संगीता मला फक्त दोनदाच भेटली. पहिल्या वेळी माझ्याच बागेत. मी बागेत फिरत होते तर एका चिकूच्या झाडाच्या गर्द सावलीत ती लपून बसलेली दिसली.

 मी दचकून विचारलं, "कोण तू? इथं कशाला आलीस? कुणाच्या परवानगीनं?"
 "बाई, मला बाहेर हाकलू नका. मी घरनं पळून आलेय. मला माझ्या नवऱ्यानं न दिरानं लई मारलं. हे बगा."
 तिनं फाटका ब्लाऊज वर करून आपली पाठ दाखवली. पाठीवर लाल जांभळे वळ होते. एकदोन ठिकाणी जखम होऊन रक्त आलं होतं.
 मी म्हटलं, "का मारलं?" पण हा प्रश्न खरं म्हणजे निरर्थक होता. पुरुष बायकांना मारतात ते वरवर भाकरी करता येत नाही इथपासून चालचलणूक चांगली नाही इथपर्यंत अनेक आणि अनेकविध कारणांसाठी असलं तरी त्या सगळ्यांच्या मुळाशी एकच कारण असतं. ते म्हणजे बायका त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत असतात, असहाय्य असतात आणि स्वसंरक्षण करायला समर्थ नसतात.
 ती म्हणाली, "मी काई बी केलं नाई, तरी मारलं. हमेशा मारतात."
 "मग तू माझ्याकडे कशाला आलीस? मी काय करू?"
 "तुमी मला कुटंबी पाठवा. मी पळून गेले तर कुटं जाईन तिथनं मला पकडून आनतात. एकदा मी पळून गेलते पार कराडपरेंत.पन आमच्यातली मानसं सगळीकडं पसरली हायती. कुणीतरी माज्या सासऱ्याला खबर दिली अन् तो न् माजा नवरा यिऊन मला पकडून घिऊन आले. तुमी मला कुटंबी पाठवा. परदेशात पाठवलं तरी जाईन. पन मला हितं ऱ्हायचं नाई"
 "हे बघ-नाव काय तुझं?"
 "संगीता."
 "हे बघ संगीता, मी तुला कशी कुठे पाठवून देऊ? माझा काय संबंध? फार तर मी तुझ्या नवऱ्याला बोलावून घेऊन त्याच्याशी बोलते."
 "नको नको, मग तर तो जीवच घेईल माजा. बाई,माज्यावर दया करा. हे बगा." ती रडायला लागली. रडता रडता तिनं आपल्या चोळीतनं एक चुरगळलेला फोटो काढून माझ्यासमोर धरला." हा मुलगा हाय माजा. फकस्त चार वर्षांचा हाय, त्येच्यापक्षी धाकटी मुलगी हाय. बाई, इतक्या लहान पोरांना सोडून मी पळून जाईन का तसंच काई झाल्याशिवाय?"
 ती बसल्याबसल्याच थोडी सरकली,सावलीतून उजेडात आली, तेव्हा मी पाहिलं, तिच्या गालावरही माराचे वळ होते. ती खूप गोरी होती. केस लालसर भुरे होते. मी लहान मुलांच्यात तेल न लावल्याने किंवा कुपोषणाने केस भुरे झालेले पाहिलेत.पण जात्याच लाल केसांच्या माणसांच्या असतात तसे हिच्या हातांवर, चेहऱ्यावर वांग होते.
 तिला हाकलून देणं मला प्रशस्त वाटेना. तिचं काय करावं ह्याचा विचार करताना मला एकच मार्ग दिसला.
 मी तिला म्हटलं, "पुण्याला अनाथ बायकांसाठी सरकारचा एक आश्रम आहे तिथे जाशील?"
 "कसं जायचं?"
 "बसनं."
 "मी ट्यांडवर गेले तर तिथं ह्यांची मानसं पाळत ठिऊन असतील."
 "त्याची तू काळजी करू नको. मी सोबत देऊन तुला पाठवीन. इथून थोड्या अंतरावर बसमध्ये बसवून देऊ."
 ती बरं म्हणाली. मी म्हटलं, "तू कुणाची ते सांगितलं नाहीस. तिनं अमक्याची सून म्हणून सांगितलं ते नाव माझ्या परिचयाचं होतं, ते लोक भटक्या जमातीचे, पण वीसेक वर्षांपूर्वी इथे येऊन स्थायिक झालेले. तिच्या सासऱ्याचा जमातीत बराच दबदबा होता. दीर चोरीचा माल खरीदतो असा बोलबाला होता. एका स्थानिक दादाची माणसं म्हणून लोक त्यांना ओळखंत.
 आपण कुणाच्या तरी कौटुंबिक मामल्यात नाक खुपसतोय, त्यातही अशा लोकांच्या म्हणून जरा बाकबुक वाटत होती, पण सोबत बघून मी संगीताला पुण्याला पाठवलं. पाच-सात दिवसांनी कळलं की ती परत आलीय. बाहेरून चौकशी केली तर समजलं की महिलाश्रमाच्या चालकांनी नियमानुसार तिच्याकडून नाव-पत्ता घेऊन तिच्या नवऱ्याला कळवलं. नवरा आणि सासरा तिथे दाखल झाले. पद्धत अशी की हिनं त्यांच्या देखत सांगितलं की ते मला वाईट वागवतात, मला त्यांच्याबरोबर जायचं नाही तर तिला ठेवून घ्यायचं. संगीता ढेपाळली म्हणा, घाबरली म्हणा किंवा तिन आपला विचार बदलला म्हणा, ती मुकाट्यानं घरी परत आली. ती न तिचं नशीब म्हणून मी स्वस्थ राहिले.
