मंगलने कष्टाने डोळे उघडले. समोर तिला तिची आई दिसली. दुसऱ्या क्षणी असह्य वेदनांची जाणीव होऊन आपण कशासाठी शुद्धीवर आलो असा तिला प्रश्न पडला. तिचं विव्हळणं ऐकून आईनं तिच्याकडे पाहिलं. ती शुद्धीवर आलीय असं पाहून आईच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या. डॉक्टरांनी कितीही सांगितलं तरी मंगल शुद्धीवर येईल, जगेल असा तिला विश्वास वाटत नव्हता.

 हळूहळू काय झालं त्याची मंगलला आठवण आली. पण आईला पाहिल्याचं तिला आठवत नव्हतं. आईनं तिला सगळ्याची कल्पना दिली आणि पोलिस तिचा जबाब घ्यायला यायच्या आत त्यांना काय सांगायचं ते पढवून ठेवलं. त्याप्रमाणे तिनं सांगितलं, "स्टोचा भडका झाला आणि एकदम साडी पेटली. साडी पेटली म्हटल्यावर मी घाबरून बेशुद्ध पडले. बाकी मला काही आठवत नाही." साडी पेटली तर फक्त छाती, पाठ गळा इतकंच कसं भाजलं? तुझा नवरा कुठे आहे? सासू-सासरे? दवाखान्यात आईवडलांनी कसं आणलं? त्यांना कुणी कळवलं? ह्या प्रश्नांची तिनं उत्तरं दिली नाहीत. मला माहीत नाही आठवत नाही एवढंच ती म्हणे. खरी गोष्ट तिच्या आईवडलांना शेजाऱ्यांकडून कळली होती. तिच्या नवऱ्यानं आणि सासूनं तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावून गेले म्हणून ती वांचली. पण ते साक्ष द्यायला तयार नव्हते. त्यांना पोलिसांच्या लफड्यात पडायचं नव्हतं. पुन्हा आरोप सिद्ध झाला नाही तर मंगलच्या सासरच्या कुटुंबाशी फुकट वैर कशाला असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा मंगलच्या आईवडलांनी ठरवलं होतं की उगीच कोर्टकचेऱ्या, खटले ह्या भानगडीत पडायचंच नाही. पोरीला आपल्याकडे ठेवून घ्यायचं नि गप्प बसायचं.
 मंगल संपूर्ण बरी होऊन हॉस्पिटलमधून घरी जायला सहा महिने लागले. तिच्या भाजल्याच्या जखमा बऱ्या झाल्या पण त्या व्रणांमुळे तिची कातडी वेडीवाकडी ओढली जाऊन विद्रूप दिसत होती. डॉक्टर म्हणाले प्लॅस्टिक सर्जरीने कातडी पूर्ववत होऊ शकेल. पण आधीच खूप खर्च झालेला. मंगलचा बाप काही कुणी मालदार नव्हता. त्याला आणखी खर्च करणं झेपणारं नव्हतं. मंगलही काही बोलली नाही. आईवडलांनी इतकं केलं, मरणाच्या दाढेतून आपल्याला ओढून काढलं, एवढा खर्च केला ह्याचंच तिला ओझं वाटत होतं. आता ह्यापुढे तरी आपला बोजा त्यांच्यावर टाकायचा नाही असं ठरवून ती नोकरी बघायला लागली. शिक्षण झालेलं नाही, कसलंच कसब नाही, तिला नोकरी तरी कसली मिळणार? शेवटी ती आसपासच्या बायांबरोबर खुरपणीला जायला लागली. पण ते काम तिला जमेना. साताठ तास डोक्यावर ऊन घेतं कष्ट करायची तिला सवय नव्हती. ह्या सुमाराला तिची एक माहेरी आलेली मैत्रीण तिला भेटली. तिचं जवळच्या जरा मोठ्या गावात लग्न झालं होतं. तिनं मंगलला विचारलं, "तू घरकाम, स्वैपाक करशील का? आमच्या इथले एक बागाईतदार आहेत. त्यांची स्वैपाकीण काम सोडून गेलीय. त्या वहिनी मला विचारीत होत्या तुला कुणी माहिती आहे का म्हणून."
 "पण मला जमेल का?"
 "न जमायला काय झालं? घरी स्वैपाक करतेस ना त? बघ, येत असलीस तर चल माझ्याबरोबर. मी तुझी त्यांची गाठ घालून देईन. दोन दिवस माझ्याकडे रहा. नोकरीचं जमलं तर तुझ्यासाठी भाड्यानं खोली बघू."
 हो ना करता मंगल तयार झाली. ती कायम आपल्याकडे रहाणार म्हणून भावाची थोडी कुरकूर चाललीच होती. आईनंही मग भर घातली.
 नोकरी मिळाली आणि मंगल भाड्याच्या खोलीत रहायला गेली. आधी तिला एकटं रहाणं अवघड वाटत होतं. पण शेवटी कुणाचं तरी मिंधं होऊन रहाण्यापेक्षा स्वतंत्र रहाणं बरं असं वाटलं. काही काळ तिला आपल्या विद्रूप झालेल्या कातडीची लाज वाटायची, पण साडी चांगली लपेटून खालमानेनं चाललं की सहज बघणाऱ्याच्या लक्षात सुद्धा येणार नाही अशा तऱ्हेनं भाजलेला भाग लपून जात असे. कुणी आवर्जून विचारलंच तर स्वैपाक करताना भाजलं म्हणून सांगायची.
 जिथे काम करायची ते मुलाबाळांचं पाहुण्यारावळ्यांचं कुटुंब होतं. काम भरपूर होतं पण माणसं चांगली होती. पगार बरा होता, शिवाय उरलं सुरलं अन्न मिळायचं त्यात तिचं रोज एखादं जेवण भागायचं. शक्य तितका पगार वाचवून ती आईवडलांना पाठवायची. तिच्या मालकिणीनं तिला एकदा विचारलं तू काही पगार बाजूला ठेवतेस का म्हणून. मंगल म्हणाली नाही.
 "का नाही? सगळेच पैसे आईवडलांना पाठवू नको. स्वत:साठी काहीतरी राखून ठेव. नाहीतर म्हातारपणी तुला काय आधार?"
 त्यांनी मंगलच्या नावानं बँकेत खातं उघडलं आणि परस्परच तिच्या पगारातले काही पैसे त्यात भरायला लागल्या. एकदोन महिने पैसे कमी आल्यावर लगेच तिच्या वडलांचं पत्र आलं. तिनं लिहिलं की अंगावरची साडी पारच फाटली होती, नवी घ्यावी लागली त्याला पैसे गेले. त्यावर वडलांचं उपदेशपर पत्र आलं. आपली परिस्थिती समजून घेऊन काटकसरीने रहात जावे, उगीच उधळपट्टी करू नये. आपण खोटं बोललो म्हणून मंगलला वाईट वाटलं, पण खरं सांगितलं असतं तर वडील रागवले असते. मात्र आता दर महिन्याला कमी पैसे पाठवले म्हणजे काय सबब सांगायची हा प्रश्न होताच.
 भावाचं लग्न ठरलं तेव्हा वडलांनी मंगलला उचल मागायला सांगितली. तिला ते फार अवघड वाटत होतं. तिनं चाचरतच मालकिणीला विचारलं. मालकीण सहज कबूल झाली. आईनं निदान आठवडाभराची सुट्टी काढून घरी ये म्हणून बोलावलं. वऱ्हाडीमंडळी खूप जमणार तेव्हा राबायला कुणी तरी हवंच. मंगलची थोरली लग्न झालेली बहीण मला इतके दिवस पाठवीत नाहीत म्हणून अंगाबाहेर टाकून मोकळी झाली. वऱ्हाड लग्नघरी गेल्यावर मंगलला आईनं सांगितलं शक्यतो सगळ्यांच्या समोर येऊ नको म्हणून. तिला नेमकं काय झालं हे व्याह्यांच्या घरी कुणाला माहीत नव्हतं. तिला पाहून कुणीतरी प्रश्न विचारायचे, मग वळवळत्या जिभांनी एकाचे दोन करून सगळीकडे खोटंनाटं पसरवायचं कशाला? मंगलला वाटलं, मला भावाच्या लग्नात मिरवायचासुद्धा हक्क नाही.स्वत:च्या घरी आल्यावर तिनं मोकळा श्वास घेतला.
