अन्वयार्थ - १/महालनोबिस ते हर्षद मेहता


महालनोबिस ते हर्षद मेहता


 मोठा चमत्कारिक दुहेरी योगायोग आहे. प्रोफेसर प्रशांतचंद्र महालनोबिस आज जिवंत असते तर १०० वर्षांचे झाले असते. यानिमित्त कोलकत्यात त्यांनी स्थापन केलेल्या 'भारतीय संख्याशास्त्र संस्थान' येथे एक मोठा थाटामाटाचा समारंभ झाला या समारंभास खुद्द पंतप्रधान हजर होते.
  'स्टॅलिन' विकासाचे सूत्रधार
 डॉ. महालनोबिस नाव गाजले ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळापासून उद्योगधंद्यांना आणि विशेषतः भारी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे यांचा त्यांनी पुरस्कार केला. महालनोबिस म्हणजे सहकारी उद्योगधंदे आणि सार्वजनिक क्षेत्राचे वर्चस्व असे समीकरणच होते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनांचा आराखडा महालनोबिस यांच्या हातचाच.
 शताब्दी आणि मृत्युलेख
 मोठा दुष्ट योगायोग असा, की महालनोबिस साहेबांची शंभरी साजरी करण्याच्या समारंभात पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना घोषणा करावी लागली, "औद्योगिक उत्पादन हे सरकारचे क्षेत्र नाही. ते खासगी क्षेत्रातच राहील. सरकारचे काम अन्याय आणि विषमता दूर करणे हे आहे." थोडक्यात शताब्दी समारोह महालनोबिस या व्यक्तीचा झाला; पण त्याच क्षणी त्यांच्या कामगिरीचा मृत्युलेख लिहिला गेला.
 विद्वानांची समीकरणे
 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून महालनोबिस यांच्या नेतृत्वाखाली अर्थशास्त्री आणि संख्याशास्त्री सगळ्या देशाचे आपण भाग्यविधाते असल्याच्या डौलात मिरवू लागले ते अगदी परवा परवापर्यंत. या काळात त्यांनी जो 'पोरखेळ' केला, त्यावर नजर टाकली तर विश्वास ठेवणे आजच कठीण झाले आहे, थोड्या दिवसांत अशक्य होईल.
 एक गणिती समीकरण, त्यात काही इंग्रजी अक्षरे, काही ग्रीक, त्यामुळे समीकरणात काही प्रचंड गूढ विद्वत्या असल्याचा आभास. समीकरणाचा थोडक्यात अर्थ काय? कोणच्याही देशातील लोकांची बचत करण्याची ताकद किती? आणि त्याच देशात भांडवलाची उत्पादकता किती? या दोन प्रश्नांचे उत्तर मिळाले, की सुयोग्य आणि संतुलित विकासाची गती साध्या गुणाकाराने मिळते, असा या समीकरणाचा अर्थ. या सगळ्या जडजबाल गुंतागुंतीचा अर्थ काय? हिंदुस्थानात एकूण उत्पादनाच्या १२% बचत होते असे समजले आणि १०० रुपयाची भांडवल गुंतवणूक केली तर २५% वार्षिक उत्पादनात वाढ होते असे धरले तर २५% गुणिले १२% म्हणजे ३% दराने देशाचा विकास होणे आवश्यक आहे; पण व्यवहारात बचतक्षमता आणि उत्पादकता या गोष्टी सतत बदलणाऱ्या आहेत. किंबहुना त्या बदलणे हे कोणत्याही अर्थव्यवस्थेचे काम आहे. त्या स्थिर आहेत असे गृहीत धरले तर हे समीकरण २+२=४ इतके स्वयंसिद्ध आणि निरर्थक होते. या असल्या पोरकट खेळाने त्या काळी अर्थशास्त्री मोठे स्तिमित आणि प्रभावित झाले होते.
 दोन 'कमलभक्षी'
 महालनोबिस हे तसे मोठे बहुरंगी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. मुळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे विद्यार्थी; पण त्यांना संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, हवामानशास्त्र, संगीत अशा अनेक विषयांत मोठी रुची होती. तागाचे पीक, वेगवेगळ्या वंशांच्या माणसांच्या शरीररचना, हवामानाचे अंदाज, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत फिशर आणि शेवार्ट या संख्याशास्त्रज्ञाच्या पद्धती त्यांनी वापरल्या. शास्त्रज्ञ म्हणून काही मूलभूत संशोधन त्यांच्या नावाने रुजू नाही; पण हिंदुस्थानातील आकडेवारी गोळा करण्यासंबंधी केंद्रीय यंत्रणा आणि नमुना पद्धतीने पाहणी करण्याची राष्ट्रीय व्यवस्था यांच्या उभारणीत महालनोबिस यांचे मोठे श्रेय आहे. शास्त्रज्ञापेक्षा संघव्यवस्थापकापेक्षा ते शास्त्रप्रशासक अधिक होते. खेळाडूपेक्षा संघव्यवस्थापकाचा तोरा अधिक अशीच परिस्थिती; त्यांचा स्वभाव, प्रकृती आणि व्यक्तिमत्त्व 'रसिकराज' पंडित नेहरूंच्या प्रकृतीशी जुळणारे होते आणि या दोघांचे चांगलेच जुळलेही.
