कर्तबगार स्त्रिया/मादाम चँग-कै-शेक
हिनें नवऱ्याला शत्रूच्या तावडीतून सोडविलें! |
मादाम चँग-कै-शेक : २ :
रेशमाची पैदास चीन देशांत फार प्राचीन काळापासून होत आली आहे. चीन देशांतील रेशमी कापड महाभारतकालींसुद्धां आपल्या ओळखीचें झालेलें होते. आधुनिक कालांत, अमेरिकेची ओळख झाल्याबरोबर रेशमी तागे हाताशीं घेऊन, अमेरिकन शहरांतील बाजारांत जाऊन बसावें, ही इच्छा साहसी चिनी व्यापाऱ्यांना व्हावी, हें स्वाभाविक होतें.
सूंग शेटजींबरोबर त्यांचा एक छोटासा पुतण्याहि गेला होता. या पुतण्याला वाटे कीं, आपण शाळा-कॉलेजांत जाऊन शिकावें; परंतु, चुलत्याची इच्छा अशी कीं, यानें दुकानांत बसावें; आणि एका दामाचे दोन दाम कसे करतां येतील, ही विद्या आपल्याकडून शिकावी. चुलत्यानें जों जों आग्रह करावा, तों तों पुतण्या दुकानदारीचा जास्त जास्तच तिरस्कार करूं लागला. चुलता आपला हट्ट सोडीना; आणि पुतण्याचें लक्ष तर दुकानाकडे लागेना!
शेवटीं पुतण्यानें एक निराळीच वाट धरली. एके दिवशीं हा बारा वर्षांचा पोरगा कोणाला नकळत दुकानांतून बाहेर पडला; आणि तडक बोस्टन शहराच्या बंदराला गेला. चुलत्याच्या कचाट्यांतून सुटण्याचा एकच मार्ग त्याला सुचला. एखाद्या जहाजांत बसून लांब कोठेतरी पळून जावें, आणि तेथे शाळा-कॉलेजांत जाऊन सुशिक्षितांत मोडूं लागावें, अशी ओढ त्याला लागली होती. बंदरांत जाऊन हा मुलगा एका जहाजांत दडून राहिला. त्याला माहीत होतें कीं, जहाज बंदरांतून लवकरच बाहेर पडणार आहे.
जहाज नेमके कोणत्या गांवाला जाणार आहे, हें त्या छोकऱ्याला माहीत नव्हतें. पण चुलत्याच्या दुकानांतून निसटत आहों, एवढ्यावरच तो संतुष्ट होता. या चिनी मुलाकडे जोन्सचे लक्ष गेलें; आणि बिगरपरवाना प्रवास करणाऱ्या या मुलाला त्यानें आपल्या खोलींतील कांहीं सटरफटर कामावर लावून घेतलें.
जोन्स हा एका जहाजाचा तांडेल होता हें खरें; पण त्याचे मन खिस्ती धर्माच्या प्रसाराकडे लागलेलें असे. त्याला वाटलें कीं, हें एक बरें कोंकरूं आपल्या हातीं लागलें आहे; याला ख्रिस्ती धर्माच्या कथा सांगाव्या; आणि एके दिवशीं बाप्तिस्मा देऊन टाकावा. मग रोज रात्रीं, तो या पोराला बायबल वाचून दाखवू लागला. होतां होतां, उत्तर कॅरोलिना परगण्यांतील विलविंग्टन् बंदराच्या धक्क्याला जोन्सचें जहाज येऊन लागलें. गांवांत येऊन, जोन्सनें हा बारा वर्षांचा चिनी मुलगा एका ख्रिस्ती उपाध्यायाच्या हवाली केला. हेतु हा कीं, या उपाध्यायानें त्याला ख्रिस्ती धर्माची दीक्षा द्यावी.
जोन्सच्या इच्छेप्रमाणे सर्व कांहीं घडून आलें. पोरानें आग्रह धरला कीं, घराण्याचे सूंग हें नांव जरी शिल्लक ठेवावयाचे असले, तरी चार्ली जोन्स हे आपल्या उपकारकर्त्याचं नांवच आपल्याला देण्यांत यावें. उपाध्यायानें त्याच्या इच्छेला मान दिला; आणि त्याचें नांव चार्ली जोन्स सूंग असें ठेवलें.
