इहवादी शासन/प्रमुख धर्मपंथांचे कार्य



प्रमुख धर्मपंथांचें कार्य



 आता भारतांतील कांही प्रमुख धर्मपंथांचा इहवादाच्या दृष्टीने विचार करावयाचा आहे. जैन, बौद्ध व शीख व झरतुष्ट्री (पारशी) हे ते पंथ होत. पहिल्या तीन पंथांचे लोक हिंदु आहेत की नाही, याविषयी वाद आहे. भारतीय घटनेने त्यांचा हिंदूंत समावेश केलेला आहे. गेली चार-पांच वर्षे विश्व हिंदुपरिषद् ही संस्था सर्व हिंदु समाजाच्या संघटनेचा प्रयत्न करीत आहे. तिला या तीनहि पंथांच्या नेत्यांचें सहकार्य लाभलें आहे. आम्ही हिंदूच आहों, असें मान्य करून परिषदेच्या व्यासपीठावर या पंथांचे कांही नेते उपस्थित राहतात व त्या अर्थाचीं भाषणेंहि करतात.
 तथापि या तीनहि समाजांत "आम्ही हिंदु नाही, आमचा धर्म स्वतंत्र आहे" असें म्हणणाराहि एक वर्ग आहे. या पंथांच्या मूळ मतभेदांचा विचार येथे अप्रस्तुत आहे. पृथक्पणाच्या भावनेमुळे इहवादाच्या दृष्टीने या पंथांनी भारतांत कोणतें कार्य केलें, एवढ्यापुरताच येथे विचार करावयाचा आहे.
 हा विचार करण्याआधी एक गोष्ट स्पष्टपणें ध्यानांत ठेवली पाहिजे की, या पंथांतले स्वतःला हिंदु म्हणविणारे किंवा न म्हणविणारे कोणतेहि लोक असोत, ते सर्व पूणपणें भारतीय आहेत. हिंदूंची राष्ट्रनिष्ठा, हिंदूंची भारतभक्ति, हिंदूंचा या भूमीचा अभिमान जितका अस्सल, अव्वल आणि विशुद्ध आहे तितकीच त्यांचीहि निष्ठा, भक्ति व अभिमान विशुद्ध आहे. या भूमीची हिंदूंनी जशी सेवा केली आहे, तिच्यासाठी त्याग केला आहे, तिच्या हिताची चिंता वाहिली आहे तशीच किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणांत क्वचित अधिकहि चिंता या पंथांनी वाहिली आहे.
 प्राचीन काळांत राजकीय नेतृत्व, धर्मसेवा, व्यापार, धनोत्पादन, काव्य, नृत्य, संगीत, शिल्प, रसायन, ज्योतिष, वैद्यक इत्यादि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत बौद्ध व जैन यांनी भरतभूमीच्या वैभवांत भर घातलेली आहे. अर्वाचीन काळांतहि या पंथांचे अनुयायी अनेक क्षेत्रांत मायभूमीची सेवा करीत आहेत. असें असतांना एकंदर हिंदु समाजाहुन यांचा निराळा विचार करण्याचें कारण एवढेच की, हिंदु जीवनाच्या मूळ प्रवाहांतून हे पंथ आरंभापासून पृथक् झाले आहेत. गतिहीन, प्रतिगामी, होऊन बसलेल्या वैदिक समाजांत आम्हीं क्रांति घडविली आहे असें त्यांचें म्हणणें आहे; आणि आजहि आम्ही निराळे आहों, आमचा धर्म हिंदु धर्माचा एक पंथ नसून तो स्वतंत्र धर्म आहे, असा आग्रह या पंथांतले लोक धरतात. आता ते स्वतःला पृथक् म्हणवितात. तेव्हा इहवादाच्या दृष्टीने त्यांनी भारताला काय देणें दिलें त्याचा विचार करणें अवश्य आहे.

विषमतेविरुद्ध बंड

 जैन आणि बौद्ध हे पंथ भारतांत इ. पू. सहाव्या शतकांत उदयाला आले. वैदिक धर्मांतील चातुर्वर्ण्य, त्यांतील विषमता, त्यांतील ब्राह्मणांचें श्रेष्ठत्व आणि यज्ञयागांतील कर्मकांड व हिंसा या तत्त्वांविरुद्ध आचारांविरुद्ध जैन व बौद्ध धर्मांचे संस्थापक, भगवान् महावीर व भगवान् गौतमबुद्ध हे बंड करून उठले असें सांगितलें जातें. हीं सर्वं तत्त्वें व आचार इहवादाला मारक आहेत यांत शंकाच नाही. पण प्राचीन इतिहासाचें आज जें संशोधन झाले आहे त्याअन्वये पाहतां या तत्त्वांविरुद्ध वैदिक धर्मीयांनी जैन-बौद्धांच्या पूर्वीच बंड उभारलें होतें.
 उपनिषदांत व गीतेंत कर्मकांडप्रधान हिंसात्मक धर्माची स्पष्टपणें निर्भर्त्सना केलेली आढळते. या दोन्ही ग्रंथांच्या प्रणेत्यांनी ज्ञानयज्ञाचा, भक्तीचा व निष्काम कर्माचा आग्रहाने पुरस्कार केलेला आढळतो. जें यज्ञयागाचें तेंच चातुर्वर्ण्याचें व तज्जन्य विषमतेचें. प्राचीन काळी वैदिक धर्मांत चातुर्वर्ण्य होतें तें गुणकर्मसिद्ध होतें. गीतेंत व उपनिषदांत त्याचेंच प्रतिपादन आहे. आणि पुढे चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध ठरूं लागलें, तरी इसवी सनाच्या दहाव्या शतकांपर्यंत हिंदूंमध्ये अनुलोम विवाह व कांही प्रमाणांत प्रतिलोमहि चालू होते. पं. सातवळेकर, डॉ. काणे, चिंतामणराव वैद्य, कै. डॉ. मनशी यांनी हें निर्विवाद सिद्ध केलें आहे.
 आता याहून निराळें असें कांही, जास्त पुरोगामी, समतेला जास्त पोषक असें जैन व बौद्ध पंथांनी सांगितलें व घडविलें आहे काय, असा प्रश्न आहे. तसें त्यांनी कांही केलें असल्याचा कसलाहि पुरावा आज उपलब्ध नाही. बौद्ध पंथाविषयी वोलावयाचें तर सगळा पुरावा उलटच आहे. 'बुद्धकालीन भारतीय समाज' हा रिचर्ड फिक् यांचा ग्रंथ पाहा. (मराठी भाषांतर- कालेलकर) त्यांनी म्हटलें आहे की "बौद्ध धर्माने जातिभेदाचा नाश तर केलाच नाही, पण जातिभेदाच्या प्रसृत होणाऱ्या तत्त्वांना आळा घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही" (पृ. २७६). जातकांतील शेकडो वचनें देऊन फिक् यांनी हें दाखवून दिले आहे की, "बौद्ध धर्माने क्षत्रियांना ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ ठरविण्यापलीकडे कांही केलेलें नाही. भिक्षु वर्गाच्या हृदयांतली जातिभेदाची भावना सदैव जागृत होती. (पृष्ठ ६).
 प्रा. धर्मानंद कोसांबी हे गौतमबुद्ध, बौद्ध धर्म व पाली साहित्य यांचे फार मोठे उपासक व पंडित होते. 'भगवान् बुद्ध' या आपल्या ग्रंथांत, बौद्ध श्रमणांना जातिभेद मोडतां आला नाही, असें त्यांनी स्पष्ट म्हटलें आहे. ते म्हणतात, "बुद्धाला व त्याच्या शिष्यांना जातिभेद पसंत नव्हता, तो मोडून टाकण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली. परंतु हें कृत्य त्यांच्या आवाक्याबाहेरचें होतें. ब्राह्मणांनी त्याची लागवड करून ठेविली होती. तो उपटून टाकणें कोणत्याहि श्रमण संघाला शक्य झालें नाही (पृष्ठ २३६). जास्तीत जास्त त्यांना काय साधलें? श्रमण संघांत किंवा बौद्ध संघांत जातिभेद पाळला जात नसेल एवढेच. बौद्ध पंथ स्वीकारलेल्या समाजामध्ये जातिभेद होताच. नव्हे त्याला बौद्धश्रेष्ठांची मान्यता होती. "विवाहाच्या वेळीं जातीचा विचार करणें योग्य आहे, धार्मिक बाबतींत मात्र जातीचा विचार करण्याचें कारण नाही" अशा अर्थाचें वचनच प्रा. कोसांबी यांनी दिलें आहे (पृष्ठ २३८).

अस्पृश्यांची परिस्थिति

 अस्पृश्यतेच्या बाबतींत हेंच घडलें. कोसांबी म्हणतात, "ग्रीक, शक, हुण यांनी बौद्ध व जैन होऊन हिंदु समाजांत प्रवेश केला. पण अस्पृश्यांची परिस्थिति सुधारली नाही. जैन व बौद्ध श्रमणांनी त्यांची हेळसांड केली व त्यामुळे उत्तरोत्तर अस्पृश्यां- विषयी तिटकारा वाढत गेला व नाहक त्यांचा छळ होऊं लागला" (पृष्ठ २४१) रिचर्ड फिक् यांच्या 'बुद्धकालीन भारतीय समाज' या ग्रंथाचा उल्लेख वर केला आहे. उत्तर प्रदेशांतील एक विद्वान् गृहस्थ पंडित मोहनलाल महतो वियोगी यांनी 'जातककालीन भारतीय संस्कृति' या आपल्या ग्रंथांत रिचर्ड फिक् यांच्याच मताला पुष्टी दिली आहे.
 जैन पंथाने सुद्धा ब्राह्मणांपासून शूद्र-चांडाळांपर्यंत सर्वांनी आपसांत विवाह करावे असें सांगितलें असल्याचें सिद्ध झालेले नाही. तेवढे सोडून समता, गुणकर्मावरून योग्यता इत्यादि सर्व विचार वैदिक धर्मीय ग्रंथांत शेकडो वेळा सांगितलेले आढळतात. पण हा मुद्दा वादग्रस्त म्हणून सोडून दिला, तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, इ. स. दहाव्या शतकाच्या सुमारास हिंदु धर्माला अवकळा येऊ लागली त्या वेळी या पंथांनी समाजाला सावरण्याचा कसलाहि प्रयत्न केलेला आढळत नाही. बौद्ध धर्म तर या काळापर्यंत भारतांतून नाहीसाच झाला होता. पण जैन धर्म चालू होता. पण इ. स. च्या पहिल्या शतकापासून त्यांच्यांतच अनंत पंथोपपंथ व जातिभेद निर्माण व्हावयास प्रारंभ झाला होता.
 हिंदु धर्मांत या वेळी शब्दप्रामाण्य प्रस्थापित झालें. शास्त्रांचें संशोधन थांबलें, विद्यापीठें जड ज्ञानाची उपासक झाली. प्रवृत्तिधर्माचा ऱ्हास होऊन ऐहिकाची उपेक्षा सुरू झाली. निवृत्तिवाद, संन्यासवाद बळावला. जाति-पोटजातींचा प्रादुर्भाव झाला. उच्चनीच भाव फार तीव्र झाला. कलियुग कल्पना रूढावली, जात बाटण्याच्या भयाने परदेशगमन थांबलें आणि धर्मांतील जड कर्मकांडाला फार महत्त्व आलें. दुर्दैव असें की, हे सगळे दोष जसेच्या तसे, किंबहुना कांही अधिकच प्रमाणांत जैन पंथांत त्या वेळीं होते. प्रारंभीच्या काळांतल्या त्यांच्यांतील पुरोगामी क्रांतिप्रवृत्ति संपूर्ण नष्ट होऊन हिंदुधर्माप्रमाणेच त्यांच्यांतील इहवादी तत्त्वांचा शून्याकार झाला होता.
