अन्वयार्थ – २/मुरली मनोहरांचे अशिक्षण धोरण


मुरली मनोहरांचे अशिक्षण धोरण


 दि. १४ नोव्हेंबर रोजी केंद्रातील मनुष्यबळ विकासमंत्री मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते शालेय शिक्षणविषयक राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याचे प्रकाशन झाले. श्री. रजपूत अभ्यास गटाने दिलेल्या अहवालानुसार हा आराखडा आधारलेला आहे.
 दहावीपूर्वीच्या सर्व परीक्षा रद्द करून त्याऐवजी शालांतर्गत मूल्यमापनाची पद्धती राबवण्यात यावी. मूल्यमापन सातत्याने केले जावे व मूल्यमापनाची पद्धत सर्वंकष असावी, दहावीपर्यंत पास-नापास अशी काही भानगड ठेऊच नये, ही या अहवालातील सर्वांत सनसनाटी शिफारस आहे. गेली अनेक वर्षे शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, वार्षिक परीक्षांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यांच्या तुलनांचे तक्ते मांडून शिक्षण क्षेत्रात केवढा प्रचंड अपव्यय होत आहे याचे हिशेब मांडण्यात येतात. रजपूत समितीची शिफारस स्वीकारली, की दहावीपर्यंत तरी शिक्षणातील अपव्यय एकदम खलास होणार. पहिलीत जितके विद्यार्थी प्रवेश घेतील ते सारे दहावीपर्यंत बिनधास्त पोहोचणार. यापुढे कुणालाही 'सातवीत नापास झालो आणि शाळा सोडून घरी बसलो' असे म्हणावे लागणार नाही. दहाव्या इयत्तेपर्यंत तरी सारे थेट पोचून जाणार. शाळेतच मूल्यमापन व्हावे, वारंवार व्हावे, सातत्याने व्हावे, सर्वंकष पद्धतीने व्हावे असा कितीही निकराने आग्रह धरला तरी प्रत्यक्षात परिणाम काय होतील, हे स्पष्ट आहे. अर्थात, मुलांना नापास करणे शिक्षकांना आवडत नाही आणि शाळांना परवडत नाही. नापास विद्यार्थ्यांना खालच्या वर्गात राहिले तर वरच्या वर्गातील बाके ओस पडतात आणि शिक्षकांच्या जागा, सरकारी अनुदाने सारेच कापले जातात. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षकांनी क्रूरपणाने पेपर तपासले असे वाटते. मुले पास व्हावीत याची चिंता विद्यार्थ्यापेक्षा शिक्षकांना अधिक असते. उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थी गुण देण्याची कोठे थोडीफार तरी संधी देत आहे काय याकडे परीक्षक बारकाईने नजर ठेवून गुणांचे वाटप खिरापतीप्रमाणे करीत असतात. एवढे करूनही नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास कसे करावे, याचे आटोकाट प्रयत्न पर्यवेक्षक आणि प्राचार्य यांच्या पातळीवर होतात. शेवटी, सगळ्यांना सरसकट किती गुण दिले तर निदान निम्मे विद्यार्थी उत्तीर्ण होतील याचा हिशेब करून गुणांचा बोनस वाटला जातो. अशा परिस्थितीत, दहावीपर्यंतच्या साऱ्या परीक्षा शालांतर्गत ठेवणे म्हणजे पोस्टातल्या टपालाप्रमाणे प्रत्येक वर्षी शिक्का मारून विद्यार्थ्यांना वर ढकलणे एवढाच होईल. सारे विद्यार्थी दहावीपर्यंत पोचतील, पण 'बे'चा पाढासुद्धा न येणारे विद्यार्थी दहावीपर्यंत पोचले तर शैक्षणिक व्यवस्था संपुष्टात आली असा डांगोरा पिटणे कितपत योग्य होईल?
 परीक्षापद्धती गुणवत्ता ठरविण्याकरिता असते, घोकंपट्टीची कसोटी नसते; एक ठरावीक कसोटी लागणार आहे, त्यासाठी आवश्यक ती तयारी करावी लागते. कोणत्याही एका अडचणीला सामोरे जाऊन तिच्यावर मात करण्याची कुवत विद्यार्थ्यांत कितपत आहे याची, खरे तर, परीक्षेत चाचणी होत असते. अनुत्तीर्ण विद्यार्थी तेवढे सारे शैक्षणिक व्यय, असे एकदा मानले तर मग काही समस्या राहतच नाही. दहावीपर्यंत कशाला, सगळ्या मुलांना पदवी परीक्षेपर्यंत पोचवून का देऊ नये?
