प्रस्तावना

 १९४७ सालीं भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि नंतर येथे इहवादी शासन- सेक्युलर गव्हर्मेंट- स्थापन झाले. आपल्या घटनेत सेक्युलर हा शब्द वापरण्यांत आला नाही. पण आपले शासन इहवादी आहे, तशी आपली प्रतिज्ञाच आहे, असें पंडितजींनी व इतर अनेक काँग्रेस नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलें आहे.
 सेक्युलर गव्हर्मेंट याला मराठींत निधर्मी शासन असा शब्द रूढ झाला आहे. कोणत्याहि धर्मांत हस्तक्षेप न करणारे, सर्व धर्माना निःपक्षपाताने वागविणारें सरकार, असा त्याचा अर्थ लोकांमध्ये केला जातो. धर्मातीत शासन असाहि शब्द त्याच अर्थाने वापरला जातो. पण हा अर्थ बरोबर नाही. इहवादाचा अर्थ यापेक्षा फार फार व्यापक आहे, त्याच्या अभ्यंतरांत फार मोठी तत्त्वें समाविष्ट झालेलीं आहेत, आणि त्या तत्त्वांचे संस्कार लोकांच्या मनावर अखंडपणें, सातत्याने झाल्यावांचून शासन इहवादी करण्यांत कोणत्याहि समाजाला यश येणार नाही.
 सेक्युलर या शब्दांतील भावार्थाची परंपरा फार जुनी आहे. "सीझरचा भाग सीझरला द्या व देवाचा भाग देवाला द्या." हें त्याविषयीचें वचन प्रसिद्धच आहे. इहलोक व परलोक हीं भिन्न क्षेत्रे आहेत आणि त्यांवर भिन्न सत्ता चालाव्या, एकाच सत्तेखाली दोन्ही क्षेत्र असू नयेत, असा त्याचा भावार्थ आहे. खिश्चन धर्माच्या उदयाच्या वेळचा हा विचार आहे.
 पण रोमच्या पीठावर पोपची सर्वंकष सत्ता स्थापन झाल्यावर हा सुविचार लोप पावला आणि धर्मपीठाची सत्ता मानवाच्या ऐहिक व पारलौकिक दोन्ही जीवनांवर चालावी असा रोम-पीठाने आग्रह धरला व जनतेची श्रद्धा त्या पीठावर असल्यामुळे तो दीर्घकाळ यशस्वी झाला. पण तेराव्या-चौदाव्या शतकांत राष्ट्रभावनेचा उदय झाला व पश्चिम युरोपांतील देशांच्या राजांना पोपची सत्ता असह्य वाटूं लागली. तेव्हा पोप व हे राजे यांच्यांत संघर्ष होऊन, अखेर पोपला नमावें लागलें. ऐहिक जीवनावरची सत्ता त्याला सोडावी लागली. 'सेक्युलॅरिझम' ही राज्यसंस्थेने धर्मसंस्थेपुढे मांडलेली एक व्यवहारी तडजोड आहे, असें या घटनेचें वर्णन कोणी करतात. तो अर्थ कांहीसा बरोबर आहे. पण कांहीसाच. असें म्हणण्याचें कारण असें की, ही तडजोड वस्तुतः पोप व राजे यांच्यांत होती, धर्मसंस्था व राज्यसंस्था यांच्यांत नव्हती. राष्ट्रभावना उदित झाल्यावर राजांनी पोपची सत्ता झुगारून दिली, धर्माची नव्हे. पश्चिम युरोपांतील बहुतेक सर्व देशांत पुढे दीर्घकालपर्यंत धर्मसंस्थेची सत्ता चालूच होती. त्यानंतर ग्रीक विद्येचा अभ्यास सखोल होऊ लागला, तिच्यांतील तत्त्वांचा लोकांत प्रसार होऊ लागला, त्यामुळे विज्ञानाचा उदय झाला आणि मग हळूहळू धर्मसत्तेचें बळ कमी होऊन सेक्युलॅरिझम- इहवादप्रभावी होऊं लागला. 'राइज ऑफ् रॅशनॅलिझम इन् युरोप' या आपल्या ग्रंथांत विल्यम एडवर्ड लेकी याने हा सर्व इतिहास दिला आहे. लेकीने प्रथम हा विषय एका लहान निबंधांत मांडला होता. त्या निबंधाचें नांव 'अद्भुतावरील श्रद्धेचा ऱ्हास' असें होतें. त्यावरून इहवादाचें मर्म काय आहे तें ध्यानांत येईल. सृष्टिघटनांविषयी लोकांत अज्ञान असतें, कार्यकारणभाव त्यांना ज्ञात नसतो, अशा काळी अद्भुतावर, चमत्कारावर, दैवी शक्तीवर त्यांची अंध श्रद्धा असते. त्यामुळे ऐहिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत- राजकारण, अर्थ, समाजरचना, शिक्षण- तो त्या श्रद्धेच्या वर्चस्वानेच निर्णय घेत असतो. हें वर्चस्व नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रांत बुद्धि, विज्ञान, अवलोकन, प्रयोग, इतिहास यांच्या साह्याने निर्णय घेणें हा इहवादाचा खरा अर्थ आहे. लेकीने आपल्या ग्रंथांत याचें सविस्तर विवरण केले आहे.
 यावरून हें ध्यानांत येईल की, राष्ट्र, लोकशाही, समाजवाद यांच्या तत्त्वांचे संस्कार जनतेच्या मनावर करणें जितकें आवश्यक असतें तितकेंच इहावादाचे संस्कार करणें आवश्यक असतें. किंबहुना वरील तत्त्वांवर केलेली समाजसंघटना यशस्वी होण्यासाठी इहवादाचा पाया अवश्य असल्यामुळे ते संस्कार करणें जास्त महत्त्वाचें आहे.
 'इहवादी शासन' या प्रस्तुत ग्रंथाच्या लेखनामागला तोच हेतु आहे.
 या ग्रंथाचे स्वरूप काय आहे तें 'विषयप्रवेश' व शेवटी 'पृथ्वीप्रदक्षिणा' या नांवाने केलेला समारोप यांवरून स्पष्ट होईल, म्हणून येथे पुनरुक्ति करीत नाही.
  ग्रंथाचें लेखन व छपाई पूर्ण झाल्यानंतर कांही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा परामर्श घेणें अवश्य आहे असें वाटल्यावरून, त्यांच्याकडे दृष्टिक्षेप करून ही प्रस्तावना पुरी करतो.
 प्रस्तावना लिहीत असतांनाच बांगला देशाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मान्यता दिल्याची सुवार्ता आली. इहवादी तत्त्वांच्या व भारताच्या इहवादी प्रगतीच्या दृष्टीने या घटनेला फार मोठा अर्थ आहे. पंतप्रधान इंदिराबाई व काँग्रेसचे नेते इहवादी झाले हा तो अर्थ होय. कोणत्याहि तत्त्वावर अंध श्रद्धा ठेवणें, देशकाल- परिस्थितीचा, त्या तत्त्वांच्या यशापयशाचा, व्यवहार्यतेचा विचार न करता, त्यांना चिकटून राहणें हे इहवादाला व म्हणूनच समाजप्रगतीला घातक असतें. पंडितजींची कम्युनिझमवर अशीच अंध श्रद्धा होती. म्हणूनच कम्युनिस्ट देश आक्रमक असुं शकत नाहीत या सिद्धान्ताला ते कवटाळून बसलें व चीनचें आक्रमण झाले, तरी ते त्याला आक्रमण म्हणेनात. पंतप्रधान इंदिराबाई या श्रद्धेतून मुक्त झाल्या आहेत. म्हणूनच चीनच्या साम्राज्यवादाला त्या जाणूं शकतात. अलिप्तता या तत्त्वाचा पंडितजींना असाच मोह होता. तो मोहहि इंदिराबाईंनी दूर सारला आहे. वेळ आली तर अलिप्ततेचा आम्ही त्याग करूं असें त्या एकदा म्हणाल्याहि होत्या. ही वास्तव, व्यवहारी, बुद्धिवादी दृष्टि नसती, तर त्यांनी रशियाशी करार केला नसता. आणि आज भारतावर १९६५ सालाचीच आपत्ति आली असती, पण आता ती येणार नाही. कारण काँग्रेस-नेते आता वास्तव दृष्टीने जगाकडे पाहूं लागले आहेत. ती ताकद, तें सामर्थ्य त्यांना प्राप्त झालें आहे. आज भारतीयांच्या ठायीं, आपल्या सेनेच्या ठायीं, कार्यकर्त्यांच्या ठायीं जें तेज, जो अभिमान, जो पराक्रम दिसत आहे तो एरवी दिसला नसता.
 आता इतर घटनांचा विचार करूं. भारताची फाळणी झाली ती हिंदुस्थानांतील मुस्लिम जमातीच्या अंध धर्मश्रद्धेमुळे झाली. राष्ट्रनिष्ठा ही इस्लामविरोधी आहे, हाच आग्रह या जमातीने धरला होता. आणि भारतीय मुस्लिम अजूनह विश्व- मुस्लिमवादाच्या घोषणा करतात हे अलअक्सा, राबात या प्रकरणांवरून दिसून आलेंच आहे. बांगला देशांत पाकिस्तानच्या एकंदर लोकसंख्येपैकी दोन- तृतीयांश लोक राहतात. त्यांतील बहुसंख्य मुस्लिम आहेत. तेव्हा फाळणीच्या निर्णयाचें श्रेय बव्हंशीं त्यांचेंच आहे. असे हे बंगाली मुस्लिम आज पाकिस्तानांतून फुटून निघून धर्मातीत राष्ट्रवादाचा अवलंब करण्यास सिद्ध झाले आहेत आणि त्यासाठी अगदी अंतिम त्याग करीत आहेत, हें फार मोठे सुचिन्ह आहे. बांगला नागरिकांनी, त्यांच्या मुक्तिवाहिनीने, पश्चिम पाकिस्तानच्या सैतानी आक्रमणाविरुद्ध जो लढा दिला त्याला खरोखर तोड नाही. त्यांतून त्यांची राष्ट्रभावना शुद्ध सुवर्णासारखी बाहेर पडली आहे. आता बांगला नागरिक भारत हा बव्हंशी हिंदूंचा देश असूनहि त्याच्याशीं पूर्ण सहकार्य करीत आहेत. हा धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा, जीनांनी उद्घोषिलेल्या द्विराष्ट्रवादाचा संपूर्ण पराभव असून, इहवादाचा मोठा विजय आहे. बांगला देशाप्रमाणेच सिंध, बलुचिस्तान, पेशावर हे पाकिस्तानचे विभागहि याच मार्गाने वाटचाल करीत असल्याच्या वार्ता येत आहेत. तसें झाल्यास भारताच्या दोन्ही कुशींतल्या कट्यारी निघून जातील आणि या देशाच्या प्रगतीचा मार्ग निर्वेध होईल. हा सर्व इहवादाचा महिमा आहे.
 बांगला देशाच्या या परिवर्तनाचा भारतांतील मुस्लिम जमातीवर परिणाम होऊन तीहि इहवादी होईल अशी आशा करतां येईल काय ? तशीं कांही चिन्हें दिसत आहेत. मुस्लिम लीग, मुस्लिम मजलीस मुशावरत यांच्या नेत्यांनी आणि इतरहि अनेक मुस्लिम संस्थांनी व व्यक्तींनी पाकिस्तानी आक्रमणाचा निषेध करून आपण सर्वस्वीं पंतप्रधान इंदिराबाईंच्या पाठीशी असल्याचे जाहीर केलें आहे. कांही वर्तमानपत्रांनी यांतील प्रामाणिकपणाबद्दल संशय व्यक्त करून याला दुटप्पीपणा म्हटलें आहे. काही उर्दू पत्रांतील लिखाण त्या संशयाला पुष्टि देत आहे. तरीहि स्वतंत्र बांगला देश ही घटना मुस्लिम जमातीच्या दृष्टीने इतकी क्रांतिकारक व इतकी प्रभावी आहे की, भारतीय मुस्लिमांच्या धर्मांध दृष्टींत ती चरचरीत अंजन घातल्यावांचून राहील, असें वाटत नाही. निदान ज्या पाकिस्तानी आधारावर येथील मुस्लिम भारतांत आणखी पाकिस्तान निर्माण करण्याची आकांक्षा बाळगून होते तो आधार कोसळल्यामुळे तरी येथला मुस्लिम समाज परिवर्तनास सिद्ध होईल, अशी आशा करण्यास हरकत नाही. भारतांतील मुस्लिम नेत्यांच्या आजच्या जाहीर वक्तव्यांवरून ती आशा दृढ होते.
 चीनने भारताला आक्रमक ठरवून अमेरिकेशीं जी अत्यंत अश्लाघ्य हातमिळवणी केली तिच्यामुळे भारतांतील कम्युनिस्टांच्या कम्युनिझम, मार्क्सवाद या धर्मावरील अंध श्रद्धेला तडा जाईल, ती ढिली होईल व तेहि राष्ट्रवादी होऊन भारताशी एकनिष्ठ होतील, अशी अपेक्षा करण्यास थोडी जागा निर्माण झाली आहे, काल-परवापर्यंत कट्टर साम्राज्यवादी म्हणून ज्या अमेरिकेवर चीन आग पाखडीत होता त्या अमेरिकेशीं आज चीन एकरूप होत आहे, तिच्या मुखांतून बोलत आहे. हें पाहून जगांत तत्त्वनिष्ठा म्हणून कांही असतं, यावरचा विश्वासच उडून जातो. कसला मार्क्सवाद व कसला कम्युनिझम ! वेळ येतांच आपल्या भारतीय कम्युनिस्ट सेवकांना साम्राज्यवाद्यांचे कुत्रे म्हणून संबोधून ठोकरून लावण्यास माओसाहेब मुळीच कमी करणार नाहीत, हे उघड आहे. या संभाव्यतेमुळे कम्युनिस्टांची धर्मांधता कमी होऊन तेहि इहवादी, बुद्धिवादी होतील, अशी आशा करणें अगदीच गैरहिशेबी होईल, असं म्हणण्याचे कारण नाहीं. तसे झाल्यास भारतांतील दुसरी एक इहवादविरोधी शक्ति लुप्त होईल.
 भारतांतील परकी मिशनरी यांच्या मनांत कधीकाळी परिवर्तन होईल ही आशा करण्यांत अर्थ नाही. पण त्यांच्या भारतीय अनुयायांच्याबद्दल कांही अपेक्षा ठेवल्या, तर ते अगदीच वावगे होईल असे नाही. तसें काय घडलें आहे ?
 ख्रिश्चन समाज म्हणजे अमकी विशिष्ट मूल्ये वंदनीय मानणारा व तीं आचरणांत आणणारा समाज, अशी स्थिति कधीहि इतिहासांत नव्हती, पण तशी श्रद्धा या मिशनऱ्यांची आहे. ख्रिस्ती धर्माचें श्रेष्ठत्व येथल्या लोकांना पटवून देऊन आम्ही धर्मांतर करतों, वाममार्गांनी नाही, असा त्यांचा दावा आहे. बांगला देशांत पाकिस्तानी सैतानांनी भयंकर मानवहत्या केली, नरसंहार केला. आणि अशा पाकिस्तानला त्याच्या या हत्याकांडाला अमेरिका व इतर अनेक ख्रिश्चन राष्ट्र यांनी पाठिंबा देऊन याह्याखानांना शस्त्रास्त्रेहि पुरविलीं. 'दाऊ शॅल्ट नॉट किल ? 'अहिंसा परमोधर्म:' असे ख्रिश्चन धर्माचं तत्त्व आहे. तेव्हा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने माणूस जास्त धर्मप्रवण होतो, त्याच्या आश्रयानेच मोक्ष मिळविणें शक्य होते, ही श्रद्धा फोल आहे हे मिशनऱ्यांच्या नव्हे, पण त्यांच्या नादाने फसणाऱ्यांच्या तरी ध्यानांत येईल. हे ध्यानांत येण्यास या युद्धाची गरज होती असें नव्हे. इतिहासाच्या पानापानांवर ते लिहिलेले आहे. पण डोळ्यांसमोर घडलेल्या घटनांचा परिणाम जास्त होतो म्हणून याचें महत्त्व विशेष.
 इस्लाम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो मार्क्सधर्म असो किंवा कोणताहि अन्य धर्म असो. त्यावरील श्रद्धा हा समाजसंघटनेचा पाया होऊं शकत नाही, हाच इहवादाचा सिद्धान्त या बांगला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याने सिद्ध होत आहे. हा सिद्धान्त वर सांगितल्याप्रमाणे इतिहासाच्या पानापानांवर लिहिला आहे. पण 'चक्षुर्वैसत्यम्' अशी ही घटना आहे. म्हणून तिच्याकडे लक्ष वेधण्याला जास्त अर्थ आहे.
 हा अर्थ वरील समाजांच्या बाबतींत खरा ठरला तर भारतीय जनता एकात्म होईल व भारतीय जवानांनी या युद्धांत जें रक्त सांडलें तें सार्थकी लागेल.
 पण तें कसेंहि असले तरी श्रीमती इंदिरा गांधी यांनी धीराने, संयमाने, मुत्सद्देगिरीने पावले टाकून शेवटीं वेळ येतांच बांगला देशाला मान्यता देण्याचा जो निर्णय घेतला तो इहवादाच्या दृष्टीने भारताच्या इतिहासाला निश्चित वळण लावील यांत शंका नाही. इतिहासांत त्याला अनन्यसामान्य असें महत्त्व आहे.
 'इहवादी शासन' ही लेखमाला केसरींत चालू होती तेव्हा या ग्रंथाच्या प्रकाशनाचा विचार नेहमीप्रमाणेच मनांत चालू होता. पण तो विचार फार वेळ करावा लागला नाही. श्री. जयंतराव टिळक यांच्यापाशीं प्रश्न काढतांच त्यांनी केसरी प्रकाशनातर्फे हा ग्रंथ प्रकाशित करण्याचें मान्य केलें. त्यामुळे माझी ती विवंचना एकदम दूर झाली. जयंतरावांचा यासाठी मी अतिशय ऋणी आहे. केसरीचे सहसंपादक श्री. वि. स. वाळिंबे यांचाहि मी असाच ऋणी आहे. हा विषय मनांत घोळत असतांना मी त्यांच्याशी चर्चा करीत असे. तशी चर्चा करीत असतानांच एक दिवस त्यांनी सांगितलें, ही लेखमाला मी रविवारच्या केसरींत प्रसिद्ध करतों. केसरींत ही माला आल्यामुळे तिला खूपच प्रसिद्धीहि मिळाली आणि लेखनाचें उद्दिष्ट बरेंच साध्य झालें.
 केसरींतील प्रकाशन विभागाचे प्रमुख श्री. चितळे व त्याच विभागांतील श्री. भास्करराव कुलकर्णी यांनी छपाईच्या कामाकडे जातीने लक्ष पुरविल्यामुळे ग्रंथाचें बाह्यरूप मनोहर झालें आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. श्री. कुलकर्णी यांना मुद्रितें तपासण्याची माझ्यापेक्षाहि जास्त काळजी असे. प्रत्येक पान ते स्वतः वाचीत व पूर्ण समाधान झाल्याखेरीज मंजूर करीत नसत. ही दक्षता फार दुर्मिळ आहे.
 पुण्यांतल्या ग्रंथालयांविषयीचा माझा अनुभव पूर्वापार फार चांगला आहे. या ग्रंथलेखनाच्या काळांतहि मला त्याचाच पुनःप्रत्यय आला. आमच्या स. प. कॉलेजचें ग्रंथालय तर घरचेंच ग्रंथालय. तेथले कोणतेंहि पुस्तक तर मी उचलून आणीत असेच, पण तेथे नसलेली पुस्तकेंहि अन्य ग्रंथालयांतून आणून माझ्या घरीं पोचविण्याची तेथील ग्रंथपालांनी नेहमी कसोशी केली. तीच गोष्ट केसरी-मराठा ग्रंथालयाची. लेखकाला ग्रंथ पुरविण्याचा यावच्छक्य प्रयत्न करणें हें आपलें कर्तव्य आहे नव्हे व्रत आहे- असेंच हे ग्रंथपाल मानतात असें दिसतें. माझे श्रम त्यामुळे किती तरी हलके झाले. पुणे विद्यापीठ, गोखले इन्स्टिटयूट, भारतीय संस्कृति कोश मंडळ, या सर्वांनी मला आपली ग्रंथालयें मुक्तद्वार ठेवली होती. त्यांच्या सहकार्यावांचून ग्रंथलेखन असें वेगाने झालें नसतें.
 राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, समाजवाद, या विषयावरच्या माझ्या लेखनाचें जनतेने आजपर्यंत चांगलें स्वागत केलें आहे. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांतील विचार लोकांत प्रसृत करण्यासाठी माझ्या लेखांचें सामुदायिक वाचन केलें व त्यांच्या आधारे व्याख्यानेंहि दिली. इहवादी तत्त्वांचे लोकमानसावर संस्कार करण्यासाठी सुद्धा ते असाच उद्योग करतील असा विश्वास व्यक्त करून ही प्रस्तावना संपवितों.

१० जानेवारी १९७२ ]
- पु. ग. सहस्रबुद्धे