इहवादी शासन/पृथ्वीप्रदक्षिणा (समारोप)
इहवाद म्हणजे काय, इहवादी शासन म्हणजे काय, याचा विचार करून भारतीय जनता इहवादी कशी होईल आणि भारतीय शासनाला विशुद्ध इहवादी रूप कसें प्राप्त होईल याचें चितन आपल्याला करावयाचें होतें. त्यासाठी जगांतील सर्व देशांत इहवादाचें स्वरुप पूर्वी कसें होतें, आज कसें आहे, त्याचा उदय, विकास, लोप, पुनरुज्जीवन कसें घडत आलें, इहवादी तत्त्वांचा समाजाच्या उत्कर्षापकर्षाशी दृढ संबंध कितपत असतो हें पाहणें अवश्य होतें. त्यासाठीच आपण पृथ्वीप्रदक्षिणेस निघालों. प्रथम आपण सोव्हिएट रशियाला भेट देऊन जडवाद आणि इहवाद यांची प्रतिज्ञा घेतलेल्या कम्युनिस्ट शासनाच्या इहवादाचें रूप न्याहाळलें. इहवादाचा नित्य घोष करणाऱ्या तेथल्या शासनाचा इहवाद तकलुपी असून, खऱ्या इहवादी तत्त्वांसाठी तेथल्या शास्त्रज्ञांना त्या शासनाशी प्राणपणाने झुंज घ्यावी लागत आहे, हें पाहून आपल्याला नवल वाटलें. तेथून आपण तुर्कस्थान, अरबस्थान, इजिप्त, इराण या मुस्लिम देशांत गेलो. भारतांत कोट्यवधि मुस्लिम आहेत त्यांना भारतापेक्षा हे देश जवळचे वाटतात. तेव्हा तेथे इहवाद कितपत अवतरला आहे, मान्य झाला आहे, हें पाहणें अवश्य होतें. पाश्चात्त्य विद्येच्या प्रभावाने यांतील बहुतेक राष्ट्रं इहवादाच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करीत आहेत हें पाहून आपल्या मनाला बराच दिलासा वाटला.
इटली, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड हीं पाश्चात्य राष्ट्र म्हणजे इहवादाची जन्मभूमि. इहवादाचीं तत्त्वें तेथेच प्रथम निश्चित झाली. तेव्हा त्या देशांत फेरफटका करणें क्रमप्राप्तच होतें आणि त्यांच्या संस्कृतीचें मूलगृह म्हणजे जी ग्रीक भूमि तिलाही धांवती भेट देणें अपरिहार्य होते. हा सर्व प्रवास जरा दगदगीचा झाला. पण त्या वेळी केलेल्या अवलोकनाने इहवादाचें सर्व तत्त्वज्ञान प्रत्यक्षांत आणतांना कोणती किंमत द्यावी लागते हें आपल्याला जवळून पाहतां आलें. आणि तो लाभ झाल्यामुळे आपल्या श्रमांचा परिहार झाला.
अशी प्रदक्षिणा करून आपण भारतांत परत आल्यावर नव्या प्रशिक्षित दृष्टीने आपण आपल्या इतिहासाकडे पाहूं शकलो. त्यामुळे या देशाच्या दीर्घकालीन इतिहासांत इहवादाचा उदय, विकास, लोप व पुनरुज्जीवन कसें घडत गेलें तें आपल्याला जाणतां आलें. वेदकालपासून भारताच्या आजच्या इतिहासांत असें अवगाहन आपण केलें तेव्हा आपली पृथ्वीप्रदक्षिणा पुरी झाली. ही प्रदक्षिणा करीत असतांना आपण बुद्धिवादाचें, विज्ञाननिष्ठेचें, सत्यशोधनाचें, विवेकप्रामाण्याचें व्रत घेतलें होतें. आता त्या व्रताचे उद्यापन करून पृथ्वीप्रदक्षिणेची सांगता करावयाची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या इहवादाच्या थोर आचार्यांना या सुप्रसंगी सांगतेच्या संकल्पाचे मंत्र सांगण्याची मीं विनंती केली आहे. त्यांनी सांगितलेल्या मंत्रांच्या श्रवणाने आपल्या पृथ्वीप्रदक्षिणेचें पुण्य आपल्याला निश्चित लाभेल, याविषयी आपल्यापैकी कोणालाहि शंका येणार नाही असें वाटतें.
