कर्तबगार स्त्रिया/मेरी कार्पेंटर

हिनें गुन्हेगार मुला-मुलींना माणसांत आणलें!


मेरी कार्पेंटर : ७ :


 डॉ. लँट कार्पेंटर हा अध्यात्मविद्येवर लिहिणारा एक मोठा ग्रंथकर्ता होऊन गेला. पहिल्यापासूनच त्याचें मन धर्मप्रवण असल्यामुळे त्यानें व्यवसायहि उपदेशकाचाच पत्करला. त्याची बायकोहि फार सालस आणि धर्माचा सतत विचार करणारी होती; अर्थात् घरांतील सारें वातावरण याच कल्पनांनीं भरलेलें असे. परमेश्वराचे चिंतन आणि मानवाची सेवा हे जे दोन धर्मांचे भाग ते या पतिपत्नींना चांगले अवगत होते. हीच त्यांची धर्मबुद्धि त्यांच्या सर्व मुलांतहि उतरली. मेरी कार्पेंटर ही १८०७ मध्यें जन्मली. मुलीला मेरी हें नांव देण्यांत आईबापांनीं आपली हीच बुद्धि प्रगट केली असें म्हटलें पाहिजे. मुलांना आणि मुलींना शिक्षण देण्याच्या कामी डॉ. कार्पेंटर हा अतिशय दक्ष असे. आपल्याला पसंत असलेलीं मतें आणि मनोज्ञ वाटणाऱ्या भावना यांचा ठसा मुलांच्या मनावर आईबापांनीं लहानपणींच उठविला पाहिजे, असें त्याचें मत होतें. जे लोकांनीसुद्धां करावें असें त्याला वाटें, तें त्यानें स्वतः केलें असेल, हे उघडच आहे. परंतु मतांचें व भावनांचें शिक्षण देण्याचें काम जरी वडिलांनी चालू ठेवले असले, तरी मुलींना घरगुती व्यवसाय आलेच पाहिजेत, असा मातुश्रींचा कटाक्ष असे; आणि या दोहोंचा मेळ कसा घालावा हें डॉ. कार्पेंटर याला चांगलें कळलेलें होतें.
 १८२९ पर्यंत मेरी कार्पेंटर हिच्या जीवितांत विशेष कांहींच घडलें नाहीं. तेव्हांच्या मुली ज्याप्रमाणें वागत, त्याप्रमाणेंच तीहि वागे; आणि थोड्याफार फरकानें सरसकट मुलींच्या मेळांत सहज लोपून जाईल, अशीच तिची चालचलणूक असे. तिला एकविसावें वर्ष लागलें; आणि बापानें तिला पत्र लिहिलें कीं, "तुझ्या जीविताची घडी पुढें कशी बसत जाणार आहे, याची निश्चित कल्पना मला होत नाहीं; पण येशू ख्रिस्तानें जो धर्मदीप प्रज्वलित केला आहे, त्याचीं किरणेंच तुझ्या अंगावर पडावींत, आणि त्या तेजाच्या अनुरोधानें तूं आपलें भावी जीवित घालवावे, असे मला वाटतें तूं स्वतःचा उद्धार करून घ्यावास, आणि कसलाहि दिमाख न दाखवितां परमेश्वराने निर्माण केलेल्या मानवांची सेवा तूं मनापासून करावी अशीहि माझी इच्छा आहे."
 डॉ. कार्पेंटर हळूहळू थकूं लागला, आणि त्याचा नित्याचा व्यवसाय त्याच्या हातून होईना. प्रपंच कसा चालवावा असा प्रश्न पडला. तेव्हां मेरी आणि तिच्या दोन बहिणी यांनी ठरविलें कीं, आपण एक स्त्रीशिक्षणाची शाळा चालवावी. मुलींची आईहि या कामी त्यांना साहाय्य करावयास सिद्ध झाली. तिलाहि थोडे शिवणें, टिपणें, विणणें इत्यादि कामें येत असत; आणि स्त्री- शिक्षणांत या गोष्टी अवश्य मानल्या जात. अर्थात् आई आणि मुली या चौघींनीं मिळून शाळा सुरू केली; आणि डॉ. कार्पेंटरच्या प्रपंचाचा गाडा त्या मोठ्या तरतुदीनें हाकूं लागल्या. मुलींना असें दिसूं लागलें कीं, आपण शाळा काढली खरी आणि आपण शिकवितोंहि, पण शिक्षणाच्या व्यवसायांतील खरें कसब अजून आपल्याला लाभलेलें नाहीं. तें हस्तगत करण्यासाठीं त्या चारसहा महिने पॅरिसला जाऊन राहिल्या; आणि मग स्त्रीशिक्षणाची शाळा कशी चालवावी, हें त्यांना जास्त चांगलें समजूं लागलें. शाळा लवकरच भरभराटीला आली. लॅटिन, ग्रीक या पुराणभाषांचें शिक्षणहि या शाळेत मिळत असे. पण मुख्य म्हणजे कार्पेंटर यांच्या कुटुंबांत चालत आलेली जी समाजसेवेची आवड, ती सर्व विद्यार्थिनींच्या मनांत रुजत राहिली. या शाळेतून बाहेर पडलेल्या कांहीं मुलींनीं पुढें आपलें प्रपंचाचें काम सांभाळून गरीब व अज्ञान लोकांना शिकविण्याचें काम चालू केलें. कांहींनीं आदर्श प्रपंच कसे करावे, हें तेव्हांच्या लोकांना दाखवून दिलें; आणि कांहीं कांहीं तर सार्वजनिक जीवितांत आपल्या कर्तृत्वानें चांगल्याच मान्यता पावल्या. शाळेच्या चालकांचा असा एक ठाम सिद्धांत असे कीं, शिक्षणामुळे स्त्रिया प्रपंचाला नालायक होतात. हें मत खोटें ठरवावें, असा मुलींचा आग्रह असे. आया मात्र म्हणत कीं, इतकें थोरलें शिकून काय करावयाचे आहे? शिवणें, टिपणें, विणणें, आणि हिशेब- ठिशेब ठेवणें येवढें आलें म्हणजे पुरें!'
 सुमारें पांच वर्षेपर्यंत मेरीचा हा शिक्षण देण्याचा उद्योग चाललेला होता. हिच्या मनांत कांहीं अकल्पित फरक पडेल, आणि हिच्या जीविताला कांहीं निराळें वळण लागेल, असें कुणालाहि वाटलें नाहीं. परंतु याच सुमारास एक अकल्पित घटना घडून आली आणि मेरीच्या मनाला एक निराळाच झोका मिळाला. या अकल्पित घटनेचे स्वरूप थोड्या विस्ताराने सांगितले पाहिजे.
 राजा राममोहन रॉय हा आधुनिक काळांतील भारतांतील पहिला सुधारक होय. बंगाल्यांत इंग्रजांचें राज्य इतर प्रांतांच्या आधीं झालेले असल्यानें ख्रिस्ती मिशनऱ्यांची पैरवी तिकडे बरीच झालेली होती. सामाजिक आणि धार्मिक मतांत मोठी चलबिचल उडून राहिली, आणि 'आपले आजपर्यंत सारेच चुकत आलें आहे' असा तेव्हांच्या लोकांचा समज झाला. राजा राममोहन रॉय हा तिकडील एक उच्चकुलीन ब्राह्मण असून प्राचीन विद्येचें त्याचें अध्ययन चांगलें झालेलें होतें. इंग्रज लोकांची राज्यकारभाराची तऱ्हा, त्यांचें साहस, त्यांची विद्याभिरुचि आणि त्यांच्या मिशनऱ्यांचे धर्मप्रसारासाठीं चाललेले यत्न हीं पाहून राममोहन रॉय अगदीं विस्मित होऊन गेला होता. त्याच्या मनाचा ओढा ख्रिस्ती धर्माकडे होऊं लागला. मूर्तिपूजेसंबंधानें त्याला पराकाष्ठेची अप्रीति उत्पन्न झाली. संस्कृत, पर्शियन व अरेबिक या तीनहि भाषा त्याला फार चांगल्या येत होत्या, आणि म्हणून मूर्तिपूजा व इतर सुधारणेचीं मतें यासंबंधींचीं अनेक पुस्तकें त्यानें या तीनहि भाषांत लिहिली. इंग्रजी भाषेतहि येशू ख्रिस्ताच्या मूलभूत सिद्धांतासंबंधानें त्यानें एक ग्रंथ लिहिला. होतां होतां शेवटीं आपण इंग्लंडांतच जावें आणि तेथें धर्माचा तौलनिक अभ्यास करावा, असें त्याला वाटूं लागलें; आणि त्याप्रमाणें तेव्हांच्या त्या दिवसांत त्याने परदेशगमनहि केलें.