 देशाचा विकास-कोट्यवधी लोकांच्या डोळ्यातील आसवे पुसण्याचा कार्यक्रम गंभीर आणि कठोर परिश्रमाचा; पण रसिक राजाच्या दृष्टीने गरिबी दूर करणे म्हणजे इतिहासाने त्यांच्याकडे सोपवलेली रोमहर्षक कामगिरी होती. पुढे व्ही. के. यांनी कौल नावाच्या लष्करी तरुण अधिकाऱ्यास वर चढवले आणि इशान्य सरहद्दीवर चिनी आक्रमणाच्या वेळी भारताची नाचक्की झाली. तसाच काहीसा प्रकार नेहरू-महालनोबिस संबंधांत झाला. वास्तवापासून दूर कल्पनाविश्वात रममाण होणाऱ्या काव्यप्रकृतीच्या लोकांना इंग्रजीत 'कमलभक्षी' म्हणजे Lotus Eaters म्हटले जाते. जवाहरलाल आणि प्रशांतचंद्र महालनोबिस या दोन 'कमलभक्षी'ची जोडी जमली आणि देशाचे दुर्दैव ओढवले.
 कोलकत्त्याचा हस्तीदंती मनोरा
 कोलकत्त्यातील संख्याशास्त्र संस्थेला राष्ट्रीय संशोधन संस्था म्हणून मान्यता द्यावी असे बिल संसदेत मांडण्यात आले. ते खुद्द पंडितजींनी मांडले. भाषण करताना पंडितजी म्हणाले, "अशा विद्वानांच्या शास्त्रीय कामाच्या खर्चासाठी त्यांना लोकांपुढे येऊन तोंड वेंगाडण्याची गरज पडता कामा नये. कोलकत्त्याला हस्तीदंती मनोरा तयार करण्यात आला. संस्थेच्या शाखा, कामाचा पसारा वाढला. शेकडो अर्थशास्त्री, संख्याशास्त्री पोटाला लागले. या संस्थेत होणाऱ्या विशुद्ध संशोधनाच्या आधारावर देशातील कोट्यवधी उपाशीपोटी कंगालांचे भवितव्य ठरायचे होते!"
 शुद्ध हातचलाखी
 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारी उद्योगधंद्यांवर भर देण्यात आला, हा निर्णय जणू काही या विद्वान पंडिताच्या सर्वसाधारण जनास अगम्ये अशा गणिती समीकरणातून अपरिहार्यपणे आला असा आभास तयार करण्यात आला. समाजवादी रशियात भारी उद्योगांवर भर दिला जातो त्या पद्धतीने हिंदुस्थानातही असेच प्राधान्य देणे हे शास्त्रीयदृष्ट्या अपरिहार्य आहे असा दबदबा पसरवण्यात आला. सत्यस्थिती ही, की गणिती समीकरणातून असा काही निष्कर्ष निघत नव्हता. समीकरण तटस्थ होते, त्यातून पाहिजे ते उत्तर काढता आले असते. या निष्कर्षात डॉक्टर साहेबांची सरळ सरळ हातचलाखी होती. एकूण गुंतवणुकीपैकी ३३% भारी उद्योगधंद्यांवर झाली पाहिजे हे गृहीत धरूनच त्यांनी बाकीची उत्तरे काढली. नेहरूंना काय पाहिजे होते याचा अचूक अंदाज घेऊन डॉक्टरांनी उत्तर काढले होते. नेहरू खुश झाले, मग कोणा अर्थशास्त्रज्ञाने फारसे फाटे फोडले नाहीत. ज्यांनी पंडितजींना विरोध केला, ते बाजूला फेकले गेले. हव्या असलेल्या व्यवस्थेचे शास्त्रीय वाटणारे समर्थन देणारा दुसरा एक 'कमलभक्षी' भेटला होता.
 कल्पनारम्य विश्वातील युगुल
 गालब्रेथ यांनी या जोडीचे वर्णन मोठे मार्मिक केले आहे. ते म्हणतात, "हे दोघेही सिडने, वेब, बर्नार्ड शॉ, टॉनी, कोल, हॅरॉल्ड लास्की आणि फेबियन सोसायटीच्या काळातच वावरत होते. त्यांच्या या कल्पनारम्य जगात सौजन्य, ऋजुता आणि बौद्धिक, कुतूहल नांदत होते. त्याच्याबरोबर अर्थकारण प्रामुख्याने सामाजिक, नैतिक निष्ठांशी जोडले होते. समाजवादी व्यवस्थेत काही दुर्लंघ्य प्रशासकीय अडचणी आहेत. आर्थिक प्रेरणा आणि सामाजिक बांधणी यासंबंधी गंभीर अडचणी आहेत, याची फारशी जाणीव नव्हती."
