मुना नेहमीप्रमाणे गाणं गुणगुणत भराभरा पाय उचलीत आली. तिनं घरात पाय ठेवला नि रेखा म्हणाली, "तो बाबा फिरून हितं आलेला मला नाही खपणार." आपल्या आईनं ज्याच्याशी दुसरा संबंध केला त्याला ती बाप म्हणायची नाही. यमुनेनं पोरीच्या डोळ्यांतला अंगार पाहिला, म्हातारीचे घट्ट मिटलेले ओठ, थिजलेला चेहरा टिपला. तशी हल्ली एरवी सुद्धा पोरगी तिची काही पत्रास ठेवीत असे असं नाही, पण आजचा नूर काही वेगळाच होता.

 "काय झालं?" तिनं आईला विचारलं.
 "व्हायचंय काय? तो हितं आला होता. त्याच्या पाठोपाठ ती अवदसा. नाही नाही ते बोलली. तिचं काय तोंड आहे? संडास आहे नुसता. सगळ्या आळीला फुकटात तमाशा. तुला काय शेण खायचं ते खा पण त्याचे शिंतोडे आमच्या अंगावर नकोत, समजलीस? पुन्हा तो हितं आला तर पोलिसात वर्दी देईन."
 यमुना काही न बोलता घरात आली आणि डोक्यावरचं गाठोडं उतरवून त्यातले कपडे वेगळाले करायला लागली. तिच्या मनात आलं, म्हातारी येवढं फडाफडा बोलली पण माझ्या घरातनं चालती हो नाही म्हणाली. कसं म्हणेल? मग म्हातारपणी तिला कोण संभाळणार?
 यमुनेचं लग्न होऊन चारपाच वर्ष झाली होती तेव्हा एक दिवस ती नवऱ्याला म्हणाली, "माझे वडील थकलेत, त्यांच्यानं काम रेटत नाही. आईला कुणीतरी मदतीला पाहिजे. आपण त्यांच्यापाशी जाऊन राहू." नवरा कबूल झाला नाही. तशा त्याला इतर जबाबदाऱ्या होत्या असं नाही. त्यांची लाँड्री होती पण ती थोरला भाऊ चालवायचा आणि हा नुसता नोकरासारखा राबायला. आईबापांकडे जाऊन राहिलं तर त्यांच्यामागे त्यांचं घर, धंदा मुलीला आणि जावयाला मिळालं असतं. पण त्याला नाही पटलं. एवढा हुंडा देऊन बायको आणली ते काय पुन्हा सासऱ्याकडे जाऊन घरजावई होऊन रहायला? शेवटी यमुना एकटीच मुलीला घेऊन आईकडे निघून आली. त्यांचा परटाचा धंदा होता त्यात ती मदत करायची. नवऱ्याला वाटलं होतं येईल थोड्या दिवसांनी परत. पण ती जायचं नाव काढीना. तो दोनचारदा येऊन गेला तिला न्यायला. ती म्हणे, "पण तुम्हाला इथं येऊन रहायला काय झालं? काय वाईट आहे इथं?" तो त्याला तयारच नव्हता. शेवटी रागावून तो म्हणाला, "तुला बऱ्या बोलानं यायचंय की नाही? मी पुष्कळ ऐकून घेतलं तुझं. आता पुन्हा मी तुला न्यायला यायचा नाही." तिचं चित्त चलबिचल झालं. ती आईला म्हणाली, "जाऊ का मी त्यांच्याबरोबर?"
 "जातीस तर जा. आमचं काय म्हातारा-म्हातारीचं? आम्ही कसं बी निभावून नेऊ. जा तू."
 आईनं असं म्हटल्यावर तिचा पाय निघेना. लवकरच तिचा बाप मरून गेला. मग तर आईला एकटं सोडणं शक्यच नव्हतं. यमुनेचा नवरा सासूला आपल्या घरी नेऊन संभाळायला तयार होता, पण म्हातारीला आपलं गाव, घर सोडून परावलंबी आयुष्य पत्करायचं नव्हतं. शेवटी त्याने यमुनेचा नाद सोडून दुसरं लग्न केलं.
 हळूहळू रेखा मोठी झाली, चार इयत्ता शिकली. कामातही तिची मदत व्हायला लागली. म्हातारी थकली होती, ती घरी राहून घरचं बघायची. एकूण त्यांचं चांगलं चाललं होतं. फक्त मधनं मधनं यमुनेला वाटायचं, मी एक नवऱ्याला सोडून आईपाशी येऊन राहिले. पण माझी मुलगी कशावरून माझ्यापाशी राहील? मग आई गेल्यावर मला कुणाचा आधार?
 गोविंदा तिला धुण्याच्या घाटावर दिसायचा. एकदा रेखा मदतीला नव्हती तेव्हा जाड चादरी पिळायला त्यानं तिला मदत केली. त्यातनं त्यांची ओळख झाली. त्याला मूल नव्हतं. त्याची कजाग बायको साऱ्या परीट आळीला माहीत होती. एखाद्यानं टाकून दिली असती. हा सज्जन म्हणून संभाळायचा, पण त्याला संसारात कसल्या तऱ्हेचं सुख नव्हतं.
