कर्तबगार स्त्रिया/दीपाबाई
हिच्या सांवलीलाही ते सलाम करीत |
दीपाबाई : १ :
नाइटिंगेल मंडळी नुसती सुखवस्तुच नव्हती. समाजांत आणि राजकीय उलाढालींत सुद्धां त्यांच्या शब्दाला विशेष प्रकारचा मान असे. इंग्लंडमधल्या मोठमोठ्या खानदानीच्या घराण्यांशीं त्यांचे शरीर संबंध झालेले असून खुद्द राजघराण्याला आपलीशी वाटण्यासारखीं जीं कांहीं कुळें होतीं, त्यांतहि त्यांचा अंतर्भाव होत असे. डर्बी-शायरमध्यें 'लीहर्स्ट' या नांवाचा त्यांचा एक सुंदर वाडा होता. तेथें उन्हाळ्यांच्या दिवसांत ही मंडळी राहत असत; आणि हिंवाळा आला, म्हणजे 'एमले' नांवाचा दुसरा एक राजवाडा दक्षिणेकडे असे, तेथें जाऊन राहत असत. त्या दिवसांत आगगाड्या निघालेल्या नव्हत्या. या गांवाहून त्या गांवाला जावयाचें, म्हणजे भाड्याच्या धमन्या असत. पण जे घरचे श्रीमंत, ते आपली स्वतःची धमनी ठेवीत. नाइटिंगेलच्या घरीं चौचाकी गाडी असून तिला चार घोडे जुंपीत असत. सडका बनत बनत बनलेल्या असल्यामुळे, प्रवासहि आतांच्या सारखा फारसा सुखकारक होत नसे. तथापि घरची गाडी आणि चार घोडे, हा इतमाम फार थोड्यांपाशीं असे.
आपण एवढे जहागिरदार, तर आपल्या मुली गांवांतल्या सामान्य लोकांच मुलें ज्या शाळेत जातात, तेथें कशा धाडाव्या, असें नाइटिंगेल यांना वाटे. म्हणून शिक्षणाची व्यवस्था त्यांनीं घरींच केलेली होती. इतिहास, भूगोल, गाणें आणि इतर कांहीं विषय, हा शिक्षणाचा क्रम असे. शिक्षणाची ही अशी घरच्या घरीच व्यवस्था असल्यामुळे प्रवासामध्येहि मुलींच्या शिक्षणांत कसलाहि खंड पडत नसे. हाताशीं मुबलक पैसा, आणि प्रवासाची अनिवार हौस यामुळे मुलेमाणसें घेऊन नाइटिंगेल हे नेहमी देशोदेशीं हिंडत राहत. या हिंडण्याचा शिक्षणाच्या दृष्टीनेंहि एक निराळाच उपयोग झाला. ज्या देशांत जावें, तेथील भाषा शिकावी, असें होऊं लागलें. मातृभाषेच्या जोडीला फ्रेंच, इटालियन, जर्मन अशा अनेक भाषा या बहिणीबहिणींना येऊं लागल्या. त्यांतल्या त्यांत धाकटी मुलगी 'फ्लोरेन्स' ही विशेष चलाख होती. म्हणून बापानें तिला लॅटिन आणि ग्रीक याहि भाषा शिकविल्या. ज्या गांवीं जावें, तेथला इतिहास वाचावा, पाहण्यासारखी स्थळे पहावीं, लोकांच्या चालीरीती समजावून घ्याव्या, असा प्रकार वर्षानुवर्ष चाललेला असे. अशा प्रकारें आपल्या मुलींचें शिक्षण मोठ्या योग्य तऱ्हेने चाललेलें आहे, असें पाहून बापाला मोठे समाधान वाटे; आणि तोहि नाना प्रकारच्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करी; पण हें सर्व चालू असतां या चाणाक्ष गृहस्थाला एक बारीकशी गोष्ट उमगली होती.
'फ्लोरेन्स' ही अभ्यास चांगला करते, आणि ज्ञानार्जनाचीहि तिला हौस फार आहे, हें जरी खरे असले, तरी तिची स्वाभाविक प्रवृत्ति आणि आवड ही कोणीकडे आहे, हेंहि त्याच्या ध्यानांत आलें होतें. ती अगदी लहान असतांना इतर मुलींच्यासारखी, अर्थात् बाहुल्या घेऊनच खेळत असे; पण या खेळण्यांत इतर मुलींना न सुचलेला खेळ हिला सुचे. बाहुलीला कांहीं तरी लागलें, किंवा तिला ताप आला आहे आणि ती कण्हत आहे, अशी कांहीं कल्पना 'फ्लो' करीत असे. मग चिंध्यांचे अंथरूण करून त्याच्यावर बाहुलीला निजवावें, तिला औषध द्यावें, थोपटावे, असे सगळे प्रकार ही लहानगी मुलगी करीत असे. हळू हळू मोठी झाल्यावरसुद्धां घरांत कोणी आजारी पडलें, सैंपाकी, चपराशी, हुजरे, यांच्या घरीं कोणास कांहीं होत असले, किंवा घरांतलीं गाई-घोडी शिंकत-खोकत असलीं, किंवा कुत्रीं केकाटत असली, तर हिचें विशेष लक्ष त्यांजकडे जाई. बाकीचीं इतकीं माणसें या सगळ्या चौकशा करावयास असतांना या लहान पोरीनें त्यांत मन घालावें, या गोष्टीचें आईबापांना मोठें नवल वाटे; पण याच नवलांतून पुढें मोठें जगप्रसिद्ध नवल उत्पन्न झालें.
फ्लोरेन्स सतरा वर्षांची झाली, तेव्हां सरासरी मानानें तिचें शिक्षण संपलें, असें म्हणावयास हरकत नाहीं. मुली वयांत आल्यानंतर त्यांनी करावयाच्या म्हणून कांहीं गोष्टी असतातच. त्यांतहि ही थोर घराण्यांतील आणि खानदानीच्या सरदारी थाटांतील मुलगी. अर्थात् तेव्हांच्या चालीप्रमाणे तिचा वर्तनक्रम चालू झाला. 'छोट्या बाईसाहेब' म्हणून तिला नोकरचाकर संबोधूं लागले. त्यांनी आज्ञा केली असतां ती मानली पाहिजे, व त्यांच्या मर्जीचा कल पाहून वागले पाहिजे, हें सेवकांच्या ध्यानांत येऊन चुकलें. आपल्या गांवांतील लोकांच्या अडीअडचणी काय आहेत, कोणी अनाश्रित माणूस कोठें आजारी होऊन पडलेलें आहे कीं काय, लोकांना बायबल शिकण्याची व्यवस्था आहे कीं नाहीं, अशांसारखी सार्वजनिक स्वरूपाचीं कामेंहि सरदार लोकांच्या वयांत आलेल्या मुलींना करावीं लागत. फ्लोरेन्स हिचा स्वाभाविक कलच तसा असल्यामुळे, तिनें हीं कामें फार हौसेने चालू केलीं. अनाश्रितांना आश्रय देणें, दुःखितांचें दुःख नाहींसें करणें आणि 'ज्यासि आपंगिता नाहीं त्यासि हृदयीं धरणें' हा तिचा मनोधर्म होता. आणि म्हणून हीं तिचीं कामेंहि चांगली होऊं लागलीं. तथापि तिच्या मनाची हुरहूर आणि अस्वस्थता वाढतच चालली. तिला वाटे कीं, आपण करतों हा सगळा पोरखेळ आहे. दुःख पर्वताएवढें आहे, पण आपले दुःख निवारणाचे यत्न जवापाडे आहेत. हें तिला जास्त जास्त पटू लागले व बोंचूं लागलें; आणि जीवितांतील सुखोपभोगांची व ऐषआरामांची तिला लाज वाटू लागली.
सुखी घराण्यांतील मुलींची दिनचर्या म्हणजे ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर अशी असावयाची. सकाळच्या प्रहरीं नोकर-चाकर आपापल्या उद्योगास लागले कीं नाहीं, हें पाहावयाचें, मग टेबलांवर, फुलपात्रांत, किंवा खिडक्यांवर पुष्पगुच्छ किंवा फुलमाळा लावावयाच्या; मग कांहीं वेळ हातीं रंग घेऊन थोडी रंगवल्ली म्हणजे रांगोळी काढावयाची; कांहीं वेळाने मग कशिदा काढावयास बसावयाचें; किंवा धाकट्या भावाला गळपट्टा विणून द्यावयाचा; जेवणारी पाहुणे मंडळी कोण आली न आली, हें पाहून त्यांना 'या बसा' करावयाचें; संध्याकाळीं नटूनथटून नृत्यमंदिरांत नाचायला जावयाचें; आणि वर-खालीं, मागें पुढें, आजूबाजूस कटाक्ष फेंकतां फेंकतां एखादा अनुरूप उमदा मनुष्य हस्तगत होतो का पाहावयाचें, असाच कार्यक्रम सरसकट मुलींचा असावयाचा. वहिवाटीप्रमाणें फ्लोरेन्सला हें सर्व करावें लागे. पण तिच्या आईबापांच्या व मैत्रिणींच्या हें ध्यानांत येऊन चुकलें होतें कीं, या पोरीचें मन या कामांत नाहीं. आई म्हणे कीं, या बाईचें एकदां लगिन झालें, म्हणजे मी सुटलें बरें, लग्न होण्यास हरकत कांहींच नव्हती. ती आतां अगदीं पणांत आलेली होती. नाकाडोळ्यांनी मोठी देखणी असून बुद्धीचें तेजहि तिच्या तोंडावर झळकत असे. ती अंगानें सडपातळ, उंचेली, आणि नाजूक असून घारे डोळे आणि भुरे सडक केस यांनी तिच्या सौंदर्यात भर पडली होती. डोळ्यांत विचारीपणाची झांक असली, तरी अत्यंत मधुर अशी हास्योन्मुखताहि तेथें दिसून येई. अशा मुलीला मागणी घालणारे न भेटले तरच आश्चर्य! पण खरी गोष्ट अशी होती कीं, तिला पाहतांच जरी सर्वांच्या मनांत तिच्या लग्नाविषयींचा विचार येई, तरी तिच्या स्वतःच्या मनांत मात्र तो विचार कधींच आला नाहीं.
