अन्वयार्थ - १/नव्या शतकातील माणूस- माणूस असेल


नव्या शतकातील माणूस - माणूस असेल


 त्क्रांतीच्या प्रवाहात माणसाची निर्मिती झाली. माकडासारखा दिसणारा माणूस हळूहळू सरळ ताठ चालू लागला. त्याचा चेहरामोहरा बदलला. आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करण्याची त्याची क्षमता वाढत गेली. साधने, अवजारे, यंत्रे संपादून तो साऱ्या पृथ्वीचा मालक बनला. धर्म, जाती, राष्ट्र, व्यावसायिक संस्था अशा विविध प्रकारच्या संघटना बनवून आपले प्रभुत्व त्याने आणखी मजबूत केले.
 पण माणसांच्या समाजात हरघडी मोठ्या जटील समस्या उभ्या राहतात. सुखासमाधानाने गुण्यागोविंदाने नांदण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करणे, लांडीलबाडी, चोरी दरवडे, खून, भ्रष्टाचार असले प्रकार माणसे करतात, एवढेच नव्हे तर संघटितरित्या आक्रमण, जाळपोळ, लुटालूट, शोषण करीत राहतात. असल्या प्रकारांना आळा घालण्याकरिता कोणा धर्ममार्तंडाला मानावे, कोणा राजा सम्राटाचे सार्वभौमत्व मानावे, कोणा पंतप्रधानाकडे, संसदेकडे सत्ता सोपवावी तर भ्रष्टाचार सत्तेला खाऊन जातो. 'सत्ता तेथे भ्रष्टाचार' या नियमाला अपवाद मोठा दुर्मिळ.
 माणूस सुधारला नाही
 या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी थोर थोर विचारवंतांनी वेगवेगळे मार्ग सुचविले.
 इहलोकातील खोट्या सुखांकडे लक्ष देण्याऐवजी इथे त्यांच्याविषयी उदासीन राहावे, 'दुःख तप्तानाम् प्राणिनाम् आर्तिनाशनम्' हे जीवित्व मानावे म्हणजे मोक्ष मिळेल, स्वर्ग मिळेल अशी लालूच हरेक धर्माने दाखवली. कुलासाठी व्यक्तीचा त्याग करावा, गावासाठी घराचा, राष्ट्रासाठी गावाचा, असा आदर्श घालून स्वतःच्या स्वार्थावर पाणी सोडण्यास माणसे तयार करावी, असा प्रयत्न राष्ट्रवाद्यांनी केला.
 आपापल्या सामर्थ्यानुसार समाजाला द्यावे आणि गरजेपुरतेच समाजाकडून घ्यावे, असा समाजवादी आदर्श देऊन मार्क्सवाद्यांनी एक वेगळी संस्कृती तयार करण्याचा प्रयत्न केला.
 आपल्याजवळची मालमत्ता 'विश्वस्त' भावनेने जोपासावी, अशा नैतिकतेवर सर्व समाजरचना उभारण्याचे स्वप्न गांधीवाद्यांनी पाहिले.
 पण माणूस जसाच्या तसा राहिला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सारे षड्पुि त्याला जन्मतःच घेरतात आणि जन्मभर त्याचा पाठपुरावा करतात आणि माणसांचे सगळे आयुष्य दुःखमय करून टाकतात. सगळ्या उत्क्रांतीत माणसाचा मूळ स्वभाव काही बदलला नाही. त्याचे सामर्थ्य वाढत गेले आणि प्रकृती रानटीच राहिली. परिणाम असा झाला, की जंगलात फिरणारा रानवट पूर्वज एखाद दुसऱ्या माणसाचे डोके फोडी, तेथे सुधारलेला वंशज गावेच्या गावे, शहरेच्या शहरे, प्रदेशच्या प्रदेश उद्ध्वस्त करू शकत आहे. माणूस माणूस कसा बनायचा हा मोठा यक्षप्रश्न आहे.
 विज्ञानाला आव्हान
 माणसाला जे प्रश्न सुटत नाहीत ते सोडवण्याच्या कामी माणसानेच शोधलेले आणि निर्माण केलेले विज्ञान, तंत्रज्ञान येते. वाढती लोकसंख्या भुकेपोटी मेली असती; पण बियाण्यांच्या नव्या वाणांनी आणि सुधारित शेतीने वाढत्या तोंडांना पुरून उरेल इतकी धनधान्याची मुबलकता तयार केली. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती तर इतकी झपाट्याने झाली, की माणसाचे आयुष्यमान गेल्या चाळीस वर्षांत जवळजवळ दुप्पट झाले. गणकयंत्रे, दूरदर्शन, संचारव्यवस्था यांच्या अक्षरशः गगनभेदी उड्डाणामुळे माणसाच्या दैनंदिन आयुष्यात मोठा गुणात्मक फरक घडत आहे. आजपर्यंत माणसाला थोडाफार माणूस बनवले ते तंत्रज्ञानाने, माणसाने नाही ! अवतारांना, प्रषितांना, संत महात्म्यांना जे जमले नाही, राष्ट्रधुरंधर, समाजवादी यांना जे पेलले नाही, ते खुद्द माणसात गुणात्मक बदल घडवून आणण्याचे काम शास्त्रविज्ञान करील असे दिसत आहे.
