इहवादी शासन/इहवाद व भारतांतील ख्रिश्चन समाज
भारतांतील ख्रिश्चन जमात व ती मानीत असलेला व आचरीत असलेला ख्रिश्चन धर्म ही इहवादविरोधी शक्ति आहे काय याविषयी निर्णय करतांना अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांचीं जीं उत्तरे मिळतील त्यावर हा निर्णय अवलंबून राहील.
बायबल या आपल्या धर्मग्रंथाकडे चिकित्सक बुद्धिवादाच्या दृष्टीने ख्रिस्ती लोक पाहू शकतात काय? देश-काल-परिस्थिति पाहून जीझसच्या वचनांचा नवा अर्थ लावणें त्यांना मंजूर आहे काय? पोपसारख्या धर्मपीठस्थ आचार्यांना ते प्रमादक्षम मानतात, की त्यांचीं वचनें शब्दप्रामाण्यबुद्धीने ते स्वीकारतात? सर्वधर्मसमानत्व, धार्मिक सहिष्णुता ख्रिस्ती धर्माने मान्य केली आहे काय ? मनुष्य आपल्या धर्मा- प्रमाणे श्रद्धेने आचरण करीत राहिला, तर तो कोणत्याहि धर्माचा असला, तरी त्याला मुक्ति मिळेल, त्यासाठी ख्रिस्ती धर्म त्याने स्वीकारला पाहिजे असें नाही, हें तत्त्व ख्रिश्चनांना मान्य आहे काय?
मानवत्वाची प्रतिष्ठा हा लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही ही माणसाकडे माणूस म्हणून पाहते. तो कोणत्या धर्माचा, वंशाचा, जातीचा आहे हा विचार तिच्यालेखीं वर्ज्य आहे. ख्रिश्चन लोक तत्त्वतः व व्यवहारतः हें तत्त्व स्वीकारतात काय ? परधर्मी माणूस कितीहि मोठा असला तरी मुस्लिम लोक त्याला हीन मुस्लिमांहूनहि हीन समजतात. ख्रिश्चन लोकांची याबाबत काय वृत्ति आहे? खिश्चन जमातींत जातिभेद, जन्मनिष्ठ उच्चनीचता आहे की नाही? आदिवासी, अस्पृश्य या भारतीय जमातींत मिशनरी लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतराची मोहीम चालविली आहे. हें धर्मांतर करतांना खिश्चन मिशनरी मानवत्वाची प्रतिष्ठा सांभाळतात काय? म्हणजे ख्रिस्ती धर्माची तत्त्वें त्या जमातीच्या लोकांच्या बुद्धीला पटवून देऊन ते धर्मांतर करवितात का कांही ऐहिक विलोभने दाखवून ते धर्मांतर घडवितात ? आदिवासी, हरिजन या भारतांत फारच कनिष्ठ व हीनदीन अश जमाती आहेत. ख्रिश्चन झाल्यावर त्या इतर श्रेष्ठ पातळीवरच्या ख्रिस्ती समाजाशीं एकरूप होऊन जातात काय? का ख्रिस्ती धर्मांतहि जातीयता आहे? ख्रिस्ती झालेले लोक इतर भारतीय समाजाहून विभक्त होतात, की आपण सर्व भारतीय एक असें मानून एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेचा परिपोष करतात? समता, मानवत्वाची प्रतिष्ठा, सर्वधर्मसमानत्व या इहवादाच्या तत्त्वाअन्वये त्यांनी तसें करणें अवश्य आहे. मग या दृष्टीने ख्रिश्चन जमातीचें काय धोरण आहे ? ख्रिश्चन लोक भारताला आपली मातृभूमि मानतात काय ? तसें मानून या भूमीच्या प्राचीन परंपरेचा अभिमान धरून ती आपलीच परंपरा आहे अशी आत्मीयतेची वृत्ति ते धारण करतात की नाही ?
भारतांतील ख्रिश्चन जमातीचा इतिहास पाहून, आजच्या श्रेष्ठ ख्रिश्चनांची मतें व आचार पाहून, मिशनऱ्यांनी चालविलेल्या धर्मांतराच्या मोहिमेचा व त्यांच्या इतर कार्याचा अभ्यास करून वरील प्रश्नांची उत्तरें आपल्याला शोधली पाहिजेत आणि त्या उत्तरांवरून ख्रिश्चन समाज ही इहवादविरोधी शक्ति आहे काय या प्रश्नाचा निर्णय केला पाहिजे.
भारतनिष्ठ चर्च
शब्दप्रामाण्यबुद्धि, अंधश्रद्धा, बाह्यनिष्ठा, विभक्तवृत्ति, आत्यंतिक जातीयता, अत्याचारी आक्रमक प्रवृत्ति या दृष्टीने पाहतां भारतीय ख्रिश्चन समाज मुस्लिम समाजासारखा एकरूप नाही. मुस्लिमांत वरील इहवादविरोधी कल्पनांतून मुक्त असलेले लोक नाहीत असें नाही. पण ते अल्प, अत्यल्प, अगदी नगण्य. त्यांना मुस्लिम समाजांत मुळीच स्थान नाही. ख्रिश्चन समाजाची स्थिति याहून थोडी निराळी आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या 'इंडियन नॅशनल चर्च'चे अनुयायी हे इहवादविरोधी नाहीत, ते भारतनिष्ठ आहेत, राष्ट्रप्रेमी आहेत; पोपचें वर्चस्व, त्याची सत्ता त्यांना मान्य नाही. भारतीय परंपरेचा त्यांना अभिमान आहे. शिवछत्रपति, सावरकर यांना ते वंद्य मानतात. परकी मिशनऱ्यांचा त्यांना हिंदुत्वनिष्ठांप्रमाणेच संताप येतो. आणि अशा या 'नॅशनल चर्च' च्या अनुयायांची संख्या अगदीच उपेक्षणीय नाही. तेव्हा त्यांचा विचार आपल्याला स्वतंत्रपणें करावा लागेल.
त्यानंतर दुसरा वर्ग म्हणजे मिशनऱ्यांचा. या वर्गांत परकी व भारतीय मिशनरीहि येतात. हे मिशनरी हा ख्रिश्चन समाजांतला दुसरा वर्ग आणि त्यांचे वर्चस्व असलेला भारतीय ख्रिश्चन समाज हा तिसरा वर्ग असे भिन्न वर्ग घेऊन त्यांचा इहवादाच्या दृष्टीने विचार करणें अवश्य आहे. कारण ते परस्परांहून बरेच भिन्न असल्यामुळे एकच एक रूप मानून, त्यांचा विचार करणें हें अन्यायाचें होईल, त्यामुळे वास्तवापासून आपण दूर जाऊ. तेव्हा ख्रिश्चन समाजांतील भिन्न वर्गांचा आपण निरनिराळा विचार करूं. त्यांत ख्रिश्चन मिशनरी यांचा क्रम पहिला. कारण अत्यंत प्रभावी असा हा वर्ग आहे. बहुसंख्य ख्रिश्चनांवर त्यांचेच वर्चस्व आहे.
ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सर्वधर्मसमानत्वावर मुळीच विश्वास नाही. धर्म- सहिष्णुता या शब्दांचेंच त्यांना वावडें आहे. महात्मा गांधींची अनेक ख्रिश्चन मिशनऱ्यांशीं हार्दिक मैत्री होती. महात्माजींच्याविषयी त्यांना आदरहि असे. पण त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, असा त्यांना ते नेहमी आग्रह करीत. कारण तोच एक खरा धर्म असून, त्याच्या आश्रयावांचून मनुष्याला मुक्ति मिळणे अशक्य आहे, असें त्यांचें मत आहे. महात्माजींनी स्वतःच याविषयीच्या हकीकती लिहून ठेवल्या आहेत. कोटस् नांवाच्या त्यांच्या क्वेकरपंथीय मित्राला त्यांच्या आत्म्याविषयी चिंता वाटे. कारण त्यांनी येशूचा धर्म स्वीकारण्यास नकार दिला होता. (ख्रिश्चन मिशनस्– म. गांधी, नवजीवन प्रेस, पृष्ठ २१).
आक्रमण हेंच धोरण
'टेंपल ऑफ अंडरस्टँडिंग' यासारख्या संस्था धर्मसमानत्व प्रस्थापिण्याच्या हेतूने प्रस्थापिल्या जातात. पण त्यांच्या परिषदांतील भाषणांवरून त्यांचें अंतरंग कळून येतें. रेव्हरंड फॅलन म्हणाले, "आपण आस्तिक, ईश्वरनिष्ठ लोक इतरांना आपल्या धर्माचीं तत्त्वें किती शिकवूं शकतों यावर संस्थेचें यश अवलंबून आहे." 'ख्रिश्चॅनिटी इन् चेंजिंग इंडिया' या पुस्तकांत स्पष्ट म्हटलें आहे की, "ख्रिश्चॅनिटीला तडजोड, देवाणघेवाण माहीतं नाही, आक्रमण हेंच तिचें धोरण आहे. इतर धर्मांचा सहानुभूतीने विचार करावा, त्याचें रहस्य जाणून घ्यावें, यासाठी कितीहि प्रयत्न चालू असले तरी बहुसंख्य मिशनरी अजून हिंदु धर्म हा शत्रु असून त्याचा पाडाव केलाच पाहिजे या वृत्तीचे आहेत." पोप आणि त्यांचे सहकारी यांचा एकच मंत्र आहे, "रोमन कॅथॉलिझम हा एकच सत्य धर्म आहे."
माजी केन्द्रमंत्री राजकुमारी अमृतकौर या ख्रिश्चन होत्या आणि स्टॅन्ले जोन्स हे स्वतःच मिशनरी आहेत. या दोघांनीहि ख्रिश्चन मिशनरी हे अत्यंत असहिष्णु व हट्टाग्रही आहेत, त्यांनी भारताची व त्याबरोबरच ख्रिश्चन धर्माची हानि केली आहे, असेंच मत मांडलें आहे. महात्माजींना लिहिलेल्या पत्रांत अमृतकौर लिहितात, "धर्मांतराचा प्रयत्न म्हणजे मला हिंसाचार वाटतो. पण ख्रिश्चन मिशनऱ्यांचें तेंच उद्दिष्ट असतें. तुम्ही त्यांना धर्मसमानत्वाचें तत्त्व शिकवीत आहांत, हें आमच्यावर मोठे उपकार आहेत. वास्तविक हिंदभूमीची लेकरें या अर्थाने आपण सर्व हिंदूच नाही का? माझ्या मतें हिंदु धर्माच्या विशाल कक्षेत जीझसचाहि सहज समावेश होईल. ख्रिश्चनांनी अंतर्मुख होऊन विचार केला, तर त्यांना हें पटेल असें वाटतें आणि मग सहिष्णुता व शालीनता या वृत्ति त्यांच्या ठायीं बाणतील. या वृत्ति म्हणजेच सर्व धर्मांचें सार आहे." (ख्रिश्चन मिशन्स, पृष्ठे १२४, १२५).
स्टॅन्ले जोन्स यांनी 'महात्मा गांधी- ॲन इंटरप्रिटेशन' या आपल्या पुस्तकांत हेच विचार मांडले आहेत. ते म्हणतात "आम्ही ख्रिश्चन लोकांनी आतापर्यंत इतर धर्मांकडे दोषैकदृष्टीनेच पाहिलें. आम्हांला वाटे की, त्या धर्मांत कांही चांगलें आहे असें मान्य केलें, तर मग बायबलचा प्रचार कशाला करावयाचा? पण गॉस्पेलची- बायबलची- ही दृष्टि नाही. आणि महात्माजींनीच आम्हांला बायबलमधलें मूळ सत्य समजावून दिलें आहे. त्यामुळे आमच्या वृत्तींत आता पालट झाला आहे."
