इहवादी शासन/कम्युनिस्ट देशांतील इहवादी शासन
कम्युनिस्ट देशांतील
इहवादी शासन
१
विषयप्रवेश
सध्या इहवादी शासनाची सर्वत्र चर्चा चालू आहे. या विषयावर परिसंवाद होत आहेत, ग्रंथ लिहिले जात आहेत आणि मोठमोठे अधिकारी- तज्ज्ञ या विषयाचा आत्मीयतेने खल करीत आहेत. भारताच्या दृष्टीने या सर्वाला फार महत्त्व आहे. भारत हे इहवादी शासन आहे की नाही याविषयी मतभेद आहेत. आपल्या घटनेत 'आमचें शासन इहवादी आहे,' असें म्हटलेले नाही. उलट दोनदा- तीनदा घटना समितींत तशी सूचना आली असतांना ती फेटाळून लावण्यांत आली. पण शब्द तस नसला तरी अर्थ तसा निश्चित आहे, असें अनेक पंडितांचें मत आहे. भारताच्या शासनव्यवहारावर धर्मसत्तेचे वा धर्मवित्राराचें मुळीच वर्चस्व नाही. समाजाच्या उत्कर्षास अवश्य तो कायदा करण्यास, धर्माचा विरोध असला तरी, भारतीय शासन पूर्ण समर्थ आहे, या अर्थाने तें इहवादी आहे, असें हे पंडित म्हणतात. 'इहवादी' याऐवजी निधर्मी असा शब्द लोकांत रूढ आहे. कोणत्याच धर्माची कड न घेणारा व सर्व धर्म सम मानणारा, असा निधर्मी शब्दाचा अर्थ केला जातो. कांही विचारवंत एका निराळ्या दृष्टीने या प्रश्नाकडे पाहतात. भारतीय जनता जोपर्यंत बुद्धिवादी इहवादी व विवेकनिष्ठ झालेली नाही, जोपर्यंत ती परलोनिष्ठ, भौतिकविन्मुख, अंधश्रद्ध व शब्दप्रामाण्यवादी आहे तोपर्यंत, भारताचें शासन इहवादी आहे, या म्हणण्याला त्यांच्या मतें, कांही अर्थ नाही. बहुसंख्य मुस्लिम समाजाचा इहवादाला कडवा विरोध आहे. त्यांच्या त्या वृत्तीमुळेच भारताची फाळणी झाली, आणि राहिलेल्या भारतांतहि आम्हांला सवतासुभा हवा अशी मुस्लिमांची मागणी आहे. या दृष्टीने पाहतां जनता इहवादी झाल्यावांचून शासन इहवादी झालें, या म्हणण्याला कांही अर्थ नाही, या विचारांत बरेंच तथ्य आहे, हें मान्य केलें पाहिजे. भारतांत अजून अनेक सार्वजनिक व शासकीय व्यवहारांच्या प्रारंभीं भूमिपूजन, मंत्रघोष, किवा असेच कांहीं अन्य धार्मिक विधि केले जातात. यावर अनेक इहवादी लेखक कडक टीका करतात. हे धार्मिक विधि इहवादाच्या मूळ तत्त्वाला हरताळ फासतात, असें त्यांना वाटतें. हे व अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न भारताच्या इहवादित्वाविषयी आज उपस्थित होत आहेत. आणि भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांना फार महत्त्व असल्यामुळे त्यांची शास्त्रीय चर्चा होणे आवश्यक आहे. तशी चर्चा करणें हा या प्रबंधाचा उद्देश आहे. मात्र या विषयाची सर्व पार्श्वभूमि नीट समाजावी व वरील प्रश्नांची उत्तरे देण्यास, त्यासंबंधी निर्णय करण्यास, अवश्य ती माहिती उपलब्ध व्हावी म्हणून भारतापासून एकदम चर्चेला प्रारंभ न करतां, प्रथम रशिया-चीन इत्यादि कम्युनिस्ट देशांतील इहवादी शासनाचें रूप पाहण्याचें योजिलें आहे. त्यानंतर तुर्कस्थान, इजिप्त, सिरिया, इराक इत्यादि मुस्लिम राष्ट्रांतील इहवादाचा विचार करावयाचा आहे. तो विचार झाल्यावर आपल्याला युरोपचा प्रवास केला पाहिजे. पश्चिम युरोप हे इहवादाचे मूळपीठ होय. आजचें आपल्या इहवादाचें तत्त्वज्ञान आपण तेथूनच घेतलें आहे. म्हणून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादि पश्चिम युरोपांतील देशांतील इहवादाचा प्रारंभापासूनचा इतिहास पाहणें अवश्य आहे- आणि त्या विवेचनांतून इहवादी शासनाच्या बहुविध अंगोपांगांचें दर्शन झालें, या विषयाकडे कोणत्या दृष्टिकोनांतून पाहणें युक्त आहे, तें ध्यानीं आलें म्हणजे मग नंतर भारताच्या शासनाची चिकित्सा करावयाची आहे. या आखणीप्रमाणे आता प्रथम सोव्हिएट रशिया व त्याच्या साम्राज्यांतील उझबेकिस्तान, ताजिकिस्तान इत्यादि देश यांतील इहवादाचा परामर्श घेऊ.१
इहवाद, इहवादी शासन ही तर सोव्हिएट रशियाच्या नेत्यांची प्रतिज्ञा आहे. कम्युनिस्ट देशांच्या जीवनाचा तो आद्य सिद्धान्त आहे. त्यांच्या मूळ पीठाचें तें प्रधान तत्त्व आहे. धर्माचें वर्चस्व, धर्मपीठाची सत्ता शासनावर व एकंदर ऐहिक व्यवहारावर असूं नये, इतकीच मध्ययुगांतील पंडितांची व शास्त्यांची मागणी होती. कम्युनिस्ट देशांत धर्मसत्ताच काय, मूळ धर्मच नष्ट झाला पाहिजे, अशी मागणी आहे व तसे तेथील शास्त्यांचे प्रयत्न आहेत. "परमेश्वरावरील श्रद्धा- हिच्याइतकें अमंगळ, तिरस्कार्य जगांत कांही नाही," असें लेनिनचें मत होतें. "धर्म हें एक आध्यात्मिक मद्य आहे. भांडवलशाहीचे दास त्या घाणींत आपली सर्व मानवी प्रतिष्ठा बुडवून टाकतात. त्यामुळे या लोकांना सभ्य किंवा सुसंस्कृत म्हणणें शक्य नाही," असें तो नेहमी म्हणत असे. "धर्मकल्पनेचा नायनाट आपण केला पाहिजे, सर्व भौतिक- वादाचा व अंशतः मार्क्सवादाचा तो पाया आहे," असें त्याचें प्रतिपादन असें.
भांडवलदार, जमीनदार, सावकार यांना किसान-कामगारांची पिळवणूक करावयाची असते. त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून, त्यांचा छळ करून, त्यांच्यापासून पैसा उकळावयाचा असतो. ही अनीति, हा अत्याचार उजळ माथ्याने करतां यावा म्हणून ते धर्माचा आश्रय करतात. हे वर्ग परमेश्वरानेच निर्माण केले आहेत, गरीब लोक हे आपल्या कर्मानेच गरीब झालेले असतात, त्यांत धनिकांचा कांही दोष नाही," अशा तऱ्हेचें तत्त्वज्ञान कष्टकरी जनतेला पाजून, तिची क्रांतिवृत्ति बधिर करून टाकणें हें धर्माचें काम आहे," असें कम्युनिस्टांचें मत आहे. "धर्म ही अफू आहे," असें मार्क्स म्हणाला तें याच अर्थाने. आज तें वचन रशियांत लेनिनच्या स्मृतिमंदिरावर त्याचें ध्येयवाक्य म्हणून, कोरून ठेविलेले आहे.
धर्मगुरूंचा छळ
परमेश्वर, धर्मपीठे, धर्माचार व एकंदर धर्म यांविषयी असें मत असल्यामुळे हाती सत्ता येतांच बोल्शेव्हिकांनी धर्मगुरूंचा भयानक छळ करण्यास प्रारंभ केला. धर्मशिक्षण, धर्मप्रसार याला कायद्याने बंदी घातलेली होती, तरी अनेक धर्मगुरु धर्मप्रवचनें करीत राहिले. अशा हजारो धर्मगुरूंना तुरुंगांत वा सैबेरियांत धाडण्यांत आलें. कांहींना फाशी देण्यांत आलें. चर्च, प्रार्थनामंदिरें यांचें रूपांतर कारखाने, कार्यालयें यांत करण्यांत आलें. क्रांतिपूर्वी मॉस्कोमध्ये ४०० चर्चे होती. आज तेथे फक्त ३० आहेत. हीं चर्चे, हे धर्मगुरु यांच्या मागे असलेली रशियन ऑर्थोडॉक्स चर्च ही संस्था नष्ट करण्यांत आली. जीं चर्चे व इतर धर्ममंदिरें शिल्लक राहिलीं त्यांच्या सर्व मिळकती जप्त करण्यांत आल्या. या वेळीं घरोघर खाजगी रीतीने उपासना- प्रार्थना करण्यास कायद्याने बंदी नव्हती. तरी अशा ठिकाणी जाऊन धर्मगुरु प्रवचनें करूं लागले तेव्हा त्यांचाहि पोलिस छळ करूं लागले. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्त्या व इतर सवलती मना करण्यांत आल्या आणि जुन्या काळीं धर्मभ्रष्ट, पतित, पापी अशा लोकांची जी स्थिति होत असे ती आता धर्मनिष्ठ, भाविक, श्रद्धाळू लोकांची होऊं लागली.
१९३६ सालीं सोव्हिएट रशियाची घटना तयार झाली. तीअन्वये प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य दिलेलें आहे. धर्मप्रसाराचें स्वातंत्र्य मात्र नाही. पण उलट धर्म विरोधी प्रचाराचें स्वातंत्र्य मात्र प्रत्येकाला दिलेलें आहे. सरकार अशा धर्मविरोधी संस्थांना साह्यहि करतें. १९२५ साली 'मिलिटंट अथेइस्ट असोसिएशन' नांवाची संस्था यारोस्लाव्हास्की याने स्थापन केली होती. धर्माचा उच्छेद करणें, नास्तिक्याचा प्रसार करणें, हेंच तिचें उद्दिष्ट होतें. सरकारचें तिला भरपूर साह्य होतें. घटनेच्या १२४व्या कलमाप्रमाणे धर्मपीठ व शासन यांची फारकत करण्यांत आली. आणि राजकारणांत धर्माला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही व धर्मात शासनाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा त्याचा खुलासा केला गेला; पण त्याला कसलाहि अर्थ नाही. शिक्षण, विवाह, कुटुंबसंस्था, अनेक धर्माचार या जीवनांतल्या प्रत्येक बाबींत सोव्हिएट शासनाची निरंकुश सत्ता चालते आणि तशी ती चालवून तें शासन सारखें हस्तक्षेप करीत असतें. धर्माची सत्ता पूर्वी या प्रत्येक बाबतींत चालत असल्यामुळे धर्माचा ज्यांना समूळ नायनाट करावयाचा आहे त्यांना असा हस्तक्षेप अनिवार्यच आहे. धर्म ही खाजगी बाब आहे, याचाहि अर्थ असाच समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरांत आपल्या मनाप्रमाणे, मताप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे धर्मसाधन करावें, त्याला संपूर्ण मुभा आहे, असा याचा अर्थ होतो. पण प्रत्येकाला म्हणजे कोणाला ? कम्युनिस्ट संघटनेच्या सभासदांना अशी मुभा नाही. श्रद्धा असलेला धर्मनिष्ठ मनुष्य कम्युनिस्ट संघटनेचा (पार्टीचा) सभासद होऊच शकणार नाही आणि झालेल्या सभासदाविपयी तशी नुसती शंका आली तरी, त्याची हकालपट्टी होईल. विद्यापीठांतील बहुसंख्य विद्यार्थी वसतिगृहांत राहतात. त्यांना तेथे धर्माचाराचें स्वातंत्र्य नाही. क्रॉस गळ्यांत अडकविल्याबद्दल कांही विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतून हाकलून देण्यांत आलें होतें. आता राहिलीं खाजगी घरें. पण तेथेहि धर्मविरोधी प्रचारक येऊन तुमच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न करतातच. त्या परिवर्तनासाठी दबावहि आणतात. आणि तरीहि लोकांनी जुमानले नाही. नास्तिकवाद पत्करला नाही, तर दंडशहांची इतराजी होऊन उत्कर्षाचे अनेक मार्ग बंद होतील, ही भीति असते. तेव्हा ही खाजगी बाब आहे व प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे, या म्हणण्यांत फारसा अर्थ नाही. १९३६ च्या घटनेने तसें स्वातंत्र्य दिलेलें आहे. पण त्या घटनेने व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, हेहि दिलेलें आहे. प्रत्यक्षांत कोणतेंच स्वातंत्र्य रशियन जनतेला उपलब्ध होत नाही !
येथे एक गोष्ट आपण ध्यानांत ठेवली पाहिजे की, कम्युनिस्ट नेत्यांना धर्म हा कोणत्याहि रूपांत नको आहे. जगांतल्या इतर देशांत गेली दोन-तीन शतकें धर्मसुधारणा चालू आहे. जुना पोथीनिष्ठ, अंधसैद्धांतिक, कर्मकांडात्मक, विषमतावादी, निवृत्तिवादी, धर्म आज कोणालाच नको आहे. पण धर्म मुळांतच नको, अशी भूमिका जगांतला कोणताहि देश घेत नाही. बहुतेक देशांत लोकांनी धर्म हा विज्ञानपूत करून घेतला आहे. जगांतल्या बहुतेक सर्व थोर शास्त्रज्ञांनी धर्माची आवश्यकता सांगितली आहे. पण कम्युनिस्टांना यांतलें कांही मान्य नाही. धर्मसुधारणा ही त्यांच्या मतें जास्तच वाईट फसवणूक आहे. लुडविग् फायरवाक् याला कम्युनिस्ट लोक फार मानतात. पण त्याने जुन्या धर्मावर टीका करून नव-धर्माची - बुद्धिनिष्ठ, विज्ञानपूत धर्माची समाजाला आवश्यकता आहे, असें म्हटल्या बद्दल एंगल्सने त्याच्यावर टीका केली होती व लेनिनने तिचें समर्थन करून फायरवाकला दोष दिला होता. आर्थर ड्र्यूज या जर्मन शास्त्रज्ञावर स्वतः लेनिनने याच कारणासाठी टीका केली आहे. या शास्त्रज्ञाने, ख्राईस्ट कधी झालाच नव्हता, असें मत मांडलें होतें आणि अनेक धार्मिक रूढींवर, दुर्मतांवर व दुराग्रहांवर प्रखर टीका केली होती. पण शेवटीं त्याने धर्माची महती गाऊन विशुद्ध बुद्धिवादी परिवर्तनशील, धर्माची आवश्यकता प्रतिपादिली होती. तरी त्याची प्रतिगामी म्हणून संभावना करून भांडवलशाहीला गरिबांच्या शोषणांत तो साह्यच करीत आहे, असा त्याला लेनिनने ठपका दिला.
धर्मतत्त्वापुढे शरण
धर्माविषयी अशीं आत्यंतिक कडवीं मतें असल्यामुळेच कम्युनिस्टांनी सत्ता हातीं येतांच, प्रारंभीं सांगितल्याप्रमाणे धर्माचें अगदी निर्दालन करण्याचा अघोरी प्रयत्न केला. वीस-बावीस वर्षे त्यांना बाह्यतः यश आल्यासारखें दिसलेंहि, पण हिटलरचें आक्रमण झालें व सर्वनाश डोळ्यांसमोर दिसूं लागला तेव्हा मार्क्स, एंगल्स, लेनिन यांचे धर्मविरोधी तत्त्वज्ञान सर्व गुंडाळून ठेवून त्यांना धर्मतत्त्वाला शरण जावें लागलें.
मॉरिस् हिंडस् याने 'मदर रशिया' या आपल्या पुस्तकांत हें परिवर्तन कां व कसें झालें, याचें तपशिलाने वर्णन दिले आहे. सार्वजनिक जीवनांत, शासकीय व्यवहारांत धर्माला, पूजेला, प्रार्थनेला कोणतेंहि स्थान असतां कामा नये, असा एक पक्ष भारतांतले इहवादी विचारवंत मांडीत असतात. त्यांनी रशियांतल्या गेल्या पन्नास वर्षांतल्या धर्मविचारांतील परिवर्तनांचा इतिहास अभ्यासणें अवश्य आहे, असें वाटतें.
धर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ति व प्राचीन परंपरेचा अभिमान या मानवाला स्फूर्ति व बळ देणाऱ्या गोष्टी कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाने अत्यंत निंद्य व त्याज्य मानल्या आहेत. धर्माबद्दल वर लिहिलेच आहे. राष्ट्राविषयी मार्क्सवादाचें तेच मत आहे. हा भांडवलदारांनी निर्माण केलेला भेद आहे, असें मार्क्स म्हणतो. परंपरेचा अभिमान हीहि अत्यंत प्रतिगामी क्रांतिविरोधी वृत्ति आहे, असें त्याचें मत आहे. रशियाचा इतिहास १९१७ पासून म्हणजे कम्युनिस्ट क्रांतीपासून सुरू होतो, असें सोव्हिएट नेते प्रारंभीं सांगत असत व शाळांत मुलांना तसें शिकवीत असत. पण युद्धाचें आव्हान येतांच या प्रेरणावांचून जनतेला अंतिम त्यागाची स्फूर्ति मिळतच नाही, असें त्यांच्या ध्यानांत आलें व मग एकदम पलट खाऊन त्यांनी या प्रेरणांची उपासना सुरू केली. या प्रेरणा म्हणजे अफू नसून प्राणवायु आहे, असें ते सांगूं लागले.
धर्मविरोधी प्रचार सर्व बंद झाला. शेकडो धर्मगुरूंना तुरुंगांतून मुक्त करण्यांत आलें. 'मिलिटंट अथेइस्ट असोसिएशन' ही पाखंड संस्था नष्ट करण्यांत आली. आणि लोकांच्या धर्मनिष्ठेला नाना प्रकारें आवाहन करण्यांत येऊ लागलें. विजयासाठी सार्वजनिक रीतीने जाहीर प्रार्थना होऊं लागल्या, अडीच कोटि रुबलचा निधि चर्चला देण्यांत आला. 'दि ट्रूथ अबाउट रिलिजन इन् दि सोव्हिएट युनियन' हा ग्रंथ स्टॅलिन-आज्ञेने लिहवून घेऊन, त्याच्या पन्नास हजार प्रती काढून, त्या वांटण्यांत आल्या. रशियांत धर्मछळ झाला हें पूर्ण असत्य आहे, असें त्या ग्रंथांत प्रतिपादन करण्यांत आलें आहे. टास एजन्सीने लिहिलें की, प्राचीन काळापासून रशियन लोक धर्मनिष्ठ आहेत. जर्मनांवर आम्ही विजय मिळवू शकलों, हें त्या निष्ठेच्या बळावरच होय. १०/४/४५ रोजी स्टॅलिनने जें धर्मविषयक भाषण केलें तें कर्मठ सनातन्यांपेक्षाहि सनातनी होतें.
