अर्धुक/सुमन
वाक्यागणिक तो तिला हाणीत होता.
"बाईंना येऊन इचारा. हल्ली उशिरानंच सोडतात मला. मी नाई वं कुठं जात."
सुमन थरथर कापत होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या. मुलं भेदरून भोवती उभी होती. हे असं वरच्यावर चालायचंच पण आज मारण्याला अंत राहिला नाही. शेवटी शेजाऱ्यांनी मधे पडून तिला सोडवली. ती कोपऱ्यात कण्हत पडली. तिची पाठ वळांनी काळीनिळी झाली होती, तोंड सुजलं होतं. ह्या भोगातनं मेल्याशिवाय सुटका नाही अशी तिची खात्री झाली होती. आत्महत्या करायचा विचार मनात डोकवत होता, पण पोरांकडे बघून तो ती बाजूला सारीत होती. व्यंकट गुरगुरला, "ए, उठ. तिथं बसून काय राह्यलीस? भाकरी कुणी करायची? उठतेस का घालू लाथ?".
पूर्णचंद्र चेहरा, मोठं कपाळ, टपोरे डोळे, लाडिक जिवणी, डोलदार बांधा. कुणीही वळून पहावं इतकी देखणी आणि तेच तिचं पाप ठरलं होतं.
सुमनचा बाप तिच्या लहानपणीच वारला. दोन थोरले भाऊ, एक थोरली लग्न झालेली बहीण. ही लग्नाला आली तेव्हा विधवा आई थोरल्या मुलाकडे आश्रितासारखी रहात होती. त्यानं सुमनसाठी स्थळ आणलं ते नाकारायची हिंमत तिच्यात नव्हती आणि सुमनमधेही नव्हती. व्यंकट एक आगापिछा नसलेला, नियमित कामधंदा नसलेला गांजेकस माणूस. पण दिसायला बरा होता, वागायला मऊ, निदान त्यावेळी तरी. त्याच्या गोड हसण्यामागे असलं उफराटं काळीज दडलं असेल ह्याची तिला काय कल्पना? बरं, थोडीफार मारहाण करतो म्हटल्यावर त्यात कुणालाच काही वावगं वाटलं नाही. भावाला तर नाहीच नाही. त्याला तिचा भार झालेला म्हणून तर तिचं लग्न करून टाकलं. आता पुन्हा काहीही कारणानं तो तिला आसरा देईल ह्याची सुतराम शक्यता नव्हती. तिची बाळंतपणं त्यानं केली नाहीतच, पण तिला मदत म्हणून त्यावेळी आई तिच्याकडे जाऊन राहिली तर त्याने केवढी कटकट केली.
मुलं जरा मोठी झाल्यावर सुमननं एका ठिकाणी स्वैपाकणीचं काम धरलं. दोन्ही वेळचा स्वैपाक करायचा. पगार बरा होता, कायम नोकरी. सतरा ठिकाणी भांडीधुणी करून पैसे जास्त मिळाले असते, पण त्यात कष्ट कितीतरी जास्त. शिवाय तीन लहान मुलं असल्यामुळे घरचं काम काही थोडं नव्हतं. पुन्हा ही माणसं चांगली होती. अडीअडचणीला उचल, सणासुदीला कपडे, गोडधोड काय केलेलं असेल ते मिळायचं, पण व्यंकट तिला नीटपणे नोकरी करू देईल तर शपथ. तिच्या चालचलणुकीबद्दल संशय घेऊन मारहाण करायची, पगारातले तो मागेल तेवढे पैसे त्याच्या हातावर ठेवले नाहीत तरी मारहाण करायची, हा त्याचा खाक्या.
त्या दिवशी मार पडल्यावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला गेली तेव्हा मालकिणीने काय झालं म्हणून विचारलं. मग तिच्या नवऱ्याला बोलावून घेऊन पुन्हा असं झालं तर पोलिसात वर्दी देईन अशी धमकी दिली. सुमन त्याला धमक्या द्यायचीच, पण तिच्यासारख्या नगण्य बाईच्या तक्रारीची पोलिस काही दखल घेणार नाहीत हे त्याला माहीत होतं. मात्र गावातली एक प्रतिष्ठित बाई तिला घेऊन पोलिस स्टेशनला गेली तर ते नक्की दखल घेतील हे तो जाणून होता. सुमन घरी आल्यावर तो चिडून म्हणाला, "आपल्या घरातली भांडणं त्यांच्यापर्यंत न्यायची काय गरज होती?" ती म्हणाली, "त्या आंधळ्याच हायती जणू. त्यांनी माझं तोंड बघून इचारलं. आन सांगितलं तर काय झालं? तुमी वाटेल तसं मारायचं न मी निस्तं तोंड बांधून ऐकून घ्यायचं व्हय?" तो रागाने जळत होता. पण तिच्या अंगाला हात लावायला धजला नाही.
व्यंकट एकाचा छकडा चालवायचं काम करायचा पण काम नियमित नसे आणि पैसे फार मिळायचे नाहीत. सुमनच्या मालकिणीने धमकी दिल्यापासून तो जरा सरळ आला. खाडे कमी करायचा, घरखर्चाला पैसे आणून द्यायचा. सुमनने तिच्या मालकिणीकडून कर्ज काढून एक बैल आणि जुना छकडा विकत घेतला. व्यंकटला जास्त काम मिळायला लागलं. तुटपुंज्या पगाराऐवजी मालकीच्या छकड्याच्या भाड्याचे सगळे पैसे त्याला मिळत. बैलाचं खाणंपिणं भागून वर चांगली मिळकत व्हायला लागली. व्यंकट अजून अधूनमधून गांज्याच्या नशेत असायचा, पण सुमनला त्रास देत नव्हता. शेवटी आपल्याला बरे दिवस आले म्हणून ती हरखून गेली. पण ते तिच्या फार दिवस नशिबात नव्हतं.
निमित्त झालं तिच्या ऑपरेशनचं. गावात बिनटाक्याच्या ऑपरेशनचं शिबीर होतं. सुमनच्या ओळखीची एक कार्यकर्ती होती तिनं सुमनला विचारलं तुला करून घ्यायचं का म्हणून. सुमन अगदी ठामपणे हो म्हणाली. तिचं ऑपरेशन झाल्याचं कळलं तशी व्यंकट धावत शिबिरात गेला. "मला न सांगता आप्रेशन का केलंस? खून पाडीन तुझा." ती कार्यकर्ती कसला गोंधळ आहे म्हणून पहायला आली तर हा तिच्या अंगावर धावून गेला. "माझ्या परवानगीबिगार तिचं आप्रेशन कसं केलं? कोर्टात खेचीन तुम्हाला." तिनं त्याला सुनावलं, "ऑपरेशन करून घ्यायला नवऱ्याची परवानगी लागत नाही. तुम्ही मुकाट्यानं बाहेर व्हा नाहीतर माणसं बोलवून तुम्हाला बाहेर काढावं लागेल."
त्याला आणखी मुलं हवी होती असं नाही. चांगले दोन मुलगे, एक मुलगी होती. पण बायकोनं आपल्याला न सांगता-विचारता असला निर्णय घेतला ह्याचा त्याला अपमान वाटला. समजते कोण स्वत:ला ही? मी नवरा आहे तिचा. आणि आता ती बिनबोभाट कुणाशीही संबंध ठेवू शकते ह्या विचाराने त्याच्या जिवाचा नुसता संताप झाला. तो तिला पुन्हा मारहाण करायला लागला आणि कुणाला सांगितलंस तर जिवे मारीन अशी धमकी देऊन ठेवली.
त्याला एका व्यापाऱ्याकडे नोकरी लागली. तशी पगारी नोकरी नव्हती, पण नुसतं वखारीत थांबायचं आणि माल घेणाऱ्या गिऱ्हाइकाचा माल पोचवायचा. व्यापाऱ्याचा धंदा मोठा होता आणि व्यंकटला खूप काम मिळत होतं. त्यानं घरी जायचं सोडून दिलं. व्यापाऱ्याच्या सामानाच्या यार्डात छकडा सोडून तिथेच झोपायचा. व्यापारी खूष होता कारण त्याला फुकटात वॉचमन मिळत होता.
एक दिवस सुमन वखारीत आली. ती आडोशाला थांबली आणि व्यंकट वर्दीवर गेल्याचं पाहून आत गेली. आपण कोण ते व्यापाऱ्याला सांगून ती म्हणाली, "घराची डागडुजी करायला सामान पाहिजेय. उधारीवर द्याल का? मी थोडं थोडं करून माझ्या पगारातनं पैसं फेडीन."
"व्यंकटराव देतील की."
"नको."
"का?"
"ते घरी येत नाईत. खर्चाला बी पैसे देत नाईत. ह्याचं बिल द्यायचे नाईत."
"बरं बघू."
तिनं पत्रे, फरशा, वासे असं सामान नीट पारखून शक्य तितके पैसे वाचवून पण दर्जाबद्दल तडजोड न करता निवडलं त्याचं व्यापाऱ्याला कौतुक वाटलं.
व्यंकट वर्दीवरून आल्यावर त्यानं त्याला विचारलं घरी का जात नाही म्हणून.
"तुमाला कुणी सांगितलं?"
"तुमची बायको आली होती. असं बरं नाही. अहो, माणूस काम कशासाठी करतो? बायकापोरांसाठी ना? अन् तुम्ही घर, बायकापोरं असून इथं भणंगासारखे रहाता?"