  'जडा' पलीकडील विज्ञान
 नवे विज्ञान 'जड', 'चेतना' असल्या कल्पनांबद्दल प्रश्नचिन्ह उभे करीत आहे, एवढेच नव्हे, तर स्थलकालाच्या पारंपरिक कल्पना नाकारत आहे. 'क्वान्टम सिद्धांतां'नंतर पदार्थविज्ञान शास्त्रात एक मोठी क्रांती घडून आली. जडांवर प्रयोग करणारे हे शास्त्र जागोजागी जडापलीकडील अनुभव नोंदवण्याच्या अवस्थेत आले आहे. नोंदवू लागले आहे. मानसोपचार शास्त्र याच्या नेमक्या उलट्या दिशेने पुढे जात आहे. मनोरुग्णांच्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या घटना, दुःख, धक्के यापेक्षा रुग्णांच्या शरीरातील, रसायनांच्या क्रियाप्रक्रियांवर आता अधिकाधिक भर दिला जात आहे. मनोवैद्यक जडाकडे वळत आहे तर वैद्यक नेमक्या उलट्या दिशेकडे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांतील वाटचालींचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे.
 सुप्त भूतकाळ
 मिल्टन एरिक्सन यांच्या एका स्त्री रुग्णास संत्र्याचा रस अतोनात आवडे. मध्यंतरी काही कारणाने तिला त्याच रसाचा उबग आला. इतका, की बाजारात दुकानात संत्री पाहिली तरी तिला ओकारी येई. संमोहनविद्येने एरिक्सनने तिला जुन्या काळात नेले. वीस मिनिटांनंतर तिचा संत्र्याविषयीचा तिटकारा नाहीसा झाला, तिला रस पुन्हा आवडू लागला. रोगाचा उपचार कोणा औषधाने झाला नाही, भूतकाळ पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या काही तंत्रामुळे झाला.
 गर्भकाळाच्या आठवणी
 डॉ. केनेथ पार्कर एक अफलातून प्रयोग करतात. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर पडद्यावर केवळ चार सहस्त्रांश सेकंद एवढा वेळ एक तेजस्वी प्रकाशबिंदू दाखवतात. या बिंदूवर काही संदेश कोरलेला असतो; पण नेहमीच्या पद्धतीने तो वाचणे एवढ्या थोड्या वेळात शक्य नसते. तरीही या सुप्त संदेशाचा 'आई' या कल्पनेचा काहीही उल्लेख असला तरी त्याचा परिणाम मोठा शुभंकर होतो. 'वंदे मातरम्' आणि 'मातृभक्ती' यांचा शरीरातील सुप्त शक्तींवर काही विशेष चांगला परिणाम आहे, असा डॉ. पार्कर यांचा निष्कर्ष आहे.
 सुप्तावस्थेतही मनुष्याची काही इंद्रिये जागृत असतात, असा शास्त्रज्ञांचा अनुभव आहे. शस्त्रक्रियेच्या वेळी गुंगीत असलेली एक बाई शस्त्रक्रियेनंतर ठार वेडी झाली. ती गुंगीत असताना डॉक्टरांनी तिच्या लठ्ठपणाबद्दल काही बीभत्स विनोद केला होता, त्याचा आणि तिच्या वेडाचा संबंध होता असे सिद्ध झाले.
 सुप्त स्मृतींचा वापर
 या सुप्त संदेशांचा प्रभाव आता सर्वमान्य झाला आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या मालाचा खप वाढविण्यासाठी कारखानदार सुप्त संदेशांचा उपयोग व्यापारी हेतूने करून घेत आहेत. १९९० मध्ये 'पेप्सी' कंपनीने त्यांच्या मालाच्या वेष्टनांवर सुप्त संदेश दिल्याचे 'टाईम' या जगविख्यात साप्ताहिकाने उघडकीस आणले, असे संदेश केवळ दृकश्राव्य माध्यमातूनच नव्हे, तर गंध, रस, स्पर्श यांच्याद्वारेही देता येतात.
 मनुष्यप्राण्याची ज्ञानसंस्था केवळ पाच इंद्रिये आणि मेंदू नावाचे एक गणकयंत्र अशी ढोबळ नाही. त्यात अनेक, आजपर्यंत अज्ञात राहिलेले बारकावे आहेत, असे शास्त्रज्ञ मानतात आणि त्या दृष्टीने संशोधन करीत आहेत.