खऱ्या शक्तीची ओळख
हिटलर सत्तारूढ होऊन त्याच्या रशियाविरोधी गर्जना सुरू झाल्या तेव्हाच सोव्हिएट नेत्यांच्या ध्यानांत आले की, जगांतील कामगारांचें ऐक्य, वर्गविग्रह मार्क्सवाद, त्यांतील ऐतिहासिक जडवाद या सर्व शिळोप्याच्या गोष्टी आहेत. धर्म, राष्ट्र याच खऱ्या शक्ति आहेत. तेव्हा त्यांची अवहेलना होता कामा नये. १९३६ साली मॉस्को येथील कॅमेरमी थिएटरने 'सरदार' हे संगीत नाटक रंगभूमीवर आणले. त्यांत आठव्या नवव्या शतकांत रशिया ख्रिस्तधर्मी झाला या घटनेची घाणेरडी निंदा केलेली होती. ख्रिस्ती धर्मदीक्षा म्हणजे स्वैर भोगाची दीक्षा, असें वर्णन केलें होतें. सरकारी कलामंडळ, सेन्सॉरबोर्ड यांनी त्या नाटकाला मान्यता दिली होती. वर्तमानपत्रांनी त्याचा गौरव केला होता. डेमियन वेंडी या त्या काळच्या विख्यात क्रेमलिनमान्य कम्युनिस्ट कवीने तें नाटक लिहिलें होतें. त्याचे प्रयोग रंगत होते. प्रेक्षक टाळी देत होते. इतक्यांत सर्व चक्र फिरलें. वादळी वेगाने शासनाने- इहवादी, सेक्युलर, जडवादी, सोव्हिएट सरकारने- त्या नाटकावर प्रहार केला. दिग्दर्शक, लेखक सर्वांना ठपका दिला. आणि रशियांत ख्रिस्ती धर्मामुळे फार मोठी प्रगति झालेली आहे, रशिया त्यामुळे सुसंस्कृत झाला आहे, असें नवें मत प्रमृत करण्याची सर्वांना आज्ञा दिली.
युद्ध सुरू होतांच ख्रिस्ती, मुस्लिम धर्माचार्य स्टॅलिनची स्तुति गाऊन 'तुं परमेश्वराचा प्रेषित आहेस,' 'अल्लाच्या कृपेने तुला जय मिळेल,' असे आशीर्वाद त्याला देऊं लागले. आणि शासकीय मुखपत्र 'प्रवदा' यांत ते प्रसिद्ध होऊं लागले.
डिमिट्रीचा गौरव
१९४१ सालीं वोरोडिन नामक लेखकाने 'डिमिट्री डॉनस्कॉय' या नांवाची एक कादंबरी लिहिली. ही साधारण हरिभाऊंच्या 'उषःकाल' या कादंबरीसारखी आहे. तिच्यांतील कथानक १३७८ सालचें आहे. दोनशे वर्षे तार्तराचें रशियावर राज्य होते. 'डिमिट्री डॉनस्कॉय' या वीरपुरुषाने तार्तरांचा पराभव करून रशियाला स्वातंत्र्य मिळवून दिलें, त्याची ही कथा आहे. कादंबरीतील विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे डिमिट्रीचे गुरु मेट्रॉपॉलिटन अलेक्सी यांचा तींत गौरव केला आहे. "अलेक्सीस्वामींनीच लहानपणापासून डिमिट्रीच्या मनावर शौर्यधैर्याचें, राष्ट्रभक्तीचे संस्कार केले व त्याला नेतृत्वाचें शिक्षण देऊन तयार केलें. त्यांचे अनेक शिष्य सर्वत्र संचार करून लोकांत धर्मजागृति करीत होते. आपल्या मठांत अनेक तरुणांना जमवून ते त्यांना चेतवून देत होते. या सर्वांचा परिणाम म्हणूनच रशिया स्वतंत्र झाला," असें मत या कादंबरींत मांडलेले आहे. धर्मनिष्ठा व परंपराभिमान यांनी ओतप्रोत भरलेल्या या कादंबरीचें 'प्रवदा' ने विस्तृत परीक्षण करून 'रशियाच्या एका प्राचीन महापुरुषाचें चरित्र' असा तिचा महिमा गायिला आहे.
इहवाद, सेक्युलॅरिझम, इहवादी शासन, शासन आणि धर्म यांची फारकत, जनतेवरील इहवादाचे संस्कार, सार्वजनिक जीवनांतील शासकीय व्यवहारांतील पूजा-प्रार्थना यांचें म्हणजे धर्माचें स्थान यांविषयी बरीच उद्बोधक माहिती वरील विवेचनावरून मिळेल. रशियांत युद्धकाळांत सोव्हिएट नेत्यांनी धर्मापुढे शरणागति पत्करली खरी, पण युद्ध थांबल्यावर गरज संपतांच त्यांनी धर्मनिर्दाळण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू केला. तो आजतागायत तसाच चालू आहे. त्याचें विवेचन पुढील लेखांत करूं. ज्या देशाला इहवादी शासन यशस्वी करावयाचें आहे, त्याने धर्म या शक्तीचा सांगोपांग अभ्यास करून मगच धर्माचें आपल्या देशांतील स्थान निश्चित केलें पाहिजे. आणि त्यासंबंधी जे निर्णय घ्यावयाचे ते या अभ्यासानंतरच घेतले पाहिजेत. गेल्या पंचवीस वर्षांतील रशियांतील धर्मविचारांचा इतिहास, या दृष्टीने वर दिलेल्या पहिल्या पंचवीस वर्षांतल्या इतिहासाइतकाच उपयुक्त होईल, यांत शंका नाही.
२
१९३६ ते १९४६ हा जो संग्रामकाळ, त्याने सोव्हिएट नेत्यांना स्पष्ट दाखवून दिलें की, धन, वित्त, कुटुंबांतले प्रियजन आणि शेवटीं प्राण यांचा त्याग करण्याची प्रेरणा कम्युनिस्ट तत्त्वज्ञान देऊ शकत नाही. धर्म, राष्ट्र, पूर्वपरंपरा या शक्ति त्यासाठी अवश्य आहेत. पण हें ध्यानांत आलेलें सत्य मान्य करणें त्यांना शक्य नव्हतें. कारण सोव्हिएट शासनाची व कम्युनिस्ट जगताची सर्व इमारत मार्क्सप्रणीत जो 'विरोधविकासवाद' त्याच्यावर उभी आहे. धर्मतत्त्वाला मान्यता दिली, तर तो पायाच हादरेल, हें जाणून १९४८-५० च्या सुमारास रशियन शासनाने नव्या जोमाने धर्मनाशाची मोहीम सुरू केली.
मात्र थोडें शहाणे होऊन आता त्याने गनिमी काव्याचा अवलंब केला. वास्तविक धर्मनाशाच्या मोहिमेंत समोरासमोर युद्ध करणे कधीच शहाणपणाचे होणार नाही, असें एंगल्सनेच सांगून ठेवलें होतें व लेनिनने विस्तृत विवेचन करून त्याचाच पुरस्कार केला होता. पण सत्ता हाती आली त्या वेळीं सोव्हिएट सत्ताधाऱ्यांना हें भान राहिले नाही. आणि त्यांनी समोरून हल्ला करूनच धर्माचा विध्वंस करण्याचें धोरण अवलंबिलें. पण छळ, हद्दपारी, फाशी हे सर्व अत्याचार करूनहि त्यांना यश आले नाही. युद्धकाळांत त्यांना धर्मश्रद्धेचा आश्रय करावा लागला. 'कॉम्युनिस्ट' या पत्राने जाहीरपणे सांगितले की, युद्धाच्या आपत्तीच्या काळी अनेक विरोधविकासवादी लोकांनीहि धर्माचा आश्रय केला होता ! १९५३ साली स्टॅलिन मृत्यु पावला व त्यानंतर क्रुश्चेव्हने जाहीरपणें त्याला बदनाम केले. त्यामुळे कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावरची रशियन जनतेची श्रद्धा ओसरूं लागली. स्टॅलिनला ते देव मानीत होते. पण निधर्मी सरकारचा हा देव नरराक्षस ठरल्यामुळे लोकांत ख्रिस्ती धर्मावरील श्रद्धा पुन्हा दृढावू लागली. पक्षाचा एक कार्यकर्ता मजुरोव्ह याने तक्रार केली आहे की, निरनिराळ्या धर्मसंस्थांवर नजर ठेवण्यासाठी नेमलेले लोक आंतून त्या संस्थांना साह्य करीत असतात.
नवा पवित्रा
हा पराभव वर्मी लागल्यामुळे कम्युनिस्टांनी नवी चढाई सावधपणे करण्याचें ठरविलें. इतके दिवस बुद्धिवादाने ते लढत असत. परमेश्वर, आत्मा, मोक्ष, मरणोत्तर गति हीं तत्त्वं तर्कदृष्ट्या कशी असमर्थनीय आहेत तें पटवून देऊन विरोधविकासवादच कसा शास्त्रशुद्ध आहे व तर्कमान्य आहे हें ते विवरून सांगत असत. अत्याचार, जुलूम, विध्वंस हे चालू असतांनाच नव्या कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे घोट अशा पद्धतीने ते लोकांना पाजीत असत. पण आता त्यांनी ध्यानांत घेतले की, धर्म ही एक अत्यंत प्रबळ अशी भावना आहे. तर्कवादाने तिचा बीमोड होणार नाही. म्हणून खाजगी संभाषणे, चर्चा, संवाद या मार्गाने भावनेला हात घालून भाविकांच्या हृदयापर्यंत पोचावयाचे, असे त्यांनी ठरविलें, अर्थात् या मार्गाने जातांना कम्युनिस्ट प्रचारक, दडपण, दहशत यांचा अवलंब करीत नसत, असें नाही. पण बाह्यतः तरी त्यांचे नेते त्याचा निषेध करतात. 'प्रवदा'ने म्हटले आहे (१२-१-६३ ) "धर्म या अफूचा अंमल नष्ट करण्यासाठी व्यक्तिगत संभाषणाचा परिणाम फार चांगला होतो. पण त्यासाठी धीर, संयम, चिकाटी यांची आवश्यकता असते. अनेक प्रचारकांच्या ठायीं हें गुण नसल्यामुळे ते भाविकांना दहशत घालून त्यांच्या भावना दुखवितात, हें योग्य नव्हे. या सनातन भाविकांचीं मनें, त्यांची सेवा करून संकटकाळी त्यांना साह्य करूनच, आपण जिंकली पाहिजेत. धर्म या भावनेशी संग्राम करावयाचा आहे तेव्हा तशाच दुसऱ्या भावना जागृत केल्या, तरच हा संग्राम यशस्वी होईल; अशा भावना कोणत्या ? कम्युनिझमच्या तत्त्वज्ञानावरील श्रद्धा, कम्युनिस्ट स्वजनांविषयीचा बंधुभाव, सामूहिक कार्याविषयीचे प्रेम या त्या भावना होत. या जागृत करून लोकांशी नित्य बोलून धर्मश्रद्धेचा फोलपणा दाखविला पाहिजे, असें सोव्हिएट नेते सध्या सांगत असतात.
गनिमी चढाईचा दुसरा मार्ग म्हणजे रशियन ऑर्थोडॉक्स चर्च ही संस्था व तिचे धर्मगुरु यांना रागलोभाने वश करून त्यांनाच कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे अगदी उघडपणें नव्हे, पण प्रच्छन्नपणें समर्थन करण्याच्या कार्यास जुंपावयाचें, हा होय. सत्ता हातीं येतांच क्रांतीच्या पहिल्या उन्मादांत चर्च ही संस्थाच कम्युनिस्टांनी हतप्रभ करून टाकली होती. पण १९४५ साली मॉस्को चर्चचें स्टॅलिनने पुनरुज्जीवन केलें आणि मॉस्कोपीठावर अलेक्सी या वृद्ध धर्माचार्याची नेमणूक केली. तेव्हापासून रशियांतील धर्मपीठें कम्युनिझमचा पाठपुरावा करीत आहेत. अलेक्सी तर वृद्धच आहे. पण निकोलायसारखे नवे तरुण धर्मगुरूहि "पोप हा अमेरिकन भांडवलशाहीचा दास आहे," असें म्हणून दाखवितात. जॉन गुंथर याने म्हटलें आहे की, अनेक धर्माचार्यांचीं भाषणें क्रुश्चेव्हसारखींच होतात. कदाचित् तीं त्याचीं असतीलहि" (इनसाइड रशिया, १९६२). आज मॉस्कोपीठ हे सर्वस्वीं कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणजेच शासनाच्या अधीन आहे. अलेक्सी, इओयान, क्रुटिसी हे आचार्य आता अतिवृद्ध झाले आहेत. ते शांतपणें सर्व सोशीत आहेत. पण ज्या तरुण आचार्यांची नित्य नवी भरती होत असते त्यांनाहि भांडवलशाही, साम्यवाद, सहजीवन, वसाहतवाद या विषयांवर कम्युनिस्ट शासनाच्या धोरणानेच बोलावें लागतें. त्यांत कधी गलती झाली की, ते एकदम पदभ्रष्ट होतात. ते कसें बोलतात याचा एक नमुना पाहा. मॉस्कोपीठाच्या पत्रांत ए. व्हेडरनिकॉव्ह याने लिहिले आहे की, "सोव्हिएट शासनाने शांतता, शस्त्रसंन्यास यांविषयी जी योजना मांडली आहे ती कल्याणकारी व उदात्त तर आहेच, पण शिवाय बायबलमध्ये वर्तविलेल्या भविष्याशीं अगदी जुळती आहे. बायबलमध्ये म्हटलें आहे की, पुढे एक काळ असा येईल की, तेव्हा सर्व लोक आपल्या तलवारींचे नांगरफाळ करतील व भाल्यांचे विळे करतील" (१९६२, नं. १) रशियांतील शासनाची धर्मविषयक. तटस्थता या स्वरूपाची आहे.
पण या दुसऱ्या युद्धांतहि सोव्हिएट नेत्यांना यश येईल असें दिसत नाही. जॉन गुंथरच्या मतें तर रशियांत धर्माचे हळूहळू पुनरुज्जीवन होत आहे. क्रांतिपूर्वी रशियांत ४६,००० चर्चे होतीं. १९३५ सालीं ही संख्या ४००० झाली, पण १९५६ सालीं ती पुन्हा २०,००० वर आली आहे. धर्मगुरूंची संख्याहि ५० हजारांवरून ५ हजारांवर जाऊन पुन्हा ३५ हजारांवर आली आहे. धर्मपीठे, धार्मिक पाठशाळा पुन्हा उघडल्या आहेत. खेड्यांत धर्मपद्धतीने विवाह जास्त होऊं लागले आहेत. स्टॅलिनच्या मृत्युनंतर बाप्तिस्मा घेणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. ही सर्व माहिती देऊन गुंथर म्हणतो, "धर्मनिष्ठा ही स्वातंत्र्यनिष्ठेइतकीच चिवट आहे. ती कधीच नष्ट करता येणार नाही" ( इन्साइड रशिया, पृष्ठे ३६७-७०).
सोव्हिएट नेत्यांचा संताप
या सर्वांमुळे सोव्हिएट नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा व सश्रद्ध भाविक कम्युनिस्टांचा अत्यंत संताप होत आहे. धर्म नष्ट करण्याच्या आपल्या प्रतिज्ञा फोल होत आहेत पन्नास वर्षांच्या मोहिमेनंतरहि आपल्याला पराभव पत्करावा लागत आहे, याची चीड येऊन पुन्हा पाशवी बलाचा आश्रय करावा, अशी भाषा ते बोलूं लागले आहेत. आणि सरकारने त्याप्रमाणे मोहीम सुरूहि केली आहे. व्होलिनिया येथील १८० व बेलोरशिया येथील ३०० चर्चेस १९६१-६२ साली बंद करण्यांत आली. मोल्डाव्हिया येथील १४ मठांना टाळे लावण्यांत आलें.
१९६२ पासून नास्तिक पंथाच्या अनेक परिषदा भरविण्यांत येत आहेत. त्यांत धर्माचा पुरता उच्छेद कोणत्या मार्गाने करता येईल याची चर्चा होत असते. नास्तिक पंथाच्या व त्याच्या अनुयायांच्या रक्षणासाठी कायदे जास्त कडक करावे, आईबापापासून मुलें दूर करून, घरांतल्या धर्मशिक्षणापासून व धार्मिक वातावरणापासून त्यांचा बचाव करावा, नास्तिकपंथाचे यशोवर्णन करणारे चित्रपट विपुल प्रमाणांत काढावेत, त्याच्या प्रचारास वाहिलेली वृत्तपत्रे सुरू करावीत, ग्रंथ लिहावेत असे अनेक उपाय त्या परिषदांत सुचविण्यांत आले आहेत व त्यांतील कांही अमलांतहि येत आहेत. एफ्. ओलेश्चूक या पत्रकाराने धर्माच्या पुनरुज्जीवनाबद्दल स्टॅलिनला जबाबदार धरलें आहे. तो म्हणतो, "स्टॅलिनुबद्दलची अतिरेकी भक्ति, विभूतिपूजा, निरीश्वरपंथीय संस्थांवर त्याने घातलेली बंदी, चर्च, मठ यांना दिलेले उत्तेजन यांमुळे नास्तिकपंथीयांचा आत्मविश्वास ढळला व त्यांचा शक्तिपात झाला. तेव्हा आता 'परत लेनिनकडे', 'परत यारोस्लाव्हास्कीकडे' अशा घोषणा करून उदारमतवादी सहिष्णुतेचें धोरण बदलून पुन्हा पूर्वीप्रमाणेच कठोर नियंत्रणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे." सोव्हिएट शासनाला अर्थातच हें मान्य झाले आहे. धर्मनिष्ठेच्या अपराधासाठी अधिकारी व्यक्तींना बडतर्फ करण्यांत येत आहे. मुलांना धर्मशिक्षण दिल्याबद्दल पालकांना शिक्षा देण्यांत येत आहेत. धर्म म्हणजे फॅसिझम, धर्म म्हणजे क्रांतिविरोध, धर्म म्हणजे लोकघात असा घोष पुन्हा सुरू झाला आहे. आणि जुलूम, अत्याचार, दडपशाही यांची नवी लाट चढू लागल्याचे दिसत आहे (म्युनिच बुलेटिन, ऑक्टोबर १९६३ पृष्ठे ४६-४९).
व्यक्तिस्वातंत्र्याचे पडसाद
पण आता सोव्हिएट रशियांत पूर्वीप्रमाणेच अनियंत्रित दडपशाही चालू शकेल असें वाटत नाही. साहित्य, विज्ञान, अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रांत रशियन माणूस जरा ताठर बनूं लागल्याच्या वार्ता येत आहेत. धर्माच्या क्षेत्रांतहि त्या व्यक्तिस्वातंत्र्यवादाचे पडसाद उमटू लागले आहेत. चर्चचे अधिकारी थोडी थोडी प्रतिकाराची भाषा बोलूं लागले आहेत. अलेक्झांडर ओपिसॉव्ह, निकोलाय स्पास्की, पावेल डरमान्स्की हे लोक एके काळी धर्मगुरु होते. पण ते नंतर शासनाला जाऊन मिळाले व 'धर्मनाश हा एकच सत्यमार्ग होय,' असा प्रचार करूं लागले. शासनाने त्यांना पाठिंबा देऊन 'प्रवदा' पत्रांत त्यांची पत्रे व लेख छापून त्यांचा गौरव केला. तरीहि मॉस्कोपीठाचे आचार्य अलेक्सी यांनी त्यांच्यावर बहिष्कार पुकारला ! निरनिराळ्या स्त्रीपुरुषांनी, शाळेतल्या शिक्षकांनीहि आपल्या अनन्य धर्मश्रद्धेची ग्वाही देणारीं पत्रें वृत्तपत्रांकडे धाडली व त्यांनी तीं प्रसिद्धहि केलीं ! लिडा नांवाच्या शिक्षिकेने तर दहा वर्षांची शाळेतली नोकरी सोडून कॉन्व्हेंटमध्ये जाऊन जोगीण होण्याचा आपला विचार जाहीर केला. रशियन जनता धर्मरक्षणासाठी शासनाच्या प्रतिकारार्थं हळूहळ सिद्ध होत आहे, असा याचा अर्थ दिसतो (म्युनि बुलेटिन, जुलै १९६०, पृष्ठे ३६, ३७ ).
आणि पन्नास वर्षांतील भयानक अत्याचार, जुलूम व हत्याकांडें सोसूनहि धर्माचें पुनरुज्जीवन करण्याची त्या जनतेंत धमक राहिली असेल, तर वरील अर्थ खरा आहे असें म्हणावें लागेल. रशियांत धर्माचें पुनरुज्जीवन होत आहे यांत शंकाच नाही. जॉन गुंथरचें मत वर दिलेंच आहे. सध्या सरकार धर्मपीठाला आर्थिक साह्य देत नाही. पण लोकच इतकी वर्गणी व इतक्या देणग्या देतात की, धर्मपीठाचें कार्य व्यवस्थित चालू राहण्यास प्रत्यवाय येत नाही. प्रार्थनामंदिरें नित्य भरून जातात. धर्माचार्यांच्या प्रवचनाला हजारो लोक जमतात, विवाह धार्मिक विधीने व्हावेत ही इच्छा लोकांत वाढत आहे, हे पुरावे सबळ आहेतच. पण त्यापेक्षाहि कम्युनिस्ट पत्रांनी धर्मप्रगति पाहून व्यक्त केलेला संताप हा जास्त निर्णायक पुरावा होय. 'सॉव्हेट्स्काया रोशिया' हें पत्र म्हणतें (१२-४-६३), "सध्या निरीश्वर- वादाचा प्रचार नव्या जोमाने चालू झाला आहे हें खरें; पण एकंदरीत तो निष्फल आहे असें दिसतें. भाविकांच्या चित्ताला तो अजूनहि स्पर्श करूं शकत नाही ", "आपण पन्नास वर्षे सतत मोहीमशीर असूनहि लोकांतील धर्मभावना अजूनहि नष्ट होत नाही याचें स्पष्टीकरण आपण दिलें पाहिजे," असें दुसऱ्या एका पत्राने सुचविलें आहे. एका अभ्यासकाने तर म्हटलें आहे की, "नास्तिक पंथाच्या प्रचारकांत आता पूर्वीसारखा आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यांच्या ठायीं पूर्वीचा आवेश, पूर्वीची तिडीक आता उरलेली नाही. त्यामुळे धर्माचा उच्छेद कधी काळी होईल ही आशाच आता धरतां येत नाही " (म्युनिच बुलेटिन, सप्टेंबर १९६३, पृष्ठे ४४-४८).
देवधर्मापुढे शरणागति
पण तसा आवेश असतां, तिडीक असती तरी धर्माचा उच्छेद झाला नसता. धर्माचा, ईश्वराचा, मुक्तिकल्पनेचा मृत्यूनंतरच्या अमर जीवनाचा म्हणजे या श्रद्धांचा एखाद्या देशांतून कधी उच्छेद होऊं शकेल ही कल्पनाच भ्रांत आहे. मानवाला भाकरीइतकीच देवाची गरज आहे; त्यावांचून त्याचें जीवन वैराण होईल, भकास होईल. मानवी समाज त्या श्रद्धेवांचून जगू शकणारच नाही. सेक्युलॅरिझमचा हिरीरीने पुरस्कार करणाऱ्यांनी हें सत्य मान्य करूनच पावलें टाकली पाहिजेत; नाही तर फसगत होईल. गौतमबुद्धाने परमेश्वर अमान्य केला होता, पण त्याच्या अनुयायांनी त्यालाच परमेश्वर मानले. आज विसाव्या शतकांतील विज्ञानयुगांत रशियांत हेंच घडत आहे. लेनिन, स्टॅलिन यांनी देव नष्ट केला, तर लोक त्यांनाच देव मानूं लागले. रशियांत अनेक घरांत व चर्चमध्येहि प्राइस्ट, मेरी यांच्याबरोवर लेनिनचा फोटो लावून त्याला हार घातलेला आढळतो. शिवाय धर्म ही एक महाप्रेरणा आहे हें रशियाला दुसऱ्या महायुद्धाने दाखवून दिले आहे. खऱ्या कसोटीच्या वेळीं माणसाला बळ देणारी हीच प्रेरणा आहे, हें ध्यानांत आल्यानंतरहि आणि त्या प्रसंगी स्टॅलिनसारख्या दंडशहालाहि देवधर्माला शरण जावें लागलें हें पाहिल्यानंतर हि पुन्हा धर्माचा उच्छेद करण्याची भाषा बोलणारे कम्युनिस्ट हे कमालीचे पोथीनिष्ठ आहेत असेंच म्हणणे प्राप्त आहे.
धर्मभावनेचें जतन करावयाचें म्हणजे तिच्यावर साचलेल्या सर्व जळमटांचे रक्षण करावयाचें असें नव्हे. या भावनेतून धर्मभोळेपणा, भोंदूगिरी, असहिष्णुता, परलोकनिष्ठा, निवृत्ति, शब्दप्रामाण्य इत्यादि अनेक अनर्थ निर्माण होतात हें खरें. पण विज्ञानाच्या, तर्काच्या, बुद्धीच्या साह्याने हीं बांडगुळे छाटून टाकून परमेश्वरावरील श्रद्धा, आत्म्याच्या अमरत्वावरील निष्ठा, सर्व भूतांचं ऐक्य हीं मूळ धर्मतत्त्वें जोपासता येतात, हें इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी या देशांनी दाखवून दिले आहे. ही तत्त्वें तर्काधिष्ठित आहेत म्हणून तीं जतन करावी असें नाही. त्या श्रद्धा म्हणजे मानवजातीचें जीवन आहे, हे ध्यानी घेऊन त्यांची जपवणूक केली पाहिजे. मानवी स्वभाव आपण बदलूं शकतो अशी कम्युनिस्टांची प्रतिज्ञा आहे. पण कुटुंबसंस्था, परंपराभिमान, खाजगी मालमत्ता या प्रत्येक बाबतीत त्यांना माघार घ्यावी लागली आहे. धर्माच्याहि बाबतीत त्यांना हाच अनुभव येईल आला आहे, येत आहे. तेव्हा धर्म हा शक्य तितका विशुद्ध, विज्ञानपूत, तर्कशुद्ध करून घ्यावा व त्या मूलप्रेरणेचें जतन करावें यांतच शहाणपणा आहे, हें इहवादी विचारवंतांनी ध्यानीं घेतलें पाहिजे.
सेक्युलर म्हणजे इहवादी, ऐहिकनिष्ठ, या जगांतल्या व्यवहाराला, जीवनाला महत्त्व देणारे; आणि सेक्युलॅरिझम म्हणजे इहवाद. मध्ययुगाच्या आरंभीं युरोपांत धर्मसत्ता सर्वंकष होती. ती तशी नसावी व परलोक, अध्यात्म, मोक्ष या क्षेत्रांपुरती तिची सत्ता मर्यादित करून राजकीय, सामाजिक, आर्थिक- सर्व ऐहिक व्यवहार हा शासनाच्या, राजसत्तेच्या वा लोकांच्या ताब्यांत द्यावा अशी त्या वेळच्या इहवादी पंडितांची मागणी होती. अशी मागणी कां निर्माण झाली याचा विचार पाहिला, तर असें दिसून येतें की, आपल्या अध्यात्मशक्तीमुळे आपल्याला राजकारण, विज्ञान, समाजशास्त्रे, इतिहास, भूगोल या क्षेत्रांत सर्व कांही समजतें असा धर्मपीठांचा, धर्मपंडितांचा व धर्मगुरूंचा दावा होता. प्रत्यक्षांत त्यांना तसें कांही समजत नसे व त्यामुळे वेळोवेळीं अनर्थ होत असत. विज्ञानसंशोधन, तर्कशास्त्र, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद यांना धर्मपीठें सक्त विरोध करूं लागलीं, प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध होणाऱ्या गोष्टी अमान्य करूं लागलीं, त्यामुळेच इहवादाची चळवळ फोफावून अनेक देशांच्या शासनांनी रोमच्या धर्मपीठाचा संबंधच तोडून टाकला. याचा अर्थ असा की, धर्मसत्ता व राजसत्ता यांचे प्रांत विभक्त असणें एवढाच जरी इहवाद या शब्दाचा अर्थ असला, तरी त्याचा भावार्थ मोठा आहे. मानवाचा ऐहिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवहार हा तर्क, बुद्धिवाद, प्रत्यक्ष प्रयोगसिद्ध ज्ञान, इतिहासाने दिलेले पाठ यांच्या आधारें चालावा, तो पोथीनिष्ठा, अंधसिद्धान्त, ग्रंथप्रामाण्य यांच्या आधारें चालू नये, हा तो भावार्थ आहे आणि या दृष्टीने पाहतां रशियांत इहवाद आहे असें म्हणणें कठीण आहे. 'डायलेक्टिकल मटीरियालिझम'- विरोध- विकासवाद या मार्क्सप्रणीत तत्त्वावर सोव्हिएट नेत्यांची श्रद्धा जुन्या लोकांच्या बायबलवरील किंवा पोपवरील श्रद्धेपेक्षाहि जास्त अंध आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांतील विचारावर त्या तत्त्वज्ञानाचा अंमल चाललाच पाहिजे, असा त्यांचा पिसाट आग्रह आहे. त्यामुळे, युजीन कामेन्का याने म्हटल्याप्रमाणे, त्या तत्त्वज्ञानाला धार्मिक पंथाचें स्वरूप प्राप्त झाले आहे. कम्युनिझम हा एक धर्मपंथ असून, स्टॅलिन हा त्याचा पोप आहे असें हॅरोल्ड लास्की याने पंचवीस वर्षांपूर्वीच म्हटलें होतें. आजहि तत्त्ववेत्ते तसेंच म्हणत आहेत.
नव्या धर्माची स्थापना
स्टॅलिन जिवंत असतांना, स्टॅलिन म्हणजे पृथ्वीचें तारुण्य, स्टॅलिन म्हणजे जगाचा वसंत ऋतु, सूर्य स्टॅलिनमुळेच प्रकाशतो, स्टॅलिन सर्वज्ञ, सर्वसाक्षी आहे अशी त्याचीं स्तुतिस्तोत्रे रचलीं जात होतीं व इजवेस्तियासारख्या पत्रांत तीं छापलीं जात होतीं. हंगेरींत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्टॅलिनचा फोटो लावण्याचा हुकूम निघाला होता. कशासाठी ? हंगेरियन कम्युनिस्ट पार्टीचा सेक्रेटरी म्हणाला, "त्याच्या दर्शनाने रोगी बरे होतील!" आज स्टॅलिन बदनाम झाला आहे. पण मार्क्स, लेनिन हे पुरुष त्याच्या जागी येऊन बसले आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द वेदवचनाप्रमाणे मानला जातो. त्यांच्या सिद्धान्तावर आक्षेप घेणें म्हणजे मृत्यूला बोलावणेंच ठरतें. त्यांच्या वचनांचा स्वतंत्रपणें अर्थ लावणें हेंहि सोव्हिएट शासनाला मंजूर नाही. बायबलचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त पोपलाच असे. त्याचप्रसाणे मार्क्ससादावर भाष्य करण्याचा अधिकार फक्त सोव्हिएट शासकीय नेत्यांनाच आहे. यावरून असें दिसेल की, धर्म या कल्पनेचें निर्दालन करतां करतां सोव्हिएट नेत्यांनी जुन्या धर्मापेक्षाहि जास्त अंध, दुराग्रही, हेकट, शब्दप्रामाण्यवादी, गूढ, तर्कातीत असा दुसरा एक धर्म निर्माण करून ठेवला आहे.
सोव्हिएट शासन हें कितपत इहवादी आहे याचा निर्णय यावरून आपल्याला करतां येईल. इहवाद याचा बुद्धिवाद, विज्ञानवाद, प्रयोगनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, समता असा शब्दार्थ नसला तरी तसा भावार्थ निश्चित आहे. त्या दृष्टीने पाहतां जुन्या धर्माचें निर्दाळण करून या तत्त्वान्वये सोव्हिएट नेत्यांनी समाजरचना केली असती, तरी सोव्हिएट शासन इहवादी ठरलें असतें. पण तसें त्यांनी केलें नाही. कुटुंबव्यवस्था, शेती, औद्योगीकरण, विज्ञान या सर्वच क्षेत्रांत तें अंधवचनप्रामाण्याने चालू लागेल. त्यामुळे रशियाची अपरिमित हानि झाली आहे. सुदैवाने आता मनु जरा पालटत आहे. तो पालटून तेथे व्यक्तीला प्रतिष्ठा आली, बुद्धीला प्रामाण्य आले तर, पुढील कांही दशकांत सोव्हिएट शासन खऱ्या अर्थाने इहवादी होण्याचा संभव आहे.
३
रशियांतील मुस्लिम समाज, त्याचा धर्म, त्याचे आचार, त्याच्या सामाजिक रूढी यांविषयी इहवादी सोव्हिएट शासनाने प्रारंभापासून कोणतें धोरण स्वीकारले आहे, त्याचा विचार या लेखांत करावयाचा आहे. धर्म ही संस्था समाजघातक आहे, धनिकांचें तें दलितांना शोषण्याचें साधन आहे, ती अफू आहे असाच कम्युनिस्टांचा सिद्धान्त असल्यामळे ख्रिस्ती धर्म, मुस्लिम धर्म, ज्यूंचा धर्म यांत फरक करण्याचें त्यांना कांहीच कारण नव्हतें व नाही. या दृष्टीने सर्वधर्मसमानत्व ते मानतात. त्या सर्वांचा समूळ उच्छेद केला पाहिजे, यांविषयी त्यांना शंका नाही. तेव्हा मुस्लिम धर्माविषयी त्यांचा भिन्न दृष्टिकोन असेल, असें वाटण्याचें कारण नाही.
मात्र सत्ता हातीं येतांच रशियन ऑर्थोडॉक्स चर्चवर सोव्हिएट शासन जसें एकदम तुटून पडलें तसें इस्लामवर पडलें नाही, हें खरें. पण त्याची कारणें साधी आहेत. मुस्लिमांचा रशियन तुर्किस्तान हा प्रदेश मॉस्कोपासून फार दूर, मुस्लिम समाज अत्यंत मागासलेला, त्यांचा धर्माभिमान अत्यंत कडवा, पश्चिम रशियांतील प्रदेशांच्या मानाने तुर्किस्तानांतील कम्युनिस्ट सभासदांची संख्या अत्यल्प, त्या समाजांत कम्युनिझमच्या तत्त्वांचा प्रसारहि अत्यल्प; अशा अनेक कारणांनी अगदी प्रारंभी त्या समाजाविषयी सोव्हिएट शासनाने जरा नरम धोरण स्वीकारलें होतें. पण तें राजनीतीच्या दृष्टीने भिन्न दृष्टिकोनामुळे नव्हे. कारण दोन-तीन वर्षांचा काळ जातांच १९२० साली बाकू येथील काँग्रेसच्या बैठकींत अध्यक्ष झिनोव्हिफ याने मुस्लिम धर्मावर उघड चढाई केली व हिरव्या निशाणाऐवजी लाल बावटा घ्यावा, इस्लामच्या जागीं कॉमिटर्न मानावें व लेनिनला पैगंबर समजावें असा मुस्लिमांना उपदेश केला (करंट हिस्टरी, जून ५७, पृष्ठ ३५२) . यामुळे अर्थातच मुस्लिम समाजांत संतापाची भयंकर लाट उसळली आणि धर्मसंग्राम सुरू झाला. प्रारंभी तो जरा मंद होता, पण १९२८- २९ साली त्याला उग्र रूप आलें. मुल्ला- मौलवी यांना पकडून हद्दपारी, तुरुंग, देहदंड अशा शिक्षा देण्यांत आल्या. मशिदी बंद करण्यांत येऊन त्यांचें तुरुंग, खानावळी, संग्रहालयें यांत रूपांतर करण्यांत आलें आणि जुन्या सर्व शाळा बंद करण्यांत आल्या. या वेळेपर्यंत कम्युनिस्ट तत्त्वांचा प्रचार थोडाबहुत झाला असल्यामुळे गावोगाव सभा भरवून 'मशिदी बंद कराव्या' असे ग्रामस्थांकडूनच कम्युनिस्टांनी ठराव पास करून घेतले. पुढले सर्व विध्वंस, अत्याचार, दडपशाही यांना असेंच 'ऐच्छिक' रूप कम्युनिस्टांनी दिलेले दिसून येतें. हें सर्व सुलभ जावें म्हणून सोव्हिएट शासनाने रशियन तुर्किस्तानची फाळणी करून मुस्लिम प्रदेशाचे सहा तुकडे केले व अझरबैजान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान इत्यादि नांवें देऊन त्यांची सहा प्रजासत्ताकें बनविलीं. अर्थातच मुस्लिमांची प्रतिकारशक्ति यामुळे ढिली झाली (सर्व्हे ऑक्टोवर, १९६० पृष्ठ १५).
भाविकांचा प्रचार
कम्युनिस्टांचा तत्त्वप्रचार सतत, अखंड, झंझावाती वादळी वेगाने चालू असल्यामुळे तुर्किस्तानांत त्यांचे अनुयायी वाढू लागले व 'न्यू मॉस्क', 'तुर्किस्तान मिलिटंट अथेइस्ट' अशा त्यांच्या संस्थाहि निघू लागल्या. पण हे मुस्लिम कम्युनिस्ट मनाने कडवे कम्युनिस्ट झालेले नव्हते. ते कम्युनिझमलाच धर्माचें रूप देऊं लागलें. १९२५-२६ साली शासनाने जमीनवांटपाचा कायदा केला तेव्हा कम्युनिस्ट मौलवी असा प्रचार करूं लागले की, "जो जमीनदार आपण होऊन जमीन सोडील त्याच्यावर परलोकांत अल्लाची कृपा होईल." कांही मुस्लिम कम्युनिस्ट भाविकपणें सांगूं लागले की, "कम्युनिस्टांना अल्लानेच धाडलेले असून, लेनिन हा आगाखानाचा मुलगाच आहे ! "इस्लाम व कम्युनिझम हे एकच असून, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा कुराणावरूनच रचलेला आहे," असाहि प्रचार होऊं लागला. पामीर पर्वतावरील कम्युनिस्ट पक्षाचे इस्माइली सभासद हे आगाखान या आपल्या गुरूला नेहमीप्रमाणे सुवर्णदक्षिणा (जकात) देत राहिले. हें सर्व पाहून खरे नास्तिकपंथी मुस्लिम कम्युनिस्टहि लोकांत आपलें वजन राहवें म्हणून मशिदींत पुन्हा जाऊं लागले. पक्षाची बैठक भरली असतांना नमाज पडण्याची वेळ झाली की, तेवढ्यापुरती बैठक तहकूब करण्याची विनंती त्यांना मान्य करावी लागे. पुढे पुढे हा प्रकार थांबला, पण त्या वेळेपुरते सभासद बैठक सोडून जाऊं लागले (सर्व्हे, ऑक्टोवर १९६०, पृष्ठ १३, १४) कम्युनिस्ट पक्षाला मिळालेल्या लोकांची ही स्थिति; मग खऱ्या पाक मुस्लिमांची काय प्रतिक्रिया असेल याची सहज कल्पना येईल. त्यांनी अत्यंत कडवा प्रतिकार केला व त्यापायी अनेकांनी मृत्यूहि पत्करला. स्त्रियांचा बुरखा व शरियत कायदा या प्रकरणी या प्रतिकाराला अतिशय उग्र रूप आलें होतें. पण त्यांत आश्चर्य करण्याजोगें कांही नाही. केमालापाशा हा स्वत: मुस्लिम होता, तुर्कस्थानचा स्वातंत्र्यवीर होता. पण त्याच्या सुधारणांना सुद्धा तुर्कस्थानांत असाच प्रतिकार झाला. रशियन तुर्किस्तानांत तर कम्युनिस्ट हे अगदी परके व उपरे असेच होते.