 तीन-चार वर्ष सगळं सुरळित चाललं होतं. एक दिवस एकदम तिचे वडील तिला भेटायला आले. म्हणाले,"तुझ्या नवऱ्यावर पोटगीसाठी दावा लावायचाय."
 "कशाला? आपल्याला काय कमी आहे?"
 तिच्या मनात तिच्या नवऱ्याबद्दल, सासरच्या लोकांबद्दल कित्येक दिवसांत काही विचारही आला नव्हता. आता त्या सगळ्याच गोष्टींची आठवण आल्यावर तिच्या अंगावर सरसरून काटा आला.
 वडील म्हणाले, "तुझा हक्क आहे पोटगीचा. त्याचं दुकान चांगलं चाललंय, भरपूर पैसा मिळतोय. तुला त्यातला वाटा मिळायला पाहिजे."
 "दुसरं लग्न करायचं म्हणून ज्यानं मला जाळून मारायचा घाट घातला त्याचे पैसे कशाला पायजेत आपल्याला?".
 तिला कळलं होतं की तिच्या हक्कापेक्षा त्यांना त्यातून पैसे मिळण्याची शक्यता जास्त महत्त्वाची होती, त्यांच्या साखर कारखान्यातल्या नोकरीतून ते निवृत्त झाले होते. मुलाला कायम नोकरी नव्हती आणि त्याचा संसार मात्र वाढत होता. तिच्या पोटगीच्या निमित्ताने त्यांच्या संसाराला हातभार लागला तर त्यांना हवा होता. शेवटी त्यांच्या हट्टापायी तिनं त्यांनी पुढे केलेल्या कागदपत्रांवर अंगठा उठवला. तिच्या नवऱ्याने वकिलातर्फे आपलं उत्तर कळवलं. मी काही बायकोला सोडून दिलेली नाही. ती आपल्या पायाने माझं घर सोडून माहेरी जाऊन राहिलीय. तशातूनही ती परत आली तर मी तिला नांदवायला तयार आहे. तेव्हा पोटगी देण्याचा प्रश्नच नाही.
 मग अघटितच घडलं. वडील म्हणायला लागले. तो येवढा म्हणतोय तर तू का नाही जात परत? मंगलला हे खरंच वाटेना.
 ती म्हणाली, "त्यांच्याकडे परत जायला तुम्ही कसं सांगता? मग मला वाचवलंत कशासाठी? मरू द्यायचं होतंत."
 वडील चिडले. "म्हणजे येवढं आम्ही केलं तुझ्यासाठी, त्याचं तुला काहीच नाही. तुझ्यावरच्या मायेपोटीच आम्ही येवढी धडपड केली ना?"
 "मग माया असली तर तुम्ही मला त्याच्याकडे परत कसं पाठवता?"
 वडलांनी तिची समजूत घालण्याच्या प्रयत्न केला. "कुणास ठाऊक, कदाचित त्याला आपण केलं त्याचा पश्चाताप झाला असेल. माणसं बदलतात."
 "मग इतकी वर्ष त्यानं माझी साधी विचारपूस सुद्धा कशी केली नाही? आता पोटगी द्यायला नको म्हणून तो मला नांदायला बोलावतो. त्याच्यावर विश्वास कसा टाकायचा? उलट आता जास्तच धोका आहे. मला मारूनच टाकायची म्हणजे पोटगी मागायचा प्रश्नच नको."