इहवाद म्हणजे समाजाची, राष्ट्राची उन्नति, इहवाद म्हणजे मानवी कर्तृत्वाचा विकास, इहवाद म्हणजे संस्कृतीचा उत्कर्ष आणि अंध धर्मवाद, धर्मसत्तावाद म्हणजे अवनति, अपकर्ष, मानवी कतृत्वाचा ऱ्हास, लोप हा सिद्धान्त वादातीत आहे असें अनेक राष्ट्रांच्या इतिहासावरून दिसून येतें.
ग्रीस, रोम यांमध्ये बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, प्रवृत्तिपरता, विज्ञानोपासना हीं चालू होतीं तोंपर्यंत त्यांचा सतत उत्कर्ष होत गेला. पुढे ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. हा धर्म शब्दाप्रामाण्यवादी, परनिष्ठ, निवृत्तिपर व पराकाष्ठेचा असहिष्णु होता, ज्ञानविन्मुख होता, धर्मसत्तावादी होता. त्यामुळे सर्व युरोपवर पुढील सात-आठ शतकें तमोयुगाची घनदाट छाया पसरून राहिली होती. त्या खग्रास ग्रहणांतून पश्चिम युरोप मुक्त झाला तो त्या प्राचीन ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे म्हणजे इहवादाच्या आश्रयामुळेच होय.
उत्कर्षाचे साधन
रशिया, पोलंड, रुमानिया, बल्गेरिया इत्यादि पूर्व युरोपांतील राष्ट्रांनी ही संजीवनी अव्हेरली. त्यामुळे त्यांचें ग्रहण सुटले नाही. पश्चिम युरोपांतहि स्पेन- पोर्तुगाल हे देश याच करंटेपणामुळे अंधारांत राहिले. इस्लामी राष्ट्रांच्या इतिहासावरून हेंच दिसून आलें. प्रारंभीची तीन-चार शतकें अरब लोक सहिष्णु, उदारमतवादी, बुद्धिवादी, विज्ञानोपासक व परिवर्तनवादी असे होते; पण पुढे या इहवादी तत्त्वांचा लोप होतांच त्यांचा झपाट्याने ऱ्हास होऊन पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारापर्यंत तीं राष्ट्र नाममात्र जगत होतीं. त्या विद्येमुळे पुन्हा त्यांना जाग आली व थोड्याच अवधींत त्यांच्यांत नवचैतन्य दिसूं लागलें. भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहासावरून हाच सिद्धान्त दृढ होतो. इहवाद म्हणजे उत्कर्ष, परवाद म्हणजे ऱ्हास!
हा कार्यकारणभाव इतिहासानेच सिद्ध होतो असें नाही. तर्कानेहि त्याला तशीच पृष्टि मिळते. प्रज्ञा, बुद्धि हेंच मानवाचे एकमेव उत्कर्षाचें साधन. ती बुद्धीच शृंखलावद्ध करून टाकणारी अंध धर्मसत्ता, समाजाच्या ऱ्हासाला कारण होणार यांत शंका कसली ? ऐहिक उत्कर्षाची आकांक्षा म्हणजे प्रवृत्तिपरता हीच मानवाला सर्व उद्योगासाठी उद्युक्त करते. परवाद, निवृत्तिवाद यांमुळे ती प्रेरणाच नष्ट झाली आणि माणूस, "अपहाय निजं कर्म कृष्ण कृष्ण" करीत बसला, म्हणजे समाज दीनदरिद्री होणार, पराक्रमशून्य होणार हें सांगायला इतिहास कशाला हवां ? बुद्धि बद्ध झाली, शब्दप्रामाण्य आले की, धर्माची परिवर्तनशीलता नष्ट होते आणि मग कालबाह्य, जीर्ण स्मृतींचें अधिराज्य सुरू होतें.
