अन्वयार्थ – २/WTO चे विरोधक आणि त्यांचे धनदांडगे मालक


WTO चे विरोधक आणि त्यांचे धनदांडगे मालक


 र्थिक सुधार, जागतिकीकरण यासंबंधी देशभर चर्चा चालू आहे. त्यात खुलिकरणाची बाजू हिरीरीने मांडणारी प्रमुख आघाडी शेतकरी संघटनेने सांभाळली आहे. याउलट, स्वदेशी जागरण मंच, राजीव दीक्षित, गुरू मूर्ती अशी मंडळी खुल्या बाजारपेठेच्या व्यवस्थेला कडाडून विरोध करणारी आहेत. त्यांचा देशातील अर्थव्यवस्थेत खुलेपणा आणण्याला विरोध आहेच; पण त्याहीपेक्षा जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियंत्रणाखाली व्यापार खुला झाला तर त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाताहत होईल, परदेशी मालाचे लोट भारतात येऊ लागतील, त्यांच्याशी स्पर्धा करणे शेतकऱ्यांना तर सोडाच, भारतीय कारखानदारांनाही शक्य होणार नाही, देशभर मंदीची लाट येईल, बेकारी वाढेल; बौद्धिक संपदेचा हक्क मान्य केला तर देशात शतकानुशतकांच्या परंपरेने निर्माण झालेली वनस्पतींची मौलिक संपदा परदेशी उद्योजक गिळंकृत करतील असे ते आग्रहाने मांडतात. WTO ही जणू काही एक महाराक्षस आहे आणि तिच्या कचाट्यातून भारतीय अर्थव्यवस्थेला वाचविणे हे आपले अवतारकार्य आहे असे मानून ही मंडळी साम्यवादी, संघवादी, गांधीवादी आणि इतर फुटकळ स्वयंसेवी संघटना यांची आघाडी बांधीत आहेत. शेतकरी नेते म्हणविणारी काही मंडळीही त्यांनी हाताशी धरली आहेत आणि आयात झालेला माल बंदरातच नष्ट करून टाकणे, ठिकठिकाणी, खुद्द देशाच्या राजधानीतही मोठमोठे मेळावे, निदर्शने घडवून आणणे असे कार्यक्रम त्यांनी जाहीर केले आहेत.
 ८ डिसेंबर रोजी बंगळूर येथे देशाच्या यापुढील आर्थिक धोरणासंबंधी एक परिसंवाद होता. शेतीसंबंधीच्या सत्राचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. उद्घाटनाच्या सत्रात मी उपस्थित राहू शकलो नाही. त्या सत्रात श्री. गुरुमूर्ती, इंदिरा काँग्रेसचे श्री. रमेश जयराम आणि नागालँण्डपासून सौराष्ट्रापर्यंत पसरलेल्या अनेक स्वयंसेवी
संघटनांचे मुखंड यांनी मोठ्या जोरदारपणे सर्वच खुलिकरणाला विरोध केला. विशेषतः, 'WTO म्हणजे तर देशावर आलेले एक परचक्र आहे, या कारस्थानाला भारताने बळी पडू नये' असे त्यांनी प्रतिपादन केले.
 दुसरे दिवशी सकाळी, माझे सत्र सुरू होण्यापूर्वी, चहाच्या टेबलावर गुरूमूर्ती मला भेटले, रमेश जयरामही भेटले. औपचारिक शिष्टाचारादाखल नमस्कारचमत्कार झाले. राष्ट्रीय कृषिवलाचा अध्यक्ष म्हणून मला निमंत्रण असल्यामुळे, साहजिकच, मी शुभ्र पांढऱ्या सुती कपड्यात गेलो होतो. गुरुमूर्तीनी खवचटपणा दाखवला आणि म्हटले, या कपड्यात तुम्ही शेतकऱ्यांपुढे गेलात तर तुमची खुली व्यवस्थावादी मांडणी शेतकऱ्यांना, कदाचित्, अधिक सहजपणे पटेल. चहाच्या प्रसंगी वादंग घालण्याची इच्छा नसल्याने मी फक्त, तर्काने आणि पुराव्याने समजूत पटली नाही, माझ्या कपड्यांमुळे पटली तरीही काही वाईट नाही, एवढेच उत्तर दिले आणि शेतीविषयक सत्राच्या सभागृहाकडे जाऊ लागलो. थोड्याच वेळात गुरुमूर्ती यांनी धावत धावत येऊन मला गाठले आणि मोठे रहस्य सांगत असल्याच्या सुरात म्हटले, "जोशीजी, एक गोष्ट ध्यानात ठेवा. WTO खलास होणार आहे; आमच्यामुळे नाही, श्रीमंत देशांनाच ती नको आहे म्हणून WTO बुडणार आहे. त्यांच्या शेतकऱ्यांना देण्यात येणारी अनुदाने संपुष्टात आणण्याची गोष्टच सोडा, कमी करायलादेखील अमेरिका, जपान आणि युरोपीय देश तयार होणार नाहीत. WTO च्या वाटाघाटींच्या नव्या फेरी निष्फळ ठरणार आहेत."