परंतु या मुलाला खिस्ती बनविल्यानेंच आपले काम संपलें, असें त्या उपाध्यायाला वाटेना. त्याला वाटू लागलें कीं, या मुलाला धर्माचें अधिक अधिक शिक्षण द्यावें. ख्रिस्ती धर्मप्रसारासाठीं त्याला चीन देशांत परत धाडावें; आणि त्याच्या द्वारां चीन देशांत जिकडे तिकडे आपल्या धर्माचा प्रसार करवावा. परंतु, हे धर्म-शिक्षणाचे काम त्या उपाध्यायाच्यानें तेथेंच होण्यासारखें नव्हतें. म्हणून सूंग याला बरोबर घेऊन, हा उपाध्याय डरहॅम येथें आला. तेथें जनरल कार या नांवाचा एक बडा कारखानदार होता. मिळत असलेल्या पैशाचा उपयोग चांगल्या कामांत सढळ हाताने करावा, अशी या गृहस्थाला हौस असे उपाध्यायाने सूंग याला जनरल कारच्या हवाली केलें; आणि सांगितले की, 'मेथॉडिस्ट पंथाच्या ट्रिनिटी कॉलेजांत याला तुम्ही घाला; आणि यांचा सर्व खर्चवेंच तुम्ही चालवा.'
जनरल कार यानें हें काम खुषीनें हातीं घेतलें. पण या चिनी मुलाच्या मनाची घडण कांहीं निराळीच झालेली होती. घरच्या थाटावरून सूंगच्या ध्यानांत आलें कीं, जनरल कार ही मोठी श्रीमंत आसामी असली पाहिजे. त्याला हेंहि दिसून आले कीं, उपाध्येबुवांची छाप जनरल कारवर मोठीच आहे. आणि म्हणून तो आपले शिक्षण चांगल्या प्रकारें करील. पण या श्रीमंत घरी फुकट खात बसावें, आणि त्याच्या पैशावर कॉलेजचा खर्च चालवावा, ही गोष्ट त्याला पसंत पडेना. जनरल कार नको नको म्हणत असतांना, पुस्तकें विकण्याचा एक स्वतंत्र धंदा त्यानें चालू केला; आणि त्यांतून तो आपला शिक्षणाचा खर्च भागवूं लागला. पुस्तकांचा बोजा पाठीवर घ्यावा, आणि दारोदार हिंडून गिऱ्हाईक गांठावें, असें सुद्धां त्यानें केलें. सुताचे टांगते झोपाळेहि त्याला विणतां येत असत. हे विकूनहि, तो आपल्या आद्यांत भर घालू लागला.
असें दिसतें कीं, शिक्षणाचे काम यथातथाच झालें. पण चिनी प्रकृतीला मानवणारा व्यापार मात्र त्यानें चांगला चालू केला. शेवटीं, स्वदेशांत जावें, आणि मोठा व्यापार-धंदा सुरू करावा, असें त्याच्या मनानें घेतलें. आणि हा ख्रिस्ती झालेला तरणा मुलगा थोडासा प्रौढ होऊन स्वदेशाला परत आला.
एवढ्या काळांत त्याला अमेरिकन बाजारपेठांची माहिती चांगली झालेली होती. म्हणून अमेरिकेतील व्यापाऱ्यांशीं बोलणें चालणें करून त्यानें शांघाय येथें अमेरिकन यंत्रसामुग्रीचे एक मोठें दुकान काढलें; आणि थोड्याच दिवसांत तो चांगला गबर बनला.
पुढें याच्या मुलींनी मोठमोठ्या लोकांशी लग्ने केली. पण केवळ श्रीमंत बापाच्या मुली म्हणून त्यांना हीं स्थळें मिळाली असें नव्हे. सूंग यानें त्यांना उत्तम शिक्षण दिलेलें होतें. चीन देश मागासलेला, आणि सूंग स्वतः ख्रिस्ती झालेला; म्हणून त्यानें आपल्या तीनहि मुलींना शिक्षणासाठीं अमेरिकेंत पाठवून दिलें.
मे-लींग हिचे शिक्षण जॉर्जिया संस्थानांतील वेस्लेयन् कॉलेजांत झालें. परंतु, तिला पदवी मिळाली, ती मॅसॅच्युसेटस् संस्थानांतील वेलस्ले कॉलेजांतून. पदवी मिळाली, तेव्हां मे-लींग हिचे वय अवघें एकोणीस वर्षांचें होतें. बाप ख्रिस्ती; तेव्हां मुलीहि अर्थातच ख्रिस्ती झाल्या; आणि अमेरिकेत आधुनिक विद्येचा झालेला प्रकर्ष सूंग यार्ने पाहिलेला असल्यामुळे, फार लहानपणींच त्यानें या पोरींना अमेरिकेंत पाठवून दिलें होतें. स्वाभाविकपणेंच, चिनी भाषा, चिनी संस्कृति यांचा गंधहि या मुलींच्या ठिकाणीं नव्हता.
