कर्तबगार स्त्रिया/सुसान बी. अंथनी

हिनेंच अमेरिकेत पहिल्यानें स्त्रियांचा कैवार घेतला!


सुसान बी. अंथनी : १०:


 सुसान बी. अंथनी या क्रांतिकारक स्त्रीचा जन्म अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् परगण्यांत १८२० साली अदाम्स येथें झाला. हिचा बाप क्वेकर पंथाचा होता. परंतु स्वतंत्र मतवाद हें त्याच्या बुद्धीचें मुख्य लक्षण होतें. आपण क्वेकर असलों, तरी ख्रिस्ती धर्माच्या इतर पंथांतील कोणाशीं लग्न करूं नये, हे मत त्याला मान्य नव्हतें. लुसी रीड या नांवाच्या एका बॅप्टिस्ट पंथांतील मुलीशीं यानें लग्न केलें. तेव्हांच्या समजुतीप्रमाणे हीं दोन्हीं माणसें अगदीं पाखंडी निघाली. स्वतःला "क्वेकर म्हणवितों आणि बॅप्टिस्ट मुलीशीं लग्न करतों, याचा अर्थ काय?" असें क्वेकर पंथाचे लोक म्हणूं लागले; आणि चांगली बॅप्टिस्ट पंथांत जन्माला येऊन शेवटीं या पोरीनें एका क्वेकर पंथीयाशी लग्न करावें, हें पाहून बॅप्टिस्ट लोकांना मोठाच उद्वेग वाटला. लुसी रीड ही मुलगी पहिल्यापासूनच थोडी स्वतंत्र बुद्धीची होती. चांगला नट्टापट्टा करावा, 'तू फार चांगली दिसतेस' असें लोकांनीं आपल्याला म्हणावें, असें या पोरीला लहानपणींच वाटे. सूत काढायला बसली, म्हणजे ती लोकांना ऐकूं जाईलसें गाणें गाऊ लागे; आणि थोडीशीं वयांत आल्यावर तर उभी रात्र ती नाचांत घालवू लागली. गाणे, नाचणें हे तिचे चाळे बरे नव्हेत, असें बालबोध चालीची सर्वच ख्रिस्तीं माणसें म्हणूं लागलीं. उपवर मुलीनें अशा तऱ्हेनें वागणें तेव्हाच्या नीतिकल्पनांप्रमाणें अगदीं गैर होतें. त्यांतच जेव्हां या मुलीनें एका क्वेकरपंथीयाशी लग्न केलें, तेव्हां तर ही मुलगी अगदींच बेताल झाली, आहे असा सर्वांचा अभिप्राय पडला. तथापि लगीन होऊन सासरी गेल्यानंतर या मुलीनें आपला प्रपंच मोठ्या शहाणपणानें आणि ठाकठिकीनें केला. आठ मुलांचा भोंवतालचा गजबाट मध्यम स्थितींतहि मोठ्या धैर्यानें संभाळून बाईनें संसाराचा भार हलका करून घेतला. अशा स्वतंत्र विचाराच्या आई बापांच्या घरांतच वाढलेली या चरित्राची 'नायिका' व मग तिनें आईच्यापुढें चार ढांगा जावें हें ओघानेच आलें.
 शाळेतल्या 'बाईंना' ही सुसान अगदीं आवरेनाशी झाली. इतर मुली फार मर्यादेनें हळू बोलत, आणि झाकून पाकून हिंडत; पण सुसानला मर्यादा कशाशीं खावी हें मुळींच कळत नसे. मुलांच्यासारखी ती फडाफड बोले, आणि स्त्रीजातीचा बिभिस्तपणा टाकून देऊन चारचौघांसमोर बेलाशक हिंडूं लागली. मास्तरीण बाई तिला सारख्या रागे भरीत, बायबलांतले दाखले देत, आणि 'बायकांच्या जातीनें सौम्यपणाने आणि आदबीनेंच वागले पाहिजे' असें तिला दरडावून सांगत; पण ही पोरगी अगदीं बेदरकार निघाली! वर्गात ती मोठमोठ्यानें हंसत असे. बाईंना हें बिलकुल खपेना. त्या म्हणत, 'मुलींची जात; हंसायचें झालें तर थोडें मंजूळ, गालांतल्या गालांत आणि कोणाला ऐकूं न जाईल अशा बेतानेंच मुलींनीं हंसलें पाहिजे.' पण सुसानचे पहावें तों घसा मोकळा करून ती 'खोखो' हंसत असे. शाळेत मुलींना पत्रे आली, तर तीं प्रथम बाईंनीं पाहायची अशी चाल असे; किंवा त्यांनीं कोणाला पाठविलीं, तरी तीं बाईंच्या नजरेतून गेली पाहिजेत अशी सक्ति असे. सुसान म्हणे कीं, 'मी इतर कोणाला पत्र लिहिलें, तर तुम्हीं तें पहावें हें बरोबर आहे. पण मी माझ्या बाबांना लिहिलेले पत्र तुम्ही काय म्हणून पहावें? मी जर आमच्या घरांतील कांहीं खाजगी बाब लिहिली असली, तर ती तुम्ही काय म्हणुन पहावी?' अशावरून मास्तरणींशीं तिचीं भांडणें होत, आणि तिला कडक शासनहि होई. एकदां शाळेच्या वसतिगृहांची वार्षिक धोतीपोती सुरू झाली. सगळया मुली झाडावयास लागल्या; आणि त्या आपले काम बेताबेतानें करीत होत्या. पण या पोरीच्या अंगांत नेहमीं पुंडाईचें वारें भरलेलें असें. शाळेच्या आढ्याला जळमटें लागलीं आहेत असे दिसलें, तीं कशीं काढावीं असा प्रश्न पडला, असें दिसतांच सुसान ही टाणकन् उडी मारून बाईच्या टेबलावर उभी राहिली. आणि केरसुणीनें वरचें झाडूं लागली. जळमटें निघालीं कीं नाहीं कोणास ठाऊक, पण उडीच्या हबक्यानें बाईचें टेबल मात्र मोडलें. त्याबरोबर काकूंचा संताप अगदीं अनावर झाला. त्यांनी शाळेंतल्या साऱ्या मुली एकत्र जमविल्या; आणि या नाठाळ आणि आडदांड मुलीची त्यांच्यापुढे खूप खरड काढली. शेवटीं बायबलांतील एक प्रकरण त्यांनी वाचून दाखविलें, आणि त्या धार्मिक आवेशानें म्हणाल्या, "पोरी, तूं नरकांत खितपत पडशील." सुसान आपल्या मनांत म्हणाली, "बरं! पडलें तर पडलें. माझ्याबरोबर तुम्हींहि साऱ्या जणी तिथेंच असाल." मास्तरीणबाईचा आग्रह असा कीं, नीति, सद्गुण आणि विनम्रपणा हे सनातन गुण मुलींनीं केव्हांहि सोडतां कामा नये; आणि या गुणांच्या व्याख्या अर्थातच बाई स्वतः करीत. खास नीति, सद्गुण आणि विनम्रपणा कशाला म्हणावें, आणि चालचलणुकीत थोडासा मोकळेपणा ठेवला तर या साऱ्या गोष्टींना धक्का पोचतो की काय, याचा विचार बाईनीं कधीं केलेला नव्हता. पूर्वजांनी घालून दिलेली ओळ आपण तशीच पुढे चालवावी, एवढाच त्यांचा हिशोब असे. अशा या बाईंना सुसान ही मुलगी बेमर्याद वाटावी, हें अगदीं स्वाभाविक होतें.
 बापाची घरची गरिबीच होती. तथापि नवराबायको आणि सारीं मुलें मिळून प्रपंचाचा गाडा बऱ्या प्रकारें हाकीत असत. आठ भावंडांतील सुसान ही दुसऱ्या नंबरचें भावंड. अर्थात् तिला धाकट्या भावंडाचेंहि बरेंच करावें लागे. बापाचा धंदा सूत कातण्याचा होता. आणि घरांत बऱ्याच चात्या फिरत रहात. त्या चालवावयास काही बाहेरची माणसें रोजंदारीनें येत. पण भाकरीतुकडा यांच्याच घरीं खात. अर्थात् सुसानला आणि तिच्या आईला पुष्कळच काम पडे. प्रसंगाला दहा-दहा, बारा-बारा माणसें जेवावयाची असत. तान्हें पारठें संभाळावयाचें असें. मग करमणूक कुठली? आणि मोठ्या झालेल्या भावंडांना खेळावयाला तरी सवड कुठली? शिवणें-टिपणें, भाकऱ्या थापणें, चिरगुटे धुणे, यांत त्यांचा सारा वेळ जाई. एकट्या सुसानला सुद्धा वीस-वीस भाकऱ्या प्रसंगी भाजाव्या लागत. दमल्या भागल्यानंतर कोठें करमणुकीला जावें, तर बायकांनी घरांतच कोंडून राहिलें पाहिजे, असा तेव्हांचा शिरस्ता होता. चूल आणि मूल यापलिकडे त्यांनी फिरकतां कामा नये, हा दंडक जारीनें चालू होता. देवाला दंडवत घालावें आणि तोंडाला खीळ घालावी ही घरगुती नीति होती. अर्थात् सुसानला यातले काहीहि संमत नव्हतें.
 बापाचा सुताचा कारखाना चालावा तसा चालत नसे. म्हणून सुसानला वाटू लागलें कीं, आपण स्वतः कांहीं कष्ट केले पाहिजेत. तिनें कोठेशीं एक शिकवणी धरली, ती थोडे दिवस चालली. कदाचित् हिचें आणि धन्याचें बनलें नसावें. तिचें बोलणें आणि तिची एकंदर चालचलणूक एरवींच्या बायकांपेक्षां इतकी निराळीं असें, कीं हिच्या हाताखाली आपली पोरें द्यावीं, असें कोणाहि आईबापाला वाटूंच नये. समाजांतले जे कोणीं उडाणटप्पू लोक असतील, आणि म्हणून ज्यांना बाकीचे लोक दूरचे लेखीत असत, त्यांच्याशीं सुद्धां सुसानची मैत्री असे. पुष्कळांनीं तिला सांगून पाहिलें कीं, "असलें चाळे चालू ठेवलेस, तर चारचौघांत तुला कसलीहि किंमत उरणार नाहीं." परंतु सर्व तऱ्हेचा फटिंगपणा हें सुसानच्या मनाचें मुख्य लक्षण होतें. चालिरीतीला ती वाईट होती असें नव्हें. पण, जिथें जिथें दुसऱ्यांनी आडवावें हें तिला बिलकुल खपत नसे. तिनें ताडकन् उत्तर दिलें कीं, "तुम्हीं ज्यांना दूरचे लेखता, त्यांच्याशींच काय पण जे प्रत्यक्ष निग्रो आहेत, आणि म्हणून फारच दूरचे आहेत, त्यांच्याशीसुद्धां माझी मैत्री आहे; आणि त्यांच्याबरोबर मी केव्हां केव्हां चहासुद्धां घेतें" अजूनसुद्धां निग्रोला कशा तऱ्हेची वागवणूक अमेरिकेत मिळते, हें आपल्याला माहीत आहे. शें सवाशे वर्षापूर्वी तर त्यांच्याशीं यत् किंचितहि सामाजिक संबंध आणणे मोठे पातक समजत असत. अशा वेळीं या तरण्याताठ्या पोरीनें असली भ्रांतिष्ट उत्तरे द्यावीत, याचा समाजाला फारच विस्मय वाटूं लागला. खरें म्हटलें म्हणजे तिला या निग्रोंची अतिशय कींव येत असें; आणि कांतडी पांढरी असल्यामुळेंच जे बदमाश समाजांत खुशाल मान वर करून वागत असत, त्यांच्यासंबंधानें तिला पराकाष्ठेचा तिरस्कार वाटे.
 तिनें एका शाळेत नोकरी धरली. तेथें अशा कांहीं पुंड प्रजा जमा होत, कीं पुरुष मास्तरालासुद्धां जीव नकोसा होऊन जाई; मग मास्तरीणकाकूंची दशा काय विचारावी! तेथें जमा होणाऱ्या पोरी खूप धांगडधिंगा करीत, मस्तवाली करीत, आणि शिक्षकाला कसें पळवून लावतां येईल, याकडेच त्यांचें लक्ष असे. असल्या या शाळेत सुसाननें नोकरी धरली. या मंडळींनीं थोडीशीं गडबड करतांच पलिकडच्या तरवडाचा एक फोंक तिनें काढून आणला; आणि एकेकीचें पाठाण असें सडकून काढलें, कीं तिला जन्माची आठवण रहावी. एवढें होतांच शाळेंत जिकडे तिकडे चिडीचिप झालें. लोक म्हणूं लागलें कीं, "मास्तरीण कसली? हा पैलवानच आहे!" पुढे लवकरच सुसान हिला काना जोहारी येथल्या एका मुलींच्या शाळेची प्रिन्सिपल म्हणून नेमण्यांत आलें. बाईंचा एकंदर वचक बघून शाळेचा एक विश्वस्त म्हणाला, "आजपर्यंत असला वचक ठेवणारा मास्तरसुद्धां आम्हांला मिळाला नव्हता, मग मास्तरीण तर लांबच राहो." लवकरच या गांवांत एक निराळी लहर उत्पन्न झाली.
 गांवांत पुष्कळ गौळवाडे होते. कुणाच्य गोठ्यांत पन्नास गाई, कुणाच्या गोठ्यांत शंभर गाई, असे अनेक गोपाळ तेथें होते. त्यांना वाटू लागलें कीं, ही आडदांड बाई पोरीसोरींना वचकांत ठेवण्याच्या कामी खर्ची पडते, हें बरें नव्हे. ती जर कां आपल्या गोठ्यांत आली, तर आपल्याला बायकोहि होईल; आणि हिचे बाहू चांगले भक्कम असल्यामुळे एका सकाळांत ती सान्या गाईच्या धाराहि काढील. अशा हिशेबानें त्या गावंढ्या गांवांतील धूर्तानीं तिला लग्नाची मागणी घातली! पण या फटिंग बाईनें उत्तर केलें, "तुमच्याशी कशाला लग्न करावयाचें? तुम्हांला हक्काची एक बटिक पाहिजे, एवढेच ना?" तिनें त्यांची मागणी फेटाळून लावली. ती म्हणे, "मी चांगली धष्ट-पुष्ट आहे. कुठेंहि चार कष्ट करीन आणि पोटाला मिळवीन. उगाच एकाद्याची बायको बनून त्याचे सारे कष्ट उपशीत बसणें मला नको. मी आपली एकटी राहीन."
 हळू हळू सुसानला वाटू लागले कीं, आपण आपल्या हिंमतीनें जरी स्वातंत्र्य मिळविलें, तरी देशांत ज्या लक्षावधि स्त्रिया आहेत, त्यांच्या दास्याचें काय करावयाचें? त्यांचा वाली कोण? अमेरिका स्वतंत्र झाली असेल; पण अमेरिकन बायका मात्र अजून दास्यांतच खितपत होत्या. सगळ्या जगांत जें होतें व आहे, तेंच तेव्हां अमेरिकेंत होतें. 'बायका म्हणजे कुठल्या झाडाचा पाला!' अशी अवस्था असे. 'पुरुषांच्या हातांतलें पोतेरें म्हणजे बायका' अशी तेथली समजूत होती. बायकांना कसलेहि हक्क किंवा अधिकार नव्हते. त्यांचें सारेंच्या सारें जिणें पुरुषांच्या पायाला बांधलेलें असें. पुरुष जी फरपट काढतील, ती मुकाटयानें सहन करणें, हाच स्त्रीचा धर्म बनला होता. आणि हें सारें कायद्याप्रमाणे होत असे. कायद्याप्रमाणें स्त्री कधीं 'सज्ञान'च होत नसे. लग्न झालें म्हणजे ती नवऱ्याची मत्ता होऊन बसे; आणि जर ती कुमारीच राहिली, तर तिचा जो पुरुष पालक असेल, त्याच्या हवालीं तिचें जिणें होई. लग्न झालेल्या बाईनें श्रम करून कांहीं मिळविलें, तर ती मिळकत तिनें नवऱ्याच्या हवाली केली पाहिजे, अशी सक्ति असे. तिला कामावर ठेवलेल्या माणसानें जर बुडविलें, आणि तिच्या नवऱ्यानें जर त्या माणसाशीं कांहीं रदबदली करून प्रकरण संपविलें, तर या बाईला कांहीं बोलतां येत नसे. इतकेच काय तिला कोणी मारलें किंवा भलतें नांव ठेवलें, तर तिला मिळणारी नुकसान- भरपाई नवऱ्याच्या हातीं जावी, असा कायदा होता. अशा प्रकारें तिच्या जीविताचें सारें गांठोडें नवऱ्याच्या काखेला लावलेलें असे. इतकेंच नव्हें तर स्वतःच्या पोरांवर सुद्धां तिची सत्ता नसे. या पोरांची वाटावाट नवऱ्याला हवी तशी लावतां येत असे. 'माझी पोरें तुम्ही लोकांना कां देऊन टाकतां?' एवढें सुद्वां बायकोला म्हणतां येत नसे. नवऱ्यानें खुशाल झिंगून पडावें किंवा बदफैलीपणाने वागावें; जर कां काडीमोडीचा प्रसंग आला, तर पोरें मात्र नवऱ्याच्या ताब्यांत जात. घरांतल्या कुत्र्यांना जसें झोडपावयाचें, तसें बायकांना झोडपावें ही गोष्ट पुरुषांच्या पाठांतली होती. 'नवरा रोज जीव घेतो आहे. मला याच्या जांचांतून सोडवा' अशी आरोळी जरी तिनें सरकारच्या दाराशीं ठोकली, तरी कायदा म्हणे कीं, 'तूं नवऱ्याची बायको आहेस, तुला त्याच्याशींच जमवून घेतले पाहिजे.' आपल्या भगिनींच्या या दारुण परिस्थितीकडे पाहून सुसान या शूर पोरीचें मन अक्षरशः विदीर्ण होऊन जाई.
 सुदैवानें सुसानचा बाप डॅनिअल यालाहि ही स्त्रियांची करुणास्पद स्थिति पाहून अतिशय उद्वेग प्राप्त होत असे. त्याच्या हाताखालीं चात्या फिरविणारे जे कामगार होते, ते आपल्या बायकांना मारहाण करीत आणि बायकांनी मिळविलेला पैसा गुत्त्यांत किंवा कुंटणखान्यांत खर्च करीत. हें सारें तो प्रत्यक्ष पहात होता. स्वाभाविकच सुसान जेव्हां भडकून बोलूं लागें, तेव्हां तो तिला स्वच्छ सागें कीं, "तूं म्हणतेस तें सारें खरें आहे. तुम्हां स्त्रियांच्या जीविताची पुरुषांनी आजवर कसलीहि कदर बाळगलेली नाहीं." डॅनिअलला कळून चुकलें होतें कीं, पुरुषांच्या दारुडेपणानें बायकांची केवळ दैना उडून जाते; आणि म्हणून तेव्हां सुरू झालेली दारुबंदीची चळवळ डॅनिअलने उचलून धरली 'आज असें झालें, उद्यां तसें झालें,' अशा अनेक कहाण्या जेवावयाच्या वेळीं डॅनिअल सांगत असे. त्या ऐकून सुसानचें माथेच भडकून गेलें. ती या दारुबंदीच्या चळवळींत आवेशानें पडली. दारूचा प्रसार इतका झाला होता, की झिंगून पडणें किंवा प्रसिद्धपणें बाटल्यावर बाटल्या फोडीत राहणें याची कोणालाच शरम वाटेनाशी झाली होती. एका मोठ्या सन्मान्य गृहस्थाला सार्वजनिक मेजवानी झाली, तेव्हां १२०० लोकांना जेवावयास बोलावलें होतें. प्रसंग खरोखर गंभीर होता. पण अशा वेळीं सुद्धां या लोकांनी दारू प्यावी कां? आणि ती किती प्यावी? बारा दुणें चोवीसशें बाटल्या या लोकांनीं फस्त केल्या! आणि वर ते सांगू लागले कीं, "ही तर नुसती 'भवानी' आहे!" असल्या लोकांच्या घरांत स्त्रियांच्या जीविताचा कोण कोंडमारा होत असेल, याची कल्पना आपल्याला सहज येते. कोणी असें सांगतात कीं, प्युरिटन् लोकांची चळवळ पार एका टोकाला गेल्यामुळे, म्हणजे ज्यानें उठावें त्यानें सात्विक आचाराची कड घेऊन बोलावें, असें झाल्यामुळे केवळ प्रतिक्रिया म्हणून समाजांत दारूचा प्रचार अतोनात झाला; आणि शेवटीं कारखान्यांतल्या हमालापासून तो न्यायमंदिरांतील न्यायमूर्तीपर्यंत सर्व माणसे कामाला लागली, म्हणजे अर्धवट झिंगलेली असत. कारण कोणतेंहि असो, पुरुषांचा समाज बेताल झाला होता, हें कांहीं खोटें नव्हें.
 हा प्रकार दुःसह होऊन सुसान अंथनी या दारूच्या चळवळींत पडली. स्त्रियांना मतांचा अधिकार असावा, या चळवळीची तिला अजून कल्पनाहि आली नव्हती. ज्या क्वेकर पंथांत ती जन्माला आलेली होती, तो पंथ मताधिकार आणि मतदान यांची केवळ थट्टाच करीत असे. याचा अर्थ असा कीं, स्त्रियांचें गाऱ्हाणें सरकारच्या दारीं नेऊन पोचविण्याचें खरें साधन जें मताधिकार, त्याचा साक्षात्कार सुसानला अजून झालेलाच नव्हता. पण हा प्रसंग लवकरच घडून आला. दारूची मोहिम सुरू झाल्यावर ती एके दिवशी सभेत बोलावयास उभी राहिली. सभेचा अध्यक्ष तिला एकदम म्हणाला, "बाई, तुम्ही गप्प बसा; बायकांनी केवळ ऐकावें आणि शिकावें; त्यांनी सभेत बिलकुल बोलतां उपयोगाचें नाहीं." अध्यक्षमहाशयांची हीं हरकत पहाताच सुसान अगदीं बेभान होऊन गेली, आणि सभेंतून बाहेर पडली. ती म्हणाली, "बायकांना सभेत बोलण्याचा सुद्धां हक्क नाहीं काय? मग मला आतां हक्कासाठींच झगडले पाहिजे." १८२० सालीं दारूच्या चळवळींतून बाहेर पडून सुसान ही स्त्रियांच्या हक्कासाठीं झगडूं लागली.
 या कामांत एलिझाबेथ कॅडी स्टॅण्डन आणि अर्नेस्टाईन रोझ या दोन बाया आधींच पडलेल्या होत्या. सुसानहि त्यांना जाऊन मिळाली. वास्तविक पाहतां, सामाजिकरीत्या या तिघींच्यांत कसलेच साधर्म्य नव्हतें. एलिझाबेथ स्टॅण्डनचा नवरा एक बडा श्रीमान् वकील होता. रोझहि युरोपांतून अमेरिकेत आलेल्या एका ज्यूची मुलगी होती; आणि सुसान ही एका गरीब क्वेकरची मुलगी होती. पण स्त्रियांच्या हक्कासाठीं चळवळ करणें या कामांत तिघी एक झाल्या. पहिल्या दोघींना सभा गाजविण्याचें चांगले साधलेलें होतें. त्या लिहिण्यांतहि चांगल्या पटाईत होत्या. सुसानला चांगले लिहितांहि येत नसे व चांगलें बोलतांहि येत नसे; पण संघटनेच्या कामांत मात्र तिनें चांगलेंच कौशल्य प्रकट केलें. या त्रयीनें देशांत मोठीच धूम सुरू केली. ठिकठिकाणी जाऊन सभा करणें, गांवोगांवच्या बायकांची उठावणी करून देणें आणि जमेल तेथें तेथें पुरुषांच्या अन्यायाचा परिस्फोट करणें हा उद्योग त्यांनीं चालू केला.
 वृत्तपत्रांनी त्यांची पहिल्यानें उपेक्षाच केली. 'यांची टवाळी आम्ही पत्रांत छापावी तर ती वाचणार कोण?' असें संपादक म्हणत! लवकरच या चळवळीला एवढा जोर चढला, कीं संपादकांना आपले मत बोलून दाखवावें लागलें. स्त्रियांच्या हक्काची ते टवाळीं करूं लागले. 'न्यूयॉर्क हेरल्ड' या पत्राच्या संपादकानें लिहिलें, "या बायकांना हवें आहे तरी काय? पुरुषांच्या साऱ्या जागा त्यांना हव्या आहेत काय? वकील, डॉक्टर, जहाजांचे तांडेल आणि फौजांचें सेनापति आपण व्हावें असे त्यांना वाटतें काय? एकाद्या वकिलीणबाई पक्षकाराची बाजू कोर्टात मांडीत असतांना, दिवस भरलेलें असल्यामुळे त्यांच्या जर पोटांत दुखूं लागलें, तर मग काय करावयाचें? किंवा याची एकादी धर्मोपदेशक बनलेली बाई पीठावरून उपदेश करता करतां जर कां तिला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, तर काय करावयाचें? किंवा एकाद्या डॉक्टरीणबाई एकाद्या पुरुषाचें भगंदर बुजवीत असतांना त्यांनाच जर सुईणीला बोलावणे पाठवावें लागलें, आणि तेथेंच त्याना जुळें झालें, तर काय करावयाचें?" असली चटोर टीका वृत्तपत्रे करूं लागलीं. परंतु या तिघींनीं त्यांना दाद दिली नाहीं. पुरुषांचा जाचच स्त्रियांना इतका तापदायक होता, की या बोलतात हें खरें आहे असें अमेरिकेतील स्त्रीवर्गाला वाटू लागले; आणि कांहीं पुरुषहि त्या बाजूला वळले.
 सुसान इत्यादि बाया बेलाशक सांगूं लागल्या कीं, "महिनोनमहिनें झिंगून पडणाऱ्या नवऱ्यांच्या बायकांना घटस्पोट मिळालाच पाहिजे; पोरबंदीची सवलत तरी त्यांना मिळाली पाहिजे." हे त्यांचे बोलणे ऐकतांच स्टार नांवाच्या पत्रानें लिहिलें, "या बायांचे हे उद्गार ऐकून नरकपुरींतल्या सैतानाच्या दूतांच्या अंगावरसुद्धां शहारे येतील." ज्यांना मनांतून थोडी सहानुभूति होती, ते सुद्धां या बायांचे हे फाडफाड बोलणे ऐकून अगदीं स्तंभित होऊन गेले. एक पत्रकर्ता म्हणाला, "बाईचें आजचें भाषण मोठें नामांकित झालें. पण माझ्या बायकोनें किंवा मुलीनें जर कां असलें भाषण केलें, तर मी त्यांना सागेन कीं, तुम्ही मेलेल्या बऱ्या; पण तुमच्या तोंडून असले शब्द ऐकाययास नकोत."
 होता होतां ही चळवळ कायदेमंडळाच्या दाराशी येऊन ठेपली. स्त्रियांना हक्क मिळाले पाहिजेत, असा अर्ज न्यूयॉर्क येथील कायदेमंडळांत सुसान हिनें आणून गुदरला. तो वाचून राजकारणी लोक अगदीं भडकून गेले. बर्ने हा पुढारी म्हणाला, 'या अर्जीत लिहिलेले हक्क म्हणजे काय आहे? हा सारा मूर्खपणा आहे!! बेशरमपणा आहे!! हा गुन्हाच आहे!!! याला आम्ही थोडीतरी संमति द्यावी असें वाटते काय? अर्जदार म्हणतात कीं, स्त्री-पुरुषांचे हक्क समसमान असावेत. यांच्या जिव्हेला कांहीं हाड आहे काय? परमेश्वरानें पहिल्यानें पुरुष उत्पन्न केला आणि मग त्याच्या बरगडींतील एक फांसळी काढून त्यानें तिची स्त्री बनविली. म्हणजे मस्तक हे पुरुषांचेंच राहणार बायका या पुरुषाच्या हाडामांसांतून निघालेल्या म्हणून; त्या त्यांच्या दुय्यमच राहिल्या पाहिजेत. बायबलांतील ही योजना जर बायकांना पटत नसेल, तर आमची अब्रू संभाळण्यासाठीं त्यांना कड्याकुलुपांत कोंडून ठेवणें हेंच आम्हांला प्राप्त आहे." परंतु सुसान आणि तिच्या मैत्रिणी यांनीं हेंहि जुमानलें नाहीं. मोहीम अखंड चालू ठेवून त्यांनीं या पुरुषांचें डोकेंच उठविलें.
 हळू हळू समाजांतील प्रतिष्ठित आणि बुद्धिमान स्त्रिया या चळवळीच्या पाठीराख्या बनल्या. आघाडीला असलेल्या सुसान सारख्या स्त्रिया म्हणू लागल्या कीं, "या सुस्तावलेल्या आणि ऐदी पुरुषांना जोराचे धक्के दिल्याशिवाय हे कधीं जागे होणार नाहीत. चळवळीचा डंका जोरानें गाजावयास हवा. असले रट्टेच यांना दिले पाहिजेत." हें व्हावें म्हणून या बायांनीं आपलें केंस कापून घेतले; आणि त्या गांवांतून बेधडक हिंडूं लागल्या. अंगांत पैरणी घालून त्या सभांना जाऊं लागल्या. पुरुष म्हणाले, "आतां मात्र शर्थ झाली! या बायांना काय वेड लागलें आहे काय? यांनीं चोळ्या टाकल्या, लुगडीं टाकलीं, या विजारी आणि कुडती घालून सैरावैरा धांवत सुटल्या आहेत, याला म्हणावें तरी काय?" सुसानला वगैरे यांतला अतिरेक कळत नव्हता असें नाहीं. पण पुरुषांना धक्के द्यावयास असलेच कांहीं तरी मुलखानिराळें केलें पाहिजे, असें त्यांना वाटत होतें. पुरुषांना गांगरवून सोडल्यावर त्यांनीं आपलें बायकांचे वेष पुन्हां अंगावर घातले. परंतु वेष ताळ्यावर आले, तरी त्यांनीं आपली चळवळ मात्र बिलकुल थांबविली नाहीं.
 स्त्रियांच्या हक्काच्या घोषणा या तिन्ही बायांनीं साऱ्या देशभर उमटविल्या. होता होतां शेवटी स्टॅण्डन आणि रोझ या दमून गेल्या; त्यांच्यानें प्रचाराचें काम होईनासें झालें, आणि सर्व भार एकट्या सुसानवरच पडला. परंतु प्रकृतीनें ही अतिशय खंबीर असल्यानें तिनें हा भार कित्येक वर्षेपर्यंत लीलेनें उचलला. प्रचाराच्या कामी गांवन् गांव टिपावें असें तिला वाटे. जसें एखादें झपाटलेलें माणूस धांवत पळत सुटतें, तशी ही सुसान एका ध्येयानें वेडी होऊन साऱ्या देशभर भ्रमन्ती करीत राहिली. संवयीनें तिला आतां उत्तम बोलतां येऊ लागलें. तिच्या विरोधकांना आतां तिचा जीवित हेतु बरोबर कळून आला. तिच्या बोलण्यांत कांहीं खरें मर्म आहे, हें सर्वांनाच पटून आलें. सुसाननें संग्रह असा कांहीं केलाच नाहीं. ही कुमारी संन्यासिनी ध्येयासाठीं वेडी होऊन आमरण दरिद्रीच राहिली. या तिच्या तपश्चर्येचा योग्य तो परिणाम अमेरिकेंत होऊं लागला. तिनें आपल्या कामाला १८५२ साली सुरुवात केली; आणि पुढें १३ वर्षांत अमेरिकेंत एवढें मतान्तर झालें, कीं स्त्रियांना उच्च शिक्षण मिळावें, म्हणून वसार येथें एक मोठें कॉलेज सुरू झालें. पुढील दहा वर्षांत दहा सरकारी युनिव्हर्सिट्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सहशिक्षणाची व्यवस्था करून टाकली. १८८० पर्यंत मुलांना आणि मुलींना एकत्र शिक्षण देणाऱ्या कॉलेजांची संख्या १५४ पर्यंत गेली. हें सारें सुसानच्या प्रचाराचें फळ होय. जेव्हां ती कामाला लागली, तेव्हां कांहीं थोड्याशाच बायांना शाळांत मास्तरणीचीं कामें मिळालीं होतीं. पण पुढील पन्नास वर्षांत म्हणजे १९०० पर्यंत काय चमत्कार घडून आला, तो पहा. एकंदर शाळांतील सर्व शिक्षकांपैकी ६६ टक्के शिक्षक म्हणजे मास्तरणी झाल्या! शिकलेल्या बायका निरनिराळ्या उच्च प्रकारच्या धंद्यांत भरपूर शिरूं लागल्या; आणि यांतूनच अमेरिकन स्त्रीचें दास्यविमोचन झालें असें म्हटलें पाहिजे. गेल्या शतकाच्या शेवटीं शेवटीं विवाहित स्त्रियांवर असलेली गुलामगिरीचीं बंधनें कायद्याने पटापट तोडून टाकली. त्यांनीं धन मिळवावें, स्वतःचें म्हणून ठेवावें, कोणतेहि सांपत्तिक व्यवहार स्वतःचे म्हणून करावे, अशी मुभा त्यांना मिळाली. लग्न म्हणजे बटिकपणा ही व्याख्या गेली; आणि बरोबरीच्या नात्याचा करार असें रूप त्याला प्राप्त झालें. स्त्रीजातीची ही प्रगति पाहून वृद्ध होत चाललेल्या सुसानला पराकाष्ठेचा आनंद होत चालला.
 तिचें आतां वयहि झालें; आणि श्रमाश्रमानें तिच्या अंगाची बळकट कांठीसुद्धां काहींशी वाकू लागली. या वृद्धावस्थेत तिनें एकदां युरोपचीं फेरी केली. जेथें जावें तेथें स्त्रियांच्या उद्धाराचा संदेश तिनें सर्व लोकांना दिला. जर्मनींत असतांना विशेष कडक मजकुराचीं पत्रे तिनें आपल्या घरीं लिहिली. परंतु तेव्हांचें जर्मन सरकार असली पत्रे पोस्टांतून पुढें जाऊ देईना. युरोपचा दौरा आवरून सुसानबाई अमेरिकेला परत आल्या. आतां त्यांचें वय शहाऐंशी वर्षांचें झालें होतें. तथापि त्यांचा कामाचा ठोका चालूच होता. सुमारें पन्नास वर्षेपर्यंत सुसानबाई स्त्री-चळवळीच्या आघाडीवर होत्या, चळवळीसाठीं त्यांनी लक्षावधि डॉलर्सचे फंड उभे केले. परंतु स्वतःला अन्नवस्त्रापलिकडे कांहीं घेतलें नाहीं. तिच्या या तपस्येमुळे अमेरिकेच्या महान् कर्त्या माणसांत तिची गणना होऊं लागली. पण मतदानाचा हक्क मात्र ती जिवंत असतांना बायकांना मिळाला नाहीं ती वारल्यानंतर चौदा वर्षांनी म्हणजे १९२० साली हा हक्क अमेरिकेतील स्त्रियांना मिळाला.
 या वृद्ध स्त्रीचा वाढदिवस साजरा करावयाचा, असें लोकांनी ठरविलें. तिला आधींच अर्धांगाचा झटका आलेला होता. डॉक्टरने सांगावें, "बाई, तुम्ही आतां पडून रहा." पण सुसानबाई हंसून म्हणें, "हें पहा, घण डोक्यांत पडावयाचाच असला, तर मी पायावर उभी असतांनाच पडू दे." आणि शेवटीं तसेंच झालें. ठरल्याप्रमाणें वाढदिवसाच्या मेजवानीला सुसानबाई गेल्या. जेवण झाल्यावर नेहमींप्रमाणे त्यांनी एक अतिशय जोरदार भाषण केलें. शेवटीं त्या म्हणाल्या, "मला तुमच्यांकडून स्तुतीचा शब्द नको, मला तुमच्याकडून न्याय पाहिजे. माझ्या कामांत मी अपयश कधीं घेणारच नाहीं." व्याख्यान आटोपून त्या घरीं आल्या. त्यांना पुन्हां एक झटका आला; आणि स्त्रीजातीचा कैवार घेउन उठलेल्या या विजेसारख्या तळपणाऱ्या बाईचा अंत झाला.

● ● ●