म. गांधींचे मत
पण ख्रिश्चन मिशनरी व ख्रिश्चन समाजाचे इतर नेते यांच्या आचार- विचारांवरून तसा कांही पालट झाल्याचें मुळीच दिसत नाही. ते सर्व- कांही अपवाद वजा जाता- पहिल्याप्रमाणेच असहिष्णु, हट्टाग्रही व दोषैकदृष्टि आहेत हें युकॅरिस्ट काँग्रेसच्या वेळीं व अन्य शेकडो प्रसंगीं पुनः पुन्हा दिसून आलें आहे. या त्यांच्या उद्धट वृत्तीमुळेच हिंदुधर्म, हिंदु संस्कृति व हिंदु आचारविचार यांची निंदानालस्ती करण्याचें आपलें व्रत त्यांनी पूर्वीप्रमाणेच चालविलें आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या या हिदु धर्मद्वेषाचें रूप महात्माजींनी पूर्णपणें जाणलें होतें. त्यामुळेच अतिशय संतापून ते एकदा म्हणाले होते की, "हिंदु धर्माचा समूळ उच्छेद करणें हाच मिशनऱ्यांच्या सर्व प्रयत्नांचा उद्देश असतो. माझ्या हाती सत्ता असती, तर सर्व धर्मांतर मी कायद्याने बंद केलें असतें. अज्ञानी जनतेला असें फसविणें याचा मला तिटकारा आहे."
कन्याकुमारीजवळील स्वामी विवेकानंदांच्या जुन्या स्मारकाची मिशनऱ्यांनी विटंबना केली होती. बोरिवलीजवळ मंडपेश्वर येथील जुन्या गुंफांतील मूर्तीचा विध्वंस करून तेथे मिशनऱ्यांनी मेरीच्या मूर्तीची स्थापना केली. १९५०- ५१ सालीं म्हणजे स्वातंत्र्यानंतर केरळमध्ये ख्रिश्चन पाद्रयांनी दीडशे हिंदु मंदिरांचा विध्वंस केला, हें तेथील ख्रिश्चन गृहमंत्र्यानेच विधानसभेत सांगितलें होतें. मंदिर-विध्वंसाची ख्रिश्चनांना खंत तर वाटत नाहीच, उलट त्यांत ते अजूनहि भूषण मानतात. युकॅरिस्ट काँग्रेसच्या वेळीं पोपमहाशय मुंबईला आले होते. त्या वेळीं वांद्रे येथील माऊंट मेरीचें देऊळ त्यांना दाखवून, पूर्वी येथलें दुर्गेचें मंदिर पाडून त्यावर हें चर्च उभारलें आहे, असें येथल्या ग्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना अभिमानाने सांगितलें.
भारत सरकारने पोर्तुगीज सत्तेपासून गोवे मुक्त केलें त्या वेळीं तेथील कांही ख्रिश्चनांनी चार शतकांपूर्वी गोव्यांतील जनतेवर धर्मांतरासाठी अमानुष अत्याचार करणारा जो 'संत' फ्रॅन्सिस झेवियर त्याची चित्रे छापून लोकांना वाटली. त्या चित्रांत झेवियरच्या पायाखाली बुद्धमूर्ति पालथी पडलेली दाखविलेली आहे.
झेवियरने धर्माच्या नांवाने केलेले सैतानी अत्याचार व बुद्धाची विटंबना आजहि ख्रिस्ती पाद्री भूषण म्हणून मिरवितात, असा याचा अर्थ आहे. (झेवियर अत्याचारासाठी पाहा- गोवा इन्क्विझिशन- प्रियोळकर, पृष्ठ २३, ५०).
महात्माजींनी ख्रिश्चनांना सहिष्णुता, धर्मसमानत्व हीं तत्त्वें शिकविलीं व त्यामुळे त्यांचा वृत्तिपालट झाला असें कोणी म्हणतात. पण तसें कांहीहि झालें नसल्याचें मिशनरी शाळांनी गांधी- शताब्दि वर्षांत दाखवून दिले आहे. गांधी- शताब्दी सर्व शाळांनी पाळून त्यासाठी तसे कार्यक्रम करावे, असें सरकारी परिपत्रक निघालें होते. पण एकंदर चौदा कॉन्व्हेंट शाळांनी हें परिपत्रक अवमानिलें व शताब्दीचा कार्यक्रम करण्यास नकार दिला, असें महाराष्ट्र विधानसभेत सरकारनेच सांगितलें. एका कॉलेजांत तर २ ऑक्टोबरलाच महात्माजींचा फोटो प्राचार्यांच्या आज्ञेवरून काढून फेकून देण्यांत आला.
गेल्या वर्षी 'इलस्ट्रेटेड वीकली'च्या एका अंकांत (२८-१२-६९) सौ. जॅमिला व्हर्गीज यांनी एका लेखांत, ख्रिश्चनांनी भारताची जी सेवा केली आहे तिचें विस्ताराने वर्णन केलें आहे. भारतांत ख्रिश्चनांनी २१७७ शाळा, १५० महाशाळा, ६२० रुग्णालये, ८६ कुष्टरोगनिवारण केन्द्रे, ७१३ अनाथ बालकाश्रम, ४४ कृषि वसाहती आणि अंध, पंगु यांसाठी कित्येक गृहें अशा संस्था स्थापिल्या आहेत आणि त्यांतून आजहि समाजसेवेचें कार्य अखंडपणे चालविलें आहे. हे प्रचंड कार्य पाहून कोणाचेहि डोळे दिपून जातील यांत शंकाच नाही.
हें कार्य बव्हंशी ख्रिश्चन मिशनऱ्यांचें आहे आणि त्यांतहि तें बहुधा परदेशी मिशनऱ्यांचें आहे. ही सेवा फार मोठी आहे, याबद्दल दुमत होणार नाही. असें असूनहि महात्माजी, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याबद्दल अत्यंत कटु शब्दांत का लिहितात आणि अमृतकौर व स्टॅनले जोन्स यांसारखे प्रौढ ख्रिश्चन लोक महात्माजींचे त्या टीकेसाठीच आभार को मानतात, असा प्रश्न येतो. वर निर्देशिलेल्या इंडियन नॅशनल चर्चचे आर्चबिशप विल्यम्स, डॉ. कुन्हा, ब्रदर रॉडरिगस यांसारखे नेते परदेशी मिशनरी व त्यांचे स्वदेशी हस्तक यांचा असाच निषेध करतात व त्यांना भारतांतून हाकलून लावा, असा दरसाल ठराव करून भारत सरकारला नित्य अर्ज करीत असतात, असें कां व्हावें ?
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर
याचें प्रधान कारण असें आहे की, धर्मांतर हे राष्ट्रांतर होय हा सिद्धान्त ख्रिश्चनांच्या बाबतीत फार खरा ठरत आहे. स्टॅनले जोन्स यांनी म्हटले आहे की, 'असहकारितेच्या लढ्यांत कांही ख्रिश्चन सामील झाले असले, तरी अधिकांश ख्रिश्चनांना ब्रिटिश राज्य कायम राहवें असें वाटत होते. स्वातंत्र्य आलें तर आपल्या ख्रिश्चन धर्मप्रसाराचें काय होईल, याची त्यांना भीति वाटत होती." जोन्स पुढे म्हणतात, "ख्रिस्ती झालेले लोक बहुतेक वेळा अराष्ट्रीय झालेले दिसतात. ते भारताशी एकरूप न होतां स्वतःला पाश्चात्त्य समजतात." (महात्मा गांधी, पृष्ठ ८७, ९०).
अमृतकौर यांनीहि याच मताला पुष्टी दिली आहे. "अनेक ख्रिश्चन अराष्ट्रीय झालेले आहेत. स्वातंत्र्य आलें तर आपले काय होणार, अशी त्यांना चिंता वाटते." (ख्रिश्चन मिशन्स, पृष्ठ १२३). ख्रिश्चन झालेला मनुष्य भारतीय समाजा पासून विभक्त होतो. तो भारताच्या सुखदुःखाशी एकरूप होत नाही, ही फार मोठी हानि मिशनऱ्यांच्या कार्यामुळे झाली आहे. 'कॅरिटास इंटरनॅशनॅलिस्ट' या संस्थेच्या फादर चार्लस ग्रेंज या अधिकाऱ्याने भारतांतील मिशनऱ्यांवर हीच टीका केली आहे. अमेरिका व इतर देश येथून आलेल्या अन्नधान्याचे भारतांत वाटप करण्याचें काम ही संस्था करते. फादर ग्रेंज हे १९६५ पर्यंत महाराष्ट्रांत मिशनरी म्हणून काम करीत होते. आता ते कॅरिटासचे अधिकारी आहेत. परकी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरुद्ध भारतांत काहूर उठले आहे, त्याला त्यांचे कर्मच कारणीभूत आहे, असें त्यांनी आपल्या पत्रांतून मिशनऱ्यांना सुनविलें आहे. हें कर्म कोणतें?
फादर ग्रेंज म्हणतात, "हे मिशनरी विकास योजनांत कार्य करतात, पण त्यांत भारतीयांशीं सहकार्य करीत नाहीत. सवता सुभा ठेवतात. भारतीयांनी चालविलेल्या कामाची ते तुच्छतापूर्वक हेटाळणी करतात. स्थानिक प्रशासकांना सुद्धा समाजसेवेच्या कार्यांत सहभागी करून घेत नाहीत. हाती आलेल्या धनाच्या वांटपाच्या कामांत भारतीय अधिकाऱ्यांना दूर ठेवतात. हें धन प्रामुख्याने धर्मप्रसाराच्या हेतूने वापरतात. जणू काय तें सर्व पोपकडून आले आहे."
याचा स्पष्ट अर्थ असा की, मिशनरी भारतीय समाजाशी एकरूप, समरस होण्यास तयार नाहीत. माणसाकडे माणूस म्हणून ते पाहवयास तयार नाहीत. आपण ख्रिश्चन श्रेष्ठ व हे हिंदु हीन, रानटी लोक आहेत असा त्यांचा भाव असतो.
वाममार्गाचा अवलंब
पण यापेक्षाहि निंद्य असें मिशनऱ्यांचें धोरण म्हणजे ते धर्मांतराच्या चळवळीत मानवत्वाची प्रतिष्ठा ठेवीत नाहीत. आपलीं धर्मतत्त्वें भारतीय जनतेच्या बुद्धीला पटवून देऊन लोकांचे मतपरिवर्तन करून धर्मांतर करावयाचें हा राजमार्ग होय. पण हा मार्ग न अनुसरतां मिशनरी धनाचें, सुखस्वास्थ्याचें, प्रतिष्ठेचें विलोभन दाखवून आणि कित्येक वेळा अत्यंत वाममार्गाने व दंडेलीने धर्मांतर घडवितात.
ख्रिश्चन मिशनरी धर्मांतर कसें करतात ते हरिजन सेवक संघाने, शहाबाद (बिहार) येथील धर्मांतराचा वृत्तान्त दिला आहे, त्यावरून कळून येतें. मिशनऱ्यांचा सर्व भर हरिजनांचें धर्मांतर करण्यावरच असतो. त्यांना अडीअडचणींत कर्जाऊ पैसे द्यावयाचे, कायद्याचा सल्ला द्यावयाचा आणि मागून "ख्रिश्चन झालास तर तुला कर्ज माफ करूं," असें विलोभन दाखवून त्यांना वाटवावयाचें, असा मिशनऱ्यांचा उद्योग असतो. संघाचे चिटणीस म्हणतात, "येथे हजारो लोकांना मिशनऱ्यांनी ख्रिश्चन केलें, पण त्यांतील एकहि धर्मांतर मतपरिवर्तनामुळे झालेलें नाही."
