<poem> एकनाथी भागवत - आरंभ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो श्रीजनार्दना । भावार्थें नमितां चरणा । जनेंसहित मीपणा । नाहींच जाणा स्वयें केलें ॥१॥ लिंगदेहाचें मर्दन । तेंचि जनाचें अर्दन । यालागीं नामें जनार्दन । प्रगट जाण प्रसिद्धी ॥२॥ तुझी ऐशीच करणी । कर्म कर्ता नुरवूनि । सुखें नांदविसी जनीं । समाधानीं जनार्दना ॥३॥ सुखेंचि तुझें नाम घेतां । घातु करिसी जीविता । जीवु घेऊनि तत्वतां । होसी सर्वथा कृपाळू ॥४॥ तुझे नामाचें प्रबळ बळ । माथा नुधविती कळिकाळ । चारी मुक्ति केवळ । होती निश्चळ निजदासी ॥५॥ नामें एवढें ढसाळ देणें । त्या तुझें स्वरूप कवण जाणे । सांडूनि जाणणें नेणणें । निवांत राहाणें तत्वतां ॥६॥ तुझा स्तुतिवादु करणें । तंव परतलीं श्रुति पुराणें । तेथ माझें आरुष बोलणें । कोठें कोणें सारावें ॥७॥ तुझा स्तुतिवादु तें मौन । तुझा कळवळा तें कीर्तन । कांहीं न करणें तें अनुसंधान । साचार जाण श्रीकृष्णा ॥८॥ ऐशियाही तुझे ठायीं । अचाट हांव उठिली पाहीं । तेचि अर्थीं चित्त देई । कृपानिर्वाही गुरुराया ॥९॥ खद्योत प्रकाशूं पाहे चांदा । मशक गरुडासी घे खांदां । तैसा मी एकादशस्कंधा । मूर्ख नुसधा टीकार्थी ॥१०॥ येचि विषयीं गुरुनाथा । कृपा करावी सर्वथा । ग्रंथरचना ग्रंथार्था । सार्थकता करावी ॥११॥ ऐशी विनवणी ऐकतां । कृपापद्मकरु ठेविला माथां । तंव उद्योत्कार जाहला ग्रंथा । यथार्थता निजदीपें ॥१२॥ नवल कृपेची करणी । अर्थचिंतामणीची खाणी । उघडली तत्क्षणीं । पदार्थश्रेणी कविमुद्रा ॥१३॥ लेतां सिद्ध अलंकारा । कवण सांकडें लेणारा । ताल राखतां खांबसूत्रा । लेपाच्या करा प्रयास काय ॥१४॥ बापाचीं पक्वान्नें घेउनी । बाळ घाली बापाचे वदनीं । तेणें साचचि तो संतोषोनी । होय मनीं सुखाचा ॥१५॥ तैशीच हेही कथा । तूंचि ग्रंथु तूंचि कविता । तेथें कोणीं घ्यावी अहंता । 'मी कर्ता' म्हणौनी ॥१६॥ गुरूनें सांडविली 'अहंता' । शेखीं राहों नेदीच 'सोहंता' । तेथ मी एकु कवि-कर्ता । हेंही सर्वथा न सरे पैं ॥१७॥ सूचितां अहंकाराचा झाडा । सूचनाचि होय त्याचा जोडा । जो आपणियातें म्हणवी वेडा । तोचि गाढा अतिचतुर ॥१८॥ तैशीच हेही होईल वार्ता । यालागीं श्रीगुरुनाथा । चरणीं ठेविला माथा । कर्ता करविता तूंचि तूं ॥१९॥ मागील ग्रंथसंगती । पंचमाध्यायाचे अंतीं । नारद वसुदेवाप्रती । बोलिला उपपत्ति ते ऐशी ॥२०॥ हा परमात्मा श्रीहरी । लीलाविग्रहें देहधारी । अवतरला तुमचे घरीं । भाग्यें करी नटनाट्य ॥२१॥ हा ईशाचाही निजईशु । वैकुंठींचा निजवासु । परमात्मा परेशु । जगदीशु श्रीकृष्णु ॥२२॥ तेंचि नारदवचनप्रमाण । प्रार्थावया श्रीकृष्ण । मिळवोनियां देवगण । द्वारकेसी जाण स्वयें आले ॥२३॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीशुक उवाच । अथ ब्रह्मात्मजैः देवैः प्रजेशैरावृतोऽभ्यगात् । भवश्च भूतभव्येशो ययौ भूतगणैर्वृतः ॥१॥

शुक म्हणे परीक्षिती । पहावया श्रीकृष्णमूर्ती । सुरवर द्वारकेसी येती । विचित्र स्तुति तिंहीं केली ॥२४॥ श्रीकृष्णमूर्तीचें कवतिक । पहावया देव सकळिक । चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातले ॥२५॥ करावयास प्रजाउत्पत्ती । पूर्वीं नेमिला प्रजापती । तोही आला द्वारकेप्रती । कृष्णमूर्ती पहावया ॥२६॥ सनकादिक आत्माराम । अवाप्तसकळकाम । तेही होऊनि आले सकाम । मेघश्याम पहावया ॥२७॥ भूतनायक रुद्रगण । आले अकराही जण । पहावया श्रीकृष्ण । भूतगणसमवेत ॥२८॥ पहावया श्रीकृष्णरावो । घेऊनि गणांचा समुदावो । द्वारके आला महादेवो । भूतभविष्यांचा पहा हो त्रिकाळज्ञाता ॥२९॥ श्रीकृष्णदर्शनाची उत्कंठा । थोर लागली नीलकंठा । धांवतां मोकळ्या सुटल्या जटा । कृष्णवरिष्ठा पहावया ॥३०॥


एकनाथी भागवत - श्लोक २ व ३ रा

इन्द्रो मरुद्‌भिर्भगवानादित्या वसवोऽश्विनौ । ऋभवोऽङ्गिरसो रुद्रा विश्वे, साध्याश्च देवताः ॥२॥

गन्धर्वाप्सरसो नागाः, सिद्धचारणगुह्यकाः । ऋषयः पितरश्चैव, सविद्याधरकिन्नराः ॥३॥ द्वारकामुपसञ्जग्मुः सर्वे कृष्णदिदृक्षवः । एकुणपन्नास मरुग्दण । तेणेंसीं इंद्र आला आपण । पहावया श्रीकृष्ण । स्वयें जाण सादर ॥३१॥ सांडोनियां रविमंडळ । बारा आदित्यांचा मेळा । पहावया कृष्णसोहळा । तृषित डोळां होऊनि आले ॥३२॥ सूर्य अधिष्ठिला डोळां । देखे पदार्थां सकळां । कृष्ण न देखतां आंधळा । सूर्यो पावला अंधत्व ॥३३॥ पाहतां श्रीकृष्णाचें मुखकमळ । फिटलें सूर्याचें पटळ । मग देखणा झाला केवळ । सर्वांगें सकळ स्वयें रवि ॥३४॥ तिन्ही अग्नी तेजाळे । परी ते धूमें झांकोळले । कृष्ण देखतांच उजळले । निर्धूम जाहले निजतेजें ॥३५॥ आठां वसूंचा मेळा । पाहों आला कृष्णलीला । म्हणे मदनाचा पुतळा । तंव तो खेळे लीला कृष्णांकीं ॥३६॥ अश्विनीकुमार धन्वंतरी । तेही भवरोगें पीडिले भारी । कृष्णदर्शनामृतकरीं । निरुज क्षणावरी ते जाहले ॥३७॥ ऋषभदेव अंगिरस । रुद्र मीनले असमसाहस । विश्वे-साध्यदेव बहुवस । देवीं आकाश दाटलें ॥३८॥ आमुची गायनकळा मोठी । होतें गंधर्वांच्या पोटीं । ते कृष्णवेणुगीतासाठीं । जाहली शेवटीं न सरती ॥३९॥ यालागीं दर्शनाची आस । क्षणक्षणां पाहती वास । त्यांसी गायनकळा सावकाश । दिधली सुरस कृपामात्रें ॥४०॥ अप्सरा म्हणती आम्ही नाचणी । तंव काळियाच्या फणारंगणीं । एकेचि तालें लाजवूनी । तत्क्षणीं सांडिल्या ॥४१॥ त्या दीनवदना कामिनी । आल्या दर्शनालागोनी । नाचों शिकविल्या नाचणी । रासरंगणीं भृकुटिमात्रें ॥४२॥ पहावया श्रीरंग । आले पाताळींचे पन्नग । सिद्ध चारण अनेग । विद्याधर साङ्ग समुदायें ॥४३॥ कश्यपादि ऋषीश्वर । अर्यमादि पितर । गुह्यक आणि किन्नर । आले अपार स्वगणेंसीं ॥४४॥ एवं विमानांचिया पंक्तीं । दाटलिया द्वारकेप्रती । पहावया कृष्णमूर्ती । आले सुरपती स्वानंदें ॥४५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

वपुषा येन भगवान्नारलोकमनोरमः । यशो वितेने लोकेषु सर्वलोकमलापहम् ॥४॥

जेणें शरीरें श्रीहरी । नाना चरित्रांतें करी । यश विस्तारिलें संसारीं । दुराचारी तरावया ॥४६॥ ऐकतां श्रीकृष्णकीर्ती । चतुर्विध प्रायश्चितांची गती । खुंटली जी निश्चितीं । श्रवणार्थीं सादर जाहलिया ॥४७॥ भावें घेतलिया श्रीकृष्णनाम । सकळ पातकां करी भस्म । देवीं देखिला पुरुषोत्तम । विश्रामधाम जगाचें ॥४८॥ ठाणठकारें अतिउत्तम । सुरनरांमाजी मनोरम । डोळ्यां जाहला विश्राम । मेघश्याम देखोनी ॥४९॥ मुकुटकुंडलें मेखला । कांसे कसिला सोनसळा । कंठीं रुळे वनमाळा । घनसांवळा शोभतु ॥५०॥ लावण्यगुणनिधान । अवतारमाळे मुख्य रत्नन । देवीं देखिला श्रीकृष्ण । निवासस्थान द्वारका ॥५१॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

तस्यां विभ्राजमानायां समृद्धायां महर्द्धिभिः । व्यचक्षतावितृप्ताक्षाः कृष्णमद्भुातदर्शनम् ॥५॥

कृष्णें अधिष्ठिली पुरी । कनककळसांचिया हारी । रत्नें जडिलीं नाना कुसरीं । तेज अंबरीं न समाये ॥५२॥ जे द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं । कल्पद्रुमांचिया हारी । खेळणीं द्वारीं चिंतामणींचीं ॥५३॥ द्वारकाजननिवासियांसी । घरीं नवरत्नां चिया राशी । ऋद्धिसिद्धि करूनि दासी । हृषीकेशी नांदतु ॥५४॥ कृष्णरूपाचिया लालसे । डोळ्यां तेणें लाविलें पिसें । आवडी जाहले मोरपिसें । अतिडोळसें हरि‍अंगीं ॥५५॥ कैसी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनीं निघती जिभा । रसाळपणें तो वालभा । उपनिषद्‌गाभा साकारला ॥५६॥ कृष्ण पहावया आवडी । होताहे देवांसी वरपडी । डोळ्यां थोर लागली गोडी । अर्ध घडी न विसंबती ॥५७॥ कृष्णरूपाचें कवतुक । पाहतां नयनां लागली भूक । अंतरीं निबिड दाटलें सुख । तरी अधिकाधिक भुकेले ॥५८॥ अवलोकितां श्रीकृष्णासी । दृष्टीसी दाटणी होतसे कैशी । मुंडपघसणी न्याहारासी । हृषीकेशी पहावया ॥५९॥ मागें पुढें श्रीकृष्णासी । देखणेनि वेढिलें चौंपाशीं । भाग्य उपजलें डोळ्यांसी । पूर्णपुरुषासी देखती ॥६०॥ श्रीकृष्ण घनमेघ सांवळा । निजात्मभावें पाहतां डोळां । सहजें श्यामता आली बुबुळा । कृष्णकळा ठसावली ॥६१॥ जो न कळेचि वेदविवंचना । योगियांच्या न ये ध्याना । त्या प्रत्यक्ष देखोनि कृष्णा । भाग्यगणना अपूर्व ॥६२॥ ऐसा देखोनियां श्रीहरी । देव सुमनांच्या शतधारीं । बहु वरुषले पै अंबरीं । राहोनि वरी विमानीं ॥६३॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

स्वर्गोद्यानोपगैर्माल्यैश्छादयन्तो युदूत्तमम् । गीर्भिश्चित्रपदार्थाभिस्तुष्टुवुर्जगदीश्वरम् ॥६॥

मांदार पारिजात संतान । कल्पद्रुम हरिचंदन । ऐशिया वृक्षांचीं सुमनें जाण । कृष्णावरी संपूर्ण वरुषले ॥६४॥ श्रीकृष्णासी चहूंकडां । दिव्य सुमनांचा जाहला सडा । समस्त देवीं सन्मुख पुढां । केला पैं गाढा जयजयकारु ॥६५॥ सार्थ पदबंधरचना । नाना गद्यपद्यविवंचना । स्तवूं आदरिलें यदुनंदना । अमरसेना मिळोनी ॥६६॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

श्रीदेवा ऊचुः । नताः स्म ते नाथ पदारविन्दं बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभिः । यच्चिन्त्यतेऽन्तहृदि भावयुक्तैर्मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात् ॥७॥

विवेकयुक्त प्राणधारणा । मनसा वाचा कर्मणा । नमस्कारु तुझिया चरणां । सच्चिद्धना श्रीकृष्णा ॥६७॥ इंद्रियउ परमालागीं जाणा । सांडूनि विषयवासना । दश इंद्रियीं लागलों चरणां । नमन श्रीकृष्णा निजभावें ॥६८॥ विषयीं होऊनियां उदास । सांडोनि संसाराची आस । चरण चिंतिती तापस । कर्मपाश छेदावया ॥६९॥ ऐसे मुक्तीचिया वासना । मुमुक्षु चिंतिती चरणां । त्यांसी अर्धक्षण न येसी ध्याना । दृढ भावना करितांही ॥७०॥ ते प्रत्यक्ष तुझे चरण । आम्हांसी झालें जी दरुषण । देव आपुल्या भाग्या आपण । अतिस्तवन करिताति ॥७१॥ देखूनि सगुण स्वरूपासी । एवढी श्लाघ्यता कां म्हणसी । जें आलें आकारासी । तें निश्चियेंसी मायिक ॥७२॥ जैसे तुम्ही शरीरधारी । तैसाच मीही एकु शरीरी । त्या माझेनि दर्शनेंकरीं । तुम्ही कैशापरी तराल ॥७३॥ ऐसें न म्हणावें जी अनंता । तूं मायेचा नियंता । हेंही कळलें असे तत्वतां । समूळ कथा परियेसीं ॥७४॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

त्वं मायया त्रिगुणयाऽऽत्मनि दुर्विभाव्यं । व्यक्तं सृजस्यवसि लुम्पसि तद्गु-णस्थः । नैतैर्भवानजित कर्मभिरज्यते वै । यत्स्वे सुखेऽव्यवहितेऽभिरतोऽनवद्यः ॥८॥

झोंप लागल्या झोंप न दिसे पाहीं । जागें जाहल्या दिसतचि नाहीं । तैसी माया अतर्क्य देहीं । न पडे ठायीं सुरनरां ॥७५॥ मूळींच तुझी अतर्क्य माया । तिसी गुणक्षोभु जाहला साह्या । ते ब्रह्मादिकां न येचि आया । देवराया श्रीकृष्णा ॥७६॥ तूं धरोनि दैवीमायेसी । ब्रह्मादिकांतें सृजिसी । प्रतिपाळोनि संहारिसी । तूं त्या कर्मासी अलिप्त ॥७७॥ स्वप्नीं स्वयें सृष्टि सृजिली । प्रतिपाळूनि संहारिली । ते क्रिया कर्त्यासी नाहीं लागली । तेवीं सृष्टि केली त्वां अलिप्तत्वें ॥७८॥ मृगजळाची भरणी । सूर्य करी निजकिरणीं । शोषूनि ने अस्तमानीं । अलिप्तपणीं तैसा तूं ॥७९॥ समूळ धर्माची वाढी मोडे । अधर्माची शीग चढे । तैं तुज अवतार धरणें घडे । आमुचें सांकडें फेडावया ॥८०॥ करोनि अधर्माचा घातु । धर्म वाढविशी यथस्थितु । देवांसी निजपदीं स्थापितु । कर्मातीतु तूं श्रीकृष्णु ॥८१॥ तुज अखंडदंडायमान । आत्मसुखाचें अनुसंधान । तें आम्हांसी नाहीं अर्ध क्षण । दीनवदन यालागीं ॥८२॥ ज्यासी आत्मसुख निरंतर । तो देहधारी परी अवतार । त्याचे चरण पवित्रकर । गंगासागर आदि तीर्थांसी ॥८३॥ तो जरी वर्ते गुणांआंतु । तरी तो जाणावा गुणातीतु । त्याचा चरणरेणु करी घातु । त्रैलोक्यांतु महापापां ॥८४॥ ऐशी तुझ्या दासांची कथा । त्या तुझे चरण वंदूं माथा । असो चरणांची हे कथा । कीर्ति ऐकतां निजलाभु ॥८५॥ चरण देखती ते भाग्याचे । त्यांचें महिमान न वर्णवे वाचे । पवित्रपण तुझिये कीर्तीचें । परिस साचें स्वामिया ॥८६॥ अग्निशिखा समसमानीं । इंधन घलितां वाढे अग्नी । आशा वाढे देहाभिमानीं । श्रवणकीर्तनीं ते त्यागवी ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

शुद्धिर्नृणां न तु तथेड्य दुराशयानां । विद्याश्रुताध्ययनदानतपःक्रियाभिः । सत्त्वात्मनामृषभ ते यशसि प्रवृद्ध । सच्छ्रद्धया श्रवणसम्भृतया यथा स्यात् ॥९॥

कृष्णस्तवनें स्तविता तरे । श्रवणद्वारें ऐकता उद्धरे । यालागीं स्तव्य तूंचि निर्धारे । स्तवनद्वारें तारकु ॥८८॥ एवं तुझे कीर्तीचें श्रवण । तेंचि परम शुद्धीसी कारण । यावेगळें जें साधन । तें केवळ जाण प्रयास ॥८९॥ ऐकें गा सुरवरिष्ठा । तुझिया श्रवणाची उत्कंठा । अंतरीं पापाचा मळकटा । धुवोनि चोखटा करी वृत्ती ॥९०॥ तुझ्या श्रवणीं होऊनि उदास । तपें तपतां तापस । नाना साधनीं कर्कश । जाहल्या निरस मती त्यांच्या ॥९१॥ 'मंत्रविद्याग्रहण' । विकळ उच्चारितां वर्ण । शुद्धी नव्हे परी दारुण । पातक पूर्ण अंगीं वाजे ॥९२॥ करितां 'शास्त्रश्रवण' । चौगुणां गर्व चढे पूर्ण । तो ज्ञातेपणाचा अभिमान । न निघे जाण चतुर्मुखा ॥९३॥ करितां 'वेदाध्ययन' । विस्वर गेलिया उच्चारण । शुद्धी नव्हेचि परी मरण । अवश्य जाण वृत्रासुराऐसें ॥९४॥ 'दान' देतां नृग बहुवस । कृपीं जाला कृकलास । प्राप्ती दूरी परी नाश । असमसाहस रोकडा ॥९५॥ 'तप' करितां ऋष्यशृंगारासी । तो वश जाहला वेश्यांसी । श्रद्धा श्रवणाचिया ऐशी । शुद्धी आणिकांसी पैं नाहीं ॥९६॥ 'कर्म' करावें यथानिगुती । तंव त्या कर्माची गहन गती । प्राचीनबर्ह्याची कर्मस्थिती । नारदोक्तीं सांडविली ॥९७॥ कर्मीं आचमन करावें । तेथ माषामात्र जळ घ्यावें । न्यूनाधिकत्वासवें । दोष पावे सुरापानसम ॥९८॥ एवं दुष्टहृद्यव ज्यासी । तपादिक साधनें त्यासी । शुद्धि नव्हे हृषीकेशी । श्रवणें कीर्तीसी नायकतां ॥९९॥ श्रवणें परीक्षिती तरला । श्रवणें क्रौंच उद्धरिला । मकरोदरीं श्रवण पावला । सिद्ध जाहला मत्स्येंद्र ॥१००॥ तुझें श्रवण दोपरी । एक तें चित्तशुद्धी करी । दुसरें जीवब्रह्मऐ क्य करी । दोंहीपरी उद्धारु ॥१॥ प्रत्यक्ष पाहतां वाराणसी । श्रवणीं तारक ब्रह्म उपदेशी । मुक्तिक्षेत्र जाहली काशी । श्रवणें जीवासी उद्धारु ॥२॥ तूं अवाप्तसकळकाम । निष्कामाचें निजधाम । ऐशिया तुज करणें कर्म । भक्तभ्रम छेदावया ॥३॥ नाना चरित्रांची करणी । करिता झालासी चक्रपाणी । मोक्षमार्गाची निजश्रेणी । दिधली रचूनि जनासी ॥४॥ चित्तशुद्धीसी कारण । प्रेमयुक्त कीर्तिश्रवण । येथ सच्छ्रद्धाचि प्रमाण । अकारण साधनें ॥५॥ अपेक्षा जें जें साधन साधिलें । तें तें अपेक्षेनेंचि फोल केलें । निरपेक्षाचें हृदय भलें । वेगीं गेलें परमार्थीं ॥६॥ हृदयाचे सखोल आळा । स्वधर्मबीजें अंकुरला । श्रद्धेचा वेल उगवला । कोंभ निघाला तरितरितु ॥७॥ सच्छ्रवणप्रबळजळें । रुतलीं वैराग्यदृढमूळें । वेगीं गेलीं निजबळें । श्रद्धामेळें चिदाकाशीं ॥८॥ ते चिदाकाशींचा चंद्रमा । स्वप्रकाश तूं पुरुषोत्तमा । साधक शिणती मेघश्यामा । तुझी प्रतिमा पहावया ॥९॥ त्यां तुझे श्रीचरण । प्रत्यक्ष जाहलें दर्शन । घालोनियां लोटांगण । चरणस्तवन करिताती ॥११०॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