 "असं वेडंवाकडं मनात आणू नको."
 "का नको? एकदा घडलंय ना." ती रडायला लागली. "मी तुम्हाला इतकी जड झालेय का?"
 "आमचं पोटचं मूल आम्हाला कसं जड होईल? पण आम्ही काय तुला जन्मभर पुरणार आहोत का? आमच्या मागं तुझं कसं होईल? एकटीनंच सारा जन्म काढणार आहेस का?"
 वडील गेल्यावर मंगलने खूप विचार केला. जळून मरण्यापेक्षा एकटीनं जन्म काढायला काय हरकत आहे? नाही तरी आता आईवडलांचं घर माझ्या हक्काचं कुठ राह्यलंय? मी एकटीच राहून पोटाला मिळवून खातेय ना? मग तसंच जन्मभर करीन. पण हे वडलांसमोर बोलायचं तिला धाडस झालं नाही. तिचे वडील आणि भाऊ तिच्या नवऱ्याला भेटून त्याच्याशी बोलणं करायला गेले. मंगलच्या सुदैवाने तिच्या नवऱ्याचा तिला परत स्वीकारण्याचा काही इरादा नव्हता. तो तिला नांदवण्यासाठी खूप पैसे मागायला लागला तेव्हा तिचे वडील त्याला शिव्या देत परत आले.
 मंगलचं आयुष्य सुरळित चाललं होतं आणि त्यात ती आपल्या परीने समाधानी होती. एखाद्या वेळी इतरांसारखा आपला संसार असावा, मुलं बाळं असावी असं तिला वाटे पण ते आपल्या नशिबातच नाही अशी ती स्वत:ची समजूत करून घेई. एक दिवस अचानक तिची बहीण आणि मेव्हणा तिला भेटायला आले. मंगल म्हणाली, "इकडे कुठे? का काही काम काढलं होतं?" बहीण चटकन बोलेना तेव्हा मंगल म्हणाली, "बोला की दाजी."
 "तुझ्याकडेच काम होतं."
 "माझ्याकडे?"
 "तुला पुन्हा लग्न करायचं का?"
 "मी तसा विचारच केला नाही आणि पहिलं लग्न मोडल्याशिवाय कायद्याने दुसरं करता येत नाही ना?"
 "आता नवऱ्याला सोडून तुला पाच-सात वर्ष झाली, म्हणजे तुझं लग्न मोडल्यातच जमा आहे."
 "बरं समजा असलं, तरी माझ्याशी कोण लग्न करणारे? तुम्ही असं का विचारताय मला?"
 मग बहीण म्हणाली, "ह्यांचा एक मित्र आहे. त्याच्यात थोडंसं व्यंग आहे म्हणून त्याचं लग्न झालेलं नाही. एकदा बोलता बोलता विषय निघाला न् आम्ही त्याला तुझ्याबद्दल सांगितलं. तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे."
 एकदम गुंतागुंतीच्या परिस्थितीला तोंड द्यायला लागलं किंवा आपण कसल्यातरी दबावाखाली आहोत अशी जाणीव झाली की मंगलची जीभ अडखळायला लागायची. ती चाचरत म्हणाली, "पण क-क-कोण आहे हा म-म-माणूस? त्याला भेटल्याशिवाय मी कसं काही सांगू?"
 "आम्ही तुझी त्याची गाठ घालून देऊ की. पण आम्ही काय तुझं नुकसान का करणार आहोत? चांगला माणूस आहे. ह्यांना खूप वर्ष माहिती आहे. त्याचा बिझनेस आहे, भरपूर पैसा मिळवतो, स्वत:चं घर आहे. तुझ्या जन्माचं कल्याण होईल."