अमृतकौर यांनी मिशनऱ्यांच्या धर्मांतर पद्धतीविषयी हेंच मत दिले आहे. त्या म्हणतात, हरिजनांच्या दैन्य- दारिद्र्याचा मिशनरी फायदा घेतात आणि त्यांना तथाकथित ख्रिश्चन धर्माची दीक्षा देतात. तथाकथित म्हणण्याचें कारण असें की, धर्मांतरितांपैकी एकालाहि ख्रिश्चन धर्माची तत्त्वें माहीत नव्हती. (ख्रिश्चन मिशन्स, पृष्ठ १२४) धर्मांतरासाठी मिशनरी वाटेल ते अत्याचार करण्यास मागेपुढे पाहत नाहीत हे नियोगी समितीने सप्रमाण दाखवून दिले आहे.
कै. हरिभाऊ पाटसकर मध्यप्रदेशचे राज्यपाल असतांना मिशनऱ्यांनी चालविलेल्या कुष्टरोगाश्रमांतून तीनशे महारोगी तीस मैल त्यांच्या निवासापर्यंत चालत आले व त्यांनी पाया पडून राज्यपालांना सांगितलें की, "आम्हांला जबरीने प्रिश्चन करण्यांत येत आहे, आम्हीं बाटण्यास नकार दिला त्यामुळे आम्हांला तीन-तीन दिवस उपाशी ठेवून आमचे हाल करण्यांत येतात. आम्हांला आपण या संकटातून वाचवा."
ख्रिश्चन शाळांत हिंदु लोक मुलें पाठवितात. अनेक वेळा मुलांच्या नावांची नोंदणी करतांना शाळेचे चालक धर्म या सदरांत ख्रिश्चन, असें पालकांना न कळवितां, लिहून ठेवतात. आणि शाळा सोडतांना तसेंच लिहून देतात. नोंद वहींत मुळांत तसें असल्यामुळे पालकांचें कांही चालत नाही. अहमदनगर जिल्ह्यांत भाऊसाहेब धनाजी साळवे यांना असा दाखला मिळाला. त्यांच्या नकळत ते ख्रिश्चन झाले होते. तेथील हिंदुसभेने शुद्धिविधि करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मांत परत घेतलें म्हणून निभावलें. मुंबईच्या एका मुलीच्या मिशनरी शाळेच्या चालकांनी हिंदु मुलींना बांगड्या घालण्यास व कुंकू लावण्यास बंदी केली व ज्या मुलींनी ऐकलें नाही त्यांना शिक्षा केली. अनेक शाळांत हिंदु मुलांना बायबल बळेंच शिकविलें जातें आणि हिंदु देवतांची विटंबना करणारी चित्रे दिली जातात.
एल्विन यांचा इशारा
डॉ. बेरियर एल्विन हे एक इंग्रज पाद्री आहेत. त्यांनी भारताला असा इशारा दिला आहे की, "मिशनऱ्यांनी जें धर्मांतराचें राष्ट्रद्रोही कार्य चालविलें आहे त्याला वेळींच आळा घातला नाही, तर सर्व आदिवासी जनता अराष्ट्रीय होऊन भारताच्या कुशीत ती एक कट्यार घुसेल." जे. सी. कुमाराप्पा यांनी असाच इशारा दिला आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की, मानवता, मानवसेवा, श्रेष्ठ धर्मतत्त्वांचा प्रसार, दीन-दलितांची आध्यात्मिक उंची वाढविणें हे व असले उदात्त हेतु मिशनरी लोकांच्या जवळ नाहीत. ते केवळ दाखविण्यापुरते आहेत. त्यांचे हेतु राजकीय आहेत. लॉर्ड रीडिंग व लॉर्ड आयर्विन हे दोघे भारताचे व्हाईसरॉय असतांना त्यांनी मिशनऱ्यांची काय प्रशस्ति केली ? "लष्कर, न्यायालयें, राज्यपाल यांच्यापेक्षा मिशनरी हे जास्त महत्त्वाचें कार्य करीत आहेत. एक मनुष्य ख्रिश्चन झाला की तितकी साम्राज्याच्या सामर्थ्यात भर पडते." मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या चळवळीमागचा हा हेतु महात्माजींनी जाणला होता. जातवार प्रतिनिधीत्वाचें तत्त्व त्या वेळीं मान्य झालें होतें. अशा वेळी कोणत्याहि जमातीच्या लोकसंख्येला महत्त्व येणारच. तें पाहूनच मिशनऱ्यांनी जोरांत चळवळ चालविली होती.
मिशनऱ्यांच्या कार्यामागे राजकीय हेतु असावा, अशी शंका भारताच्या बहुतेक सर्व पुढाऱ्यांना आलेली होती. स्वातंत्र्यानंतर वल्लभभाईंनी मिशनऱ्यांना सांगितलें की, तुम्ही, "वैद्यकीय सेवा करा, धर्मप्रसार करण्याचाहि तुम्हांला हक्क आहे. पण सामुदायिक धर्मांतर करून जातीय दृष्टि वाढवू नका." मौ. आझादांनी हेंच सांगितलें, "तुम्ही राजकीय हेतूने सामुदायिक धर्मांतर करूं नका." राजगोपालाचारी म्हणाले की, "धर्मांतराचा तुम्हांला हक्क आहे, पण त्याने भारतीय समाज दुभंगतो. तेव्हा तुम्ही फक्त समाजसेवेचें कार्य करा." पंडित जवाहरलाल यांनी त्यांना संदेश दिला की, "भारताला मातृभूमि मानून त्याच्या नव्या घडणींत जे कोणी साह्य करतील त्यांचें आम्ही स्वागतच करू."
विभक्त वृत्तीची जोपासना
भारतांतील ख्रिश्चन मिशनरी हे इहवादविरोधी आहेत काय, हें तपासून पाहण्यासाठी आपण आरंभी कांही प्रश्न निर्माण केले होते. त्यांच्या उत्तरावरून काय दिसतें ? सर्वधर्मसमानत्व हें तत्त्व त्यांना मान्य नाही. सहिष्णुता त्यांना त्याज्य वाटते. माणूस म्हणून त्यांच्या लेखी माणसाला किंमत नाही. महात्माजींसारख्या महापुरुषाला सुद्धा नाही. तो ख्रिस्ती झाला तरच त्यांचें त्यांना महत्त्व. मानवत्वाची प्रतिष्ठा त्यांना मान्यच नाही. मतपरिवर्तनाने, बुद्धीला, धर्मविचारांना आवाहन करून धर्मांतर करावें, असें त्यांचें धोरण नाही. विलोभनें दहशत, दंडेली व इतर अनेक वाममार्ग यांचा ते आश्रय करतात. जातीयता त्यांच्या हाडीमासीं खिळली आहे. ख्रिश्चन जमात ही इतर भारतीयांहून अलग राहवी, विभक्त व्हावी असें त्यांचे प्रयत्न असतात. त्यामुळे धर्मांतरितांच्या मनांत ते अराष्ट्रीय वृत्तीची जोपासना करतात.
इहवादाचें आतापर्यंत जें विवेचन केलें आहे, त्यावरून हें ध्यानांत येईल की, यांतील प्रत्येक कृति, प्रत्येक विचार व त्यामागली वृत्ति ही इहवादाला अत्यंत घातक आहे. अशा वृत्तीच्या मिशनऱ्यांचा भारतीय ख्रिश्चन समाजावर फार प्रभाव असल्यामुळेच भारतांत अनेक ख्रिस्तीस्थानें निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भारतांतील ख्रिश्चन समाज ही इहवादविरोधी शक्ति आहे काय, याचा विचार आपण करीत आहोत. त्यांतील मिशनऱ्यांचा विचार गेल्या लेखांत केला. आता उर्वरित ख्रिश्चन समाजाचा विचार करावयाचा. या समाजांत इंडियन नॅशनल चर्चचे अनुयायी असा एक वर्ग आहे. त्याचा निर्देश प्रारंभ केलाच आहे. हा वर्ग सोडून राहिलेला ख्रिश्चनांचा एक मोठा वर्ग आहे. त्याचें स्वरूप आता पाहवयाचें आहे. या वर्गाबद्दलहि सरसकट कांही विधाने करणें हें युक्त होणार नाही.
हा समाज परदेशी ख्रिश्चन मिशनरी व त्यांच्या वर्चस्वाखाली असलेले ख्रिस्ती धर्मगुरु यांचा अनुयायी असला, धर्मक्षेत्रांत त्यांची सत्ता त्याच्यावर चालत असली, तरी त्या समाजांतहि या मिशनऱ्यांची व धर्मगुरूंची जी अरेरावी चालते तिला विटलेला असा एक वर्ग आहे, असें दिसतें. हे पाद्री लोक ऐषआरामांत लोळत असलेले तो पाहतो. त्यांचें ब्रह्मचर्य हें केवळ ढोंग आहे हें त्याला दिसत असतें. जाहीरपणें वृत्तपत्रांत पत्रे लिहून अनेक ख्रिस्ती लोक आपला हा उबग व्यक्त करतात. सध्या चर्चचे अधिकारी भूदानाची भाषा बोलत आहेत. त्यासंबंधी जी पत्रे प्रसिद्ध होत आहेत त्यांवरून हैं स्पष्ट दिसतें.
तेव्हा इंडियन नॅशनल चर्चच्या अनुयायांखेरीजहि ख्रिश्चन समाजांत भारतनिष्ठ असा एक वर्ग आहे असें दिसतें. पण ख्रिश्चन समाजांतील हे दोन्ही वगळूनहि बराच मोठा वर्ग शिल्लक राहतो. तो अराष्ट्रीय आहे, इहवादविरोधी आहे, मिशनऱ्यांचा दास आहे. त्याच्या मनोवृत्तीचें परीक्षण आता करावयाचें आहे.
नागालँड, झालखंड या प्रदेशांत दिसून येणारी विभक्तवृत्ति हें या समाजाचें लक्षण आहे. नागालँड हा भारताच्या ईशान्य सरहद्दीवरचा प्रदेश. त्याचें क्षेत्रफळ सव्वासहा हजार चौरस मैल असून, त्याची वस्ती पांच लाखांच्या आसपास आहे. इतकी थोडी लोकसंख्या असूनहि येथील ख्रिस्ती समाजाने स्वतंत्र प्रदेशाची मागणी केली व भारत सरकारने ती पुरवली! नागाप्रदेशांत एकंदर तेरा नागा जमाती असून, त्यांतील अंगामी, सिमा, लाथो व आओ या बाटून ख्रिश्चन झालेल्या आहेत. राहिलेल्या झेलियांग, फोम इत्यादि नऊ जमाती अजून हिंदु आहेत व त्यांची संख्या तीन लक्षांच्या आसपास आहे. म्हणजे अजून तेथे हिंदु बहुसंख्या आहे. तरीहि अल्पसंख्य ख्रिश्चनांचेंच तेथे वर्चस्व आहे. कारण शिक्षण, धन या दृष्टीने हा समाज पुढारलेला आहे व परकी मिशनरी शक्ति त्याच्यामागे उभी आहे. तेथील शासनांत एकहि हिंदु नाही. एकहि हिंदु लोकसभेचा सभासद नाही व तेथील हिंदूंवर सध्या घोर अन्याय होत आहे. पण हिंदु समाज व मिशनऱ्यांपुढे लाचार असलेलें भारत सरकार याविषयी पूर्ण उदासीन आहे.
