अर्धुक/नकुसा
दशरथला दारूचा नाद होता. म्हणजे रोज दारू पिऊन नकुसाला मारहाण करायचा वगैरे असं काही नाही. पण दर आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी तालुक्याच्या गावाला बाजार करायला म्हणून जायचा तेव्हा प्यायचा. बरं, प्यायला तर एकटा नाही प्यायचा. गावातली पाहुणेमंडळी बाजाराला यायची त्यांना बोलावून दारू पाजायचा. त्याच्या ह्या गुणाचा लवकरच बोलबाला झाला आणि अनेक फुकटे येऊन त्याला चिकटायला लागले. फुकटच्या मोठेपणाची त्याला झिंग येत होती पण ह्या व्यसनापायी बराच पैसा खर्च झाल्यामुळे घरी पुरेसं धान्य, भाजीपाला, तेल येईना. उपासमार व्हायला लागली म्हणून नकुसा शेतमजुरी करायला लागली. पण तिचा पगारही दशरथ मागून न्यायचा. ती देत नाही म्हणाली तर तिला बडवायचा. बाप शेजारी असून जावयाला धमकावण्याची कुवत त्याच्यात नव्हती म्हणा, किंवा संसार हा असाच चालायचा, त्यात जगावेगळं काय आहे असं वाटत होतं म्हणून म्हणा, त्यानं ह्या बाबतीत काही दखल घेतली नाही.
दशरथचं खर्चाचं आणखी एक कलम होतं ते म्हणजे त्याची जिमिन. लांब येऊन राहिला तरी त्यानं जमिनीवरचा हक्क सोडला नव्हता. मग दर पेरणीच्या हंगामाच्या आधी भाड्यानं बैल-औतं घेऊन नांगरट, कुळवणी करायची, शेणखत टाकायचं, पेरणी, काढणी, मळणी ह्या सगळ्याचा खर्च, पुन्हा रजा घेऊन गावी जाण्यासाठी केलेले खाडे ह्या सगळ्याचा हिशेब तो कधी मांडीत नसे. घरी यायची ती दोन-तीन पोती ज्वारी, ती आपल्याला किती महागात पडते हा विचार त्याच्या कधी मनात आला नाही. भाडं भरून एस्टीनं ती पोती आणताना, छकडा करून घरी आणून टाकताना तो अभिमानाने फुललेला असायचा. पोती उतरवून घेऊन घरात आणून ठेवली की तो आणि नकुसा जमीनदाराच्या थाटात वावरायचे.
तेवढा दाणा घरी खायला ठेवला असता तर थोडी तरी बेगमी झाली असती. पण कसल्या तरी नडीपोटी ज्वारी विकायची, असं करीत लवकरच ती संपून जायची. परत उपासमार सुरू व्हायची.
एकदाच कधी तरी सणाला मुलांना कपडे घ्यायला नकुसानं बापाकडे पैसे मागितले, ते सुद्धा उसने, तर त्यानं आपली परिस्थिती किती बिकट आहे ह्याचं इतकं रडगाणं लावलं की तिनं पुन्हा बापाच्या दारात जायचं नाही म्हणून कानाला खडा लावून घेतला.
बापाचंही बरोबर होतं. त्याच्या नव्या बायकोला एकीपाठोपाठ एक अशा दोन मुली झाल्या. त्यांच्या पाठीवर मुलगा. मुलांना संभाळायला दुसरं कुणी नव्हतं म्हणून ती कामाला जात नसे. पुन्हा ती तरुण बायको म्हणून तिची थोडी हौसमौज करावीच लागे. जमिनीच उत्पन्न काही ह्या सगळ्या गरजा भागवण्यापुरेसं नव्हतं तेव्हा वयानुसार झेपत नसून सुद्धा त्याला मजुरी करावी लागायची. त्यात तो आणखी मुलीला मदत काय करणार? त्यातून त्याची बायको जवळजवळ आपल्याएवढ्या सावत्र मुलीला पाण्यात पहायची. एवढंसं काही बापाघरून पोरीकडे गेलेलं तिच्या तीक्ष्ण नजरेला दिसलं की ती आकाशपाताळ एक करायची. दारात एक आंब्याचं झाड होतं. वर्षाआड त्याला भरपूर आंबे लागायचे. एकदा बापाने नकुसाकडे पाचपंचवीस आंबे दिले तर बायकोनं थयथयाट केला.
"आपल्या पोरांच्या तोंडचा घास काढून तिची भर करता."
"अगं, पर लय आंबं हायती, आपल्याच्यान् सरायचं न्हाईत. वाइच तिच्या बी पोरांला खाऊ दे की."
"सरायचं न्हाईत तर बाजारला निऊन इकावं म्हन्ते मी. आपल्याला कंची बी नड नसल्यासारकंच वागताय तुमी बी."
नकुसाला कसलासा आजार झाला. वरच्यावर ताप यायचा, अशक्तपणा वाटायचा. फारच आजारी झाली तर दशरथ तिला औषधाच्या दुकानातनं कसल्यातरी गोळ्या आणून द्यायचा. तेवढ्यापुरतं बरं वाटलं की ती उठून कामाला लागायची. एकदा ती फारच मागे लागली म्हणून तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरने तिला बरीच औषधं लिहून दिली. अंगात रक्त फार कमी आहे म्हणाला. त्यासाठी इंजेक्शनं द्यावी लागतील म्हणाला. इतक्या लांब इंजेक्शन घ्यायला वरच्यावर येता येणार नाही असं दशरथने त्याला सांगितलं. तेव्हा त्याने गोळ्या लिहून दिल्या. खूप दिवस घ्याव्या लागतील म्हणाला. खाण्यापिण्यावर जरा लक्ष ठेवा, भाज्या बिज्या भरपूर खायला पाहिजेत म्हणाला. दशरथने औषधांच्या दुकानात जाऊन पाचसहा दिवसांपुरती औषधं आणली.
