"विठोबा, तुम्ही मला रोज बोलायला लावता. एखाद्या दिवशी सुद्धा वेळेवर कसे येत नाही? किती उशीर हा!"

 "बाई, मला तुमची बोलणी खायची हवस का हाय? पर काय करू? भाकरी लवकर होतच न्हाई."
 "का?"
 "त्या उठतच न्हाईत. मस मी फाटंचंच हाका मारतो. पर उठाया तय्यारच न्हाईत. मग मी तरी काय करू?"
 भंडलकर असावेत पन्नाशीतले. अतिशय सौम्य, सुस्वभावी माणूस. बायकोला मारहाण करणं दूरच, उलट जरा भिऊनच वागत होते हे सरळ दिसत होतं. त्यांचा सासरा माझ्या ओळखीचा होता. त्याच्या सांगण्यावरून मी त्यांना शेळ्या संभाळायला ठेवून घेतलं होतं.
 त्यांची थोडी जमीन होती. दोघांनी कष्ट केले तर पोटापुरतं मिळेल एवढी. पण बायको काही काम करायला तयार नव्हती. तिथे रहायलाच तयार नव्हती. सारखी माहेरी पळून यायची. आठ-पंधरा दिवस झाले की नवऱ्यानं जाऊन आणायची नाहीतर बापानं घालवायची. दोघंही ह्या प्रकाराला वैतागून गेले. शेवटी सासरा म्हणाला मी तुमच्यासाठी काम बघतो. तुम्ही सगळी इथंच येऊन रहा. भंडलकर तयार झाले. सासरा बोलावतोय तर जावं तरी. बायको खुशीत राहील. आपल्याला कामधंदा मिळेल.
 आल्या आल्या सगळे एकत्रच रहात होते. सासू लवकर उठून भाकरी करायची, जेवण घेऊन भंडलकर लवकर कामाला यायचे. मग सासऱ्याला कुठेशी वॉचमनची नोकरी मिळाली. कामाच्या ठिकाणी रहायची अट होती. म्हातारा-म्हातारी तिकडे गेली आणि मग भंडलकरांचं उशिरा येणं सुरू झालं. जना इतका नाठाळपणा का करते कळत नव्हतं. आपल्यावर एकदम सगळं घरकाम पडलं, आई मदतीला नाही म्हणून आळशीपणा करीत असेल असं म्हणून मी भंडलकरांना वरच्यावर नुसती समज देऊन गप्प राहिले. पण मग त्यांनी सारखी उचल मागायला सुरुवात केली. एक दिवस मी म्हटलं, "ह्या रविवारच्या बाजारात तुम्ही आपली शेळी विकलीत तिचे चार-पाचशे रुपये तरी आले असतील. ते काय केले?"
 "घरच्यांनी इकडे तिकडे खरचले."
 "म्हणजे काय?"
 "अहो, त्या दुकानचा माल उचलतात, पोरांना रोज धा रुपयाचं म्हटलं तर खायला घेतात. मग असे एकदम पैसे आले तरी ते थकलेली बिलं चुकवायला जातात."
 मी मनात म्हटलं,म्हणजे ही बाई काम तर करीत नाहीच, पण नवऱ्यानं मिळवलेले पैसे गैरहिशेबीपणानं उधळून टाकते. शेवटी मी एक दिवस म्हाताऱ्याला बोलावणं पाठवलं.
 "अण्णा, हा काय प्रकार आहे? तुम्ही पोरीला जरा खडसून सांगा. नाहीतर तुमच्या जावयाला कामावर ठेवणं कठीण होईल. जित्रापाचं काम आहे. सकाळी लोटायचं,खायला टाकायचं,धारा काढायच्या सगळं मलाच करावं लागतं. मग त्यांना ठेवलंय कशाला?"
 "बाई, आता तुमीच बगा आमी तकडं ऱ्हाया गेलो तर म्हातारीनं ह्यांची पोरं बी न्हेली. आता तिचं काय वय हाय का इक्त्या न्हान पोरांच्या मागं पळायचं? तर म्हंते त्येंची आय नीट संबळत न्हाई त्येना. तिच्यान होत न्हाई. मी पोरं परत न्हेऊन घातली तर पोरीनं दोन-चार दिसांनी पुन्ना आणून टाकली. म्हातारीनं अक्षी लाडावून ठेवलीया पोरीला. आन तिला काय म्हटलं तर डोळ्यांतनं पाणी काढते. म्हन्ते माजी येकलीच पोर उरलीया."