होता होतां आईनें एकदा लग्नाची गोष्ट प्रत्यक्षच काढली. ती आतां चांगली पंचवीस सव्वीस वर्षांची झाली होती. आईचा प्रश्न ऐकून फ्लोरेन्सनें विनयानें उत्तर केलें कीं, 'मला लग्न करावयाचें नाहीं; मला नर्स म्हणजे शुश्रूषिका व्हावयाचें आहे.' हे तिचें उत्तर ऐकून आई थक्कच झाली. नाइटिंगेल यांची मुलगी; आणि म्हणे ती 'सुईण होणार!' हे ऐकून तिला पराकाष्ठेचा अपमान व दुःख झालें. त्या वेळीं नर्सचा धंदा अत्यंत हीन समजत असत. हा पतकरणाऱ्या स्त्रिया अडाणी, मूढ, अभद्र बोलणाऱ्या, घाणेरड्या, वर्तनानें बेताल, दारुड्या आणि 'समाजांतील पडझड' म्हणून ज्यांना नांव देतां येईल, अशा असत. यांना वेतनहि सामान्य गडीमाणसांपेक्षां जास्त मिळत नसे; आणि समाजांत तर त्यांना कसलीहि प्रतिष्ठा नसे. आपली सोन्यासारखी पोर असल्या वाईट बायांच्या संगतींत जाणार, आणि त्यांचा धंदा करणार, हे ऐकून बापालाहि चैन पडेनासें झालें. वास्तविक पाहतां, खुद्द त्या धंद्यांत वाईट असें कांहींच नव्हतें; दुःखपरिहाराचें खिस्ती धर्मातलें अत्यंत उदात्त तत्त्व त्याच्या बुडाशीं असल्यामुळे तो धंदा मान्यच ठरावयास हवा होता; पण प्रत्यक्ष स्थिति मात्र निराळी होती. खुद्द इंग्लंडमध्ये तरी त्याला कसलाहि संभावितपणा किंवा पवित्रपणा प्राप्त झाला नव्हता, आईबापांनी व नातेवाइकांनीं पुष्कळ सांगून पाहिलें; पण फ्लोरेन्स मुळींच बधेना. ती म्हणे मनुष्यमात्रावर उपकार करावयास या धंद्यांत उत्कृष्ट संधि मिळते; आणि म्हणून चांगल्या माणसांनीं त्यांत प्रवेश केला, तर त्याचें स्वाभाविक वैभव त्याला प्राप्त होईल.
आपलीं नित्याचीं कामें नीट रीतीनें करावीं, व उरलेला वेळ गरिबांचीं घरें धुंडाळण्यांत घालवावा, असें फ्लोरेन्स करूं लागली. काबाडकष्ट करणारे लोक, रोजंदारीनें खपणारे लोक, यांना आजारीपण आलें, तर त्यांची उस्तवास्त कोण करतो? त्यांनीं तसेंच विव्हळत पडावें, व औषधावांचून व अन्नपाण्यावांचून तडफडावें, अशी स्थिति असे. पण फ्लोरेन्स ही कोणाच्याहि भल्याबुऱ्या मताची पर्वा न करतां अशा लोकवस्तींत जाऊन आजाऱ्यांची शुश्रूषा करूं लागली. तिचें हें वेड जावें, म्हणून वडिलांनीं तिला प्रवासासाठीं परदेशीं धाडलें. पॅरिस, रोम अशांसारखीं शहरे व स्वित्झर्लंडमधील मनोरम देखावे पाहिल्यानें तिच्या वृत्तींत बदल पडेल, असें त्यांना वाटलें होतें. पण त्या त्यांच्या इलाजाचा परिणाम अगदींच विपरीत झाला. ती ज्या गांवीं जाई, तेथें जीं मोठमोठीं इस्पितळे असतील त्यांत जावें, व रुग्ण शुश्रूषा करावयाच्या कोणत्या पद्धती तेथें चालू आहेत हें पहावें, असा क्रम तिनें आरंभिला. रोममध्यें तर कॅथॉलिक भगिनीमंडळाने चालविलेलें हैं शुश्रूषेचें काम पाहून तिला फार आश्चर्य वाटलें. जर्मनीमध्यें ऱ्हाइन नदीच्या कांठीं कायझर्सवर्थ येथेंहि अशाच तऱ्हेचें मोठें नमुनेदार काम चालू असलेले तिनें पाहिलें. पॅरिसमध्येंहि 'धर्म-भगिनी' म्हणून तिनें या कामाचा थोडासा अनुभव घेतला. आपल्या इंग्लंड देशांत मात्र अशा प्रकारची कांहीं संस्था नसावी, याची तिला चुटपूट लागून राहिली; व परत येतांच ती त्याच उद्योगास लागली.
याच सुमारास सिडने हर्बर्ट या तरुण आणि उदारमनस्क माणसाची व तिची मैत्री झाली. हा गृहस्थ मोठा रुबाबदार आणि पाहतांच लोकांच्या मनांत भरावा असा होता. या उभयतांची मैत्री जमत आहे, असें दिसतांच लोकांनीं निरनिराळीं अनुमान काढावयास आरंभ केला. पण सिडने हर्बर्ट याचे लग्न आधींच झालेलें होतें; आणि शिवाय फ्लोरेन्स हिच्या मनांत लग्नाचा विचार सहसा येतहि नसे. वास्तविक स्थिति अशी होती कीं, फ्लोरेन्स हिंचें मन जसें भूतदयान्वित असे, तसें हर्बर्ट याचेहि असे. दोघांच्याहि मनाचा प्रमुख धर्म एकच होता; आणि म्हणून त्यांची मैत्री जमली. हर्बर्ट यानें फ्लोरेन्सनें मनांत धरलेला हेतु पसंत केला; इतकेंच नव्हे, तर तो सफल व्हावा, म्हणून तिला परोपरीचें साह्य केलें, त्याचे उदार मन, थोर विचार, आणि सुरस भाषण यांचा फ्लोरेन्सच्या बापाच्या मनावरहि मोठाच परिणाम झाला होता. त्यानें नाइटिंगेल यांना सांगितलें कीं, 'या नर्सच्या कामांत वाईट असें कांहीं नाहीं. इंग्लंडमध्ये जरी त्याचें रूप हीन असले, तरी खास युरोपांत या धंद्याचा महिमा मोठा आहे; इतका कीं, त्याची गणना धर्मकृत्यांत होते.' हळू हळू नाइटिंगेल यांचेहि मन बदलूं लागलें; व फ्लोरेन्सला घरांतून फारसा विरोध राहिला नाहीं.