१९२७ सालीं तुर्किस्तानांत कम्युनिस्टांनी स्त्रीबंधविमोचनाची चळवळ सुरू केली. तिला 'हदजुम' (चढाई) असें म्हणत. बुरखा नष्ट करणें हें तिचें पहिलें लक्ष्य होतें. त्या सालीं ८ मार्चला जागतिक स्त्रीदिन होता. त्या दिवशी सर्व तुर्किस्तानांत शेकडो सभा घेण्यांत आल्या. त्या सभांना सर्व मिळून लक्षावधि स्त्रिया उपस्थित राहिल्या. एकट्या उझबेकिस्तानांत एक लक्ष स्त्रियांनी बुरखा काढून टाकून त्याचें दहन केलें. त्यांतील बहुसंख्य स्त्रियांनी घरी गेल्यावर पुन्हा बुरखा घेतला, पण त्या सभांमुळे मुस्लिम समाज भडकून गेला व त्याने दहा-पांच दिवसांत बुरखा टाकणाऱ्या चौदा स्त्रियांचे खून केले. पुढल्या वर्षी ८ मार्च या दिवशी हाच प्रकार झाला. त्या साली २०० स्त्रियांचे खून झाले. पण आता स्त्रिया निर्भय होत चालल्या होत्या. सोव्हिएट शासनाचा त्यांना पाठिंबा होता. त्याने खुनी लोक शोधून काढून त्यांना भराभर फासावर चढविलें तेव्हा स्त्रीविमोचनाची चळवळ पसरू लागली. मुस्लिम स्त्रिया पडद्यांतून बाहेर तर आल्याच, पण आता त्या ग्रामपंचायतीच्या सभासदहि होऊं लागल्या आणि अशा रीतीने कम्युनिस्ट सोव्हिएट शासनाच्या पक्षांत त्या पूर्ण सामील झाल्या. वष्किरिया, तार्तरिया या प्रदेशांत बुरखा तितकासा रूढ नव्हता. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या प्रदेशांत बुरखा काढणें म्हणजे इस्लामचा नाश होय, असें मुल्लामौलवींना वाटे. पण वरील प्रदेशांत तशी भावना नव्हती. तेथील मुल्लांनी बुरखा असू नये अशी इस्लामचीच आज्ञा आहे, असा निर्णय दिला. त्यामुळे तेथे फारसे अत्याचार झाले नाहीत. इतकेंच नव्हे, तर स्त्रियांना तेथे मशिदींतहि प्रवेश मिळू लागला व गावकारभारांतहि त्यांना सुखाने सहभागी होतां येऊ लागलें. यामुळे स्त्रीदास्य-विमोचनाच्या चळवळीस हळूहळू यश येऊं लागलें. अर्थात् तें एकदम आलें किंवा त्याचें मार्गक्रमण सुखाने झालें असें नाही. उझबेकिस्तान, तुर्कमेनिया या प्रांतांतून पुरुष आपल्या स्त्रियांना सक्तीने बुरखा घालण्यास भाग पाडतात, अशा तक्रारी बरेच दिवस येत राहिल्या. अगदी १९३९ साली बुरखा टाकल्याबद्दल दहा स्त्रियांचे खून पडले आणि रफियेवा या स्त्रीचा खून तर तिच्या नवऱ्यानेच केला. पण हे सर्वच प्रकार हळूहळू बंद पडून आता सोव्हिएट रशियांतील मुस्लिम स्त्री बव्हंशी पुराण- बंधनांतून मुक्त झाली आहे.
अरबीऐवजी लॅटिन
शरियत हा मुस्लिमांचा धर्माधिष्ठित असा कायदा आहे. त्यांत एक अक्षराचाहि बदल झालेला चालणार नाही, अशी कडव्या सनातनी मुस्लिमांची प्रतिज्ञा आहे. पण तुर्कस्थान, इजिप्त, सिरिया, इराक या मुस्लिम देशांतहि तो मूळ स्वरूपांत राहिलेला नाही. सोव्हिएट रशियांत तर नाहीच नाही. सत्ता हाती येतांच इस्लामशीं संग्राम करण्याचें धोरण ठरवून सोव्हिएट शासनाने, इस्लामच्या तीन संस्था नष्ट करण्याचें ठरविले; १ वक्फ धर्मसंस्थांची स्थावर-जंगम मिळकत, २ कुराणप्रणीत धार्मिक विद्यालये आणि ३ शरियत न्यायालयें, या त्या तीन संस्था होत. वक्फच्या आश्रयानेच मुस्लिम धार्मिक शाळा चालत. नव्या पिढीचें शिक्षण मुल्ला-मौलवींच्या हाती ठेवावयाचें नाही हा तर सोव्हिएट शासनाचा कृतनिश्चय होता. समाजवादी समाजरचनेच्या स्थापनेसाठी, उभारणीसाठी सोव्हिएट नेत्यांना नवा माणूस निर्मावयाचा होता. मुल्ला-मौलवींच्या शाळांतून असा माणूस निर्माण होणे शक्य नव्हतें. विज्ञान, जडवाद, मार्क्सवाद, त्यांतील विरोधविकासवाद, नास्तिकवाद, यांचे शिक्षण त्यांना विद्यार्थ्यांना द्यावयाचें होतें. म्हणून त्यांनी प्रथम वक्फ जप्त केलें व जुन्या शाळा बंद करून तेथे सर्वत्र नव्या शाळा स्थापन केल्या. नव्या शाळांत त्यांनी रशियन भाषा सक्तीची केली व अरबी लिपीच्या ऐवजी लॅटिन लिपी आणली. मुलींना मुलांप्रमाणेच शिक्षण देण्याची व्यवस्था केली आणि अनेक ठिकाणी मुलामुलींचें एकत्र शिक्षणहि रूढ केलें.
वर सांगितलेले स्त्रीबंधविमोचन आणि हें नवें भौतिकवादी शिक्षण हें शरियतला मान्य होणें शक्य नव्हतें. केमालपाशाने तर सत्ता हाती येतांच एक-दोन वर्षातच शरियत हा मुस्लिम कायदा बंद करून स्विस कायदा तुर्कस्थानांत जारी केला. सोव्हिएट नेत्यांनी तेच धोरण, पण जरा मंदगतीने अमलांत आणले. दरसाल कांही शरियत न्यायपीठे बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला. उझबेकिस्तानांत १९२५ सालीं अशीं ८७ न्यायपीठें होतीं तीं १९२६ साली त्यांनी २७ केली व १९२७ सालीं शून्यावर आणली.
तुर्किस्तानांतील मुस्लिम समाजाने याचा अत्यंत कडवेपणाने व निर्धाराने प्रतिकार केला पण सोव्हिएट शासनाने त्याच्या दसपट क्रौर्याने तो मोडून काढला. कॉकेशस मध्ये अडझर प्रजासत्ताकांत आणि चेचियानामध्ये भयंकर दंगे झाले. चेचियानांत अनेक इमाम एकत्र येऊन त्यांनी कम्युनिस्टांविरुद्ध जिहाद पुकारला. त्यांतील मुख्य इमाम सदसेव यास सरकारने पकडलें तेव्हा अल्लाची कृपा असलेल्या मनुष्याला सरकार पकडूं शकेल, यावर लोकांचा विश्वास बसेना. तेव्हा त्याचा खटला जाहीरपणे चालवून त्याला मृत्युदंड देण्यांत आला. तेव्हा मग जीर्णमतवादी मुस्लिमांना प्रतिकार हळूहळू ओसरू लागला.
युरोपीय पश्चिम रशियाप्रमाणेच तुर्किस्तानांतहि युद्धकाळांत धर्मविरोधी आघाडी बंद करण्यांत आली होती. मुस्लिमांच्या धर्मभावनांची जपणूक करून, त्यांना युद्धांत सहभागी होण्यास अनुकूल करावें, अने प्रयत्न त्या काळांत सोव्हिएट नेते करीत होते. त्यांना यशही आले होते. पण युद्ध संपल्यानंतर इस्लामवर पुन्हा हल्ले सुरू झाले. 'एसेज् इन दि स्टडी ऑफ इस्लाम इन् दि यू. एस्. एस्. आर्.'- लेखक स्मर्नाव्ह- हें पुस्तक रशियांतील सायन्स ॲकॅडमीने १९५४ मध्ये प्रसिद्ध केलें. या पुस्तकाच्या पानापानांत इस्लामचा द्वेष भरला आहे. याच वेळी सोव्हिएट पंडित इस्लामविरोधी प्रचार आणि नास्तिक पंथाचा प्रचार पुरेसा होत नाही, अशी तक्रार करीत होते. पण असे असूनहि आता तुर्किस्तानांत कम्युनिस्ट तत्त्वाज्ञनाचा प्रसार खूपच झाला असल्यामुळे सोव्हिएट शासनाच्या धोरणाचे समर्थन करणारे अनेक मुस्लिम लेखक, पंडित, मुत्सद्दी व धर्मगुरूहि आढळून येऊ लागले. तेव्हा सोव्हिएट नेत्यांच्या क्रांतीच्या प्रयत्नाला बरेंच यश आलें आहे, येत आहे, असे दिसून येतें. ताजिक साहित्य- परिषदेचे अध्यक्ष मिर्झो टुरसन झेद, कझाक लेखक मुखतार औसोव्ह, अवई कुनंवयेव हे या वर्गातले लेखक आहेत. मार्क्सवाद, ऑक्टोबर क्रांति यांचा गौरव करून ते इस्लामच्या वर्चस्वावर मुल्लांच्या पिसाटपणावर कडक टीका करतात. अशा लेखकांचा सोव्हिएट नेते, रशियाबाहेर, रशियांतील धर्मस्वातंत्र्याचा, सर्वधर्मसमानत्वाचा प्रचार करण्यासाठी उपयोग करून घेतात. १९५५ सालापर्यंत मुस्लिम लेखक, पंडित, वक्ते यांना रशियाबाहेर जाण्यास मुभा नव्हती. आता ते बाहेर जाऊन, सोव्हिएट नीतीचा गौरव करतील अशी खात्री झाल्यामुळे, अशा लोकांची सदिच्छा मंडळें बाहेर पाठविण्यांत येतात. इमाम सापोकारी यांच्या अध्यक्षतेखाली असें एक मंडळ १९५५ साली मक्केला गेलें होतें. पुन्हा १९५६ सालीं कमरुद्दिन सालिखोव्ह यांच्या नेतृत्वाखाली असेंच एक दुसरें मंडळ अनेक मुस्लिम देशांत जाऊन आले. यांत अनेक मुल्ला होते व त्यांनी मक्केला सर्व धार्मिक विधीहि केले !
श्रेष्ठतेची अहंभावना
हीं शिष्टमंडळे, हे विद्वान लोक बाहेरच्या देशांत जाऊन, रशियांत पूर्ण धर्मस्वातंत्र्य आहे, असा प्रचार करतात. वरील मंडळाने इजिप्तमध्ये अनेक व्याख्यानें दिली व त्यांत, खरें धर्मस्वातंत्र्य रशियांतच आहे, तेथे मुस्लिमांना स्वतःच्या मद्रसा (शाळा) चालवितां येतात, धार्मिक वाङमय प्रसिद्ध करतां येतें असें मोठ्या अभिमानाने सांगितले, आणखी एक विचार रशियाबाहेर जाणाऱ्या लोकांच्या व्याख्यानांतून नित्य व्यक्त होत असतो. रशियन तुर्किस्तानांतील मुस्लिम हे इतर देशांतल्या मुस्लिमांपेक्षा श्रेष्ठ असून, त्या इतर कमनशिबी धर्मबंधूंना साह्य करून त्यांना सुधारणें हें आपले कर्तव्य आहे, असें ते सांगत फिरतात. एका अमेरिकन अभ्यासकाने १९५३ साली ३१ मुस्लिम निर्वासितांची मुलाखत घेतली. त्यांच्या बोलण्यांतहि हा भाव दिसून आला. सोव्हिएट मुस्लिमांबद्दल ते अभिमानाने बोलत होते व इराणी, तुर्की व एकंदर आशियाई मुस्लिमांची मागासलेले, अंधश्रद्ध अशी हेटाळणी करीत होते. यावरून सोव्हिएट मुस्लिमांच्या ठायीं ही श्रेष्ठतेची अहंभावना निर्माण करण्यांत सोव्हिएट शासनाला यश आलें असावें असें दिसतें. (करंट हिस्टरी, जून १९५७ पृ. ३५५-५६).
चीन आणि रशिया यांचे आज वैमनस्य असलें तरी धर्माचा उच्छेद करण्याविषयी त्यांच्या धोरणांत मुळीच फरक नाही. १९६६ साली रेडगार्ड संघटनेचा उठाव झाला होता तेव्हा इस्लामवर भयानक अत्याचार करण्यांत आले. रेडगार्डस् यांनी 'इस्लामचा नाश करणारें क्रांतिमंडळ' नांवाचें एक मंडळच स्थापन केलें होतें. त्या मंडळाने 'मशिदी बंद करा, कुराणपठन बंद करा, धार्मिक विवाह बंद करा' अशी भित्तीपत्रके लावली व मुस्लिमांचे सर्व आचार, रूढि, धर्मविधि ताबडतोब नष्ट करणें हें आपले उद्दिष्ट असल्याच्या घोषणा चालू केल्या. पेकिंगमध्ये जवळ जवळ एक लक्ष मुस्लिम नागरिक आहेत. १९६७ सालीं रेडगार्डस् चा मोहरा त्यांच्याकडे फिरला. आणि त्यांनी मशिदींचा विध्वंस केला, व मुस्लिम धार्मिक आचारांची विटंबना केली. या काळांत मारामाऱ्या, रक्तपात, अत्याचार, खून यांना ऊत आला होता.
राक्षसी अत्याचार
चीनमध्ये बौद्धधर्मीयांची संख्या फार मोठी आहे. पण त्यांची स्थिति तशी कांही निराळी नाही. धर्म या कल्पनेचेच कम्यनिस्ट हे वैरी असल्यामुळे मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध असा भेदाभेद ते करीत नाहीत. तिबेट चीनच्या हातीं आल्यानंतर कम्युनिस्टांनी तेथे जे राक्षसी अत्याचार केले त्यांचें वर्णन "इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्टस्" या मंडळाने आपल्या अहवालांत केलें आहे. त्यावरून कम्युनिस्टांच्या धर्मद्वेषाची व इहवादाची चांगली कल्पना येते. अनेक लामांची त्यांनी विटंबना केली, शेकडो लामांचा शिरच्छेद केला आणि त्यांचे बहुतेक सर्व मठ उद्ध्वस्त करून टाकले. आणि दर वेळीं "तुमच्या धर्माला, तुमच्या देवाला, आता हाका मारा, म्हणजे तो तुमचें रक्षण करील" अशा डागण्या ते देत असत.
चीनचें व रशियाचें आज वाकडें आहे. त्यामुळे प्रवदा, कॉम्युनिस्ट यांसारखी पत्रे चीनला बदनाम करण्यासाठी, तेथे चालू असलेल्या धर्मावरील अत्याचारांचीं भडक वर्णने करतात. मॉस्कोच्या कॉम्युनिस्ट पत्रांतील हें वर्णन पहा- "चीनमधील सांस्कृतिक क्रांतींत मुस्लिमांच्या मशिदी, बौद्धांचीं मंदिरें व मठ यांचा विध्वंस होत आहे. उश्गूर, ह्यू, तिबेटी, मंगोल, कझाख यांच्या धर्मभावनांचा पदोपदीं अपमान होत आहे. माओचे ठग, पेंढारी मुस्लिमांना मृतांचें दहन करण्यास भाग पाडतात व डुकराचें मांस सक्तीने खायला लावतात."
'ओपिनियन' या पत्रांत (३०-७-१९६८) ही सर्व हकीगत देऊन लेखक ए. जी. नुराणी म्हणतात, "हें सर्व खरें आहे, पण ही टीका करण्याचा रशियाला काय अधिकार आहे ? रशियांत असेच अत्याचार चालू आहेत. आणि हेहि कॉम्युनिस्ट या पत्रावरूनच दिसून येते. एकीकडे रशियांतील धर्मस्वातंत्र्याचा गौरव व चीनमधील अत्याचारांचा निषेध चालू असतांनाच "आमच्या निरीश्वर पंथीयांनी इस्लामचें वर्गीय रूप लोकांना उघड करून दाखविलें पाहिजे; सत्ताधारी वर्गाचे कप्कटरी जनतेला शोषणाचे इस्लाम हें कसें साधन होतें तें इतिहासाच्या आधारें स्पष्ट केलें पाहिजे; आणि मुस्लिम मुल्ला-मौलवींचा, कम्युनिझम व इस्लाम यांत भेद नाही, हा ढोंगी फसवा प्रचार हाणून पाडला पाहिजे. असा उपदेश तेंच पत्र करीत होते."
जे रशियन ऑर्थोडॉक्स चर्चेच्या धर्माविषयी म्हटले तेंच इस्लामविषयी म्हणावेंसें वाटतें. त्या समाजाची धर्मभावना समूळ नष्ट करणें कालत्रयी शक्य नाही हें प्रारंभापासूनच कम्युनिस्टांनी जाणलें असतें व भौतिक विज्ञानवादी दृष्टिकोनांतून त्या धर्माची सुधारणा करण्याचें धोरण केमालपाशासारखें आखलें असतें तर आतापेक्षा मुस्लिम समाजाची कम्युनिझमच्या दृष्टीने सुद्धा जास्त प्रगति झाली असती. कारण, इस्लाममध्ये कम्युनिझमचींच तत्त्वें आहेत, असें सांगणारा एक फार मोठा वर्ग रशियन तुर्किस्तानांत लवकरच निर्माण झाला होता. पण कम्युनिस्ट अजूनहि धर्माकडे त्या दृष्टीने पाहण्यास तयार नाहीत. त्यामुळे रशियांत अंतर्गत धोरण एक व परराष्ट्रांसाठी दुसरें असा ढोंगीपणा, दुटप्पीपणा त्यांना करावा लागत आहे. आणि तो अगदी विनाकारण. राजनीतींत हें सर्व करावें लागतें. पण तसें करण्याचें येथे कांहीच कारण नव्हतें- पण नव्हतें असें कसें म्हणावें ? "डायलेक्टिकल मटीरियालिझम" हें मोठें कारण आहे ना ! तो भ्रांत सिद्धान्त सोडावयास अजूनहि ते तयार नाहीत. कारण तो सोडावयाचा म्हणजे आत्माच सोडावयाचा अशी कम्युनिस्टांची श्रद्धा आहे. वास्तविक मूळ तत्त्वांचा वाटेल तो अर्थ फिरविण्यांत कम्युनिस्ट अत्यंत निष्णात आहेत. तसा विरोधविकासवादाचा अर्थ फिरवून धर्मतत्त्वांचा त्यांत त्यांना समावेश करतां आला असता, नवीन भाष्य लिहितां आलें असतें. तशा भाष्यांवरच जग चाललें आहे. सोव्हिएट रशियाचा प्रपंचहि मूळ मार्क्सवादावर चाललेला नसून त्याच्या भाष्यावरच चाललेला आहे. कुटुंबसंस्थेच्या बाबतीत त्यांनी अशा भाष्याचाच अवलंब करून चांगले यश संपादन केलें आहे. कडव्या मार्क्सनिष्ठ इहवादांतच त्यांनी सनातन कुटुंबसंस्था- मातृत्व, पातिव्रत्य, अपत्यप्रेम, अष्टपुत्रा यांसह- बसविली आहे. येथे एवढेच सांगावयाचें आहे की, हें भाष्यरूपाने सुधारणा करण्याचें धोरण इस्लामविषयी त्यांनीं स्वीकारलें असतें तर रक्तपात, प्राणहानि हें सर्व वांचलें असतें. पण मग कदाचित् त्यांत प्रौढी मिरवण्याजोगें कांही झालें नसतें. औरंगजेब म्हणत असे की, "लक्षवधि माणसे मरतात तेव्हाच तैमूरसारखी कीर्ति मिळते." डायलेक्टिकल भौतिकवादाचा हाच संदेश आहे.
