कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/भारतीय मुसलमान : एक कानोसा
येथे मुस्लिममंडळी शोधूनही सापडत नाहीत. एक तर नव्या दिल्लीत सगळे सरकारी नोकर आणि राजकीय नेते. मधूने (खासदार मधू लिमये ) काही मंडळींची गाठ घालून दिली. त्यांत काश्मीर राज्यातील माजी खासदार श्री. महंमद शफी हे होते. लोकसभेत एका कँटीनमध्ये आम्ही दोन तास बोललो. या दोन तासांत, शेख अब्दल्ला जातीयवादी कसे नाहीत, हे ते मला पटवण्याचा प्रयत्न करत होते. लोकसभेच्या कामकाजाची वेळ संपत आली, तेव्हा मधू तिथे आला. ते मधूला म्हणाले,
"तू अब्दलांना भेटायला कोडाईकॅनालला जा. त्यांना आवडेल."
मधू काहीच बोलला नाही. आम्ही दोघे परतताना मला मधू रस्त्यात म्हणाला,
"हा मनुष्य फार चांगला आहे. तू त्याच्याशी संबंध ठेव."
मधूनेच स्कूल फॉर इंटरनॅशनल स्टडीजमध्ये असलेल्या परिमलकुमार दासशी ओळख करून दिली आणि परिमलकुमारने मला अनिरुद्ध गुप्तांकडे नेले. गुप्तादेखील त्याच स्कूलमध्ये शिकवतात. गुप्तांना मुस्लिम प्रश्नात फारसे स्वारस्य
आहे, असे मला प्रथम वाटले नाही. त्यांनाही पीरियडला जायचे होते. निघताना ते म्हणाले,
“तुम्ही उद्या याच वेळेला येथे येऊ शकाल का? माझी पत्नी येणार आहे. तुम्ही तिला भेटावे, असे मला वाटते. ती मुसलमान आहे आणि आमच्या लग्नामुळे आम्हालाही एका वेगळ्या पातळीवर या प्रश्नाला तोंड द्यावे लागले आहे."
दासने मला गुप्तांकडे का आणले, ते आता कळले.
१४ ऑगस्ट १९६७,
आज खतिजा गुप्ताला जाऊन भेटलो. श्री. गुप्तादेखील होते. आमची ओळख करून दिल्यानंतर ते पीरियडला निघून गेले. खतिजाने विचारले, “आता बोला."
काय बोलावे, असा मला प्रश्न पडला. मी म्हणालो,
"तुम्हीच सांगा. स्वत:विषयी, तुमची हरकत नसेल तर तुमच्या लग्नाच्या अनुभवाविषयी."
त्या म्हणाल्या,
"मी लखनौची. फिरंगी महल मदरसाचे नाव तुम्ही ऐकले आहे?"
"वा! निश्चितच. मला वाटते, हा मदरसा औरंजेबाने सुरू केला. या वाड्यात पूर्वी युरोपियन्स राहत होते, म्हणून त्याला फिरंगी महल म्हणतात."
"बरोबर. आमचे नाव अन्सारी. लखनौचे अन्सारी हे एक प्रतिष्ठित घराणे आहे. माझे वडील फिरंगी महल मदरशाचे मौलवी होते. सध्या ते ढाक्याला असतात. 'कौमी आवाज' या लखनौच्या उर्दू पत्राचे संपादक हयातुल्ला अन्सारी हे आमच्याचपैकी एक. एरवी ही मंडळी नेहरूंच्या भोवताली वावरायची. नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेची स्तुती करायची. परंतु आमच्या लग्नाला त्यांनीदेखील विरोध केला. धर्म विसरणे हे तितकेसे सोपे नाही, हे तेव्हा माझ्या लक्षात आले. तर... मी तुम्हाला लग्नाविषयी सांगत होते. माझ्या सर्वच नातेवाइकांनी लग्नाला विरोध केला. अपवाद माझ्या वडिलांचा. त्यांनी पाठिंबा दिला.
अजूनही मानत नाही. आमच्या दृष्टीने धर्म पाळण्याचा किंवा बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता."
“या काळात वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते ढाक्याहून येथे येतात, तेव्हा माझ्याकडे उतरतात. पण आता इतर नातेवाईकही हळूहळू येऊ लागले आहेत."
"खरे म्हणजे, तुम्ही माझ्या बहिणीला भेटले पाहिजे. तिचे यजमानदेखील हिंदू आहेत. किशनसिंग त्यांचे नाव. ते दोघे अलिगढला राहतात. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्येच किशनसिंगजींचे पुस्तकांचे दुकान आहे. तिथे तुम्ही कोणालाही विचारा, त्यांच्या दुकानावर तुम्हाला कोणीही पोचवेल. माझी बहीण सार्वजनिक कार्य करीत होती. तिच्याकडून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल."
स्कूलच्या वाचनालयातच कमलेश (तेव्हाचे डॉ. लोहियांचे खास चिटणीस. सध्या 'प्रतिपक्ष' या दिल्लीहून निघणाऱ्या हिंदी पत्राचे कार्यकारी संपादक) भेटला.
त्याने तिथे लॉनमध्ये उभ्या असलेल्या मुलांच्या घोळक्याकडे मला नेले. त्या मुलांत पंचविशीतील एक सडपातळ, खादीचा कुडता आणि पायजमा घातलेला मुलगा उभा होता. कमलेशने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. त्याचे नाव सईद मन्सूर.
तो म्हणाला, “आपण कुठे तरी जाऊन बसू या." आणि आम्ही चालतच कॅनॉट प्लेसकडे गेलो. चालता-चालता तो म्हणाला, “दिल्लीचा मुसलमान तुम्हाला जुन्या दिल्लीत सापडेल. आम्ही दिल्लीचे आहोत." तो असे म्हणाला, तेव्हा त्याचे डोळे दिल्लीविषयीच्या अभिमानाने लकाकले. आम्ही कॅनॉट प्लेसला पोचलो, तेव्हा उन्हे उतरली होती आणि जुम्मा मशिदीचे उंच मीनार दूरवर दिसत होते. कॉफी हाऊसकडे आम्ही वळलो.
तो म्हणाला, “दिल्लीत सुमारे तीस टक्के मुसलमान फाळणीपूर्वी राहत होते. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत बरेचसे पाकिस्तानात निघून गेले. आता मूळ दिल्लीवासी असे दोन किंवा तीन टक्के मुसलमान राहत असतील. कराचीला गेलेले हे मुसलमानदेखील एका वेगळ्या कॉलनीत राहतात. या कॉलनीला 'दिल्ली कॉलनी' असे नाव दिले आहे."
या कॉलनीत मी एकदा गेलो असल्याचे आठवते. १९६२ मध्ये मी कराचीला गेलो असताना, एका नातेवाइकाला भेटण्यासाठी या कॉलनीत गेलो होतो. आणि तिथे या नातेवाइकाच्या घरमालकाच्या पत्नी अंगणातल्या मोरीत भांडी धूत असल्यामुळे, सुमारे दोन तास घरात अडकून पडलो होतो! मी जायला निघालो की तो म्हणे, “थांब, घरमालकीण भांडी धूत आहे. ती परदानशीन आहे. परपुरुषाने तिच्यासमोरून असे जाणे बरे नाही."
मी म्हणालो, "तिला दोन मिनिटे घरात जायला सांगा."
तो म्हणाला, “ती मालकीण आहे. तिला असे सांगणे जमणार नाही."
“पण मग अंगणात भांडी धूत कशी बसते? हा कसला पडदा आला?"
"हे बघ, हा वाद नको. इथे असेच वागावे लागेल. हे पाकिस्तान आहे.हिंदुस्थान नाही. तू थोडा वेळ थांब. तिला आत जाऊ दे."
आणि सुमारे दोन तासांनी तिची भांडी धुऊन झाल्यानंतरच मी तिथून बाहेर पडलो!
मन्सूर सईदला ही आठवण सांगितली, तेव्हा तो म्हणाला, "हिंदुस्थानातील मुसलमान याहून वेगळे नाहीत. दिल्लीनिवासी मुसलमानांकडे चला. तुम्हाला असाच कडक पडदा आढळेल."
मग तो बोलू लागला,
“मला कळत नाही, कुठल्याही मुसलमानाला भेटलो की तो कसल्या ना कसल्या तक्रारी करतो. सबंध मुस्लिम समाज म्हणजे एक कंप्लेन्ट हाऊस आहे, असे वाटू लागते! त्याचे मित्र मुसलमान असतात. संभाषण मुस्लिम व्यक्ती, मुस्लिम इतिहास, मुस्लिम देश आणि पाकिस्तान याच्यापुढे जातच नाही. संभाषणात तो ज्या प्रतिमा वापरतो, त्याही अशाच कशाशी संबंध नसलेल्या असतात. तारिकने स्पेन कसा जिंकला याचे रसभरीत वर्णन करण्यात तो तासनतास गुंगून जातो. पण तो हे सगळे कशाकरता सांगत आहे, हे कळत नाही. या सगळ्यांचा आजच्या दैनंदिन जीवनाशी संबंध काय? खरे म्हणजे, मी एक परंपरागत-रूढीग्रस्त घराण्यात जन्मलो. माझे आजोबा अखिल भारतीय जमायते उलेमाचे अध्यक्ष होते."(मौ. सईद अहमद. ते १९६० ते १९६४ या काळात अखिल भारतीय जमायते उलेमाचे अध्यक्ष होते.)
मी त्याला विचारले, “फाळणीच्या वेळी दंगलीची झळ तुम्हाला लागली नाही?"
तो म्हणाला, “लागली होती. परंतु माझ्या आजोबांना लोक ओळखत. त्यांनी वल्लभभाईंना फोन करून पोलीस मागवले. वल्लभभाईंनी पोलीससंरक्षणाची व्यवस्था त्वरित केली. शिवाय हिंदू समाजातील असंख्य मंडळी त्यांना ओळखत. यामुळे आमच्या मोहल्ल्यातील काही मुस्लिम कुटुंबे इथेच राहिली."
मी त्याला विचारले, "तुम्ही मघाशी म्हणालात की, मुस्लिम नेहमी तक्रार करत असतात. त्या कोणत्या?"
"बऱ्याचशा तक्रारी तुम्हाला माहितीच आहेत. उदाहरणार्थ- दंगली होतात, सुरक्षितता नाही. आता दिल्लीला फाळणीनंतर एकही दंगा झालेला नाही, तरीही दिल्लीच्या मुसलमानाला असुरक्षितता वाटते; याचा अर्थ काय समजायचा? तुम्ही नोकऱ्यांचेच पाहा ना. मला इथे दिल्लीत तरी पदवीधर मुसलमान दीर्घ काळ बेकार असलेला सापडलेला नाही."
मन्सूर सईदने मला सांगितले, “तुम्ही काही दिल्लीनिवासी मुसलमानांना भेटून जा. त्यांचे मनोगत समजून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल."
दिल्ली २० ऑगस्ट १९६७
अनिससुर रहिमानना (श्री. अनिससूर रहिमान हे 'परचमे-हिंद' या उर्दू साप्ताहिकाचे संपादक आहेत. एक जुने स्वातंत्र्यसैनिक.) पूर्वी भेटल्याचे आठवत होते.
मी म्हणालो, “होय. तेव्हा अतीक (श्री. अतीक सिद्दीकी. हे एक उर्दू पत्रकार आहेत.) तुमच्याकडे काम करत होता. पासष्टच्या युद्धानंतरची गोष्ट आहे. आता दोन वर्षे होत आली."
"अतीक आता माझ्याकडे नसतो. आणि दोन वर्षांत इतर काहीही बदल झालेले नाहीत. मुसलमान आहेत तिथेच आहेत. पाकिस्तान आहे तिथे आहे. आणि ते हिंदुस्थानशी भांडत राहणार आहे. हे भांडण लवकर मिटणारे नाही."
मी भीत-भीत म्हणालो, “मी हिंदी मुसलमानांवर एक पुस्तक लिहू इच्छितो, त्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी आलो आहे."
त्यांनी मधेच अडवून म्हटले, “त्याकरिता माहिती कशाला गोळा करायला पाहिजे? मुसलमान कसे आहेत तुम्हाला माहीत नाही? तुम्ही पुस्तक लिहिताय ना? मग लिहा. सर्व मुसलमान एकजात बेवकूफ आहेत!"
मी हसत-हसत त्यांना म्हणालो, “हे पुस्तक होत नाही; हे वाक्य होईल."
"ही थीम आहे. डेव्हलप करा. तुम्ही दहा पुस्तके लिहिलीत, तरी त्यांचा निष्कर्ष तोच काढावा लागेल!"
मधेच चहा आला. नोकराने नुसताच चहा आणला, तेव्हा ते त्याच्यावर रागावले. त्याला त्यांनी मिठाई व फळे आणायला पिटाळले. दरम्यान, ते बोलत राहिले. मला त्यांनी विचारले,
"तुम्ही आलात कसे? म्हणजे कुठल्या रस्त्याने आलात?"
"हमदर्द दवाखान्याच्या बाजूने."
"तुम्ही येताना किती ठिकाणी पत्ता विचारलात?"
"तीन-चार ठिकाणी विचारला असेन."
"ज्यांना पत्ता विचारलात, ते मुसलमान होते?"
"काही कल्पना नाही." मी म्हणालो, “पण एकाने काही न बोलता गल्ली कासम जान स्ट्रीटकडे बोट दाखवले. दुसरे असे- परवाच जामा मस्जिदकडे आलो
असताना, एका पेपरस्टॉलवाल्याला ‘परचमे-हिंद' आहे का विचारले. तेव्हा तो म्हणाला, 'उनके दफ्तर में मिलेगा. यह पेपरस्टॉल पे नहीं मिलता!' आणि त्याने तुमच्या ऑफिसकडे कसे जायचे, हेही सांगितले."
"बरोबर आहे. पाहिलेत ना? आजूबाजूला इथे मुस्लिम वस्ती आहे, त्यामुळे माझे घर एवढेच इथे हिंदुस्थान आहे. बाकी मी संपूर्णपणे पाकिस्तानने वेढला गेलो आहे!"
त्यांनी बाजूच्या फाईलमधून पत्रांचा ढीग काढला.
"ही पत्रे पाहा. कुणाच्या धमक्या येतात, कोणी मी हिंदूंचे पैसे खात असल्याचा आरोप करतो, तर कोणी इस्लामचा दुष्मन असल्याचा शोध लावतो."
हातातल्या पत्रांचा ढीग त्यांनी खाली ठेवला आणि म्हणाले, “तंग आ गया हूँ!"
मी हळूच भीत-भीत म्हटले, “असे निराश होऊन कसे चालेल?"
त्यांनी चष्माच्या कडेतून तिरपे माझ्याकडे पाहिले.
"तुम्ही मला उपदेश करताय? चाळीस सालापासून मी लढतोच आहे. अब्दुल बारीबरोबर (बिहार काँग्रेसचे अध्यक्ष. त्यांचा १९४७ मध्ये खून झाला.) काम केले, सय्यद महमूद मजालिस-ए-मशावरतकडे पळाले. मी मात्र मुस्लिम जातीयवाद्यांशी एकाकी लढतो आहे. असा एकटा किती दिवस लढू?"
त्यांनी जवळच पडलेला ‘परचमे-हिंद'चा एक अंक माझ्याकडे फेकला. "हे वाचलेत?"
मी अडखळत ते दोन कॉलमी शीर्षक वाचले. शीर्षक होते : ‘इन्होने भी मारा।' खालचा मजकूर अतिशय बारीक होता. तो वाचायला माझा फारच वेळ गेला असता. मी त्यांनाच सांगितले, "हे काय आहे, तुम्हीच जरा सांगा-"
ते सांगू लागले,
"मी पाटण्याला एका सभेत गेलो होतो आणि मुसलमान या देशाविषयी प्रेम बाळगत नाहीत व राष्ट्रगीत म्हणत नाहीत, असे म्हणालो. आता हे म्हणणे चूक आहे का? आज आपल्या देशात खरे सांगण्याची चोरी झाली आहे. सभेत हुल्लड झाली. काही मुसलमान होते, त्यांनी आक्षेप घेतला. खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली. मी म्हणालो, 'आपण सारे राष्ट्रप्रेमी आहात, हेच आपल्याला सांगायचे आहे ना? मग आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची सुवर्णसंधी आताच प्राप्त झाली आहे. आता सभा संपल्यावर आपण राष्ट्रगीत म्हणू या. ते सर्वांनी म्हणणे हाच आपल्या राष्ट्रनिष्ठेचा पुरावा होय.' यावर अधिकच हुल्लड झाली. हुल्लडीतच सभा बरखास्त झाली. आता या हुल्लडखोरांना उद्देशून लोकांनी काही बोलायला हवे,पण त्यांना कुणीच काही बोलत नाहीत. लोक मलाच दोष देतात." "बिहारच्या काही हिंदू मित्रांनी अनिससुर रहिमान टाळ्या मिळवण्यासाठी हे लिहितो आहे, असे काही वृत्तपत्रांतून म्हटले आहे. म्हणजे मुसलमान दगडांनी मारतात, ही मंडळी शब्दांनी मारतात, म्हणजेच दोघेही मारतातच. या हिंदू मित्रांना उद्देशूनच मी लिहिले : 'इन्होने भी मारा'!"
मग त्यांनी माझी चौकशी केली. मी कोण, कुठला? गावाचे नाव काय? तालुका, जिल्हा कोणता? माझी राजकीय मते कोणती? कोणत्या राजकीय पक्षाशी माझा संबंध आहे, हेदेखील जाणून घेतले.
दरम्यान, एक मौलाना आले. त्यांनी विचारले, “आजकाल परचमे हिंदचा अंक पाठवत नाही?" मला ते म्हणाले, “बसा." नोकराला हाक मारून त्यांनी ताजा अंक मौलानासाहेबांना दिला. मौलानासाहेबांनी वर्गणीचे पैसे त्यांच्या हातावर ठेवले. मग विचारले, “मसरुफ हो?"
"होय. हे मेहमान आले आहेत. मुंबईचे आहेत." मौलाना म्हणाले, “मग मी निघतो."
ते निघून गेले, तेव्हा अनिससुर रहिमान मला म्हणाले, "हा मनुष्य मोठा नेकीचा आहे. पण विचाराने शेवठी कठमुल्लाच! अजूनपर्यंत मी अनेकांना मोफत अंक पाठवत होतो. आता बंद केले आहेत."
"परचमे-हिंदचा खप काय आहे?"
“खप?" त्यांनी मलाच प्रतिप्रश्न विचारला. "किती असेल असे तुम्हाला वाटते?"
"चार-पाच हजार तरी?"
“वाह साब! जेमतेम दीड हजार आहे. त्यातील पाचशे मोफत वर्गणीदार. उरलेल्या दीड हजार प्रतींपैकी बाराशे हिंदू वाचतात आणि 'वाहवा, वाहवा, अनिससुर रहिमान, तुम्ही केवढे राष्ट्रभक्त आणि सेक्युलर आहात' असे येऊन सांगत असतात. पण ज्या मुसलमानांसाठी मी हा खटाटोप करतो आहे, ते वाचतच नाहीत. ते 'दावत' पत्र वाचतात. बंगलोरचे 'नशेमन' वाचत असतात. सुशिक्षित मुसलमान रेडियन्स' वाचतात. ('दावत' हे दिल्लीहून प्रकाशित होणारे जमाते इस्लामीचे उर्दू दैनिक आहे. दिल्लीहून 'रेडियन्स' हे इंग्रजी साप्ताहिकदेखील जमाते इस्लामी प्रकाशित करते. 'नशेमन' हे उर्दू साप्ताहिक आहे. जमाते इस्लामीच्याच ध्येयधोरणांचे या साप्ताहिकात समर्थन केलेले असते.) दर आठवड्याला मला किमान पाचशे रुपये नुकसान सहन करावे लागते. न घाटा कम हो रहा है, न कंबख्त मुसलमान बदल रहे है! लेकिन मेरा पेपर बंद नहीं करूंगा. जी में जी है तब तक चलाऊँगा!"
मी म्हणालो, “तुमचा सूर निराशेचा दिसतो आहे. मुसलमान समाजाच्या वागण्यात, वैचारिक श्रद्धेत काही बदल होऊ शकेल, असे तुम्हाला वाटत नाही?"
त्यांनी चष्म्याच्या कडेतून माझ्यावर नजर रोखीत मला विचारले, “आप कभी रेस को गये है?"
"नाही."
"कभी अकडनेवाली घोडी देखी है?"
"नाही."
"कोई घोडी अकडनेवाली होती है, वो किसीको सवार नहीं होने देती. पीछेसे टाँगे झाडती है. लेकिन अगर किसीने हंटर चढाया तो सीधी हो जाती है. मुसलमानों का भी ऐसाही है, अकडनेवाली घोडी जैसा. ब्रिटिशों के खिलाफ मुसलमानोंने पहले ऐसेही टांगे झाडी! उन्होने जब खूप हंटर चढाये तभी सीधे हो गये. ब्रिटिश यहाँ से चले जाने के वक्त तक उनको ‘जी हुजूर' करते थे. अब हिंदुओं के खिलाफ टाँगे झाड रहे है. जब हिंदू खूब हंटर चढायेंगे तब सीधे हो जायेंगे. आपके कहने से नहीं! आप मुफ्त अपना वक्त बरबाद मत किया किजीए। जाईये- कहाँ अच्छी बिरयानी वगैरे खाईये और आरामसे अपनी जिंदगी बसर किजिये-"
ते बोलायचे थांबले. आपला पसरलेला पाय त्यांनी आखडता घेतला. मग माझ्या खांद्यावर हात ठेवत ते उभे राहिले. मला निघायची ही अप्रत्यक्ष सूचना होती. हे मी ओळखले. निघताना माझा हात हातात घेऊन ते म्हणाले, "तुमच्या मनात आता कोणते विचार असतील, हे मी ओळखून आहे. 'मुसलमान हंटरनेच सुधारणार असतील, तर मग मी कशाला धडपड करीत आहे?' असा प्रश्न तुमच्या मनात असेल; नाही का?"
मी म्हणालो, “होय. तुम्ही बरोबर ओळखलेत."
“सांगतो. हा मानवी स्वभाव आहे. काही माणसांना स्वस्थ बसवतच नाही. बुरा करनेवाले अपने कारनामे करते रहते है. भला सोचनेवाले अपनी कोशिशें जारी रखते हैं. वह चूप नहीं बैठते. मुसीबतों से हटते नहीं, नतीजा क्या होगा यह भी सोचते नहीं. मै उसमेसे एक हूँ. आप भी उसी में से एक है. नही तो भला इतने लंबे ढुंढने आतेही क्यों? आप भी चूप नहीं बैठेंगे यह मै जानता हूँ. इसलिए आपको एहसास दिलाना चाहता हूँ- जब कुछ करोगे तो यह अनिससुर रहिमान आपको साथ देगा!"
त्यांनी प्रेमाने हात दाबला. लंगडतच ते माझ्याबरोबर गच्चीवरून खाली उतरले आणि कुठे तरी जाण्यासाठी लंगडत-लंगडत रस्त्याने चालू लागले.