स्वातंत्र्यापूर्वी या प्रदेशांत ब्रिटिश सरकारने बाहेरच्या हिंदूंना जाण्यास बंदी घातली होती. मिशनऱ्यांना मात्र मोकळीक दिली होती. स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत सरकारने तेथे तेंच धोरण पुढे चालविलें. रे. स्कॉट या मिशनऱ्याने तेथे केवढा उपद्व्याप चालविला आहे हे नित्य जाहीर होत होतें. दीर्घ काळ भारत सरकारने तिकडे दुर्लक्षच केलें. कारण तो मिशनरी होता, आणि भारत सरकार निधर्मी होतें! हिंदुखेरीज अन्य समाजांवर बंधने घालणें त्याच्या धोरणांत बसत नव्हतें.
वास्तविक मिशनऱ्यांची वृत्ति किती राष्ट्रविघातक आहे, भारताच्या इहवादी धोरणाला त्यांची जातीय, धर्मांध वृत्ति कशी घातक आहे, हें महात्माजींनी उच्चरवाने सहस्र वेळा सांगितलें होतें. डॉ. एल्विन, रे. स्टॅनले जोन्स यांसारख्या ख्रिश्चनांनी तेंच मत मांडलें होतें. तेव्हा भारताच्या संरक्षणाची नेहरूंना अल्प जरी चिंता असती आणि इहवादाचा थोडा अर्थ जरी त्यांना कळला (आणि वळला) असता तरी आसाम, केरळ या सरहद्दीवरच्या प्रदेशांतून तरी त्यांनी मिशनऱ्यांना हाकललें असतें. पण पंडितजींना जागतिक शांतीची चिंता होती. भारताच्या संरक्षणाची नव्हती आणि हिंदू खेरीज अन्य जमातींना सर्व रान मोकळे करून देणें हा त्यांचा इहवादाचा अर्थ होता. त्यामुळे त्यांनी नागालँडमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांना पूर्ण मोकळीक देऊन तेथील नाग टोळ्यांचे राष्ट्रांतर सुखेनैव घडूं दिलें.
या प्रदेशाचें नांव नागलिमा (लिमा-भूमि) असें ठेवावें, असा तेथील हिंदूंचा आग्रह होता. पण तेंहि त्यांनी मान्य केलें नाही. कारण ख्रिश्चनांना नागालँड हें नांव हवें होतें. या एका गोष्टीवरूनहि ख्रिश्चनांच्या वृत्तीचें पुरेसें दर्शन होतें. पण अशीं दर्शनें डोळे उघडे असलेल्यांना होतात. मिटलेल्यांना नाही. या अंधतेचा परिपाक होऊन नागाप्रदेश विभक्त झाला आहे. आणि आता चीन, पाकिस्तान यांच्या हस्तकांच्या घातक कारवाया तेथे उघडपणें चालू झाल्या आहेत. मिशनऱ्यांना भारताचे खंड-खंड करावयाचे आहेत. त्यांच्या अधीन असलेल्या ख्रिश्चनांनी त्यांचें तें स्वप्न साकार केले आहे.
छोटा नागपूर विभागांतील झालखंड हें मिशनऱ्यांचें दुसरें असेंच केंद्र आहे. तेथील ख्रिश्चनांनी मिशनऱ्यांच्या चिथावणीवरून स्वतंत्र झालखंडाची चळवळ चालविली आहे. १५ ऑगस्ट रोजी भारतभर स्वातंत्र्याचा जयजयकार होतो. तर झालखंडांत तेथील ख्रिश्चन लोक, "हे इसामसीह, हमारा खोया हुआ राज्य हमे वापस दे" अशी प्रार्थना करतात. या भागांतील एका पाद्र्याने एका हिंदूची जमीन विकत घेतली. पण पैसे देण्याच्या वेळीं, "तूं ख्रिस्ती झालास तरच तुला पैसे देईन असें सांगितलें. यासारखी आणखी सात-आठ प्रकरणे झाली. तेव्हा आजूबाजूच्या पन्नास गावांच्या लोकांनी उठाव करून न्यायालयांत दाद मागितली आणि सर्व आठहि पाद्रयांना तुरुंगांत पाठविलें. (मसुराश्रम- विश्वकल्याणमाला, पुष्प क्र. १४, पृष्ठे २०-२१).
मध्यप्रदेशांतील सरगुजा संस्थानांत स्वातंत्र्यापूर्वी एकहि ख्रिश्चन नव्हता. स्वातंत्र्य येतांच संस्थानिकांनी मिशनऱ्यांवर घातलेली बंदी निधर्मी काँग्रेस सरकारने उठविली. त्यामुळे १९६१ पर्यंत तेथे नऊ हजार लोकांना बाटविण्यांत आलें. तेव्हा तेथले माजी राजे श्री. भानुप्रसादसिंह यांनी मध्यप्रदेशचे मुख्य मंत्री कैलासनाथ काटजू यांना इशारा दिला की, "या प्रकारामुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यांत आल्याविना राहणार नाही."
'मलमाड' ची मागणी
केरळमध्ये 'मलमाड' हा स्वतंत्र ख्रिश्चन जिल्हा करावा अशी तेथील ख्रिश्चन समाजाची मागणी सध्या चालू आहे. नंबुद्रिपाद सरकारने मुस्लिमांना मल्लापुरम् दिला. त्यामागोमाग ही मागणी आली. पुढच्या निवडणुकीपर्यंत ती मान्यहि होण्याचा संभव आहे. युकॅरिस्ट काँग्रेसच्या वेळी जर्मन मिशनरी प्लॅटनर म्हणालाच होता, "केरळ हें इंडियन चर्चचें आशास्थान आहे. मध्य मलबार ही निश्चितच ख्रिस्ती भूमि आहे."
मिशनऱ्यांना व त्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या ख्रिश्चन समाजाला भारताचीं शकलें करावयाचीं आहेत. येथल्या भारतीय समाजाच्या उत्कर्षापर्षाची त्यांना कसलीहि चिंता नाही, हें आणखी एका गोष्टीवरून दिसून येतें. वर्णभेद, जातिभेद व अस्पृश्यता हे हिंदु समाजाच्या मार्गांत येणारे त्रिदोष आहेत. ख्रिस्ती झालेल्या हिंदूंमधले हे दोष नष्ट करावयाचे व सर्वांना समपातळीवर आणावयाचें, एवढें जरी कार्य ख्रिश्चन पाद्रयांनी केलें असतें, तरी बाटलेल्या लोकांना त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, असें म्हणतां आलें असतें. व्यक्तिशः तशीं कांहीं उदाहरणें घडलींहि आहेत. पण बहुसंख्य वाटलेल्या हिंदु ख्रिश्चनांत वरील त्रिदोष तसेच राहिलेले दिसुन येतात.
अठराव्या शतकाच्या प्रारंभी गोवेकर ख्रिस्त्यांतील दोन पाद्रयांनी दोन पुस्तकें प्रसिद्ध केलीं. त्यांतील एक ब्राह्मण ख्रिस्ती व एक चारडी (क्षत्रिय ख्रिस्ती) होता. दोघांनीहि आपापल्या जातीचें श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हीं पुस्तकें लिहिलीं आहेत. पाद्री फारीय यांनी पॅरिसमध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या पुस्तकावर आपण ब्राह्मण असल्याचें अभिमानाने लिहिलें आहे. पाद्री पाइश याने आपण चारडी असल्याचें कंठरवाने सांगितलें आहे. डॉ. पिसुर्लेकर यांनी 'गोवेकर कॅथॉलिकांतील जातिभेद' या आपल्या लेखांत ही माहिती देऊन म्हटले आहे की, हिंदूंमधील जातीबाबत मत्सर हा दोष नवख्रिस्त्यांमध्ये बाप्तिस्म्याच्या पाण्याने नष्ट झाला नाही. (मांडवी, फेब्रुवारी १९६७).
महात्माजींनी 'हरिजन' मधील (दि. १९- १२- ३६) आपल्या लेखांत हाच अभिप्राय दिला आहे- "नाममात्र झालेल्या धर्मांतरामुळे अस्पृश्यतेचा कलंक नष्ट झाल्याचें मला दिसून आलें नाही. व्यक्तिशः कांही लोकांचा कलंक गेला असेल. मी एकंदर धर्मांतरित समाजाबद्दल बोलत आहे." कर्मवीर महर्षि वि. रा. शिंदे यांनी हीच टीका केली आहे. ते म्हणतात, "ख्रिस्ती झाल्यामुळे अस्पृश्य समाजाची कोणतीच उन्नति झालेली नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सर्व जातिभेद, अस्पृश्यता या बाटलेल्या लोकांत कायम ठेविली आहे. अस्पृश्यांना चर्चमध्ये प्रवेश मिळत नाही आणि इतर जातींना चर्चमध्ये मागील बाकांवर बसावें लागतें." (माझ्या आठवणी व अनुभव, पृष्ठे २१३, ३०२). यावरून धर्मातरितांच्या मानवत्वाची प्रतिष्ठा वाढवावी असा मिशनऱ्यांच्या अनुयायी ख्रिश्चनांचा प्रयत्नहि दिसत नाही. इहवादाच्या दृष्टीने पाहतां या ख्रिश्चन समाजांत प्रगति शून्य आहे, असें यावरून दिसतें.
माणुसकीची हत्या
केरळ-कन्यकांचा ख्रिश्चनांनी जो विक्रय चालविला आहे आणि त्याचें येथील पाद्रयांनी जें भयंकर समर्थन केलें, त्यावरून मानवी प्रतिष्ठेचीच नव्हे, तर माणुसकीचीच हत्या करण्याची धर्मन्यायासनांची (इन्क्विझिशन) व जेसुइटांची घोर परंपराच हा समाज पुढे चालवीत आहे असें दिसून येतें. मसुराश्रमपत्रिका (गोरेगाव, मुंबई) या पत्राने 'न्यू लीडर', 'गोअन स्पोर्टस वीकली', 'सिने टाईम्स', 'नवहिंद टाइम्स' इत्यादि कॅथॉलिक वृत्तपत्रांतून आलेली माहिती व मतें एकत्र करून या सर्व प्रकरणाची साद्यंत हकीकत दिली आहे. (मसुराश्रमपत्रिका, सप्टेंबर १९७०). तींतून भारतीय ख्रिश्चन समाजांतील दैवी आणि आसुरी दोन्ही वृत्तींवर चांगला प्रकाश पडतो.
१९६४ मध्ये केरळमधून सुमारे २४० ख्रिश्चन मुली विमानाने पश्चिम जर्मनींत पाठविण्यांत आल्या. या प्रकरणाचा गवगवा होऊन शोध सुरू झाला तेव्हा एकंदर दोन हजार मुली नेण्यांत आल्या आहेत, असें उघडकीस आलें. या सर्व गरीब ख्रिश्चन घरांतील मुली होत्या. त्यांपैकी फार थोड्या मुलींना इंग्रजी येत होतें. रुग्णासेवेसाठी आपल्याला नेत आहेत, असा त्यांचा समज करून दिला होता. जर्मनींत गेल्यावर त्यांना संडास, मोऱ्या धुणे, झाडू मारणें अशीं कामें देण्यांत आली. कांही मुली रडूं लागल्या तेव्हा त्यांना कठोरपणें समज देण्यांत आली. जर्मन भाषा त्या मुलींना येत नसल्यामुळे त्यांची अवस्था फार बिकट झाली. त्यांना तेथे दोन वर्षे कैद्यांसारखें वागविण्यांत आलें. कोणाला भेटण्याची, कोणाशीं बोलण्याची परवानगी नाही, एकमेकींतसुद्धा त्यांच्या मल्याळम् भाषेत बोलावयास बंदी आणि एकंदर वागणूक निर्दय व क्रूर.
केरळ-कन्यकांना फसवून त्यांचा असा विक्रय करण्याच्या धंद्यांत सुमारें सहा- सात सिरियनराइट पाद्री गुंतलेले आहेत. प्रत्येक पाद्रयाला प्रत्येक मुलीमागे ठराविक पैसा मिळतो. नरेंद्रभूषण (चेंगनूर, केरळ) यांना एका फेरीवाल्या ख्रिश्चन गरीब गृहस्थाने या मुलींच्या व्यापारासंबंधी बरीच माहिती दिली. पण माझें नांव कोठे सांगू नका, कारण तसे झाल्यास चर्चचे अधिकारी मला हीं गुपितें फोडल्याबद्दल शिक्षा करतील असें सांगितले. अशा रीतीने युरोपांत नेलेली प्रत्येक मुलगी तेथून निसटून परत येण्याच्या संधीची वाट पाहत असते. इतर मुलींनी फसू नये म्हणून त्या घरीं गुप्तपणें निरोप पाठवितात की, पुन्हा इकडे मुली धाडूं नका.
रोमन कॅथॉलिक वृत्तपत्रांनी या निंद्य व हीन कृतीचा परामर्श घेतांना पुढील- प्रमाणे विचार प्रकट केले आहेत- (१) 'कन्फेशन्स ऑफ ए नन्' या ग्रंथावर पोपने मागे बंदी घातली होती. हेतु हा की, कॅथॉलिक मठांत जोगिणींना (नन्स) कसें वागविलें जातें, तेथे काय चालतें हे लोकांना कळू नये. केरळ-कन्या प्रकरण त्याच हेतूने चर्चचे अधिकारी दडपून टाकीत नसतील ना? (२) या प्रकरणांत असें अनेकांना वाटतें की, या मुलींना मोलकरणी व रखेल्या म्हणूनच नेले जात असावें. (३) एका मोठ्या पाद्रीसाहेबाने म्हटले आहे की, "युरोपने आतापर्यंत भारतावर जे उपकार केले त्याची परतफेड म्हणून या कन्यकांना पाठविले जात आहे असें मानावें." हे उद्गार अशा मोठ्या पदाधिकाऱ्याला शोभत नाहीत. भारताला जिंकून युरोपने आमच्या धनाची लूट केली, सक्तीने धर्मांतर केलें यासाठीच आम्ही युरोपचं ऋण मानावयाचें काय? कार्डिनलसाहेबांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी दोनदा विचार करावयास हवा होता."
रोमन कॅथॉलिक पत्रांनी भारताचा अभिमान धरून या दुष्कृत्यावर परखड टीका केली ही अभिनंदनीय गोष्ट आहे. पण त्यापेक्षाहि समाधानाची गोष्ट म्हणजे या पत्रांचे संपादक पोपच्या वर्चस्वांतून मुक्त आहेत ही होय. इहवादाच्या दृष्टीने या गोष्टीला फार महत्त्व आहे. मिशनरी व त्यांचे भारतीय अनुयायी हे मात्र पोपचे अंध व हेकट दास आहेत ही गोष्ट या व इतर प्रकरणांतून स्पष्ट होते. असें दास्य पत्करणारा जो ख्रिश्चन समाज हीच इहवादाच्या दृष्टीने फार घातक शक्ति आहे.
श्री. ग. वि. केतकर यांनी 'ख्रिश्चन देवदासी' या नांवाचा एक लेख लिहून पाश्चात्त्य ख्रिश्चन मठांत जोगिणींना (नन्स) कसें नरकप्राय जीवन जगावें लागतें तें वर्णिलें आहे. रॉबर्ट ब्लेअर कायसर या अमेरिकन लेखकाने तेथील 'लेडीज होम जर्नल' या मासिकांत एप्रिल १९६७ च्या अंकांत मुळांत अमेरिकेतल्या मठांतील जोगिणींची दुरवस्था जाहीरपणे सांगितली आहे. त्या लेखाच्या आधारेच केतकरांनी 'ऑर्गनायझर' (दि. ७-१-१९६८) मध्ये वरील लेख लिहिला आहे. या ख्रिश्चन जोगिणींचें जीवन कैद्यांपेक्षाहि दीन-हीन असतें. त्यांना कसलेंहि स्वातंत्र्य नसतें. अत्यंत स्वल्प चुकांसाठी मदर सुपीरियर त्यांना क्रूर शिक्षा करते. गाणे, नाटक, कुठलीहि करमणूक त्यांना वर्ज्य आहे. सर्व आयुष्य म्हणजे वैराण वाळवंट.
या कारणांमुळे शेकडो जोगिणी मठांतून पळून जातात. एका १९६६ सालांतच ३६०० जोगिणी पळून गेल्या व बाहेर येऊन त्यांनी लग्नें करून संसार मांडले. बाहेर आल्यावरच, आम्हांला खरा ख्रिश्चन धर्म समजला व आम्ही खऱ्या नागरिक झालों असें त्यांपैकी अनेक जणींनी सांगितले. ही आजची अमेरिकेतली स्थिति. स्वातंत्र्य, समता, समनागरिकत्व, मानवता, ऐहिक सुखाचा अधिकार या इहवादाच्या मूलतत्त्वांना पोपच्या ख्रिश्चन धर्मात काय प्रतिष्ठा आहे हें यावरून कळून येतें. केडगावच्या मुक्तिसदनांतील पन्नास जोगिणींनी नुकतेच पुण्याच्या एका मिशनऱ्याला पत्र लिहून आपल्याला तेथे असाच नरकवास भोगावा लागतो असें जाहीर केलें आहे. अमेरिकेंत तशी स्थिति असतांना भारतांत नसेल हें कसें शक्य आहे? पंडिता रमाबाईंनी हें सदन भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी स्थापिलें होतें !
पंडिता रमाबाई यांची धर्मांतराची कहाणी मोठी उद्बोधक आहे. हिंदु धर्मातील विषमता, स्त्रीवरील अन्याय, कर्मकांड यांचा वीट येऊन त्या ख्रिश्चन झाल्या. पण धर्मांतर केल्यावर त्यांच्या ध्यानी आले की, हे सर्व दोष ख्रिश्चन समाजांतहि आहेत. शिवाय त्यांच्या लेखनभाषणावर मिशनऱ्यांची बंधने येऊं लागलीं. बाईंची भारतनिष्ठा त्यांना सलूं लागली. त्यामुळे मिशनरी बाईचे शत्रु झाले. हिंदु धर्मापासून तर त्या दुरावल्याच होत्या. त्यामुळे उच्च हिंदु स्त्रियांचा उद्धार हें आपलें कार्य त्यांना सोडून द्यावे लागले. शेवटीं त्या केडगावला जाऊन अनाथाश्रम काढून बसल्या. तेथील आश्रितांची आज वर वर्णिलेल्या अमेरिकेतल्या जोगिणींच्यासारखी स्थिति आहे.
भारतीय जीवनाशीं त्यांचा कसलाहि संबंध राहिलेला नाही. त्या आश्रमांत रमाबाईंच्या अंगचें सर्व तेज, त्यांचा स्वातंत्र्याचा बाणा, त्यांचें सर्व कर्तृत्व लुप्त झालें होतें. धर्मांतर करून त्यांनी मिळविले काय ? तर शून्यत्व. त्यापेक्षा त्यांनी धर्मांतर न करतां धर्मांध रूढिग्रस्त हिंदु समाजाशी झगडा करून स्त्रियांसाठी आश्रम चालविले असते, तर भारतीय स्त्री-जीवनांत त्यांनी निःसंशय क्रांति केली असती. किंवा ख्रिस्ती झाल्यावर तेथले दोष व तेथलीं जाचक बंधने पाहून त्या परत स्वधर्मात् आल्या असत्या, तरीहि त्यांचे कर्तृत्व जिवंत राहिलें असतें. पण तसें न केल्यामुळे भारतांतले एक असामान्य कर्तृत्व, एक अलौकिक तेज व्यर्थ मृत्यु पावलें. पण मिशनऱ्यांना याची खंत नव्हती, नाही. किंबहुना तेंच त्यांचे उद्दिष्ट आहे.
सेवेचे आमिष
रुग्णालये, अंध पंगुगृहें यांतून ते अनाथांची सेवा करतात, आणि तसे करतांना आम्ही मानवतेच्या भावनेने सेवा करतों असा त्यांचा दावा असतो. पण हें सर्व वरवरचें असतें. धर्मांतर हाच त्यांचा अंतिम हेतु असतो. त्यांच्यातील अनेक श्रेष्ठींनी हें वेळोवेळीं स्पष्टपणें सांगितलें आहे. साल्व्हेशन आर्मीचे संस्थापक जनरल बुथ यांनी आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रांत म्हटलें आहे की, "समाजसेवा हें आमिष आहे. धर्मांतराने मुक्ति हा खरा गळ आहे. मासा त्याला लागतो." आपल्या मिशनचें मुख्य ध्येय धर्मांतर करून लोकांना ख्रिश्चन समाजांत आणणें हेंच होय असें बुथ यांनी वारंवार सांगितलें आहे. हीं अवतरणें देऊन महात्माजी म्हणतात, "सर्व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबतींत हेंच खरें आहे. त्यांची समाजसेवा सेवेसाठी नसून त्या लोकांच्या मुक्तीसाठी आहे. सेवेसाठी मिशनरी भारतांत आले असते तर भारताचा इतिहास निराळाच झाला असता." (ख्रिश्चन मिशन्स, पृष्ठ ११३).
भारत स्वतंत्र झाल्यावर आपल्या ख्रिस्तीकरणाच्या कार्याला पायबंद बसेल असें मिशनऱ्यांना वाटलें होतें. पण भारताची निधर्मी राज्याची घोषणा व नेहरूकृत ख्रिश्चन गौरव यांमुळे सर्व रान आपल्याला मोकळें आहे, हें त्यांनी जाणलें व ते चेकाळून गेले. प्रोटेस्टंट मिशनने जाहीर केलें की, "भारत ही लवकरच ख्रिस्तभूमि होईल.' कॅथॉलिक मिशनने घोषणा केली की, "धर्मांतराला ही सुवर्णसंधि आहे. तेव्हा भारताचें तारण करणें आता आपल्या शिरीं आहे." बॅप्टिस्ट मिशनने पुकारा केला की, "अखिल भारताला ख्रिश्चन करण्याची अनन्य संधि आता ख्रिश्चन मिशनऱ्यांना मिळाली आहे." मदुरेचे बिशप जॉन पिटर लिओनार्ड म्हणाले, "भारतीयांच्या ख्रिस्तीकरणाचें कार्य फार मंद गतीने चाललें आहे, हें दुःखदायक आहे. सामुदायिक धर्मांतराचाच आपण अवलंब केला पाहिजे. यासाठी वन्य जमाती व अनुसूचित जाति हे क्षेत्र उत्तम आहे. सर्व मिळून यांची संख्या सात-आठ कोटि आहे." पॉल बेनिश यांचें 'ख्राइस्ट मस्ट रेन' हें पुस्तक १९५३ साली प्रसिद्ध झालें. त्यांत म्हटलें आहे की, "सेंट झेवियर भारतांत आले तेव्हापासून प्रत्येक ख्रिश्चनाने एका हिंदूचें जरी धर्मांतर केलें असतें, तरी आज सर्व भारत ख्रिस्ती झाला असता. अजून प्रत्येक ख्रिश्चनाने हा निश्चय केला तरी भारत हा लवकरच एक कॅथॉलिक देश होईल." (मसुराश्रम, विश्वकल्याणमाला, पुष्प १४, पृष्ठ १३-१९).