देशकाल न पाहतां केलेले कायदे सर्व प्रगति खुंटवितील हें पांडित्याच्या आश्रया- वांचूनहि कळण्याजोगे आहे. या अंध ग्रंथप्रामाण्यांतूनच असहिष्णुता निर्माण होते. कारण आपल्या धर्मग्रंथावांचून अन्य धर्मग्रंथ सत्य आहेत, असूं शकतील, हे अंधश्रद्ध समाजाला पटणेंच शक्य नाही. धर्मग्रंथ, धर्माचार्य यांच्या शब्दाला प्रामाण्य आलें की ते धर्माचार्य, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांनी नियुक्त केलेले अधिकारी आणि तत्सम दैवी शक्तीने संपन्न असे पुरुष यांची निराळी जात होऊन, समाजांत विषमता निर्माण होते, समतेचा लोप होतो आणि ही अविवेकी विषमता समाजाच्या विनाशाला निश्चित कारण होते.
इहाकांक्षा संपल्या, निवृत्तिवाद प्रबळ झाला की, सर्वच उद्योग थंडावतात तशी ज्ञानोपासनाहि थंडावते आणि भौतिक सृष्टीचें ज्ञान म्हणजेच विज्ञान नाहीसें झालें की, मानवी मन भयग्रस्त होऊन धर्माचार्यांच्या जास्त जास्त आहारीं जातें आणि स्वतंत्र चिंतन, विवेकनिष्ठा यांमुळे अंध धर्मसत्तेला आव्हान देण्याचें जें मानसिक बळ, जें सामर्थ्य तें क्षीण होतें. त्याच्या अभावीं धर्मसुधारणा, समाजपरिवर्तन हें अशक्य होऊन बसतें आणि परिवर्तन नाही म्हणजे नाश हें ठरलेलेच आहे. तेव्हा बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्ति, विज्ञाननिष्ठा, परिवर्तनशीलता, स्वतंत्र चिंतन, विवेकसामर्थ्य, समता, सर्वधर्म समानत्व, सहिष्णुता हीं जीं इहवादाची तत्त्वें त्यांचा व समाज- उत्कर्षाचा कार्यकारणसंबंध आहे हें इतिहासाने जितकें, तितकेंच तर्कानेहि सिद्ध होतें.
प्राचीन काळी सर्वसाधारणपणें धर्म हेंच समाजसंघटनेचें तत्त्व होतें. त्या काळांतहि इहवादाच्या लोपामुळे समाजाचा ऱ्हास झाला. मग अर्वाचीन काळांत राष्ट्रनिष्ठा, लोकशाही व समाजवाद या तत्त्वांवर समाजाची घडण झालेली असतांना इहवादाच्या अभावी काय होईल हें सांगण्याची देखील आवश्यकता नाही. इहवादांतूनच तीं तत्त्वें जन्माला आली आहेत. तो त्यांचा पायाच आहे. त्यावांचून समाज जगणार कसा ?
राष्ट्ररचनेचा पाया
राष्ट्रनिष्ठा या पहिल्या तत्त्वाचाच विचार पाहा. राष्ट्र हें नागरिकांचें असतें. आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी आपल्या शिरीं आहे असें मानणारा मनुष्य म्हणजे नागरिक. ही जबाबदारीची जाणीव व ती पार पाडण्याची शक्ति या नागरिकाच्या ठायीं केव्हा येईल ? त्याच्या बुद्धीवर कसल्याह शृंखला नसल्या तर. विचार, उच्चार, आचार यांच्या बाबतींत तिला पूर्ण स्वातंत्र्य असेल तर. व्यक्तीला असें स्वातंत्र्य असले पाहिजे असे मत म्हणजेच व्यक्तिवाद. हा व्यक्तिवाद हा राष्ट्ररचनेचा पाया आहे आणि व्यक्तींवर अशी बंधनें असतां कामा नयेत, तिला पूर्ण स्वातंत्र्य असलें पाहिजे हे तर इहवादाचें पहिले तत्त्व होय.
या राष्ट्रवादांतूनच लोकशाही परिणत होत असते. व्यक्तिस्वातंत्र्य हें तत्त्व तर तिला पायाभूत आहेच. शिवाय सर्व राज्यकारभार, देशाचें सर्व शासन यावर नागरिकांची सार्वभौम सत्ता असली पाहिजे, हें लोकशाहीचें आद्य महातत्त्व आहे. राष्ट्रवादांत हे तत्त्व असतेंच असें नाही. तेराव्या शतकांत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आदि देशांत राष्ट्रवाद उदयाला आला, पण त्या वेळी तेथे जनसत्ता सार्वभौम झाली नाही. ती जसजशी होत गेली तसतशी लोकशाही त्या देशांत विकसित होत गेली.
