कर्तबगार स्त्रिया/कॅथरीन ब्रेशकोवस्की

हिनेंच आपल्या हालांनी क्रान्तीचें बीज रुजविलें!


कॅथरीन् ब्रेशकोव्स्की : ६ :


 कॅथरीन् ब्रेशकोव्स्की या रशियन् क्रान्तीच्या जननीचें मूळचें नांव एक ओळभर लांब भरेल! "एकाटेरिना कॉन्स्टॅन्टिनोव्हा ब्रेशकोव्स्काया" एवढे लांबलचक नांव तिचें होतें. या स्त्रीच्या पोटीं रशियन राज्यक्रांति जन्माला आली, असें म्हणणें अतिशयोक्तीचें होईल; कारण तिला एकदां कां हा गौरव अर्पण केला, म्हणजे लेनिन् इत्यादि जबरदस्त कर्तबगार लोकांना कोणचे श्रेय शिल्लक उरतें असा प्रश्न क्रान्तीच्या अभिमान्यांना पडेल. तथापि ब्रेशकोव्स्की ही स्त्री असूनहि तिनें क्रान्तिकल्पना रुजत घालण्यासाठीं, आणि त्या व्यवहारांत आणण्यासाठीं सोसलेल्या वेदना लक्षांत घेतल्या, म्हणजे तिच्या चाहत्यांनीं क्रान्तीचं मातृपद तिला अर्पण करावें, हें पुरुषांच्या स्त्री-दाक्षिण्याला शोभेसेंच आहे. तसेंच हिला परित्यक्तपण प्राप्त झालें, हा दावा सर्वच क्रान्तिकारक मान्य करतील, अशी शाश्वति देववत नाहीं. तथापि अलंकारांच्या पोटीं सर्व कांहीं खपून जातें हा न्याय आपण मानला पाहिजे; आणि या स्त्रीला 'क्रान्तीची परित्यक्त जननी' हें नांव खुषीनें दिलें पाहिजे. आपण पुष्कळदां म्हणतों कीं, प्रतिकार-बुद्धींतून क्रान्तीचीं बीजें अंकुरित होतात; आणि ज्यांचे हाल चाललेले असतात, त्यांतूनच वीर पुरुष जन्माला येतात. पण हे नेहमींच खरें नसतें. धर्मकारणांत ज्याप्रमाणें उपाध्यायवर्गातूनच कित्येक सुधारक निपजले आहेत, त्याप्रमाणेंच समाजकारणांतही सरंजामशाही भोगणाऱ्या वर्गातून गरिबांचा कैवार घेणारे आणि स्वकीयांवर चढाई करून जाणारे क्रान्तिवीर निघाले आहेत. कॅथरीन ब्रेशकोवस्की हिचे वाडवडील आणि आजोळचें घराणें ही सरदार-दरकदार अशा वर्गातीलच होतें. दोन्ही घरीं सर्व तऱ्हेची सुबत्ता होती. पण इतर सरदार घराण्यांहून या लोकांच्या मनाची ठेवण कांहींशीं निराळी बनली होती. तेव्हांची रशियन सरदार घराणीं उतून मातून गेलेली असत. सुखलालसेपलिकडे दुसरा मनोधर्म त्यांना उरलेला नव्हता; आणि आपण हे भोग कशाच्या बळावर भोगतो, यांची वर्दीही त्यांना नसे. पैसा मातीमोल होता, तो उधळत रहावें, एव ढेंच त्यांना माहीत असे. कोणी देवाच्या नांवानें त्यांना हिणवलें, तर ते म्हणत कीं, 'आम्ही फक्त "पोटोबा" जाणतों, विठोबा जाणत नाहीं.' कांहीं कांहीं जमीनदार तर असे लफंगे बनले होते, की एकाच सुगीच्या सर्व धान्याचा सौदा ते अनेक व्यापाऱ्यांशी करीत. प्रत्येक व्यापाऱ्याकडून आनामत रकमा घेत, आणि शेवटीं धान्य कोणालाच विकत नसत. जर कोणी व्यापाऱ्यांनी तक्रार केली, तर ते त्याला पळवून नेत, आणि चाबकाखाली बेदम मारून काढीत. ऐदीपणामुळे यांचीं पोरेंहि सुस्त बनत आणि अर्धवट निवटत. पण असल्या अर्धववटांच्या सुखसोयीसाठीं हे लोक लाखों रुपये खर्च करीत. धडधाकट आणि बुद्धिमान पोरांच्या आईबापांना स्वाभाविकच वाटे कीं, असली मद्दड पोरें सुखांत रहात आहेत, आणि आपली चलाख मुले अर्धपोटीं काळ कंठीत आहेत. हीच तक्रार जर कां त्यांनीं उघडपणें केली, तर वरील व्यापाऱ्यांप्रमाणें त्यांच्याही पाठीं नरम होत असत. सुदैवाने कॅथरीन् ब्रेशकोव्स्की हिच्या आईबापांची सदसद्विवेकबुद्धि अजून जागृत राहिलेली होती. श्रीमंतीनें आणि सुखानें हे लोक कोडगे आणि बेपर्वा बनलेले नव्हते. गरिबांना आपल्यासारखाच जीव असतो, आणि त्यांनाही मनें आणि बुद्धि हीं परमेश्वरानें दिलेली असतात, हें