आपले आभाळ पेलताना/गीताईचे भागवत ....

गीताईचे भागवत ....


 "मी मायच्या पोटात होते तवा अण्णांच्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी घरी भागवत बसवलं होतं. मी पाचवी लेक. पोरग झालं तर भागवत नाव ठिवणार होते. पण समाप्तीच्या दिवशीच मायीनं घाई केली नि मी झाले. पुन्हा पोरगीच! पन पोथी वाचाणारा बामण बरा असावा. त्याने समजूत घातली म्हणे. की पांच लेकींचं कन्यादान केलं की स्वर्गातली सीट पक्की होते. देवांनीच पाचवी लेक धाडलीय. गीता नाव ठेवा असंही सांगितलं. म्हणून हे असं सुंदर नाव मिळालं. पण म्हणतात नां ? नाव सोनाबाई आणि हाती कथलाचा वाा नाही. नांव गीता पन अख्खा जन्म रडगाणी गाण्यात चाललाया." गीता बोलायला लागली की किती बोलू नि किती नको असे होऊन जाई. लहानपणापासून बोलण्यावर नेहमीच 'अळीमिळी गुपचिळी' चा कायदा होता. एकतर ही पाचवी. त्यातून रीतीरिवाजांच्या घडीबंद घरातली लेक, वडिलांना पंधरा एकर रान होतं. दोन विहिरी होत्या. पण पदरातल्या पाच पोरींचा उताडा घराबाहेर काढायचा ही काय चुटकी वाजवण्यासारखी सोपी बाब होती?

 "भाभी, आजकाल चपराशाची नोकरी मिळवायसाठी तीस-तीस हजार मोजावे लागतात. नोकरीवाला नवरा शोधायचा तर लाखाची तयारी हवी. ती कशी आमच्या आण्णांना पेलणार ? मोठे दाजी आक्कीपरीस चौदा वरसांनी वडील आहेत. त्याची पहिली बायकू तिसऱ्या बाळातपणात खर्चली. तिच्यावर आक्कीला दिली. रुपया नि नारळावर लग्न लागलं. दाजींचा वारदाना मोठ्ठा पन्नास एकरात तर नुसती बागायत. आक्की पहिलीची तीन नि स्वत:ची चार अशा सात लेकरांना वाढवतेय. तिसरी माया लईच देखणी होती. म्हणून शेजारगावच्या हायस्कुलातील चपराशाने मागून केली. आक्कीनंतरची शांतू लई कामसू नि गरीब होती. तिला कुंबेफळात दिली होती. नवरा टेलर काम करायचा.अण्णांनी दोन एकराचा तुकडा इकून लगीन करुन दिलं. वरीसभर सुद्धा नांदली नाही. पंचमीला पहिल्यांदा माहेरपणाला आली तेव्हा खूप घुसमटल्यागत वाटली. डोळे नेहमीच भरून वाहात. आमच्या धाकट्या काकीने खोदून-खोदून इचारलं. पन तिनं काहीच थांगपता लागू दिला न्हाई. आणि नवरात्रीच्या तिसऱ्या माळंलाच तिच्या गावाकडून निरोप आला की सकाळी पानी भरतांना हिरीत पाय घसरुन पडली नि तिथंच म्येली. अण्णा नि आई फकस्त मातीला पोचले. माय एक दिवस आक्कीला सांगत होती की,
तोंडावार, हातावर ओचकाऱ्याचे वरखडे होते. माज्याहून मोठी रंजा. तिचा नवरा मुंबईत फरशी बसवण्याचे काम करतो. चार महिन्याला फेरी मारतो. रंजा सासू सासऱ्यांना सांबालते. दोन पोरं आहेत. तीन एकराचा मळा आहे. भरपूर काम करते. मजेत राहाते.