४
कोणत्या शासनाला इहवादी शासन म्हणावें याची थोडी चर्चा आपण यापूर्वी केली आहे. समाजाचें कल्याण कशांत आहे याचा तर्कशुद्ध, शास्त्रीय, ऐतिहासिक पद्धतीने विचार करून तें कल्याण साधेल असे कायदे करणारे शासन इहवादी शासन असें त्या चर्चेवरून आपणांस म्हणतां येईल. धर्माचें वर्चस्व इहवादी शासन मानीत नाही याचेंहि कारण हेंच आहे. बहुधा सर्व धर्म शब्दप्रामाण्यवादी, परलोकवादी, देशकाल न पाहणारे परिवर्तनविरोधी असे असतात. त्यामुळे त्यांचें वर्चस्व शासनावर असलें की, तर्क, इतिहास, प्रत्यक्ष प्रयोग यांवरून सिद्ध होणारी समाजाच्या उत्कर्षापकर्षाची मीमांसा त्याला स्वीकारतां येत नाही. आणि मग प्रगतीशील कायदे करतां येत नाहीत. पाश्चात्य शासनांना इहवादी होण्याची आवश्यकता पांच-सहा शतकांपूर्वी भासूं लागली त्याचें कारण हें आहे. आजहि सेक्युलॅरिझमचा सर्वत्र स्वीकार होत आहे त्याचें कारण हेंच आहे. (आपापल्या समाजाच्या प्रगतीचा मार्ग आखतांना लोकांना त्या मार्गांत अडथळा आणणारी धर्मबंधनें नको आहेत.)
सोव्हिएट शासनाने आपण इहवादी असल्याचें घोषित केलें तें त्यासाठीच. रशियांतील धर्मसंस्थांविषयी नवे कायदे करतांना त्याने इहवादाला कोणतें रूप दिलें तें आपण पूर्वी पाहिलेंच आहे. आता तेथील कुटुंबसंस्थेचा या दृष्टीने विचार करावयाचा आहे. समाजवादी व्यवस्थेत धर्माला स्थान असूच शकत नाही, या भूमिकेसारखीच कुटुंबसंस्थेबद्दलहि कम्युनिस्टांची प्रारंभी भूमिका होती. अशी भूमिका असण्याचें मुख्य कारण हे की, जुन्या कुटुंबव्यवस्थेत स्त्री ही गुलाम होती. कुटुंबांतील या स्त्रीच्या दास्यामुळे निम्मा समाज शृंखलाबद्ध होऊन बसतो व समाजवादी उत्पादनाला त्या प्रचंड शक्तीचें साह्य लाभू शकत नाही, हें कारण लेनिन नेहमी सांगत असे. कुटुंबसंस्थेचा कम्युनिस्टांना द्वेष वाटण्याचें दुसरें कारण असें की, जुना अंध धर्म, जुन्या परंपरा, जीर्णमतवाद, अंधश्रद्धा, घातक रूढि यांचा कुटुंबसंस्था हा मोठा आधार असतो. सोव्हिएट नेत्यांना कम्युनिस्ट मानव निर्माण करावयाचा होता. बालवयांत हा मानव जर या संस्कारांत वाढला तर त्याची मानसिक क्रांति करणें जवळ जवळ अशक्य होऊन बसतें. म्हणून बालपणापासूनच मुलांना घरापासून, आई-बापांपासून व त्या जुनाट अंधश्रद्ध वातावरणांतून दूर नेणें अवश्य होतें. कुटुंबसंस्थेवर त्यांना आघात करावयाचा होता तो यासाठी. प्लेटोच्या काळापासून कुटुंबसंस्था ही समाज विकासाच्या आड येते असें एक मत रूढ होतें. कौटुंबिक संस्कारांमुळे मनुष्याची दृष्टि बहीण, भाऊ, आई, बाप आणि आपली मुलेबाळें यांच्यापुरतीच मर्यादित राहते. त्यांच्या कल्याणाचीच फक्त जबाबदारी आपल्यावर आहे अशी त्याची भावना होते. ती संस्था नष्ट केली, तर त्याची दृष्टि समाजांतील सर्व बंधु-भगिनींपर्यंत पसरून विशाल होईल असें प्लेटो म्हणत असे. कम्युनिस्टांच्या कुटुंबविरोधाचें तेंहि एक कारण होतें.
येथे आपण एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे की, धर्मसंस्थेला कम्युनिस्टांच्या आद्य भाईचा जसा तात्त्विक व प्रखर विरोध होता तसा कुटुंबसंस्थेला नव्हता. मार्क्स, एंगल्स, लेनिन, यांच्या लेखनांत धर्माप्रमाणे कुटुंबसंस्थेची प्रत्यक्ष हेटाळणी नाही. एकनिष्ठा, मातृत्वगौरव, पातिव्रत्य ही भांडवली बूर्झ्वा कुटुंबाची लक्षणं होत, असें एंगल्सने म्हटले आहे. पण समाजवादांत ही संस्थाच नष्ट होईल असें त्याने म्हटलेले नाही. उलट तेव्हाची कुटुंबसंस्था जास्त चांगली असेल असें त्याने म्हटले आहे. पण असें असले तरी, स्त्री- दास्यविमोचनासाठी व नवमानवनिर्मितीसाठी सोव्हिएट नेत्यांनी प्रारंभीं कुटुंबसंस्थेविषयी जे कायदे केले त्यामुळे तिचा संपूर्ण उच्छेद होत आला होता, हें खरेंच आहे. धर्मवर्चस्व असलेल्या कोणत्याहि शासनाला असे कायदे करता आले नसते.
सुलभ घटस्फोट.
१९१७ सालीं सत्तारूढ होतांच कम्युनिस्टांनी पहिल्या तडाख्यांत चर्च-विवाह बंद करून नोंदणी-विवाहाचा कायदा केला. पण प्रत्यक्षांत धार्मिक विवाहाला विरोध, इतकाच त्याचा अर्थ झाला. कारण विवाहनोंदणीची व्यवस्था झाली तरी विवाहाला नोंदणी अवश्य होतीच असें नाही. नोंदणी न करतांहि पति-पत्नी म्हणून संसार मांडण्यास शासनाने परवानगी दिली होती. अर्थात् यामुळे औरस व अनौरस संतती हा भेदच नष्ट झाला. अनौरस संततीला सोव्हिएट कायद्याने औरस संततीइतकीच प्रतिष्ठा मिळवून दिली. १९१७ च्या या कायद्याने दुसरी गोष्ट केली ती ही की, त्याने घटस्फोट अत्यंत सुलभ करून टाकला. दोघांनी न्यायालयांत उपस्थित असण्याची जरुरी नाही, दोघांची संमति अवश्य नाही, कारणें देण्याची गरज नाही. नोंदणी कार्यालयांत जाऊन पति-पत्नीपैकी एकाने जरी इच्छा दर्शविली, तरी घटस्फोट मिळू लागला. मग दुसऱ्याला पत्र टाकून कळवायचें ! स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीबंधविमोचन, स्त्रीपुरुष समता हें तर या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट होतें. त्या कायद्याने ते पूर्णपणें प्रस्थापित केलें. आज्ञापालन नाही, सेवा नाही, बोलणीं खाणें नाही. स्त्री सर्वांतून मुक्त झाली. पतिपत्नी साधारण एकत्र राहत हें खरें पण या कायद्याने न राहण्याचें स्वातंत्र्य स्त्रीला देऊन टाकले होते. स्त्रीने कोणता उद्योग करावा हें ठरविण्याचा तिला अधिकार मिळाला. पतीच्या परवानगीची जरूरी नाहीशी झाली. त्याचप्रमाणं आर्थिक स्वातंत्र्यहि तिला मिळाले. तिच्या पैशावर पतीचा हक्क मुळीच राहिला नाही.
स्त्री समाजवादी उत्पादनाला धनोत्पादनाला पूर्ण मोकळी झाली पाहिजे हा कम्युनिस्टांचा पहिल्यापासून कटाक्ष. पण घर, स्वैपाक, मुले सांभाळणे यांतून तिची सुटका झाल्यावांचून तें शक्य नव्हतें. तेव्हा कम्युनिस्टांनी सार्वजनिक भोजनगृहें व शिशुगृहें स्थापन केली. त्यामुळे स्त्री कम्युनिझमच्या उभारणीसाठी पूर्ण मुक्त झाली. पण अजून एक बंधन राहिलें होतें. गर्भधारणा ! स्त्रीची इच्छा नसतांनाहि पुष्कळ वेळा गर्भधारणा होते. हा जुलूम चालू देणें हें भांडवलशाहीचें लक्षण. तेव्हा सोव्हिएट शासनाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली. आणि सरकारी दवाखान्यांत त्याची सोय करून ठेवली.
हे सर्व कायदे पाहिल्यानंतर कुटुंबसंस्थेचा संपूर्ण उच्छेद व्हावा या उद्देशानेच ते केलेले होते हे स्पष्ट दिसून येतें. विवाहविधि नाही, नोंदणी नाही. म्हणजे विवाहच नाही. घटस्फोट अत्यंत सुलभ. मॉरिस हिडसने लिहिल्याप्रमाणे, नवा बूट घेण्यापेक्षाहि सुलभ. प्रपंचाची जवाबदारी नाही, औरस, अनौरस भेद नाही. एकत्र राहणें नाही, गर्भधारणेची चिंता नाही ! मग कुटुंबसंस्था काय राहिली ?
भयंकर परिणाम
एरवी कुटुंबसंस्था नष्ट झाली असती तरी तिचें सोयरसुतक कम्युनिस्टांनी धरलें नसतें. पण तिच्या अभावीं सर्व समाजच अधोगतीला जात असलेला पाहून ते सावध झाले. घर ही संस्था नष्ट झाल्यामुळे अत्यंत भयंकर परिणाम झाला तो मुलांच्यावर. कुटुंबांतून मुलें हिरावून घेऊन क्रेश नांवाच्या संस्थांतून त्यांना ठेवण्याची सोय केलेली होती. पण या सरकारी शिशुगृहांत मुलांची नीट वाढ होईना. त्या खात्याच्या मुख्य मॅडम लिबिदेवा यांनी स्पष्ट शब्दांत अहवाल लिहिला की, गृहांतील मुलें दुबळी, अर्धवट, हीन, रोगट अशी होतात. सध्या तरी येथल्यापेक्षा घरीं आईने वाढविलेलीं मुलेंच निकोप, तेजस्वी व चपळ असतात. पण यापेक्षाहि भयंकर आपत्ति आली ती ही की, मुलांना घर नाहीसे झाल्यामुळे व अनेक आईबापांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे तो गुन्हेगार बनून हिंसक कृत्ये करीत वणवणा हिंडूं लागलीं. १९३५-३६-३७ सालच्या प्रवदा, इझव्हेस्टिया या पत्रांच्या अंकांतून या प्रकारांची वर्णने वाचून अंगावर काटा येतो. ही पोरकीं पोरें मालगाड्यांत, इंजिनांत वाटेल तेथे बसत व खेड्याखेड्यांतून हिंडून आगी लावीत, खूनहि करीत. अनेक ठिकाणी लष्कर धाडून सरकारला त्यांना आवरण्यासाठी गोळीबार करावा लागला. पिसाळलेल्या कुत्र्यांवर गोळ्या घालाव्यात तशा कांही ठिकाणीं लष्कराने या मुलांवर गोळ्या घातल्या. (सोशिऑलाजिकल बुलेटिन, मार्च १९५३, पृष्ट ३७).
हे पाहून कम्युनिस्टांची समाजवादी क्रांतीची धुंदी उतरली व १९३६, १९४४ व १९५३ या तीन सालीं नवे कायदे करून सोव्हिएट नेत्यांनी कुटुंबसंस्थेला प्रतिष्ठा व मान प्राप्त करून दिला आणि १९६७ सालीं निःसंदिग्धपणें जाहीर केलें की, कुटुंबाची आर्थिक व शैक्षणिक कार्ये जरी सरकारने घेतली असली तरी पतिपत्नी आणि मुले यांच्या खाजगी एकात्मतेचे स्थान म्हणून कुटुंब हें निश्चित राहील व समाजवादी समाजरचनेचा आद्य घटक म्हणून त्याचें सर्वतोपरी रक्षण केलें जाईल.
गर्भपाताला बंदी
या नव्या कायद्यांनी प्रथम गर्भपाताला बंदी करण्यात आली आणि विवाहाची नोंदणी आवश्यक ठरविण्यांत आली. त्यावांचून विवाह कायदेशीर होणार नाही असें जाहीर करण्यांत आलें. नंतर घटस्फोट फार अवघड करण्यांत आला. कायद्याने त्याला बंदी घातली नाही; पण त्याच्या मार्गात अनेक अडसर उभे करून तो दुर्मिळ व्हावा अशी व्यवस्था करण्यांत आली. आणि याहून विशेष म्हणजे मातृत्वाचा गौरव कम्युनिस्ट करूं लागले. भारतांत प्राचीन काळी 'अष्टपुत्रा' हा फक्त आशीर्वाद देण्यांत येत असे. पण सोव्हिएट रशियांत नव्या पिढीच्या कार्यक्षम संगोपनासाठी बुद्धिमान् माता बनविणें हें स्त्रीशिक्षणाचें ध्येय आहे असें सांगून, सातव्या मुलापासून अकराव्या मुलापर्यंत दोन ते पांचहजार रूबल मातांना अनुदान देण्याची व्यवस्था करण्यांत आली. हिरॉईन मदर, मदरहूड ग्लोरी, मदरहूड मेडल असे किताव बहुप्रज स्त्रियांना मिळू लागले. "मानवी भाषेत 'माता' या शब्दापेक्षा दुसरा पवित्र शब्द नाही. मातृत्वाच्या आनंदाला मुकणाऱ्या स्त्रीला दुर्दैवीच म्हटले पाहिजे." असा मातृपदगौरव प्रवदा, इझवेस्टिया हीं पत्रे करूं लागली. "सूर्यप्रकाशावांचून फुले नाहीत, प्रेमावांचून सुख नाही, स्त्रीवाचून प्रेम नाही आणि आईवांचून कवि नाही व वीरकाव्यहि नाही," हें मॅक्झिम गॉर्कीचें वचन लोकांच्या कानांत रोज दुमदुमूं लागले. मातृत्वाइतका नव्हे, पण जवळ जवळ तसाच, पातिव्रत्याचाहि गौरव आता कम्युनिस्ट करूं लागले. "पत्नीकडून पातिव्रत्याची अपेक्षा हे भांडवली मालकशाही वृत्तीचें लक्षण आहे, मत्सर हा स्वामित्वभावनेतून निर्माण होतो," असे उद्गार १९३६ ते ४० या काळांत पुण्या-मुंबईच्या कांही वक्त्यांच्या व्याख्यानांतून मी ऐकलेले आहेत. त्याच वेळी 'सोव्हिएट कम्युनिझम' या आपल्या ग्रंथांत सिडने वेव लिहीत होता की, "व्यभिचार हा कम्युनिस्ट तत्त्वाप्रमाणे निंद्य आहे, अपवादात्मक व्यभिचार सुद्धा तेथे गुन्हा मानला जातो. त्या पापासाठी पक्षांतून सभासदाला हाकलून दिले जाते. व्यभिचारामुळे व्याधी जडतात व कामगारांची उत्पादनशक्ति घटते. तेव्हा आमरण एकनिष्ठा हेंच सोव्हिएट रशियांतील विवाहनीतीचं ध्येय आहे." (पृष्ठे १०५७-५८).
कम्युनिस्टांनी ही विशुद्ध वैवाहिक नीति पुन्हा प्रस्थापित केली याचें एक कारण वर दिलेंच आहे. बालगुन्हेगारी वाढू लागली हें तें कारण होय. क्रांती- नंतरच्या यादवींत व पुढे दुसऱ्या महायुद्धांत मनुष्यसंहार फार भयंकर झाल्यामुळे लोकसंख्या फार घटू लागली, हें दुसरें कारण होय. आणि तिसरें व महत्त्वाचें कारण हें की, कुटुंबप्रेमावांचून मनुष्याला कोणत्याहि कार्याला अवश्य ती प्रेरणा व स्फूर्ति मिळत नाही. धर्म, राष्ट्र या महाप्रेरणाइतकीच मातृभक्ति, स्त्रीची निष्ठा, अपत्यप्रेम या रूपाने व्यक्त होणारें कुटुंबप्रेम, ही प्रेरणा महत्त्वाची आहे. कुटुंब नाही म्हणजे मनुष्याला जीवनांत अर्थ वाटत नाही, जगण्यांत उत्साह राहत नाही व कोणत्याहि कार्याची हौस वाटत नाही. मॉरिस हिंडस याने 'मदर रशिया' या आपल्या पुस्तकांत 'फॅमिली' या प्रकरणांत या भावनेचें सविस्तर वर्णन केलेलें आहे. कर्नल ॲलेक्सी फियोदोरोव्ह यांच्या रेडस्टार पत्रांत प्रसिद्ध झालेल्या पत्रांतला एक उतारा हिंडसने दिला आहे. फियोदोरोव्ह म्हणतो, "मी व माझे शिपाई प्राणपणाने लढतों तें का? दरवेळी, प्रत्येक क्षणाला आमचें कुटुंब आमच्या डोळयांसमोर असतें. घर, आई, बाप, बालके यांच्या आठवणीने आमच्या अंगांत चैतन्य येतें. लढायला धैर्य येतें व त्वेष येतो. आम्ही लढतों तें आमच्या मातृभूमीसाठी आणि कुटुंबासाठी !" याच प्रकरणांत त्याने प्रसिद्ध शास्त्रज्ञ हॅवलॉक एलिस यांचें एक वचन दिलें आहे. एलिस म्हणतो, "मनुष्याच्या शारीरिक व मानसिक प्रकृतीचाच कुटुंब हा एक नसर्गिक घटक आहे. कोणालाहि तो केव्हाहि नष्ट करतां येणार नाही."
समंजस विवेक
सोव्हिएट नेत्यांनी कुटुंबसंस्थेच्या बाबतींत फारच समंजसपणा दाखविला. विवेक जागृत ठेवून प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांवरून बोध घेऊन निष्कर्ष काढून त्यांनी आपले धोरण बदललें. हा खरा इहवाद होय. इहवादी शासनाकडून हीच अपेक्षा असते तर्क, बुद्धिवाद, इतिहास, अवलोकन या आधारे समाजप्रगतीला अवश्य काय तें ठरवून, तसे कायदे करणें हा इहवादाचा आत्मा होय. या मार्गात धर्म, परंपरा, अंध रुढि यांचे कितीहि अडसर आले, तरी त्याला जें जुमानीत नाही तें इहवादी शासन. कुटुंबसंस्थेच्या बाबतींत कम्युनिस्ट इहवादाच्या प्रतिज्ञेशीं प्रामाणिक राहिले याबद्दल त्यांचे अभिनंदन केलें पाहिजे. येथेहि त्यांना विरोधविकासवादी हेकटपणा, दुराग्रह, अंध, आवेश दाखवितां आला असता. कुटुंबप्रेम, पातिव्रत्य, मातृत्वगौरव हें सर्व समाजवादाच्या तत्त्वाशी विसंगत आहे, यांत प्रतिगामीपणा स्पष्ट दिसतो अशी टीकाहि त्या वेळीं अनेक पंडितांनी केली होती. त्यांच्या म्हणण्याला मार्क्सवादांत आधारहि आहे. पण त्यांचें तें भाष्य सोव्हिएट नेत्यांनी मानले नाही. त्यांनी आपले स्वतंत्र भाष्य करून हें सर्व कम्युनिझममध्ये बसतें, त्यांत विसंगति नाही, असेंच मानले व राष्ट्राला मोठ्या अनर्थातुन वाचविलें. धर्माविषयी त्यांनी हाच समंजस विवेक युद्धकाळांत दाखविला, पण पुढे त्यांनी पुन्हा फ्लट खाल्ली. डायलेक्टिकल मटीरियालिझम हा धर्मविरोधीच आहे हा दुराग्रह पुन्हा त्यांनी मानगुटीस बसूं दिला आणि सध्या धर्माचें निःसंतान करण्यासाठी ते आपली शक्ति व बुद्धि व्यर्थ खर्च करीत आहेत. पण लवकरच त्यांना सद्बुद्धि सुचेल अशी आशा आहे. कारण सध्या सोव्हिएट शास्त्रज्ञच विरोधविकासवाद अगदी अशास्त्रीय आहे असें सांगू लागले आहेत. स्टॅलिनने या अपराधाबद्दल अनेक शास्त्रज्ञांना देहान्तशासन दिलें होतें. पण आता ती हानि परवडणार नाही, हें ध्यानांत आल्यामुळे सोव्हिएट नेते थोडी माघार घेत आहेत. या प्रकरणाचा विचार आपल्याला पुढे सविस्तर करावयाचा आहे. येथे धर्माच्या दृष्टीने थोडा विचार करून हा लेख संपवू.