 प्रत्येक दुर्दैवी ऐतिहासिक पुरुषाच्या आसपास एक विचित्र व्यक्तिमत्त्व उभे राहते; संभाजीबरोबर कलुषा कब्जी, रशियातील झारबरोबर रासपुतीन, तसेच पंडितजीबरोबर डॉक्टर प्रशांतचंद्र महालनोबिस.
 आणखी एक अर्थकारणी
 महालनोबिस या ग्रहणातून देश सुटत असतानाच दुसरा एक मोठा विचित्र योगायोग घडून येतो आहे. आर्थिक विकासासंबंधी आणखी एक थिल्लर विचार मोठ्या गंभीरपणे मांडला जातो आहे. हा मांडणारा कोणी अर्थशास्त्रज्ञ नाही, परदेशांतून पदव्यांच्या साधा बी. कॉम आहे; पण तरीही बाजारपेठेत जास्तीत जास्त धुमाकूळ घातल्याचे श्रेय त्याच्या लेखी आहे. त्याचे नाव हर्षद मेहता.
 लॉर्ड केन्स हा अर्थशास्त्रज्ञांचा 'मुगुटमणी' प्रचंड बुद्धिमत्ता, देदीप्यमान शैक्षणिक पार्श्वभूमी, सुंदर सोपी काव्यमय गद्यशैली, याबद्दल केन्स प्रसिद्ध आहे; पण अर्थशास्त्रज्ञांना त्यांचे विशेष कौतुक वाटते ते काही काळ शेअरबाजारात अचूक खेळी करून केन्सने भरपूर कमाई केली. तसे बहुतेक अर्थशास्त्री बोलण्यात, लिहिण्यात, तरबेज असतात; पण प्रत्यक्ष काही उलाढाल करायची त्यांची ताकद शून्यच असते. त्यामुळे बाजारपेठेतही यशस्वी झालेल्या केन्सचे मोठे नाव आहे.
 या फूटपट्टीने बघायचे झाले तर हर्षद मेहतालाही अर्थशास्त्रज्ञ मानायला पाहिजे आणि काही काळ तरी त्याला अशी मान्यता मिळाली. महालनोबिसना नेहरूंनी बोलावून घेतले; हर्षदला तसे कोणी चालवले नाही आणि बोलावले असते तरी तो गेला नसता. पगार, भत्त्याच्या, तुकड्याकरिता धावणारा तो काही पोटभरू प्राध्यापक नाही; पण २९ फेब्रुवारी १९९२ रोजी दूरदर्शनने हर्षदच्या अंदाजपत्रकावरील प्रतिक्रियेला भली मोठी प्रसिद्धी दिली. ११ जानेवारी १९९२ रोजी त्याच्या कामगिरीत कोणतीही अडचण आणू नये असे वित्तमंत्रालयातील एका अधिकाऱ्यांने मुद्दाम मुंबईला येऊन शेअर बाजारातील अधिकाऱ्यांना सांगितले आणि त्यानंतर महिन्याभरात वित्त मंत्रालयाचे प्रमुख सचिव गीता कृष्णन यांच्या चेंबरमध्ये हर्षदचे मोठे स्वागत झाले आणि कसेबसे बी. कॉम. पास झालेल्या हर्षदने अर्थ सचिवांना बचत, भांडवल गुंतवणूक आणि देशाचा आर्थिक विकास, या विषयावरील आपले सिद्धांत ऐकवले. नवे आर्थिक धोरण देशात भरभराट आणणार आहे ही ग्वाही देणारा खास साक्षीदार म्हणजे हर्षद.
 हर्षद मेहताचा सिद्धांत काही महालनोबिस सिद्धांतापेक्षा जास्त पोरकट नाही. महालनोबिसांचे म्हणणे भारी उद्योगधंद्यांत पैसे टाका भरभराट होईल. हर्षदचे म्हणणे, पैसे शेअर बाजाराकडे वळवा; शेअर बाजार चढता राहिला म्हणजे नवीन उद्योगधंद्यांकरिता भांडवल उभे करणे सहज शक्य होईल आणि देशाची भरभराट होईल. त्यासाठी काही हातचलाखी करावी लागेल; पण महाविद्वान महालनोबिसनेही तेच केले होते. हर्षद मेहताकडे अर्थशास्त्रातील डॉक्टरेट असती तर त्याला नियोजन मंडळावर नक्कीच नेमले असते.
 देशाचा विकास म्हणजे काही आकड्यांचा, समीकरणांचा आणि चलनांचा खेळ आहे असे मानणाऱ्यांच्या हाती भवितव्याच्या दोऱ्या जातात. निदान काही काळ तरी जातात. एवढी दुर्दैवी जाणीव या महालनोबिस शताब्दी आणि हर्षद प्रकरण या दुहेरी योगायोगातून झाली तरी पुरे.

(१६ जुलै १९९३)
■ ■