शुश्रूषिका म्हणजे नर्सेस तयार करावयाची संस्थाच आपण काढली पाहिजे, असें तिच्या मनानें घेतलेलें असल्यामुळे त्या संस्थेत ज्या स्त्रिया येतील, त्यांना शिक्षण देण्याची आपली स्वतःची तयारी पाहिजे, हें ओळखून तिनें जर्मनी, फ्रान्स, इत्यादि देशांतील संस्थांत स्वतः शिक्षण घेतलें. जर्मनींतल्या संस्थेत तर शिक्षण अगदीं कडकडीत असे. जी गरिबांची सेवा करावयास जाणार, तिनें स्वतः आपली राहणी गरिबीचीच ठेवावयास हवी, व हरतऱ्हेचे कष्ट करण्याची संवय लावून घ्यावया हवी, हें धोरण ठेवून संस्थाचालकांनीं तेथील दिनचर्या अगदीं तापशाला साजेल अशीच ठेवलेली होती. सुप्रभातीं उठावें, सडासंमार्जन करावें, युक्त व परिमित आहार करावा, अध्यापिकांनी दिलेली संथा नीट समजावून घ्यावी, जेथें कोठें रुग्णपरिचर्या करावयाची असेल तेथें ती सद्भावनेनें व आनंदी वृत्तीने करावी, असे तेथील शिक्षण असे. तसेच, शुश्रूषा किंवा परिचर्या हें जें हळूहळू शास्त्र बनत चाललें होतें, तेंहि अभ्यासावें अशी सक्ती असे. या शिक्षणाचा फ्लोरेन्सला फार उपयोग झाला. तिचे स्वतःचे मन मुळांत मोठें प्रतिभाशाली असून त्या विषयाच्या अविरत चिंतनानें शुश्रूषेविषयीं तिला नाना प्रकारच्या कल्पना सुचत. त्यांतच या शिक्षणाची भर पडल्यामुळे संस्था चालविण्यास तिला पूर्ण योग्यता प्राप्त झाली. लंडनला परत येऊन काय करतां येणें शक्य आहे, हें पाहून अधिक अभ्यासासाठीं ती पुन्हा पॅरिस शहराला गेली. याप्रमाणे स्वाभाविक प्रवृत्ति, धर्मबुद्धि, आणि शिक्षण यांचा उत्तम संयोग जमून फ्लोरेन्स ही आपल्या जीवितांतील प्रमुख कामाला सर्वथा पात्र झाली.
१८५३ या वर्षी लंडनमधील "रुग्ण-स्त्री-शुश्रूषा-मंदिर" या संस्थेचें काम तिनें आपल्या हातीं घेतलें. तेथें तिनें नाना प्रकारचे प्रयोग सुरू केले. आजाऱ्याची जागा, त्याचें अंथरूण-पांघरूण व त्याचें शरीर हीं अगदीं स्वच्छ ठेवावयास हवीं, असा दंडक तिनें घातला. वास्तविक, आपल्या आतांच्या कल्पनेप्रमाणें पाहतां, यांत नवीन असें कांहींच नव्हतें! पण तेव्हां ही गोष्टहि, आणि इंग्लंडांतहि, नवीनच होती. स्वच्छता ठेवावयाची, तर हवा खेळती ठेवावयास हवी. मात्र तेव्हां पद्धत अशी असे कीं, दारें दपटून आंत रोग्याला ठेवावें! खोलीला खिडक्या असल्या, तर त्या बंदच ठेवावयास हव्या असें तत्त्व होतें! येथपासून फ्लोरेन्सला वादावादी करावी लागली. शेवटीं खिडक्या उघड्या ठेवाव्या असें ठरलें! यावरून कल्पना येईल कीं, केवढ्या क्षुद्र सुधारणेसाठींसुद्धां तिला झगडावें लागलें. पण तिच्या या नवीन उपायांचा व धोरणाचा उत्तम उपयोग होत आहे, असें ताबडतोब दिसूं लागलें. तिची कर्तबगारी पाहून किंग्ज कॉलेज हॉस्पिटलवर तिची नेमणूक करण्यांत आली. क्लोरोफॉर्मचा उपयोग नुकताच सुरू झाला होता; आणि रोग्याची विशेष प्रकारची बडदास्त ठेवावी, ही कल्पनाहि रूढ होऊं लागली होती. त्यामुळे रोग्यांना सुख लागूं लागलें होतें. या इस्पितळाचें काम तिच्या हातून मार्गास लागत आहे, तोंच एक अकल्पित प्रकार घडून आला.