"ती चांगल्या चालीची बाई नाही सायेब?"
"तसं काही नाही. मी चौकशी केलीय. कुणी काही वावगं बोलत नाही तिच्याबद्दल."
व्यंकटची समजूत घालून व्यापाऱ्यानं त्याला घरी पाठवलं. तो आल्यावर सुमनवर डाफरला. "मालकाकडे जाऊन माझ्याबद्दल तक्रार करायला लाज वाटली नाही?"
"मी तक्रार केली नाई. त्यांनीचहन इचारलं."
"पण आधी तिकडं गेलीसच कशापाई?"
"सामान घ्यायला."
"सामान? कशाचं सामान?"
"घराची डागडुजी करून घेणार हाय मी. छपार गळतया, कूड धड राह्यलं नाई, जमिनीला उंदरांनी उकर काढलाय. तुमाला लईदा म्हणलं पर तुमी मनावरच घेईनात मग आता मीच करायचं ठरवलं."
"आन पैसे कोण देणार? बाप तुझा?"
"मी देनार हाय. दर महिन्याला माज्या पगारातनं थोडं थोडं. तुमच्या मालकांनी हप्ते दिलेत मला."
ती आपल्या पायावर उभी रहातेय, मला न विचारता आपल्याच कलानं सगळं करतेय हे व्यंकटला आवडलं नव्हतं. तो तिचा रागराग करायचा. रोज घरात शिव्यागाळी, भांडणं सुरू झाली. पैसे पण देईना. त्यात त्यानं दारू प्यायला सुरुवात केली. बैलाच्या खाण्याची सुद्धा हेळसांड करायला लागला. मग सुमनला पैसे देऊन पोरांकडून कुठे वैरणीची पेंढी, कुठे उसाचं वाडं आणून बैलापुढे टाकावं लागायचं. तिला वाटायला लागलं हा घरी येत नव्हता तेच बरं होतं. मुलं आता मोठी झाली होती. त्यांना ही सगळी परवड दिसत होती. ती बापाच्या अरे ला कारे करायला लागली. एक दिवस त्यांनी बापाला सुनावलं, "आईला शिव्या दिलेल्या आम्ही ऐकून घेणार नाही." तेव्हा तो सुमनला म्हणाला, "मी आता जातो तो परत यायचाच नाही. तू पाया पडलीस तरी येणार नाही. बघू तू एकटी घर कसं चालवतेस ते." तो छकडा जुंपून चालता झाला. त्याला कुणी थांब म्हटलं नाही. फक्त सुमनचा भाऊ तिला जाब विचारायला आला.
"व्यंकटरावांना का हाकलून दिलं? ही काय रीत असते का?"
"ते आपल्या पायांनी गेले."
"ते तसं म्हणत नाहीत."
"मग ते खोटं बोलतात. पोरांना इचार."
"पोरं काय तुझ्या बाजूनंच बोलणार."
ती उसळून म्हणाली, "का माज्या बाजूनं बोलतात? कारण त्यांना दिसतंय आपला बाप कसला हाय ते."
"काय वाईट आहे त्यांच्यात?"
"ते तुला दिसणारच नाई. तू आपल्या मतानं समजून उमजून मला त्यांच्या गळ्यात बांधलंयस."
"सुमने, थोबाड फोडीन हां. लई चुरूचुरू बोलायला लागलीस."
"फोड की, मार काई नवीन नाई मला. त्यो मारीतच होता, आता तूबी मार, समद्यांचा मार खायसाठीच जल्माला घातलीय मला."
एक दिवस सुमनला कोणी तरी बोलवायला आलं व्यंकटला हॉस्पिटलला ॲडमिट केलंय म्हणून. माल छकड्यात भरत असताना एक फरशी त्याच्या पायावर पडून त्याची बोटं ठेचली होती आणि पावलाला फ्रॅक्चर झालं होतं. तिच्याच्यानं अगदीच झटकून टाकवलं नाही. त्याचं दुसरं कोणीच नाही हे तिला माहीत होतं आणि तिचा भाऊ बिऊ नुसता तोंडानं त्याचा कैवार घेणार, अडीअडचणीला त्याला मदत करणार नाही ह्याची तिला खात्री होती. ती हॉस्पिटलमधे गेली, त्याची देखभाल केली, कर्ज काढून हॉस्पिटलचं बिल भरलं आणि त्याला डिस्चार्ज मिळाल्यावर घरी घेऊन आली. तो महिनाभर बसूनच होता. थोरला मुलगा फावल्या वेळात छकडा चालवून चार पैसे मिळवत होता. तरी पण पैशाची खूप ओढाताणच होती. जमेची बाजू एवढीच होती की व्यंकट जरा चांगला वागत होता. कदाचित तिनं त्याच्यासाठी एवढं केलं ह्याचं त्याला काहीतरी वाटलं असेल.