 तो ब्रिस्टल येथें गेला, तेव्हां त्याची आणि डॉ. कार्पेंटर याची गांठ पडली. डॉ. कार्पेंटर हा अध्यात्मवादी लेखक होता, हें मागें सांगितलेच आहे. कार्पेंटर व राजा राममोहन रॉय यांच्या पुष्कळ चर्चा चालत; आणि त्या ऐकावयास मुलीहि बसत. राममोहनच्या विचाराचा पल्ला आणि त्याच्या मनाचें विशाल क्षितिज यांचा मेरीच्या मनांवर विलक्षण परिणाम झाला. तिचा बाप धर्मपंडितच होता; आणि त्याच्या मुखांतून धार्मिक प्रमेयांचें विवेचन तिनें कितीदा तरी ऐकलेलें होतें. पण या हिंदु पंडिताच्या विवेचनाची छाप तिच्या मनावर जास्तच बसली. हिंदुस्थानांत स्त्रीशिक्षण पसरावें, अशी राजा राममोहन यांचीहि इच्छा होती. हें काम आपण करावें, आणि शिक्षणाच्या द्वारा भारतांतील अज्ञानाचा निरास करावा, अशी वासना मेरीच्या मनांत उत्पन्न झाली. हें सारें पुढें केव्हांतरी व्हावयाचें होतें. पण त्या कल्पनेचें बीजारोपण राममोहन यांच्या सहवासानें तिच्या मनांत झालें हें खरें.
 १८६६ त राजा राममोहन रॉय यांच्या 'इंग्लंडांतील शेवटचे दिवस' या ग्रंथाचे संपादन तिनें केलें. ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेंत रॉय यांच्या संबंधाची आपली आदरबुद्धि तिनें ठिकठिकाणीं प्रकट केली आहे. धर्म आणि सदाचार यांच्या प्रसारासाठीं, रॉयनें केलेल्या प्रयत्नांचा तिनें मोठाच गौरव केला आहे; आणि त्याची गुणाढ्यता व त्याचे शुचिष्मंत चरित्र यांविषयीं गाढ आदर प्रकट केला आहे. बापाने दिलेल्या धर्मशिक्षणाच्या खालोखाल राममोहन याच्या उदात्त सहवासाचा आणि मताचा मेरीच्या मनावर फार मोठा परिणाम झाला असला पाहिजे.
 मेरीचें स्त्रीशिक्षणाचें काम चालूच होतें. डॉ. कार्पेंटर याची प्रकृति आतां अगदीं बिघडली. हवा पाणी बदलावें, म्हणून इंग्लंडांत तो अनेक ठिकाणीं जाऊन राहिला; पण प्रकृतीला कोठेंच आराम पडेना. शेवटीं वैद्यांनी सांगितलें कीं, दक्षिण युरोपांत कोठेतरी जावें. बापाचें दर्शन पुन्हां होईलच, अशी शाश्वति मेरीला नव्हती. मेरीला या वियोगाच्या वेळीं अत्यंत दुःख झालें. पण डॉ. कार्पेंटर याचा अंत निराळ्याच तऱ्हेने व्हावयाचा होता. नेपल्समधून लेगहॉर्न इकडे जातांना, जहाजावरून तो समुद्रांत पडला. दोन महिन्यांनीं त्याचें प्रेत किनाऱ्याला लागलें! तेव्हां त्याचें खरोखरी काय झालें हें सर्वांना कळलें.
 आतां या साऱ्या मुली पोरक्या झाल्या. पोरकें होणें म्हणजे काय, हें मेरीच्या ध्यानांत आलें. पण आपल्याला एकविसावें वर्ष लागलें, तेव्हां बापानें कोणचा उपदेश केला होता, याचें तिला पक्के स्मरण होतें. जे कोणी पोरके असतील, पण यांना परमेश्वरानेंच उत्पन्न केलेलें असतें, त्यांची सेवा करावी, हा भाव तिचा मनांत उदित झाला; आणि आपले भावी जीवित याच कार्यात व्यतीत करावें, असें तिनें ठरविलें.
 या वेळी इंग्लंडांत उपरी बनलेल्या आणि उनाडक्या करीत फिरणाऱ्या मुलांना ताळ्यावर कसें आणावें, त्यांना हातीं धरून शहाणे करून सन्मार्गाला कसे लावावें, या विषयींची चर्चा विचारवंतांत आणि मुत्सद्यांत चालली होती. ती वाचीत असतांना, मेरीच्या मनाला वाटू लागलें कीं, आपण याच कामांत पडावें; हीं उपरीं मुलें आपलीं म्हणावीं, त्यांना ममता दाखवावी, आणि त्यांना परत माणुसकीत आणून सोडावें. हीच परमेश्वराची सेवा होईल. एकदां निश्चय झाल्यानंतर मेरीनें काचकूच केलें नाहीं किंवा मागेंहि पाहिलें नाहीं. लोकसेवेची ही बिकट वाट तिनें आपण होऊन धरली.
 उपरीं आणि भटकीं मुलें बोलून चालून मुलेंच असतात. तीं मुद्दाम उनाडपणानें वागतात, असें नाहीं. त्यांच्या विचारशक्तींत जन्मतःच कांहीं दोष राहून गेलेला असतो; त्यांची मनें कदाचित् खुजट राहिलेली असतात. कांहीं ठिकाणीं असेंहि होतें कीं, दुसऱ्या बायकोच्या नादी लागून बाप आपल्या पहिल्या बायकोच्या मुलांची निगा ठेवीनासा होतो. तो त्यांना हिडीस- फिडीस करतो; आणि मग हें घर आपलें नव्हें असें मानून पोरें दूर कोठेतरी पळून जातात; कित्येकदां सावत्र आया त्यांना वरकरणी माया दाखवून आंतून त्यांचा छळ करतात; त्यांचे पोट मारतात; आणि मग कंटाळून जाऊन मुलं अभद्र बोलूं लागतात व घरांतून निघून जातात. कित्येक वेळां सावत्र बाप अशा लहान मुलांचा छळ करतात; आणि आपली आई येथें कोठें आली आहे; आणि हा गृहस्थ कोण, असे कडवट प्रश्न या मुलांना पडतात व तीं पळून जातात. कांहीं कांहीं वेळा शाळांतील माराच्या भयानें पोरें दडून बसूं लागतात; आणि आईबापांना हें कळू नये, म्हणून शेवटीं पळून जातात. एकादा दुष्ट बाप आईला मरमर मारीत आहे, हें न पाहवल्यामुळे पोरें परागंदा होतात. कांहीं मुलांना लहानपणींच, वयाने मोठीं असलेलीं दुर्गुणीं मुलें भलत्याच नादाल लावतात; आणि मग त्यांच्या मनाच्या शक्ती क्षीण होत जातात. अशा सर्व प्रकारची मुलें निराश्रित होऊन, पोटासाठी लहान लहान चोऱ्या करूं लागतात. समाज त्यांचा वैरी बनतो; आणि न्यायाधीश त्यांना शिक्षा करतो.
 वास्तविक पाहतां, यांत मुलांच्याकडे कांहींच दोष नसतो. ही प्रजा वांया जाऊं द्यावी काय, हा प्रश्न अनेकांच्या मनांत उद्भवतो; आणि त्यांना त्यांच्याविषयीं सहानुभूति उत्पन्न होते. अशांपैकीं ज्यांची धर्मबुद्धि अत्यंत उत्कट असते, ते प्रत्यक्ष कामाला लागतात; आणि हळूहळू विनाशाच्या गर्तेत जाणाऱ्या या बालप्रजेला सावरून धरतात. मेरी कार्पेंटर ही अशाच लोकांपैकीं होती. असल्या प्रजेची सेवा हाच तिनें आपला धर्म बनवला.
 परंतु, केवळ भावनेनें या प्रश्नाकडे पाहणे पुरेसें नसतें, हेंहि तिला कळून आलें; आणि तिनें या प्रश्नाचा अभ्यास सुरू केला. शेंकडों उनाड मुलांचीं चरित्रे तिनें जवळून न्याहळून पाहिलीं; शेकडों घरांतील प्रापंचिक रहस्यें समजावून घेतलीं; अशा मुलांच्या तोंडून अभावितपणें कोणचे उद्गार निघतात, त्यांच्या अतृप्त वासना कोणच्या असतात, आणि काय झाले किंवा ऐकलें म्हणजे त्यांचा दुर्मुखलेपणा क्षणभर दूर होतो, याचें तिनें बारकाईनें निरीक्षण केलें. हीं सारीं प्रमाणें तिच्या हाताशी असल्यामुळे तिच्या बोलण्याला हळूहळू प्रामाण्य प्राप्त झालें; आणि मग या प्रश्नाच्या चौकशीसाठीं पार्लमेन्टनें जेव्हां एक समिति नेमली, तेव्हां तिच्यापुढे झालेली आपल्या या मेरीची जबानी सर्वत्र गाजली. मेरी कार्पेंटर म्हणजे या प्रश्नावर अधिकारवाणीनें बोलणारी स्त्री, असा तिचा लौकिक झाला.
 लवकरच मेरीनें 'गुन्हेगार लोकांच्या मुलांना सुधारणाऱ्या शाळा' या नांवाचें एक पुस्तक लिहिलें. यानंतर लवकरच 'उनाड मुलें' या नांवाचा ग्रंथहि तिनें लिहिला. 'भिकाऱ्यांची मुलें' हेंहि असेंच एक पुस्तक तिनें लिहिलें. विषय अगदीं नवा असल्यामुळे आणि मेरीचें लिखाण जिवंत सहानुभूतीनें झालेलें असल्यामुळे सर्व देशभर या पुस्तकांचा जयजयकार झाला; आणि शेवटीं १८५४ त गुन्हेगार मुलांच्या सुधारणेसाठी कायदा केला पाहिजे, असें विधेयक ब्रिटनच्या लोकसभेपुढें येऊन पासहि झालें. अनेक ठिकाणीं सरकारनें अशीं सुधार-गृहें (Remand-Homes) सुरूं केलीं.
 मेरी कार्पेंटर हिला या कामीं अनेक मैत्रिणी मिळाल्या. त्यांत लेडी नोल बायरन् ही प्रमुख होती. या श्रीमंत स्त्रीचा आणि मेरीचा परिचय चमत्कारिक तऱ्हेनें झाला. मेरीचा भाऊ विल्यम कार्पेंटर हा लॉर्ड लव्हलेस् याच्या घरीं शिकवावयास जात असे; आणि या लव्हलेसनें लॉर्ड बायरनची एकुलती एक मुलगी आडा हिच्याशी लग्न केलें होतें. स्वाभाविकच विल्यम कार्पेंटरच्या द्वारां आडाची आई म्हणजे लॉर्ड बायरनची बायको हिची आणि मेरीची ओळख झाली. या श्रीमंत स्त्रीला मेरीचें काम पाहून इतका आनंद झाला, कीं आपल्या जवळची सर्व साधनसंपत्ति या कामी लावावी, असें तिला वाटूं लागलें.
 लेडी बायरन् हिनें 'रेड लॉज' या नांवाची ब्रिस्टल येथें असलेली एक मोठी इमारत खरेदी केली; आणि या इमारतींत दुराचारी बनलेल्या आणि आपत्तींत सांपडलेल्या तरुण मुलींना ताळ्यावर आणण्यासाठीं एक शाळा तिनें सुरू केली. 'रेड लॉज' ही एक फार पुराणी इमारत होती. अनेक राजघराण्यांनी या इमारतींत वस्ती केली होती. इतकेंच काय पण येथें एक 'सिंहासन मंदिर' म्हणून सुद्धां होतें. अशी ही झोंकबाज इमारत लॉर्ड बायरनच्या बायकोनें या कामासाठीं मेरीला घेऊन दिली. मेरीचा इतमाम केवढा वाढला पहा.
 मेरी कार्पेंटर हिनें स्वतः अशा मुलींच्या शिक्षणाचा हेतु काय, हें स्पष्ट करून सांगितलें. 'या मुलींच्या शारीरिक व मानसिक शक्तीची योग्य जोपासना करावी, म्हणजे त्यांना घरगुती नोकरी करून पोट भरतां येईल; आणि जर त्यांना लग्न करतां आलें, तर आपले स्वतःचे संसार नीट थाटतां येतील' असें मेरीला वाटत असे. म्हणून, धुणें, स्वयंपाक करणें, विणकाम करणें इत्यादि कामें त्यांना शिकविण्याचा उपक्रम तिनें केला. त्यांची रुचि चांगली सुसंकृत बनावी, म्हणून त्यांना गाणे शिकविण्याची व्यवस्था करण्यांत आली. कांहीं कांहीं मुलींना चटोरपणाचीं गाणीं आधींच म्हणतां येत असत. मेरीनें हीं गाणीं एकदम बंद केलीं; आणि त्यांना संभावित पदें शिकविलीं. लिहिणें-वाचणें हें अर्थातच रोजच्या कार्यक्रमांत होत असे. परंतु एवढ्यानेंच भागण्यासारखे नव्हतें.