मेलिंग सुंदर इंग्रजी बोले; बायबलांतील संदर्भ तिच्या भाषणांत येत; आणि धर्मातील तत्त्वांचे मर्महि ती समजावून सांगे. मुख्यतः ख्रिस्ती धर्मातील भूतदयेचे तत्त्व तिला फारच पटलेलें होतें. जे कोणी रंजले-गांजले असतील, त्यांना आपले म्हणावें, अशी तिच्या मनाची ठेवणच बनून गेली होती. चिनी संस्कृति आणि चिनी जीवन यांची पुरेशी माहिती तिला झालेली नव्हती. म्हणून स्वदेशीं परत जातांना ती एकदां म्हणाली, 'मी चीन देशांतील खरी; पण नाक-डोळे सोडून दिले, तर माझ्या ठिकाणी चिनीपणाचे कोणचें लक्षण राहिलें आहें?' मेलिंगचे हें म्हणणें अगदीं बरोबर होतें.
सूंगच्या ठिकाणी कितीही प्रखर देशभिमान असला, तरी जीवनांत आधुनिकता आणल्याशिवाय, देशाची प्रगति कधीही व्हावयाची नाहीं, हें त्याला कळून चुकलेलें होतें. आणि म्हणूनच त्यानें आपल्या मुलींना येवढ्या लहान वयांत परद्वीपांत शिक्षणासाठी धाडलेलें होतें. मेलिंगच्या ठिकाणीं सुद्धां स्वदेशाचा मोठा ओढा होताच; पण आधुनिक कल्पनांचा प्रसार स्वदेशांत झपाट्यानें केल्याशिवाय तेथील लोकांचे खरें ऊर्जित साधवयाचे नाहीं, ही तिची पक्की खात्री झाली होती.
चीन देशांत आल्यावर तर 'हें चित्र पहा आणि तें चित्र पहा' हाच प्रश्न तिच्या मनापुढे सारखा येऊं लागला. अमेरिकेतील स्वच्छतेचें स्मरण झालें, म्हणजे स्वदेशांत पसरलेल्या घाणीची तिला लाज वाटे. अमेरिकेतील आरोग्य तिने पाहिलेलेंच होतें. त्या मानानें पाहतां, आपले चिनी बांधव केवळ रोगग्रस्त आहेत, असेंच तिला वाटू लागले. अमेरिकेतील सर्वच माणसें भर पोटीं काम करतात, कोणाला अन्नाची ददात नाहीं, हें तिनें पाहिलेलें होतें येथें स्वदेशांत बघावें, तर जिकडे तिकडे बेकारी आणि उपासमार माजलेली तिला दिसूं लागली. जर स्वदेशाची सेवा करावयाची, तर घाण, रोगराई, आणि उपासमार यांचा नायनाट कसा होईल हें पाहावयाचें, असें या पोरीने ठरविलें.
दरम्यान चीन देशांत एक मोठी चमत्कारिक घटना घडून आली होती. सन्यत्सेन यानें मांचू घराणें उलथून पाडलें होतें, व लोकशाही प्रथापित केली होती, हें खरें; तरी, राजशाहीच्या अभिमानी लोकांचा बीमोड अजून झालेला नव्हता; आणि लोकशाहीचा अभिमान पुरेसा प्रखर बनला नव्हता. राजकुलाच्या अभिमानी लोकांनी जमवाजमव करून बंड केलें; आणि सन्यत्सेन याला कांहीं काळपर्यंत जपान देशांत पळून जावें लागलें. आपत्तींत मेलिंगचा बाप सन्यत्सेनबरोबर जपानांत गेला होता.
सूंग याचा पेशा व्यापाऱ्याचा होता खरा; पण देशांत सुरू झालेली लोकशाहीची झटापट नित्य पाहिल्यावर आपणही सन्यत्सेनला मदत करावी, असें त्याच्या मनानें घेतलें होतें; आणि म्हणून छापखान्याचा एक स्वतंत्र धंदा काढून क्रांतिकारक वाङ्मयाचा जोराचा फैलाव त्यानें सुरू केला होता.
तीनही मुली उत्तम प्रकारचें शिक्षण घेऊन अमेरिकेतून परत आल्या; तेव्हां स्वदेशाची मागासलेली स्थिति तर त्यांच्या मनाला सारखी बोंचूं लागलीच; आणि घाण, अज्ञान, आणि उपासमार या आपत्ती घालवल्या पाहिजेत, असें तर त्यांना वाटू लागलेच; पण राजकारणाची उडालेली चमत्कारिक धमाल पाहून त्या अगदीं चकित होऊन गेल्या. आपला बाप एका बलाढ्य नेत्याच्या ध्येयवादांत सामील झाला आहे, आणि त्याला साहाय्य करण्यासाठीं आपले सर्वस्व त्याने पणाला लावलें आहे, हें पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. या उपवर मुलींनीं राजकारणांत प्रवेश करून तीन मोठ्या पुरुषांशी लग्ने करून टाकली.