पण तो बरा झाला आणि सगळं पूर्वपदावर आलं. एक दिवस त्यानं सुमनला दिलेल्या शिव्या ऐकून थोरल्या मुलाचं डोकं फिरलं. त्यानं रॉकेलची बाटली घरातून आणून बापाच्या अंगावर रिकामी केली. म्हणाला. "थांब आता पेटवूनच देतो तुला, म्हणजे पुन्हा त्रास द्यायला यायचा नाहीस." व्यंकटला भीती वाटली तो खरंच आपल्याला पेटवून देणार म्हणून. तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी छकडा न्यायला आला तेव्हा मुलानं सांगितलं, "छकडा मिळणार नाही. बैल न छकडा आईनं आपल्या पैशानं घेतलाय. तिचा आहे तो." पण छकडा नसला तर पोटाला काय मिळवणार म्हणून सुमनने मधे पडून छकडा द्यायला लावला.
व्यंकट आता काम नीट करीना. खाडे करायला लागला. दारू पिऊन कामावर आला म्हणून व्यापाऱ्याने त्याला हाकलून दिलं. तो पुन्हा छकड्याच्या लायनीत उभा रहायला लागला. पण भाडं सगळ्यांपेक्षा जादा सांगायचा, माल चढवा-उतरवायला मदत करायचा नाही, गिऱ्हाईकाशी अरेरावीनं वागायचा त्यामुळे त्याला फारसं काम मिळेना.
सुमनचं आता चांगलं चाललं होतं.थोरला मुलगा गवंड्याच्या हाताखाली काम करायचा. त्याला चांगली हजेरी मिळायची. धाकट्याला एका औषधाच्या दुकानात नोकरी लागली. तिनं मुलीचं लग्न केलं. लग्नाला तिनं व्यंकटला बोलावलंच नव्हतं, पण तिचे भाऊ आणि शेजारीपाजारी असं कसं, मुलीच्या बापाशिवाय कसं लग्न लागायचं म्हणून त्याला घेऊन आले. त्याने प्रसंग साजरा केला, पण आपल्याला न विचारता सवरता पोरीचं लग्न केलं नि आपल्याला नुसतं पाहुण्यासारखं बोलावलं हे त्याला फार लागलं. लग्नानंतर थोड्या दिवसांनी तो दारू पिऊन आला आणि त्यानं मोठा तमाशा केला. सुमनला, पोरांना घाण घाण शिव्या दिल्या, घर माझ्या नावावर आहे तुम्हाला हाकलून काढीन म्हणून धमक्या दिल्या. घरासमोरच्या रस्त्यात छकडा आडवा घालून ठेवला होता न त्यामुळे सगळी रहदारी थांबली होती. काय प्रकार आहे पहायला माणसांची ही गर्दी जमली. पोरांनी बापाला मारहाण करीत घराबाहेर काढलं. तो अजून शिव्यागाळी करीत त्यांच्या अंगावर धावून जातच होता, पण जमलेल्या माणसांनी त्याची समजूत घालून त्याला मुकाट्याने जायला लावलं. सुमनला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. ती पोरांना म्हणाली, "मला आता हे सगळं सहन होत नाही. मी एकतर आत्महत्या करते नाहीतर आमच्या मालकांच्या रानातल्या वस्तीवर रहायला जाते. तिथं मोलमजुरी करून राहीन."
पोरं म्हणाली, "हंऽऽ आणि मग आम्हाला करून कोण घालणार? आता तर तायडी बी लग्न होऊन गेली. तू कशाला घाबरतेस? आम्ही आहोत तवर तो तुला धक्का लावणार नाही. आता त्याला घरात येऊच देणार नाही काय बी झालं तरी. तू निवांत रहा."
मुलं आता स्वत:चीच नव्हे तर आपली सुद्धा काळजी घ्यायला समर्थ आहेत असं वाटून सुमनचा जीव सुखावला. सगळी जबाबदारी आता आपण एकटीनेच वहायला नको म्हणून ती सैलावली. मुलं मिळवती झाली आहेत तेव्हा त्यांच्या लेखी मिळवून पालनपोषण करणाऱ्या आईपेक्षा भाकरी करून घालणारी आई ही प्रतिमा जास्त महत्त्वाची झाली आहे ह्याचं तिला वैषम्य वाटलं नाही. किंवा ह्याचीच तार्किक परिणती म्हणजे त्यांना भाकरी करून घालायला त्यांच्या बायका आल्या की ही गरज सुद्धा संपेल असाही विचार तिच्या मनात आला नाही.