 तिची गोविंदाशी ओळख झाल्यापास्नं रेखा घाटावर येईनाशी झाली. आजीनं का ग म्हणून विचारलं तेव्हा ती म्हणाली, "ती त्या बाबाशी गुलुगुलु बोलत बसते. मला नाही आवडत." म्हातारीच्या कानावर कुणकुण आलीच होती. एक दिवस यमुनेचं कपड्यांचं गाठोडं पोचवायला तो तिच्याबरोबर आला तेव्हा म्हातारी खवळली.
 "त्याला इथं का आणलंस?"
 "काय बिघडलं आणलं म्हणून? माझं गठुळं लई जड होतं ते घेऊन आला तो."
 "तो चांगला माणूस नाही. लोकं त्याच्याबद्दल काहीबाही बोलतात."
 "लोकं काई बी बोलतील. तुला माहीताय का त्यानं कसलं वंगाळ काम केलं म्हणून?"
 म्हातारी गप्प बसली. यमुना म्हणाली, "आई, मी त्याच्याशी दुसरा संबंध करणार आहे."
 "काय? डोस्कं ठिकाणावर आहे का तुझं? चांगलं लग्न लावून दिलं त्याच्याबरोबर नांदली नाहीस. आणि हा कोण कुठला एका बायकोचा नवरा शोधलास?"
 एवढं झाल्यावर म्हातारी तिच्याशी धड बोलायची नाही. बोललीच तर तिरकस बोलायची. रेखाचं पण तसंच, फटकन उलट बोलायची. तिनं दोनचार घरी कामं धरली होती, पैसे मिळवीत होती. यमुनेनं खूणगाठ बांधली पोरीला मिळवतेपणाचा माज आला म्हणून. आपण कुणाचं काय वाकडं केलं म्हणून त्या दोघी आपल्याशी असं वागतात हे तिला कळेना. तिनं स्वप्न पाहिलं होतं, गोविंदा आपल्याकडे रहायला येईल, कामाला हातभार लावील. नाहीतरी वडील गेल्यापास्नं पुरुषमाणूस नव्हतंच कुणी घरात. तर आईचं हे असं. आणि मग गोविंदा बायकोला सोडून तिच्याकडे रहायला तयारच नव्हता असं तिच्या ध्यानात आलं.
 ती आजारी होती म्हणून दोनतीन दिवस घाटावर गेली नव्हती तर गोविंदा विचारायला घरी आला. त्याच दिवशी जरा बरं वाटलं म्हणून ती बाहेर गेली आणि त्यांची चुकामूक झाली, तेव्हा रेखानं नि म्हातारीनं मोठा तमाशा केला. मग तिनं त्याला सांगितलं पुन्हा माझ्या घरी येऊ नको म्हणून.
 "तुला बरं नव्हतं म्हणून चवकशी करायला आलो."
 "तेवढंही नाही यायचं. घर आईचं आहे. तिला नाही आवडत तुम्ही आलेलं."
 "म्हंजे मी तुला भेटायला कधी तिथं यायचंच नाही?"
 "तुम्ही तुमच्या बायकोला सोडीत नाही तवर नाहीच."
 "तिला तरी दुसरं कोण आहे?"
 "ते मला ठाऊक नाही. पण ती तुमची बायको आहे तवर ती तुमच्यावर हक्क सांगणार. त्या दिवशी तुम्ही येऊन गेल्यावर ती आली होती. ओरडली, आरडली, घाण घाण शिव्या दिल्यान. ही माणसं जमली होती गंमत बघायला."
 गोविंदा तिला म्हणाला तू माझ्याकडे रहायला ये. पण एक तर ती म्हाताऱ्या आईला न् लेकीला सोडू शकत नव्हती आणि त्याच्या घरी ती अवदसा यमुनेला सुखानं राहू देणं शक्य नव्हतं. पण हा तिढा सोडवायचा कसा ह्यावर ती डोक्याला फार त्रास करून घेत नसे. तो तिचा स्वभाव नव्हता. जे होईल ते होईल असं म्हणून ती आला दिवस आनंदात घालवायची.
 शेजारणी पाजारणींनी आडून आडून विचारायला सुरुवात केली तेव्हा रेखाला कळलं आईला दिवस गेलेत म्हणून. तोपर्यंत तिला थोडीतरी आशा होती की ती कधी ना कधी त्या बाबाचा नाद सोडून देईल म्हणून. पण आता तिच्या मनात काय आहे तेच रेखाला कळेना.
 यमुनेला मुलगी झाली. बाळंतपण तिला फार अवघड गेलं. त्यात ती आजारी झाली. मरता मरता वाचली. दोनतीन महिने काम बंदच होतं. त्यात औषधं, इंजेक्शनं चालू होती.अंगावर धन नव्हतं म्हणून पोरीसाठी पावडरचे डबे लागायचे. रेखानं सगळं एकटीच्या हिमतीवर निभावलं.गोविंदानं एकदा तिला बाहेर गाठून यमुनेशी चवकशी केली, पैसे द्यायला बघितले पण तिनं ते घेतले नाहीत.