 'शिकण्यापेक्षां विसरणें जास्त अवघड असतें' असें म्हणतात, तें कांहीं खोटें नाहीं. या मुलींच्या जुन्या संवयी घालवणें, हें मोठें कष्टाचें आणि नाजूक काम असे. मुलींना आपला वचक तर वाटला पाहिजे, पण आपल्या संबंधानें त्यांच्या मनांत भीति उत्पन्न होतां उपयोगाची नाहीं; त्यांना शिस्त लागावी, पण आपण कैदी आहों असें त्यांना वाहूं नये; अशी वागणुकीची ढब मेरीला ठेवावी लागे. या शिक्षणाचा परिणाम योग्य तोच झाला. कांहींशा बेताल बनत चाललेल्या या मुली निःसंशय चांगल्या मार्गावर आल्या; आणि मग कांहीं मोठ्या लोकांच्या घरीं कामधंद्याला राहूं लागल्या. 'सुस्वभावी आणि नीतिमान' असें त्याच मुलींचें वर्णन होऊं लागलें; व कांहींना तर चांगले नवरेहि मिळाले आणि त्यांच्या संगतींत मोठ्या सुखानें त्यांनीं आपले संसार केले. अर्थात् कांहीं थोड्याशा मुली तुपात तळल्या आणि साखरेत घोळल्या, तरी कडू कार्ल्याप्रमाणें कडू राहिल्या! १८६२ ते ६५ या चार वर्षात या रेड् लॉजमधून सत्तर मुली बाहेर पडल्या. यांपैकीं साठ मुली आपला जीवनक्रम सचोटीनें चालवू लागल्या; आणि यांतल्या कांहींनीं तर समाजांत मोठे मानाचें स्थान मिळवलें.
 १८६१ सालीं डब्लीन शहरांतील कारागृहें तपासण्याचें काम मेरीनें हातीं घेतलें. तीन वर्षात तिचा हा अभ्यास पुरा झाला; आणि १८६४ त "आपले कैदी" या नांवाचा द्विखंड ग्रंथ तिनें प्रसिद्ध केला. या ग्रंथांत कैद्यांची एकंदर स्थिति आणि त्यांना मिळत असलेली वागणूक यांची माहिती दिलेली असून, कोणच्या तत्त्वांना अनुसरून कैद्यांना वागवावें, याची सूक्ष्म छाननी तिनें केली आहे. १८७२ साली "तुरुंगाची शिस्त" या नांवाचा आणखी एक ग्रंथ तिनें प्रसिद्ध केला. अशा प्रकारें, उनाड मुलांपासून तों तहत बिलंदर गुन्हेगारापर्यंत सर्व तऱ्हेच्या लोकांच्या मनाचा बारीक अभ्यास केल्यावर, आणि त्यांचीं जीवितें सुखी करण्यासाठीं शक्य ते ते इलाज ग्रंथरूपानें सरकारला सुचवल्यानंतर, या विषयांत जें जें काय आपल्याला करतां येण्यासारखें होतें तें झालें आहे, असें तिला वाटू लागले; आणि मग तिचें मन हिंदुस्थान देशाकडे वळले.
 राजा राममोहन रॉय या उदारमनस्क सुधारकाच्या संगतींत असतांना भारतांतील स्त्रियांच्या संबंधानें अनेक गोष्टी तिनें ऐकल्या होत्या. राममोहन यांच्या मनांत आपल्या देशांत स्त्रीशिक्षणाचा फैलाव व्हावा असें फार असे. दुर्दैवानें ते तिकडेच वारले. परंतु, मेरीच्या मनांत तें शल्य रुतून बसलेलें होतें. म्हणून तिनें हिंदुस्थानांत यावयाचें ठरवलें. हिंदुस्थानच्या लोकांशी मैत्री जोडावी, स्त्री- शिक्षणाचा फैलाव करावा, आणि आजवर चालू असलेल्या कष्टांतून बाहेर पडून थोडी विश्रांति घ्यावी, असा मेरीचा हेतु होता.
 बाई इकडे येणार हे कळतांच, मुंबई सरकारनें निरनिराळ्या प्रमुखांना आज्ञापत्रे लिहिलीं कीं, "शाळा, तुरुंग, वेडेखाने इत्यादि ज्या ज्या संस्था बाईंना पहावयाच्या असतील त्या त्या त्यांना मोकळेपणाने दाखवाव्या; दप्तरांत असलेली सर्व आखबंद माहिती त्यांना पुरवावी आणि त्यांच्याशीं फार भलेपणानें वागावें. गव्हर्नरनीं स्वतः आज्ञापत्रांत म्हटलें होतें कीं, "इंग्लंडांतील कोणीहि मुत्सद्दी किंवा कारभारी असो, कोणच्याहि पक्षाचा असो, बाईंच्या अनुभवाला आणि मताला हे सारे लोक सारखाच मान देत आले आहेत, बाई हिंदुस्थानात आल्यानंतर आपल्याला पडलेले जे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यास बाईशी विचारविनिमय करावा लागेल व त्याचा फार उपयोग होईल."
 १८६६ च्या सप्टेंबर महिन्यांत बाई! मुंबईला येऊन पोहोंचल्या. तेथेंच गव्हनर्रच्या आज्ञापत्राची एक प्रत त्यांच्या हातांत पडली ती वाचून बाई मनांत दचकल्याच. त्या म्हणाल्या, 'मी विश्रान्तीसाठीं आलें, पण येथें पहात्यें तों हे मला सगळीकडे हिंडवणार आणि माझ्याकडून पुष्कळ काम करवून घेणार असें दिसतें!' पण अवलोकन आणि सूक्ष्म अभ्यास हाच बाईचा हव्यास असल्यामुळे हें पुढें वाढून ठेवलेलें कामहिं सुहास्य करून त्यांनीं हातीं घेतलें.
 त्या प्रथम अहमदाबादला गेल्या. तेथील संस्थांची पाहणी करून तेथील प्राणीसंग्रहालय त्यांनीं पाहिलें. तेथील माकडें, खारोट्या आणि वाघ यांच्या वाकुल्या पाहून त्यांना फारच मौज वाटली. परंतु हिरव्या रंगाचे, लाल चोचींचे आणि काळा गळपट्टा घातलेला पोपट पाहून तर त्या हर्षभरितच होऊन गेल्या. तेथल्या वडांसारखी विस्तीर्ण झाडें त्यांनीं कधीं पाहिलींच नव्हतीं. सुरतेच्या मुक्कामांत बाईचा फारच गौरव झाला. त्यांना दिलेल्या मानपत्रांत 'मातुःश्री' असें संबोधन केलें होतें. स्वतःचें लग्नहि झालेलें नसतांना ज्या स्त्रीनें सहस्त्रावधि मुलांमुलींचा प्रतिपाळ केला, ज्यांना कोणी त्राता नाहीं, आणि जीं मुलें माणसाच्या जातींतून कायमचीं उठलीं असतीं, त्यांना वात्सल्यबुद्धीनें जिनें जवळ केलें, तिला सुरतेच्या स्त्रियांनीं 'मातोश्री' म्हणून संबोधावें हें सर्वथा युक्तच होतें.