देवबंद
२५ ऑगस्ट १९६७
मीरतहून देवबंदला आलो. देवबंद अगदीच किरकोळ स्टेशन. पॅसेंजर गाडी खडखड करीत येऊन उभी राहिली. मी उतरून स्टेशनच्या बाहेर पडलो. एका सायकलरिक्षावाल्याने विचारले, "बाबूजी, कहाँ जाना है? मदरेसे मे?"- याला कसे कळले? मदरशात बहुधा खूप लोक येत असावेत.
कडव्या धर्मपंथी मौलानांनी 'देवबंद' हा गाव इस्लाम धर्माच्या प्रचारकार्यासाठी निवडावा, हा एक विनोद. रिक्षातून जाताना देवबंदी टोप्या घातलेली आणि दाढ्या वाढवलेली बरीच तरुण मुले दिसली. हरिद्वारला जसा साधूंचा सुळसुळाट, तसा इथे या दाढीवाल्यांचा सुळसुळाट दिसला. एक मशीद रस्त्याला लागली. नंतर रिक्षावाला थांबला.
थोड्याशाच चौकशीनंतर पैगंबरवासी मौलाना हुसेन अहमद मदनी यांच्या घरी गेलो. दिल्लीला मला असद मदनींनी (पै. मौ. हुसेन अहमद मदनी यांचे चिरंजीव. जमायतुल उलेमाचे तेव्हाचे चिटणीस व राज्यसभेचे काँग्रेस पक्षीय सभासद.) पत्र दिले होते. मी गेलो तेव्हा तिथे कुणी मौलानाच होते. त्यांना पहिले मौलाना' म्हटले पाहिजे. कारण दिवसभर ते वारंवार भेटले. त्यांनी मला त्या विस्तीर्ण लांबच लांब पसरलेल्या खोलीत नेले. तिथे जमिनीवर सतरंजी पसरली होती. तिच्यावर माझी बॅग मी ठेवली आणि तिथेच बसलो.
थोड्या वेळाने तिथे दुसरे एक मौलाना आले. ते बरेचसे तरुण दिसत होते. पहिल्या मौलानांनी त्यांची ओळख करून दिली. त्यावरून ते असद मदनींचे बंधू असल्याचे कळले. त्यांनी आस्थेने चौकशी केली. “काही संकोच बाळगू नका. घर तुमचेच आहे असे समजा." ते म्हणाले. मग “कशाकरता आला आहात?" अशी चौकशी केली.
मी थोडक्यात त्यांना कल्पना दिली. मग म्हणालो, “मला दरसे निझामियाची (मुस्लिम धर्मपीठातील अभ्यासक्रमाला 'दरसे निझामिया' म्हणतात. औरंगजेबाच्या आज्ञेवरून निझामुद्दीन या धर्मपंडिताने तो तयार केला, म्हणून आजतागायत त्याच्या नावावरून हा अभ्यासक्रम ओळखला जातो.) थोडी माहिती देऊ शकाल का?"
मला त्यांनी अभ्यासक्रमाची माहिती पुरवली. मी विचारले, “या अभ्यासक्रमात काही बदल झाले आहेत काय?"
त्यांनी विचारले, “कोणते बदल तुम्हाला हवे आहेत? कुराण, हदीस यात तर बदल होत नाहीत. फक्त इतर काही नव्या बाबी शिकवल्या जातात. उदाहरणार्थ- भूगोल, उर्दू इत्यादी."
मी माझा मुद्दा स्पष्ट केला. म्हणालो, "कुराणात बदल करण्याचा प्रश्न नाही. मी कुराणाच्या अभ्यासक्रमाविषयी बोलतो आहे. कुराण शिकवण्याच्या पद्धतीत काही बदल होऊ शकतो की नाही? उदाहरणार्थ, इतिहास तोच असला तरी इतिहासाची नवनवी पुस्तके निघत असतात. नव्या पद्धतीने, नव्या दृष्टीने इतिहास शिकवण्यावर सध्या भर दिला जातो. कुराण, हदीस यांच्या अभ्यासक्रमाबाबत असे काही होत आहे का?"
त्यांनी विचारले, “कुराण आणि इतिहास एकच आहे का?"
मी हतबुद्ध झालो आणि अधिक प्रश्न विचारण्याचा नाद सोडून दिला.
मदनीसाहेब थोड्या वेळाने निघून गेले आणि पहिले मौलाना पुन्हा प्रकटले. कानाशी लागून बोलतात तसे, खालच्या आवाजात म्हणाले, "तुमची दुपारी मौ. तय्यबसाहेबांशी भेट होईल. त्यांची वेळ नक्की केली आहे." आणि मग ते तय्यबसाहेबांबद्दल तक्रारी करू लागले. “मौ. हुसेन अहमद मदनी 'रहिमतुल्ला हे अलय' यांनी येथे निर्माण केलेले सगळे नष्ट करण्याचा तय्यबसाहेबांनी चंग बांधला आहे. त्यांनी निर्माण केलेली परंपरा, त्यांचे विचार- सर्व काही नाहीसे केले जात आहे. आता हेच पाहा ना. मौ. मदनी 'रहिमतुल्ला हे अलय' यांनी या घराच्या अंगणात एक आंब्याचे झाड लावले होते, तय्यबसाहेबांनी ते गाडून टाकले!"
ते गृहस्थ मला हे सगळे का सांगत आहेत, हे कळेना. मौ. मदनींच्या नावामागे 'रहिमतुल्ला हे अलय'ची उपाधी उच्चारण्याची त्यांची लकब मला मजेदार वाटली. साधारणत: मृत अवलिया-संतपुरुष यांच्या नावाचा उच्चार 'रहिमतुल्ला हे अलय'ने(याचा अर्थ 'परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी होवो') होत असतो. परंतु मागाहून माझ्या लक्षात आले की, कोणत्याही मृत मौलानाच्या नावानंतर 'रहिमतुल्ला हे अलय'चा उच्चार ते करीत होते. मौ. शब्बीर अहमद उस्मानींचा (मौ. उस्मानी १९४० मध्ये जमायतुल-उलेमा या संघटनेतून फुटून निघाले व पाकिस्तानचे पुरस्कर्ते बनले.) मी उल्लेख केला, तेव्हा माझ्याऐवजी त्यांनीच 'रहिमतुल्ला हे अलय'चा गजर केला. त्यानंतर कोणत्याही फालतू मृत मौलानाच्या नावाचा उच्चार 'रहिमतुल्ला हे अलय'खेरीज होत नाही, हे माझ्या लक्षात आले. देवबंदचे हे सगळेच मौलाना मृत्यूनंतर पीर-अवलिया बनतात, हे पाहून गंमत वाटली!
दुपार झाली आणि एकदाचे जेवण आले. जेवण येताच अनेक मौलाना, कुठून कुणास ठाऊक, उपस्थित झाले. जेवण म्हणजे एका मोठ्या परातीत मटणाचे कालवण आणि एका मोठ्या रुमालात बांधलेल्या गव्हाच्या पोळ्या. सर्व जण त्या परातीभोवती वर्तुळाकार बसले. मीही बसलो. तेवढ्यात मौ. मदनी आले. त्यांनी माझ्याशी एव्हाना बोलत असलेल्या मौलानांना इशारा केला. त्यांनी
एका छोट्या प्लेटमध्ये मटणाचे कालवण आणले व माझ्या पुढ्यात ठेवले. मी म्हणालो, “मला हे वेगळे कशाकरता? आपल्याबरोबर मीही खाईन की.”
"तुम्हाला ते पचणार नाही." मौ. मदनी मला म्हणाले. “हे म्हशीचे मटण आहे. तुम्हाला खायची सवय नाही, म्हणून तुमच्याकरता बकऱ्याचे मटण आणले आहे."