 माज्या नवऱ्याने पहिली बायको टाकून दिली. का तर लेकरू होत नाही म्हणून! रंजा आणि शांतूच्या लग्नाच्या खर्चात अण्णा बुडालेले होते. माज्यासाठी त्यांनी फारशी जिकीर न करता दोन पैसे देणाऱ्याच्या गळ्यात मला बांधून टाकले. माज्या नवऱ्याचा व्याजाने पैसे देण्याचा धंदा आहे. पैसा भरपूर. शिवाय पिढीजात पाटीलकी. त्याला कुठल्या की वैदूनं सांगितलं.नुकतीच वयात आलेली पोरगी कर. औषध देतो, सहा महिन्यात गरवार राहील. लगीला झालं. वरीस झालं तरी माझी पाळी येत राहिली. नि मग माझ्या छळाला पारावार राहिला नाही. नहाणं येऊन तीनच महिने झाले होते. तोच लगीन झालं, नवऱ्याचा लई त्रास व्हायचा. पन जागार कुठे? बापानं मोजून चार हजार घेतले होते. रडत पडत दोन वर्ष त्याच्या घरात राहिले.

 ताई, शिणेमात सुद्धा असला त्रास दाखवला नसेल असा छळ तो करायचा. डोक्यावर दगडाचं जातं तेवून तासन्तास उभं करायचा. शिवाय दोन्ही हातात दगड. जातं तर पडलं नाही पायजे. पैशाच्या जोरावर त्याला तिसरी बायको आणायची होती. मी माहेरी पाळून तरी जावे नाहीतर मरुन तरी जावे अशी त्याची इच्छा. तो अडाणी नव्हता. बायकोच्या डोक्यात दगड घालायची वा रॉकेल ओतून काडी लावायची बी हिंमत नव्हती. म्हणूनच फार-फार त्रास द्यायचा. भर उन्हात बिनचपालांची उभा करायचा. शेतात नेऊन सारे चाळे चालत. शेवटी सोसवेना म्हणून एकदिवस पळून बापाच्या घरी आले. आईला माराचे वण दावले. तिलाच कळवळा आला. माहेरी तीन वरीस होते. त्या काळातच बाप्पा भेटले. शेतकरी संघटनेचं काम करायचे. बायांच्या मिटिंगा घेत. मी पण तिथे जाई. माइया बंद डोक्याचं मशीन पुन्हा चालू झालं. सहावी पसवर वर्गात नेहमी पहिली येत होते. ते दिवस पुन्हा जागे झाले, मिटिंगमध्ये मी पण बोलायची. बाप्पा नि सारेच भाऊ माझं कवतुक करीत. अण्णाला हे आवडत नसे. पण माइया पाठच्या भावाने कधी हरकत घेतली नाही. पुण्याला एकदा संघटनेचं बायांचं शिबीर होतं. मला जायचं होतं पण अण्णांची परवानगी नव्हती. आईच्याकडून पैसे घेऊन मी शिबिराला इतर बायांबरोबर गेले. घरी आल्यावर अण्णांनी घरात घ्यायलाच नकार दिला.
बाप्पा माज्या आजोबांसारखे. गेली चाळीस वर्ष कम्युनिस्ट पक्षात काम करणारे. पण त्यांच्या नि माझ्याबद्दल घाण घाण सौंशय घेऊन बोलले. मग मात्र मी ठरवलं. विहीर गाठायची पन माहेराला रामराम ठोकायचा. मग बाप्पांनी मला पिंपळापुरच्या संघटनेच्या ताईकडे ठेवले. तिथे महिना काढला. पण पुढे काय? हा प्रश्न होताच. तेवढ्यात या संस्थेची माहिती कळाली नि मला बाप्पांनी इथे आणून घातले....." अशी ही गीता चार महिने दिलासा घरात होती. गुबरे गाल. अपरे नाक. नेहमीच उत्सुकतेने विस्फारलेले मोठेमोठे डोळे. उंची जेमतेम चार फूट दहा इंच असेल. ठुसका बांधा. गीताला संसाराची खूप हौस होती. बाजार करण्यात. स्वयंपाक करण्यात रस होता. अशा या गीताचे लग्न करुन द्यावे असा बाप्पांचा आग्रह होता. योग्य मुलगा शोधण्यास मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. अर्थात गीताशी बोलल्या शिवाय लग्नाचा घाट घालणे योग्य वाटेना. कारण विवाहाच्या संकल्पनेभोवती सांस्कृतिक, भावनिक व धार्मिक रेशीम कलावतूंची सुनहरी नक्षी विणलेली असली, तरी शेवटी पुरुषाला हवी असलेली "बाई"ची गरज, असेच विवाहाचे मूळ स्वरुप असते. खेडयात काय किंवा शहरात काय फारसा फरक नसतो. गीताला तर वयाच्या चौदाव्या वर्षीच तिशीच्या घरातल्या, त्यातुनही मूल होत नाही म्हणून बेचैन असलेल्या आणि त्यासाठी हपापलेल्या पुरुषाचा शारीरिक सहवास सहन करावा लागला होता. त्या मानसिक धक्क्याचे नेमके स्वरूप लक्षात घेणे महत्वाचे होते.

