अन्वयार्थ - १/चोर, हर्षद, कवी, शास्त्रज्ञ आणि डंकेल
शेअर बाजार घोटाळ्याचे प्रकरण सगळीकडे गाजले आहे. हजारो कोटी रुपयांचा घपला, त्यात मोठमोठ्या लोकांचे हात गुंतलेले. शेअर बाजारातील रामायणाचा नायक म्हणजे हर्षद मेहता. त्यांच्या पराक्रमाने अयोध्येचा रामसुद्धा मागे पडला. आजपर्यंत जो काही पुरावा पुढे आला आहे त्यावरून भूपेन दलाल, कृष्णमूर्ती इ. काही मंडळी या एकूण घोटाळ्यास हर्षद मेहतापेक्षा जास्त जबाबदार आहेत; पण सर्वमुखी नाव झाले आहे हर्षद मेहताचे.
चोर आणि हर्षद
दहावीस हजार रुपयांचा दरोडा घालणारा टोळीवाला पोलिसांनी पकडला म्हणजे लोक त्याला पाहायला जमतात. "काय भयानक खतरनाक माणूस!" अशा थोड्या भयाने लोक त्याला पाहायला जमतात. हर्षदने केलेला घपला तीनचार हजार कोटींचा. त्याच्या कारवायांमुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत; पण त्याच्याविषयी चर्चा, "काय भयानक माणूस आहे!" अशी नाही, "पठ्ठा बहाद्दर आहे; पण थोडा फसला, नशीब बेकार!" अशा स्वरात.
एखादं फाटकं पोर पाचपंचवीस रुपयांकरिता खिसा कापायला जाते. जर का सापडलं तर आसपासचे सगळे लोक निर्दयपणे लाथाबक्क्यांनी त्याला तुडवून काढतात. मारणाऱ्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठा संताप आणि त्या फाटक्या पोराविषयी राग राग असतो.
हर्षद मेहताने सगळ्या समाजाचा खिसा कापला, थोडा थोडक्याला नाही दोन-तीन हजार कोटीला कापला; पण कोर्टाच्या आवारात त्याला पाहायला जमलेल्या लोकांमध्ये 'ठोका लेकाला' अशी भावना नसते. "आहे कर्तबगार; पण चुकला, भोगेल बिचारा, आपल्या कर्माची फळे," अशी भावना असते.
चाकू, कुऱ्हाड वापरून दरोडा घातला म्हणजे त्याच्याविषयी लोकांमध्ये संताप आणि तिरस्कार आणि कोर्टामध्ये कडक सजा. धारेच्या पात्याने खिसा कापणाऱ्या पोराला लोकांची मारहाण, पोलिसांची मारपीट आणि वर तुरुंग; पण लेखणीच्या शाईने किंवा कॉम्प्युटरच्या आधाराने हजारो कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या हर्षदबद्दल मात्र वेगळीच भावना, मुंबईला आता 'हर्षद फॅन' क्लब निघाले आहेत. "शेअर बाजार का एकही मर्द, हर्षद हर्षद" अशा घोषणांचे फलक जागोजाग लागत आहेत.
दीड दांडीचा तराजू
नैतिक काय? अनैतिक काय? कोणते कर्म म्हणजे गुन्हा? त्याची गंभीरता काय? आणि शिक्षा काय? या विषयीच्या कल्पना, नियम आणि कायदे पैसेवाल्यांच्या आणि लेखणीवाल्यांच्या मोठ्या सोयीसोयीने बनवले आहे. सुरा, बंदूक वापरली तर फाशी, तोच गुन्हा लेखणी वापरून केला तर जास्तीतजास्त वर्षा-दोन वर्षांची सजा! जमिनीच्या वादावरून डोक्यात कुऱ्हाड घालून अडाणी शेतकऱ्याने खून केला, तर त्याची फाशी निश्चित; पण तीच मनुष्यहत्या एखाद्या सुशिक्षित माणसाने पिस्तुलाने किंवा विषप्रयोगाने केली, तर जास्तीतजास्त जन्मठेपेने सुटणार! चार हजार कोटीची भानगड करणाऱ्या हर्षद मेहताला कायद्याच्या तरतुदीनुसार जास्तीतजास्त चार-पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. तेवढीदेखील प्रत्यक्षात व्हायची नाही. भरपाईपोटी दंड आणि दोनएक वर्षांची शिक्षा म्हणजे कमाल होईल. तेदेखील तो कमी शिकलेल्या गरिबाचा मुलगा म्हणून. उच्च शिक्षित, देशातील सर्वोच्च पदांना विभूषित केलेल्या कृष्णमूर्तीना तेवढीसुद्धा शिक्षा व्हायची नाही.
अपहार अडाण्यांनी केला तर शिक्षा कठोर, शहण्यांनी केला तर शिक्षा हलकी. खिसा कापणाऱ्या पोराला जीवघेणा मार, खोटे कागदपत्र करून घपला करणाऱ्याचा प्रसंगी जयजयकार, अशी काही विचित्र व्यवस्था आहे.