जर्मनीत हिटलरच्या अंतापर्यंत तिचा पूर्ण विकास झालाच नव्हता. तेथे व्यक्तीला स्वातंत्र्य होतें, पण तें राजकीय क्षेत्रांत फार मर्यादित होते. जवळ जवळ नव्हतेंच. तेव्हा लोकशाहींत जनता हीच सार्वभौम सत्ता असते. पण कुराण किंवा बायबल यांच्या वचनान्वयेच कायदा झाला पाहिजे असा जेथे दंडक असतो किंवा "नाविष्णुः पृथ्वीपतिः।" अशी स्मृति असते तेथे जनता सार्वभौम असणें शक्य नाही. ते दंडक नाहीसे झाले तरच लोकशाही स्थापन होऊ शकते. पश्चिम युरोपांत प्रबोधन, धर्मक्रांति या युगांत प्रथम ते दंडक ढिले झाले व पुढे नाहीसे झाले तेव्हाच लोकशाहीच्या तत्त्वावर घडण झाली.
सर्वधर्मसमानत्व हें असेच लोकशाहीला अवश्य असें तत्त्व आहे. धर्मामुळे कांही व्यक्तींना नागरिकत्वाचे हक्क जर मिळणार नसतील तर लोकशाहींतील समता, स्वातंत्र्य, बंधुता या विचारांना कांही अर्थच राहणार नाही. इंग्लंडमध्ये दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत कॅथॉलिक पंथावर बंधने होती. तीं नष्ट झाली तेव्हाच तेथील लोकशाहीला अर्थ व जोम प्राप्त झाला. अनेक मुस्लिम देशांत अशी बंधनें अजून आहेत. आणि भारतांत कायद्यांनी तशी बंधने नसली, तरी मुस्लिम समाज धर्म- समानत्वाचें तत्त्व मान्य करीत नाही. हे होत नाही तोपर्यंत लोकशाहींचा विकास होणें शक्य नाही.
आर्थिक समता
समाजवादांत राष्ट्रवाद व लोकशाही या दोन्हींतील तत्त्वें तर समाविष्ट आहेतच. पण शिवाय आर्थिक समता आणि उत्पादन-साधनांवरची जनतेची सत्ता हीं आणखी दोन तत्त्वें समाजवादांत अभिप्रेत आहेत. प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, घर, शिक्षण व आरोग्य हें हक्काने मिळाले पाहिजे हें समाजवादाचें अंतिम उद्दिष्ट आहे. तें साध्य व्हावयाचें तर आजच्या सहस्र पटींनी, लक्ष पटींनी उत्पादन वाढलें पाहिजे. ही वाढ विज्ञानोपासनेवांचून अशक्य आहे. आणि विज्ञानोपासना ही बुद्धिप्रामाण्य, स्वतंत्र चिंतन, सत्याचें निर्भय प्रतिपादन यांच्या आश्रयावांचून शून्यवत् होते. तेव्हा इहवादावांचून समाजवादी समाजरचनेच्या दृष्टीने एक पाऊलहि टाकता येणार नाही, हे उघड आहे.
तेव्हा राष्ट्रनिष्ठा, लोकशाही व समाजवाद हीं जीं आजचीं युगतत्त्वें तीं इहवादाच्या अवलंबनांवाचून प्रत्यक्षांत येणें कदापि शक्य नाही.
ती प्रत्यक्षांत आणण्यासाठी इहवादी शासनाची आवश्यकता असते. अप्रगत देशांत तर अशा शासनावांचून कसलीच प्रगति होणार नाही. कारण विषमता, दारिद्र्य, अज्ञान, जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद, स्त्री-पुरुषविषमता, अंध धर्मसत्ता, कर्मकांड, शब्दप्रामाण्य, सुस्त, निरुद्योगी लोक, भयग्रस्त, प्रतिकारशून्य जनता हीच अप्रगत देशाचीं लक्षणें होत. यामुळेच समाज अप्रगत राहिलेला असतो, त्याची प्रगति खुंटलेली असते. तेव्हा या सर्व व्याधींपासून त्याला मुक्त करण्याची जबाबदारी शासनावरच प्राधान्याने येते.
