अर्थशास्त्राची मूलतत्वे

अर्थशास्त्राचीं मूलतत्वें

हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थिति
आणि
ती सुधारण्याचे उपाय.


लेखक

गोविंद चिमणाजी भाटे, एम्.ए.
लाइफ मेंबर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणें.


(सर्व हक्क राखून ठेवले आहेत.)


पुणे येथें
आर्यभूषण छापखान्यांत छापिलें.

१९१०


किंमत २॥ रुपये

 

 

हें पुस्तक पुणें येथें
आर्यभूषण छापखान्यांत नटेश अप्पाजी द्रवीड यांनीं छापिलें
व प्रो.गोविंद चिमणाजी भाटे, फर्ग्युसन् कॉलेज पुणें
यांनीं प्रसिद्ध केलें.

 

 

हें पुस्तक
कै.ती.रा.चिमणाजी नारायण भाटे,
वकील, महाड जि. कुलाबा
यांस
त्यांच्या अंगच्या
असामान्य अपत्यवात्सल्य, अद्वितीय नीतिधैर्य
व अलौकिक लोककल्याणेच्छा
या गुणांची वारंवार आठवण काढणाऱ्या
त्यांच्या अपत्यानें प्रेमादरपूर्वक
अर्पण केलें आहे.

 

 

 जी डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीची जाहिरात या ग्रंथाच्या लेखनास निमित्तकारण झाली त्या जाहिरातीला आज बरोबर तीन वर्षे झालीं. त्या जाहिरातीस निमित्तकारण म्हणण्याचें कारण हें कीं कर्तव्य म्हणून, जिज्ञासा म्हणून, किंवा आवड म्हणून, पाश्चात्य शास्त्रवाड्मयरूपीं विस्तीर्ण उद्यानांत ज्या ज्या सुंदर वाटिकांत फिरण्याचा मला प्रसंग आला त्या त्या वाटिकांचें शब्दचित्र निवळ मराठी वाचकांकरितां रेखाटावें अशी पुष्कळ दिवसांची मनीषा होती. परंतु "उत्पद्यते विलीयंते दरिद्राणां मनोरथाः" या सुभाषितांतील उक्तीप्रमाणे आजपर्यंत दारिद्रयामुळे मनांतील हेतू मनांत राहिले. माझें हें दारिद्र्य दुहेरी आहे. मी ज्या संस्थेचा तहाहयात सभासद आहें त्या संस्थचें काम इतकें असतें की, ग्रंथलेखनास जी मानसिक स्वस्थता व जी फुरसत लागते ती मिळत नाहीं. शिवाय आपल्या देशांत अझून या बाबतींत श्रमविभागाचें तत्व अंमलांत आलें नसल्यामुळे ग्रंथलेखकास ग्रंथप्रकाशकाचीही जबाबदारी व काळजी अंगावर घ्यावी लागते. व ती घेण्याचें मला सामर्थ्य नव्हतें. परंतु वर उल्लेख केलेल्या जाहिरातीनें ही अडचण झाल्यास दूर होईल असें पाहून जाहिरातीप्रमाणें पुस्तक लिहिण्याचा बेत तर कायम केला. परंतु बेत कायम करणें व तो हातून शेवटास जाणें यांत किती तरी अडचणी उत्पन्न होतात. त्याप्रमाणें येथेंही झालें. मनुष्याच्या मनाला अगदीं व्यग्र करून टाकणारी, त्याची मानसिक स्वस्थता घालविणारी अशी प्रियपत्नीच्या असाध्य रोगाची घरगुती अडचण उत्पन्न झाली व यामुळे सोसायटीच्या जाहिरातींतील दोन वर्षे केव्हांच निघून गेलीं व पुस्तकाच्या लेखनास प्रारंभही झाला नाहीं. तरी पण प्रियपत्नीच्या आजारांत व तिच्याच प्रोत्साहनाने कायम केलेला बेत शेवटास न्यावयाचा असा विचार करून पुस्तकास प्रारंभ केला. अशी या पुस्तकलेखनाची पूर्वपीठिका आहे. अर्थात हें पुस्तक गेल्या नऊदहा महिन्यांतच प्रायः लिहिलें गेलें आहे. इतक्या थोड्या अवकाशांत सर्व पुस्तक लिहावें लागल्यामुळें रात्रीचा दिवस करून काम करावें लागलें हें सांगणें

 

 