स्यान्नस्तवाङ्‌घ्रिरशुभाशयधूमकेतुः । क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदोह्यमानः । यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्भिःभ । व्यूहेऽर्चितः सवनशः स्वरतिक्रमाय ॥१०॥

आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतु । तुझाचि जी विख्यातु । त्रैलोक्यांतु श्रीकृष्णा ॥११॥ पापइंिधनाचा मेळु । तेथ तुझा चरण वडवानळु । लागतां तो अतितेजाळु । तिळेंतिळु जाळितु ॥१२॥ ऐसा पापियांतें कांपविता । प्रेमळांतें अभयदाता । तुझा चरण जी अनंता । हृदयीं सर्वथा वाहताति ॥१३॥ तेंचि हृदय जी कैसें । वोळलें भक्तिप्रेमरसें । तेथ तुझे चरण सावकाशें । अतिउल्हासें वाहताति ॥१४॥ करितां चरणाचें ध्यान । जे विसरले भूकतहान । त्यांसी द्यावया अभयदान । चरणध्वजु जाण पैं तुझा ॥१५॥ तोचि चरण सात्वतीं । पावावया समविभूती । पूजिला जी श्रीपती । चतुर्मूती व्यूहरूपें ॥१६॥ 'वासुदेव' 'संकर्षण' । 'अनिरुद्ध' आणि 'प्रद्युम्न' । हाचि चतुर्व्यूह जाण । पूजास्थान भक्तांचें ॥१७॥ भिन्न भिन्न चारी व्यक्ती । चहूं रूपीं एक मूर्ती । ऐसें जाणोनि पूजिजे भक्तीं । 'व्यूहस्थिति' त्या नांव ॥१८॥ 'सात्वत' म्हणिपती ते भक्त । भगवत्पदऐथश्वर्यातें वांछित । चतुर्व्यूहरूपें पूजित । ऐश्वर्यीं चित्त ठेवूनी ॥१९॥ जन्ममरणप्रवाहस्थिती । नासावया एक भक्तीं । पूजा कीजे चतुर्मुर्ती । आत्मवंती सज्ञानीं ॥१२०॥ त्रिषवण* त्रिकाळ । पूजा करितां अविकळ । [*तीन सवने] भजोनि जिंतिला कळिकाळ । जन्ममूळ छेदावया ॥२१॥ आणिकही भक्तजन । तुझें करिताति भजन । यज्ञद्वारा होमहवन । विधि विधान वेदोक्त ॥२२॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

यश्चिन्त्यते प्रयतपाणिभिरध्वराग्नौ । त्रय्या निरुक्तविधिनेश हविर्गृहीत्वा । अध्यात्मयोग उत योगिभिरात्ममायां । जिज्ञासुभिः परमभागवतैः परीष्टः ॥११॥

दीक्षाग्रहणीं अतिसादर । यज्ञद्वारा भजनतत्पर । क्रियेपासोनि नेमिले कर । हस्तव्यापार न करिती ॥२३॥ तेथ वेदत्रयीची विधानकळा । बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा । आंत यज्ञपुरुष आव्हानिला । चैतन्यतेजाळा सर्वात्मा ॥२४॥ तेथ ओंकार वषट्कार । लक्षणोक्त मंत्रउळच्चार । द्रव्यें अर्पिती अपार । अतिपवित्र अवदानीं ॥२५॥ आणिक एक योगयुक्त । योगधारणा तूतें भजत । प्राणापानांची समता देत । आसनस्थ होऊनियां ॥२६॥ वज्रासनीं दृढ बंध । भेदोनि षट्चक्रांचे भेद । कुंडलिनीचा स्कंध । अतिसुबद्ध थापटिला ॥२७॥ ते खवळली महाशक्ती । वेगें चालिली ऊर्ध्वगती । पवन प्राशूनि ग्रासिती । योगस्थिती गगनातें ॥२८॥ शोषूनि सहस्त्रदळाचे पाट । आटपीठ आणि गोल्हाट । क्रमोनियां श्रीहाट । आली अतिउद्भट ब्रह्मस्थाना ॥२९॥ तेथ परमानंदाचा भोग । शिवशक्तींचा संयोग । यापरी अभ्यासोनि योग । हा भजनमार्ग योग्यांचा ॥१३०॥ तुझी जाणावया माया । एक भजों लागले तुझिया पाया । सर्वथा अतर्क्य तुझी माया । देवराया श्रीकृष्णा ॥३१॥ माया न लक्षेचि लक्षितां । तोचि मायामोह जाहला चित्ता । मग ते सिद्धीलागीं तत्वतां । चरण भगवंता पूजिती ॥३२॥ आणिकही एक पक्ष । तुज भजावया मुमुक्ष । जाले गा अतिदक्ष । अध्यात्मपक्षनिजयोगें ॥३३॥ आत्ममायेचा नाशु । करावया जिज्ञासु । निजात्मबोधें सावकाशु । अतिउल्हासु पूजेचा ॥३४॥ विवेकाचिया भावना । नित्यानित्याची विवंचना । करूनि आणितां अनुसंधाना । सर्वत्र जाणा तूंचि तूं ॥३५॥ जें अनित्यपणें वाळिलें । मायिकत्वें मिथ्या जाहलें । मग चिन्मात्रैक उरलें । निर्वाळिलें निजरूप ॥३६॥ एवं पाहतां चहूंकडे । तुझेंचि स्वरूप जिकडे तिकडे । मग पूजिती वाडेंकोडें । निजसुरवाडें सर्वत्र ॥३७॥ जें जें देखती जे जे ठायीं । तें तें तुजवांचूनि आन नाहीं । ऐसा सर्वत्र चरण पाहीं । ठायींचा ठायीं पूजिला ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

पर्युंष्टया तव विभो वनमालयेयं । संस्पार्धिनी भगवती प्रतिपत्नीवच्छ्रीः । यः सुप्रणीतममुयाहणमाददन्नो । भूयात्सदाङ्‌घ्रिरशुभाशयधूमकेतुः ॥१२॥

ऐसे सर्वत्र तूतें पूजिती । भक्त पढियंते होती । त्यांची पूजा तेही अतिप्रीतीं । स्वयें श्रीपती मानिसी ॥३९॥ रानींची रानवट वनमाळा । भक्तीं आणूनि घातली गळां । रमा सांडोनि उताविळा । स्वयें भाळला माळेसी ॥१४०॥ भक्तीं अर्पिली आवडीं । म्हणौनि तियेची अधिक गोडी । शिळी जाहली तरी न काढी । अर्धघडी गळांची ॥४१॥ भक्तीं भावार्थें अर्पिली । देवें सर्वांगीं धरिली । यालागीं सुकों विसरली । टवटवीत सर्वदा ॥४२॥ तिचा आस्वादितां गंधु । भावें भुलला मुकुंदु । श्रियेसी उपजला क्रोधु । सवतीसंबंधु मांडिला ॥४३॥ मज न येतां आधीं । भक्तीं अर्पिली नेणों कधीं । मी तरुण सांडोनि त्रिशुद्धी । ते वृद्ध खांदीं वाहातसे ॥४४॥ देव नेणे भोगाची खूण । ती वृद्ध मी तरुण । परी तिशींच भुलला निर्गुण । गुणागुण हा नेणे ॥४५॥ मज चरण सेवा एकादे वेळां । हे सर्वकाळ पडली गळां । मजहूनि स्नेह आगळा । नेला वनमाळा सर्वथा ॥४६॥ मातें डावलूनि वेगीं । हे बैसली दोहीं अंगीं । इसीं बोलतो श्रीशार्ङ्गीं । मजचिलागीं त्यागील ॥४७॥ मज दीधली चरणांची सेवा । इचा मत्सरु किती सहावा । आपाद आवरिलें यादवा । माझी सेवा हरितली ॥४८॥ मी कुळात्मजा क्षीराब्धीची । हे रानट रानींची । खांदीं बैसली देवाची । भीड भक्तांची म्हणवूनि ॥४९॥ हे भक्तिबळें बैसली खांदीं । कंहीं नुतरेचि त्रिशुद्धी । रमा वनमाळेतें वंदी । द्वेषबुद्धी सांडोनी ॥१५०॥ ऐशी भक्तांची पूजा । तुज आवडे गरुडध्वजा । सुप्रणीत भावो वोजा । चरणीं तुझ्या अर्पिल्या ॥५१॥ तो चरणधूमकेतु तुझा । आमुच्या पापांतें नाशू वोजा । पुनः पुनः गरुडध्वजा । पापसमाजा निर्दळू ॥५२॥ करितां चरणांचें वर्णन । न धाये देवांचें मन । पुढपुढतीं चरणस्तवन । ध्वजलक्षण वर्णिती ॥५३॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

केतुस्त्रिविक्रमयुतस्त्रिपतत्पताको । यस्ते भयाभयकरोऽसुरदेवचम्वोः । स्वर्गाय साधुषु खलेष्वितराय भूमन् । पादः पुनातु भगवन् भजतामघं नः ॥१३॥

बलिबंधनीं अनंता । त्रिविक्रमचरणु वाढतां । सत्यलोकाही वरुता । दिसे झळकता श्रीचरणु ॥५४॥ चरणु वाढला सर्वांवरी । तो 'केतु' बोलिजे कवीश्वरीं । पताका झळकत कवणेपरी । सुरसरी निजगंगा ॥५५॥ बलिबंधनीं आवेश । चरण उचलिला दुराश । नखें भेदला आवरणकोश । जळ बहुवस चालिलें ॥५६॥ चरणस्पर्शें भगवंता । जाहली जीवनासी पवित्रता । ब्रह्मा कमंडलीं धरितां । शिवें माथां वाहिली ॥५७॥ चरणध्वजीं पताका ते गंगा । त्रिवाहिनी त्रिपथगा । चरणशोभा श्रीरंगा । नयनभृंगा उल्हासु ॥५८॥ केतु झळकलिया पाठीं । आसुरी सेनेसी भय उठी । दैवी संपत्तीचे पोटीं । अत्यंत उठी आल्हादु ॥५९॥ आणिक चरणाची कथा । देवांसी स्वर्गसुखदाता । तोच चरणु अधर्मवंतां । होय तत्वतां नरकहेतु ॥१६०॥ एक तरले चरण पूजितां । एक तरले चरण ध्यातां । चरण उपेक्षिती सर्वथा । अधःपाता ते जाती ॥६१॥ चरण वंदिती कां निंदिती । ते निजपदाप्रती जाती । सर्वथा जे उपेक्षिती । अधोगती तयांसी ॥६२॥ चरण वंदितां तरली शिळा । निंदितां उद्धरिलें शिशुपाळा । जे उपेक्षिती चरणकमळा । तयां खळां रौरव ॥६३॥ ऐकें स्वामिया व्यापका । ऐसा तुझा चरण निका । आमुच्या सकळ पातकां । क्षणार्थें देखा उद्धारु ॥६४॥ जेथ पापाचा जाहला उद्धारु । तेथ सहजचि खुंटला दुराचारु । ऐसा तरावया संसारु । चरण साचारु पैं तुझा ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नस्योतगाव इव यस्य वशे भवन्ति । ब्रह्मादयस्तनुभृतो मिथुरर्द्यमानाः । कालस्य ते प्रकृतिपूरुषयोः परस्य । शं नस्तनोतु चरणः पुरुषोत्तमस्य ॥१४॥

निजसुखातें विस्तारिता । तुझा चरण जी अच्युता । काळादिकर्माचा शास्ता । आत्मा नियंता देवाचा ॥६६॥ तूं काळाचा निजनियंता । काळासी अकाळें न करवे सत्ता । देवांसी अधिकारीं स्थापिता । देवनियंता तूं कृष्णा ॥६७॥ कर्मस्वामी तूं कृष्णनाथा । इंद्रियक्रिया समस्ता । कोणा न करवे अन्यथा । कर्मनियंता श्रीकृष्णा ॥६८॥ ब्रह्मादि शरीरधारी । तुज आधीन गा श्रीहरी । जैसे नाथिले बैल नांगरीं । कृषीवळू धरी स्वामित्वें ॥६९॥ तेथ जो राहे मागें पुढें । तो झोडिजे आसुडें । तुझे आज्ञेवरी रोकडे । वर्तती गाढे कळिकाळादिक ॥१७०॥ संसारलक्षण शेतासी । अधिकारीं जुंपोनि सर्वांसी । निजकर्में क्षेत्रासी । तूं वाहविसी निजाज्ञा ॥७१॥ रोंवोनि अहंकाराची मेढी । महत्तत्वांचें खळें झाडी । त्रिगुणदोरें बापुडीं । बांधिशी कडोविकडी जीवपशूंतें ॥७२॥ उदोअस्तांचेनि झणत्कारें । देतां निजकर्मांचे फेरे । जो खांदा चुकवोनि वोसरे । तोचि मारें मारिजे ॥७३॥ हा बोल जरी म्हणसी वायां । 'सृष्टिकर्त्री धरिती माया । मजसी संबंध नाहीं यया ' । देवराया हें न म्हणें ॥७४॥ मायेसी तूं अधिष्ठान । यालागीं तूं परम कारण । तुझिये मांडीवरी जाण । क्रीडास्थान प्रकृतिपुरुषां ॥७५॥ तूं मायेहूनि अपारु । प्रकृतिपुरुषांहूनि परु । काळाचा काळ तूं दुर्धरु । सर्वसंहारुकर्ता तूं ॥७६॥ आमुच्या निजसुखा उत्तमा । तुझा चरणविस्तार मेघश्यामा । हेंचि मागों पुरुषोत्तमा । कृपा आम्हांवरी कीजे ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

अस्यासि हेतुरुदयस्थितिसंयमानाम् । अव्यक्तजीवमहतामपि कालमाहुः । सोऽयं त्रिणाभिरखिलापचये प्रवृत्तः । कालो गभीररय उत्तमपूरुषस्त्वम् ॥१५॥

जगाची उत्पत्ति स्थिति । तुजचिपासोनि श्रीपति । सकळ संहरिता अंतीं । तूंचि निश्चितीं महाकाळु ॥७८॥ क्षोभलिया तामसी शक्ती । सृष्टीचा प्रळय करी अंतीं । तेथें बीजरूपीं अव्यक्तीं । जीव राहती सूक्ष्मत्वें ॥७९॥ मग उत्पत्तीचे काळवेळे । तींच बीजें विरूढती सकळें । पाल्हेजती स्थितिकाळें । पुष्पफळें सफळित ॥१८०॥ ' हे गुणक्षोभाची अवस्था । तेथ मी नव्हें प्रळयकर्ता ' । ऐसें म्हणसी जरी कृष्णनाथा । तरी हे कथा परियेसीं ॥८१॥ तुझा साचार जाहलिया भावो । माया महत्तत्व आणि जीवो । नासोनियां दास पाहा हो । निजपदीं निर्वाहो भोगिती ॥८२॥ त्या तुज सकळ संहारितां । कोण दुर्घटता कृष्णनाथा । कारणेंसी प्रळयकर्ता । तूंचि सर्वथा महाकाळु ॥८३॥ कळों नेदिसी संसारस्थिती । अतिसूक्ष्म काळगती । नाश करिसी अंतीं । निजप्रकृतिविकार ॥८४॥ प्रळयासी प्रमाण मूळ । लव निमेष घटिका पळ । अहोरात्र त्रिकाळ । 'त्रिनाभी' केवळ जो म्हणिये ॥८५॥ ऐसिये गंभीर गतीसीं । मायामहत्तत्व नाशिसी । तो तूं 'महाकाळ' होसी । हृषीकेशी श्रीकृष्णा ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

त्वत्तः पुमान् समधिगम्य यया स्यवीर्यं । धत्ते महान्तमिव गर्भममोघवीर्यः । सोऽयं तयानुगत आत्मन आण्डकोशं । हैमं ससर्ज बहिरावरणैरुपेतम् ॥१६॥

पुढतीं सृष्टीचा सृजिता । तूंचि होशी गा अनंता । ते उत्पत्तीची अवस्था । मूळकर्ता तूंचि तूं ॥८७॥ तुझी लाहोनि वीर्यशक्ती । होये पुरुषासी पुरुषत्वप्राप्ती । तेणें अंगीकारूनि प्रकृती । केलें उत्पत्ती गर्भाधान ॥८८॥ तेचि ते वेळीं प्रकृती । महत्तत्वीं होय गर्भवती । पंचतत्वेंसी गर्भीं धरिती । हिरण्यवर्ण अंडातें ॥८९॥ तें अमोघ वीर्य प्रबळ । गर्भीं विश्वाकार बाळ । धरिती जाहली वेल्हाळ । ब्रह्मांड सकळ अंडामाजीं ॥१९०॥ जैसें गर्भासी उल्ब जाण । तैसें अंडासी बहिरावरण । सप्तधा नेमस्त प्रमाण । तूं निर्माण करविता ॥९१॥ पृथ्वी जल अनल अनिल । नभ आणि अहंकार स्थूळ । सातवें तें अतिसबळ । जाण केवळ क्रियासूत्र ॥९२॥ त्या गर्भासी जतनेवरी । तूंचि आंतु आणि बाहेरी । रिघालासी सूत्रधारी । खांबसूत्र जैसा कां ॥९३॥ ऐसें जग जाहलें दोघांपासूनी । परी तिसरें न देखों कोणी । अवघी सृष्टी दोघाजणीं । दुमदुमुनी भरलीसे ॥९४॥ वाती लावूनि पाहतां । तिसरें न लगेचि हाता । दुसरी प्रकृती निर्धारितां । तेही सर्वथा टवाळ ॥९५॥ ऐसा दुजेनवीण एकला । एकलाचि विश्व जाहला । आकळीत कौशल्यकळा । मल्लमर्दना श्रीकृष्णा ॥९६॥ एवं एकलेपणें तूं कर्ता । त्यालागीं लेपु न लगे सर्वथा । कर्म करूनि तूं अकर्ता । तेचि कथा परियेसीं ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

तत्तस्थूषश्च जगतश्च भवानधीशो । यन्माययोत्थगुणविक्रिययोपनीतान् । अर्थाञ्जुषन्नपि हृषीकपते न लिप्तो । येऽन्ये स्वतः परिहृतादपि बिभ्यति स्म ॥१७॥

चरें आणि अचरें । जंगमें आणि स्थावरें । या जगाचा स्वामी तूं निर्धारें । केलें खरें गतश्लोकीं ॥९८॥ तेंचि स्वामित्व कैसें घडे । हें जरी पुससी धडफुडें । तरी तेहीविखीं रोकडें । वचन गाढें अवधारीं ॥९९॥ निजमायेचेनि योगें । नाना विषय भोगिसी अंगें । तें भोगिलेपण अंगीं न लगे । अकर्तात्मसंगें अलिप्त ॥२००॥ तोचि अकर्तात्मबोधु कैसा । जरी म्हणशी हृषीकेशा । ते आगमनिगमां अतर्क्य दशा । परम पुरुषा परियेसीं ॥१॥ भोग्य-भोग-भोक्ता । या तिहींतें तूं प्रकाशिता । जेवीं घटीं बिंबोनि सविता । अलिप्तता स्वभावें ॥२॥ घट-जळ-प्रति-बिंबासी । स्वयें सविता प्रकाशी । प्रकाशूनि अलिप्त त्यांसी । तेवीं तूं भोगासी श्रीकृष्णा ॥३॥ अथवा कर्म-कार्य-कर्ता । या तिहींमाजीं निजात्मता । देखे तो अभोक्ता । भोगोनि तत्वतां निजभोग ॥४॥ दर्पणींच्या प्रतिबिंबासीं । जो प्रवर्तला भोगासी । व्यभिचाराचा आळ त्यासी । केवीं अंगासी लागेल ॥५॥ जगचि हें अवघें । जो होऊनि ठाके अंगें । त्यासी बाधावें कोणें भोगें । निजात्मयोगें योगिया ॥६॥ ऐशिया बोधाचेनि बळें । तो विषयावरी जरी लोळे । तरी विषयाचेनि विटाळें । बोधु न मैळे तयांचा ॥७॥ तो घेणें देणें करी । पाहतां दिसे व्यवहारी । नांदतांही घरदारीं । त्यामाझारीं तो नाहीं ॥८॥ नेणोनि बोधाची मागी । भोगत्याग केला योगीं । तरी कांपताति सर्वांगीं । वासना अंगीं उरलीसे ॥९॥ स्वप्नीं विषय देखती । जागे जाहल्या प्रायश्चित घेती । नाहीं मावळली अहंकृती । यालागीं भीती सर्वदा ॥२१०॥ ऐशिया जी विषयभेडा । नाहीं निजबोधु धडफुडा । तैसा नव्हेसी तूं निधडा । दिसे रोकडा निजबोधु ॥११॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

स्मायावलोकलवदर्शितभावहारि । भ्रूमण्डलप्रहितसौरतमन्त्रशौण्डैः । पत्न्यस्तु षोडशसहस्रमनङ्गबाणैः । यस्येन्द्रियं विमथितुं करणैर्न विभ्व्यः ॥१८॥

मी निधडा निजबोधें संपूर्ण । म्हणशी देखों न शके कवण । ये अर्थींचें उपलक्षण । ऐक ते खूण स्वामिया ॥१२॥ सोळा सहस्त्र पत्न्या घरीं । आणि गोकुळींच्या परनारी । कुब्जादि मथुरेमाझारीं । कर्णकुमारी भोगिल्या ॥१३॥ मुंजी नव्हतां आधीं । भोगिली त्वां गोंवळी पेंधी । धरोनियां सांदीबिदीं । नदोनदीं असंख्य ॥१४॥ अविधी भोगितां नारी । बोध न मैळेचि श्रीहरी । अंगें रिघालासी क्षीरसागरीं । अर्जुना करीं धरोनी ॥१५॥ शेषशायी नारायणा । उत्कंठा तुझिया दर्शना । तेणें उपावो केला जाणा । हरूनि ब्राह्मणाचीं बाळें ॥१६॥ जेवीं आपुलें स्वरूप आपण । पहावया कीजे दर्पण । तेवीं पहावया कृष्णार्जुन । स्वयें नारायण अपत्यें आणी ॥१७॥ 'तूं अवतार नर-नारायण । तुझें घ्यावया दरुषण । ब्राह्मणअवपत्यें जाण । म्यां आपण आणिलीं' ॥१८॥ ऐसे नारायणाचे बोल । सप्रेम अतिसखोल । आम्हीं ऐकिले गा सकळ । तुझा बोध अकळ श्रीकृष्णा ॥१९॥ तीं ब्राह्मणाचीं अपत्यें । जीं बहु काळ जाहलीं होतीं मृतें । तुवां आणोनि दिधिलीं श्रीअनंतें । तीं देखलीं समस्तें चरितें आम्हीं ॥२२०॥ तुझी नारायणासी आस्था । तेथ आमुची कवण कथा । पार न कळे जी अच्युता । गुणातीता श्रीकृष्णा ॥२१॥ मागां अवतार जाहले । परी ऐसें चरित्र नाहीं केलें । विधिवेदां लाजविलें । व्यभिचारियां दिधलें निजपद ॥२२॥ जें म्यां भोगिलें स्त्रियांसी । तें तूं उदासीनत्वें म्हणसी । तेणें बाध न पवे बोधासी । हृषीकेशी तें न घडे ॥२३॥ हावभावविलासेंसीं । अंगें दाविती चपळतेसी । तुज लक्षोनि पुरुषोत्तमासी । कामबाणासी योजिती ॥२४॥ वाऊनि भ्रमंडलाचे वेढे । व्यंकट कटाक्षें बाण गाढे । सुरतमंत्रीं रोकडे । केले धडफुडे सतेज ॥२५॥ ज्या बाणांचे घायीं । इंद्र खोंचला सहस्त्रां ठायीं । शिव लोळविला पाहीं । मोहिनीव्यामोहीं महाबाणें ॥२६॥ ज्या बाणाचा पिसारा । लागतांचि पैं भेदरा । तापसीं घेतला परा । सोडोनि घरदारा पळाले ॥२७॥ ऐसें सोळा सहस्त्र बाण । अखंड तुजचिवरी संधान । करितां न मैळे बोधु जाण । अतिविंदान हें तुझें ॥२८॥ घरींच्या स्त्रिया सहस्त्र सोळा । गोकुलादि मथुरेच्या अबळा । तुज विषयी करावया गोपाळा । नव्हती सकळा समर्था ॥२९॥ त्यांचेनि तुज न करवे विषयी । परी त्या त्वां केल्या निर्विषयी । ऐसा तूं त्रैलोक्याचे ठायीं । स्वामी पाहीं श्रीकृष्णा ॥२३०॥ ऐशी तुझी कीर्ति ऐकतां । अथवा चरणतीर्थ घेतां । याचि दोंही तीर्थांची समर्थता । पवित्रता जगासी ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

विभ्व्यस्तवामृतकथोदवहास्त्रिलोक्याः । पादावनेजसरितः शमलानि हन्तुम् । आनुश्रवं श्रुतिभिरङ्घ्रिजमङ्गसङ्गैः । तीर्थद्वयं शुचिषदस्त उपस्पृशन्ति ॥१९॥

तुझिये कीर्तीचें श्रवण । आंतरमलाचें क्षालन । करूनियां वृत्ति जाण । परम पावन कीर्तनें ॥३२॥ तुझिया चरणींची गंगा । सकळ पातकें ने भंगा । ते पायवणी श्रीरंगा । पवित्र जगातें करी ॥३३॥ या दोंही तीर्थांचें सेवन । अखंड करिती साधुजन । तेणें होऊनि परम पावन । समाधान निजवृत्ती ॥३४॥ अवतारांचे अंतीं । ये दोनी तीर्थीं अतिविख्याती । प्रगट केली तुवां क्षिती । तारावया श्रीपती निजदासां ॥३५॥ एक श्रवणें एक स्नानें । दोनी तीर्थें परम पावनें । प्रगट केलीं जगज्जीवनें । मलिन जनें तरावया ॥३६॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

श्रीबादरायणिरुवाच । इत्यभिष्टूय विबुधैः सेशः शतधृतिर्हरिम् । अभ्यभाषत गोविन्दं प्रणम्याम्बरमाश्रितः ॥२०॥

शुक म्हणे परीक्षिती । यापरी देवीं समस्तीं । स्तविला स्वानंदें श्रीपती । परमभक्तिभावार्थें ॥३७॥ ऐसा करूनि स्तुतिवादु । संतोषविला गोविंदु । देवांसी होत असे आल्हादु । परम विनोदु सर्वांसी ॥३८॥ स्तुति करावया अग्रणी । ब्रह्मा शिव पुढें येऊनी । तिंहीं जय-जयकार करूनी । लोटांगणें घातलीं ॥३९॥ देव राहूनियां गगनीं । हात जोडोनि विमानीं । विनंती करावयालागोनी । ब्रह्मा पुढें राहोनी बोलतु ॥२४०॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

श्रीब्रह्मोवाच । भूमेर्भारावताराय पुरा विज्ञापितः प्रभो । त्वमस्माभिरशेषात्मन्तत्तथैवोपपादितम् ॥२१॥

उतरावया धराभारा । पूर्वीं प्रार्थिलासी यदुवीरा । अभय द्यावया सुरवरां । आम्हीं श्रीधरा विनविलें ॥४१॥ आम्हीं विनविलें जैसें । तुवां कार्य केलें म्हणों तैसें । त्याहूनियां विशेषें । केली निजविन्यासें धर्मवृद्धी ॥४२॥ तूं सर्वेश्वरु सर्वात्मा । जें कार्य न कळेचि आम्हां । तेंही तुवां पुरुषोत्तमा । घनश्यामा संपादिलें ॥४३॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

धर्मश्च स्थापितः सत्सु सत्यसन्धेषु वै त्वया । कीर्तिश्च दिक्षु विक्षिप्ता सर्वलोकमलापहा ॥२२॥

सत्यवादी साधु जे कांहीं । ज्यांचा संकल्प तुझ्या पायीं । धर्म स्थापिला त्यांच्या ठायीं । तुवां पाहीं यथस्थित ॥४४॥ आणिक दश दिशांप्रती । विस्तारिली उदार कीर्ती । तेणें पावन त्रिजगती । होय निश्चितीं श्रवणद्वारें ॥४५॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

अवतीर्य यदोर्वंशे बिभ्रद्रूपमनुत्तमम् । कर्माण्युद्दामवृत्तानि हिताय जगतोऽकृथाः ॥२३॥

पूर्णपुरुषा हृषीकेशी । तूं अवतरलासी यदुवंशीं । सीमा तुझिया रूपासी । बरवेपणासी न करवे ॥४६॥ तूं सर्वांमाजीं सर्वोत्तम । देखतां वृत्तींसी उपरम । लीलाविग्रही पुरुषोत्तम । मनोरम सकळिकां ॥४७॥ कर्में केलीं परमाभ्दुतें । गोवर्धन धरिला वाम हस्तें । मुखें प्राशूनि वणव्यातें । गोपाळांतें वांचविलें ॥४८॥ मृता आणिलें गुरुपुत्रासी । गत गर्भ भेटविले देवकीसी । गोपालवत्सें तूं जाहलासी । विधात्यासी भुलविलें ॥४९॥ जगाचिया परम हिता । लागीं नाना चरित्रकथा । करिता जालासी श्रीअनंता । कृष्णनाथा निजजनका ॥२५०॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

यानि ते चरितानीश मनुष्याः साधवः कलौ । श्रृण्वन्तः कीर्तयंतश्च तरिष्यन्त्यञ्जसा तमः ॥२४॥

कथाकौतुकें विचित्रें । नाना परींचीं चरित्रें । परम पावन पवित्रें । येणें अवतारें त्वां केलीं ॥५१॥ कलियुगीं साधुजन । या चरित्रांचें श्रवण कीर्तन । करितां तरले जाण । मायामोह त्रिगुणेंसीं ॥५२॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

यदुवंशेऽवतीर्णस्य भवतः पुरुषोत्तम । शरच्छतं व्यतीयाय पञ्चविंशाधिकं प्रभो ॥२५॥

अवतरल्या यदुवंशीं । पुरुषोत्तमा हृषीकेशी । संख्या या अवतारांसी । जाहली ते तुजपाशीं सांगेन ॥५३॥ मृत्युलोकीं मनुष्यमर्यादा । शत वर्षें जी गोविंदा । ते अतिक्रमोनि आवदा । अधिक मुकुंदा पंचवीस जाहलीं ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

नाधुना तेऽखिलाधार देवकार्यावशेषितम् । कुलं च विप्रशापेन नष्टप्रायमभूदिदम् ॥२६॥

आतां पुढें येथ कांहीं । देवकार्य उरलें नाहीं । यादवकुळ म्हणसी तेंही । नष्टप्राय पाहीं उरलेंसे ॥५५॥ उठवणी आलें हतिरूं । कां पांख उपडिल्या पांखरूं । तैसा यादवांचा दळभारू । भूमिये भारु उरला असे ॥५६॥ निवणाचा फुटका डेरा । कां क्षयो लागल्या राजकुमरा । वणवा आहाळल्या अजगरा । यादववीरां ते दशा ॥५७॥ दारुण ब्राह्मणाचा शाप । नाशला वीर्यशौर्यप्रताप । गळाला वाढिवेचा दर्प । केवळ प्रेतरूप दिसताती ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

ततः स्वधाम परमं विशस्व यदि मन्यसे । सलोकाँल्लोकपालान्नः पाहि वैकुण्ठकिङ्करान् ॥२७॥

यालागीं जी यादवराया । आम्ही वांछूं तुझ्या पायां । वेगु कीजे स्वधामा यावया । सुरवर्या श्रीकृष्णा ॥५९॥ ऐकें देवकींनंदना । जरी मानेल तुझिया मना । तरी निघिजो जी याचि क्षणा । सुरसेना तिष्ठत ॥२६०॥ सलोक लोकपाळ जे जे । त्यांवरी तुवां कृपा कीजे । आम्ही किंकर गा तुझे । वचन मानिजे दासांचें ॥६१॥ ऐकें जी वैकुंठनाथा । तुझी थोर आम्हां अवस्था । आदिकरूनि उमाकांता । आणि समस्तां देवांसी ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

श्रीभगवानुवाच । अवधारितमेतन्मे यदात्थ विबुधेश्वर । कृतं वः कार्यमखिलं भूमेर्भारोऽवतारितः ॥२८॥

जो योगज्ञाना मुकुटमणी । मेघगंभीरया वाणी । ब्रह्मयाप्रती चक्रपाणी । हास्यवदनीं । बोलिला ॥६३॥ नादब्रद्म मुसावलें । कीं निजानंदाचें फळ पिकलें । तैसें श्रीमुखें बोलों आदरिलें । भाग्य उदेलें श्रवणांचें ॥६४॥ गौरवें म्हणे 'ब्रह्मदेवा । संतोषलों तुझिया भावा' । पुत्रस्नेहेंकरूनि तेव्हां । उद्यत खेवा हरि जाला ॥६५॥ आवडीं म्हणे विबुधेंद्रा । सत्य तुझी वाङ्मु द्रा । तुझेनि वचनें ब्राह्मणेंद्रा । धराभारा उतरिलें ॥६६॥ सकळ कार्य निःशेख । म्यां संपादिलें देख । तरी उरलें असे एक । थोर अटक मजलागीं ॥६७॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ व ३० वा

तदिदं यादवकुलं वीर्यशौर्यश्रियोद्धतम् । लोकं जिघृक्षद्रुद्धं मे वेलयेव महार्णवः ॥२९॥

यद्यसंहृत्य दृप्तानां यदूनां विपुलं कुलम् । गन्तास्म्यनेन लोकोऽयमुद्वेलेन विनङ्क्ष्यति ॥३०॥ हें यादवकुळ येथ । वीर्यशौर्यश्रियोद्धत । धर्म नाशावया उद्यत । अतिदृप्त निजबळें ॥६८॥ हे छेदूं पाहती धर्ममूळें । म्यां आवरिले असती योगबळें । जेवीं समुद्रातें मर्यादवेळें । असे राखिलें नेमूनी ॥६९॥ सांडोनि ऐशियांसी । मज गेलिया निजधामासी । हे प्रवर्ततील अधर्मासी । कोण यांसी वारील ॥२७०॥ जैसा निर्मर्याद सागरू । खवळल्या सर्वसंहारकरू । त्यासी कोण शकेल आवरूं । तैसा विचारू होईल ॥७१॥ हे अधर्मपर होतील गाढे । तुम्हांसी पडेल सांकडें । सांगों धांवाल मजपुढें । यांचें रोकडें गार्हा७णें ॥७२॥ हे नाटोपती देवां । नाकळती दैत्यां दानवां । हें अधर्म करिती जेव्हां । तुम्हीच मज तेव्हां सांगों याल ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

इदानीं नाश आरब्धः कुलस्य द्विजशापतः । यास्यामि भवनं ब्रह्मन् नेतदन्ते तवानघ ॥३१॥

यालागीं कुळनाशासी त्वरित । आजिपासोनि सुमुहूर्त । केला असे गा निश्चित । यथोचित यादवां ॥७४॥ ऐकें सखया प्रजापती । या कुळनाशाचिया अंतीं । तुझिया भुवनावरूनि निश्चितीं । निजधामाप्रती येईन ॥७५॥ ऐसें बोलिला प्रभू । ऐकोनि शंभु स्वयंभू । आनंदला देवकदंबू । समारंभू मांडिला ॥७६॥ जयजयकारु केला सकळीं । परमानंदें पिटिली टाळी । चरण वंदूनि वनमाळी । पुष्पांजळी अर्पिल्या ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

श्रीशुक उवाच । इत्युक्तो लोकनाथेन स्वयम्भूः प्रणिपत्य तम् । सह देवगणैर्देवः स्वधाम समपद्यत ॥३२॥

शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि कृष्णवदंती । सुरवर आनंदले चित्तीं । आल्हादें करिती अभिवंदनें ॥७८॥ धाता सविता शूळपाणी । मिळोनियां देवगणीं । कृष्णासी घातल्या लोटांगणीं । चरण वंदूनी निघाले ॥७९॥ एवं वंदूनी श्रीपती । आपुलिया स्थानाप्रती । निघाल्या जी देवपंक्ती । पवनगती विमानें ॥२८०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

अथ तस्यां महोत्पातान् द्वारवत्यां समुत्थितान् । विलोक्य भगवानाह यदुवृद्धान्समागतान् ॥३३॥

कुळनाशु करणें रोकडें । ऐसें कृष्णें नेमिलें धडफुडें । तंव द्वारकेसी येरीकडे । महोत्पात गाढे उठिले ॥८१॥ गगनीं निघाले त्रिकेतु । धूमकेतु दंडकेतु । शिखेसहित शिखाकेतु । गगनाआंतु उगवले ॥८२॥ माध्यान्हीं वाजला आघात । दिवसा उल्कापात होत । होत भूतें नागवीं नाचत । गगनाआंतु रुदती ॥८३॥ वृक जंबुक नगराआंत । दिवसा चौबारा कुंकात । नगरीं भालुवा भुंकत । जन कांपत देखोनी ॥८४॥ नगरा आंतुबाहेरी । श्वानांची रडणीं भारीं । मार्जारकलहो नगरीं । घरोघरीं होतेसे ॥८५॥ गाई आरडती मध्यरात्रीं । लेंकुरें खेळती झुंझारीं । माणसांतें झडपिती घारी । घुंघाती घरोघरीं दिवाभीतें ॥८६॥ वागीश्वरी क्षोभली गाढी । बोलीं म्हणती आली यमधाडी । कां रे धांवतां तांतडी । आगीं उडी घालूं पाहतां ॥८७॥ भूस्फोट भूमिकंप । अग्निकरणीं तपे आतप । वारेनि सोडिला अहा कंप । लागे झडप खरस्पर्शें ॥८८॥ धुळोरा उधळत नगरीं । रज भरे डोळ्यांमाझारीं । डोळा नुघडवे नरनारीं । दिशा चारी धुमधुमित ॥८९॥ ऐसे नाना परींचे उत्पात । नगरीं रुधिरवृष्टि होत । देखोनि यादव समस्त । भयचकित पैं जाहले ॥२९०॥ यादव मिळोनि थोर थोर । वृद्ध वृद्ध करिती विचार । ये चिन्हें अरिष्टकर । विघ्न थोर दिसतसे ॥९१॥ अवघे आले कृष्णापाशीं । वृत्तांत सांगती तयासी । उव्दिग्न देखोनि यादवांसी । हृषीकेशी बोलिला ॥९२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

श्रीभगवानुवाच । एते वै सुमहोत्पाता व्युत्तिष्ठन्तीह सर्वतः । शापश्च नः कुलस्यासीद्ब्राह्मणेभ्यो दुरत्ययः ॥३४॥

कृष्ण यादवांसी सांगत । दिवि-भू-अंतरिक्षगत । उठिले जे महोत्पात । सर्वगत सर्वदा ॥९३॥ देखोनियां चिन्हांसी । मजही आठवलें मानसीं । ब्राह्मणशाप यदुकुळासी । चिन्हें त्यासी सूचकें ॥९४॥ ब्राह्मणांचा शापु खरा । नुल्लंघवे हरिहरां । तुम्ही आतांचि विचार करा । नगराबाहिरा जनु काढा ॥९५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

न वस्तव्यमिहास्माभिर्जिजीविषुभिरार्यकाः । प्रभासं सुमहत्पुण्यं यास्यामोऽद्यैव मा चिरम् ॥३५॥

येथोनि द्वारकेची वस्ती । आम्हीं सांडावी समस्तीं । जीवें जियावयाची चाड चित्तीं । तरी प्रभासाप्रती निघावें ॥९६॥ वेगीं करा रे तांतडी । आजचि निघा लवडसवडी । सांडा घरदारांची गोडी । येथ अर्धघडी न रहावें ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

यत्र स्नात्वा दक्षशापाद् गृहीतो यक्ष्मणोदुराट् । विमुक्तः किल्बिषात्सद्यो भेजे भूयः कलोदयम् ॥३६॥

ऐका समस्त यादवश्रेष्ठ । प्रभासतीर्थ महावरिष्ठ । जेथिंचेनि स्नानें उडुराट । निस्तरला कष्ट क्षयाचे ॥९८॥ दक्षें निजकन्या चंद्रासी । सत्तावीस दिधल्या त्यासी । तो रतला रोहिणीसीं । येरां सर्वांसी उपेक्षुनी ॥९९॥ दक्षें शापिलें चंद्रासी । क्षयरोग लागला त्यासी । तेणें येऊनि प्रभासासी । स्नानदानासी पैं केलें ॥३००॥ स्नानमात्रें केवळ । क्षयरोग गेला तत्काळ । कळा पावला सकळ । शोभे निर्मळ निजतेजें ॥१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

वयं च तस्मिन्नाप्लुत्य तर्पयित्वा पितॄन् सुरान् । भोजयित्वोशिजो विप्रान्नानागुणवतान्धसा ॥3७॥

आम्हीही तेथ स्नान दान । पितृतर्पण देवतार्चन । करूं ब्राह्मणपूजन । जे संपन्न श्रुति शास्त्रीं ॥२॥ नाना परींचीं पक्वान्ने । गुणाधिक्यें मिष्टान्ने । देवां ब्राह्मणांसी भोजनें । नाना दानें विधानोक्त ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

तेषु दानानि पात्रेषु श्रद्धयोप्त्वा महान्ति वै । वृजिनानि तरिष्यामो दानैर्नौभिरिवार्णवम् ॥३८॥

श्रद्धेचेनि नेटेंपाटें । पाहूनि दानपात्रें चोखटें । दान द्यावें गोमटें । भूमी वोलटे जेवीं बीज ॥४॥ ब्राह्मणाचें मुख तें क्षेत्र । पालवियेपेढीवीण पवित्र । ऐसें पाहूनि सुक्षेत्र । दानें विचित्र पेरावीं ॥५॥ विनीततेची सेल वोल । श्रद्धेचें चाडें निर्मळ । शमदमादि बैल सबळ । ते तात्काळ जुंपोनी ॥६॥ ऐशिया वोजा परी । बीज पेरिलिया क्षेत्रीं । पीक पिकेल घुमरीं । पुरुषार्थ चारी लगटोनी ॥७॥ त्या पिकाचेनि सबळें । पापें तरोनि पैं सकळें । जेवीं नावेचेनि बळें । समुद्रजळें तरिजेती ॥८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

श्रीशुक उवाच । एवं भगवतादिष्टा यादवाः कुरुनन्दन । गन्तुं कृतधियस्तीर्थं स्यन्दनान् समयूयुजन् ॥३९॥

शुक म्हणे कौरवनंदना । ऐकें परिक्षिति सज्ञाना । कृष्णें दिधली अनुज्ञा । तीर्थविधाना प्रभासा ॥९॥ यादव उठिले गाढे । रथीं जुंपिले जी घोडे । येर धांवती येरांपुढें । चहूंकडे लगबग ॥३१०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

तन्निरीक्ष्योद्धवो राजन् श्रुत्वा भगवतोदितम् । दृष्ट्वारिष्टानि घोराणि नित्यं कृष्णमनुव्रतः ॥४०॥

थोर वीरांचे बोभाट । गजरथांचे घडघडाट । द्वारकेमाजीं न फुटे वाट । प्रयाण उभ्दट प्रभासासी ॥११॥ हडबडली देखोनि द्वारावती । ऐक राया परीक्षिती । उद्धवास आठवलें चित्तीं । कृष्णवदंती देवांसी ॥१२॥ कुळनाशासी त्वरित । आजीपासूनि सुमुहूर्त । तोचि देवें प्रस्तुत । कार्यार्थ निश्चित मांडिला ॥१३॥ उद्धव कृष्णासवें संतत । कृष्णानुमतें तो वर्तत । सुरसंवाद निश्चित । होता श्रुत तयासी ॥१४॥ असतां येथ कृष्णनाथ । द्वारकेमाजीं अतिउत्पात । उठिले तें मनोगत । जाण निश्चित कृष्णाचें ॥१५॥ यादव नेऊनि प्रभासासी । अर्धक्षणें नाशील यांसी । जावया निजधामासी । हृषीकेशी उद्यत ॥१६॥ म्हणाल 'कां नेले इतुके दुरी । नाशु न करीच द्वारकापुरी ' । तरी तो सर्वज्ञ श्रीहरी । सूत्रधारी जाणता ॥१७॥ यादव देवांश निश्चितीं । सातवी पुरी द्वारावती । येथ निमाल्या सायुज्यमुक्ती । हें जाणोनि श्रीपति न नाशी ॥१८॥ यांसी आहे पदाभिमान । द्वारकेमाजीं न घडे निधन । हें जाणोनि जगज्जीवन । करवी प्रयाण प्रभासासी ॥१९॥ ब्रह्मशापाचें मूळ देखा । प्रभासासी निघाली ते येरिका । हें कळलेंसे यदुनायका । तेथ सकळिकां धाडिलें ॥३२०॥ स्वकुळ ग्रासोनि श्रीपती । निघेल निजधामाप्रती । हें जाणोनि उद्धव चित्तीं । बहुतां रीतीं कळवळला ॥२१॥ बाष्पें कंठ निरोधला । नेत्रीं अश्रूंचा पूर लोटला । स्वेदु सर्वांगीं चालिला । हृदयीं दाटला हुंदका ॥२२॥ कृष्णवियोग अर्ध क्षण । तेणें निघों पाहे प्राण । विसरला कार्य आठवण । कृष्णवदन निरीक्षी ॥२३॥ वियोगप्राप्तीचे बाण प्रबळ । हृदयीं रुतले अतिसबळ । बुद्धि धैर्येंसीं होती विकळ । जीवीं तळमळ लागली ॥२४॥ एकांत देखोनि श्रीकृष्णासी । धांवोनि लागला पायांसी । मिठी घालोनि चरणेंसीं । उकसाबुकसीं स्फुंदत ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

विविक्त उपसङ्गम्य जगतामीश्वरेश्वरम् । प्रणम्य शिरसा पादौ प्राञ्जलिस्तमभाषत ॥४१॥

जो जगाचा नियंता । त्या काळाचा कृष्ण कळिता । त्याचे चरणीं ठेवूनि माथा । विनीतता बोलतु ॥२६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

श्रीउद्धव उवाच । देवदेवेश योगेश पुण्यश्रवणकीर्तन । संहृत्यैतत्कुलं नूनं लोकं सन्त्यक्ष्यते । भवान् विप्रशापं समर्थोऽपि प्रत्यहन्न यदीश्वरः ॥४२॥

उद्धव म्हणे यादवेंद्रा । देवेंद्राच्या आदि‍इंद्रा । योगियांच्या प्रबोधचंद्रा । अकळ मुद्रा पैं तुझी ॥२७॥ देवांमाजीं इंद्र ईशु । त्या इंद्राचा तूं जगदीशु । योगियांमाजीं श्रेष्ठ महेशु । त्याचाही ईशु तूं श्रीकृष्णा ॥२८॥ तुझें जें श्रवणकीर्तन । तें पुण्यासी करी पावन । छेदी संसारबंधन । समाधान कीर्तनें ॥२९॥ संहारूनि निजकुळासी । सांडोनियां या लोकासी । निजधामा जावों पाहसी । हृषीकेशी निश्चित ॥३३०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

नाहं तवाङ्‌घ्रिकमलं क्षणार्धमपि केशव । त्यक्तुं समुत्सहे नाथ स्वधाम नय मामपि ॥४३॥

अन्यथा विप्रशापासी । करावया समर्थ होसी । तें न करूनि कुळ संहारिसी । निजधामासी जावया ॥३१॥ ऐसें बोलतां आलें रुदन । न धरत चालिलें स्फुंदन । आसुवीं पूर्ण झाले नयन । धांवोनि चरण धरियेले ॥३२॥ माथा ठेविला चरणांवरी । सखा स्वामी तूं श्रीहरी । आम्हांसी सांडूनियां दुरी । कैशापरी जासील ॥३३॥ तुझिया प्रयाणाची वार्ता । ऐकतांचि गा अच्युता । उभड सांठवेना चित्ता । वियोग सर्वथा न व्हावा ॥३४॥ जळावेगळी मासोळी । तैसा जीवु तळमळी । निष्ठुर जाहलासी अंतकाळीं । वनमाळी मजलागीं ॥३५॥ तुज गेलियापाठीं । मी दीनवदन ये सृष्टीं । कोणासी सांगों गोड गोष्टी । श्वासु पोटीं न समाये ॥३६॥ निघोनि गोलिया आत्मा । प्रेतरूप उरे प्रतिमा । तुवां गेलियां निजधामा । तैसें आम्हां होईल ॥३७॥ तूंचि आम्हां जनक जननी । हा दृढ विश्वास आमुचे मनीं । केवीं जातोसी सांडोनि । म्हणोनि लोळणी घातली ॥३८॥ तूं निघालासी निजधामा । कोणासी निरविलें जी आम्हां । कां रुसलासी पुरुषोत्तमा । बोलु निजकर्मा आमुच्या ॥३९॥ मुकें बाळ सांडोनि क्षितीं । माता रिघों पाहे सती । तें जेवीं ये काकुळती । तैसी गती उद्धवा ॥३४०॥ गोडु गिळी आमिषकवळु । सवेंचि पारधी आंसुडी गळु । त्या मीनाऐसा विकळु । होय प्रेमळु उद्धव ॥४१॥ तुजगेलियावरी देवा । म्यां कोणाची करावी सेवा । कां रुसलासी गा यादवा । आमच्या दैवा निश्चित ॥४२॥ कांटवणे आड क्षितीं । आंधळें सांडूनि जाये सांगाती । तें ग्लानी करी वनांतीं । तैसी गती उद्धवा ॥४३॥ धांवधावों पायां पडे । धाय मोकलोनि रडे । मज सांडोनि तूंचि पुढें । कोणीकडे जातोसी ॥४४॥ मी नव्हें पायांवेगळा । क्षण नोसंडीं चरणकमळा । तुझें प्रयाण जी गोपाळा । अंतकाळा मज काळु ॥४५॥ तुझी थोर लागली सवे । मज न्यावें आपणासवें । हेंचि प्रार्थीतसे जीवेंभावें । कृपा यादवें मज कीजे ॥४६॥ तूं गरुडारूढ होसी । तेव्हां कृपेनें बैसवीं पाठीसीं । सांडों नको हृषीकेशी । निजधामासी मज नेईं ॥४७॥ सलगी दिधली जन्मवरी । अंतीं का त्यागिसी दुरी । कृपाळुवा श्रीहरी । कृपा करीं सर्वथा ॥४८॥ म्हणसी मी निजकुळासी काळु । तो तुज केवीं होईन कृपाळु । हें न म्हणें तूं दीनदयाळु । अतिस्नेहाळु भक्तासी ॥४९॥ तुझी कृपा भक्तांवरी । यालागीं मी सलगी करीं । मातें उद्धरीं श्रीहरी । झणें संसारीं सांडिसी ॥३५०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

तव विक्रीडितं कृष्ण नृणां परममङ्गलम् । कर्णपीयूषमासाद्य त्यजन्त्यन्यस्पृहां जनः ॥४४॥

तुझी क्रीडा नाना खेळ । प्राणियांसी परम मंगळ । कर्णद्वारें वेल्हाळ । निजनिर्मळ सेविती ॥५१॥ तुझे कीर्तिश्रवणाचे आवडीं । लागली कर्णपीयूषीं गोडी । तेथ अमृताची चवी थोडी । होय अर्ध घडी न लागतां ॥५२॥ ऐशी ऐकतां तुझी कीर्ती । सवासना स्पृहा नासती । ते भक्तु तुज न विसंबती । हृदयीं वाहती सर्वदा ॥५३॥ त्या तुज प्रत्यक्ष श्रीकृष्णासीं । मज न साहवे वियोगासी । सवे लाविली आम्हांसी । सौजन्येंसीं स्वामित्वें ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

शय्यासनाटनस्थान स्नानक्रीडाशनादिषु । कथं त्वां प्रियमात्मानं वयं भक्तास्त्यजेम हि ॥४५॥ तूं तंव आमुचा स्वामी होसी । मज अर्धांसनीं बैसविसी । मजवेगळें हृषीकेशी । निजगुजासी तुज नाहीं ॥५५॥ अचाट कार्य पडे थोर । तेव्हां मज पुससी विचार । मी सांगें जो जो मंत्र । तो साचार मानिसी ॥५६॥ जेव्हां भोजन करूं रिघसी । माझें ताट ताटेंसीं मांडिसी । जेवितां नाना विनोद करिसी । निजशेष देसी मजलागीं ॥५७॥ ब्रह्मादिकां न लभे पंक्ती । तो मी जेवीं तुझिया पांतीं । शेषविभागी जी श्रीपती । केलें निश्चितीं त्वां मज ॥५८॥ मातें धरोनियां हातीं । एकला बैससी एकांतीं । ब्रह्मादिकांची विनंती । तुजप्रती मी सांगें ॥५९॥ कळों नेदितां कोणासी । तुवां केलें रासक्रीडेसी । तें गुह्य सांगोनि मजपाशी । गोकुळासी धाडिलें ॥३६०॥ सेजेचे उठवूनि भीमकीसी । मज आपणाजवळ निजविशी । ते निद्रेचिया सुखासी । समाधि कायसी बापुडी ॥६१॥ ऐशिया तुझे संगतीं । रात्री भोगिल्या नेणों कितीं । त्या मज सांडोनि श्रीपती । जाणें निश्चितीं करितोसी ॥६२॥ वेळु न गमे चक्रपाणी । मज बोलवूं धाडिसी रुक्मिणी । सारीपाटु आम्हीं दोघीं जणीं । एकासनीं खेळिजे ॥६३॥ जेव्हां व्याहाळिये निघसी । मज आपुले रथीं बैसविशी । दोघां गमन एके रथेंसीं । आजि उबलासी सांघाता ॥६४॥ जळक्रीडा करितां जळीं । करितां गोपिकांसी रांडोळी । तेव्हांही मी तुजजवळी । स्नानकाळीं सर्वदा ॥६५॥ ऐसें सांगों मी किती । तुजगेवळा श्रीपती । नाहीं झालों अहोरातीं । केवीं म्यां अंतीं सांडावें ॥६६॥ तूं स्वामी सखा सर्वात्मा । जीवाचा जीव पुरुषोत्तमा । तुझा वियोगु मेघश्यामा । केवीं आम्हां साहवेल ॥६७॥ आमुचा जीवु आणि प्राण । ते तुझे गा श्रीचरण । ते वियोगदुःख साहावया जाण । समर्थपण मज नाहीं ॥६८॥ आमुचा हाचि लाभु अव्यंग । जे तुझिया पायांचा संयोग । त्यांचा न साहवे वियोग । देहभंग झालिया ॥६९॥ देह राहेल तरी राहो । अथवा जाईल तरी जावो । तुझ्या चरणांचा वियोग पहा हो । न शके साहों सर्वथा ॥३७०॥ थोर दुस्तर तुझी माया । ब्रह्मादिकां न ये आया । मज सुगम जाली तरावया । यादवराया निजशेषें ॥७१॥


एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

त्वयोपभुक्तस्रग्गन्ध वासोऽलङ्कारचर्चिताः । उच्छिष्टभोजिनो दासास्तव मायां जयेम हि ॥४६ ॥

तुझें गंधशेष आणि माळा । धरितां कपाळीं आणि गळां । मी नागवें कळिकाळा । दास गोपाळ पैं तुझा ॥७२॥ तुझे कांसेचा पिंवळा । येऊनि माझे कांसे लागला । तैंचि कामु म्यां जिंतिला । दृढ जाहला निजकांसे ॥७३॥ तुवां आपुले हृदयींचें पदक । जेव्हां मज दिधलें देख । तेव्हांचि माया जाहली विमुख । दासां सन्मुख न राहे ॥७४॥ मायेसी असतें मुख । तरी हों लाहती सन्मुख । ते मिथ्या गा निःशेख । वृथा लोक भ्रमले पैं ॥७५॥ तुझें उच्छिष्ट सेवितां देख । लाजोनि जाये समाधिसुख । निडारला निजात्मतोख । शेषें प्रत्यक्ष निजलाभु ॥७६॥ ऐसा तुझेनि दास्यें सरता जाहला । तुझेनि निजशेषें चर्चिला । तुझी माया मी तरला । जिया धाकु लाविला योगियां ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