भारतांत घटनेने शासन पूर्णपणे इहवादी करून टाकलें आहे, पण सत्तालोभ, स्वार्थ, ध्येयशून्यता यांमुळे काँग्रेसच्या शासनाने वर निर्देशिलेले समाजाचे सर्व रोग त्या सर्व व्याधी, तशाच जपून ठेवण्याचें धोरण अवलंबिले आणि केव्हा केव्हा तर त्या वाढवून ठेवल्या. त्यामुळे राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद या नुसत्या घोषणाच राहिल्या आणि स्वातंत्र्यानंतर जी प्रगति, जो समाजविकास अपेक्षित होता तो झाला नाही. इतकेंच नव्हे तर उज्ज्वल भवितव्याची आशाहि लोकांच्या मनांतून नष्ट होत चालली आहे. भारताचें शासन खरेखुरें इहवादी असतें, घटनेंतील तत्त्वें त्याने प्रामाणिकपणें प्रत्यक्षांत आणली असती तर हा अनर्थ ओढवला नसता.
पण जसे लोक तसें त्यांचे शासन हेंहि खरेंच आहे. शासनाने लोकांना वळण लावलें पाहिजे हें जितकें खरें तितकेंच लोकांनी शासनाला वळण लावलें पाहिजे, हेंहि खरें आहे. लोकशाहीत जनता सार्वभौम असते याचा दुसरा अर्थ काय आहे ? अप्रगत देशांत लोकांवर इहवादाचे संस्कार करणें हें शासनाचें जसें कर्तव्य आहे तसेंच लोकनेत्यांचेंहि आहे. पण त्या दृष्टीनेहि भारत दुर्दैवीच ठरला. ब्रिटिशांचें राज्य असतांना राममोहन रॉय, रानडे, टिळक, सावरकर, महात्माजी, पंडितजी, नेताजी असे जंगी लोकनेते भारताला लाभले होते व त्यांनीच येथे त्या समाजाला आधुनिक युगांत खेचून आणलें होतें.
स्वातंत्र्यानंतर भारताचे शास्ते तर कर्तव्यच्युत झालेच, पण विरोधी पक्षांचे नेतेहि तसेच, किंबहुना त्याहूनहि जास्तच हीन पातळीवर गेले. त्यांचेंहि लक्ष सत्तेवरच होतें. त्यांनाहि स्वार्थ सुटला नव्हता. आपापले पक्षीय नेतेपद टिकवून धरण्यासाठी त्यांनीहि धर्मांधता, असहिष्णुता, जातिभेद, वर्णभेद, शब्दप्रामाण्य, कर्मकांड या व्याधींची जपणूक केली. समाजवादी, साम्यवादी पक्षांची ही मोठी जबाबदारी होती. पण त्यांनी कामगारांतहि सामाजिक आणि धार्मिक क्रांति केली नाही, तसे प्रयत्नहि केले नाहीत. जीर्णमतवादाचा त्यांनी परिपोषच केला. त्यामुळे भारताची जनता अजूनहि इहवादापासून फार दूर आहे आणि दिवसेदिवस ती जास्त जास्तच दूर जात आहे असें दिसतें.
नव्या नेतृत्वाची गरज
अशा स्थितींत या जीर्णमतवादी पुराण्या नेतृत्वाला विटलेले, त्याचा उबग आलेले जे विद्यासंपन्न मध्यमवर्गीय तरुण त्यांनी नवें नेतृत्व निर्माण करून समाजावर इहवादाचे संस्कार करण्याची म्हणजे सामाजिक व धार्मिक क्रांति करण्याची जबाबदारी शिरावर घेतली पाहिजे. कारण अंती समाज इहवादी झाल्यावांचून या देशांत कसलीहि प्रगति होणें शक्य नाही. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, यांवरची श्रद्धा ढळल्यावांचून व्यक्ति निर्माण होणार नाहीत; व्यक्ति नाहीत म्हणजे राष्ट्र नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, यांवांचून लोकशाही नाही. जनता सार्वभौम होऊं शकणार नाही. तिच्या ठायीं संघटित सामर्थ्य निर्माण होणार नाही. ती अशी दुबळी आहे, तोपर्यंत शासन हें भ्रष्ट, सत्तालोभी, जुलमी, अन्यायी व भोगैकपरायण असेंच राहणार.