"इथे म्हशीचे मटण कसे काय मिळते?"
“गाईचे मिळत नाही म्हणून!" मदनीसाहेब शांतपणे म्हणाले, “गोहत्येला बंदी आहे. बकऱ्याचे मांस परवडत नाही. या मदरशात एकूण पंधराशे विद्यार्थी आहेत. एवढ्यांना बकऱ्याचे मटण कुठून आणायचे? म्हणून आम्ही म्हशीचे मटण आणतो. ठीक आहे. तुम्ही जेवायला लागा. सकाळपासून काही खाल्ले नसेल."
“बिस्मिल्ला हिरीमा निर्रहिम' असे म्हणून त्यांनी हातात रुमाल घेतला आणि त्यातील पोळ्या ते प्रत्येकाला वाटू लागले. प्रथम मला दिल्या. आम्ही जेवू लागलो.
मौ. मदनीदेखील जेवतच होते. परंतु जेवता-जेवता ते प्रत्येकाच्या हातातली पोळी संपली की चटकन रुमालातील देत होते. तेवढ्यात तिथे एक गृहस्थ आले. त्यांची आधीची ओळख होती. 'अस्सलामुअलयकुम'ची फैर झडली. जेवायला बसलेल्या प्रत्येकानं 'अस्सलामुअलयकुम' म्हटले आणि प्रत्येकाला आदबशीरपणे वाकून त्या गृहस्थांनी ‘वालेकुम सलाम'चा प्रतिजवाब दिला.
“जेवायला या, जेवायला या-" जवळजवळ साऱ्यांनीच त्यांना आग्रह केला.
“जेवण झाले आहे. तुमचे चालू द्या. काही कामानिमित्त आलो होतो. म्हटले, मदनीसाहेबांच्या घराला भेट देऊन जावे."
"बरे केले आलात. तुम्ही आग्र्याला असता, नाही का?" मदनीसाहेबांनी विचारले. स्वत: जेवणे, इतर जेवणाऱ्यांच्या हातातील पोळी संपताच झटकन त्यांना हातातल्या रुमालातील पोळी देणे आणि आलेल्या त्या गृहस्थांबरोबर संभाषण करणे, या तिन्ही क्रिया ते एकाच वेळी बिनचूक पार पाडत होते.
ते गृहस्थ मदनीसाहेबांना काही वेळ निरखीत राहिले. मग एकदम म्हणाले, "मरहुम हुसेन अहमद मदनीसाहेबांच्या वेळेपासून मी येथे येत आहे. ते असेच सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे. अशीच परात, अशाच पोळ्या आपल्या हाताने प्रत्येकाला द्यायचे. तसेच चालले आहे. तुम्ही वडिलांची ही परंपरा तशीच चालवली आहे."
मौ. मदनीसाहेबांचा चेहरा लकाकला. तोंडाशी आलेला घास तसाच थांबवून ते म्हणाले, “होय. आणि असेच चालणार. इन्शाअल्ला, आम्ही या परंपरा अशाच जतन करून ठेवणार!"
५२ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
जेवण संपले. बरीचशी मंडळी पांगली. मग मी, पहिले मौलानासाहेब, तिथे हिशेबाचे कामकाज पाहणारे एक मौलाना आणि दुसरे एक पेशावरी मौलाना असे उरलो. बोलण्यासारखे काही नव्हतेच. मी तसाच बसून राहिलो. तेवढ्यात आणखी एक गृहस्थ आले.
पुन्हा 'सलामअलयकुम'ची फैर झडली. त्या गृहस्थांनी देवबंदी टोपी घातली होती. थोडी पूर्वीची ओळख असावी, असे दिसले. पैशांचा व्यवहार पाहणारे मौलाना सावरून बसले. “आईये, आईये"चा त्या साऱ्यांनीच गदारोळ केला. मग बोलणे सुरू झाले.
"कधी आलात?"
"चार महिने झाले."
“कुठे असता?"
“मदिना मुनव्वरा."
मदिन्याचे नाव कानावर पडताच सारेच जण “वाहवा, वाहवा" म्हणाले. त्यांचे चेहरे सांगू लागले, 'तुम्ही किती भाग्यवान! मदिन्याला असता! आम्हाला तर त्या पवित्र शहराचे दर्शन केवळ कल्पनेनेच घेता येते!'
“आता किती वर्षे झाली?"
“बटवारा झाला आणि लगेच गेलो. मी लुधियानाचा. दंगल झाली. मुसलमानांची पंजाबमध्ये नावनिशाणीही राहिली नाही. मी दिल्लीला आलो. सर्वस्व गेले होते. काही दिवस कसे तरी चार नातेवाइकांकडे काढले. तेवढ्यात अरबस्तानात मौलवी हवे असल्याचे कळले. मी गेलो. काही दिवस एक मदरसा चालवला. मग हिऱ्यांच्या विक्रीचे दुकान काढले. आता मौलवीगिरी करत नाही. तिजारतच करतो."
“तिथे दुकाने उघडी टाकून फिरता येते, इथल्यासारखे नाही; खरे ना?" पेशावरी मौलानांनी विचारले.
"अगदी खरे. अगदी रस्त्यावर फेरीवाला आपल्या मालावर रुमाल टाकून नमाजेला जाऊन येतो. कोणी त्याच्या मालातील पिनदेखील उचलणार नाही."
मधेच संभाषणात मी स्वत:ला झोकून दिले. म्हणालो, "तसे म्हणायचे तर तेथील हिऱ्याचे दुकान तसेच उघडे टाकून तुम्ही इथला प्रवास आटोपून जायला हरकत नाही. असेच ना?"
त्या साऱ्यांनी चपापून माझ्याकडे पाहिले. मग मदिनावाल्यांनी विचारले, "हे कोण ? इन्का तआरुफ नहीं करवाया आपने."
“यांचे नाव दलवाई. हमीदसाहेब दलवाई. मुंबईहून आले आहेत.
मुसलमानांवर पुस्तक लिहू इच्छितात. देवबंद मदरशाची माहिती गोळा करायला इथे आले आहेत."
“वाहवा! चांगले नेकीचे काम करीत आहात!" मदिनावाले उद्गारले. परंतु माझ्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे मात्र त्यांनी टाळले.
खिशातून त्यांनी शंभर रुपयांची नोट काढली आणि पैशांचा व्यवहार पाहत असलेल्या मौलानांकडे मदरशाकरता दिले. त्याची पावती करून दिली. दरम्यान, कोणीच काही बोलेना. माझ्या बोलण्यामुळे त्यांच्या संभाषणाचा रंग विस्कटला की काय, असे मला वाटू लागले. मी काहीसा अवघडून बसलो.
हिशेब सांभाळणारे मौलाना बोलू लागले, “असे तुमच्यासारखे दाते आहेत, म्हणून हा मदरसा चांगला आहे. परंतु पंधराशे विद्यार्थी. त्यांच्याकडून आम्ही एक पैसादेखील घेत नाही. जगातील सर्व देशांतील मुसलमान आम्हाला पैसे पाठवतात."
"चालवायला तो समर्थ आहे!" मदिनेवाल्यांनी आकाशाकडे बोट दाखवले. त्यांना स्वत:कडे श्रेय घ्यायचे नव्हते. आणि मग झटकन ते माझ्याकडे वळून म्हणाले, “हमीदसाब, अरबस्तानचे कायदेकानू वेगळे आहेत. म्हणून तिथे चोऱ्या होत नाहीत. तिथे इस्लामचे कायदेकानून अस्तित्वात आहेत."
"मला माहीत आहे." मी शक्य तितक्या नम्रपणे म्हणालो.
"आणि आपले भारतीय मुसलमान तिथे काझी आहेत. ते न्याय देतात. तेच अरबांना मजहब शिकवतात."