 त्यानंतर आजच्या जैन समाजाचें स्वरूप पाहिलें पाहिजे. इंग्रजांचें राज्य येथे प्रस्थापित झाल्यानंतर भारतांत पाश्चात्त्य विद्या आली. आणि येथे प्रबोधनयुगाला प्रारंभ झाला. त्याचे संस्कार कमीअधिक प्रमाणांत सर्वच समाजावर झाले तसे जैनांवरहि झाले. त्यामुळे हिंदूप्रमाणेच जैनहि हळूहळू इहवादाच्या कांही तत्त्वांचा अवलंब करूं लागले व त्यामानाने त्यांचें पाऊलहि प्रगतिपथावर पडूं लागलें. त्या इहवादाच्या दृष्टीने आजच्या जैन समाजाचा अभ्यास करतां असें दिसतें की, हिंदु समाज जितका व ज्या प्रमाणांत प्रगत किंवा अप्रगत आहे तितकाच जैनसमाजहि प्रगत किंवा अप्रगत आहे.

प्रा. संगवे यांचें प्रतिपादन

 प्रा. विलास आदिनाथ संगवे यांनी 'जैन कम्युनिटी: ए सोशल सर्व्हे' असा ग्रंथ लिहिला आहे. यावरून आजच्या जैन समाजाचें रूप पुढीलप्रमाणे दिसतें. जैन धर्मांत ऐक्यभावना अशी नाहीच. उलट अत्यंत क्षुद्र मतभेदांना महत्त्व देऊन समाजाचीं शकलें करण्याची प्रवृत्ति दिवसेदिवस वाढतच आहे. दोन हजार वर्षांत हे भेद नष्ट करून जैनसमाज संघटित करील असा एकहि पुरुष या समाजांत झाला नाही. श्वेतांवर व दिगंबर असे जैनांचे प्रमुख भेद आहेत व वस्त्रे नेसावीं की नग्न राहावें, स्त्री मोक्षाधिकारी आहे की नाही, एवढेच त्यांच्यांत वादविषय आहेत. या दोन उपपंथांत पुन्हा अनेक भेद असून अंगावरच्या माशा निवारण्यास झटकणें वापरावयाचें तें मोरपिसांचें असावें की गाईच्या शेपटीच्या केसांचें असावें, की कांहीच घेऊ नये, असल्या क्षुद्र कारणांवरून ते भेद निर्माण झालेले आहेत. पण त्या लोकांच्या मतें त्यांना महत्त्व इतकें आहे की, दुसरे दोन पंथ जैन नव्हेतच असें प्रत्येक पंथ म्हणतो.
 जातिभेदाच्या दृष्टीनेहि हिंदूंपेक्षा जैनांची स्थिति निराळी नाही. दिगंबर पंथांत ८७ जाति-उपजाति असून, श्वेतांबरांत ३८ जाति आहेत. यांतील कांही जातींची लोकसंख्या शंभराच्या आंतच असल्यामुळे त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्यांच्यांत बेटीबंदी रूढ आहे. जातिजातींत उच्चनीच भाव हिंदूंप्रमाणे जारी असून बेटीबंदीप्रमाणेच रोटीबंदीहि या जातींत जारी आहे. एका जातीच्या जेवणावळीला दुसऱ्या जातीला निमंत्रणहि नसतें. जैनांमध्ये क्षत्रियांना ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ मानतात. आणि या उच्चनीच भावनेमुळे व्यवसायबंदीहि या पंथांत रूढ झाली आहे. कोणत्याहि जातीने कोणताहि धंदा करावा हें चालणार नाही. सारांश असा की, जातिभेद हा जैनसमाजांत दृढमूल असून अखिल भारतांतील या समाजाच्या त्यामुळे अगदी हवाबंद चिरफळ्या झालेल्या आहेत.
 स्त्री-जीवनाच्या दृष्टीने विचार करतां जैन समाज अजूनहि बराच मागासलेला आहे. बालविवाह बराच रूढ असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा प्रसार व्हावा तसा झालेला नाही. आणि मुख्य म्हणजे विधवांचें प्रमाण जैन समाजांत फार मोठें आहे. कांही जातींत विधवा-विवाह मान्य आहे. पण असा विवाह मान्य नसलेल्या जाति या जातींना हीन लेखतात. त्यामुळे जाति- जातींतला दुरावा आणखी वाढतो. बाल-विवाह आणि विधवाविवाह निषेध यांमुळे जैन समाजाची लोकसंख्या घटत आहे, याची चिंता त्या समाजाच्या धुरीणांना वाटत आहे.
 हें सर्व पाहतां असें दिसतें की, अंधश्रद्धा, शब्दप्रामाण्य, रूढीचें प्राबल्य, कर्मकांड, जातीयता, भेदप्रवृत्ति हीं इहवादाला अत्यंत मारक असलेलीं जीं तत्त्वें त्यांचें वर्चस्व जैनांवर हिंदूंच्या इतकेंच आहे. लेखक डॉ. संगवे यांनी गेली दोन हजार वर्षे जैन समाजाचें जें अधोगमन चालू आहे त्याला कारण भोवतालच्या हिंदु समाजाचें प्रबळ वर्चस्व हे होय असें म्हटलें आहे. याचा अर्थ असा की, जैन- धुरीण कसलीहि क्रांति करूं शकलेले नाहीत.

शिखांची भूमिका

 शिखांच्या इतिहासाची रूपरेखा अशीच आहे. प्रारंभीच्या काळांत गुरु नानक यांच्यापासून गुरु गोविंदसिंगांपर्यंत बहुतेक सर्व गुरूंनी इहवादाचीं बहुतेक सर्व तत्त्वें उपदेशिलीं व आचरलीं होतीं. गुरु नानक अखेरपर्यंत स्वतःला हिंदूच म्हणवीत; पण त्यांनी वेदप्रामाण्य मानले नाही व आपल्या बुद्धीने स्वतंत्र धर्म-तत्त्वांचा उपदेश केला. एकत्र रसोई निर्माण करून त्यांच्या लंगरांत सर्व जातींच्या व धर्मांच्या अनुयायांना एकत्र खानपान घडविलें. निवृत्तिवादाचा कडक शब्दांत निषेध केला व कर्मकांडाचें प्राधान्य नष्ट केलें. स्वत: परदेशगमन करून ती पांचशे वर्षांची हिंदूंच्या पायांतील शृंखला तोडून टाकली. गुरु गोविंदसिंग यांनी जातपात, शिखासूत्र, उच्चनीचता पाळणारा जो धर्म तो धर्मच नव्हे असें सांगितलें. आपापल्या मताप्रमाणे प्रत्येक शीख गुरु धर्मांत सुधारणा करीत गेले, यावरून धर्माची परिवर्तनीयता त्यांना मान्य होती हे उघडच आहे.
