<poem> एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुनरु अमरपती । अनुभवु तोचि ऐरावती । स्वानंदेमदें भद्रजाती । उन्मत्तीस्थितीं डुल्लतु ॥१॥ उपदेशाचें वज्र तीख । छेदी संकल्पविकल्पपांख । जडजीव ते पर्वत देख । निजस्थानीं सम्यक स्थापिसी ॥२॥ विवेकाचे पारिजात । वैराग्यसुमनीं घमघमित । मुमुक्षभ्रमर रिघोनि तेथ । आमोद सेविती चित्सुख ॥३॥ उपशम तोचि बृहस्पती । विश्वासें तुझा निकटवर्ती । त्यासी मानिसी अतिप्रीतीं । तो सभेप्रती सदस्य ॥४॥ कृपाकामधेनूंचीं खिल्लारें । श्रद्धावत्साचेनि हुंकारें । वोळल्या वोरसाचेनि भरें । तें दुभतें पुरे भागवतां ॥५॥ सतेज चिंतामणीचे खडे । सभोंवतीं लोळती चहूंकडे । भक्त न पाहती तयांकडे । चरणसुरवाडें सुखावले ॥६॥ स्वर्गांगना अष्टमासिद्धी । तुजपुढें नाचती नानाछंदीं । त्यांतें दास न पाहती त्रिशुद्धी । मंदबुद्धि भाळले ॥७॥ समसाम्यें समान । अढळ तुझें सिंहासन । सच्चिदानंदाची गादी जाण । तेथें सुखासन पैं तुझें ॥८॥ पावावया तुझिया पदाप्रती । साधनचतुष्टयसंपत्ती । जोडोनियां याजक यजिती । प्रत्यगावृत्तीचेनि यागें ॥९॥ जे मन होमिताति सावधानीं । ऐसें भक्तभजन देखोनि । तेणें भावार्थयोगें संतोषोनी । निजपददानी तूं होशी ॥१०॥ त्यांसी निजात्मता देऊनि । बैसविसी निजासनीं । मरणेंवीण अमर करूनी । अपतनीं स्थापिसी ॥११॥ इंद्रा अहल्येशीं व्यभिचारु । तुज वृंदेशीं दुराचारु । इंद्र जाहला सहस्त्रनेत्रु । तूं सर्वांगे सर्वत्रु देखणा ॥१२॥ इंद्रासी दैत्य करिती दीन । त्याचें पद घेती हिरोन । तुज भक्त करिती प्रसन्न । पद चिद्धन ते घेती ॥१३॥ ककुत्स्थ बैसला इंद्राचे स्कंधीं । दुर्वास बैसला तुझ्या खांदीं । इंद्र वर्ते विष्णूचे बुद्धी । तूं भक्तच्छंदीं वर्तसी ॥१४॥ रावणें बंदीं घातलें इंद्रासी । तुज बळीनें राखिलें द्वारासी । इंद्र याची यागअतवदानासी । तूं भूमिदानासी याचिता ॥१५॥ इंद्रासी अग्निमुखें प्राप्ती । तुज विश्वतोमुखीं तृप्ती । ऐसा सद्गुअरु तूं कृपामूर्तीं । अमरचक्रवर्ती गुरुराया ॥१६॥ तुझी करावी विनवणी । तंव तेथें न रिघे वाणी । वाणीप्रकाश तुझेनी । वक्ता वदनीं तूं सत्य ॥१७॥ एका एक जनार्दनीं । तो जनार्दन वक्ता वदनीं । ऐसा वचनामाजीं प्रवेशोनी । ग्रंथकरणी करविता ॥१८॥ तेथें मूळीं निमाली अहंता । अहं दवडूनि तूं कवि कर्ता । एका जनार्दनु अभंगी सुता । अभंगता गुरुचरणीं ॥१९॥ त्या गुरुचरणप्रसादें । गुरूचीं लक्षणें विनोदें । वाखाणिलीं यथाबोधें । यदुसंवादें अवधूतें ॥२०॥ मागा अष्टमाध्यायाच्या अंतीं । असतां पिंगलेसी एकांतीं । विवेकवैराग्य निवृत्तीवृत्ती । निजसुखप्राप्ती पावली ॥२१॥ जंव जंव अपरिग्रह होणें । तंव तंव निजसुख पावणें । हेंचि प्रस्तुत बोलणें । तेणें ब्राह्मणें बोलिजे ॥२२॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीब्राह्मण उवाच । परिग्रहो हि दुःखाय यद्यत्प्रियतमं नृणाम् । अनन्तं सुखमाप्नोति तद्विद्वान् यस्त्वकिञ्चनः ॥१॥

ब्राह्मण म्हणे रायासी । परिग्रहो जयापाशीं । वाढतें दुःख तयासी । अहर्निशीं चढोवढी ॥२३॥ कुटुंबपरिग्रहाचे आसक्ती । कपोता निमाला दुर्मती । आतां एकाकी परिग्रहो करिती । तेही पावती दुःखातें ॥२४॥ गृहपरिग्रहें गृहस्था । पाषाणमृत्तिकेची ममता । काडीकारणें कलहो करितां । सुहृदता सांडिती ॥२५॥ निःसंगा परिग्रहो लागला कैसा । शिष्यसंप्रदायें घाली फांसा । शास्त्रपुस्तकसंग्रहवशा । वाढवी आशा मठाची ॥२६॥ त्या मठशिष्यांचें सांत्वन । करितां अत्यंत होय दीन । मग परिग्रहाचें उपशमन । अपरिग्रही जाण करिताति ॥२७॥ त्या मठाचिया आशा । शिष्यसंप्रदायवशा । कलहो लागे आपैसा । विरोधु संन्यासा परिग्रहें ॥२८॥ परिग्रहो जिणोनि गाढा । लंगोटी त्यजूनि जाहला उघडा । नागवे माथां घेऊनि घडा । लाविल्या झाडा शिंपित ॥२९॥ त्या वृक्षाचें कोणी पान तोडी । त्यासी आक्रोशें कलह मांडी । थोर परिग्रहाची सांकडी । दुःखें पीडी सर्वांतें ॥३०॥ आवडीं केला जो जो परिग्रहो । तो तो उपजवी दुःखकलहो । हा होतांही अनुभवो । वैराग्य पहा हो उपजेना ॥३१॥ ऐशी परिग्रहाची कथा । देखोनि देखणा जो ज्ञाता । आसक्ती सांडोनि सर्वथा । अकिंचनपंथा लागला ॥३२॥ प्रपंच अनित्य नाशवंत । तेथील संग्रह काय शाश्वत । ऐसें विवंचूनि समस्त । अकिंचनचित्त ते जाहले ॥३३॥ परिग्रहामाजीं गाढा । देहपरिग्रहाचा खोडा । मिथ्यात्वें फोडी रोकडा । तो विवेकें गाढा ज्ञाता पैं ॥३४॥ जेथ देहपरिग्रह मिथ्या जाहला । तो अनंत सुखाच्या घरा आला । ज्या सुखासी अंत न वचे केला । त्या पावला निजसुखा ॥३५॥ परिग्रहो दुःखवंतू । हा कुररी गुरुत्वें वृत्तांत्तू । तुज सांगेन साद्यतू । उपहासें अवधूतू बोलिला ॥३६॥ तंव राजा मनीं चमत्कारला । म्हणे मी राज्यपरिग्रहें गुंतला । देहपरिग्रहें बंदी पडला । पाहिजे केला हा त्यागु ॥३७॥ ऐसा राजास वैराग्यु । करूं पाहे सर्व त्यागु । श्रवणें जाहला तो सभाग्यु । होय योग्यु निजज्ञाना ॥३८॥ करूनी गुरुत्वें जाणा । परिग्रहत्यागविवंचना । आणावया जी मना । सादर श्रवणा करीतसे ॥३९॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

सामिषं कुररं जग्मुर्बलिनो ये निरामिषाः । तदामिषं परित्यज्य स सुखं समविन्दत ॥२॥

'कुरर' बोलिजे टिटवा । पावला आमिषकवळु बरवा । तेणें तेथेंची भक्षवा । तो लोभस्वभावा ठेविला ॥४०॥ तें आमिष देखोनियां फार । बळी जे निरामिष कुरर । ते धांविन्नले अतिसत्वर । लहान थोर मिळोनि ॥४१॥ हिरोनि घेऊं पाहती बळें । हें जाणोनियां तो पुढें पळे । पळतां देखोनि एक वेळे । त्वरें तत्काळें वेढिला ॥४२॥ त्या आमिषाचिया चाडा । थोर मांडला झगडा । मारूं लागले फडफडां । चहूंकडा निष्ठुर ॥४३॥ एक झडपिती पांखीं । एक चपेटे हाणिती नखीं । एक विदारिती मुखीं । परम दुःखी होतसे ॥४४॥ आमिष-कवळें गुंतलें मुख । मारितां देऊं न शके हाक । खस्तावेस्त करितां देख । बोलावया मुख त्या नाहीं ॥४५॥ हे माझे स्वजाती पहा हो । सांडोनियां सुहृदभावो । मज कां करूं आले अपावो । तो अभिप्रावो विवंची ॥४६॥ म्हणे माझिया दुःखासी मूळ । मजपाशील आमिषकवळ । तो त्यजोनियां तत्काळ । सुखी सुनिश्चळ बैसला ॥४७॥ जेथ आमिषकवळु पडे । तेथ कलहाचा गोंधळ मांडे । परस्परें फुटती मुंडें । ठेंचिती तोंडे येरयेरां ॥४८॥ आमिष त्यजोनि बैसला देख । तो पाहे कलहाचें कौतुक । मूळ परिग्रहो तेथें दुःख । परम सुख त्यागितां ॥४९॥ माड्या गोपुरें धवळारा । धनधान्य नाना अंबरा । रत्नें प्रवाल धन पुत्रदारा । हा समुदायो खरा परिग्रहो ॥५०॥ या समस्त परिग्रहाचें मूळ । देहबुद्धि गा केवळ । तेहीं अभिमानें सबळ । एवं सर्वांस मूळ अभिमानू ॥५१॥ तो अभिमानू जैं सांडे । तैं प्रपंचाचें मूळ खंडे । मूळ छेदिल्या जेवीं उलंडे । अतिप्रचंडे तरुवर ॥५२॥ अभिमान देहबुद्धिजीवन । देहबुद्धि संगास्तव गहन । उभयसंगू तो आयतन । निवासस्थान परिग्रहो ॥५३॥ एवं अन्योन्य सापेक्षक । येरयेरा आवश्यक । याचे त्यागीं परम सुख । अतिदुःख तो परिग्रहो ॥५४॥ परिग्रहत्यागाचें मूळ जाण । आधीं त्यजावा अभिमान । तेणेंवीण त्यागु तो विटंबन । केल्या जाण होईल ॥५५॥ अभिमानसहित सकळ सांडे । तैं पडती सुखाचे पायमांडे । तें सुख न बोलवे तोंडें । शब्द मुरडे लाजोनि ॥५६॥ अभिमान जाऊन वर्तन । कैसें राया म्हणसी जाण । तें अर्भक-गुरुत्वलक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥५७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

न मे मानापमानौ स्तो न चिन्ता गेहपुत्रिणाम् । आत्मक्रीड आत्मरतिर्विचरामीह बालवत् ॥३॥