त्यांनी ओळखलें होतें. इतकेंच नव्हें, तर त्याप्रमाणें त्यांची वर्तणूकही होत असे. कॅथरीनच्या अंगीं आईबापांचे हे गुण लहानपणापासूनच दिसूं लागले. देशांतील निराश्रित आणि गरीब लोकांनीं लष्करांत भरती व्हावें, नवीं नवीं युद्धे निघावीत, त्यांचें जीव जावें, आणि सरदारांनीं व सरंजामदारांनीं मागें राहून देशाभिमानाच्या गोष्टी कराव्या, हा सनातन प्रघात होता. जे कोणी अशा रीतीनें मरत, ते आपल्या जिवाला मुकत, त्यांचीं बायकापोरें उघडी पडत, आणि तिकडें सरदार-सरंजामदार देशाभिमानाचा डंका आपल्या वाड्याच्या मनोऱ्यावर वाजवीत बसत. कॅथरीनचे आईबाप याच वर्गातले असले, तरी आतांच सांगितल्याप्रमाणें त्यांची विचारशक्ति जागी झालेली होती आणि आपल्या लोकांच्या हातून कांहींतरी विपरीत घडत आहे, आपण पातकी आहोंत, या जाणिवेनें त्यांचें मन त्यांना सारखे खात असे. आपल्या आईबापांचें हें मानसिक दुःख कॅथरीनच्या ध्यानांत फार लहान वयांतच आलें होतें, आणि तिचा अंकुरही तोच असल्यामुळे तिच्या कोवळ्या मनाला या दुःखाचा चटका जास्तच तीव्रतेनें बसत असे. आपल्या आसपासचे मग्रूर श्रीमंत लोक नोकरचाकरांना आणि शेतावरच्या गुलामांना फटाफट फटके मारूं लागले, म्हणजे कॅथरीन् हिचें मन अगदीं कळवळून जाई. आपले आईबाप मात्र आपल्या लोकांना ममतेनें वागवतात, हें पाहून तिला फार आनंद वाटे. लोकांना मारावयास चटावलेले ते मग्रूर सरदार कॅथरीनच्या बापाला म्हणत, 'तुमचें घर म्हणजे प्रजासत्ताक राज्य आहे.' या त्यांच्या थट्टेचा अर्थ एवढाच होता कीं, हा भला गृहस्थ आपल्या लोकांना चांगल्या तऱ्हेनें वागवत असे.
 कॅथरीन् हिने आपल्या श्रीमंतीचा डौल लहानपणापासूनच टाकून दिला. गरिबांच्या मुलांतच जाऊन खेळावें, त्यांच्याशीं गोष्टी बोलत बसावें, असा तिचा शिरस्ता असे. एकादे वेळीं आपल्या सोबत्याच्या अंगांत जर कुडतें नसलें, तर आपल्या अंगांतलें काढून त्याला द्यावें, असा प्रकार ती कितीदां तरी करी. आईनें म्हणावें, "तूं आपले कोट सारखे देऊं लागलीस, तर कसें बरें चालेल?" यावर कॅथरीन् तिला उत्तर करी, "आई, बायबलांत सांगितलें आहे ना कीं, तुमच्यापाशीं जर दोन कोट असले, तर त्यांतला एक उघड्यानें हिंडणाऱ्या माणसाला देऊन टाका!" यावरून दिसून येईल कीं, कॅथरीनच्या मनाची ओढ जे कोणी रंजले-गांजले असतील, त्यांच्या बाजूला असे.
 कॅथरीनला वाटे कीं, साऱ्या गरीब लोकांना आपल्यासारखेंच सुखी करावें, त्यांना चांगलें खायला मिळावें, त्यांना अंगभर चांगलें वस्त्र असावें, आणि त्यांना त्यांचें स्वतःचें घर असावें. पण हें सारें कसें होणार होतें? कॅथरीननें ऐकलें होतें. कीं, अमेरिकेतील कॅलिफोर्निया देशांत सोन्याच्या खाणी आहेत, एल्-डो-रॅडो इकडेही नदीच्या वाळवंटांत सोन्याचे गोळेच्या गोळे सांपडतात; असें जर आहे, तर आपण अमेरिकेत जावें, खाणींतून खूप सोनें खणून काढावें, आणि तें घरीं आणून गरिबांना अन्न, वस्त्र, आणि निवारा प्राप्त करून द्यावा, असें तिला वाहूं लागलें. कॅलिफोर्निया किंवा एल-डो-रॅडो इकडे सोनें केवळ फुकट सांपडतें, फक्त 'खणून काढावें लागतें, किंवा गोळा करावें लागतें, असा तिचा समज होता. तिची ही कल्पन बालपणची अर्थातच फोल ठरली आणि लवकरच तिला कळून चुकलें, कीं अशा रीतीनें सोनें गोळा करून आणणें आणि त्याच्या बळावर गरिबांचे हाल नाहींसें करणें, गुलामांना मुक्त करणें, हें सर्वथा अशक्य आहे. परंतु लहानपणचीं तिचीं बरींच वर्षे या मनोराज्यांतच गेली.
 सरदार, सरंजामदार, बडे उत्पन्नदार, राजे-रजवाडे, आणि झारच्या दरबारांतील मानकरी यांच्या लेकी-सुना नटण्या-मुरडण्यांत आणि घरीं आलेल्या श्रीमंत पाहु ण्यांची बडदास्त ठेवण्यांत नेहमीं गुंतलेल्या असत. आज अमक्याच्या वाड्यावर, नाच आहे, उद्यां तमक्याच्या बागेत मेजवानी आहे, परवां झारच्या दरबारी कलावन्तांचा सन्मान आहे, अशीं बोलावणीं त्यांना येत असत. अर्थात् परस्परांच्या गांठीभेटी, पानसुपाऱ्या, नाचरंग, आणि गुजगोष्टी, यांत त्या पोरींचा सारा वेळ नाहींसा होई. परन्तु कॅथरीन ही अशा प्रकारांपासून पहिल्यापासूनच अलिप्त राहात असे. तिला हे श्रीमंतीचे ढंग आणि चोचले कधीं रुचलेच नाहीत. सुदैवानें तिला फ्रेंच आणि जर्मन या भाषा अवगत झालेल्या होत्या; आणि त्यांतील श्रेष्ठ दर्जाचें वाङमय तिच्या परिचयाचें झालें होतें. व्हाल्टेअर, रूसो आणि डिडिरो या क्रांतिकारकांचीं वाङमयें तिला फारच आवडत; आणि फ्रेंच राज्यक्रांतीवरचे ग्रंथ तर तिनें मुखोद्गत केलेले होते. १८४८ मध्ये जर्मनींत झालेली क्रान्ति तिनें चांगली अभ्यासिली होती. तिचें मन रशियांतून बाहेर पडून युरोपच्या क्रान्तिमय जीवनांत अव्याहत संचरूं लागलें. रशियांत क्रान्ति झाली नव्हती; परंतु क्रांति व्हावी अशी परिस्थिति मात्र होती. बाहेरच्या युरोपांतील लोकांनीं आपल्या दास्याचे पाश तटातट तोडलेले पाहून तिला मोठा विस्मय वाटे. हेंच धैर्य आपल्या देशांतील लोक केव्हां दाखवितील, अशी चुटपूट तिला लागून राहिली.
 क्रांति शब्दानें, अचानक झालेली उलाढाल किंवा एकाएकीं झालेली घडामोड सूचित होते. परंतु ही कल्पना असावी तितकी बरोबर नाही. क्रांतीच्या कल्पनांचा उद्भव, त्यांची परिणति आणि त्यांचा स्फोट कांहीं वेळ खातात. या साऱ्या गोष्टी विजेच्या धक्क्याप्रमाणें अचानक घडून येत नाहीत. कॅथरीननें ओळखलें कीं, बाहेरील देशांतील लोक दास्यमुक्त झाले आहेत, तसे आपल्याही देशांतील होतील; परंतु त्यांच्या विमोचनाची तयारी कोणीतरी केलीच पाहिजे. या लोकांच्या मनांत स्वातंत्र्याच्या कल्पना रुजत घातल्या पाहिजेत. त्या तेथें वाढल्या, म्हणजे केव्हां ना केव्हांतरी सफल होतीलच. सुटकेच्या कल्पना रुजत घालावयाच्या, तर लोकांच्या मनावरचें अज्ञानाचे किटण खरडून काढावयास हवें, आणि या कामाला शाळा हें फार उत्तम साधन आहे.
 म्हणून कॅथरीन् ब्रेशकोवस्की हिनें शेतांत राबणारांसाठी एक शाळा सुरू केली. हे शेतकरी अतिशय अडाणी होते. ते लाचार बनलेले असत. आपला जमिनीचा लहानसा टवका, त्या जमिनीवरचा गोठा, गांवठणांतील एकादें कच्च्या विटांचें खोपट, आणि फार झालें तर एखादी बैलजोडी याच्या पलिकडे त्यांच्या मनाचा व्याप जातच नसे. नांगरणें, पाऊस पडणें, पेरा करणें, तण काढणें, पाणी देणें, कापणी करणें, मळणें, सावकाराला धान्य घालणें, सरकारी कर भरणें, आणि स्वतः वर्षभर जीविताचें कातडें कसेंतरी कुरतडत बसणें, एवढेंच शेतकऱ्यांचें जीवन असे. कॅथरीनच्या मनानें घेतलें कीं, रशियन शेतकऱ्यांना यांतून बाहेर काढलेंच पाहिजे. युद्ध सुरू झालें, म्हणजे झारबाबासाठीं मेलें पाहिजे; आणि युद्ध नसलें, म्हणजे झारबाबाच्या खजिन्यांत कर भरीत राहिलें पाहिजे, ही या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील टांगलेली तलवार तोडून टाकली पाहिजे, असा तिच्या मनाचा निश्चय झाला.
 शेतावरची गुलामगिरी रशियाच्या झारनें रद्द केली होती हें खरें. शेतावर राबणारे लोक बंधमुक्त झाले, असें वर्तमान सर्व युरोपभर पसरलें; पण आपण बंधमुक्त झालों म्हणजे काय, याचें मर्म त्या जमीन कसणारांनाच फक्त कळून आलें! झारच्या फर्मानाचा परिणाम एवढाच झाला कीं, शेतावर राबत असतांना या लोकांना अर्धपोटीं राहावें लागत असें, तें आतां बंधमुक्त झाल्यावर त्यांना मुळींच खावयास मिळेनासें झालें! अमेरिकेतील बंधमुक्त निग्रोंची जी स्थिति झाली, तीच या राबणारांचीही झाली. जमीनदारांचा आणि यांचा कसलाही संबंध उरला नाहीं. अर्थात् जो थोडासा कुणगा त्यांना मिळावयाचा, तोही मिळेनासा झाला. शेतकरी सरकाराला म्हणू लागले कीं, 'आम्हांला तुम्ही मुक्त केलें असेल, पण आमची चंदीही तुम्ही बंद केलेली आहे; आम्हीं पोरांना काय आपली हाडें खाऊं घालावीं?' सरकारचे अधिकारी कोडगेपणानें उत्तर करीत, 'तें तुमचें तुम्ही पहा. तुमची गुलामगिरी नष्ट व्हावयास हवी होती, ती आम्हीं नष्ट केली आहे!'
 बेशकोवस्कीची शाळा चालूच होती; पण देशभर उडालेला हा हाहाःकार पाहून तिला वाटू लागलें कीं, क्रांति घडवून आणण्याला आपण योजत असलेला इलाज फार सौम्य आणि दिवसगतीचा आहे; हा उपाय जेथें पोंचावयास हवा, तेथें पोंचणार नाहीं. देशांत प्रचंड राज्यक्रांति झाली पाहिजे. ती झाली, तरच आर्थिक क्रांति होईल. आणि आर्थिक क्रांति झाली, तरच शेतकऱ्यांची दैना फिटेल. आतां राजकीय क्रांति करावयाची म्हणजे करावयाचें तरी काय? घडी हळू हळू बदलत न्यावी, इष्ट त्या सुधारणा घडवून आणाव्या, हा कार्यक्रम तिला बरोबर वाटे. राज्य- व्यवस्था आणि मग समाजव्यवस्था आमूलाग्र उलथून पाडावी, हें तिला अजूनही भावत नव्हतें. अशा काळांत एका सुधारणावादी क्रान्तिकारकाची व तिची गांठ पडली; आणि त्यांचा प्रेमसंबंध जुळून तिनें त्याच्याशीं लग्नही करून टाकलें. कॅथरीनच्या आईला असें वाटें कीं, पोरगी नाता तऱ्हेचें पाखंड बोलूं लागली आहे. एकदां तिच्या गळ्यांत संसाराची माळ पडली, म्हणजे ती शुद्धीवर येईल. अर्थात् लग्न झाल्याबरोबर ती म्हणाली, 'चला, माझा जीव आतां भांड्यांत पडला; आतां ही पोर मार्गाला लागेल.!'
 कॅथरीननें लग्न केलें खरें पण या नवरोजीच्या संगतींत तिच्या क्रांतिप्रवण मनाला समाधान मिळेना. आपण नवऱ्याची बायको झालों असूं; पण लहानपणापासून आपण घेतलेला ध्यास शांत होण्याचीं लक्षणें या नवऱ्याच्या संगतींत सांपडत नाहींत, व तिची हें तिला चक्क दिसूं लागलें. लवकरच पीटर क्रोपोटकिन् या एका तरुण माणसाची गांठ पडली. हा क्रोपोटकिन् राजघराण्यांतील असून फार रूपसुंदर माणूस होता. घरचाही हा चांगला गबर होता. परंतु क्रांतीच्या कल्पनेनें तोही केवळ भडकून गेला होता. आपल्या जिंदगीवर त्यानें तुळशीपत्र ठेवलें, सरकारांतून मिळालेले सारे किताब त्यानें टाकून दिले; आणि तो गरीब लोकांत जाऊन राहूं लागला. गरिबांसाठीं फकिरी पत्करलेल्या अशा या माणसाची आणि कॅथरीनची गांठ पडली. त्याच्याशीं संभाषण चालूं झालें, म्हणजे भविष्यकालाचें खरें खरें चित्र कॅथरीनच्या डोळ्यासमोर उभे राही; आणि त्याच्या वक्तृत्वानें तिच्या मनाचे अणु-रेणू कंप पावूं लागत. दूर बसून शेतकऱ्यांना शिकवावें, एवढ्यानें भागण्यासारखें नाहीं, आपण त्यांच्यापैकींच झालें पाहिजे, हा प्रिन्स क्रोपोटकिन् याचा नवा संदेश कॅथरीनच्या कानीं आला; आणि तिनें ठरविलें कीं, आपल्या समाजाचा आणि इभ्रतीचा त्याग करून आपण शेतकऱ्यांशीं तन्मय होऊन जावें. तिनें आपल्या नवऱ्याला एके दिवशीं विचारलें कीं, 'मला आतां तत्सम होऊन जावयाचें आहे. मी आपल्या साऱ्या पीठिका विसरणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर प्रत्यक्ष शेतकरी जीवनांत प्रविष्ट होण्याला येतां काय?' नवरा म्हणाला, "तूं म्हणतेस तें कदाचित् आवश्यक असेल; पण माझ्या हातून ही गोष्ट होण्यासारखी नाहीं. मला हें झेंपायचें नाहीं."
 नवऱ्याचें उत्तर ऐकून कॅथरीन् मनांत खट्टू झाली; पण तिनें ताडकन् उत्तर केलें कीं, "कांहीं हरकत नाहीं. तुम्ही बाहेर पडला नाहीं तर नाही मी मात्र आतां चाललें." या वेळीं तिचे दिवस अगदीं भरत आले होते. परंतु नवऱ्याचा आणि घराचा त्याग करून, क्रांतीची कल्पना अमलांत आणण्यासाठी ही तरणी बाई बाहेर पडली. पुढें काय वाढून ठेवलें आहे, हें तिला दिसतच होतें. एक तुरुंगांत खितपत पडावें किंवा दूर कोठेतरी सायबेरियाच्या रेताडांत हद्दपार व्हावें. अर्थात् मरेपर्यंत मग घर नाहीं, नवरा नाहीं, कोणी नाहीं. तथापि तिनें त्याला स्वच्छच सांगितलें कीं, 'क्रांतीसाठीं मी आतां मरणाला कवटाळण्यास तयार झालें आहे!'
 कॅथरीन घरांतून बाहेर पडली ती, थेट रशियाची एक जुनी राजधानी कीव येथे गेली. या कीव शहरीं तिची बहीण राहत असे. या विधवा बहिणीकडे जाऊन तिनें कांहीं दिवस मुक्काम केला. आणि शरीरावरचा भार हलका होईपर्यंत ती तेथेंच राहिली. कांहीं थोडें शिकविण्याचें काम करावें, आणि आपला गुजारा करावा, असा क्रम तिनें ठेवला होता. दिवसां शिकवावें आणि रात्रींच्या वेळीं क्रान्तीचा दिवस जवळ यावा, म्हणून लोकांत चळवळ करावी. असे थोडे दिवस जातांच कॅथरीन प्रसूत झाली. आतां मात्र तिची निष्ठा कसोटीस लागायची होती. पण तिनें आपला मुलगा, भाऊ आणि भावजय यांच्या हवाली केला; आणि अंगांत थोडी शक्ति येतांच तीं पुन्हां संचाराला बाहेर पडली. "आईपण आणि क्रांतींची चळवळ ही दोन्ही मला झेपणार नाहीत; पण क्रान्तीला तर मी माझा जीवच अर्पण केला होता; मुलाला टाकून जाणें सोपें काम नव्हतें. त्याला लोकांच्या हवालीं करतांना माझें काळीज केवळ पिचून गेलें." असें ती पुढें एकदां म्हणाली. प्रपंच करून गुलामगिरीत वाढावयासाठीं प्रजा निर्माण करावी, कां प्रपंचावर अंगार ठेवून राष्ट्रांतील लोकांना बंधमुक्त करण्यासाठी जिवावर उदार व्हावें, असा प्रश्न तिच्या पुढें होता; आणि असें सांगतात कीं, कॅथरीननें जसा त्याग केला, तसा त्याग करणाऱ्या कित्येक रशियन स्त्रिया या काळांत उत्पन्न झाल्या.
 पोटासाठी कांहींना कांहीं करणें भाग होतें. शिवाय 'तुम्ही धंदा काय करतां, खातां काय' असा प्रश्न सरकारी लोक आपल्याला विचारणार, हे तिला माहीतच होतें. धंदा नाहीं म्हटलें कीं पोलिसांचा डोळा आपल्यावर जास्तच राहील, म्हणून तिनें रंगाऱ्याचे काम शिकण्यांत कांहीं दिवस घालविले. तथापि माशा कॅलेन्किना आणि याकोब स्टिपॅनोविचच् यांच्यासह कॅथरीन् क्रांतीच्या चळवळीला निघाली. क्रांतीची ज्योत कोठें सांपडते, हें त्यांना पहावयाचें होतें. त्यांनी शेतकरी स्त्रियांचीं रूपें घेतलीं आणि कामाला सुरवात केली.
 त्या काळीं प्रवासाला परवाने लागत. म्हणून त्यांनीं खोटेच परवाने तयार केले. कॅथरीनच्या परवान्यांत म्हटलें होतें कीं, 'या बाईचें वय चाळीस वर्षांचें असून, ओर्लेव प्रांतांतील एका खेडेंगांवची ही आहे.' खरें म्हटले म्हणजे कॅथरीनचे वय सध्या तीस वर्षांचेच होते; पण आपण थोडें पोक्त दिसावें, अशी तरतूद तिनें केली. तसेंच एकाकी प्रवासांत सौंदर्यहि पुष्कळदां धोक्याचे ठरतें. म्हणून तें घालविण्याचीहि व्यवस्था तिनें केली; म्हणजे कसली तरी ओंगळ वस्त्रे पेहराव, सुरकुत्या पडलेला पदर तोंडावरून घ्यावा, पायांत कसला तरी झाडाच्या सालीचा वगैरे जोडा घालावा, आणि शेतकऱ्यांच्या बायका अंगांत घालीत असत तसें एक निळे कुडतें घालून, कमरेला एक तांबडा पट्टा बांधावा. तात्पर्य, कोणालाहि असेंच वाटावें कीं, ही एक साधीसुधी गांवढळ बाई आहे. पण किती झालें तरी तिच्या शरीराचें सुकुमारपण पूर्णपणे लपणें सर्वथा अशक्य होतें. अशा वेषानेंच ती शेतकऱ्यांत आणि कामगारांत जाऊन मिसळत असे. पण बारीक रीतीनें तिच्याकडे पाहणारांना असें वाटें कीं, ही आपल्यापैकी नव्हे. एकदां एक मजूर तिच्या शरीराकडे पाहून म्हणाला, 'आपण शेतकरी आहों असें तुम्ही म्हणतां, मग तुमचे हात इतके गोंडस आणि मऊ कसे?' कॅथरीनने बतावणी केली कीं, एका श्रीमंत उमरावाच्या घरीं मी कामधंद्याला होते. तो मला नेहमीं नाजुकच कामें सांगी. त्यामुळे माझे हात असे राहिले आहेत." मजुराला हें खरें वाटेना. तो कांहींसा हंसून म्हणाला; "आलं ध्यानांत; आलं ध्यानांत."
 या गांवाहून त्या गांवाला असें करतां करतां तिचा प्रवास पुष्कळच झाला. सर्व देशभर हिंडावें आणि खेडेंगांवच्या लोकांत असंतोषाची आगटी पेटवावी, असा कॅथरीनचा हेतु होता. म्हणून ती प्रवासाला निघाली होती. चालून चालून तिच्या पायाला फोड येत; ती श्रीमंतींत वाढलेली पण आतां शेतकऱ्यांच्या घरचा मिळेल तो तुकडा तिला खावा लागे. कित्येकदां तो तोंडापुढें सुद्धां आणू नये असें वाटें. पण इलाज नव्हता. कोठें मुक्कामाला राहावें, तर चन्द्रमौळी घर असावें, आंत कोळिष्टकें लागलेली असावीं, तेथेंच खांद्यावरच्या सामानसुमानाचा भार उतरवून एखाद्या पटकुरावर झोपीं जावे; आणि उंदरांची चिवचिव कानाशीं चालू असतां जी काय मिळेल ती झोंप घ्यावी, अशा रीतीनें कॅथरीनचा प्रवासाचा कार्यक्रम अखंड चालू राहिला.
 इतके हाल होत होते, तरी तिनें आपले काम सोडलें नाहीं. खेडेगांवच्या लोकांत झारशाहीच्या विरुद्ध भावना उत्पन्न करणें, हें आपलें पहिलें काम आहे, असें तिनें ठरविलें होतें. पण बोलावयास जावें, तो शेतकरी म्हणत, "आमचे झारबाबा मोठे थोर आणि उमदे गृहस्थ आहेत. आम्ही त्याची लेकरेंच आहोत; आणि तो आमचा बाप आहे. आमचे हाल होतात, याला तो काय करणार? सरदार लोक हे अतिशय वाईट आहेत; हे उमराव आम्हांला सारखे छळत असतात आणि झारला जाऊन सांगतात कीं, जिकडे तिकडे अबादी- अबाद आहे, लोक तूप-साखर खात आहेत; आणि राज्याचा बंदोबस्त उत्तम आहे. आमच्या हालांची कहाणी झारच्या कानावर कधीं जातच नाहीं." लोकांच्या मनांतून हा गैरसमज काढून टाकणे फार कठीण जाऊं लागलें. झार स्वतः प्रजेकडे दुर्लक्ष करतो; आपण सुखांत राहतो; आणि कष्ट करणारांना छळणारे कायदे पास करतो, कोणी थोडी मान वर केली, कीं त्याला दडपून टाकण्यासाठीं आपलें प्यादें तो पाठवितो, हे कॅथरीनचे म्हणणे शेतकऱ्यांना आणि कामगारांना खरेंच वाटेना. झारचा दरबार कसा चालतो, आणि सामान्य लोकांची चालू असलेली दैना खुद्द झार स्वतः उघड्या डोळ्यांनी कशी पाहतो, या संबंधींची छापलेलीं पत्रके या लोकांना वाचून दाखवावीं, तर त्यांवरहि त्यांचा विश्वास बसेना. ते म्हणत, "कायद्याची पुस्तकें उमरावांनी तयार केलीं आहेत; आणि आमच्या रक्षणासाठीं झारबाबांनीं चांगल्या कायद्याचीं जीं पानें यांत घातलेलीं असत, तीं हे उमराव लोक फाडून टाकतात." अशा या लोकांचा भ्रम नाहींसा करणें मोठें कठीण काम होतें.
 तथापि 'मोझेस् आणि त्याचे चार भाऊ' अशा सारखीं कांहीं कांहीं पुस्तकें या लोकांना वाचून दाखविण्याचा क्रम कॅथरीननें चालू केला. आणि मग मात्र या अडाणी लोकांचे डोळे एकदमच उघडले. त्यांना कळून चुकलें कीं, अमीर उमराव आणि झार हे दोघेहि एकाच माळेचे मणी आहेत, सारे उडीद सारखेच काळे आहेत, काळे-गोरे म्हणून निवडावयास मुळींच जागा नाहीं. हळू हळू शेतकऱ्यांत आणि कामगारांत असंतोषाचें वारें फैलावूं लागलें. पण अजूनहि झारबाबावर श्रद्धा असलेल्या लोकांनीं कॅथरीनच्या या चळवळीची बातमी पोलिसांच्या कानावर घातली; आणि मग एके दिवशीं या लोकांच्या पुढें क्रांतिवाङ्मयाचें वाचन चालू असतां त्यांनीं कॅथरीनवर झडप घातली.
 क्रांतिकारकांची भीति झारच्या दरबाराला इतकी पडली होती, कीं या लोकांना शिक्षा द्यावयाची ती कंबर मोडेशीच दिली पाहिजे, असें दरबारनें ठरविलें होतें. पोलिसांनीं कॅथरीनला पकडलें, तेव्हां ती म्हणाली, 'मी दुसरें तिसरें कांहीं करीत नसून या अज्ञ लोकांना विचार करावयास शिकवीत आहे.' यावर ते पोलिस म्हणाले, 'थांब, तुला विचार करावयाला छान जागा देतों.' त्यांनीं तिला एका जेलखान्यांत भिरकावून दिलें. तेथें डोळ्यांत बोट घातलें, तरी दिसत नव्हतें; उंदीर-घुशींचा सुळसुळाट चालला होता; आणि आंतल्या लोकांनीं केलेल्या घाणीवर आंत येणारांचे पाय सरासर घसरत होते. सारी रात्र कॅथरीन् हिनें उभे राहूनच काढली. यानंतर या तुरुंगांतून त्या तुरुगांत तिची रवानगी होत राहिली; आणि निरनिराळ्या जेलखान्यांची चव तिला आणून दिल्यानंतर त्यांनी तिला सायबेरियांत हद्दपारीवर पाठवून दिलें. पांच वर्षेपर्यंत खाणी खणण्याचें सक्तमजुरीचें काम तिला देण्यांत आलें. ही मुदत संपल्यानंतर पुढे कित्येक वर्षे सायबेरियाच्या रेताडांतच तिनें राहावें, अशी सजा देण्यांत आली.
 पोलिसांनी तिला एका गाडीत बसविलें, दोन्हीकडें दोन गलेलट्ठ शिपाई बसविले होते. आठवड्यामागें आठवडा ही गाडी खडकाळ सडकांवरून धक्के खात चालली होती. कोठेंहि दहा मिनिटांपेक्षां जास्त मुक्काम त्यांनी होऊ दिला नाहीं. झोपेचें नांव नाहीं. आणि ते गलेलठ्ठ आसामी तर तिच्याकडे सारखे टक लावून बसले होते. कोठें एकादी रात्र मुक्काम करावा, तर मुक्कामाची जागा म्हणजे उंदीर-घुशींचें पेव फुटलें आहे, असे वाटत असे. अशा प्रकारची ही दुर्धर आपत्ति या झारबाबांच्या काळांत दहा लक्ष लोकांच्या नशिबी आली होती.
 जातां जातां शेवटीं ही टोळी कारा गांवच्या खाणीजवळ येऊन पोंचली. येथें सक्तमजुरी तर होतीच, पण कांहीं कांहीं वेळां ऐद्यासारखे बसून राहण्याची शिक्षा होत असे. थोडेसे दिवस येथे गेल्यावर उत्तर ध्रुव प्रदेशांतील बार्गुझिन् या गांवाकडे तिची रवानगी करण्यांत आली. हा गांव जवळ जवळ बर्फात गाडलेलाच असे. तेथें पोंचेपर्यंत कॅथरीन् हिला एक हजार मैल पायीं चालावें लागलें. सारे कैदी लोक खालीं माना घालून दिवसानुदिवस चालले होते. हुं कां चूं करण्याची सोय नव्हती. वाटेनें उजव्या डाव्या हाताला पहावें, तर असल्या हालांत मरून गेलेल्या कैद्यांच्या प्रेतांचे सापळे दोन्ही बाजूला भेडसावीत असत. तेथें पोंचल्यावर कांहीं स्थानिक लोकांच्या मुलांना शिकवावें, असें कॅथरीननें ठरविलें. पण तिला जरब देण्यांत आली कीं, झारच्या राज्यांत शिकविणें-बिकवणें सारें बंद आहे.
 बरेच दिवस गेल्यावर तेथलीं तीन तरणीं शिकाऊ पोरें बरोबर घेऊन कॅथरीननें या गांवांतून पळ काढला. सायबेरिया म्हणजे एक अवाढव्य देश आहे; आणि इतक्या वर्षापूर्वी तर पाऊलवाटांशिवाय दुसऱ्या वाटाहि फारशा नसत. अर्थात् वाटाड्याशिवाय वाटचाल करणें सर्वथा अशक्य होतें. कॅथरीनचा वाटाड्या वाट चुकला आणि ही सारी मंडळी अचानक पोलिसांच्या हातीं लागली!