कार्डिनल ग्रेशस एका मुलाखतीत म्हणाले की, "अलीकडे मिशनरी समाज सेवेवर भर देतांना दिसतात. पण आपण हें विसरतां कामा नये की, आपलें खरें उद्दिष्ट ख्रिस्ताचा संदेश पसरून त्याचें साम्राज्य प्रस्थापित करणें हा आहे." (मसुराश्रम- पत्रिका, डिसेंबर १९६९). मिशनरी ख्रिस्तेतर समाजाची सेवा करतात ती मानवता- बुद्धीने नव्हे हें यावरून दिसून येईल. अखिल भारताचें ख्रिस्तीकरण हें त्यांचें अंतिम उद्दिष्ट आहे. हिंदु धर्म व इतर सर्व धर्म यांचा उच्छेद हा त्यांचा हेतु यांतून स्पष्ट होतो; शिवाय यामागे राजकीय हेतु असतो हेंहि आता सर्वांच्या ध्यानीं आलें आहे. इतके दिवस ब्रिटिश साम्राज्याचें बळ वाढविणें हा हेतु होता. आता नागालँड, झालखंड असे प्रदेश तोडून काढून भारत दुबळा बनविणें हा आहे. त्या कार्यासाठी त्यांचे परकी पोशिंदे त्यांना धन्यवाद कसे देतात हें वर सांगितलेच आहे.
इतके दिवस बराच मोठा ख्रिश्चन समाज या ना त्या कारणामुळे त्यांच्या वर्चस्वाखाली होता व त्यांच्या कार्यांत त्यांना साह्यहि करीत असे. आता सुदैवाने मनु पालटत आहे. भारतीय ख्रिश्चनांत स्वत्व-जागृति होत आहे. आपल्याला मिशनरी व त्यांच्या वर्गाचे अधिकारी गुलामासारखे वागवीत असून, आपल्या कल्याणाची त्यांना कसलीहि चिंता नाही हें त्यांच्या ध्यानांत येत आहे.
बदललेला मनु
सध्या ख्रिस्ती चर्चचे अधिकारी आपल्या ताब्यांतील जमिनी दीन-दलितांच्या साठी दान म्हणून देऊन टाकण्याच्या घोषणा करीत आहेत. या प्रसंगाने परकी मिशनरी व त्यांचे हस्तक यांचे काळें अंतरंग उघड झालें आहे. या घोषणा फसव्या आहेत व त्यामागे कपटकारस्थान आहे हें पुण्याच्या सकाळ पत्राने प्रथम लोकांच्या निदर्शनास आणलें. (दि. २–११–७० ). 'सकाळ'चा 'ख्रिस्ती समाजाचें दुःख' हा अग्रलेख प्रसिद्ध होतांच संपादकांना अनेक ख्रिस्ती लोकांचीं पत्रे आलीं. आपण आमच्या दुःखाला वाचा फोडली, म्हणून अनेकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. त्यांतील भायखळ्याच्या ह्यूम मेमोरियल कॉंग्रिगेशनल चर्चचे पॅस्टर रे. डॉ. के. एल्. शिंदे यांचें पत्र देऊन हें विवेचन पुरें करूं. येथपर्यंत ख्रिश्चन समाजाविषयी वर जें विवेचन केलें आहे तें सर्व सारार्थाने त्या पत्रांत आलें आहे. रे. शिंदे म्हणतात, "आमचे पूर्वज व आम्ही, आमचे सगेसोयरे सोडून, मिशनऱ्यांचे बाजारबुणगे (कँप फॉलोअर्स) झालो. आम्हांला हाताशीं धरून त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. मिशनऱ्यांनी जनसेवा केली, उपासना-मंदिरें व इतर इमारती बांधल्या त्या सर्वांत आमचा वांटा आहे. आमच्यावांचून हे मिशनरी येथे टिकले नसते. त्यांनी हिंदी ख्रिस्ती समाजाची खोटी समजूत करून दिली की, त्यांच्यावांचून आम्ही आमच्या देशांत जगलोंच नसतों. जसे कांही आम्ही हिंदवासी नाहीच. येथे आलेल्या मिशनऱ्यांचा हेतु धर्मप्रचार व सेवा हा नव्हता हे खास. आज ते आम्हांला सहकारी न समजतां नोकर, गुलाम समजतात. पण यांचा मालकीहक्क मुळीच नाही.
आता भारतनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ अशा ख्रिश्चन समाजाचा विचार करावयाचा आहे. सुदैव असें की, हा वर्ग बराच मोठा आहे. त्यांत प्रोटेस्टंट, रोमन कॅथॉलिक, सिरियन अशा सर्व पंथांचे लोक आहेत. भारताच्या स्वातंत्र्याची त्यांना आस होतीच. पण तितकीच पोप आणि इंग्लिश चर्च यांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त होण्याचीहि इच्छा होती. स्वातंत्र्यपूर्व काळांत या वर्गाची मोठी दयनीय स्थिति होती. राष्ट्रीय चळवळीत सामील व्हावें असें त्यांना वाटे. पण चर्चचे सत्ताधारी व मिशनरी त्यांना बहिष्काराची धमकी देऊन स्वातंत्र्यलढ्यापासून परावृत्त करीत. शिवाय ब्रिटिश सरकारची भीति होतीच. तें सरकार संपूर्णतया चर्चच्या मागे उभे असल्यामुळे या राष्ट्रीय ख्रिश्चनांची दुहेरी कुचंबणा झाली होती.
साहजिकच स्वातंत्र्यप्राप्तिबरोबरच ते राजकीय साम्राज्य जसें नष्ट झाले, तसें पोपचें, मिशनऱ्यांचें व इंग्लिश चर्चचे म्हणजे सर्व भारतबाह्य सत्तांचे साम्राज्यहि नष्ट व्हावें, अशी तीव्र आकांक्षा या ख्रिश्चन समाजाच्या मनांत निर्माण झाली. त्याच हेतूने स्वातंत्र्याच्या उषःकाली त्यांनी 'इंडियन नॅशनल चर्च'ची स्थापना केली. आर्चबिशप विल्यम्स, डॉ. त्रिस्तौ कुन्हा, ब्रदर रॉडरिगस अशांसारखे नेते या ख्रिश्चनांना लाभले व त्यांनी परकीय धर्मसत्तेपासून भारतीय ख्रिश्चनांना मुक्त करण्याची चळवळ आरंभिली; कारण या सत्तेने त्यांना गुलाम केलें होतें.
डॉ. कुन्हा यांनी तर जाहीरपणे सांगितले होते की, ख्रिस्ती धर्मांतराने आमची आत्मिक उन्नति झाली नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांचा तो हेतूच नव्हता. त्यांच्यामुळे आम्हां भारतीय ख्रिश्चनांची मनें गुलाम झाली. त्यांनी आमची आर्थिक पिळवणूक केली आणि जें जें भारतीय त्यापासून दूर राहवयाचे असे वळण आमच्या मनाला लावलें. मिशनऱ्यांच्या चळवळी या वसाहतवादाच्या प्रस्थापनेसाठी, साम्राज्याच्या स्थैर्यासाठी व प्रजेच्या शोषणासाठी होत्या. या वस्तुस्थितीची ज्यांना जाणीव झाली ते ख्रिश्चन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकी धर्मसत्तेचें जोखडहि फेकून देण्यास उत्सुक झाले असल्यास नवल नाही.
'क्रुसेडर्स लीग'ची स्थापना
धार्मिक स्वातंत्र्याच्या तीव्र आकांक्षेतूनच १९५० सालीं मंगलोर येथे क्रुसेडर्स लीग ही संस्था जन्माला आली. ब्रदर हेन्री रॉडरिगस व त्यांचे शेकडो रोमन कॅथॉलिक सहकारी यांनी भारतांतील रोमन कॅथॉलिक चर्च व त्यांचे अधिकारी यांच्या अराष्ट्रीय, देशद्रोही व अख्रिश्चन कृत्यांना वाचा फोडण्यासाठी ही संस्था स्थापन केली. अनेक रोमन कॅथॉलिक प्रीस्ट व नन्स त्यांना येऊन मिळाल्या. त्यांनी वृत्तपत्रांतून लेख लिहून व अनेक सभा भरवून कॅथॉलिक सत्तेविरुद्ध असंतोष जागृत करण्यास प्रारंभ केला. अर्थातच कॅथॉलिक सत्ताधीशांनीहि त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली. त्यांनी या ख्रिश्चनांच्या सभांवर गुंडांकरवी दगडफेक केली, त्यांच्यार पीठाकरवी बहिष्कार घालण्याची धमकी दिली आणि ब्रदर रॉडरिगस यांच्यावर अनेक खोटेनाटे खटले भरले. पण सर्व खटल्यांतून ते निर्दोष ठरून मुक्त झाले; राष्ट्रीय ख्रिश्चनांची चळवळ फोफावूं लागली आणि अनेक शहरी 'क्रुसेडर्स लीग' च्या शाखा स्थापन भाल्या.
रॉडरिगस यांनी १९६३ साली 'ख्रिस्तनगर मिशन' अशी दुसरी एक संस्था त्याच कार्यासाठी स्थापिली. १९६४ साली मुंबईला जागतिक ख्रिश्चन समाजाची एक आंतरराष्ट्रीय परिषद् भरली होती. "सर्व भारताचें ख्रिस्तीकरण झाले पाहिजे. येथे ख्रिस्ताचें राज्य स्थापन झालें पाहिजे, या धर्मयुद्धांत विजय मिळविण्याची आमची जिद्द आहे" अशा घोषणा करीतच हजारो ख्रिश्चन पाद्री, इतर धर्मसत्ताधीश व रोमचे पोप हे त्या वेळी भारतांत आले होते. या त्यांच्या घोषणा गुप्त नव्हत्या. शेकडो पत्रकें छापून त्यांनी आपला हा मनोदय व्यक्त केला होता. गोरेगाव (मुंबई) येथील मसुराश्रमाने या युकॅरिस्ट परिषदेविरुद्ध मोठी मोहीम उघडली होती. ब्रदर रॉडरिगस व क्रुसेडर्स लीग यांनी या मोहिमेंत मसुराश्रमाशी सहकार्य केलें व त्यासाठी स्वतंत्र भारताच्या निधर्मी शासनाने दिलेला तुरुंगवासहि भोगला.
'इंडियन नॅशनल चर्च' ही क्रुसेडर्स लीगसारखीच भारतनिष्ठ राष्ट्रीय ख्रिश्चनांची संस्था आहे. आर्च बिशप विल्यम्स हे तिचे अध्यक्ष आहेत. पूर्वीचे सर्व अँग्लिकन प्रोटेस्टंट ख्रिश्चन तिचे सभासद आहेत. १९२७ च्या ज्या दोन कायद्यान्वये येथील ख्रिश्चन समाज ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ असलेल्या कलकत्त्याच्या बिशपच्या हातीं सुपूर्त केला आहे ते रद्द झाले पाहिजेत व भारतीय ख्रिश्चन समाजावर कोणत्याहि क्षेत्रांत भारतबाह्य सत्तेचें वर्चस्व असता कामा नये यासाठी ही संस्था चळवळ करीत आहे. 'नॅशनल चर्च' व 'क्रूसेडर्स लीग' या दोन्ही संस्थांचे उद्दिष्ट असें एकच असल्यामुळे परकी मिशनऱ्यांची भारतांतून पूर्णपणे हकालपट्टी झाली पाहिजे हा विचार तिचे नेते सतत मांडीत असतात आणि त्यासाठी चळवळहि करतात.