 तिच्या शेजारच्या एका बाईनं मला सांगितलं की परत आल्यापासून संगीताला पुन्हा मारहाण चालूच आहे. काही दिवसांनी कळलं तिचा नवरा अचानक मेला. सायकलवरून चालला होता, चक्कर येऊन पडला की दारू प्यायला होता कुणाला कळलं नाही. पण पडला तेव्हा त्याचं डोकं दगडावर आपटलं आणि तो जागच्या जागी खलास झाला.
 मी विचारलं, "आता संगीता काय करणार?"
 "राहील दिराबरोबर. त्यांच्यात तसंच असतं."
 एकदा ती शेजारीण म्हणाली, "बाई, मुळात तिचा दीरच तिला मारायचा जास्त करून.आता तर ती त्याच्या तावडीतच सापडलीया. अक्षी गुरावाणी बडवतो हो तिला. ती किंचाळते ते आमच्या घरात ऐकाय येतं".
 एक दिवस मावळतीला संगीता माझ्या फाटकाशी उभी. तोंड सुजलेलं, दंडावर माराचे वळ, एक डोळा काळा निळा झालेला.
 "काय ग?"
 "बाई मला आजच्या रातीला आत घ्या. उद्या कुठेतरी पाठवून द्या."
 "मी आता पुन्हा तुझ्या भानगडीत पडणार नाही. एकदा तू मला तोंडघशी पाडलंस तेवढं पुरे. तू आपली घरी जा मुकाट. नाहीतर आपल्या पायानं कुठं जायचं ते जा."
 थोडा वेळ माझ्याशी हुज्जत घालून मी बधत नाहीसं पाहिल्यावर ती निघून गेली.
 आठेक दिवसांनी तिचा सासरा एका लहान मुलाला घेऊन माझ्याकडे आला. धोतर, कोट, डोक्याला फेटा, मोठा झोकात होता माणूस.
 "नमस्कार, बाई."
 "नमस्कार, कोण आपण?"
 "संगी आठवते का, ती तुम्ही पुण्याला पाठवलेली मुलगी? तिचा सासरा मी."
 "काय काम होतं?"
 "ती पुन्हा पळून गेलीय."
 "मग?"
 "नाही, म्हटलं तुम्हाला माहीत असेल कुठं गेलीय ते."
 "मला काहीएक माहीत नाही."
 "हा बघा हा मुलगा लहान आहे, त्याला सोडून गेली. त्याचा बाप मरून गेला, आता आई टाकून गेली. कुणी संभळायचं त्याला?"
 "तुम्हाला संभाळायचं नसलं तर ती कुठेय शोधून काढा न् पाठवून द्या त्याला तिच्याकडे."
 "तिच्याकडे का पाठवून द्यायचा? नातू आहे तो माझा."
 "मग संभाळा तुम्हीच."
 तो माझ्याकडे का आलाय समजत नव्हतं. कदाचित ती कुठेय मला माहीत आहे असं अजूनही त्याला वाटत असावं.
 "ती आपल्या आईबापाकडे गेली म्हणतात."
 "झालं तर मग. माहीताय ना तुम्हाला ती कुठेय ते? मग मागल्यासारखं जाऊन घेऊन या तिला."
 "पण तिनं तरी इतक्या लहान पोराला सोडून जावं का?"
 "तुम्ही तिला मारून झोडून हाकलूनच दिली, मग तिनं काय करावं?"
 "मी कधी तिच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही."
 "तुम्ही म्हणजे तुम्हीच असं नाही. तुमच्या मुलानं, पण तुम्ही त्याला थांबवत तर नव्हता ना?"
 "नवऱ्यानं येवढं तेवढं मारलं तर पोरं सोडून पळून जायचं म्हणजे अजबच आहे."
 "तुम्ही आता जा. ह्या बाबतीत माझं तुमचं पटायचं नाही. तुमची सून कठेय मला माहीत नाही. असतं तरी तिला परत आणायला मी तुम्हाला मदत केली नसती."
 म्हातारा शेवटी निघून गेला. मी जराशी चिडून बोलले तरी त्यानं त्याचा सभ्य, सौम्य मुखवटा टाकून दिला नव्हता.
 संगीताचा मुलगा खूपच तिच्यासारखा दिसत होता. लाल गोरा, भुरे केस, गोरेपणामुळे त्याचा मळका चेहरा जास्तच कळकट दिसत होता. आमचं संपूर्ण संभाषण तो तिथं उभं राहून निर्विकारपणे ऐकत होता. आई आपल्याला सोडून गेली हे त्याला समजत होतं की नाही कुणास ठाऊक. आज्याने चल म्हटल्यावर तो त्याचं बोट धरून चालू लागला.
 संगीताची शेजारीण मला नंतर म्हणाली, "अवो, आईबापाकडे कुठली आलीय? तिथून त्यांनी कवाच उचलली असती तिला. तिथून ती कुणाच्या तरी मागं गेलीया."
 म्हणजे ती ज्याच्या मागे गेली त्याला हात लावायला ही माणसं धजत नव्हती म्हणायचं, संगीता मला पुन्हा कधी दिसली नाही. फक्त कधी कधी माझ्या मनात येतं, ती ज्याच्याबरोबर गेली तो तिला कसं वागवीत असेल?