इहवादी शासन/मुस्लिम राष्ट्रांतील इहवादी शासन



मुस्लिम राष्ट्रांतील
इहवादी शासन




 सोव्हिएट रशियांतील इहवादी शासनाचा विचार गेल्या प्रकरणांत केला. आता मुस्लिम राष्ट्रांतील इहवादाचा विचार करावयाचा आहे. इजिप्त, सिरिया, इराक, सौदी अरेबिया, तुर्कस्तान व इराण हीं नव्यानेच जन्माला आलेलीं राष्ट्रें प्रामुख्याने या लेखांत डोळयांपुढे आहेत. इंडोनेशिया, मलाया, लेबॅनॉन, मोरोक्को, ही अशींच मुस्लिम राष्ट्रें आहेत. त्यांचा विचार अनुषंगाने होईलच. पण इस्लामची प्राचीन परंपरा, धर्माचें आद्यपीठ, मुस्लिम साम्राज्य इ. अनेक दृष्टींनी अरेबिया, इजिप्त, सिरिया, तुर्कस्थान या वर निर्देिशिलेल्या राष्ट्रांना जास्त महत्त्व असल्यामुळे त्यांचाच विचार प्राधान्याने करावयाचा आहे.
 भारताच्या दृष्टीने या विवेचनाला फार महत्व आहे. मुस्लिम समाजांत इहवाद प्रसृत न झाल्यामुळेच भारताची फाळणी झाली, असें अनेक अभ्यासकांचें मत आहे. आणि फाळणी झाल्यानंतरहि भारतापुढे ज्या अनेक समस्या आहेत त्यांतील तीन- चतुर्थांश समस्या मुस्लिमांच्या आहेत. त्या इहवादविरोधामुळेच निर्माण झालेल्या आहेत हेहि बहुमान्य आहे. याच कारणामुळे भारताची पुन्हा एकदा फाळणी होण्याचा धोका आहे, असेंहि अनेक विचारवंत म्हणतात. एकदा पाकिस्तान दिलें की भारतांत अनेक पाकिस्तानें निर्माण होतील, असा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक वेळा दिला होता. केरळांतील मल्लापुरमच्या रूपाने तशी चिन्हें दिसूं लागली आहेतच. यावरून या विषयाचें महत्त्व किती आहे तें वाचकांच्या ध्यानांत येईल. म्हणूनच भारताच्या इहवादी शासनाचा विचार करण्याआधी मुस्लिम देशांतील इहवादी शासनाचा विचार करणें अवश्य आहे.

धर्माचे सर्वंकष स्वरूप

 इस्लाम हा सर्वंकष धर्म आहे. मनुष्य जन्मल्यापासून तो मरेपर्यंत त्याच्या आयुष्यांतील सर्व क्षेत्रांतील सर्व घटनांवर, विकार-विचारांवर, संस्थांवर, तत्वज्ञानावर धर्माची अप्रतिहित सत्ता असली पाहिजे, असें मुस्लिम धर्मवेत्ते मानतात. हॉवर्ड ए. रीड यांनी म्हटल्याप्रमाणे "इह व पर, ऐहिक व पारलौकिक, धार्मिक व धर्मनिरपेक्ष असा भेद इस्लाम करूं शकत नाही.' (करंट हिस्टरी, जून १९५७) राजशासन, शिक्षण, ज्ञानोपासना, समाजरचना, विवाह, अंत्यसंस्कार, अर्थव्यवस्था या महत्वाच्या संस्थांपासून पोषाख, केशरचना, नमस्कार, खाणे-पिणे, बसणें-उठणें, या सामान्य आचारांपर्यंत प्रत्येक गोष्ट धर्मनियमांनीच झाली पाहिजे असा पुराण इस्लामचा आग्रह आहे. असा आग्रह बहुतेक सर्वच धर्मांचा असतो. एक प्राचीन काळचा वैदिक हिंदु धर्म सोडला, तर जगांतील बहुतेक सर्व धर्म असेच असहिष्णु व एकांतिक होते व अजूनहि कांही अंशी तसे आहेत. पण तरीहि इस्लामचा सर्वंकषतेचा कडवा आग्रह या सर्वांहून शतपटींनी अधिक आहे. प्रारंभीच्या काळांत तसा तो नव्हता, असे आज अनेक पाश्चात्त्य व पौरस्त्य पंडित म्हणतात. पण तो उदारमताचा, सहिष्णुतेचा तीन-चारषे वर्षांचा काळ संपल्यावर तेव्हापासून पाश्चात्त्य विद्येचा मुस्लिम समाजांत प्रवेश होईपर्यंत इस्लाम हा पराकाष्ठेचा एकांतिक व अंधमतवादी होऊन बसला होता याविषयी फारसे दुमत नाही. आणि अंधमतवाद आला की सर्वंकषता अपरिहार्यच असते. मनुष्याच्या श्वासोच्छ्वासावरहि आपली सत्ता चालावी अशी महत्वाकांक्षा अशा धर्मपीठांची असते. मुस्लिम राष्ट्रांमध्ये गेली सातशे-आठशे वर्षे अशी सर्वव्यापी धर्मसत्ता होती. अशा स्थितीत तेथे इहवाद येणे शक्यच नव्हते. पण एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आणि विशेषतः उत्तरार्धात पाश्चात्त्य भौतिक विद्या त्या देशांत पसरूं लागली. आणि त्या विद्येमुळे लोकांची मने धर्मसत्तेच्या जाचांतून हळूहळू मुक्त होऊ लागली. बुद्धिजीवी वर्गातील कांही तरुणांची मने तर पूर्णपणे मुक्त झाली. मुस्लिम राष्ट्रांत पूर्णांशाने किंवा बव्हंशाने किंवा अल्पांशाने क्रान्ति घडवून आणून तेथे इहवादी शासनाची स्थापना करण्याचे श्रेय या बुद्धिवादी नेत्यांना आणि त्यांनी लोकांना पढविलेल्या पाश्यात्त्य भौतिक विद्येला आहे.
 पाश्चात्त्य विद्या म्हणजे काय ? रसायन, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, स्थापत्य, गणित, खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषाशास्त्र या जड आणि मानवी शास्त्रांच्या समूहाला पाश्चात्त्य विद्या म्हणतात. गेल्या शंभर-दीडशे वर्षांत आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, पूर्व युरोप या खंडांत जें आमूलाग्र परिवर्तन घडून आले आहे तें या विद्येमुळेच होय. मुस्लिम राष्ट्रहि याला अपवाद नाहीतच. तेव्हा तेथील इहवादाचा उदय आणि विकास यांचें सम्यक् आकलन होण्यासाठी या पाश्यात्य विद्येची मूलतत्त्वं कोणतीं व त्यांतून कोणत्या शक्ति निर्माण होतात हे पाहून मुस्लिम राष्ट्रांत ती तत्त्वें केव्हा, कशी रुजलीं, तीं कोणीं रुजविलीं, त्यांचे परिणाम काय झाले व त्यांतून इहवादपोषक कोणत्या शक्ति निर्माण झाल्या, हें पाहणें अवश्य आहे.
 प्रा. हॅनस् कोहन (स्मिथ कॉलेज, अमेरिका) या पंडिताने या विषयाचा दीर्घकाल अभ्यास करून त्यावर 'वेस्टर्न सिव्हिलिझेशन इन् दि निअर ईस्ट' व 'हिस्टरी ऑफ नॅशनॅलिझम इन दि ईस्ट' असे दोन ग्रंथ लिहिले आहेत. वरील मुस्लिम देशांतील गेल्या शंभर वर्षांतील परिवर्तनाचा अत्यंत सुबोध असा इतिहास या ग्रंथांत त्याने दिला आहे. या विषयाच्या अभ्यासकांनी हे ग्रंथ अवश्य पाहवेत. पाश्यात्त्य विद्येमळे या देशांत प्रबोधनयुग आले व त्यामुळे तेथे एक नवा बुद्धिजीवी वर्ग निर्माण होऊन त्याने धर्म, समाज, राजकारण, अर्थव्यवस्था या प्रत्येक क्षेत्रांत सर्वस्वीं नवी सृष्टि कशी निर्माण केली त्याचें या दोन ग्रंथांत ग्रंथकाराने साकल्याने विवेचन केले आहे.

प्रबोधनाचे प्रयत्न

 हिंदुस्थानांतील ब्रिटिश सत्तेला शह देण्यासाठी नेपोलियन प्रथम इजिप्तमध्ये शिरला, त्याच्या मागोमाग ब्रिटिश तेथे आले आणि मग पुढील काळांत या दोन सत्तांचा या मुस्लिम देशांशी घनिष्ठ संबंध येऊन त्यांचें वर्चस्वहि तेथे प्रस्थापित झालें; आणि हिंदुस्थानप्रमाणे या वर्चस्वामागोमाग पाश्यात्त्य विद्याहि या देशांत प्रवेश करती झाली. तिचें स्वागत करून तिला आपल्या भूमींत अकुंठित प्रवास करण्यास साह्य करणारे थोर मुस्लिम नेते वरीलपैकी बहुतेक देशांत झाले हें जगाचें सुदैव होय. नेपोलियनचा पराभव होऊन तो परत गेल्यानंतर इजिप्तमध्ये महंमदअल्ली हा कर्ता राजा उदयास आला. त्याने अनेक युरोपीय प्राध्यापकांना स्वदेशांत पाचारण केले, आपले अनेक विद्यार्थी पाश्चात्त्य विद्यापीठांत पाठविले, इजिप्तमध्ये अनेक शाळा, महाशाळा स्थापन केल्या आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचीहि सोय केली. स्वदेशांत अशा सुधारणा केल्यानंतर महंमदअल्लीने अरेबिया, सिरिया, तुर्कस्थान यांवर स्वारी केली. ते देश जिंकले. तेथेहि पाश्चात्त्य विद्या प्रसृत करून, प्रबोधनयुगास प्रारंभ करून द्यावा, असा त्याचा मानस होता. पण प्रबोधनांतून कर्तृत्व व सामर्थ्य निर्माण होतें हें जाणणाऱ्या ब्रिटिशांनी सर्वस्व पणाला लावून त्याला पायबंद घातला. जमालउद्दिन एल्-अफगाणी हा या क्षेत्रांतला दुसरा थोर नेता होय. याचा जन्म १८३८ च्या सुमारास अफगाणिस्तानांत झाला. पण प्रौढपणी सर्व मुस्लिम देशांत प्रवास व वास्तव्य करून दर ठिकाणी प्रबोधनयुग निर्माण करण्याचा हा सतत प्रयत्न करीत असे. १८७० ते १८७८ अशी आठ वर्षे हा इजिप्तमध्ये होता. तेथील एल्-अझार विद्यापीठांतील विद्यार्थ्यांत त्याने या काळांत अपूर्व जागृति घडवून आणली. बुद्धिवाद, स्वतंत्र चिंतन, तर्कनिष्ठ विचारसरणी व संशोधन यावर त्याचा भर असे. त्यामळे पाश्यात्त्य सत्ताधारी व जीर्णमतवादी मुस्लिम मुल्ला-मौलवी त्याचा सारखाच द्वेष करीत. त्यामुळे प्रत्येक देशाने त्याला हद्दपार केले. तरीहि निर्भयपणे सर्वत्र धाडसाने प्रवेश करून लोकजागृतीचे कार्य त्याने अखंड चालू ठेविलें होतें. ग्रॅंडमुफ्ती महंमद अब्दुल हा याचाच शिष्य. टालस्टॉयला लिहिलेल्या एका पत्रांत त्याने आपल्या मनांतील धर्मसुधारणेचे व उदारमतवादी विचार स्पष्टपणे मांडले आहेत. शेख अली अब्दुल रझिक हा मनसुर मेहाकामा येथील शरीयत न्यायालयांत न्यायाधीश होता. त्याचे शिक्षण ऑक्सफर्डला झाले होते. परत आल्यावर त्याने 'इस्लाम व शासनाची तत्त्वें' या विषयावर एक ग्रंथ लिहून त्यांत इहवादी तत्त्वांचं निरुपण केलें. "मुस्लिम कायदा हा केवळ व्यक्तीच्या खाजगी जीवनासाठी असून, समाज किंवा शासन यावर नियंत्रण ठेवणें हा त्याचा हेतूच नाही" असे प्रतिपादन त्याने केले आहे. बहुभार्यात्व व स्त्रीचें पारतंत्र्य यांचा त्याने निषेध केला आहे; आणि जुने सरंजामदार, राजा आणि उलेमा यांचें वर्चस्व नष्ट झाले पाहिजे अशी मागणी केली आहे. या घोर अपराधासाठी शेख रझिक याला न्यायपीठावरून पदच्युत करणांत आले. पण तरुण विद्यार्थ्यांनी मात्र सर्वस्वी त्यालाच पाठिंबा दिला. अशा या दीर्घकालीन प्रबोधनांतूनच आरबी पाशा, झगलूल पाशा, मुस्ताफा केमाल (तुर्कस्थानचा केमाल अतातुर्क निराळा) हे मध्यमवर्गीय नेते उदयास आले व त्यांनी इजिप्त हे राष्ट्र घडविले.
 सिरिया, इराक, सौदी अरेबिया हे सर्व अवस्थानातील प्रदेश. तेथेहि सामाजिक व राजकीय प्रबुद्धता याच मार्गाने आली. शेकडो वर्षे हे देश जीर्ण, प्रतिगामी अशा तुर्क साम्राज्यशाहीच्या अंध सत्तेखाली होते. त्यांच्या ठायी प्रतिकारसामर्थ्य असे मुळीच नव्हते. पाश्चात्य मिशनरी प्रथम सिरियांत शिरले. त्यांनी शाळा, छापखाना, वृत्तपत्रे या आधुनिक संस्था तेथे आणल्या. त्यामुळे इतर देशांपेक्षां सिरियांत परिवर्तन आधी घडून आले. १८६८ साली अमेरिकन प्रोटेस्टंट मिशनऱ्यांनी बेरुत येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले व तेथे त्यांनी अरबी भाषेत अध्यापन करण्यास प्रारंभ केला. १८७५ साली फ्रेंच जेसुइटांनी बेरुत येथे विद्यापीठ स्थापन केले व अरबी वर्तमानपत्रे सुरू केली. १८९५ सालीं शेख अहंमद आब्बास याने उस्मानिया कॉलेजची स्थापना केली. हा जेख अहंमद एल्-अझारच्या धर्मसुधारकांचा अनुयायी होता. इस्लामचा त्याला दृढ अभिमान होता. पाश्चात्य विद्येचाहि तो कट्टा उपासक होता. या दोहोंचा समन्वय साधून त्याने सिरियांत चालू झालेल्या परिवर्तनाला चांगली गति दिली. पाश्चात्य विद्येच्या या अध्ययनामुळे सिरियन वाङमयांतहि क्रांति झाली आणि बुट्रास एल्. बुस्टानी, सुलेमान बुस्टानी, आदिव इशाक हे लेखक व हिंद नीफेल, ललिबे हशेम या लेखिका उदयास आल्या व त्यांनी वृत्तपत्रे मासिके, ग्रंथ या साधनांनी नवविचारधारा सर्वत्र पसरून दिल्या. बुट्रास बुस्टानी याने तर १८७५ साली अरबी विज्ञानकोश रचण्यास प्रारंभ केला. १८८३ त त्याचा मृत्यु झाला. नंतर त्याचे भाऊ व त्याचा मुलगा यांनी तें कार्य पुरें केलें. फराक अंतन याने 'न्यू जेरुसलेम' या कादंबरीतून विज्ञानवादाचा विपुल गौरव केला आणि सामाजिक विषमतेवर कडक टीका करून, सामाजिक न्यायाचा दृढ पुरस्कार केला.

नव्या विद्येचें सामर्थ्य

 हॅनस कोहन यांनी 'वेस्टर्न सिव्हिलिझेशन इन् दि निअर ईस्ट' या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत या पाचात्य सुधारणेचीं लक्षणें व तिचें महत्त्व वर्णिलें आहे. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, इहवाद व विज्ञानवाद हीं त्या संस्कृतीचीं ते लक्षणें मानतात. ही संस्कृति मानवाच्या बुद्धीला आवाहन करून व त्याची शब्दप्रामाण्य-वृत्ति नष्ट करून जीर्ण समाजरचना नष्ट करण्याचें सामर्थ्य त्याला देते. एकोणिसाव्या शतकांत ही संस्कृति सर्व जगांत पसरली व तिने सर्वत्र हेंच कार्य केलें. या विद्येच्या जोरावरच युरोपने जग जिंकले. आणि आता आशिया आफ्रिकेतील देश याच विद्येच्या साह्याने युरापचे आर्थिक व राजकीय वर्चस्व नष्ट करीत आहेत. युरोपचें जगावर स्वामित्व होते तेव्हा ते श्वेतवंशीय लोक आपल्या अंगभूत वांशिक श्रेष्ठतेमुळे व परमेश्वरी योजनेमुळे आपल्याला हें सामर्थ्य प्राप्त झालें असें मानीत. पण हा त्यांचा भ्रम होता. अर्वाचीन पाश्चात्त्य सुधारणेच्या उदयापूर्वी पौर्वात्य लोक पाश्चिमात्यांइतकेच समर्थ होते. कधी कधी ते श्रेष्ठहि ठरत. तेव्हा युरोपचें सध्याचें सामर्थ्य हें नव्या विद्येचें आहे वंशगुणाचें व परमेश्वरी योजनेचें नाही.
 तसे असल्यामुळेच तुर्कस्थान हा १९२२ साली ब्रिटन, फ्रान्स या मातबर पाश्चात्त्य देशांवर मात करून स्वतंत्र होऊ शकला. तुर्कस्थानांत पाश्चात्त्य विद्या शंभर वर्षांपूर्वीच येऊन पोचली होती. सुलतान महंमद दुसरा हा इजिप्तच्या वर निर्देशिलेल्या महंमदअल्लीच्या आदर्शाने भारावून गेला होता. पौर्वात्य अनियंत्रित सुलतानी सत्ता व शतकानुशतकाची स्थिरावस्था यांतून राष्ट्र मुक्त करण्यावांचून व घटनात्मक शासनाच्या स्थापनेवांचून गत्यंतर नाही हें त्याने जाणलें होतें. त्याने पीटर दि ग्रेटप्रमाणे लष्कराची पुनर्घटना करण्याचें ठरवून एक नवें लष्करी विद्यालय स्थापिले व युरोपीय लष्करी अधिकाऱ्यांची तेथे नेमणूक केली. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ निर्माण करून तुर्की व फ्रेंच भाषांत 'ला मॉटिनर ऑटोमन' नांवाचें वर्तमानपत्रहि चालू केले. महंमदाचा मुलगा अब्दुल मजीद याने रशिदापाशा या लंडन व पॅरिस येथे राहून नवविद्याविभूषित होऊन आलेल्या गृहस्थांच्या साह्याने सुधारणेचे व्रत तसेंच पुढे चालविलें. कायद्याचें राज्य, व्यक्तिस्वातंत्र्य व विशेष म्हणजे सर्वधर्म- समानत्व हीं तत्त्वें त्याने पुकारली आणि फ्रेंच कायद्याचे अनुकरण करून नवें सिव्हिल व क्रिमिनल कोडहि तयार केलें. यानंतर तुर्की विद्यार्थी फ्रान्सला शिक्षणासाठी जाऊं लागले. आणि त्यांच्यांतूनच परिवर्तनाला अवश्य असा बुद्धिजीवी मध्यमवर्ग निर्माण झाला. शिनासी एफंडी, त्याचा शिष्य नमिल केमाल वे, झिया पाशा, हमीद बे हे त्यांतील आघाडीवरचे लोक पॅरिस, लंडन येथे अनेक वर्षे राहून परत आलेले होते. त्यांनी मोलियरचीं नाटकें, रूसोचे ग्रंथ यांची तुर्कीत भाषांतरे करून तुर्की रंगभूमि सजविली आणि 'हरित', 'इब्रेट', 'वतन' यांसारख्या राष्ट्रीय पत्रांना जन्म दिला. पण अशा रीतीने लोकजागृति होत असतांना १८७६ साली अब्दुल हमीद हा प्रतिगामी, जीर्णमतवादी सुलतान गादीवर आला व पुढील तीस वर्षे प्रबोधनयुगाला चांगलाच पायबंद बसला. हा सुलतान कडवा मुस्लिम होता व मध्ययुगाप्रमाणेच धर्माचें राजकारणावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करणें आणि पाश्चात्त्य विचार खणून नष्ट करणें हें उद्दिष्ट त्याने डोळ्यांसमोर ठेविले होते.

'यंग टर्कस'चें कार्य

 प्रगतीला अंधधर्ममताचे वर्चस्व नष्ट होणे किती अवश्य आहे हें यावरून दिसून येईल. तें वर्चस्व नष्ट करावयाचे तर पाश्चात्य भौतिक विद्येवांचून दुसरा तरणोपाय नाही, हें तरुण तुर्कांनी चांगले जाणले होते. या तीस वर्षांच्या काळांत हे 'यंग टर्कस्' बहुतेक हद्दपार होऊन युरोपांत गेले होते. पण तेथे ते स्वस्थ बसले नाहीत. नव्या ज्ञानाचा दीप इतक्या लांबूनहि त्यांनी तुर्कस्थानांत पाजळत ठेविला होता. त्यामुळेच नव्या चळवळीची शक्ति वाढत जाऊन १९०९ मध्ये सुलतानाला तिच्यापुढे वांकावें लागले. केमाल अतातुर्क हा या 'यंग टर्क' लोकांनी स्थापिलेल्या 'युनियन ॲण्ड प्रोग्रेस' या समितीचा प्रारंभापासून सभासद होता. त्याला फ्रेंच भाषा उत्तम अवगत होती. रूसो, व्हाल्टेअर, हॉब्स, मिल यांचे तत्त्वज्ञान त्याने आत्मसात् केलें होतें. सुलतानी राजवट, अंधमतवादी मुल्ला-मौलवी, शरियत यांचा तो हाडवैरी होता. यांच्या वर्चस्वांतून इस्लाम मुक्त केल्यावांचून तुर्कराष्ट्राची प्रगति होणार नाही अशी त्याची निश्चिति होती. रुसो, व्हाल्टेअर, मिल यांनी दिलेल्या या मनःसामर्थ्याच्या जोरावरच त्याने तुर्कस्थानांत नवी सृष्टि निर्माण केली.
 इहवादाचा अर्थ यावरून स्पष्ट होईल. धर्म व राजशासन यांची फारकत एवढाच इहवादाचा अर्थ नाही. मानवी बुद्धि, मानवी प्रज्ञा मानवाचें व्यक्तिमत्त्व अंध, जीर्ण धर्माच्या मगरमिठींतून मुक्त होणें हा त्याचा अर्थ आहे. तसे झाल्यावांचून कोणत्याच क्षेत्रांत मानव नवें तत्त्वज्ञान निर्माण करूं शकत नाही. नवा आचार स्वीकारु शकत नाही. रोमचा पोप पॉल याने नुकताच कुटुंबनियोजना- विषयी निर्णय देऊन तें धर्मबाह्य ठरविले आहे. पण त्याचा तो विवेकशून्य निर्णय प्रसिद्ध होतांच अनेक कॅथॉलिक स्त्री-पुरुषांनी, "आमच्या वैयक्तिक जीवनांत हस्तक्षेप करण्याचा पोपला कसलाहि हक्क नाही" असें उत्तर दिलें. डॉ. रॉबर्ट मॅकरेडी, डॉ. जॉन रॉक यांसारख्या विख्यात कॅथालिक वैद्यकशास्त्रज्ञांनी "हा वैद्यकशास्त्राचा प्रश्न असून, यांत पोपचा कांही संबंध नाही" असें जाहीर केलें आणि रे. जॉन ओब्रायन, हॅनस कुंग, कार्ल राहनर यांसारख्या प्रतिष्ठित कॅथॉलिक धर्माचार्यांनी तर पोपविरुद्ध मोहीमच उघडली. यामुळे कॅथॉलिक पंथांत दुफळी माजेल, गॅलिलिओ सारखें हे प्रकरण होईल, सोळाव्या शतकांतील घटनांची पुनरावृत्ति होईल, असा त्यांनी पोपला इशारा दिला आहे व "तुम्हीहि मानव असून प्रमादातीत नाही हे जाणून आपला प्रमाद कबूल करून, ही धर्माज्ञा मागे घेतलीत तरच हा संघर्ष मिटेल," असें त्याला बजावले आहे. कॅथॉलिक धर्मगुरूंच्या विवाहाच्या बाबतींत हेंच होणार आहे. त्यांना विवाहाची परवानगी सध्या नाही. पण आता कांही धर्मगुरु ती मागत आहेत. पोप ती नाकारीत आहे. यामुळेहि कॅथॉलिक पंथांत चिरफळ्या होण्याचा संभव आहे.
 या प्रसंगांतून इहवादाची अनेक तत्त्वें स्पष्ट होतात. ऐहिक जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रांत विज्ञान- विरोधी असा धर्मनिर्णय करण्याचा पीठस्थ आचार्यांना हक्क नाही. आचार्य कितीहि मोठे असले तरी ते प्रमादातीत नसतात, त्यामुळे लोककल्याण कशांत आहे हे त्यांना कळेलच असे नाही, म्हणून परिस्थिति, इतिहास, अनुभव, विज्ञानशास्त्रे, तर्क यांच्या आधारेंच निर्णय केले पाहिजेत- हीं तीं तत्त्वें होत. पाश्चात्त्य विद्येचीं हीं प्रधान तत्त्वें आहेत. म्हणूनच इहवादाला पाश्यात्त्य विद्येचे एवढे महत्त्व वाटतें. तुर्कस्थानांतील नेते पश्चिमीकरणाची चळवळ व इहवादाची चळवळ हे शब्द एकाच अर्थाने वापरतात. या दोहोंत त्यांच्या मतें अभेदच आहे. यासाठीच मुस्लिम राष्ट्रांतील इहवादी शासनाचा उहापोह करतांना त्या देशांत पाश्चात्त्य विद्या कशी आली व तिचें कोणी, कसें स्वागत केलें याचा विचार प्रारंभीच करणें अवश्य वाटले. बहुधा सर्व मुल्ला-मौलवींनी तिला विरोध केला आणि राष्ट्रवादी, स्वातंत्र्यवादी तरुण पिढीने तिचें स्वागत केलें, ही गोष्ट फार अर्थगर्भ आहे.
 हॅनस कोहन म्हणतो, पंधराव्या शतकांत जें युरोपांत घडलें तेंच आज सर्व जगांत घडत आहे. त्यामुळेच युरोपीकरण, पश्चिमीकरण हाच मोक्षाचा मंत्र होय, असें सर्व अप्रगत देश मानीत आहेत. पण युरोपीकरण म्हणजे स्वयंप्रज्ञा, उपक्रमशीलता, उद्योग, शिस्त यांचे संस्कार ! युरोपीकरण म्हणजे स्वातंत्र्य, निर्भयता, नीतिधैर्य ! ही गुणसंपदा जो देश, जो समाज जोपाशील त्यालाच पाश्चात्त्य विद्या प्रसन्न होईल आणि तोच समाज खरा इहवाद निर्माण करूं शकेल. मध्यपूर्वेतील कोणत्या राष्ट्रांनी ती गुणसंपदा जोपासली व त्यांना तिचें फल काय मिळालें तेंच यापुढील लेखांत पाहवयाचें आहे.


 मागील प्रकरणांतील विवेचनावरून हें ध्यानांत येईल की, इहवादावाचून कोणतीहि प्रगति शक्य नाही, आणि धार्मिक क्रांति झाल्यावांचून इहवाद शक्य नाही. आज मध्यपूर्वेतील सुशिक्षित तरुणांत फार मोठ्या आकांक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यांना आपापल्या राष्ट्रांची अस्मिता पोसावयाची आहे. गेली अनेक शतकें इजिप्त, सिरिया, सौदी अरेबिया, इराक इत्यादि देश तुर्की साम्राज्यांत होते. स्वतःच्या भिन्न राष्ट्रीयत्वाची जाणीवहि त्यांना नव्हती. ती पाश्चात्त्य विद्येमुळे निर्माण झाली. तुर्कानंतर चाळीस-पन्नास वर्षे हे देश इंग्लिश- फ्रेंचांच्या अधिसत्तेखाली होते. त्यांतूनहि ते वीसएक वर्षांपूर्वी मुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आकांक्षा सतत वृद्धिंगत होत आहेत. त्यांना आपली राष्ट्रे बलाढ्य करावयाची आहेत. औद्योगिक प्रगति करावयाची आहे. जमिनींतून सुबत्ता निर्मावयाची आहे. त्यासाठी विज्ञानाचा, भौतिक शास्त्रांचा विकास करावयाचा आहे.
 या शतकाच्या आरंभी बहुतेक अरब देश व इराण येथे अमाप तेलाचे साठे सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा भांडवलाचा प्रश्न सुटला आहे. पण अजून बहुतेक तेल कंपन्या अमेरिका, ब्रिटन यांच्या ताब्यांत आहेत. मुस्लिम शासनांना निम्मी भागीदारी फक्त मिळते. हे तेल सर्वस्वी स्वतःच्या ताब्यांत असावे अशी अरब तरुणांची ईर्षा आहे. पण आज ती कर्तबगारी, ती संघटनविद्या, तें शास्त्रज्ञान त्यांच्या ठायी नाही. ही गुणसंपदा त्यांना अधिगत करावयाची आहे. पण दर पावलाला अंध जीर्ण धर्म त्यांच्या आड येत आहे, असे त्यांच्या लक्षांत आले आहे. हारवर्ड विद्यापीठाचे प्रा. रिचर्ड फ्राय यांनी 'इस्लाम इन् दि मिडल ईस्ट' या आपल्या लेखांत हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. (करंट हिस्टरी, जून १९५६). ते म्हणतात, "इस्लामच्या सर्वंकष, सर्वव्यापी जाचक बंधनांचा अरब तरुणांना कंटाळा आला आहे. या देशांत राष्ट्रभावना विकसत आहे, पण धर्मबंधने दर ठिकाणी आड येत आहेत. त्यामुळे या तरुणांच्या निष्ठा, त्यांची मूल्ये आता बदलत आहेत." गमाल अबदेल नासर याच्या 'दि फिलॉसफी ऑफ रेव्होल्यूशन' या पुस्तिकेवरून याची चांगली कल्पना येते. एकाहून एक मोठी अशी एककेंद्री वर्तुळे कल्पून तो म्हणतो की, "या वर्तुळांच्या केंद्रस्थानीं आपले इजिप्त हे राष्ट्र ठेवा. नंतरच्या वर्तुळांत आफ्रिकी देश, त्यानंतर सर्व अरब देश आणि शेवटच्या वर्तुळांत इस्लामी विश्व येईल." इस्लामची अधिसत्ता मनावर आहे तोपर्यंत हें मूल्यपरिवर्तन कधीहि शक्य होणार नाही. पण तें घडवावयाचें असा अरब तरुणांचा निर्धार आहे. आणि यासाठीच त्यांना धार्मिक क्रांति करावयाची आहे. इतर मुस्लिम देशांत सर्वत्र हीच वृत्ति दिसून येत आहे.

धार्मिक क्रांतीचा आधार

 धार्मिक क्रांतीचें पहिले लक्षण म्हणजे बुद्धिवाद, बुद्धिप्रामाण्य ! कुराणा- सारख्या धर्मग्रंथांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानण्याची म्हणजेच शब्दप्रामाण्याची वृत्ति जोपर्यंत मूळ धरून असते तोंपर्यंत धार्मिक क्रांति होणे शक्य नाही. तेव्हा मुस्लिमांच्या या शब्दनिष्ठ वृत्तांत कितपत पालट झाला आहे हें पाहणें अवश्य आहे. हें पाहूं लागतांच असें दिसतें की, मुस्लिम देशांत कांही ग्रंथकार पूर्ण क्रांतिवादी, बुद्धिवादी झालेले आहेत. तुर्की राष्ट्रवादी विचारवंत झिया गोएक आल्प (१८७५-१९२५) हा त्यांत अग्रणी आहे. राष्ट्रनिष्ठा, युरोपीकरण आणि धर्मसुधारणा हे प्रगतीचे तीन उपाय तो सांगतो. त्याच्या मतें धर्मसुधारणेचीं लक्षणें अशीं : मूळच्या विशुद्ध इस्लामी तत्त्वांचा अवलंब करून त्यानंतरच्या टीका व भाष्ये सर्व फेकून देणें हें पहिले लक्षण आणि आजच्या काळाला लागू नसलेली, केवळ त्या प्राचीन काळापुरतीच मर्यादित असलेलीं स्वतः पैगंबरांची वचनेंहि दृष्टीआड करणें हें दुसरें लक्षण. (वेस्टर्न सिव्हिलिझेशन- हॅनस् कोहन, पृष्ठ ९२). जी. मालूफ या सिरियन विचारवंताने अशाच स्वरूपाचीं मतें मांडलेली आहेत. तो म्हणतो, "सर्व शासनें इहवादी करून टाकणे हीच खरी प्रगति. प्रत्येक गोष्टीला धर्मग्रंथांतून आधार काढणें हें तर्कदुष्ट आहे. पौर्वात्य देशांच्या सर्व दुर्दैवाचीं बीजें त्यांच्या धर्मांत आहेत." (नॅशनॅलिझम इन् दि ईस्ट, कोहन, पृष्ठ २७१-७२).
 पण इस्लाम धर्मावर अशी तीव्र टीका करण्याचें अनेक मुस्लिम पंडितांच्या मतें मुळीच कारण नाही. कारण स्वतः महंमद पैगंबरांचाच शब्दप्रामाण्याला विरोध होता. पाकिस्तानांत विवाह व कुटुंबसंस्था यांत सुधारणा करण्याचा कायदा झाला त्या वेळी उलेमांनी, धर्मपंडितांनी त्याच्याविरुद्ध फार ओरडा केला. तेव्हा त्यांना त्या कायद्यासाठी नेमलेल्या कमिशनने पुढीलप्रमाणे उत्तर दिलें, "जीवन हें अत्यंत विविध आहे. त्यांत अनेक अतर्क्य प्रसंग उद्भवतात, अकल्पनीय घटना घडतात; त्या सर्वांचा परामर्श एका माणसाला घेणें शक्य नाही हें जाणून स्वतः पैगंबरांनीच आपल्या काळच्या कायदेपंडितांना व न्यायाधीशांना स्वतंत्रपणें चिंतन करून निर्णय करण्याची मुभा दिली होती. कुराण ग्रंथ व सुन्ना- पैगंबरांचें जीवनचरित्र- त्यांच्यासमोर प्रत्यक्ष असूनहि त्यांना हे स्वातंत्र्य दिलेलें होतें. या स्वातंत्र्यतत्त्वालाच 'इज्तिहाद' असें म्हणतात. कुराण व सुन्ना यांचीं तत्त्वें संभाळून कोणालाहि स्वतंत्रपणें निर्णय करण्याचा हक्क आहे असा या तत्त्वाचा अर्थ आहे. (इस्लाम इन् दि मॉडर्न नॅशनल स्टेट, अर्विन रोझेंथाल, पृष्ठ ३३४). ए. जी. नुराणी यांनी पैगंबरांच्या विषयीची एक याच आशयाची गोष्ट दिली आहे. पैगंबरांनी एका राज्यपालाला विचारले, "कुराण व सुन्ना यांत एखाद्या समस्येचें उत्तर तुम्हांला सापडलें नाही, तर तुम्ही काय कराल ?" राज्यपालाने उत्तर दिलें, "अशा वेळी मी माझ्या बुद्धीने उचित तो अर्थ ठरवीन." या उत्तराने पैगंबर अगदी संतुष्ट झाले. यावरून इस्लामच्या प्रवर्तकाचा शब्दाविषयी मुळीच आग्रह नसून, केवळ तत्त्वाचा आग्रह होता हें स्पष्ट होईल. प्राप्त परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या बुद्धीप्रमाणे निर्णय करण्यास त्याचा मुळीच विरोध नव्हता. (ओपिनियन, मे १९६७, पुष्ट २७.)

परिस्थितीशी फारकत

 शरियत किंवा मुस्लिम पर्सनल लॉ याचा प्रारंभापासूनचा इतिहास पाहतां असेंच दिसतें की. प्रारंभीच्या दोनशे वर्षांत बुद्धीला- इज्तिहादला- विपुल अवसर होता. देशकालपरिस्थिति पाहून मुस्लिम धर्मवेत्ते निर्णय करीत असत. पण पुढील काळीं हें तत्त्व अमान्य होऊन धर्मनियमांचा व परिस्थितीचा संबंध तुटला. मुल्ला- मौलवी सांगूं लागले की, शरियत कायदा हा युरोपीय कायद्याप्रमाणे परिस्थितींतून विकसत आलेलाच नाही. तो अल्लाने आधीच सांगन टाकलेला असून, त्याप्रमाणे समाजाने वागावयाचें आहे. आणि अर्थातच कायदा दैवी असल्यामुळे त्यांत एका अक्षराचाहि फरक करण्याचा किंवा त्याचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ करण्याचा कोणालाहि अधिकार नाही. या शब्दप्रामाण्यामुळेच मुस्लिम समाजाची सर्व प्रगति खुंटली होती. गेल्या शतकाच्या प्रारंभी पाश्चात्त्य विद्येचा प्रसार झाल्यानंतर बुद्धिप्रामाण्याचें तत्त्व पुन्हा उदयास आलें. (क्वेस्ट, विंटर १९६३-६४, प्रा. नोएल कोल्सन, लंडन विद्यापीठ, दि किनसेप्ट ऑफ् प्रोग्रेस ॲण्ड इस्लामिक लॉ). आणि मग पुन्हा काळ पालटला.
 या तत्त्वाच्या उदयामुळेच धर्मपरिवर्तन जें हें धर्मसुधारणेचें दुसरें लक्षण तें आज सर्व मुस्लिम राष्ट्रांत दिसूं लागलें आहे. त्याचें पहिलें प्रमाण हे की, आज मोरोक्कोपासून मलायापर्यंत एकाहि देशांत मुस्लिम धर्मशासन- इस्लामिक स्टेट- राहिलेले नाही. पाकिस्तानांतहि नाही. संसदेने केलेले कायदे तपासण्याचा अधिकार आपल्याला असावा अशी मागणी तेथील उलेमांनी केली होती. पण ती फेटाळून लावण्यांत आली. शासनावर धर्मनियंत्रण असणें हें पाकिस्तानी संसदेला मान्य नाही. आणि एकदा तें नियंत्रण अमान्य झाल्यावर, शरियतमध्ये अक्षराचाहि बदल चालणार नाही हा आग्रह टिकणें शक्यच नव्हतें. प्रत्येक देशांत जीर्णवादी मुस्लिम तसा आग्रह धरीत, अजूनहि धरतात; पण शासन तो मुळीच मान्य करीत नाही. त्यामुळेच नवा नागरी कायदा- सिव्हिल कोड- लेबॅनॉन, सिरिया, इराक, इजिप्त, ट्युनिशिया आणि पाकिस्तान या देशांत या ना त्या स्वरूपांत गेल्या पन्नास वर्षात संमत होऊन अमलांतहि आलेला आहे. भारताने नवा नागरी कायदा केला आहे. पण या इहवादी समदृष्टि शासनाने तो फक्त हिंदूंना लागू केला आहे. मुस्लिम कायद्यांतहि सुधारणा करावी अशी स्फूर्ति या शासनला १९६३ साली झाली होती. म्हणून त्याने वरील मुस्लिम देशांतील नव्या नागरी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी कमिशन नेमण्याचें ठरविले. पण मुस्लिमांनी त्याविरुद्ध इतकी भयंकर हाकाटी केली की, या निवडणूकनिष्ठ, सत्तानिष्ठ लाचार शासनाने ती कल्पनाच टाकून दिली. या देशांत राष्ट्रनिष्ठेपेक्षा वरील दोन निष्ठांना जास्त मान आहे !
 पण धर्मपरिवर्तन झाल्यावांचून राष्ट्रनिष्ठेचा परिपोष होणें आणि देश अर्वाचीन काळांतील समस्यांना तोंड देण्यास समर्थ होणें हें अशक्य आहे. 'इस्लाम इन दि मॉडर्न नॅशनल स्टेट' या आपल्या ग्रंथांत प्रा. रोझेंथॉल यांनी या विषयाचें केलेलें विवेचन या दृष्टीने फार उद्बोधक आहे. ते म्हणतात, "राष्ट्र, लोकशाही, समाजवाद, इत्यादि पाश्चात्त्य संस्थांचा पूर्वेकडे सध्या स्वीकार होत आहे. पण या संस्थांच्या मागे जें पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, जी विचारपरंपरा आहे ती या लोकांनी आत्मसात् केल्यावांचून या संस्था यशस्वी होणार नाहीत. डेकार्टपासून पुढच्या काळांत पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व विज्ञान यांचें रूप अगदी पालटून गेलें आहे. देव आणि माणूस यांचे नातें तेव्हापासून आमूलाग्र बदललें आहे. विश्वरचनेंतील मानवाच्या स्थानाविषयीचा दृष्टिकोन अगदी भिन्न झाला आहे. धर्मक्षेत्रांत लुथरने विवेकस्वातंत्र्याचें महत्त्व प्रस्थापित केलें आहे. प्रबोधन व धर्मसुधारणा या युगांच्या प्रेरणांतून हॉब्स व लॉक निर्माण झाले व त्यांच्यापासून फ्रेंच तत्त्ववेत्त्यांनी जी स्फूर्ति घेतली तिच्यांतून फ्रेंच क्रांतीचा स्फोट झाला. राजकीय जुलमाप्रमाणेच धार्मिक अंधश्रद्धेलाहि या क्रांतीने सुरुंग लावले. यामुळे अर्वाचीन युगाला प्रारंभ झाला. बुद्धिवादी, समाजनिष्ठ मानव हा या युगांत केंद्रस्थानी आलेला आहे. हें सर्व नवें तत्त्वज्ञान मुस्लिम देशांत येऊन थडकल्यामुळे तेथील विचारवेत्त्यांपुढे हें नवें आव्हान आलेलें आहे. तें स्वीकारल्यावांचून त्यांची कोणतीहि प्रगति होणें शक्य नाही" ( वरील ग्रंथ पृष्ठ ६).

धर्मपरिवर्तनाला मान्यता

 हें जाणूनच बहुतेक सर्व मुस्लिम देशांनी तें आव्हान स्वीकारलें आहे. हॅनस कोहन याने या देशांचा १९३२ पर्यंतचा व रोझेंथॉल याने १९६६ पर्यंतचा इतिहास दिला आहे. त्यावरून हें अगदी स्पष्ट दिसून येतें. या देशांतील धर्मपंडितांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी धर्मपरिवर्तन आता मान्य केलें आहे आणि राजकीय नेत्यांनी तेंच परिवर्तनाचें तत्त्व मान्य करून त्याप्रमाणे कायदे केले आहेत. गेल्या शतकांतील जमालुद्दीन अफगाणी, त्याचा शिष्य महंमद अब्दु, अर्वाचीन काळांतील रशीद रिडा, अली एल्- रझिक, झिया गोएकल्प, महंमद इकबाल, मौ. अबुलकलम आझाद, हे सर्व परिवर्तनवादी आहेत. इज्तिहाद, निर्णयस्वातंत्र्य हे यांतील प्रत्येकाला मान्य आहे. मात्र हे स्वातंत्र्य मुळांतंच इस्लाममध्ये होतें, मध्यंतरीच्या काळांत मुल्ला-मौलवींच्या हेकट दुराग्रहामुळे तें लुप्त झालें होतें, तेव्हा त्याचें पुनरुज्जीवन करणे हाच उपाय होय, असें हे सर्व पंडित आग्रहाने प्रतिपदितात. यांतील बहुतेक सर्व विचारवंत हे निष्ठावंत मुस्लिम असून कुराण, सुन्ना व महंमद पैगंबर यांवर त्यांची अढळ निष्ठा आहे. शरियत हा जो इस्लामी कायदा त्यावरहि त्यांची निष्ठा आहे. मात्र देश- काल- परिस्थिति पाहून त्याचा नवा अर्थ लावून घेतला पाहिजे असें त्यांचे मत आहे. रशिद रिडासारखे लोक तर असें सांगतात की, लोकशाही, समाजवाद, समता ही सर्व तत्त्वें इस्लाममध्ये मुळांत आहेतच. पाश्चात्त्यांकडून तीं घेण्याची मुळीच गरज नाही. पाश्चात्त्य समाजवादी लोकांना इस्लाम नीट समजला, तर आपली सर्व तत्त्वें त्यांत आहेत हे ध्यानी येऊन ते सर्व मुस्लिम धर्माचा स्वीकार करतील, असें रशिद रिडा यांचे मत होते. अशा एकांतिक मतामुळे या मुस्लिम पंडितांत दोन तट पडलेले आहेत. एक परंपरावादी आणि दुसरा पाश्चात्त्यवादी. त्यांच्यांत हि पुन्हा सूक्ष्म व स्थूल मतभेदांमुळे अंतर्गत फळ्या आहेतच. पण शरियतच्या आज्ञांचा स्वतःच्या बुद्धीने, परिस्थिति पाहून प्रगतीला पोषक असा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य लोकांना आहे, याविषयी त्यांच्यांत दुमत नाही. मध्यपूर्वेतील देशांवर पन्नास- पाऊणशे वर्षे ब्रिटिश व फ्रेंच यांची जुलमी सत्ता होती. त्यामुळे तेथील धर्म- पंडितांच्या व राजकीय नेत्यांच्या मनांत या पाश्चात्त्य देशांविषयी अजूनहि कडवा द्वेष आहे; आणि त्यामुळेच पुष्कळांच्या मनांत पाश्चात्त्य विद्येविषयीहि तिटकारा आहे. इस्लाममध्ये हीं सर्व तत्त्वें आहेत, पाश्चात्त्य विद्येची आम्हांला गरज नाही, असे ते म्हणतात. पण केमाल पाशासारखे राजकीय नेते व झिया गोएकल्पसारखे विचारवंत पाश्चात्त्य सत्तांचे कडवे द्वेष्टे असूनहि त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचा द्वेष वाटत नाही. इतकेंच नव्हे, तर तिचा स्वीकार केल्यावांचून तरणोपाय नाही, असे त्यांचं मत आहे. पण हें कसेंहि असले तरी, हे सर्व नेते धर्मांत सुधारणा करण्यास, परिवर्तन करण्यास अनुकूल आहेत यांत शंका नाही. नवीं तत्त्वे पाश्चात्त्यांकडून घ्यावयाचीं, की इस्लामच्या मूळ पीठिकेंतून घ्यावयाची. हा मुद्दा आपल्या दृष्टीने गौण आहे. नवें परिस्थितीचे आव्हान स्वीकारून सर्व मुस्लिम देश धर्मपरिवर्तनाला सिद्ध झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यांत प्रगति होऊ शकली, हा विचार, इहवादाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
 बुद्धिप्रामाण्य व परिवर्तनीयता हीं तत्त्वें मान्य झाली की तिसरें ओघानेच येतें. धर्माची ऐहिक व्यवहारावर सर्वंकष सत्ता असतां कामा नये, हें तें तत्त्व होय. वर एके ठिकाणीं सांगितलेच आहे की, प्रगतीच्या पावलोपावली आड येणाऱ्या या सर्वंकष सत्तेला मुस्लिम देशांतील तरुण आता कंटाळले आहेत. एकच उदाहरण पहा. इस्लामधर्माप्रमाणे भांडवलावर व्याज घेणें हें पाप आहे. या श्रद्धेमुळे बँक ही कल्पनाच अशक्य होऊन बसते. इजिप्तमध्ये हा प्रश्न आला तेव्हा ग्रँड मुफ्ती महंमद अब्दु याने फतवा काढून, व्याज घेणें हें पाप नाही, असा निर्णय दिला. इजिप्शिनय शेतकऱ्यांना यामुळेच सेव्हिंग्ज बँकेचा उपयोग करतां येऊ लागला. तुर्कस्तानांत बँकांच्या व्यवहारासाठी असाच फतवा काढावा लागला. परकी भाषा शिकणें व ऐहिक विद्या शिकणें हें पाप नाही, असाहि फतवा गेल्या शतकांत तुर्कस्तानांतील उलेमांना काढावा लागला होता. रूढ, अंध धर्माची सर्वंकष सत्ता ढिली केल्यावांचून अर्वाचीन काळांत नित्याचें जीवन जगणें सुद्धा शक्य नाही, मग प्रगति लांबच राहिली. ती साधावयाची तर राज्यशासन, न्यायपीठ, शिक्षण, अर्थव्यवहार या सर्व क्षेत्रांतील धर्मनियंत्रण ढिलें करणें अवश्य आहे. याचाच अर्थ असा की, धर्म ही यापुढे एक खाजगी वैयक्तिक बाब राहील. सार्वजनिक व्यवहारांत मूळ परंपरेच्या तात्त्विक अभिमानापलीकडे तिचें नियंत्रण राहणार नाही.

केमाल पाशाचें धोरण

 या बाबतीत तुर्कस्तानने अगदी एकांतिक टोक गाठले आहे. केमालपाशाला राजशासनावरील धर्माचें नियंत्रण तर मान्य नव्हतेंच; पण शरियत हा मुस्लिम कायदा मुळांतच मान्य नव्हता. त्यामुळे तुर्की प्रजासत्ताकाची स्थापना करतांनाच त्याने खलिफापद नष्ट केलें आणि शरियत कायदा रद्द करून, स्विस नागरी कायदा स्वदेशांत जारी केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या हातची सत्ता गेली. डेमोक्रॅटिक सत्तारूढ झाले. त्यांनी केमाल अतातुर्क याचें धोरण सर्वस्वीं बदललें नाही, पण थोडे ढिलें केलें. उलेमा, मुल्ला-मौलवी यांना कांही सवलती दिल्या. पण त्यामुळे इहवादविरोधी सूर उमटू लागले. इहवादी धोरण रद्द करून इस्लाम हा शासकीय धर्म म्हणून जाहीर करा, अशी त्या पक्षांतल्या लोकांनीच मागणी केली. पण पक्षप्रमुखांनी ती मानली नाही. उलट त्या लोकांनाच पक्षांतून हाकलले. याच वेळी १९५२ साली डॉ. अहंमद अमीन यालमन या कट्टर इहवादी पत्रकाराचा खून करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शासन जास्तच सावध झाले. त्याने धर्मस्वातंत्र्य नष्ट केले नाही. पण इस्लामवर अतिशय कडक नियंत्रण घातले. (हावर्ड ए. रोड, सेक्युलॅरिझम ॲन्ड इस्लाम इन् टर्किश पॉलिटिक्स, करंट हिस्टरी, जून १९५७). गमाल अब्देल नासर हा इजिप्तचा नेता केमालपाशासारखा इस्लाम- विरोधी नव्हता; तो एकनिष्ठ मुस्लिम होता. पण त्यालाहि धर्माची सर्वंकष सत्ता मान्य नव्हती. तशा सत्तचा पुरस्कार करणारी 'मुस्लिम ब्रदरहूड' ही संस्था १९५४ साली त्याने रद्द करून टाकली. यावरून मुस्लिम समाज आता इहवादी होत आहे, असें कीथ आयर्विन या अभ्यासकाने आपले मत दिले आहे. (करंट हिस्टरी, जून १९५७, रिलिजन इन् दि मिडल ईस्ट).
 इराणमध्ये मालकमखान या सुधारकाने राज्यकारभार व न्यायपीठ यांवर धर्मसत्ता असूं नये, उलेमांच्या ऐवजी त्यांवर कायद्याचें नियंत्रण असावें, असें प्रतिपादन १८९० पासूनच सुरू केलें होतें. त्या साली लंडनला जाऊन त्याने 'कानून' हे पत्र सुरू केलें. आणि इराणचें शासन व तेथील उलेमा यांच्या प्रतिगामी वृत्तीवर प्रखर टीका करण्यास प्रारंभ केला. त्या काळांत सुद्धा त्याने निर्भयपणें असें मत मांडलें आहे की, टेलिग्राफ, तारायंत्र यांचे संशोधक आततायी देहदंडन करणाऱ्या फकिरापेक्षा अल्लाला जास्त प्रिय असतात. मालकमखानाचें कानून हें पत्र गुप्तपणें इराणमध्ये येत असे. त्यामुळेच इहवादी बुद्धिजीवी तरुणांचा एक वर्ग तेथे निर्माण झाला. (नॅ. ईस्ट- कोहन पृष्ठ ३२१) आज इराणचे शासन हें कायद्यांतील शब्दाच्या दृष्टीने, इस्लामी शासन आहे, पण सध्याचा इराणचा शहा पूर्ण नवमतवादी असून, पश्चिमीकरणाचा त्याने ध्यास घेतलेला आहे. शिक्षण, स्त्रीजीवन व एकंदर समाज- जीवन यांवरील जीर्ण धर्माचें वर्चस्व त्याने कधीच नष्ट केले आहे. सिरिया, इराक, सौदी अरेबिया येथे सर्वत्र याच नव्या मार्गाने दौड चालू आहे. त्यासंबंधीचें विवेचन पुढे येईलच. धर्मक्रांतीला सर्व मुस्लिम देश आज कटिबद्ध झाले आहेत एवढेच येथे लक्षणीय आहे.
 धर्मसत्ता व इहवाद यांच्यांत आज जो संघर्ष निर्माण झाला आहे तो संघर्ष म्हणजे जगांतील सर्वच धर्माच्या पुढे काळाने टाकलेलें एक दुष्कर असें आव्हान आहे. त्या विषयी आपल्या ग्रंथाच्या समारोपांत प्रा. रोझेंथॉल यांनी केलेले समालोचन मोठें उद्बोधक आहे. तें तेथे देऊन धर्मक्रांतीचें हें विवेचन पुरें करूं.

दुष्कर आव्हान

 ते म्हणतात, "हें आव्हान अर्वाचीन विद्या व भौतिक शास्त्रे या रूपाने मूर्त झालेला जो इहवाद आणि त्याच्या मुळाशी असलेली तर्कनिष्ठ चिकित्सा वृत्ति व ऐतिहासिक दृष्टि यांनी दिलेले असून ते जगांतल्या सर्वच धर्मांना दिलेले आहे. या दुर्जय दिसणाऱ्या आव्हानाचा स्वीकार करावयाचा असेल, तर आपल्याला फार मोठी किंमत देण्यास सिद्ध झाले पाहिजे. आपल्या धार्मिक श्रद्धा, आपली आध्यात्मिक तत्त्वें व आपले सनातन सिद्धान्त यांची नव्या दृष्टिकोनांतून मूलगामी चिकित्सा व शोधन करणे ही ती किंमत होय. ही चिकित्सा करून आपण आपल्या प्राचीन धर्माचें पुनर्मुल्यमापन केले पाहिजे आणि नव्या दृष्टीला दिसलेली जुनीं मूल्यें व नवीं तत्त्वें यांचा समन्वय साधला पाहिजे. आज जीवनाचा नवा अर्थ आपण शोधीत आहोत. अंतराळांत जाऊन जीवनाच्या कक्षा रुंदावीत आहोत. यासाठी अत्यंत मूलगामी अशी क्रांति व पुनर्रचना अपरिहार्यच असते."
 हॅनस कोहन, रोझेंथॉल, कोल्सन इत्यादि पंडितांनी मुस्लिम देशांचा जो इतिहास दिला आहे त्यावरून तेथील जनता व नेते ही किमत देण्याचा प्रयत्न करीत आहेत असें दिसतें.


 इजिप्त, सिरिया, इराक, तुर्कस्थान ही नव्यानेच जन्माला आलेली राष्ट्रें आहेत असें प्रारंभी म्हटले आहे. नव्यानेच म्हणजे गेल्या शंभर वर्षात. मग त्यापूर्वी ही राष्ट्रें कोठे होतीं ? याचें उत्तर असे की, ही राष्ट्रे त्या वेळी नव्हतीच. ते सर्व भौगोलिक देश असून, ते तुर्की साम्राज्यांत होते. पाश्चात्य विद्या त्या देशांत आली, तिने त्यांना हे नवें संघटनतत्त्व शिकविलें आणि त्यामुळे प्रत्येक देशाची स्वतंत्र अस्मिता जागृत होऊन तेथील लोकांत आपण मिसरी (इजिप्शियन), आपण सिरियन, इराकी, अशी भावना उदय पावली.
 इतके दिवस आपण मुस्लिम आहोंत, अशी त्यांची भावना होती. तुर्की साम्राज्यांत आपण दास्यांत आहोंत, गुलामगिरीत आहों, असें त्यांना वाटत नसे. तुर्की सुलतानावर त्यांची भक्ति होती व तोच खलिफा असल्यामुळे तो त्यांचा धर्माचार्यहि होता. पण पाश्चात्त्य संपर्काने राष्ट्रीयतेची जाणीव त्यांच्यांत येतांच त्यांना तुर्क हे आपले शत्रु वाटू लागले आणि त्यामुळे तुर्की साम्राज्याला तडे जाऊन पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस तें पूर्ण लयास गेलें. तुर्कांच्या नव्या नेत्यांना- केमालपाशा आणि त्याचे सहकारी यांना– तुर्की साम्राज्य नकोच होतें आणि याचें कारणहि राष्ट्रभावना हेंच होय. आपण सर्व मुस्लिम- सिरियन, इराकी, इराणी, अफगाणी सर्व एक आहोत अशी भावना त्यांच्या ठायीं शिल्लकच राहिली नव्हती. तुर्कस्तान तुर्कांचा, असा त्यांचा नवा घोष होता. इजिप्तमध्ये याच नव्या जाणिवेने 'मश्र लिल मश्रिजिन' (मिसर मिसरींचा) असा घोष ऐकू येऊ लागला होता. त्यांचा नेता आरबीपाशा स्वतःला 'एल्-मश्री' असें म्हणवीत असें. आपण मुस्लिम आहोंत ही कल्पना गौण झाली. यांतल्या कोणी इस्लामचा त्याग केला असा याचा अर्थ नाही. ते सर्व एकनिष्ठ मुस्लिम होते. पण त्यांचे संघटनतत्व व त्यामुळेच आपपरभावहि आता बदलले.

नवा ऐक्यबंध

 १९२५ सालीं अंकारा येथे भाषण करतांना केमालपाशाने लोकांना जाणीव दिली की, "आज आपण एकराष्ट्रीय म्हणून संघटित झालों आहों. एकधर्मीय म्हणून नव्हे.' त्याने खिलाफत नष्ट केली तेव्हा इतर मुस्लिम देशांतील अनेक शिष्टमंडळांनी त्याला विनंती केली की, 'तुम्हीच आता खलिफा व्हा.' पण इस्लाम हा ऐक्यबंध केमाल मानीतच नव्हता. आपण तुर्क आहोत, तुर्कांचे नेते आहोत, व तुर्क राष्ट्रीयांनाच आपल्याला संघटित करावयाचें आहे, असें त्याने जगाला शतवार जाहीर करून सांगितलें. जगांतल्या इतर सर्व मुस्लिम देशांनीहि हाच नवा ऐक्यबंध, हेंच नवें संघटन-तत्त्व त्या वेळीं स्वीकारून आपल्या समाजाची पुनर्रचना करण्याचें निश्चित केलें.
 असा निश्चय करून त्यांनी पहिले पाऊल टाकतांच, राष्ट्रनिष्ठा म्हणजे इहवाद, इहवादांतूनच हें तत्त्व निर्माण झालें आहे, त्याच्या आश्रयावांचून राष्ट्ररचनेची अणुमात्र प्रगति होणें शक्य नाही, हें त्यांच्या ध्यानांत आलें आणि त्या त्या देशांत जे इस्लामचे कडवे अभिमानी होते त्यांना ही नवी निष्ठा म्हणजे इस्लामचा सर्वांत मोठा शत्रु आहे हें तत्काळ समजून आलें.
 इस्लाम हा सर्व मुस्लिम जगत एक मानतो. मुस्लिम हा जगांत कोठेहि असो, तो कोणत्याहि वंशाचा, देशाचा, वर्गाचा असो, तो दुसऱ्या सर्व मुस्लिमांचा बंधु आहे. या अखिल मुस्लिम समाजाला 'उम्मत' म्हणतात. या उम्मतांत भेद करणें हे इस्लामच्या मूळ तत्त्वाच्या विरुद्ध आहे. तें पाप आहे. राष्ट्रनिष्ठा ही या कारणानेच सनातन मुस्लिमांना निंद्य वाटते. महंमद एल्. गझाली हा धर्मवेत्ता म्हणतो, "राष्ट्रभावना म्हणजे इस्लामला सुरंगच आहे. कारण इस्लाम हा विश्वसमाज असून पांचहि खंडांत त्याचे सभासद आहेत. विशिष्ट भूमीविषयीची राष्ट्रभक्ति जसजशी वाढत चालली आहे, तसतशी जगदिस्लाम भावना ही दुबळी होत आहे." (रोझेंथॉल, पृष्ठ १११). महंमद अझाद याचेंहि मत असेंच आहे. राष्ट्रभावनेचा निषेध करून तो म्हणतो की, "मुस्लिम विश्व हा एकच इस्लामचा ऐक्यबंध आहे. वंश, राष्ट्र हे आम्ही कांही मानीत नाही. आम्ही सर्व एकधर्मीय आहों यापलीकडे आम्ही दुसरें कांही जाणीत नाही." ही भावना इतर सर्व भावनांच्या अतीत आहे. पॅन इस्लामिझम- विश्वमुस्लिमवाद- या चळवळीच्या बुडाशीं मुस्लिमांची हीच निष्ठा आहे. सर्व जगतांतील मुस्लिम एक हा तिचा घोष आहे. राष्ट्रभेद तिला मान्य नाहीत.
 पण उलेमा, मौलवी हे लोक सोडले तर कोणत्याहि मुस्लिम देशांतील नेत्यांना हा विश्वमुस्लिमवाद आता मान्य नाही. तुर्कांचा एक नेता हमदुल्ला सुवदी हा १९२१ सालींच म्हणाला, "पॅन इस्लामिझमची भाषा आता बंद करा. राष्ट्रनिष्ठा हें आमचें नवें उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाश्चात्य तत्त्वें पाश्चात्त्य संस्था यांची आम्ही आशियाच्या भूमीत पेरणी करणार आहों. तुर्की राष्ट्राचे स्वतंत्र व्यक्तित्व आम्हांला अभंग राखावयाचें आहे. आम्हीं आता आमचे जुने गुरुजी व नियंते यांच्याकडे पाठ फिरविली असून, पश्चिमाभिमुख झालो आहों." १९२५ साली तुर्की न्यायमंत्री एका परिषदेत भाषण करतांना म्हणाले, "आपण एक नवें सुसंस्कृत राष्ट्र निर्माण करीत आहो. सध्याच्या काळाची ती गरज आहे. त्यासाठी पाश्चात्त्य तत्त्वें आणि पद्धति यांचा अवलंब आपल्याला करावा लागेल. त्याअन्वयें मध्ययुगीन दंडविधान टाकून आपल्याला इहवादी दंडविधानाचा स्वीकार केला पाहिजे. या आमच्या निश्चयापासून आम्हांला कोणीहि परावृत्त करूं शकणार नाही." (हॅनस कोहन- हि. नॅ. ईस्ट पृष्ठ २५७, २५९).
 इजिप्शियन पुढारी मुस्ताफा केमाल हा एकोणिसाव्या वर्षीच 'इजिप्त हा इजिप्शियनांचा' या घोषणेने भारावून गेला होता. त्या वेळचे मिसरी (इजिप्शियन) पुढारी बुद्धिवादी दृष्टिकोणामुळे धर्माविषयी थोडे उदासीन होत चालले होते. पॅन् इस्लामिझमला मधून मधून ते साथ देत, पण ते राजकीय व राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने. त्या तत्त्वावर त्यांची मुळीच श्रद्धा नव्हती. गेल्या शतकाच्या उत्तरार्धांत वास्तविक विश्व- मुस्लिम- संघटनेच्या कल्पनेला फार बहर आला होता. जमाल एल्. अफगाणी हा तिचा अत्यंत समर्थ प्रवक्ता होता. तुर्क सुलतान अब्दुल हमीद याने १८७६ सालीं सत्तारूढ होतांच या कल्पनेचा अत्यंत जोराने पुरस्कार केला. त्याने तिच्या प्रसारार्थं सर्व जगभर प्रचारक धाडले. त्यांना प्रथम प्रतिसादहि चांगला मिळाला.

विश्व-मुस्लिमवादाला ओहोटी

 १९०३ साली लंडन येथे अब्दुल्ला सुऱ्हावर्दी याने पॅन इस्लामिक सोसायटीची स्थापनाहि केली. पण राष्ट्र या नव्या संघटन-तत्त्वाचा प्रभाव आता इतक्या वेगाने वाढत आहे की, जगांतल्या सर्व मुस्लिम देशांत विश्व-मुस्लिमवादाचे प्रवक्ते आजहि सापडत असले, तरी त्याच्यामागे तो प्रत्यक्षांत अवतरण्याइतका जोम कोठेहि नाही; राष्ट्रवादाने सर्वत्र त्याच्यावर मात केली आहे. हा इहवादाचा विजय आहे. कारण अखिल मुस्लिम ऐक्य ही इस्लाम धर्माची महत्त्वाची कल्पना आहे. इहवादाचा प्रभाव पडला नसता तर ती बाजूस सारून राष्ट्रवादाचा पुरस्कार करणें मुस्लिम राष्ट्रीय नेत्यांना शक्य झालें नसतें. पण ते उघडपणें त्या धार्मिक कल्पनेचा त्याग करीत आहेत. आणि राष्ट्रनिर्मितीवर सर्व शक्ति केंद्रित करीत आहेत. राष्ट्र संघटित करणें हें त्यावांचून अशक्य आहे, हें त्यांनी जाणले आहे.
 आपल्या राष्ट्राबाहेरचे जे मुस्लिम, त्यांना परके लेखणें, प्रसंगी त्यांना शत्रु मानून त्यांच्याशी युद्धहि करणें हें एक पाप, तर आपल्या राष्ट्रांतील ख्रिश्चन, ज्यू, हिंदु, इत्यादि जे परधर्मीय लोक त्यांना आपले मानणें हें धर्माच्या दृष्टीने दुसरें पाप होय. राष्ट्र या नव्या संघटनतत्त्वामुळे हें दुसरें पापहि मुस्लिमांना करावें लागतें. वास्तविक एका मुस्लिम पंथान्वये हे पाप नाही. तुर्कस्थानचे विख्यात सुलतान सेलिम व सुलेमान यांनी, युरोपांत ज्यू लोकांचा छळ होत होता तेव्हा त्यांना मुद्दाम पाचारण करून, तुकीं साम्राज्यांत वसाहती करण्यास जागा दिल्या. ख्रिश्चन, ज्यू या धर्माच्या लोकांना बहुतेक सुलतान अधिकाराच्या जागाहि देत व त्यांना सन्मानाने वागवीत. महंमदी धर्माचें सहिष्णुता हें प्रधान लक्षण आहे, असें अनेक मुस्लिम पंडितांचें मत आहे. मक्केच्या तहानंतर हजरत पैगंबरांनी जो जाहिरनामा प्रसिद्ध केला त्यांत ख्रिश्चन धर्मीयांशी सहिष्णुतेने वागावें अशी आज्ञा प्रत्येक कलमांत केलेली आहे. ख्रिश्चन हे माझे नागरिक आहेत व याबद्दल मला अभिमान वाटतो, असेंहि त्यांनी जाहीरपणे सांगितलें आहे. ख्रिश्चनांना त्यांची प्रार्थना-मंदिरें बांधण्यास मुस्लिमांनी साह्य केलें पाहिजे, अशी आज्ञा नवव्या कलमांत आढळते.

असहिष्णु वृत्तीचा उदय

 हें सर्व पाहतां सर्वधर्मसमानतत्त्वाचें तत्त्व पैगंबरांना आणि तुर्की खलिफांना मान्य होतें असें दिसतें; पण पुढे त्याचा बहुसंख्य मुस्लिमांना विसर पडला. 'महात्मा गांधींना मी हीनांतल्या हीन मुस्लिमापेक्षाहि हीन मानतो" हे मौ. महंमदअल्लीचे उद्गार प्रसिद्धच आहेत. प्रारंभीचे औदार्य, ती सहिष्णुता लोपल्यानंतर मुस्लिम समाज पराकाष्ठेचा असहिष्णु बनला. सक्तीचें धर्मांतर ही गोष्ट पैगंबरांनी अत्यंत निषिद्ध मानलेली होती. एखाद्या ख्रिश्चन स्त्रीने मुसलमान पुरुषाशीं लग्न केलें, तरी तिला सक्तीने मुस्लिम करण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याला नाही, असें वर निर्देशिलेल्या जाहीरनाम्यांत आठव्या कलमांत सांगितलें आहे. (हजरत महंमद पैंगंबर चरित्र- सय्यद अमीन, पृष्ठ ४७) तुर्क सुलतान सेलिम पहिला याने एकदा आपल्या साम्राज्यांतील सर्व ख्रिस्ती व ज्यू यांना सक्तीने मुस्लिम करण्याचे ठरविलें होतें. पण त्याच्या राज्यांतील उलेमांनी, (धर्मपंडितांनी) शरीयतमधील वचनें दाखवून, हें इस्लामविरुद्ध आहे, असें त्यास सांगितलें व परावृत्त केलें. (मिड् ईस्ट- वर्ल्ड सेंटर, पृष्ठ ३२१) सक्तीचें धर्मांतर अगदी निंद्य होय, असें पैगंबरांनीच सांगितलेले आहे. पण पैगंबरांचीं वचनें, कुराण, शरियत (मुस्लिम कायदा) यांतील सहिष्णुता पुढील काळांत नष्ट झाली. मुस्लिमांचा पुढील सर्व इतिहास रक्तपाताचा आहे. कुराण किंवा मरण यावांचून अन्य गति नाही असें ते इतर धर्मीयांना बजावीत. म्हणजे गेली अनेक शतके इतर धर्मीयांना हीन, पतित मानणें हेंच इस्लामचे तत्त्व होतें. आतां राष्ट्रभावनेमुळे तें मुस्लिमांना सोडावें लागलें व इजिप्त, तुर्कस्तान, इराण, सिरिया, इराक येथील मुस्लिमांनी विवेकबळाने तें सोडण्याची सिद्धता केली. पोथीतील वचनांचें प्रामाण्य न मानतां आपल्या विवेकाला प्रमाण मानणें हें इहवादाचे प्रधान लक्षण होय. या विवेकाचा प्रभाव जितका जास्त तितकें राष्ट्र अधिक संघटित व म्हणूनच अधिक समर्थ.
 इजिप्तमध्ये कॉप्ट (ख्रिश्चन) व मुस्लिम यांच्यांत प्रारंभी तीव्र संघर्ष होता. पण राष्ट्रभावनेच्या प्रभावाने तो हळूहळू नाहीसा झाला. सिरियांत असेंच घडलें. तेथे ख्रिश्चन व मुस्लिम यांच्यांत, इतकंच नव्हे, तर शिया, सुनी, ड्र्यूज या भिन्न मुस्लिम पंथांतहि पूर्वी अहिनकुल वृत्ति होती. पण राष्ट्रभावनेमुळे ती नष्ट झाली व त्यांच्यांत ऐक्य निर्माण झालें. तुर्कस्थानांत सोळाव्या शतकांतील सुलतान सुलेमान यांचें उदार धोरण पुढील सुलतानांनी त्याज्य ठरविलें होतें. पण केमालपाशापूर्वीच सुलतान अब्दुल मजीद याने पुन्हा त्याचा अवलंब केला होता. १८३९ सालींच त्याने नव्या सुधारणा जाहीर करून मुस्लिम व मुस्लिमेतर यांना कायद्याने समप्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. १८७६ सालीं सुलतान अब्दुल हमीद याने पुन्हा पूर्ण प्रतिगामी धोरण अवलंबून पॅन इस्लामिझमचा पुरस्कार केला हें वर सांगितलेंच आहे. पण १९०८ सालीं तरुण तुर्कांनी उठावणी करून हमीदला पदच्युत केलें व इहवादी धोरणाची पुन्हा प्रस्थापना केली. त्या दिवशी मुस्लिम-उलेमा, मुल्ला-मौलवी व ख्रिस्ती धर्मगुरु यांनी एकमेकांना मिठ्या मारून आनंदोत्सव साजरा केला. १९११ साली सर्वधर्मसमानत्वाचा कायदा त्यांनी पुन्हा मंजूर करून घेतला व सरकारी अधिकारपदें यापुढे धर्मवंशनिरपेक्ष, केवळ गुणांवर मिळतील, असें जाहीर केलें.
 पुढे केमालपाशाने खिलाफत नष्ट केली आणि धर्म व शासन यांची फारकत करून टाकल्यावर धर्मसमानता तुर्कस्थानांत कायमची प्रस्थापित झाली. तुर्कस्थानांत धर्मसमानतेची म्हणजे इहवादाची परंपरा अशी वरीच जुनी असल्यामुळेच तेथे हें तत्त्व लवकर दृढमूल होऊन राष्ट्रसंघटना सुकर झाली. भारतांत स्वातंत्र्यलढ्याच्या काळांत हिंदु-मुस्लिम भाई-भाई अशा घोषणा होत होत्या व भिन्न धर्मीय लोक मिठ्याहि मारीत होते. पण त्यावेळी सुद्धा त्या घोषणांचा आशय मुस्लिमांच्या मनांत अजीबात नव्हता. त्यामुळे त्या घोषणा व्यर्थ ठरून या भूमींत राष्ट्रसंघटना अयशस्वी होऊन तिची शकले झाली. भारतांत उरलेल्या मुस्लिमांची अजूनहि तीच वृत्ति आहे. आणि काँग्रेस व इतर पक्ष तिचा परिपोष करीत आहेत. त्यामुळे अजूनहि भारतांत राष्ट्रसंघटना अशक्य होऊन बसली आहे. सर्वधर्मसमानत्व या तत्त्वाचें इहवादांत काय महत्त्व आहे तें यावरून कळून येईल.

परंपरेचा अभिमान

 प्राचीन परंपरेचा अभिमान हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा आहे. या परंपरेंत त्या भूमींतील सर्वांच्या कर्तृत्वाचा धर्मनिरपेक्षपणें समावेश होतो. पण इस्लामचा याला कडवा विरोध आहे. इजिप्तची इस्लामपूर्व संस्कृति फार थोर होती. पण सातव्या शतकांत मुस्लिमांनी तो देश जिंकल्यावर तेथील सर्व प्रजा मुस्लिम झाली आणि त्या परंपरेचा त्या भूमींत कोणीहि अभिमान धरीनासा झाला. मुस्लिमांच्या दृष्टीने तें कर्तृत्व, ती गुणसंपदा त्यांची नव्हतीच. ती काफरांची होती. तिचा अभिमान ते कसा धरणार ?
 पण गेल्या शतकांत राष्ट्रनिष्ठेचा उदय होतांच आपपरभाव बदलले. इस्लामपेक्षा स्वभूमीचा अभिमान जास्त प्रभावी ठरला आणि मग मिसरी नेते त्या परंपरेचे गुणगान करूं लागले. १९१० साली इजिप्शिअन नॅशनल काँग्रेसचा चिटणीस हमीद अलेली आपल्या भाषणांत म्हणाला, "युरोपी देश जन्मालाहि आले नव्हते तेव्हा या भूमीत उच्च संस्कृति निर्माण झाली होती. ज्यांचें पूर्व असें उज्ज्वल आहे, दिव्य आहे त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल होईल यांत शंकाच नाही. ज्या लोकांनी पिरामिड बांधले त्यांची प्रतिभा, त्यांचा पराक्रम सुप्त अग्नीप्रमाणे आमच्या ठायीं अजूनहि आहे. त्यांच्या आठवणीने आम्हांला स्फूर्ति येते व आम्हीहि तसाच पराक्रम करूं, असा विश्वास वाटतो."
 राष्ट्रभावनेचा उदय होतांच सर्व मुस्लिम देशांत मुस्लिमपूर्व इतिहासांतील कर्तृत्वाचा व त्या काळच्या कर्त्या पुरुषांचा म्हणजेच प्राचीन परंपरेचा असा अभिमान उसळून येऊं लागला. पाक मुस्लिमांना याचीच खंत वाटते. मुस्लिमेतर पुरुषांचा अभिमान धरणें हें त्यांना पाप वाटतें. भारताचे दिवंगत राष्ट्रपति झाकीर हुसेन यांनी शंकराचार्यांच्या दर्शनाला जावें, नेहरूंच्या निधनानंतर मशिदींतून त्यांच्यासाठी प्रार्थना व्हाव्या यावर त्यांनी कडवट टीका केली आहे. पण या परंपरेच्या अभिमानांत खरें सामर्थ्य आहे हें इराक, तुर्कस्थान या देशांतील नेत्यांनी जाणलेले असल्यामुळे ते त्याचा परिपोष करण्याचा अट्टाहास करीत आहेत.
 आजचे इराकी लोक बगदाद, हरून अल्- रशीद यांचा अभिमान धरतातच, पण आपल्या भूमींत पांच हजार वर्षांपूर्वी बाबिलोनी संस्कृति नांदत होती व तिचे आपण वारस आहोंत हाहि अभिमान ते बाळगतात. आज युफ्रेटिस व तैग्रीस या नद्यांतून ते कालवे काढू लागले की, त्याच पन्हाळीतून ३००० वर्षांपूर्वी बाबिलोनी संस्कृतीने कालवे खणले होते हे ध्यानांत येऊन त्यांचा ऊर भरून येतो. याच न्यायाने इराणमध्ये आज दरायस, झर्सीस यांचे पोवाडे गाइले जात आहेत. आम्ही प्राचीन ग्रीक लोकांना जिंकले होतें या विचाराने इराण्यांना आज स्फूर्ति मिळते. आणि अशा पराक्रमी पूर्वजांचे आम्ही वारस भविष्यकाळांतहि तसेच पराक्रम करूं असें त्यांचे मन त्यांना ग्वाही देऊं लागतें. तुर्कस्थानांत हलिदे एडिव हनुम या लेखिकेने एक ऐतिहासिक कादंबरी लिहून अटिल्ला, चंगीझखान (हे दोघेहि मुस्लिम नव्हते) यांचा गौरव करून त्यांचे रक्त आमच्या अंगांत खेळतें आहे अशी प्रौढी मिरविली. याच भूमीत हिटाइट व असिरियन या संस्कृति प्राचीन काळी होऊन गेल्या. आज तेथील बँकांना असीरियन बँक, हिटाइट बँक अशी नांवें दिली जातात. त्या संस्कृतीचे प्रत्यक्ष अवशेष आज सांपडत नाहीत. कांही भटक्या आदिवासी लोकांच्या तोंडी त्याबद्दलची फक्त गाणी आढळतात. पण तुर्क नेते व सर्व साहित्यिक आज त्यांचाच उदो उदो करीत आहेत !
 हिंदु लोक प्राचीन काळापासून सहिष्णु आहेत. त्यामुळे त्यांना सर्वधर्म- समानत्व स्वीकारण्यांत कांही अवघड आहे, हें ध्यानांत येत नाही. पण कोणत्याहि धर्माबद्दल ज्याला एकांतिक अंध व कडवा अभिमान असतो त्याला तें तत्त्व महापाप वाटतें. कारण तें स्वीकारतांना केवढा विवेक करावा लागतो पाहा. आपल्या धर्माची तत्त्वें, सिद्धान्त हे परमेश्वराने सांगितलेले आहेत, त्यावरची भाष्यें हीं प्रेषितांनी, अवतारी पुरुषांनी केलेली आहेत, अशी प्रत्येकाची श्रद्धा असते. हा धर्म पूर्ण आहे, निर्दोष आहे, आपले धर्माचार्य हे प्रमादातीत आहेत, असा त्याला विश्वास वाटतो. आता दुसरा धर्म आपल्या धर्माइतकाच खरा आहे, असूं शकेल, असे मानले तर, स्वधर्माचे पूर्णत्व, सर्वंकषत्व कोठे राहिले ? दुसरा धर्म, त्यांतील तत्त्वें, बरोबर असूं शकतील असें म्हणतांच, आपल्या धर्माची तत्त्वें कदाचित् प्रामादिक असूं शकतील, हा विचार सूक्ष्मपणे मनांत उद्भवतोच. तो सहन करणें हें फार थोड्यांना शक्य आहे. वास्तविक विवेकाने केवळ स्वधर्माकडे पाहिले, तरी वरील विचार तितका भयंकर नाही, हें सहज ध्यानांत येईल.