चुंगलिंग हिनें डॉ. सन्यत्सेन याच्याशी लग्न केलें. सन्यत्सेन हा कोण हें आतां आपल्याला माहित झालेलें आहे. तिची धाकटी बहीण ईलिंग हिनें डॉ. कुंग याच्याशीं लग्न केलें. कुंग हा मोठा हुशार माणूस असून चीन देशचा अर्थमंत्री झालेला होता. चिनी इतिहासांत आणि धर्मसंस्थेत गाजलेला जो कॉन्फ्यूशियस् त्याच्या वंशांत हा जन्माला आलेला होता. तिसरी मुलगी मेलिंग हिनें चँग-कै-शेक याच्याशी लग्न केलें. या चँग-कै-शेकचें नांव सध्या जरी थोडें मागें उरलेले असले, तरी चाळीस कोट लोकांच्या नशिबाचा विधाता ही पदवी त्यानें एकदां प्राप्त करून घेतली होती.
मेलिंग हिनें चँग-कै-शेकशीं लग्न केलें, असें आतांच सांगितले; पण हा योग जमून येणें दोघांनाही फार अवघड गेलें. मेलिंग ही अर्थातच ख्रिस्ती होती; आणि अमेरिकेत राहिल्यानें समता, स्वातंत्र्य, आणि बंधुभाव हा घोष तिनें हजारदा ऐकलेला होता. इतकेंच नव्हे तर, हा घोष व्यवहारांत यावा, म्हणून कडोबिकडीचा सामना करावा लागतो, हेंहिं तिनें अमेरिकेत पाहिलेलें होतें.
चँग-कै-शेक हा सन्यत्सेनचा उजवा हात होता; आणि पुढें तर जपानी साम्राज्यवाद्यांना स्वदेशांतून पिटाळून देण्याच्या कामी यानें जिवाचे रान करून घेतलें होतें, सन्यत्सेन आणि त्याचें सरकार चीन देशाच्या दक्षिणेकडे येऊन बसलें होतें. शांघाय येथें डॉ. सन्यत्सेन आला असतांना त्याच्याबरोबर चँग-कै-शेकही आला होता. सूंगच्या घरीच या तिघांची गांठ पडली.
चँग-कै-शेक व मेलिंग यांची दृष्टादृष्ट झाली; आणि पुढें कांहीं वर्षांनीं घडलेल्या त्यांच्या विवाहाचें प्रीतिबीज याच वेळीं त्यांच्या मनांत रुजलें. चँग-कै-शेक याचें लग्न त्याच्या आईनें लहानपणींच करून दिलें होतें. पण या बायकोशीं त्यानें काडीमोड करून टाकली; आणि कांहीं वर्षेपर्यंत तो सडाच राहिला. लोक एकमेकांत असेंही कुजबुजत कीं, कॅन्टन शहरी दोन बायांना यानें आपल्या नादी लावले; पण त्यांच्याशी यानें लग्न मात्र केलें नाहीं. पण ही बाब सोडली, तर देशसेवा, समरचातुर्य, पुढाऱ्यावरची निष्ठा आणि साहसवृत्ति या त्याच्या गुणांचा जयघोष सर्व चीनभर चालू होता.
मेलिंगच्या आईला ही गोष्ट बिलकुल पसंत पडेना कीं, आपल्या मुलीनें असल्या काडीमोड केलेल्या आणि ख्रिस्ती नसलेल्या माणसाशी लग्न करावें. बरें, मेलिंग ही आईचें मत बाजूला सारून लग्नाला सिद्ध होईल असे म्हणावें, तर तेंहि होईना. पांच वर्षेपर्यंत चँग हा मेलिंगच्या आईच्या विनवण्या करीत होता कीं, 'कसेही करा आणि लग्नाला परवानगी द्या.' पण ती म्हातारी परवानगी तर देईचना, उलट चँगशी दोन शब्द बोलण्याचें सुद्धां ती नाकारूं लागली. एकदां ही बाई जपानला गेली असतांना, चँग तिकडे गेला; आणि त्याने तिची आर्जवें केली. तिला वाटे कीं, कदाचित् याची पहिली बायको अजूनही याच्याकडे येईल, शिवाय हा खिस्ती धर्माचा द्वेष करतो. चँगनें नाना प्रकारचे पुरावे देऊन तिला पटवलें कीं, काडीमोड खरोखरच झालेली आहे; आणि तुमचें म्हणणेंच असेल, तर तुमची बायबलची पोथी मी थोडी थोडी वाचीत जाईन. शेवटीं वृद्धेला करुणा आली; आणि १९२६ त सेनापति चँग-कै-शेक आणि मेलिंग यांचे लग्न झालें.
नवऱ्याच्या हातीं साऱ्या चीन देशाचे भवितव्य आहे, ही गोष्ट मेलिंगला पुरी- पुरी पटलेली होती. तिच्या स्वतःच्याहि प्रवृत्तींत साहसवृत्तीचे अणुरेणू मुळापासूनच जोराजोरानें खेळत असत. हीं दोन साहसीं माणसें एकत्र झाली. कसल्याही प्रसंगांत आपल्या संगतींत धिमेपणाने उभी ठाकणारी स्त्री आपल्याला मिळालेली आहे, म्हणून तो दुप्पट जोरानें कामास लागला. पण येवढ्यानेंच झालें नाहीं. अमेरिकेत मिळालेल्या शिक्षणाने आणि ख्रिस्ती धर्माच्या आचारानें मेलिंग हिच्या मनाला जो एक स्वतंत्रतेचा बोध झालेला होता, तो आतां चँगच्या कानी पडला. रोज सकाळीं ती नवऱ्याबरोबर फिरावयास जाई आणि त्याला खिस्ती पुराणांतील गोष्टी सांगे. होतां होतां खिस्ती धर्मतत्त्व पटले म्हणून म्हणा, किंवा बायकोचा शब्द मोडवेना म्हणून म्हणा, चँग-कै-शेक दोन वर्षांनीं खिस्ती बनला. अशा रीतीनें मेलिंग आणि चँग यांचा पूर्ण मिलाफ होऊन गेला.
नवऱ्याबरोबर प्रत्यक्ष रणांगणावर जाणें आणि सर्व देशभर सैन्याची नाचानाच करणें हें मेंलिंग हिला अर्थातच अशक्य होतें. परंतु, जो नवा चीन देश चँगच्या मनांत जन्मास घालावयाचा होता, त्याचे स्वरूप सिद्ध करण्यासाठीं, इतर अनेक चळवळींची आवश्यकता होती. ही आवश्यकता ओळखून मेलिंग कामाला लागली; आणि मग एकाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे, तिनें आपल्या अंगातल्या सर्व शक्ती प्रकट केल्या. जे क्रान्तिकारक रणांगणावर पतन पावले होते, त्यांच्या मुलांच्यासाठीं तिनें शाळा काढल्या. ती म्हणे कीं, 'हींच मुले पुढे देशासाठीं अधिक त्वेषानें लढतील. कारण आपला बाप कशासाठीं मेला, याचें स्मरण त्यांना होईलच होईल.' या शाळांत तिनें शिक्षणाची एक नवीनच प्रथा पाडली. कांहीं हस्तव्यवसाय करावा, शारीरिक श्रम करावे, आणि या व्यवसायाचा आणि श्रमांच्या द्वारां ज्ञान संपादन करावें, असा शिक्षणाचा क्रम तिनें चालू केला. नेहमींच्या शाळांतून, 'असें करावें; तसें करूं नये,' असें सांगण्यांत येतें. पण असें कां करावें, आणि तसें कां करूं नये,' हें मात्र कधीं सांगत नसत. मेलिंग हिने शिक्षणाची तऱ्हा अशी ठेवली कीं, कां किंवा कशासाठीं असे प्रतिप्रश्न विचारण्याची बुद्धि विद्यार्थ्यांना व्हावी; आणि जमल्यास, त्यांची त्यांना उत्तरे द्यावीं.