बाल माझें तुझें न म्हणे । उंच नीच कांही नेणे । यालागीं मानापमान तेणें । सुखें साहणें सर्वथा ॥५८॥ तिमासांचेनि बाळकें । मानु कोण हें नोळखे । अपमानू तोही न देखे । आपुलेनि सुखें क्रीडत ॥५९॥ दुजेपणातें नातळे । बालक आपुलियाचि लीळें । आपआेपणियाशींच खेळें । आपुलेनि मेळें आपण ॥६०॥ देहगेहांची चितां । बाळासि नातळे सर्वथा । स्वभावेंचि निश्चिंतता । चिंताकथा त्या नाहीं ॥६१॥ न देखतां दुजी स्थिती । बाळका आपुली आपणिया प्रीती । आपुली आपणिया अतिरती । तैसी गती योगिया ॥६२॥ योगियासी प्रपंचाचें भान । सत्यत्वें नाहीं जाण । यालागीं मानापमान । दोन्ही समान तयासी ॥६३॥ चित्रींचेनि सापें खादला । तो चित्रींचेनि अमृतें वांचला । तेवीं जिण्या मरण्या मुकला । निश्चिळ ठेला निर्द्वंद्वें ॥६४॥ गृहदारापुत्रचिंता । हे समूळ मिथ्या वार्ता । स्वदेहो सत्यत्वें असता । तरी करूं लाहता चिंतेतें ॥६५॥ भवमूळ कल्पना जाण । ते कल्पना मनाआघीन । तें मन स्वरूपीं जाहलिया लीन । तेव्हां वस्तुचि होणे सर्वत्र ॥६६॥ तेणें स्वरूपानसंघानें । सुखें क्रीडतु चिद्धनें । क्रीडा दैवयोगें करणें । देहाभिमानें विरहित ॥६७॥ पावोनि निजसुखप्राप्ती । मनआादि इंद्रियें उपरमती । अणुभरी स्फुरेना वृत्ती । 'समाधि' बोलती या नांव ॥६८॥ तेचि स्वरूपीं ठेवूनि मन । बाह्यस्फूर्तीचें स्फुरे भान । ते दशा गा 'व्युत्थान' । साधुजन बोलती ॥६९॥ उंबर्यागवरी ठेविला दिवा । तो जेवीं देखे दोंही सवा । तैसी व्युत्थानदशा जीवभावा । उभय स्वभावा देखणी ॥७०॥ लवणजळा समरसता । तेवीं स्वरूपीं विरवूनि चित्ता । समाधिव्युत्थाना हाणी लाथा । निजीं निजस्वरूपता तापोनी ॥७१॥ त्यासी कोणाचा मानापमान । गृहपुत्रचिंता करी कोण । स्वरूपीं हारपलें मन । निजसमाधान पावला ॥७२॥ मनेंवीण जें विहरण । तें बालकाच्या ऐसें जाण । दैवयोगें चलनवलन । वृत्तिशून्य वर्तत ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

द्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ । यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः ॥४॥

थोर चिंतेचा आवर्त । जेथ ब्रह्मादिक बुडत । ते आवर्तीं दोघे मुक्त । परीस निश्चित यदुवीरा ॥७४॥ दोघां नाहीं द्वैतभान । दोघे नेणती मानापमान । दोघे सुखें सुखसंपन्न । दोघे मनेंवीण वर्तती ॥७५॥ एकासी पुढे भेटले दुःख । दुजेनि जिंतिलें सुखदुःख । एकासी मुग्धतेचें सुख । दुज्या देख निजज्ञान ॥७६॥ पाहतां बाळकाचे ठायीं । गुप्तवासना असे देहीं । ते अंकुरीजोनि पाही । अवश्य अपायीं घालील ॥७७॥ तैसा नव्हे योगिया गुणातीत । जो पूर्णानंदें पूर्ण भरित । त्यासी सुखदुःखाची मात । नाहीं जगांत सर्वथा ॥७८॥ देहीं दिसे जीव वर्तत । तो केवीं झाला गुणातीत । ऐसे म्हणसी तो वृत्तांत । ऐक साद्यंत सांगेन ॥७९॥ साधकें सेवूनि साधुजन । वाढविला सत्त्वगुण । वाढलेनि सत्त्वें जाण । ज्ञानसमाधान साधिलें ॥८०॥ साधिलेनि ज्ञानसाधनें । छेदी रजतमांचीं विंदानें । जें मोहममतेचीं दारुणें । उभय भोगजन्यें कर्मठां ॥८१॥ एवं वाढलेनि सत्त्वोत्तमें । निर्दळलीं रजतमें । सत्त्व एकलेपणें निमे । स्वयें उपशमें तें जाणा ॥८२॥ जंव जंव काष्ठसंभार असे । तंव तंव अग्नि जाळी उल्हासें । सरलेनि काष्ठलेशें । अग्नि प्रवेशे निजतेजीं ॥८३॥ ऐसी जिणोनि गुणावस्था । योगी पावला गुणातीतता । त्यासी न बाधी भवव्यथा । प्रलयकल्पांता जालिया ॥८४॥ ज्या सुखासी नाहीं अंत । तें सुख स्वरूपें जालें प्राप्त । ते देहीं वर्ततां देहातीत । चिंताआवर्त त्यां नाहीं ॥८५॥ एकाकी जाहल्यावीण तत्त्वतां । ते अवस्था न चढे हाता । येचिविशीं नृपनाथा । कुमारीगुरुकथा सांगेन ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

क्वचित् कुमारी त्वात्मानं वृणानान् गृहमागतान् । स्वयं तानर्हयामास क्वापि यातेषु बन्धुषु ॥५॥

कोणी एके कुमारीसी । घरीं राखण ठेवूनि तिसी । पिता माता स्वगोत्रेसीं । गेली यात्रेसी कुळदेवा ॥८७॥ ते कुमारीचें विवाहलग्न । पूर्वीं नेमिलें होतें जाण । त्या निश्चयालागीं ब्राह्मण । घरा संपन्न पैं आले ॥८८॥ पुसती घरीं आहे कोण । लाजे नोवरी धरी मौन । त्यांसी न देतां दर्शन । पूजाविधान ते मांडी ॥८९॥ वातायनद्वारा आसनें । दिधलीं समस्तांकारणें । गंधाक्षता सुमनें पानें । दिधले मौनें उपचार ॥९०॥ देखोनि पूजेचें विधान । जाणों सरले ते ब्राह्मण । घरीं नोवरीचि आहे जाण । हें चतुरलक्षण तियेचें ॥९१॥ त्यांच्या पाहुणेराची चिंता । उशिरां येईल माझी माता । ते काळीं साळीं सडितां । विलंबु सर्वथा होईल ॥९२॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

तेषामभ्यवहारार्थं शालीन् रहसि पार्थिव । अवघ्नन्त्याः प्रकोष्ठस्थाश्चक्रुः शङ्खाः स्वनं महत् ॥६॥

ऐसें विचारूनि जाण । साळी कांडूं रिघे आपण । ते कंडणकाळींचे विंदान । चतुरलक्षण परियेसीं ॥९३॥ घावो घालितां कांडणा । उठी झणत्कार करकंकणा । तेणें नादें लाजोनि जाणा । विचारु मनामाजीं करी ॥९४॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

सा तज्जुगुप्सितं मत्वा महती व्रीडिता ततः । बभञ्जैकैकशः शङ्खान् द्वौ द्वौ पाण्योरशेषयत् ॥७॥

या शंखवलयांचा ध्वनि । पडेल पाहुण्यांचें कानीं । ते अत्यंत लाज मजलागुनि । नववधु कांडणीं बैसली ॥९५॥ त्यांच्या कानीं ध्वनि न पडे । कांडण तरी चाले पुढे । ऐसें विचारोनि रोकडें । कंकणाकडे पाहिलें ॥९६॥ पाहतां दिसे ते अबला । विचार वृद्धाहोनि आगळा । करीचा कंकणखळाळा । युक्तीं वेल्हाळा विभागी ॥९७॥ जरी कंकण फोडूं आतां । तरी ते मुहूर्तींच अशुभता । शतायु हो माझा भर्ता । न फोडी सर्वथा या हेतु ॥९८॥ अति बुद्धिमंत ते कुमारी । हळूचि कंकणें उतरी । ते ठेवी जतनेवरी । राखे दों करीं दोनी ॥९९॥ दोनी कंकणें उरवूनी । कांडूं बैसली कांडणीं । दोंहीमाजीं उठे ध्वनी । ऐकोनि कानीं लाजिली ॥१००॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

उभयोरप्यभूद् घोषो ह्यवघ्नन्त्याः स्वशङ्खयोः । तत्राप्येकं निरभिददेकस्मान्नाभवद्ध्वनिः ॥८॥

म्हणे दोघांचा संगु एके स्थानीं । तेथें सर्वथा न राहे ध्वनी । दोंतील एक वेगळें काढोनी । बसे कांडणीं कुमारी ॥१॥ एकपणीं कांडितां । ध्वनि नुठेचि तत्त्वतां । तो उपदेशु नृपनाथा । झालों शिकता मी तेथ ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

अन्वशिक्षमिमं तस्या उपदेशमरिन्दम । लोकाननुचरन्नेतान् लोकतत्त्वविवित्सया ॥९॥

जिणोनि प्रतिस्पर्धी भूपाळ । किंकर केले राजे सकळ । तूं अरिमर्दन सबळ । मिथ्या केवळ तो गर्व ॥३॥ कामक्रोधादि अरिवर्ग । न जिणतां सकळ साङ्ग । अरिमर्दन हा बोल व्यंग । होईल चांग ये अर्थी ॥४॥ कामादिक सहा वैरी । येणें उपदेशशस्त्रधारीं । जिणोनि घालितां तोडरीं । मग संसारी अरि नाहीं ॥५॥ लोकांवेगळा अवधूतु । म्हणसी कुमारी ते घरांआंतु । तो एकांतींचा वृत्तांतु । कैसेनि प्राप्तु तुज झाला ॥६॥ राहोनियां विजनस्थानीं । विश्वासोनि गुरुवचनीं । दृढ बैसोनि आसनीं । निजतत्त्व ध्यानीं आकळिलें ॥७॥ त्याचि तत्त्वनिश्चयालागुनी । मी विचरतसें ये मेदिनी । निजात्मभावो जनीं वनीं । दृढ करोनि पाहतसें ॥८॥ होतां दृश्येंसीं भेटी । दृश्य दृश्यत्वें न पडे मिठी । द्रष्टेपणही घालोनि पोटीं । ऐसिया दृष्टीं विचरत ॥९॥ अंगीकारितां गुरुत्वगुण । देखतां जगाचें दर्शन । मज होतसे चैतन्यभान । ऐसे जाण मी विचरत ॥११०॥ ऐशिया निजदृष्टीं वीरा । मज विचरतां चराचरा । अवचटें कुमारीमंदिरा । त्याचि अवसरा मी आलों ॥११॥ करितां कंकणविवंचना । निजस्वार्थाचिया खुणा । पाहोनि घेतलें ज्या लक्षणा । ते विचक्षणा परियेसीं ॥१२॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

वासे बहूनां कलहो भवेद् वार्ता द्वयोरपि । एक एव चरेत्तस्मात् कुमार्या इव कङ्कणः ॥१०॥

जेथ होय बहुतांची वस्ती । तेथ अनिवार कलहप्राप्ती । दोघे बैसल्या एकांतीं । वार्ता करिती बहुविधा ॥१३॥ जेथें गोष्टीखालीं काळु जाये । तेथें निजस्वार्थु हों न लाहे । यालागीं मी पाहें । विचरत आहें एकाकी ॥१४॥ एकाकी एकाग्रता । साधिल्या थोर लाभु ये हाता । येचविषयीं शरकर्ता । गुरु तत्त्वतां म्यां केला ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

मन एकत्र संयुञ्ज्याज्जितश्वासो जितासनः । वैराग्याभ्यासयोगेन ध्रियमाणमतन्द्रितः ॥११॥

वैराग्येंवीण अभ्यासु घडे । तेथ विषयचोर उठती गाढे । कामाचा घाला पडे । मुद्दल बुडे निजज्ञान ॥१६॥ विवेकदीप करूनि धुरे । निरसी अज्ञानाचें अंधारें । वैराग्याचें बळ पुरें । महामुद्रेचेनि योगें ॥१७॥ प्राणापानाची चुकामुकी । झाली होती बहुकाळ कीं । ते अभ्यासबळें एकाएकीं । केली वोळखी दोघांसी ॥१८॥ वोळाखीसवेंचि जाण । पावली जुनाट पहिली खूण । दोघां पडिलें आलिंगन । समाधान समसाम्यें ॥१९॥ दृढ बैसोनि आसनीं । ऐशी प्राणापानमिळणी । करूनि लाविली निशाणी । ब्रह्मस्थानीं रिघावया ॥१२०॥ ब्रह्मगिरीचिया कडा । शमदमें घालोनियां वेढा । प्रत्याहाराचा झगडा । पुढिले कडां लाविला ॥२१॥ प्राणापानांच्या विवरीं । पहिली वोळखी होती खरी । माळ लाविली अभेदकरीं । मन एकाग्रीं राखोनि ॥२२॥ एकाग्रतेचेनि कल्लोळें । पुढारें न ढळवे चालिले बळें । उल्हाटयंत्राचेनि मेळें । षट्चक्रपाळें भेदिलें ॥२३॥ वैराग्याचीं वज्रकवचें । निधडे वीर लेऊनि साचे । एकाग्रताबळें बळाचें । झळके ध्यानाचें करीं खड्ग ॥२४॥ नवल खड्गांेचा वाहो । लहान थोर निवटी पहा हो । संमुख आलिया संदेहो । न लगतां घावो छेदित ॥२५॥ निर्दाळूनि आळसासी । दासी केलें निद्रेसी । ऐसें सावधान अहर्निशीं । योगदुर्गासी झोंबती ॥२६॥ रणरंगींचे वीर गाढे । निजबळें चालिले पुढें । सत्रावीचें पाणीवाढे । जिंतिलें रोकडें महावीरीं ॥२७॥ तेथ युद्ध झालें चांग । कामादिक अरिषड्वर्ग । रणीं पाडिले अमोघ । सतेज खड्ग झळकत ॥२८॥ ऐसे वैरी पाडूनि रणीं । प्राशिलें सत्रावीचें पाणी । तंव अनुहताची सुडावणी । दुर्गामधोनि ऊठली ॥२९॥ तेथ सोहंवीराची एकाग्रता । होतां भीतरील भेदु आला हाता । दुर्गराखती अहंममता । मरों सर्वथा टेंकली ॥१३०॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

यस्मिन्मनो लब्धपदं यदेतच्छनैः शनैर्मुञ्चति कर्मरेणून् । सत्त्वेन वृद्धेन रजस्तमश्च विधूय निर्वाणमुपैत्यनिन्धनम् ॥१२॥

कामक्रोधादि महाशूर । पुत्र रणीं पडले थोर । तेणें दुःखें अतिजर्जर । मरणतत्पर दिसताति ॥३१॥ ऐसी ऐकोनि दुर्गाची वार्ता । उल्हासु वीरांचिया चित्ता । उठावा दीधला मागुता । दुर्ग सर्वथा घ्यावया ॥३२॥ निजधैर्ये वीर अदट । निजसत्त्वें अतिउद्भट । पुढें निर्धारितां वाट । थोर अचाट देखिलें ॥३३॥ कर्मरेणूंचे दुर्धर घाट । विधिवादें अवघड वाट । हळूहळू उल्लंघितां अचाट । समूळ सपाट तो केला ॥३४॥ पुढां रजतमाचें आगड । खोलपणें अत्यंत गूढ । घालूनि निवृत्तीचे दगड । सत्त्वें सुदृढ बूजिलें ॥३५॥ सांचलू नव्हतां बाहेरी । जिणोनि मनकर्णिकावोवरी । माळ चढविली ब्रह्मगिरी । ब्रह्मरंध्रीं उसळले ॥३६॥ तेथ जैताची एक घायी । अनुहत निशाण लागलें पाहीं । शोधितां पारखें कोणी नाहीं । केलें ठायीं स्ववश ॥३७॥ तेथ रजतमांच्या वाटा । सहजें जाल्या सपाटा । हरिखें रामराज्याचा चोहटा । धेंडे दारवंटा पीटिले ॥३८॥ पारिखें कोणी न पडे दृष्टी । ध्यानखड्गाची सोडिली मुष्टी । वैराग्यकवचाचिया गांठी । समदृष्टीं सोडिल्या ॥३९॥ ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी न दिसे पाहतां । ध्यानखड्ग तत्त्वतां । न धरी सर्वथा या हेतू ॥१४०॥ दारुण युद्धसामग्री । सत्त्वें केली होती भारी । ते साधने सांडिलीं दुरी । कोणी वैरी असेना ॥४१॥ तन्मयतेचें छत्र धरूनी । समसाम्यसिंहासनीं । बैसला सहज समाधानी । त्यागी वोंवाळुनी जीवभावो ॥४२॥ शोधित वाढला सत्त्वगुण । तेणें सर्वस्वें केलें निंबलोण । पायां लागोनि आपण । स्वयें जाण उपरमला ॥४३॥ जैसा अग्नि असे काष्ठांच्या मेळीं । मंथिल्या काष्ठाची करी होळी । काष्ठ नाशूनि तत्काळीं । त्यजूनि इंगळीं उपशमे ॥४४॥ तैसें वाढोनि सत्त्व उत्तम । नाशूनि सांडी रजतम । पाठीं सत्त्वाचाही संभ्रम । स्वयें परम पावला ॥४५॥ तेथें निमालें जीवाचें जीवपण । ज्ञातृत्वेंसीं निमालें ज्ञान । निमालें प्रपंचाचें भान । चिन्मात्र पूर्ण कोंदलें ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

तदैवमात्मन्यवरुद्धचित्तो न वेद किञ्चिद् बहिरन्तरं वा । यथेषुकारो नृपतिं व्रजन्तमिषौ गतात्मा न ददर्श पार्श्वे ॥१३॥

ऐसी चिन्मात्र परिपूर्णता । तेथ निरोधूनि आणितां चित्ता । चित्त पावे चैतन्यता । जाण सर्वथा नरवीरा ॥४७॥ तेव्हां अंतरीं चैतन्यघन । बाह्य चिन्मात्र परिपूर्ण । आणिक न दिसे गा जाण । वृत्तीनें आण वाहिली ॥४८॥ पाहतां ध्येय ध्याता ध्यान । जेथ उल्हासें विगुंतलें मन । ते संप्रज्ञातसमाधी जाण । गुणेंवीण भोगिती ॥४९॥ तेथ निःशेष समरसे मन । झाला सुखरूप चिद्घीन । ते समाधी परम कारण । विचक्षण बोलती ॥१५०॥ ब्रह्म इंद्रियां गोचर नसे । गुण गेलिया डोळां दिसे । हे अनुभव्यासीचि भासे । बोलावें ऐसें तें नव्हे ॥५१॥ येथ शास्त्रें विषम झालीं वादें । 'नेति नेति' म्हणितलें वेदें । थोटावलीं योगिवृंदें । अनुभवी निजबोधें जाणती ॥५२॥ तेथ हेतुमातु दृष्टांतू । समूळ बुडाला समस्तू । अद्वैतवादाची मातू । ज्या ठायांतु गांजिली ॥५३॥ सबाह्य समदर्शन । हे अनुभवाची निर्वाणखूण । शरकार गुरु केला जाण । हेंचि लक्षण लक्षूनि ॥५४॥ तावूनि उजू करितां बाण । दृढ लागलें अनुसंधान । इतुकेन प्रपंचाचें भान । खुंटलें जाण तयाचें ॥५५॥ निशाण भेरी वाजंतरें । रथ गज सैन्य संभारें । राजा गेला अतिगजरें । नेणिजे शरकारें शरदृष्टीं ॥५६॥ मागूनि रायाचा हडपी आला । तो पुसे ये मार्गी राजा गेला । येरु म्हणे नाहीं देखिला । गेला कीं न गेला कोण जाणे ॥५७॥ तो शरकारू देखिला दृष्टीं । हे ऐकोनि तयाची गोष्टी । जगीं एकाग्रता मोटी । प्रपंच दृष्टीं येवों नेदी ॥५८॥ हेंचि साधावया साधन । गहारंभेंवीण एकपण । सर्प गुरु केला जाण । हेंचि लक्षण देखोनि ॥५९॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

एकचार्यनिकेतः स्याद्प्रमत्तो गुहाशयः । अलक्ष्यमाण आचारैर्मुनिरेकोऽल्पभाषणः ॥१४॥

सर्प सांघातु न राहे । एकाकी सुखें विचरत जाये । सदा सावधान राहे । श्वासू वाये जावों नेदी ॥१६०॥ तैसीच योगियाची गती । न साहे द्वैताची संगती । एकाकी वसे एकांतीं । जनांप्रती अलक्ष्य ॥६१॥ विषमाचा संगु न करी । परी समाचाही संगू न धरी । निघे देह संगाबाहेरी । त्वचेचे परी सर्पाचे ॥६२॥ सदा सावधानबुद्धी । लवनिमेष वायां जावों नेदी । अनुसंधान त्रिशुद्धी । तुटों नेदी सर्वथा ॥६३॥ सर्प बिळामाजीं रिघें बळें । मार्गीं मागू देखती सकळें । धाला भुकेला हें त्यां न कळे । गेला कळे सर्वांसी ॥६४॥ तैसाचि योगियाही योगबळें । न राहे जनांमाजीं जनमेळें । गुहेमाजीं पडिला लोळे । एकला खेळे एकपणीं ॥६५॥ हो का योगियांचा आचार । करितां देखती लहान थोर । सविकल्पनिर्विकल्प विचार । न कळे साचार कोणासी ॥६६॥ एक म्हणती कर्मठ । एक म्हणती कर्मभ्रष्ठ । एक म्हणती आत्मनिष्ठ । कळेना स्पष्ट कोणासी ॥६७॥ सर्पास बोलणेंचि नाहीं । बोले तरी अल्प कांहीं । तैसाच योगिया पाहीं । वाग्वादीं नाहीं सादर ॥६८॥ आंतुले कृपेचेनि बळें । बोले मृदु मंजुळ कोंवळें । श्रवणासी दोंदें एक वेळे । तेणें वचनमेळें निघालीं ॥६९॥ बोलणें तरी अतिअल्प । परी छेदी संकल्पविकल्प । त्याच्या बोलाचे स्वरूप । सत्यसंकल्प जाणती ॥१७०॥ जो एकाकी उदास । ज्याचें परमार्थीं मानस । तेणें गृहारंभाची आस । वृथा प्रयास न करावे ॥७१॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

गृहारम्भोऽतिदुःखाय विफलश्चाध्रुवात्मनः । सर्पः परकृतं वेश्म प्रविश्य सुखमेधते ॥१५॥

मूळीं गृहांरभ तें दुःख । कष्ट करितां दुःखकारक । निपजविलें त्रिमाळिक । तें अध्रुव देख सर्वथा ॥७२॥ जेथें संसारचि नाशवंत । देह प्रत्यक्षाकारें असंत । तेथींचें गृह काय शाश्वत । मूर्ख मानित सत्यत्वें ॥७३॥ जें गर्भीच निमालें । तें उपजतां जातक केलें । मृताचें जन्मनांव ठेविलें । तैसें गृह केलें असंत ॥७४॥ तोही असंतू आरंभ कुडा । मृत्तिकेसाठीं लावी झगडा । भांडवी दगडासाठीं कां लांकुडा । सुहृदभिडा सांडोनि ॥७५॥ वोळंबा घर करी सायासें । त्यामाजीं सर्प राहे सावकाशें । न शिणतां अप्रयासें । परघरवासें संतुष्ट ॥७६॥ तैसाचि योगियाही जाण । न धरी देहगेहअभिमान । परगृहीं वसे निरभिमान । सुखसंपन्न सर्वदा ॥७७॥ एकही गृह न करावें । हें सत्य मानिलें जीवें । एवढी सृष्टि केली देवें । बाधुं न पवे त्या केवीं ॥७८॥ सृष्टि रचिली कैसेनी । निपजली कोणापासुनी । येचि अर्थी गुरु कांतिणी । लक्षण लक्षुनी म्यां केली ॥७९॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

एको नारायणो देवः पूर्वसृष्टं स्वमायया । संहृत्य कालकलया कल्पान्त इदमीश्वरः ॥१६॥

नारांचे आश्रयस्थान । यालागीं बोलिजे 'नारायण' । जीवाचें तोचि जीवन । स्वामी नारायण सर्वांचा ॥१८०॥ ऐसा एक नारायण । तेणें पूर्वी जग स्रजिलें जाण । उपकरणसामग्रीवीण । केलें निर्माण जगाचे ॥८१॥ एकलेनि सामग्रीवीण । केवीं केलें जग संपूर्ण । स्वमाया क्षोभवूनि जाण । करी निर्माण जगाचें ॥८२॥ ते निजमायेच्या पोटीं । असंख्य जीवसामग्रीच्या कोटी । ते माया अवलोकिली दृष्टीं । तोचि उठाउठी निजकाळू ॥८३॥ ऐसी निजमाया अवलोकिली । ते निजांगावरी नांदविली । परी अंगीं लागों नाहीं दिधली । हे अलिप्तता केली तो जाणे ॥८४॥ धुई दाटली आकाशीं । आकाश नातळे धुईसी । तैसी निजांगे वाढवूनि मायेसी । अलिप्त तियेसी वर्ततू ॥८५॥ उदकें कमळिणी वाढिन्नली । ते जळ आवरी निजदळीं । तैसी माया आनंदू आकळी । चित्सत्ता मोकळी सदंशेंसीं ॥८६॥ स्वमायेसी जो अधिष्ठान । मायेसी नांदावया तोचि भुवन । एवं मायानियंता नारायण । सत्य जाण सर्वथा ॥८७॥ रजोगुण स्रजी सृष्टीसी । सत्त्वगुण प्रतिपाळी तिसी । कल्पांतीं क्षोभोनि तमोगुणासी । काळरूपेंसीं संहारी ॥८८॥ हे मायेची क्षोभक शक्ती । असे नारायणाचे हातीं । यालागीं संहारिता अंतीं । ईश्वरु म्हणती या हेतू ॥८९॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ व १८ वा

एक एवाद्वितीयोऽभूदात्माधारोऽखिलाश्रयः । कालेनात्मानुभावेन साम्यं नीतासु शक्तिषु । सत्त्वादिष्वादिपुरुषः प्रधानपुरुषेश्वरः ॥१७॥

परावराणां परम आस्ते कैवल्यसंज्ञितः । केवलानुभवानन्दसन्दोहो निरुपाधिकः ॥१८॥

एवं संहारोनि कार्यकारण । एक अद्वितीय नारायण । एकापणें परिपूर्ण । गुणागुण निरसोनि ॥१९०॥ एकला एकू नारायण । हेंही तेथ म्हणे कोण । हें अद्वितीयलक्षण । भेदशून्य अवस्था ॥९१॥ 'विजातीय भेद' ते ठायीं । नसे 'सजातीय भेदू' कांहीं । 'स्वगतभेदू' तोही नाहीं । भेदशून्य पाहीं ये रीतीं ॥९२॥ ऐसा अभेदू जो साचारु । तोचि प्रकृतिपुरुषांचा ईश्वरु । नियंता तो परावरु । तोही निर्धारु परियेसीं ॥९३॥ प्रकृति पुरुष हे दोन्ही । कल्पिलीं जेणें अमनमनीं । तो ईश्वर होय भरंवसेनी । त्याचे सामर्थ्येंकरूनि वर्तती ॥९४॥ प्रकृतीतें चेतवी सत्ता । तेचि याची पुरुषता । यालागीं प्रकृतीचा भर्ता । होय सर्वथा हाचि एकु ॥९५॥ 'पर' जे अज-प्रमुख । 'अवर' मनुमुख्य स्थावरांतक । यांचा नियंता तो देख । सर्वचाळक सर्वांचा ॥९६॥ ज्याचे आज्ञेवरी पाहें । सैरा वायु जाऊं न लाहे । समुद्र वेळेमाजीं राहे । सूर्य वाहे दिनमान ॥९७॥ ज्याची आज्ञा करूनि प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण । परता जाऊं न शके जाण । आज्ञेभेण सर्वथा ॥९८॥ आज्ञा जाणोनि धडफुडी । मेरु बैसका न सोडी । चेतना आज्ञा करी गाढी । अचेतन कुडी चेतवी ॥९९॥ तो स्वयें तंव निराधार । परी झाला विश्वासी आधार । जेवीं सर्पाभासा दोर । दिसे साचार आश्रयो ॥२००॥ सत्त्वादिकां ज्या गुणशक्ती । आवरूनि निजकाळगती । समत्वा आणिल्या स्थिती । निजप्रकृतीमाझारीं ॥१॥ तेहि प्रकृती उपरमोनी । राहिलो असे निर्गुणस्थानीं । जेवीं वट बीजीं सामावोनि । केवळपणीं राहिला ॥२॥ तैसा उपाधि गिळून सकळ । निरुपाधिक केवळ । जेवीं काढिलिया मंदराचळ । राहे निश्चळ क्षीराब्धी ॥३॥ नाना अंलकार ठसे । घातलिया जेवीं मुसे । पूर्वरूप सोनें जैसें । होय तैसें केवळ ॥४॥ नाना नक्षत्रावलोकू । निजतेजें लोपी अर्कू । तैसा उपाधि गिळूनि एकू । निरुपाधिकू उरलासे ॥५॥ हो कां ग्रीष्माच्या अंतीं । बीजें लीन होतीं क्षितीं । तैशी लीन होऊनि प्रकृति । केवळ सुखमूर्ती उरलासे ॥६॥ ऐसा निरुपाधिक केवळ । सुखस्वरूपानंदकल्लोळ । चिन्मात्रतेजें बहळ । नित्यनिर्मळ सदंशें ॥७॥ तेणें ज्ञानस्वरूपें अनंतें । सृजनकाळ अवस्थेतें । स्रजिता झाला सृष्टीतें । तेंही निरुतें अवधारीं ॥८॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ व २० वा

केवलात्मानुभावेन स्वमायां त्रिगुणात्मिकाम् । सङ्क्षोभयन्सृजत्यादौ तया सूत्रमरिन्दम ॥१९॥

तामाहुस्त्रिगुणव्यक्तिं सृजन्तीं विश्वतोमुखम् । यस्मिन्प्रोतमिदं विश्वं येन संसरते पुमान् ॥२०॥

तेणें निजात्मकाळसत्तें । अवलोकिलें निजमायेतें । ते क्षोभोनि तेथें । निजसूत्रातें उपजवी ॥९॥ तेचि बोलिली 'क्रियाशक्ती' । करिती झाली त्रिगुणव्यक्ती । अहंकारद्वारा स्रजिती । जगउशत्पत्तीतें मूळ ॥२१०॥ तेथें गुणागुणविभाग । सुर नर आणि पन्नग । अध ऊर्ध्व मध्यभाग । रचिलें जग तत्काळ ॥११॥ ब्रह्मांडीं सूत्र जाण । पिंडू वर्तवी प्राण । पिंडब्रह्मांडविंदान । कर्त्री जाण 'क्रियाशक्ति' ॥१२॥ जीव करावया संसारी । षड्‌विकार वाढवी शरीरीं । षडूर्मी त्यामाझारीं । जीव संचारीं संचरवी ॥१३॥ एवढी संसारउात्पत्ती । करावया इची व्युत्पत्ती । यालागीं नांवें 'क्रियाशक्ती' । सांख्यसंमतीं बोलिजे ॥१४॥ या क्रियाशक्तिसूत्राचे ठायीं । जग ओतिलें असे पाहीं । आडवेतिडवे ठायींचे ठायीं । गोंवून लवलाहीं वाढत ॥१५॥ दृढबंध देहाभिमाना । देऊन संसारी करी जना । उपजवी अनिवार वासना । योनीं नाना जन्मवी ॥१६॥ पित्याचेनि रेतमेळें । रजस्वलेचेनि रुधिरबळें । उकडतां जठराग्निज्वाळें । बहुकाळें गोठलें ॥१७॥ तेथ निघाले अवयवांकुर । करचरणादिक लहान थोर । देह जाला जी साकार । तरी अपार यातना ॥१८॥ जठरीं गर्भाची उकडतां उंडी । नाना दुःखांची होय पेडी । रिघे विष्ठा कृमी नाकींतोंडी । तेणें मस्तक झाडी पुरे पुरे ॥१९॥ थोर गर्भींची वेदना । आठवितां थरकांपू मना । भगद्वारें जन्म जाणा । परम यातना जीवासी ॥२२०॥ ऐसें जन्मवूनि जनीं । घाली स्वर्गाच्या बंदिखानीं । कां पचती अधःपतनीं । देहाभिमानेंकरूनियां ॥२१॥ ऐसी सुखदुःखांची कडी । घालोनि त्रिगुणीं दृढ बेडी । भोगवी दुःखांच्या कोडी । तरी न सोडी अविद्या ॥२२॥ हा थोर मायेचा खटाटोपू । राया तुज नाहीं भयकंपू । तुवां दृढ धरोनि अनुतापू । अभिमानदरर्पू छेदिला ॥२३॥ तुझी पालटली दिसे स्थिती । हृदयीं प्रगटली चिच्छक्ती । मावळली अविद्येची राती । बोधगभस्ति उगवला ॥२४॥ जेथ छेदिला अभिमान । तेथें कामादि वैरी निमाले जाण । जेवीं शिर छेदिल्या करचरण । सहजें जाण निमाले ॥२५॥ यापरी तूं 'अरिमर्दन' । बोलिलों तें सत्य जाण । ऐकोनि अवधूतवचन । सुखसंपन्न नृप झाला ॥२६॥ म्हणे धन्य धन्य मी सनाथ । मस्तकीं ठेविला हस्त । प्रेमें वोसंडला अवधूत । हृदयीं हृदयांत आलिंगी ॥२७॥ दोघां निजात्मबोधें जाहली भेटी । यालागीं खेवा पडली मिठी । तेणें आनंदें वोसंडे सृष्टी । सभाग्यां भेटी सद्गुीरूसी ॥२८॥ बालका कीजेति सोहळे । तेणें निवती जननीचे डोळे । शिष्यासी निजबोधु आकळे । ते सुखसोहळे सद्गुोरूसी ॥२९॥ करितां दोघांसी संवादु । वोसंडला परमानंदु । पुढील कथेचा संवादु । अतिविशदु सांगत ॥२३०॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

यथोर्णनाभिहृदयाद् ऊर्णां सन्तत्य वक्त्रतः । तया विहृत्य भूयस्तां ग्रसत्येवं महेश्वरः ॥२१॥

ऊर्णनाभि म्हणजे कांतिणी । हृदयतंतु मुखेंकरूनी । विस्तारी बाहेर काढूनी । निजगुणीं स्वभावे ॥३१॥ त्या विस्तारिल्या तंतूंवरी । तळीं आणि उपरी । आपणचि क्रीडा करी । नानापरी स्वलीला ॥३२॥ तंतुविस्तारें खेळती लीला । प्रत्यक्ष देखतांचि डोळां । ग्रासूनि ने हृदयकमळा । अद्वैतकळा दाखवी ॥३३॥ याचि रीतीं सर्वेश्वरु । एकला रची संसारु । अंतीं करूनि संहारु । उरे निर्विकारु निजात्मा ॥३४॥ या लक्षणाचा निर्धारु । धरूनि ऊर्णनाभी केला गुरु । आतां सारूप्यतेचा विचारु । पेशस्कारु गुरु म्यां केला ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

यत्र यत्र मनो देही धारयेत्सकलं धिया । स्नेहाद् द्वेषाद् भयाद् वापि याति तत्तत्स्वरूपताम् ॥२२॥

काया वाचा आणि मन । पुरुषें एकाग्र करून । जे जे वस्तूचें करी ध्यान । तद्‌रूप जाण तो तो होय ॥३६॥ स्नेहें द्वेषें अथवा भयें । दृढ ध्यान जेणें होये । तेणेंचि तद्‌रूपता लाहे । उभवूनि बाहे सांगतू ॥३७॥ देह गेलिया तद्‌रूपता । होईल हें वचन वृथा । येणेंचि देहें येथ असतां । तद्‌रूपता पाविजे ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

कीटः पेशस्कृतं ध्यायन् कुड्यां तेन प्रवेशितः । याति तत्सात्मतां राजन् पूर्वरूपमसन्त्यजन् ॥२३॥

भिगुरटी कीटकींते धरी । कोंडी भिंतीमाजिले घरीं । ते मरणभयें ध्यान करी । निरंतरीं भ्रमरीचें ॥३९॥ तेणें तीव्रध्यानें ती कीटी । होऊनि ठाके भिंगुरटी । गगनीं चढे उठाउठी । प्रत्यक्ष दृष्टीं देखिजे ॥२४०॥ भिंगुरटी जड असंत । मूढ कीटी तिचें ध्यान करीत । तेणें तद्‌रूपता प्राप्त । तैसा भगवंत तंव नव्हे ॥४१॥ तो अज चिद्‌रूप सुखदाता । ज्ञाता अधिकारी ध्यानकरिता । तेथ तद्‌रूपता पावतां । विलंबू सर्वथा पैं नाहीं ॥४२॥ कीटकीस भ्रमरत्व जोडे । हें तीव्रध्यानें न घडतें घडे । विचारितां दोन्ही मूढें । जड जडें वेधिलें ॥४३॥ भगवद्ध्यान नव्हे तैसें । ध्याता भगवद्‌रूपचि असे । ध्याने भ्रममात्र नासे । अनायासें तद्‌रूप ॥४४॥ येणें देहें याचि वृत्तीं । आपुली आपण न जाणे मुक्ती । न घेववे भगवत्पदप्राप्ती । तैं वृथा व्युत्पती नरदेहीं ॥ ४५ ॥ वृथा त्याचें ज्ञान । वृथा त्याचें यजन याजन । वृथा त्याचें धर्माचरण । चैतन्यघन जरी नोहे ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

एवं गुरुभ्य एतेभ्य एषा मे शिक्षिता मतिः । स्वात्मोपशिक्षितां बुद्धिं श्रृणु मे वदतः प्रभो ॥२४॥

अवधूत म्हणे यदूसी । इतुकिया गुरूंपाशी । मी शिकलों जें जें मतीशीं । तें तुजपाशीं सांगितलें ॥४७॥ निजबुद्धीचिया व्युत्पत्ती । कांहींएक शिकलों युक्ती । तेंही सांगेन तुजप्रती । अनन्यप्रीती स्वभावे ॥४८॥ चोवीस गुरूंचाही गुरु । विवेकवैराग्यविचारु । हा नरदेहीं लाधे सधरु । यालागीं मुख्य गुरु नरदेहो ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

देहो गुरुर्मम विरक्तिविवेकहेतुर्बिभ्रत्स्म सत्त्वनिधनं सततार्त्युदर्कम् । तत्त्वान्यनेन विमृशामि यथा तथापि पारक्यमित्यवसितो विचराम्यसङ्गः ॥२५॥

देहासी जें गुरुत्व जाणा । तें दों प्रकारीं विचक्षणा । सांगेन त्याच्या लक्षणा । संरक्षणा परमार्था ॥२५०॥ देहाऐसें वोखटें । पृथ्वीमाजीं नाहीं कोठें । देहाऐसें गोमटें । पाहतां न भेटे त्रिलोकीं ॥५१॥ वोखटें म्हणोनि त्यागावें । तैं मोक्षसुखासी नागवावें । हो कां गोमटें म्हणोनि भोगावें । तैं अवश्य जावें नरकासी ॥५२॥ तरी हें त्यागावें ना भोगावें । मध्यभागें विभागावें । आत्मसाधनीं राखावें । निजस्वभावें हितालागीं ॥५३॥ जैसें भाडियाचें घोंडें । आसक्ति सांडोनि पुढें । येणेंवरी नेणें घडे । स्वार्थचाडेलागूनि ॥५४॥ हेतु ठेऊनि परमार्था । गेहीं वस्तीकरू जेवीं उखिता । देहआसक्तीची कथा । बुद्धीच्या पंथा येवों नेदी ॥५५॥ देहाची नश्वर गती । नश्वरत्वें उपजे विरती । नाशवंताची आसक्ती । मुमुक्षु न करिती सर्वथा ॥५६॥ जेणें उपजे विरक्ती । तो विवेक जाणावा निश्चितीं । एवं विवेकवैराग्यप्राप्ती । निजयुक्तीं नरदेहीं ॥५७॥ इतर देहांच्या ठायीं । हा विचारूचि नाहीं । केवळ शिश्नोदर पाहीं । व्यवसावो देहीं करिताति ॥५८॥ यालागीं नरदेह निधान । जेणें ब्रह्मसायुज्यीं घडे गमन । देव वांच्छिती मनुष्यपण । देवाचें स्तवन नरदेहा ॥५९॥ म्हणसी नरदेह पावन । परी तो अत्यंत निंद्य जाण । योनिद्वारें ज्याचें जनन । पाठींच मरण लागलेंसे ॥२६०॥ जंव जन्मलेंचि नाहीं । तंव मरण लागलें पाहीं । गर्भाच्याचि ठायीं । मरणघायीं धाकती ॥६१॥ एवं या देहासरिसा । नित्य मृत्यु लागला कैसा । पोषूनियां बालवयसा । तारुण्यसरिसा लागला ॥६२॥ विसरोनियां आत्ममरण । तारुण्य चढलें जी दारुण । चतुर शाहणा सज्ञान । बळें संपूर्ण मी एकु ॥६३॥ त्या तारुण्याची नवाळी । देंठ न फेडितां काळ गिळी । जरा जर्जरित मेळी । मरणकाळीं पातली ॥६४॥ धवलचामरेंसीं आलें जाण । जरा मृत्यूचें प्रस्थान । मागूनि यावया आपण । वेळा निरीक्षण करीतसे ॥६५॥ सर्वांगीं कंपायमान । तो आला मृत्युव्यजन । मान कांपे तो जाण । डोल्हारा पूर्ण मृत्यूचा ॥६६॥ दांत पाडूनि सपाट । काळें मोकळी केली वाट । मृत्युसेनेचा घडघडाट । वेगीं उद्भट रिघावया ॥६७॥ पाठी झाली दुणी । तेचि मृत्यूची निशाणी । दोनी कानीं खिळे देउनी । सुबद्ध करूनि बांधिली ॥६८॥ येतिया मृत्यूसी पुढारें । नयनतेज धांवे सामोरें । मग न्याहाळतीना अक्षरें । अंजनोपचारें शिणतांही ॥६९॥ उभळीचा उजगरा । उबगु सेजारिल्या घरा । म्हणती न मरे हा म्हातारा । बाळाची निद्रा मोडितो ॥२७०॥ देखोनि मृत्यूची धाडी । पायां वळतसे वेंगडी । जिव्हेसी चालली बोबडी । तुटल्या नाडी सर्वांगीं ॥७१॥ मरण न येतां जाण । थोर जरेचें विटंबन । विमुख होती स्त्रीपुत्रजन । अतिदीन ते करी ॥७२॥ जन्मवरी सायासीं । प्रतिपाळिंले जयांसी । तींचि उबगलीं त्यासी । जरेनें देहासी कवळिल्या ॥७३॥ जरा लागलिया पाठीं । कोणी नाइके त्याची गोष्टी । विटावों लागलीं धाकुटीं । कुतरीं पाठीं भुंकती ॥७४॥ शाहणीं सांगती अबलांसी । बागुल आला म्हणती वृद्धासी । निसुर पडों नेदी ढांसी । कासाविसी होतसे ॥७५॥ 'म्हातारा हो' हा आशीर्वाद । दीधला तेहीं केलें द्वंद्व । जरे‍एवढें विरुद्ध । आणि द्वंद्व तें नाहीं ॥७६॥ ऐसी जरेची जाचणी । देखोनियां तरुणपणीं । हेचि दशा मजलागूनी । हात धरूनि येईल ॥७७॥ देहो तितुका षड्‌विकारी । कोटि अनर्थ एकेके विकारीं । षडूर्मी लागल्या त्या भीतरी । जेवीं अग्नीवरी घृतधारा ॥७८॥ या दुःखाचें जें मूळ । तें देहाचें आळवाळ । देहो वाढवितां दुःख प्रबळ । उत्तरफळ महादुःख ॥७९॥ एवं देहाची जे संगती । ते निरंतर दुःखप्राप्ती । यापरी सांडावी आसक्ती । हेतु विरक्ती देहगुरु ॥२८०॥ या देहाचेनि साधनें । अविनाश पद पावणें । याहीपरी येणें गुणें । गुरुत्व म्हणणे देहासी ॥८१॥ देह उपकारी अपकारी । यासी गुरुत्व दोन्हीपरी । येथ विवंचूनिं चतुरीं । निजहित करी तो धन्य ॥८२॥ करितां तत्त्वविवंचन । देहाचें मूळ तें अज्ञान । निजरूपाचें अदर्शन । तेंचि भान प्रकृतीचें ॥८३॥ प्रकृतीस्तव त्रिगुणसूत्र । त्रिगुणीं त्रिविध अहंकार । येथूनि महद्भूुतविकार । इंद्रियव्यापार देहेंसी ॥८४॥ एवं पिंडब्रह्मांडखटाटोप । हा अवघाचि आरोप । दोरु जाहला नाहीं साप । भ्रमें सर्प तो म्हणती ॥८५॥ पाहतां देहाचें मूळ । भासे जैसें मृगजळ । भ्रमाची राणीव प्रबळ । हा आरोपचि केवळ वस्तूचे ठायीं ॥८६॥ नसतें देह आभासे जेथें । आरोपु म्हणणें घडे त्यातें । आतां सांगेन अपवादाते । सावचित्ते परियेसीं ॥८७॥ देह पांचभौतिक प्रसिद्ध । तो 'मी' म्हणणें हें अबद्ध । देहो मलिन मी शुद्ध । अतिविरुद्ध या आम्हां ॥८८॥ पृथ्वी मी नव्हे जडत्वें । जळ मी नव्हे द्रवत्वें । तेज मी नव्हें दाहकत्वें । चंचलत्वें नव्हें वायु ॥८९॥ नभ मी नव्हे शून्यत्वें । अहं मी नव्हें दृश्यत्वें । जीव नव्हें मी परिच्छिन्नत्वें । माया मिथ्यात्वें मी नव्हें ॥२९०॥ देह नव्हें मी नश्वरत्वें । विषय नव्हे मी बाधकत्वें । या तत्त्वां आणि मातें । संबंधू येथें असेना ॥९१॥ 'ब्रह्माहमस्मि' अभिमान । हंसपरमहंसांसी मान्य । तें सत्त्वावस्थेचें साधन । तोही अभिमान मी नव्हें ॥९२॥ जितुका तत्त्वांचा अनुवादू । तितुका मजवरी 'अपवादू' । हा माझा बुद्धीचा बोधू । तुज म्यां यदु सांगितला ॥९३॥ हें माझें गुप्त ज्ञान । तुझें देखोनि अनन्यपण । केलें गा निरूपण । भावें संपूर्ण तूं भावार्थी ॥९४॥ येरवीं करावया हे कथा । मज चाड नाहीं सर्वथा । परी बोलवीतसे तुझी आस्था । नृपनाथा सभाग्या ॥९५॥ ऐशिया संवादाच्या मेळीं । अद्वैतबोधें पिटिली टाळी । दोघे आनंदकल्लोळीं । ब्रह्मसुकाळीं मातले ॥९६॥ ऐसा उपकारी देखा । या देहासारिखा नाहीं सखा । म्हणसी राखावा नेटका । तंव तो पारका मुळींचि ॥९७॥ यासी अत्यंत करितां जतन । दिसे विपरीत निदान । श्वानशृगालांचें भोजन । कां होय भक्षण अग्नीचें ॥९८॥ या दोंही गतींवेगळें पडे । तरी सुळबुळीत होती किडे । चौथी अवस्था यासी न घडे । हें तूंही रोकडें जाणशी ॥९९॥ यालागीं देहाची आसक्ती । मी न धरींच गा नृपती । निःसंगु विचरतसें क्षितीं । आत्मस्थितीचेनि बोधें ॥३००॥ देहासी उपभोगसाधनें । तितुकीं जाण पां बंधनें । दृढ वासना तेणें । अनिवारपणें वाढते ॥१॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

जायात्मजार्थपशुभृत्यगृहाप्तवर्गान्पुष्णाति यत्प्रियचिकीर्षया वितन्वन् । स्वान्ते सकृच्छ्रमवरुद्धधनः स देहः । सृष्ट्वास्य बीजमवसीदति वृक्षधर्मः ॥२६॥

देहभोगीं मुख्य गोडी । स्त्रीभोगाची अतिआवडी । सर्वस्व वेंचोनि जोडी । आणी रोकडी योषिता ॥२॥ स्त्री हातीं धरितां देख । वाढे प्रपंचाचें थोर दुःख । गृह पाहिजे आवश्यक । भोगार्थ देख स्त्रियेच्या ॥३॥ त्या गृहाचे गृहसिद्धीं । पाहिजे धनधान्यसमृद्धी । जाली प्रजांची वृद्धी । तेणें अतिआधी अनिवार ॥४॥ त्या प्रजांचा अतिलालसू । दासदासी मेळवी पशू । थोर कष्टांचा पडे सोसू । सुखलेशू पैं नाहीं ॥५॥ व्याही जांवयांच्या वोढी । आप्तवर्गाचिया कोडी । पडे उचिताचिया सांकडीं । सोशितां कोरडी देहाची ॥६॥ पोसावया पोष्यांसी । रची नाना उपायराशी । हिंडे स्वदेशीं परदेशीं । अहर्निशीं व्याकुळ ॥७॥ देहासी द्यावया सुख । शतधा वाढवी दुःख । देहाभिमानें जन मूर्ख । वृथाभिलाख वाढविती ॥८॥ देहसुखाचिया चाडा । पडे परिग्रहाचे खोडां । दारागृहलोभें केला वेडा । न देखे पुढां निजस्वार्थु ॥९॥ देहें वाढविली प्रीती । गृह दारा पुत्र संपत्ती । तेचि वासना होय देहांतीं । देहांतराप्रती निजबीज ॥३१०॥ जैसा जोंधळा कणिसा चढे । कणसींचा क्षितीवरी झडे । वाढी वाढलें झाड मोडे । तें बीज गाढें उरलेंसे ॥११॥ तेंचि बीज जलभूमीचे संगतीं । सवेंचि झाड वाढे पुढतीं । तैसी वासना उरे देहांतीं । देहांतराप्रती न्यावया ॥१२॥ त्या वृक्षाचिया परी । वासनाबीज शरीरीं । उरवूनि स्वर्गसंसारीं । योनिद्वारीं जन्मवी ॥१३॥ देहीं वासना केवीं वाढे । तेंही सांगेन तुज पुढें । विषय सेवितां वाडेंकोडें । वासना वाढे अनिवार ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

जिह्वैकतोऽमुमपकर्षति कर्हि तर्षा शिश्नोऽन्यतस्त्वगुदरं श्रवणं कुतश्चित् । घ्राणोऽन्यतश्चपलदृक् क्व च कर्मशक्तिःर्बह्व्यः सपत्न्य इव गेहपतिं लुनन्ति ॥२७॥

जिव्हा रसाकडे वोढी । तृषा प्राशनालागीं तोडी । शिश्नासी रतिसुखाची गोडी । तें चरफडी रमावया ॥१५॥ त्वचा पाहे मृदुपण । उदर वांछी पूर्ण अन्न । श्रवण मागती गायन । मधुरध्वन आलापू ॥१६॥ घ्राण उद्यत परिमळा । रूप पहावया वोढी डोळा । हस्त वांछिती खेळा । नाना लीळा स्वभावें ॥१७॥ पाय वांछिती गती । ऐशीं इंद्रियें वोढा वोढिती । जेवीं एका गेहपती । बहुतां सवती तोडिती ॥१८॥ एवं इंद्रियांसी विषयासक्ती । तेणें वासना दृढ होती । त्या देहदेहांतराप्रती । पुरुषासी नेती सर्वथा ॥१९॥ यालागीं करावया विषयत्यागू । अवश्य छेदावा देहसंगू । इये अर्थी मनुष्यदेह चांगु । ज्ञानविभागु ये देहीं ॥३२०॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयाऽऽत्मशक्त्या वृक्षान् सरीसृपपशून् खगदंशमत्स्यान् । तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदमाप देवः ॥२८॥

हेचि जाणावया निजरूपातें । पूर्वीं तेणें श्रीअनंतें । निजमायेचेनि हातें । केलीं बहुतें शरीरें ॥२१॥ एकें केलीं भूचरें । एकें तें केलीं खेचरें । एकें केली जळचरें । चरें अचरें तीं एकें ॥२२॥ वृक्ष सर्प पशु दंश । राक्षस पिशाच बक हंस । मत्स्यकच्छादि अशेष । सृजी बहुवस योनींतें ॥२३॥ ऐसा चौर्यांदशीं लक्ष योनी । सृजूनि पाहे परतोनी । तंव निजप्राप्तीलागोनी । न देखे कोणी अधिकारी ॥२४॥ ऐशिये देखोनि सृष्टीतें । सुख न वाटेचि देवातें । मग मानवी प्रकृतीतें । आदरें बहुतें निर्मिलें ॥२५॥ बाहुल्यें मनुष्यदेहीं । निजज्ञान घातलें पाहीं । जेणें ज्ञानें देहीं । विदेह पाहीं पावती ॥२६॥ आहार निद्रा भय मैथुन । सर्वा योनींसी समसमान । मनुष्यदेहींचें ज्ञान । अधिक जाण सर्वांशीं ॥२७॥ देखोनि मनुष्यदेहासी । सुख झालें भगवंतासी । अधिकार ब्रह्मज्ञानासी । येणें देहेंसीं मत्प्राप्ती ॥२८॥ पावोनियां मनुष्यपणा । जो न साधी ब्रह्मज्ञाना । तो दाढीचा मेंढा जाणा । विषयाचरणा विचरतू ॥२९॥ मनुष्यदेहींचेनि ज्ञानें । सच्चिदानंदपदवी घेणें । एवढा अधिकार नारायणें । कृपावलोकनें दीधला ॥३३०॥ मनुष्यदेहीं ब्रह्मज्ञान । पुढील जन्मीं मी करीन । म्हणे तो नागवला जाण । सोलींव अज्ञान त्यापासीं ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसम्भवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः । तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावन्निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात् ॥२९॥

चौर्यांयशीं लक्षयोनींप्रती । जैं कोटिकोटि फेरे होती । तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें लाहती निजभाग्यें ॥३२॥ जो मनुष्यदेही जन्मला । तो परमार्थासी लिगटला । एवढा अलभ्य लाभ जाला । पितरीं मांडिला उत्साहो ॥३३॥ झालिया मनुष्यदेहप्राप्ती । परमार्थ साधूं भोगाअंतीं । एवढी येत नाहीं निश्चिती । मृत्युप्राप्ति अनिवार ॥३४॥ मृत्यु न विचारी गुण दोष । न म्हणे देश विदेश । न पाहे रात्र-दिवस । करीत नाश तत्काळ ॥३५॥ देह जैंपासोनि झाला । तैंपासूनि मृत्यु लागला । जेवीं सापें बेडूक धरिला । गिळूं लागला लवनिमिषें ॥३६॥ साप बेडुकातें गिळी । बेडूक मुखें माशातें कवळी । तैशीं मृत्युमुखीं पडलीं । विषयभुलीं झोंबतीं ॥३७॥ येथ आळसु जेणें केला । तो सर्वस्वें नागवला । थिता परमार्थ हातींचा गेला । आवर्ती पडला भवचक्रीं ॥३८॥ ऐसें जाणोनि यदुराया । देहाचिया लवलाह्या । परमार्थ साधावया । ब्रह्मोपाया उद्यत व्हावें ॥३९॥ छेदोनियां आळसासी । दवडूनियां निद्रेसी । आत्मचिंतन अहर्निशीं । अविश्रमेंसीं साधावें ॥३४०॥ रणीं रिघालिया शूरासी । न जिणतां परचक्रासी । विसांवा नाहीं क्षत्रियांसी । तेणें वेगेंसीं साधावें ॥४१॥ साधावया आत्मलग्न । सावधान बिजवराचें मन । तेणें साक्षेपें आपण । सायुज्यलग्न साधावें ॥४२॥ रायाचें एकुलतें एक । चुकल्या अवचटें बाळक । तो जेवीं शोधी सकळ लोक । तेवीं निजसुख साधावें ॥४३॥ काळाचा चपेटघात । जंव वाजला नाहीं येथ । तंव साधावया परमार्थ । आयुष्य व्यर्थ न करावें ॥४४॥ नरदेहींचेनि आयुष्यें । प्रपंचाचेनि हरूषें । विषयाचेनि विलासें । भोगपिसे नर जाले ॥४५॥ पश्वादियोनींच्या ठायीं । विषयांवांचोनि आन नाहीं । तेचि विषयो नरदेहीं । वाढविल्या कायी हित झालें ॥४६॥ विचारितां विवेकदृष्टीं । विषयांसी प्रारब्धें भेटी । वृथा करितां आटाटी । मुद्दलतुटी नरदेहा ॥४७॥ नरदेह परम पावन । पावोनि न साधी ब्रह्मज्ञान । तो लांडा गर्दभ जाण । पुच्छेंवीण दुपायी ॥४८॥ अपरोक्षज्ञानेंवीण वांझट । उदरार्थ दंभ खटपट । जेवीं मदिरापानी मर्कट । उडे उद्भट तडतडां ॥४९॥ ब्रह्मज्ञानेंवीण शास्त्रज्ञ । ते अंधारींचे खद्योत जाण । अज्ञाननिशीमाजीं तेज गहन । सूर्योदयीं कोण त्यां देखे ॥३५०॥ ब्रह्मज्ञानेंवीण संन्यासी । नटाच्या ऐसें मुंडण त्यांसी । सोकले मिष्टान्नभिक्षेसी । वृथा गेरूसी नाशिलें ॥५१॥ मनीं विषयांचें अभिलाषण । धरूनि करिती वेदाध्ययन । ते वर्षाकाळींचे दर्दुर जाण । कर्दमपानें जल्पती ॥५२॥ विषयप्राप्तीलागीं मौन । तें बकाचें बकध्यान । विषयबुद्धी जें गायन । तें खरी देखोन खर भुंके ॥५३॥ विषयालागीं उपन्यास । नाना युक्तींचे विलास । जेवीं पिंड देखोनि वायस । करिती बहुवस अतिशब्द ॥५४॥ पोट भरावया भांड । सैरा वाजविती तोंड । तैसें विषयांलागीं वितंड । शास्त्रपाखंड बोलती ॥५५॥ विषयवासना धरूनि थोर । बाह्य मिरविती आचार । जेवीं कागाचा शौचाचार । विष्ठातत्पर मानसीं ॥५६॥ हृदयीं धरूनि जीविका चांग । करिती अग्निहोत्रयाग । जेवीं वेश्या विकोनि अंग । चालवी सांग संसारा ॥५७॥ नरदेहींचा हाचि स्वार्थ । साधावा चौथा पुरुषार्थ । तो न करितां जो का अर्थ । तो अनर्थ जाणावा ॥५८॥ साधीना देहीं ब्रह्मज्ञान । तो श्वानसूकरांसमान । अथवा त्याहोनि हीन । तें विवेचन परियेसीं ॥५९॥ पशूसी हाणिल्या लाथा । द्वेष न धरी सर्वथा । मनुष्यासी 'तूं' म्हणतां । जीवघाता प्रवर्ते ॥३६०॥ पशूसी लोभ नाहीं संग्रहता । एक आहार होय भक्षिता । मग उरलिया अर्था । त्यागी सर्वथा तत्काळ ॥६१॥ मनुष्याचें लोभिष्ठपण । गांठीं असल्या कोटि धन । पोटा न खाय आपण । मा त्यागितां प्राण त्यजील ॥६२॥ सायंप्रातर्चिंता । पशूसी नाहीं सर्वथा । मनुष्याची चिंता पाहतां । जन्मशतां न राहे ॥६३॥ अमित धन असतां गांठीं । तरी चिंता अनिवार मोठी । नाथिलेंचि भय घे पोटीं । अविश्वासी सृष्टीं नरदेही ॥६४॥ जरी मरों टेंकलें शरीर । तरी व्यवहारीं साधी वृत्तिक्षेत्र । पाया शोधोनि बांधी घर । पुत्रपौत्र नांदावया ॥६५॥ ऐसी दुस्तर चिंता । पशूसी नाहीं सर्वथा । आतां मैथुनाची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६६॥ पशूसी ऋतुकाळीं मैथुन । मग स्त्रियेसी नातळे आपण । पुरुषासी नित्य स्त्रीसेवन । गरोदरही जाण न सोडी ॥६७॥ काम क्रोध सलोभता । चिंता निंदा अतिगर्वता । हें मनुष्याचेचि माथां । पशूसी सर्वथा असेना ॥६८॥ न साधितां आत्मज्ञान । केवळ जे विषयी जन । ते श्वानसूकरांपरीस हीन । माणुसपण त्यां नाहीं ॥६९॥ विषयाचें जें सुख जाण । तें स्वर्गी नरकीं समान । जें इहलोकीं भोगी श्वान । तें स्वर्गी जाण इंद्रासी ॥३७०॥ मनुष्यदेहावांचोनी । पशुपक्ष्यादि नाना योनी । त्या विषयभोगालागोनी । विषयच्छेदनीं नरदेह ॥७१॥ तो नरदेह कैसेनि जोडे । ते प्राप्तीचें कठिण गाढें । तें सांगेन तुजपुढें । परिस निवाडें विभागु ॥७२॥ अत्यंत सुकृतें स्वर्गी चढे । अत्यंत पापें अधोगती घडे । पापपुण्य निःशेष झडे । तैं आतुडे निजमुक्ति ॥७३॥ जैं पापपुण्य समान समीं । तैं मनुष्यदेह आक्रमी । जन्म पावे कर्मभूमीं । आश्रयधर्मी सुमेधा ॥७४॥ साक्षेपें मनुष्यदेह जोडे । ऐसें करितां तंव न घडे । अवचट हाता चढे । भाग्य चोखडें जयाचें ॥७५॥ मोलें अनर्घ्य रत्नें येती । तैसा चिंतामणी न ये हातीं । तेवी बहुत योनिये जन्म होती । परी मनुष्यदेहप्राप्ती दुर्लभ ॥७६॥ ऐसा नरदेह पावोनि देख । जो न साधीचि ब्रह्मसुख । तो जनांमाजीं परम मूर्ख । विश्वासघातक देवाचा ॥७७॥ निजात्मप्राप्तीलागोनी । देवें केली मनुष्ययोनी । तो देवाचा विश्वास बुडवुनी । विषयसेवनीं निजपतन ॥७८॥ होतें पितरांचें मनोगत । पुत्र होईल हरिभक्त । कुळ उद्धरील समस्त । विषयीं प्रतिहत तें केलें ॥७९॥ हो का सकळ भाग्याचें फळ । मनुष्यदेह गा केवळ । तें करावया सफळ । वैराग्य अढळ म्यां केलें ॥३८०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

एवं सञ्जातवैराग्यो विज्ञानालोक आत्मनि । विचरामि महीमेतां मुक्तसङ्गोऽनहङ्कृतिः ॥३०॥

देहो निजात्मसाधनीं साधक । तोचि विषयभोगीं बाधक । ऐसें देखोनियां देख । केलें निष्टंक वैराग्य ॥८१॥ त्या वैराग्याचेनि बळें । गुरुकृपावचनमेळें । विषयइंैद्रियांचे पाळे । एकेचि वेळें विभांडिले ॥८२॥ अविद्या जंव घ्यावी जीवें । तंव 'अविद्या' येणें नांवें । मागें मी विद्यमान नोहे । हेंही अनुभवें जाणीतलें ॥८३॥ ऐशी मिथ्यात्वें अविद्या आतां । चित्प्रकाश पूर्ण लाभे हाता । तेणें स्वदेहस्थ अहंता । गेली सर्वथा निःशेष ॥८४॥ ज्ञानसाधन जो निजदेहो । तयाच्या ठायीं वैराग्य पहा हो । मा देहसंबंधाचा स्नेहो । कैसेनि राहों शकेल ॥८५॥ ऐसेनि अनुभवें पाहीं । निःसंग मी विचरें मही । अहंता स्वदेहीं नाहीं । पुशिलें तें पाहीं सांगितलें राया ॥८६॥ जैं पुरुषाची अहंता गळे । तैं देह अदृष्टयोगें चळे । जेवीं सुकलें पान वायुबळें । पडिलें लोळे सर्वत्र ॥८७॥ यालागीं ब्रह्मसाक्षात्कारा । वृत्ति लय पावे जंव वीरा । तंववरी जो वैराग्यें खरा । अभंग पुरा पुरुषार्थी तो ॥८८॥ म्हणसी एका गुरूचे ठायीं । तुज सर्वथा विश्वास नाहीं । ये अर्थीं सावध होईं । विशद पाहीं सांगेन ॥८९॥ गुरूनें सांगतांचि कानीं । ज्याची वृत्ति जाय विरोनी । जेवीं मिळतां लवणपाणी । अभिन्नपणीं समरसे ॥३९०॥ केल्यासी साधकबाधकताबाध । हें बोलणें अतिबद्ध । जेवीं निमालियासी वोखद । न पाजवे दुग्ध गर्भस्था ॥९१॥ यापरी त्यासी कर्तव्यता । नाहीं नाहीं गा सर्वथा । परी ऐसी हे अवस्था । कदा कल्पांता न लभेचि ॥९२॥ गुरूनें सांगितलें कानीं । स्वरूपाबोध जाला मनीं । परी तें न राहेचि निश्चळपणीं । बाह्यदर्शनीं विक्षपू ॥९३॥ आसनीं बैसल्या स्वरूपस्थितीं । आसन सोडिल्या प्रपंचस्फूर्ती । ऐशी एकदेशी स्थिती । नातळती निजयोगी ॥९४॥ देह आसनीं निश्चळ । अथवा कर्मीं हो चंचळ । परी वृत्ति सर्वदा निश्चळ । तेचि निर्मळ निजयोगी ॥९५॥ परशुरामेंसीं रणांगणीं । भीष्म भिडला निर्वाणबाणीं । तोडरीं घातिला जिणोनी । वृत्ति समाधानीं अचंचळ ॥९६॥ करितां निर्वाणयुद्धीं । ज्याची न मोडे समाधी । हेंचि साधावया त्रिशुद्धी । चोवीस गुरु विधीं वंदिलें म्यां ॥९७॥ देहनिश्चळत्वें वृत्ति निश्चळ । देहचंचळत्वें वृत्ति चंचळ । तरी ते देहबुद्धीचि सबळ । नव्हे केवळ निजबोधू ॥९८॥ होतां प्रपंचदर्शन । वृत्तीसी विक्षेप होय जाण । तो विक्षेप करावया छेदन । बहुगुरुसाधन म्यां केलें ॥९९॥ निजगुरूंनीं सांगितल्या अर्था । त्या साधावया परमार्था । नाना प्रपंचपदार्था । गुरुसंस्था म्यां केली ॥४००॥ जेथोनिया विक्षेपता । तेचि लाविली गुरुत्वपथा । ऐसेनि साधनें साधितां । जग स्वभावतां परब्रह्म ॥१॥ पूर्वी गुरूंनीं बोधिलें नाहीं । तरी पृथ्व्यादिकें बोधितील कायी । तोचि निजार्थ साधावया पाहीं । गुरूपायीं प्रवर्तलों ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

न ह्येकस्माद् गुरोर्ज्ञानं सुस्थिरं स्यात्सुपुष्कलम् । ब्रह्मैतदद्वितीयं वै गीयते बहुधर्षिभिः ॥३१॥

गुरूनें सांगितलें निजज्ञान । हृदयीं प्रकाशलें चिद्भान । तें विद्युत्प्राय चंचळ जाण । स्थैर्यपण त्या नाहीं ॥३॥ जें मूळींचि चंचळ । तें कदा नव्हे पुष्कळ । क्षणां भासे क्षणां चपळ । तेणें तळमळ साधका ॥४॥ जैसें मुखींचें आमिष जाये । तेणें सर्प डंखला राहे । तैसी वेदना साधकां होये । वियोगु न साहे सर्वथा ॥५॥ येरवीं ब्रह्म अद्वितीय नित्य । हें सकळ ऋषींचें संमत । त्यांसीही पुसों जातां बहुत । विक्षेप तेथ उठती ॥६॥ एक म्हणती ब्रह्म सगुण । एक म्हणती तें निर्गुण । ऐसे वाद करिती दारुण । युक्तिखंडण अभिमानें ॥७॥ एक म्हणती ब्रह्म सप्रपंच । एक म्हणती निष्प्रपंच । मिळोनियां पांचपांच । शब्दकचकच वाढविती ॥८॥ प्रपंचदर्शन विक्षेपता । तेथ साधावया निजऐचक्यता । सुबुद्धीनें नाना पदार्था । गुणग्राहकता गुरुरूपें ॥९॥ तेथ साधकांचे प्रश्न । सहसा न पवती समाधान । यालागीं पुसावया मन । न रिघे जाण ते ठायीं ॥४१०॥ जेथूनि विक्षेपता वाढे । तेथेंचि ऐक्यता जोडे । तें नानागुरुत्वें रोकडें । साधन चोखडें योजिलें ॥११॥ जीं जीं सांगितलीं गुरुलक्षणें । तीं तीं निजबुद्धीचीं साधनें । समूळ विक्षेपू तेणें । तीव्र धारणें छेदिला ॥१२॥ तेणें चंचलत्वें निश्चल । फावलें निजबोधाचें मूळ । दृश्य देखतां केवळ । भासे सकळ चिन्मात्र ॥१३॥ जें माझ्या निजगुरूंनीं । पूर्वी दिधलें होतें बोधुनी । तेंचि नाना गुरुत्वें साधूनी । विक्षेप छेदुनी पावलों ॥१४॥ निजगुरु तो एकुचि जाण । इतर गुरु साधकत्वें साधन । हें यथातथ लक्षण । तुज निरूपण म्यां केलें ॥१५॥ येथ प्रपंचाचें भानाभान । कर्म करितां न कळे जाण । लाधली निजबोधाची खूण । समदर्शन सर्वदा ॥१६॥ दृश्य देखतां दृष्टीं । नव्हे दृश्येंसीं भेटी । हारपली कर्मत्रिपुटी । बोधकसवटी अभिनव ॥१७॥ यथेष्ट करितां भोजन । उष्टेना निराहारलक्षण । जगेंसीं वागतां जाण । एकलेपण मोडेना ॥१८॥ तरंग सागरामाजीं क्रीडतां । न मोडे उदकाची एकात्मता । तेवीं जगामाजीं वर्ततां । दुजी वार्ता मज नाहीं ॥१९॥ नवल सद्गुमरूची नवायी । सर्वी सर्व तोचि पाहीं । गुरूवेगळें रितें कांहीं । उरलें नाहीं सर्वथा ॥४२०॥ आतां माझें जें मीपण । तें सद्गु रु जाला आपण । बोलतें तुझें जें तूंपण । तेंही जाण सद्गु रुचि ॥२१॥ याहीपरी पाहतां । माझा गुरु एक एकुलता । तेथें दुजेपणाची वार्ता । नाहीं सर्वथा यदुराया ॥२२॥ ऐशी सद्गुेरुकथा । तुज सांगितली परमार्था । हरिखें आलिंगिलें नृपनाथा । दोघां ऐक्यता निजबोधें ॥२३॥ जीवीं जीवा पडली मिठी । आनंदें वोसंडली सृष्टी । तेणें वाचेसी पडली बेलवटी । बोलों उफराटी विसरली ॥२४॥ हरिखु न संटवे हृदयभवनी । बाहेर वोसंडे स्वेदेजोनी । आनंदघन वोळला नयनीं । स्वानंदजीवनीं वर्षतु ॥२५॥ तुटली अहंकाराची बेडी । पावलों भवार्णवपरथडी । म्हणौनि रोमांची उभविली गुढी । जिंतिली गाढी अविद्या ॥२६॥ समूळ देहभावो पळाला । यालागीं गात्रकंपू चळचळा । संकल्पविकल्प निमाला । मनेंसीं बुडाला मनोरथु ॥२७॥ जीवभावो उखिता । यदूनें अर्पिला गुरुनाथा । तें चिह्न बाहेरीं तत्त्वतां । दावी सर्वथा निजांगीं ॥२८॥ तो अवधूत जाण दत्तात्रया । तेणें आलिंगूनि यदुराया । निजरूपाचा बोधू तया । अनुभवावया दीधला ॥२९॥ दत्तात्रेयशिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा । तेणें जनार्दनू तिसरा । शिष्य केला खरा कलियुगीं ॥४३०॥ गुरुप्राप्तीलागीं सर्वथा । थोर जनार्दनासी चिंता । विसरला तिन्ही अवस्था । सद्गुोरु चिंतितां चिंतनीं ॥३१॥ देवो भावाचा भोक्ता । दृढ जाणोनि अवस्था । येणें जालें श्रीदत्ता । तेणें हातु माथां ठेविला ॥३२॥ हातु ठेवितांचि तत्काळ । बोधु आकळिला सकळ । मिथ्या प्रपंचाचे मूळ । स्वरूप केवळ स्वबोधें ॥३३॥ कर्म करूनि अकर्ता । तोचि अकर्तात्मबोधु जाला देता । देहीं असोनि विदेहता । तेही तत्त्वतां आकळिली ॥३४॥ गृहाश्रमू न सांडितां । कर्मरेखा नोलांडितां । निजव्यापारीं वर्ततां । बोधु सर्वथा न मैळे ॥३५॥ तो बोधु आकळतां मना । मन मुकलें मनपणा । अवस्था नावरेचि जनार्दना । मूर्च्छापन्न पडियेला ॥३६॥ त्यासी सावध करूनि तत्त्वतां । म्हणे प्रेमा आहे सत्त्वावस्था । तोही गिळोनि सर्वथा । होयीं वर्तता निजबोधें ॥३७॥ पूजाविधी करोनियां । जंव जनार्दनु लागला पायां । तंव अदृश्य जाला दत्तात्रेया । योगमायाचेनि योगें ॥३८॥ कथेसी फांकलों सर्वथा । तो कोपु न मनावा श्रोतां । प्रसंगें गुरुविवंचना होतां । मीही गुरुकथा बोलिलों ॥३९॥ मज तंव चुकी पडिली मोठी । चुकूनि सांगितली गुरुगोठी । तेही संस्कृत नव्हे मराठी । वृथा चावटी न म्हणावी ॥४४०॥ जो असेल गुरुभक्त । तो हें जाणेल मनोगत । जो गुरुस्मरणीं सदोदित । त्यासी हें हृद्ग त कळेल ॥४१॥ ज्यांसी गुरुचरणीं श्रद्धा गाढी । ज्यांसी गुरुभजनीं अतिआवडी । जिंहीं गुरुप्रेम जोडिलें जोडी । ते हे गोडी जाणती ॥४२॥ ज्या सद्गुुरूचें नांव घेतां । चारी मुक्ती वोडविती माथा । मुक्ति नावडे गुरुभक्तां । नित्यमुक्तता गुरुचरणीं ॥४३॥ ज्याचें घेतां चरणतीर्थ । चारी मुक्ती पवित्र होत । पायां लागती पुरुषार्थ । धन्य गुरुभक्त त्रिलोकीं ॥४४॥ चैतन्य नित्य निराधार । निर्धर्मक निर्विकार । त्याचा केला जीर्णोद्धार । सत्य साचार जगद्गु रु ॥४५॥ सद्गुारुकृपा नव्हतां । नव्हती देवाची कथावार्ता । देवासी देवपणीं स्थापिता । सत्य सर्वथा सद्गुीरु ॥४६॥ सद्गुीरु कृपेवीण पाहीं । देवो असतुचि झाला होता नाहीं । त्यासी देवपणे ठेवूनि ठायीं । भजविता पाहीं गुरुरावो ॥४७॥ त्या सद्गुपरूची कथा । चुकोनि जालों बोलता । थोर अपराधु हा माझे माथां । क्षमा श्रोतां करावी ॥४८॥ वृथा बोलिलों नाहीं जाण । झालें बोलावया कारण । दत्तात्रेयशिष्यकथन । करितां जनार्दन आठवला ॥४९॥ मी जरी नाठवीं जनार्दनासी । परी तो विसरों नेदीच आपणासी । हटें देतसे आठवणेंसी । अहर्निशीं सर्वदा ॥४५०॥ जिकडे जिकडे मी पाहे । तिकडे तिकडे तोचि होऊनि राहे । मी जरी त्याजकडे न पाहें । तें न पाहणें होये तो माझें ॥५१॥ जिकडे मी विसरोंनि जायें । तिकडेचि तो येऊनि राहे । मी जरी त्याजकडे न पाहें । तें न पाहणें होये तो माझें ॥५२॥ घटु सांडूं पाहे आकाशासी । तंव आकाश न सांडी घटासी । तेवीं जनार्दनु आम्हांसी । अहर्निशीं लागला ॥५३॥ मी न करीं त्याची कथा । तंव तोचि होये मुखीं वक्ता । ऐसेंनि बलात्कारें बोलविता । काय म्यां आतां करावें ॥५४॥ दृश्य मी देखावया बैसें । तंव दृश्या सबाह्य जनार्दनु दिसे । श्रवणीं ऐकतां सौरसें । शब्दीं प्रवेशे जनार्दनू ॥५५॥ आतां नाइकें न पाहें । म्हणौनि मी उगा राहें । तंव उगेपणाचेनि अन्वयें । जनार्दनु पाहे लागला ॥५६॥ ऐसा अडकलों त्रिशुद्धी । जनार्दनू उघडो नेदी । श्रोता सांगावी जी बुद्धी । मी अपराधी सर्वथा ॥५७॥ श्रोते म्हणती नवलावो । येथ न देखों अहंभावो । पाहतां बोलाचा अभिप्रावो । प्रेम पहा हो लोटत ॥५८॥ येथील विचारितां बोल । क्षीराब्धीहून सखोल । नवल प्रेमाची वोल । येताती डोल स्वानंदें ॥५९॥ जें त्वां केलें गुरुनिरूपण । तें सप्रेम ब्रह्मज्ञान । थोर निवविलों जाण । नाहीं दूषण निरूपणा ॥४६०॥ नित्य करावें गुरुस्मरण । तें गुरूप्रेमें केलें कथन । करितां अमृताचें आरोगण । पिरे कोण म्हणेल ॥६१॥ जनार्दनीं दृढ भावो । हाही कळला अभिप्रावो । निरूपणाचा नवलावो । रसाळ पहा हो वोडवला ॥६२॥ तूं मूळकथा निरूपिसी । अथवा आडकथा सांगसी । परी गोडी या निरूपणाऐसी । न देखों आणिकांसी सर्वथा ॥६३॥ शुद्ध निरूपणें गुरु वर्णिसी । वर्णूनि अपराधी म्हणविसी । ऐक्यें घोळली बुद्धी कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला ॥६४॥ तुझी जे अपराधबुद्धी । ते प्रवेशली भगवत्पदीं । जाहली अपराधाची शुद्धी । देखणा त्रिशुद्धी तूं होसी ॥६५॥ गुरुस्तवनीं रतसी । तेव्हां मूळकथा विसरसी । प्रेमाची जाती ऐसी । कळलें आम्हांसी सर्वथा ॥६६॥ श्रोते म्हणती आतां । विस्मयो दाटला चित्ता । वेगीं चालवावें ग्रंथा । पूर्वकथा मूळींची ॥६७॥ हें संतवचन मानूनि माथां । चरण वंदूनि तत्त्वतां । सावधान व्हावें चित्ता । पुढील कथा सांगेन ॥६८॥ यापरी तो अवधूतू । यदूसी सांगे परमार्थू । संवादें निवाला परमाद्भू तू । मग निवांतु राहिला ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

श्रीभगवानुवाच । इत्युक्त्वा स यदुं विप्रस्तमामन्त्र्य गभीरधीः । वन्दितोऽभ्यर्थितो राज्ञा ययौ प्रीतो यथागतम् ॥३२॥

जाहलें देखोनि समाधान । मग पुसोन निघाला ॥४७०॥ राजा धांवोनि लागला चरणां । परम प्रेमें करीं पूजना । करोनियां प्रदक्षिणा । मागुता चरणां लागला ॥७१॥ जाय ऐसें न बोलवे सर्वथा । राहे म्हणतां दिसे सामिता । वियोगु न साहवे तत्त्वतां । बोलु सर्वथा खुंटला ॥७२॥ ते देखोनि अवस्था । कृपा उपजली श्रीदत्ता । हात ठेवूनि माथां । प्रसन्नता उपजली ॥७३॥ येथूनि तुज मज आतां । वियोगु नाहीं सर्वथा । ऐसें आश्वासोनि नृपनाथा । होय निघता श्रीदत्त ॥७४॥ जेणें सुखें होता आला । तेणेंचि सुखें निघता जाला । राजा अतिप्रीतीं निमाला । सुखी झाला निजबोधें ॥७५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

अवधूतवचः श्रुत्वा पूर्वेषां नः स पूर्वजः । सर्वसङ्गविनिर्मुक्तः समचित्तो बभूव ह ॥३३॥

इति श्रीमद्भा्गवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे नवमोऽध्यायः ॥९॥ पाहोनि उद्धवा उजू । बोलता जाला अधोक्षजू । म्हणे आमचे पूर्वजांचा पूर्वज्जू । राजध्वजू यदुवीरु ॥७६॥ म्हणसी मी नेणें त्याचें नांव । तूं सांगतोसी हें अपूर्व । परी ज्याचेनि नामें आम्ही सर्व । वीर 'यादव' म्हणवितों ॥७७॥ हरिखें म्हणे नंदनंदू । तो आमचा पूर्वज यदू । ब्रह्मज्ञानाचा संवादू । दत्तात्रेयेंसीं पैं केला ॥७८॥ श्रीदत्तात्रेयाच्या वचनार्था । विश्वासोनि जाहला घेता । तेणें सर्वसंगविनिर्मुक्तता । आली हाता यदूच्या ॥७९॥ जो संगू सांडूनि दूर गेला । तेणें संगत्यागूचि केला । संगीं असोनि स्नेह सांडिला । संगमुक्त जाला तो जाण ॥४८०॥ आकाश सर्व पदार्थासी । मिळालें असे सर्व देशीं । परी नातळेचि सर्वसंगासी । संगमुक्तता त्यासी बोलिजे ॥८१॥ याहूनि विशेष संगमुक्तता । आली यदूचिया हाता । तेही सांगेन कथा । परिसें तत्त्वतां उद्धवा ॥८२॥ दत्तात्रेयबोधें तत्त्वतां । सर्वसंगामाजी असतां । न देखे संगाची कथावार्ता । 'विशेषमुक्तता' या नांव ॥८३॥ 'मज पूर्वी द्वैतसंगू होता । तो जाऊनि निःसंग जालों आतां' । या दोनी समूळ मिथ्या वार्ता । विनिर्मुक्तता पावलों ॥८४॥ दोर सापु नाहीं जाला । परी सापुपणाचा आळ आला । तोही दोरें नाहींसा केला । भ्रांतीं कल्पिला निजभ्रमु ॥८५॥ दोरु दोरपणें असे । सर्पु तो भ्रांतामनीं वसे । ऐसें सांडूनि द्वैतपिसें । रायासी सावकाशें समाधी ॥८६॥ समसाम्यें समानबुद्धी । ते बोलिजे 'निजसमाधी' । ते समाधी पावोनि त्रिशुद्धी । राजा निजपदीं पावला ॥८७॥ कृष्ण म्हणे उद्धवासी । 'तुं जन्मूनि ऐशिये वंशीं । जरी ब्रह्मज्ञान न साधिशी । तरी उणें पूर्वजांसी येईल ' ॥८८॥ यापरी हृषीकेशी । तिरस्कारोनि उद्धवासी । झोंबावया अद्वैतासी । पुट बुद्धीसी देतुसे ॥८९॥ आधींचि विखारू काळियाणा । त्याचेंही पुच्छ रगडिल्या जाणा । मग झोंबिन्नल्या सत्राणा । नावरे कोणा सर्वथा ॥४९०॥ आधींचि अनुताप उद्धवासी । वरी तिरस्कारिला हृषीकेशीं । तो गिळावया चिद्ब्रवह्मासी । निजमानसी खवळला ॥९१॥ पुढिले अध्यायीं निरूपण । कृष्णउसद्धवसंवाद जाण । सांगेल गुरुशिष्यलक्षण । श्रोते विचक्षण परिसतू ॥९२॥ एका जनार्दनु म्हणे । अगाध कृष्णमुखींचें बोलणें । तें मी जरी निरोपूं नेणें । परी तें गोडपणें निववित ॥९३॥ साखरेचा बोळू केला । परी कडूपणा नाहीं आला । तैसा ग्रंथु प्राकृतभाषा झाला । असे संचला स्वानंदु ॥९४॥ जरी सोन्याचें पेंडुकें केलें । परी तें दगडमोला नाहीं आलें । तैसें भागवत प्राकृत जालें । परी नाहीं चुकलें निजज्ञाना ॥९५॥ मुक्ताफळालागीं सागरीं । बुड्या देती नानापरी । तें सांपडलिया घरीं विहिरीं । जो अव्हेरी तो मूर्ख ॥९६॥ तैशी संस्कृतव्याख्यानआटाटी । अतिकष्टें परमार्थीं भेटी । तें जोडिल्या मराठीसाठीं । उपेक्षादृष्टि न करावी ॥९७॥ धनवंतु रत्नतपारखी पुरा । तेणें धुळीमाजीं देखिल्या हिरा । गांठीं बांधोनि आणी घरा । पारखी खरा निजज्ञानें ॥९८॥ तैसें ज्ञाते विद्वज्जन । ग्रंथु मराठी देखोन । उपेक्षा न करितां करावा यत्नर । पारखोनि चिद्र८त्न साधावया ॥९९॥ क्षुद्रदृष्टीं पाहणें पाहतां । बोलु लागेल व्यासाचे ग्रंथा । मा हे तरी मराठी कविता । सांडूनि कुटिलता पाहावी ॥५००॥ ज्यांसी निजसुखाची आवडी । ते प्राकृतीं न काढिती खोडी । घेतील ज्ञानगर्भाची गोडी । अवस्था गाढी परमार्थी ॥५००॥ जे साचार परमार्थी । ते अधिकारी ये ग्रंथीं । ज्यांसी भागवतीं भक्ती । ते पावती निजसुख ॥२॥ ज्यासी भागवतीं नाहीं भक्ती । कोरडी व्युत्पत्ती मिरविती । तेही जरी निंदा न करिती । तरी पुढें पावती भक्तीतें ॥३॥ निंदा वसे ज्याचे चित्ता । त्यास गति नाहीं सर्वथा । निंदा सकळ पापांचे माथां । दोष ईपरता असेना ॥४॥ निंदकाचें नांव घेतां । दोष वाचेसी होय लागता । तिशीं द्यावया प्रायश्चित्ता । 'रामराम' सर्वथा म्हणावें ॥५॥ निंदेमाजीं देखिलें स्वार्था । निंदक प्रवर्तले भक्तहिता । बुडवूनि आपुले स्वार्था । परदोष सर्वथा क्षाळिले ॥६॥ सांडूनियां गुणदोष । श्रोतां होआवें सावकाश । जेथ वक्ता हृषीकेश । अतिसुरस तें ज्ञान ॥७॥ कृष्णउद्धवांचे ज्ञान । तत्काळ निरसी अज्ञान । एका विनवी जनार्दन । सावधान परियेसा ॥५०८॥

इति श्रीमद्भारगवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां नवमोऽध्यायः ॥९॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥३३॥ ओव्या ॥५०८॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]