 दिलासा घर सुरु झाल्यापासून प्रथमच मानसशास्त्राच्या तांत्रिक अभ्यासाची उणीव भासली. या लहान गांवात मानसशास्त्राचा अभ्यासक सापडणे अशक्यच होते. गावात शासकीय मेडिकल कॉलेज जरुर आहे पण या आडवळणाच्या गावात यायला तज्ज्ञ डॉक्टर्सही फारसे तयार नसतात. त्या शास्त्राची जाण आणि आवड असणारी व्यक्ती 'मनस्विनी'ला सुद्धा हवी होती. शेवटी अनुभव, वाचन आणि गीताला अधिक नेमकेपाणानी बोलते करणे याचा आधार घेतला आणि एक लक्षात आले की गीताला शारीरिक आघात व ताण जाणवला तरी त्या मानाने मानसिक धक्का कमी होता. खेड्यातला गोतावळा गाई, गुरेढोरे, कुत्री, कोंबड्या, बतऱ्या अशांसह असतो. लैंगिक जीवनाबद्दलची गुप्तता, घृणा इ. भावना मानवी कुटुंबातून सहजपणे जोपासल्या जातात. पण खेड्यातील गोतावळ्यात या भावनांना एक सहज छेद आपोआप मिळतो. प्राण्यांचे कामजीवन, जननप्रक्रिया दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून अनुभवल्या जातात. वाढत्या वयानुसार,
आपले जीवन आणि प्राणीजीवन यांतीलं संगतीचे आढावे अंतर्मनात आपोआप घेतले जातात. त्यातून काही गृहिततत्वे जोपासली जातात. घरातल्या पारंपारिक संस्कारातून स्त्री ही 'देणारी' असते आणि पुरुष हा 'घेणारा' असतो ही भूमिका आपोआप तयार होतेच. अगदी सुशिक्षित, मध्यमवर्गीय स्त्रियाही मुलींबद्दल असाच विचार करतात.

 "ज्याचा माल त्याच्या दारात नेऊन टाकला की आपण मोकळे. कधी करणार लेकीचं लग्न. आमचीचं ठरवून मोकळे झालो आम्ही!" या शब्दात एक शिक्षक बाई मला टोकत होत्या. मग सर्वसामान्य स्त्रियांबद्दल काय बोलायचे?

 गीताने ती लहान असताना वडिलांचं आईच्या पांघरुणात घुसणं पाहिलं होतं. शारीरिक त्रास मात्र जबरदस्त होता. सुरुवातीच्या काळात नवऱ्याने लाड भरपूर केले होते. त्यामुळे स्त्री पुरुष सहवासाची आवड आणि ओढ निर्माण झाली होती. गप्पांच्या ओघात तिने सारे बोलून दाखविले. जोडीदार तरुण आणि तिच्या भावना जाणणारा असावा अशी तिची अपेक्षा होती. गीताला शेतकामाची भरपूर माहिती होती. आवड होती. शेतकरी संघटनेच्या शिबिरातील अनुभव, बैठकीतून शेतीचे व महिलांचे प्रश्न मांडण्याची सवय यामुळे गीताची जीवनाकडे, कुटुंबाकडे, स्वत:कडे बघण्याची दृष्टी अत्यंत सुजाण आणि संवेदनशील होती.