बाहेर शिक्षणाचा असा उपक्रम चालू असतांना, घरांत तिनें चँग-कै-शेकला पाश्चिमात्य लोकांचे ध्येयवाद आणि त्यांचे राजकीय तत्वज्ञान यांचे शिक्षण दिलें. थॉमस जेफरसन् याचें राजकीय तत्वज्ञान आणि अब्राहम लिंकन याचा समाज विचारांतील गूढवाद तिनें आपल्या नवऱ्याच्या मनावर चांगला बिंबवला. परंतु रणांगणाची हवा तिने मुळींच पाहिली नाहीं, असें मात्र नव्हें. नवऱ्याची साहसवृत्ति आणि त्याचा कामाचा धडाका पाहिल्यावर, यांच्या हालविपत्तींत आपण सहभागी झालें पाहिजे, अशी बुद्धि तिला होई; आणि मग, तो जेथें कोठें जाई, तेथें तेथें तीहि त्याच्याबरोबर जाऊं लागली. माळावर घातलेल्या झोपड्या, आगगाडीची स्टेशने शेतकऱ्यांचे गोठे, यांचा सुद्धां आश्रय चँग-कै-शेकला कित्येकदां करावा लागे. मेलिंग ही अशा सर्व ठिकाणीं, त्याच्याबरोबर असे. सर्व देशभर अशी धावाधाव करतांना, आपल्या लक्षावधि देशबांधवांची अवस्था कशी केविलवाणी झाली आहे, दूरदूरच्या आणि मागासलेल्या टापूंत अज्ञान, घाण, आणि नैतिक ऱ्हास यांचा बुजबुजाट कसा झाला आहे, हें दोघांनीं प्रत्यक्ष पाहिलें. आणि मग, नवऱ्याच्या सैनिकी मोहिमेबरोबरच स्वच्छता, नीतिमत्ता आणि ज्ञान यांची एक स्वतंत्र मोहीम या बाईनें चालू केली. कित्येक शतकेंपर्यंत चिनी लोक अपसमजुती आणि मिथ्या ज्ञान यांत पिचत पडलेले होते. यांतून या सर्वांना सोडविण्यासाठीं तिनें ख्रिस्ती मिशनऱ्यांचीही मदत घेतली.
चँग-कै-शेक विमानांतून दूरच्या प्रदेशाची पाहणी करण्यासाठी निघाला, म्हणजे हीहि त्याच्याबरोबर जाई; आणि त्याची सैनिकी पाहणी एकीकडे चालू असतां, ही लोकांच्या करुणास्पद स्थितीची पाहणी करीत असे. लांबलांबचे किल्लेकोट, दरोडेखोरांच्या गढ्या आणि सहस्रावधि वर्षे नागर संस्कृतीचें मुखावलोकनही ज्यांनी केलें नाहीं, अशा मागासलेल्या लोकांचीं खेडीं हीं तिनें डोळ्यांनीं पाहिली. चीन देशाचे मोठ-मोठाले अधिकारी म्हणूं लागले, "हा नसता धंदा या बाईला कोणी सांगितला आहे? आणि हा वेडा पीरहि तिच्या नादानें, जेथें कोणीं कधीं गेलें नाहीं, तेथें जात राहतो! एकादे दिवशीं हे रानटी लोक या जोडप्याचें चंदन उडवतील."
परंतु चँग व मेलिंग या दोघांनाही असें वाटें कीं, विश्वासानें विश्वास वाढत जाईल; एवढालीं माणसें आपल्या दाराशीं आपण होऊन येत आहेत, तीं आपल्या बऱ्याकरतांच येत आहेत, हा विचार अडाणी जनतेला सुद्धां सुचेल, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. एका एका ठिकाणीं गेल्यावर, मेलिंग ही तेथील प्रमुख स्त्रियांना एकत्र बोलावून आणी; आणि त्यांना सांगे कीं, "तुम्ही घरांत बसून राहूं नका; बाहेर काय चाललें आहे, तें नीट डोळे उघडून पहा. जग बदलत आहे. तुम्हीं जागच्या हलल्या नाहींत, तर तुमचे संसार कुचंबतील; तुमचीं पोरें अडाणी राहतील; एकादा सवाई सोट त्यांच्या श्रमाचें फळ हिसाकावून नेईल."
पति-पत्नींचा हा कामाचा आवेश खरोखर पाहण्यासारखा होता. चीन देशांतील फुटीर वृत्ति चँगनें जवळ जवळ नाहींशीं केली; आणि मेलिंग हिनें अज्ञानी लोकांच्या खोपट्यांत आणि रकट्यांत खऱ्या ज्ञानाचें अस्वास्थ्य उत्पन्न केलें; पण यांतूनच एकदां एक मोठे चमत्कारिक संकट उद्भवलें.