 त्याला तीन मुलं. थोरला मुलगा होता. तो बायकोला मारहाण करायचा. तिच्या भावानं त्याला वरच्यावर बजावलं होतं तिला मारलंस तर माझ्याशी गाठ आहे म्हणून. एक दिवस तिला इतकं मारलंन की तिचा भाऊ पिसाळलाच. ह्याच्या अंगावर रॉकेल ओतून ह्याला पेटवून दिलं. तो भाजून मेला. त्याच्या पाठची मुलगी. तिचं लग्न करून दिलं होतं. पहिलं बाळंतपण फार अवघड गेलं.तिला हृदयविकार आहे असं निदान केलं गेलं. डॉक्टरांनी अण्णाला समजावून सांगितलं की ती पुन्हा गर्भार राहिली तर बाळंतपणात मरून जाईल. पण सासरच्यांना मुलगा हवा होता. त्यांनी विचार केला असणार जगली वाचली आणि मुलगा झाला तर ठीकच. नाहीतर दुसरी बायको करता येईल. ती बाळंतपणात हृदयविकाराच्या झटक्याने मेली. ही जना सगळ्यात धाकटी. तिच्यासाठी काहीही केलं तरी अपुरंच आहे असं म्हातारीला का वाटत होतं ते एकवेळ समजू शकत होतं. पण जना आपल्या थकलेल्या आईचा असा फायदा का घेते, नवऱ्याशी इतक्या नाठाळपणे का वागते ह्याचं काही उत्तर मिळत नव्हतं. एक अडाणी अशिक्षित बाई. मजूर वर्गातली. घरातले सगळे कष्ट करणारे आणि ही सगळ्या तऱ्हेच्या कष्टांना नकार देणारी. शेतीचं काम करीत नाही. मुलांना संभाळत नाही, नवऱ्याला वेळेवर भाकरी सुद्धा करून घालीत नाही. हा प्रकार तरी काय आहे? ही बाई आहे तरी कशी ह्याचं मला फारच कुतूहल वाटायला लागलं. मी अण्णाला सांगितलं, "पोरीला एकदा माझ्याकडे घेऊन या. मी बोलते तिच्याशी."
 जना भेटायला आली आणि तिला पाहूनच अनेक गोष्टी स्वच्छ कळल्या. अंगानं थोराड पण शेलाट्या बांध्याची. काळा तुकतुकीत वर्ण, धरधरीत नाक, मोठाले डोळे, कपाळावर अधेली एवढं ठसठशीत कुंकू. बाई रसरशीत, देखणी होती. साधारण तिशीतली असेल.
 मी एकदम मुद्यालाच हात घातला. "भंडलकर म्हणतात त्यांना रोज उशीर होतो कारण तु भाकरी वेळेवर करीत नाहीस. असं का?"
 तिच्या डोळ्यांत अंगार फुलला पण उत्तर आलं नाही. सरळ हल्ला करून काही उपयोग नव्हता हे मला कळून चुकलं. मग मी तिला गप्पा मारीत हळूहळू बोलती केली. जे तिच्याकडून कळलं ते खरं म्हणजे आधीच ध्यानात यायला हरकत नव्हती. पण तिचा बाप आणि नवरा दोघंही ह्या गोष्टीचा उल्लेख टाळून खोटं बोलले होते. किंवा त्यांच्या लेखी त्याचं काही महत्त्व नव्हतं.
 >भंडलकर सरळसरळ आयुष्याच्या उतरणीला लागलेले म्हटल्यावर हे त्यांचं दुसरं लग्न होतं ह्यात काही आश्चर्य नव्हतं. थोडं आश्चर्य वाटलं ते ह्याचं की त्यांची पहिली बायको जिवंत होती. तिला मूल नाही म्हणून हे दुसरं लग्न केलं. सवतींचं एकमेकींशी मुळीच पटायचं नाही. थोरली मोठेपणाचा अधिकार गाजवून हिलाच सगळ्या कामाला जुंपायला पहायची. हिला मुलं झाल्यावर सुद्धा परिस्थितीत काही फरक पडला नाही. नवरा तिची समजूत घालायचा पण थोरलीला बोलण्याची त्याची हिम्मत नव्हती. मग ही सारखी माहेरी पळून यायची.
 आता ते इकडे रहायला आले होते पण आपल्यापेक्षा वयानं इतक्या मोठ्या असलेल्या एक संसार करून भागलेल्या त्या माणसाबरोबर जनाचे सूर कधी जुळलेच नाहीत. तिचं असमाधान ती नाठाळपणे वागून दाखवीत होती.
 "पण तुझ्या वडलांनी तुला अशी सवतीवर दिलीच कशी?"
 "त्येचं पयलं लगीन झालेलं माहीतच पडलं न्हवतं आमाला."
 "तरी पण वयानं एवढ्या मोठ्या माणसाबरोबर कसं लग्न लावून दिलं तुझं?"
 "आमच्या दाजींनी सुचवलं हुतं त्येंचं नाव. लई चांगला मानूस हाय, त्याचा मस जिमीनजुमला, घर हाय, काय बी खरचात न पाडता लगीन करून घेतील असं सम्दं सांगितलं. म्या तर लगीन हुयाच्या आंदी नीट पायलं बी न्हवतं त्यांला. धापाच मान्सं आलीवती त्यातलं कुटलं म्हून म्हाईत बी पल्डं न्हाई मला." ती एकदम लहान मुलीसारखी खिदळली.
 आता लग्न झालंय, दोन मुलं आहेत. नवरा बऱ्यापैकी सुस्वभावी आहे, दारू पीत नाही, मारहाण करीत नाही. शिवाय सवतीला सोडून हिच्यापाशी येऊन राहिलाय. कामधंदा करून चांगलं मिळवून आणतोय. थोडं त्याच्याशी जमवून घेऊन दोघांनी सुखासमाधानात राहावं असं तिला मुळीच वाटत नव्हतं का? नवऱ्याला आणि कदाचित आईबापांनाही शिक्षा करण्याच्या भरात ती स्वत:ला सुद्धा शिक्षा करून घेत होती. पण मी तिला असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं ओठ घट्ट मिटून घेऊन चेहरा निर्विकार केला आणि काही प्रतिसादच दिला नाही.