नकोच. म्हणूनच या पुस्तकांत घाईच्या लेखनाची छटा जागोजाग दृष्टीस पडेल. हे पुस्तक कोणत्याही एका पुस्तकाच्या आधारानें लिहिलेलें नाहीं. एकंदर अर्थशास्त्रावरील वाड्मयाचा थोडाफार व्यासंग जी माझे हातून झाला त्यावरून या शास्त्रांतील प्रश्नांवर जी माझी मते बनली ती स्वतंत्रपणें देण्याचा या ग्रंथांत प्रयत्न केला आहे. या विषयावर मराठीत दोन तीन लहान लहान पुस्तकें झालेली आहेत असें मला ठाऊक आहे. परंतु ती सामान्यतः भाषांतररूप असून अगदी प्राथमिक आहेत असे ऐकलें असल्यामुळे त्या पुस्तकांचा मीं कांहींच उपयोग केला नाहीं किंवा तीं पाहिलींही नाहींत. नवीन विषयावर मराठींत नवीन ग्रंथ लिहावयाचा म्हणजे पारिभाषिक शब्दाची मोठी अडचण येते. तशी येथेंही मला अडचण पडली. परंतु पुष्कळ विचार करून या पुस्तकांत बहुतेक सर्व इंग्रजी पारिभाषिक शब्दांना नवे मराठी शब्द केले आहेत. नवीन बनविलेले हे शब्द जितके लहान व जितके अन्वर्थक व जितके सुलभ करता येतील तितके करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेंच होता होईल तों निवळ मराठी वाचकांस सुद्धां विषय समजावा अशा तऱ्हेनें विवचन करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत सिद्ध झाला आहे हें ठरविणें वाचक वर्गाकडे आहे.
 वर सांगितलेच आहे की, या ग्रंथांतील विवेचन स्वतंत्रपणें केलेलें आहे. तरी पण पाश्चात्य भाषेतील पुष्कळ अर्थशास्त्रविषयक पुस्तकांचा मला उपयोग झालेला आहे. त्या सर्व पुस्तकांची यादी देत बसण्यांत अर्थ नाहीं. त्यांतल्यात्यांत अमेरिकन अर्थशास्त्री सेलिंग्मन व इंग्रजी अर्थशास्त्रज्ञ निकलसन यांच्या ग्रंथाचा मला पुष्कळ उपयोग झालेला आहे हे येथे सांगणे जरुर आहे.
 शेवटीं ज्या डे.व्ह.ट्रां.सोसायटीच्या जाहिरातीमुळे हे पुस्तक लिहिलें गेलें त्या सोसायटीचे आभार मानणें रास्त आहे. या सोसायटीनें माझें पुस्तक उशिरानें पुरें झालें असतांही तें परीक्षणास घेण्याचे कबूल केलें याबद्दलही तिचे आभार मानणे अवश्य आहे. ज्यांचा अर्थशास्त्रविषयक व्यासंग दोनतीन तपांचा आहे, ज्यांचा हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीबद्दलच्या ज्ञानामध्यें आज कोणी हात धरणारा नाहीं व राज्यव्यवस्थेशीं प्रत्यक्ष

 

 

संबंध असल्यामुळे ज्यांना हिंदुस्थानच्या स्थितीचें अन्तर्बाह्य ज्ञान आहे असे महाराष्ट्रांतील दोन अर्थशास्त्रज्ञ व ज्यांचा मराठी भाषेचा व्यासंग आज २५|३० वर्षांचा आहे, जे स्वतः मराठी उत्तम लेखक व कवी आहेत व जे मार्मिक टीकाकार आहेत असे महाराष्ट्रांतील एक प्रसिद्ध ग्रंथकार अशा तिघांची या पुस्तकाच्या परीक्षणाची कमिटी आहे. अशा कमिटीकडून 'प्रथम प्रयत्न या नात्यानें पुस्तक बरें आहे' एवढा जरी अभिप्राय मला मिळाला तरी केलेल्या श्रमाचें सार्थक झालें असें मला वाटेल.

गद्र्यांचा वाडा, शनिवार पेठ, पुणे, ता.१३ ऑक्टोबर १९१०

लेखक गोविंद चिमणाजी भाटे

 

 

अनुक्रमणिका.

 विषय.                                                      पृष्ठ.

१. पुस्तक पहिले - प्रास्ताविक १-४६

१. भाग १ ला-अर्थशास्त्राचा इतिहास                            १ 
२. भाग २ रा-अर्थशास्त्राची व्याख्या व शास्त्रीय पद्धति                     ३२ 
3. भाग 3 रा-संपत्ति म्हणजे काय ?                                 ३८ 
४. भाग ४ था-अर्थशास्त्राचे विभाग                            ४३ 

२. पुस्तक दुसरे - उत्पत्ति ४७-१३२

 १.भाग १ ला-सामान्य विचार.                                      ४७ 
 २.भाग २ रा-संपत्तीचीं अमूर्ती कारणें                                 ५१ 
 ३.भाग ३ रा-मृर्त कारणें-जमीन                                     ६१
 ४.भाग ४ था-श्रम                                               ६४ 
 ५.भाग ५ वा-भांढवल                                        ७० 
 ६.भाग ६ वा-योजक अगर कारखानदार                               ८०
 ७.भाग ७ वा-श्रमविभाग                                          ८५
 ८.भाग ८ वा-मोठया प्रमाणावर व अल्प प्रमाणावर उत्पत्ति                 ९४ 
 ९.भाग ९ वा-उतरत्या व चढत्या पैदाशीचा सिद्धांत व त्याचे विवरण           १०३ 
 १०.भाग १० वा-लेोकसंख्येची वाढ                                    १०८ 
 ११.भाग ११ वा-भांडवलाची वाढ                                     ११७ 
 १२.भाग १२ वा-सामान्य व औद्योगिक शिक्षण                           १२७ 

३. पुस्तक तिसरें-वांटणी १३३-२८२

१. भाग १ ला-सामान्य विचार                                       १३३ 
२. भाग २ रा-वांटणीच्या मुळाशी असलेल्या कल्पना व संस्था               १३८ 
३. भाग ३ रा-भांडें अगर खंड                                      १४३ 
 

 

२ विषय. पृष्ठ.

४. भाग ४ था-मजुरी व तिचे सिद्धांत                         १५४
५. भाग ५ वा-व्याज                                      १६४
६. भाग ६ वा-नफा                                       १७१ 
७. भाग ७ वा-जमीनधाऱ्याच्या पद्धति                          १७८
८. भाग ८ वा-अर्धेलीची कृषिपद्धति                           १८५                   
९. भाग ९ वा-प्रचंड शेती कीं छोटी शेती                       १८८                  
१०. भाग १० वा-हिंदुस्थानांतील जमीनधाऱ्याच्या पद्धति             १९५
११. भाग ११ वा-चढाओढीनें ठरलेल्या वांटणीची असमता व ती 
              नाहींशी करण्याचे उपाय                      २०३
१२. भाग १२ वा-संप व त्यांचे सांपत्तिक परिणाम                २११
१३. भाग १३ वा-मजुरांचे संघ व त्यांची उपयुक्तता               २१९
१४. भाग १४ वा-सहकारिता                                 २२७
१५. भाग १५ वा-सहकारि पतपेढ्या                           २३४
१६. भाग १६ वा-सामाजिकपंथाचा इतिहास व त्या पंथाचे प्रकार      २४२
१७. भाग १७ वा-सामाजिकपंथी योजनांचा सारासार विचार          २६४

४. पुस्तक चवथें-विनिमय २८३-४१४

१. माग १ ला-सामान्य विचार                              २८३
२. भाग २ रा-मोल व किंमत                               २८७
३. भाग ३ रा-बाजार व त्याची उत्क्रांति                        २९७ 
४. भाग ४ था-मागणी व पुरवठा यांचे नियम                    ३०१
५. भाग ५ वा-मूळ किंमतीची मीमांसा                         ३०७
६. भाग ६ वा-पैसा                                       ३१५
७. भाग ७ वा-नाणी व धात्वात्मक पैशाचे प्रकार                 ३२३
८. भाग ८ वा-द्विचलन पद्धति                              ३३२
९. माग ९ वा-हिंदुस्थानांतील नाणीं व त्यांची चलनपद्धति           ३४७
१०. भाग १० वा-धात्वात्मक पैशाच्या मोलाची मीमांसा             ३५४
११. भाग ११ वा-अधात्वात्मक पैसा व त्याचे प्रकार               ३६० 
१२. भाग ९२ वा-पेढीची उत्पति                              ३७२
१३. भाग १३ वा-पेढीचें स्वरूप व उपयोग                      ३८० 
 

 

विषय. पृष्ठ.

१४. भाग १४ वा-बहिर्व्यापार व त्याची मीमांसा                    ३८८
१५. भाग १५ वा-विनिमयपत्रें                                  ३९८
१६. भाग १६ वा-अप्रतिबंध व्यापार विरुद्ध संरक्षण                  ४०७

५. पुस्तक पांचवें-राष्ट्रीय जमाखर्च ४१५-४९२

१. भाग १ ला-सामान्य विचार                                ४१५
२· भाग २ रा-अॅडम स्मिथच्या मताप्रमाण सरकारचीं कर्तव्यकर्में        ४१९ 
३. भाग ३ रा-सरकारचीं कर्तव्यकर्में                             ४३३
४. भाग ४ था-सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी                      ४३७
५. भाग ५ वा-कराचीं तत्वें                                   ४४१
६. भाग ६ वा-कराची संपात-मीमांसा                            ४४७
७. भाग ७ वा-राष्ट्रीय कर्ज                                   ४५३
८. भाग ८ वा-हिंदुस्थान सरकारचें कर्ज                          ४७१
९. भाग ९ वा-हिंदुस्थानचा जमाखर्च                            ४८२

६. पुस्तक सहावें-हिंदुस्थानाची सद्यः सांपत्तिक स्थिति

   व तिला लागू पडण्यासारख्या सिद्धांतांचें विवेचन              ४९३-५२७