 ... लोणावळ्याला ग्रामीण परिसरात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प एका स्वयंसेवी संस्थेनी आयोजित केला होता. आम्ही दोन कार्यकर्त्या पाठविण्याचे ठरवले. त्यात गीताची निवड केली. वातावरणात, विषयात बदल होईल, त्यातून तिचे मन स्थिर होईल असे वाटले. पण गीता तिथे जेमतेम आठ दिवस राहिली. दोन वर्षे शेतकरी संघटनेच्या लहानमोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव असल्याने या प्रशिक्षणात तिला काही नवीन वाटेता. त्यातून तिथे आलेल्या महिलांच्या त्यात त्या गप्पांचाही तिला कंटाळा आला. बहुतेक प्रशिक्षणार्थी संसारी होत्या किंवा कुमारिका होत्या. गुणाला सारखे घर वा मुले दिसत. नवऱ्याची सय येई. तर कुमारिका पोरींची आपसात खुसपूस चाले. गीता तेथे काहीशी एकटी पडली. त्यातून डोंगर चढायउतरायची सवय नाही. शेवटी तिथे लेखी अर्ज देऊन बाई माघारी परत आल्या.

 एक दिवस बाप्पा एका बावीस-तेवीस वर्षाच्या तरुणास घेऊन मनस्विनीच्या कार्यालयात आले. या तरुणाचा विवाह तो दहा वर्षांचा असतांना एका पाच वर्षाच्या चिंगुलीशी झाला. चौथी पास झाल्यावर तो तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी आला. मॅट्रिकची परीक्षा दिली पण इंग्रजी विषयाने पाय अडकवला नि 'मॅट्रिक फेल' ही डिग्री मागे लावली. खरे तर शाळेत असतानाच रेडियो दुरुस्ती, लाईट फिटींग, विजेच्या मोटारींची दुरुस्ती यांची विशेष आवड निर्माण झाली. मग एका रेडियो मेकॅनिकच्या हाताखाली दोन वर्षे काम केले. मध्ये बराच काळ लोटला होता. लहानपणी त्या मुलीशी लग्न झाले होते तिच्या वडिलांना तिचा विवाह दुसऱ्या मुलाशी करुन द्यायचा होता. यालाही शिकण्याची इच्छा होती, तो नववीत असतानाच रिवाजानुसार काडीमोड झाला होता. रेडिओ मेकॅनिकचा धंदा बरा चालू लागल्यावर लग्न करण्याची इच्छा झाली. पण त्याला पत्नी थोडं पार शिकलेली आणि गावाकडे राहून शेत व सासु सासऱ्यांची काळजी घेणारी हवी होती. वाप्पांनी गीतूची माहिती तिली. पहिल्या भेटीत दोघांनी एकमेकांच्या आवडी निवडीबद्दल, मागील जीवनातील घटनांबद्दल गप्पा मारल्या. दुसऱ्या भेटीत मुलाने प्रश्न केला की, संस्थेत नोकरी मिळेल का ? बाप्पांचीही इच्छा होती की मुलाला संस्थेच्या व्यापात सामावून घ्यावे. पण आम्ही या गोष्टीला विरोध केला. पूर्वीपासूनच तो संस्थेत असता आणि नंतर संस्थेतील मुलीशी विवाह कराण्याचा निर्णय घेतला असता तर, संस्थेने त्याला सहकार्य केले असते. बधाई दिली असती. संस्थेचे नियम वेगळे आणि शिस्त वेगळी. ती पाळणे महत्त्वाचे. भविष्यात या संदर्भात त्याच्या हातून चूका घडल्यास त्याचे परिणाम त्याला स्वीकारावे लागले असते. विवाहाचा एक परिणाम वा फायदा म्हणून नोकरी मिळेलच असे त्याला वाटणे हे आम्हाला योग्य वाटले नाही. कदाचित त्यातून संस्थेच्या कामावर दबावही आला असता. गीताच्या संसारातही त्यातून छोटी-मोठी वादळे निर्माण झाली असती. अर्थात आम्ही आमच्या नकारामागची भूमिका गीता व बाप्पांना समजावून दिली. मुलाला मात्र सध्या जागा नाही, पुढे मागे जागा असल्यास विचार करु असे सांगून समजूत घातली. गीताचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावला. नव्या संसारासाठी लागणाऱ्या सामानाची यादी आमच्या दिलासातील इतर मुलींनी अगदी हौशीने तयार केली. प्रेशर कुकरचा आग्रह सर्व जणींनीच धरला. पोळीपाट, कळशी, कढई, जर्मनचे डब्बे, वाट्या, पेले आदी भरपूर सामान मुलींनी जमवलं. मात्र सतरंजी, गादी आणि चादरीला जाणीवपूर्वक चाट मारली. हा निर्णय त्यांचाच.