इ. स. १८५४ सालीं क्रिमियन युद्ध सुरू झालें. काळ्या समुद्राच्या उत्तर किनाऱ्याकर क्रिमिया नांवाचें द्वीपकल्प आहे. तेथें इंग्रज व रशियन्स यांचें युद्ध जुंपलें. युद्धांत जखमी झालेल्यांना किंवा तळावर आजारी पडलेल्यांना जहाजांत घालून त्या समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर आणीत; व बास्फोरस सामुद्रधुनीच्या पूर्व किनाऱ्यावर जे स्कुटारी म्हणून शहर आहे, तेथें त्यांना औषधपाणी करीत. हे शहर तुर्कांचें होतें. त्यांनीं इस्पितळांसाठी मोठमोठे वाडे खाली करून दिले होते. पण हीं घरें जुनीं व घाणेरडीं असत, व्यथितांच्या मानानें डॉक्टर अगदी थोडे पडत. शुश्रूषिका किंवा परिचारिका अशा कोणी नव्हत्याच. इतकेंच काय, पण जखमा बांधावयास पुरेशा पट्ट्यासुद्धां मिळत नसत. या गैरव्यवस्थेचा दोष सेनापतीकडेच जातो. पण एकंदरीत सगळी व्यवस्था जितक्यास तितकीच असल्यामुळे कोणी कोणास बोल लावावा, असें होतें. या हयगयीचा परिणाम असा झाला कीं, प्रत्यक्ष लढाईत रशियनांच्या तलवारीनें जितके शिपाई मरत, त्यांपेक्षां शुश्रूषा नसल्यामुळे जास्त जखमी व आजारी हे मरत.
वर्तमानपत्रांनी जेव्हां ही बातमी इंग्लंडांत फोडली, तेव्हां एकच हाहाःकार झाला; व आमच्या शिपायांना आपण असेच मरू देणार का, असें सरकारास जो तो विचारू लागला. फ्लोरेन्सचा मित्र सिडने हर्बर्ट हा या वेळीं युद्धमंत्री झालेला होता. त्यानें फ्लोरेन्स हिला ताबडतोब लिहिलें कीं, आतां राष्ट्राला तुमच्यासारख्या हुशार व उदार सेविकेची आवश्यकता आहे. तिने लागलीच होकार दिला. सरकारी हुकूमहि तिच्या हातांत लगोलग आला; आणि आपल्या पसंतीच्या अडतीस परिचारिका घेऊन फ्लोरेन्स ही स्कुटारीस जाण्याच्या तयारीस लागली!
फ्लोरेन्स नाइटिंगेल ही उच्चकुलीन सुस्वरूप कुमारी आपला मोठेपणाचा अभिमान सोडून, शिपायांच्या आडदांडपणाची भीति न बाळगतां, केवळ व्यथितांच्या शुश्रूषेसाठी द्वीपांतरास जावयास निघाली आहे, ही वार्ता देशांत पसरतांच चारहि दिशांत तिची वाहवा होऊ लागली. उदार धनिकांनीहि योग्य ती सर्व मदत तिला केली. पण ख्रिस्ती धर्माच्या अमुक एका पंथाची ती आहे, आणि त्याच पंथाची सगळी माणसें तिने आपल्या तुकडीत गोळा केली आहेत, असा आरोप तिच्यावर बऱ्याच जणांनी केला. लष्करी अधिकारी तर म्हणूं लागले की, हे पुरुषमाणसांचें काम आहे, यांत असल्या बायकामाणसांनी विनाकारण कां पडावें? शेवटी व्हिक्टोरिया राणीपर्यंत हे आरोप आणि ह्या कुरबुरी जाऊन पोचल्या. तिला या कुत्सित लोकांचा अतिशय राग आला; आणि त्या सर्वांना झिडकारून लावून तिने फ्लोरेन्स हिला प्रोत्साहनपर आशीर्वाद दिला आणि ह्या तिच्या उदार कृत्यांत तिला यश चिंतिले. व्हिक्टोरियाच्या या साह्यामुळे फ्लोरेन्स हिचा मार्ग पुष्कळच सुकर झाला; व विशेष निर्भयपणाने ती आपल्या कामास लागली.