 शैक्षणिक व्यय मोजायचे मानदंड असे खुळे असून चालणार नाही. दहावीच्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांची कुवत काय असावी? याची अपेक्षा ठरली आणि त्या अपेक्षेच्या तुलनेने प्रत्यक्षातील दहावीच्या विद्यार्थ्याची कुवत कमी ठरली आणि प्रत्यक्ष व अपेक्षित कुवतीच्या तुलनेने शैक्षणिक व्ययाची टक्केवारी काढली तर त्यात काही अर्थ राहील.
 साऱ्या पास-नापास श्रेणी बाद केल्याचा काय फायदा होणार आहे? नव्या शालेय शिक्षण धोरणात राष्ट्रभक्ती व धार्मिक मूल्यांवर भर द्यावा अशी शिफारस आहे. अभ्यासक्रमाचा बोजा कमी करावा व सर्व स्तरांवरील शिक्षणात मुलांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रीयता आणि सर्व धर्मांतील मूल्यांचे धडे देण्यावर केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे.
 देशातील शालेय शिक्षणात देशभक्तीविषयी उदासीनता निर्माण झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. धर्माची खरी शिकवण समजून घेण्यास एकूण समाजालाच वेळ मिळत नाही. त्यामुळे, अभ्यासक्रमात आधारभूत मूल्यांचा समावेश करण्याचे घाटते आहे. शासन भा.ज.पा.चे आहे. हिंदू धर्माच्या सर्वंकष
श्रेष्ठत्वाविषयी अनेक धुरीणांची खात्री आहे. मनुष्यबळविकास मंत्र्यांचे तर याबाबतीत विचार सर्वधर्मसहिष्णुतेलादेखील न मानणारे आहे. अशा परिस्थितीत आधारभूत मूल्याची शिकवण सर्वधर्मसमावेशक असणार आहे, केवळ हिंदू धर्मापुरती मर्यादित नाही, हेच आश्चर्य आहे.
 धर्माच्या मूल्यांची शिकवण देणे म्हणजे नेमके अभ्यासक्रमात काय घालण्यात येईल? आजही थोर थोर संतांची वचने पाठ्यपुस्तकांत भरपूर भरण्यात येतात. 'खोटे कधी बोलू नये,' 'आईवडीलांचा आदर करावा' अशा बाळबोध धड्यांपासून ते 'अहिंसा, सत्य, अस्तेय' अशा प्रगल्भ सूत्रांपर्यंत शिकवणींची आजही पाठ्यपुस्तकांत रेलचेल आहे.
 राष्ट्रप्रेमाची भावना चेतवण्यासाठीही भरपूर मजकूर पाठ्यपुस्तकांत असतो. राष्ट्राचा इतिहास, त्यातील शूरवीरांच्या आणि थोर पुरुषांच्या जीवनकहाण्या, स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांचे बलिदान, आपल्या समाजाचा अभिमान आणि दुसऱ्या समाजांचा द्वेष हे लहान मुलांच्या कोवळ्या मनावर दडपण्याचा प्रयत्न आजही चालू आहे. भारत सरकारच्या नवीन शिक्षण धोरणामुळे त्यांत नेमका काय फरक पडणार आहे हे कुठेच स्पष्ट केलेले नाही.
 विद्यार्थ्यांच्या मनात कोवळ्या वयात ज्ञानजिज्ञासा जागृत करणे हे काम शिक्षणसंस्थांचे आहे. हे विश्व काय आहे? त्याची उत्पत्ती काय? त्याच्या चलनवलनाचे नियम कोणते? त्याच्या प्रगतीची दिशा कोणती? असे प्रश्न मुलामुलींच्या मनात उभे करणे आवश्यक आहे; पण, या प्रश्नांची कालौघातील दार्शनिक, प्रेषित, पैगंबर आणि अवतार यांनी दिलेली वेडीबागडी गोलमाल उत्तरे मुलांच्या डोक्यात कोंबून फायदा तो काय होणार?
 महाराष्ट्रात अनेक शाळा व संस्था भगवद् गीतेतील अध्यायांचे वाचन, पाठांतर नियमाने करून घेत असतात. पहिला, दुसरा, ११वा, १२वा, १३वा आणि १५वा हे भगवद्गीतेतील अध्याय मुलांकडून पाठ करून घेण्यासाठी निवडले जातात. मुलेही बिचारी ती पाठ करतात. १२व्या अध्यायाच्या पाठांतरावर खूपच जोर असतो. शिक्षक ज्ञान, कर्म आणि भक्ती यांतील भक्तिमार्गावर विशेष भर देऊ इच्छितात. त्यामुळे, १२वा अध्याय खास लाडका झाला असावा काय? सांख्ययोग, क्षेत्र-क्षेत्रज्ञ विचार हे जाणीवपूर्वक कोपऱ्यात ढकलले जातात काय? का १२वा भक्तिमार्गावरील अध्याय सर्वांत छोटा म्हणून निवडला जातो?