 हळूहळू यमुना बरी झाली, धुणं धुवायला जायला लागली. पण तिची तब्बेत पहिल्यासारखी राहिली नाही. आधी ती कपड्याचं गाठोडं डोक्यावर घेऊन लयीत चालायला लागली की आळीतले बाप्ये तिच्याकडे बघत एकमेकांना डोळ्याने खुणावायचे. आता तिची रयाच गेली. बसलेले गाल, आजाराने काळवंडलेलं तोंड, सुरकुतलेले ओथंबलेले स्तन, अशी ती पाय ओढीत चालायची. पहिल्यासारखी बडबड न करता शिंपल्यासारख्या डोळ्यांनी मख्खपणे लांब कुठे नजर लावून बसायची. बेबीही तसलीच. वर्षाची होत आली तरी कोलमडत जेमतेम उठून बसायची. तिला सदा काही तरी झालेलं असायचं, सर्दी नाहीतर ताप नाहीतर जुलाब. सारखी किरकिर किरकिर करायची. एखाद्या वेळेला रेखाला वाटायचं, ह्या दोघी बाळंतपणातच खलास झाल्या असत्या तर बरं झालं असतं.
 एक दिवस अंधारात घरी येताना बोळाच्या तोंडाशी ती दोघं बोलत उभी असलेली पाहिली तशी रेखाला उमजलं की आईनं त्या बाबाचा नाद काही सोडला नाही. त्यानंच तिचं मातेरं केलं. आधी कशी रसरशीत दिसायची. एवढ्या तेवढ्यावरनं हसायची. कुठल्याशा सिनेमातलं गाणं म्हणून नाचून दाखवायची. आता गाणं, नाचणं तर जाऊ दे, साधं हसू सुद्धा तिच्या तोंडावर दिसत नाही. हे त्याचंच काम. आमचं सगळ्यांचंच सुख त्यानं ओरबाडून घेतलंय आणि तरी ती त्याच्याच मागे असते. रेखाचा जीव तडफडला. ती तरातरा घरी आली आणि तोंड मिटतेस का हाणू म्हणून बेबीवर खेकसली.
 पण हळूहळू होतं ते अंगवळणी पडायला लागलं. सारखा रागराग सुद्धा होईनासा झाला. यमुनेची तब्बेत थोडी सुधारली. रेखाच्या मनानं उभारी धरली.
 रथाची जत्रा आली तेव्हा ती हौसेनं बाजारात गेली. नवीन कानातलं घेतलं, लाल खड्याची चमकी घेतली नि मनगटभर लाल काचेच्या सोनेरी नक्षीच्या बांगड्या भरून घेतल्या. मग एक तयार कपड्यांचा ढीग दिसला तशी तिला बेबीची आठवण झाली. आपण तिला हिडिसफिडिस करतो तरी ती परवा तिच्या करवंदासारख्या गोल डोळ्यांनी आपल्याकडे बघून कशी हसली ते आठवलं. त्या बिचारीनं आपलं काय वाकडं केलंय? लहान पोर तर आहे ती. बेबीसाठी एक गुलाबी रंगाचा फुलाफुलांचा फ्रॉक तिनं घेतला.
 ती घरी पोचली तेव्हा दारातच यमुना बेबीला मांडीवर घेऊन बसली होती. काय बोलावं, कसं द्यावं ते रेखाला कळलंच नाही. तिनं पिशवीतनं फ्रॉक काढून आईच्या अंगावर टाकला नि म्हणाली, "हे घे. त्या पोरीला आणलंय."
 यमुना फ्रॉक उचलून बघतच राहिली नि एकदम खुदकन हसली, खूप मागे हसायची तशी. पण रेखानं पाहिलं तिच्या डोळ्यांत पाणी होतं.
 रेखा म्हणाली, "ही बघ, गुडदाणी आणलीय आणि केळी. देशी केळी तुला आवडतात ना, तसली. घे ना एक."
 "मला नको."
  "का?"
 यमुना काही बोलली नाही. भूक नाही असं म्हणाली नाही. रेखाला छातीवर दगड ठेवल्यागत झालं. ती तिरीमिरीनं म्हणाली, "असं का केलंस तू? मागल्या खेपेला ऑपरेशन करून घे म्हटलं तर घेतलं नाहीस. का नाही घेतलंस? तुला माझी मायाच नाही. गळ्याला दगड बांधून विहिरीत लोटून तरी दे मला." ती हमसून हमसून रडायला लागली. यमुनेनं तिला जवळ घ्यायला बघितलं तर तिनं रागानं तिला हिसडून टाकलं. यमुनेच्या डोळ्यांतनं पाणी वहायला लागलं. ती फक्त हलक्या आवाजात म्हणाली, "रेखा, माझं ऐकून तरी घे. अगं, त्याला मुलगा नको का?"