एकनाथी भागवत/अध्याय सव्विसावा

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनीमोहना आद्यकारण । कार्यकारणातीत चिद्धन । जय जनार्दन जगद्गुरु ॥१॥ जगासी पडे मायामोहन । तें तूं निर्दळिसी ज्ञानघन । जगीं जगद्रूप जनार्दन । कृपाळू पूर्ण दीनांचा ॥२॥ दीनासी देवमाया स्त्रीरुपें । भुलवी हावभावखटाटोपें । ते स्त्रीमोहादि मोहक रुपें । जनार्दनकृपें निर्दळिती ॥३॥ जेथ वैराग्य वाढे संपूर्ण । तेथ जनार्दनाची कृपा पूर्ण । वैराग्य तेथ ब्रह्मज्ञान । सहजें जाण ठसावे ॥४॥ जीव सहजें ब्रह्मचि आहे । तो मायागुणें जीवत्व वाहे । जेवीं भद्रीं निजेलेनि रायें । तो स्वप्नींचें लाहे रंकत्व ॥५॥ त्यासी राजपदा यावया जाण । सेवक करिती थापटण । तेवीं वैराग्य निर्दळी त्रिगुण । जीवा ब्रह्मपण स्वयंभचि ॥६॥ ऐसें स्वयंभ जोडल्या ब्रह्म पूर्ण । तेव्हां स्त्री पुरुष हें मिथ्या ज्ञान । मृपा दृश्याचें दृश्यभान । भोग्यभोक्तेपण असेना ॥७॥ असो साधकासी देवमाया । स्त्रीरुपें ये भुलवावया । तेथ स्मरतां भावें गुरुराया । जाय विलया स्त्रीबाधू ॥८॥ सद्गुरुचें निजनाम एक । निवारी बाधा महादोख । वैराग्य उपजवी अलोलिक । तेणें होय निजसुख साधकां ॥९॥ निर्विशेष निजसुखदाता । आम्हां सद्गुरुचि तत्त्वतां । त्याचे चरणीं ठेवितां माथा । सुखसंपन्नता साधकां ॥१०॥ संत साधकांची निजमाउली । शांति निजसुखाची साउली । जनार्दनकृपेच्या पाउलीं । कथा चालिली यथार्थ ॥११॥ हाता आलिया निजनिर्गुण । साधक होती सुखसंपन्न । तदर्थ करावें माझें भजन । हें बोलिला श्रीकृष्ण पंचविसावां ॥१२॥ भावें करितां भगवद्भजन । देव दारारुपें करिती विघ्न । तें निर्दळावया जाण । माझें नामस्मरण करावें ॥१३॥ अच्युत हें स्मरतां नाम । प्रतापें निर्दळी कर्माकर्म । सकळ पातकें करी भस्म । दाटुगें नाम हरीचें ॥१४॥ नामें होइजे विरक्त । नामें निर्मळ होय चित्त । नामें साधे गुणातीत । नामें निर्मुक्त भवपाश ॥१५॥ नामीं लोलिंगत चित्त । भवभय रिघों न शके तेथ । नामीं विश्वास ऐसा जेथ । भगवंत तेथ तुष्टला ॥१६॥ दुष्टसंगें विषयासक्त । जरी झाला लोलिंगत । अनुताप उपजलिया तेथ । होय विरक्त क्षणार्धें ॥१७॥ महादोषासी प्रायश्चित्त । केवळ अनुताप निश्चित । अनुतापेंवीण प्रायश्चित्त । जो जाण एथ विटंबू ॥१८॥ अनुतापाएवढा सखा । जगीं आणिक नाहीं लोकां । धडाडिल्या अनुताप देखा । सकळ पातकां निर्दळी ॥१९॥ अनुतापा चढलिया हात । क्षणार्धें करी विरक्त । येचि अर्थी ऐलगीत । हरि सांगत उद्धवा ॥२०॥ सव्विसाव्या अध्यायीं येथ । विषयासक्त ज्याचें चित्त । त्यासी व्हावया विरक्त । ऐलगीतप्रस्तावो ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीभगवानुवाच - मल्लक्षणमियं कायं लब्ध्वा मद्धर्म आस्थितः । आनन्दं परमात्मानमात्मस्थं समुपैति माम् ॥१॥

ब्रह्म लक्षिजे परिपूर्ण । हेंचि कायेचें मुख्य लक्षण । तें हें मानवी शरीर जाण । परम पावन तिहीं लोकीं ॥२२॥ मनुष्यदेहीं अधर्म । करितां नातुडे परब्रह्म । तेथ करावे भागवतधर्म । जे कां परम पावन ॥२३॥ भागवतधर्में करितां भक्ती । निर्मळ होय चित्तवृत्ती । जीव तोचि ब्रह्म निश्चितीं । ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावे ॥२४॥ ठसावल्या ब्रह्मस्फूर्ती । होय स्वानंदाची अवाप्ती । तेणें परमानंदीं लीन होती । हे शुद्धप्राप्ती पैं माझी ॥२५॥ माझिये प्राप्तीचें लक्षण । देहीं असतां वर्तमान । सर्वथा नाहीं विषयस्फुरण । तेंचि निरुपण हरि सांगे ॥२६॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

गुणमय्या जीवयान्या विमुक्तो ज्ञाननिष्ठया । गुणेषु मायामात्रेषु दृश्यमानेष्ववस्तुतः । वर्तमानोऽपि न पुमान् युज्यतेऽवस्तुभिर्गुणैः ॥२॥

जे मूळ अज्ञानाची खाणी । जे संसारप्रवाहाची श्रेणी । जे तिहीं गुणांची जननी । माया राणी अनादि ॥२७॥ मायागुणयोगें पहा हो । सोळा कळांचा संभवो । तो वासनात्म्क लिंग देहो । जीवासी पहा हो दृढ झाला ॥२८॥ ज्या लिंगदेहाचिये प्राप्ती । भोगी नाना सुखदुःखसंपत्ती । पडे स्वर्गनरकआवर्ती । मिथ्यामरणपंक्ती स्वयें सोशी ॥२९॥ वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासी संसार । देहाभिमानें केला थोर । अपरंपार अनिवार्य ॥३०॥ तेथ गुरुवाक्यें ज्ञानानुभवो । पाहतां मायेचा अभावो । लिंगदेह झाला वावो । जीव जीवभावो तो मिथ्या ॥३१॥ जेवीं उगवलिया गभस्ती । अंधारेंसीं हारपे राती । तेवीं गुरुवाक्यें ज्ञानप्राप्ती । मायेची स्थिती मावळे ॥३२॥ एवं नासल्या गुणविकार । जीवन्मुक्त होती नर । जेवीं कां कुलालचक्र । भंवे साचार पूर्वभ्रमणें ॥३३॥ तेवीं प्रारब्धशेषवृत्तीं । ज्ञाते निजदेहीं वर्तती । वर्ततांही देहस्थिती । देहअहंकृती असेना ॥३४॥ जेवीं कां छाया आपुली । कोणीं गांजिली ना पूजिली । परी कळवळ्याची न ये भुली । तेवीं देहींची चाली सज्ञाना ॥३५॥ तो देहाचेनि दैवमेळें । जरी विषयांमाजीं लोळे । परी विकाराचेनि विटाळें । वृत्ति न मैळे अणुमात्र ॥३६॥ त्यासी विषयांचें दर्शन । समूळत्वें मिथ्या जाण । करितां मृगजळाचें पान । करा वोलेपण बाधीना ॥३७॥ गगनकमळांचा आमोद । जैं भ्रमर सेवी सुगंध । तैं सज्ञाना विषयसंबंध । निजांगीं बाध लागतां ॥३८॥ असो अतर्क्य मुक्तांची स्थिती । परी मुमुक्षांलागीं श्रीपती । नियमाची यथानिगुती । निजात्मप्राप्तीलागीं सांगे ॥३९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

सङंग न कुर्यादसतां शिश्नोदरतृपां क्वचित् । तस्यानुगस्तमस्यन्धे पतत्यन्धानुगोऽन्धवत् ॥३॥

शिश्नोदरार्थ आसक्त । स्वधर्मत्यागें अधर्मरत । ऐसे जे विषयासक्त । ते जाण निश्चित असाधू ॥४०॥ ऐसे जे असाधु जन । त्यांसीं सर्वथा आपण । संगती न करावी जाण । कायावाचामनःपूर्वक ॥४१॥ वोढाळेचे संगतीं पाहें । क्षणभरी गेलिया धर्मगाये । त्या क्षणासाठीं पाहें । लोढणें वाहे निरंतर ॥४२॥ यालागीं दुर्जनाची संगती । क्षणार्धें पाडी अनर्थी । मुमुक्षीं ऐशियाप्रती । अणुमात्र वस्ती न वचावें ॥४३॥ लोहाराची आगिठी जैसी । सहजें पोळी भलत्यासी । दुर्जनाची संगति तैशी । पाडीं अपभ्रंशीं भाविकां ॥४४॥ अवचटें असाधुसंगती । जोडल्या वाढे विषयासक्ती । तेणें उठी अधर्मरती । विवेक-स्फूर्तिघातक ॥४५॥ मावळल्या विवेकवृत्ती । अंध होय ज्ञानस्फूर्ती । आपण आपली न देखे गती । जेवीं आभाळीं राती अंवसेची ॥४६॥ जेवीं अंधें अंध धरिल्या हातीं । दोघां पतन महागर्ती । तेवीं अविवेकाचिया स्थितीं । अंधतमा जाती विषयांध ॥४७॥ कुसंगाचा जो सांगात । तेणें वोढवे नरकपात । अनुताप सोडविता तेथ । तें ’ऐलगीत’ हरि सांगे ॥४८॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

एलेः सम्राडिमां गाथामगायत बृहच्छ्रवाः । उर्वशीविरहान्मुह्यन्निर्विण्णः शोकसंयमे ॥४॥

समुद्रवलयांकित क्षिती । सकळ रायांचा राजपती । पुरुरवा चक्रवर्ती । ज्याची ख्याती पुराणीं ॥४९॥ तेज प्रभाव महाशौर्य । उचित वदान्य गांभीर्य । महिमा महती अतिवीर्य । धर्मधैर्य पुरुरवा ॥५०॥ राजधर्माचिया नीतीं । स्वधर्में प्रतिपाळी क्षिती । ब्राह्मण तितुका ब्रह्ममूर्ती । हा भाव निश्चितीं रायाचा ॥५१॥ प्राणान्तेंही आपण । न करी ब्राह्मणहेळण । गायीलागीं वेंची प्राण । करी संरक्षण दीनाचें ॥५२॥ ऐसा धार्मिक ऐल-चक्रवर्ती । तोही उर्वशीचे आसक्तीं । भुलोनि ठेला भूपती । निजात्मगती विसरला ॥५३॥ तेणें अनुतापें गाइली गाथा । ते तुज मी सांगेन आतां । परी त्याची पूर्वकथा । कामासक्तता ते ऐक ॥५४॥ विसरोनि निजमहत्त्वासी । अतिदीन झाला वेश्येसी । काम पिसें लावी मनुष्यासी । तें ऐल-इतिहासीं हरि सांगे ॥५५॥ ऐल-उर्वशीकामासक्ती । सवेंचि अनुतापें विरक्ती । हे कथा बोलिली वेदोक्तीं । तेचि यदुपति स्वयें सांगे ॥५६॥ उर्वशीपुरुरव्याचा संबंध। नवम स्कंधीं असे विशद । तेणें जाणोनियां गोविंद । एथ कथाअनुवाद न करीच ॥५७॥ पूर्वकथासंबंधः ॥ ॥ उर्वशी स्वर्गभूषण । नारायणें धाडिली आपण । तो उर्वशीसी गर्व पूर्ण । श्रेष्ठपण मानूनी ॥५८॥ तया गर्वाचिये स्थिती । ताल चुकली नृत्यगतीं । तेणें ब्रह्मशापाची प्राप्ती । तुज मानवी भोगिती भूतळीं ॥५९॥ उच्छाप मागतां तिसी । ब्रह्मा सांगे तियेपाशीं । नग्न देखिल्या पुरुरव्यासी । स्वर्गा येसी मेषप्रसंगें ॥६०॥ ऐशा लाहोनि शापासी । भूतळा आली उर्वशी । देखोनि तिचिया स्वरुपासी । पुरुरवा तिसी भूलला ॥६१॥ विसरोनि आपुली महंती । वश्य झाला वेश्येप्रती । रुपा भुलला भूपती । विचारस्फूर्ती विसरला ॥६२॥ नग्न देखिलिया रायासी । सांडूनि जावें उर्वशीं । ऐशी भाक देऊनि तिसी । निजभोगासी आणिली ॥६३॥ तिणें आपुलिया उच्छापासी । आणिलें दोघां एडक्यांसी । पुत्रस्नेहें पाळावें त्यांसी । तेविखीं भाकेसी दिधलें रायें ॥६४॥ ते उर्वशीच्या कामप्राप्ती । अतिशयें वाढली कामासक्ती । तो नेणे उदयास्त-दिवसराती । ऐशा अमित तिथी लोटल्या ॥६५॥ भोगितां उर्वशीकाम । विसरला स्वधर्मकर्म । विसरला नित्यनेम । कामसंभ्रम वाढला ॥६६॥ तेथ मेषरुपें दोघे जण । झाले आश्विनीकुमार आपण । उर्वशीभोगक्षया कारण । इंद्रें जाण पाठविले ॥६७॥ पुरुरव्याचा भोगप्रांतीं । उर्वशी न्यावया स्वर्गाप्रती । दोनी एडके चोर नेती । मध्यरातीं मेमात ॥६८॥ ऐकोनि मेषांच्या शब्दासी । दुःखें हडबडली उर्वशी । रागें निर्भर्त्सी रायासी। नपुंसक होसी तूं एक ॥६९॥ वृथा वल्गसी पुरुषबळें । चोरें नेलीं माझीं बाळें । जळो तुझें तोंड काळें । म्हणोनि कपाळें ते पिटी ॥७०॥ ऐकोनि स्त्रियेचा शोक थोरु । शस्त्र घेऊनि सत्वरु । धांवतां फिटला पीतांबरु । तें नृपवरु स्मरेना ॥७१॥ पराभवूनि ते चोर । मेष आणितां सत्वर । विद्युल्लता झळकली थोर । तंव नग्न शरीर रायाचें ॥७२॥ नग्न देखोनि रायासी । सांडूनि निघाली उर्वशी । तिचेनि वियोगें मानसीं । अतिशोकासी पावला ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

त्यक्त्वा ऽऽत्मानं व्रजन्तीं तां, नग्न उन्मत्तवन्नृपः । विलपन्नन्वगाज्जाये, घोरे तिष्ठेति विक्लवः ॥५॥

पृथ्वीपरिपालनीं वरिष्ठ । स्वधर्मी धार्मिक श्रेष्ठ । शत्रुदमनीं अतिसुभट । प्रतापें उद्भट महावीर ॥७४॥ जाणे वेदशास्त्रविवेक । ज्यासी वंदिती सकळ लोक । तोही वेश्येचा केवळ रंक । झाला देख निजांगें ॥७५॥ सुरां असुरां न खालवी मान । जो अल्पही न साहे अपमान । तो वेश्येलागीं झाला दीन । निजसन्मान विसरोनी ॥७६॥ उर्वशी जातां देखोनि दिठीं । नग्न उन्मत्त उठाउठीं । रडत पडत लागे पाठीं । स्फुंदतां पोटीं श्वास न रिघे ॥७७॥ डोळेभरी पाहूं दे दिठीं । सांगेन जीवींच्या गुह्य गोष्टी । प्राण रिघों पाहे उठाउठी । क्षणभर भेटी न देतां ॥७८॥ आपुल्या पूर्वजांची आण । कदा नुल्लंघीं तुझें वचन । सत्य मानीं माझें प्रमाण । तुज काय कारण रुसावया ॥७९॥ तुज चालतां लवलाहीं । झणीं खडे रुततील पायीं । तुज जाणें कोणे ठायीं । तरी सवें मीही येईन ॥८०॥ जाऊं नको उभी राहें । परतोनी मजकडे पाहें । म्हणोनि धरुं धांवे पाये । तंव ते जाये उपेक्षुनी ॥८१॥ ज्यासी राजे मुकुटमणी । सदा येती लोटांगणीं । तो लागे वेश्येचे चरणीं । बाप करणी कामाची ॥८२॥ तुझी मज अति कळवळ । तुजलागीं मन माझें कोमळ । तूं कठिण झालीस केवळ । कोप प्रबळ कां धरिला ॥८३॥ यापरी रायाचें चित्त । विरहातुर शोकाकुलित । अतिशयें ग्लानियुक्त । ते ग्लानि सांगत श्रीकृष्ण ॥८४॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

कामानतृप्तोऽनुजुषन्, क्षुल्लकान्वर्षयामिनीः । न वेद यान्तीर्नायान्तीरुर्वश्याकृष्टचेतनः ॥६॥

उर्वशीकामीं कामासक्त । एकाग्र झालें रायाचें चित्त । नेणे सूर्याचें गतागत । केला भ्रांत कंदर्पें ॥८५॥ भोगिलीचि कामिनी । भोगितांही अनुदिनीं । अधिक प्रेम वाढलें मनीं । ऐसा तिजलागूनी आसक्त ॥८६॥ भोगितां उर्वशीकामासी । नेणे दिवसमासवर्षांसी । व्ययो झाला आयुष्यासी । हेंही त्यासी स्मरेना॥८७॥ जेवीं अग्निमाजीं घृत पडे । तंव तंव ज्वाळा अधिक वाढे । तेवीं कांता भोगितां वाडेंकोडें । काम पुढें थोरावे ॥८८॥ विचारितां स्त्रीकामासी । अतितुच्छत्व दिसे त्यासी । तोही भोगितां अहर्निशीं । विरक्ती रायासी नुपजेचि ॥८९॥ प्रीति गुंतली उर्वशीसीं । अतिग्लानी करितां तिसी । परतोनि न येचि रायापाशीं । निघे वेगेंसीं सांडूनि ॥९०॥ उर्वशी न देखुनि पुढें । राजा विरहें मूर्च्छित पडे । पाहों धांवे इकडेतिकडे । आक्रोशें रडे अतिदुःखी ॥९१॥ अटण करितां दाही दिशीं । अवचटें आला कुरुक्षेत्रासी । तंव अतिरिक्षीं उर्वशी । देखे दृष्टीसी नृपनाथ ॥९२॥ देखोनि म्हणे धांव पाव । मजलागीं दे कां वेगीं खेंव । येरी म्हणे मूढभाव । सांडीं सर्व विषयांधा ॥९३॥ आम्हां स्त्रियांची आसक्ती । कदा धड नव्हे गा भूपती । सदा स्त्रियांची दुष्ट जाती । जाण निश्चितीं महाराजा ॥९४॥ विशेषें आम्ही स्वैरिणी । स्वेच्छा परपुरुषगामिनी । आमुचा विश्वास मनीं । झणीं न मानीं नृपनाथा ॥९५॥ आम्हां प्रमदांच्या संगतीं । राया ठकले नेणों किती । आतां सांडूनि आमची आसक्ती । होईं परमार्थी विरक्त ॥९६॥ बहु काळ भोगितां माझा भोग । आद्यापि नुपजे तुज विराग । कामासक्ति सांडूनि साङग । साधीं चांग निजस्वार्थ ॥९७॥ राजा ग्लानि करी अनेग । एकवेळ निजांगें अंग । मज देई अंगसंग । सुखसंभोग भामिनी ॥९८॥ निलाग देखोनि ग्लानीसी । कृपेनें द्रवली उर्वशी । मग ते आपुल्या पूर्व वृत्तांतासी । रायापाशीं निवेदी ॥९९॥ मी स्वर्गांगना अतिसुरुप । मज घडला ब्रह्मशाप । तूं महाराजा पुण्यरुप । संगें निःशाप मी झालें ॥१००॥ तुझेनि संगें मी निर्धूत । शाप निस्तरले समस्त । मज तुज संग न घडे एथ । मी असें जात स्वर्गासी ॥१॥ ऐकोनि उर्वशीचें वचन । राजा विरहें करी रुदन । तेव्हां कळवळलें तिचें मन । त्या उपाय पूर्ण दाविला ॥२॥ प्रार्थूनियां गंधर्वांसी । अग्निस्थाली दिधली रायासी । यावरी करुनि यागासी । मज पावसी महाराजा ॥३॥ उर्वशीवियोगें व्यथाभूत । अग्निस्थाली उपेक्षूनि तेथ । राजा निजमंदिरा येत । शोकाकुलित अतिदुःखी ॥४॥ उर्वशीची व्यथा रायासी । स्वप्नीं देखिलें तियेसी । त्वरेनें पाहूं आला स्थालीसी । तंव देखे अश्वत्थासी शमीगर्भा ॥५॥ त्याच्या अरणी करुनि देख । यज्ञाग्नि पाडिला चोख । यजूनि पावला उर्वशीलोक । कामसुखभोगेच्छा ॥६॥ भोग भोगितां उर्वशीसीं । विरक्ति उपजली रायासी । तो जें बोलिला अनुतापेंसीं । तें ऐक तुजसी सांगेन ॥७॥ अठरा श्लोकांचें निरुपण । राजा बोलिला आपण । आठे श्लोकीं अनुताप पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥८॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

ऐल उवाच - अहो मे मोहविस्तारः कामकश्मलचेतसः । देव्या गृहीतकण्ठस्य, नायुःखण्डा इमे स्मृताः ॥७॥

ऐलगीताचा अनुताप । नाशी अगम्यागमनपाप । करी श्रोत्यांसी निष्पाप । साधकां कंदर्प बाधीना ॥९॥ जेवीं मदगज गजीसंगीं । नाना आपत्ति स्वयें भोगी । तेवीं उर्वशीच्या संभोगीं । झाला विरागी पुरुरवा ॥११०॥ जो उर्वशीलागीं अनुरक्त । तोचि तिसीं झाला विरक्त । तेणें वैराग्यें अनुतापयुक्त । स्वयें बोलत ऐलरावो ॥११॥ माझ्या मोहाचा विषयविस्तार । कामासक्त कामातुर । कुश्चित कंदर्पाचें घर । म्यांचि साचार सेविलें ॥१२॥ उर्वशीकामें अतिआसक्त । कामातुर झालें चित्त । तेणें म्यां जोडिला अनर्थ । थितें केलें व्यर्थ आयुष्य ॥१३॥ उर्वशी कंठसल्लग्न शस्त्र । आयुष्यच्छेदनीं सतेजधार । छेदिलें आयुष्य अपार । तें मी पामर स्मरेना ॥१४॥ कांताआलिंगन विषवल्ली । म्यां कंठीं घातली सुकाम भुलीं । तिणें आयुष्याची होळी केली । विवेक समूळीं गिळिला ॥१५॥ कामिनीकामआलिंगनीं । कंठीं पेटविला दावाग्नी । तो धडाडिला आयुष्यवनीं । विवेकअवनी जाळित ॥१६॥ नरदेहींचें उत्तमोत्तम । अमूल्य आयुष्य केलें भस्म । जळो जळो माझें कर्म । निंद्य अधर्म तो एक ॥१७॥ नरदेहींच्या आयुष्यपुष्टी । साधक रिघाले वैकुंठी । ज्ञाते ब्रह्म होती उठाउठीं । तें म्यां कामासाठीं नाशिलें ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

नाहं वेदाभिनिर्मुक्तः, सूर्योवाऽभ्युदितोऽमुया । मुषितो वर्षपूगानां, बताहानि गतान्युत ॥८॥

नरदेहाचा आयुष्यक्षण । न मिळे देतां कोटी सुवर्ण । तें म्यां नाशिलें संपूर्ण । आपणया आपण नाडिलें ॥१९॥ साधूंचिया निजस्वार्था । साधूनि द्यावया उगवे सविता । निमेषोन्मेषें परमार्था । साधक तत्त्वतां साधिती ॥१२०॥ तोचि सविता सकामासी । आयुष्य हरी अहर्निशीं । हें न कळे ज्याचें त्यासी । नरकपातासी निजमूळ ॥२१॥ पुढिलांची गोठी ते कायसी । मीच नाडलों उर्वशीपासीं । र्हालस झाला आयुष्यासी । हे हानि कोणासी सांगावी ॥२२॥ जनांचिया हितासी वहिला । सूर्यो अनुदिनीं उगवला । तें मी नेणेंचि दादुला । उर्वशीकामें भुलला उन्मत्त ॥२३॥ सूर्याचा उदयो अस्तमान । वर्षेंही लोटल्या नाहीं ज्ञान । करितां उर्वशी-अधरपान । तेणें मदें संपूर्ण मातलों ॥२४॥ मद्यमदु उतरे दिनांतीं । धनमदु जाय निधनस्थितीं । तारुण्यमदु जाय क्षीणशक्ती । स्त्रीमदप्राप्ती कदा नुतरे ॥२५॥ नरदेहाची आयुष्यकथा । पुढती दुर्लभ न लभे हाता । जळो हे उर्वशी देवकांता । इणेंचि तत्त्वत्तां नागविलों ॥२६॥ मी निर्भय रक्षिता सर्वांसी । त्या मज नागविलें उर्वशीं । हे लाज सांगों कोणापाशीं । उकसाबुकसीं स्फुंदत ॥२७॥ माझ्या निजहिताचा चोरु । हे उर्वशी जीवें मारुं । सवेंचि उपजला विचारु । येथ मीचि पामरु अविवेकी ॥२८॥ मग म्हणे कटकटा । सृष्टीमाजीं मी करंटा । आयुष्य नाशिलें कामचेष्टा । अपाव मोठा मज झाला ॥२९॥ मग आक्रंदे अतिगर्जोनी । कामें नागविलों आयुष्य हरोनी । यहीहोनि अधिक हानी । पाहतां ये जनीं असेना ॥१३०॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

अहो मे आत्मसंमोहो, येनात्मा योषितां कृतः । क्रीडामृगश्चक्रवर्ती, नरदेवशिखामणिः ॥९॥

राजे मुकुटांचे प्रतापी पूर्ण । माझ्या चरणा येती शरण । तो मी वेश्येचे घरीं चरण । हें निर्लज्जपण म्यां केलें ॥३१॥ मज पुरुरव्याचे आज्ञेंकरीं । राजे नाचती चराचरीं । तो मी वेश्येचे आज्ञेवरी । श्वानाचेपरी वर्तलों ॥३२॥ जैसें वानर गारुडयाचें । तैसा स्त्रियेचेनि छंदें नाचें । माझ्या चक्रवर्तीपणाचें । अतिनिंद्य साचें फळ झालें ॥३३॥ सकळ राजे मज देती सन्मान । भूपति सदा वंदिती चरण । तो मी झालों स्त्रियेआधीन । हीनदीन अतिरंक ॥३४॥ राखतां स्त्रियेचा रसरंगप्रेम । पायां पडणें हें उचित कर्म । म्हणती ते जळो जन सकाम । हेचि धाडी परम कामाची ॥३५॥ मी वलयांकित चक्रवर्ती । तोही योषिता घातलों आवर्ती । त्याचि आवर्ताची स्थिती । स्वमुखें भूपति अनुवादे ॥३६॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

सपरिच्छदमात्मानं, हित्वा तृणमिवेश्वरम् । यान्तीं स्त्रियं चान्वगमं, नग्न उन्मत्तवद्रुदन् ॥१०॥

केवळ साकार मायाभ्रम । यालागीं ’प्रमदा’ स्त्रीचें नाम । संगें ठकिले उत्तमोत्तम । स्त्रीसंभ्रम वाढवितां ॥३७॥ प्रमदा अंबरें अलंकार । हें मायेचें सोलीव सार । एथ भुलले थोरथोर । मीही पामर स्त्रीसंगें ॥३८॥ माझीच मज करणी । दिसतसे दैन्यवाणी । उर्वशी वेश्या कामचारिणी । जे बहुजनीं भोगिली ॥३९॥ ऐशियेच्या कामासक्तता । मी सर्वस्वें भुललों सर्वथा । ते भुललेपणाची कथा । अनुतापतां स्वयें बोले ॥१४०॥ धर्मपत्नीणसीं भोगितां काम । सहसा नासेना स्वधर्म । मज वोढवलें दुष्ट कर्म । वेश्येसी परम भुललों ॥४१॥ परदारा अभिलाषिती । ते अवश्य नरका जाती । मा स्वदारा-कामासक्ती । तेथही अधोगती सोडीना ॥४२॥ स्त्रियां भुलविले हरिहर । स्त्रियां भुलविले ऋषीश्वर । स्त्रियां भुलविले थोरथोर । मीही किंकर स्त्रियां केलों ॥४३॥ राज्य आणि राजवैभव । वेश्येअधीन केलें सर्व । याहीहूनि केलें अपूर्व । तीलागीं जीव अर्पिला ॥४४॥ मी राजवर्यां मुकुटमणी । तो दास झालों तिचे चरणीं । बाप कंदर्पाची करणी । केलों कामिनीअधीन ॥४५॥ ऐशिया मज राजेश्वरातें । वेश्येनें हाणोनि लातें । उपेक्षूनियां तृणवतें । निघालि निश्चितें सांडोनी ॥४६॥ तीसी जातां देखोनियां पुढें । मी नागवा धांवें लवडसवडें । लाज सांडोनियां रडें । तरी ते मजकडे पाहेना ॥४७॥ जेवीं कां लागलें महद्भूत । नातरी पिशाच जैसें उन्मत्त । तेवीं नागवा धांवें रडत । तरी तिचें चित्त द्रवेना ॥४८॥ तरी रडत पडत अडखळत । मी निर्लज्ज तीमागें धांवत । माझे मोहाचा अतिअनर्थ । अपमानग्रस्त मज झाला ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

कुतस्तस्यानुभावः स्यात्तेज ईशित्वमेव वा । योऽन्वगच्छं स्त्रियं यान्तीं खरवत्पादताडितः ॥११॥

मी महत्त्वें राजराजेश्वरु । ऐसा गर्व होता अति दुर्धरु । तो मी वेश्येचा अनुचरु । झालों किंकरु निजांगें ॥१५०॥ एवढाही मी राजेश्वरु । मागें धांवें होऊनि किंकरु । तरी ते न करी अंगीकारु । जेवीं वोसंडी खरु खरी जैशी ॥५१॥ जेवीं खरी देखोनियां खरु । धांवोनि करी अत्यादरु । येरी उपेक्षूनि करी मारु । अतिनिष्ठुरु लातांचा ॥५२॥ तिच्या लाता लागतां माथां । खरु निघेना मागुता । त्या खराऐशी मूर्खता । माझे अंगीं सर्वथा बाणली ॥५३॥ स्त्री उदास कामदृष्टीं । मीं आसक्त लागें पाठीं । माझ्या समर्थपणाची गोठी । सांगतां पोटीं मी लाजें ॥५४॥ ऐसें स्त्रीकामीं ज्याचें मन । त्याचें योग याग अनुष्ठान । अवघेंचि वृथा जाण । तेंचि निरुपण निरुपी ॥५५॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन वा । किं विविक्तेन मौनेन, स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ॥१२॥

स्त्रीकाममय ज्याचें मन । त्याची वृथा विद्या वृथा श्रवण । वृथा तप वृथा ध्यान । त्याग मुंडण तें वृथा ॥५६॥ वृथा एकांतसेवन । वृथा जाण त्याचें मौन । राखेमाजीं केलें हवन । तैसें अनुष्ठान स्त्रीकामा ॥५७॥ कामासक्त ज्याचें चित्त । त्याचे सकळही नेम व्यर्थ । आपुलें पूर्ववृत्त निंदित । अनुतापयुक्त नृप बोले ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

स्वार्थस्याकोविदं धिङ्‌मां, मूर्खं पण्डितमानिनम् । योऽहमीश्वरतां प्राप्य, स्त्रीभिर्गोखरवज्जितः ॥१३॥

चहूं पुरुषार्थांचें अधिष्ठान । नरदेह परम पावन । जेणें देहें करितां भजन । ब्रह्म सनातन पाविजे ॥५९॥ नरदेहींचा क्षण क्षण । समूळ निर्दळी जन्ममरण । भावें करितां हरिस्मरण । महापापें जाण निर्दळती ॥१६०॥ त्या नरदेहाची लाहोनि प्राप्ती । नरवर्य झालों चक्रवर्ती । त्या माझी जळो जळो स्थिती । जो वेश्येप्रती भुललों ॥६१॥ मानी श्रेष्ठ मी सज्ञान । परी अज्ञानांहूनि अज्ञान। नेणेंचि निजस्वार्थसाधन । वेश्येआधीन मी झालों ॥६२॥ लाभोनि नरदेहनिधान । म्यां देहीं धरिला ज्ञानाभिमान । न करींच निजस्वार्थसाधन । हें मूर्खपण पैं माझें ॥६३॥ जैसा गायीमागें कामयुक्त । धांवतां बैल न मानी अनर्थ । कां खरीमागें खर धांवत । तैसा कामासक्त मी निर्लज्ज ॥६४॥ खरी खरास हाणी लाताडें । तरी तो धसे पुढें पुढें । तैसाचि मीही वेश्येकडे । कामकैवाडें भुललों ॥६५॥ ’कामभोगांतीं विरक्ती’ । ऐसें मूर्ख विवेकी बोलती । ते अधःपातीं घालिती । हे मज प्रतीति स्वयें झाली ॥६६॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

सेवतो वर्षपूगान्मे, उर्वश्या अधरासवम्‌ । न तृप्यत्यात्मभूः कामो, वन्हिराहुतिभिर्यथा ॥१४॥

सत्ययुगींचें आयुष्य माझें । ऐश्वर्य सार्वभौमराज्यें । उर्वशी स्वर्गमंडनकाजें । सर्वभोगसमाजें भोगितां ॥६७॥ भोगितां लोटल्या वर्षकोटी । परी विरक्तीची नाठवे गोठी । मा ’वैराग्य भोगाचे शेवटीं’ । हे मिथ्या चावटी मूर्खांची ॥६८॥ स्त्रियेचें म्हणती अधरामृत । तेही मूर्ख गा निश्चित । तें उन्मादमद्य यथार्थ । अधिकें चित्तभ्रामक ॥६९॥ वनिताअधरपानगोडी । त्यापुढें सकळ मद्यें बापुडीं । तत्काळ अनर्थी पाडी । निजस्वार्थकोडीनाशक ॥१७०॥ घालितां कोटि घृताहुती । अग्नीसी कदा नव्हे तृप्ती । तेवीं वनिताकामासक्ती । कदा विरक्ती उपजेना ॥७१॥ ऐसा आठ श्लोकीं अनुताप । स्वयें बोलोनियां नृप । हृदयीं उपजला विवेकदीप । जेणें झडे कंदर्प तें स्मरलें ॥७२॥ सकामासी विषय त्यागितां । वासना न त्यागे सर्वथा । कां आदरें विषय भोगितां । विरक्ति सर्वथा उपजेना ॥७३॥ ऐशिये अर्थींचा उपावो । विचारोनि बोले रावो । कामत्यागाचा अभिप्रावो । साचार पहा हो संबोधी ॥७४॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

पुंश्चल्यापहृतं चित्तं, को न्वन्यो मोचितुं प्रभुः । आत्मारामेश्वरमृते, भगवन्तमधोक्षजम् ॥१५॥

पुरुष सदा स्त्रीअनुराग । परी सहसा न करवे प्रसंग । त्यासी पुंश्चलीचा घडल्या संग । ते बाधी निलाग हावभावीं ॥७५॥ पुंश्चलीचे कटाक्ष गुण । तेंचि पुरुषासी दृढ बंधन । स्त्रीकामबंधन सोडवी कोण । एक नारायणावांचूनि ॥७६॥ कामिनीकामापासूनि निर्मुक्त । कर्ता ईश्वर समर्थ । जो कां आत्माराम भगवंत । तोचि निश्चित सोडविता ॥७७॥ मायागुणें कामसंचार । अविद्या वाढवी साचार । मायानियंता जो ईश्वर । तो कामकरकर निर्दळी ॥७८॥ स्वस्वरुपीं रमण आराम । ऐसा जो कां आत्माराम । तो निवारी सकळ काम । करी निर्भ्रम निजात्मता ॥७९॥ जो भोग भोगूनि अभोक्ता । त्या शरण रिघाल्या अनंता । बाधूं न शके विषयावस्था । स्त्रीसंगीं सोडविता तो एक ॥१८०॥ जो निवारी अधोगती । तो अधोक्षज असतां भक्तपती । त्यासी शरण रिघाल्या निश्चितीं । कामासक्ती निवारी ॥८१॥ राजा कामासक्तीं अतित्रासला । सबाह्य विषयीं उदास झाला । त्याचा वासनाकाम जो उरला । तो न वचे त्यागिला त्याचेनीं ॥८२॥ सर्वभावेंसीं संपूर्ण । हरीसि रिघालिया शरण । सकळ कामाचें निर्दळण । सहजें जाण स्वयें होय ॥८३॥ एकाचा मतवाद निश्चितीं । करितां श्रुतिवाक्य व्युत्पत्ती । यजितां इंद्रादि देवांप्रती । कामनिवृत्ति हृदयस्थ ॥८४॥ ऐसें बोलती जे सज्ञान । ते सर्वथा गा अज्ञान । हरीसी न रिघतां शरण । कामसंचरण शमेना ॥८५॥ इंद्रादि देव कामासक्तीं । विटंबले नेणों किती । त्यांचेनि भजनें कामनिवृत्ति । जे म्हणती ते अतिमूर्ख ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

बोधितस्यापि देव्या मे, सूक्तवाक्येन दुर्मतेः । मनोगतो महामोहो, नापयात्यजितात्मनः ॥१६॥

काम्य कर्मीं होईल सुख । हें बोलणें समूळ लटिक । काम्य कर्मीं अधिक दुःख । हें नेणती मूर्ख सकाम ॥८७॥ प्रत्यक्ष म्यां याग करुन । इंद्रादि देवांतें यजून । उर्वशीसंभोगा लाधून । अतिदुःखी जाण मी झालों ॥८८॥ नारायणऊरुसीं जन्मली । यालागीं ’उर्वशी’ नांव पावली । त्या मज श्रुतिवाक्यें बोधिलीं । निष्काम बोली अतिशुद्ध ॥८९॥ ऐकतां श्रुतिनिष्कामबोली । माझी न वचेच सकाम भुली । जंव गोविंदें कृपा नाहीं केली । तंव कामाची चाली खुंटेना ॥१९०॥ भावें हरीसी निघाल्या शरण । हृदयीं प्रकटे नारायण । तेव्हा सर्व काम सहजें जाण । जाती पळोन हृदयस्थ ॥९१॥ उर्वशीकामसंगें जाण । थोर कष्टलों मी आपण । असो तिचा अपराध कोण । मीचि हरिस्मरण विसरलों ॥९२॥ जरी मी करितों हरीचें स्मरण । तरी काम बापुडें बाधी कोण । मज माझी असती आठवण । तैं तुच्छ जाण उर्वशी ॥९३॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

किमेतया नोऽपकृतं, रज्ज्वा वा सर्पचेतसः । रज्जुस्वरुपाविदुषो, योऽहं यदजितेन्द्रियः ॥१७॥

मूढमतीचा प्रबोध । मानी उर्वशीचा अपराध । विवेकें पाहतां शुद्ध । मीच मतिमंद सकाम ॥९४॥ उर्वशी देखतां दृष्टीं । मी कामासक्त झालों पोटीं । माझिये लंपटतेसाठीं । मज म्यां शेवटीं नाडिलें ॥९५॥ जेवीं सांजवेळे पडिला दोरु । भेडा सर्प भासे थोरु । जंव नाहीं केला निर्धारु । तंव महाअजगरु भयानक ॥९६॥ तेणें सर्पभयें लवडसवडीं । पळों जातां पैं तांतडी । दुपावुलीं पडली आढी । त्याची कल्पना नाडी तयासी ॥९७॥ तेवीं माझिये कामभ्रांतीं । उर्वशी सुंदर युवती । एथ माझिया कामासक्ति । सुरत-रतीं भुललों ॥९८॥ यापरी मी अविवेकात्मा । भुललों उर्वशीच्या कामा । तीवरी कोपणें जें आम्हां । हेंचि अधर्माचें मूळ ॥९९॥ दृष्टीं देखतां कामिनी । कामासक्ता ते अतिरमणी । विवेकिया पोहणघाणी । नरकमाथणी ते कांता ॥२००॥ जेवीं सूकरा विष्ठेची प्रीती । तेवीं सकामा कामिनीची रती । विवेकी देखोनि थुंकिती । तेंचि श्लोकार्थीं नृप बोले ॥१॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

क्वायं मलीमसः कायो, दौर्गन्ध्याद्यात्मकोऽशुचिः । क्व गुणाः सौमनस्याद्या, ह्मध्यासोऽविद्यया कृतः ॥१८॥

स्त्री-पुरुष नामाभिधान । केवळ देहासीचि जाण । ते स्त्रीदेहीं पाहतां गुण । मलिनपणा अत्यंत ॥२॥ जे नीच नव्या विटाळाची खाणी । जे रजस्वलेची प्रवाहन्हाणी । जे कां दुर्गंधाची पोहणी । जे उतली चिडाणी विष्ठेची ॥३॥ जे कां दोषांचें जन्मस्थान । जे विकल्पाचें आयतन । जे महादुःखाचें भाजन । अधःपतन जिचेनी ॥४॥ जे वाढवी अतिउद्वेग । जिचेनी मनासी लागे क्षयरोग । जिचा बाधक अंगसंग । अतिनिलाग निंद्यत्वें ॥५॥ जेवीं नीचाचा कांठपरा । गळां अडकल्या मांजरा । तें रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रां विटाळी ॥६॥ तेवीं कामिनीची संगती । गळां पडली न निघे मागुती । कामिनीकामें कामासक्तीं । नेणों किती विटंबिले ॥७॥ तें मांजर जेथें घाली मुख । तेथ कांठपरा रोधी देख । तेवीं स्त्रीसंगें अतिदुःख । मानिती सुख सकाम ॥८॥ मृगजळीं कमळ मनोहर । तैसें अंगनावदन सुंदर । सुस्मित चारु सुकुमार । सकाम नर वानिती ॥९॥ अंगनावदनाची निजस्थिती । निखळ शेंबुडाची तेथ वस्ती । तें मुख चंद्रेसीं उपमिती । जेवीं अमृत म्हणती विखातें ॥२१०॥ वनिताअधरीं झरे लाळ । ते म्हणती अधरामृत केवळ । बाप अविद्येचें बळ । भुलले सकळ सुरासुर ॥११॥ स्त्रीपुरुषीं आत्मा एक । स्त्रीरुप तेथ आविद्यक । मिथ्या स्त्रीकामीं भुलले लोक । बाप कवतिक मायेचें ॥१२॥ आत्मा भोक्ता म्हणावा स्त्रीसंभोगीं । तंव तो नित्यमुक्त असंगी । देह भोक्ता म्हणावा स्त्रीसंयोगीं । तंव देहाचे अंगीं जडत्व ॥१३॥ तेथ विषयभोगासी कारण । मुख्यत्वें देहाभिमान । त्या देहाभिमानासी जाण । बहुत जण विभागी ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

पित्रोः किं स्वं नु भार्यायाः स्वामिनोऽग्नेः श्वगृध्रयोः । किमात्मनः किं सुहृदामिति यो नावसीयते ॥१९॥

गर्भधारण पोषण । स्वयें श्रमोनियां आपण । माता करी परिपालन । तो हा देह जाण ’मातेचा’ ॥१५॥ एकलेपणें माता । स्वप्नीं न देखे पुत्रकथा । जो निजवीर्यनिक्षेपिता । तो हा देहो तत्त्वतां ’पित्याचा’ ॥१६॥ जे अग्नि ब्राह्मण साक्षी करुनी । भार्या आणिली भाक देवोनी । जे जीवित्व समर्पोनी । सेवेलागोनी विनटली ॥१७॥ जीसी याचेनि सुखशृंगार । जीसी याचेनि ऐहिक पर । ऐसा सूक्ष्म करितां विचार । देहो साचार ’स्त्रियेचा’ ॥१८॥ या देहाचीं आवश्यकें । ’सुहृद बंधू’ जे कां सखे । देहाचेनि सुखावती सुखें । देह एके पाखें त्यांचाही ॥१९॥ स्वयें घेऊनियां वेतन । देहो विकिला आपण । आज्ञेवीण न वचे क्षण । देहो जाण ’स्वामीचा’ ॥२२०॥ ’श्वानशृगालगिधांचें’ खाजें । तरी हा देहो त्यांचा म्हणिजे । जीवस्तव देहीं कर्म निफजे । यालागीं देह बोलिजे ’जीवाचा’ ॥२१॥ पिता-माता-स्त्री-पुत्र-स्वजन । देहाचें अवश्य करिती दहन । यालागीं देह ’अग्नीचा’ पूर्ण । विचक्षण बोलती ॥२२॥ यापरी देहाचे जाण । विभागी असती आठ जण । तेथ ’मी भोक्ता’ हा अभिमान । तो केवळ जाण मूर्खत्वें ॥२३॥ एथ एक ’मी’ विशिष्ट भोक्ता । ’माझा’ देह ऐशी ममता । हेचि जाण तत्त्वतां । अधःपाता नेताती ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

तस्मिन्कलेवरेऽमेध्ये, तुच्छनिष्ठे विषज्जते । अहो सुभद्रं सुनसं, सुस्मितं च मुखं स्त्रियः ॥२०॥

देहो तितुका अशुचिकर । त्यांत स्त्रीदेह अतिअपवित्र । केवळ विटाळाचें पात्र । निरंतर द्रवरुपें ॥२५॥ स्वयें भोक्ता अतिकुश्चित । ऐसे अविवेकी कामासक्त । कामिनीकामीं लोलंगत । ते मूर्ख वानीत स्त्रियांतें ॥२६॥ अहो हे सुंदर सुरेख । चंद्रवदना अतिसुमुख । सरळ शोभे नासिक । सुभग देख सुकुमार ॥२७॥ ऐशिये सुंदर स्त्रियेतें । पावलों आम्ही सभाग्य एथें । ऐशीं कामासक्तचितें । भुललीं भ्रांतें प्रमदांसी ॥२८॥ स्त्रीदेहाचे विवंचनें । विवंचितां ओकारा ये मनें । जळो स्त्रियेचें निंद्य जिणें । मूर्खीं रमणें ते ठायीं ॥२९॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

त्वङ्‌मांसरुधिरस्नायुमेदोमज्जाऽस्थिसंहतौ । विण्मूत्रपूये रमतां, कृमीणां कियदन्तरम् ॥२१॥

स्त्रीदेहाचा उभारा । केवळ अस्थींचा पांजरा । त्याचें आवरण तें स्नायु शिरा । बांधोनि खरा दृढ केला ॥२३०॥ तेथ रुधिरमांसाचें कालवण । करुनि पांजरा लिंपिला पूर्ण । अस्थीवरील जें वेष्टण । ’मज्जा’ म्हणती त्या नांव ॥३१॥ अस्थिमाजील रसबद्ध । त्या नांव बोलिजे ’मेद’ । वरी चर्म मढिलें सुबद्ध । ’त्वचा’ शुद्ध ती नांव ॥३२॥ त्या देहामाजीं सांठवण । विष्ठा मूत्र परिपूर्ण । ते स्त्रीदेहीं ज्याचें रमण । ते ’कृमि’ जाण नररुपें ॥३३॥ विष्ठेमाजीं कृमि चरती । तैशी स्त्रीदेहीं ज्यां आसक्ती । तेही कृमिप्राय निश्चितीं । संदेह ये अर्थी असेना ॥३४॥ वनिता देह यापरी एथ । विचारितां अतिकुश्चित । तो वस्त्रालंकारीं शोभित । करुनि आसक्त नर होती ॥३५॥ घंटापारधी पाश पसरी । त्यावरी तो मृगांतें धरी । पुरुश स्त्रियेतें श्रृंगारी । त्या पाशाभीतरीं स्वयें अडके ॥३६॥ यालागीं स्त्रियांची संगति । कदा न करावी विरक्तीं । गृहस्थीं सांडावी आसक्ती । येचि अर्थीं नृप बोले ॥३७॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

अथापि नोपसज्जेत, स्त्रीषु स्त्रैणेषु चार्थवित् । विषयेन्द्रियसंयोगान्मनः क्षुभ्यति नान्यथा ॥२२॥

स्त्रीदेह शोभनीय असता । तरी वस्त्रालंकारेंवीण शोभता । तो अतिनिंद्य कुश्चितता । उघडा सर्वथा शोभेना ॥३८॥ यालागीं वस्त्राभरणीं । देह गुंडिती कामिनी । जेवीं मैंद ब्राह्मणपणीं । विश्वासूनी घात कीजे ॥३९॥ तैशी स्त्रियांची संगती । सेवा लावी नाना युक्तीं । शेखीं संगें पाडी अधःपातीं । तेथ विरक्तीं न वचावें ॥२४०॥ जरी स्त्रियेची विरक्तस्थिती । तरी साधकीं न करावी संगती । अग्निसंगें घृतें द्रवती । तेवीं विकारे वृत्ति स्त्रीसंगें ॥४१॥ अमृत म्हणोनि खातां विख । अवश्य मरण आणी देख । स्त्री मानूनि सात्त्विक । सेवितां दुःख भोगवी ॥४२॥ अग्नीमाजीं घृताची वस्ती । जरी बहुकाळ निर्वाहती । तरी स्त्रीसंगें परमार्थी । निजात्मस्थिती पावते ॥४३॥ घृत वेंचल्या वर्षें झालीं साठी । तरी अग्निसंगें द्रव उपजे घटीं । तेवीं प्रमदासंग परिपाठीं । वार्धकींही उठी अतिकामु ॥४४॥ जरी कापूर अग्नीआंत । नांदों लाहता न पोळत । तरीच स्त्रीसंगें परमार्थ । पावते समस्त परब्रह्म ॥४५॥ अग्नी पोळी धरितां हातीं । तैशी स्त्रियांची संगती । संगें वाढवी आसक्ती । पाडी अनर्थीं पुरुषांतें ॥४६॥ स्त्रियेपरीसही स्त्रैण । संगती मीनलिया जाण । कोटि अनर्थांचें भाजन । अधःपतन तत्संगें ॥४७॥ स्त्रैणेंसीं झाल्या भेटी । ब्रह्मानंद स्त्रीसुखाच्या पोटीं । ऐशा विरक्तां प्रबोधी गोठी । करी उठाउठी स्त्रीकाम ॥४८॥ तेथ स्वदारा आणि परदारा । या करुं नेदी विचारा । प्रवर्तवी स्वेच्छाचारा । स्त्रैण खरा अतिघाती ॥४९॥ स्त्रैण जेथें प्रवेशला । तेथ अनाचार वेलीं गेला । अधर्म सर्वांगीं फुलला । बाधकत्वें फळला अनर्थफळीं ॥२५०॥ यालागीं जो परमार्थी । तेणें स्त्री आणि स्त्रैणाची संगती । सर्वथा न धरावी हातीं । पाडी अनर्थी तो संग ॥५१॥ मुख्य स्त्रैणचि वाळिला आहे । तेथें स्त्रीसंग कोठें राहे । हे संगतीचि पाहें । सेव्य नोहे परमार्था ॥५२॥ यालागीं साधकीं आपण । स्त्रीनिरीक्षण संभाषण । सर्वथा न करावें जाण । एकांतशील न केव्हांही व्हावें ॥५३॥ म्हणशी विवेकी जो आहे । त्यासी स्त्रीसंग करील काये । स्त्रीसंगास्तव पाहें । सोशिले अपाये सुज्ञांनीं ॥५४॥ पराशरासी अर्ध घडी । नावेसी मीनली नावाडी । ते अर्ध घटिकेसाठीं रोकडी । अंगीं परवडी वाजली ॥५५॥ ऋष्यश्रृंग अतितापसी । तोही वश झाला वेश्येसी । इतरांची गोठी कायसी । मुख्य महादेवासी भुलविलें ॥५६॥ विषय इंद्रियांचे संगतीं । अवश्य क्षोभे चित्तवृत्ती । तेथ सज्ञानही बाधिजती । मा कोण गती अज्ञाना ॥५७॥ हेही असो उपपत्ती । नसतां स्त्रियांची संगती । काम क्षोभे एकांतीं । तेंचि विशदार्थी नृप बोले ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

अदृष्टादश्रुताद्गावान्न भाव उपजायते । असंप्रयुञ्जतः प्राणान्, शाम्यति स्तिमितं मनः ॥२३॥

जें देखिलें ऐकिलें नाहीं । ऐशिया विषयांचे ठायीं । पुरुषाचें मन पाहीं । सर्वथा कहीं क्षोभेना ॥५९॥ जे पूर्वभुक्त विषय असती । तेचि स्मरण झालिया चित्तीं । कामउद्रेकें क्षोभे वृत्ती । नसतां संगती स्त्रियेची ॥२६०॥ एवं पूर्वापार विषयासक्ती । पुरुषासी बाधक निश्चितीं । तो बैसल्याही एकांतीं । वासनासंस्कारें वृत्ति सकाम क्षोभे ॥६१॥ पूर्वदिवशींचीं पक्वान्नें । जीं ठेविलीं अतियत्नें । तीं न करितांही रांधणें । पहांटे भक्षणें स्वयें जेवीं ॥६२॥ तेवीं वासनासंस्थित काम । पुरुषास करी सकाम । कामक्षोभें पाडी भ्रम । कर्माकर्म स्मरेना ॥६३॥ एवं वासना कामसंगती । बाधक होय परमार्थीं । यालागीं साधकीं समस्तीं । स्त्रीकामासक्ती त्यागावी ॥६४॥ मनीं क्षोभल्या कामसक्ती । साधकीं तेथें करावी युक्ती । आवाराव्या बाह्य इंद्रियवृत्ती । तैं मनासी शांति हळूहळू होय ॥६५॥ कर्मेंद्रियीं राखण । दृढ वैराग्य ठेविलिया जाण । मनीं क्षोभल्या काम पूर्ण । आपल्या आपण उपशमे ॥६६॥ जेणें पडिजे अनर्थी । ते त्यागावी संगती । संगत्यागाची निजस्थिती । दृढ श्लोकार्थीं नृप बोले ॥६७॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

तस्मात्सङगो न कर्तव्यः, स्त्रीषु स्त्रैणेषु चेन्द्रियैः । विदुषां चाप्यविश्रब्धः, षङ्‌वर्गः किमु मादृशाम् ॥२४॥

जेणें सज्ञाना उठी छळ । सकाम भुलवी तत्काळ । ऐसा स्त्रीसंग अनर्थशीळ । त्याहूनि प्रबळ स्त्रैणाचा ॥६८॥ यालागीं कर्मेंद्रियांचे स्थितीं । स्त्री आणि स्त्रैणाची संगती । घडों नेदावी परमार्थीं । जे निजस्वार्थीं साधक ॥६९॥ जरी विषयीं क्षोभेल मन । तरी इंद्रियें आवरावीं आपण । तरी मनींचा विषयो जाण । मनींचि आपण स्वयें विरे ॥२७०॥ निकट विषय स्त्रीसंगती । मन क्षोभे विषयासक्तीं । क्षणार्ध स्त्रीसंगप्राप्ती । पडले अनर्थी सज्ञान ॥७१॥ स्त्रीदर्शनें कामासक्त । देवेंद्र झाला भगांकित । चंद्र कळंकिया एथ । केला निश्चित गुरुपत्न्याक ॥७२॥ सौभरी तपस्वी तपयुक्त । तो मत्स्यमैथुनास्तव एथ । करुनि सांडिला कामासक्त । ऐसा संग अनर्थभूत स्त्रियांचा ॥७३॥ निजकन्येचिया संगतीं । ब्रह्मा भुलला कामासक्ती । मा इतरांची कोण गती । संग अनर्थी स्त्रियांचा ॥७४॥ कामिनीसंग अतिदारुण । शिवासी झालें लिंगपतन । प्रमदांसंगें सज्ञान । ठकले जाण महायोगी ॥७५॥ नारदें विनोददृष्टीं । कृष्णपत्नीह मागितल्यासाठीं । तो नारदी केला गंगातटीं । तेथ जन्मले पोटीं साठी पुत्र ॥७६॥ कौतुकें स्त्रियांप्रति जातां । सज्ञान पावे बाधकता । मा मजसारिख्या मूर्खाची कथा । कोण वार्ता ते ठायीं ॥७७॥ क्षणार्ध स्त्रियांची संगती । सज्ञान ठकले ऐशा रीतीं । जे स्त्रीसंगा विश्वासती । ते दुःखी होती मजऐसे ॥७८॥ यालागीं विश्वासतां स्त्रीसंगासी । इंद्रियषङ्‌वर्ग ठकी सर्वांसी । एथ आवरुनि इंद्रियांसी । सर्वथा स्त्रियांसी त्यागावें ॥७९॥ त्यागूनि स्त्रियांची संगती । उपरमूनि इंद्रियवृत्ती । राजा पावला परम शांती । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥२८०॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

तस्मात्सङगो न कर्तव्यः, स्त्रीषु स्त्रैणेषु चेन्द्रियैः । विदुषां चाप्यविश्रब्धः, षङ्‌वर्गः किमु मादृशाम् ॥२४॥

जेणें सज्ञाना उठी छळ । सकाम भुलवी तत्काळ । ऐसा स्त्रीसंग अनर्थशीळ । त्याहूनि प्रबळ स्त्रैणाचा ॥६८॥ यालागीं कर्मेंद्रियांचे स्थितीं । स्त्री आणि स्त्रैणाची संगती । घडों नेदावी परमार्थीं । जे निजस्वार्थीं साधक ॥६९॥ जरी विषयीं क्षोभेल मन । तरी इंद्रियें आवरावीं आपण । तरी मनींचा विषयो जाण । मनींचि आपण स्वयें विरे ॥२७०॥ निकट विषय स्त्रीसंगती । मन क्षोभे विषयासक्तीं । क्षणार्ध स्त्रीसंगप्राप्ती । पडले अनर्थी सज्ञान ॥७१॥ स्त्रीदर्शनें कामासक्त । देवेंद्र झाला भगांकित । चंद्र कळंकिया एथ । केला निश्चित गुरुपत्न्याक ॥७२॥ सौभरी तपस्वी तपयुक्त । तो मत्स्यमैथुनास्तव एथ । करुनि सांडिला कामासक्त । ऐसा संग अनर्थभूत स्त्रियांचा ॥७३॥ निजकन्येचिया संगतीं । ब्रह्मा भुलला कामासक्ती । मा इतरांची कोण गती । संग अनर्थी स्त्रियांचा ॥७४॥ कामिनीसंग अतिदारुण । शिवासी झालें लिंगपतन । प्रमदांसंगें सज्ञान । ठकले जाण महायोगी ॥७५॥ नारदें विनोददृष्टीं । कृष्णपत्नीज मागितल्यासाठीं । तो नारदी केला गंगातटीं । तेथ जन्मले पोटीं साठी पुत्र ॥७६॥ कौतुकें स्त्रियांप्रति जातां । सज्ञान पावे बाधकता । मा मजसारिख्या मूर्खाची कथा । कोण वार्ता ते ठायीं ॥७७॥ क्षणार्ध स्त्रियांची संगती । सज्ञान ठकले ऐशा रीतीं । जे स्त्रीसंगा विश्वासती । ते दुःखी होती मजऐसे ॥७८॥ यालागीं विश्वासतां स्त्रीसंगासी । इंद्रियषङ्‌वर्ग ठकी सर्वांसी । एथ आवरुनि इंद्रियांसी । सर्वथा स्त्रियांसी त्यागावें ॥७९॥ त्यागूनि स्त्रियांची संगती । उपरमूनि इंद्रियवृत्ती । राजा पावला परम शांती । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥२८०॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

श्रीभगवानुवाच - एवं प्रगायन्नृपदेवदेवः, स उर्वशीलोकमथो विहाय । आत्मानमात्मन्यवगम्य मां वै, उपारमज्ज्ञानविधूतमोहः ॥२५॥

जो उर्वशीस्वर्गभोग पावोनी । ज्यासी देव मानिती श्रेष्ठपणीं । जो सकाळराजचूडामणी । ज्यासी येती लोटांगणीं भूपाळ ॥८१॥ ऐसा पुरुखा चक्रवर्ती । लाहोनि उर्वशीभोगप्राप्ती । स्वर्गभोगीं पावला विरक्ती । सभाग्य नृपति तो एक ॥८२॥ अप्राप्तविषयें योगी । बहुत देखिले विरागी । परी प्राप्तस्वर्गांगनाभोगीं । धन्य विरागी पुरुखा ॥८३॥ पुरुख्याऐशी विरक्ती । नाहीं देखिली आणिकांप्रती । धन्य पुरुखा त्रिजगतीं । स्वमुखें श्रीपति वाखाणी ॥८४॥ तेणें अनुतापाच्या अनुवृत्तीं । निंदोनियां निजात्मस्थिती । क्षाळिली कामिनीकामासक्ती । धुतला निश्चितीं महामोहो ॥८५॥ अनुतापआगिठीं अभंग । वैराग्यपुट देऊनि चांग । विवेकें दमितां साङग । काममोहाचे डाग क्षाळिले तेणें ॥८६॥ जेवीं सोनें पुटीं पडे । तुक तुटे वानीं चढे । तेवीं निजात्मप्राप्तिनिवाडें । वृत्ति वाडेंकोडें क्षाळिली ॥८७॥ ऐशिये अतिशुद्ध निजवृत्तीं । विवेकवैराग्यसंपत्ती । पूर्ण अनुतापाचे स्थितीं । माझी कृपाप्राप्ती पावला ॥८८॥ माझिया कृपेवीण कांहीं । कदा अनुताप नुपजे देहीं । शुद्ध अनुताप ज्याच्या ठायीं । ते माझी कृपा पाहीं परिपूर्ण ॥८९॥ माझी कृपा झालिया जाण । जीव होय ब्रह्म पूर्ण । निःशेष गळे देहाभिमान । मीतूंपण भासेना ॥२९०॥ तेथ कार्य कर्म आणि कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता । दृश्य दर्शन द्रष्टृता । हे त्रिपुटी सर्वथा असेना ॥९१॥ त्रिगुणत्रिपुटीचें कारण। मूळभूत निजअज्ञान । तें सद्गुरुकृपेस्तव जाण । गेलें हरपोन मिथ्यात्वें ॥९२॥ जेवीं दोराचें सापपण । निर्धारितां हारपे पूर्ण । तेवीं गुणेंसीं अविद्या जाण । जाय हारपोन गुरुबोधें ॥९३॥ सद्गुरुबोधें पाहतां जाण । दिसेना द्वैताचें भान । तेथ उर्वशी भोगी कोण । राजा स्वानंदें पूर्ण निवाला ॥९४॥ राजा निवाला ब्रह्मरसीं । मग सांडूनियां उर्वशी । त्यजोनियां स्वर्गलोकासी । निजबोधेंसीं निघाला ॥९५॥ इतर ज्ञाते स्त्रिया त्यागिती । परी त्यागेना कामासक्ती । तैसी नव्हे रायाची स्थिती । परमार्थविरक्ती पावला ॥९६॥ जे परम विरक्तीचे पोटीं । कामिनी कामवार्ता नुठी । ब्रह्मानंदें कोंदली सृष्टी । स्वानंदपुष्टीं निवाला ॥९७॥ ऐसा सुखरुपें सहज । मी होऊनि पावला मज । जिणोनि कल्पना कामकाज । नाचत भोज स्वानंदें ॥९८॥ ऐसा निश्चयेंसीं निश्चित । माझें निजस्वरुप झाला प्राप्त । तेणें हा इतिहास एथ। निजसुखार्थ गायिला ॥९९॥ अनुताप आवडीं इतिहास । गातां प्रकटे पूर्ण परेश । तेथ सहजें अविद्येचा नाश । निजसुखें क्षितीश निवाला ॥३००॥ एवढी पावावया निजप्राप्ती । त्यागावी कामिनीकामासक्ती । मुख्यत्वें धरावी सत्संगती । हेंचि उद्धवाप्रती हरि बोले ॥१॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

ततो दुःसङगमुत्सृज्य, सत्सु सज्जेत बुद्धिमान् । सन्त एतस्य छिन्दन्ति, मनोव्यासङगमुक्तिभिः ॥२६॥

अवश्य त्यागावी दुःसंगता । तो दुःसंग कोण म्हणशी आतां । तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना ॥२॥ जो मानीना वेदशास्त्रार्था । जो अविश्वासी परमार्था । ज्यामाजीं अतिविकल्पता । तोही तत्त्वतां दुःसंग ॥३॥ जो बोल बोले अतिविरक्त । हृदयीं अधर्मकामरत । कामरोधें द्वेषा येत । तोही निश्चित दुःसंग ॥४॥ कां स्वधर्मकर्मविनीतता । बाह्य दावी सात्विकता । हृदयीं दोषदर्शी संतां । हे दुःसंगता अतिदुष्ट ॥५॥ जो मुखें न बोले आपण । परी देखे साधूंचे दोषगुण । तेंचि संवादिया दावी उपलक्षण । तो अतिकठिण दुःसंग ॥६॥ मुख्य आपली जे सकामता । तोचि दुःसंग सर्वथा । तो काम समूळ त्यागितां । दुःसंगता त्यागिली ॥७॥ कामकल्पनेचा जो मार । तोचि दुःसंग दुर्धर । ते कामकल्पना त्यागी जो नर । त्यासी संसार सुखरुप ॥८॥ कामकल्पना त्यागावया जाण । मुख्य सत्संगचि कारण । संतांचे वंदितां श्रीचरण । कल्पनाकाम जाण उपमर्दे ॥९॥ संग सर्वथा बाधक । म्हणशी त्यजावा निःशेख । तरी सत्संग न धरितां देख । केवीं साधक सुटतील ॥३१०॥ सत्संगेंवीण जें साधन । तेंचि साधकां दृढ बंधन । सत्संगेंवीण त्याग जाण । तेंचि संपूर्ण पाषांड ॥११॥ चित्तविषयांचा संबंध । गांठीं बैसल्या सुबद्ध । त्यांचा करावया छेद । विवेकें विशद निजसाधु ॥१२॥ संतांच्या सहज गोठी । त्याचि उपदेशांच्या कोटी । देहात्मता जीवगांठी । बोलासाठीं छेदिती ॥१३॥ भावें धरिल्या सत्संगती । साधकां भवापाशनिर्मुक्ती । यालागीं अवश्य बुद्धिमंतीं । करावी संगती संतांची ॥१४॥ त्या संतलक्षणांची स्थिती । अतिसाक्षेपें श्रीपती । आदरें सांगे उद्धवाप्रती । यथानिगुती निजबोधें ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

सन्तोऽनपेक्षा मच्चित्ताः, प्रशान्ताः समदर्शिनः । निर्ममा निरहङकारा, निर्द्वन्द्वा निष्परिग्रहाः ॥२७॥ साधूंचे अमित गुण । त्यांत मुख्यत्वें अष्टलक्षण । निवडूनि सांगे श्रीकृष्ण । ते कोण कोण अवधारीं ॥१६॥ प्राप्ताप्राप्त-लाभावस्था । बाधूं न शके साधूंच्या चित्ता । चित्त रातलें भगवंता । ’निरपेक्षता’ या नांव ॥१७॥ पैल विषयो मज व्हावा । ऐसा आठव नाठवे जीवा । हा साधूचा निरपेक्ष ठेवा । जाण उद्धवा गुण पहिला ॥१८॥ चित्तें चिंतावें चैतन्य । याचि नांवें ’मचित्त’ पण । याचि नांवें निरपेक्ष पूर्ण । इतर चिंतन भवबंधु ॥१९॥ निरपेक्ष व्हावया एथ । जागृति स्वप्नसुषुप्तीआंत । चिन्मात्रीं जडलें चित्त । या नांव ’मच्चित्त’ गुण दुजा ॥३२०॥ देह झालिया लक्ष्मीयुक्त । अथवा हो कां आपद्भूत । चित्त परमानंदीं निश्चित । या नांव ’मच्चित्त’ उद्धवा ॥२१॥ कामलोभादिदोषरहित । परमानंदीं जडलें चित्त । शांति सुखवासें वसे तेथ । यालागीं ’प्रशांत’ बोलिजे त्यासी ॥२२॥ जरी प्राणान्त केला अपकार । तरी न म्हणे हा ’दुष्ट’ नर । अपकार्याण करी अतिउपकार । प्रशांतिप्रकार या नांव ॥२३॥ जरी ठकूनि सर्वस्व नेलें । तरी क्षोभेना दोष बोले । तें जाण ब्रह्मार्पण झालें । येणें अंगा आलें प्रशांतत्व ॥२४॥ ब्रह्मभावेंचि ऐसा हा प्रशांत गुण । अंगीं बाणावया हेंचि कारण । जगीं देखे ’समदर्शन’ । ब्रह्मपरिपूर्ण समसाम्यें ॥२६॥ जग पाहतां दिसे विषम । परी विषमीं देखे सम ब्रह्म । तोचि ’समदर्शी’ परम। हा गुण निरुपम पैं चौथा ॥२७॥ हे समदृष्टी यावया हाता । भावें भजोनि भगवंता । निःशेष त्यजावी अहंममता । तेही कथा अवधारीं ॥२८॥ देहीं धरितां देहाभिमान । ते अहंता वाढवी ’मीपण’ । मीपणें ’ममता’ जाण । वाढे संपूर्ण देहसंबंधें ॥२९॥ जे वाढली अहंममता । ते वर्तवी महादुःखावर्ता । तेचि निवारावया निजव्यथा । सद्भावें गुरुनाथा शरण जावें ॥३३०॥ गुरुकृपा झालिया पूर्ण । माझ्या देहींचें जें मीपण । तें उकलोनि दावितां जाण । जग संपूर्ण मी एक ॥३१॥ जें जें सान थोर दिसे दृष्टीं । तें तें अवघें मीचि सृष्टीं । माझ्या मीपणाची निजपुष्टी । घोंटीत उठी त्रैलोक्य ॥३२॥ ऐसा मीपणें परिपूर्ण । तेथ ’मी’ म्हणावया म्हणतें कोण । निःशेष निमालें मीतूंपण । ’निरभिमान’ या नांव ॥३३॥ ऐसें माझें मीपण पाहतां । समूळ हारपली ममता । हें ’माझें’ म्हणावया पुरता । ठाव रिता नुरेचि ॥३४॥ माझ्या मीपणाबाहिरें । जैं ममतास्पद दुजें उरे । तैं तेथ पूर्ण ममता स्फुरे । ते म्यां चिन्मात्रें घोंटिली ॥३५॥ तेथ मीपणेंसीं मी माझें । नुरेचि तूंपणेंसीं तुझें । ऐसे परब्रह्माचेनि निजें । झाले सहजें ’निर्मम’ ॥३६॥ निर्मम निरभिमान । तें हें उद्धवा गा संपूर्ण । पांचवें सहावें लक्षण । संतांचें जाण निजगुह्य ॥३७॥ ऐसे निर्मम निरहंकार । जे होऊनि ठेले साचार । त्यांसी द्वंद्वदुःखडोंगर । अणुमात्र न बाधी ॥३८॥ देह अदृष्टाच्या वांटा । लागतां सुखदुःखांच्या झटा । तो ब्रह्मसुखाचे चोहटा । देहाचा द्रष्टा होऊनि वसे ॥३९॥ देहासी पदवी आली थोरी । तो श्लाघेना जीवाभीतरीं । देह घोळसितां नरकद्वारीं । तो अणुभरी कुंथेना ॥३४०॥ देह व्याघ्रमुखीं सांपडे । तेणें दुःखें तो न सांकडे । देह पालखीमाजीं चढे । तैं वाडेंकोडें श्लाघेना ॥४१॥ छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजीं चढे । तेणें पुरुषा सुखदुःख न जोडे । मुक्तासी तेणें पाडें देहभोग ॥४२॥ त्याचे दृष्टीखालीं एकाएक । दुःखपणा मुके दुःख । सुखपणा विसरे सुख । ’निर्द्वंद’ देख या हेतू ॥४३॥ जो निर्मम निरभिमान । त्यासी नाहीं भेदमान । अभेदीं मिथ्या द्वंद्वबंधन । हा सातवा गुण निर्द्वंद ॥४४॥ जो निर्द्वंद्व निरभिमान पहा हो । त्यासी समूळ मिथ्या निजदेहो । तेथ देहसंबंधे परिग्रहो । उरावया ठावो मग कैंचा ॥४५॥ स्वजनधनस्त्रीपुत्रांसी । नांदोनि तो नातळे त्यांसी । स्वप्नींची घरवात जागृता जैशी । तैसा साधूसी संसारु ॥४६॥ एवं परिग्रही असोन । साधु ’अपरिग्रही’ पूर्ण । हें आठवें मुख्य लक्षण । अतर्क्य जाण जगासी ॥४७॥ साधु परिग्रही दिसती । परी ते परिग्रही नसती । हेचि संतांची पावावया स्थिती । त्यांची निजभक्ती करावी ॥४८॥ हें साधूचें अष्टलक्षण । तें ब्रह्मींचें अष्टांग जाण । कीं अष्टमहासिद्धि निर्गुण । ते हे अष्टगुण साधूंचे ॥४९॥ चैतन्यसरोवरींचें कमळ । विकासलें अष्टदळ । तें हें संतलक्षण केवळ । स्वानंदशीळ साधूंचें ॥३५०॥ ऐसे हे अष्ट महागुण । सकळ भूषणां भूषण । ज्यांचे अंगीं बाणले पूर्ण । ते साधु सज्जन अतिशुद्ध ॥५१॥ इतर संगाचिये प्राप्ती । संग बाधक निश्चितीं । तैशी नव्हे सत्संगती । संगें छेदी आसक्ती देहसंगा ॥५२॥ तेथ उपदेश नलगे कांहीं । संगेंचि देही करी विदेही । तेचि साते श्लोकीं पाहीं । संतांची नवाई हरि सांगे ॥५३॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

तेषु नित्यं महाभाग, महाभागेषु मत्कथाः । संभवन्ति हिता नृणां, जुषतां प्रपुनन्त्यघम् ॥२८॥

इंद्रपदादि ब्रह्मसदन । ये प्राप्ती नांव ’भाग्य’ गहन । तेही सत्संगासमान । कोट्यंशें जाण तुकेना ॥५४॥ ऐशी जे कां सत्संगती । सभाग्य भाग्याचे पावती । भगवद्भावें साधु वर्तती । माझे कथाकीर्ति-अनुवादें ॥५५॥ जे कथा अवचटें कानीं । पडतां कलिमलाची धुणी । करुनि सांडीत तत्क्षणीं । जे गंगेहूनी पवित्र ॥५६॥ जेथ माझी निजकथा गाती । तीर्थें तेथें पवित्र होती । ऐशिया भगवत्कथाकीर्ती । साधु गर्जती सर्वदा ॥५७॥ स्वयें आपण भागीरथी । सर्वदा ऐसें जीवीं चिंती । कोणी साधु ये जैं मजप्रती । तैं माझीं पापें जाती निःशेष ॥५८॥ पार्वतीचा द्वेष मनीं । तें बद्धपाप मजलागुनी । तेंही झडे संतचरणीं । सकळ पापा धुणी सत्संगें ॥५९॥ कां ज्याचे मुखीं हरिनामकीर्ती । त्याचे पाय जैं मजमाजीं येती । तैं सकळ पापें माझीं जाती । ऐसें भागीरथी स्वयें बोले ॥३६०॥ ऐसी संतांची संगती । सदा वांछी भागीरथी । अवचटें गेलिया संतांप्रती । पापें पळतीं प्राण्यांचीं ॥६१॥ ते संतमुखींची माझी कथा । जैं अत्यादरें ऐके श्रोता । तैं त्याचें निजभाग्य तत्त्वतां । मजही सर्वथा न वर्णवे ॥६२॥ माझे कथेची अतिआवडी । नित्य नूतन नवी गोडी । सादरें ऐकतां पापकोडी । जाळोनि राखोडी उरवीना ॥६३॥ माझी कथा कां माझें नाम । सकळ पातकां करी भस्म । हेंचि चित्तशुद्धीचें वर्म । अतिसुगम उद्धवा ॥६४॥ नाना योग याग वेदाध्ययन । करितां पवित्र नव्हे मन । तें करितां हरिकथाश्रवण । होय अंतःकरण पुनीत ॥६५॥ अबद्ध पढतां वेद । दोष बाधिती सुबद्ध । नाम पढतां अबद्ध । श्रोते होती शुद्ध परमार्थतां ॥६६॥ नाना योग याग वेदाध्ययन । तेथ अधिकारी द्विज संपूर्ण । कथाश्रवणें चारी वर्ण । होती पावन उद्धवा ॥६७॥ ऐसा लाभ कथाश्रवणीं । तरी कां नाइकिजे सकळ जनीं । तें भाग्य भगवत्कृंपेवांचूनी । सर्वथा कोणी लाहेना ॥६८॥ भगवत्कृपा पावेल साङग । त्यांसी कथाकीर्तनीं अनुराग । तेचि निजभाग्यें महाभाग । स्वमुखें श्रीरंग बोलिला ॥६९॥ जगातें पवित्र करिती । माझी जाण नामकीर्ती । ऐसा कळवळोनि श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥३७०॥ ऐशी भगत्कृपेची प्राप्ती । केवीं आतुडे आपुले हातीं । तेचि अर्थीं श्रीपती । विशद श्लोकार्थी सांगत ॥७१॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

ता ये श्रृण्वन्ति गायन्ति, ह्यमुमोदन्ति चादृताः । मत्पराः श्रद्दधानाश्च, भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥२९॥

