कॅलेंडर

 निरूपमाचे कॅलेंडरकडे लक्ष गेले. दोन हजार चारच्या जानेवारीची अठरा तारीख म्हणजे फेब्रुवारी अगदी पुढ्यात येऊन उभा राहिलाय.
 पाहाता पाहाता सहा वर्षे उलटून गेली आहेत. पण या वर्ष उलटण्याला 'पहाता पहाता' हे उपपद जोडणं बरोबर होईल का? काल आईबरोबर ती दवाखान्यात गेली तेव्हा डॉक्टरीणबाई अगदी सहजपणे म्हणाल्या होत्या की पाहाता पाहाता सहा वर्षे उलटली. आणि त्यांनी आईकडे काहीशा काळजीने पाहिले.
 "निरूच्या आई, ही औषधं ठेवली आहेत. आहारात पालक, मेथी, तांदुळजा आलटून पालटून देता ना? गूळ, शेंगदाणे, मोड आलेली कडधान्ये वगैरे जेवणात असते ना?..."
 "होय ताई. हिचा बाप रोज दारू ढोसून येतोय. पेन्सनचे पैशे अर्धेमुर्धे त्यातच जातात. पन, मी म्हशीच्या दुधाचा पैसा त्याच्या हाती लागून देत न्हाई. आन् त्यांच्या सायबाला बी सांगून ठेवलंय. तो सायब बरा हाय. बिचारा दर महिन्याला हजार रुपये माझ्या हातावर ठेवतो. झेडपीतल्या डायवरला पेन्सन ते कितीसं? पन त्यातला अर्धा भाग देतो बिचारा. पण हा साहेब बदलला की पुन्हा...?" आईनेही पुढची काळजी बोलून दाखवली होती.
 आज कम्प्युटर क्लासकडे निरूपमाचे पायच वळेनासे झालेत. या ठिकाणी शिकवायला जाऊ लागली त्यालाही तीन वर्षे उलटून गेली आहेत. ती क्लासमध्ये गेली की तिथले प्रमुख तिचं हसून स्वागत करतात. आणि अगदी न चुकता.
 "बरी आहेस ना निरू?", असं विचारतात.
 "निरू, अग दहा वाजून गेले. चल माय थोडी पोळीभाजी खाऊन घे. आन् निघ. अकराला क्लास आहे ना तुझा? चल माय. मी आज मेथीची मुद्दाभाजी केलीया. वरून लसनीची खमंग फोडणीबी केलीय, लाल मिरच्या चुरडून टाकल्यात त्यात. तुला आवडते, अशी वरून फोडणी घ्यायला. निचिंतीने जेव." आईने वाढलेले ताट खाली ठेवले. पुढे पाट मांडला. आणि निरूपमला हाक दिली.
 निरूपमा पुढ्यातली पोळी मुकाट्याने पोटात ढकलू लागली. गेल्या काही दिवसांपासून सात फेब्रुवारीचा चौकटीतला आकडा मोठा मोठा होत जातो. अन् वाटतं त्या साताच्या गोलात आपला फिक्कट... निस्तेज गोरागोमटा गळा अडकलाय. आणि त्या गळ्याला ओढणारा तो अर्धगोलाकार दोर. फास आवळणारा. आई तव्यावरची तूप माखलेली तांबूस पोळी लेकीच्या ताटात टाकते आणि काहीसे रागावून बोलते.
 'उगा कशाला काळजी? समोर येईल तेव्हा बघू. आतापासून कशाला गं घोर? जेव माय.
 क्लासकडे जाताना वाटेत राणी ताई, संस्थेच्या वकीलताईंनी त्यांची लूना थांबवून निरूला संध्याकाळी येण्यासाठी बजावले. परवा तिची तारीख आहे त्याची आठवण करून दिली.
 क्लासचा जिना चढून आल्यावर तिने मस्टरवर सही केली. सवयीने नोटीस बोर्ड बघितला. बहुजन समाज पार्टीचा कोणी तरुण पुढारी महाराष्ट्राचा दौरा करतोय. संध्याकाळी बैठक बोलवलीय. क्लासच्या वरच्या गच्चीवर. तिने नोटीस वाचली. मागास, अतिमागास, इतर मागास, आदिवासी वगैरे जातीतील तरुण-तरुणींनी बैठकीसी यावे. आणि एकत्र येऊन मागण्यांच्या निवेदनावर सह्या कराव्यात. हे लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधानांना २६ जानेवारीस दिले जाणार आहे. ती नोटीस पाहून तिला वाटले त्यात एक दुरुस्ती करावी. 'वगैरे' या शब्दाच्या आधी 'आणि समाजातील सर्व महिलांनी' हे वाक्य टाकावे. त्याचक्षणी एक प्रश्न तिच्या मनात उगवला. वंचित वर्गातील लोकांना विविध सवलती दिल्या, संधी उपलब्ध करून दिल्या तर आर्थिकदृष्ट्या ते सबल होतील,... ऐहिक विकासही होईल. पण ज्यांची मनंच गेल्या हजारो वर्षापासून विचार करण्याच्या क्षमतेपासून वंचित ठेवली गेली आहेत त्यांचा विकास कसा होणार? विकास म्हणजे नेमके काय? विकास, हा आर्थिक? की वैचारिक? की भौतिक?
 घाईघाईने फळा पुसून टांकावा तसे तिने मनात उगवलेले विचार पुसून टाकले. पण तरीही धुरळा उडालाच. मनात काय काय येऊ लागले.
 तिच्या टेबलावर सहा-सात पत्र कम्प्युटरवर काढण्यासाठी ठेवली होती. संध्याकाळपर्यंत सर्व पत्रांचे प्रिंटआउटस् काढून सरांच्या टेबलावर जायला हवे होते. तिची बोटं सराईतपणे कम्प्युटरवर लयीत नृत्य करू लागली. दुपारच्या सुट्टीत ती आणि मीना डबा खायला बसल्या. तेवढ्यात तिथे नवीन ही टपकला.
 "निरूजी, मैने आपके लिये मेथी और हरी धनियाका ठेपला लाया है, मीनाजी आप भी चखकर देखिये." काहीशा नाटकीपणाने म्हणत त्याने प्लास्टिकच्या पिशवीतून मेथीचे देखणे ठेपले काढले आणि त्यांच्यासमोर ठेवले.
 नवीनच दुकान ऑफिसच्या समोरच आहे. निरूपमाच्याच वर्गातला तो मित्र. दोन्ही घरांचा दाट परिचय. निरूची आई त्यांच्याकडे घरी केलेल्या शेवया, पापड विकायला जात असे. त्या मावशीही नलूताईंना... तिच्या आईला मदतीला बोलवत. ती बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच रमेशशी तिचं लग्न झालं. झटपट लग्न आणि मग वर्षभरात कायमचं माघारपण.
 "नवीन; जिजींना का त्रास देतोस रे? दर चार दिवसांनी काही ना काही आणून समोर ठेवतोस. अरे भी घरी.येऊन भरपेट खाईन ना! जिजी आणि भाऊ का मला परके आहेत? आणि निर्मला बाळाला घेऊन कधी येणारेय इथे? बारसं इथेच की तिकडे? तेव्हा मात्र आठवण ठेवून ये, निमंत्रण द्यायला. निरूने नवीनला बजावून सांगत ठेपल्याचा तुकडा तोंडात टाकला. लगेच तिचं मन धसकलं. आणि ती पटकन म्हणाली, "तुझी गंमत केली हं."
 जिजींच्या सुगरण हातांनी तीळ, मेथी घालून केलेला ठेपला क्षणभरात जिभेवर विरघळला: नवीनने जाताना सप्रयोग पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन येण्याची आठवण दिली.