 सर्व धर्मांच्या शिकवणी पुस्तकांत घातल्याने धर्मशिक्षण सर्वंकष होते, असे नाही. एकाच धर्मातील वेगळे वेगळे विचार, वेगळे वेगळे पंथ विद्यार्थ्यांना
माहीत होणे आवश्यक आहे. अन्यथा, चार्वाक का शंकर, यांतील निवड करण्याचा अधिकार शिक्षण खात्यातील नोकरशाहीच्या हाती एकवटून जाईल.
 धर्म जिज्ञासा जागृत कशी करता येते याचा अनुभव घेण्याचे भाग्य मला काही थोर शिक्षकांमुळे लाभले. मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजात प्राचार्य एस.के. मुरंजन आठवड्यातून एक दिवस आत्मचिंतनचा कार्यक्रम ठेवीत. या कार्यक्रमात त्यांनी विश्वाचे अनंत स्वरूप वेगवेगळ्या तऱ्हांनी मांडले. ज्ञानेंद्रियांची त्रोटकता समजावून सांगताना आकाशात तारे दिसतात म्हणजे ते आहेत असे नाही, दिसतात याचा अर्थ काही प्रकाशवर्षांपूर्वी ते तारे होते असे त्यांच्या तोंडून ऐकताच डोक्यात झिणझिण्या उठत. 'ईश्वराच्या साक्षात्काराचा अनुभव सेंट पीटरपासून अनेकांनी सांगितला आहे. अशा अनुभवांचा भास आकडी (Epilepsy)च्या आजाराच्या अनुभवाने येऊ शकतो असे मानण्यात धार्मिकांचा काही उपमर्द नाही. काही आजार विश्वाच्या आकलनाचा मार्ग सुलभ करून देतात, एवढेच फारतर तात्पर्य निघते.' एवढी स्पष्ट मांडणी ते करीत. रसेलचा ट्रिस्ट्रॅम सॅण्डी आत्मचरित्र लिहायचे ठरवतो. अगदी बारीकसारीक तपशीलसुद्धा नोंदवायचा निश्चय करतो. एका दिवसाचे चरित्र लिहिण्यासाठी त्याला एक वर्ष लागते. बोला, त्याचे आत्मचरित्र कधी लिहून पुरे होईल? असे त्यांनी विचारताच आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात उत्तर लगेच तयार - शक्यच नाही. मग प्राचार्यांनी अनंत दिवस = अनंत महिने हे गणिती समीकरण सांगितले आणि कोणत्याही सात कालखंडात अशक्य असणारी ही गोष्ट अनंतात शक्यप्राय होते याची जाणीव होताच आम्ही सारे भांबावलो; पण डोक्यात धर्मजिज्ञासा जागृत झाली. अनंताच्या नेढ्यातून पुढे जाताना जग उलटेपालटे होते आणि लुई कॅरोलच्या आरशापलीकडील जग कथेप्रमाणे सारेच काही अनुभव उलटेपालटे होतात. या भूलभुलैयाने थोर थोर विचारवंत प्रेषित चकले. सांत विश्वातील नियम त्यानी अनंतावर लादले, त्यातून ज्ञानमार्गातील ईश्वराची भाकडकथा तयार झाली. या असल्या, बुद्धी चेतवणाऱ्या जिज्ञासा जागृत करणाऱ्या आत्मचिंतनाच्या प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांचा फायदा होईल यात काही शंका नाही; पण
 स्वतः प्रमाणम् परतः प्रमाणम् नैको मुनिर्यस्य मतमभिन्नम्
 धर्मस्य तत्त्वम् निहितम् गुहायः महाजनो येन गतः स पंथः
 या उक्तीप्रमाणे धर्माचे तत्त्व जाणून घेण्याची इच्छा तयार करण्याऐवजी केवळ पाठांतर आणि घोकंपट्टी या प्रशस्त मार्गाने विद्यार्थ्यांना हाकीत नेण्यात आले तर त्याचा विपरीत परिणाम होण्याचा भरपूर धोका आहे. आजच्या जगात
पाऊस पडण्यासाठी यज्ञकर्म जागोजाग होतात, तेथे लोक उत्साहाने जमतात. पण, असल्या कर्मकांडाला बौद्धिक प्रतिष्ठा नाही. गीतेतील 'यज्ञात् भवति पर्जन्यः' हे पाठ करून विद्याथ्यांनी नंतर भूगोलाचा आणि हवामानशास्त्राचा अभ्यास करावा कसा? आणि 'संकरो भयावहः' पाठ करून जैविक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बीजसंकराचे काम निष्ठेने करावे कसे? उपनिषदांतील शिकवणुकीचे मर्म ध्यानी आल्यानंतर वेदांचे महत्त्व ते काय? पाण्याचे सरोवर मिळाल्यानंतर परसातील कूपाचे ते काय महत्त्व? वेदांतील कर्मकांडांना भुललेले आणि त्यापलीकडे काही नाही असे बेडकांप्रमाणे ओरडणारे यांच्यावर केलेला भगवद्गीतेतील शेलक्या वचनांचा मारा ऐकून वेद आणि उपनिषदे यांच्यातील संघर्षाचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले तर ते शिक्षण खात्याला आणि शासन संस्थेला परवडणार आहे का?
