अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? (नाट्यछटा)
<poem> ... एकूण तें सगळें खोटेंच तर ? माझ्या या कपाळावरचें कुंकूं हळूच आपल्या प्रेमळ - हो ! कसचें प्रेमळ ! - बोटानें - हेंच नव्हे का तें ? - यानेंच पुसून टाकून आपण कोणीकडे बरें गेलां होतां ? स्वर्गाला ? - नाथ ! या हदयांतून - सदैव प्रेमाची गाणीं म्हणणार्या माझ्या या अंतःकरणांतून - बाहेर पडायला आपण मला कधीं बरें विचारले होतें ? आणी मी कधीं जा म्हणून सांगितलें ? - पण जाऊं द्या आतां ! तें सगळें स्वप्नच होतें । कारण, या स्वच्छ व झुळझुळ वाहणार्या प्रवाहामध्यें माझ्या कपाळावरचा कुंकुमतिलक कसा नक्षत्रासारखा आनंदानें चमकत आहे ! प्रेमानें नाचत आहे ! प्राणनाथ ! या हिरव्यागार गालिचावर आपणाला बसवून - मी नाहीं जा ! या मांडीवर बसून अश्शी मी या गळ्याला निरंतर मिठी मारुन बसणार ! अगबाई ! पाऊस पडत आहे ! आहाहा ! नाथ ! कसें सुंदर इंद्रधनुष्य उगवलें आहे इकडे ! काय म्हटलेंत ? हें स्वर्गाचें महाद्वार उघडलें आहे ? खरेंच ! या सायंकाळच्या वेळेला आपल्या नुकत्याच उमलेल्या गुलाबासारखी, लोंकर आहे त्यांच्या अंगावरची ! - या मेंढ्याना घेऊन हा मेघ - हा वृद्ध मेंढपाळ - नेत्रांतून आनंदाश्रु गाळीत कसा त्या स्वर्गद्वाराकडे हळूहळू चालला आहे पण ! - असें काय गडे ! कोठें जायचे आहे आपणांला ? - हंसतां काय ? - बोला गडे ! - मी आपणांला आतां क्षणभरसुद्धां कोठें जाऊं द्यायची नाहीं ! - थांबा ! कोठें जायचें आहे तें मला नाहीं का सांगत ? नाथ ! मी येऊं का - येऊं का आपल्याबरोबर ? खरेंच सांगतें, आपण जर मला टाकून गेलां, तर तडफडून मरेन हो ! आपल्याशिवाय मला आतां कोण बरं प्रेमाने जवळ घेणार आहे ? - दोनच महिने झाले, माझी आई किं नाहीं मला टाकून गेली आहे ! - नाहीं ! नाही !! माझ्या या घट्ट मिठींतून मी आपणाला मुळींच जाऊं देणार नाहीं ! प्राणनाथ ! माझे हात तुटले तरी - हाय ! हाय !! येथें कोण आहे ! - काय ? मला कायमचे टाकून गेले ? आतां त्यांना मी मिठी मारली होती ना ? मग या घट्ट मिठींत काय आहे । तडफडणारें ! - न मरणारें ! - हें माझेंच हदय आहे ! - काय ? बाहेर बेंडबाजा वाजत आहे ! समजलें ! बाबा आतां नव्या आईला आणायला चालले आहेत ! - इतकी कशी गाढ झोंप मला लागली पण ? - किती गोड स्वप्न ! पण तें स्वप्नच ! आई ! - आई !! - तडफडूं नकोस ! हदया ! तडफडूं नकोस !! बाबा, हंसायला लाग ! कारण - अशा शुमदिनी रडून कसें बरें चालेल ?....
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |