'मैत्र'

 चढणारी रात्र. त्या अनोळखी रस्त्यावरून ते पाचजण वाढविता येईल तेवढ्या वेगाने पुढे जात आहेत. शेजारून म्हणजे जेमतेम फर्लांगभर अंतरावरून तापी वाहतेय. नीरव रात्री तिच्या वाढत्या पाण्याचा घनगंभीर नाद कधीतरीच जाणवतो. निरभ्र आकाश. पण अंधारात लपेटलेलं. काल शहाद्याकडे येताना सातपुड्याचे दुरून दर्शन झाले होते. ती बहुधा कृष्णपक्षातली रात्र असावी. सातपुडा पाहून तिला महानुभाव पंथाचा संस्थापक चक्रधर आठवला. त्याच्या देखण्या पुरुषी कमळकान्ती देहावर भाळलेली, सातपुड्यात तप करणारी योगिनी आठवली. पुरुष देहाच्या तृप्त मोहात लपटलेली आठवून तिला खूप हसू आलं. म्हणे योगिनी!! "मीनू जरा वेगाने चाल. पावलं उचल. उमन्या भिल्ल बिचारा पुढे जातो नि आपल्यासाठी थांबतो." सदा.
 "दीदी, ताडाताडी चालबेन..." शुभेंदू.
 "अरे चालतेच आहे की भरभर, रस्ता पायाखालचा नाही ना... मग चाचरायला होतं. ए शिष्टपणा करू नका. उमन्यासारखे तुम्ही दरारा पुढे चालायला लागा आणि मग, माझ्यासाठी थांबा. तेवढेच श्वास घ्यायला निवान्तपणा" मीनूचे घुश्श्यात उत्तर.
 पंधरा मिनटे गवतातून चालणाऱ्या पावलांचे आवाज आणि अचानक दूरवर मंद उजेडाचे ठिपके दिसू लागले. उमन्याने एक विचित्र आवाजात हाकारा घातला आणि खुणेचे शीळ घातली. तीन-चार उजेडाचे ठिपके जवळ येऊ लागले. या सगळ्यांच्या पावलांचा वेग वाढला.
 "दादा, चिनावल उनात... चिनावल आलं. ती माणसं आपल्याला घ्यायला आली हाईत." उमन्याच्या आवाजातही सर्वांना घेऊन ठिकाणी पोचल्याची निश्चिती होती.
 त्या झोपडीवजा घरात सगळे शिरले. उमन्याचे आत जाऊन चकचकित पितळी तांब्यात पाणी आणलं. घरातल्या बायांनी दोन ताटं आणली. एकात नागलीच्या लाल भाकऱ्यांची चवड आणि दुरीत सोललेले कांदे आणि निखाऱ्यावर भाजलेल्या मिरच्या. तिसरी वाट्या घेऊन आली नि चौथीचे वरणाचं भगुणं पातेल आणलं. इतक्यात वसू आत आली.
 "या बराच उशीर केलात. चिनावल तसं फार दूर नाही शहाद्याहून असेल चार कोस. म्हणजे आपले दहा-अकरा किलोमीटर्स, मीने तू नि सदा कधी पोचलात? मी आज सकाळी येथे पोचले उद्याचा दिवस येथेच. बायांचा मेळावा मिने तू आणि मी पाहायचा. तानीबाई आहेच मदतीला. जेवा नि चल झोपायला." असे म्हणत तिने त्या स्वच्छ आणि नेटकेपणानी सारवलेल्या जमिनीवर बसकण मारली. एकेका वाटीत वरण ओतू लागली.
 वरण-भाकरीचा पहिला घास पोटात घातला नि पोट धवळून निघालं. पण दिवसभराच्या भुकेनं घास गोड करून मीनूने गिळला.
 "मीने, उदंडाचं वरण नि नागलीची भाकरी खाताना पहिला घास गळ्यात अडतो. पण सवय झाली की मस्त मजा येते खाताना. माझी आजी म्हणायची घास चावून चावून खाल्ला की अन्नाला गोडी येते..."