 राष्ट्राभिमानाच्या शिकवणुकीतही असेच सारे धोके आहेत. मी मराठी शाळेचा विद्यार्थी. शिवाजी महाराज हे आमचे दैवत. कर्नाटकातील कोणा यल्लम्मा राणीने केलेला शिवाजीचा पराभव आणि केलेली फजिती याची कहाणी ऐकल्यावर राष्ट्र म्हणजे नेमके कोणते हा प्रश्न मनात उठला. शेतकरी संघटनेचे काम सुरू केले त्याआधी 'भारत' आणि 'इंडिया' यांतील द्वंद्व कळले. कोणत्या राष्ट्राची बाजू घेऊन आपण उभे राहायचे आहे हेच कळेनासे झाले आहे. राष्ट्रांचा इतिहास विजेते लिहितात आणि जितांवर तो लादतात. चांगल्या हुशार विद्यार्थ्याच्या मनातही भारत म्हटले म्हणजे आपापल्या सभोवतालच्या प्रदेशाचेच चित्र येते; आसाम, नागभूमी, लक्षद्वीप यांचा विचार येत नाही. शालेय पाठ्यपुस्तकांत नेमक्या कोणत्या राष्ट्राच्या प्रेमाचे पोवाडे गायिले जाणार आहेत? वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या राष्ट्रांचा अभिमान शिकवला गेला तर त्यातून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल की तिला तडा जाईल?
 नाझी जर्मनीत आणि समाजवादी रशियात तसेच बहुतेक सर्व राष्ट्रांत राजकीय सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता वर्तमानात तर चालवायचीच; पण ती भविष्यकाळातही दीर्घ काळ चालावी यासाठी लहान विद्यार्थ्यांच्या मेंदूवर बलात्कार करायचे मेंदूसफाई (Brain Washing)चे तंत्र विकसित केले. आपल्या देशातही धर्म, राष्ट्र, इतिहास यांच्या शासनसंमत संकल्पना मुलांच्या डोक्यावर लादण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे राज्य आले, त्यांनी त्यांना अनुकूल असलेल्या व्यक्तींना मोठे केले; त्यांचा विचार प्रभावशाली राहावा यासाठी पाठ्यपुस्तकांच्या आधारे विद्यार्थ्यांची कोवळी मने दडपून टाकली. आता नवा पक्ष सत्तेवर आला
आहे. त्याने आता धर्मभावना आणि राष्ट्रवाद यांची त्यांच्या पक्षाची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवून दीर्घकाळपर्यन्त आपले मतदारसंघ शाबूत रहातील याची व्यवस्था करण्याचे योजले आहे. हे असले शिक्षणक्रम स्वीकारले गेले तर दहावीपर्यन्तच काय, अगदी शेवटपर्यन्त कोणत्याच परीक्षांचे कोणतेच प्रयोजन राहणार नाही. धर्मभावना आणि राष्ट्रप्रेम शाळेत प्रवेश करण्याआधीही एखाद्या संस्कारित विद्यार्थ्याच्या मनात प्रचंड चेतलेले असतील तर, दहावीपर्यन्त एक दशक धर्मतत्त्वांचे आणि राष्ट्रवादाचे धडे घोकलेल्या विद्यार्थ्याच्या मनात त्यांची शिकवण स्पर्शही करू शकलेली नसेल ही शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, परीक्षांचे काही कामच राहत नाही. शिक्षणच अशिक्षण झाले तर परीक्षा घ्यायचीच कशाची? एका बाजूला पंतप्रधान 'जय विज्ञान' अशी घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षातील कठमुल्ले विज्ञानविरोधी धोरणे राबवतात, त्याबद्दल पंतप्रधान काहीही करू शकत नाहीत. एवढेच रजपूतप्रणित 'मुरली मनोहर जोशी शिक्षणधोरणा'चे तात्पर्य!

दि. २३/११/२०००
■ ■