एः ! फारच बोबा ! (नाट्यछटा)
<poem>
आमचे वासुदेवराव शेक्सपीअर किती उत्तम शिकवितात म्हणून सांगूं तुला ! त्यांतून अथेल्लो तर, फारच, फारच चांगलें सांगतात ! तिकडे काय पाहात आहेस रे ? अरे ती एक तरुण विधवा उगीच रडत आहे झालें ! तुला काय करायचें आहे तिच्या रडण्याशीं ? - हो, तुला एक असें विचारायचें आहे कीं, या नाटकांतल्या यागोच्या कॅरेक्टरविषयीं तुझें काय मत आहे रे ? - फारच बेमालूम साधली आहे म्हणतोस ? - छे: ! आपलें तर मत अगदीं साफ विरुद्ध आहे ! कसें म्हणून विचारशील, तर असें पाहा कीं, मनुष्याच्या दुष्ट स्वभावाला शेक्सपीअरनें वाजवीपेक्षां फाजील - अगदीं लाल भडक - असा रंग चढविला आहे झालें ! - नाहीं, तें कबूल आहे रे ! नाट्यसृष्टींत हें पात्र उत्तम - चांगलें उठावदार दिसत असेल, हें मलासुद्धां मान्य आहे ! पण तेंच आपल्या खर्या सृष्टींत दुष्टपणाचा पारा इतका वर चढेल कीं नाहीं याची मला तर बोवा शंकाच आहे ! इतका कठोरपणा माणसाच्या अंगीं असणें शक्य तरी आहे ? ए: ! फारच बोवा ! तूं कांहीं म्हण. निदान अशीं दुष्ट माणसें माझ्या तरी पाहण्यांत आजपर्यंत कधींही आली नाहींत, हें मात्र खास ! - स्सुक् ! ती पहा, ती पहा ! त्या खिडकींत उभी आहे ती ! - कां ? कशी सुंदर आहे ? आहे कीं नाहीं ? - हं, हं ! - तरी रडून रडून, हिच्या तोंडावरचा तजेला पुष्कळच कमी झाला आहे ! नाहींतर किती सुंदर ! - आहे, त्या धुरकटलेल्या घरामध्यें, माझें जाळें विणण्याचें काम चांगलेंच पार पडत आलें आहे ! एकदां संपण्याचा अवकाश, कीं ही येऊन त्याच्यांत अडकलीच म्हणून समज ! हः हः.....
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |