एकनाथी भागवत/अध्याय तेविसावा

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ।

ॐ नमो सद्गुरु विश्वरुप । विश्वा सबाह्य तूं चित्स्वरुप । तुझें निर्धारितां रुप । तूं अरुप अव्यय ॥१॥ चराचर जें सावेव । ते तुज अरुपाचे अवेव । जीवशीव हे तुझी माव । अद्वयवैभव पैं तुझें ॥२॥ धृतपुतळी दिसे साकार । घृतपणें ते निराकार । तैसा तूं अव्यय अक्षर । जगदाकार भाससी ॥३॥ ठसावलें जें दिसे जग । निर्धारितां तुझें अंग । अंग पाहतां तूं अनंग । अनंगाचा माग तुजमाजीं नाहीं ॥४॥ देखिजे तें तूं नव्हसी । नव्हे तें तूंचि होसी । होणें न होणें नाहीं तुजपाशीं । ऐसा तूं जगासी जगद्गुरु ॥५॥ शब्द तुजहोनियां दूरी । तूं शब्दा सबाह्य अंतरीं । बोलका तूं चराचरीं । वेदशास्त्रीं तूं वक्ता ॥६॥ उंसापासून गोडी दिसे । उंसा सबाह्य गोडीचि असे । गोडियेमाजीं ऊंस नसे । वेदांसी तुज तैसें सौजन्य ॥७॥ वेदांचा वक्ता तूंचि होसी । वेदीं प्रतिपादिजे तुम्हांसी । शेखीं वेदांसी नाकळसी । निःशब्दवासी गुरुराया ॥८॥ जेवीं कां निःशब्द अनाहतध्वनी । असे ध्वनिमात्रीं मिळूनी । तो अनाहत वाजविजे जनीं । ऐसें नाहीं कोणी वाजंत्र ॥९॥ तेवीं तूं वेदांचा वक्ता । सकळ शास्त्रां युक्तिदाता । परी वेदशास्त्रार्थसंमता । तुज तत्त्वतां न बोलवे ॥१०॥ म्हणों तूं केवळ निःशब्द । तंव निःशब्द आणि सशब्द । हाही मायिक अनुवाद । तूं एवंविध न कळसी ॥११॥ तूं न कळसीचि तत्त्वतां । ऐशिया युक्तींचा तूंचि विज्ञाता । ज्ञाताचि हें जंव स्थापूं जातां । तंव अज्ञानता असेना ॥१२॥ जेथ अज्ञानता नाहीं । तेथ ज्ञातेपण कैंचें कायी । हो कां मुख्यत्वें नोवरी नाहीं । तैं नोवरी पाहीं म्हणे कोण ॥१३॥ ज्ञाता ना अज्ञाता । तूं बोलता ना नबोलता । तूं बहु ना एकुलता । तुझी अलक्ष्यता लक्षेना ॥१४॥ तूं निःशब्द निर्विकार । तू निगुण निरहंकार । हेंही म्हणतां पडे विचार । तूं जगदाकार जगदात्मा ॥१५॥ जगदाकारें तूं प्रसिद्ध । तेथ कोणाचें कोणा बाधे द्वंद्व । पर नाहीं मा परापराध । अतिविरुद्ध कोणासी ॥१६॥ यापरी सद्गुरुनाथा । तुझे चरणीं द्वंद्वसमता । तेणें समसाम्यें निजकथा । श्रीभागवता चालविसी ॥१७॥ तेंचि श्रीभागवतीं । बाविसावे अध्यायाअंतीं । उद्धवें पुशिलें निजशांती । द्वंद्वसमाप्तिउपावो ॥१८॥ उद्धवें प्रश्न केला वाड । जेणें ब्रह्मज्ञानाची पुरे चाड । तो श्रीशुकासी लागला गोड । तेणें पुरे कोड परीक्षितीचें ॥१९॥ ऐकोनि उद्धवाची प्रश्नोक्ती । शुक सुखावला आनंदस्फूर्ती । तो म्हणे सावध परीक्षिती । तुष्टला श्रीपती उद्धवासी ॥२०॥ ब्रह्मज्ञानाची निर्वाणस्थिती । ते जाण पां मुख्यत्वें शांती । ते उद्धवें पुशिली अतिप्रीतीं । तेणें श्रीपती संतोषला ॥२१॥ तो शांति आणि निवृत्ती । सांगेल चौं अध्यायोक्ती । ऐक राया परीक्षिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥२२॥ ऐकें पांडवकुलदीपका । कौरवकुळीं कुलतिलका । तूं शांतीसी अधिकारी निका । निजात्मसुखा साधकू ॥२३॥ साधावया ब्रह्मप्राप्ती । तूं त्यक्तोदक श्रवणार्थीं । यालागीं शांति आणि निवृत्ती । ऐक नृपती हरि सांगे ॥२४॥ तेविसावे अध्यायीं निरुपण । दुर्जनीं क्षोभविलें मन । त्या मनासी ये क्षमा पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण सांगेल ॥२५॥ भिक्षुगीतसंरक्षण । तें मनोजयाचें लक्षण । प्रकृतिजयाचें निरुपण । सांगेल संपूर्ण चोविसावा ॥२६॥ सांगोनि त्रिविध त्रिगुण । परी लक्षविलें निजनिर्गुण । हें गुणजयाचें निरुपण । सुलक्षण पंचविसावा ॥२७॥ सव्विसावा अध्यावो येथ । तो धडधडीत विरक्त । सांगोनियां ऐलगीत । स्त्रियादि समस्त विषयत्यागू ॥२८॥ गुण विषय प्रकृति मन । या चहूंचें समाधान । चहूं अध्यायी विशद जाण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥२९॥ यापरी परीक्षितीस जाण । करोनियां सावधान । श्रीशुकयोगींद्र आपण । कथालक्षण निरुपी ॥३०॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

बादरायणिरुवाच - स एवमाशंसित उद्धवेन भागवतमुख्येन दशार्हमुख्यः । सभाजयन् भृत्यवचो मुकुन्दस्तमाबभाषे श्रवणीयवीर्यः ॥१॥

शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि उद्धवाची विनंती । वचनें संतोषला श्रीपती । तो उद्धवाप्रती संबोधी ॥३१॥ कोटि जन्मांतीं केवळ । द्विजत्वें पाविजे सत्कुळ । हें महापुण्याचें निजफळ । तेंचि निष्फळ हरिभक्तीविणें ॥३२॥ सदा सफळ आंब्याचा रुख । त्यावरी उपजे कांवरुख । तो सफळींही निष्फळ देख । तैसे उत्तम लोक भजनेंवीण ॥३३॥ ते स्थिति नाहीं उद्धवापासीं । उत्तम जन्म यादववंशीं । सभासदता आल्याही हातासी । श्रीमदासी भुलेचिना ॥३४॥ झालियाही राज्यसंपत्ती । जो विसंबेना भगवद्भक्ती । भागवतमुख्यत्वाची प्राप्ती । त्यासीच निश्चितीं महाराजा ॥३५॥ सगुण सुंदर पतिव्रता । अनुकूळ मिळालिया कांता । जो विसंबेना भगवत्पथा । भागवतमुख्यता त्या नांव ॥३६॥ इंहीं गुणीं अतियुक्त । विवेकेंसीं अतिविरक्त । श्रीकृष्णचरणीं अनुरक्त । मुख्य भागवत उद्धवू ॥३७॥ वयें धनें जें श्रेष्ठपण । तें श्रेष्ठत्व अतिगौण । भगवत्प्राप्ती ते श्रेष्ठ जाण । तेणें भाग्यें परिपूर्ण उद्धवू ॥३८॥ जो श्रीकृष्णाचा विश्वासी । श्रीकृष्ण एकांत करी ज्यासी । गुण ज्ञान सांगे ज्यापाशीं । त्याच्या भाग्यासी केवीं वानूं ॥३९॥ परब्रह्म जें कां साक्षात । जें उद्धवासी झालें हस्तगत । त्याच्या बोलामाजीं वर्तत । भाग्यें भाग्यवंत तो एक ॥४०॥ उद्धवभाग्य वानित वानित । शुक झाला सद्गदित । स्वानंदें वोसंडला तेथ । ठेला तटस्थ महासुखें ॥४१॥ उद्धवभाग्याचा उद्रेक । सांगतां वोसंडला श्रीशुक । तें देखोनि कुरुनायक । जाहला आत्यंतिक विस्मित ॥४२॥ ज्याचें निजभाग्य सांगतां । श्रीशुकासी होतसे अवस्था । उद्धव भाग्याचा तत्त्वतां । मजही सर्वथा मानला ॥४३॥ तंव शुक म्हणे रायासी । परम भाग्य तें उद्धवासी । तेणें विनवितां हृषीकेशी । वचनमात्रेंसीं तुष्टला ॥४४॥ उद्धवासी शांतीची चाड । तो प्रश्न श्रीकृष्णांसी झाला गोड । त्याचें पुरवावया कोड । निरुपण वाड सांगेल ॥४५॥ परम शांतीचा अधिकारी । तूंचि एक निजनिर्धारीं । ऐसें उद्धवप्रेमपुरस्करीं । शांति श्रीहरि सांगत ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

श्रीभगवानुवाच - बार्हस्पत्य स वै नात्र साधुर्वै दुर्जनेरितैः । दुरुक्तैर्भिन्नमात्मानं यः समाधातुमीश्वरः ॥२॥

उद्धवा तू जें बोलिलासी । मीही सत्य मानीं त्यासी । दुर्जनीं केल्या अपमानासी । सहावया कोणासी शांति नाहीं ॥४७॥ देव पादुका वाहती शिरसीं । मुख्य इंद्र लागे ज्याच्या पायांसीं । अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी । ब्रह्मज्ञान ज्यापाशीं वचनांकित ॥४८॥ ऐसा देवगुरु बृहस्पती । त्याचा शिष्य तूं विवेकमूर्ती । यालागीं शांतीच्या साधक युक्ती । तूंचि निश्चितीं जाणसी ॥४९॥ शांति आकळावया उद्धवासी । आदरें सत्कारी हृषीकेशी । अनुमोदूनि त्याचे बोलासी । शुद्ध शांतीसी हरि सांगे ॥५०॥ निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनीं केलिया अपमान । हें साहे तो ईश्वर जाण । निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥५१॥ ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ बाणलीसे तत्त्वतां । तो दुर्जनाचिया आघाता । साहे सर्वथा यथासुखें ॥५२॥ जो स्वयें होय अवघें जग । त्यासी लागतां उपद्रव अनेग । उठेना क्रोधाची लगबग । साहे अनुद्वेग यथासुखें ॥५३॥ निजांगीं लागतां निजकर । नुठी क्रोधद्वेषांचा उद्गार । निजात्मता जो देखे चराचर । शांति त्याचें घर स्वयें रिघे ॥५४॥ उद्धवा ऐसा ज्यासी निजबोधू । त्यासी म्हणिजे सत्य साधू । तोचि साहे पराचा अपराधू । शांतिशुद्ध तो एक ॥५५॥ नेणोनिया निजबोधातें । इतर जे सज्ञान ज्ञाते । ते न साहती द्वंद्वातें । ऐक तूतें सांगेन ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

न तथा तप्यते विद्धः पुमान्बाणैः सुमर्मगैः । यथा तुदनित मर्मस्था ह्मसतां परुषेषवः ॥३॥

तिख्याचे अतितिख बाण । जेणें घायें होती विकळ प्राण । त्याहूनि दुर्जनाचे वाग्बाण । अधिक जाण रुपती ॥५७॥ लोहाचे बाण जेथ लागती । तेचि अंगें व्यथित होती । परी वाग्बाणांची अधिक शक्ती । घायें भेदिती पूर्वज ॥५८॥ लोहबाणाचे लागलिया घाये । ते पानपाल्या व्यथा जाये । परी वाग्बाण रुपल्या पाहें । तें शल्य राहे जन्मांत ॥५९॥ वर्मस्पर्शाचें बासटें जाण । विंधितां निंदेचे वाग्बाण । तेणें भेदितांचि अंतःकरण । सर्वांगीं पूर्ण भडका उठी ॥६०॥ दुर्जनाचिया दुरुक्ती । अपमानाची उद्धती । साहावयालागीं शांती । नव्हे निश्चितीं प्राकृतां ॥६१॥ ऐशिया रीतीं यथोचित । उद्धवाचें मनोगत । संलक्षूनि श्रीकृष्णनाथ । शांतीचा निश्चितार्थ सांगों पाहे ॥६२॥ पूर्वी सांगीतलें निजशांतीसी । वेगीं साधीं म्हणे उद्धवासी । ते अटक वाटेल तयासी । अतिसंकोचासी पावेल ॥६३॥ होतें उद्धवाचे मानसीं । हे शांति असाध्य सर्वांसी । जाणोनियां हृषीकेशी । सांगे इतिहासेंसीं भिक्षुगीत ॥६४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

कथयन्ति महत्पुण्यमितिहासमिहोद्धव । तमहं वर्णयिष्यामि निबोध सुसमाहितः ॥४॥

अशांतिक्षोभाचे चित्तमळ । क्षाळावया जी तत्काळ । इतिहासगंगा केवळ । अतिनिर्मळ कृष्णोक्ति ॥६५॥ श्रीकृष्णवदनब्रह्माद्रीं । श्रीभागवतऔदुंबरीं । जन्मली शांतिगोदावरी । निजमूळाकारीं निर्मळ ॥६६॥ ते गुप्त ओघें नारदगती । उद्धवगंगाद्वारीं व्यासोक्ती । तेचि शुकमुखकुशावर्ती । प्रकटे अवचितीं पवित्रपणें ॥६७॥ तया पवित्र ओघाचिये गती । श्रद्धाधृती समरसे भक्ती । त्याचि अरुणा वरुणा सरस्वती । हे संगमप्राप्ती जेथ होय ॥६८॥ तेणें शांतिगंगेची स्थिती । भरुनि उथळे अतिउन्नती । तेथ श्रवणार्थी बुडी देती । ते पवित्र होती निजक्षम ॥६९॥ ते शांतिगंगा अतिविख्यात । उद्धव करावया पुनीत । प्रकट करी श्रीकृष्णनाथ । भिक्षुगीतविन्यासें ॥७०॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

केनचिद्भिक्षुणा गीतं परिभूतेन दुर्जनैः । स्मरता घृतियुक्तेन विपाकं निजकर्मणाम् ॥५॥

उद्धवा कोणी एक संन्यासी । दुर्जनीं उपद्रवितां त्यासी । म्हणे क्षयो होय दुष्टकर्मासी । येणें संतोषें मानसीं क्षमावंत ॥७१॥ आपुले अंगींचे मळ । पुढिलीं क्षाळितां सकळ । जो क्रोधेंसीं करी तळमळ । तो मूर्ख केवळ आत्मघाती ॥७२॥ लोक म्हणती ज्यासी दुर्जन । संन्यासी म्हणे ते माझे स्वजन । माझे दोषांचें निर्दळण । यांचेनि धर्में जाण होतसे ॥७३॥ संमुख कोणी निंदा करिती । तेणें अत्यंत सुखावे चित्तीं । म्हणे मज तुष्टला श्रीपती । पापाची निष्कृती सहजें होय ॥७४॥ ऐसेनि विवेकें तत्त्वतां । शांतीसी ढळों नेदी सर्वथा । चढोनि निजधैर्याचे माथां । गायिली गाथा ते ऐक ॥७५॥ उद्धवासी म्हणे श्रीकृष्णनाथा । ये अर्थी होईं सावचित । अतिलोभी तो अतिविरक्त । झाला तो वृत्तांत सांगेन ॥७६॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

अवन्तिषु द्विजः कश्चिदासीदाढयतमः श्रिया । वार्तावृत्तिः कदर्यस्तु कामी लुब्धोऽतिकोपनः ॥६॥

मालवदेशीं अवंतिनगरीं । तेथ ब्राह्मण वसे गृहद्वारीं । कृषिवाणिज्यवृत्तीवरी । जीविका करी निरंतर ॥७७॥ गांठीं धनधान्यसमृद्धी । अमर्याद द्रव्यसिद्धी । परी अतिशयें कृपणबुद्धी । पोटाही त्रिशुद्धी न खाय ॥७८॥ पोटा सदा खाय कदन्न । तेंही नाहीं उदरपूर्ण । तेथ स्त्रीपुत्रादि दासीजन । जठरतर्पण न पावती ॥७९॥ न करी नित्यनैमित्य । स्वप्नीं नेणे धर्मकृत्य । देव ब्राह्मण अतिथी तेथ । सदा जात पराङमुख ॥८०॥ कवडी एक लाभू पाहे । तैं मातापित्यांचें श्राद्ध आहे । तें सांडूनि अंत्यजगृहा जाये । न मनी भये स्पर्शाचें ॥८१॥ मी उत्तम हा हीनवर्ण । हे धनलोभें गिळी आठवण । हाता येतां देखोनि धन । स्वीकारी अन्न पतिताचें ॥८२॥ धनकामासाठीं देख । न मनी पाप महादोख । कवडीच्या लोभें केला मूर्ख । नाठवे नरकमहापातू ॥८३॥ यापरी तो कर्मभ्रष्ट । अकर्म करी क्रियानष्ट । अतिवंचक महाशठ । केवळ नष्ट धनलोभी ॥८४॥ त्या धनलाभाचा अवरोधू । होतां देखोनि खवळे क्रोधू । गोहत्यादि ब्रह्मवधू । करावया सिद्ध स्वयें होय ॥८५॥ धनकामीं क्रोधाची वस्ती । धनापाशीं पापें असती । धनलोभीं ज्यासी स्थिती । कदर्युवृत्ति त्या नांव ॥८६॥ ऐसें धन सांचिलें फाडोवाडें । त्याचाही व्यय जैं करणें पडे । तैं प्राणांतचि येऊनि घडे । विचार पुढें असेना ॥८७॥ वानराचे गालींचे चणे । हाता न येती जितां प्राणें । तैसा द्रव्याचा व्ययो करणें । तेंचि मरणें कदर्या ॥८८॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

ज्ञातयोऽतिथयस्तस्य वाडवात्रेणापि नार्चिताः । शून्यावसथ आत्माऽपि काले कामरैनर्चितः ॥७॥

घरींचा भात वेंचेल कांहीं । यालागीं वैश्वदेव करणें नाहीं । तेथ अतिथि आलिया पाहीं । कोणे समयीं कोण पूजी ॥८९॥ अतिथि आलिया जाण । ऐसे बोल बोले आपण । जे वचनमात्रें जाती प्राण । त्यासी मागे कोण अन्नोदक ॥९०॥ देखोनि त्याचिया घरासी । ब्रह्मचारी नित्य उदासी । आशा त्यजिली संन्यासीं । जेवीं राजहंसीं गोमय ॥९१॥ भिकारीं सांडिलें त्याचें द्वार । अतिथीं डावलिलें निरंतर । पाहुणा दूरी पाहे बिढार । निराशी पितर सर्वदा ॥९२॥ दारा न ये कोरान्नकर । घर सांडूनि गेले उंदिर । काउळीं वोसंडिलें तें घर । चिडियां साचार न मिळे दाणा ॥९३॥ मुंग्यांसी पडे नित्य लंघन । तिंही धरिलें बिढार आन । पोटा ना खाय जो आपण । तेथ कथा कोण इतरांची ॥९४॥ अत्यंत भूक लागल्या पोटीं । चणेही न खाय जगजेठी । तेथ कायसी सेवकांची गोठी । कावलीं पोटीं स्त्रीपुत्रें ॥९५॥ जैं वमन घडे त्यासी । तैं न करी फळाहारासी । अधिक वेंचू कोण सोशी । यालागीं उपवासी स्वयें पडे ॥९६॥ तेथ कुळगुरुचा सन्मान । कुळधर्म गोत्रभोजन । व्याही जांवई यांचा मान । धनलोभी जाण कदा न करी ॥९७॥ ऋतुकाळें फळें येती पूर्ण । त्यांसीं दृष्टिभेटी हाटीं जाण । परी जिव्हेसी आलिंगन । प्राणांतीं आपण हों नेदी ॥९८॥ मातेचें स्तनपान सेविलें । तेंचि क्षीर रसना चाखिलें । पुढें दूधचि वर्जिलें । व्रत धरिलें धनलोभें ॥९९॥ रस रसनेचें माहेर । तेणेंवीण ते गादली थोर । धनलोभ अतिनिष्ठुर । करितां करकर भेटों नेदी ॥१००॥ वस्त्रें मळकीं अतिजीर्ण । मस्तक सदा मलिन । मुखीं वास निघती जाण । स्वप्नींही पान न खाय ॥१॥ सण वार दिवाळी दसरा । तैं जुने जोंधळे धाडी घरा । अन्नेंविण पीडी लेंकुरां । कदर्यु खरा या नांव ॥२॥ धनलोभी धर्महीन । देखोनि कदर्युवर्तन । विमुख झाले स्वजन । तेंचि निरुपण हरि सांगे ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

दुःशीलस्य कदर्यस्य द्रुह्यन्ते पुत्रबान्धवाः । दारा दुहितरो भृत्या विषण्णा नाचरन् प्रियम् ॥८॥

नाहीं स्वधर्मी निजशीळ । दानधर्म खुडी सकळ । अत्यंत धनलोभी केवळ । त्यासी दुःशीळ बोलिजे ॥४॥ अन्नआच्छादनेंवीण । कुटुंबेसहित आपण । जो कदर्थवी निजप्राण । कदर्यु पूर्ण त्या नांव ॥५॥ कदर्यु नरासी तंव देख । मुख्य स्त्री होय विमुख । स्वजन आणि सेवक । पुत्रही पराङ्‌मुख होती त्यासी ॥६॥ आपले जे कां सखे बंधू । तेही करुं लागती विरोधू । द्रव्यविभागाचा संबंधू । कलह सुबद्धू आरंभे ॥७॥ गांठीं असोनि अमित धन । न करी माहेरसणबोळवण । कन्या क्षोभोनियां जाण । शाप दारुण त्या देती ॥८॥ गोत्रज सदा चिंतित । हा मरे तैं जेवूं दूधभात । आप्त ते झाले अनाप्त । अवघे अनहित वांछिती ॥९॥ जयाचिया द्रव्यासी जाण । नाहीं धर्माचें संरक्षण । तें काळेंचि होय क्षीण । तेंचि लक्षण हरि सांगे ॥११०॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

तस्यैवं यक्षवित्तस्य च्युतस्योभयलोकतः । धर्मकामविहीनस्य चुक्रुधुः पञ्चभागिनः ॥९॥

खाय ना जेवी ना लावी हात । ठेव्यापाशीं जैसें भूत । तैंसें याचें यक्षवित्त । असे राखत ग्रहो जैसा ॥११॥ केवळ धर्मकामरहित । धनलोभी जैसें भूत । त्या नांव बोलिजे यक्षवित्त । जीवाहून आप्त अर्थ मानी ॥१२॥ स्वशरीरीं भोग नाहीं जाण । तेणें इहलोक झाला शून्य । नाहीं स्वधर्मकर्म पंचयज्ञ । परलोक शून्य तेणें झाला ॥१३॥ यज्ञाचे पंच विभागी । यज्ञभाग न पवे त्यांलागीं । ते कोपोनियां पंचविभागीं । वित्तनाशालागीं उद्यत ॥१४॥ पावोनि ब्राह्मणजन्म वरिष्ठ । धनलोभें स्वधर्मनष्ट । तो होय उभय लोकीं भ्रष्ट । पावे कष्ट कृपणत्वें ॥१५॥ करितां अतिआयास । जोडला अर्थ बहुवस । त्यासी अधर्में आला नाश । तोही विलास हरि सांगे ॥१६॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

तदवध्यानविस्त्रस्तपुण्यस्कन्धस्य भूरिद । अर्थोऽप्यगच्छन्निधनं ब्रह्वायासपरिश्रमः ॥१०॥

पंचयज्ञदेवता सकळ । येणें उपेक्षिल्या केवळ । तिंहीं द्रव्यलाभाचें मूळ । पुण्यक्षयें तत्काळ छेदिलें ॥१७॥ द्रव्यप्राप्तिपुण्यदिवाकर । अस्तमाना गेला तो भास्कर । मग द्रव्यलाभाचा अंधकार । अधर्में थोर दाटला ॥१८॥ प्रयासें संचिली संपत्ती । तिसी अधर्मअंधाराची ये राती । क्षोभल्या पंचधा यज्ञमूर्ती । पंचधा पावती महानाश ॥१९॥ जो सुखी न करी कुटुंबालागीं । जो निजात्मा निववीना नाना भोगीं । जो द्रव्य न वेंची धर्मालागीं । त्यासी पंचविभागी ऊठती ॥१२०॥ दायाद चोर राजा आगी । अधर्में रोग संचरे अंगीं । हे पांचजण विभागी । द्रव्यनाशालागीं पावती ॥२१॥ नाहीं द्विजपूजा श्रद्धायुक्त । नाहीं लौकिकक्रिया उचित । नाहीं दानादि धर्म वेदोक्त । द्रव्यक्षयो तेथ आवश्यक ॥२२॥ जेथ नाहीं वडिलांसी सन्मान । जेथ नाहीं पंचमहायज्ञ । जेथ गुरुसीं करी अभिमान । तेथ क्षयो जाण उद्धवा ॥२३॥ ज्यांसी परांचा द्वेष सदा । जे बोलती परापवादा । जे चढती धनगर्वमदा । तेथ क्षयो सदा उद्धवा ॥२४॥ त्याच द्रव्यक्षयाचें लक्षण । ग्रंथाधारीं निरुपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । दयाळू पूर्ण निजभक्तां ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

ज्ञातयो जगृहुः किञ्चित् किञ्चिद्दस्यव उद्धव । दैवतः कालतः किञ्चिद्ब्रह्मबन्धोर्नृपार्थिवात् ॥११॥

स्त्री पुत्र होऊनि एक । तिंहीं ठेवा नेला कित्येक । गोत्रज मिळोनि सकळिक । बलात्कारें देख वांटा नेला ॥२६॥ चोरीं फोडोनियां घर । काढूनि नेलें भांडार । आगी लागोनियां घर । वस्तु अपार जळाल्या ॥२७॥ हिंसाळ्यानें गेलें शेत । प्रवर्त बुडाला जेथींचा तेथ । विश्वासू ठेवा घेऊनि जात । खतखूत हारपलें ॥२८॥ भांडीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारुं बुडे । पातिकरावरी घाला पडे । चहूंकडे अपावो ॥२९॥ ठक येऊनि एकांतीं । मुलाम्याचीं नाणीं देती । धनलोभाचे काकुळती । हातींची संपत्ती त्यांसी दे ॥१३०॥ स्वचक्रपरचक्रविरोधधाडी । खणती लावूनि घर फोडी । तळघरींचे ठेवे काढी । भरोनि कावडी धन नेती ॥३१॥ पाणी रिघे पेंवाआंत । तेणें धान्य नासे समस्त । धटू झोंबोनि हरी शेत । दैवहत तो झाला ॥३२॥ गोठणीं सेणयां रोगू पडे । निमाले गायीम्हशींचे वाडे । उधारें नेले ठाणबंदी घोडे । तो रणीं पडे महायुद्धीं ॥३३॥ भूमिनिक्षेप जे करुं जाती । ते आपणियाकडे धूळी ओढिती । तेथ घालूनि निजसंपत्ती । तोंडीं माती स्वयें घाली ॥३४॥ बुद्धि सांगती वाड वाड । येथूनि तोंडीं घाला दगड । ऐसे ठेवे बुजिले दृढ । त्याची चाड धरुं गेला ॥३५॥ ठेवे ठेविले जे अनेक । ते पृथ्वीनें गिळिले निःशेख । भाग्य झालें जैं विमुख । झाले अनोळख ते ठाय ॥३६॥ अधर्में अदृष्ट झालें क्षीण । विपरीत भासे देहींचें चिन्ह । पालटला निजवर्ण । ब्राह्मपण लक्षेना ॥३७॥ देखे तो पुसे ज्ञाति कोण । तो सांगे जरी मी ब्राह्मण । ऐक त्याचें न मनी मन । वर्णाग्रपण मावळलें ॥३८॥ एवं निःशेष नासलें धन । ब्रह्मवर्चस्व गेलें जाण । म्लानवदन हीनदीन । खेदखिन्न अतिदुःखी ॥३९॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

स एवं द्रविणे नष्टे धर्मकामविवर्जितः । उपेक्षितश्च स्वजनैश्चिन्तामाप दुरत्ययाम् ॥१२॥

गेलें शेत निमाली कुळवाडी । घर पाडिलें परचक्रधाडीं । धन नासलें नाहीं कवडी । अधर्माचे जोडी हे दशा ॥१४०॥ नाहीं स्वधर्मकर्म ना दान । विहित भोग न करी आपण । त्या धनलोभ्याचें नासलें धन । जेवीं कां स्वप्न रंकाचें ॥४१॥ दैव झालें पराङ्‌मुख । त्या हतभाग्याची दशा देख । स्त्रीपुत्रें झालीं विमुख । तिंहीं निःशेख दवडिला ॥४२॥ ऐक धनलोभाच्या ठायीं । इष्ट मित्र पूर्वीचि नाहीं । गोत्रजांसी त्याचें सुख कायी । दवडिला पाहीं उपेक्षितू ॥४३॥ निंदा प्रत्यक्ष करिती लोक । रांडा पोरें थुंकती देख । खावया नाहीं निःशेख । मागतां भीक मिळेना ॥४४॥ भिकेलागीं जेथ जेथ गेला । म्हणती काळमुखा येथें कां आला । होता धनलोभें भुलला । भला नागविला ईश्वरें ॥४५॥ यापरी धिक्कारिती लोक । धन जाऊनि झाला रंक । चिंतावतीं पडला देख । दुःखें महादुःख पावला ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

तस्यैवं ध्यायतो दीर्घं नष्टरायस्तपस्विनः ॥ खिद्यतो बाष्पकण्ठस्य निर्वेदः सुमहानभूत् ॥१३॥

धनलोभ्याचें गेलें धन । धनासवें न वचेचि आठवण । तें आठवतां फुटताहे मन । तळमळी जाण अतिदुःखें ॥४७॥ कांटा रुतल्या भुजंगकपाळीं । पुच्छ तुटल्या सापसुरळी । हो कां जळावेगळी मासोळी । तैसा तळमळी अतिदुःखें ॥४८॥ मनें आठवितांचि धन । हृदयीं चालिलें स्फुंदन । अश्रुधारा स्त्रवती नयन । मूर्च्छापन्न क्षणक्षणां ॥४९॥ पोटीं दुःखें अति चरफडे । धाय मोकलूनियां रडे । उठे बैसे पाहे पडे । लोळे गडबडे आरडत ॥१५०॥ मग म्हणे रे कटकटा । झालों एक वेळ करंटा । अहा विधायता दुष्टा । काय अदृष्टा लिहिलेंसी ॥५१॥ मज ठावो नाहीं कोणीकडे । विचार संभवेना पुढें । अतिदुःख आलें जी रोकडें । तेणें विचारें रडे महादुःखी ॥५२॥ हें अल्पदुःख पावलों येथें । पुढें थोर दुःख आहे मातें । यम दंडील निष्ठुर घातें । कोण तेथें सोडवी ॥५३॥ म्यां नाहीं दीधलें दान । मी नाहीं स्मरलों नारायण । मज येती नरक दारुण । तेथ कोण सोडवी ॥५४॥ म्यां नाहीं केले पंचमहायज्ञ । नाहीं दीधलें अतिथींसी अन्न । नाहीं केलें पितृतर्पण । माझें दुःख कोण निवारी ॥५५॥ म्यां नाहीं केले पंचमहायज्ञ । नाहीं दीधलें अतिथींसी अन्न । नाहीं केलें पितृतर्पण । माझें दुःख कोण निवारी ॥५५॥ म्यां नाहीं केली द्विजपूजा । नाहीं भजलों अधोक्षजा । नाहीं वंदिलें वैष्णवरजा । माझे दुःखसमाजा कोण नाशी ॥५६॥ मी सर्वथा अकर्मकारी । बुडालों बुडालों अघोरीं । धांव पाव गा श्रीहरी । मज उद्धरीं दीनातें ॥५७॥ कृष्णा माधवा मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी । गरुडध्वजा गोवर्धनधारी । मज उद्धरीं दीनातें ॥५८॥ तुवां रक्षिलें प्रल्हादासी । अंबरीषासी गर्भवासीं । उदरीं राखिलें परीक्षितासी । तैसें मज दीनासी उद्धरीं ॥५९॥ तुवां तारिलें अहल्येसी । उद्धरिलें नष्टा अजामिळासी । उडी घातली गजेंद्रासी । तेणें वेगेंसी मज तारीं ॥१६०॥ महादोषांची श्रेणी । नामें तारिली कुंटिणी । तेणें लाघवें चक्रपाणी । मज दुष्टालागोनी उद्धरीं ॥६१॥ जळो जळो हा धनकाम । गेलें वृथा माझें जन्म । फुकाचें जें रामनाम । तें मी अधम न म्हणेंचि ॥६२॥ रामनामाच्या प्रतापासाठीं । जळती महापापांच्या कोटी । थोर अधम मी एक सृष्टीं । नाम वाक्पुटीं न म्हणेंचि ॥६३॥ ऐसा मानोनि अपराध । अनुतापें करितां खेद । उपजला अतिनिर्वेद । तेंचि गोविंद स्वयें सांगे ॥६४॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

स चाहेदमिदं कष्टं वृथाऽऽत्मा मेऽनुतापितः । न धर्माय न कामाय यस्यार्थायास ईदृशः ॥१४॥

हात चुरुनि म्हणे कटकटा । ब्राह्मणदेहो मोक्षाचा वांटा । तो लाहोनि मी अतिकरंटा । धनलोभचेष्टा नाडलों ॥६५॥ जेणें देहें लाभे मोक्षसुख । त्या देहासी म्यां दीधलें दुःख । धनलोभी मी परम मूर्ख । मजऐसा आणिक असेना ॥६६॥ न वेंचितां धर्मकामासी । अर्थ जोडिला सायासीं । त्या अर्थाची दशा ऐसी । अतिदुःखेंसीं मज फळला ॥६७॥ बाप धनलोभाचें कवतिक । नाहीं इहलोक ना परलोक । थितें अंतरलें मोक्षसुख । भोगवी नरक अनिवार ॥६८॥ देखें ज्या नरकाचे ठायीं । आकल्प बुडतां ठावो नाहीं । धनलोभ घाली तैसें ठायीं । तें म्यां नरदेहीं जोडिलें ॥६९॥ तो जन्मला ब्राह्मणदेहीं । तो पूज्य होय लोकीं तिहीं । मोक्ष लागे त्याच्या पायीं । म्यां अभाग्यें तोही नाशिला ॥१७०॥ लोभें जें धन संचिलें । तें निःशेष नासोनि गेलें । परी मजलागीं अतिदुःखी केलें । बांधोनि दीधलें महानरका ॥७१॥ उत्तम देहो झाला प्राप्त । तो धनलोभें केला व्यर्थ । आयुष्य गेलें हातोहात । अतिसंतप्त अनुतापें ॥७२॥ धनलोभींचे अचाट । वृथा गेले माझे कष्ट । वैराग्य उपजलें उद्भट । अतिचोखट सविवेक ॥७३॥ धनलोभी जो कां नर । तो सकळ दुःखांचें भांडार । धनबद्धक तो पामर । स्वमुखें साचार निंदीत ॥७४॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

प्रायेणार्थाः कदर्याणां न सुखाय कदाचन । इह चात्मोपतापाय मृतस्य नरकाय च ॥१५॥ प्रायशा जे धनबद्धक । त्यांसी इहलोकीं नाहीं सुख । धनरक्षणीं अतिदुःख । तें जातां देख प्राणान्त ॥७५॥ धनागमनीं अतिकष्ट । धनरक्षणीं कलह श्रेष्ठ । धननाशें होय हृदयस्फोट । इहलोकीं कष्ट धनलोभ्या ॥७६॥ यापरी इहलोकीं दुःख । अधर्में खुंटला परलोक । मरतां उरीं आदळे नरक । आवश्यक धनलोभ्या ॥७७॥ जो धर्म करीना स्वयें न खाये । जो मजसारिखा कदर्यु होये । त्यासी चढतें वाढतें दुःख पाहें । नाहीं सुखसोये कदर्या ॥७८॥ लोभाची वस्ती जिये ठायीं । तेथ स्वप्नींही सुख नाहीं । लोभ अतिशयें निंद्य पाहीं । तें आपण स्वमुखेंही सांगत ॥७९॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

यशो यशस्विनां शुद्धं श्लाघ्या ये गुणिनां गुणाः । लोभः स्वल्पोऽति तान् हन्ति श्वित्रो रुपमिवेप्सितम् ॥१६॥

रणीं पडतां मुख्य धुरेसी । जो अंगें विभांडी त्या रणीसी । खांदीं वाऊनि आणी रायासी । येवढी कीर्ति ज्यासी जोडली ॥१८०॥ लोभ संचरोनि त्यापाशीं । एक शेत मागवी रायासी । तेचि अपकीर्ति होय त्यासी । जग उपहासी मूर्खत्वा ॥८१॥ त्यासी न मागतां राजा जाण । करुं पाहे आपणासमान । त्यासी लोभें आणोनि नागवण । मूर्खपण स्थापिलें ॥८२॥ स्वयें करितां कन्यादान । सकळ कुळ होय पावन । तेथेंही लोभें घेतां धन । अधःपतन धनलोभिया ॥८३॥ दाता देऊनियां दान । दानप्रसंगें उपार्जी धन । तेंचि दात्यासी दूषण । लोभ लांछन दानासी ॥८४॥ वेदशास्त्रें करुनि पठण । पंडित झाले अतिसज्ञान । तेही धनलोभें छळिले जाण । ज्ञानाभिमान प्रतिष्ठे ॥८५॥ देहप्रतिष्ठेचिये सिद्धी । पंडित-पंडितां वादविधी । नाना छळणोक्ती विरोधीं । ठकिले त्रिशुद्धी ज्ञाते लोभें ॥८६॥ सविवेक सज्ञान ज्ञात्यासी । लोभ आणी निंदास्पदासी । इतरांची गति काइसी । ते लोभाची दासी होऊनि ठाती ॥८७॥ लोभ शुद्धीसी करी अशुद्ध । लोभ तेथ निंदास्पद । तोचि दृष्टांत विशद । ऐक प्रसिद्ध सांगत ॥८८॥ कुलशील अतिसुकुमार । रुपें सर्वांगमनोहर । नाकीं श्वेतता अणुमात्र । निंद्य सुंदर तेणें होय ॥८९॥ तेवीं अल्पही लोभाची जे वस्ती । नाशी गुणौदार्ययशःकीर्ती । लोभाऐसा त्रिजगतीं । कर्ता अपकीर्ती आन नाहीं ॥१९०॥ धनलोभीं सदा विराधू । धनलोभ तोडी सखे बंधू । धनलोभाऐसा नाहीं बाधू । अतिअशुद्धू आणिक असेना ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

अर्थस्य साधने सिद्ध उत्कर्षे रक्षणे व्यये । नाशोपभोग आयासस्त्रासश्चिन्ता भ्रमो नृणाम् ॥१७॥

प्रथम शिणावें द्रव्य जोडितां । दुसरें शिणावें तें वाढवितां । द्रव्य जरी झालें उत्कर्षतां । तरी लोभ सर्वथा पुरे न म्हणे ॥९२॥ द्रव्यालागीं भावार्थतां । जैसी कष्टती सर्वथा । तैसा जरी कष्टे परमार्था । तैं ब्रह्म तत्त्वतां खेळणें होय ॥९३॥ एवं कष्टीं जोडल्या द्रव्यासी । रक्षणीं अतिचिंता मानसीं । अतिशय लागली जीवासी । अहर्निशीं धुकधुकी ॥९४॥ स्त्री पुत्र हो माता पिता । त्यांसी पातिजेना सर्वथा । आपणाहूनि परता । विश्वासू अर्था मानेना ॥९५॥ विसरोनियां निजघाता । चोरापासोनि राखे वित्ता । वित्तरक्षणीं निजचिंता । तिन्ही अवस्था एकाग्र ॥९६॥ ऐसी एकाग्रता करुनी । जरी लागता भगवद्भजनीं । तरी वश्य होता चक्रपाणी । अर्धक्षणीं साधका ॥९७॥ उचितानुचित विवाहासी । द्रव्य वेंचितां उदरासी । अतिशय होय कासाविसी । धनव्ययो त्रासासी उपजवी ॥९८॥ एवं जोडूनि रक्षितां द्रव्यासी । अवचटें नाश होय जैं त्यासी । ते अतिभ्रम चढे मानसीं । होती धनपिशीं बद्धक ॥९९॥ द्रव्यार्जनीं वसे प्रयास । द्रव्यरक्षणीं चिंतेचा वास । द्रव्यव्ययीं वळसा त्रास । भ्रमाचा रहिवास धननाशीं ॥२००॥ आदिमध्यावसानीं पाहीं । द्रव्य तें समूळ अपायी । तेथ सुखाचा लेश नाहीं । हें ऐसें पाहीं मज जाहलें ॥१॥ आयास-त्रास-चिंतेसहित । धनापाशीं भ्रम नांदत । अर्थ तितुका अनर्थयुक्त । तोचि अर्थ स्वयें सांगे ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

स्तेय हिंसाऽनृतं दम्भः कामः क्रोधः स्मयो मदः । भेदो वैरमविश्वासः संस्पर्धा व्यसनानि च ॥१८॥

अर्थ सर्वांगें अनर्थभूत । हें माझें वचन त्रिसत्य । पृथ्वीमाजीं जे जे अनर्थ । ते ते अर्थांत उपजती ॥३॥ पुसाल अर्थीचे अनर्थ । ते सांगतां असंख्य अनंत । संक्षेपें सांगेन येथ । पंधरा अनर्थ अर्थासी ॥४॥ प्रथम अनर्थ अर्थासी । चोरी वसे अर्थापाशीं । अर्थु नाहीं गा जयापाशीं । चोरापासून त्याची भय नाहीं ॥५॥ द्रव्य नाहीं ज्याच्या हातीं । त्यातें देखोनि चोर भिती । कांहीं मागेल आम्हांप्रती । म्हणोनि लपती त्या भेणें ॥६॥ अतर्क्य नेत्रांतरें नेणें । कां धातुवादें सर्वस्व घेणें । परस्व भोळ्यांनीं बुडवणें । कां विजनीं हरणें सर्वस्व ॥७॥ मार्गीं पडलें धन पराचें । स्वयें जाणोनि अमकियाचें । नाहीं देणें त्यासी साचें । हेंही चोरीचें लक्षण ॥८॥ स्वर्णस्तेयें नरकप्राप्ती । ऐसे विवेकीही चोरी करिती । मा इतरांची कायशी गती । चोरीची वस्ती धनापाशीं ॥९॥ जगीं महापापिणी चोरी । तीस कोणी बैसों नेदी द्वारीं । ते राहिली सुवर्णामाझारीं । धन तेथ चोरी निश्चित ॥२१०॥ देखतांचि त्या धनासी । विकल्पी होती संन्यासी । इतरांची कथा काइसी । चोरी धनापाशीं स्वयें नांदे ॥११॥ प्रथम अनर्थलक्षण । धनापाशीं चोरी जाण । धन हिंसेचें आयतन । तेंही निरुपण अवधारीं ॥१२॥ धनालागीं द्वंद्व दारुण । पुत्रपौत्र मारिती जाण । धनालागीं घेती प्राण । सुहृदपण सांडोनी ॥१३॥ धनलोभाचें कवतिक । कन्या बापासी देतसे विख । पितृघाताचें न मानी दुःख । निष्ठुर देख धनलोभ ॥१४॥ धनलोभी सांडी बापमाये । स्त्री घेऊनि वेगळा राहे । तेथही धनलोभ पाहें । वैर होये स्त्रीपुरुषां ॥१५॥ धनलोभाची नवलपरी । पुत्र पित्यातें जीवें मारी । पिता पुत्रातें संहारी । कठिण भारी धनलोभ ॥१६॥ जे नवमास आहे उदरांत । जे सदा सोशी नरकमूत । ते मातेचा करी घात । द्रव्यानिमित्त निजपुत्र ॥१७॥ अभिनव धनलोभाची त्राय । नवल तें मी सांगों काय । पोटींचा पुत्र मारी माय । ऐसा अनर्थ होय धनासाठीं ॥१८॥ एवं हिंसा ते हे संपूर्ण । दुसरें अनर्थलक्षण । आतां असत्याचें विंदान । तेंही निरुपण स्वयें सांगे ॥१९॥ असत्य जन्मलें अर्थाच्या पोटीं । अर्थबळें तें दाटुगें सृष्टीं । अर्थासवें असत्य उठी । असत्याची गांठी अर्थेंसीं ॥२२०॥ तो अर्थ असे जयापाशीं । कां अर्थअपेक्षा जयासी । तेथ असत्य वसे कुटुंबेंसीं । धन तें मिरासी मिथ्यात्वीं ॥२१॥ अर्थबळ थोर असत्यासी । मिथ्या बोलवी बापासी । धनलोभें झकवी मातेसी । सत्यत्व धनापाशीं असेना ॥२२॥ क्रयविक्रयीं धनलोभें जाण । मिथ्या बोलती साधारण । परी वेदशास्त्रसंपन्न । धनार्थ सज्ञान बोलती मिथ्या ॥२३॥ वेदींचा आठव न ये पूर्ण । तो संभावनेलागीं जाण । म्हणवी मी वेदसंपन्न । करावया यजन नीचाचें ॥२४॥ भाग देऊनि मध्यस्था । मी चतुःशास्त्रीं विख्याता । ऐसें मिथ्यात्वें छळी पंडिता । राजद्रव्यार्थालागुनी ॥२५॥ विरक्त म्हणविती परमार्थी । तेथही असत्यें घातली वस्ती । नाथिल्या सिद्धि दाविती । अर्थप्राप्तीलागोनी ॥२६॥ अर्थी असत्याचा बडिवारु । सद्भावें केला जो सद्गुरु । त्यासी मिथ्या नास्तिक विचारु । एकान्तीं नरु प्रतिपादी ॥२७॥ अर्थ नाहीं जयापाशीं । ना अर्थकल्पना जयासी । असत्य स्पर्शेना तयासी । कदाकाळेंसीं कल्पांतीं ॥२८॥ अर्थापाशीं असत्य जाण । त्याचें सांगीतलें लक्षण । आतां अर्थापाशीं दंभ संपूर्ण । तेही वोळखण अवधारीं ॥२९॥ पोटीं नाहीं परमार्थ । धरोनियां अर्थस्वार्थ । स्वयें म्हणविती हरिभक्त । या नांव निश्चित भजनदंभू ॥२३०॥ धन जोडावयाकारणें । टिळे माळा मुद्रा धारणें । धनेच्छा उपदेश देणें । या नांव जाणणें दीक्षादंभू ॥३१॥ देखोनि धनवंत थोरु । त्याचे उपदेशीं अत्यादरु । नेमूनि गुरुपूजाकरभारु । सांगे मंत्रू तो दांभिक ॥३२॥ जयांपासोनि होय अर्थप्राप्ती । ते समर्थ शिष्य आवडती । दीन शिष्यातें उपेक्षिती । हे दांभिकस्थिती गुरुत्वा ॥३३॥ गुरुसी द्यावें तनु मन धन । ऐसें उपदेशूनि जाण । जो द्रव्य संग्रही आपण । तें दांभिकपण गुरुत्वा ॥३४॥ जेथ धनलोभ गुरुपाशीं । तो काय तारील शिष्यासी । धनलोभाची जाती ऐसी । करी गुरुत्वासी दांभिक ॥३५॥ आखाडभूतीऐसा जाण । गुरुपाशील न्यावया धन । उपदेश घे होऊनि दीन । तो दांभिक जाण शठ शिष्य ॥३६॥ गुरुपदेशें शिकोनि युक्ती । स्वयें ज्ञानाभिमाना येती । गुरुतें मानी प्राकृतस्थिती । तोही निश्चितीं दांभिकू ॥३७॥ मी एक सधन सज्ञान । ऐसा सूक्ष्मरुप ज्ञानाभिमान । करी गुरुआज्ञेचें हेळण । हेंही लक्षण दंभाचें ॥३८॥ अहं ब्रह्म हेही स्फूर्ती । न साहे जेथ स्वरुपस्थिती । तेथ मी ज्ञाता हे धोंगडी युक्ती । स्फुरे निश्चितीं सूक्ष्मदंभें ॥३९॥ जीवासी देहाचें मध्यस्थान । तेथ दंभाचें अधिष्ठान । त्यासी मिळोनियां मन । ज्ञानाभिमान उपजवी ॥२४०॥ नवल दंभाचें कवतिक । आम्ही अग्निहोत्री याज्ञिक । तेचि जीविका करुनि देख । नाडले वेदपाठक धनलोभें ॥४१॥ सोडोनि परमार्थाची पोथी । ब्रह्मज्ञान सांगे नाना युक्तीं । तेही ज्ञाते दंभें नाडिजेती । द्रव्यासक्ती धनलोभें ॥४२॥ मंत्रतंत्रांची कथा कोण । मुख्य गायत्री वेंचिती ब्राह्मण । आम्ही स्वधर्मनिष्ठापावन । म्हणती जन दांभिक ॥४३॥ दंभें नाडिले संन्यासी । लौकिक राखणें पडे त्यांसी । ज्यालागीं मुंडिले शिसीं । त्या अर्थासी विसरले ॥४४॥ दृष्टि सूनि अन्नसन्मान । संन्यासी करिती शौच स्नान । शुद्ध न करवेचि निजमन । वादव्याख्यान अतिदंभें ॥४५॥ घ्यावया परद्रव्य परान्न । कां देहप्रतिष्ठेलागीं जाण । मिथ्या दाखवी सात्त्विकपण । हें दंभलक्षण पैं चौथें ॥४६॥ द्रव्यापाशीं वसे काम । अतिशयें अतिदुर्गम । द्रव्य तेथ कामसंभ्रम । अतिविषम सांगात ॥४७॥ द्रव्य नसतां अपेक्षाकाम । तो सबाह्य करवी अतिश्रम । अनेक कष्टांचें विषम । अतिदुर्गम भोगवी ॥४८॥ धन झालिया उन्मादकाम । करुं लागे अगम्यागम । उपजवी नाना अधर्म । निंद्य कर्म धनवंता ॥४९॥ कामु जडलासे धनेंसीं । तो सदा छळी धनवंतासी । काम खवळे धनापाशीं । अहर्निशीं मुसमुशित ॥२५०॥ धनापाशीं अति उद्धतू । काम पांचवा अनर्थू । काम तेथ निश्चितू । क्रोध नांदतू सैन्येंसीं ॥५१॥ कामप्राप्तीसी आडवी काडी । होतां क्रोधाची पडे उडी । खवळला अति कडाडी । तपाच्या कोडी निर्दाळित ॥५२॥ जप तप निष्ठा नेम । शिणोनि साधलें दुर्गम । क्रोध अति खवळल्या परम । ते करी भस्म क्षणार्धें ॥५३॥ धनाकडे कोणी दावी बोट । तेथ क्रोध उठी अचाट । वाढवी प्राणान्त कचाट । क्रोध अतिदुष्ट धनेंसीं ॥५४॥ धनागमनीं अवरोधू । कां धनव्ययाचा संबंधू । ते संधीं खवळे क्रोधू । अतिविरोधू उन्मत्त ॥५५॥ धनापाशीं क्रोध समर्थू । हा सहावा अतिअनर्थू । धनापाशीं गर्व अद्भुतू । तेंचि निश्चितू सांगत ॥५६॥ धनगर्वाचिये पुष्टी । सखा बाप नाणी दृष्टी । मातेतें म्हणे करंटी । इतरांच्या गोष्टी त्या काय ॥५७॥ सिद्ध साधक तापसी । त्यांतें देखोनि उपहासी । म्हणे करंटे ते होती संन्यासी । हरिदासासी विटावी ॥५८॥ अंगीं धनाचें समर्थपण । त्याहीवरी जैं झालें ज्ञान । तैं गर्वाचा ताठा चढे पूर्ण । जेवीं घारें धारणू गिळिला ॥५९॥ धनज्ञानगर्वाची जाती कैसी । गर्व करी सद्गुरुसी । त्याच्या वचनातें हेळसी । शेखीं धिक्कारेंसीं निर्भर्त्सी ॥२६०॥ धनज्ञानगर्वाचें लक्षण । देखे सद्गुरुचे अवगुण । गुरुसी ठेवी मूर्खपण । मी एक सज्ञान हें मानी ॥६१॥ जो भ्रांत म्हणे सद्गुरुसी । गुरु मानी त्यातें द्वेषी । बाप गर्वाची जाती कैशी । देखे गुणदोषांसी सर्वांच्या ॥६२॥ नवल गर्वाची पैं काहणी । गुणू सर्वथा सत्य न मानी । दोष पडतांचि कानीं । सत्य मानी निश्चित ॥६३॥ सात्त्विक ये गर्वितापुढें । त्यासी सर्वथा मानी कुडें । अतिसात्त्विकता दृष्टी पडे । तरी मानी वेडें अर्बुज ॥६४॥ अंगीं भवंडी भरे लाठी । तैं भूमी लागे ललाटीं । साष्टांग नमावया सृष्टीं । पात्र गर्वदृष्टीं दिसेना ॥६५॥ तेथें कोण दे सन्मान श्रेष्ठा । कायसी वृद्धाची प्रतिष्ठा । धनगर्वें चढला ताठा । मी एक मोठा ब्रह्मांडीं ॥६६॥ एक गुरुसेवाविश्वासकू । निजसेवा झाला वश्यकू । त्यासी गर्व चढे मी सेवकू । तो अतिबाधकू सेवका ॥६७॥ ऐसा अतिगर्वें उन्नद्ध । हा सातवा गर्वबाध । आतां धनापाशीं महामद । तोही संबंध द्विज सांगे ॥६८॥ ज्यासी चढे धनमदू । तो उघडे डोळां होय अंधू । कानीं नायके शब्दबोधू । धनमदें स्तब्धू सर्वदा ॥६९॥ धनमदें अतिअहंता । धनमदें उद्धतता । धनमदें अद्वातद्वता । करी सर्वथा अधर्म ॥२७०॥ धनमद अति अपवित्र । तो चढल्या होय अतिदुस्तर । न म्हणे पात्र अपात्र । विचरे विचित्र योनीसी ॥७१॥ जो धनमदा वश होय । तो न मानी कोणाचेंही भय । न जावें तेथ स्वयें जाय । न खावें तें खाय यथेष्ट ॥७२॥ न धरावा तो संग धरी । न करावें तें कर्म करी । न बोलावें तें उच्चारी । जनभीतरीं उद्धतू ॥७३॥ न देखे आपुलें केलें । परापवाद स्वयें बोले । नायके बापाचें शिकविलें । वेडें केलें धनमदें ॥७४॥ शिकविलें तें नायके । वारिलें तें करी आवश्यकें । साधुनिंदा निजमुखें । यथासुखें जल्पत ॥७५॥ न मानी स्वयाती स्वाचारु । न मानी दोष अनाचारु । न मानी वडिलांचा विचारु । धनमदें थोरु मातला ॥७६॥ आधींच तारुण्यें अतिलाठा । वरी धनमदें चढला ताठा । यापरी मातला मोठा । न चाले वाटा सुपंथीं ॥७७॥ स्त्रीकामें अतिविव्हळ । न विचारी कुळशीळ । न म्हणे सकाळ सांज वेळ । विचरे केवळ खरु जैसा ॥७८॥ अभिलाषूनि परनारी । दिवसा विचरे दुपारीं । गतालकाही अंगीकारी । भय न धरी पापाचें ॥७९॥ जो मातला करुनि मद्यपान । तो मद तत्काळ उतरे जाण । त्याहूनि धनमद दारुण । आल्याही मरण उतरेना ॥२८०॥ अकर्म करितां आपण । तेंचि निजघातें घेईल प्राण । हेही नाठवे आठवण । धनमदें जाण भुलला ॥८१॥ महाअनर्थी धनमद जाण । हें आठव्या अनर्थाचें लक्षण । आतां धनापाशीं भेद पूर्ण । तेंचि निरुपण द्विज सांगे ॥८२॥ भेद जन्मला धनाचे कुशीं । धन तेथ भेदाची मिराशी । भेद सपरिवार धनापाशीं । अहर्निशीं जागत ॥८३॥ हाता आलिया बहु धन । मातेहूनि राखे भिन्न । पित्यासी करी वंचन । स्त्रियेसीही जाण कळों नेदी ॥८४॥ अर्थ पुत्रासी अतर्क्यता । तेथ इतरांची कोण कथा । भेदू तो अर्थापरता । जगीं सर्वथा असेना ॥८५॥ माथां साहोनि शस्त्रघात । बंधु बंधूसी रणीं साह्य होत । तेचि बंधू अनाप्त होत । वांटितां अर्थविभाग ॥८६॥ मित्र मित्रांसी वेंचिती प्राण । तेथें प्रवेशोनियां धन । विकल्पा आणी मित्रपण । भेद दारुण धनापाशीं ॥८७॥ आपणचि गांठीं बांधिलें धन । तें क्षणक्षणां पाहे आपण । येथवरी धनापाशीं जाण । विकल्प पूर्ण नांदत ॥८८॥ ऐसा धानापाशीं भेदू जाण । हें नववें अनर्थलक्षण । अतिशयें अतिनिर्वाण । वैर दारुण धनेंसीं ॥८९॥ धनापाशीं वैर पूर्ण जाण । हें अंगें भोगूनि आपण । सांगे कदर्यु ब्राह्मण । वैरलक्षण धनाचें ॥२९०॥ पित्यापुत्रांमाजीं विरोधू । पाडितो हा द्रव्यसंबंधू । वैरी करी सखे बंधू । तो हा प्रसिद्धू धनलोभ ॥९१॥ आपुल्या कळवळयाचे सुहृद । त्यांसी धनलोभ पाडी द्वंद्व । धनास्तव अतिसुबुद्ध । वैर विरुद्ध सर्वांसी ॥९२॥ प्राणाहूनि पढिये मित्रू । त्यांसी धनलोभ करी शत्रू । धनलोभ अतिअपवित्रू । वैरी दुस्तरु जगीं हा ॥९३॥ बंधुकलहें धन वांटितां । अधिक न ये आपुल्या हाता । तैं वांटा करिती जे धर्मतां । त्या साधूंसी तत्त्वतां वैर चाळी ॥९४॥ जिचे उदरीं जन्मला आपण । जिचें सदा केलें स्तनपान । ते मातेसी धनलोभें जाण । वैर संपूर्ण चालवी ॥९५॥ आपली जे कां निजजननी । अर्थ तीतें करी वैरिणी । बाहेर घाली घरांतूनी । मुख परतोनी पाहेना ॥९६॥ ज्याचेनि तुटे भवबंधन । ज्याचेनि बोलें होइजे पावन । त्या सद्गुरुसी अबोला जाण । धनाभिमान धरवित ॥९७॥ धनाभिमानाचा बडिवार । सद्गुरुमाजीं पाडी वैर । धनाभिमानी अणुमात्र । नव्हे निर्वैर कोणासी ॥९८॥ जें हें सांगीतलें निरुपण । त्या नांव वैर संपूर्ण । हें दहावें अनर्थलक्षण । अविश्वासी धन तें ऐक ॥९९॥ धनाभिमानाचा विलास । न मानी पित्याचा विश्वास । पूर्ण बंधूचा अविश्वास । केवीं सुहृदांस पातेजे ॥३००॥ ’आत्मा वै पुत्रनामासि’ । जो साचार धणी सर्वस्वासी । त्या पातेजेना निजपुत्रासी । अतिअविश्वासी धनलोभ ॥१॥ धर्म अर्थ काम संपूर्ण । त्रिसत्य सत्य हें वचना । पूर्वजांची भाक निर्वाण । देऊनि आपण जे परणी ॥२॥ जिणें जीवू प्राण सर्वस्वेंसीं । साचार अर्पिला भ्रतारासी । ऐशियेही धर्मपत्नीससी । अविश्वासी धनलोभ ॥३॥ जे उदरीं वाहे नवमासीं । जे सर्वदा विष्ठामूत्र सोशी । धनलोभाची जाती कैशी । तेही मातेसी न विश्वासे ॥४॥ धनाभिमान ये जयापाशीं । तो विश्वासेना सद्गुरुसी । इतरांची कथा कायसी । पूर्ण अविश्वासी धनमानी ॥५॥ अविश्वासाचें मुख्य कारण । धन आणि दुसरी स्त्री जाण । तेथ मोहावलें ज्याचें मन । तो अतिसंपन्न अविश्वासें ॥६॥ जो धनमानी आणि स्त्रीजित । त्यासी विमुख होय हृदयस्थ । त्यातें सद्गुरुही उपेक्षित । परम अनर्थ अविश्वासें ॥७॥ सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास बोलिला पुराणीं । जो प्रकटतां अर्धक्षणीं । करी धुळदाणी वृत्तीची ॥८॥ अविश्वासा अभिमान भेटे । तैं मुक्ताची मुक्तता तुटे । मग विकल्पाचेनि नेटें । घाली उफराटें देहबंदीं ॥९॥ अविश्वासें कवळिल्या चित्ता । अभिमानें म्हणे मी ज्ञाता । तेव्हां उभउभ्यां पळे आस्तिकता । देखे नास्तिकता सर्वत्र ॥३१०॥ अविश्वास येतां पहा हो । सकुंटुंब पळे सद्भावो । मग लोकत्रयीं अभावो । नांदवी निर्वाहो विकल्पेंकरुनी ॥११॥ वाडेंकोडें अविश्वासी । विकल्पू नांदे अहर्निशीं । जेथ रिगाव अविश्वासासी । विकल्प त्यासी नागवी ॥१२॥ अंगोवांगीं अविश्वास । परमाथराष्ट्र पाडी वोस । सद्गुरुचेही दावी दोष । न मनी विश्वास ब्रह्माचा ॥१३॥ यालागीं सकळ दोषांचा राजा । अविश्वासाहूनि नाहीं दुजा । तो रिगोनियां निजपैजा । विभांडी वोजा महासिद्धि ॥१४॥ जिकडे अविश्वासें चाली केली । तिकडे परमार्था पळणी झाली । विकल्पाची धाडी आली । ते संधी नागवली बहुतेकें ॥१५॥ सिद्धाचें गेलें सिद्धिभूषण । साधकें सपाई नागवलीं जाण । रानभरी झाले साधारण । श्रद्धेचें उद्यान छेदिलें ॥१६॥ यमनियमांचीं नगरें जाळी । क्रोधू तापसा करी होळी । मोक्षफळें सफळिता केळी । समूळ उन्मळी मोहगजू ॥१७॥ शमदमाचें घरटें । खाणोनि सांडिलें आव्हाटे । वोस विवेकाचे चोहटे । कोणी ते वाटे वागेना ॥१८॥ व्रतोपवास यांचीं साजिरीं । निष्काम उपवनें चौफेरीं । तीं जाळिलीं उपराउपरी । नानापरी विकल्पें ॥१९॥ ऐशिया अविश्वासासी । ज्ञानाभिमानी आले भेटीसी। विकल्पें अभय देऊनि त्यांसी । आपणियापाशीं राहविलें ॥३२०॥ ऐशिया अविश्वासापुढें । परमार्थ काइसें बापुडें । विकल्पाचें बळ गाढें । तो करी कुडें तत्काळ ॥२१॥ पोटांतून जो अविश्वासी । तो सदा देखे गुणदोषांसी । अखंड द्वेषी परमार्थासी । हा त्यापाशीं स्वभावो ॥२२॥ यापरी अविश्वासी । बद्धवैर पडे परमार्थासी । यालागीं जो पोटींचा अविश्वासी । हांसल्याही त्यापाशीं न वचावें दीनीं ॥२३॥ सकळ दोषांमाजीं समर्थ । सकळ दोषांचें राजत्व प्राप्त । तो हा अकरावा अनर्थ । असे नांदत धनामाजीं ॥२४॥ अकराही इंद्रियांसी । पूर्ण करी अविश्वासेंसी । यालागीं अकरावें स्थान यासी । वस्ति अविश्वासासी मनामाजीं ॥२५॥ मुख्यत्वें स्पर्धेचें आयतन । बहुविद्या कां बहुधन । हेंचि स्पर्धेचें जन्मस्थान । येथूनि जाण तें वाढे ॥२६॥ विद्या झालिया संपन्न । पंडित पंडितां हेळण । मुख्य गुरुशीं स्पर्धा करी जाण । हें स्पर्धालक्षण विद्येचें ॥२७॥ गांठीं झालिया धन । स्पर्धा खवळे दारुण । कुबेर परधनें संपन्न । मी स्वसत्ता जाण धनाढय ॥२८॥ माझिया निजधनापुढें । गणितां अल्प गंगेचे खडे । माझिये धनाचेनि पडिपाडें । कोण बापुडें उभें राहे ॥२९॥ मग जे जे देखे धनवंत । ते ते हेळूनि सांडी तेथ । यापरी स्पर्धा अद्भुत । धरुनि अर्थ उल्हासे ॥३३०॥ एवं धरुनियां अर्थ । स्पर्धा बारावा अनर्थ । सदा नांदे धनाआंत । तो हा वृत्तांत सांगीतला ॥३१॥ आतां तीन अर्थांचा मेळा । एके पदीं झाला गोळा । तोही नांदे धनाजवळा । ऐक वेगळा विभाग ॥३२॥ स्त्री द्यूत आणि मद्यपान । या तिहींतें वाढवी धन । हे तीन अनर्थ दारुण । धनवंता पूर्ण आदळती ॥३३॥ स्त्री द्यूत आणि मद्यपान । या तिहींतें वाढवी धन । हे तीन अनर्थ दारुण । धनवंता पूर्ण आदळती ॥३३॥ जो कां पुरुष निर्धन । तो स्त्रियेस जडिसासमान । देखोनि निर्धनाचें वदन । प्रत्यक्ष जाण स्त्री थुंकी ॥३४॥ धनहीन पुरुषाचे घरीं । कलहो स्त्री-पुरुषांमाझारीं । निर्भर्त्सूनि नानापरी । दवडी घराबाहेरी पुरुषातें ॥३५॥ धनवंता पुरुषासी । स्त्री लवोटवो करी कैसी । कुटका देखोनि शुनी जैसी । हालवी पुच्छासी कुंकात ॥३६॥ त्या धनाची झालिया तुटी । स्त्री वसवसोनि लागे पाठी । आतां नावडती तुमच्या गोठी । रागें उठी फडफडोनी ॥३७॥ दिवसा पोरांची तडातोडी । रात्रीं न सोसे तुमची वोढी । हातीं नाहीं फुटकी कवडी । जळो गोडी जिण्याची ॥३८॥ ऐशापरी कडोविकडी । निर्भर्त्सूनि दूरी दवडी । निर्धन पुरुषाची आवडी । न धरी गोडी स्वदारा ॥३९॥ यापरी निर्धन पुरुषासी । स्वस्त्री वश्य नव्हे त्यासी । स्त्रीबाधा धनवंतासी । अहर्निशीं अनिवार ॥३४०॥ लक्षूनि धनवंत नर । वेश्या मिरवी शृंगार । हावभाव चमत्कार । त्यासी धनाढय थोर भाळले ॥४१॥ वेश्याकामसंगें जाण । अखंड लांचावलें मन । तद्योगें मद्यपान । करिती सधन धनमदें ॥४२॥ मद्यपानें जो उन्मत्त । तो स्वेच्छा खेळे द्यूत । एवं हेही तिन्ही अनर्थ । जाण निश्चित अर्थासी ॥४३॥ अर्थापाशीं पंधरा अनर्थ । ते सांगीतले इत्थंभूत । सुखाचा लेशु येथ । नाहीं निश्चित धनवंता ॥४४॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

एते पञ्चदशानर्था ह्मर्थमूला मता नृणाम् । तस्मादनर्थमर्थाख्यं श्रेयोर्थी दूरतस्त्यजेत् ॥१९॥

एवं हे पंधराही अनर्थ । मूर्ख अथवा पंडित । जे अर्थसंग्रह करित । अवश्य हे तेथ उठती ॥४५॥ त्यासी नाम मात्र हा अर्थ । येर्हथवीं मूर्तिमंत अनर्थ । यालागीं श्रेयार्थी जे हरिभक्त । तिंहीं निश्चित त्यागावा ॥४६॥ जेवीं कां बोळ हुंगेना माशी । ढेंकुण न ये तेलापाशीं । वोळंबा न लगे अग्नीसी। तेवीं जो अर्थासी नातळे ॥४७॥ जेवीं कां अग्नीमाजीं लवण पडे । तें तडफडोनि बाहेर उडे । तेवीं मोक्षाचिये चाडे । जो त्यागी रोकडें निजधन ॥४८॥ बचनाग मुखीं घालितां आपण । क्षणार्ध दावी गोडपण । तोचि परिपाकीं आणी मरण । तैसा अर्थ जाण अनर्थी ॥४९॥ यालागीं जो मोक्षार्थी । तेणें अर्थ न धरावा हातीं । काया वाचा चित्तवृत्ती । अर्थ निश्चितीं त्यागावा ॥३५०॥ अर्थमूळ सकळ भेद । पूर्वी बोलिला एवंविध । तोचि पुनःपुनः गोविंद । करुनि विशद सांगत ॥५१॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

भिद्यन्ते भ्रातरो दाराः पितरः सुहृदस्तथा । एकास्निग्धाः काकिणिना सद्यः सर्वेऽरयः कृताः ॥२०॥

इष्टमित्रांचें मित्रत्व मोडी । बंधुबंधूंचा स्नेह विघडी । सुहृदांचें सौजन्य तोडी । फुटकी कवडी अर्थाची ॥५२॥ पित्यापुत्रांमाजीं विरोध । स्त्रीपुत्रांमाजीं द्वंद्व । तो हा जाण अर्थसंबंध । विभांडी हार्द सुहृदांचें ॥५३॥ काकिणी म्हणजे वीसकवडी । ते आप्तांचा स्नेह तोडी । त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

अर्थेनाल्पीयसा ह्येते संरब्धा दीप्तमन्यवः । त्यजन्त्याशु स्पृधो घ्रन्ति सहसोत्सृज्य सौहृदम् ॥२१॥

अतिअल्प अर्थासाठीं । सुहृदता सांडोनि पोटीं । कोपें खवळला उठी । शस्त्रमुठी उद्यत ॥५५॥ तेथें आप्त होऊनि अनाप्त । परस्परें करिती घात । अर्थ अनर्थी प्राणांत । निजस्वार्थघातकू ॥५६॥ जितां अर्थ अनर्थ करी । मेल्या ने नरकद्वारीं । उत्तम देहाची बोहरी । अर्थ करी ते ऐक ॥५७॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

लब्ध्वा जन्मामरप्रार्थ्यं मानुष्यं तद्‌द्विजाग्र्यताम् । तदनादृत्य ये स्वार्थं घ्रन्ति यान्त्यशुभां गतिम् ॥२२॥

कोटि जन्मांचें शुद्ध सुकृत । तेणें कर्मभूमीं नरदेह प्राप्त । तेथेंही वर्णाग्र्य समर्थ । सत्कुळप्रसूत ब्राह्मणत्वें ॥५८॥ ऐसें जन्म पावावया येथ। अमरही मरण मागत । इंद्रादि देव जे स्वर्गस्थ । तेही वांछित हें जन्म ॥५९॥ जे सत्यलोकपर्यंत । ऐश्वर्य पावले अद्भुत । तेही हें जन्म वांछित । उत्कंठित अहर्निशीं ॥३६०॥ येथ करितां भगवद्भक्ती । पायां लागती चारी मुक्ती । यालागीं हे जन्मप्राप्ती । अमर मागती अहर्निशीं ॥६१॥ ऐसें उत्तम जन्म पावोनी । अतिअभाग्य मी त्रिभुवनीं । निजस्वार्थातें उपेक्षूनी । भुललों धनीं धनलोभें ॥६२॥ धनलोभाचिया भ्रांती । कां लोकेषणा लौकिकस्थिती । जो उपेक्षी भगवद्भक्ती । अशुभ गती तयासी ॥६३॥ तेचि कैशी अशुभ गती । धनलोभ्यां नरकप्राप्ती । चौर्याैयशीं लक्ष योनींप्रती । गर्भ भोगिती अतिदुःखें ॥६४॥ जया ब्राह्मणजन्माआंत । स्वर्गमोक्ष सहजें प्राप्त । तेचि अर्थीचा इत्यर्थ । स्वयें सांगत धनलोभी ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

स्वर्गापवर्गयोर्द्वारं प्राप्य लोकमिमं पुमान् । द्रविणे कोऽनुषज्जेत मर्त्योऽनथस्य धामनि ॥२३॥

ब्राह्मणें करितां स्वधर्म । वासना झळंबे स्वर्गकाम । तैं इंद्रचंद्रादिकांचें धाम । पावे द्विजोत्तम सहजचि ॥६६॥ ज्याचिया याजनस्थिती । इतरांसी होय स्वर्गप्राप्ती । एवं स्वर्ग तो ब्राह्मणांच्या हातीं । त्यांसी ते गती सहजचि ॥६७॥ सांडूनि ईषणात्रयासी । निष्काम स्वधर्म ज्या द्विजासी । मोक्ष लागे त्याच्या पायांसी । तिष्ठे अहर्निशीं आज्ञाधारी ॥६८॥ तो अनुग्रही जयांसी । ते पावती निजमोक्षासी । एवढें सामर्थ्य ब्राह्मणापाशीं । अनायासीं सहजचि ॥६९॥ स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्याचा आज्ञाधारी । एवढी ब्राह्मणत्वाची थोरी । धनलोभावारी नाशिती ॥३७०॥ ब्राह्मणजन्म पावल्या जाण । निःशेष खुंटे जन्ममरण । तेथ मी नाडलों जाण । जोडूनि धन धनलोभें ॥७१॥ दुर्लभ येथें माणुसपण । त्यामाजीं अतिदुर्लभ ब्राह्मण्य । तेंही पावोनि मी आपण । धनलोभें पूर्ण नागवलों ॥७२॥ पावोनि ब्राह्मणशरीर । धनें नाडले थोरथोर । अर्थ अनर्थाचें मुख्य घर । दुःख दुर्धर वाढवी ॥७३॥ अर्थ अनर्थाचें भाजन । तें निःशेष त्यागावें धन । वैराग्यें तापला पूर्ण । स्वयें ब्राह्मण बोलत ॥७४॥ ॥आशंका ॥ दैवें जोडिलें संपत्तीसी । नेऊनि सांडावें बिदीसी । कां घालावें जळप्रवाहेंसीं । त्याग अर्थासी तो कैसा ॥७५॥ तें अर्थत्यागनिरुपण । स्वयें सांगताहे ब्राह्मण । जे असतील सधन । तिंहीं सावधान परिसावें ॥७६॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

देवर्षिपितृभूतानि ज्ञातीन्बन्धूंश्च भागिनः । असंविभज्य चात्मानं यक्षवित्तः पतत्यधः ॥२४॥

दैवें जोडिलिया धन । आचरावे पंचमहायज्ञ । करावें भगवत्पूजन । उल्हासें जाण महोत्साहें ॥७७॥ स्वयें करावें पितृतर्पण । षण्णवति श्राद्धें जाण । पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनियां ॥७८॥ जित्यां पितरां त्रिकाळीं नमन । कदा न करावें हेळण । त्यांची अवज्ञा आपण । प्राणांतीं जाण न करावी ॥७९॥ त्यांसी गौरवूनि आपण । यथारुचि द्यावें अन्न । यथाशक्ति द्यावें धन । सेवेनें संपूर्ण सुखी करावीं ॥३८०॥ पिता स्वयमेव नारायण । माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण । ऐसें भावें ज्याचें भजन । सुपुत्र जाण तो एक ॥८१॥ ज्याचे सेवेनें सुखी पितर । तेंचि पितृतर्पण साचार । जितां अवज्ञा तो अनाचार । मेल्या श्राद्धविचार तो लौकिक ॥८२॥ जो पितृवचन अविश्वासी । तेणें केल्या पापराशी । जो पितृवचन विश्वासी । मोक्ष त्यापाशीं वोळंगणा ॥८३॥ जितमृतपितृतर्पण । ते सांगीतली उणखूण । या नांव गा पितृभजन । ऋषिपूजन तें ऐक ॥८४॥ सन्मानें आणूनि ब्राह्मण । श्रद्धा कीजे चरणक्षाळण । चरणतीर्था अभिवंदन । सबाह्य जाण स्वयें कीजे ॥८५॥ धूपें दीपें यथोक्त पूजन । यथारुचि तृप्ति सदन्न । यथाशक्ति द्यावें धन । ऋषिपूजन या नांव ॥८६॥ ब्राह्मण तेचि ऋषीश्वर । ब्राह्मणें तृप्त सनत्कुमार । ब्राह्मणमुखें शाङर्गधर । धाला ढेंकर देतसे ॥८७॥ बंधु स्वगोत्र स्वजन । त्यांची दरिद्रपीडा दारुण । निरसावी देऊनि धन । हा मुख्य धर्म जाण श्रेष्ठत्वें ॥८८॥ कुटुंब पीडूनि आपण । अन्यत्रां द्यावें अन्नधन । तोचि अधर्म परिपूर्ण । शुद्ध पुण्य तें नव्हे ॥८९॥ कुटुंबासी यथोचित । सुखी करुनि समस्त । याहूनि उरला जो अर्थ । तो श्रेयार्थ वेंचावा ॥३९०॥ अतिथि आलिया देख । अन्न द्यावें आवश्यक । तो झालिया पराङ्‌मुख । पुण्य निःशेष हरासे ॥९१॥ सकळ दीनांमाजीं जाण । अतिश्रेष्ठ अन्नदान । दीनास देऊनि सन्मान । द्यावें सदन्न अतिश्रद्धा ॥९२॥ कुटुंब सुखी करी आपण । स्वेच्छा दे दीनभोजन । परी कदर्थवी जो निजप्राण । तोही दारुण अधर्म ॥९३॥ जैसें कीजे दीनतर्पण । त्यांत आपणही एक दीन । तेथ न करुनि अधिकशून्य । करावें भोजन समभागें ॥९४॥ पंक्तीमाजीं प्रपंचपण । तें अन्नदानीं अतिविघ्न । यालागीं करावें भोजन । समभागीं आपण सकळांसीं ॥९५॥ धनाचा सद्वययो खरा । द्यावें अनाथप्रेतसंस्कारा । अर्पावें दीनांच्या उद्धारा । धाडावें घरा अयाचितांच्या ॥९६॥ अंध पंगु मुके दीन । यांसी संरक्षी जो आपण । त्याचेंचि सार्थक धन । शुद्ध पुण्य तयाचें ॥९७॥ साधुसज्जनां विचंबू अडी । तो विचंबू जो सधन तोडी । त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥९८॥ दुर्बळ जो कां भगवद्भक्त । त्यासी संरक्षी जो धनवंत । तेणें तुष्टला भगवंत । त्यातें उद्धरीत भक्ताआधीं ॥९९॥ सकळमंगळां मंगळ पूर्ण । सकळ कल्याणांचें कल्याण । ते हे सद्गुरुश्रीचरण । तेथ निजधन जयांचें अर्पे ॥४००॥ तयांच्या निजधर्माचें निशाण । सत्यलोकीं लागलें जाण । वैकुंठीं कैलासीं संपूर्ण । भेरीनिशाण त्राहाटिलें ॥१॥ स्वधर्में जोडलें निजधन । जो करी सद्गुरुसी अर्पण । तोचि कर्मीं निष्कर्म जाण । परम पावन तो एक ॥२॥ जो चढत्यावाढत्या भगवद्भक्ती । गुरुसी अर्पी निजसंपत्ती । त्यातें अंगीकारुनि लक्ष्मीपती । आपुली निजभक्ती त्यासी दे ॥३॥ ज्यासी अनन्य गुरुभक्ती । त्याच्या द्वारीं चारी मुक्ती । दासीत्वें उभ्या असती । त्यापासोनि श्रीपती परता नव्हे ॥४॥ ज्याचें तनु मन धन । गुरुचरणीं अर्पे पूर्ण । त्यासी भवभयाचें भान । कल्पांतीं जाण दिसेना ॥५॥ दैवें जोडली जे संपत्ती । ते वेंचोनि ऐशा निगुतीं । अर्थें परमार्थप्राप्ती । सभाग्य लाहती निजनिष्ठा ॥६॥ ऐसे न वेंचोनि धन । स्वयाति कुटुंब पीडी पूर्ण । जो पोटा न खाय आपण । तें यक्षधन संचित ॥७॥ एवं कदर्थूनि निजप्राण । जें संचिलें यक्षधन । तें अधःपातासी कारण । दुःख दारुण धनलोभ्या ॥८॥ म्हणे मीही याच निष्ठा । यक्षवित्तें झालों करंटा । हातींचा स्वार्थ गेला मोटा । वंचलों कटकटा निजमोक्षा ॥९॥ सांचोनियां यक्षवित्त । म्यां माझें केलें अनहित । ऐसा तो खेदयुक्त । कष्टें बोलत निजदुःख ॥४१०॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

व्यर्थयाऽर्थेहया वित्तं प्रमत्तस्य वयो बलम् । कुशला यन सिध्यन्ति जरठः किं नु साधये ॥२५॥

निजभोगविवर्जित । शिणोनि काया वाचा चित्त । कष्टें मिळवावया वित्त । झालों उन्मत्त अविवेकी ॥११॥ करितां वित्ताचे आयास । गेलें तारुण्य बळ आयुष्य । शरीर क्षीण झालें निःशेष । तरी वित्ताचा शोष शमेना ॥१२॥ अर्थें अर्थ वाढवितां । अनिवार वाढली चिंता । तेथें विसरलों निजस्वार्था । अर्थलोभता कदर्यू ॥१३॥ जेणें वित्तें जीवितें साचार । भूतदया परोपकार । करुनियां विवेकी नर । भवाब्धिपरपार पावले ॥१४॥ मज निर्दैवाचें येथ । वृथा वित्त वृथा जीवित । आयुष्यही गेलें व्यर्थ । निजस्वार्थ बुडाला ॥१५॥ म्हणाल असतां जीवें जीत । साधूनि घेऊं निजस्वार्थ । तें आतां न चले येथ । अर्थ सामर्थ्य दोनी गेलीं ॥१६॥ अधर्मास्तव गेलें वित्त । जरेनें गिळिलें सामर्थ्य । केवळ मी जरठ येथ । दैवहत उरलों असें ॥१७॥ कटकटा जोडितां अर्थ । लोक नाडले समस्त । ऐसें जाणोनि प्रस्तुत । स्वयें सांगत कदर्यु ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

कस्मात्संक्लिश्यते विद्वान् व्यर्थयाऽथहया सकृत् । कस्यचिन्मायया नूनं लोकोऽयं सुविमोहितः ॥२६॥

येथ अज्ञानाची कोण गती । जे अर्थ अनर्थी म्हणती । तेही अर्थार्थी होती । ज्ञाते भ्रमती अर्थासी ॥१९॥ ऐसे भ्रमले जे सज्ञान । तेही अर्जावया धन । युक्तायुक्त प्रयत्नन । अनुदिनीं जाण स्वयें करिती ॥४२०॥ सज्ञान भ्रमावया कारण । ईश्वराची माया पूर्ण । अघटघटी जीचें लक्षण । त्या धनी सज्ञान मोहिले ॥२१॥ कृष्णमाया मोहिले पंडित । नव्हे म्हणाल हा इत्यर्थ । ते जोडिताति अर्थ । निजसुखार्थ भोगेच्छा ॥२२॥ भोगांमाजीं जे म्हणती सुख । ते जाणावे केवळ मूर्ख । येच अर्थींचा विवेक । कदर्यु देख बोलत ॥२३॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

किं धनैर्धनदैर्वा किं कामैर्वा कामदैरुत । मृत्युना ग्रस्यमानस्य कर्मभिर्वोत जन्मदैः ॥२७॥

कटकटा वर्णाग्र्यें पूज्य पहा हो । त्या द्विजासी भुलवी मायामोहो । भोगीं वाढविजे जो देहो । तोचि पहा हो नश्वर ॥२४॥ त्या देहासी जे नाना भोग । तोच त्यासी क्षयरोग । धन जोडणें अनेग । तोचि मार्ग निर्धनत्वा ॥२५॥ तें धन मिळे अनायासीं । यालागीं धनवंत उपासी । अर्थ जोडोनियां प्रयासीं । भोगितां कामासी सुख काय ॥२६॥ कामसुख कामिनीमेळीं । सुखार्थ स्त्रियेतें प्रतिपाळी । तेचि नानापरी सळी । देतां किंकळी सुटेना ॥२७॥ स्त्रीपुत्रकामभोगादिक । तेणें देहासी द्यावें सुख । तो देहोचि मरणोन्मुख । नित्य अंतक लागला ॥२८॥ जे जे अतिक्रमे घडी । ते ते काळ वयसा तोडी । येथ कोण भोगाची गोडी । धनकामें वेडीं सज्ञानें केलीं ॥२९॥ सर्पमुखीं दर्दुर जातां । तो दर्दुर होय माशा खाता । तेणें न सुटे सर्पग्रासता । जाण तत्त्वतां जयापरी ॥४३०॥ तेवीं नानाभोगमेळें । देहींचा मृत्यु मागें न टळे । हें जाणोनि आंधळे । धनकामें झाले सज्ञान ॥३१॥ स्वयें कर्ता तोचि मरणधर्म । त्यासी कोण निववी भोगकाम । हा केवळ मायेचा भ्रम । भ्रमले परम महासिद्ध ॥३२॥ धनें होईल परलोक । तोही भोगू दुःखदायक । भोगक्षयें कर्ममूर्ख । येती देख अधःपाता ॥३३॥ करितां भोग्य काम्य कर्म । पुढती मरण पुढती जन्म । भोगणें पडे अविश्रम । हें दुःख परम धनकामा ॥३४॥ धनकामासी निजसुख । सर्वात्मना नाहीं देख । मीही ऐसाचि होतों मूर्ख । निजभाग्यें देख धन गेलें ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

नूनं मे भगवांस्तुष्टः सर्वदेवमयो हरिः । येन नीतो दशामेतां निर्वेदश्चात्मनः प्लवः ॥२८॥

मी पूर्वी होतों अतिअभाग्य । आतां झालों अतिसभाग्य । मज तुष्टला श्रीरंग । विवेकवैराग्य पावलों ॥३६॥ माझें संचित जें कां धन । तेंचि माझें मुख्य अज्ञान । तें हरीनें हरोनि आपण । कृपा पूर्ण मज केली ॥३७॥ भक्तांचें अज्ञान हरी । याचिलागीं नांवें तो ’हरी’ । तेणें कृपा करुन पुरी । विवेक अंतरीं उपजविला ॥३८॥ वैराग्य विवेकावीण आंधळें । विवेक वैराग्यावीण पांगळें । ते माझे हृदयीं जावळीं फळें । एक वेळे उपजविलीं ॥३९॥ ऐशी हरीनें कृपा करुनी । माझें धनेंसीं अज्ञान हरुनी । विवेक वैराग्य यें दोनी । माझे हृदयभुवनीं प्रकाशिलीं ॥४४०॥ परी कोणे काळें कोणे देशीं । कोण समयविशेषीं । हरि कृपा करितो कैशी । हें कोणासी कळेना ॥४१॥ भक्तांचें हरावया चित्त । हरि हरितो त्यांचें वित्त । वित्तत्यागें करुनि सुचित । दे विवेकयुक्त वैराग्य ॥४२॥ ऐसें घेतेदेतें विंदान । ब्रह्मादिकां अतर्क्य जाण । यालागीं तो भगवंत पूर्ण । त्यासी साशी गुण वशवर्ती ॥४३॥ त्याचें अचिंत्यानंतरुप । परी मजलागीं झाला सकृप । माझें धनेंसीं निरसूनि पाप । ज्ञानदीप उजळला ॥४४॥ हो कां कृपा उपजली भगवंता । परी म्यां वंचिल्या यज्ञदेवता । त्या क्षोभल्या करिती घाता । हेंही सर्वथा घडेना ॥४५॥ करीं चक्र धगधगित । ज्याचा पाठिराखा हरि समर्थ । विघ्नाचा वारा न रिघे तेथ । देव वंदीत तयासी ॥४६॥ देवीं वंदूनि प्रल्हादासी । शांत करविलें नृसिंहासी । तो पाठिराखा नरहरि ज्यासी । विघ्न त्यापाशीं रिघे केवीं ॥४७॥ जेणें देवांचिया कोडी । क्षणें सोडविल्या बांदवडी । त्याचे भक्तांची लोंव वांकडी । देवें बापुडीं केवीं करिती ॥४८॥ जो सकळ देवांचा नियंता । ज्याचे चरण देव वंदिती माथां । तो भगवंत साह्य असतां । विघ्न सर्वथा बाधीना ॥४९॥ ज्याचेनि बळें वाढले देव । देव जयाचे अवयव । तो हरि तुष्टला स्वयमेव । तेथ विघ्नसंभव कोणाचा ॥४५०॥ सर्वदेवमय श्रीहरी । इंद्रचंद्ररुपें माझा हरी । ऐशिया मज दीनावरी । विघ्न संसारीं असेना ॥५१॥ ऐशिये कृपेचें कारण । ये जन्मीं नाहीं साधन । हें माझें पूर्वील जुनें ऋण । देवापाशीं जाण ठेविलें होतें ॥५२॥ पूर्वीं कोण जन्मीं कोण देशीं । तीर्थक्षेत्रीं कोण वंशीं । कोण आचरलों सत्कर्मासी । तेणें हृषीकेशी तुष्टला ॥५३॥ मातें अतिदुःखी देखोन । हरि तुष्टला कृपापूर्ण । त्याचे कृपेस्तव जाण । विवेकसंपन्न मी झालों ॥५४॥ हो कां धनक्षयें झालें दुःख । तेणें दुःखें पावलों निजसुख । भवाब्धि तरावया देख । वैराग्यविवेक दृढ तारुं ॥५५॥ हरिखें वोसंडूनि ब्राह्मण । म्हणे उरले आयुष्येनि जाण । वृथा जावों नेदीं अर्ध क्षण । करीन निर्दळण सुखदुःखां ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

सोऽहं कालावशेषेण शोषयिष्येऽङगमात्मनः । अप्रमत्तोऽखिलस्वार्थे यदि स्यात्सिद्ध आत्मनि ॥२९॥

काइसा भवभयाचा पाड । घेईन कोटि जन्मांचा सूड । नासल्या आयुष्याचा कैवाड । करीन निवाड येणें देहें ॥५७॥ देहासी आली वार्धक्यता । परी वृद्धत्व नव्हे माझिया चित्ता । तेणें चित्तें चिंतूनि भगवंता । भवबंध आतां छेदीन ॥५८॥ उरले आयुष्यें येथ । कळिकाळाचे पाडीन दांत । गर्भदुःखाचें खणोनि खत । मरणाचा घात मी करीन ॥५९॥ जेणें देहें सत्यानृत । कर्में आचरलों समस्त । तें देह मी शोषीन येथ । विदेहस्थ निजभावें ॥४६०॥ घालूनि निजबोधाची धाडी । फोडीन देहाची बांदवडी । तोडूनि सुखदुःखांची बेडी । उभवीन गुढी सायुज्याची ॥६१॥ आजी वैराग्यविवेकयुक्त । मी निजस्वार्थी सावचित्त । जो जो साधीन परमार्थ । तो तो हस्तगत मज होय ॥६२॥ मजचि साधे निजस्वार्थ । हाचि नेम नाहीं येथ । जो जो वैराग्यविवेकयुक्त । त्यासी परमार्थ आंदणा ॥६३॥ वैराग्यविवेकाचें लक्षण । देहगेहस्त्रियादि धन । असतां आसक्त नव्हे मन । वैराग्य पूर्ण या नांव ॥६४॥ म्यां जो आरंभ केला पहा हो । यासी देवोदेवीसमुदावो । येणेंसहित देवाधिदेवो । मज साह्य होवो हें प्रार्थित ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

तत्र मामनुमोदेरन् देवास्त्रिभुवनेश्वराः । मुहूर्तेन ब्रह्मलोकं खटवाङगः समसाधयत् ॥३०॥

इंद्रियअधिष्ठात्री देवता । मज साह्य होतू समस्ता । सिद्धि पावावया परमार्था । इंद्रियजयता मज द्यावी ॥६६॥ जो त्रिभुवनेश्वर विख्यात । तो साह्य झालिया भगवंत । देवता साह्य होती समस्त । त्या अंतर्भूत हरिरुपीं ॥६७॥ देवतारुपें भावूनि हरी । सकळ देवांची सेवा करीं । साह्य होऊनि दीनोद्धारीं । मज भवसागरीं तारावें ॥६८॥ म्हणाल वयसेचा शेवट । केवळ झालासी तूं जरठ । वार्धकीं हे खटपट । वृथा कष्ट कां करिशी ॥६९॥ ऐसा न मानावा अर्थ । खटवांगराजा विख्यात । मुहूर्तें साधिला परमार्थ । निजस्वार्थ फावला ॥४७०॥ त्याहूनि माझें तंव येथ । आयुष्य असेल बहुत । देव साह्य होत समस्त । निमेषें परमार्थ साधीन ॥७१॥ आजी विवेकवैराग्य जैसें आहे । हें जैं निर्वाहलें राहे । तैं कळिकाळ बापुडें काये । म्यां जिंतिला होये संसार ॥७२॥ हा पूर्वी कैसा होता येथ । आतां पालटलें याचें वृत्त । झाला विवेकवैराग्ययुक्त । आश्चर्यें सांगत श्रीकृष्ण ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

श्रीभगवानुवाच--इत्यभिप्रेत्य मनसा ह्यावन्त्यो द्विजसत्तमः । उन्मुच्य हृदयग्रन्थीन् शान्तो भिक्षुरभून्मुनिः ॥३१॥

ऐसा तो अवंतीचा ब्राह्मण । अतिकदर्यु होता जाण । त्याच्या हातींचें गेलिया धन । वैरायचिन्ह पालटलें ॥७४॥ यालागीं वैराग्यविवेक चित्तीं । झाल्या आंदणी ब्रह्मप्राप्ती । कृष्ण सांगे उद्धवाप्रती । निजात्मस्थिती साधावया ॥७५॥ पूर्वी होता ब्राह्मणाधम । धनलोभी निंद्यकर्म । तोचि झाला द्विजोत्तम । विवेकें परम वैरागी ॥७६॥ पूर्वी केलिया निश्चितार्था । मी साधीन सर्वथा । ऐशिया अतिउल्हासता । निजपरमार्था साधक ॥७७॥ माझिया दुःखाचें कारण । माझा मीचि झालों जाण । धरितां काम लोभ धनाभिमान । दुःख दारुण मज माझें ॥७८॥ मज दुःख देऊनि गेलें धन । धन तें दुःखाचें भाजन । स्त्रीपुत्रार्थ सलोभी आपण । तिंहींच जाण मज दवडिलें ॥७९॥ धरावा ज्ञातीचा अभिमान । तंव स्वयातीं मी सांडिलों जाण । मजसी विमुख झाले स्वजन । त्यांचा लोभ कोण मज आतां ॥४८०॥ स्त्री पुत्र स्वजन धन । यांच्या लोभाचें मुख्य कारण । माझा मज देहाभिमान । त्यासी माझें नमन साष्टांग ॥८१॥ नमन स्त्रीपुत्रादि धनांसी । नमन स्वयातिस्वजनांसी । नमन देहाभिमानासी । संबंध तुम्हांआम्हांसी असेना ॥८२॥ जेवीं कां जळा आणि चंद्रबिंबासी । एकत्र वास दिसे दोहींसी । परी चंद्र अलिप्त जळेंसीं । तेंवीं संबंध तुम्हांसीं मज नाहीं ॥८३॥ जेवीं कां अखंड अहर्निशीं । छाया जडलीसे रुपासी । तैं रुप न बैसे निजच्छायेसी । तेवीं संबंधू तुम्हांसीं मज नाहीं ॥८४॥ जेवीं तारुण्य ये देहापाशीं । तेणें तारुण्यें देहो मुसमुशी । शेखीं तारुण्य सांडी देहासी । तेवीं म्यां तुम्हांसी सांडिलें ॥८५॥ वनीं वसंताचें रिगवणें । वनश्री शोभा मिरवी तेणें । तो वसंतू जेवीं सांडी वनें । तेवीं म्यां सांडणें अहंममता ॥८६॥ बाप सवैराग्य विवेक । त्याग करविला अलोलिक । देहाभिमाना तिळोदक । दीधलें देख ममतेसी ॥८७॥ जेवीं भ्रष्टलिया पुत्रासी । पिता घटस्फोटें त्यागी त्यासी । तेवीं त्यागूनि देहाभिमानासी । स्वयें संन्यासी तो झाला ॥८८॥ जेवीं कां ये फळ परिपाकातें । सांडी जन्मल्या निजदेहातें । देंठ न धरी त्या फळातें । फळ देंठातें धरीना ॥८९॥ तेवीं हा न धरी अहंतेसी । अहंता लाजिली न ये यापाशीं । हाही देहाभिमानासी । सद्भावेंसीं नातळे ॥४९०॥ जळीं जेवीं पद्मिनीपान । असोनि जळेंसीं अलिप्त जाण । तेवीं नातळोनि देहाभिमान । संन्यासग्रहण विध्युक्त ॥९१॥ अन्य संन्यासी करोनि होम । जाळिला म्हणती क्रोधकाम । शेखीं तिळतूप होय भस्म । क्रोधकाम संचले ॥९२॥ तैशी नव्हेच याची होमस्थिती । जाळिल्या विकल्पाच्या वृत्ती । कामक्रोधांची पूर्णाहुती । केली अहंकृतीसमवेत ॥९३॥ होमूनि निजस्वभावासी । झाला त्रिदंडी संन्यासी । आज्ञा घेऊनि गुरुपाशीं । सुखें सुखवासी विचरत ॥९४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

स चचार महीमेतां सयंतात्मेन्द्रियानिलः । भिक्षार्थं नगरग्रामानसङगोऽलक्षितोऽविशत् ॥३२॥

जिणोनियां मनपवन । सांडोनिया मानाभिमान । परमानंदें परिपूर्ण । पृथ्वीमाजीं जाण विचरत ॥९५॥ ज्यासी नावडे देहसंगती । त्यासी कैंचा संगू सांगाती । एकला विचरे क्षिती । आत्मस्थिती निजबोधें ॥९६॥ अखंड वसे वनांतरीं । भिक्षेलागीं निघे नगरीं । खेट खर्वट ग्रामीं पुरीं । भिक्षा करी यथाप्राप्त ॥९७॥ मी एक भिक्षेसी येता । हा नेम न करी सर्वथा । अलक्ष्य येवोनि अवचितां । जें आलें हाता तेणें सुखी ॥९८॥ पंचागार सप्तागार । हाही नेम नाहीं निर्धार । कोणेविखींचा अहंकार । अणुमात्र धरीना ॥९९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

तं वै प्रवयसं भिक्षुमवधूतमसज्जनाः । दृष्टवा पर्यभवन् भद्र बह्वीभिः परिभूतिभिः ॥३३॥

न करी देहमळक्षाळण । मुसलवत करी स्नान । यालागीं तो धूसरवर्ण । अवधूतपण या हेतू ॥५००॥ ऐसा विचरतां पृथ्वीसी । अवचटें आला अवंतीसी । अतिवृद्ध आणि संन्यासी । अवधूतवेषी देखिला ॥१॥ संन्यास घेतलिया जाण । पूर्वभूमिका अवलोकन । एक वेळां करावी आपण । पद्धतिलेखन आचार्याचें ॥२॥ ते नगरींचे म्हणती जन । अरे हा कदर्यु ब्राह्मण । याचें हारपल्या धन । संन्यासी जाण हा झाला ॥३॥ हें ऐकोनियां अतिदुर्जन । त्यासभोंवते मीनले जाण । परस्परें दावूनि खूण । विरुद्ध छळण मांडिलें ॥४॥ त्यासी बहुसाल उपद्रवितां । क्षणार्ध पालट नव्हे चित्ता । क्रोधा न येचि सर्वथा । अतिवेवेकता महाधीरु ॥५॥ त्याच्या उपद्रवाची कथा । आणि त्याची सहनशीलता । तुज मी सांगेन तत्त्वतां । सावधानता अवधारीं ॥६॥ दृष्टि ठेवूनि येथींच्या अर्था । विवेकें कुशळ होय श्रोता । अर्थ धरी भावार्थता । शांति तत्वतां तो लाभे ॥७॥ विवेकचित्तचकोरचंद्रा । भागवतभाग्यें शुद्धमुद्रा । शांतिसौभाग्यनरेंद्रा । ऐक सुभद्रा उद्धवा ॥८॥ आकळावया निजशांतीसी । कृष्ण संबोधी उद्धवासी । ऐसें सावध करोनि त्यासी । म्हणे दशा ते ऐसी शांतीची ॥९॥ अवरोधितां जीविकेसी । सन्मान देतां अपमानेंसीं । जो सर्वथा न ये क्षोभासी । शांति त्यापाशीं तें ऐक ॥५१०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

केचित्त्रिवेणुं जगृहुरेके पात्रं कमण्डलुम् । पीठं चैकेऽक्षसूत्रं च कन्थां चीराणि केचन ॥३४॥

दुर्जनीं वेढूनि संन्यासी । छळणार्थ लागती पायांसी । तेणें नमनप्रसंगेंसीं । करिती स्पर्शासी अवघेही ॥११॥ एक म्हणती वृद्ध संन्यासी । एक म्हणती किती चातुर्मासी । एक पुसती संप्रदायासी । कोणे गुरुनें तुम्हांसी मुंडिलें ॥१२॥ एक खुणाविती एकांसी । पूर्वभूमी पुसा यासी । एक म्हणती यापाशीं । धनसंग्रहासी पुसा रे ॥१३॥ एक म्हणती अहो स्वामी । तुमची कवण पूर्वभूमी । तुम्ही व्यापारी कीं उदिमी । कोणे ग्रामीं निवासू ॥१४॥ एक म्हणती कांहीं आहे धन । एक म्हणती आतां निर्धन । एक म्हणती न करा छळण । विरक्त पूर्ण संन्यासी ॥१५॥ ऐसें करितां छळण । संन्यासी अनुद्वेग जाण । निःशब्दवादें धरिलें मौन । कांहीं वचन न बोले ॥१६॥ एक म्हणती त्रिदंडा कारण । हा पूर्वी होता अतिसधन । कोरुनि भरिलें असेल धन । हेंचि लक्षण त्रिदंडा ॥१७॥ एक म्हणती सहस्त्रदोरीं । कंथा केली असे अतिथोरी । एक म्हणती त्यामाझारीं । धन शिरोवेरीं खिळिलेंसे ॥१८॥ एक म्हणती काय पाहतां तोंड । येणें मांडिलेंसे पाखंड । ऐसा निर्भर्त्सिता वितंड । एकें त्रिदंड हरितला ॥१९॥ एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र । एकें नेलें अक्षरसूत्र । काषायवस्त्र तें एकें ॥५२०॥ एक म्हणे हा माझा ऋणायित । भला सांपडला येथ । म्हणोनि कंथेसी घाली हात । कौपीनयुक्त तेणें नेली ॥२१॥ ऐसें करितांही दुर्जन । त्याचें गजबजीना मन । कांहीं न बोले वचन । क्षमेनें पूर्ण निजधैर्य ॥२२॥ तो म्हणे जाणेंयेणें हीं दोनी । केवळ अदृष्टाअधीनी । यालागीं मागण्याची ग्लानी । न करुनि मुनी निघाला ॥२३॥ संन्यासी जातां देखोनी । सभ्य सभ्य शठ येऊनी । साष्टांग नमस्कार करुनी । अतिविनीतपणीं विनवित ॥२४॥ मग म्हणती हरहर । अपराध घडला थोर । मातले हे रांडपोर । पात्रापात्र न म्हणती ॥२५॥ स्वामी कोप न धरावा मनीं । वस्त्रें घ्यावीं कृपा करुनी । परतविला पायां लागूनी । पूर्ण छळणीं छळावया ॥२६॥ प्रदाय च पुनस्तानि दर्शितान्याददुर्मुनेः । संन्यासी आणूनि साधुवुत्ती । दंडकमंडलू पुढें ठेविती । एक वस्त्रें आणोनि देती । एक ते नेती हिरोनी ॥२७॥ एक ते म्हणती वृद्ध संन्यासी । याचीं वस्त्रें द्यावीं यासी । एक म्हणती या शठासी । दंडितां आम्हांसी अतिपुण्य ॥२८॥ वस्त्रें न देती उपहासीं । संन्यासी निघे सावकाशीं । एक परतवूनि त्यासी । देऊनी वस्त्रांसी जा म्हणती ॥२९॥ एक धांवूनि हाणे माथां । वस्त्रें हिरोनि जाय परता । एक म्हणती द्या रे आतां । वृद्ध कां वृथा शिणवाल ॥५३०॥ यावरी संन्यासी आपण । गेला वस्त्रें वोसंडून । करोनिया संध्यास्नान । भिक्षार्थ जाण निघाला ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ व ३६ वा

अन्न च भैक्ष्यसंपन्नं भुञ्जानस्य सरित्तटे ॥३५॥

मूत्रयन्ति च पापिष्ठाः ष्ठीवन्त्यस्य च मूर्धनि । यतवाचं वाचयन्ति ताडयन्ति न वक्ति चेत् ॥३६॥

भिक्षा मागोनि संपूर्ण । शास्त्रविभागें विभागून । सरितातटीं करितां भोजन । तें देखोनि दुर्जन तेचि आले ॥३२॥ अरे हा संन्यासी नव्हे साचा । कदर्यु आमुचे गांवींचा । होय नव्हे न बोले वाचा । हा ठकपणाचा उपावो ॥३३॥ यासी बोलविल्याविण राहे । तो याचाचि दासीपुत्र होये । ऐशी शपथ करुनि पाहें । आले समुदायें तयापाशीं ॥३४॥ एक म्हणे याचें मान । उडवीन मी न लागतां क्षण । हा जेणें करी शंखस्फुरण । तो उपावो जाण मी जाणें ॥३५॥ तो महापापी अतिदुर्मती । जेवितां त्याचे मस्तकीं मुती । तरी क्रोध न ये त्याचे चित्तीं । निजात्मस्थितीं निवाला ॥३६॥ जरी अंतरीं क्रोध आला । तरी तो अशांतचि झाला । बाहेरी न बोलेचि बोला । लोकलाजे भ्याला पोटास्थे ॥३७॥ तैसा नव्हे हा संन्यासी । धोऊनि सांडिलें निजलाजेसी । निजशांतीची दशा कैशी । क्रोध मानसीं वोळेना ॥३८॥ आंत एक बाह्य एक । या नांव मुख्य दांभिक । तैसा संन्यासी नव्हे देख । सबाह्य चोख निजशांति ॥३९॥ तंव ते दुर्जन म्हणती । अरे हा न बोले निश्चितीं । संमुख मुखावरी थुंकिती । अति निंदिती नोकूनी ॥५४०॥ एक हाणिती लाता । एक टोले देती माथां । एक म्हणती न बोलतां । यासी सर्वथा न सोडा ॥४१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

तर्जयन्त्यपरे वाग्भिः स्तेनोऽयमिति वादिनः । बन्धन्ति रज्ज्वा तं केचिद्बध्यतां बध्यतामिति ॥३७॥

आणिक एक दुरुनि जाण । वर्मी विंधिती वाग्बाण । याच्या वेषाचें लक्षण । आम्हीं संपूर्ण जाणीतलें ॥४२॥ याचे वेषाचा विचारु । शठ नष्ट दांभिक थोरु । भिक्षामिसें हिंडे हेरु । धरा चोरु निश्चितीं ॥४३॥ ऐसे विकल्पवाक्यें गर्जती । एक बांधा बांधा म्हणती । एक दृढदोरीं बांधिती । दोहीं हाताई अधोमुख ॥४४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

क्षिपन्त्येकेऽवजानन्त एष धर्मध्वजः शठः । क्षीणवित्त इमां वृत्तिमग्रहीत्स्वजनोज्झितः ॥३८॥

त्याचें पूर्ववृत्त जे जाणती । ते अपमानूनि निंदिती । पूर्वी कदर्यू याची ख्याती । हा आम्हांप्रती संन्यास मिरवी ॥४५॥ येणें सूक्तासूक्तीं संचिलें धन । अधर्में वित्त झालें क्षीण । स्वजनीं सांडिला दवडून । पोटासी अन्न मिळेना ॥४६॥ अन्न मिळावया पोटासी । झाला कपटवेष संन्यासी । लाज नाहीं या निर्लज्जासी । योग्यता आम्हांसी दावितां ॥४७॥ पूर्वीलागूनि हा वंचकू । आतां झाला संन्यासी दांभिकू । याचें मत नेणे हा भोळा लोकू । महाठकू दृढमौनी ॥४८॥ हो कां बहुरुप्याचीं सोंगें जैसीं । तेवीं हा उत्तमवेषें संन्यासी । होऊनि ठकूं आला आम्हांसी । मारितां यासी दोष नाहीं ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

अहो एष महासारो धृतिमान् गिरिराडिव । मौनेन साधयत्यर्थं बकवद्‌दृढनिश्चयः ॥३९॥

हा दांभिकांमाजीं महाबळी । धरिल्या वेषातें प्रतिपाळी । आम्हीं पीडितां न डंडळी । जेवीं कां वाहटोळीं महामेरु ॥५५०॥ याच्या धैर्याचें शहाणपण । साधावया अन्नआच्छादन । बकाच्या ऐसें धरिलें मौन । स्वार्थ पूर्न लक्षूनी ॥५१॥ बक गिळावया मासा । मौन धरोनि राहे जैसा । हाही जाणावा तैसा । भोळ्या माणसां नाडील ॥५२॥ आतां हा धनलोभार्थ जाणा । पूर्वील उपद्रव नाणी मना । तेचि झालीसे दृढ धारणा । उपद्रवगणना या नाहीं ॥५३॥ एक म्हणती धैर्यमूर्ती । म्हणोनियां लाता हाणिती । एक ते नाकीं काडया खुपसिती । याची निजशांती पाहों पां ॥५४॥ ऐसऐसे उपद्रवती । नानापरी उपहासिती । तरी द्वेष नुपजे चित्तीं । निजशांती निश्चळू ॥५५॥ जंव जंव देखती त्याची शांती । तंव तंव दुर्जन क्षोभा येती । नाना उपद्रव त्यासी देती । तेंचि श्रीपती सांगत ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

इत्येके विहसन्त्येनमेके दुर्वातयन्ति च । तं बबन्धुर्निरुरुधुर्यथा क्रीडनकं द्विजम् ॥४०॥

कदर्या बाणली पूर्ण शांती । ऐसे एक उपहासिती । एक नाकीं चुना लाविती । एक मुख माखिती काजळें ॥५७॥ एक अतिशठ साचोकारे । पुढां ठाकोनि पाठिमोरे । शर्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ॥५८॥ तरी त्याचिया निजस्थिती । अणुमात्र क्षोभ न ये चित्तीं । तोचि संन्यासी त्रिजगतीं । ज्याची ढळेना शांती क्षोभविल्याही ॥५९॥ एवं क्षोभेना त्याचें मन । देखोन खवळले दुर्जन । त्यासी गळां शृंखला निरोधन । आणिला बांधून चौबारा ॥५६०॥ यासी वोळखा रे कोणी तुम्ही । हा धनलोभी जो अकर्मी । तो आजी सांपडविला आम्हीं । अतिअधर्मी दांभिक ॥६१॥ जेवीं गारुडी बांधी माकडा । तेवीं संन्यासी बांधिला गाढा । मिळोनियां चहूंकडा । मागांपुढां वोढिती ॥६२॥ एक ओढिती पूर्वेसी । एक ओढिती पश्चिमेसी । संन्यासी हांसे निजमानसीं । सुख सर्वांसी होये येणें ॥६३॥ देह प्रारब्ध भोगी जाण । याचा मजसी संबंध कोण । येणें विवेकें क्षमापूर्ण । कोणाचें मन दुखवीना ॥६४॥ जेथ स्वगोत्र सोइरे स्वजन । जिंहीं दीधला अतिसन्मान । त्यांदेखतां अपमान । अनुद्विग्न जो साहे ॥६५॥ त्यापाशीं शांति संपूर्ण । उद्धवा निश्चयेंसीं जाण । ज्याचें लोकेषणे लाजे मन । अशांति जाण ते ठायीं ॥६६॥ ऐसा क्षोभवितां पहा हो । क्षोभा न चढे त्याचा भावो । त्या संन्याशाचा अभिप्रावो । स्वयें देवाधिदेवो सांगत ॥६७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

एवं स भौतिकं दुःखं दैविकं दैहिकं च यत् । भोक्तव्यमात्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तमबुध्यत ॥४१॥

भिक्षु बोले निजविवेक । त्रिविध प्रारब्धें बांधले लोक । तेणें भोगणें पडे आवश्यक । रावो रंक सुटेना ॥६८॥ भूतांची पीडा ते भौतिक । देवांची पीडा ते दैविक । देहीं उपजती ज्वरादिक । हे पीडा देख दैहिक ॥६९॥ यापरी त्रिविध दुःख । प्रारब्ध झालें जनक । तें भोगितां मानी असुख । तो केवळ मूर्ख अतिमंद ॥५७०॥ जे भोग आले प्रारब्धेंसीं । तेथें साह्य केल्या हरिहरांसी । भोग न चुकती प्राण्यासी । हें जाणोनि संन्यासी क्षमावंत ॥७१॥ कृष्ण साह्य पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी । तेथें साह्य केल्या हरिहरांसी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥७२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

परिभूत इमां गाथामगायत नराधमैः । पातयद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्त्विकीम् ॥४२॥

दुर्जनांच्या उपद्रवाहातीं । निजशांति न सांडीच यती । धरोनियां सात्त्विकी धृती । स्वधर्मस्थिती न ढळेचि ॥७३॥ तेणें भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज मी सांगेन आतां । उद्धवा अतिसावधानता । तो बोध तत्त्वतां अवधारीं ॥७४॥ तो बोधू धरितां चित्तीं । द्वंद्वसाम्या पावे स्थिती । सहजें उल्हासे निजशांति । सायुज्यमुक्ती घर रिघे ॥७५॥ जगीं उद्धवाचें भाग्य पूर्ण । ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान । काय बोलिला भिक्षु आपण । तें निरुपण अवधारीं ॥७६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

द्विज उवाच-नायं जनो मे सुखदुःखहेतुर्न देवतात्मा ग्रहकर्मकालाः । मनः परं कारणमामनन्ति संसारचक्रं परिवर्तयेद्यत् ॥४३॥

सुजन दुर्जन साधारण । ऐसे जे त्रिविध जन । माझ्या सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण ते नव्हती ॥७७॥ जन तितुके पांचभौतिक । माझाही देहो तोचि देख । जनांसी मज सहजें ऐक्य । उपजे सुखदुःख मनापाशीं ॥७८॥ देवता सुखदुःखदायक । ऐसें म्हणावें आवश्यक । तीं दैवतें मनःकाल्पनिक । त्याचें सुखदुःख मजसी न लगे ॥७९॥ देवतारुपें मन आपण । मनें कल्पिले देवतागण । ते जैं सुखदुःखें देती जाण । तैं मुख्य कारण मन झालें ॥५८०॥ जेथ जैसा मनाचा सद्भावो । तेथ तद्रूपें भासे देवी देवो । जेथ मनाचा विकल्प पहा हो । तेथ थिता देवो दिसेना ॥८१॥ यालागीं सकळ देवता । त्या जाण मनःकल्पिता । त्यांपासाव सुखदुःखव्यथा । ते मनाचे माथां निश्चित ॥८२॥ आत्मा सुखदुःखांसी कारण । हें समूळ मिथ्यावचन । आत्म्याचे ठायीं द्वैतभान । त्रिशुद्धी जाण असेना ॥८३॥ मी एक सुखदुःखांचा दाता । हा एक सुखदुःखांचा भोक्ता । हें आत्म्याचे ठायीं तत्त्वतां । जाण सर्वथा असेना ॥८४॥ जन्मकाळींचे ग्रह दारुण । म्हणों सुखदुःखांसी कारण । ग्रहांचा ग्रहो मन आपण । जन्ममरण भोगवी ॥८५॥ ग्रहांची ग्रहगती देहान्तवरी । मनाची ग्रहगती त्याहूनि थोरी । दुःख भोगवी नाना प्रकारीं । जन्मजन्मांतरीं सोडीना ॥८६॥ दुष्ट ग्रह चारी दिवस पीडी । मनाची पीडा जन्मकोडी । दुष्ट ग्रहो भोगूनि सोडी । मन न सोडी कल्पांतीं ॥८७॥ जैं मन न धरी देहाभिमान । तैं ग्रहांची पीडा मानी कोण । यालागीं सुखदुःखां कारण । मनचि जाण महाग्रहो ॥८८॥ येथ निजकर्म दुःखदायक । हेंही म्हणतां न ये देख । कर्म कर्मबंधमोचक । तें दुःखदायक घडे केवीं ॥८९॥ स्वकर्म शुद्ध स्वाभाविक । त्यासी मनें करुनि सकामिक । नानापरी अतिदुःख । योनि अनेक भोगवी ॥५९०॥ हो कां कर्माचेनि क्रियायोगें । जैं मनःसंकल्प कर्मी न लगे । तैं सुखदुःखांचीं अनेगें । विभांडी वेगें निजकर्म ॥९१॥ देह सुखदुःखांसी काय जाणो । आत्मा सुखदुःख सर्वथा नेणे । येथ सुखदुःखांचे गाडे भरणें । मनें भोगवणें निजसत्ता ॥९२॥ येथ सुखदुःखदायक । मनचि झालें असे एक । मनाअधीन होऊनि लोक । मिथ्या सुखदुःख भोगिती ॥९३॥ काळ सुखदुःखांचा दाता । हेंही न घडे गा सर्वथा । मनःसंकल्पसंकेता । काळाची सत्ता लागली ॥९४॥ अजरामर असतां आपण । मनें घेतलें मज आहे मरण । तेथचि काळ लागला जाण । क्षणें क्षण निर्दाळित ॥९५॥ आपुलेनि हातें आपण । पठाडे खोंविलें दाभण । रात्रीं रुततांचि तें जाण । सर्पभयें प्राण सांडिला ॥९६॥ त्यासी सर्प नाहीं लागला । मा विखें केवीं तो घारला । परी निजशंके स्वयें निमाला । तैसा काळ लागला जनासी ॥९७॥ एकासी सर्प झोंबला पाठीसी । काय रुतलें म्हणे सांगातियासी । तो म्हणे कांटी लागली होती कैसी । ते म्यां अनायासीं उपडिली ॥९८॥ तो नव्हे सर्पा साशंक । यालागीं त्यासी न चढेचि विख । निजव्यापारीं देख । यथासुख वर्तत ॥९९॥ त्यासी सांगोनि बहुकाळें खूण । देतां सर्पाची आठवण । तत्काळ विषें आरंबळोन । आशंका प्राण सांडिला ॥६००॥ तेवीं निर्विकल्पपुरुखा । उठी संकल्पाची आशंका । ते काळीं काळू देखा । बांधे आवांका निर्दळणीं ॥१॥ निःशंकपणें साचार । ज्याचें मन म्हणे मी अमर । त्याचें काळ वर्जी घर । काळ दुर्धर मनःशंका ॥२॥ जो निर्विकल्प निजनिवाडें । काळ सर्वथा न ये त्याकडे । नश्वर नाहीं मा तयापुढें । काळ कोणीकडे रिघेल ॥३॥ यापरी गा काळ देख । नव्हे सुखदुःखदायक । सुखदुःखांचें जनक । मनचि एक निश्चित ॥४॥ मनःकल्पित संसार जाण । मनें कल्पिलें जन्ममरण। संसारचक्रीं आवर्तन । मनास्तव जाण पुनःपुनः ॥५॥ हे साही प्रकार जाण । म्हणती सुखदुःखांसी कारण । विचारितां हें अप्रमाण । मनोजन्य सुखदुःखें ॥६॥ नवल लाघवी कैसें मन । शुद्धि उपजवी मीपण । चिद्रूपा लावूनि जीवपण । सुखदुःखें जाण भोगवी ॥७॥ डोळींचा कणू अल्प एक । तो शरीरासी दे अतिदुःख । तेवीं वासनामात्रें मन देख । दारुण सुखदुःख भोगवी ॥८॥ म्हणाल येथ अविद्या एक । ते होय सुखदुःखदायक । अविद्या ब्रह्म असतां देख । मनेंवीण सुखदुःख कदा नुपजे ॥९॥ अविद्या ब्रह्म असतां पाहीं । मन लीन सुषुप्तीच्या ठायीं । तेव्हां सुखदुःखचि नाहीं । भोग कोणेंही कंहीं देखिजेना ॥६१०॥ मन दुश्चित जेव्हां पाहीं । तेव्हां जो भोग भोगिजे देहीं । तें सुखदुःख न पडे ठायीं । स्वयें स्वदेहीं देखिये ॥११॥ यालागीं सुखदुःखांचें कारण । मनचि आपण्या आपण । तेणें लावूनि जन्ममरण । भोवंडी दारुण भवचक्रीं ॥१२॥ भवचक्रीं प्रत्यावर्तन । कोणे रीती करवी मन । तेचि अर्थीचें निरुपण । भिक्षु आपण्या आपण निरुपी ॥१३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

मनो गुणान्वै सृजते बलीयस्ततश्च कर्माणि विलक्षणानि । शुक्लानि कृष्णान्यथ लोहितानि तेभ्यः सवर्णाः सृतयो भवन्ति ॥४४॥

मनें कल्पोनि निजसत्तें । उपजवी नाना वृत्तींतें । त्याचि त्रिगुणा होती येथें । गुणविभागातें गुणवृत्ती ॥१४॥ सत्त्वरजतमादि गुणीं । सुरनरतिर्यगादि योनी । मनें त्रिभुवन उभवूनी । संसारभुवनीं स्वयें नांदे ॥१५॥ त्या मनाची प्रौढी गाढी । क्षणें रची क्षणें मोडी । मन ब्रह्मादिकां भुली पाडी । इतर बापुडीं तीं कायी ॥१६॥ मनाचा बलात्कार कैसा । निर्गुणीं पाडी गुणाच्या फांसा । लावूनि जीवपणाचा झांसा । संसारवळसा आवर्ती ॥१७॥ केवळ विचारितां मन । तें जड मूढ अचेतन । त्याचें केवीं घडे स्त्रजन । तेंचि निरुपण सांगत ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

अनीह आत्मा मनसा समीहता हिरण्मयो मत्सख उद्विचष्टे । मनः स्वलिङगं परिगृह्य कामान् जुषन्निबद्धो गुणसङगतोऽसौ ॥४५॥

आत्मा चित्स्वरुप परिपूर्ण । निःसंग निर्विकार निर्गुण । त्यासी संसारबंधन । सर्वथा जाण घडेना ॥१९॥ जो स्वप्रकाशें प्रकाशघन । निजतेजें विराजमान । जो परमात्मा परिपूर्ण । त्यासी क्रियाचरण कदा न घडे ॥६२०॥ विचारितां निजनिवाडें । मनाचें जडत्वचि जोडे । त्यासीही संसार न घडे । भवबंध घडे तो ऐका ॥२१॥ नवल मनाचें विंदान । शुद्धीं उपजवी मीपण । तेचि वस्तूसी जीवपण । सगुणत्वा जाण स्वयें आणी ॥२२॥ मनःसंकल्पाचें बळ । शुद्धासी करी शबळ । लावूनि त्रिगुणांची माळ । भवबंधजाळ स्वयें बांधे ॥२३॥ जेवीं घटामाजील घटजळ । आकळी अलिप्त चंद्रमंडळ । तेवीं मनःसंकल्पें केवळ । कीजे शबळ चिदात्मा ॥२४॥ घटींचें हालतां जीवन । चंद्रमा करी कंपायमान । तेवीं शुद्धासी जन्ममरण । मनोजन्य सुखदुःखें ॥२५॥ आत्मा स्वप्रकाश चित्स्वरुप । मन जड कल्पनारुप । तें मानूनि आपुलें स्वरुप । त्याचें पुण्यपाप स्वयें भोगी ॥२६॥ जीवाचा आप्त आवश्यक । सुहृद सखा परमात्मा एक । तो मनाजीवाचा नियामक । द्रष्टा देख साक्षित्वें ॥२७॥ अविद्या प्रतिबिंबे नेटका । जीव जो कां माझा सखा । तो मनोभ्रमें भ्रमोनि देखा । भोगी सुखदुःखां मनोजन्य ॥२८॥ मनाची एकात्मता परम । जीवासी पडला थोर भ्रम । आपण असतांही निष्कर्म । कर्माकर्म स्वयें भोगी ॥२९॥ सूळीं जीव मनाचा नियंता । तोचि मनाच्या एकात्मता । मनाचिया सुखदुःखव्यथा । आपुले माथां नाथिल्या सोशी ॥६३०॥ जेवीं अतिआप्तता प्रधान । रायासी लावी दृढबंधन । मग राजा तो होय दीन । तो भोगवी तें आपण सुखदुःख भोगी ॥३१॥ ते दशा झाली जीवासी । मनें संसारी केलें तयासी । मग नाना जन्ममरणें सोशी । अहर्निशीं सुखदुःखें ॥३२॥ त्या मनासी निग्रहो न करितां । जीवाची न चुके व्यथा । मनाचेनि छंदें नाचतां । साधनें सर्वथा व्यर्थ होती ॥३३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

दानं स्वधर्मो नियमो यमश्च श्रुतं च कर्माणि च सद्‌व्रतानि । सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ताः परो हि योगो मनसः समाधिः ॥४६॥

न लक्षितां मनोनियमन । सर्वस्वही दिधल्या दान । एक मी दाता होय अभिमान । तेणें दानें मन दाटुगें होय ॥३४॥ चुकोनि मनोनिग्रहाचें वर्म । आचरतां वर्णाश्रमधर्म । तेणें उल्हासे मनोधर्म । माझें स्वकर्म अतिश्रेष्ठ ॥३५॥ मीचि एक तिहीं लोकीं । स्वाचारनिष्ठ स्वयंपाकी । यापरी स्वधर्मादिकीं । मन होय अधिकीं चाविरें ॥३६॥ मनोनियमनीं नाहीं बुद्धी । तैं यमनियम ते उपाधी । मी एक साधक त्रिशुद्धी । हेंचि प्रतिपादी मनोधर्म ॥३७॥ करितां वेदशास्त्रश्रवण । गर्वाचें भरतें गहन । पांडित्यीं अतिअभिमान । मनोनियमन तेथें कैंचें ॥३८॥ करुं जातां निजकर्म । कर्मक्रिया अतिदुर्गम । कर्मठतेचा चढे भ्रम । मनोनियमन घडे केवीं ॥३९॥ कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं असोनि विदेहता । त्यासी कर्मी कर्मबद्धता । कर्मठ मूर्खतां मानिती ॥६४०॥ अनंतव्रतें झाले व्रती । तेणें धनधान्य वांछिती । मनोनिग्रहो नाहीं चित्तीं । सहृतें जाती सुनाट ॥४१॥ व्रत दान स्वधर्म सकळ । यांसी मनोनिग्रहो मुख्य फळ । तेणेंवीण अवधीं विकळ । साधनें निष्फळ साधकां ॥४२॥ दानादिक सप्त पदार्थ । हे ज्ञानाचे अंगभूत । तीं साधनें समस्त । निष्फळ येथ केवीं म्हणा ॥४३॥ दानादिकें जीं जीं येथें । इहामुत्र फळ ये त्यांतें । तें फळचि निष्फळ येथें । जन्ममरणांतें वाढवी ॥४४॥ येथ साधक होय सज्ञान । फळाशा निःशेष त्यागून । दानादि स्वधर्माचरण । चित्तशुद्धीसी जाण उपयोगी ॥४५॥ माझी व्हावी चित्तशुद्धी । ऐशी उपजावया बुद्धी । भगवत्कृपा पाहिजे आधीं । तैं साधनें सिद्धी पावती ॥४६॥ साधनीं माझी मुख्य भक्ती । त्यांत विशेषें नामकीर्ती । नामें चित्तशुद्धि चित्तीं । स्वरुपस्थिती साधकां ॥४७॥ नामापरतें साधन । सर्वथा नाहीं आन । नामें भवबंधच्छेदन । सत्य जाण उद्धवा ॥४८॥ स्वरुपस्थित निश्चळ मन । जेथ लाजोनि जाय साधन । तेथ दानादिकांचें प्रयोजन । सहजचि जाण खुंटलें ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

समाहितं यस्य मनः प्रशान्तं दानादिभिः किं वद तस्य कृत्यम् । असंयतं यस्य मनो विनश्येद्दानादिभिश्चेदपरं किमेभिः ॥४७॥

येथ ज्या पुरुषाचें मन । ठाकी आपुलें जन्मस्थान । त्यासी दानादिकांचें कोण । प्रयोजन साधनीं ॥६५०॥ पूर्णतृप्तापाशीं जाण । ओगरलिया सदन्न । तो जेवीं न पाहे हुंगोन । तेवीं साधन अमनस्का ॥५१॥ गंगा उतरावया महापूरीं । अतिप्रयासीं ताफा करी । तोचि पूर वोहटल्यावरी । ताफा अव्हेरी निःशेष ॥५२॥ तेवीं कामक्रोधादिवेगशून्य । ज्याचें निर्विकल्पीं निश्चळ मन । त्यासी दानादिकीं प्रयोजन । नाहीं जाण निश्चित ॥५३॥ जेवीं सूर्योदय झाल्यापाठीं । उपेगा न ये लक्ष दिवटी । तेवीं निर्विकल्पता मनीं उठी । तैं साधनें कोटी सुनाट ॥५४॥ एवं समाहित ज्याचें मन । त्यासी दानादि नाना साधन । करावया नाहीं प्रयोजन । कल्पना पूर्ण निमाल्या ॥५५॥ ज्याचें नेम न मनी चित्त । जें सदा विवेकरहित । जें अनिवार विषयासक्त । त्यासीही अनुपयुक्त साधनें ॥५६॥ जेवीं मदगजांच्या लोटीं । सैन्य पळे वारा वाटीं । तेवीं विषयासक्तापाठीं । साधनें हिंपुटी होऊनि ठाती ॥५७॥ जो विषयासक्तमना । तो सर्वथा नातळे साधना । करी तैं तेथेंही जाणा । विषयकल्पना संकल्पीं ॥५८॥ स्वयें करितां पैं साधना । जें जें फळ वांछी वासना । तें तेंचि फळे जाणा । करी उगाणा दानादिकांचा ॥५९॥ जेवीं कां पूर्णबळाचा वारु । त्यावरी बैसला निर्बळ नरु । तो त्यासी सर्वथा अनावरु । नव्हे स्थिरु अणुमात्र ॥६६०॥ तैसें ज्याचें अतिदुर्मन । सदा कामक्रोधीं परिपूर्ण । जो स्वयें झाला मनाचे आधीन । ज्याचा विवेक निमग्न महामोहीं ॥६१॥


कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]