असें शासन समाजवाद कधीच आणूं शकणार नाही. तेव्हा निःस्पृह, सत्ताविमुख, लोकवादी, बुद्धिवादी, असें नेतृत्व निर्माण झालें व त्याने इहवादाचा अवलंब करून सामाजिक व धार्मिक क्रांति घडवून आणली तरच भारताचें स्वातंत्र्य टिकेल व त्याची प्रगति होईल.
अशी क्रांति घडविण्याची जबाबदारी सर्व भारतीय समाजावर व विशेषतः हिंदु समाजावर आहे. कारण हाच समाज बहुसंख्य आहे. आणि भारताचें भवितव्य घडविणें हें बव्हंशी त्याच्यावरच अवलंबून आहे. पण मागे एक-दोनदा सांगितल्याप्रमाणे त्या दृष्टीने इतरांच्या तुलनेने त्याने जरी बरीच प्रगति केली असली, तरी लोकशाही, समाजवाद, राष्ट्रनिष्ठा, ही तत्त्वें यशस्वी करण्याइतकी इहवादी दृष्टि बहुजनसमाजाला व बऱ्याचशा सुशिक्षितांनाहि अजून प्राप्त झालेली नाही. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, घातक धार्मिक रूढि, देवलसी वृत्ति यांची बीजें त्यांच्या मनांतून समूळ नष्ट झालेली नाहीत.
सावरकरांचे तत्त्वज्ञान
हिंदुराष्ट्र, हिंदुत्व यांचा नित्य घोष करणारे हिंदु नेते, त्यांचें अजून समर्थनच करतांना दिसतात. वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यासारखा, सर्व नेत्यांचा नेता, सर्व बुद्धिमंतांचा अग्रणी, हाडाचा क्रांतिकारक असा एक टोलेजंग पुरुष हिंदु समाजाला नेता म्हणून लाभला होता. पण त्याच्या राजकीय कार्यासाठी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळून त्याच्या सामाजिक व धार्मिक क्रांतीच्या विचारांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचेंच धोरण हिंदु समाजाने अवलंबिलें होतें व अजूनहि आहे. सावरकरांच्या तत्त्वज्ञानाविषयी हिंदु समाजाची व त्याच्या तथाकथित नेत्यांची ही उपेक्षावृत्ति जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत हा समाज इहवादी होणें अशक्य आहे. आणि वर सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत तो इहवादी होत नाही तोपर्यंत तो संघटित होणें शक्य नाही व त्याच्या ठायीं बल व सामर्थ्य येणेंहि शक्य नाही. म्हणून सावरकरांनी जें धार्मिक व सामाजिक क्रांतीचें तत्त्वज्ञान सांगितले त्याचा अभ्यास व्हायला हवा.
हिंदुधर्म, हिंदु संस्कृति व हिंदूंची प्राचीन परंपरा यांचे सावरकर पराकाष्ठेचे अभिमानी होते. हा अभिमान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मौलीभूत घटक होता. "हिंदु विचारपरंपरा इतकी पूर्णपदाला पोचली आहे की, तत् आणि त्वम् याबद्दल तिच्या पलीकडे कोणी जाऊं शकणार नाही. कांही झाले तरी बुद्धिवादाच्या दृष्टिीनेहि एकंदरींत पाहतां सर्व धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदु धर्म होय' या त्यांच्या वचनांवरून हें स्पष्ट होईल. पण त्यांचा अभिमान विषय असलेल्या हिंदु धर्माचें त्यांच्या मतें स्वरूप काय होतें ? विज्ञानपूत, बुद्धिप्रामाण्यवादी, असा हिंदु धर्म त्यांना अभिप्रेत होता. "धारणात् धर्मं इत्याहु:" ही धर्माची व्याख्या त्यांना मान्य होती. हिंदु समाजाचे संघटन करील, रक्षण करील तो धर्म, असे त्यांनी वारंवार म्हटलें आहे. धर्मग्रंथांत सांगितला असेल तो धर्म असें ते कधीच मानीत नाहीत.
"धर्मग्रंथ हे ईश्वरी आज्ञा नसून मनुष्यकृतच आहेत. म्हणून ते त्रिकालज्ञानी त्रिकालाबाधित होऊं शकत नाहीत. त्यांना आदरावे पण अनुल्लंधनीय शास्त्र कधीच मानूं नये. मागासलेल्या धर्मग्रंथांना त्रिकालाबाधित मानल्यामुळेच हिंदु समाज मागासलेला राहिला" असें ते नेहमी म्हणत. धर्म विज्ञानपूत असावा असें सांगतांना अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन, "कार्यकारण भावाच्या कसोटीला उतरणारे व मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यांत येणारे जे सृष्टिनियम व जीं वैज्ञानिक सत्यें त्यांसच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो" असें त्यांनी निकराने सांगितलें आहे. भावार्थ असा की, सावरकरांचा हिंदु धर्म हा पोथीबद्ध, श्रुतिस्मृतिबद्ध नसून हिंदु राष्ट्राच्या अभ्युदयार्थ जो जो विधिनिषेध, जो आचार, जें तत्त्व उपकारक तो हिंदु धर्म, अशी त्यांची व्याख्या आहे. त्यांच्या मतें हिंदुसंघटन हेंच स्मृतिशास्त्र होय आणि हिंदुराष्ट्राच्या संघटनाबलाच्या मुळावर घाव घालणारा जो धर्म तो धर्म नसून अपधर्म होय.
चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, यांवर याच प्रखर बुद्धिवादी दृष्टींतून त्यांनी कठोर प्रहार केले आहेत. या घातक रूढि आहेत तोपर्यंत हिंदु समाज संघटित होणार नाही. त्याला स्वातंत्र्य मिळणार नाही व मिळाले तरी तें टिकणार नाही, या त्यांनी शतवार सांगितलेल्या सत्याची आज पावलोपावली प्रचीती येत आहे.
"हिंदु धर्माच्या आणि हिंदुराष्ट्राच्या मुळासच लागलेली ही जन्मजात म्हणविणाऱ्या, पण पोथीजातच असणाऱ्या, जातिभेदाची कीड मारल्यावांचून तो संघटित व सबळ होऊन आजच्या जीवनकलहांत टिकाव धरूं शकणार नाही," असा घोष ऊर्ध्वबाहू होऊन ते सारखा करीत होते. असाच घोष अस्पृश्यतेबद्दलहि जन्मभर त्यांनी चालविला होता. "अस्पृश्यता ही तर निव्वळ मानीव, पोथीजात. माणुसकीचा कलंक! ती तर तात्काळ नष्ट केली पाहिजे. या एका सुधारणेसरशी कोटि कोटि हिंदुबांधव आपल्या राष्ट्रांत एकजीव होऊन सामावले जातील व हिंदु राष्ट्रासाठी झुंजूं लागतील." चातुर्वर्ण्याला संकराची फार भीति वाटते. 'संकरो नरकायैव' हें वचन प्रसिद्धच आहे. पण यासंबंधी विवेचन करतांना वर्णसंकरांतून निर्माण झालेल्या वेदव्यासांसारख्या महापुरुषांची उदाहरणे देऊन 'संकरः स्वर्गायैव' असा सिद्धान्त सावरकरांनी मांडला आहे.
बेड्या तोडून टाका
वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या सात बेड्यांनी हिंदु समाजाची सर्व हानि झाली आहे, असें सावरकरांचें मत आहे. त्या बेड्या तोडून टाका असें सांगताना त्यांनी जें विवेचन केले आहे त्यांत हिंदुराष्ट्राच्या घडणीसाठी अवश्य असलेली सामाजिक क्रान्ति, धार्मिक क्रान्ति व इहवाद यांची सर्व तत्त्वें आलेली आहेत. या सर्व बेड्या हिंदंनी आपण होऊनच आपल्या पायांत ठोकून घेतल्या आहेत. म्हणजे त्या श्रुतिस्मृतिपुराणोक्त हिंदुधर्मशास्त्राने हिंदु समाजाच्या पायांत ठोकल्या आहेत. त्या बेड्या म्हणजेच तें धर्मशास्त्र त्याज्य मानले पाहिजे असें सावरकर सांगत होते. इहवाद तरी दुसरें काय सांगतो? माझीं श्रवणेंद्रियें आणि माझी आकलन शक्ति ही ह्या ऐहिक, प्रत्यक्ष प्रमाणमय जगाचा शब्दघोष ऐकण्यास शिकली आहे, असें त्यांनी पुनः पुन्हा सांगितले आहे.
सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद हा अनेकांच्या डोळ्यांत सलतो. पण मुस्लिमांची विभक्तवृत्ति व मुस्लिम साम्राज्याच्या पुनरुज्जीवनाची त्यांची आकांक्षा यामुळेच तो निर्माण झाला आहे. आणि दुसरें म्हणजे हिंदुत्वाची अत्यंत व्यापक व्याख्या करून आजच्या भारतीय राष्ट्रवादाचा आशय त्यांनी त्यांत भरला आहे. भारतभूमि ज्यांची पितृभू व पुण्यभू आहे तो हिंदु अशी त्यांनी व्याख्या केली आहे. वेदप्रामाण्य हें व्याख्येतून रद्द केल्यामुळे बौद्ध, जैन, शीख यांचा समावेश हिंदुत्वामध्ये होतो. आणि याच्यापुढे जाऊन हिंदुत्वाच्या धार्मिक लक्षणाला गौणत्व देऊन "धर्मांतर केल्यावरहि मनुष्य संस्कृतीने हिंदु राहूं शकतो" असे सांगून भारतीयत्वाइतका त्यांनी हिंदुत्वाला व्यापक अर्थ दिला आहे.
राजकुमारी अमृतकौर, तेलो मस्कारेन्हस यांनी याच अर्थाने आपण हिंदु आहों असें म्हटल्याचें मागे सांगितलेच आहे. अल्पसंख्याकांविषयीचा आपला दृष्टिकोन स्पष्ट करतांना आमचे "पारशी नि ख्रिश्चन देशबंधु हे आजच सांस्कृतिकदृष्ट्या आमच्याशी समानशील आहेत, समंजस आहेत व देशभक्त आहेत" असें निःसंदिग्धपणें सावरकरांनी म्हटलें आहे. हिंदुत्वाची अशी सांस्कृतिक पायावर उभारणी केल्यामुळे ते भारतीयत्वाशी समव्याप्त होतें हें कोणालाहि सहज मान्य होईल.
जातिभेद असो, अस्पृश्यता असो, परदेशगमन असो, पतितशुद्धि असो, देवपूजा असो, गोपूजा असो, स्मृतींतलें वचन असो, श्रुतींतलें असो, कुराणांतलें असो, बायबलांतलें असो, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आचार, रूढि, वचन, तत्त्व हें उपयुक्ततेच्या विज्ञानाच्या, बुद्धीच्या प्रत्यक्षनिष्ठ, निकषावर घासून पाहूनच तें ग्राह्य की त्याज्य तें ठरवावें हा विचार सावरकर जन्मभर सांगत व आचरीत राहिले.
यावरून हे ध्यानांत येईल की गेल्या शंभर-दीडशे वर्षांत होऊन गेलेल्या भारतीय नेत्यांमध्ये इहवादाचे ते सर्वश्रेष्ठ पुरस्कर्ते होते, त्यांच्यांतले ते मुकुटमणि होते. असें असल्यामुळे त्यांच्या शब्दांतच इहवादाच्या विवेचनाचा समारोप करणें मला सर्वथैव योग्य वाटलें. त्या महापुरुषाच्या पुण्याईमुळे तरी भारतीय समाजांत इहवादाचीं मूलतत्त्वें दृढमूल व्हावीं व राष्ट्रवाद, लोकशाही आणि समाजवाद या तत्त्वांवर भारत राष्ट्राची पुनर्घटना करण्यांत भारतीयांना यश यावे अशी शुभेच्छा व्यक्त करून हें विवेचन संपवितों.
पृथ्वीप्रदक्षिणा
९

■ ■ ■