तेवढ्यापुरती नकुसाची तब्बेत जरा सुधारली. ती म्हणाली, "अवं, औषधं संपल्यात. बाजारच्या दिशी गावात जाल तवा घिऊन या."
"हां तुला इरभळ औषधाचा खुराक द्यायचा मंजी आमी समद्यानी उपाशीच ऱ्हायला पायजे."
मग नकुसा काही बोलली नाही. बघता बघता तिची तब्बेत पुन्हा बिघडली. अमुक दुखतंय असं तिला सांगता येईना, पण काही तरी होत होतं एवढं खरं, अंगात बळच नव्हतं. हळूहळू रानातलं काम बंदच झालं, पण घरातलंही होईना. त्यातच तिला नीट चालता येईनासं झालं. पाय ओढीत ओढीत कशीबशी चालायची. वस्तीवरली माणसं म्हणायला लागली, "दशरथ, तिला चांगल्या डाक्टरला दाव. तिच्या अंगावरनं वारं गेलंय जनू" शेवटी लोकांच्या आग्रहाने का होईना, त्यानं तिला सायकलवर घालून डॉक्टरकडे नेली. डॉक्टरनं बऱ्याच तपासण्या केल्या, शेवटी म्हणाला, तिच्या पाठीच्या कण्याला काहीतरी झालंय. पुण्याला नेऊन दाखवलं पाहिजे. आता तिला पुण्याला घेऊन कोण जायचं, म्हणून दशरथनं तिला तशीच घरी आणली. पण ती बरी व्हायची काही लक्षणं दिसेनात. उलट तिला आता आधाराशिवाय चालता येईनासं झालं. शेवटी दशरथनं मालकाकडून उचल घेऊन तिला पुण्याला नेलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले तिच्या मणक्यावर गाठ आहे. ती ऑपरेशन करून काढली पाहिजे. नकुसाचं ऑपरेशन झालं. पण तिच्या परिस्थितीत काही फरक पडला नाही. मग डॉक्टर म्हणाले, "तुम्ही फार उशीर केला. तिला लवकर आणली असती तर ती बरी होऊ शकली असती."
दशरथने तिला घरी परत आणलं. आता तिचा कमरेखालचा भाग संपूर्ण लुळा पडला होता. तिला उठून बसता येईना की खुरडत चालता येईना. दशरथ तिला तिच्या बापाकडे घेऊन गेला. म्हणाला, "तिला तुमच्याकडं ठिवा थोडं दीस."
"हितं कशापाई? तिचं कोन करनार?"
"आय हाय की तिची. घरातच असती न्हवं? मी एकला तरी कुठवर करनार? तिला संबळू का पोरांचं बगू का काम करून पोटाला मिळवू?"
"त्ये मला काय ठावं नाय. तुमी आपल्या गावी निऊन ठिवा तिला. तुमची बी मान्स हायती की. आता लगीन करून दिल्यावर आमची काय जबाबदारी? तुमचं तुमी बगून घ्या."
आधी त्याला जबाबदारी घ्यायचीच नव्हती. पण पोरीची अवस्था बघून कणव आली असती तरी तिला घरात ठेवून घ्यायचं तिच्या सावत्र आईनं कधीच पत्करलं नसतं. दशरथच्या घरी पण तसं तिची देखभाल करील असं कुणीच नव्हतं. तेव्हा आहे इथंच राहून आला दिवस रेटायचा एवढंच करणं शक्य होतं. नकुसाची मुलगी नऊ-दहा वर्षांची होती. ती थोडीफार मदत करायची. आजारी झाल्यावर नकुसानं तिला भाकरी करायला शिकवलं होतं. पण आईला आधार देऊन बसतं करायचं, थोडंफार खाऊ पिऊ घालायचं, तिचं गू-मूत साफ करायचं हे सगळं काही पोरीला जमलं नसतं. दिवसभर काम करून उरल्या वेळात दशरथ आपल्या बुद्धीप्रमाणे, जमेल तशी बायकोची सेवा करीत होता. पण तोही वैतागला होता.
काही दिवसांनी नकुसा आधार घेऊन बसू सुद्धा शकेनाशी झाली. तिची वरच्यावर कूस बदलायला पाहिजे, तिचं शरीर हलतं रहायला पाहिजे हे दशरथला माहीत नव्हतं आणि आळसापायी तिचं अंग पुसणं, कपडे बदलणं हे तर त्यानं सोडूनच दिलं होतं. मग तिला सगळ्याभर व्रण झाले, त्यात पू झाला. व्रणांची दुर्गधी इतकी वाढली की तिला बघायला कुणी येईनासं झालं. दशरथला आणि पोरांना सुद्धा ते असह्य व्हायचं.
शेवटी मरणानेच तिला ह्या यातनांतून आणि विटंबनेतून मुक्ती मिळाली. तिला अशी सुटका नको होती. ती शेवटपर्यंत मी बरी झाले की अमकं करीन तमकं करीन असंच म्हणत होती.
दशरथ आता परत लग्न करायची भाषा बोलतोय. मुलांचं तो एकटा कसं बघणार? शिवाय भाकरी करून घालायला कुणी तरी हवंच.