 अशा इहवादी तत्त्वांच्या अवलंबनामुळेच शीख समाज संघटित झाला व मोठे पराक्रम करूं शकला. पण हें पुढे टिकलें नाही. जैनांप्रमाणेच या एका पंथाच्या अंतरांत अनेक भेद निर्माण झाले. ग्रंथसाहेब वेदांच्या ठायीं येऊन बुद्धिप्रामाण्य नष्ट झालें. परदेश-गमनबंदी म्हणजे सिंधु-बंदी ही शृंखला पुन्हा स्वहस्तानेच शिखांनी आपल्या पायांत टोकून घेतली आणि जातीय व पंथीय भेदांमुळे शीख समाज भग्न होऊन गेला. महाराज रणजितसिंग यांनी शिखांची एकजूट करून तीस वर्षांत पंजाब स्वतंत्र केला. पण त्यांच्या काळी भारतांत पाश्चात्त्य विद्या प्रविष्ट झाली असूनहि शीख पंडितांनी तिचा प्रसार पंजाबांत केला नाही. त्यामुळे रणजितसिंगानंतर सर्व प्रकारचे भेद चेकाळून शीख पराभूत झाले.
 अर्वाचीन काळांत हिंदूंप्रमाणेच शिखांवरहि पाश्चात्त्य विद्येचे संस्कार होऊन लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, विज्ञानदृष्टि या तत्त्वांचा त्यांनी अवलंब केला. स्वातंत्र्य- लढ्यांत प्रथम गदर पक्ष स्थापून आणि नंतर क्रांतिकारकांत सामील होऊन शीखांनी जें आत्मबलिदान केलें त्याला तर तोडच नाही. त्यांची लोकसंख्या भारतांत एक टक्का आहे. पण वधस्तंभावर चढलेल्यांत शीख क्रांतिकारकांचें प्रमाण पन्नास टक्के आहे असें सतीन्द्रसिंग यांनी म्हटलें आहे. (इलस्ट्रेटेड वीकली, २३।११।६९.) पण असें असूनहि शीख थोर संघटनाकुशल असा राजकीय नेता निर्माण करू शकत नाहीत. कारण शीखसमाज अजूनहि पुराणमतवादी अंधश्रद्धा जथेदारांच्या व 'मास्टरां'च्या अधीन आहे.
 शिरोमणि गुरुद्वारप्रबंधक समिति ही या जथेदारांच्या व मास्टरांच्याच ताब्यांत असून त्यांचें उत्पन्न कोट्यवधि रुपये आहे. यामुळे शीखसमाज अंध व पुराणवादी राहणें त्यांच्या हिताचें आहे. 'इलस्ट्रेटेड वीकली'च्या त्याच अंकांत श्रीमती इंदिरा रंधवा यांनी 'शीखांतील जातिसंस्था' या आपल्या लेखांत शीखांत जैनांप्रमाणेच तीव्र जातिभेद असल्याचें सांगून त्या जातिसंस्थेचें वर्णनहि केलें आहे. त्या म्हणतात, "सर्व गुरूंचा जातिभेदाला विरोध असूनही एकाहि गुरूने आपल्या जातीबाहेर लग्न केलें नाही. ते सर्वं क्षत्रिय होते. त्यांनी सर्वांनी क्षत्रिय स्त्रियाच केल्या. शीखांत जाट- शीख, हिंदु-शीख व अस्पृश्य हे भेद कायमच आहेत. जाट हे शीखेतर जाटांशी लग्न करतील, पण शीख जाटेतरांशी करणार नाहीत. मझावी हे शीखांतील अस्पृश्य असून त्यांच्यांतहि चांभार, चुव्रा, इ. जाति आहेत. हे मझावी मोठे पराक्रमी आहेत, पण त्यांची अस्पृश्यता जात नाही. कित्येक खेड्यांत त्यांचीं गुरुद्वारें व विहिरी निराळ्या आहेत. आणि शहरांत गुरुद्वारें एक असली तरी त्यांच्या हातचा प्रसाद कोणी घेणार नाही. शीखांत जातिभेद तसेच राहण्याचें कारण म्हणजे हिंदु परंपरेचें वर्चस्व होय."
 वर निर्देशिलेले लेखक डॉ. प्रा. संगवे यांनीहि तसेंच म्हटलें आहे. शीख, बौद्ध, जैन हे सर्वच आपण जातिभेद निर्मूलन करूं शकलो नाही, याचें अपश्रेय हिंदु परंपरेच्या वर्चस्वालाच देतात. पण यावरून त्यांना हिंदु समाजामध्ये कसलीहि क्रांति करतां आली नाही हेंच उघड होते. तेव्हा फुटून निघालेल्या शीखसमाजालाहि इहवादाच्या दृष्टीने निराळें असें स्थान नाही.

जातिभेद कायमच

 बौद्ध धर्माने प्राचीन काळी काय कार्य केलें तें वर सांगितलेंच आहे. इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत भारतांतून बौद्ध धर्म समूळ नाहीसा झाला. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने भारतांतील अनेक अस्पृष्य जातींनी- प्रामुख्याने महार जमातीने बौद्धधर्माचा स्वीकार केला आहे. आणि अजूनहि तसें धर्मांतर होत असल्याच्या वार्ता अधूनमधून येतात. या घटनेला चौदा-पंधरा वर्षेच झालीं असल्याने नवबौद्धांनी काय साधलें हे सांगण्याची वेळ अजून आलेली नाही. पण अजूनहि त्यांची अस्पृश्यता नष्ट झालेली नाही आणि जातिभेद मुळीच कमी झालेले नाहीत एवढें खरें. आंतरजातीय विवाहावांचून सुधारणा होणार नाही असें डॉ. आंबेडकर म्हणत असत. पण महार, मांग, चांभार यांच्यांत तसे विवाह अजूनहि घडत नाहीत. इतकेंच काय, पण त्यांच्या पोटजातींतहि होत नाहीत.
 या सगळ्याचा भावार्थ असा की, बौद्ध, जैन व शीख हे हिंदु समाजापासून फुटून निघून त्यांनी आपले स्वतंत्र पंथ स्थापिले असले, तरी इहवादाच्या दृष्टीने ते हिंदूंपेक्षा जास्त प्रगत झालेले नाहीत. मात्र हेंहि तितकेंच खरें की, हिंदु समाजाच्या धुरीणांप्रमाणे त्या पंथाचे धुरीणहि स्वसमाजावर पाश्चात्त्य विद्येचे संस्कार करून इहवादाचीं तत्त्वें तेथे दृढमूल करण्याचा यावत्-शक्य सर्व प्रयत्न करीत आहेत. कारण पंथभेद असला तरी त्यांना भारताच्या उत्कर्षाची हिंदूइतकीच चिंता आहे.
 यशाच्या दृष्टीने पाहिलें तर असें वाटतें की, हिंदु समाजाला तरी इहवादाचे संस्कार व्यापक प्रमाणावर दृढमूल करून टाकण्यांत मोठें स्पृहणीय यश कोठे आलेलें आहे? गेल्या शंभर-दीडशे वर्षांत प्रगति बरीच झालेली असली, तरी अजून अंतिम उद्दिष्ट फार दूर आहे. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, ग्रंथप्रामाण्य, परिवर्तनविरोध यांचा प्रभाव अजून इतका आहे की, हे सर्व दोष समूळ नष्ट होऊन हिंदु समाज पूर्ण एकसंध व संघटित होण्याविषयी केव्हा केव्हा निराशा वाटू लागते. तीच स्थिति या पंथांची आहे. पण अंतिम उद्दिष्ट तें आहे व त्या मार्गाने जाऊन समता, स्वातंत्र्य, विज्ञानवृत्ति, बुद्धिप्रामाण्य यांचे संस्कार करून लोकशाही व राष्ट्रनिष्ठा यांचीं मूलतत्त्वें स्वसमाजांत रुजवावयाचीं याविषयी त्यांच्यांत दुमत नाही. म्हणून पंथभेद कायम राखावयाचा असला, तरी त्यावर भर न देतां ऐक्यवृत्तीवर भर देऊन सर्वांनी संघटित व्हावयाचें ठरविलें तर प्रगतीचा मार्ग बराच सुगम होईल.


 बौद्ध, जैन व शीख यांचा इहवादाच्या दृष्टीने विचार झाला. आता याच दृष्टीने पारशी पंथाचा विचार करावयाचा आहे. झरतुष्ट्री पंथ असें या पंथाचें मूळ नांव आहे. त्याचा मूळ प्रणेता जो झरतुष्ट्र त्याच्यावरून हें नांव पडलेलें आहे. या पंथाच्या अनुयायांचें 'पारशी' असें नांव भारतांत रूढ झालेले आहे.
 हा पंथ हिंदु धर्मांतला पंथ नाही. जैन बौद्धांप्रमाणे या पंथाचे लोक आपल्याला केव्हाहि हिंदु म्हणवीत नव्हते. ते मूळचे हिंदुस्थानांतलेहि नाहीत. इसवी सनाच्या सातव्या शतकांत इराण या त्यांच्या मायभूमीवर मक्केला नवीनच प्रस्थापित झालेल्या इस्लामाचें आक्रमण झालें. आक्रमकांनी इराणी जनतेला सक्तीने बाटविण्यास प्रारंभ केला. तेव्हा ज्यांना हा धर्मच्छळ असह्य झाला असे कांही सात-आठशे लोक तेथून निसटून भारतांत आश्रयास आले व तेव्हापासून ते येथेच आहेत.
 असे असूनहि पारशी जमातीचा या विभागांत समावेश करण्याचें कारण असें की, पारशी लोक पूर्णपणे भारतनिष्ठ आहेत. इराण या त्यांच्या मूळ भूमीशीं त्यांचा आज कसलाहि संबंध नाही. शिवाय मूळचे इराणी म्हणजे आर्यांचीच एक शाखा होती व त्यामुळे आपणहि आर्य आहों, असा पारशी लोक आजहि अभिमान बाळगतात. सायरस, दरायस, झर्सीस यांचा वारसाहि त्यांना भूषणावह वाटतो. ते अग्निपूजक आहेत हें तर त्यांच्या आर्यत्वाचें निश्चित लक्षण आहे. सातव्या शतकांत पारशी लोक येथे आले तेव्हा दीव, दमण, संजाना या गुजरातेंतील बंदरांत ते उतरले व जयदेव या राजाने त्यांना आश्रय दिला. त्या वेळी त्यांनी गुजराती ही भाषा स्वीकारली व आज तीच त्यांची मातृभाषा आहे. त्यांनी हिंदूंच्या चालीरीति स्वीकारल्या आणि दुधामध्ये साखर जशी मिसळून जाते तसे आम्ही हिंदु समाजांत मिसळून जाऊं, असें राजा जयदेव याला आश्वासनहि दिलें. त्याप्रमाणे पारशी समाज रक्ताने जरी हिंदुसमाजांत मिसळून गेला नाही, तरी या समाजाच्या हिताहिताशीं तो एकरूप होऊन गेला असून, भारताच्या हितसंबंधाशी सर्वस्वीं एकजीव होऊन गेला आहे. तेव्हा जैन, बौद्ध, शीख यांची भारतनिष्ठा हिंदूंप्रमाणेच अव्वल व विशुद्ध आहे असें जें वर म्हटलें आहे तेच सर्वार्थाने पारशी समाजाच्या बाबतींतहि खरें आहे आणि म्हणूनच ते वाच्यार्थाने हिंदु नसले, तरी त्यांचा विचार याच विभागांत करणें सयुक्तिक वाटतें. मात्र जैन-बौद्धांचा जसा फक्त इहवादाच्या दृष्टीनेच विचार केला तसा पारशी समाजाचाहि विचार केवळ त्याच दृष्टीने करावयाचा आहे. इहवादाच्या दृष्टीने त्यांचें भारताला देणें काय आहे तेंच फक्त येथे पाहवयाचें
