आदिमाया - आशी कशी येळी व माये, आशी ...
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?
बारा गाडे काजळ कुंकू
पुरल नहीं लेनं
साती समदुराचं पानी
झालं नही न्हानं
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?
धरतीवरलं चांदी सोनं
डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं
तेभी झालं थिटं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
इडा पिडा संकटाले
देल्हा तूनें टाया
झाल्या तुझ्या गयामंधीं
नरोंडाच्या माया
आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?
बरह्मा इस्नू रुद्र बाळ
खेळईले वटीं
कोम्हायता फुटे पान्हा
गानं आलं व्होटीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नशीबाचे नऊ गिर्हे
काय तुझ्या लेखीं?
गिर्ह्यानाले खाईसनी
कशी झाली सुखी ?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नऊ झनासी खाउन गेली
सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तेव्हां
कुठें राहिन सृष्टीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |