कर्तबगार स्त्रिया/मादाम क्यूरी

हिनें स्त्रीजातीचें मुख रेडियमइतकेंच उजळ केलें!


मादाम क्यूरी : ९:


 मादाम क्यूरी ही पोलंडमध्ये १८६७ साली जन्मली. तिनें एका फ्रेंच शास्त्रज्ञाशी लग्न केलें, म्हणून तिला फ्रेंच समजतात, इतकेंच. क्यूरीचें माहेरचें नांव मार्जा असें होतें. तिचा बाप कॉलेजांत भौतिक शास्त्रे शिकवीत असे. परंतु त्याची घरची गरिबीच होती. शास्त्रज्ञाला कांहीं किंमत असते, आणि म्हणून त्याला सांपत्तिक स्वास्थ्य उत्पन्न करून द्यावें, हें पहिल्या पहिल्यानें युरोपांतसुद्धां फार थोड्या सरकारांना कळत असे. त्यांतून पोलंडवर तेव्हां रशियाचें राज्य होतें. झारच्या करड्या अंमलाखाली पोलिश जनता अगदीं बेजार झाली होती. पोलिश जनतेला दारिद्र्यानें गांजलें होतेंच; पण तिची पोलिश भाषासुद्धां मारून टाकण्याचें झारचे यत्न चालले होते. पोलिश लोकांच्या कत्तली सुद्धां होत असत; आणि या कत्तली करावयास झारला थोडेंसुद्धां कारण पुरत असे. म्हणजे स्वदेशांतच पोलिश लोक चोर झाले होते. मार्जाला लहानपणापासून वाटे कीं, आपणही शास्त्राभ्यासच करावा; पण हें पोलंडमध्ये रहाणें नको. घरची गरिबी; म्हणून तिनें एका श्रीमंताच्या घरीं मुलें सांभाळण्याचे काम पत्करलें. ज्या मुलीला तिनें सांभाळण्याचें काम चालू केलें, तिचा एक मोठा भाऊ होता. त्याचें मन मार्जावर बसलें. मार्जाही त्याला नाहीं म्हणेना. हळू हळू यांच्या प्रेमसंबंधाची वार्ता मालकाला कळली. आणि मग तीं श्रीमंत नवरा-बायको रागानें अगदी बेफाम बनली. एका दरिद्री मुलीशीं आपला मुलगा लग्न करतो म्हणजे काय, असें म्हणून त्यांनीं मार्जाला नोकरीवरून काढून टाकलें. मार्जानें नोकरीचे थोडेसे पैसे गांठीला बांधले होते, ते घेऊन ही अवमानित मुलगी शास्त्राभ्यासासाठी पॅरिसला आली.
 पॅरिस शहरांत अनेक मोठाले शास्त्रज्ञ होते व संशोधकहि होते. मार्जानें त्यांच्या हाताखाली बी. ए. ची पदवी मिळविली; आणि तिची हुशारी तेथील शास्त्रज्ञांच्या मनांत चांगलीच भरली. ती एम्. ए. चा अभ्यास करूं लागली. परंतु प्रयोग करून पाहण्याला तिला पुरेशी जागा सांपडेना; कारण तिची राह ण्याची जागा, म्हणजे चांदईकडे खिडकी असलेली माळ्यावरची एक लहानशी खोली होती. मेरीच्या देशांतील एक बडा गृहस्थ या सुमाराला पॅरिसमध्ये आला. त्याला ऐकून माहीत होतें कीं, आपल्या देशांतील एक फार हुशार मुलगी पॅरिसमध्ये अभ्यास करीत असते. तिचा पत्ता काढून त्यानें तिला आपल्या बंगल्यावर बोलवून घेतलें; आणि बरीच विचारपूस केली. तिनें अशी एक अडचण सांगितली कीं, प्रयोग करून पाहण्याला पुरेशी जागा नाहीं. तेव्हां तो बडा गृहस्थ म्हणाला, "पेरी क्यूरी नांवाचा एक संशोधक मला माहीत आहे. तो तुला जागा देतो कां पाहू. तूं उद्या पुन्हा ये. मी त्यालाहि बोलावून ठेवतो." दुसऱ्या दिवशीं सगळ्यांची बैठक झाली. पेरी क्यूरीनें मार्जाला जागा देण्याचें पत्करलें. क्यूरीची आणि मार्जाची ओळख झाली.
 ही कांहीं कादंबरी नव्हे; तरी पण मार्जा ही फार सुस्वरूप होती हें सांगितलेच पाहिजे. पेरी क्यूरी हा तिच्याइतका देखणा नसला, तरी दिसायला साधारण बरा होता. मात्र संशोधनाच्या कामांत त्याची मोठीच प्रगति झालेली होती. शाखाभ्यासासाठी दोघांनाहि पुन्हा पुन्हा एकत्र यावें लागे; आणि मग तो कांहींसा गबाळा दिसणारा माणूस मार्जाच्या तोंडाकडे टक लावून पाहूं लागला. आपण बुद्धिमान् आहों, हें मार्जाला कळून चुकलें होतें; पण पेरीची बुद्धि आपल्याहि पेक्षा जास्त तल्लख आहे, हें तिच्या प्रत्ययाला आलें. विशेष परिचय झाल्यावर, तो एकदा तिच्या घरीं आला. घरांत अठरा विश्वे दारिद्र्य होतें. तेथें चांगली वस्तु म्हणजे फक्त मार्जा हीच काय ती. बाकीं सारें दैन्यच पसरलेलें होतें. मार्जाला फार लाज वाटली; आणि पेरीला तिची दया आली.
 एम्. ए. ची परीक्षा जवळ आली; आणि पेरीला दिसू लागलें कीं, पदवी घेतल्यावर मार्जा पोलंडमध्ये आपल्या घरीं जाईल. 'तूं जाणार कां?' असें त्यानें तिला मुद्दामच विचारलें, तेव्हां तिनें सांगितलें, "कोणाहि पोलिश माणसानें परदेशांत जाऊन सुखी होऊन राहणें म्हणजे पोलिश मातृभूमीचा द्रोह होय!" यावर पेरीनें असा मुद्दा काढला कीं, "हें खरें असेल; पण एम्. ए. नंतरचा तुझा शास्त्राभ्यास मात्र पोलंडमध्यें एकदम बंद पडेल." हा मुद्दा मार्जालाहि पटला. देशाभिमानापेक्षां शास्त्राभ्यासाची आवड तिच्या मनांत बळावत चालली होती; आणि म्हणून तिनें ठरविलें कीं, एकदा पोलंडमध्यें घरीं जावें, आणि अभ्यासासाठी परत पॅरिसला यावें. तिचा हा निर्णय पेरी क्यूरीला अर्थातच फार शहाणपणाचा वाटला.
 मार्जा परत आली; आणि तिचा पी. एच. डीचा अभ्यास सुरू झाला. या अभ्यासांत पेरी क्यूरीचें तिला मोठेंच साहाय्य होत असे. क्यूरीच्या मनांत आपल्या संबंधानें कोणची भावना उद्भवली आहे, याची सूक्ष्म वर्दी मार्जाला अर्थातच लागली होती. त्याची ती भावना दिवसेंदिवस बळावत चालली; आणि त्यानें तिला मग प्रत्यक्षच मागणी घातली. मार्जाला निकाल करतां येईना. तिनें हें प्रेम-प्रकरण वर्ष-सहा महिने तसेंच घोळत ठेवलें; कारण फ्रेंच माणसाशीं लग्न करणें म्हणजे मातृभूमीला अंतरणें होय, हें तिला पक्के माहीत होतें. तथापि तिचाहि निश्चय हळू हळू ढासळू लागला; आणि लौकरच पोलंड देशांतील ही मार्जा आतां मेरी क्यूरी बनली.