आपुलिया गृहकार्यार्था । विषयव्यापारीं जातां जातां । कानीं पडली हरिकथा । स्वभावतां प्रसंगें ॥७२॥ कृष्णकीर्तिकथनाक्षरें । रिघतांचि कर्णद्वारें । भीतरील पाप एकसरें । निघे बाहिरें गजबजोनि ॥७३॥ जेवीं पंचाननाची आरोळी । करी मदगजां रांगोळी । तेवीं हरिकथेच्या मेळीं । होय रंवदळी महापापा ॥७४॥ ऐसा निघाल्या पापाचा केरु । कथेसी उपजे अत्यादरु । कथावधानीं धरितां धीरु । हर्षें निर्भरु नर होय ॥७५॥ जंव जंव कथारहस्य जोडे । तंव तंव अनुमोदनीं प्रीति वाढे । वाढले प्रीतीचेनि पाडें । ते कथ कैवाडें स्वयें गाय ॥७६॥ फेडूनि लोकलाजेचें बिरडें । गातां हरिकीर्तिगुण पवाडे । न पाहे तो कर्माकडे । न सांकडें सुहृदासी ॥७७॥ निजभावें भगवत्कथा गातां । स्वयंभ उपजे सादरता । तेणें अत्यादरें हरिकथा । होय सांगता अतिश्रद्धा ॥७८॥ जंव जंव कथा सांगे निवाडें । तंव तंव श्रद्धा अधिक वाढे । प्रेमाचा पूर चढे । त्यामाजीं बुडे निजश्रद्धा ॥७९॥ कथाकीर्तन अनुकीर्ती । वाढत्या श्रद्धेचिये प्रीतीं । बाधूं न शके विषयासक्ती । तेणें मत्पर स्थिति साधकां ॥३८०॥ न करितां भगवद्भजन । वेदाध्ययन यज्ञ दान । येणेंचि आम्ही जाऊं तरोन । म्हणती ते जन महामूढ ॥८१॥ एथ मुख्यत्वें भगवद्भक्ती । हा विश्वास धरितां चित्तीं । भगवत्पर झालिया वृत्ती । सर्व भूतीं मद्भाव ॥८२॥ ऐसा भाव धरोनि हृदयीं । माझे भक्तीवेगळें कांहीं । सर्वथा स्वयें करणें नाहीं । ’मत्पर’ पाहीं या रीतीं ॥८३॥ ऐशिया मत्परा वृत्तीं । सावधान निजस्थिती । तेणें उपजे ’चौथी भक्ती’ । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥८४॥ तेथ न करितां आठवण । अखंड होय हरीचें स्मरण । क्रियामात्रें भगवद्भजन । सहजें जाण सर्वदा ॥८५॥ जें जें ’दृष्टीं’ देख आपण । थोर अथवा सूक्ष्म सान । तें तें होय हरीचें निजदर्शन । सहजें भजन अहेतुक ॥८६॥ जें जें ’वाचा’ वदे वचन । तें तें होय हरीचें स्तवन । स्तव्य स्तविता उणखून । हेही आठवण विसरोनी ॥८७॥ शब्दीं शब्दातें शब्दवितां । ते शब्दरुपें हरीची सत्ता । शब्द द्योती ज्या शब्दार्था । ते अर्थग्राहकता हरीची ॥८८॥ यापरी ’शब्दश्रवण’ । श्रवणीं श्रवण होतां जाण । तो शब्दार्थ संपूर्ण । होय ब्रह्मार्पण श्रवणेंसीं ॥८९॥ ’गंध’ घ्राणां होतां भेटी । भोक्तेपणें हरीचि उठी । तो घ्रेय घ्राता घ्राण त्रिपुटी । स्वयें घोंटी चिदत्वें॥३९०॥ ’रस’ रसना रसत्वबोध । तेथ निजभोक्ता गोविंद । तो भोग्य भोक्ता भोजनसंबंध । करी परमानंद निजबोधें ॥९१॥ ’शीत-उष्ण-मृदु-कठीण’ । निजांगीं लागतां जाण । तें अंगेंचि होय आपण । मृदु कठिण मिथ्यात्वें ॥९२॥ ’करां’ची जे कर्तव्यता । तीतें चालवी अकर्तता । यालागीं घेतां देतां । अकर्तात्मतां हरिभजन ॥९३॥ निश्चल निजरुपावरी । चपळ पाउलांच्या हारी । चालवी जैशा लहरी । सूर्यकरीं मृगजळाच्या ॥९४॥ जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । चिन्मात्रीं जडली वृत्ती । चित्त चित्तत्वाची विसरे स्फूर्ति । या नांव ’मद्भक्ति’ उद्धवा ॥९५॥ हे माझी आवडती भक्ती । इचें नांव म्हणिजेत ’चौथी’ । हें भाग्य आतुडे ज्याचे हातीं । तैं चारी मुक्ती निजदासी ॥९६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

भक्तिं लब्धवतः साधोः, किमन्यदवशिष्यते । मय्यनन्तगुणे ब्रह्मण्यानन्दानुभवात्मनि ॥३०॥

अत्यंत माझी पढियंती । ते हे जाण चौथी भक्ती । निजभाग्यें लाधल्या हातीं । चारी मुक्ती तृणप्राय ॥९७॥ निरपेक्ष जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्ती । त्यांतें भक्त न धरिती हातीं । एथवरी प्रीति मद्भजनीं ॥९८॥ माझिया निजभजनप्रीतीं । स्वप्नींही बद्धता नेणिजे भक्तीं । बद्धतेवीण मिथ्या मुक्ती । जाणोनि न घेती निजभक्त ॥९९॥ जेथ बद्धता समूळ कुडी । तेथ मुक्ति कायशी बापुडी । माझिया निजभजनआवडीं । स्वानंदकोडी मद्भक्तां ॥४००॥ निरपेक्ष निजप्रीतीं । भावें करितां अनन्य भक्ती । भक्तांसी स्वानंदाचि प्राप्ती । भजनस्थितीमाझारीं ॥१॥ जेवीं गर्भेंसीं वर्ते गुर्विणी । कां तरुणपणेंसीं तरुणी । तेवीं स्वानंदाच्या पूर्णपणीं । माझे निजभजनीं मद्भक्त ॥२॥ तेथ सगुण अथवा निर्गुण । उभयरुपें मीचि ब्रह्म पूर्ण । तेथ भावें करितां भजन । ब्रह्मसंपन्न मद्भक्त ॥३॥ भावें करितां माझी भक्ती । भाविकां कोण पां अप्राप्ती । विवेक वैरग्यज्ञान संपत्ती । पायां लागती मद्भक्तांच्या ॥४॥ माझे निजभजनें तुटे भेद । स्वयेंचि प्रकटे अभेदबोध । तेणें वोसंडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥५॥ माझे स्वरुपा नाहीं अंत । यालागीं नांवें मी ’अनंत’ । बाप भक्तभाव समर्थ। तिहीं मी अनंत आकळिलों ॥६॥ ऐसें ज्यांचें प्रेम गोड । त्यांचे सेवेचें मज कोड । त्यांचें सोशीं मी सांकड । निचाडा चाड मज त्यांची ॥७॥ देव सप्रेमें भुलला । म्हणे मी त्यांचाचि अंकिला । जीवेंभावें त्यांसी विकिला । मी त्यांचा जाहला तिहीं लोकीं ॥८॥ एथवरी भक्तां माजी प्राप्ती । अवचटें झाल्या सत्संगती । मा सद्भावें जे साधु सेविती । त्यांची निजगती मज न बोलवे ॥९॥ ऐसा संतमहिमा वानितां । धणी न पुरे श्रीकृष्णनाथा । तोचि संतमहिमा मागुता । होय वानिता चौं श्लोकीं ॥४१०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

यथोपश्रयमाणस्य, भगवन्तं विभावसुम् । शीतं भयं तमोऽप्येति, साधून् संसेवतस्तथा ॥३१॥

जेवीं वैश्वानर तेजोमूर्ती । त्याची सेवा जे करुं जाणती। त्यांचें शीततमभयनिवृत्ती । तो करी निश्चितीं उद्धवा ॥११॥ शीत निवारी संनिधी । तम निवारी तेजोवृद्धी । भय निवारी भगवद्बुद्धी । जेवीं त्रिशुद्धी विभावसु ॥१२॥ तैशीच जाण सत्संगती । संगें त्रिविध ताप निवारती । तेचि अर्थींची निजयुक्ती । ऐक उपपत्ती उद्धवा ॥१३॥ शीत म्हणिजे द्वंद्वबाधु । तो समूळ निवारिती साधु । तम म्हणिजे अज्ञानांधु । त्यासी करिती प्रबोधु निजज्ञानें ॥१४॥ भयांमाजीं श्रेष्ठ मरण । भय निवारी साधु विचक्षण । निवारिती जन्ममरण । कृपाळु पूर्ण दीनांचे ॥१५॥ अग्नीसमान म्हणों साधु । हाही बोल अतिअबुद्ध । अग्नीहूनि अधिक साधु । तोचि प्रबोधु हरि सांगे ॥१६॥ अग्नीपाशीं प्रबळ धूम । साधु निष्क्रोध निर्धूम । अग्नि पोळी अधमोत्तम । साधू सर्वसम सुखदाते ॥१७॥ साधूंची धन्य संगती । संगें जडजाडय तोडिती । कर्माचें कर्मत्व मोडिती । बुडत्या तारिती निजसंगें ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

निमज्ज्योन्मज्जतां घोरे, भवाब्धौ परमायनम् । सन्तो ब्रह्मविदः शान्ता, नौर्दृढेवाप्सु मज्जताम् ॥३२॥

प्रतिक्षणीं अधिक वृद्धी । अमर्याद वाढे भवाब्धी । तेथ उबकल्या चुबकल्या त्रिशुद्धी । अधर्मबुद्धि जनासी ॥१९॥ अधर्में निमज्जन नरकांत । स्वधर्में उन्मज्जन स्वर्गांत । ऐसे भोगिती आवर्त । स्वर्गनरकांत संसारी ॥४२०॥ यापरी संसारी जन । पावतां उन्मज्जन निमज्जन । त्यासी तरावया भवाब्धि जाण । साधु सज्जन दृढ नाव ॥२१॥ पडल्या जळार्णवा माझारीं । जेवीं अच्छिद्र नाव तारी । तेवीं बुडतां भवसागरीं । सुखरुप तारी सज्जननाव ॥२२॥ कामक्रोधरहित शांती । हेचि नावेची अच्छिद्र स्थिती । ब्रह्मज्ञानें सपुरती । सुखरुप निश्चितीं या हेतु ॥२३॥ कामक्रोधादि सावजांसी । बळें घ्यावया आंविसासी । कदा न येववे नावेपाशीं । संगें सकळांसी तारक ॥२४॥ नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पांतीं । बुडवूं नेणे धारावर्ती । तारक निश्चितीं निजसंगें ॥२५॥ परी ये नावेची नवल गती । वरी चढले ते बुडती । तळीं राहिए ते तरती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥ दीनांचा कळवळा पहा हो । हाचि मुख्यत्वें तरणोपावो । त्या कळवळ्याचा अभिप्रावो । स्वयें देवो सांगत ॥२७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

अन्नं हि प्राणिनां प्राण, आर्तानां शरणं त्वहम् । धर्मो वित्तं नृणां प्रेत्य, सन्तोऽर्वाग्बिभ्यतोऽरणम् ॥३३॥

जेवीं अन्नेवीण प्राण । सर्वथा न वांचती जाण । प्राण्यांचें प्राणपोषण । करावया सामर्थ्य पूर्ण अन्नीं नांदे ॥२८॥ जोडली धर्माची संपत्ती । ते इहलोकीं होय रक्षिती । तेचि धर्मधन देहांतीं । उत्तम गतिदायक ॥२९॥ संसारीं । पीडिले दारुण । त्रिविध तापें तापले पूर्ण । ऐशिया शरणागता शरण्य । मी नारायण रक्षिता ॥४३०॥ माझें करितां नामस्मरण । सहजें निवारे जन्ममरण । त्या मज रिघालिया शरण । बाधी दुःख कोण बापुडें ॥३१॥ दुःखभय न पावतां आधीं । जिंहीं साधु सेविले सद्बुद्धीं । त्यांसी भवभयाची आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी बाधीना ॥३२॥ प्राणियांसी होतां पतन । भाग्यें भेटल्या सज्जन । निवारुनि अधोगमन । जन्ममरण छेदिती ॥३३॥ संसार तरावया जाण । सत्संगतीचि प्रमाण । त्यांचे भावें धरितां चरण । दीनोद्धरण त्यांचेनी ॥३४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

सन्तो दिशन्ति चक्षूंषि, बहिरर्कः समुत्थितः । देवता बान्धवाः सन्तः, सन्त आत्माऽहमेव च ॥३४॥