कोल्हापूर चर्च कौन्सिल हीं सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यांतील प्रोटेस्टंट ख्रिश्चनांची अधिकृत संस्था आहे. १९६९ च्या मेमध्ये तिने एक ठराव करून रे. रेमर, रफ हॉवर्ड प्रभृति सहा परकी मिशनऱ्यांना भारतांतून हाकलून लावावें अशी मागणी केली. हे मिशनरी देशद्रोही कारवायांत गुंतले आहेत असा त्यांच्यावर आरोप करून, कोल्हापूर कौन्सिलने भारताच्या गृहमंत्र्यांकडे त्यांच्याविरुद्ध त्या वेळी अर्जहि केला होता.
विल्यम्स यांची मागणी
याच सुमारास आसाम सरकारने बारा परदेशी मिशनऱ्यांना भारत सोडून जाण्याची आज्ञा दिली. त्या वेळी 'कॅथॉलिक युनियन ऑफ इंडिया' या संस्थेने त्याविरुद्ध फार ओरड केली. पण इंडियन नॅशनल चर्चने आसाम सरकारला पाठिंबाच दिला. आर्चबिशप विल्यम्स यांनी आसाम सरकारला पत्र पाठवून याबाबत सरकारने आजपर्यंत ढिलें धोरण ठेवल्याबद्दल खेद व्यक्त केला आणि पूर्ण राष्ट्रीय वृत्तीच्या आपल्या संस्थेला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली.
ऑगस्ट १९६९ मध्ये 'नॅशनल ख्रिश्चन असोसिएशन' या संस्थेची सिमल्याला परिषद् भरली होती. तिने परदेशी मिशनऱ्यांची कृत्यें देशाच्या सुरक्षिततेला घातक असून भारताची प्राचीन संस्कृति नष्ट करणें हें त्यांचे उद्दिष्ट आहे म्हणून भारत सरकारने त्यांना त्वरित हाकलून काढावे असा ठराव केला; आणि १९२७ च्या इंडियन चर्च ॲक्टमुळे भारतीय ख्रिश्चन हे परक्यांचे गुलाम ठरतात म्हणून तो कायदा रद्द करावा अशी दुसऱ्या ठरावान्वये मागणी केली.
हा भारतनिष्ठ ख्रिश्चन समाज पूर्णपर्णे राष्ट्रीय आहे आणि म्हणूनच तो इहवादी आहे. राष्ट्र या संघटनेत प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा असते, व ती जातिधर्मनिरपेक्ष असते. स्वातंत्र्य, समता, सर्वधर्मसमानत्व ह्रीं तत्त्वें अप्रत्यक्षपणें व प्रत्यक्षपणेंहि त्या संघटनेने गृहीत धरलेली असतात. याचे विवेचन मागे अनेक ठिकाणी केलें आहे. त्यावरून हें ध्यानांत येईल की, राष्ट्रवादी मनुष्य हा इहवादाला अनुकूल असतो. राष्ट्रीय ख्रिश्चन समाज तसा आहे. त्याचा सक्तीच्या धर्मांतरावर विश्वास नाही, तर निश्चयाने विरोध आहे.
मुंबईजवळ सहार या गावच्या मिशनरी शाळेचे रे. डॉ. एल् सी. टोरकॅटो हे मुख्याध्यापक होते. पुष्पा शेनाई नांवाच्या एका मुलीला बाप्तिस्मा देण्याची त्यांना आज्ञा झाली. पण त्यांना असे दिसलें कीं, त्या मुलीचा धर्मांतराला विरोध आहे. तेव्हा त्यांनी बाप्तिस्मा देण्यास नकार दिला. अर्थात् त्याबद्दल त्यांना शाळेंतून बडतर्फ करण्यांत आलें व अनेक प्रकारें त्यांचा छळ करण्यांत आला, तरी ते कचरले नाहीत. कारण असें धर्मांतर हा अत्याचार आहे, असें त्यांना वाटतें. अशा रीतीने धर्मांतर झालेल्यांनी हिंदु धर्मांत पुन्हा परत जावें, असे डॉ. टोरकॅटो जाहीरपणे सांगतात. रे. फादर पिंटो, रे. डिसूझा, फादर सदानंद, रे. मेडोंसा असे त्यांचे अनेक सहकारी आहेत. ते रोमन कॅथॉलिक चर्चच्या असल्या अराष्ट्रीय व अनैतिक आज्ञा निश्चयाने धुडकावतात आणि त्यासाठी होईल तो छळ आनंदाने सोसतात. (मसुराश्रम- पत्रिका, ऑक्टोबर १९६९).
हा ख्रिश्चन समाज रोमच्या पोपची सत्ता मानीत नाही. हा त्याच्या इहावाद- निष्ठेचा निश्चित पुरावा होय. मागे पाश्चात्त्य देशांतील इहवादाचें विवेचन केलें आहे. त्यावरून दिसून येईल की, राष्ट्रनिष्ठेला पहिला अडसर रोमच्या पोपचा होता आणि त्यानंतर प्रत्येक धर्मसुधारणेच्या म्हणजे इहवादाच्या मार्गांत पोपच आडवा पडत असे. सतराव्या शतकांत त्याचें हें राष्ट्रघातक कार्य करण्यास जेसुइट पंथ पुढे आला व त्याने अनेक देशांतील राष्ट्रसंघटनेला सुरुंग लावण्यांत यश मिळविलें. हिंदुस्थानांत आज हेंच चालू आहे. हें ध्यानांत घेऊनच भारतनिष्ठ ख्रिश्चन समाजाने पोपचें वर्चस्व समूळ उच्छेदून टाकण्याचें ठरविलें आहे. तें आहे तोंपर्यंत कोणताहि समाज राष्ट्रनिष्ठ व इहवादी होऊ शकणार नाही.
पोपला मानीत नाही
ब्रदर रॉडरिगस यांनी मुंबईचे कॉर्डिनल ग्रेशस यांना एक अनावृत पत्र लिहून निर्भयपणें आपल्या प्रतिज्ञा स्पष्ट केल्या आहेत. ते म्हणतात, 'आम्ही रोमन कॅथॉलिक नाही, इंडियन ख्रिष्चन आहों. आम्ही पोपला मानीत नाही; तो आमचा धर्मगुरु नाही. जीजस आमचा गुरु आहे. पाद्री-संस्थेवर आमचा विश्वास नाही. 'होली सॅक्रिफाइस ऑफ मास', 'ऑरीक्युलर कन्फेशन', 'सेव्हन सॅक्रॅमेंटस्', 'परगेटरी', 'रोमन परंपरा' यांपैकी कशावरहि आमची श्रद्धा नाही. आम्ही फक्त बायबल मानतों. फक्त रोमन कॅथॉलिक चर्चच मोक्ष देऊ शकतें हें आम्हांला मान्य नाही. तुमच्या धार्मिक कायद्यान्वये आम्ही पाखंडी आहोंत. तेव्हा आम्हांला आपण काय शिक्षा करणार आहांत तें कळवावें. तुमच्या व तुमच्या सहकाऱ्यांच्या कृपेने आमचा पोलिस-स्टेशनमध्ये व न्यायालयांत खूप छळ झाला आहे. पण ध्यानांत ठेवा, शेवटीं प्रभु येशूच्या कृपेने आम्ही यशस्वी झालों. म्हणून पुन्हा सांगतों आम्ही प्रथम भारतीय आहों आणि अंतींहि भारतीयच आहों !" (मसुराश्रमपत्रिका, मे १९६८).
परंपरेचा अभिमान
आम्ही भारतीय आहों, असें जे ख्रिश्चन म्हणतात त्यांच्या मनांत काय अभिप्रेत असतें ? ते भारतीय परंपरेचा अभिमान बाळगतात, भारतीयांच्या सुखदुःखाशीं एकरूप होतात आणि भारतासाठी कोणत्याहि अंतिम त्यागासाठी सदैव सिद्ध असतात. डॉ. फ्रॅन्सिस्को लुई गोम्स (१८२९-६९) याचें उदाहरण पाहा. हे पोर्तुगीज पार्लमेंटचे पहिले हिंदी सभासद होते. अर्थशास्त्र, भाषाशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ असून कादंबरीकारहि होते. पोर्तुगालमध्ये राहूनहि त्या काळी सुद्धा ते भारताच्या स्वातंत्र्याचें समर्थन करीत. इटली, बेल्जम, फ्रान्स या देशांतहि त्यांची कीर्ति पसरली होती. जॉन स्टुअर्ट मिल यांचे ते मित्र होते. असे हे गृहस्थ एकनिष्ठ भारतीय होते. फ्रेंच इतिहासकार लॅमारचटाइन याला लिहिलेल्या पत्रांत त्यांनी लिहिलें होतें, "भारत हे एके काळी काव्य, इतिहास, तत्त्वज्ञान यांचें आदिपीठ होतें. अशा भारतांत माझा जन्म झाला आहे. ज्यांनी महाभारत रचलें त्यांचा मी वारस आहें. अशा या माझ्या देशाला आज ग्रहण लागलें आहे म्हणून त्याच्या स्वातंत्र्याची व प्रबोधनाची मी मागणी करीत आहें." (इलस्ट्रेटेड वीकली, दि. १७-८-६९).
भारतीय याचा अर्थं यावरून स्पष्ट होईल. या भूमीच्या प्राचीन वैभवाचे (रोमच्या वैभवाचें नव्हे) आपण वारस आहों, असें जे अभिमानाने सांगतात ते भारतीय आणि अमृत कौर यांच्या मताने ते हिंदु. तेलो मस्कारेन्हस हे असेच हिंदु आहेत. १९६२ साली या वृद्ध तरुणाने गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी खडतर तुरुंगवास पत्करला. त्यांना कोणी माफी मागण्यास सांगितलें तेव्हा ते कडाडले, "कसली माफी, कशाकरिता? माझ्या देशाची परंपरा माफीची नाही. मी भारतांत जन्मलों आहें. माझ आई-वडील भारतीय आहेत. माझ्यावर भारतीय संस्कृतीचे संस्कार झाले आहेत. माझ्या रक्ताचा थेंबन् थेंब भारतीय आहे. म्हणून मी पोर्तुगीज नागरिकत्व फेकून देत आहे. मला भारतीय नागरिकत्व मिळालें पाहिजे."
तेलो मस्कारेन्हस अनेक वर्षे पोर्तुगालमध्ये होते. त्या काळांत हिंदुस्थानसंबंधी त्यांनी अनेक पुस्तकें लिहिली. त्यांतील 'हिंदु स्त्री' हें त्यांचें पुस्तक खूप गाजले. या पुस्तकांत सीता, दयमंती यांची चरित्रे त्यांनी अभिमानाने वर्णिली आहेत. भारतीय संस्कृतीची माहिती पोर्तुगीजांना व्हावी म्हणून त्यांनी एक मंडळ तेथे स्थापन केलें होतें. त्याचें नांव 'हिंदु असोसिएशन!' या मंडळाचे सर्व सभासद ख्रिश्चन होते. तरी ते हिंदु संस्कृतीचे प्रखर अभिमानी होते. मस्कारेन्हस म्हणत, "'इंडियन' याचा अर्थ मी 'हिंदु' असाच लावतों व मला त्याचा अभिमान आहे."