चँगचे हे वर्तन पसंत नसलेल्या आणि कदाचित त्याच्या प्रभावाने दिपून गेलेल्या कांहीं सैनिकी अधिकाऱ्यांनी त्याला अचानक उचलून नेलें. चँग-कै-शेक एकाएकी नाहींसा झाला; आणि सर्व देशभर हलकल्लोळ झाला. तो कोठें आहे, आणि त्याला कोणी धरून नेले आहे, याचीही वार्ताच लोकांना लागेना. होतां होतां हे बदमाश लष्करी अधिकारी कोण, याचा पत्ता लागला. पुढें असेंही कळलें कीं, हे लोक मोठे फौजबंद सरदार असून दोन लक्ष सैनिकांचा गराडा त्यांच्या शिबिराच्या भोंवतीं पडलेला आहे. या शिबिरांत त्यांनीं चँगला डांबून ठेवलें होतें. ते त्याला म्हणत कीं, 'तूं पुढारीपण सोडून दे; आणि चीन देशाची सूत्रे आमच्या हातीं दे.' चँगनें त्यांना खडसावून सांगितलें कीं, 'जीव गेला, तरी बेहत्तर; पण ही गोष्ट कदापि होणार नाहीं. तुम्हीं चारटे लोक आहां.' या त्याच्या खडसावणीला त्यांनीं येवढेंच उत्तर दिलें कीं, त्यांनीं त्याला जखडून बंदिखान्यांत घातलें. पण पहारेकऱ्यांचे थोडेसे दुर्लक्ष झालें आहे, असें पाहून चँग त्यांच्या कोंडाळ्यांतून निसटला; एका उंच तटावर चढला; खाली उडी घालतांना खंदकांत पडला; पण तसाच खुरडत खुरडत तो एका दूरच्या डोंगराकडे गेला. चँग पळाला; हे ऐकतांच त्याच्या पळाच्या दिशेनें भराभर गोळ्या सुटू लागल्या; आणि बाँम्बगोळेही पडूं लागले. जातां जातां कांटेरी झुडपांत लपलेल्या गुहेत तो जाऊन बसला. त्याला उभेही राहतां येईना. शेवटीं त्या अधिकऱ्यांचे शिपाई तेथें येऊन ठेपलें. तेव्हां आपल्या सर्व सत्ताधिकाराचा रोष एकत्र करून तो त्यांना म्हणाला, 'छाती असेल तर मला गोळी घाला; नाहीं तर माझी पदवी मरून मला सलाम करा!' त्याला त्यांनीं धरून नेलें.
चँगच्या बंदिवासाची ही वार्ता सर्व देशभर पसरली; आणि त्याच्या स्वतःच्या फौजा त्याला सोडविण्यासाठी सज्ज होऊन राहिल्या. याच ठिकाणीं मेलिंग हिच्या अंगचें लोकविलक्षण धैर्य आणि तिचा आत्मविश्वास हीं सर्व जगाच्या प्रत्ययाला आली.
चीन देशांत आतां यादवी माजणार, आणि दोन्ही बाजूंच्या लाखों सैनिकांचा चुराडा होऊन खुद्द चँगचें जीवितही संशयांत सांपडणार, हें मेलिंग हिनें ओळखलें; आणि तिनें, चँगच्या सैन्यावरील अधिकाऱ्यांना निरोप धाडला कीं, 'चँग -कै-शेक यांना सोडविण्यासाठीं तुम्हीं चाल करून जाणार आहां. पण मी सांगतें कीं, हा तुमचा बेत तुम्ही रद्द करा. चँग यांना मी स्वतःच सोडवून आणतें.' हा निरोप पोहोंचतांच वाटचाल करूं लागलेली चँगची सैन्यें थबकून उभीं राहिलीं. ही बाई नवऱ्याला सोडवून आणणार म्हणजे काय करणार, याकडे सगळें राष्ट्र उत्सुकतेनें पाहूं लागलें.
चँग याला आपल्या बायकोचा स्वभाव पुरा माहीत झालेला होता. तिला चैन पडावयाचें नाहीं; आणि आपल्याला सोडविण्यासाठीं कांहींतरी अघटित कामाला ती हात घालील, असें त्याला वाटू लागलें. इतक्यांत, तिचा बेतही त्याच्या कानीं आला. त्याने निरोप धाडला कीं, 'तूं असलें कांहीं करूं नकोस; तूं आलीस तर हे लोक तुला ठार मारतील.' परंतु, नवऱ्याचा निरोप आणि स्वकीयांची हरकत हीं या बाईनें बाजूला सारली. तिनें एक विमान घेतलें; आणि बरोबर एक हुजऱ्याही घेतला. तिने त्याला सांगितलें कीं, 'शत्रूच्या शिबिरांत जाऊन पोहोंचल्यावर जर तेथले शिपाई माझ्या अंगाला हात लावून हिसकाहिसक करूं लागले, तर तूं मला गोळी घाल.'