जखमी व आजारी यांना उपयोगी पडणाऱ्या सामानाचे गठ्ठे आपल्याच बरोबर न्यावे असे तिने ठरविले. माहितगार लोक म्हणाले, 'कांही जरूरी नाही. स्कुटारी येथे सर्व काही आहे.' पण त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तिने हे गठ्ठे आपल्या- बरोबरच नेले; आणि स्कुटारीस पोहोचल्यावर तिला दिसून आले की, सामान आणले हे फार बरे झाले. तेथील इस्पितळे पाहिल्यावर तिला अतिशय वाईट वाटले. घराच्या खालूनच मोऱ्या गेलेल्या होत्या; आणि इस्पितळांतील सगळी हवा त्या घाणीने भरून गेलेली असे. भुईला इतके पोपडे आलेले, आणि भिंतीला भोकसे पडलेले होते, की उंदराघुशींच्या फौजाच्या फौजा रात्रंदिवस तेथें हिंडत असत. आजाऱ्यांच्या खाटा अशा खेटून घातल्या होत्या की, मधून सरकावयास वाटसुद्धां राहिली नव्हती. खिडक्याबिडक्यांविषयीं तर बोलावयास नको. शुश्रूषेचें सामान कांहींच नव्हतें. बशा, तसराळी, रुमाल, साबण, चमचे, पळ्या यांतलें काहीहि नव्हते. रोग्याला इकडून तिकडे न्यावयाचे, म्हणजे दोघां-चौघांनी त्याला उचलून दामटून न्यावयाचे इतकेंच; सरकगाड्या नव्हत्या, मोडलेली हाडे बांधावयास न्यावे, कामट्या व पट्ट्या यांची तर नावहि नव्हतें. फार काय सांगावे, इतक्या आजारी लोकांना जेवूं घालावयाचा, तर सैंपाकीणबाईना पुरेसें सरपण तरी दिलें पाहिजे, इकडेसुद्धां कोणी लक्ष देत नसे. ही सगळी परिस्थिति पाहून फ्लोरेन्सला वाईट वाटलें. तरी ती नाउमेद झाली नाहीं. तेथील अधिकारीवर्गाच्या पसंतीची किंवा गैरपसंतीची पर्वा न ठेवतां आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन ती झपाट्याने कामास लागली. जमिनी खरवडून काढण्यापासून रोग्यांना आंघोळी घालणें, त्यांचे कपडे बदलणें, त्यांच्या तोंड धुण्याची व्यवस्था करणे, मलमपट्या बदलणें, खिडक्या-दारें मोकळीं राहिलीं आहेत कीं नाहींत तें पाहणें, भटारखान्यावरचे उद्धट आचारी दुखणाइतांना अर्धकच्च्याच भाकऱ्या देत आहेत कीं काय हें पाहणें, येथपर्यंतचीं सर्व कामें या बायांनी आपल्या हातीं घेतलीं. तेथल्या त्या वतनदार अधिकाऱ्यांना प्लोरेन्स तेथें आली, हेंच आवडलें नाहीं. शस्त्रवैद्य इ. तर म्हणूं लागले कीं, ही आमच्या कामांत विनाकारण ढवळाढवळ करते. सरकारी सामानसुमानावरचा अधिकारी गर्जून तक्रार करूं लागला कीं, ही बाई सरकारच्या सामानाची नासधूस करते. यामुळे तिच्या कामांत थोडा व्यत्यय येऊं लागला. पण तिचा वशिला थेट युद्धमंत्र्यापर्यंत होता, हे आपण मागे पाहिलेलेच आहे. आणि खुद्द राणीसाहेबांनींहि तिला शाबासकी दिलेली होती. म्हणून तत्रस्थ अधिकऱ्यांना जुमानण्याचें आपणांस फारसें कारण नाहीं, असें ती समजे. शिवाय 'लंडन टाइम्स'चा बातमीदार, कीं ज्यानें इकडील हकीगतीचा भडका इंग्लंडांत उडविला होता, त्यानें वर्गणीच्या रूपानें जमा केलेला खूप पैसा फ्लोरेन्स हिला सहज मिळू लागला. तसेच, बरेंच सामानसुमान तिनें आपल्याबरोबर आणलेलें होतेंच. या साधनांच्या बळावर तिनें त्या जखमी लोकांची आणि दुखणाइतांची अशी उत्तम निगा राखली, कीं त्यांना खरोखरच सुख उत्पन्न होऊन ते तिला दुवा देऊं लागले.
एकदां असें झालें कीं, इस्पितळांसाठीं सरकारांतून तिनें सदरे मागविले. थोड्याच दिवसांत सत्तावीस हजार सदऱ्यांचे गठ्ठे स्कुटारीस येऊन पडले, अधिकारी लोक हे गठ्ठे आज फोडतील, उद्यां फोडतील, असें फ्लोरेन्सला वाटत होतें. पण त्या निगरगट्ट अधिकऱ्यांनीं शुद्ध चालढकल चालविली. शेवटीं संतापून जाऊन बाईनें सगळा अधिकार आपल्या हातीं घेतला; व सदऱ्यांचे गठ्ठे फडाफड फोडून तिने ते दुखणाइतांना वांटून टाकले. इस्पितळाचे अधिकारी बऱ्या होत चाललेल्या शिपायांनासुद्धां रोग्याचेंच अन्न देत असत. त्यामुळे त्यांना लवकर शक्ति येत नसे. तिनें आपल्या पैशांतून निराळे पौष्टिक पदार्थ तयार करून ते त्यांना देण्याचा परिपाठ पाडला. मुदपाकखाना, धुवणखाना, स्नानगृहें, इत्यादींवर सक्त नजर ठेवून तिनें जिकडे तिकडे लखलखाट करून टाकला. यामुळे 'इस्पितळ म्हणजे नरकपुरी' हा शिपायांचा समज साफ बदलला; आणि आश्चर्य हें कीं, हयगय, उपासमार, साधनांचा अभाव, इत्यादींमुळे, ती येण्याच्या आधीं शेंकडा पंचेचाळीस रोगी मरत असत, ते तिचें काम सुरू झाल्यावर शेंकडा तीनच मरूं लागले! हें पाहतांच डॉक्टर लोक, अधिकारी, सेनापति या सर्वांचे डोळे खाडकन् उघडले; आणि आपण स्वतः माणसे नसून हैवान आहों, आणि आपण जिला केवळ हिडिसफिडिस करीत होतों, ती उगीच कोणी साधी स्त्री नसून मनुष्यमात्राच्या कल्याणासाठीं स्वर्गांतून आलेली देवांगनाच आहे, असें त्यांस वाटू लागलें!
तेथील अंमलदारांना जरी तिचें महत्त्व अशा रीतीनें पटू लागलें, तरी हातांतील सत्ता सोडावयास ते यत्किंचितहि कबूल होईनात. पण आपल्या कामाची उपयुक्तता ज्यांना पटावयाची, त्यांस पटून चुकलेली आहे, याची जाणीव फ्लोरेन्सला असल्यामुळे या अधिकाऱ्यांचा विरोध ती केवळ धुडकावून लावू लागली. शिवाय, येथील एकंदर हकीगतीचीं सविस्तर पत्रे तिनें वेळोवेळीं सिडने हर्बर्ट याला लिहिण्याचा प्रघात ठेवला. यांत काय हवें, किती हवें, इत्यादि पाढा ती वाचीत असे; व तिच्या मागणीप्रमाणें सामानसुमानहि भराभर येत असे. अर्थात् तिच्या रुबाबापुढें अधिकारी लोक अगदीं मालवल्यासारखे झाले. कपडे करणें, रोजची देखरेख ठेवणें, सामानसुमान पुरविणें, हवें असेल तें खरेदी करणें, इत्यादि सगळीं खातीं तिनें अगदीं बांधून टाकलीं; आणि त्यांच्या कामाला अशी कांहीं शिस्त लावून दिली कीं, तिच्या त्या पद्धति अजून चालू राहिल्या आहेत. खाणेपिणें, वस्त्रप्रावरण आणि स्वच्छता, इत्यादींची योजना अंमलांत आलेली आहे, हें पाहून आजारी किंवा जखमी शिपायांच्या मनाला कांहीं विरंगुळा प्राप्त व्हावा, म्हणून तिनें बारीक बारीक वाचनालयें सुरू केली. स्वाभाविकपणेंच घाणेरड्या चकाट्या पिटण्याऐवजीं चांगला मजकूर वाचावयास किंवा ऐकावयास सांपडत आहे, असें दिसतांच त्या लोकांना फारच आनंद झाला. बापडे लष्करी अधिकारी मात्र जोराने तक्रार करूं कीं, ही बाई या शिपायांना बिघडविणार! शिपायांचा आणि वाचनाचा काय संबंध!
ती एवढ्यावरच थांबली नाहीं. 'आपला पगार तुम्ही दारूंत खर्च करूं नका' असें ती शिपायांना सांगू लागली. त्यांचे शिल्लक पैसे बँकेत ठेवण्याची तिनें व्यवस्था केली, किंवा त्यांचीं जीं बायकामुलें ओढगस्त स्थितींत होतीं, त्यांच्याकडे ती पाठवू लागली. या तिच्या कामगिरीमुळे सगळे रुग्ण लोक तिला देवता समजून भजू लागले. दिवसाच्या कांठीं वीस वीस तास ती काम करीत असे. रात्रीच्या वेळीं सर्व निजानीज झाल्यावरसुद्धां हातांत कंदील धरून ही दुःखितांची परामर्शी स्त्री, चार चार मैल पसरलेल्या खाटांच्या रांगांतून, कोणास ताप आला आहे, कोण कण्हत आहे, कोणास काय हवें, हें पाहत हिंडत असे. हातांत दिवा घेऊन ती येऊ लागली, म्हणजे या दीपाबाईस पाहून शिपायांना अतिशय हर्ष होई; आणि तिची सांवली जरी त्यांच्या अंथरुणावर पडली, तरी त्या सांवलीला हात लावून ते सलाम करीत; आणि म्हणत, "या माउलीने आमच्या दुखण्यांतून आम्हांला वांचविलें; नाहीं तर आम्ही आमच्या जिवाला आणि बायकामुलांना केव्हांच मुकलों असतो. खरोखर ही येथे येण्याच्या आधीं या इस्पितळांत शिव्याशाप आणि अचकटविचकट बोलणें यांशिवाय दुसरें कांहींच ऐकूं येत नसे. पण आतां आम्ही लोक प्रार्थना करतो आणि परमेश्वराचे गुणानुवाद गातों." अशा रात्रीच्या वेळीं सुद्धां एखाद्या शिपायाला आपल्या घरीं पत्र लिहावेंसें वाटलें, तर ती त्याचें पत्रहि लिहून देत असे !
एकदा असें झालें कीं, आपले काम केवळ इस्पितळापुरतें ठेवावें, हें तिला बरें वाटेना. प्रत्यक्ष रणांगणावर काय चालतें, हें पाहण्याची इच्छा तिला झाली. म्हणून खुद्द क्रिमिया द्वीपकल्पांतच ती गेली. स्कुटारी गांवीं शिपाई लोकांच्या व्यवस्थेची हयगय दिसून आली होती; तशीच तेथेंहि दिसून आली. तिच्या देहस्वभावाप्रमाणें तिनें येथेंहि अतोनात कष्ट केले. त्या द्वीपकल्पांत जेवढीं म्हणून लहान लहान इस्पितळें होतीं, तेवढीं सगळीं तपासून पाहण्याचा तिनें निश्चय केला. जेथें गाडींतून जातां येईल, तेथें गाडींतून जावें, गाडीवाट नाहीं तेथें घोड्यावरून जावें, आणि जेथें घोडेहि जाण्यासारखे नसत, तेथें पायींच जावें, असा क्रम तिनें ठेवला. मुलूख खडकाळ आणि वैराण असल्यामुळे तिला शरीरकष्ट अतिशय झाले. त्यांतच केव्हां बर्फ पडावें किंवा बर्फासारखे गार वारे सुटावे; पण कसलीहि दरद न बाळगतां एकटीनें प्रवास करावा, व शिपायांचे हाल कसे कमी होतील, याची विवंचना मात्र सोडूं नये, असें काम अव्याहत चाललेलें होतें. तीन वेळां ती प्रत्यक्ष रणांगणावरून जाऊन आली. शेवटीं तिने सरकारांत लिहून धाडलें कीं, दारूगोळा आणि कवाईत यांची शिपायांना जितकी आवश्यकता आहे, तितकीच ताज्या अन्नाचीसुद्धां आहे; आणि अधिकाऱ्यांच्या खणपटीस बसून तिनें तीहि सुधारणा घडवून आणली. पण अशा प्रकारें दुखणाइतांची आणि जखमी झालेल्यांची निगा राखतां राखतां तिला स्वतःलाच दुखणें येऊं लागलें. ताप येतां येतां तो इतका येऊ लागला कीं, ही आतां जगत नाहीं, असें लोकांना वाटूं लागलें. तिनें चालविलेल्या अखंड सेवेची वार्ता 'टाइम्स्' व इतर पत्रे यांच्या द्वारां सगळ्या इंग्लंडांत दुमदुमून राहिलेली होती; व त्यामुळे इंग्लंडची ही संरक्षक देवता आहे, असें लोकांना वाटूं लागलें होतें. म्हणून तिला जिवावरचें दुखणें आलें आहे, हें वर्तमान इंग्लंडमध्ये येऊन थडकलें, तेव्हां सर्व देश तिच्यासाठी हळहळू लागला. सुदैवानें तिच्या दुखण्याला उतार पडला; व हळूहळू तिला बरें वाटूं लागलें. पण दुखण्यानें तिच्या डोक्याचे केस गळाले; आणि तिची प्रकृति जी एकदां ढासळली, ती पहिल्यासारखी पुन्हां कधींच झाली नाहीं. तिचें बरें आहे असें ऐकून लोकांनीं सुखाचा उच्छ्वास टाकला; आणि राष्ट्रावरचें संकट टळलें, म्हणून त्यांनीं देवळां- देवळांतून परमेश्वराचें नामसंकीर्तन केलें. खुद्द व्हिक्टोरिया राणीनें तिच्या समाचारासाठीं पत्र लिहिलें; आणि 'बाई, तुम्ही परत आलांत, म्हणजे तुम्हांला भेटावयास मला किती आनंद होईल म्हणून सांगूं!' असे उद्गार काढले.
थोडें बरें वाटतांच तिनें आतां इंलंडाला परत जावें, म्हणून अधिकाऱ्यांनी आग्रह धरला. परंतु तिनें स्वच्छं सांगितलें कीं, क्रिमियांत एक तरी शिपाई आहे, तोंपर्यंत मी येथून हलणार नाहीं; माझें कांहीं बरेवाईट झालें तरी चालेल. पण सुदैवानें लवकरच युद्ध आटोपलें आणि मांडलेल्या कामाच्या पसाऱ्याची चार महिन्यांत आवरा- सावर करून फ्लोरेन्स ही घरी परत जाण्यास निघाली. ती परत येणार, हें ऐकून सर्व राष्ट्राला कृतज्ञतेचें भरतें आलें! तिला कांहीं अहेर करावा, म्हणून लोकांनी वर्गणी केली; ती आठ लक्ष रुपये भरली! किनाऱ्यावर उतरतांच आणि तिच्या घरच्या मार्गावर तिचा जाहीर सत्कार करावा, म्हणून लोकांनीं व्यवस्था केल्या; पण ह्या विनयशील स्त्रीने आडवाटेनेंच घराकडे कूच केलें.
राष्ट्रानें बक्षिस दिलेलें आठ लक्ष रुपये खर्ची घालून नर्सेसना शिक्षण देण्याची उत्कृष्ट शाळा तिनें घातली. नंतर १८५८ सालीं 'ब्रिटिश सैन्याचें आरोग्य' या विषयासंबंधानें तिनें एक आठशे पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. यांत तिनें नमूद केलेल्या सूचनांचा विचार करण्यासाठी सरकारनें एक कमिशन नेमलें; अशा रीतीने एका सामान्य स्त्रीनें हातीं घेतलेल्या या प्रश्नाला सरकारी राज्यकारभारांत एका मोठ्या खात्याचे महत्त्व प्राप्त झालें. ही इस्पितळ-सुधारणेची चळवळ व नाइटिंगेलचें नांव हीं सर्व युरोपभर पसरली; आणि नाइटिंगेल ही युरोपांतील स्त्रीजातीचा अलंकार होऊन बसली.
तिची प्रकृति क्रिमियांतच रोडावली होती. तरी खुटुरुटू करीत ही स्त्री वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत जगली! सगळं राष्ट्र तर तिला भजत होतेच; पण खुद्द व्हिक्टोरिया राणीसुद्धां तिची मैत्रीणच झालेली होती. १८०७ सालीं आजपर्यंत कोणाहि स्त्रीला न मिळालेला, 'ऑर्डर ऑफ मेरिट' चा मान एडवर्ड बादशहानें तिला दिला; व लागलीच पुढल्या वर्षी 'फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन' हा मान देऊनहि त्याने तिचा गौरव केला. अशा रीतीनें आपलें सर्व आयुष्य मानव्याच्या सुखासाठीं वेचून आणि त्याच्या कृतज्ञतेचा आनंदाने स्वीकार करून ही 'दीपाबाई' फ्लोरेन्स नाइटिंगेल १९१० साली मरण पावली.
● ● ●