अनुचित आग्रह

 इस्लामचे मुख्य आधार म्हणजे कुराण व सुन्ना. पण त्यांवरून जीवनांतल्या सर्व प्रसंगी मार्गदर्शन होत नाही. अनेक तत्त्वें, अनेक आचार, अनेक व्यवहार विषय यांचा त्यांत समावेश नाही. यासाठी त्यांवर पुढील काळच्या धर्मपंडितांनी भाष्ये लिहिली. आता आरंभापासून अंतापर्यंत एकच भाष्य असतें, तर त्यावरील एकांतिक श्रद्धेला कांही अर्थ आला असता. पण भाष्यें अनेक आहेत. अबू हनिफा (६९९- ७६७), मलिक (७१७- ७९५), शफी (७६७- ८२०) व हनवली या चार पंडितांनी चार प्रकारांनी आपल्या बुद्धीने कुराणावर भाष्ये लिहिली. तसे करतांना त्यांनी तत्कालीन रूढी व परंपरा लक्षांत घेऊनच नवा कायदा रचला. शिवाय नंतरच्या काळांत आटोमन तुर्क सुलतान वेळोवेळी नवा प्रसंग येताच स्वतंत्र फतवे काढीत असत. इस्लामच्या कायद्यांत शरीयतमध्ये- त्यांचीहि भर पडे. (मिड् ईस्ट- वर्ल्ड सेंटर, मजिद खादुरी, जॉन् हॉपकिन्स युनिव्हर्सिटी- अमेरिका, पृष्ठे २२२-२५) अशा तऱ्हेने भिन्न शतकांत, अनेक पंडितांनी रचलेला कायदा परमेश्वरप्रणीत आहे, असा आग्रह धरणें युक्त नाही, हें कोणाच्याहि सहज ध्यानांत येईल. आधीच्या भाष्यकाराचें कांही तरी चुकलें, ते अपूर्ण आहे, योग्य नाही असें वाटल्यावरूनच पुढच्या भाष्यकाराने नवी टीका रचली हें उघड आहे. शिया व सूफी पंथांची भाष्ये आणखी निराळी. तेहि मुस्लिमच आहेत व इस्लामचे तितकेच अभिमानी आहेत. सुनी पंथांतील अनेक सिद्धान्त त्यांना प्रामादिक वाटले म्हणूनच त्यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळला. शिवाय पहिली चार भाष्ये होऊन चार पंथ झाले तेव्हा कोणालाहि एक पंथ सोडून दुसऱ्यांत जाण्याची परवानगी होती. म्हणजे कोणतें खरें वा खोटे हें ठरविण्याचें स्वातंत्र्य प्रत्येकाला होतें.
 अशा स्थितीत सर्वच भाष्यकार प्रमादातीत अवतारी पुरुष होते असें मुस्लिम लोक मानीत नाहीत हेंच सिद्ध होतें. आणि कोठे तरी प्रमाद असूं शकतो, दुसऱ्यांचें बरोबर असूं शकतें, हे एकदा मान्य केल्यानंतर सर्वधर्म समानत्व फार लांब नाही. पण हा विवेक बहुसंख्य लोक करीत नाहीत. पश्चिमेंत चौदाव्या शतकांतपर्यंत हीच स्थिति होती. तेथे ल्यूथरचा प्रोटेस्टंट पंथ निघाला तेव्हा प्रथम रक्तपात झाले. ज्यूंची कत्तल ही नित्याचीच गोष्ट होती. पण तेथे हळूहळू बुद्धिवाद, विज्ञानवाद, उदयास आला, माणसें विवेकी झाली. म्हणूनच तेथे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी अशी प्रबळ राष्ट्र निर्माण झालीं. पूर्व युरोपांत लोक अंधश्रद्ध व शब्दनिष्ठच राहिले. त्यामुळे तेथे राष्ट्रसंघटना होऊ शकल्या नाहीत. पश्चिम युरोपांतील इतिहासाची आज पश्चिम आशियांतील (मध्यपूर्वेतील) मुस्लिम देशांत पुनरावृत्ति होत आहे. जे देश विवेकाचा, इहवादाचा आश्रय करीत आहेत ते प्रबळ व संपन्न होत आहेत. ज्यांना हें जमत नाही ते मागे राहत आहेत. पण सर्व इहवादाच्या मार्गाने निघाले आहेत यांत मात्र शंका नाही.


  राष्ट्रवादामुळे विश्व-मुस्लिमवाद सोडावा लागतो, मुस्लिमेतरांना स्वकीय मानावें लागतें व प्राचीन परंपरा मुस्लिमेतर असली तरी तिचा अभिमान वहावा लागतो. अंध जमातवादी लोकांना हे सर्व कडू घोट आहेत. पण त्यांपेक्षाहि एक कडू- जहर घोट राष्ट्रनिष्ठेसाठी घ्यावा लागतो. तो म्हणजे जनतेचें सार्वभौमत्व मान्य करणें हा होय. राष्ट्र हें नवें, अगदी ध्रुवभिन्न असे संघटनतत्त्व आहे, असें वर अनेक वेळा सांगितलें आहे, याचे कारण हेंच आहे.
 त्यासाठी जुन्या समाजरचनेतील जवळ जवळ सर्व तत्त्वांचा त्याग करावा लागतो आणि सर्वस्वीं नवीन, अपरिचित व निषिद्ध वाटणाऱ्या तत्त्वांचा स्वीकार करावा लागतो. इस्लामने अल्लाची आज्ञा ही सर्वगामी व सर्वव्यापी आहे, हें तत्त्व शिरसावंद्य मानले आहे. आणि जनतेचं सार्वभौमत्व मान्य केलें, तर त्याचा त्याग करणें अपरिहार्य ठरते. राष्ट्रामध्ये कोणत्याहि क्षेत्रांतला अंतिम निर्णय सर्व राष्ट्रांतील जनतेच्या मताप्रमाणे व्हावयाचा असतो. तो करतांना परमेश्वराच्या, अल्लाच्या आज्ञेचा विचारहि केला जात नाही. त्यामुळेच देव की माणूस, निर्णायक शासन देवाचें की माणसाचें, असा पेच निर्माण होऊन समाजाचे दोन तट होतात व त्यांच्यांत संघर्ष अटळ होतो.
 जीर्णवादी मुस्लिम मौलानांचा राष्ट्रवादाला कडवा विरोध आहे तो याच कारणासाठी. त्याअन्वये लोकांच्या हातीं शासन जातें व मग शासनावर धर्माची- इस्लामची- सत्ता राहत नाही. राजशासन व धर्म यांची तेथे फारकत होते. पाक इस्लामी पंडितांना ही कल्पनाच असह्य आहे. महंमद गझाली हा अरब पंडित म्हणतो की, "राष्ट्रवाद स्वीकारणें म्हणजे पैगंबरांच्या पूर्वीच्या रानटी अवस्थेत जाणें होय. ही कल्पना आपण पाश्चात्त्यांकडून घेतली आहे; पण ती सर्वथैव त्याज्य आहे. शासन आणि इस्लाम यांची फारकत म्हणजे पाखंड आहे. शासकीय सत्तेवांचून धर्माला कांही अर्थच नाही. तेव्हा आपल्याला शासन हवें तें इस्लामी शासन हवें, राष्ट्रीय नको. इस्लामअन्वये अल्ला हा एकच शास्ता व निर्बंधकार असू शकतो. पैगंबरांनी राजशासन चालविले, समाजनियंत्रण केलें, तें अल्लाच्या आज्ञेप्रमाणे केलें. परिस्थिति पाहून त्यांनी निर्बंध ठरविले नाहीत. तेव्हा राष्ट्रवाद म्हणजे इस्लामचा नाश होय." मौलाना मीदुदी या पाकिस्तानी पंडितांचे विचार प्रसिद्धच आहेत. तो म्हणतो, "जनतेचें सार्वभौमत्व इस्लामला कधीच मंजूर नाही. ती पाश्चात्त्य कल्पना आहे. अल्ला हीच मुस्लिम देशांत सार्वभौम सत्ता असली पाहिजे. पाकिस्तानांत अल्ला हाच एकमेव शास्ता राहिला पाहिजे. येथलें शासन हें केवळ त्यांचे मुखत्यार मुनीम म्हणून कारभार पाहील. इस्लामचें हें प्राणतत्त्व आहे. पाकिस्तान हें निराळें केलें तें यासाठीच. तेव्हा तेथे शरियत हाच कायदा जारी झाला पाहिजे. तो जारी करावयाचा तर धर्म व शासन यांची फारकत होऊन चालणार नाही."

दुसऱ्या टोकाचीं मतें

 हीं जशी एकांतिक मतें आहेत तशींच दुसऱ्या टोकाची एकांतिक मतेंहि मुस्लिम देशांत दिसून येतात. तुर्कस्तानांत केमाल अतातुर्क व त्याचे सहकारी यांनी केलेल्या सुधारणांचा निर्देश वर केलेलाच आहे. तुर्कस्तानांत जनता हीच सार्वभौम असून त्या देशाच्या नेत्यांनी इस्लामचा शासनाशी कसलाहि संबंध ठेवलेला नाही. इजिप्शियन ग्रंथकार अली अब्दुल रझिक याने 'इस्लाम अँड दि प्रिन्सिपल्स ऑफ गव्हर्नमेंट' या ग्रंथांत तुर्कस्तानच्या कृतीचें दृढपणें समर्थन केलें आहे. तो म्हणतो, "पैगंबरांनी एक धर्मबद्ध समाज निर्माण केला. पण खलिफा ही त्यांची निर्मिति नाही. कुराण व सुन्ना यांत त्यांचा निर्देश नाही. सर्वांचा शास्ता खलिफा ही कल्पना इस्लामविरोधीच आहे. रझिकच्या मतें धर्म व शासन हे परस्पर विसंगतच आहेत. त्यांचा दृढ संबंध आहे असें म्हणणाऱ्या कायदेपंडितांना पैगंबरांचा धर्म कळलाच नाही. तेव्हा अर्वाचीन राष्ट्रांत धर्म व शासन यांची फारकत ही अत्यंत अवश्य आहे. तो नव्या शासनाचा पायाच होय. महंमद अब्दुल्ला अस्समान याचें मत याहून जरा निराळे आहे. राष्ट्रांमध्ये जनता हीच सार्वभौम सत्ता असली पाहिजे, असे तो म्हणतो. पण तें पैगंबरांचेंच तत्त्व आहे, असें त्याचें मत आहे. तो असेंहि म्हणतो की, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानांत शास्ते हे सर्वसत्ताधारी असतात. इस्लाम हा एकच धर्म असा आहे की, जो लोकांचें सार्वभौमत्व मानतो. मोआवियाने अनियंत्रित सत्ता स्थापिली व बहुतेक सर्व मुस्लिम देशांत तीच प्रथा पडली याचा त्याने निषेध केला आहे. मिसरी राष्ट्रवादी नेता मुस्ताफा कामील (केमाल) याच्या मतें इस्लाममध्येच राष्ट्रवादाची शिकवण आहे. इस्लामचा व राष्ट्रवादाचा विरोध, त्याच्या मतें अशक्य आहे. इस्लाम त्याला प्रिय आहे, पण तो त्याचा अंधभक्त नाही. इस्लामची मूळ तत्त्वें व इस्लामी कायदा- शरियत- यांत तो फरक करतो. आणि म्हणतो की, शासनाची उभारणी इस्लामच्या मूळ तत्त्वांप्रमाणे व्हावी. पण इस्लामच्या कायद्याप्रमाणे मात्र होऊ नये. तसें केल्यास ख्रिस्ती, ज्यू या इस्लामेतरांना राष्ट्रांत स्थान राहणार नाही. तें तर अवश्य राहिले पाहिजे, असें त्यांचें मत आहे.
 जनतेचें सार्वभौमत्व मानण्यास जीर्णवादी पंडितांचा फार विरोध आहे, तो या कारणासाठीच आहे. जनतेमध्ये इस्लामेतर समाज येणार, ज्यू येणार, ख्रिश्चन येणार, हिंदु येणार. बौद्ध येणार. अशा जनतेचें सार्वभौमत्व म्हणजे इस्लामी लोकांवर इस्लामेतरांची कांही अंशी तरी सत्ता चालणार आणि त्यांच्या मतें हें इस्लामच्या मूळ तत्त्वाला अगदी बाधक आहे. पण मुस्ताफा कामील याला तसें वाटत नाही. त्याला स्वदेशांत पाश्चात्त्य पद्धतीची लोकसत्ता हवी आहे. त्या लोकसभेलाच शासन जबाबदार असले पाहिजे. या लोकसभेंत सर्व वर्गांचे, धर्मांचे व पंथाचे लोक असणार. त्यांनी केलेले निर्बंध (कायदे) हे इस्लामच्या तत्त्वाप्रमाणे असले, तरी ते शरियत अनुसारी निश्चित नाहीत. या बाबतीत सामी शौकत याचे उद्गार अगदी निःसंदिग्ध आहेत. तो म्हणतो, "सध्याचे युग हें धर्मयुग नसून राष्ट्रयुग आहे हें आपण ध्यानांत ठेवले पाहिजे."
 हें सर्व विवेचन सविस्तर करून अर्विन रोझेंथॉल म्हणतो, "राष्ट्रसंघटना मुस्लिम देशांत शक्य व्हावयाची तर इस्लामने आपलें अधिसत्तेचें, वर्चस्वाचें स्थान सोडून इतर धर्मांच्या पातळीवर आले पाहिजे. मुस्लिमांच्या जीवनावरची आपली सर्वंकष सत्ता सोडली पाहिजे. आणि सर्वांत आधी राजकीय क्षेत्रांतलें त्याचे वर्चस्व नष्ट झालें पाहिजे. इस्लाम हें एक आध्यात्मिक तत्त्व, तो एक वैयक्तिक धर्म असें स्थान त्याने स्वीकारलें, तरच हें शक्य होईल." (इस्लाम इन् दि मॉडर्न नॅशनल स्टेट, पृष्ठे ६, १०९, ११५, ११९-१२२, १३६, १३८).
 या क्षेत्रांतल्या सर्वच अभ्यासकांचें असें मत असल्याचे आपल्याला दिसून येईल. धर्माचें सर्वंकष वर्चस्व नष्ट झाले पाहिजे, तसें झालें तरच राष्ट्रनिमिति शक्य होईल. धर्म नष्ट झाला पाहिजे, असें ते म्हणत नाहीत. तसें त्यांच्या मनांतहि नाही. पण शासन हें धर्माधीन असता कामा नये असे मात्र प्रत्येकाने आग्रहाने सांगितलें आहे. हॅनस कोहनने म्हटले आहे, "१९२४ साली खिलाफत नष्ट झाली आणि तें अपरिहार्यच होते. युरोपीय विद्येमुळे मध्यपूर्वत इहवाद आला होता आणि इहवादामुळे धर्माची जागा हळूहळू राष्ट्राने घेतली होती. शासनाचा व एकंदर मानवी जीवनाचा आता तो पाया होत होता. तेव्हा खिलाफतीचें पुनरुज्जीवन करण्याचा कोणताच प्रयत्न यशस्वी झाला नसता. इस्लाम ही अजूनहि एक प्रबळ धार्मिक शक्ति निश्चित आहे. पण तीच आता इहवादी होऊन राष्ट्रवादाचें रूप घेत आहे. धर्मसत्तेपासून शासन, दंडविधान, शिक्षण आणि एकंदर समाजजीवन मुक्त होणें म्हणजे इहवाद. तो आता मध्यपूर्वेत सर्वत्र प्रभावी होत आहे." (वेस्टर्न सिव्हिललिझेशन इन् दि निअर ईस्ट, पृष्ठ ९८).
 डॉ. सनहूरी या मिसरी पंडिताने प्रत्यक्ष तात्त्विक चर्चा न करतां अरब- देशांत हें प्रत्यक्षांत घडवून आणले आहे. शरियतमधले अर्वाचीन काळाला हि योग्य असे निर्बंध निवडून त्यांत त्याने पाश्चात्त्य तत्त्वांची भर घातली व एक नवा नागरी कायदा तयार केला. सिरिया, इजिप्त व इराक या देशांत तो १९४९ व १९५३ सालीं स्वीकारण्यांत आला. डॉ. सनहूरी यांस एवढे यश येण्याचें मुख्य कारण हे की, त्याने सेक्युलरायझेशन हा शब्द कटाक्षाने टाळला आहे. अरब देशांत धर्मनाश असा त्या शब्दाचा अर्थ झाला आहे. म्हणून तो शब्द टाळून मॉडर्नाय झेशन, 'आधुनिकीकरण' असा शब्द त्याने वापरला. त्याच्या कायद्यांत धर्म व शासन यांची फारकत करणें हें तत्त्वहि प्रत्यक्ष सांगितलेले नाही. पण ध्वनित निश्चित आहे.

परंपरेचा धागा

 सुवही महसानी या लेबॅनॉनमधील न्यायपंडिताने हा ध्वनित अर्थ पुढे स्पष्ट करूनहि सांगितला आणि त्याला त्याने पैगंबरांचा आधारहि दिला. प्रा. मजिद खादुरी या अमेरिकेतील पंडिताने 'फॉम रिलिजस टु नॅशनल लॉ' या आपल्या लेखांत ही सर्व माहिती देऊन डॉ. सनहूरी याच्या धोरणाचें समर्थन केलें आहे. तो म्हणतो की, "या नागरी कायद्यांत इहवाद निश्चित आहे. पण प्राचीन परंपरेचाहि धागा त्यांत राखला आहे. कारण प्रगतीच्या दृष्टीने तेंच हितावह असतें. जुन्या परंपरेपासून एकदम तुटून निघणें कोणत्याहि समाजाला शक्य होत नाही व तें इष्टहि नसतें." (मिड् ईस्ट, वर्ल्ड सेंटर, पृष्ठ २३४). प्रा. खादुरी यांचें हें म्हणणें युक्तच आहे. पण मथळ्यांतून सूचित होणारा "रिलिजस लॉकडून आपण नॅशनल लॉकडे गेलें पाहिजे," हा विचार येथे आपल्या विवेचनाच्या संदर्भात ध्यानी घेतला पाहिजे.
 जनतेच्या सार्वभौमत्त्वाचा इतका आग्रह सर्व पंडितांनी धरला आहे याचें कारण असें की, राष्ट्रवादाच्या बुडाशी प्रामुख्याने व्यक्तिवाद आहे. व्यक्ति ही राजकीय, धार्मिक, सामाजिक या सर्व प्रकारच्या बंधनांतून मुक्त असली पाहिजे, विचार, आचार, उच्चार यांचें सर्व प्रकारचें स्वातंत्र्य तिला असलें पाहिजे, हा सिद्धान्त म्हणजे व्यक्तिवाद होय. युरोपांत प्रबोधनयुगांत या व्यक्तिवादाचा उदय झाला व त्यांतूनच राष्ट्रवाद निर्माण झाला. रशियांतील इहवादाचें विवेचन करतांना हें सांगितलें आहे की, ज्या समाजांत प्रत्येक व्यक्ति समाजाच्या उत्कर्षापकर्षाची चिंता वाहते आणि त्या उत्कर्षाची जबाबदारी स्वतःवर आहे हें जाणून त्यासाठी उपाययोजना करते, आणि ती उपाययोजना अमलांत आणण्याचा जिला हक्क आहे, तोच समाज राष्ट्र- पदवीला जाऊं शकतो. जुन्या राजसत्तेत प्रजेवर ही जबाबदारी नव्हती. तिला तिची जाणीवहि नव्हती आणि तिला त्या प्रकारचे हक्कहि नव्हते. पिता आणि लहान मुलें यांच्यासारखे त्या वेळीं राजा व प्रजा यांचे संबंध असत. पश्चिम युरोपांत पंधराव्या शतकापासून हें नातें बदललें. बुद्धिप्रामाण्य, विज्ञान संशोधन, भूसंशोधन यांमुळे तेथला मानव प्रौढ झाला व पित्याचा योग्य तो मान ठेवून, कारभाराची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊ लागला. अर्थातच पित्याने घातलेली बंधनें अशा स्थितीत मानणें शक्य नव्हतें. 'माझी बंधनें मी घालणार' अशी त्याने प्रतिज्ञा केली. जनतेचें सार्वभौमत्व तें हेंच.
 राजकीय क्षेत्रांत राजा हा पिता असे, तसाच धार्मिक क्षेत्रांत परमेश्वर वा त्याचा प्रतिनिधि जो धर्माचार्य तो पित्याच्या ठायीं असे. त्याचीहि बंधने मानवाला आता असह्य होऊं लागली. गॅलिलिओ, न्यूटन यांनी निसर्गाच्या कारभारा- विषयी जे शोध लावले त्यांवरून मानवाला हें दिसून आलें की, निसर्ग हा नियमबद्ध आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, वीज, पाणी, यांच्या सर्व हालचाली काटेकोर नियमांनी नियंत्रित झाल्या आहेत. हें दिसून आल्यामुळे मानवाच्या मनांतील परमेश्वराविषयीचा आदर कमी न होता उलट दुणावला. कारण तो म्हणाला, "पाहा, परमेश्वराने स्वतःच्या लहरीप्रमाणे सुलतानशाहीने जग चालविलेलें नाही, तर त्यासाठी त्याने कायदे केले आहेत, आणि ते कायदे तो स्वतःहि पाळतो. त्यांत हस्तक्षेप करीत नाही. स्वतः परमेश्वर असा घटनाबद्ध राजा असतांना पृथ्वीवरील सत्ताधीशांनी, राजा किंवा पोप यांनी अनियंत्रित असणें कसें युक्त ठरेल ?"

मानवी मनाची मुक्तता

 विज्ञानामुळे मानवाचें मन मुक्त झालें तें असें. यापूर्वी निसर्ग, परमेश्वर या लहरी, सुलतानी, कठोर शक्ति आहेत असें वाटून त्याचें मन सदैव भयग्रस्त असें. आपल्या हातीं कांही नसून आपलें व समाजाचें भवितव्य या लहरी शक्तींच्या हाती आहे, आपण पराधीन आहों, गुलाम आहों अशी त्याची भावना होती. हा भयग्रस्त, पराधीन मानव राष्ट्राचा घटक, राष्ट्राचा नागरिक होऊ शकत नाही. सर्व समाजाची जबाबदारी पेलण्याचें मानसिक सामर्थ्य त्याच्या ठायीं या दासस्थितींत येऊंच शकत नाही. तें सामर्थ्य विज्ञानाने, बुद्धिवादाने त्याला दिलें. त्या सामर्थ्याने संपन्न मनुष्य म्हणजेच व्यक्ति. अशा व्यक्तीच राष्ट्र घडवू शकतात आणि त्यांनी निर्मिलेल्या या नव्या संघटनेवर त्यांची सार्वभौम सत्ता असली तरच ती संघटना टिकते व समर्थ होते. त्या सार्वभौमत्वाचा आग्रह आहे तो यासाठी. हें जनतेचें सार्वभौमत्व जेथे नसतें, त्या जागी पोप, खलिफा, कुराण, श्रुतिस्मृति, बादशहा, सुलतान यांचें सार्वभौमत्व जेथे प्रस्थापित होतें, तेथे व्यक्तीचें प्रौढत्व नष्ट होतें. व्यक्ति ही व्यक्ति राहत नाही. ती राजाची प्रजा होते. प्रजा ही राष्ट्र घडवू शकत नाही.
 आज मुस्लिम देशांतील नेत्यांना राष्ट्र घडवावयाचें आहे. त्यासाठी त्यांना धर्माची सर्वंकष सत्ता नष्ट करावयाची आहे. शासन हें धर्मबंधनांतून मुक्त करावयाचें आहे. म्हणजेच इहवादी बनवावयाचें आहे. इहवादावांचून व्यक्तिवाद अशक्य आहे व व्यक्तिवादावांचून राष्ट्रसंघटना अशक्य आहे हें त्यांनी जाणलें आहे. या नव्या तत्त्वज्ञानाचे संस्कार त्या देशांतील नागरिकांवर जितके खोल, जितके जास्त दृढ होतील तितकी ही नवी संघघटना जास्त दृढ व समर्थ होईल.
 या व्यक्तिवादाच्याहि मागे जाऊन आणखी विचार केला पाहिजे. प्रबोधन- युगांत मानवाविषयीच्या तत्त्वज्ञानांत अत्यंत मोठी क्रांति घडून आली ती ही की, मानव हा एकंदर जागतिक व्यवहाराचा मध्यबिंदु आहे, मानव हें अंतिम मूल्य आहे, धर्म, शासन, ज्ञानपीठें या संस्था मानवासाठी आहेत, मानव त्यांच्यासाठी नाही, हा विचार पुन्हा एकदा प्रस्थापित झाला. प्राचीन काळीं ग्रीकांनी तो मांडला होता. पण ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतर त्याचा लोप झाला होता. या संस्था परमेश्वराने निर्मिल्या असून मानवाने अंग संकोचून त्यांत कोठे वसतां आलें तर वसावें, असें तत्त्वज्ञान त्या काळी रूढ होतें. पण ग्रीक विद्येचें चौदाव्या- पंधराव्या शतकांत पुनरुज्जीवन झालें तेव्हा तो विचार पुन्हा उसळून वर आला व पाश्चात्त्य जगांत त्याने चांगलेच मूळ धरल्यामुळे तेथे राष्ट्रसंघटना प्रबल होऊन त्यांची प्रगति झपाट्याने झाली.
 मुस्लिम समाजांत प्रबोधनयुगांतील हे तत्त्व केव्हाच उदय पावलें नाही व प्रभावी झालें नाही. आरंभीच्या दोन शतकांत त्या समाजांत समता कांही अंशीं नांदत होती. पण लोकशाही, व्यक्तिवाद, मानवी स्वातंत्र्य हीं तत्त्वें तेथे कधीच प्रस्थापित झाली नव्हती. खलिफांची अरबस्तानांत कधी निवड होत नसे व त्यांची सत्ताहि अनियंत्रित असे. पुढल्या काळांत समताहि संपुष्टांत आली. अशा स्थितीत तेथे मानव हें अंतिम मूल्य, मानव हा विश्वाचा मध्यबिंदू हा विचार उद्भवणेंहि शक्य नव्हतें. मग तो प्रभावी होणे दूरच. व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य हीं तत्त्वें मुस्लिम देशांत पाश्चात्त्य विद्येच्या आगमनानंतर प्रसृत झाली आणि अजूनहि तेथे तीं दृढमूल झालेली नाहीत, असेंच वरील विवेचनावरून दिसून येईल. पण हे क्रांतिकारक विचार त्या समाजांत शिरले आहेत व हळूहळू जीर्णमतवादाला पोखरून ते त्याला ढिला करीत आहेत, यांत मात्र शंका नाही.

राष्ट्रधर्माची दीक्षा

 त्यांतील इजिप्त, सिरिया, तुर्कस्थान या देशांत हें क्रांतिकारक तत्त्वज्ञान जनतेंत रुजविण्याचें कार्य करणारा सुशिक्षित मध्यमवर्गहि निर्माण झाला आहे. समाजाला राष्ट्रधर्माची दीक्षा देण्याचें कार्य प्रामुख्याने हाच वर्ग करीत असतो. कारण त्या धर्माचें तत्त्वज्ञान सिद्ध करणें व त्याचा प्रसार करणें यास जो विद्याभ्यास, जें पांडित्य लागतें तें याच वर्गाजवळ असतें. किंबहुना तें ज्याच्याजवळ असतें तो मध्यमवर्ग. या वर्गावांचून राष्ट्रसंघटना यशस्वी होऊं शकत नाही. जॉन गुंथर याने 'इनसाईड लॅटिन अमेरिका' या आपल्या ग्रंथांत मेक्सिको, चिली, पेरू इत्यादि देशांत राष्ट्रसंघटना यशस्वी न होण्याचें कारण मध्यमवर्गाचा अभाव हेंच दिलें आहे. लॉर्ड ॲक्टन याने मेक्सिकोवरील आपल्या निबंधांत हेंच मत मांडलें आहे.
 तेव्हा ज्यांना राष्ट्र घडवायचें आहे त्यांनी व्यक्तिवाद व त्यावर अधिष्ठित असलेलें जनतेचें सार्वभौमत्व हें मान्य केलें पाहिजे. अर्थातच त्या प्रमाणांत धर्माचें सार्वभौमत्व शिथिल होणार हें अटळ आहे. बहुतेक मुस्लिम देशांत जनतेचें सार्वभौमत्व मान्य होण्याच्या मार्गावर आहे.


 समाजाचा अपकर्ष होतो तो जीवनाच्या एखाद्या दुसऱ्या क्षेत्रांत होत नाही. राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्वच क्षेत्रांत समाजाचा एकाच वेळीं अधःपात होत जातो. त्यामुळे समाजाच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या पुरुषांना सर्वांगीण सुधारणा करणें प्राप्त असतें. जुन्या काळी बहुतेक सर्व जीवनक्षेत्रावर धर्माचें सर्वंकष प्रभुत्व असल्यामुळे इहवादाचा आश्रय घेतल्यावांचून कोणत्याच क्षेत्रांत सुधारणा होणें शक्य नव्हतें. राष्ट्ररचनेच्या कार्यात इस्लामचा पावलोपावलीं कसा विरोध होतो तें मागल्या एक-दोन लेखांत पाहिले. आता मुस्लिम देशांतील सामाजिक क्रांतीचा या लेखांत विचार करायचा आहे.
 तेथेहि असेच दिसून येतें की, दर ठिकाणी जुन्या धर्माचे अभिमानी जे मुल्ला- मौलवी त्यांचा सामाजिक सुधारणेला पावलोपावलीं विरोध होत होता आणि अजूनहि होतो. इराणचा शहा रेझाखान पहेलवी हा केमाल अतातुर्कांचा समकालीन होता. केमालचें अनुकरण करून आपल्याहि देशांत सुधारणा कराव्या असा त्याचा प्रयत्न होता. पण मौलवींनी त्याला इतका कडवा विरोध केला की, केमालसारखी घोडदौड त्याला झेपेना. म्हणून त्याने मंद गति स्वीकारली. अफगाणिस्तानचा राजा अमानुल्ला याला तर सामाजिक सुधारणांच्या पायीं राज्य घालवावें लागले. तेव्हा हा संघर्ष फार तीव्र आहे. त्यालाहि तोंड देऊन इजिप्त, सिरिया, तुर्कस्थान आदि देश समाजपरिवर्तन करण्यांत बरेंच यशस्वी झाले आहेत. तो इतिहास आता पाहावयाचा आहे. कारण नव्या क्रांतीचें तें एक प्रधान अंग आहे.
 सामाजिक क्रांतीचें पहिले कलम म्हणजे स्त्रीदास्यविमोचन हे होय. ऐहिक प्रगतीच्या दृष्टीने जगाच्या अग्रभागी असलेल्या पाश्चात्त्य देशांतहि स्त्रीचें पूर्ण दास्यविमोचन झाल्याला अजून शंभर वर्षेहि झालेली नाहीत. तरी धर्माच्या सर्वव्यापी सत्तेशीं ते देश आज तीन-चारशे सर्षे सामना देत आहेत. पश्चिम युरोपांत आधुनिक युगाला सुरुवात झाली ती इहवादी प्रेरणेमुळेच झाली. असें असूनहि स्वित्झर्लंडसारख्या दीर्घकाल लोकायत्त असलेल्या देशांत अजूनहि स्त्रीला मताधिकार नाही. इतर सर्व अधिकार तिला असल्यामुळे तिची प्रगति तेवढ्याने खुंटली आहे असे जरी नसले तरी, आजच्या लोकशाही युगांतहि तेथले पुरुष शास्ते तिला मतदान करण्यास योग्य मानीत नाहीत हे लक्षांत घेतलें पाहिजे. त्या दृष्टीने पाहतां मुस्लिम राष्ट्रांत पुष्कळच प्रगति झाली आहे, असे म्हणावें लागेल.

तुर्कस्थानची आघाडी

 इतर क्षेत्रांतल्याप्रमाणे याहि बाबतींत तुर्कस्थान आघाडीवर आहे. 'युनियन ॲण्ड प्रोग्रेस' या संस्थेतर्फे १९०८ साली स्त्रिया सामाजिक व राजकीय चळवळींत प्रथमच भाग घेऊं लागल्या. प्रथमच त्या घराबाहेर पडून सभेंत येऊन भाषणें करूं लागल्या. पडदा, बुरखा व कुटुंबांतील इतर बंधनें त्या काळी इतकी कडक होती की, त्यांचा भंग केला तर पोलिस खटला करीत असत. पण तुर्की स्त्रियांनी हा धोका पत्करूनहि समाजकार्यात उडी घेतली. हलिदे हनूम या विदुषीने तर केवळ पुरुषांच्याच सभेंत जाऊन भाषण करण्याचें धाडस केलें. मात्र या वेळी तिने बुरखा घेतला होता. पण लवकरच त्याविरुद्ध चळवळ करून, व्याख्यानें व लेख यांद्वारा लोकजागृतीस तिने प्रारंभ केला. त्यासाठी संस्थाहि स्थापन केल्या व स्त्रियांचीं म्हणून निराळी वृत्तपत्रेहि काढली. १९१३ साली कॉन्स्टांटिनोपल येथे पहिली मुलींची शाळा स्थापन झाली आणि लवकरच स्त्रियांना विद्यापीठांत ज्ञानाच्या सर्व शाखांत प्रवेश मिळू लागला. दोस्तांच्या सैन्याचा पराभव करून १९२३ सालीं केमाल अतातुर्क याने स्मर्ना शहरांत प्रवेश केला तेव्हा तेथील स्त्रियांच्या सभेंत त्याने पुढीलप्रमाणे भाषण केलें : "आम्ही आता शत्रूवर निर्णायक विजय मिळविला आहे. पण तुम्ही आमच्या साह्याला आता आला नाहीत; तर त्या विजयाला अर्थ राहणार नाही. तुम्ही लोकशिक्षण हातीं घ्या, त्या क्षेत्रांत विजय मिळावा, ती देशसेवा आमच्या सेवेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. यापुढे स्त्रियांनी तुर्कस्थानच्या सामाजिक जीवनांत भाग घेतला नाही, त्यांनी आपल्या सामाजिक रूढि आमूलाग्र बदलल्या नाहीत, तर आपली प्रगति होणार नाही. सुधारणेच्या क्षेत्रांत आपल्याला पश्चिमेची बरोबरी करतां येणार नाही."
 अतातुर्क याची पत्नी लतिफे हनूम ही त्याची खरी सहधर्मचारिणी होती. बुरखा टाकून देऊन ती पतीबरोबर प्रत्येक ठिकाणी जात असे व स्त्रीदास्य- विमोचनाच्या सर्व चळवळींत जातीने भाग घेत असे. लवकरच तुर्की लोकसभेने कुटुंब, विवाह, घटस्फोट यांसंबंधीचे जुने कायदे रद्द करून तुर्की स्त्रीला सर्व जीर्ण धर्मबंधनांतून मुक्त केलें.
 इजिप्त, सिरिया, इराक, सौदी अरेबिया, इराण या देशांत थोड्याफार फरकाने स्त्रियांच्या मुक्तीची अशीच चळवळ चालू झाली होती. आणि याच मार्गाने तिची प्रगति होत होती. कोठे तिचा वेग जास्त होता, कोठे कमी होता. पाश्चात्त्य विद्या जेथे लवकर पोचली तेथे वेग जास्त होता. उशिरा पोचली तेथे तो कमी होता. सौदी अरेबिया हा देश मागासलेला आहे. १९६३ साली तेथील बुरादिया या गावी मुलींची शाळा काढण्याचें राजा फैजल याने ठरविलें; पण मुलींनी शिकणे पाप आहे, असें त्या वेळी सुद्धा गावच्या नागरिकांचें मत होतें. त्यामुळे ही वार्ता ऐकून ते अत्यंत भडकून गेले व त्यांनी फैजलकडे एक शिष्टमंडळ पाठविलें. राजाने त्यांना सांगितलें की, "मुलींच्या शिक्षणाविरुद्ध कुराणांतून एक तरी वाक्य मला काढून द्या." शिष्टमंडळाला तसें वाक्य सापडलें नाही, पण त्याचा विरोध मात्र कमी झाला नाही. शेवटी फैजलला त्या गावीं लष्कर पाठवून शाळा स्थापावी लागली. सुदैवाने लष्कर पाहून लोकांनी विरोध मागे घेतला आणि पुढे लवकरच त्यांचे मत पालटलें व त्यांनी ही शाळा पुरत नाही, दुसरी काढावी अशी मागणी केली.

पश्चिमीकरणाचा ध्यास

 राजा फैजल याने युरोपांत पुष्कळ प्रवास केलेला असून, त्याचीं मतें अत्यंत पुरोगामी आहेत. त्याची राणी एफात ही तशीच बहुश्रुत आहे. स्त्रीदास्य-विमोचनाच्या चळवळींत ती सदैव अग्रभागी असते. इराणच्या शहाला आपल्या देशाचें पश्चिमीकरण करण्याचा असाच ध्यास लागला आहे. प्रत्येक खेड्यांत शाळा असलीच पाहिजे, असा त्याचा कटाक्ष आहे. विवाह, घटस्फोट यासंबंधीचे जुने कायदे त्याने बदलून टाकले आहेत. तेथील एक विदुषी सौ. एफात ही अभिमानाने सांगते की, "पूर्वी आम्ही बुरखा घेत होतों. आता आमच्या लोकसभेंत सहा स्त्रिया आहेत. सर्व क्षेत्रांत, उद्योगांत, व्यवसायांत आम्हांला मुक्त प्रवेश असून, तेथे आम्हांला पुरुषांच्या इतकेंच वेतन मिळते. पाश्चात्त्य देशांतहि अजून स्त्रियांन हा न्याय मिळालेला नाही." इराणचा शहा फ्रेंच व इंग्लिश उत्तम जाणतो. 'मिशन टु माय कंट्री' व 'व्हाइट रेव्होल्यूशन' असे दोन ग्रंथहि त्याने लिहिले आहेत. गेल्या वर्षी मयूरसिंहासनावर आरूढ होतांना त्याने स्वहस्तें आपली राणी फराहा हिच्या मस्तकावरहि मुगुट ठेवला. अशी गोष्ट इराणी साम्राज्यांत अडीच हजार वर्षांत घडली नव्हती. मुस्लिम जगतांतील स्त्रीजीवनांतील क्रांतीची ती निदर्शक आहे.
 पाकिस्तानांतहि अशीच क्रांति झालेली आहे. बेगम शहानवाज व बेगम इक्कामुल्ला या तेथील लोकसभेच्या सभासद असून, या सुधारणांत अधार्मिक व विरोधी कांहीहि नाही, असें त्या अट्टाहासाने सांगतात. आयुबखानाने १९६१ सालीं कायदे करून 'ऑल पाकिस्तान विमेन्स असोसिएन'ने सुचविलेल्या बहुतेक सुधारणा अमलांत आणल्या आहेत. भारतांतील मुस्लिम स्त्रिया मात्र अजुन हजार वर्षांपूर्वीच्या स्थितींतच आहेत. कारण येथल्या इहवादी पुरोगामी शासनाला त्यांना मुक्त करतील असे कायदे करण्याचें सामर्थ्य नाही. स्त्रीजीवनांत हे जे क्रांतिकारक बदल मुस्लिम देशांनी घडवून आणले आहेत त्यासाठी तुर्कस्थानचा अपवाद सोडतां बहुतेकांनी कुराण, सुन्ना व शरियत यांचेच आधार घेतले आहेत. त्यांच्या मतें पैगंबरांच्या काळी व नंतर दोन- तीनशे वर्षे स्त्रीजीवनावर आतासारखी जाचक बंधने नव्हती. पुढील काळीं तीं कुराणाच्या भाष्यकारांनी व मुल्ला-मौलवींनी जारी केलेली आहेत. पण या नव्या काळांत परिस्थितीप्रमाणे मूळ ग्रंथाचा नवा अर्थ लावण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्यामुळे, या सुधारणा करण्यांत आपण इस्लामविरोधी कांही करीत आहों, असें मानण्याचें कारण नाही.
 अर्थात् सुधारकांच्या या विचारसरणीला कोणी विरोध केलाच नाही, असें नाही. जीर्णमतवादी मौलवींनी तिला कसूनं विरोध केलाच. पण शिवाय नवविद्या- संपन्नांनीहि पुष्कळ वेळा तसाच कडवा विरोध केल्याचें आढळतें. हीं मतमतांतरें आणि त्यांतील संघर्ष आपण पाहिले तर इहवादाची वाटचाल कशी होते तें दिसून येईल. रशीद रिडा या इजिप्शियन पंडिताचा निर्देश वर आलाच आहे. त्याच्या मतें स्त्रीला समान हक्क देणें हें कुराणाच्या विरुद्ध आहे. कुराणांतील सुरा २-२२८ यांत तसे हक्क दिलेले आहेत. पण 'पुरुष नेहमी एक पायरी वरच असतो, स्त्रीच्या कल्याणासाठीच अल्लाने त्याला श्रेष्ठ केलें आहे' इत्यादि वचनांच्या आधारें, स्त्री-पुरुषसमता पैगंबरांना संमत नव्हती, असे तो म्हणतो. महंमद गझालीचें असेंच मत आहे. तो म्हणतो, "स्त्रीला शिक्षण देण्यास हरकत नाही; पण तिला राजकीय क्षेत्रांत किंवा इतर सार्वजनिक व्यवहारांत प्रवेश करूं देणें योग्य नाही. कारण ती ऐपत तिला नाही. स्टॅलिन, मोलोटोव्ह यांच्या तोडीची एक तरी स्त्री आतापर्यंत झाली आहे काय ? स्त्रीला न्यायालयांत साक्ष देण्याचाहि अधिकार नाही. मग ती न्यायाधीश कशी होऊ शकेल ? परमेश्वराने आतापर्यंत पृथ्वीवर जे प्रेषित धाडले ते सर्व पुरुष होते हा केवळ योगायोग नाही. त्यांतील भावार्थ स्पष्ट आहे" (रोझेंथॉल पृष्ठे ७२, ११२). इजिप्तचा मुफ्ती शेख माकलूफ याने १९५५ सालीं एक फतवा काढुन जाहीर केलें की, "इस्लामी कायदा पाहतां स्त्रीला मतदानाचा किंवा लोकसभासदत्वाचा हक्क द्यावा असें म्हणण्यास कोणताहि आधार नाही."