येतां येतां विमान शत्रूच्या तळावर येऊन उतरलें; आणि हातीं भरलेलें पिस्तुल घेतलेल्या या हुजऱ्याला बरोबर घेऊन मेलिंग ही चँगच्या कैदखान्याकडे निघाली. दोन्ही बाजूला उभे असलेले सैनिक विस्मित होऊन तिच्याकडे पाहूं लागले. लाखों संगिनींनीं गजबजलेल्या शत्रूच्या तळांत ही बाई निर्भयपणें प्रवेश करते, आणि नवऱ्याला सोडवीन म्हणते, याचें या शिपायांना मोठेंच नवल वाटलें. जातां जातां ती नवऱ्याच्या खोलीपाशीं पोहोंचली. तिचें धाडस पाहून चकित झालेल्या शत्रूंनीं तिला कसलीही हरकत केली नाहीं. चँगनें अन्नत्याग केलेला होता. ती त्याला म्हणाली, 'तुम्ही असें करूं नका. तुम्ही अन्न खा. कारण, अन्नमय प्राण आहे.' इतकें बोलून, त्याच्या चित्ताला शांति यावी, म्हणून धर्मग्रंथांतील कांहीं वचनें तिनें वाचून दाखवली.
दोन दिवस ती तेथें राहिली; आणि शत्रूशीं तिनें सारखी रदबदली केली. 'माझ्यासाठीं नव्हे, पण चीन देशासाठीं तुम्हीं यांना सोडून द्या; सोडलें नाहींत तर यांच्या लक्षावधि फोजा तुमच्यावर चालून येतील; आणि सर्व देशभर यादवीचा डोंबाळा माजेल.' शत्रूंना तिची ही रदबदली पटली; आणि १९३६ च्या नाताळांत त्यांनी चँगला बायकोच्या हवाली केलें. नवऱ्याला घेऊन, ही धीट आणि पराक्रमी स्त्री वाजत-गाजतच आपल्या घरीं परत आली! तिचा हा पराक्रम ऐकुन, सर्व देशाच्या अंगावर शहारे उभे राहिले; आणि जिकडे तिकडे तिच्या नांवाचा जयघोष होऊन घरोघर ध्वजातोरणें उभी राहिली.
येथून पुढें चीन देशावर एक नवीनच संकट कोसळले, पाश्चात्य लोकांशीं स्पर्धा करावयाची, तर सवर्णीय चीन लोकांशी मैत्री जोडावी, व त्यांनीं आणि आपण एक होऊन, युरोपियन लोकांना पूर्व आशियांतून पिटाळून द्यावें, हें न करतां, जपानी लोक साम्राज्यवादी बनले; आणि त्यांनीं चीन देशावरच स्वारी केली. चँगनें आपला मोहरा आतां जपानी लोकांच्या विरुद्ध वळवला; आणि मग मेलिंग हिची हालचाल एकाद्या सेनापतीप्रमाणें चालू झाली.
विमानांतून उड्डाणें करावीं, फौजांच्या हालचालींच्या योजना सिद्ध करण्यासाठीं शिबिरा- शिबिरांतून हिंडत रहावें, असले काम मेलिंग ही नवऱ्याच्या बरोबरीनें करूं लागली. जपान्यांची स्वारी मारून काढण्याच्या कामीं चँग-कै-शेक याला बरेचसें यश मिळाले; या यशांतील निम्मा वाटा प्रपंचांतील त्याच्या वांटेकरणीकडे जातो, हे सर्वांनी मान्य केलें आहे.
दुसरे महायुद्ध सुरू झालें; जपानी राष्ट्र जर्मनांच्या बाजूला गेलें; आणि चीनी राष्ट्र अँग्लो-अमेरिकनांच्या बाजूला गेलें. मग स्टॅलिन, रुझवेल्ट, चर्चिल अशा लोकांच्या भेटी घेण्यासाठीं मदाम चँग-कै-शेक हिला सर्व जगाच्या फेऱ्या कराव्या लागल्या. ती एकदां हिंदुस्थानांतही येऊन गेली.
पण पुढें चँग व चिनी कम्युनिस्ट यांचें वैर जुंपलें, आणि दोस्तांची मदत पुरेशी न मिळाल्यामुळे चँगची पिछेहाट होऊं लागली. आज चँग हा फोर्मोसा बेटावर तीन-चार लक्ष फौज घेऊन बसलेला आहे. त्याची वेडी आशा अशी आहे कीं, चीन देशावर पुन्हां आपल्याला स्वारी करतां येईल. मदाम चँग-कै-शेक असल्या कानकोंड्या स्थितींत नवऱ्याला कसला सल्ला देत असते, हें कळावयास कांहींच मार्ग नाहीं; पण चिनी राष्ट्र जरी तिला आतां विसरलेलें असले, तरी चीन देशाचा आणि स्त्रीजातीचा इतिहास तिला कधींही विसरणार नाहीं!
● ● ●