 दोघेही साधारणपणें गरीबच होतीं; आणि म्हणून त्यांनी आपला मधुचंद्रमास सायकलवरच्या रपेटीनेंच साजरा केला. मेरीला लवकरच एक मुलगी झाली. पण प्रापंचिकपणाची ही आघाडी जरी दिवसेंदिवस वाढत चालली होती, तरी तिची शास्त्राभ्यासाची आवड यत्किंचितहि कमी झाली नाहीं. सैंपाकपाणी करणें, गृह व्यवस्था ठेवणें, इ० कामांत तिचे रोज तीन तास जात. तेवढे गेल्यानंतर रोज आठ आठ तास ती शास्त्राभ्यासांत आणि संशोधनांत घालवू लागली. सरावानें आणि वयाबरोबर तिच्या बुद्धीची झेप वाढू लागली. आणि पेरी क्यूरी हा कितीहि बुद्धिमान् असला, तरी त्याला हळू हळू असें दिसूं लागलें कीं, बायकोची बुद्धि आपल्यापेक्षां रतिभर जास्तच चलाख आहे. मेरीला ठराविक वाटेनें जाणें अगदी पसंत नसे; आणि कांहीं तरी एखादा बारीकसारीक शोध लावावा, आणि पीएच. डी. ची पदवी पदरांत पाडून घ्यावी, हेंहि तिला अवमानाचे वाटे. कांहीं तरी निराळें संशोधन करावें, एखादा मोठा शोध लावावा, ज्या भूमीवर कोणाचा पायहि पडला नाहीं, त्या भूमींत शास्त्रशोधाचा हमरस्ता तयार करावा, अशी कांहीं एक चढाईची वासना तिच्या मनांत वाढत चालली होती. हळू हळू अभ्यासाच्या कामी नवऱ्याच्या तंत्रानें चालणें, तिनें सोडून दिलें. नवऱ्यानेही पडतें घेतलें; आणि तिच्या तंत्राने चालून जें काय साह्य तिला करतां येईल, तें तो करूं लागला.
 हेन्री बेकेल या नांवाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेले आपल्या शोधाचें इतिवृत्त एकदां मेरीला वाचावयास सांपडलें, त्यांत असें दिसलें कीं, हेन्री बेकेल यानें युरेनियम या धातूचे क्षार हा संशोधनाचा विषय बनविलेला आहे. त्याचें संशोधनाचें ध्येय कांहीं निराळेच होतें; पण त्याला सहजगत्या आढळून आलें कीं, उजेडाचा झोत नसतांनासुद्धां युरेनियमच्या क्षारांतून किरण आपोआप बाहेर पडतात. पण हे किरण कसले आहेत, हें मात्र त्याला समजेना. कदाचित् सूर्याचे किरण या क्षारांत जिरलेले असल्यामुळे युरेनियममधून हे किरण बाहेर पडत असावे, म्हणून त्याने या धातूचे क्षार कित्येक महिने अंधारांत ठेवून पाहिले, तरी किरण पहिल्यासारखेच बाहेर पडतात, असें दिसून आलें. हेन्रीनें सारी हकीगत आपल्या इतिवृत्तांत दिली होती. मदाम क्यूरी आणि पेरी या दोघांचेंहि लक्ष या चमत्काराकडे लागून राहिलें; आणि यांतूनच पुढें रेडियमचा शोध जन्मास आला.
 युरेनियमच्या क्षारांतून प्रकाश बाहेर पडतो म्हणजे तरी काय, असा प्रश्न या दोघा पेरींना पडला; आणि पीएच. डी. च्या पदवीसाठीं हाच विषय घ्यावा, असें मेरीने ठरविलें. शोधतां शोधतां तिला असें दिसलें कीं, युरेनियम जास्त जास्त घ्यावें, तों तों हा प्रकाश अधिक भडक होत जातो, हा प्रकाश मोजतांसुद्धां येतो. आणि युरेनियम दुसऱ्या कोणच्या द्रव्याशीं निगडित झालें असलें, अथवा उजेड व हवामान यांत फरक पडला, तरी त्या प्रकाशांत कसला फरकहि होत नाहीं. जास्त अभ्यासानें कळून आलें कीं, या किरणांसारखे किरण दुसरीकडे कोठेंहि आढळत नाहींत. पुढील टप्पा तिनें गांठला, तो हा कीं, हा प्रकाश म्हणजे एक अणुधर्म असावा. अधिक अभ्यासानें कांहीं दिवसांनीं दिसून आलें कीं, असाच प्रकाश थोरियम या मूलद्रव्यांतूनसुद्धां