कुराणाचा आधार

 अर्थात् याच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांनी कुराण व सुन्ना यांच्याच आधारें स्त्रीला हे सर्व हक्क आहेत, असें प्रतिपादन केलें आहे. अल्लाल अलफासी हा मोरोक्कोमधील एक मोठा राजकीय नेता आहे. इस्लाम धर्मशास्त्र व अर्वाचीन भौतिकविद्या यांत तो सारखाच पारंगत आहे. बहुभार्यात्व हें त्याच्या मतें कायद्याने बंद केलेच पाहिजे; त्याचप्रमाणे पुरुषाला दिलेले घटस्फोटाचे वारेमाप अधिकार हेहि रद्द करणें अवश्य आहे; या आपल्या मतांना तो शरीयतचाच आधार देतो. तो म्हणतो, "शरीयत हा इस्लामी कायदा कोणत्याहि काळाला व परिस्थितीला सुयोग्य असाच आहे. मात्र त्याचा दर वेळीं उदार दृष्टीने नवा नवा अर्थ लावला पाहिजे." पाकिस्तानांतील जी. ए. परवीज हा पंडित पुरोगामी व उदारमतवादी आहे. तो कुराणाखेरीज कोणताच ग्रंथ मानीत नाही. सुन्ना हा पैगंबरांच्या चरित्रावरूनच रचलेला आहे. पण त्याच्या मतें नंतरच्या धर्मपंडितांनी त्यांत भर टाकली आहे. म्हणून तो फक्त कुराण मानतो. आणि त्याच्या आधारेंच सांगतो की, "स्त्रीला सर्व क्षेत्रांत कुराणाने समहक्क दिलेले आहेत. या दृष्टीने स्त्री-पुरुष असा भेद कुराण करीत नाही." (रोझेंथाल, पृष्ठे १६८, ६९, २०८).
 इजिप्तमधील शरीयत न्यायालयाचा न्यायाधीश शेख अली अब्दुल रझेक याचें तर मत असें आहे की, "मुस्लिम कायदा हा मनुष्याच्या खाजगी वैयक्तिक आचाराचाच फक्त धर्म सांगतो. सामाजिक व्यवहार हा त्याचा विषयच नाही. तेव्हा स्त्रीला पूर्ण मुक्त करून तिला समहक्क देण्यास कांहीच हरकत नाही." हें अवतरण देऊन हॅनस कोहन म्हणतो की, "शेख रझेक याची हीं मतें म्हणजे इजिप्तमध्ये सुरू झालेल्या इहवादी विचारसरणीची तर्कप्राप्त परिणति होय. (नॅशनलिझम इन् द ईस्ट, पृष्ठ २१८).
 इतर मुस्लिम सामाजिक जीवनाची कथा स्त्रीजीवनासारखीच आहे. इस्लाममध्ये श्रेष्ठ-कनिष्ठता नाही, विषमता नाही, जन्माने किंवा धनाने कोणी मोठा किंवा लहान होत नाही, अशी स्वच्छ कुराण- वचनें आहेत. पण पैगंबरांच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षांत मुस्लिम समाजांत विषमता थैमान घालू लागली. पैगंबर कुरेशी जमातीचे होते. तेव्हा त्या जमातीचे लोक स्वतःला श्रेष्ठ मानूं लागले. पुढे अरबांनी इजिप्त, इराण, तुर्कस्थान इ. देश जिंकले तेव्हा सर्व अरब त्या देशांतील मुस्लिम झालेल्या लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानूं लागले. अरबेतर मुस्लिमांना ते मवाली म्हणत आणि त्यांना इतके हीन लेखीत की, रस्त्यांत त्यांच्यावरोवर चालणें सुद्धा त्यांना कमीपणाचें वाटे. इराण, तुर्कस्थान येथील अनेक लोक इस्लाम धर्माचे मोठे पंडित झाले, धर्मशास्त्रज्ञ झाले; पण अरब लोक त्यांना हीनच लेखीत.
 खलिफा उमर याला हा भेद फारसा मंजूर नव्हता. म्हणून त्याने दोन मवाली गृहस्थांना उच्चाधिकारपदी नेमलें; पण त्याविरुद्ध फार भयंकर ओरडा झाला. पुढे पुढे अरबेतर मुस्लिम या छळाला अत्यंत कंटाळून गेले आणि तो चुकविण्यासाठी अनेक युक्त्या योजूं लागले. अनेकांनी खोट्या वंशावळी तयार करून आपले पूर्वज अरब होते असा पुरावा तयार केला. अनेकांनी धर्मग्रंथांत भर घालून पैगबरांच्या मुखीं नवीं वचने घालून, अरबेतर हे अरबांइतकेच श्रेष्ठ आहेत, असा आधार निर्माण केला. नवव्या शतकांत याकुबी याने पैगंबरांचें चरित्र लिहिलें, त्यांत त्यांच्या तोंडीं जीं वचनें घातली आहेत, तीं त्याच्या आधी इब्न हिशम व वाकुदी यांनी लिहिलेल्या चरित्रांत सापडत नाहीत, हें ध्यानांत घेण्याजोगें आहे. पण या युक्त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. विषमता वाढतच गेली. महंमद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हा त्यांच्या सोबत जे लोक गेले त्यांचे वंशज स्वतःला श्रेष्ठ समजूं लागले. मदिनेला ते गेल्यावर त्यांना तेथले जे लोक मिळाले त्यांच्या वंशजांनी असाच दावा मांडला. इराणमधील राजकन्येशीं पैंगंबरांचा नातू हुसेन याने लग्न केलें होतें, म्हणून तेथील लोक उच्चपदीं गेले हुसेनचा पिता अली याच्याशीं कांही लोकांनी नाते जोडलें व ते आपणांस सय्यद म्हणवू लागले.

विषमतेला मान्यता

 अशा रीतीने पैगंबरांच्या आज्ञा निःसंदेहपणें विरुद्ध असतांना मुस्लिम समाजांत अतिशय कड़वी विषमता प्रारंभापासूनच रूढ झाली. कांही खलिफा क्वचित् केव्हा समतेचा पक्ष घेत. पण तें अपवादात्मक. खलिफा उमर याने प्रारंभीचे मुस्लिम व नंतरचे मुस्लिम असा भेद करून युद्धांतल्या लुटीचा वांटा नंतरच्या मुस्लिमांना कमी प्रमाणांत देण्याचा शिरस्ता पाडला. कांही मुस्लिम अधिकाऱ्यांनी मुस्लिमेतर लोकांवर लादावयाचा जो जिझिया कर, तो धर्माज्ञा उल्लंघून, अरबेतर मुस्लिमांवरहि लादला. ही जी प्रारंभींच विषमता निर्माण झाली तिला कुराणावर भाष्य लिहिणारा पहिला धर्मपंडित जो अबू हानिफ त्याने आपल्या भाष्यांत स्वच्छ मान्यता दिली. पहिली श्रेष्ठ जात म्हणजे कुरेशी. दुसरी राहिलेल्या अरबांची. (म्हणजे अरबांतहि विषमता). त्यानंतर अरबेतर मुस्लिम. त्यांतहि ज्यांच्या दोन पिढ्या मुस्लिम असतील तो श्रेष्ठ, इतर कनिष्ठ असे तपशीलवार जातिभेद त्याने करून ठेवले. आणि ते कांही अंशी आजतागायत चालू आहेत. (सोशल स्ट्रक्चर ऑफ् इस्लाम– प्रा. लेव्ही, केंब्रिज विद्यापीठ, प्रकरण पहिलें).
 मुस्लिम पंडित विश्व- मुस्लिम- वादाचा पुरस्कार करतात. पण तो प्रत्यक्षांत कधीहि आलेला नाही. इतकेंच नव्हे, तर गेली चाळीस-पन्नास वर्षे सिरिया, इराक, जॉर्डन, येमेन इत्यादि अरबस्थानांतील सर्व देश एकत्र करण्याचे प्रयत्न चालू आहेत, त्यांनाहि यश येत नाही. इराकचें राजघराणें हाशमाईट आहे व सौदी अरेबियाचें सौदी आहे. त्यांच्यांत हेवेदावे- मत्सर हे सर्व असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे सर्व मुस्लिम एक ही भावना अगदी दुबळी असल्यामुळे अखिल अरेबिया सुद्धा एक होऊं शकत नाही. मुस्लिम समाजांत जन्मजात उच्चनीचतेचा प्रभाव हा असा आहे.
 जन्मनिष्ठ उच्चनीचतेबरोबर आर्थिक विषमता ही अपरिहार्यपणे येतेच. जमिनी, व्यापार हीं सर्व धनसाधनें उच्च जातींचे लोक ताब्यांत घेतात आणि हीन जातीय शतकानुशतकें नागविले जातात. सुदैवाने आता अरब देशांत व इराण- मध्ये तेलाचीं कुंडें सापडली आहेत आणि त्यांतून अमाप धन त्या देशांना मिळत आहे. दुसरें सुदैव हें की, बहुतेक सर्व देशांत नवी इहवादी, उदारमतवादी दृष्टि असलेले लोक सत्तारूढ झालेले आहेत. त्यामुळे या नव्या धनाचें वांटप ते जनतेच्या सुखसोयींच्या, शिक्षणाच्या उन्नतीच्या दृष्टीने करीत आहेत. इराणच्या शहाने जमीनदारांचे हक्क रद्द करून कोटि-सव्वा कोटि शेतकऱ्यांना जमिनी वांटून दिल्या आणि शेतकऱ्यांना शास्त्रीय शेतीसाठी अवश्य तें कर्जहि दिलें. इराकमध्ये वर्षभर जमीन कसल्यानंतर शेतकऱ्याला उत्पन्नाचा आठवा हिस्साच मिळत असे. आता तेलामुळे तेथे समृद्धि आली आहे आणि धरणे बांधून झाल्यावर राजाने पाण्याखालची जमीन अनेक शेतकऱ्यांना, प्रत्येकीं चाळीस एकर, या प्रमाणांत वांटून दिली आहे.
 या शेतकऱ्यांपैकी एक अलवी अबूद हा जमिनीचें मालकीपत्र हाती येतांच म्हणाला, "माझे आजोबा, बाप आणि मी आजपर्यंत दुसऱ्याची जमीन कशीत आलों. आम्ही पिढ्यान् पिढ्या कर्जबाजारी व भुकेलेच राहिलों. आता मी, माझा मुलगा स्वतःची जमीन कसूं व पिकवू." सौदी अरेबियाचा सध्याचा राजा फैजल हा १९६४ सालीं गादीवर आला. मुलींची शाळा काढण्यासाठी त्याने लष्कर पाठविलें हा उल्लेख वर आलाच आहे. त्याच्या आधी त्याचा भाऊ राजा सौद हा जुन्या परंपरेंतला सुलतान होता. तेलापासून सहज दरसाल पांच-सहाशे कोटि रुपये मिळत असूनहि तो सदा कर्जबाजारीच असे. गरीब शेतकरी, कामगार इतके त्रासून गेले की, देशांत बंड होण्याची वेळ आली. तेव्हा त्याला पदच्युत करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फैजलला गादीवर आणले. त्याने शिक्षण, धरणें, कारखाने यांवर लक्ष केंद्रित करून सर्व भांडवल त्यांत ओतण्यास सुरुवात केली. आणि इतकें करूनहि दरसाल दीडशे कोटि रुपये शिल्लक राहतात.
 राष्ट्रनिष्ठा, जनताभिमुखता, समता, लोकशाही, सामाजिक न्याय, धनाचें न्याय्य वाटप, बुद्धिप्रामाण्य, मानवता या तत्त्वांचे कांही संस्कार झालेले लोकच सध्या मुस्लिम देशांत सत्तारूढ आहेत. धर्म हा परिवर्तनीय आहे, देशकालानुरूप धर्मवचनांचा नवा अर्थ लावण्यास इस्लामचा विरोध नाही, राजशासन सर्वंकष धर्मसत्तेपासून मुक्त असलें पाहिजे, ही नवी पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य असल्यामुळे ते स्वदेशाची प्रगति करूं शकले व करूं शकतील. ही विचारसरणी म्हणजेच इहवाद. त्याचा अवलंब करणें सध्याच्या काळीं तरी कसें अपरिहार्य आहे याचीं या मुस्लिम देशांच्या इतिहासावरून कल्पना येईल.


 मानवी कर्तृत्वाचा उगम बुद्धिस्वातंत्र्य, वुद्धिप्रामाण्य, स्वतंत्र चिंतन, अवलोकन, अनुभव, कार्यकारणभावावरील विश्वास आणि या सर्वांवरून निष्कर्ष काढण्याची, सिद्धान्त स्थापण्याची शक्ति यांतून होत असतो. आणि बहुधा मानवाच्या या सर्व शक्ति धर्मवर्चस्वामुळे विकल होतात, मारल्या जातात. कारण धर्माचे सिद्धान्त हे अंतर्ज्ञान, दिव्य दृष्टि, ग्रंथवचनें, देववाणी, साधुसंतांचीं, चरित्रे- त्यांचें आचरण, उद्गार- यांवर आधारलेले असतात. धर्माचें उद्दिष्ट आत्मा, परमात्मा, मोक्ष, अध्यात्म, परलोक या विषयीचें ज्ञान प्राप्त करून घेऊन लोकांना त्याच्या आधारें मुक्तिमार्ग दाखवून देणें हें असतें, आणि अंतर्दृष्टीने समाधिअवस्थेत प्राप्त झालेलें ज्ञान जोंपर्यंत तेवढ्याच विषयांत आपला अधिकार सांगते तोंपर्यंत धर्मवर्चस्वाचा फारसा घातक परिणाम होत नाही. पण असें सहसा घडत नाही. अध्यात्मज्ञानी धर्मवेत्ते पुरुष आपल्याला इहलोकच्या व्यवहाराचेंहि संपूर्ण ज्ञान आहे, असा दावा सांगतात व तेथेहि सत्ता चालवू पाहतात. इस्लाममध्ये कित्येक शतकें खलिफा व सुलतान हे एकच होते याचा अर्थ हाच होता. ख्रिश्चन धर्मांत पोप हा प्रत्यक्ष राजा नव्हता. पण सर्व राजे, महाराजे, सम्राट् यांवर त्याची अधिसत्ता होती. धर्मपीठाला परलोकाप्रमाणेच इहलोकीच्या व्यवहारावर सत्ता चालविण्याचा अधिकार आहे, हीच या मागली भूमिका आहे. लोकांच्या अंधधर्मश्रद्धेमुळे ही धर्मपीठाची भूमिका जेव्हा मान्य केली जाते तेव्हा मानवी कर्तृत्वाचा नाश होऊन समाज रसातळाला जातो. कारण अतींद्रिय धर्मवर्चस्वामुळे (आंतल्या आवाजाला प्रामाण्य दिल्यामुळे) बुद्धि, प्रज्ञा, निष्कर्ष-शक्ति अवलोकन-दृष्टि या मनुष्याच्या शक्ति मारल्या जातात.
 'एंडलेस-क्वेस्ट' (थ्री थाउजंड इयर्स ऑफ सायन्स) या आपल्या ग्रंथांत श्री. वेस्टवे या इतिहासकाराने युरोपच्या कर्तृत्वाचा इतिहास दिला आहे. पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या प्रथमार्धापर्यंत गणित, पदार्थविज्ञान, रसायन, जीवशास्त्र, स्थापत्य, समुद्रपर्यटन, भूसंशोधन, वैद्यकविद्या इत्यादि मानवी कर्तृत्वाच्या सर्व शाखांतील कर्त्या पुरुषांचीं नांवें व त्यांचें कार्य यांचा त्याने परिचय करून दिला आहे. तीं नांवें पाहिलीं म्हणजे इहवाद व कर्तृत्व यांमध्ये किती निश्चित कार्यकारणभाव आहे हें दिसून येतें. पश्चिम युरोपांतील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, स्वीडन, हॉलंड, डेन्मार्क या देशांत पोपच्या धार्मिक सत्तेविरुद्ध तेराव्या-चौदाव्या शतकांतच शास्त्रवेत्त्यांनी संग्राम सुरू केला होता आणि त्यामुळे धर्माचें अंधवर्चस्व हळूहळू ऱ्हास पावूं लागलें होतें. त्यामुळे या देशांत मानवी कर्तृत्वाला पुढील चार शतकांत अगदी बहर येऊन बेकन, शेक्सपिअर, पास्कल, डेकार्टस्, लूथर, कोपरनिकस, केप्लर, मायकेल एंजलो, गॅलिलिओ, राफेल, कोलंबस, इरॅसमस्, वास्को द गामा, पॅरासेलस, न्यूटन, लिबनिट्झ, लिओनार्डो द व्हिन्सी, पाश्चर, मेरी क्युरी, डार्विन, लाप्लास इत्यादि थोर पुरुष निर्माण झाले. पण त्याच काळांत युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, रुमानिया, पोलंड, रशिया, ग्रीस, अल्बानिया या पूर्व युरोपांतील देशांत याच्या एकशतांशहि कर्ते पुरुष उदयास आले नाहीत. कारण या काळांत या देशांवर ऑर्थोडॉक्स चर्चचें अंध वर्चस्व होतें, अधिसत्ता होती आणि त्या सत्तेविरुद्ध संग्राम करण्यास तेथे कोणीच उभा ठाकला नाही. या देशांतील नावें या कर्तृत्वाच्या इतिहासांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत दिसूं लागतात. त्या वेळीं तेथे बुद्धिस्वातंत्र्याचा संग्राम सुरू झाला होता. यावरून 'भावे भाव: अभावे अभावः।' इतक्या निश्चितपणें हा कार्यकारणभाव सिद्ध होतो, असें दिसेल.
 यासंबंधी प्रारंभी विवेचन करतांना वेस्टवे याने हाच सिद्धान्त मांडला आहे. इ. पू. ७०० ते इ. स. ३०० या काळांत ग्रीस व रोम येथे धर्मसत्ता गौण असून, राजसत्तेला प्रधान स्थान होते. त्यामुळे तेथे बुद्धिप्रामाण्य होतें, अवलोकन होतें, प्रयोग होते, संशोधन होते, आणि म्हणूनच कर्तृत्वाचा उत्कर्ष झाला होता. वेस्टवे म्हणतो, "ग्रीक संस्कृतीचा हाच फलितार्थ आहे."