 यानंतर मुंबईच्या कांहीं संस्थांची पाहणी करून त्या पुण्यास आल्या; आणि पुढें मद्रासकडून कलकत्त्याकडे गेल्या. गव्हर्नर जनरल सर जॉन लॉरेन्स यांनीं आपल्या राजवाड्यांतच त्यांना राहवून घेतलें; आणि कलकत्ता शहरांतील सर्व संस्था त्यांना दाखवल्या. बाईच्या संबंधानें तेव्हां वर्तमानपत्रांत आलेल्या एका लेखांतील लहानसा उतारा येथें उद्धृत करतों. लेखक म्हणतो:—
 "कुमारी कार्पेंटर यांच्या संबंधानें पुरेसें लिहिणें माझ्या शक्तीच्या बाहेरचें आहे. बाईंची आस्था आणि त्यांच्या चालिरीतींतील सौजन्य ही पाहून हिंदुस्थानांतील लोक अगदीं खुष होऊन गेलेले आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल त्यांना अतिशय आदर वाटू लागला आहे. शांति आणि प्रगति हें बाईंचें ध्येय; आणि या बाबतींत त्यांच्या हातून जें होईल असे वाटत होतें तें प्रत्यक्ष होऊन चुकलें आहे. त्यांची चालरीत आणि त्यांची संभाषणाची पद्धत यांचें अनुकरण सर्वच राज्यकर्त्या अधिकारी मंडळींनीं करावयास हवें. वास्तविक पाहतां, बाई परकीय देशांत आलेल्या आहेत; पण त्या जेथें जातील तेथें लोक त्यांच्या भोंवतीं गोळा होतात. बाईचें बोलणें प्रेमळपणानें ऐकून घेतात. आणि त्यांची योग्यता आपल्याला कळतें हें दाखवून देतात. पण हें सारें त्यांच्या भलेपणामुळे घडून येतें."
 खुद्द बाईंनाहि इकडे आल्यामुळे फार आनंद झाला. त्या म्हणाल्या, "हें साल म्हणजे माझ्या दृष्टीनें मोठेंच घडामोडीचें गेलें. माझ्या जीवितांतील कार्यानंदाचा या सालीं अगदीं कळस झाला." हिंदुस्थानांतील निरनिराळ्या संस्था पाहून आपल्याला काय वाटलें हें त्यांनी पुढील वर्षाच्या आरंभीं सर लॉरेन्स यांना सांगितलें व त्या इंग्लंडला परत जावयास निघाल्या. टाऊन हॉलमध्यें मुंबईच्या लोकांनी त्यांचा शेवटचा सत्कार केला, सर लॉरेन्स यांना आपल्या कामाचा जो अहवाल त्यांनी सादर केला तो पुस्तकरूपानें इंग्लंडांत परत गेल्यावर त्यांनीं छापून काढला. तेथील हिंदु स्त्रीपुरुषांनी मोठा समारंभ करून बाईंना चहादाणीचें एक सुंदर तबक नजर केलें.
 बाईंची लेखणीहि अव्याहत चाललेली होती. 'हिंदुस्थानांतले सहा महिने' या नांवाचे एक मोठें पुस्तक त्यांनीं लवकरच प्रसिद्ध केलें. तें त्यांनी राजा राममोहन रॉय यांना अर्पण केलें होतें. दोन्ही खंडांत झालेला बाईंचा लौकिक व्हिक्टोरिया राणीच्या कानीं गेलाच होता. म्हणून त्यांनी कार्पेटरबाईना राजवाड्यावर आपल्या भेटीला बोलावलें.
 इकडे मुंबईत 'नॉर्मन स्कूल' नांवाची संस्था स्थापन करून हिंदुस्थान सरकारने दरसाल बारा हजार रुपये पांच वर्षेपर्यंत देण्याचें पत्करलें. आपल्याला हवी आहे तशी संस्था मुंबईला निघत आहे हें पाहून बाई पुन्हां हिंदुस्थानांत यावयास निघाल्या. त्यांच्या प्रवासाचा खर्च सरकारनेच सोसला.
 येथें येतांच 'नॉर्मन स्कूलच्या व्यवस्थापिकेचें काम आपण पत्करावयास तयार आहों,' असें त्यांनीं सरकारला सांगितलें. सरकारनें ही जागा त्यांना खुषीनें दिली. दुर्दैवाची गोष्ट अशी की, कार्पेंटरबाईची प्रकृति बिघडू लागली. त्यांना हिंदुस्थानांतील हवा मानवेना. म्हणून त्या लवकरच इंग्लंडला परत गेल्या. हिंदुस्थानांतील स्त्रीशिक्षणाचें काम पुढे ढकलावें म्हणून त्या पुन्हां हिंदुस्थानांत आल्या. परंतु सर्वच गोष्टींना नेहमीं अन्त असतो, या न्यायानें दुसऱ्यासाठी सतत श्रम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचाहि अंत झाला; आणि इंग्लंडांतील पोरक्या मुलांपासून तो हिंदुस्थानांतील अज्ञानी स्त्रियांपर्यंत सर्व निराश्रितांना आपल्या कर्तबगारीचा लाभ करून देणारी ही साध्वी कुमारी स्त्री लवकरच मरण पावली.

● ● ●