 फ्रेंच शास्त्रज्ञ अल्फ्रेड टोमॅटिस् यांनी एका मूकबधीर मुलावार मोठा अनोखा प्रयोग केला. मुलाच्या आईचा आवाज पातळ द्रव्याच्या माध्यमातून मुलाला ऐकवला. मुलाला हा सुप्त आवाज ऐकू आला. त्याने जाऊन खोलीभर अंधार केला आणि आईच्या मांडीवर जाऊन गर्भावस्थेतल्याप्रमाणे पायाशी डोके घेऊन तोंडात बोट घालून तो शांत पडून राहिला आणि थोड्या वेळात दहा महिन्यांच्या बालकाप्रमाणे चित्रविचित्र आवाज काढू लागला. बाळ गर्भात असताना आईचे बोलणे आणि आजुबाजूचे इतर आवाज गर्भजलाच्या माध्यमातून त्याला ऐकू येतात. त्यांच्या आठवणी जन्मानंतरही सुप्तावस्थेत राहतात
 ही कल्पना तशी नवी नाही, परंपरागत पद्धती आहे. आईचे खाणे, पिणे, वागणूक तसेच आसपासचे वातावरण यांचा गर्भावर परिणाम होतो, असे मानले जातेच. त्यामुळे, गरोदर स्त्रीची कोडकौतुके करावी, तिच्या मनाला धक्का बसू देऊ नये, अन्यथा बाळावर दुष्परिणाम होतात. याला मान्यता आहे. आजपर्यंत विज्ञानवादी तिला फारसे महत्त्व देत नसत; पण परिस्थिती बदलली आहे आणि अनेक ठिकाणी गर्भकाळातही मुलांना प्रशिक्षण देऊन 'सुपरमेन' तयार करण्याकरिता विद्यापीठे उघडली जात आहेत.
 जन्म म्हणजे दुःख
 गर्भकाळात मिळालेल्या साऱ्या संवेदना काही व्यक्तींच्या बाबतीत थोड्याफार तरी शिल्लक राहतात. सगळ्यांच्या बाबतीत असे का घडत नाही? गर्भवासाच्या सर्व स्मृती नष्ट का होतात? अनेक शास्त्रज्ञांचा आडाखा असा आहे, की उत्क्रांतीच्या काळात माणसाला मिळालेली प्रसूतीची पद्धत मोठी रानटी आहे. आईच्या पोटात सुखाने, कोणतीही चिंता न करता वाढणारे बाळ एकदम जगात फेकले जाते. जन्मत:च त्याला धक्का, भीती, भूक, राग इत्यादी भावनांचा परिचय होतो. गर्भकाळात मिळविलेल्या अनुभवांच्या आठवणी जन्माच्या त्या एका धक्क्यात पुष्कळशा पुसून जातात किंवा विस्कळीत होतात. गर्भवासातील अनुभव नष्ट होणार नाही. जन्मानंतरही ते ज्ञान कायम राहील अशी काही अवस्था झाली तर मानवांची एक अधिक उन्नत श्रेणी तयार होऊ शकेल.

 नव्या माणसाचा जन्म?
 प्रश्न समजला त्याला उत्तर काय? प्रसूतीच्या वेळी आईचे शरीर पाण्यात ठेवण्याचा एक प्रयोग गेली काही वर्षे मोठी प्रमाणावर चालू आहे. मूल पाण्यात जन्मते, नाळ तोडण्याआधी वीस वीस मिनिटे ते पाण्यात तरंगू शकते. पाण्यातून काढताना अनेकदा बाळे रडण्याऐवजी हसत असलेली दिसतात. पाण्याखाली जन्मलेली बाळे इतर मुलांच्या तुलनेने खूप झपाट्याने प्रगती करतात. तिसऱ्या चौथ्या महिन्यात बोलू लागतात, चालू लागतात. त्यांची स्मरणशक्ती तीव्र असते. राग, द्वेष इत्यादी तामसी भावनांपासून ती पुष्कळ दूर राहतात. एवढेच नव्हे तर, गर्भकाळात मिळालेल्या अनुभवांचे त्यांना चांगले स्मरण असते. पाण्याखालील प्रसूती हा मानवजातीच्या उत्क्रांतीतील सर्वांत नवीन आणि सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे असा संबंधित शास्त्रज्ञांचा आग्रह आहे.
 नवे शतक - नवा माणूस
 मनुष्यप्राण्याच्या उत्पत्तीपासून जीवनसंघर्षात त्याने साधने आणि संघटना वापरली. मनुष्यप्राण्यात फारसा काही फरक पडला नाही. आता मनुष्यप्राण्याची प्रकृती, स्वभाव आणि सामर्थ्य बदलेल असे काही नवे घडत आहे. मार्क्स, गांधी यांनी समाजवादी 'विश्वस्त' अशा वेगळ्या बुद्धीच्या माणसांचा उदय समाजव्यवस्थेमुळे होईल अशी आशा धरली. सामाजिक परिस्थितीमुळे अधिक शुभंकर माणसाचा उदय झाला नाही. पाण्याखालील प्रसूतीसारख्या छोट्याशा गोष्टीने साऱ्या मनुष्यजातीचे परिवर्तन होण्याची शुभवार्ता शास्त्राने आणली आहे. विसाव्या शतकातून नव्या शतकात आणि नव्या सहस्रात जाणारा माणूस माणूस असेल, माकड नाही, ना राक्षस.

(६ जानेवारी १९९४)
■ ■