अरबांचें कर्तृत्व

 या दृष्टीने मुस्लिम देशांतील कर्तृत्वाचा विचार आपण केला पाहिजे. अरब देशांचा इतिहास पाहतां असें दिसतें की, इसवी सनाच्या नवव्या-दहाव्या शतकांत अरबांचें कर्तृत्व चांगलेच फुलून आले होते. महंमद जवीर, अरकाझेल, अलहाजेन, अबदुल लतीफ इत्यादि शास्त्रज्ञांनी गणित, ज्योतिष व वैद्यक या शास्त्रांत खूप संशोधन करून मोलाची भर घातली होती. अरबांनी अनेक ग्रीक व संस्कृत ग्रंथांचीं भाषांतरें केलीं होतीं व त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला होता. त्यांना शास्त्रसंशोधनाची प्रेरणा त्यामुळे मिळाली होती. पण यामुळे अरबांच्या संशोधनाला विज्ञानेतिहासांत फारसे महत्त्व नाही, असें म्हणणें योग्य नाही. अंकगणित व त्रिकोणमिति यांतील अरबांचें संशोधन अत्यंत मौलिक आहे. प्रा. जॉर्ज सार्टन् (हॉवर्ड विद्यापीठ) यांनी या विषयीचें संपूर्ण विवेचन करून हा निर्णय दिला आहे आणि ग्रीक व संस्कृत ग्रंथांची व पुढे चिनी ग्रंथांची भाषांतरें अरबांनी केली, यांत कमीपणाचें कांही नसून, ज्ञानाच्या हव्यासाने अरब लोक किती प्रेरित झाले होते तेंच त्यावरून दिसतें आणि म्हणून ते भूषणावहच आहे, असें म्हटलें आहे. (मिड् ईस्ट, वर्ल्ड सेंटर, पृष्ठ २७५). पहिला नामांकित अरब वैद्य हारेट्स बिन कलदाह हा पैंगंबरांचा समकालीन असून, धर्माने ख्रिस्ती होता. तरी पण, पैगंबरांनी त्याला स्वतःचा खासगी वैद्य नेमले व खलिफा अबुबकर याजजवळ त्याची शिफारसहि केली. अशा रीतीने अगदी आरंभापासून वैद्यकशास्त्राला सांप्रदायिक बंधनांपासून अलिप्त ठेवण्यांत आलें होतें.
 आपल्या दृष्टीने महत्त्वाची म्हणजे शेवटची गोष्ट होय. पैगंबरांच्या ठायीं पिसाट धर्मांधता नव्हती. शास्त्राच्या बाबतींत ते धर्मभेद मानीत नसत, असे यावरून स्पष्ट दिसतें. प्रारंभीच्या खलिफांचीहि अशीच दृष्टि होती. त्यामुळेच ग्रीक व संस्कृत ग्रंथांची भाषांतरें अरब पंडित करूं शकले. आणखी एक गोष्ट लक्षणीय आहे. युरोपांत विज्ञान- संशोधकांना धर्मसत्तेशी सतत संग्राम करावा लागला. तसा अरब पंडितांना करावा लागला नाही. यावरून त्या काळचे मुस्लिम सत्ताधारी व मौलवी यांना विद्येच्या क्षेत्रांत धर्म-वर्चस्व स्थापित करावें, धर्माच्या नांवाखाली अंध बंधनें शास्त्रज्ञांवर घालावी अशी बुद्धि नव्हती, हेंच दिसून येतें. असें वातावरण असल्यामुळेच गणित, वैद्यक व ज्योतिष या शास्त्रांत अरब संशोधक मौलिक संशोधन करूं शकले. पुढे ही निर्लेप उदारबुद्धि नष्ट झाली व जॉर्ज सार्टन् यांनी म्हटल्याप्रमाणे, धर्मसत्तेच्या अंध आग्रहामुळे अरब-विद्या ऱ्हास पावली. तेव्हा इहवादी बुद्धिप्रामाण्याच्या वातावरणांतच मानवी कर्तृत्वाचा, विकास होतो हें निर्विवाद होय.
 'दि सोशल स्ट्रक्चर ऑफ इस्लाम' या आपल्या ग्रंथांत स्वेन लेव्ही याने हेंच मत मांडलें आहे (पृ. ४५९), तो म्हणतो की, "कुराणांत जगांतलें सर्व ज्ञान आहे व कुराणांतील ज्ञानाने पूर्वीच्या सर्व ज्ञानाचा निरास होतो, हें मत उत्तरकालीन आहे. कोणी म्हणतात की, खलिफा उमर याने अलेक्झांड्रिया शहर जिंकलें तेव्हा त्याने तेथील प्रचंड ग्रंथालय जाळून टाकलें आणि कारण असें दिलें की, "या ग्रंथांतील ज्ञान कुराणांतलेंच असेल, तर त्यांचा कांही उपयोग नाही व कुराणाहून भिन्न असेल, तर तें त्याज्यच होय." लेव्हीच्या मतें ही केवळ दंतकथा होय. कारण असें असतें तर अरबांनी ॲरिस्टॉटल, प्लेटो, युक्लिड, हिपॉक्रीटस्, हिरोडोटस् या ग्रीक ग्रंथकारांच्या ग्रंथांचीं भाषांतरें केलींच नसती. कारण तें सर्व कुराणबाह्य ज्ञान होतें. असा हा साधारण पांचशे वर्षांचा कर्तृत्वाचा काळ गेल्यानंतर पुढे अंधारयुग सुरू झालें. चौदाव्या शतकांत अरब इराणी यांच्या हातांतील सत्ता तुर्क लोकांच्या हातीं गेली. त्यांनी मोरोक्कोपासून इराकपर्यंत फार प्रचंड साम्राज्य स्थापन केलें. त्यांत पहिली दोन शतकें महंमद, मुराद, सेलीम, सुलेमान यांसारखे अत्यंत कर्तबगार असे पादशहा होऊन गेले. पण गणित, रसायन आदि भौतिक विद्या, इतिहास- भुगोल इत्यादि सामाजिक शास्त्रे व साहित्य आणि कला यांच्या दृष्टीने त्यांच्या काळीं कांहीच निष्पत्ति झाली नाही. एच्. ए. एल. फिशर हा विख्यात इतिहासकार म्हणतो, "तुर्क साम्राज्यांत प्रजेला स्वतंत्र विचार वर्ज्य होते. या साम्राज्यांत बगदाद समाविष्ट झाल्यानंतर त्या नगरीच्या वैभवाचा लोप झाला. कारण त्या वैभवापर्यंत जाऊन पोचण्यास तुर्की प्रज्ञा असमर्थ होती." (ए हिस्टरी ऑफ युरोप, पृष्ठ ४९३).
 तुर्की साम्राज्य व त्यांतील मुस्लिम देश हे जवळ जवळ सहा-सातशे वर्षे अंधार- युगांत होते. त्या अंधारांत प्रथम नेपोलियनच्या वेळी व पुढे मग गेल्या शतकाच्या अखेरीस इंग्रज, फ्रेंच या आक्रमकांच्या बरोबर, पाश्चात्त्य विद्या आली त्या वेळीं थोडीं प्रकाशकिरणें दिसूं लागलीं. इजिप्त, सिरिया, तुर्कस्थान या देशांत तीं लवकर पोचलीं आणि राहिलेल्या देशांत ती पोचल्याला अजून पावशतकहि झालेलें नाही. पण आज शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचें करून ती विद्या समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोचवावयाची, असा सर्व मुस्लिम देशांतील शास्त्यांचा व नेत्यांचा कृतनिश्चिय झाला आहे. तेथील शाळा- महाशाळांतून भौतिक विद्यांचें शिक्षण दिलें जातें. आणि त्यांतूनच सध्याचा बुद्धिवादी, विद्यासंपन्न असा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. मागे एके ठिकाणीं सांगितल्याप्रमाणे मुस्लिम देशांचे आजचे सर्व नेते या मध्यमवर्गातूनच आलेले आहेत. अरबीपाशा, (इजिप्तचा) केमाल अथवा कामीलपाशा, सौदी अरेबियाचा फैजल, इराणचा झगलूलपाशा, तुर्कस्थानचा केमालपाशा, इजिप्तचा अब्दुल नासर हे सर्व या नव्या इहवादी विद्येचे व शिक्षणाचे भोक्ते व पुरस्कर्ते आहेत. त्यांनी सर्व शिक्षण उलेमांच्या हातून काढून घेऊन शासनाच्या नियंत्रणाखाली आणले आहे. उलेमांनी स्वतंत्रपणे धर्मशिक्षण देण्यास त्यांची हरकत नाही, पण त्या- वरहि यांचे कडक नियंत्रण असावें, नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रशक्तीला पोषक असेंच धर्मशिक्षण उलेमांनी दिले पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष आहे.
 भारतांत १८७१ सालीं नेमलेल्या हंटर कमिशनचे अध्यक्ष सर विल्यम् हंटर यांनी इहवादी शिक्षण व कर्तृत्व यांचा संबंध स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, हिंदुस्थानांत उच्च सरकारी अधिकारपदें व उच्च व्यवसाय यांत मुस्लिम अभावाने दिसतात याचें कारण असें की, सरकार जें शिक्षण देतें तें मुस्लिम परंपरेच्या, धर्माच्या विरुद्ध आहे, त्यांना घातक आहे, असें मुस्लिमांना वाटतें. हिंदूंनी तें शिक्षण घेतल्यामुळे त्यांचीं अनेक शतकांची झोप जाऊन त्यांच्यांत राष्ट्रनिष्ठेच्या उदात्त प्रेरणा निर्माण झाल्या आहेत. पण मुस्लिमांनी तें शिक्षण इहवादी असल्यामुळे निषिद्ध ठरविले आहे. (मुस्लिमांच्या मागासलेपणाचें हें कारण आहे.– रोझेंथॉल, पृष्ठ १९०). त्यानंतर सर सय्यद अहंमद यांनी जुनी शिक्षणपद्धति त्याज्य ठरवून पाश्चात्त्य विद्येचा जोराने पुरस्कार केला. जुन्या पद्धतींत बुद्धिस्वातंत्र्य नाही, हेंच कारण त्यांनी दिलें आहे. आज मुस्लिम देशांतील नेत्यांची हीच विचारसरणी आहे. म्हणून बुद्धीचा विकास घडवून आणणारी पाश्चात्त्य विद्याच ते स्वदेशांत प्रसृत करीत आहेत.

तुर्कस्थानची आघाडी

 आणि तिचीं फळेंहि त्यांना दिसूं लागलीं आहेत. आज त्या देशांत राष्ट्रीयत्वाचा पाया घातला गेला आहे. ते सर्व देश आज पारतंत्र्यांतून मुक्त झाले आहेत व आपले स्वातंत्र्य टिकविण्याइतकें कर्तृत्व त्यांच्या ठायीं निर्माण झाले आहे. लोकशाहीचे विचार त्या देशांत अगदी थोड्या प्रमाणांत का होईना, रुजत आहेत. तुर्कस्थानांत १९५० साली निवडणुका झाल्या. तेव्हा सत्तावीस वर्षे सत्तारूढ असलेला रिपब्लिकन पक्ष पदच्युत झाला व डेमोक्रॅट पक्ष अधिकारावर आला. त्याचें वर्णन करतांना कोलंबिया विद्यापीठाचे अर्नेस्ट जॅक म्हणतात, 'शांततेच्या मार्गाने विकास घडवून आणण्याचें हें तुर्कांचें सामर्थ्य जवळ जवळ अँग्लो-सॅक्सन लोकांसारखेंच आहे.' तुर्कस्थान आज औद्योगिक व शेतीविषयक क्रांतीच्या दृष्टीनेहि असाच आघाडीवर आहे. इतके दिवस धान्य आयात करणारा हा देश आता धान्य निर्यात करू लागला आहे. त्याने आपली एकंदर निर्यात १९५० ते १९५६ या सहा वर्षांत ९० टक्क्यांनी वाढविली आहे. आणि हें सर्व कर्जबाजारी न होतां किंवा चलनवाढ न करतां या तुलनेने पाहतां इतर मुस्लिम देश अजून मागासलेले आहेत. शेतीच्या उत्पादनांत तुर्कस्थान- ६, इजिप्त, इराक, सिरिया- ३.५ आणि इराण- १.७ असें प्रमाण आहे. मला वाटतें इहवादाच्या प्रगतीचा व तज्जन्य कर्तृत्वाचा हिशेबहि याच प्रमाणांत निघेल. सौदी अरेबिया, जॉर्डन, येमेन हे देश अजून इहवादांत व म्हणूनच कर्तृत्वांत खूपच मागे आहेत. तेथे पाश्चात्त्य विद्या बऱ्याच उशिरा पोचली, हें त्याचें कारण आहे.
 इहवादाचा व मानवी कर्तृत्वाचा विचार करतांना आपण एक ध्रुवतारा अविचल दृष्टीने समोर ठेवला पाहिजे. पाश्चात्त्य देशांत गेल्या शंभर वर्षांत आइन्स्टाइन, ऑलिव्हर लॉज, एडिंग्टन, पाश्चर, मेरी क्युरी, सिग्मंड फ्रॉइड, विल्यम् जेम्स, जॉन स्टुअर्ट मिल, बर्ट्रांड रसेल, शॉ, गाल्सवर्दी, अप्टन सिंक्लेअर, झोला, ह्यूगो, रूझवेल्ट, चर्चिल, लेनिन, स्टॅलिन, वर्गसन्, सांतायन, टॉलस्टॉय, गॉर्गी, हेन्री फोर्ड, रॉकफेलर, क्रप, पॉल म्युनी, साहरा बर्नहार्ट असे थोर स्त्री-पुरुष निर्माण झाले. कोणत्याहि देशाच्या कर्तृत्वाचे मापन करतांना हा मानदंड नेहमी पुढे ठेवला पाहिजे. त्याने मोजून पाहतां या मुस्लिम देशांत त्या तोडीचा, केमालपाशा हा अपवाद वगळतां एकहि पुरुष झालेला नाही. दर पिढीला असा एखादा तरी पुरुष निर्माण होत राहिला तरच राष्ट्र प्रगतिपथावर आहे, असें म्हणतां येईल. तें फळ मिळावयाचें तर बुद्धिस्वातंत्र्य, व्यक्तिवाद, राष्ट्रनिष्ठा, स्वतंत्र अवलोकन, चिंतन, समता, मानवत्वाची प्रतिष्ठा या तत्त्वांचा म्हणजेच इहवादाचा अवलंब करणें हाच उपाय आहे. मुस्लिम देशांत आज त्या दिशेने मार्गदर्शक्रमण चालू आहे. पण वरील मानदंडाने मोजतां अजून ध्येयबिंदु फार दूर आहे, असें दिसून येईल.

चिकित्सक दृष्टीची गरज

 त्या बिंदूच्या जवळ जाण्याची आकांक्षा असेल, तर वरील देशांतील जनतेने आपले पूर्वग्रह, अंधश्रद्धा, रूढिनिष्ठा यांचा त्याग करून, ऐतिहासिक चिकित्सक दृष्टीने इस्लामकडे पाहावयास शिकलें पाहिजे आणि त्यांतील शुद्ध सुवर्ण तेवढे ठेवून बाकीचें हीण काढून टाकण्याचे मनःसामर्थ्यं प्राप्त करून घेतलें पाहिजे. तें प्राप्त झालें तरच श्रद्धा कशावर ठेवावी व कशावर ठेवू नये हें त्यांना सहज उमगेल. परमेश्वराने, अल्लाने महंमदाच्या तोंडून कुराण वदविलें आणि पुढे इस्लामचें धर्मशास्त्र तें कुराण, महंमदाचें चरित्र व त्याची स्वतःचीं वचनें म्हणजेच सुन्ना या आधारें रचलें आहे, अशी सर्व मुस्लिमांची श्रद्धा आहे. ही श्रद्धाच माणसाला बळ देते, त्याच्या उत्कर्षाला कारण होते, हें खरें पण तिला विवेकाची, ऐतिहासिक चिकित्सेची जोड दिली नाही, तर त्या मूळ तत्त्वावर साचलेले थरहि, इतरांनी त्याचे केलेले विपर्यस्त अर्थहि माणूस त्याच श्रद्धेने सुवर्ण म्हणून स्वीकारूं लागतो व मग त्याची प्रज्ञा झाकाळून जाते. कुराणात कांही विसंगती आहेत. मग कोणतें वचन खरें मानावें, असा प्रश्न येतो. त्याला उत्तरोत्तर प्रामाण्य असें मौलवींचें उत्तर आहे, पण तें जमत नाही. कारण कुराणांतले सर्व सुरे (अध्याय) व आयते (श्लोक) हे कालक्रमाने रचलेले नाहीत. पैगंबर प्रथम मक्केला होते. नंतर मदिनेला गेले. पण पवित्र कुराणांत मदिनेच्या सुऱ्यानंतर पुष्कळ मक्केचे सुरे सापडतात ! वर एके ठिकाणीं सांगितलेच आहे की, आपण मूळ अरबी आहों, असे दाखविण्यासाठी अनेक घराण्यांनी पैगंबरांच्या तोंडीं नवीन वचनें घातलीं आहेत, असें आज इतिहाससंशोधक सांगतात. पैगंबरांच्या चरित्रकारांनी जीं वचनें त्यांची म्हणून दिली आहेत, तीं सर्वत्र सारखी नाहीत. कुराण व सुन्ना यांच्या आधारें शरीयत हा कायदा झाला. पण त्यावर चार पंडितांनी वेगळी चार भाष्यें केलीं आहेत. शिवाय पुढे अनेक सुलतानांनी जे फतवे काढले तेहि त्यांत समाविष्ट केलेले आहेत. तेव्हा शरीयत हा कायदा सर्वस्वी पैगंबरांच्या आधारेंच उभा आहे असें नाही. शिवाय वेळोवेळी असे प्रसंग निर्माण होतात की, त्या वेळी शरीयतप्रमाणे वागणें अशक्य होऊन बसतें. व्याज, समता, चोरीची शिक्षा यांसंबंधीची उदाहरणें वर दिलीच आहेत. स्वेन लेव्ही याने 'सोशल स्ट्रक्चर ऑफ् इस्लाम' या आपल्या ग्रंथांत 'यूसेज्, कस्टम अँड सेक्युलर लॉ अंडर इस्लाम' या प्रकरणांत याची विपुल उदाहरणें दिली आहेत. राज्यकारभार, व्यापार, समाजनियंत्रण या क्षेत्रांत पावलोपावली शरीयत हा कायदा बाजूला ठेवावा लागलेला आहे. 'इव्हेजन्स ऑफ् लॉ' असें एक कलमच त्याने या प्रकरणांत घातलेले आहे. हें सर्व पाहतां इजिप्तचा मुस्ताफा कामील (अथवा केमाल) व अली अब्दुल रझेक यांनी सांगितल्याप्रमाणे इस्लामची मूलतत्त्वें फक्त स्वीकारून त्यांच्या आधारे प्रत्येक काळच्या समाजाने आपली प्रज्ञा, बुद्धि, चिंतन, अवलोकन, अनुभव, इतिहास, तर्क, यांच्या साह्याने आपापल्या जीवनाचें नियंत्रण करावे हाच उत्कर्षाचा खरा मार्ग होय. मुस्लिम देशांतील बहुतेक सर्व शासनांनी हा इहवादाचा मार्गच अनुसरण्याचें ठरविलें आहे, हें स्पष्ट आहे.
 आता तेथील मध्यमवर्गीय पंडितांनी वरील ऐतिहासिक चिकित्सेच्या आधारें इहवादाचीं हीं तत्त्वें समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोचविली व तेथे रुजविलीं तर मुस्लिम विश्वाच्या प्रगतीला फार विलंब लागणार नाही. कोणत्या देशांतील बुद्धिवादी नेते किती निकडीने हें कार्य करतात त्यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. आज त्या देशांत पुन्हा प्रतिगामी विचारांची लाट आली आहे, असे दिसतें. इस्रायलने त्यांचा पराभव केला. त्यामुळे आपण इहवादी झालों म्हणून हे अपयश आलें असें तेथील मुल्ला-मौलवी सांगू लागले आहेत. तेथील तरुण नेते व जनता यांच्यावर या विचरांचा पगडा बसला, तर त्या देशांची प्रगति खुंटण्याचा संभव आहे. पण बहुधा तसे होणार नाही अशी आशा करूं या.