इतकं सगळं ज्याच्याकडे आहे तो आपल्यासारखीशी कशाला लग्न करील असा विचार का कोण जाणे मंगलच्या मनात काही आला नाही. लग्नाच्या कल्पनेनं ती हुरळली. लग्नानंतरचे पहिले काही दिवस तिला आठवले. तेव्हा नवरा तिच्याशी प्रेमाने वागे, तिचे लाड करी, गपचूप तिला एखादी वस्तू, तिच्या आवडीचं काहीखायला आणून देई. कदाचित आपल्या नशिबात तसं सुख पुन्हा असेल असं तिला वाटलं. दोन दिवस रजा काढून ती बहिणीकडे जाऊन आली. तिनं त्याला पाहिलं. तसं व्यंग म्हणजे काय तर त्याचा एक पाय जरा अधू होता आणि चालताना तो थोडा लंगडत होता. त्यांचं तिला काही वाटलं नाही पण तो तिला फारसा आवडला नाही. का ते तिला सांगता आलं नसतं. आणि बहिणीला तसं म्हणायचा तिला धीर झाला नाही.
 बहीण म्हणाली, "तू त्यांना अगदी पसंत आहेस."
 "त्यांनी तर माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काही बोललेही नाहीत."
 बहीण गालातल्या गालात हसून म्हणाली, "जरूर तेवढं पाहिलं. आणि काही माणसं भिडस्त असतात. लग्नानंतर मारतील हो भरपूर गप्पा. मग कधी नक्की करायचं लग्नाचं? जेवढ्या लवकर तेवढं बरं."
 "आईला, बाबांना विचारू या."
 "काही नको. ते उगीच घोळ घालीत बसतील नि संधी हातची निसट्रन जाईल."
 मंगलने नोकरीचा राजीनामा दिला. तिच्या लग्नाला ती, तिचा होणारा नवरा, बहीण, मेव्हणा इतकेच जण हजर होते. तेव्हाच मंगलच्या मनात जराशी पाल चुकचुकली. लग्न म्हणजे तरी काय, त्यांनी एकमेकांना हार घातले, दुसऱ्या दोघांनी त्यांच्यावर अक्षता टाकल्या, पेढे खाल्ले. त्याच्या घरीच समारंभ झाला आणि नंतर तिला तिथेच सोडून बहीण आणि तिचा नवरा निघून गेले. मंगलला सगळंच जरा विपरीत वाटत होतं. इथे दुसरं कुणीच कसंनाही? त्याच्या घरात इतर कुणी माणसं नाहीत? तिला जराशी भीती वाटायला लागली. पण बहीण गावातच आहे म्हटल्यावर थोडा तरी आधार वाटला.
 थोड्याच दिवसांत त्याचं खरं व्यंग काय होतं त्याचा तिला पत्ता लागला. आणि तसं असताना त्यानं आपल्याशी लग्न का केलं त्याचाही पत्ता लागला. सगळं घरकाम, स्वैपाक करायला फुकट मोलकरीण हवी होती. शिवाय त्याच्या बिझनेसमधल्या महत्त्वाच्या लोकांना पार्ट्या द्यायच्या आणि त्यांचं 'मनोरंजन' करायचं ह्यासाठी त्याला ती हवी होती. प्रथमच एका क्लायंटने तिच्याशी लगट केली तेव्हा तिनं त्याला झटकून टाकलं. ती नवऱ्याला म्हणाली, "मला नाही हे असलं आवडत. तो तुमच्यासमोर माझ्यावर हात टाकतो न तुम्ही त्याला काहीच कसं म्हणत नाही?"
 "आवडून घ्यावं लागेल."
 "म्हणजे?"
 "त्यासाठीच तर मी आणलंय तुला."
 "लाज नाही वाटत असं बोलायला? मला हे खपायचं नाही. तुम्हाला माझ्याबरोबर नीटपणे रहायचं नसलं तर मी निघून जाते."
 त्याने स्मित केलं."निघून कोण जाऊ देतंय तला? चांगले पैसे मोजलेत तुझ्यासाठी, माहीताय? जिथे कुठे जाशील तिथून फरफटत आणीन तुला."