 ऑफिस संपल्यावर 'मैत्री तुझी माझी' या संस्थेत जाण्यासाठी पाय तयार होत नव्हते. वाटलं, एखाद्या वैराण वाळवंटात फक्त आपणच उभे आहोत. भवतालच्या आठही दिशांच्या क्षितिजापर्यंत कोणीही माणूस नाही. पाय चटचटताहेत. घशाला कोरड पडलेली. चेहेरे नसलेली काळी... विक्राळ भुतं, हवेतून नाचताहेत... ती घाबरून भानावर आली. माथ्यावरचा घाम पुशीत तिनं इकडे तिकडे पाहिलं आणि ती संस्थेच्या आवारात शिरली. प्रतिभा समोरच होती. निरूचे हसून स्वागत केले आणि संजीवनीला स्वयंपाक घरातून पाणी आणायला सांगितले.
 'निरूपमा, मी तुझ्या दिराच्या बँकेतल्या माणसाकडे जाऊन आले. तुला आणि नलूताईंना उगाच भीती वाटत होती. तो साक्ष द्यायला तयार आहे. त्याने मला सगळी गाथा सांगितली. निरू, तुझ्या वडिलांनी त्याला शिव्या दिल्या म्हणून त्यांच्यावर त्याचा राग आहे. पण तुझ्यावर नाही. उलट तुझ्या दिराने त्याच्यामार्फत तुम्हाला गळ घातली याचा पश्चाताप होतोय.
 ...पण किती चुका केल्यात ग तुम्ही मायलेकीनी. तू जेव्हा पहिल्यांदा संस्थेत आलीस तेव्हा डॉक्टरकडे नेलं आम्हीच ना? संस्थेच्या कम्प्युटर सेंटरमध्ये शिकायला ठेवलं, तेही फी न घेता. कोणी केलं हे? डॉक्टरताई नेहमी औषधं देतात तेही संस्थेच्या विनंतीवरूनच ना? मग वकील लावताना का नाही आठवली संस्था? तुला तर माहीत होतं ना की संस्था मोफत कायदा सल्ला देते म्हणून! आल्या बघ वकिलीणताई.", असे म्हणत प्रतिभाने तिच्यासमोर चहाचा कप ठेवला.
 "आलीस ना? बरं झालं", असं म्हणत राणीताई ऊर्फ ॲड. सुजाता सोहन आत आली आणि तिने निरूपमला अगदी निक्षून सांगितले.
 "निरूपमा, आम्ही वकिलांनी इतर वकिलांवर टीकाटिपण्णी करू नये. ते आमच्या व्यावसायिक नीतीत बसत नाही. पण आजकाल 'वकिली' हा व्यवसाय न राहता धंदा बनलाय. तू त्या पवार ॲडव्होकेटना आग्रहाने सांग की बँकेतल्या, तुमच्या समोर राहणाऱ्या श्री. सावळकर यांची साक्ष काढा म्हणावे. जर त्यांनी त्यांची साक्षच काढली नाही तर मी काहीच करू शकणार नाही." आणि ॲड. सुजाता सोहन घाईघाईने निघून गेली. निरूपमला अंगातले त्राण गेल्यागत झाले. ती खुर्चीत तटकन् बसली आणि हमसून हमसून रडू लागली.
 प्रतिभा पाण्याचा तांब्या घेऊन आली. तिला तोंड धुवायला लावले. चहा गरम करून आणला. तिला प्यायला लावला. तिला लुनावर मागे बसवून तिच्या घरी सोडले आणि मगच ती संस्थेत परतली. निरूपमाच्या चेहेऱ्यावर धास्तावलेला भाव पाहून, स्त्रियांच्या एकूण प्रश्नांकडे दुरस्थपणे पाहून निर्णय घेण्याच्या दिशेचा विचार करणारे, प्रतिभाचे तटस्थ मनही भरून आले.
 घरात येताच निरूने आईला हाक दिली.  "आई मी पडते जरा. डोळा लागला तर उठवू नकोस.", असे सांगत निरू कॉटवर आडवी झाली. आणि रमेशचां चेहरा आठवू लागली. चेहरा आठवेचना.
 जिल्हा रुग्णालयातील अगदी वेगळ्या आणि जरा दूरच असलेल्या वॉर्डात रमेश जवळजवळ पंधरा दिवस होता. त्याचे विलक्षण करुण, चकाकणारे डोळे आणि बोचणारी निर्विकार नजर. त्या पंधरा दिवसांत तर मोठे भैयाजी दवाखान्यात फिरकलेही नव्हते. लग्नाआधीच्या एक महिन्यात मात्र तिच्या अण्णांच्या झोपडीवजा घरात किमान बारा-पंधरा वेळा तरी आले असतील.
 अण्णांची, म्हणजेच निरूची जन्मजात जिनगर. ही जात कलाकारांची. हात लावला तिथे सुंदरता साक्षात होई. तिची आई कागदाची देखणी फुलं, बैलाची बाशिंगं, नवरदेव नवरीच्या तऱ्हेतऱ्हेच्या मुंडावळ्या, बाशिंगं अगदी सहजपणे कुशलतेने करीत असे. पोळा आणि लग्नाचा मोसम जवळ आला की धाकटा जगदीश लातूरहून तऱ्हेतऱ्हेचे रंगीत कागद, जिलेटीन पेपर, टिकल्या, पुंगळ्या...असे खूप सामान घेऊन येई. पंधरा दिवस सगळं घर त्यात बुडालेलं असे. तिचे अण्णा जिल्हा परिषदेच्या साहेबांच्या गाडीवर ड्रायव्हर होते. नेहमी फिरतीवर असत. घरी येताना खिशात बाटली असेच. आईने शेवया, बोटवी, कागदी फुलं, बाशिंग इत्यादीच्या विक्रीतून दोन म्हशी घेतल्या. त्याची उस्तवारी तीच करी. मोठी अनुपमा आणि मधली निरूपमा. धाकटे दोन मुलगे. मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण फुकट असल्याने दोघी मुली घरकाम सांभाळून शिकत गेल्या. अनू बी. कॉम. झाली. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, पदवी परीक्षेत प्रथम वर्ग, महिलांसाठी काही जागा राखीव. या झपाट्यात तिला बँकेत नोकरी लागली. कमावती मुलगी पाहून सासरच्या मंडळींनी मागणी घालून लग्न जमवले. तरीही सासरच्यांना सहा हजारची थैली द्यावीच लागली होती. अनूपेक्षा निरूपमा तीन वर्षांनी लहान. ती बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. बँकेचे मॅनेजर म्हणून भैयाजी नुकतेच गावात बदलून आले होते. निरूच्या घरासमोर त्यांच्या बँकेत काम करणाऱ्या सावळकर काकांकडे ते अधूनमधून येत. तिथेच त्यांनी निरूपमला पाहिले. एक दिवस सावळकर काकांचा निरोप तिच्या बँकेजवळ राहणाऱ्या मैत्रिणीने दिला. दोघीजणी काकांना भेटायला गेल्या. काकांनी आग्रहाने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या साहेबांच्या घरी नेले. साहेबांची बायको साधीसुधी, जुन्या वळणाची. जेमतेम चौथी पास असेल.
 "यावा यावा की...ह्येंनी सांगितलंवतं की आपल्याच जातीची येक पोरगी शेजारच्या साळंत जाती म्हणून. आन् लई शिकल्याली हाय. चौदावी की पंधरावीत हाय. दिसायाबी देखणी हाय. तूच नव्हं ग? आमचा दीर आणि आमचे साहेब दोघेच. सासुसासरे मरून झाली धा वरसं. रमेसभाऊ म्यॅट्रिकनंतर दोन वरिसं कॉलिजात होते. विंजिनेर का काय हाईत. पुण्यात नोकरी हाये. लहानपणी लई चांगलेवते. आता कंदी कंदी बाटली... बाईने जीभ चावली आणि काहीशा उत्साहाने म्हणाली, "लई काम असलं की त्ये बी औषधच असतं म्हने!" आता तुमी शिकलेल्या. तुमाले माहीतच हाये", असे म्हणत तिने कोचावर बसण्याचा आग्रह केला.