जेवीं आंधारेंसीं सगळी राती । निजतेजें निरसी गभस्ती । तेवीं सत्संगसूर्यप्राप्तीं । अविद्येची निश्चितीं निरसी निशा ॥३५॥ बाह्य उगवल्या गभस्ती । चोरभयाची होय निवृत्ती । तेवीं जोडल्या सत्संगती । भवभय कल्पांतीं असेना ॥३६॥ बाह्य सूर्योदयकाळीं । पक्षी सांडिती आविसाळीं । सत्संगसूर्याचे मेळीं । देहाचीं आविसाळीं सांडिती जीव ॥३७॥ बाह्य सूर्याच्या किरणीं । हर्षें विकासे कमळिणी । सत्संगसूर्याचे मिळणीं । निर्विकल्प कमळणी विकासे ॥३८॥ सूर्य उगवलिया गगनीं । चक्रवाकें मिळती मिळणीं । तेवीं सत्संग पावोनि । जीव शिव दोनी एकवटती ॥३९॥ बाह्य सूर्याचे पहांटेसी । पांथिक चालती स्वग्रामासी । सत्संगसूर्याचे प्रकाशीं । मुमुक्षु निजधामासी पावती ॥४४०॥ बाह्य सुर्याचे उदयस्थितीं । कर्माची चाले कर्मगती । सत्संग सूर्याचे संगतीं । निष्कर्म प्रवृत्ति प्रवर्ते ॥४१॥ सूर्यबिंबाचे उदयसंधीं । अर्घ्यदान दीजे वेदविदीं । सत्संगसुर्याचे संबंधीं । दीजे देहबुद्धी तिलांजळी ॥४२॥ सूर्यउदयाचिया प्राप्ती । याज्ञिक होमातें हविती । तेवीं सत्संगसूर्यस्थिती । अहंता हविती ज्ञानाग्नीं ॥४३॥ सूर्य उगवूनि आकाशीं । जगाची जड निद्रा निरसी । संत उगवूनि चिदाकाशीं । जीव चित्प्रकाशीं प्रबोधी ॥४४॥ हो कां साधु सूर्यासमान । हें बोलणें निलाग हीन । सूर्यो पावे अस्तमान । साधु प्रकाशमान सर्वदा ॥४५॥ सूर्यासी आच्छादी आभाळ । साधु सदा निजनिर्मळ । सूर्यासी सदा भ्रमणकाळ । साधु अचंचळ भ्रमणरहित ॥४६॥ ग्रहणकाळाचा लवलाहो । पावतां सूर्यातें ग्रासी राहो । साधु ग्रहांचा पुसोनि ठावो । स्वानंदें पहा हो नांदती ॥४७॥ धुई दाटतां प्रबळ । तेणें आच्छादे रविमंडळ । तम धूम मोहपडळ । साधूंसी अळुमाळ बाधीना ॥४८॥ सूर्य निजकिरणें सर्वांतें तावी । साधु निजांगें जग निववी । सूर्य सर्वांतें क्षयो दावी । साधु अक्षयी करी निजबोधें ॥४९॥ सूर्यो साह्य झालिया दृष्टीं । दृश्याकारें उघडे सृष्टी । सत्संग साह्य झालिया दृष्टीं । चिन्मात्रें सृष्टी ठसावे ॥४५०॥ विवेकें विचारितां देख । सूर्याहूनि साधु अधिक । साधु धरातळीं ज्ञानार्क । भवाब्धितारक निजसंगियां ॥५१॥ पृथ्वीतळीं देवता साधु । साधु दीनांचे सखे बंधु । साधुरुपें मी परमानंदु । जाण प्रसिद्धु परमात्मा ॥५२॥ देवां दीजे बळिअवदान । तेव्हां देव होती प्रसन्न । कृपातारक निजसज्जन । दयाळु पूर्ण दीनांचे ॥५३॥ सुहृद सखे सगोत्र बंधु । द्रव्यलोभें भजनसंबंधु । निर्लोंभें कृपाळू साधु । सखे बंधु दीनांचे ॥५४॥ संत केवळ कृपेचे दीप । संत ते माझें निजस्वरुप । यालागीं सत्संगें फिटे पाप । होती निष्पाप साधक ॥५५॥ निष्पाप करुनि साधकांसी । ब्रह्मस्वरुपता देती त्यांसी । ऐसें कृपाळुत्व साधूंपाशीं । जाण निश्चयेंसीं उद्धवा ॥५६॥ मी निर्गुणत्वें ब्रह्म पूर्ण । साधु चालतें बोलतें ब्रह्म जाण । साधूंसी रिघालिया शरण । तैं जन्ममरण असेना ॥५७॥ साधूंसी सद्भावें शरण । रिघाल्या नुरे जन्ममरण । साधु शरनागतां शरण्य । सत्य जाण उद्धवा ॥५८॥ भावें धरिलिया सत्संगती । संसारिया होय निर्मुक्ती । हें प्रतिज्ञापूर्वक श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥५९॥ सद्भावेंसीं सत्संगती । धरितां घरा ये ब्रह्मस्थिती । हें निजवर्म उद्धवाप्रती । देवें अध्यायांतीं निरुपिलें ॥४६०॥ परम विरक्तीचें कारण । तें हें पुरुखाप्रकरण । उपसंहार श्रीकृष्ण । अध्यायांतीं जाण संपवी ॥६१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

वैतसेनस्ततोऽप्येवमुर्वश्या लोकनिस्पृहः । मुक्तसङगो महीमेतामात्मारामश्चचार ह ॥३५॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे ऐलगीतं नाम षड्‌विंशोऽध्यायः ॥२६॥

पूर्वीं सूर्यवंश प्रसिद्ध । तेथ सोमवंशाचा संबंध । ’वैतसेन’ श्लोकींचें पद । लावूनि गोविंद बोलिला ॥६२॥ उमावनीं अतिएकांत । तेथ उमा आणि उमाकांत । विगतवासेंसीं क्रीडत । स्वानंदयुक्त स्वलीला ॥६३॥ तेथ शिवाचे दर्शनासी । अवचटें आले सप्तऋषी । लज्जा उपजली पार्वतीसी । तिणें त्या वनासि शापिलें ॥६४॥ ’जो पुरुष या वनाआंत । येईल तो हो स्त्रीरुप एथ’ । ऐसा शाप क्रोधयुक्त । वदली निश्चित जगदंबा ॥६५॥ तेथ राजा ’सुद्युम्न’ सूर्यवंशी । नेणोनियां शाप प्रभावासी । पारधी आला त्या वनासी । सकळ सेनेसीं सन्नद्ध ॥६६॥ रिघतांचि त्या वनाआंत । पुरुषत्व पालटलें तेथ । बाप शापाचें सामर्थ्य । झाले समस्त स्त्रीरुप ॥६७॥ तेथ पुरुषत्वाची आठवण । निःशेष विसरलें मन । आपण पूर्वी होतों कोण । हेंही संपूर्ण विसरले ॥६८॥ अश्व झाले अश्विनी । हस्ती झाले हस्तिणी । पुरुष झाले कामिनी । तत्क्षणीं त्या वनांत ॥६९॥ तेथ पुरुषकामें कामासक्ती । अनुकूल पुरुषांप्रती । स्त्रिया गेलिया त्या समस्ती । अतिकामरतीं संभोगा ॥४७०॥ राजा सुद्युम्न झाला नारी । अतिसुकुमार सुंदरी । तो सोमपुत्र बुधातें वरी । अतिप्रीतीकरीं भाळोनि ॥७१॥ बुधें सुद्युम्न देखोनि नारी । तो भुलला स्त्रीकामेकरीं । एवं अतिप्रीतीं परस्परीं । येरयेरावरी भाळलीं ॥७२॥ बुध महाराज चूडामणी । तो सुद्युम्नातें स्त्रीत्वें पर्णी । केली पटाची निजराणी । बाप करणी कर्माची ॥७३॥ सुद्युम्न बुधवीर्येंकरीं । पुरुरवा जन्मे त्यांचे उदरीं । एवं सूर्यवंशामाझारीं । सोमवंश यापरी संचरला ॥७४॥ हे सोमवंशींची आद्यकथा । एथूनि सोमवंश वाढता । श्रीकृष्ण बोलिला ध्वनितार्था । तेचि म्यां कथा उपलविली ॥७५॥ सुद्युम्न झाला बुधाची नारी । मागें सूर्यवंशा माझारीं । नाहीं राज्यासी अधिकारी । संकट भारी वोढवलें ॥७६॥ ते सूर्यवंशींचा कुळगुरु । वसिष्ठ महायोगीश्वरु । तेणें करुनि अत्यादरु । गौरी-हरु प्रार्थिलीं ॥७७॥ प्रसन्न करुनि पार्वतीसी । मागे सुद्युम्नाच्या उच्छापासी । येरी सांगे महादेवासी । तुम्हीं वसिष्ठासीं बुझवावें ॥७८॥ जें भवानीचें शापवचन । कदा अन्यथा नव्हे जाण । धरावया वसिष्ठाचें मन । नवलविंदान शिवें केलें ॥७९॥ शुक्ल पक्षीं सुद्युम्नासी । पुरुषत्व प्राप्त होईल त्यासी । कृष्णपक्षीं बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं वर्तेल ॥४८०॥ पक्षें पुरुष पक्षें नारी । ऐशिया उच्छापाची परी । शिवें करुनि कृपेकरीं । केला अधिकारी निजराज्या ॥८१॥ पुरुषत्व पावल्या सुद्युम्नासी । तें पुरुषत्व नावडे त्यासी । स्त्रीसंभोगें बुधापाशीं । अतिप्रीतीसीं लोधला ॥८२॥ स्वर्ग अप्सरा आलिया पाशीं । त्याही नावडती सुद्युम्नासी । त्याहूनि प्रीति बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं अनिवार ॥८३॥ बुधासीही स्वर्गांगना । संभोगीं न येती मना । ऐसी अतिप्रीति सुद्युम्ना । स्त्रीभोगें जाणा विगुंतली ॥८४॥ पुरुषीं पुरुषत्वाची रती । भोगुं जाणें मी श्रीपती । इतर बापुडीं तीं किती । स्त्रीदेहासक्तीं भुललीं ॥८५॥ स्त्रीदेहीं जो आत्मा असे । तो भोगिजे म्यां हृषीकेशें । इतरांसी स्त्रीदेहींचें पिसें । विषयावेशें भुलोनी ॥८६॥ असो हें सांगावें किती । कामीं निष्कामतेची रती । ते मी जाणें रमापती । कां जाणती निजानुभवी ॥८७॥ पुरुत्वापरीस कामरती । स्त्रीदेहीं अतिआसक्ती । त्या स्त्रीकामाची निवृत्ती । जाण निश्चितीं सत्संगें ॥८८॥ वसिष्ठाचिये सत्संगतीं । झाली स्त्रीभावाचि निवृत्ती । सुद्युम्न पावला पुरुषत्वप्राप्ती । धन्य त्रिजगतीं सत्संग ॥८९॥ पुरुषत्व पावोनि सुद्युम्न । निजनगरा येतां जाण । स्त्रीभावें नष्टलें सैन्य । एकला आपण स्वयें आला ॥४९०॥ एवं निःशेष विगत सैन्य । यालागीं नांवें ’वीतसेन’। त्या वीतसेनाचा पुत्र जाण । ’वैतसेन’ पुरुरवा ॥९१॥ तेणें निजात्मता अतिविरक्ती । सांडूनि स्वर्गभोगसंपत्ती । त्यजूनि उर्वशीकामासक्ती । आत्मारामस्थिती पावला ॥९२॥ आत्माराम निजस्थिती । मिथ्या देहसंग सांगाती । निजात्मबोधें त्रिजगतीं । स्वानंदें नृपति विचरत ॥९३॥ जेथें जेथें पाउल उठी । तेथें तेथें होती सुखाच्या कोटी । स्वानंदें कोंदली सृष्टी । ब्रह्मदृष्टीं विचरतु ॥९४॥ ब्रह्मीं विचरतां ब्रह्मपणें । ब्रह्मरुप झालें जिणें । विसरला जिणेंमरणें । पूर्णीं पूर्णपणें परिपूर्ण ॥९५॥ हें उर्वशी-पुरुखोपाख्यान । जो स्वयें ऐके सावधान । तैं दोष जाती अगम्यागमन । विरक्ति संपूर्ण साधकां ॥९६॥ यापरी वैराग्ययुक्तीं । राजा पावला ब्रह्मप्राप्ती । वैराग्य उपजे सत्संगतीं । सत्संगें विरक्ती मद्भजनें ॥९७॥ ’सद्भावें करितां माझी भक्ती । साधकां उपजे विरक्ती’ । ऐसें बोलिला श्रीपती । तें उद्धवें चित्तीं दृढ धरिलें ॥९८॥ ते भजनक्रियेचा प्रश्न । पुढिले अध्यायीं जाण । उद्धव पुसेल आपण । जेणें श्रीकृष्ण संतोषे ॥९९॥ उद्धव पुसेल गोड गोठी । जेणें श्रीकृष्ण सुखावे पोटीं । तेणें स्वानंदें निजपुष्टी । भजनहातवटी सांगेल ॥५००॥ उपासनाकांडरहस्य पूर्ण । मुख्य क्रियायोगनिरुपण । समूळ आगमलक्षण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥१॥ ते कथेसी अवधान । श्रोतां द्यावें सावधान । एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन निजबोधें ॥५०२॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां ऐलगीतोपाख्यानं नाम षडविंशोऽध्यायः ॥२६॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥श्लो.३५॥ओ.५०२॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]