“वाहवा! सुभानअल्ला! अरबांच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना इस्लाम शिकवला; आता आम्ही आमच्या इस्लाम शिकवणाऱ्यांच्या वारसदारांना तो शिकवत आहोत. त्यांचे ऋण फेडीत आहोत. वाहवा!" हिशेब ठेवणाऱ्या त्या मौलानांनी भावनावेगाने डोळे मिटून घेतले!
“कुठे कुठे फिरलात?" पेशावरी मौलानांनी मदिनेवाल्यांना विचारले.
"सगळ्या ठिकाणी जातो आहे. मदरसे, मशिदी पाहतो आहे. जेवढे होईल तेवढे दान करतो आहे."
"दिल्लीला गेला होता?"
"होय, जुन्या दिल्लीतही फिरलो. पण का कुणास ठाऊक, मला लोक निरुत्साही, मरगळलेले दिसले. कुणाच्या चेहऱ्यावर टवटवी म्हणून दिसली नाही."
“अरे भाईसाब, पहले चांदनी चौक वगैरा मोहल्लोमें मुसलमान रहा करते थे. अब वह वहाँ नहीं दिखाई देते. मुसलमान के चेहरेपे जो तजल्ली दिखाई देती है वो भला काफरके चेहरे पर कहाँ दिखाई देगी?" हिशेब पाहणारे मौलाना म्हणाले.
५४ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
"हां, हां. लेकिन महंगाई भी बढ़ी है. लोग उसीसेही तंग आये हुये महसूस हुये!" मदिनेवाले म्हणाले. बहुधा काफिरांच्या चेहऱ्यावर तेज नसल्याच्या सिद्धान्तावर (मदिन्याला राहूनही) त्यांचा विश्वास नसावा!
ते निघून गेले. मंडळी पांगली. कोणी तरी एक मुलगा आला. पहिले मौलाना माझ्याशेजारीच बसून राहिले होते. ते म्हणाले, “जरा आपण बाहेर फेरफटका मारून येऊ या."
त्यांनी संबंध मदरसा दाखविला. वर्ग चालू होता. एका वर्गात एक मौलाना हदीस शिकवीत होते. बाहेर उभे राहून थोडा वेळ त्यांचे प्रवचन ऐकले. काही विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांच्याशी इच्छा असूनही चर्चा करता आली नाही. ते वर्गात जायच्या घाईत होते. जे घाईत नव्हते, ते बोलू इच्छित नव्हते. त्यांच्या शिक्षकांच्या समोर आपली मते मांडायला त्यांना अवघडल्यासारखे वाटत होते काय, काही कळले नाही.
रस्त्यात पुस्तकांचे दुकान होते. त्यात मो. हुसेन अहमद मदनींच्या आत्मचरित्राचे दोन्ही खंड उपलब्ध होते. मी ते विकत घेतले. परतताना तो मुलगा म्हणाला, “हमीदसाहेब, नुकताच रांचीला दंगा झाला. मुसलमानांवरला हा जुलूम कधी थांबेल? तुमचे मत काय आहे?"
मी काहीच बोललो नाही, तोच पुढे म्हणाला, “आमचे काय आहे, ते आम्हाला देऊन का टाकत नाहीत?"
पहिले मौलाना म्हणाले, “यह गलत बात है. आता पुन्हा देण्या-घेण्याची भाषा बरोबर नाही!"
ते अधिक काही बोलले नाहीत. परंतु एवढ्या समंजसपणाची भाषा फक्त त्यांच्या तोंडून सकाळपासून पहिल्यांदाच मी ऐकत होतो.
मी त्या मुलाला विचारले, “तू काय करतोस?"
"नोकरी."
“पढाई किती झाली आहे?"
“फारशी नाही. उर्दतून लिहिता-वाचता येते."
"हे ‘आमचे', ते तुमचे' तुला कुणी शिकवले? मुसलमानांना वेगळे द्यायचे म्हणजे काय? त्यांना एकदा पाकिस्तान दिले गेले, हे तुला माहीत आहे का?"
“जाऊ द्या हो, तो बच्चा आहे! मोठी माणसे काही तरी बोलतात, ते मुले ऐकतात आणि विचार न करता तेच बडबडू लागतात!"
मौलवीसाहेबांचे म्हणणे खरे होते. पण याचा अर्थ, कुठे तरी असे बोलले जात आहे, असा होतो. कुठे? मशिदीतून, मोहरमच्या वाज (प्रवचन) मधून
खुतबा (सामुदायिक नमाजेनंतर देण्यात येणारे प्रवचन) पढताना? राजकीय आणि धार्मिक पुढाऱ्यांच्या खासगी बोलण्यातून? त्या मुलाच्या बोलण्यातून जो विचार ध्वनित होत होता, त्याच्या परिणामाच्या कल्पनेने मी शहारलो.
अखेरीला मौ. तय्यबना भेटलो. ही भेट बरीच औपचारिक, नेहमीच्या सोपस्कारांनी परिपूर्ण ठरली. एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर. फरशीवर सतरंज्या आणि मऊ-मऊ गाद्या. मधोमध तक्क्याला टेकून तय्यबसाहेब बसलेले. जरा भांबावलेल्या मन:स्थितीतच आत प्रवेश केला. त्यांना आदाब अर्ज करून समोर बसलो. आजूबाजूला बरेचसे मौलाना बसलेले. त्यात आधी जेवण करताना उपस्थित असलेलेही काही होते. मदिनेवाले मौलानाही तय्यबसाहेबांच्या दर्शनाला आले होते.
माझ्या आदाब अर्जचा स्वीकार करून तय्यबसाहेबांनी कुणाला तरी खूण केली, तसा चहा आला. अतिशय छोटे रंगीबेरंगी ग्लास. त्यात कोरा चहा. याला काश्मिरी चहा म्हणतात. येथे 'कावा' या नावाने तो ओळखला जातो. 'बिस्मिल्ला हिर्राम निर्रहीमा'चा गजर झाला आणि सर्वांनी ते ग्लास तोंडाला लावले.
“वाहवा! क्या लजीज चीज है!" मदिनावाले रिकामा ग्लास खाली ठेवून उद्गारले आणि मग ती शांतता भंग पावली. मी तय्यबसाहेबांकडे पाहिले. त्यांचा चहा संपला होता. त्यांचे पाणीदार डोळे माझ्यावरच रोखले गेले होते. दाढी अर्धवट पिकलेली. खास काळी टोपी. पाय अदबशीरपणे दुमडलेले. समोर कसले तरी पुस्तक.
माझ्या मनात त्यांच्याविषयी आधीच अढी निर्माण झाली होती. कारण नेहरूंच्या मृत्यूनंतर काही मुसलमानांनी मशिदीत नमाज अदा केली आणि त्यांना जन्नत नसीब होवो' अशी दुवा म्हटली. यावर काही मुस्लिम मंडळींनी मौ. तय्यब यांच्याकडे फतवा मागितला. प्रश्न असा- बिगरमुसलमानाच्या मृत्यूनंतर मुसलमान त्याला जन्नत लाभावी म्हणून प्रार्थना म्हणू शकतो काय?
'नाही' असे मौलाना तय्यब यांनी आपल्या फतव्यात उत्तर दिले आहे. हे उत्तर तसे मासलेवाईक आहे. त्यांनी फतव्यात पुढे म्हटले आहे : ज्यांना नेहरू जन्नतीत जावे असे वाटत होते, त्यांनी त्यांना (नेहरूंना) त्यांच्या हयातीत मुसलमान केले असते तर इस्लामची फार मोठी सेवा त्यांच्या हातून घडली असती. बिगरमुस्लिमासाठी अशी प्रार्थना म्हणणे हाच इस्लामद्रोह आहे. ज्यांनी प्रार्थना म्हटली, त्यांनी आपण मुसलमान असल्याची जाणीव ठेवली नाही. लानत हो ऐसे लोगोंपर खुदाकी!