बाहेर पडत असतो. ज्या पदार्थात युरेनियम किंवा थोरियम या धातू असतात, ते पदार्थ किरणोत्सर्गी (Radio-active) असतात. इतर पदार्थ Radio-inactive असतात. पुढला बारीकसा शोध म्हणजे युरेनियम किंवा थोरियम या धातूंचें परिमाण जर कमी असले, तर ही किरणोत्सर्गी क्रिया (Radio-action) जास्त भरते! वीस वेळां तिनें तपासून पाहिलें; आणि मग निश्चय झाला कीं, तपासावयास घेतलेल्या खनिजांत ज्या मानानें युरेनियम किंवा थोरियम आहे, त्या मानानें पाहतां, त्या खनिजांतील रॅडिएशन म्हणजे प्रकाशोद्भव जास्त लकलकीत असतो. हा लकलकीतपणा कोठून येतो, असा प्रश्न पुढें उभा राहिला. तेव्हां तिनें मनाशीं ठरविलें कीं, अजून माहीत नाहीं, असें एखादें मूलद्रव्य या खनिजांत असले पाहिजे. प्रयोग कर करून परीक्षेसाठीं घेतलेल्या खनिजांतून बाकीची सारीं द्रव्यें बाजूला काढली पाहिजेत; आणि काय उरतें तें पाहिलें पाहिजे, असें तिनें ठरविलें. अधिक शोधान्तीं दिसून आलें कीं, जें नवें मूलद्रव्य आहेसे आपल्याला वाटतें, तें फारच थोडें असलें पाहिजे; आणि खनिजाच्या कांही टक्क्यांतच हे अपेक्षित द्रव्य असले पाहिजे. पिच-ब्लेंड तपासतांना दिसलें कीं, हें द्रव्य सर्वभर पसरलेलें नाहीं; व रेडिओ ॲक्टिव्हिटी या खनिजाच्या दोन अवयवांत सांठून राहिलेली आहे. म्हणजे मूलद्रव्यें एक नसून दोन असली पाहिजेत. असें तिनें ठरविलें. १८९८ च्या जुलै महिन्यांत यांतलें एक मूलद्रव्य तिच्या हातीं लागलें; आणि त्याचें नांव, आपल्या देशाचें स्मरण म्हणून, तिनें 'पोलोनियम' असें ठेवलें. पण तिला हवें होतें तें द्रव्य मात्र हें नव्हतें. या सर्व कामांत तिच्या नवऱ्याचें काम तिच्या बरोबरीनें चाले. हे द्रव्य फार थोडें सांपडतें, म्हणजे किती थोडें, हें तिच्या लवकरच लक्षांत आलें. पण पिन्च-ब्लेंडमध्यें हें एक दशलक्षांशाइतकें कमी असतें. कदाचित् कित्येक खंडी पिच-ब्लेंड आतां संशोधनासाठी हवें होतें. बोहिमियांतील कांचकारखान्याच्या बाहेर याचा ढिगारा पडला होता; तो नांवापुरती किंमत देऊन मेरीनें मागविला; आणि शोधाचें काम सुरू झाले. १८९८ ते १९०२ पर्यंत म्हणजे चार वर्षे त्या दोघांनीं ही कढई ढवळण्याचे काम सारखें चालविलें होतें. शेवटीं नवरा थकून गेला. तथापि बायकोच्या श्रमाकडे बघून तो थोडी थोडी मदत करत असे. होतां होतां पिचब्लेंडमधील बाकींचीं द्रव्यें नष्ट होऊन शुद्ध स्वरूपाचे मणी तयार होऊं लागले; आणि त्यांची तकाकी जास्तच दिसुं लागली. पण बाकीचें सारे रसायन टाकून देऊन या मण्यांचेंच नवें रसायन तिनें चालू केलें. शेवटीं, रेडियमची कल्पना आल्यानंतर पंचेचाळीस महिन्यांनीं, मेरीला प्रत्यक्ष रेडियमचा शोध लागला. अत्यंत शुद्ध स्वरूपाची, एका गुंजेइतकी रेडियम या सगळ्या परिश्रमानंतर तिच्या हाती लागली. तिनें ते रेडियमचे मणी कांचेच्या पेटींत ठेवले; प्रयोगशाळेत अंधार केला, तो ती पेटी चकाकूं लागली! नवऱ्याला तिनें आंत बोलावून आणले; आणि मग ते चमकणारे रेडियमचे मणी पाहून नवराबायको हर्षोत्फुल्ल होऊन गेलीं. १९०४ सालीं या शोधाबद्दल दोघांना नोबेल प्राइज मिळालें. एक नवें मूलद्रव्य पेरींनीं शोधून काढलें होतें.
 पुढें तीनच वर्षांनी पेरी क्यूरी गाडीच्या अपघातानें एकाएकी मरण पावला. मेरीच्या दुःखाची कल्पना सहज करतां येते. पण तिनें आपलें लक्ष संशो धनाकडे जास्त लावले; आणि १९११ साली रसायन विषयांतलें नोबेल प्राइज तिनें पुन्हा एकदां मिळविलें. पहिल्या महायुद्धांत रेडियमचा उपयोग इस्पितळांत होत आहे, हें पाहून तिला फार आनंद झाला; आणि मग मादाम पेरीवर मानसन्मान आणि पदव्या यांचा वर्षाव होऊं लागला! दरवेळीं तिला नवऱ्याची आठवण मात्र सारखी होत असे.
 या युद्धानंतर पोलंड स्वतंत्र झालें. तेव्हां पेरीला वाटू लागलें कीं, आपल्या मातृभूमीत एक संशोधन-मंदिर बांधावें; व रेडियमच्या साह्याने कॅन्सर बरा करण्याची व्यवस्था तेथें करावी. १९२५ साली मेरी ही पोलंडला गेली; व या संस्थेची कोनशिला तिनें बसविली. आपल्या देशाची कन्या एवढी सुविख्यात बनून पुन्हा स्वदेशाला परत येत आहे, हें पाहून वार्सा राजधानींतील लोक आनंदाने वेडे झाले. १९२३ साली या शोधाचा पंचविसावा वाढदिवस साजरा झाला. तेव्हां फ्रान्स देशांतील झाडून सारे विद्वान्, अधिकारी, प्रतिष्ठित लोक, पत्रकर्ते इत्यादिकांची मोठीच गर्दी जमली; आणि त्यांनीं मेरीचा केवळ जयजयकार केला. परंतु हळू हळू तिची प्रकृति खालावत चालली; तिची दृष्टि मंद होत चालली; आणि आपण कशाला तरी विनाकारणच भीत आहों, असें तिला वाटूं लागलें. १९३४ सालीं मेरीला दुखण्यानें गांजले. तिच्या पित्ताशयांत एक गांठ आली आहे, असें दिसून आलें. तिचा बाप याच दुखण्यानें वारला होता. थोडयाच दिवसांत तिचीं फुफ्फुसे सुजली; आणि आपलें आतां संपत आले आहे, असें तिचें तिला स्वच्छ दिसूं लागलें. तिने स्वतः थर्मामीटर लावून पाहिला; पण ताप किती आहे, हें तिच्या ध्यानांतच येईना! ती म्हणाली, 'माझी आठवण नाहींशी होत आहे.' आणि खरोखरच कोणाहि माणसाचें नांव तिला आठवेनासें झालें. स्वतःच्या मुलींचें नांव सुद्धां तिला आठवेना. नेहमींप्रमाणें डॉक्टर आले, तेव्हां ती म्हणाली, 'डॉक्टर, आतां काय पाहतां? पुरें झालें. मला आतां स्वस्थ पडूं द्या!' १९३४ च्या जुलै महिन्याच्या चौथ्या दिनांकीं पहाटेच्या सुमारास मेरी क्यूरीनें आपला देह ठेवला!
 रेडियम जशी झळकते, तसें मेरी क्यूरीचें नांव प्रथम संशोधकांत आणि मग साऱ्या जगांत झळकत राहिलें आहे. स्त्रीजात काय करूं शकतें, असें म्हणणारांना मेंरी हें एक चूप बसविणारें प्रमाणच जगाच्या हातीं लागलें. स्त्रीजातीची उंची सपाट्यासरशीं वाढली; आणि एकंदर मानव्य तत्त्वशोधनांत कसें पुढें चाललें आहे, हे जगाच्याहि प्रत्ययास आलें.

● ● ●