 कॅथरीनला पुन्हां खाणींतल्या सक्त मजुरीची शिक्षा झाली. येथें केवळ कदान्नावर रहावें लागे. पण कॅथरीनची मूळची शरीर प्रकृति दणकट आणि तिची मनःप्रकृति तर अधिकच बळकट; त्यामुळे ती त्यांतूनहि बचावून गेली. एक अमेरिकन बातमीदार तिला भेटण्यासाठीं मुद्दाम गेला होता. त्याला ती कठोर निग्रहानें म्हणाली, "आम्ही मरून जाऊं; आमचीं मुलें बंधमुक्त होतील; कदाचित् मुलेंहि मरून जातील; पण नातवंडें तरी मुक्त होतील!" तिचा हा दुर्दम्य आशावाद पाहून बातमीदार चकितच होऊन गेला.
 १८९६ मध्ये, सायबेरियांतून तिची मुक्तता झाली. परत आल्यावर ती आपल्या जुन्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटली. त्यांचें तें सुखाचें जीवन पाहून तिला मोठा विस्मय वाटला. परंतु रशिया मुक्त होईपर्यंत ती गप्प बसणार नव्हती. ती पुन्हा क्रांतिकारकांच्या टोळीला जाऊन मिळाली. शेतकऱ्याचा वेष घेऊन तिनें कामाला सुरवात केली. पोलिसांना हुलकावण्या देण्यांत ती आतां पटाईत झाली होती. केव्हां शेतकऱ्यासारखें दिसावें; केव्हां स्वैपाकिणीचा वेष घ्यावा, असें करीत तिनें कांहीं दिवस घालविलें. आणि मग ती अमेरिकेत गेली. तेथील लोंकांनीं तिचा जयजयकारच केला. ती सभास्थानीं येतांच सारे श्रोते तटकन् उभे राहात; हातरुमाल उडवून ते तिच्या नांवानें आरोळ्या मारीत; आणि "रशियांतील क्रांतीची जननी" म्हणून तिचा गौरव करीत. ते तिला म्हणू लागले कीं, "आतां तुम्ही रशियांत परत जाऊं नका." परंतु या करारी बाईनें हा त्यांचा प्रेमळ आग्रह बाजूला सारला; आणि ती स्वदेशाला परत गेली.
 १९१२ साली तिच्यावर पुन्हा खटला झाला; आणि तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. पुन्हा शिक्षा, पुन्हा सायबेरिया, असें चाललें होतें. पोलिसांना वाटत होतें कीं, या प्रदेशांतील दोन तीन हिंवाळे हिनें खाल्ले, म्हणजे ही मरून जाईल. पण त्यांचा अदमास अगदीं चुकला. या बाईचें शरीर लोखंडाचें बनलें होतें. ती आतां सत्तरीला आलेली होती. पण तिचें अंग चांगलें गुबगुबीत आणि चेहरा लालबुंद असे. जो जो वय व्हावें, तों तों ही जास्तच तरुण होत चालली आहे, असें पोलिस लोक म्हणूं लागले. ते म्हणत, "ही बाई चेटकी आहे." त्यांनीं तिच्यावर सक्त पाहारा ठेवला; पण असल्याहि पाहाऱ्यांतून तिनें शेवटीं झुकांडी दिलीच, पण तिचें दैव खोटें हजारों मैल चालत जाऊन आतां रशियांतून बाहेर पडणार तोच, पोलिसांनी तिला पुन्हां गांठलें. त्यांनीं तिला सायबेरियाच्या अगदीं उत्तर टोकाकडे फेकून दिलें. येथल्या समुद्राच्या खाडींत आपण गोठून मरून जाणार, असें कॅथरीनला स्वतःलासुद्धां वाटू लागलें. चार-पांच वर्षे गेली; आणि एके दिवशीं शुभवर्तमान आलें कीं, "रशिया स्वतंत्र झाला आहे; क्रान्ति यशस्वी झाली आहे; झारशाही समूळ उपटून पडली आहे!" आपलें स्वप्न खरें ठरलेलें पाहून ही पराक्रमी बाई आनंदानें बेहोष होऊन गेली आणि मास्कोला परत आली.
 परत आल्यावर क्रान्तीचा एकंदर रोख आपल्याला हवा आहे तसा चालूं नाहीं, हे पाहून तिला वाईट वाटलें. जर्मनांशीं क्रान्तिकारकांनीं तहनामा करावा, हें तिला बिलकुल पसंत नव्हतें. मतभेद होऊन ती शेवटीं झेकोस्लोव्हाकियांत जाऊन राहिली. तथापि साऱ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, तशाच नेहमीं घडत नाहींत, हा मानवी जीवनांतला उंच विचार तिनें प्रमाण मानला. पण शहात्तराव्या वर्षी या बाईनें प्राग येथें एक नवीन शाळा काढली; आणि आपल्याला पसंत असलेल्या क्रांतितत्त्वांचें शिक्षण चालू ठेवलें. चौदा वर्षे म्हणजे नव्वद वर्षांची होईपर्यंत हा उद्योग तिनें चालू ठेवला; आणि जीवितांत कृतकृत्य होऊन या क्रांतिकारक वृद्धेनें जगाला शेवटचा प्रणाम केला.

● ● ●