कुटुंबप्रेम, मातृप्रेम, पत्नीप्रेम, अपत्यप्रेम ही जशी मानवी जीवनांतली मोठी प्रेरणा आहे तशीच धर्म हीहि प्रेरणा आहे. तेव्हा कुटुंबनिष्ठा, मातृभक्ति, पातिव्रत्य, वैवाहिक नीति यांची जशी सोव्हिएट नेत्यांनी इहवादाच्या भूमिकेतूनच जोपासना केली तशीच धर्मश्रद्धेची जोपासना करणें अवश्य आहे. ही श्रद्धा कार्यस्फूर्ति देण्यास तितकीच अवश्य आहे, समर्थ आहे हें युद्धकालीन घडामोडींवरून प्रत्यक्षच ध्यानांत आलेले आहे. तेव्हा धर्मश्रद्धेच्या जोपासनेमुळे सेक्युलॅरिझमला बाध येईल असें मानण्याचें कारण नाही. इहवादी शासनाने कोणत्याच धर्माचारांत शासन म्हणून सहभागी होऊ नये असे एक मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण तें सयुक्तिक आहे असें वाटत नाही. त्याने सर्व धर्माविषयी तटस्थ राहवें असेंहि म्हणतात. या बाबतीत त्याने पक्षपात करूं नये एवढेच फार तर म्हणतां येईल, पण अपक्षपातासाठी तटस्थता आवश्यक आहे असें नाही. धर्म ही एक प्रेरक शक्ति आहे, ती माणसाला ध्येयवाद, त्याग, समाजसेवा यांना प्रवृत्त करते, असें ज्यांना मुळांतच वाटत नाही त्यांची गोष्ट निराळी. पण ज्यांना धर्माचें हें सामर्थ्य मान्य आहे त्यांना इहवादी शासनानेसुद्धा सर्व धर्म समानत्वाचें तत्त्व न सोडतां त्या शक्तीची जोपासना केली पाहिजे हा विचार पटेल, असें वाटतें. कुटुंबसंस्थेविषयी भिन्न समाजांत, भिन्न धर्मीयांत, पंथीयांत भिन्न तत्त्वें भिन्न रूढि व आचार असतात. पण त्यांची दखल न घेतां सोव्हिएट शासनाने सर्व रशियाला एक कायदा लागू केला. प्रारंभी कांही समाजांना त्याने सवलती दिल्या, पण पुढे सर्वांना समपातळीवर आणलें. एक पत्नी करावी असें ख्रिस्ती धर्मतत्त्व आहे, तर मुस्लिमांना चार स्त्रिया करणें ही धर्माज्ञा आहे असें वाटतें. स्त्रीची समानता मुस्लिमांना मुळीच मान्य नाही. घटस्फोट त्यांच्यांत एकांगी आहे. स्त्री-पुरुषांना त्यांचे भिन्न कायदे आहेत. बुरखा, अपत्य- संगोपन, वारस अशा अनेक बाबतींत प्रत्येक समाजांत, धर्मांत भिन्न व परस्परविरोधी तत्त्वें रूढि व आचार असूनहि सोव्हिएट शासनाने सर्वांना कुटुंबसंस्थेच्या बाबतींत एकच कायदा लागू केला आणि हिंदुस्थानांत सर्वांना एकच सिव्हिल कोड असावें असा आग्रह सर्व इहवादी पंडितांचा आहे. हें जर खरें तर धर्माच्या बाबतींत निरळा विचार करण्याचें कारण काय, तें समजणे कठीण आहे. असो. भारतीय इहवादाचा विचार करतांना याचा सविस्तर परामर्श घेण्यांत येईलच. कुटुंबसंस्थेच्या विचारांशीं तो विचार निगडित असल्यामुळे येथे त्याचा निर्देश करून ठेवला आहे.
सोव्हिएट रशियांतील कुटुंबसंस्थेचा सविस्तर इतिहास देणें व त्या मागील तत्त्वांची चिकित्सा करणें हा या लेखाचा हेतु नाही. तो इतिहास व ती चिकित्सा अनुषंगाने आलेली आहे. इहवादी सोव्हिएट शासन या संस्थेकडे कोणत्या दृष्टीने पाहतें, तिच्याविषयी कायदे करतांना कोणतें धोरण अवलंबितें, तें आपणांस पहावयाचे होतें. आपल्याला असे आढळून आले की, या बावतीत त्या शासनाचा दृष्टीकोन मोठा समंजस, विवेकनिष्ठ व म्हणूनच अभिनंदनीय असा आहे. अंधसिद्धान्ताला बळी पडतां, पोथीतत्त्व बाजूला सारून केवळ समाजोत्कर्ष हाच निकष लावून त्याने कायदे केले व परिवर्तन घडवून आणली. हें इहवादित्त्वाच्या ब्रीदाला शोभेसेचे झालें.
५
सोव्हिएट रशियांतील शिक्षण संस्थेचा या लेखांत विचार करून तेथील शिक्षण हें इहवादी आहे की नाही तें ठरवायचें आहे. आज रशियांतील शिक्षण- पद्धतीचा सर्वत्र गौरव होत आहे. प्रा. रॉबर्ट उलिच् सारखे (हारवर्ड विद्यापीठ) अमेरिकन शिक्षणतज्ज्ञहि त्या पद्धतीचें यश निःसंकोचपणे मान्य करीत आहेत. रशियाने पहिला स्पुटनिक अंतराळांत सोडला त्याच्या आधी तेथील अध्यापन- पद्धतीची सर्वत्र चेष्टा होत असे. कम्युनिझम म्हणजे केंद्र-नियंत्रण, साचेबंद शिक्षण, नालायकी, अकार्यक्षमता आणि लोकशाही म्हणजे विकेंद्रीकरण, मुक्त शिक्षण, कार्यक्षमता असें समीकरणच लोकांनी ठरवून टाकलें होतें. त्याने पाश्चात्त्य जगाची मोठी हानि झाली असें प्रा. उलिच् म्हणतात (करंट हिस्टरी, जून १९६१). आता सोव्हिएट शिक्षणपद्धतीने फार मोठें यश मिळविले आहे यांत कोणाला शंका नाही. त्या यशाचें वर्णन करण्यास कोणत्याहि शिक्षणतज्ज्ञाची गरजहि नाही.
आज रशिया संरक्षण, लष्करी सामर्थ्य या दृष्टीने जगांत अतिशय बलाढ्य झाला आहे. त्या देशांत अनेक वंशांचे, धर्मांचे, राष्ट्रीयतेचे व संस्कृतींचे लोक असूनहि त्या सर्वांचा एकात्म समाज घडविण्यांत सोव्हिएट नेत्यांना अपूर्व यश आलें आहे. देशाचें औद्योगीकरण करून त्या क्षेत्रांत रशियन शासनाने अमेरिकेच्या खालोखाल स्वदेशाला स्थान मिळवून दिलें आहे. विज्ञानाच्या क्षेत्रांत त्याने किती प्रगति केली आहे तें त्याची अंतराळयानें रोज जाहीर करीत आहेत. असें निर्भेळ यश ज्या देशाने मिळविलें त्या देशाची शिक्षणपद्धति अत्यंत कार्यक्षम असलीच पाहिजे याविषयी कोणाला शंका घेतां येईल असे वाटत नाही. ती पद्धति सेक्युलर आहे की नाही याविषयी वाद होऊं शकेल. ती तशी आहे असें ठरलें, तर प्रश्नच नाही. पण नाही असें ठरलें, तर त्या रशियन शिक्षणपद्धतींत कांही न्यून आहे, असें ठरण्याऐवजी शिक्षण सेक्युलर असण्याला कांही महत्त्व नाही, असेंच उलट म्हणावें लागेल.
धर्माविषयी मार्क्सवादाचें काय मत आहे तें प्रारंभीच्या लेखांत आपण सविस्तर पाहिलेंच आहे. तेव्हा सोव्हिएट शिक्षणक्रमांत धर्माला स्थान नाही हे उघडच आहे. सत्ता हातीं येतांच रशियन शास्त्यांनी धर्मपीठाकडून शिक्षण व शिक्षणसंस्था सर्व काढून घेतल्या; पण यांत कांही विशेष नाही. पश्चिम युरोपांतील बहुतेक सर्व देशांनी हें धोरण याआधीच अवलंबिलें होतें. तसें त्यांनी केलें नसतें, तर त्यांची झाली ही प्रगति झालीच नसती. सोव्हिएट रशियाचा विशेष हा की, नित्याच्या शालेय शिक्षणांतून तर त्यांनी धर्म हा विषय काढून टाकलाच. पण रशियांत धर्मशिक्षण देणाऱ्या संस्था असतांच कामा नयेत, असा दंडक त्याने जारी केला. "शिक्षणांत धार्मिक शिक्षणाला वाव असतां कामा नये" असें लेनिनने मे १९१७ मध्ये जो शिक्षणविषयक कार्यक्रम जाहीर केला त्यांत एक कलमच आहे.
शिक्षणाचे उद्दिष्ट
विद्यार्थ्यांचा मनोविकास व्हावा, त्यांच्या सुप्त सद्गुणांचे संवर्धन व्हावें, त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावे, असा सर्वसाधारण शिक्षणाचा हेतु असतो. सोव्हिएट नेत्यांना हे सर्व अभिप्रेत आहेच. पण मनोविकास, गुणसंवर्धन, सुसंस्कार हें सर्व एका विशिष्ट दृष्टीने झाले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष आहे. त्यांना देशांत प्रथम समाजवाद स्थापावयाचा आहे व पुढे कम्युनिझममध्ये त्याची परिणति करावयाची आहे. या उद्दिष्टाच्या सिद्धीचें साधन म्हणून ते शिक्षणाकडे पाहतात. केवळ चारित्र्यविकास, शीलसंवर्धन या दृष्टीने नव्हे. ज्याच्या चारित्र्य, शील या शक्ति कम्युनिझमच्या उभारणीसाठी उपयोगी पडतील असा नवा कम्युनिस्ट मानव त्यांना हवा आहे. असा मानव निर्मिणे हे त्यांच्या शिक्षणाचे ध्येय आहे आणि अध्यापनाचे विषय, अध्यापनपद्धति, शिक्षकांची गुणवत्ता, अध्यापनाचा काल हे सर्व त्या ध्येयानुसार ते ठरवितात.
कम्युनिस्ट समाजरचना हें उद्दिष्ट असल्यामुळे शिक्षणांत मार्क्सवादाला अग्रस्थान असावें हें ओघानेच येतें. विरोधविकासवाद, ऐतिहासिक जडवाद, वर्गविग्रह व श्रममूल्य सिद्धान्त असे मार्क्सवादाचे चार मूलभूत सिद्धान्त आहेत. त्यांचें वर्चस्व सर्व रशियन जीवनावर आणि अर्थातच शिक्षणावरहि आहे. जुन्या काळीं बायबलवर श्रद्धा ठेवून त्यांतील तत्त्वें व आज्ञा शिरसावंद्य मानल्या पाहिजेत, हा जसा दंडक होता तसाच मार्क्सच्या सिद्धान्ताविषयी रशियांत दंडक आहे. मार्क्सच्या सिद्धान्तांचं मूल्यमापन करण्याचा कोणालाहि तेथे अधिकार नाही. शाळा- महाशाळांत ते सिद्धान्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून द्यावयाचे, त्यांच्या मनांत रुजवावयाचे व इतर सिद्धान्त विचारांत घेण्याइतपत सुद्धा योग्यतेचे नाहीत, हें त्यांच्या मनावर अहोरात ठसवावयाचें एवढेच शिक्षकांचें काम. कडव्या आग्रहांत अतिशय सामर्थ्य असतें, बळ असतें. पूर्वी ख्रिश्चन धर्म, इस्लाम यांनी असा आग्रह निर्माण करून त्या बळावर मोठी कार्ये साधली. आज मार्क्सप्रणीत धर्माला तें साधावयाचें आहे म्हणून त्या धर्माचे अनुयायी जे सोव्हिएट नेते त्यांनी त्याला पोथिनिष्ठ अंध-सिद्धान्तांचें रूप दिलें आहे व त्या धर्माचे दृढ संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर कमीत कमी दोन तपें करणें हें शिक्षणाचें कार्य आहे, असें ठरवून टाकले आहे.
कोणत्याहि अंध-सिद्धान्ताचे (डॉग्मा) शासनावर व जीवनावर वर्चस्व नसणें, त्याचे व्यवहार बुद्धिवादाने चालणें हें इहवादाचें, सेक्युलॅरिझमचें महत्त्वाचें लक्षण होय. त्या दृष्टीने पाहतां मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानाच्या अंध आग्रहामुळे रशियन शासनाच्या इहवादाला मोठा बाध येतो. पण एवढ्यावरच हें थांबत नाही. या मार्क्स धर्माचा राजकारणाशीं सोव्हिएट नेत्यांनी अविभाज्य संबंध जोडलेला असल्यामुळे त्याला अत्यंत विकृत असें रूप प्राप्त झालेलें आहे. दर वेळीं राजकीय परिस्थितीप्रमाणे व राजकीय धोरणाप्रमाणे आणि कित्येक वेळा केवळ दंडराजांच्या लहरीप्रमाणे मार्क्स तत्त्वांचा अर्थ लावला जातो व त्यांनीच मंजूर केलेला जुना अर्थ त्याज्य ठरवून, त्याचें अपश्रेय दुसऱ्याच्या माथी मारून, त्याला शिक्षा केली जाते. मार्क्सवाद व त्यावरचें दरवेळचें नवें राजकीय भाष्य यांचा शिक्षणावर काय परिणाम होतो हें पाहणें मोठें उद्बोधक होईल.
पद्धतशीर विटंबना
धर्माभिमानाप्रमाणेच मार्क्सवादाला पूर्वपरंपराभिमान हाहि निषिद्ध, प्रतिगामी, क्रांतिविरोधी असा वाटतो. त्यामुळे रशियाचा खरा इतिहास १९१७ साली सुरू झाला, त्याच्या मागला इतिहास हा भांडवली, जमीनदारी जुलमाचा, वर्गविग्रहाचा असून, त्यांत अभिमानास्पद कांही नाही, असें सोव्हिएट पंडितांचे प्रथम मत होते. सत्ता हाती येतांच पोक्राव्हस्की या लेखकाकडून लेनिनने या धोरणाने इतिहास लिहवून घेतला, त्याला स्वतः प्रस्तावना लिहिली व सर्व विद्यालयांतून तें पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून नेमून टाकले. रशियांतील प्राचीन काळचे राजे, सरदार, सेनापति यांच्याविषयी, ते कष्टकरी जनतेच्या विरुद्ध म्हणून, तरुण पिढीच्या मनात कमालीचा तिटकारा निर्माण करावा अशा हेतूनेच पोकाव्हस्कीने तें पुस्तक लिहिलें होतें. पण १९३६ सालच्या सुमारास जर्मन आक्रमणाचें भय दिसूं लागतांच धर्माप्रमाणेच परंपराभिमानाविषयीचें सोव्हिएट शासनाचें– म्हणजे स्टॅलिनचें- मत वलदलें व त्याने पोक्राव्हस्कीवर भडिमार सुरू केला. त्याला पदभ्रष्ट केलें व शेस्टॉकॉव्ह या पंडिताकडून दुसरा इतिहास लिहवून घेऊन तो शाळांत नेमला. वास्तविक पोक्राव्हस्कीचा इतिहास सोव्हिएट शासनानेच लिहवून घेतला होता, मंजूर केला होता, लेनिनने त्याला प्रस्तावना लिहिली होती. आतापर्यंतचा जगाचा इतिहास हा वर्गविग्रहाचा इतिहास आहे, (तसाच रशियाचाहि) हें मार्क्सचे लाडकें मत त्यांत प्रतिपादिले होते. तेव्हा ठपका द्यावयाचाच तर मार्क्स, लेनिन यांना द्यावयास हवा होता. पण हे महापुरुष प्रमादातीत आहेत, ते चुकणें शक्य नाही अशी सोव्हिएट शासनाची श्रद्धा आहे. चुकला असेल तर तो पोकाव्हस्की ! पीटर दि ग्रेट, अलेक्झँडर नेव्हस्की यांच्या जीवनाचें खरें मर्म त्याला कळलेच नाही. जगाचा इतिहास वर्गविग्रहाचा असला तरी रशियाचा तसा नव्हता, हें त्याला कळायला हवें होतें. तें त्याला कळले नाही. म्हणजे त्याला मार्क्सवादच कळला नाही. अशा माणसाचा इतिहास मुलांना कसा नेमावयाचा ?
'टेन डेज दॅट शूक दि वर्ल्ड' या जॉन रीडच्या पुस्तकाची हीच गत झाली. १९१७ साली झालेल्या रशियन क्रांतीचें त्यांत उत्तम वर्णन असून, रशियांत ऑक्टोबर क्रांतीच्या या स्तोत्राला प्रारंभी फार मोठी प्रतिष्ठा लाभली होती; पण स्टॅलिन सत्तारूढ झाल्यावर हें पुस्तक जप्त करण्यांत आलें. कारण त्यांत स्टॅलिनचें स्तवन मुळीच नव्हतें. आणि तो तर क्रांतीचा खरा शिल्पकार ! त्याचें स्तवन नसणें हा खरा मार्क्स वाद नव्हे ! असलें पुस्तक नष्ट केलेच पाहिजे आणि त्याच्या आधारे सेरजी आइन्स्टाइन याने काढलेला चित्रपटहि ! प्रारंभी अत्यंत लोकप्रिय असलेला हा चित्रपट उत्तरकाळांत आक्षेपार्ह ठरविण्यांत आला व सेरजीलाहि जगांतून नाहीसें करण्यांत आलें.
१९३० साली ऑस्ट्रोहिट्यानाव्ह या अर्थशास्त्रज्ञाने 'औटलाईन्स ऑफ् पोलिटिकल एकॉनमी' हा ग्रंथ लिहिला. स्टॅलिनची मर्जी त्या वेळीं त्याच्यावर सुप्रसन्न असल्यामुळे त्याला 'कम्युनिस्ट अर्थशास्त्राचा आधारभूत ग्रंथ' म्हणून मान्यता मिळून तो सर्व विद्यापीठांत लावला होता. पण त्याची सद्दी दहा वर्षे टिकली. त्यानंतर दंडराजाची मर्जी फिरली. 'लेनिनची चुकीची अवतरणें दिलीं,' 'लेलिनस्टॅलिनचे बनावट संवाद दिले,' असे त्याच्यावर आरोप ठेवण्यांत आले व त्या क्षीणपुण्य ग्रंथकाराला खाली लोटून देण्यांत आलें. युद्धसमाप्तीच्या वेळीं स्टॅलिनचें अमेरिकेविषयी चांगलें मत होतें. तें ध्यानीं घेऊन डॉ. युजीन वार्गा याने "मार्क्स मताप्रमाणे भांडवली देशांत पुनः पुन्हा येणारें आर्थिक अरिष्ट अमेरिकेत मात्र येणार नाही" असें प्रतिपादन आपल्या 'कॅपिटॅलिस्ट एकॉनमी आफ्टर दि वॉर' या ग्रंथांत केलें. पण स्टॅलिन जरी अमेरिकेविषयी बाह्यतः बरें बोलत असला, तरी त्याच्या मनांत तसें नव्हतें. त्यामुळे वार्गाला प्रायश्चित्त भोगावें लागलें. तो पदच्युत झाला व डॉ. शेरिलॉव्ह हा अमेरिकेविषयी 'खरें' मत मांडणारा ग्रंथकार त्याच्या पदावर आला. मग त्याचीं पुस्तकें पाठ्यपुस्तकें म्हणून शाळा- महाशाळांतून अभ्यासली जाऊं लागलीं.