 भुकेपोटी त्या भाजल्या मिरचीला मीठ लावून भाकरी खाताना जिभेची चव वाढतच होती. जेवणं झाली आणि सगळे झोपायला शेजारच्या झोपडीत गेले. लांब लांब शिवलेलं, पोती जोडून केलेलं जाजम. त्या वर आधी आलेले सर्व कार्यकर्ते झोपले होते. त्याच रांगेत वसू टेकली.. "मीने येथे भेदाभेद नस्से. तण्णावून झोप. वुई ऑल आर फ्रेंड्स. आणि मित्रत्वाला, सहकार्याला लिंग नसते. बी कम्पर्टेबल. तू नवी आहेस, पण रुळशील आईस्ते आईस्ते. मीनूला हे सांगता सांगता वसू घोरायला लागली."
 मीनू मात्र कितीतरी वेळ जागी होती, मग केव्हा तरी झोप लागली...
 ...मीनाला या कामाला सुरुवात करतानाचा पहिला अनुभव आठवत होता. त्यालाही पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत.

* * *
 "मीने बी. ए. नंतर पुढे काय करण्याचे ठरविले आहेस?"
 "वशे तुझा काय विचार? नीते तू काय करणार आहेस?" अशा त्या वेळच्या मैत्रिणींच्या गप्पा.
 "नीतूला काय विचारतेस? ती बेकंबेचा पाढा म्हणत जगणार. देखणा, पगारदार नवरा... गोंडस मुलं... त्यांची वाट पाहत नि त्यांना छान छान पदार्थ तयार करून खाऊ घालण्यात धल्ली माय-म्हातारी होणार. नातवंड-पतवंड खेळवीत राम म्हणणार. होय नीते?" वशीने मारलेला टोमणा. तोही मीनूला आठवला. आणि खूप हसू आले.
 सुखवस्तू मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या, तेही सांगलीसारख्या काहीशा पारंपरिक ब्राह्मणी घरात वाढलेल्या मीनूला पुढे काय करायचे हा प्रश्नच पडला होता. तिने आणि सदूने मुंबईच्या समाजविज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. एक वेगळी वाट म्हणून... "सदू रेडलाईट एरिया म्हणजे काय रे? पुढचे आठ दिवस आमच्या गटाला फिल्डवर्कसाठी तो भाग पालथा घालायचाय." मीनूचा प्रश्न

ऐकून सद्याने कपाळाला हात लावला होता.
 "मीने, तुझी लाईनच चुकली. येथे 'टीस' ला येण्यापरिस तू पुण्यातल्या एस. पी. कॉलेजमधून इंग्रजी नाही तर मराठी हा विषय घेऊन "यमे" करायच्या लायकीची आहेस: तुझं फिल्डवर्क संपल ना की मग तूच मला या शब्दाचा अर्थ समजावून दे. जा आता हॉस्टेलमध्ये." तेव्हाचे सद्याचे उत्तर.
 टीसची दोन वर्षे भन्नाट झपाट्याने पळत संपली. दिवस केव्हा उगवले नि मावळले ते कळले नाही. दारिद्र्यातून येणारी किळसवाणी असहाय्यता, वयाची चाळीशी जवळ आली तरी संध्याकाळ झाली की, चेहऱ्यावर रंगरंगोटी फासून, दारात पदर पाडून, बसणाऱ्या बाया... त्यातल्या एका सुशीची मीनूशी थोडी गडद ओळख झाली होती.
 "मीनूताय, माझं एक काम कराल? काम लई अवघड नाय. पण मी अडानी. ग्येली पंधरा वर्ष तुमच्यासारख्या इस्टुडंटला भैन मानून ह्ये काम करून घेती. तुमीबी करतालच की!" सुशीचा विश्वास दाखवीत आग्रह.
 "माझी लेकरं माजी भैन सम्भालती. येक पोरग हाय नि येक पोरगी. पोरं शिकताहेत. पोरगी आठवीला हाय नि पोरगं बारावीला. त्यांच्या खर्च्यासाठी म्हैन्याला पैशे पाठविते मी. येवढे हजार रुपये बार्शीला पाठवायचे. हा पत्ता." एका जाड कागदावर पत्ता लिहिलेला होता. "शंभरच्या दहा नोटा आणि वर पन्नास हाईत. आता पैशे पाठवाया बी पैशे लागतात." असे म्हणत तिने पैशे मीनूजवळ दिले. सुशीची ओळख अधिक गडद होत गेली. सुशीची केस... सुशीची जीवन कहाणी मीनूने "केस स्टडी" म्हणून अभ्यासायची ठरविली.
 सुशी केज तालुक्यातल्या चिंचोलीची. सातवीपर्यंत शिक्षण झाले. तेही शाळेत न जाता, फक्त परीक्षेपुरते शाळेत जायचे. गाइड पाहून पेपरावर चार रेघोट्या मारल्या की पास! त्या उन्हाळ्यात ती शहाणी झाली आणि बापाने कळम जवळच्या झाकोळ्यातल्या तानाजी लगड बरोबर लग्न लावलं. तानाजीला दोन एकर शेत होतं. पण कोरडवाहू आषाढ श्रावणातल्या पावसावर तीळ, उडीद, मूग, पिवळी ज्वार असे पीक बरे येई. तो सहावीतूनच घरी बसला होता. सुशी वयात येऊ लागली तसा रंगरूपाला उजाळा येऊ लागला. पंधरा वर्षांची झाली तेव्हा पहिलं लेकरू आलं.
 "उगा अंगठ्याएवढा वळवळता जीव. चार दोन तास काढले बिचाऱ्याने. सूर्व्य पहाया अगुदरच डोळे मिटले. जीव मातीत गाडला. दर दीड वर्स्याला ह्ये असं व्हायचं मी बी जरा जाणती झाल्ये. चंदू झाला तवा शानीन होऊ था वरसं झालीवती. ईस वरिसांची व्हती. तवा चंद्या जलमला... नंतरची वरीस दोन वरसं बरी ग्येली. पन मग समदीच चित्तरकथा."
 सुशी थोड बोले नि मग मध्येच थांबे. डोळे संतापाने फुलणारे श्वास उफाळणारा. अशावेळी मीनू म्हणे, "येऊ मी?... उगा नको विचार करुस."
 पण मीनूच्या डोक्यात तोच विचार. समाजातले खालचे नि वरचे, जमिनीच्या पोटातले असतात तसे न दिसणारे स्तर, अर्थात अभ्यासक्रमाचा अपरिहार्य भाग म्हणून उलगडून पाहताना मीनू त्यात लोणच्याच्या फोडीसारखी मुरू लागली.
 सुशीच्या केसचा अभ्यास करताना रमण भेटला. त्याने मानसोपचारावर आधारीत कौटुंबिक सल्ला हा विषय निवडला होता. त्याचीही मदत झाली.
 "ताई येक इचारू का?" सुशीचा तेव्हाचा प्रश्न.
 "विचार की!"
 "तुम्ही माझ्या भैनीला, चंद्याला, माझ्या रानीला भेटून आलाव. ताई, नवरा लई माराया लागला वो, एकदा तर अंगावर राकील टाकलं आमच्या. माझी म्हातारी सासू मध्ये आली म्हणून वाचले. म्हणाली, त्या गाढवाला धा बाया मिळतील. त्या बी दोन लगनाच्या. पण लेकराचा माय न्हाई मिळत. तवा तू सूट हितून. कितींदीस मार खाशील? तुझ्या बापाकडून पैशे आन म्हंतो, तो बाप जाणार रोजंदारीनं. लोकांच्या शेतात. कुठून आणावा पैसा? बाईला तरी लुगडं फेडून बसली तरी चार पैशे मिळत्यात. पण म्हाताऱ्या बापानं कुटून आणावा पैका? जा माय. पुन्ना फिरकू नकं इकडं..."
 ... म्हाईरी गेले तर बाप म्हणाला. नवऱ्या घरीच मर. पण माझ्या दारात नगं येऊ. बिनभावाच्या पाच भैनी तुम्ही. माय मरून ग्येली. मला बी कस्ट व्हईनात. मालकीन शिळा भाकर तुकडा फेकती त्यावर जगतो मी. ये पन्नास रुपये घ्ये आन् जा कुठंबी... "बोलताना पुन्हा धाप लागली बापाला मग परत नवऱ्याकडे. आणि एक दिवस रात्री नवऱ्यानेच एक पुरुषाला घरात घालून बाहेरून कडी घातली."
 शेतातलं कुडाचं, शेणामातीनं लिपलेल घर... सकाळी सुशीच्या शरीराचे हाल हाल करून तो माणूस निघून गेला. सुशीनं लेकरू, बापानं दिलेले पन्नास रुपये घेतले नि तिने बार्शीचा रस्ता धरला.
 चंद्याला भैनीकडं ठेवलं. भैनीच्या घरी राहून धुणं-भांडी झाड लोटीचं काम करीत होती. तिथंच शेवंताबाईची वळख झाली. ती भैनीला पैशे द्यायला आलीवती. तिची चित्तरकथा माझ्या सारखीच. लेकरू व्हाया आधीच विधवा झाली. दिरानं ममईला नेतो म्हणून रेड लाईट एरियात येऊन एका मालकिणीकडे भरती केलं. पैशे घेऊन तो फरारी झाला. तिची भैन बारशीत असती. तिथंच ती खोली घेनारेय. म्हातारपणासाठी. तिच्या बरूबर मी बी आल्ये हितं रेड लाईट एरियात.
 मीनूने अनेक प्रकरणे हातळली. पण सुशीशी वेगळे मैत्र निर्माण झालेय. तिला आणि तिच्या मुलांना मदत करण्यात एक आपलेपणा आपोआप आलाय.
 एक दिवस सुशी थेट औरंगाबादला येऊन थडकली. अर्थात फोनबिन करून.
 ताई माजा चंद्या आता लई मोठा झालाय. साळंत मास्तर झालाय. मावशीकडं दोगं बी ऱ्हातात. उद्या मी म्हातारी झाल्ये की मला सांबाळील का व त्यो? त्याला माय काय धंदा उरती त्ये म्हाईत न्हाई. त्याला वाटतं ममईच्या म्युन्शीपालटीत माय रस्ते झाडायचं काम करती...
 ...ताई माझं रूप लई उजवं होतं. एक मालक लई भाळला माझ्या रूपावर. दर एक दोन दिसाआड यायचा. मी बी तो म्हनंल तस्सं, करायची. त्याच्याकडे एक पुस्तक व्हतं. त्यातलं पाहून काय... काय कराया सांगायचा. मी बी तो म्हनलं तशी वागायची. मला लई छान वाटायचं. त्यानंच ही खोली इकत घेऊन दिली. धा तोळे सोनं बी अंगावर घातलं. त्यावेळी मी भैनीला चार चार हजार रुपये बी द्यायची. भैनच ती. जीवाला जीव देणारी. लेकरू बाळ नव्हत. मेहुणा बी मयाळू. त्याला मी काय करती त्ये ठाऊक नव्हतं. त्याला बी वाटे की सुशी ममईत झाडू मारती. तो ग्येला मरून. बार्सीत घर हाये. मिलमंदी कामाला होता. माझ्या लाडक्या मालकाची खूण म्हंजी माजी रानी. हेमा, चंद्याला वाटतं त्याचा नि तिचा बाप येकच हाय.
 ताई, लेकरं माझ्यावर लई माया करतात. त्यांची माय पैशे कशी मिळवते, रानीचा जलम कसा झाला हे त्यांना कळलं तर...? अशात लई भ्या वाटतं. रानील तर मी लई शिकविणार हाये. तिच्या बापाला मी फोटू दावायची. अक्षी हेमामालिनी वानी गोल गोंडस चेहेरा. मालकानीच हे नाव सांगितला तिच्यासाठी पैशेबी ठेवलेत. बार्सीच्या बँकीत. पन अशात ती हट्ट करत्ये. म्हनते. मला पप्पांकडे ने त्ये का येत न्हाईत. उद्या मोठी झाली की काय सांगू तिला? त्यो मायाळू दादाप्पा... मालक ॲक्शिडेंटात मरून ग्येला"
 पुढचा दिवस उगवताच असतो. तसे मागोमाग उगवणारे व मावळणारे दिवस, महिने आणि वर्षे. मीनू त्या आज सुशीला मनापासून आठवते आहे.
 भलेही केस स्टडी करीत असली तरी तेव्हा मीनूचे वय जेमतेम बावीस वर्षांचे. मैत्रीच्या एक अगदी कोमल पण चिवट बंध दोघीत जोडला गेला होता. आजही आहे. कुठे असेल सुशी?... हा प्रश्न नेहमीच मनासमोर येई.
 गेले महिनाभर मेळघाट, सेमाडोह, चंद्रपूर, गडचिरोली भागात हिंडून तिथल्या आदिवासींच्या साठीच्या विविध प्रकल्पांच्या कामांना भेटी देऊन त्यात काय त्रुटी आहेत, काय हाती आले आहे याची मांडणी करून, आढावा घेण्याचे काम मीनू आणि सद्याने घेतले आहे. काही वर्षे मीनूने नोकरी केली. नोकरी चांगली होती. पगार खूप होता. पण मानसिक समाधान फारसे नव्हते. सरकारी नोकरी म्हटली की असेच असते. नुस्ती भटकंती आणि काम चालू आहे, उत्तम चालले आहे. हे दाखविण्यासाठी, वरिष्ठांच्या हुकुमावरून कागदी घोडे नाचवायचे. आठ वर्षे नाचवले घोडे. पण नंतर कायमचा रामराम ठोकला. औरंगाबादेत छोटेस घर घेतले. मीनूने सादाशी लग्न करावे म्हणून आई-वडील, भाऊ सगळ्यांनी आग्रह केला. परंतु या काहीशा वेगळ्या कामात बुडून गेल्यापासून लग्न करावेसे वाटले नाही. पुरुषाच्या शरीराच्या स्पर्शाची ओढ जाणवली नाही. किंवा असेही असेल. परित्यक्ता, एकाकी, विधवा अन्याय सोसणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न जाणून त्यांचे विविध मार्गांनी पुनर्वसन करण्याचे सुरुवातीला केलेले काम, गेल्या दहा वर्षांपासून विविध स्वयंसेवी व अशासकीय प्रकल्पांच्या कामांचे मूल्यांकन करून त्याचा लेखी दस्तऐवज तयार करण्याची फ्रीलांन्सिंग पद्धतीने घेतलेली जबाबदारी, गुत्तं घेऊ केलेले काम म्हणा की, यात मीनू इतकी अडकली की, शरीराच्या भुका, अपेक्षा जाणवल्याच नसतील. ती काय किंवा सदा काय. दोघेही सारखेच. गेल्या पंचवीस, अठ्ठावीस वर्षांचा सहवास. घट्ट मैत्री. टाळ्यांची देवघेव. चिमटे काढणं, पाठीवर थाप मारणे, हे सारं सहजपणे.
 लिंगसमभावाची संकल्पना विविध संघटना, संस्थांतील शिबिरांतून कार्यकर्त्यांच्या तना-मनावर गोंदविताना आपल्या लिंगाशी जोडलेल्या मानसिक, शारीरिक भावना, जाणिवा... अपेक्षा आटून गेल्या असतील का, असा प्रश्न मीनूला अधून मधून सतावत असे. सदाजवळ हे सारे बोलून दाखविले की, तो तिच्या डोक्यावर टपली मारून "मुर्ख आहेस" असे म्हणे. मेळघाटातून आल्यापासून मीनू काहीशी अस्वस्थ आहे. आज संध्याकाळी लांब थेट माइल स्टोनपर्यंत फेरफटका मारून आली. लहानपणचे, कॉलेज जीवनातले फोटो काढून बसली. असिम आणि गीताला फोन लावून गप्पा झाल्या त्यातही उल्फाची चळवळ , जवळ आलेल्या बिहूची तयारी. यावर चर्चा. तरीही मन अशांत. शेवटी तिने वसूला पत्र लिहायला घेतले,
 "प्रिय वसू, परवा सकाळी मी आणि सदा मेळघाटातून औरंगाबादेस परतलो. रात्री जाग आली तेव्हा अंगावरून कुणाचा तरी हात फिरतोय असा भास झाला. पण तो भास नव्हता. ते हात सद्याचे. मी दूर होऊ लागले तर त्याने होता नव्हता जोर एकवटून मला गच्च आवळून धरले...
 वसू अंतर्यामी मीही सुखावत होते. तरुणाई हरवलेल्या प्रौढत्वाच्या अखेरच्या वळणावर आम्ही दोघे. अट्टाहासानं... तत्त्व म्हणून नाकारलेले कोंडलेले नैसर्गिक लिंगभाव या अखेरच्या वळणावर का उसळून यावेत? वसू तू आणि शुभेन गेली बावीस वर्षे एकत्र राहता. शुभेन तुझ्यापेक्षा चार वर्षांनी लहानच. तुम्ही राहायचे ठरविलेत. अर्थात एकत्र काम करताना शरीराने साद घातली तर नकारणार नाही तोही एक अनुभव. या भूमिकेतून त्याकडे पाहू. लग्न हे बंधन... परंपरेने लादलेलं. ते नको निखळ "मैत्री" हवी."...कधी भुवनेश्वरला आलात तर कळवा. मी चार दिवस येऊन मोकळी होऊन जाईन. तर वसू खरे "मैत्र" मला कळलेच नाही. कबुली फक्त तुझ्याजवळच.
 - तुझी मीनू.