 अमेरिकेतील सीएटल येथे मंत्रिपातळीच्या वाटाघाटी डिसेंबर ९९ मध्ये व्हायच्या होत्या. WTOच्या विरोधकांनी तेथेसुद्धा प्रचंड निदर्शने केली आणि वाटाघाटी आटोपत्या घ्याव्या लागल्या. हा इतिहास सर्वांना माहीत आहे. आपल्या संघटित शक्तीविषयी विरोधकांना बराच आत्मविश्वास आलेला दिसतो आहे, असा काहीसा भाव माझ्याही चेहऱ्यावर उमटला असावा. तो हेरून गुरुमूर्ती म्हणाले, आमच्यामुळे नाही, श्रीमंत राष्ट्रांच्या भूमिकेमुळेच WTO संपणार आहे. WTOला विरोध करताना आपण गरीब देशांच्या हितापोटी बोलतो आहोत, असा आव आणणाऱ्यांनी श्रीमंत देशच जागतिकीकरणाच्या व्यवस्थेचा गर्भपात करणार आहेत या शक्यतेबद्दल आनंद मानावा हे मोठे विचित्रच! आपल्या बोलण्यातील दुष्ट विसंगती गुरुमूर्ती यांच्या लक्षात आली नसावी.
 मीही, वेळ नसल्यामुळे, थोडक्यात उत्तर दिले, म्हणजे आता तुमचे 'बोलविते धनी' WTO हाणून पाडण्याचे काम जातीने स्वतःच करणार आहेत असे
म्हणायचे.
 यापुढे त्याठिकाणी अधिक चर्चा होणे शक्य नव्हते. गुरुमूर्ती आपल्या कामाकडे निघून गेले, मी माझ्या.
 'जागतिकीकरणाची WTO-व्यवस्था कोसळली म्हणजे बाजारपेठेच्या अर्थशास्त्राचा समूळ उच्छेद होणार; सोवियट युनियनचे पतन झाल्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्थेचा ऐतिहासिक जागतिक पराभव झाला, त्याच धर्तीवर येत्या वर्षभरात बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा पाडाव होणार आहे, होणार आहे' अशी स्वप्ने पाहणारे भले पाहोत, त्यात त्यांचा फक्त अजाणपणा दिसून येतो.
 देशादेशांतील भिंती पडाव्यात आणि जगातील देशादेशांत श्रमविभागणी ज्याच्या त्याच्या औकातीप्रमाणे व्हावी यासाठीचे प्रयत्न म्हणजे काही मॅराकेश येथे १९९५ मध्ये तयार झालेला बुडबुडा नाही. दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापार घटत गेला आणि शेवटी महाविद्ध्वंसक जागतिक युद्ध छेडले गेले. अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी GATTच्या झेंड्याखाली जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी क्षणाक्षणाने आणि कणाकणाने प्रयत्न केले. त्यातून तयार झालेले WTO हे एक भव्य स्वप्न आहे. WTO च्या कारारमदारांत सगळे काही ठीकठाकच आहे, असा आग्रह कोणीच धरत नाही. सरकारी हस्तक्षेपाने अर्थव्यवस्थेचे पाणी गढूळ होऊन जाते. तो हस्तक्षेप किमान कसा करावा; कोणती सरकारी ढवळाढवळ खपवून घेतली जाईल, कोणती नाही यासंबंधीची नियमावली WTOने तयार केली. कोणताही नियम किंवा कायदा म्हटले, की तो मोडणारे, त्याच्याशी लपाछपी करणारे निघतातच. त्यांचा बंदोबस्त कसा करावा? WTO च्या पूर्वी धनदांडगी राष्ट्रे एकतर्फी फर्माने काढीत. त्यांच्यापुढे मान तुकविण्याखेरीज इतर राष्ट्रांना काही पर्यायच उरत नव्हता. WTO च्या करारामुळे ही परिस्थिती बदलली. सुपर ३०१, स्पेशल ३०१ यांच्या आधारे दादागिरी करणाऱ्या अमेरिकेलादेखील WTO च्या वांधा समितीत इतर सर्व देशांच्या बरोबरीनेच मतदानाचा हक्क घेऊन बसावे लागते. आजपर्यंत अनेक निर्णय त्यांच्या विरुद्धही गेले. काही वर्षांच्या अनुभवांनी अधिकाअधिक संस्कारित व्यवस्था तयार होईल आणि जगाच्या इतिहासात पहिल्यांदा जगातील सारी राष्ट्र एकमेकांशी वस्तूंची आणि सेवांची देवाणघेवाण करू लागतील अशी शक्यता तयार झाली असता तिची भ्रूणहत्या करण्याचा करंटेपणा काही 'शुभ बोल नाऱ्यां'ना सुचतो आहे हे मानव जातीचे दुर्दैव म्हणायचे.