 झरतुष्ट्री धर्माची स्थापना झाली तेव्हापासूनच परधर्मसहिष्णुतेचें तत्त्व त्याने मान्य केलेलें आहे. हद्दपार होऊन वणवण भटकणाऱ्या, वनवासी झालेल्या ज्यू लोकांना सायरस या प्राचीन सम्राटाने उदार आश्रय दिला, असा बायबलच्या जुन्या करारामध्ये त्याचा गौरव केलेला आहे. सातव्या शतकांत पारशी लोक येथे आले तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी हिंदूचें धर्मांतर करण्याचा कधीहि प्रयत्न केला नाही. तेव्हा ते अगदी अल्पसंख्य होते हें खरें पण प्रारंभी आलेले ख्रिश्चनहि तसेच होते. पण जग ख्रिश्चन करून सोडावे अशी ख्रिश्चनांची धर्माज्ञाच आहे. तशी झरतुष्ट्री धर्माची नाही. निदान पारशी तशी मानीत नाहीत, एवढे खरें. आज ख्रिश्चनांप्रमाणेच पारशीहि लोकसेवा, परोपकार, दानशौर्य यांत अग्रगण्य आहेत. इस्पितळें पंगुगृहें, शाळा, प्रशाळा, कलाविद्यालयें यांना त्यांनी लाखांनी कोटींनी दानें दिलीं आहेत. अजूनहि ते देतात. पण याच्या मागे या संस्थांतून आश्रयाला किंवा विद्येसाठी आलेल्यांचें धर्मांतर करावें, त्यांना बाटवून पारशी करावें, असा अंतःस्थ हेतु धनिक पारशी दात्यांनी कधीहि बाळगलेला नाही. ख्रिस्ती समाजाने तो हेतु जाहीरपणें सांगितलेला आहे. लोकसेवा गौण होय, धर्मांतर हेंच अंतिम उद्दिष्ट होय, असें ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जाहीर केल्याचें मागे सांगितलेंच आहे. पारसी धनिक दात्यांच्याविषयी अशी कधी कोणाला शंकाहि आलेली नाही. त्यांनी दानें दिलीं तीं मानवतेच्या बुद्धीने व राष्ट्रीय भावनेने दिलीं हें निर्विवाद आहे. आणि ही त्यांची आजचीच वृत्ति आहे असें नसून, प्रारंभापासूनचीच आहे. अकराव्या-बाराव्या शतकामध्ये त्यांनी असाच दानधर्म केल्याची नोंद त्यांच्या इतिहासांत सापडते.
 प्रारंभीं पारशी शेतकरी होते, पण पुढे हळू हळू ते व्यापारी झाले आणि त्यासाठी अवश्य तें परदेशगमनहि ते करूं लागले. जैन, शीख हे व्यापारी झाले. पण परदेशगमन त्यांनी केलें नाही. वैदिक धर्मापासून ते वेगळे झाले, पण सप्तशृंखला तोडण्याची त्यांना हिंमत झाली नाही. आणि यासाठी हिंदु धर्माच्या वर्चस्वाला ते आज दोष देतात. पण पारशी या वर्चस्वाखाली सापडले नाहीत असें दिसतें. रुस्तुमशेठ माणेकशेठ यांचा मुलगा १७२३ सालींच इंग्लंडला गेला होता. लोवजी नसरवानजी वाडिया (१७००-१७७४) यांनी सिंगापूरला जहाज बांधणीचा कारखाना काढला होता. वाडियांच्या अनेक पुत्रपौत्रांनी मुंबईला गोद्या बांधून जहाजे बांधण्याचा धंदा पुढे चालविला आणि त्यांनी इंग्लिश आरमारालाहि जहाजें पुरविलीं. नेल्सन हा याच जहाजांतून लढाया लढला असें सांगतात. इंग्लिश आरमारी मंत्रालयाने वाडियांचा यासाठी मुक्तकंठाने गौरव केलेला आहे. पारशी जसे आरमारासाठी जहाजे बांधीत तसेच व्यापारी जहाजेंहि बांधीत. आणि त्या स्वतःच्या जहाजांतून चीन देशाशींहि व्यापार करीत. याचा अर्थ असा की, हिंदु समाजाच्या अफाट विस्तारांत राहूनहि पारशी कूपमंडूक झाले नाहीत. १६६८ साली पोर्तुगालने मुंबई बंदर इंग्रजांना दिलें. तेव्हापासून पारशी लोक बहुसंख्येने मुंबईत राहूं लागले. त्यामुळे त्यांना इंग्रजांशीं व पाश्चात्त्य जगाशीं चांगला संबंध ठेवतां आला व पाश्चात्त्य विद्येचे संस्कारहि त्यांच्यावर होऊं लागले. या संधीचा फायदा घेऊन अनेक पारशी इंग्लिश, फ्रेंच या भाषा शिकले व त्या मार्गाने त्यांनी पाश्चात्त्य विद्याहि स्वीकारली. याचाच सुपरिणाम होऊन पारशांमध्ये अनेक कर्तृत्वशाली स्त्री-पुरुष निर्माण झाले.