अदंड्य ब्राह्मण
मुसलमानी अमलात इस्लामच्या पाक बंद्यांकरिता वेगळा कायदा आणि काफिरांकरिता वेगळा दंड अशी व्यवस्था होती. मनुस्मृतीत शुद्राला साध्या चोरीकरितासुद्धा अमानुज शिक्षा; पण ब्राह्मणमात्र अदंड्य, असे स्पष्टच सांगितले आहे. औरंगजेबाच्या आणि मनुच्या व्यवस्थांविषयी वाचताना आज मोठे चमत्कारिक वाटते; पण असाच दीड दांडीचा तराजू न्यायव्यवस्थेत आजही आहे. सुशिक्षितांनी केलेला गुन्हा गुन्हाच नाही, असे ठरवणाऱ्या नीतीमत्तेची आणखी काही गमतीची उदाहरणे देता येतील.
इंग्रजी पुस्तकातील कवींच्या कल्पना हूबहू उत्तरवून मराठीत काव्यसंपदा साधणाऱ्यांचा एक मोठा जमाना होऊन गेला. केशव कुमारांनी असल्या कावड्यांची भंबेरी उडवली. 'कवी आणि चोर' या कवितेत त्यांच्यातील साम्य दाखविले; पण कवी आणि लेखकांच्या चौर्यकाला कुठे सक्तमजुरीची शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. उचलेगिरी करून कवी आणि लेखक केवळ धनच नाही, मानसन्मानही मिळवतात.
ना.सी. फडके यांचे 'प्रतिभासाधन' हे गाजलेले पुस्तक एका पाश्चिमात्य ग्रंथावरून सरळसरळ घेतल्याचे सिद्ध झाले. फडक्यांचे थोडे हसे झाले; पण त्यांना काही तुरुंगात जावे लागले नाही. आजही वाङ्मय - चौर्याचा धंदा राजरोस चालू आहे. इंग्रजी पुस्तकातून चोरणे आता फारसे सुरक्षित राहिले नाही; पण एखादी रशियन, फ्रेंच, जपानीसारखी भाषा येत असली तर त्या भाषांतून चौर्य करण्यात धास्ती काहीच नाही. केशवकुमारांचीच ओळ आहे : "परवाङ्मयाची भांडारे, आम्हासाठीच ना बरे! खुली तयाची तुजला द्वारे, चिंता न करी."
शास्त्रज्ञांच्या चोऱ्या
वाङ्मयाच्या बाबतीत जे खरे तेच संशोधनाच्या बाबतीत. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा विषयांत गेल्या पन्नास वर्षांत हजारो डॉक्टरेटचे प्रबंध झाले असतील; पण त्यात काही स्वतंत्र मांडणी केलेला प्रबंध शोधायला गेले, तर सापडणे जवळजवळ अशक्य. "परीक्षा म्हणजे एका ठिकाणची चोरून केलेली कॉपी आणि प्रबंध म्हणजे पाच-पन्नास ग्रंथांतून केलेली राजरोस चोरी!" असे विश्वविद्यालयातील विद्वान मंडळी उघडपणे मानतातच. फक्त समाजशास्त्रीय विषयातच हे खरे आहे, असे नाही. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इ. भौतिकशास्त्रातही हा उचलेपणाचा धंदा करून अनेकजण स्वतंत्र प्रतिभेचे शास्त्रज्ञ म्हणून मान्यता पावले आहेत. त्यांनी केलेल्या चौर्य कर्माला शिक्षा तर सोडाच मान्यता आहे.
'एकाचा वध म्हणजे खून, हजारोंची राजरोस हत्या म्हणजे देशप्रेम,' असे सीझरचे वाक्य आहे. तो नियम सुशिक्षितांच्या चौर्यकर्मासही लागतो. त्यांनी केलेली चोरी गुन्हा तर नाही; पण त्यांचे चौर्यकर्म हे एक थोर कार्य आहे. ही एक देशसेवा आहे. असे जाहीररित्या प्रतिपादन केले जाते. परदेशातील शास्त्रज्ञांनी आणि संस्थांनी कोट्यवधी रुपये खर्चुन अथक परिश्रमांनी संशोधन केलेले असो, त्यांच्याकडून उचलून घेण्याचा आम्हाला हक्कच आहे. आम्हाला ते राजरोसपणे उचलून घेता आलेच पाहिजे. एवढेच नव्हे, तर या उचलेगिरीच्या कामाला सगळ्या सोयीसवलती, सुविधा मिळायला पाहिजे. इतक्या की, या संशोधनाच्या मालकांनी आपणहून ते संशोधन ते आमच्या हवाली केले पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचा प्रतिबंध असता कामा नये, असे मोठे डौलाने म्हटले जाते. डंकेल प्रस्तावाच्या विरोधकांचे युक्तिवाद हे सुशिक्षितांच्या गुन्हेगारीला ब्रह्मकर्माचे स्थान देणारे आहेतच.
सर्व खिसेकापूंना आणि अगदी हर्षद मेहतांना देण्यासारखा सल्ला एकच, 'बाबाहो! इतके धोका असलेले चौर्यकर्म तुम्ही का करता? विद्यापीठात जा, संशोधन शाळांत जा. खुलेआम चोऱ्या करा. फायदा अफाट आहे. धोका काही नाही. विशेष माहिती आणि सल्ल्यासाठी डंकेल विरोधकांना भेटा.
धन्य ते चौर्य जाणावे।
अब्रू जे जगी वाढवी
धिक धिक चौर्य मित्रा
जे नाव लौकि घालवी
(केशवकुमार)
(दि. २८ ऑक्टोबर १९९२)
■ ■