 आपल्या देशापुरतेच बोलायचे झाले तरी, शेतकऱ्यांच्या व्यापारात खुलेपणा
यावा, सरकारी बंधने असू नयेत, मक्तेदारी असू नये, जिल्हाबंदी नको, राज्यबंदी नको, निर्यातबंदी नको, सरकारी आतबट्ट्याची आयात नको याकरिता शेतकरी संघटनांनी २० वर्षांपूर्वी शिंग फुकले. वर्षानुवर्षांच्या अंधारानंतर सूर्योदयाची पहाट शेतकरी पाहत असताना, उष:काल होता होता काळरात्र आली असे दुर्दैवाने घडलेच तर, माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर आलेला शेतकरी निराश होत्साता स्वस्थ बसणार नाही. एक WTO बुडले तर WTO-२ उभे करू, तेही बुडले तर WTO-३ उभे करू; पण अखेरीस सरकारी हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था केल्याशिवाय शेतकरी विश्राम घेईल अशी काहीही शक्यता नाही.
 जागतिकीकरण हा काही केवळ वस्तू आणि सेवांच्या व्यापाराचा विषय नाही. एकमेकांशी संपर्क साधण्याची व्यवस्था मर्यादित होती तेव्हा गाव, छोटी छोटी राज्ये ही एकके उभी राहिली. संचारक्षमता वाढल्यानंतर राष्ट्रांचा उदय झाला. पण, संचारक्षमता पुरेशी नसल्या कारणाने दूरदेशीच्या समानधर्म्यांशी संपर्क दुष्कर झाल्यामुळे ज्याच्याशी संपर्क साधता येतो तो निकटवासीच समानधर्मा असे मानण्याची मजबुरी मानवाच्या पुत्रावर आली. आता ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात काय चालले आहे याची माहिती तत्क्षणीच साऱ्या जगभर प्रत्यक्ष चक्षूंनी पाहता येते. ज्याला काही म्हणायचे असेल त्याला आता अरण्यरुदन करण्याची आवश्यकता नाही; इंटरनेटच्या फळ्यावर एक चिट्ठी डकवून दिली, की ती साऱ्या जगासमोर जाते. एखाद्या विषयासंबंधी माहिती हवी असेल तर गणनायकाच्या वाहनाचा नवा अवतार गणकयंत्राचा नवा 'मूषक' तत्काळ ती समोर सादर करतो. एकमेकांशी खुलेपणाने संपर्क साधू शकणारा मानवाचा आजचा पुत्र परस्परांतील संबंध अधिकाअधिक घट्ट करणार आहे. या प्रयत्नाच्या आड कोणी भिंती घालू पाहील तर बर्लिन भिंतीची जी दशा झाली तीच अशा अडथळ्यांच्या भिंतींची होईल.
 जागतिक व्यापार व्यवस्था आता कोसळेल, आता कोसळेल आणि, पुन्हा एकदा स्वयंमन्य शासने आणि नोकरशहा मनमानी करण्यासाठी मोकळे होतील अशी शेखमहंमदी स्वप्ने पाहण्यात ज्यांना आनंद वाटत असेल त्यांनी तो आनंद भले घ्यावा; फक्त, मस्तीत येऊन शेखमहंमदाप्रमाणे मडके फोडू नये, एवढी काळजी घेतली तरी पुरे झाले.

दि. १३/१२/२०००
■ ■