मौ. तय्यबनी विचारले, “काय काय पाहिलेत? कोणती माहिती हवी आहे आपल्याला आमच्याकडून?"
५६ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
मी थोडक्यात त्यांना काय पाहिले, याची कल्पना दिली. मग प्रश्न विचारला, “बिगरमुसलमानाला या मदरशात शिकायला प्रवेश मिळू शकेल?"
“नाही. हिंदू धर्मपीठांत अहिंदूला प्रवेश मिळत नाही. ख्रिश्चन सेमिनरीमध्ये इतरांना प्रवेश मिळत नाही. तसाच इथे बिगरमुसलमानांना मिळणार नाही."
"स्त्रियांना? मुस्लिम स्त्रियांना इथे धर्म शिकता येतो?"
"नाही, कारण स्त्रिया मौलवी बनत नाहीत."
"बनू शकतील."
"आम्हाला बनवायच्या नाहीत."
मागाहून मला कळले की, स्त्रियांना या मदरशाच्या आवारातदेखील प्रवेश करता येत नाही.
मग मी जरा धीर करून विचारले, “आपण नेहरूंच्या मृत्यूनंतर एक फतवा काढला होतात. दि. २० जून १९६४च्या 'दावत'च्या अंकात तो प्रसिद्ध झाला आहे. त्याच्यावर बरीच उलट-सुलट चर्चा झाली आहे. आपल्याला त्याविषयी आज काय वाटते?"
"माझे ते मत कायम आहे. मी योग्य तेच म्हटले आहे. तुम्ही धर्मशास्त्र वाचले आहे?"
"नाही."
"इस्लामविषयी काही वाचले आहे?"
“फारसे नाही."
"मग आपण वाद कसा घालता?"
"माझा मुद्दा वेगळाच आहे. धर्मविषयक मूल्ये बदलतात की नाही, असा माझा प्रश्न आहे. उदाहरणार्थ- ख्रिश्चन चर्चमध्ये नेहरूंच्या मृत्यूनंतर प्रार्थना झाल्या. त्यांच्या धर्मश्रद्धेला कुठे बाधा आलेली नाही."
“म्हणूनच तुम्ही इस्लाम समजावून घेतला पाहिजे. हिंदुस्थानात केवळ नावाचे मुसलमान राहणार की इस्लामदेखील राहणार, असा प्रश्न आहे. पूर्वीदेखील तोच प्रश्न होता; आजही तोच अस्तित्वात आहे. अकबर आणि औरंगजेब यांच्यातील फरक हाच आहे. मुसलमान अकबराच्या मागे लागले असते तर मुसलमानांचा धर्म राहिलाच नसता, ते नावाचे मुसलमान राहिले असते. औरंगजेबामुळे धर्मही राहिला, मुसलमानदेखील राहिले! हा झगडा चालूच आहे, आणि चालूच राहणार!"
त्यांनी विचारले, “आणखी विचारायचे आहे?"
मी 'नाही' म्हटले. त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर काही विचारण्यासारखे उरलेच नव्हते.
.
पहिले मौलाना मला स्टेशनपर्यंत पोचवायला आले. मला मीरतला जायचे होते. गाडी आली, तेव्हा मौलाना म्हणाले, “पुन्हा या. एक-दोन दिवस राहा इथे. तुमचेच घर आहे." मी “जरूर येईन' असे हसून म्हणालो खरा; परंतु आपण काही इथे पुन्हा येणार नाही, आपल्याला यावेसे वाटणार नाही, हे मनात आले. गाडीत बसलो तेव्हा, येथील गुदमरलेल्या वातावरणातून सुटका झाली म्हणून हायसे वाटले. त्याचबरोबर जे ऐकले आणि पाहिले, त्यामुळे फार उदास झालो! माझ्या विचारचक्राची गतीच थांबली. मीरत येईपर्यंत असाच बधिरपणे बसून राहिलो !
अलिगढ
५ सप्टेंबर १९६७
हॉटेलात सामान टाकले आणि प्रथम किशनसिंगला शोधत गेलो. त्याचे पुस्तकाचे दुकान खूप मोठे आहे. खतिजाचा उल्लेख करताच त्याने मला अगत्याने बसवून घेतले. तिथे काही मुस्लिम विद्यार्थी होते. त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यातील एका विद्यार्थ्याचे नाव होते मुशीरूल हसन. तो महेबूबुल हसन या जामियामधील इतिहासाच्या प्राध्यापकाचा मुलगा. किशनसिंगने दुपारी पाच वाजता मला पुन्हा बोलावले. तो म्हणाला, “हे बघा दलवाईसाहेब, आम्ही कम्युनिस्ट असलो, तरी आमच्या सरंजामदारी संस्कृतीचा वारसा विसरलो नाही. दुपारच्या वेळी येथील रीती-रिवाजाप्रमाणे आम्ही झोप काढतो. तुम्ही पाच वाजण्याच्या आधी येऊ नका."
मुशीरूल हसन आज बराच उपयोगी पडला. त्याने अनेक प्राध्यापकमंडळींची ओळख करून दिली. प्रा. बिलग्रामी हे किशनसिंगच्या पुस्तक दुकानाच्या वरच राहातात. त्यांनी घरीच नेले. अतिशय हलक्या आवाजात आणि अडखळत ते मला म्हणाले, “या विद्यापीठात पुरोगामी, प्रतिगामी, जातीयवादी, सेक्युलरवादी असे सगळेच तुम्हाला आढळतील. परंतु इथे अधिक प्रभाव जातीयवाद्यांचाच आहे. पुन्हा गंमत अशी की, बिचारे शिया तेवढे जरा व्यापक दृष्टीने विचार करणारे आहेत. तुम्हाला इथे शियांखेरीज फारसे पुरोगामी विचारांचे लोक आढळणार नाहीत."
प्रा. बिलग्रामी हे शिया असल्याचे मला मागाहून कळले.
श्री. आय. हसन हे प्राध्यापक इथे हिंदी आणि तत्त्वज्ञान शिकवतात. ते मला म्हणाले, “मी तरी मुसलमानांविषयी निराशावादी बनलो आहे. आणि त्यांच्या या जातीयवादी प्रवृत्तीबद्दल जीनांना मोठ्या प्रमाणात जबाबदार धरावे लागेल. पाकिस्तान मिळाल्यावरदेखील हा मनुष्य बदलला काय? नाही!माउंटबॅटननी हैदराबाद आणि काश्मीरबाबत एक तोडगा सुचवला. नेहरूपटेलांनी तो मान्य केला, परंतु जीनांनी तो फेटाळून लावला. त्यांना सगळेच प्रदेश घशाखाली घालायचे होते!"
५८ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
"माझे नातेवाईक पाकिस्तानात आहेत. ते अधूनमधून इथे येत असतात. माझे इतर नातेवाईक अधूनमधून पाकिस्तानात जात असतात. त्यांच्यामुळे तिथे काय चालले आहे, हे मला कळते. तेथील नवी पिढी अधिक धर्मांध, अधिक जातीयवादी होत आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते या तरुण पिढीला पद्धतशीरपणे तशी बनवत आहेत. हा झगडा मग लवकर मिटावा कसा?"
प्रा. निझामी आणि प्रा. जमाल ख्वाजा हे आणखी दोन प्राध्यापक भेटले. निझामींचे काही लिखाण मी वाचलेले आहे. त्यांचा शहा वलीउल्ला (भारतातील पुनरुत्थानवादी मुस्लिम चळवळींचा जनक.) वरील लेख गाजला होता. ते बरेच रिझर्व्हड वाटले. परंतु मजलिसे मशावरतच्या राजकारणावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, “आता मुस्लिमांच्या वेगळ्या राजकीय संघटना असू नयेत, असे माझे मत आहे."