 गीता गावातच राहात होती अधुन-मधून संस्थेत येत असे. नंतर सासरच्या गांवी गेल्याचे कळले. आज पाच वर्षानंतर दोन मुलांना घेऊन गीता समोर उभी राहिली. हातात अर्ज होता.
 "मी गीता मधुकर पाखरे मनस्विनीच्या दिलास घरात राहात होते तिथेच माझे लग्न झाले. आता मी सासरी आनंदात आहे. मला दोन मुले आहेत. माझे जोडीदार मधुकर, पुणे येथे दापोडीस काम करतात. मी गावी सासू-सासऱ्यांसह रहाते. शेतमळा सांभाळते. माझ्या वडिलांनी माझ्या भावांच्या नावे १२ एकर शेत करुन दिले. उरलेले सहा एकर शेत माझे नावे करुन देतो म्हाणतात. माझे भाऊ त्यांना सांभाळत नाहीत. त्यांचे फार हाल होतात. वडिलांची इच्छा माझ्याजवळ राहाण्याची आहे. मधुकरांच्या कानावर मी त्यांची इच्छा घातली. त्यांनी व मी असे ठरवले की तुम्हाला भेटून निर्णय घ्यावा. कृपया मला याबाबत सहकार्य करावे ही विनंती.

आपली
-गीता मधुकर पाखरे.


 मोफत कायदा आणि कुटुंबसल्ला मदत केंद्राच्या रीतीनुसार आम्ही तिचे आई-वडील, जोडीदार, सासू-सासरे या साऱ्यांची एक बैठक घेतली, चर्चा केली.

 गीताच्या मनात वडिलांविषयीचा राग आलेला परत दाटलेला होता. घरात आईला होणारा जाच तिने जवळून पाहिला होता. भावांचे लाड तर आई नि वडील नको तितके करीत. दोघांनी शिक्षण अर्ध्यातून सोडले होते. एकाला मटक्याचा नाद होता. दुसऱ्याची बायको जळून मेली होती. गीताच्या मनात आई विषयी पण आढी होती. तिला वाटे की, आई सुनेशी नीट वागली असती, मुलाला धाकात ठेवले असते तर तिने जीव दिला नसता. गीताच्या विवाहानंतर गेल्या नऊ-दहा वर्षात माहेरच्यांनी कधी तिची दखल घेतली नव्हती. बाप्पावर नि गीतावर घाणेरडा संशय घेणारे वडील, बाप्पांना घेऊन गीताच्या दारात आले होते. आपले दुःख सांगताना भडभडा रडलेही होते. पहिल्या भेटीत वडिलांना जेऊखाऊ घालून, शंभर रुपये खर्चाला देऊन पण "आता तरी माझा संसार नासवायला येऊ नका " असे ठामपणे बजाऊन त्यांना माघारी धाडले होते.