 १९ व्या शतकांत मुंबईची जी वाढ झाली तिचें बरेंचसें श्रेय पारशी समाजाला आहे. १९२५ साली ज्ञानकोशकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे साक्षरतेचें व इंग्रजी भाषा जाणणाऱ्यांचें प्रमाण पारशांत सर्वांत जास्त होतें. स्त्रीशिक्षणाचा प्रसारहि त्याच जमातींत जास्त होता. बी. ए., एम. ए., एम. डी. झालेल्या अनेक स्त्रिया पारशांत तेव्हा होत्या. एकंदर पारशी समाजांत डॉक्टर, वकील, इंजिनियर, सरकारी अधिकारी, व्यापारी, कारखानदार, शास्त्रज्ञ यांचें प्रमाण मोठें आहे. भारतांत आज एकंदर १ लक्ष २५,००० एवढीच पारशांची संख्या आहे. या लोकसंख्येच्या मानाने त्यांच्यांतील कर्तृत्व किती मोठें आहे पाहा. दादाभाई नौरोजी, जमशेदजी जिजीभाई, जमशेदजी टाटा, दोराब, रतन, जे. डी. आर. टाटा, फेरोजशहा मेथा, मॅडम कामा, खुशीद फ्रामजी नरीमन, डॉ. होमी जहांगीर भाबा, झुबीन मेहेता, जनरल माणेकशा, फरुक इंजिनियर, हीं अगदी वरच्या पातळीवरच्या कर्त्या स्त्री-पुरुषांचीं नांवें आहेत.
 पारशी जमातीमधल्या वर निर्देशिलेल्या श्रेष्ठ स्त्री-पुरुषांपैकी दोघातिघांची चरित्रे तपशिलाने पाहतां, त्या समाजाची इहवादी वृत्ति स्पष्टपणे दिसून येईल. दादाभाई नौरोजी हे प्रथमपासूनच जाती-जमातीय संकुचित वृत्तीपासून मुक्त होते. मंबईला त्यांनी 'स्टुडंटस् लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी'ची स्थापना केली ती सर्व समाजासाठी. केवळ पारशांसाठी नव्हे. म्हणूनच त्याच वेळी मराठी व गुजराती 'ज्ञान प्रसारक मंडळी' या नांवाच्या तिच्या दोन शाखा त्यांनी स्थापन केल्या. त्यांनी मुलींच्या शाळा काढल्या त्या पारशी व मराठी मुलींसाठी. ते इंग्लंडला १८५५ सालीं प्रथम गेले ते कामा घराण्याच्या व्यापारी कंपनीचे भागीदार म्हणून. पण तेथे हिंदी जनतेच्या दुरवस्थेची कहाणी इंग्लिश जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी व्याख्यानें दिलीं व संस्थाहि स्थापन केल्या. इंग्रजी राज्यांत हिंदुस्थान दरिद्री होत चालला आहे; आणि इंग्रज लोक रयतेची लूट करीत आहेत हा टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीचा जो आधारभूत सिद्धान्त तो १८७३ साली 'हिंदुस्थानचें दारिद्र्य' या आपल्या ग्रंथांत प्रथम दादाभाईंनी मांडला. 'स्वराज्यमंत्राचे द्रष्टे', 'आधुनिक भारताचे पितामह' असा दादाभाईंचा गौरव केला जातो तो किती यथार्थ आहे तें यावरून दिसून येईल. आपल्या निःस्वार्थी, सेवामय जीवनाने त्यांनी भारतापुढे एक आदर्शच निर्माण करून ठेवला आहे. जातीयता, अंधश्रद्धा, पूर्वग्रह यांतून ते मुक्त नसते, तर त्यांच्या हातून भारताची ही सेवा घडलीच नव्हती.
 स्वराज्याचा मंत्र प्रथम जसा दादाभाईंनी दिला तसा भारताचा 'वंदे मातरम्' अक्षरांकित तिरंगी राष्ट्रीय ध्वज प्रथम मादाम कामा यांनी उभारला व भारतापुढे दुसरा आदर्श निर्माण करून ठेवला. कामाबाईंचा जन्म १८६१ सालीं झाला. तरुणपणींच त्यांनी राष्ट्रसेवेचें व्रत घेतलें होतें. लग्न झाल्यावर त्यांच्या पतींचा याला विरोध होऊ लागला, पण माझें माझ्या देशकार्याशी आधीच लग्न झालें आहे, असें त्या म्हणत. त्या वेळी त्यांनी स्त्रियांसाठी संस्था स्थापन केल्या त्या हिंदी स्त्रियांसाठी. केवळ पारशी स्त्रियांसाठी नव्हे. त्यांच्या राष्ट्रीय कार्यामुळे त्यांना इंग्रज सरकारने हद्दपार केलें. तेव्हा त्या इंग्लंडला गेल्या. तेथे शामजी कृष्ण वर्मा, वीर सावरकर यांचा सहवास त्यांना लाभला व शामजींप्रमाणें त्याहि भारताच्या दुःस्थितीविषयी हाइडपार्कमध्ये व्याख्याने देऊ लागल्या. त्यामुळे त्यांना इंग्लंड देश सोडावा लागला. मग त्या पॅरिसला जाऊन राहिल्या. तेथे त्या पस्तीस वर्षे होत्या. त्या मुदतींत त्यांचें घर म्हणजे क्रांतिकारकांचें आश्रयस्थान होतें. 'वंदे मातरम्' हें साप्ताहिक त्यांनी लंडनला सुरू केलें होतें. तें पुढे त्या जिनीव्हाहून चालवीत. त्यांत लाला हरदयाळ, वीरेंद्र चट्टोपाध्याय यांचे लेख येत असत. याच काळात १९०७ साली जर्मनीमध्ये जी सोशॅलिस्टांची परिषद् भरली होती तेथे त्यांनी भारताचा ध्वज फडकविला. आणि हें आमच्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचें निशाण आहे, असें जाहीरपणे सांगितलें.
