कर्तबगार स्त्रिया/इव्हा पेरॉन
ही भुकेली तरुणी भुकेल्यांची पोशिंदी बनली! |
इव्हा पेरॉन : ११ :
या प्रकरणांत इव्हा पेरॉन या अर्जेंटाईनमधील महाकर्तबगार स्त्रीची हकीगत द्यावयाची आहे, दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना नांवाचा, दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला एक विस्तीर्ण देश आहे. सारीच दक्षिण अमेरिका पूर्वी स्पेनच्या ताब्यांत होती. तीनशे वर्षेपर्यंत या प्रदेशावर स्पेनचा अंमल अबाधित राहिला होता. हळू हळू तो खालावत चालला; आणि त्या त्या ठिकाणच्या लोकांनीं आपली स्वतंत्र राष्ट्रें बनविलीं. या राष्ट्रांपैकींच अर्जेंटिना हैं एक राष्ट्र आहे.
जॉन पेरॉन हा या प्रजासत्ताक राज्याचा अधिपति होता; व ज्या स्त्रीचें चरित्र पुढे दिलेलें आहे, ती इव्हा त्याची पत्नी होती. या पराक्रमी इव्हाचें चरित्र नीट समजून घ्याययाचें, तर जॉन पेरॉन याचाहि थोडासा इतिहास कळावयासच हवा.
जॉनचा बाप कोर्टातला साधा बेलिफ होता. अर्जेंटिनाच्या दक्षिण प्रदेशाला पंपास हें नांव आहे. हा प्रदेश उजाड असला तरी चांगला सुपीक आहे. यांतीलच एका खेड्यांत जॉनचें बालपण गेलें. १६ वर्षांच्या वयाला त्याचा लष्करी शाळेंत प्रवेश झाला. तलवारीचे हात करण्यांत आणि बंदुकीचा नेम मारण्यांत जॉन पहिला येऊ लागला. दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हां एका मुत्सद्याच्या दिमतींत त्याला रोम येथें जावें लागलें. तेथें तो मुसोलिनीचा मोठा चहाता बनला. त्याचें सामाजिक आणि आर्थिक तत्त्वज्ञान त्याला पटूं लागलें. आल्प्स पर्वतांत कवाईत करणाऱ्या इटालियन फौजांबरोबर तो हिंडूं लागला; आणि आपल्या राजवाड्याच्या सज्जांतून जेव्हां मुसोलिनी गर्जना करी, तेव्हां ती कान भरून ऐकण्यांत तो दंग होऊन जाऊं लागला.
इटलीतून परत आल्यावर आपल्या लोकांचें आत्मिक बळ वाढवले पाहिजे, असें ठरवून त्यानें एक संस्था स्थापन केली. लष्करांत थोडीशी वरची जागा मिळतांच त्यानें आपल्या वगीचे लोक शेलक्या ठिकाणीं नेमून टाकले. वरील अधिकाऱ्याच्या हें ध्यानांत येऊन चुकलें; म्हणून 'तूं राजिनामा दे' असा हुकूम त्यानें त्याला धाडला. आज्ञापत्र आणणाऱ्या शिपायाला त्यानें सांगितलें कीं, "हा हुकूम धाडणाऱ्या त्या गाढव अधिकाऱ्याला सांग कीं, जीव गेला तरी बेहत्तर पण माझ्या पदावरून मी हलगार नाहीं." पण येवढा जवाब देऊनच तो थांबला नाहीं. त्याच्या संस्थेतील सदस्यांची संख्या आतांपर्यंत कित्येक शतकांवर गेली होती. आणि हे सारे सदस्य त्याच्या अर्ध्या वचनांत असत. यांतल्या सहा जणांना पेरॉन यानें आपल्या वरिष्ठाकडे पाठवलें. हातांत बंदूक घेऊन या सहा जणांनीं त्या वरिष्ठाला त्याच्याच कचेरींत घेरा दिला; आणि 'तूंच राजिनामा दे; नाहीतर मेलास म्हणून समज,' असें त्याला दरडावून सांगितलें. त्या सेनापतीनें गांगरून जाऊन राजिनामा दिला; आणि जॉन पेरॉन म्हणजे लष्करांतील एक बडी आसामी होऊन बसली.
पण जॉन याचें खरें लक्ष लष्कराकडे नव्हतें. देशांतीला कामगार लोक अर्धपोटी रहातात, हें त्याला मुळींच सहन होईना. त्यानें ताबडतोब कामगार संघ स्थापन केले, अधिकाराचा बडेजाव बाजूला ठेऊन त्यांच्याशीं तो समत्वाच्या नात्यानें वागू लागला. सरकारदरबारीं ज्यांना कांहीं विशेष महत्त्व होतें, त्यांनाच वश करून घेऊन त्यानें या लोकांना कामगार संघाचे पुढारी नेमले.
जॉन यानें मुसोलिनीचें जवळ जवळ अनुकरणच केलें; मात्र या अनुकरणांत तो फार सावधगिरीनें वागला. तो एकदां म्हणाला, "मुसोलिनी हा या शतकांतला सर्वात मोठा पुरुष होय. पण त्याच्या हातून फार मोठाले प्रमाद घडले. हे प्रमाद माझ्या हातून घडू नयेत, अशी दक्षता मी ठेवतों." मुसोलिनीची राज्यरचनेचीं सर्व तत्त्वें जॉन यानें अंमलात आणली, आणि सत्ता हस्तगत केली; मात्र प्रतिपक्षाचे खून पाडणें आणि आपल्या कर्तृत्वाची भलतीच घमेंड बाळगणे हे प्रकार त्यानें केले नाहीत.
१९४५ मध्ये पेरॉन यानें ठरविलें कीं, अध्यक्षाच्या जागेसाठीं आतां उभें रहावयाचें; याच वेळीं दुसरें महायुद्ध संपलें; आणि लोकशाहीचा डंका जगभर झडूं लागला. अर्जेंटिनामध्येहि लोक घसा फोडून 'लोकशाही, लोकशाही' म्हणून ओरडूं लागलें. पेरॉन यानें हें बंड मोडण्यासाठी हजार लोकांना कैद केलें. प्रेसिडेंट फॅरेल याला त्याचें हें कृत्य बिलकुल पसंत नव्हतें. म्हणून त्यानें पेरॉनला कैद केले, आणि एका बेटावर नेऊन ठेवलें. लोकांना वाटलें कीं, पेरॉनचा अवतार संपला.
एक गोष्ट ध्यानांत हवी कीं, पेरॉन हा कामगारांचा पुढारी झालेला होता, आणि सत्तासंपादनासाठीं त्यानें कांहीं जरी केलें, तरी हे लक्षावधि कामगार लोक त्याला सोडावयास बिलकुल कबूल नव्हते. याच वेळीं दुसरा एक चमत्कार घडून आला, आणि त्या चमत्कारानें इव्हा या कुमारिकेचें नांव अर्जेंटिनाभर दुमदुमूं लागलें. आणि जॉन पेरॉन याचें चरित्रच बदलून गेलें.
इव्हा द्वारटी हिचे आईबाप अगदीं गरीब होते. उपासमारीला कंटाळून पोर घरांतून पळाली; आणि ब्यूनो आयरिस या राजधानीच्या गांवीं येऊन नटीचा धंदा करूं लागली. अर्थातच हॉटेलांत जमा होणारी खाबू मंडळी तिच्याभोंवतीं घोटाळूं लागली; आणि कांहींनीं तिची मैत्रीहि संपादन केली. इव्हा ही सुमारे साडे पांच फूट उंच असून थोडी ठाकठिकीनें वागणारी आणि कांहींशीं रंगेल दिसत असे. एके दिवशीं एका खान्याच्या वेळेला आपल्या कर्नल पेरॉनची आणि तिची गांठ पडली. या वेळेपर्यंत तो युद्धमंत्रिमंडळांत दाखल झालेला होता. या दोघांचें तारा मैत्रकच झालें; पेरॉन तिच्यापेक्षां पुष्कळच मोठा होता, पण त्याची पहिली बायको मेली होती. या विधुराचें आणि इव्हाचें प्रेम जमलें; आणि पेरॉन याला सर्व तऱ्हेची मदत आपण केली पाहिजे, असें या पोरीनें ठरविलें.
कामगार लोकांविषयीं पेरॉन याचा जीव जसा तिळतिळ तुटे, तसाच इव्हाचाही तुटत असे. 'दुसरे कोणी श्रीमंत असले तर असले, पण गरीब लोकांचे हाल होतात, हें मात्र मला पहावत नाही,' असें ती म्हणे. अर्थात् गरिबांची कड घेणारा पेरॉन हा कैदेंत पडलेला पाहून इव्हानें त्याला सोडवून आणण्याची युक्ति योजली. पेरॉन हा तुरुंगांत असतांना त्याच्या छातीत दुखूं लागलें. परीक्षा करण्यासाठी राजधानीच्या लष्करी इस्पितळांत त्याला आणण्यांत आलें. इव्हाला वाटलें कीं, पेरॉनला सोडवण्याची ही फार नामी संधि आहे. कामगार मंडळांपुढे ती जोरजोरानें म्हणूं लागली कीं, "तुमचा पुढारी कारागृहांत पिचत आहे, आणि तुम्हीं स्वतःला त्याचे अनुयायी म्हणवितां! त्याच्यासाठीं तुम्ही काय करणार आहां?" आपली गर्दन फुगवून प्रत्येक कामगार ओरडला. "बाई, तूं म्हणशील तें आम्ही करूं." मग दुसऱ्या दिवशीं पन्नास हजार कामगारांचा मोर्चा बरोबर घेऊन इव्हा इस्पितळावर चाल करून गेली. इस्पितळापासून राजवाड्यापर्यंत 'पे-रॉ-न, पे-रॉ-न' अशा गर्जना चलूं होत्या. पोलिस गप्प उभे राहिले, आणि लष्करचे शिपाई टकमकां बघतच राहिले. काय होत आहे, हेंच त्यांना कळेना. या पन्नास हजार कामगारांनी संध्याकाळपर्यंत सारें शहर ताब्यांत घेतलें. आणि इस्पितळांतून बाहेर काढून पेरॉन याला त्यांनी मोटारींत बसवून जंगी मिरवणूक काढली. मिरवणूक राजवाड्याकडे गेली. अध्यक्ष फॅरेल यांनी चांगलेंच प्रसंगावधान दाखवलें. आपण कैदेत टाकलेला माणूस लोकांचा एवढा आवडता आहे हें पाहून, त्यांनी त्याला राजवाडयाच्या सज्जांत बोलवून घेतलें. त्याची लोकप्रियता न पाहवणऱ्या एका पत्रानें आपल्या जादा अंकात म्हटलें कीं, "फाटकीं कुडतीं घातलेले देशभक्त साऱ्या सडकांवरून हिंडत आहेत." पेरॉन यानें त्या पत्राचे तेच शब्द उचलले आणि सज्जावर बसवलेल्या ध्वनिक्षेपकांत तो गरजला, "हो! हो! हे कुडतीं नसलेले लोक देशभक्तच आहेत; आणि याच गरीब लोकांना मी उराशी कवटाळून घेणार आहे." हे त्याचे शब्द ऐकतांच पटांगणावर पसरलेला तो लोकसमुदाय त्याच्या नांवाचा जयजयकार करूं लागला; आणि 'अर्जेंटिनाचा खरा लोकनायक पेरॉन होय,' हें ठरून गेलें. पण ही डांबर-बत्ती कोणी शिलगावली होती? ती इव्हा द्वारटीनें शिलगावलेली होती. अर्थात् तिच्या सौंदर्याच्या जोडीला हें तिचें अचाट कर्तृत्व पाहून पेरॉन तिच्यावर केवळ लुब्ध होऊन गेला. चारच दिवसांनीं पुढें इव्हा आणि जॉन यांचें लग्न झालें.
इव्हा द्वारटी हिच्याकडे पाहून वरिष्ठ अधिकारी नाके मुरडत; कारण तिची जन्मकथा अशीतशीच होती. तिला स्वतःला याची जाणीव असल्यामुळे या आपत्तींतून बाहेर पडण्याचे मोठे चमत्कारिक इलाज तिनें केले, ही आपत्ति नसती तरी पुढें केलेलीं कृत्यें तिनें केली नसतीं, असें मात्र म्हणतां येत नाहीं. लग्न न झालेल्या एका गरीब जोडप्याची ती पोर होती. गरिबीचा दंश तिच्या मनाला इतका कडकडून झालेला होता, की त्या स्थितींतून बाहेर पडण्याची तिनें शिकस्त केली. ती नाटक-सिनेमांत शिरली. तेव्हां तिचा महिन्याचा पगार सुमारें दोनशे रुपये होता; परंतु तिच्या गुणांच्या बळावर हा पगार थोड्याच अवधींत बत्तीस हजार रुपयां पर्यंत वाढला. मिळू लागलेल्या या संपत्तीचा उपयोग या बांईनें कसा केला, हें पाहण्यासारखें आहे. आपले लग्न एका मोठ्या माणसाशीं झालेलें आहे, या विचारांतच ती दंग होऊन राहिली नाहीं. शहरांतल्या सगळ्या गरीब लोकांना सुखी कसें करतां येईल, याचें चिंतन ती करूं लागली. आणि पदरचे पंचवीस हजार रुपये घालून कामकऱ्यांना, मजुरांना आणि कोणाहि गरिबांना साहाय्य करणारी संस्था तिनें सुरू केली. गरीब लोकांच्या सहानुभूतीचा लोंढा तिच्याकडे जोरानें वाहूं लागला; आणि पेरॉन हा अध्यक्षपदासाठी उभा राहिला असतां या लोंढ्याच्या जोरावर तो निवडून आला. बायकोच्या या कर्तबगारीची जाणीव पेरॉनला कायमची राहिली.
मजूर खातें पेरॉननें इव्हाच्या हवाली केलें; आणि मग या बाईच्या कामाचा झपाटा काय आहे, हे लोकांच्या ध्यानीं आलें. त्यांना वाटलें कीं, नवऱ्याचा पदर धरून ही राज्यकारभारांत शिरली आहे; पण तिचा निग्रह, तिचें राजकारणाचें उपजत ज्ञान आणि कसल्याहि प्रसंगाला निर्भयपणे तोंड देण्याची तिची तयारी हीं पाहून ते थक्क झाले. रोज शेकडों लोकांच्या मुलाखती होऊं लागल्या. येवढ्या विस्तीर्ण देशांत जेथें कोठें मजुरांच्या सभा भरत, तेथें ती भाषणासाठीं जाऊं लागली. नवऱ्याने काढलेल्या संस्थेचें पुढारीपणहि तिनें आपल्याकडेच घेतलें; आणि या सर्व लोकांच्या तक्रारी तिनें भराभर मिटवून टाकल्या. रेल्वेंतील कामगारांनीं पगारांत चाळीस टक्के वाढ मागितली. तेव्हां ती त्यांना म्हणाली, "तुम्ही वेडे आहत; तुम्हांला पन्नास टक्के वाढ मिळाली पाहिजे!" इतके बोलून तिनें पन्नास टक्के वाढ दिलीहि! चाळीस टक्के वाढ पदरांत पडावयास हवी असली, तर निदान सत्तर टक्के मागावी, अशा हिशेबानें टेलिफोन-कामगारांनी आपला मागणीचा अर्ज तिच्यापुढे टाकला. तिनें सत्तर टक्के वाढ देऊन टाकली! 'आपणां गरिबांचा पक्ष घेणारी ही देवताच राजवाड्यांत अवतरलेली आहे' असें कामगारांना वाटू लागावें, यांत काय आश्चर्य आहे! पण ती एवढ्यावरच थांबली नाहीं.
खुद्द मजूरांचे पुढारी, उद्योगधंद्याचे पुढारी आणि प्रत्यक्ष सरकार यांना ढोसढोसून पैसा जमा करण्याचें काम तिनें सुरू केलें, आणि हा निधि तिनें वर्षाला दहा कोटी डॉलर येईल, येवढा मोठा केला! इतका पैसा हातीं येऊ लागल्यावर इव्हाने वृद्ध लोकांच्यासाठीं एक भला मोठा आश्रम बांधला; कामकरी मुलींच्यासाठी एक मोठें झोंकबाज विश्राम-मंदिर बाधलें; आणि मुलांच्यासाठीं तर एक मोठें गंमतीदार खेडेंच तिनें वसविलें. यांत प्रत्येक ठिकाणी अद्ययावत् पद्धतीच्या सर्व सुखसोयी तिनें केल्या. मदत मिळाली नाहीं, असा कोणीहि याचक तिच्या अंगणांतून परत जाईना.
पैसा कसा खर्च करावा आणि कोणाला किती द्यावा, हे सारे तिच्या मर्जीप्रमाणे होई. गरजू माणसांना उद्योग गांठून देण्यासाठी अनेक मकाणें तिनें ठिक ठिकाणी घातली. बेवारशीं पोरांना संभाळण्यासाठीं गृहें सुरू केलीं; शाळा, कॉलेजें, दवाखाने यांना तर चलनी नोटा ती पुडक्यावारी देऊं लागली. सहानुभूति, दुःख-परिहार, प्रपंच- विवंचनेचा निरास, वार्धक्याची सोय, दुखणाइतांना औषधोपचार अशा सर्व कामांसाठीं इव्हा सढळ हाताने खर्च करु लागली. अर्थात् जे लोक आतांपर्यंत केवळ 'पेरॉन, पेरॉन' म्हणून ओरडत होते, ते 'पेरॉन-इव्हा' असे ओरडूं लागले.
घरंदाज आणि श्रीमंत स्त्रियांची ऐट घालविण्यासाठीं इव्हानें आपलाहि इतमाम वाढविला. नेहमींची राहणी तिनें अगदीं बेताची ठेवलेली होती. परंतु सार्वजनिक ठिकाणी किंवा दरबारांत जावयाचें म्हटलें, म्हणजे एकाद्या सम्राज्ञीला सुद्धां हेवा वाटावा, असा पोषाख ती करूं लागली. युरोपांतील मोठमोठ्या राजधानींतील झगेवाल्यांना तिच्याकडून पत्रे येऊं लागलीं, "आजपर्यंत तुम्ही केले नसतील असे उंची झगे करून पाठवा; त्यांना रत्नांच्या आणि मोत्यांच्या झालरी लावा, त्यांवर मधून मधून हिऱ्याचे चांद बसवा." मग असला पोशाख करून प्रेसिडेंट पेरॉनची बायको मोठ्या तोऱ्याने सार्वजनिक प्रसंगांना आणि दरबाराला जाऊं लागली. तिच्याकडे पाहून तिला नाके मुरडणाऱ्या त्या श्रीमंतांच्या आणि खानदानीच्या स्त्रिया अगदीं दिपून जाऊं लागल्या. पण हे प्रसंग सोडले, कीं अंगांत एक साधें पोलकें घालून ही बाई झाडूवाल्यांच्या सभेत जाऊन बसत असे! साऱ्या देशांतील स्त्रिया तिच्याकडे आपली कर्तबगार बहीण म्हणून पाहूं लागल्या. चाळीस लाख मतदार स्त्रियांचें मोठें संघटन तिनें बनविलें; आणि नवऱ्याची पुन्हां निवडणूक आली तेव्हां तिनें त्याच्यावर मतांचा नुसता पाऊस पाडला.
जॉन पेरॉन हाही स्वतः मोडा उमदा, देखणा आणि पराक्रमी माणूस होता. सत्ता कशी हस्तगत करावी, आणि हुकूमशहांच्या चुका होऊ न देतां, ती हातीं कशी ठेवावी, याचें शास्त्र त्याला चांगलें अवगत होतें. त्यांतच बायकोच्या या साहाय्याची भर पडल्यामुळे पेरॉन अर्जेंटिना देशाचा अनभिषिक्त राजाच बनला. इव्हा तर त्याच्यावर इतकी लुब्ध होती, कीं तारीफ करतांना त्याची तुलना कोणाशीं करावी याचेंहि भान तिला राहीना. ती म्हणें, "आमचे 'हे' शिकंदरापेक्षां मोठे आहेत; नेपोलियनपेक्षां मोठे आहेत; प्रत्यक्ष येशू ख्रिस्ताइतके मोठे आहेत." तें कसेंहि असो, पति-पत्नींनी मिळून सारा अर्जेंटिना देश सात आठ वर्षांच्या आंत अगदीं मुठींत आणला. पण वैभव, सौंदर्य, सामर्थ्य यांचा तमाशा पहात दुर्दैव मिष्कलपणा जवळच कोठेतरी बसलेलें असतें; आणि कोणाला नकळत भलत्याच वाटेनें येऊन लोकांच्या अन्नांत तें माती कालवतें. त्यांच्या खिरींत खराटा घालतें; याणि त्यांच्या वैभवाला सुरुंग लावतें.
सारे नेक चाललें असतां एक कोटी सत्तर लक्ष प्रजांची प्रीति संपादिलेल्या या जोडप्यचें बरें देवाला बघवलें नाहीं. इव्हाला हळू हळू ताप येऊं लागला. "ताप सधासुधा नाहीं," असें वैद्यराज म्हणूं लागलें. "बाईसाहेबांना रक्तक्षय होण्याची चिन्हें आहेत" अशी कुरकूर ते करूं लागले. कॅन्सरचा वहिम येऊं लागत्यामुळे न्यूयॉर्कहून तज्ञ डॉक्टर विमानानें येऊन दाखल झाले. आतां आपले कांही नीट नाहीं, असें इव्हाचें इव्हाला कळून चुकलें. ती म्हणू लागली, "पेरॉन म्हणो माझा प्राण आहे, पेरॉन माझा सूर्य आहे. मी श्वासानें हवा आत घेतें, त्या हवेसारखा माझा पेरॉन आहे." याच व्याधींत तिनें आपलें आत्मचरित्र लिहून टाकलें. तिच्या दुखण्याची वार्ता सर्व देशभर पसरली; आणि यांतून ही आतां उठत नाहीं, असें सर्वाना वाटू लागलें. मग आपल्यापाशीं जे काय आहे तें तिच्या अर्पण करावें, ही वासना सर्व संस्थांना उत्पन्न झाली; आणि आजाराच्या शेवटच्या महिन्यांत राजदरबार, शिक्षण-संस्था, उद्योग-मंदिरें, आरोग्य-शाळा, कामगार मंडळे एक ना दोन, शेकडों हजारों संस्थांनी तिला पदव्या अर्पण केल्या; मानपत्रे दिलीं, नजराणे पाठविले. पण सगळ्यांच्या वर म्हणजे हजारोंच्या हजारों त्रिया तिच्या राजवाड्याच्या कुंसवाला पाठ देऊन मुसमुसत बसूं लागल्या. आपली आई नाहींशी होणार, हें पाहून अर्जेंटिनाच्या साऱ्या प्रजा हवालदिल होऊन गेल्या; आणि स्त्रिया व गरीब लोक यांना तर आपलाच प्राण कुडींतून चालला आहे, असें दुःख होऊं लागलें. होतां होतां तिचें वजन ऐंशी पौडांवर आले; शेवटी एके दिवशीं रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनीं प्रेसिडेंट जॉन पेरॉन शोकाकुल होऊन तिच्या खोलींतून बाहेर पडला; आणि बाहेर बसलेल्या मंत्र्यांना तो म्हणाला, "इव्हा संपली आहे!" वार्ता शहरभर पोहोचताच राजधानी दुःखाने केवळ वेडी होऊन गेली.
दुसरे दिवशीं तिच्या नेहमींच्या सुवर्ण मंदिरात तिची शवपेटिका आणून ठेवण्यांत आली. पांच लक्ष लोक अश्रू ढाळीत पटांगणात उभे होते. फाटक उघडतांच तिचें दर्शन घेणाऱ्या लोकांची अशी खेचाखेच झाली, की चार माणसें प्रत्यक्ष मेलीं, आणि अडीच हजार घायाळ झाली.
अवघ्या नऊ वर्षात इव्हानें ही लोकप्रियता संपादिलेली होती. तिच्यासाठीं एक मोठी समाधि बांधूं घातली. आतांपर्यंत ती तयार होऊन इव्हाचें शव आंत गेलेंहि असेल. पेरॉन हा आतां पोरका झाला; आणि अर्जेंटिनाच्या लक्षाधि प्रजा इव्हा द्वारटीसाठी अजूनहि दुःखाचे उसासे टाकीत आहेत.
● ● ●