 भामाताईंनी आग्राहाने चहा, पोहे खायला घातले मगच निरुपमांची सुटका झाली होती...
 "निरू, असोल्या मुगाची खिचडी केलीय. मटाराचे दाणे घातलेत. तुला आवडते अशी खिचडी. खाऊन घे माय थोडी अन् मंगच झोप. उठ माज्या लेकरा." अती मायेनं नलूताईंनी निरूला उठवून जवळ घेतले. आईच्या कुशीत घुसून निरू ढसढसून रडू लागली.
 "आई, एवढी बोलघेवडी नि भांडखोर तू. म्हशीसाठी, जगूच्या मार्कासाठी, कुंपणाच्या फूटभर जागेसाठी शेजाऱ्यांशी खनखना भांडणारी तू. माझ्या लग्नाच्या वेळी का नाही नवरा, त्याच्या घरची माणसं पारखून आलीस? अण्णांना दारू पाजली की ते खूश. त्यांना भैयाजींनी खूश ठेवलं. महिना पंधरा दिवसांत माझी गाठ त्या नरपड्या माणसाशी बांधून टाकलीस. तू पयल्यांदा त्याला पाहिलंस की अनूताईजवळ बोलली होतीस म्हणं. पोरगं भलतंच वीक आहे. चेहऱ्यांवर तेज नाही. मला अनूताईने नंतर भलतंच वीक आहे. चेहऱ्यावर तेज नाही. मला अनूताईने नंतर सांगितलं. भाराभर भांडी दिलीस. भला सोन्याचं गंठन दिलंस. भैयाजी नि भामावैनींना दोन शेवंत्या चढविल्यास. का तर हुंडा मागितला नाही. पाप्याच्या पितराशी मजं लगीन लावून मोकळी झालीस. पण झालीस का मोकळी? बोल. तुझा पण जीव जळतो गऽ. मला कळतंय. पण काय करूं मी? आई मला एकेक श्वास जड जातोय ग. आई मला मारून तरी टाक गऽऽ." निरुपमाचा आवाज वाढला. दुकानातून आलेल्या नवीनला तो. ऐकू आला असावा. तो घाईने घरात शिरला. माठातून तांब्याभर पाणी आणलं.  "निरुपमा उठ. आधी तोंड धू. खिचडी खा. काकू माझंही ताट वाढा. मी थकून आलोय. चल उठ आधी." काहीशा कडक शब्दांत नवीनने बजावले. निरू मुकाट्याने खिचडी खाऊ लागली.
 "निरू, कोपऱ्यापर्यंत फिरून यायचं का? चल मी येतो सोबत." नवीनने मऊ शब्दात विचारले. एवढ्यात झोकल्या चालीने अण्णांना आत येताना पाहिले.
 "नको नवीन, मी आज थकलेय. झोपते मी. तूही दमला आहेस. नीघ तू...किती काळजी नि मदत करतोस रे", निरूचे शब्द पुरे होण्याआधीच नवीन निघून गेला होता.
 आज झोपल्यावरही डोळा लागेना. जुन्या आठवणी विसरता येईनात. लग्नाच्या दिवशी मैत्रिणींनी चिडवून बेजार केलं होतं. निरूचा सतेज सावळा रंग जांभुळ्या रंगाचा शालूत निरुपमा अधिकच उठून दिसत होता. नववधूच्या मनातली पहिली रात्र तऱ्हेतऱ्हेच्या चांदण-चित्रांनी झगमगलेली असते. त्या पहिल्या स्पर्शाचा अनुभव. अंगाअंगातून उठणाऱ्या झिणझिण्या. अनू म्हणाली होती, मोकळ्या मनाने त्याच्या कुशीत स्वतःला मिटवून टाक. अवघा देह सतारीगत रुणझुणायला लागेल बघ. पण तसं काही घडलंच नाही. रमेश खोलीत आला. तिच्याकडे न पाहता त्याने कपडे उतरवले. नाईट ड्रेस घालून आडवा झाला. मध्येच खोकल्याची उबळ आली तेव्हा उठून बसला. परत झोपताना काहीशा तुटक शब्दांत बोलला, "सॉरी मॅडम, आज मी थकलोय. उद्या जमलं तर तुमचं पुस्तक ओपन करून पाहू. तुमी पण झोपा."
 त्यानंतर पुस्तकाची उघडझाप अधून मधून होई. पण त्यात ना मन वाचण्याची उत्सुकता ना शरीराची नवी ओळख करून घेण्याची उत्सुक घाई.
 खोकला वाढतच गेला. एक दिवस त्याच्या कंपनीतून निरुपमला भेटायला बोलवल्याचा निरोप आला. निरुपमा गेली. त्यांचे साहेब प्रौढ गृहस्थ होते.
 "मुली, तुझ्या नवऱ्याला डॉक्टरला दाखवून घे. इथे कोणी नातलग आहेत का? त्याला सारखी धाप लागते. गेली सहा वर्षे कंपनीत बॉयलर सेक्शनमध्ये काम करतो हा. तुझं काय शिक्षण झालंय?" साहेबांनी विचारले. निरुपमा पदवीधर नाही हे ऐकून ते गप्प झाले. हळहळलेही.
 "मुली, पदवीधर असतील तर कारकुनाची जागा मिळाली असती. इथे महिला कामगारांसाठी पाळणाघर आहे. तिथे तुला नोकरी देतो. पंधराशे रुपये पगार देऊ. मान्य असेल तर सांग. त्याला कामावरून कमी केले आहे." असे सांगून साहेब निघून गेले.
 नंतरचे सहा महिने... पहाटे उठून स्वयंपाक. दिवसभर ऑफिस, घरी आल्यावर रमेशची सुश्रुषा. फरक काहीच पडत नव्हता. आणि मग तो दिवस.
 त्या आठवणींनीही निरुपमच्या अंगावर शहारे आले. ससून हॉस्पिटल्या त्या वॉर्डीच्या मुख्य डॉक्टरांनी तिला बोलावून घेतले होते. निरुपमाचा काहीसा फिकट, अशक्त, निष्पाप चेहरा पाहून त्यांनी सिस्टरनाही बोलावून घेतले. पेशंटचा रिपोर्ट नीट समजावून देण्याचे सांगून "पुअर गर्ल..." असे पुटपुटत ते त्यांच्या खोलीच्या बाहेर पडले.
 रमेशला दवाखान्यातून हालविण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता फोन केल्यावर भैयाजी येऊन गेले. त्यांनी दवाखान्याचा रिपोर्ट वाचून त्रयस्थपणे बाजूला ठेवला.
 "निरू, मी नागपूरहून दोन दिवसांची रजा घेऊन आलोय. हे दोन हजार रुपये जवळ ठेव. तुझ्या आईवडिलांना बोलावून घे. पण...", अर्धवट वाक्य सोडून ते मुकाट बसले.
 आपण पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असूनही किती अडाणी मुर्ख आहोत, याचा तिला त्याच क्षणी साक्षात्कार झाला होता. दोन दिवसातच रमेश होत्याचा नव्हता झाला. त्याला उचलायलाः चार माणसंही मिळाली नाहीत. दवाखान्यातच्या शववाहिकेतून त्याच्या देहाची विल्हेवाट लावीपर्यंतचा वेळ. शेवटच्या वेळी चरकात घातलेल्या उसाच्या निर्जीव चोरट्यासारखी. रमेशच्या मृत्यूनंतर आई अण्णांबरोबर परत गावी येताना तिला वॉर्डाच्या मुख्य मेट्रननी सांगितलेली गोष्ट आठवली होती. त्या म्हणाल्या होत्या,
 "बेटा, तुझे रक्तही तपासून घे. खरं तर इथेच तपासून घेणे बरे होते. पण तुझ्याजवळ ना आई-बाप, ना सासू-सासरे. दोन दिवस तरी हा काढेल की नाही गॉड नोज. तेवढं मात्र कर बरं." रमेश जाण्यापूर्वी दोनच दिवस आधी आई अण्णा आले होते. रमेश वारल्यावर आई अण्णांच्या घरी परतल्यावर अनेकजण येऊन गेले. पहिल्यांदा नवीन येऊन गेला. अण्णांचं पिणं वाढतच होतं. आई अडाणी. निरुपमाने नवीनजवळ मेट्रनने सांगितलेली गोष्ट सांगितली. त्यानेच तिला 'मैत्री तुझी माझी' या संस्थेत नेले होते. तेथील प्रतिभाताईंनी डॉ. कुंदा वैद्यांना चिठ्ठी दिली होती. सप्रयोग पॅथॉलॉजी लॅबमधून आलेला रिपोर्ट पाहताच प्रतिभाताईसुद्धा चक्रावून गेल्या होत्या. रमेशचा आणि तिचा जेमतेम वर्षभराचा सहवास. त्यातही त्याच्यातलं कमी होत जाणारं त्राण. पण निसर्गाचे नियम कोणाला टाळता येणार? निरुपमाच्या रक्ताचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
 ती बारावीन असेल तेव्हा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्सवर एक पथनाट्य सादर केले होते. ते पाहताना किती लाज वाटली होती आणि हसूही आले होते. वाटलं होतं कसल्या गचाळ घाणेरड्या विषयावर पथनाट्य करताहेत हे विद्यार्थी? पण ते नाटक नव्हतं. ते एक विदारक सत्य होतं. आज तिच्याच अंगणात उभं राहिलेलं, मृत्यूचं रूप घेऊन!
 जीव गुदमरून गेला. श्वास घेता येईना. अंग घामानं दरदरून गेलं. ती तटकन् उठून बसली. शेजारी आईने ठेवलेल्या तांब्यातलं पाणी गटागटा पिऊन टाकलं. उठून ट्यूब लावली. तो प्रकाशही खूप धीर देणारा वाटला. पण तेव्हा? त्याक्षणी विचार करता करता कधी डोळा लागला कळलं नाही.
 "काकू, निरू उठली नाही का अजून? तिचा रिपोर्ट घेऊन आलोय मी. तिच्या रक्तात पांढऱ्या पेशी सात हजार आहेत. म्हणजे एकदम गुड आणि लिम्फोसाईटसही साठ आहेत. काकू पांढऱ्या पेशी चार हजारांनी खाली आणि लिम्फोसाइटस् चाळीसच्या खाली गेल्यातर संसर्गाची... इन्फेक्शनची शक्यता वाढते. काकू तुम्ही प्रथिनयुक्त आहार देता. किती काळजी घेता हो. आणि रक्तात हिमोग्लाबीनही अकरा आहे. काकू, पण डॉक्टरांनी सांगितलंय की, परिसर खूप स्वच्छ ठेवा. ती काळजी मी घेईन. म्युनिसिपालटीच्या लोकांना सांगून आपण ते करतोच, काकू, निरूला सांगा, हार मानायची नाही. आपण आहोत ना तिच्याबरोबर. बोलताना त्याचा आवाज भरून आला.
 "उठवा, निरूला. मी आज तिच्या हातचा चहा पिणार आहे. आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी मृत्यूला सामोरे जाणारे जवान हसतखेळतं सीमेवर जातात. तसंच निरूनेही एड्सला सामोरं जायचं. तो भयाण शत्रू तिच्यापर्यंत पोचू नये म्हणून नवनवीन कुंपणं बांधायला आहोतच की आपण..." 'उठ नीरू' असे म्हणत.
 डोळ्यातलं पाणी.मागे हटवीत नवीनने तिच्या अंगावरचे पांघरुण ओढले.