 इहवाद, पुरोगामी वृत्ति, भारतीय दृष्टि, जातीयतेपासून मुक्तता या दृष्टीने पाहतां सर फेरोजशहा मेथा हे भारताचे असेच आदर्श नागरिक ठरतात. त्यांचे चरित्रकार सर होमी मोदी यांनी "फेरोजशहा प्रथम भारतीय होते व नंतर पारशी होते, आणि असें पुनः पुन्हा जाहीर करण्यांत त्यांना भूषण वाटे," असें आवर्जून अनेक वेळा सांगितले आहे. १८६४ साली फेरोजशहा इंग्लंडला गेले. त्या सालीं रुस्तुमजी जमशेटजी जीजीभाई यांनी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी जाऊं इच्छिणाऱ्या हिंदी विद्यार्थ्यांसाठी दीड लाखाची रक्कम देऊ केली होती. हिंदु, मुस्लिम, पारशी सर्व जमातींना ती उपलब्ध होती. त्या निधीतून पैसे घेऊन फेरोजशहा विलायतेला गेले. तेथे दादाभाईनी अखिल हिंदी जनतेच्या उत्कर्षासाठी स्थापिलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचे ते सभासद झाले. पारशी जमातीचे एक पंचायत बोर्ड आहे. त्यामार्फत त्यांच्या धर्मादाय निधीची व्यवस्था होत असते. इंग्लंडहून परत आल्यावर त्या निधीच्या विश्वस्ताच्या जागेसाठी फेरोजशहा उभे राहिले. पण जीर्णवादी, अंध, प्रतिगामी वृत्तीच्या लोकांनी त्यांना जबर विरोध केल्यामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पारशी समाज हा प्रगतिशील आहे. पण सर होमी म्हणतात की, "तो कधी कधी कमालीचा अंध होतो व मग जीर्ण, दुष्ट रूढींचा पुरस्कार करतो." तसेच या वेळीं घडलें. फ़ेरोजशहा आपल्या भाषणांत नेहमी म्हणत की, जो पारशी आपल्या जन्मभूमीशीं एकनिष्ठ आहे, जो या भूमीच्या सर्व कन्यापुत्रांशी बंधुभाव मानतो व या भूमींतल्या सर्व जाति जमातींच्या लोकांशीं पूर्ण सहकार करून सर्वांच्या सामुदायिक, सार्वजनिक उद्दिष्टांसाठी जो झगडतो तोच खरा सच्चा पारशी होय. पारशांचें सुखदुःख अखिल भारतीय राष्ट्राच्या सुखदुःखाशी निगडित आहे, हें त्यांनी विसरूं नये, असे ते स्वसमाजाला वारंवार बजावीत. फेरोजशहांनी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई विद्यापीठ, काँग्रेस अशा सर्व सार्वजनिक संस्थांत काम केलें तें याच व्यापक दृष्टीने.
 पारशी समाज इहवादाच्या दृष्टीने कसा पुरोगामी आहे तें यावरून दिसून येईल. त्या समाजांत प्रतिगामी वृत्तीचे लोक नाहीत असें नाही. मध्यंतरी एकदा पंचांगाच्या वादावरून त्या जमातींत तीन फळया पडल्या होत्या व अगदी बेटीबंद जाति झाल्या होत्या. पण लवकरच हे भेद विवेकी लोकांनी मोडून काढले. त्यांच्यांतहि पडदा व बालविवाह या रूढि पडल्या होत्या. पण १८५१ साली सुधारक तरुण पक्षाने 'रहनुमाई मझ्दयस्नन' नांवाची एक सभा स्थापून या रूढि बंद करून टाकण्यांत यश मिळविलें. त्यांच्या स्मशानभूमींतील गिधाडांच्या भक्ष्यस्थानीं प्रेतें देण्याच्या चालीवरून सध्या जुन्यानव्या पक्षांत कांही वाद चालू आहे. पण तुलनेने पाहतां या गोष्टी गौण आहेत. इहवादी वृत्तीचा एक प्रधान निकष मागे एक-दोनदा सांगितला आहे. ही वृत्ति मानवी कर्तृत्वाची जोपासना करते. हिच्या अभावीं समाजाचें कर्तृत्व खुरटतें व पुढे त्याचा लोप होतो, हें अनेक समाजांच्या इतिहासांवरून तेथे दाखविलें आहे. पारशी समाज अत्यंत अल्पसंख्य असून, त्याने दादाभाई, जीजीभाई, जमशेटजी टाटा, मादाम कामा, मेथा, नरीमन, भाभा, माणेकशा यांसाखे अखिल भारताला भूषणभूत होणारे स्त्री-पुरुष निर्माण केले हें एकच प्रमाण त्या समाजाच्या इहवादी वृत्तीविषयी साक्ष देण्यास पुरेसें आहे.
 सर सय्यद अहंमदखान हिंदू व मुस्लिम जमातींच्या लोकांना लष्करांत एका पलटणींतसुद्धा घालूं नये, तसें केल्यास त्यांच्यांत बंधुभाव निर्माण होण्याचा धोका आहे, असें १८५८ सालापासून इंग्रज सरकारला बजावीत होते. तर त्याच वेळीं पारशी समाजाचे धुरीण अखिल हिंदी जनतेसाठी संस्था स्थापीत होते व इंग्रज सरकारचा रोष ओढवून घेत होते. 'वंदे मातरम्' हें राष्ट्रगीत रद्द करावें अशी मुस्लिमांची सहकार्याची पहिली अट होती. तर मादाम कामांनी भारतीय राष्ट्रध्वजाचें भूषण म्हणून त्यावर ती अक्षरें काढलीं होतीं व त्या नांवाचें पत्रहि चालविलें होतें. आम्हांला स्वतंत्र सुभा पाहिजे, जास्त हक्क पाहिजेत. प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व सर्व क्षेत्रांत पाहिजे अशी मुस्लिमांची प्रथमपासून मागणी होती व पाकिस्तानानंतरहि ती कायम आहे. पारशी समाजाच्या नेत्यांनी चुकून सुद्धा अशी मागणी कधी केली नाही. अखिल भारतीयांचे जें सुखदुःख तेंच आपलें असें या भूमीवर पाऊल ठेवल्यापासून ते मानीत आले व त्यांचें ते ब्रीद आजहि अविचलित आहे. त्यांनी लाखांनी, कोटोंनी दानधर्म केला पण इतरांचें धर्मांतर करावें असा विचार स्वप्नांतहि आणला नाही.
 पारशीसमाज हा खराखुरा राष्ट्रीय समाज आहे, भारताच्या राष्ट्रीय आशा- आकांक्षांशीं तो मनापासून एकरूप झाला आहे हें यावरून स्पष्ट होईल. आणि इहवादावांचून राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष होत नसतो हे मागें अनेक ठिकाणीं दाखवून दिलेच आहे.