वातवसना य ऋषयः श्रमणा ऊर्ध्वमन्थिनः । ब्रह्माख्यं धाम ते यान्ति शान्ताः सन्न्यासीनोऽमलाः ॥४७॥

मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिघाले कपाटीं । जरी सांडिली लंगोटी । तरी पोटीं धाकती ॥७८॥ आसनस्थ होऊनि जाणा । आकळावया प्राणापाना । मूळबंधें आकोचना । दृढ धारणा ते करिती ॥७९॥ अंगुलें बारा बारा । जिणावया जी वारा । रात्रंदिवस शरीरा । अभ्यासद्वारा आटिती ॥३८०॥ क्षुधेनें खादली भूक । तृषा तहान प्याली देख । जिणोनियां सुखदुःख । अतिनेटक निधीं ॥८१॥ सुबुद्धि धरूनिया हातीं । आकळूनि इंद्रियवृत्ती । वैराग्यें करित ख्याती । ऊर्ध्वगती निघाले ॥८२॥ भेदोनि मणिकर्णिका वोवरी । उसळले जी ब्रह्मरंध्रीं । जिणोनियां ब्रह्मगिरी । निशाणभेरी लाविल्या ॥८३॥ तेथ शांतीचेनि योगें । विलसत सर्वांगें । संकल्पत्यागवेगें । जाहले अंगें चिद्ब्र।ह्म ॥८४॥ ऐसे योगबळें योगी । माया जिणती अंगोअंगीं । त्याहोनि अतिसुगम मार्गीं । आम्हांलागीं त्वां केली ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४८ वा

वयं त्विह महायोगिन् भ्रमन्तः कर्मवर्त्मसु । त्वद्वार्तया तरिष्यामस्तावकैर्दुस्तरं तमः ॥४८॥

भजावें तुझिया निजभक्तां । ऐकावी तुझी कथावार्ता । इतुकेनि तरलों जी सर्वथा । कृष्णनाथा निजमाया ॥८६॥ आम्हां कर्ममार्गींचिया कर्मठां । तुवां उपकारु केला मोठा । तुझ्या कथेचा श्रवणपाठा । मुक्त दारवंठा मोक्षाचा ॥८७॥ असो मोक्षाची कथा । चाड नाहीं गा सर्वथा । तुझ्या भक्तांसी तुझी कथा । करितां भवव्यथा न बाधीचि ॥८८॥ तुझे अभेद भक्तीचें कोड । आम्हां संसारुचि गोड । ठेंचूनि त्रिगुणांचें तोंड । भक्त प्रचंड भजताति ॥८९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४९ वा

स्मरन्तः कीर्तयन्तस्ते कृतानि गदितानि च । गत्युत्स्मितेक्षणक्ष्वेलि यन्नृलोकविडम्बनम् ॥४९॥

तुझ्या चरित्राचें श्रवण । आवडीं करितां कीर्तन । त्यांचा भवबंध च्छेदन । बळेंचि जाण तूं करिशी ॥३९०॥ पुसोनिया संसारभावो । निजपदीं देसी ठावो । हा श्रवणकीर्तनलाभ पाहा हो । आम्ही सहजें लाहों निजभक्त ॥९१॥ स्वभावें कीर्तन करितां । एवढा लाभु होये तत्वतां । या तुझिये मुखींच्या कथा गातां । आपणियां देता तूं होशी ॥९२॥ तुझीं गोकुळींचीं गमनपदें । आवडीं वर्णिती जे आनंदें । त्यांसी खांदीं वाऊनि निजबोधें । कीर्तनच्छंदें नाचशी ॥९३॥ तुवां जे केली लीला । ते आवडी गातां जी गोपाळा । नित्य त्या सेवकांजवळा । अंगें अंगवळा तूं होशी ॥९४॥ तुझें वर्णिती जे हास्यवदन । त्या भक्ताचें तूं करिशी ध्यान । त्यांचेनि बोलें समाधान । स्त्रीशूद्रां जाण तूं देशी ॥९५॥ तुझें दृष्टीचें दर्शन । दृश्यातीत निरीक्षण । सर्वत्र देखणेंपण । कीर्तनीं गान जे गाती ॥९६॥ त्यांच्या पाउलांपाउलांसी । आपुलें सर्वांग तूं वोवाळिसी । अंग टाकूनि तिष्ठसी । त्यांपाशीं सर्वदा ॥९७॥ आपुली गुह्य ज्ञानमुद्रा । त्यांसी अर्पिसी तूं ज्ञानीनरेंद्रा । निजबोधें प्रबोधचंद्रा । त्यांच्या निजभद्रा तूं करिशी ॥९८॥ रासक्रीडादि नाना छंद । अंगनामंगनादि प्रबंध । कीर्ति अतिशयें विशद । भावार्थें शुद्ध जे गाती ॥९९॥ कां ठकूनियां ब्रह्मयासी । गोपाळवत्सें तूं जाहलासी । ऐसऐ सिया विनोदांसी । हृषीकेशी जे गाती ॥४००॥ त्यांसी सर्वांभूतीं निजात्मता । देशी तूं आपुली सत्ता । त्यांच्या बोलांमाजी वर्तता । कृष्णनाथा तूं होशी ॥१॥ मनुष्यनाट्याचेनि योगें । जें जें केलें तुवां अंगें । तें गातां ऐकतां अनुरागें । तरले वेगें निजभक्त ॥२॥ म्यांचि केली जे जे आळी । ते त्वां पुरविली सर्व काळीं । त्या मज उपेक्षूनि वनमाळी । अंतकाळीं कां जाशी ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक ५० वा

श्रीशुक उवाच । एवं विज्ञापितो राजन्भगवान्देवकीसुतः । एकान्तिनं प्रियं भृत्यमुद्धवं समभाषत ॥५०॥

इति श्रीमद्भािगवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे षष्ठोऽध्यायः ॥६॥

एवं यापरी देवकीसुत । पूर्ण पूर्णाशें भगवंत । विनविला श्रीकृष्णनाथ । निजभृत्य-उद्धवें ॥४॥ 'निजभृत्य' म्हणणें । उद्धवासी याकारणें । निजगुज श्रीकृष्णें । त्यासीं बोलणें सर्वदा ॥५॥ जेथ रिगमु नाहीं रुक्मिणीसी । ठावो नाहीं वसुदेवदेवकीसी । बळिभद्रा प्रद्युम्नासी । अनिरुद्धासी जे ठायीं ॥६॥ ते ठायीं कृष्णाप्रती । उद्धव असे अहोरातीं । यालागीं पैं 'एकांती' । ज्ञाते म्हणती तयासी ॥७॥ श्रीकृष्णासी वाडेंकोडें । जीवापरीस जें जें आवडे । तें उद्धवासी देणें घडे । प्रेम गाढें भक्तांचें ॥८॥ देतां तो जरी नेघे । तरी धांवोनि आलिंगी वेगें । न घेतां देवो पायां लागे । भक्तपांगें पांगिला ॥९॥ यालागीं कृष्णासी प्रियकर । उद्धवुचि साचार । याहूनि प्रेम थोर । नाहीं सधर आनाचें ॥४१०॥ यालागीं 'प्रिय-भृत्य-एकांती' । ये बिरुदें उद्धवासी साजती । तेणें निजस्वामीस विनंती । निजप्रीतीं पैं केली ॥११॥ ऐकोनि उद्धवाचें वचन । चातकांलागीं जेवीं घन । तेवीं वोळला जगज्जीवन । स्वानंदघन निजबोधें ॥१२॥ चातकाची तहान किती । तृप्त करूनि निववी क्षिती । उद्धवउीद्देशें श्रीपती । त्रिजगती निववील ॥१३॥ ऐकतां उद्धवाचे बोल । येताति श्रीकृष्णासी डोल । भक्तभाग्य जी सखोल । जाहली वोल प्रेमाची ॥१४॥ ते वोळले भक्तभूमीसी । निजबीज पेरील हृषीकेशी । तें पीक पुरेल जगासी । मुक्तराशी मुमुक्षां ॥१५॥ धेनु वत्साचेनि वोरसें । घरा दुभतें पुरवी जैसें । तेवीं उद्धवाचेनि उद्देशें । जग हृषीकेशें निवविजे ॥१६॥ घरीं पाहुणयालागीं । कीजती परवडी अनेगी । तेथ बालकें जेवीं विभागी । होतीं वेगीं न मागतां ॥१७॥ पक्वान्न सेवूं नेणतीं बाळें । तरी माता मुखीं घाली बळें । तैसें जनार्दनें आम्हां केलें । स्वयें दिधलें निजशेष ॥१८॥ नवल कृपा केली कैशी । कृष्ण उद्धवातें उपदेशी । तोचि अर्थ दिधला आम्हांसी । देशभाषीं अर्थितां ॥१९॥ एका जनार्दनु म्हणे । श्रोतां सावधान होणें । हें मी तोंडें बोलों कवणें । तिंहीं मज करणें सावध ॥४२०॥ निजभक्तें केली विनंती । निजज्ञान बोलेल भक्तपती । श्रवणाची सावध पंक्ती । बैसवा वृत्ति तद्बोतधें ॥२१॥ येथ मुक्तांचें कोड । पुरे मुमुक्षांची चाड । येचिविषयीं कथा गोड । श्रवणकवाड उघडेल ॥२२॥ उद्धवें श्रीकृष्ण विनविला । ना तो श्रवणीं डांगोरा पिटिला । मुमुक्षां म्हणे चला चला । कृष्ण वोळला निजबोधें ॥२३॥ मोक्षमार्गींचे कापडी । अर्थतृषातृषितें बापुडीं । प्रबोधबोधाची पव्हे गाढी । उद्धवें रोकडी घालविली ॥२४॥ भक्तिजननी माझी तेथ । कडे घेवोनि होती नेत । जनार्दन परमामृत । जाहलें प्राप्त तिचेनीं ॥२५॥ ते तुझी भक्ति तत्वतां । आम्हांसी असावी सर्वथा । तुज मागावी मुक्तता । तंव ते मूर्खता भक्तांची ॥२६॥ साच असावी बद्धता । तरी म्यां मागावी मुक्तता । तेचि नाहीं गा तत्वतां । मिथ्या मागतां मूर्खता ॥२७॥ मीतूंपणेंवीण सहजस्थिती । तुझी असो अभेद-भक्ती । हेचि मागणें पुढपुढतीं । संतांप्रती सर्वदा ॥२८॥ उद्धवासी ज्ञान गुप्त । उपदेशील कृष्णनाथ । एका जनार्दन विनवित । दत्तचित्त तुम्ही दीजे ॥४२९॥

इति श्रीमद्भािगवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां देवस्तुत्युद्धवविज्ञापनं नाम षष्ठोऽध्यायः ॥६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥५०॥ ओव्या ॥४२९॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]