 मधुकर पुण्याहून आल्यावर तिने त्यांच्या कानावर सारी हकीगत
घातली. गीताची सासू अतिशय प्रेमळ आहे. गीताने बापाला एवढे टाकून बोलायला नको होते असे तिने आवर्जून लेकाला सांगितले. गीताचा बाप रीतीनुसार वागला. सगळा समाजच पोरींना गळ्यातील धोंड समजतो. "ज्याच्या घरी पाप त्याच्या घरी जन्मतात लेकी आपोआप" अशी म्हणच आहे. पाच पोरींना हुंडा द्यायचा म्हणजे बापाच्या गळ्यावर जूच की. त्यातून कोणत्याही वयाचा बाप्या नि लहानगी लोकांची मुलगी एकत्र दिसले की लोकांना संशय येतोच. बाई नि बुवा यांच्यात तीनच .. स्वच्छ नाती असतात. आई, बहीण आणि मुलगी. अशा वेळी त्यांच्या मनात संशय येणे चुकीचे असले तरी ते रीतीनुसार होते. त्यांच्यावर वसावसा रागावण्यापेक्षा त्यांना गोडीने बोलायला हवे होते असे गीताच्या सासूचे मत. सासूचे मत ऐकून गीताला खूप बरे वाटले. सासूबद्दलचा आदर आणखीनच दुणावला. गीता नि मधुकर आधी संस्थेत येऊन आमच्याशी बोलून गेले. मधुकर पुण्यात राहातो. रात्रशाळेत जाऊन त्याने बारावीची परीक्षा दिली आहे. कामगार संघटनेचे कामही उत्साहाने करतो. सासऱ्यानी शेत दिले नाही तरी, लेकीने त्यांना आधार द्यावा असे त्याचे मत. गीताचे सासरे मात्र काहीसे नाराज होते. एकत्र राहाणे कसे जमावे? पटले नाही तर पुढे कसे? असे त्यांना वाटे. अर्थात त्यांच्या म्हणण्यातही तथ्य होते.

 मधुकर पुण्यात राहणार. दोन घरातल्या .. सासर नि माहेरच्या चार वयस्कांना 'नांदवणे' ही एक मोठी जबाबदारी होती. गीताचा स्वभाव तसा बडबड्या. काहींसा तापट. तिला ही जबाबदारी नीट पार करता येईल की नाही याची मलाही शंका होती. त्यासाठी तिच्याशी बोलणे महत्त्वाचे होते. ती जबाबदारी आमच्या कार्यकर्तीने, संवादिनीने स्वीकारली. वृद्धाश्रम, त्यामागची कल्पना, तेथील वातावरण, वृद्धांना आवडणाऱ्या कामात त्यांना कसे गुंतवावे लागते वगैरे अनेक गोष्टी तिला सांगितल्या. माहिती दिली. त्यानंतर मधुकर, गीता, तिचे आईवडील, सासूसासरे सगळेच एकत्र बसले. मागील घटना कुणाच्या उकरून काढायच्या नाहीत, एखादी गोष्ट पटली नाही तर मोकळेपणी सांगायचे, टोमणे मारायचे नाहीत. सर्वांनी गीताला मदत करायची, असे ठरले. दोन वर्ष नीटनेटकी, समाधानाने पार पडली तर मग सहा एकर शेती वडिलांनी गीताचे नावे करावी असा निर्णय घेतला. आज या गोष्टीलाही तीनचार वर्ष उलटली आहेत.

 आज गीता, सासूसासरे, आईवडील यांच्या सोबत राहाते. वडिलांचे
शेत दुसऱ्याला बटाईने करायला दिले आहे. मधुकर वर्षातून तीनचार वेळा येऊन जातो. माहेरात आसरा न मिळालेली नकोशी मुलगी आज आई वडिलांना आणि सासूसासऱ्यांना दिलासा देत संसार करीत आहे.