 तो चिडला असता तर वाटली असती त्यापेक्षा किती तरी जास्त भीती तिला त्याच्या थंड क्रूरपणाची वाटली. परिस्थितीतला धोका ओळखून ती भांडण न वाढवता गप्प बसली. तिच्या मनात आलं, बहिणीला हे माहिती असून तिनं आपला विश्वासघात केला असेल? ती काही दिवस थांबली. मुकाट तो म्हणेल तसं वागत राहिली. मग एका रात्री तो झोपला असताना ती गपचूप दार उघडून पळून गेली. बहिणीकडे गेले तर कदाचित ती धोकाच द्यायची म्हणून ती आडवळणांनी जात जात कुठल्या तरी मोठ्या रस्त्यापर्यंत येऊन पोचली. ट्रकला वगैरे हात दाखवण्यात अर्थच नव्हता. बससाठी तिच्याजवळ पैसे नव्हते. शेवटी तिला एक बैलगाडी दिसली. त्यात बरेच जण होते. बायामाणसं, पोरं दिसत होती. तिनं गयावया करून त्यांना गाडीत जागा द्यायला लावली. रात्रीतनं कधीतरी ती गावी आली नि आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी मालकिणीकडे जाऊन रडली, "मला माझ्या बहिणीनं फसवलं. तुम्ही मला परत कामावर घेता का?" बाई म्हणाल्या, "मी दुसरी बाई कामाला लावलीय, तिला हाकलून तर देता येत नाही ना?" मंगल म्हणाली, "मग मी काय करू तुम्हीच सांगा. मला दुसऱ्या कुणाचा आधार नाही."
 बाई विचार करून म्हणाल्या, "मुंबईला जाशील का? माझी एक भाची तिथे असते, तिला कामाच्या बाईची फार गरज आहे. जात असलीस तर सांग. मी तुला सोबत देऊन पाठवीन."
 मंगलला थोडी धाकधूक वाटत होती, पण तिनं विचार केला, विश्वास तरी कुणावर टाकायचा? बहिणीनं हे असं केलं. ह्या बाईंनी मला नेहमीच चांगलं वागवलंय. त्या मुद्दाम माझं वाईट कशाला करतील?
 ती म्हणाली, "जाते मी."
 "आईला, वडलांना विचारायचं नाही का?"
 "मग कळवीन. आता मला कुणालाच काही सांगायचं नाही की विचारायचं नाही."
 मंगलला नोकरी पसंत पडली. जेवण, कपडे, वर चांगला पगार. ती आईवडलांना दर महिन्याला पैसे पाठवायची, पण पगार किती आहे ते तिनं त्यांना सांगितलं नाही. बँकेत खातं उघडून ती त्यात नियमितपणे पैसे टाकायची. कुणी कुणाचं नसतं आणि आपल्या भविष्यकाळाची तरतूद आपल्यालाच केली पाहिजे हे तिला कळून चुकलं होतं. वर्षातनं पंधरा दिवस तिला सुट्टी मिळायची तेव्हा ती सगळ्यांसाठी खाऊ, बक्षिसं घेऊन घरी जायची. सगळे खूष असायचे. पाचसहा दिवसांतच कंटाळा येऊन ती परत जायची. बहिणीला मात्र ती कधी भेटायला गेली नाही आणि बहिणीनं पुढाकार घेऊन करून दिलेल्या लग्नाबद्दल ती कुणाला काही बोलली नाही. वडलांनी तिच्याकरता एक-दोन स्थळं आणली होती पण तिनं ती पसंत केली नाहीत. त्यांना धड नोकऱ्या नव्हत्या, घरदार, जमीन नव्हती. तिनं विचार केला, म्हणजे नवऱ्यानं शेवटी माझ्या जिवावरच जगायचं. बाहेरही मी राबायचं आणि घरातही. पुन्हा तो चांगलं वागवील ह्याची काय हमी? त्यापेक्षा मी आहे ती काय वाईट आहे? तिनं वडलांना सांगून टाकलं ह्यापुढे स्थळं बिळं बघू नका, मला लग्न करायचं नाही.