रे. ना. वा. टिळक यांची अशीच भूमिका होती. वेदांचा ते जुना करार म्हणून आदर करीत. "ख्रिस्त यशोरत झालों तरी, ख्रिस्ती झालो तरी, माझ्या जन्मधरेसाठी मी मृत्यु पत्करीन" असें एका कवितेंत त्यांनी म्हटलें आहे. त्यांचे चिरंजीव देवदत्त यांनी धर्मांतर म्हणजे संस्कृत्यंतर किंवा समाजांतर नव्हे. धर्मांतरानंतरहि मनुष्य संस्कृतीने हिंदु राहूं शकतो अशा शब्दांत वडिलांच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुराष्ट्रवादी सावरकर यांनी मायकेल मधुसूदन दत्त या बंगाली राष्ट्रीय ख्रिस्ती कवीचा उल्लेख करून माणसाने धर्मांतर केल्यानंतरहि तो संस्कृतीने हिंदु राहूं शकतो या मताला पुष्टी दिली आहे. (ग. त्र्यं. माडखोलकर, तरुण भारत दि. ५-४-१९६२).
मसुराश्रमाचे संचालक हे कडवे हिंदुराष्ट्रवादी आहेत. पण त्यांचीहि हिंदुत्वाची व्याख्या वरीलप्रमाणेच व्यापक आहे असें दिसतें. 'इंडियन नॅशनल चर्च'शीं त्यांनी दृढ स्नेहसंबंध प्रस्थापित केले असून, त्या चर्चच्या चालकांविषयी ते अतिशय आदराने लिहितात. वरील ख्रिश्चन संस्था या वीर सावरकरांच्या स्मृतीला भक्तीने वंदन करतात. मसुराश्रमाला लिहिलेल्या एका पत्रांत नॅशनल चर्चचे आर्चबिशप विल्यम्स लिहितात, "महामना वीर सावरकरांच्या स्मृतीला आम्ही या चर्चचे सभासद वंदन करतो. आपल्या भारतमातेचे ते थोर सुपुत्र होते. ते कडवे हिंदु असले तरी आपल्या शौर्यधैर्यादि गुणांनी व ख्राइस्टसारख्या चारित्र्याने ते आम्हा राष्ट्रीय ख्रिश्चनांचे सदैव स्फूर्तिस्थान झालेले आहेत. परकी वर्चस्वाविरुद्ध आम्ही जो लढा चालविला त्यामुळे आपले पूज्य नेते वीर सावरकर यांच्या आत्म्याला शांति मिळेल अशी आमची खात्री आहे." (मसुराश्रमपत्रिका, जून १९७०).
त्रिवेंद्रमचे आर्च बिशप बेनेडिक्ट ग्रेगोरियस हे पूर्वीचे केरळांतील इझावा या अस्पृश्य जमातीचे गृहस्थ. त्यांनी गेल्या वर्षी शिवगिरीला जाऊन हिंदु साधुपुरुष नारायण गुरु यांच्या समाधीची हिंदु पद्धतीने पूजा केली. त्या वेळी ते म्हणाले, "शिवगिरीची यात्रा म्हणजे सत्य, ज्ञान व मुक्ति यांचीच यात्रा होय." नारायण गुरु जरी इझावा जातीचे असले, तरी ते केवळ एक कोटि इझावांनाच वंद्य नसून अखिल हिंदु समाजाला वंद्य आहेत. भारतीयत्व याचा हा असा अर्थ आहे.
शेवटी एका प्रश्नाची चर्चा करून हें भारतीय ख्रिश्चन समाजाविषयीचें विवेचन पुरें करूं. हे जे भारतनिष्ठ राष्ट्रीय ख्रिश्चन त्यांना भारत सरकार (काँग्रेस नेते) इतर अराष्ट्रीय, बाह्यनिष्ठ ख्रिश्चन समाजापेक्षा जास्त आपुलकीने, आदराने वागवतें काय? नाही. बरोबर उलट स्थिति आहे. मुस्लिमांच्या बाबतींत स्वातंत्र्यापूर्वी व नंतरहि काँग्रेस नेत्यांची जी दृष्टि होती तीच ख्रिश्चनांच्या बाबतींत आहे. अराष्ट्रीय, देशद्रोही, धर्मांध, लीगवादी जे मुस्लिम ते काँग्रेसला जवळचे व जे राष्ट्रनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी, भारतीय परंपरेचे अभिमानी ते दूरचे, सावत्र नात्याचे. तोच प्रकार खिश्चनांच्या बाबतींत आहे. नियोगी समितीने ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कृष्णकृत्यांचें आधारप्रमाणांसह आपल्या अहवालांत वर्णन केलें आहे. पण तो अहवाल नेहरूंनी दडपून टाकला. ख्रिश्चन समाजाने यासाठी 'उदार मनाचे पंडितजी ' अशी त्यांची प्रशस्ति केली. (इलस्ट्रेटेड वीकली, दि. २८-१२-६९).
सरकारी धोरण
महाराष्ट्र शासनाने फेररला हाकलून काढलें. लगेच केंद्र सरकारने त्याला पुन्हा परवाना दिला आणि ब्रिटिशांच्या वेळचे ख्रिश्चन समाजाला गुलामींत बांधणारे कायदे रद्द करावे ही राष्ट्रीय ख्रिश्चनांची मागणी मात्र अजून पुरी होत नाही. केरळ- कन्या विक्रयाच्या बाबतींत ख्रिश्चन पत्रांनीच पुराव्यानिशी सिद्ध करून दिलें की यामागे अत्यंत नीच हेतु आहे. पण केंद्र सरकारने परवा जाहीर करून टाकलें की, या प्रकारांत हीन, दुष्ट असें कांही नाही. १९५५ साली सेंट थॉमस याचा जीर्णोद्धार करून त्याचा स्त्रिश्चनांनी महोत्सव केला. त्यांत श्रीसोमनाथ जीर्णोद्धाराला विरोध करणारे नेहरू काँग्रेसच्या सर्व परिवारासह सामील झाले. मिशनऱ्यांची त्यांनी स्तुतिस्तोत्रे गाइली व त्यांना मुक्तद्वार करून दिलें.
स्वातंत्र्यानंतर वल्लभभाई, राजगोपालाचारी या सर्व नेत्यांनी ख्रिश्चनांचें धर्मप्रसाराचें स्वातंत्र्य मान्य केलें होतें; पण सामुदायिक धर्मांतर तुम्ही करावयाचें नाही असा दंडक त्यांना घातला होता. पण तो न जुमानतां मिशनऱ्यांनी सामुदायिक धर्मांतर इतक्या मोठ्या प्रमाणावर केलें की, गेल्या वीस वर्षांत ख्रिश्चनांची संख्या कित्येक प्रदेश-राज्यांत दुपटीने-तिपटीने वाढली.
महाराष्ट्रांत १९५१ ते १९६१ या दहा वर्षांत हिंदूंची संख्या तेरा टक्क्यांनी वाढली, तर ख्रिश्चनांची एकोणतीस टक्क्यांनी! मध्यप्रदेशांत ती एकशे बत्तीस टक्क्यांनी, राजस्थानांत शंभर टक्क्यांनी व आसामांत सत्तावन्न टक्क्यांनी वाढली. मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, ओरिसा या प्रदेशांत धर्मांतराविरुद्ध कायदे करण्यांत आले आहेत; पण त्यांना लाथाडून मिशनरी बाटवाबाटवी करीतच आहेत.
युकॅरिस्ट काँग्रेसच्या वेळीं अखिल भारताचें ख्रिस्तीकरण करण्याच्या प्रतिज्ञा करीतच देशोदेशींचे ख्रिश्चन भारतांत आले होते. त्या परिषदेची सर्व बडदास्त काँग्रेस सरकारने बादशाही इतमानाने ठेवली होती. रोमच्या पोपने शिष्टाचाराप्रमाणे आपण होऊन राष्ट्रपतींची भेट घ्यायची. पण बोलावणें आल्यावरहि त्याने नकार दिला. वास्तविक त्या क्षणींच त्या महाराजांना काँग्रेस सरकारने भारत सोडण्यास सांगावयाचें. तें तर त्याने केलें नाहीच, उलट सर्व स्वाभिमान गिळून राष्ट्रपति व महामंत्री मुंबईला त्यांच्या भेटीसाठी धावले.
१९५८ सालीं त्या वेळचे वाहतूकमंत्री श्री. जगजीवनराम यांनी हैदराबाद येथील भाषणांत सांगितलें की, "हैदराबाद व मध्यप्रदेश येथे सामुदायिक धर्मांतरें सतत चालली आहेत. या ख्रिस्तीकरणाच्या व्यवहाराशीं मी स्वतः गेली पंचवीस वर्षे झगडत असून, या काळांत ख्रिस्ती झाल्यामुळे इतस्ततः उद्ध्वस्त स्थितींत काळ कंठीत असलेल्या सात सहस्र हरिजनांना परत हिंदु धर्मांत आणले आहे. आपले लोक या विषयांत अज्ञानी आहेत. एका पक्षी कांही सामाजिक अन्यायामुळे आणि दुसऱ्या पक्षी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी दाखविलेल्या विलोभनामुळे बळी पडून हिंदु धर्म सोडण्यास ते तयार होतात."
कणखर कृतीचा अभाव
मंत्रिमहाशयांच्या भाषणांत मिशनऱ्यांचें सारार्थाने सर्व वर्णन आले आहे. मिशनरी विलोभने दाखवून धर्मांतर घडवितात, आणि धर्मांतरितांचें जीवन धर्मांतर केल्यानंतरहि हीन-दीन असेंच राहतें. त्यांच्यावरील सामाजिक अन्याय दूर होत नाहीत असें स्वच्छ दिसत असूनहि धर्मांतरावर बंदी घालण्याचा कायदा करण्याचा प्रयत्न जगजीवनराम करीत नाहीत.
पण काँग्रेसच्या नेत्यांकडून यापेक्षा कांही निराळी अपेक्षा करण्यांत अर्थ नाही. मतासाठी, सत्तेसाठी, परदेशांतून मिळणाऱ्या पैशासाठी लाचार व ध्येयशून्य नि तत्त्वशून्य झालेली अशी ती एक संस्था आहे. हें तिच्या नेत्यांनीच वेळोवेळीं सांगितलें आहे. तेव्हा राष्ट्रीय मुस्लिमांप्रमाणेच ती राष्ट्रनिष्ठ ख्रिश्चन समाजाची उपेक्षा करणार, त्याच्यावर धार धरणार यांत कांही नवल नाही. पण या राष्ट्राची चिंता वाहणाऱ्या हिंदु संस्थांनी या समाजाची उपेक्षा करणें अक्षम्य ठरेल.
या भूमीला मातृभूमि मानणारा, या भूमीच्या प्राचीन परंपरेचा आत्मीयतेने अभिमान बाळगणारा, तिच्या थोर सुपुत्रांना भक्तीने वंदन करणारा व तिच्या उत्कर्षासाठी वाटेल त्या त्यागाला सिद्ध असणारा जो समाज तो कोणत्याह धर्माचा असला तरी तो स्वकीयच आहे, ही भूमिका हिंदुसमाजाने घेतली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा ती घेतली होती. तेव्हा ती भारताच्या हिताची असणार यांत शंका नाही. पण तशी भूमिका घ्यावयाची तर हिंदु समाज स्वातंत्र्यवीरांइतकाच इहवादी होणें अवश्य आहे. हें त्याला पेलेल काय ?
इहवाद व
ख्रिश्चन समाज
६
१

२

३