साहित्याच्या अध्यापनाच्या बाबतींत इहवादाची अशीच मार्क्सवादी विटंबना रशियांत चालू आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी मॉस्कोच्या शिक्षणखात्यांत कम्युनिस्ट पक्षाचा चिटणीस ग्लेवाव्ह हा एक मोठा अधिकारी होता. तो टॉलस्टॉयबद्दल जाहीरपणें सांगत असे की, "स्टॉलस्टॉय हा जमीनदारवर्गांतला मनुष्य होता. त्याने आपल्या सर्व आयुष्यांत स्वतःच्या वर्गाच्या हिताचीच जपणूक केली होती व त्याच्या साहित्यांत त्याची तीच वृत्ति दिसून येते. तेव्हा त्याच्या लेखनांत अभिजात असें कांही असणें शक्यच नाही." १९६७ साली मॉस्को येथे सोव्हिएट लेखकांचा मेळावा भरला होता. त्याला उद्देशून अलेक्झांडर सोल्शेनित्सिन या लेखकाने एक अनावृत पत्र लिहिलें होतें. त्यांत त्याने रशियांतील साहित्यविषयक धोरणावर कडक टीका केली आहे. तो म्हणतो, "विश्व-साहित्यांत मानाचें स्थान लाभलेली दोस्तोवस्कीचीं पुस्तकें देखील एके काळी आमच्या देशांत प्रसिद्ध केली जात नव्हती. शैक्षणिक अभ्यासक्रमांतून त्याचीं पुस्तकें वगळण्यांत आली होती. त्याची त्या वेळीं फार नालस्ती करण्यांत येत असे. येसिनिन, मायक्रोव्हस्की यांच्या साहित्यावरहि असाच क्रांतिविरोधी म्हणून शिक्का मारून त्यांना बदनाम करण्यांत आलें होतें. सोव्हिएट साहित्यावर शासकीय नियंत्रणाचें असें जोखड पडलें आहे. हें नियंत्रण हा मध्ययुगांतील एक अवशेष असून एखाद्या मेथुसेलाप्रमाणे एकविसाव्या शतकापर्यंत जिवंत राहण्याचा त्याने निर्धार केलेला दिसतो. पण खेदकारक गोष्ट अशी की, या नियंत्रणांत कोणतेंहि तत्त्व नाही. सेन्सॉरबोर्ड 'सिद्धान्तप्रणालीच्या दृष्टीने हानिकारक', 'प्रमादपूर्ण', 'मार्गभ्रष्ट' असे शिक्के मारते. पण हे शिक्के सारखे बदलत असतात. आमच्या डोळ्यांदेखत ते अनेक वेळा बदललेले आहेत." टॉलस्टॉय- विषयीच्या ग्लेवाव्हच्या मताचा उल्लेख वर केलाच आहे. युद्धाचा समय प्राप्त होतांच सोव्हिएट शासनाचें त्याच्या विषयीचें मत बदललें. रशियाचा तो एक अमर अभिजात लेखक होय असें आता ठरलें आहे.
वरील उदाहरणांवरून सोव्हिएट रशियांत शिक्षणावर व एकंदर जीवनावर जुन्या काळी पाश्चात्त्य जीवनावर जसे पोप-धर्माचें प्रभुत्व होतें, तसेंच आज मार्क्स-धर्माचं प्रभुत्व आहे, असें दिसून येईल. हा नवा धर्म त्या जुन्या धर्माइतकाच अंध, पिसाट व बुद्धिशून्य असा आहे. अशा धर्माच्या छायेंत असणारें शिक्षण इहवादी आहे असें कदापि म्हणतां येणार नाही. मग इहवाद, बुद्धिप्रामाग्य, व्यक्तिस्वातंत्र्य, वस्तुनिष्ठ संशोधन यांचा व राष्ट्रीय उत्कर्षाचा कांहीच संबंध नाही असे म्हणावयाचें काय ? तसें नसेल तर सोव्हिएट रशियाच्या प्रगतीची संगति कशी लावावयाची ?
याचें उत्तर असें आहे की, पाश्चात्त्य युरोपांत ज्याप्रमाणे पोपच्या धर्मसत्तेविरुद्ध शास्त्रसंशोधक आणि तत्त्वचिंतक संग्राम करीत होते आणि त्या संग्रामांत विज्ञाननिष्ठेमुळे, स्वातंत्र्यनिष्ठेमुळे आत्मबलिदान करीत होते, तसेच सोव्हिएट रशियांतहि तत्त्वनिष्ठ लोक मार्क्स धर्माविरुद्ध प्रारंभापासूनच लढा करून मृत्युदंड सोशीत होते. विज्ञानसंशोधनाला जी विश्वाविरुद्ध ताठ उभें राहण्याची शक्ति अवश्य असते, ती रशियांतील शूर संशोधक जोपाशीत होते आणि रशियाची प्रगति हें तिचेंच फल आहे. या विज्ञानसंग्रामचें सविस्तर विवेचन पुढील लेखांत करावयाचें आहे. येथे रशियाच्या प्रगतीला कारणीभूत झालेल्या आणखी एक-दोन कारणांचा विचार करूं.
त्यांतलें प्रधान कारण म्हणजे राष्ट्रनिष्ठा हे होय. मार्क्सवाद हा मूलतः राष्ट्रवादाच्या विरुद्ध आहे. पण १९२६ माली एकराष्ट्रीय समाजवादाचा पुरस्कार करून स्टॅलिनने सोव्हिएट रशियाला राष्ट्रधर्माची दीक्षा दिली. आणि तेव्हापासून आजपर्यंत सोव्हिएट नेते या महाप्रेरणेची शाळा- महाशाळांतून सतत जोपासनाच करीत आहेत. या निष्ठेने प्रेरित झालेला मनुष्य पराक्रमाच्या केवढ्या कोटि करतो हें कांही सांगावयास नको. तेव्हां सोव्हिएट रशियाची प्रगति मार्क्सवादाने झाली नसून, मार्क्सतत्त्व झुगारून राष्ट्रवादाचा अंगीकार केल्यामुळे झालेली आहे, हें आपण ध्यानांत ठेविलें पाहिजे.
या राष्ट्रवादाचें जें मूळ महातत्त्व त्याकडे आपण लक्ष दिल्यास रशियाच्या प्रगतीचे रहस्य चटकन उलगडेल. राष्ट्रवादांत समाजांतील प्रत्येक व्यक्ति म्हणजे समाजाचा एक जबाबदार घटक अशा दृष्टीने तिच्याकडे पाहिलें जातें. जुन्या राजसत्तेंत व्यक्तीला हें स्थान नव्हते. तिला स्वतंत्र अस्तित्व असें नव्हतें. ती राजाची प्रजा होती. समाजाच्या चिंतेचा भार तिच्यावर नव्हता. तो राजावर होता. राष्ट्रवादी समाजरचनेत मुख्य फरक हा होता की, प्रत्येक व्यक्ति ही नागरिक असून, समाजाच्या उत्कर्षापकर्षांत तिचा वांटा आहे, ती त्याला जबाबदार आहे, हा विचार महत्त्वाचा मानला जातो व नागरिकांच्या मनांत तो रुजविला जातो. हें फार मोठें मानसिक परिवर्तन आहे. व्यक्तीच्या अस्मितेचा त्यामुळे परिपोष होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्य याविषयी आकांक्षा तिच्या मनांत निर्माण होतात व त्यासाठी झगडा करण्याचें मानसिक व नैतिक सामर्थ्य तिला प्राप्त होतें. रशियन विद्यार्थ्यांना हे बाळकडू आज चाळीस वर्षे पाजले जात आहे.
अर्वाचीन काळांत शासन जरी दंडायत्त असले तरी जुन्या काळच्या सुलतानाप्रमाणे अनियंत्रित सत्ता त्याला दीर्घकाळ कदापि चालवितां येणार नाही. कारण सर्व समाज जागृत करून, त्याची राष्ट्रनिष्ठेच्या तत्त्वावर संघटना करून, तें बळ दंडशहांना आपल्या पाठीशी उभे करावेंच लागतें. त्यावांचून त्यांची दंडसत्ता चालणार नाही, कोसळून पडेल. आणि देशांतील लोकांना राष्ट्रनिष्ठ नागरिक बनविणे म्हणजे आपण होऊनच आपल्या दंडसत्तेला सुरुंग लावण्यासारखे आहे. अर्वाचीन दंडसत्तांना औद्योगीकरण करणेंहि अपरिहार्य असतें. तें करावयाचें म्हणजे विज्ञान- संशोधन, भौतिक विद्यांचा प्रसार, वस्तुनिष्ठ सत्यदर्शन यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर करणें हें अपरिहार्य ठरते. पण भौतिक विद्या ही शक्तीच अशी आहे की, ती मनुष्याला निर्भय बनवून अनियंत्रित सत्तेशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देतें. याचा अर्थं असा की, दंडसत्तेच्या अंतरांतच तिच्या नाशाची बीजें असतात. रशियांत हीं बीजें कशीं धुमारत आहेत याचा विचार पुढे करावयाचा आहे. तत्पूर्वी नवी कुटुंबसंस्था हेंच कार्य कसें करीत आहे तें पाहूं.
कुटुंब हा राष्ट्राचा मूळ घटक असून समता, स्वातंत्र्य, जबाबदारी याच तत्त्वांवर त्याची पुनर्रचना नव्या जगांत होत आहे. सोव्हिएट कुटुंबसंस्थेचें विवेचन वर केलेंच आहे. त्यावरून हे ध्यानांत येईल की, त्यांतील स्त्री ही आता नागरिक झालेली आहे. ती पूर्वीची परस्वाधीन जिणे असलेली, बाहेरच्या सार्वजनिक जीवनापासून अलिप्त असलेली, अज्ञानांत रुतलेली अशी दासी आता राहिलेली नाही. रशियाच्या अणुसंशोधन खात्यांत जे तीस-चाळीस हजार लोक आहेत त्यांत निम्म्या स्त्रिया आहेत, हें ध्यानांत घेतल्यावर ही केवढी मोठी क्रांति आहे हें सहज उमगेल. हे नव्या कुटुंबसंस्थेचें देणें आहे. मुलांच्या दृष्टीनेहि तीच क्रांति झालेली आहे. पित्याची अनियंत्रित सत्ता आता कुटुंबांत चालत नाही. त्यामुळे कुटुंबांत राहूनहि मुलांच्या मनाचा स्वतंत्रपणे विकास होऊ शकतो. नव्या काळांत दंडायत्त देशांतहि कुटुंबसंस्थेतील हें परिवर्तन अपरिहार्य आहे. स्त्रीची शक्ति धनोत्पादन, समाज- व्यवहार, राष्ट्रीय प्रपंच यांसाठी लाभावी व मुलांच्या मनावर साम्यवादाचे संस्कार करतां येऊन कम्युनिझमच्या निर्मितीला अवश्य तीं नवीं माणसें राष्ट्राला मिळावी यासाठीच तर सोव्हिएट नेत्यांनी कुटुंबसंस्था आमूलाग्र बदलून टाकली. मातृत्व, पातिव्रत्य मातृ-पितृभक्ति इत्यादि सनातन तत्त्वांचा त्यांनी पुन्हा स्वीकार केला असला तरी, झारशाहीतले कुटुंब व सोव्हिएटशाहीतले कुटुंब यांत जमीन- अस्मानाचें अंतर आहे. आणि समता, व्यक्ति स्वातंत्र्य या तत्त्वांमुळेच तें अंतर पडले आहे.
तेव्हा सोव्हिएट शासन जरी मार्क्सच्या अंध, वुद्धिशून्य धर्माच्या प्रभुत्वाखाली असले, तरी राष्ट्रसामर्थ्याच्या जोपासनेची त्याला आकांक्षा असल्यामुळे त्या धर्माचें जोखड झुगारून देण्यावांचून त्याला गत्यंतरच नव्हतें. प्रारंभापासूनच त्याने कळत नकळत ती बंधने ढिली करण्यास अपरिहार्यपणे प्रारंभ केलेला आहे. त्यावांचून रशिया हें राष्ट्र झाले नसते. त्यावांचून कुटुंबसंस्था टिकली नसती. त्यावांचून त्याला जर्मनीवर विजय मिळवितां आला नसता आणि त्यावांचून चंद्रावर स्वारी करतां आली नसती.
६
सोव्हिएट शासन हे खरेखुरें इहवादी शासन असतें तर कम्युनिस्ट लोकांच्या हाती सत्ता आल्यानंतर भौतिक विद्यांची अविरोध प्रगति झाली असती. पूर्ण व्यक्ति- स्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, वस्तुनिष्ठ सत्यसंशोधन हा भौतिक विद्यांचा पाया आहे. कोणतीहि धार्मिक व सामाजिक बंधनें संशोधकाच्या प्रज्ञेला शृंखलाबद्ध करीत नाहीत, सत्य प्रकटन करतांना त्याच्या मनाला कसलीह भीति वाटत नाही, कोणाहि व्यक्तीच्या, संस्थेच्या वा रूढीच्या मुरवतीस्तव त्याला सत्याला मुरड घालावी लागत नाही, असें वातावरण भौतिक विद्यांना अवश्य असते. येथवर आपण जें विवेचन केले आहे त्यावरून हें सहज ध्यानांत येईल की, सेक्युलॅरिझमचा, इहवादाचा हाच अर्थ आहे. पाश्चात्त्य देशांनी याच तत्त्वांचा आश्रय करून गेली तीन-चार शतकें भौतिक विद्येची उपासना केली व आपला उत्कर्ष साधला. स्पेन, इटली इत्यादि ज्या देशांनी हा इहवाद स्वीकारला नाही ते देश मागे पडले, स्पर्धेत पराभूत झाले. तेव्हा इहवादाचीं वरील तत्त्वें व रसायन पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, राजकारण, नीतिशास्त्र इत्यादि भौतिक विद्या यांच्यांत कार्यकारणसंबंध आहे हे उघड आहे. त्यामुळे रशिया जर इहवादी असता तर तेथेहि आरंभापासून या भौतिक विद्यांच्या प्रगतीच्या मार्गात कोणताच अडसर येण्याचे कारण नव्हते.
बौद्धिक गुलामगिरी
पण रशिया इहवादाच्या घोषणा करीत असला तरी इहवादाचीं वरील तत्त्वें त्याने प्रारंभापासूनच त्याज्य मानली होती. आणि याचे कारण म्हणजे सोव्हिएट नेत्यांनी पत्करलेलें मार्क्स-धर्माचं दास्य व तज्जन्य बौद्धिक गुलामगिरी हे होय. २५ जून १९१८ या दिवशीं लेनिनच्या शासनान्वये कम्युनिस्ट ज्ञानपीठाची स्थापना करण्यांत आली. त्याच वेळी 'शास्त्रीय' समाजवादाच्या मार्क्सवादाच्या तत्त्वान्वये सर्व शास्त्रांचा अभ्यास करणें हें त्याचें ध्येय ठरविण्यांत आले. १९२६ साली पुन्हा हे ध्येय स्पष्ट करण्यांत आलें. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इतिहास, इत्यादि सामाजिक शास्त्रांचा व रसायन पदार्थविज्ञान, भूगोल, खगोल इत्यादि भौतिक शास्त्रांचा मार्क्स-लेनिन- वादाच्या सिद्धान्तांन्वये विकास करणें हें या ज्ञानपीठाचें उद्दिष्ट आहे, असें निःसंदिग्धपणे सांगण्यांत आलें. सिडने वेब यांनी आपल्या 'सोव्हिएट कम्युनिझम' या ग्रंथांत या धार्मिक वृत्तीवर सौम्यपणे पण स्पष्ट टीका केली आहे. ते म्हणतात की, "पुष्कळ वेळा वस्तुस्थिति व घटितें यांवरून निर्णय करण्याऐवजी मार्क्स- स्टॅलिन- वचनांच्या आधारे निर्णय केला जातो. वास्तविक शंभर वर्षांपूर्वी मार्क्सने लिहिलेल्या वचनांना अजूनहि चिकटून राहणे, विरोध-विकास- वादाच्या दृष्टीनेच सयुक्तिक नाही. कारण जग सारखे बदलत आहे, हा त्या तत्त्वज्ञानाचाच सिद्धान्त आहे. पण सोव्हिएट नेते हे लक्षांत घेत नाहीत. ख्रिश्चन धर्मगुरु बायबलवचनान्वये सत्य निर्णय करीत, हे नेते मार्क्सवचनान्वये करतात, एवढाच फरक. गणितशास्त्र, वैद्यक, जीवशास्त्र यांत आम्ही पार्टीच्या दृष्टीनेच सत्यासत्य निर्णय करतो, असे ते अभिमानाने सांगतात. या शब्दप्रामाण्याच्या रोगांतून सोव्हिएट रशिया लवकरच मुक्त होईल अशी आशा आहे." (सोव्हिएट कम्युनिझम आवृत्ति, १९४४, पृष्ठे ७७८- ८०७).
आज पंचवीस वर्षांनी रशिया तसा मुक्त झालेला नाही; पण तसा तो मुक्त होण्याची चिन्हें दिसत आहेत, हें खरें आहे. तसा तो मुक्त होणें अपरिहार्यच आहे. कारण लष्करी सामर्थ्याची वाढ व औद्योगीककरण हा कम्युनिझमकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, हा सोव्हिएट नेत्यांचा प्रारंभापासूनच सिद्धान्त आहे आणि विज्ञानाची उपासना केल्यावांचून औद्योगीकरण अशक्य आहे, हेंहि ते प्रथमपासूनच जाणत आहेत, सांगत आहेत. त्यामुळे विज्ञान आणि भौतिक विद्या यांचे शिक्षण समाजाला देण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तेथे शाळा- महाशाळांतून जास्त भर शास्त्रीय विषयांवर व तंत्रविद्येवरच असतो. शे. ६५ विद्यार्थी शास्त्र- शाखेकडेच जातात. शालेय शिक्षणक्रमांत १० वर्षे गणित, ४ वर्षे रसायन, ५ वर्षे पदार्थविज्ञान व ६ वर्षे जीवनशास्त्र यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. १९५८ च्या हिशेबाप्रमाणे रशियांत ७६७ उच्च शिक्षणसंस्था असून, त्यांत वीस लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत होते. यांतील १९३ संस्था इंजिनियर तयार करतात. १९५७ साली या संस्थांतून ७७,००० इंजिनियर तयार झाले. एका मॉस्को विद्यापीठांतच १६,००० विद्यार्थी असून त्यांतील ८,००० विद्यार्थिनी आहेत. या विद्यापीठांत १७०० प्रयोगशाळा असून २४०० प्राध्यापक आहेत. ही सर्व माहिती 'इन्साइड रशिया टुडे' या आपल्या ग्रंथांत देऊन जॉन गुंथर म्हणतो, "आज विज्ञानाचें शिक्षण घेतलेला एक मोठा वर्ग तेथे तयार होत आहे. शास्त्रीय रीतीने विचार करण्याचें शिक्षण त्याला दिले जात आहे. हा वर्ग पुढील काळी स्वतंत्र विचारशक्ति प्राप्त करून घेईल यांत शंका नाही." वेंडेल विल्की याने स्टॅलिनची मुलाखत घेतली त्यावेळी या शिक्षणाचा उल्लेख करून विल्की म्हणाला, "स्टॅलिनसाहेब, जपून असा. या शिक्षणप्रसारामुळेच एखादे दिवशी आपण पदच्युत होण्याचा संभव आहे." मार्क्स म्हणत असे की, "कॅटिपटॅलिझमच्या अभ्यंतरांतच त्याच्या नाशाची बीजें असतात," हें कांही खरें ठरणार नाही. पण मार्क्सवादाला विज्ञानप्रसार व औद्योगीकरण ही अवश्य असल्यामुळे त्याच्या अंतरांतच त्याच्या नाशाचीं बीजें आहेत हें मात्र खरें ठरणार असें दिसतें. मार्क्सचा विरोध विकासवाद अन्यत्र नाही, तरी त्याच्याच तत्त्वज्ञानाच्या बाबतींत खरा ठरत असल्याचें समाधान कम्युनिस्टांना मिळत आहे, हें कांही थोडें नाही.
शास्त्रज्ञांचा संग्राम
पण हा विचार क्षणभर बाजूला ठेवला तरी अंध-धर्मांचें, धर्मपीठाच्या अनियंत्रित सत्तेचें, पोपसारख्या बलाढ्य धर्माधिकाऱ्यांचे वर्चस्व झुगारून देण्याची शक्ति विज्ञानाच्या ठायीं असते, हें कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ, वेकन, न्यूटन यांनी मध्ययुगाच्या इतिहासांत दाखवून दिलेलें आहे. तोच इतिहास आज रशियांत घडत आहे. धर्मनिष्ठेमुळे जशी प्राणपणाने शत्रूशी लढण्याची शक्ति माणसांच्या अंगीं येते तशीच विज्ञाननिष्ठेनेहि येते यांत आता शंका राहिलेली नाही. पोपच्या अंध सत्तेशीं विज्ञानवेत्त्यांनी तीन-चार शतकें संग्राम केला. त्यांत तीन-चार लाख लोक बळी गले. पण अखेर विज्ञानाचा विजय झाला. रशियांत हा संग्राम तीस-पस्तीस वर्षां- पूर्वीच सुरु झाला आहे. पण तो दीर्घकाळ चालेल असे पंडितांना वाटत नाही. पुढील दहा-वीस वर्षांतच मार्क्सच्या तत्वज्ञानाला मूठमाती देण्यांत सोव्हिएट शास्त्रज्ञ यशस्वी होतील असे त्यांचे मत आहे.
एन्. आय्. व्हाव्हिलाव्ह हा यु. एस्. एम्. आर. मधील सायन्स अॅकॅडमीचा विख्यात सभासद होता. १९४३ साली जेनेटिक्स या विज्ञानशाखेतील आपले संशोधन त्याने प्रसिद्ध केलें. त्यांतील निर्णय डायलेस्टिकल मटिरियालिझमच्या अगदी विरुद्ध होते. त्याचे सिद्धान्त जगांतील शास्त्रज्ञांनी मान्य केले होते; पण याच कारणामुळे सोव्हिएट नेत्यांनी त्याच्यावर गहजब केला. त्याला प्रतिगामी, क्रांतिविरोधी ठरविले आणि ते निर्णय बदलण्याची आज्ञा दिली. आणि ती पाळण्याचें नाकारतांच त्याला देहान्ताची शिक्षा देण्यांत आली. बेलो- रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचा अध्यक्ष ॲटन वी शेब्राक हा १९४४ साली मार्क्सच्या विरोधविकासवादाच्या भ्रांत सिद्धान्तापुढे असाच बळी गेला. लायसेको हा त्या वेळी शासनमान्य असा बॉयॉलॉजिस्ट-जीव-शास्त्रवेत्ता होता. मनुष्याचे पिंडगत गुणच तेवढे पुढील पिढीत संक्रांत होतात. संपादित गुण होत नाहीत, असा जगांतील सर्व जीवशास्त्रज्ञांचा सिद्धान्त आहे. पण परिस्थितीने माणूस बदलत असतो या मार्क्स-तत्वाच्या तो विरुद्ध आहे. संपादित गुणहि संक्रांत होतात असा मार्क्सचा सिद्धान्त आहे. लायसेंकोने तो उचलून धरला. त्याला पुरावा नाही. स्टॅलिनची मर्जी हा त्याचा पुरावा. रशियांत यापेक्षा जास्त पुरावा लागत नाही. म्हणून लायसेंकोला विरोध म्हणजे त्या काळी मृत्युला निमंत्रणच होते. पण तसें निमंत्रण पत्करूनहि अनेक शास्त्रज्ञांनी सत्याचाच पाठपुरावा केला. मॅचेस्टर विद्यापीठांतील जीवनशास्त्राचा अध्यापक एरिक ॲसवी हा आपल्या 'सायंटिस्ट इन् सोव्हिएट रशिया' या पुस्तकांत (१९४७) म्हणतो, "स्टॅलिनने कांही बोल्शेव्हिक स्वयंसिद्धान्त म्हणून सांगितलेले आहेत. पण ते सर्व अपसिद्धान्त आहेत. त्यांत सिद्ध असें कांही नाही; तरी ते प्रमाण मानून प्रयोगांनी सिद्ध झालेली सत्ये रशियांत अमान्य केली जातात. एकदा स्टॅलिनने जाहीरपणे सांगितले होते की, "वैद्यकशास्त्रज्ञांना बॉटनी, फिजिक्स हीं शास्त्रे अवगत नसली तरी चालेल, पण विरोधविकासवादाचें ज्ञान मात्र त्यांना असलेच पाहिजे."
पण या सर्व वल्गना हळूहळू पोकळ ठरणार असें दिसूं लागलें. स्टॅलिनच्या हयातीतच शस्त्रास्त्रांच्या जागतिक स्पर्धेत रशियाला विजय मिळवावयाचा असेल, तर गणितज्ञ व पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ यांशीं विरोध करणें परवडणार नाही, हें सोव्हिएट शासनाच्या ध्यानांत येऊं लागलें होतें. शेवटच्या काळांत या शास्त्रज्ञांच्यापुढे स्टॅलिनहि नमते घेऊं लागला होता. त्याच्या मृत्यूनंतर तर आता शास्त्रज्ञ निर्भयपणें एकंदर मार्क्सवादावर व विशेषतः विरोध विकासवादावर जाहीरपणें टीका करूं लागले आहेत. १९५८ साली विज्ञानवेत्ते व मार्क्सतत्त्ववेत्ते यांची परिषद् भरली होती; तींत विज्ञानवेत्त्यांनी मार्क्स- तत्त्वावर कठोर टीका करून शासनाला म्हणजे निकिता क्रुश्चेव्हला आपल्या बाजूस वळवून घेतलें. (इन्स्टिटयूट फॉर दि स्टडी ऑफ् यू. एस्. एस्. आर, म्युनिच. या संस्थेचें बुलेटिन, ऑगस्ट १९६४, मार्च १९५९, मे १९६०).
यानंतर आता आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद- जो इतके दिवस बूर्झ्वा व क्रांतिविरोधी होता- तो आता मान्य होऊ लागला आहे. आता गणित, रसायन, पदार्थविज्ञान व बरेंचसें जीवशास्त्र हें कम्युनिस्ट पार्टीच्या जाचक बंधनांतून मुक्त झालें आहे. डॉ. स्टीफन योव्हेव हा लेखक यांविषयी लिहिताना म्हणतो, "न्यूक्लर फिजिसिस्ट व बायॉलॉजिस्ट हे गेली दोन वर्ष (१९५८-५९) जाहीरपणें विरोधविकासवादाचा पाया हादरून टाकणारी भाषणे करीत आहेत. याचे रहस्य काय ? कम्युनिस्टांना पाश्यात्त्य लोकसत्तांवर, जागतिक युद्ध न करतां, मात करावयाची आहे. त्यासाठी या शास्त्रांत अत्यंत द्रुतगतीने प्रगति होणे अवश्य आहे. हें ध्यानीं आल्यामुळेच सोव्हिएट दंडसत्तेने ही अपूर्व अशी सहिष्णुता धारण केली आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या एकविसाव्या अधिवेशनांत क्रुश्चेव्हने स्पष्टपणे सांगितले की, "सोशॅलिझमचा अंतिम विजय हा, लेनिन म्हणतो त्याप्रमाणे, सोव्हिएट रशिया व भांडवली राष्ट्रे यांच्यांत भयानक संघर्ष होऊनच साधतां येईल असे नाही. आर्थिक, राजकीय व तात्त्विक क्षेत्रांत आघाडी मारून तो विजय मिळवितां येईल." यामुळेच केवळ व्यावहारिक कारणांमुळे क्रुश्चेव्हने आपल्या पिसाट, मार्क्सधर्मांध अनुयायांना सध्या लगाम घातला आहे.
सुंभ जळाला तरी-
मात्र हे सर्व जडशास्त्रांच्या बाबतीत खरे आहे. गणित, पदार्थविज्ञान, रसायन ही प्रमादहीन (एक्झॅक्ट) निरपवाद शास्त्रे आहेत. तेथे नाही- होय म्हणण्याची सोय नाही. म्हणून ज्याला औद्योगीकरण करावयाचें आहे, अद्ययावत् शस्त्रास्त्रांनी सज्ज व्हावयाचें आहे, त्याला त्यांपुढे शरणागति पत्करणे भाग आहे. सोव्हिएट दंडराज तशी ती पत्करीत आहेत. पण सुंभ जळाले तरी पीळ राहतोच या न्यायाने ते अजून इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान इत्यादि सामाजिक शास्त्रांच्या बाबतींत मार्क्सप्रणीत धर्मांधता सोडण्यास तयार नाहीत. कारण त्यांतील सिद्धान्त वरील शास्त्रांसारखे तंतोतंत, निरपवाद नसतात. जीवनशास्त्राचें थोडेसें तसेंच आहे. गणित- पदार्थविज्ञान यांच्याइतकें तें निरपवाद नाही. त्यामुळे सोव्हिएट शासन त्या बाबतींत मावर्ससादाचे लाड करूं शकले. पण सोव्हिएट रशियांत शेतीचा सर्व विचका झाला तो लायसेंकोच्या अशास्त्रीय मतांच्या समर्थनामुळे झाला, असें एका सोव्हिएट शास्त्रज्ञाने नुकतेच प्रकटपणे सांगितले आहे (उक्त म्युनिच बुलेटिन). तेव्हा इतर सामाजिक शास्त्रांच्या बाबतींतहि असाच प्रत्यय येऊन सोव्हिएट दंडराजांना तेथेहि पिसाट धर्मांध वृत्ति सोडून इहवादाकडे वळावें लागेल, असा सुमार दिसूं लागला आहे.
यूजीन कामेन्का (ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी) यांनी 'बोल्शेव्हिक कालखंडांतील तत्त्वज्ञान' या आपल्या लेखांत असाच आशावाद प्रकट केला आहे. (सोव्हिएट रशियाची पन्नास वर्षे, खंड २ रा समाजप्रबोधन संस्था, पुणे, १९६८). ते म्हणतात, "बोल्शेव्हिकांनी तत्त्वज्ञानाला राजकीय विचारसरणीचं एक उपांग बनवून टाकल्यामुळे रशियांत तत्त्वज्ञानाला पोथीनिष्ठ धार्मिक पंथाचे रूप येणें अटळ होतें. या तत्त्वज्ञानाचे प्रमाणग्रंथ म्हणजे मार्क्स-एंगल्स, लेनिन-स्टॅलिन यांचे ग्रंथ आणि त्यांचे प्रमाण भाष्यकार म्हणजे सोव्हिएट कम्युनिस्ट पक्ष. त्याने केलेल्या भाष्यावर स्तुतिवर्षाव करणे व त्याचाच अनुवाद करणें हें सोव्हिएट तत्त्ववेत्त्यांचे एकमेव कार्य. असे असल्यामुळे समकालीन पाश्चात्य विचारवंतांच्या तुलनेने तर राहु द्याच, पण क्रांतिपूर्वकालीन रशियन तत्ववेत्यांनी बौद्धिक चिकित्सेची आणि विश्लेषणाची जी पातळी गाठली होती तिच्या तुलनेने सुद्धा बोल्शेव्हिक तत्त्ववेत्ते फार थिटे पडतात. सोव्हिएट दंडधरांनी १९२१ सालीच धर्म आणि चिद्-वाद (आयडॲलिझम) यांविरुद्ध एक जोरदार मोहीम सुरू केली; मार्क्सेतर तत्त्वज्ञान सांगणाऱ्या प्राध्यापकांना भराभर स्थानभ्रष्ट करण्यांत आले; आणि आस्कोल्दोव सारख्या अनेक तत्त्ववेत्त्यांना हद्दपार करण्यांत आले. पण १९४७ सालापासून या धोरणांत हळूहळू फरक पडत चालला आणि १९५५ मध्ये जे वादविवाद व विचारमंथन झाले त्यावरून तत्त्वज्ञानांतील पोथीनिष्ठपणा व अंध-सैद्धान्तिक निष्ठा झुगारून देण्याची प्रवृत्ति स्पष्टपणे दिसू लागली आहे, असे म्हणावेसें वाटतें."
विश्वाच्या पसाऱ्याचे रहस्य
तसें झाल्यास इहवादी वातावरण निर्माण होऊन सोव्हिएट तत्त्ववेत्ते कांहीसे वरच्या पातळीवर जातील हे खरे; पण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत एवढ्याने भागणार नाही. तत्त्वज्ञान, अध्यात्मचिंतन ही मानवी मनाने अनंतांत घेतलेली एक झेप आहे. एक भरारी आहे. सांताच्या बंधनांतून सुटून अनंतांत, अतींद्रियांत अवगाहन करावे ही मानवी मनाची एक आर्त आहे. त्यांतून वैज्ञानिक कसोटीच्या दृष्टीने प्रत्यक्षांत कांही हातीं लागलें नाही, तरी तें अवगाहनच मानवी मनाला भव्यता व विशालता प्राप्त करून देतें. अनंताशीं क्षणकाल, कल्पनेने का होईना, एकरूप होण्याचा आनंद हा पृथ्वीमोलाचा आनंद आहे. आणि त्यासाठी ज्या समाजांतील लोक अखंड धडपड करीत नाहीत तो समाज कायम दरिद्रीच राहणार. मार्क्स व एंगल्स यांची बुद्धि, प्रज्ञा, चिंतनाची ऐपत अत्यंत दरिद्री, भिकारी होती. मानवी जीवनाचें व विश्वाच्या पसाऱ्याचें रह्स्य आकलण्याची त्यांच्या मनाला कुवतच नव्हती. त्यामुळे त्यांच्या सिद्धान्तांच्या बंधनांत जोपर्यंत रशियन तत्त्ववेत्ते गुरफटलेले आहेत तोपर्यंत विश्वचैतन्याची हाक त्यांना ऐकू येणें शक्य नाही व ती नाही तोपर्यंत तो समाज दरिद्रीच राहणार. पण येथपर्यंत मजल गेली नाही, तरी मार्क्सच्या अंध-धर्माच्या शृंखलांतून सुटून तत्त्वज्ञानाचें चिंतन जरी बोल्शेव्हिक पंडित करूं लागले, तरी तें इहवादपोषक होईल यांत शंका नाही.
विज्ञान, तत्त्वज्ञान, यांच्याप्रमाणेच साहित्याच्या क्षेत्रांतहि वातावरण बदलत चाललें असल्याचीं चिन्हें दिसत आहेत. १९६३ सालीं क्रुश्चेव्ह याने केलेल्या भाषणावरून कम्युनिस्ट पक्षाची मूळ भूमिका बदलली आहे, असें म्हणतां येत नाही. "लेखकांनी, कलावंतांनी पक्षाचीच भूमिका उचलून धरली पाहिजे," असें तो म्हणाला. पण असें असले तरी, प्रत्यक्षांत स्टॅलिनचा सर्वंकष सत्तावाद आता समूळ नष्ट झाला आहे यांत शंका नाही. व्हिक्टर नेक्रासोव्ह हा पक्षाचा सभासद असूनहि त्याने क्रुश्चेव्हवर टीका केली. 'सातासमुद्रापलीकडे' हा त्याचा प्रवासवर्णनात्मक ग्रंथ बंडखोरीने भरलेला आहे. तरी त्याने आपले मत बदलण्याचें व कबुली जबाब लिहून देण्याचें नाकारलें. मागल्या काळीं या अपराधासाठी देहान्तशासन झालें असतें. पण या वेळीं नेक्रोसोव्हला पक्षांतून काढून टाकण्याचे धैर्य सुद्धा दंडराजांना झालें नाही. सिऱ्यावस्की व दानियेल या दोन लेखकांना शिक्षा झाल्या हें खरें. पण त्यांनी केलेली भाषणे, त्यांतील आत्मसमर्थन, हें युग पालटल्याचें लक्षण आहे. स्टॅलिनच्या काळांत अशा लेखकांना, "आपण चुकलों, आपल्याला कम्युनिझम कळला नाही, आपण प्रतिगामी आहोंत, क्रांतिद्रोही आहोंत," असें लिहून माफी मागावी लागे. पण या दोन लेखकांनी तसे करण्याचें नाकारून आपल्या मतांचें व कृत्यांचें जोरदार समर्थन केलें व सोव्हिएट अधिकाऱ्यांविरुद्ध टीका केली. हें लक्षण अगदी निराळें आहे. तें मन्वंतर होत असल्याचे निदर्शक आहे.
तर्कहीन तत्त्वज्ञान
सोव्हिएट रशियाच्या शासनाचें रूप येथवर आपण पाहिलें. आपल्याल त्याचा इहवादाच्या दृष्टीने विचार करावयाचा होता. त्या दृष्टीने पाहतां असें दिसतें की, प्रारंभापासून तें शासन एका अंध शब्दप्रामाण्यवादी तर्कहीन, भ्रांत अशा तत्त्वज्ञानाच्या, मार्क्स-धर्माच्या शृंखलांनी बद्ध झालेलें होतें व अजूनहि बव्हंशीं तसेंच आहे. पण लेनिन, स्टॅलिन, क्रुश्चेव्ह हे त्या शासनाचे नेते समयज्ञ, व्यवहारवादी व उत्कर्षैकदृष्टि असल्यामुळे प्रसंगाप्रसंगाने त्यांना त्या शृंखला ढिल्या करण्याची बुद्धि झाली व तशा त्यांनी केल्याहि. पण त्यापेक्षाहि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिझमची स्थापना हें त्यांचे अंतिम ध्येय असल्यामुळे त्यांना औद्यागीकरणाची कास धरणें अवश्य होतें. त्यासाठी विज्ञानाची उपासना अपरिहार्य होती. हें त्यांच्या मार्क्स·धर्मानेच सांगितले होते. त्यामुळे ती त्यांनी प्रारंभापासूनच आरंभिली होती. शाळा-महाशाळांतून विज्ञानाच्या अध्यापनावर सर्व शक्ति केंद्रित करून त्यांनी नव्या पिढीत आमूलाग्र मानसिक परिवर्तन घडवून आणलें होतें; आणि या नव्या शक्तीनेच त्यांच्या अंधसैद्धान्तिक धर्मावर आघात केल्यामुळे, प्रथम एका क्षेत्रांत, नंतर दुसऱ्या, नंतर तिसऱ्या क्षेत्रांत अशी क्रमाक्रमाने त्यांना माघार घ्यावी लागली. बुद्धिप्रामाण्य, वस्तुनिष्ठ सत्य संशोधन व्यक्तिवाद या तत्त्वांपुढे त्यांना शरणागति पत्करावी लागली. आणि सहजगत्या इहवादी व्हावे लागले. त्यांनी आपली मार्क्सवादी भूमिका अजूनहि सोडलेली नाही. पण आता शास्त्रज्ञ मार्क्सवादांतील विरोध-विकासवाद व ऐतिहासिक जडवाद हीं तत्त्वें अशास्त्रीय व निराधार आहेत असे प्रतिपादून मूळ मार्क्स-धर्माला तात्त्विक भूमिकेवरूनच शह देत आहेत आणि सोव्हिएट नेत्यांना औद्योगीकरण, लष्करी सामर्थ्याचा विकास यांकडे लक्ष ठेवून ही बंडखोरी सहन करावी लागत आहे. हा क्रम असाच चालला- तसा तो चालेल असे आज वाटत आहे- तर लवकरच सोव्हिएट शासन मार्क्सवादाच्या शृंखलांतून मुक्त होईल आणि मग ते पूर्णपणें इहवादी होईल अशी आशा करण्यास जागा आहे.