श्री. जमाल ख्वाजांनी येण्याचा हेतू विचारला.
मी कल्पना देताच, त्यांनी गंभीर चेहरा केला. ते घराच्या छताकडे पाहत राहिले. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याचे मला माहीत होते. त्यांच्याविषयी थोडेसे नानासाहेब गोऱ्यांच्या तोंडून ऐकले होते. नानासाहेब लोकसभेचे सभासद होते. श्री. ख्वाजा राज्यसभेचे नियुक्त सभासद होते आणि एकमेकांच्या शेजारी राहत होते.
श्री. ख्वाजा छताकडे पाहतच मला म्हणाले, “मिस्टर दलवाई, मुसलमान समाजात मार्टिन ल्युथर का निर्माण होत नाही याचा मी विचार करतो आहे! प्रोटेस्टंट पंथासारखा पंथ निघाल्याखेरीज इस्लामचे आजचे रूप बदलू शकणार नाही!"
मागाहून मुशीरने मला सांगितले, “जमाल ख्वाजांचे वडील आणि जवाहरलाल नेहरू यांचे फार निकटचे संबंध होते. नेहरू अलिगढला आले की, प्रथम त्यांच्या घरी जात. ख्वाजांच्या एका भावाचे नाव वडिलांनी म्हणूनच जवाहर ठेवले आहे, दुसऱ्या भावाचे नाव रवींद्र. ते रवींद्रनाथ ठाकूरांविषयीचा आदर म्हणून ठेवलेले!"
किशनसिंगची पत्नी संध्याकाळी भेटली. किशनसिंगने घरी नेले. पत्नीची ओळख करून दिली आणि तो पुन्हा दुकानात परतला. सौ. किशनसिंग म्हणाल्या, “माझा एक लेख 'माधुरी' या हिंदी मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्यावर मला मुसलमानांची शिवीगाळ करणारी असंख्य पत्रे आली. ती वाचून, यापुढे आपण काही करू शकणार नाही, याविषयी माझी खात्री पटली!"
मला भेटलेली ही सारीच मंडळी अगतिक झाल्याप्रमाणे बोलत असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. बहुधा अलिगढला अधिक सामर्थ्यवान असलेल्या जातीयवादी शक्तीशी मुकाबला करणे अशक्य होत असल्याचा परिणाम असावा!
सौ. किशनसिंगनीच माझी प्रा. महंमद हबीब यांच्याशी उद्याची वेळ ठरवून दिली. ते इतिहासाचे प्राध्यापक. सध्या नॅशनल प्रोफेसर आहेत. हिस्टरी काँग्रेसचे दोनदा तरी अध्यक्ष होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उपराष्ट्रपतिपदाकरता विरोधी पक्षातर्फे उमेदवार होते. त्यांना भेटण्याची मला उत्सुकता होतीच.
ते बरेच थकलेले दिसले. संथपणे म्हणाले, “तुम्ही उद्या सकाळी दहा वाजता या. मी तुम्हाला फक्त एक तास देईन. तुमचे प्रश्न तुम्ही तयार करून आणा. निष्कारण बाष्कळ बोलण्यात मी वेळ दवडणार नाही. आणि केवळ तीनच प्रश्न विचारा!"
६ सप्टेंबर १९६७
प्रा. हबीब वाटच बघत होते. ते व्हरांड्यांत खुर्चीवर बसले होते. दुसऱ्या रिकाम्या खुर्चीवर त्यांनी मला बसण्याची खूण केली. मग ते उठून आत गेले व हातात खूपसे चिरूट घेऊन बाहेर आले. नोकराने तेवढ्यात चहाचा ट्रे आणला. हबीब मला म्हणाले, “या किटलीतील चहा संपेपर्यंत आपण बोलत राहू. चिरूट ओढता ना?" त्यांनी चहा बनवला. मग म्हणाले, "विचारा काय विचारायचे ते!"
मी तीन प्रश्न एका कागदावर लिहून घेऊन गेलो होतो. ते त्यांना वाचून दाखवले.
पहिला प्रश्न : अलिगढ विद्यापीठाने मुस्लिम समाजात आधुनिक धर्मनिरपेक्ष विचार आणण्यात कितपत हातभार लावला?
दुसरा प्रश्न : भारतातील हिंदू-मुस्लिम प्रश्नामागे भारतीय गतेतिहास कितपत कारणीभूत आहे?
आणि तिसरा प्रश्न : भारतीय मुसलमानांत सामाजिक सुधारणा होणे आवश्यक आहे, असे आपल्याला वाटते काय?
त्यांनी माझा कागद हातात घेऊन ते प्रश्न पुन्हा नीट वाचून घेतले आणि मग ते बोलू लागले,
“तुमच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर आधी देतो- किंबहुना, मी शेवटाकडून आरंभ करणार आहे. सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत,असे मी नेहमीच मानीत आलो आहे. मुस्लिम सामाजिक कायदे बदलले पाहिजेत, असे माझे मत आहे.
६० । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
"भारताव्यतिरिक्त इस्लामी जगताचा विचार केला तर, काही देशांत कायदे बदलले आहेत, परंतु तुर्कस्तान वगळता इतर देशांतील बदलांचे स्वरूप मर्यादित आहे. उदाहरणार्थ- बहुपत्नित्व मर्यादित करण्यात आले आहे. गुलामी नष्ट करण्यात आली आहे. याचाच अर्थ, सवलतींना अथवा कायद्यांना ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत, त्या संकुचित करण्यात आल्या आहेत. परंतु शरियतच्या मर्यादांचा भंग करणारे क्रांतिकारक कायदे अद्याप त्यांनी बनवलेले नाहीत."
"आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो. भारतीय (मुस्लिमांचा) कायदा आता कालबाह्य झाला आहे. त्याच्यात क्रांतिकारक बदल केले पाहिजेत."
मी मधेच विचारले, “वेगवेगळ्या जाती-धर्मांचे कायदे बदलण्यापेक्षा सर्वांसाठी एकच कायदा करावा, असे आपल्याला वाटते का?"
"बिलकुल हरकत नाही. कायदा बदलणे, ही बाब माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे."
“मी आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो. भारतीय मुस्लिमांचा प्रश्न-ज्याला हिंदू-मुस्लिम प्रश्न म्हणतात- इतिहासातून निर्माण झालेला आहे, याला एका मर्यादेत अर्थ आहे. एक तर मुस्लिम राजवटींचा इतिहास हा आपला इतिहास असे मुसलमान मानतात; आणि तो परकी, आक्रमक विजेत्यांचा इतिहास आहे असे हिंदु मानतात. इतिहास संघर्षमय असला तरी त्या गतेतिहासात आता रममाण व्हायचे नाही, हे अजून आपल्याला शिकायचे आहे."
"मुसलमानांपुरते बोलायचे तर इतिहासाला भूगोलाची एक बाजू असते, हे त्यांनी कधी समजावूनच घेतले नाही. मुस्लिमांना भूगोलाची जाणीवच नसते. तुम्हाला याचे एक उदाहरण देतो. माझा नोकर मला १९४६च्या निवडणुकीत 'कुणाला मत देऊ?' असे विचारायला आला. कारण मी काँग्रेस पक्षातर्फे मध्यवर्ती कायदे मंडळाच्या निवडणुकीकरता उभा होतो. तेव्हा मतदारसंघ वेगळे आणि मर्यादित होते. निवडणुकीत माझा पराभव झाला आणि लीगवाला प्रचंड बहुमताने निवडून आला. पण ही बाब महत्त्वाची नाही. पुढे फाळणी झाल्यावर याच नोकराने मला विचारले, 'हबीबसाब, हमने वोट तो यहाँ दिया, लेकिन वो कराची में कैसा निकलके आया?'"
“परंतु या प्रश्नाला धार्मिक बाजूदेखील आहे. इस्लाम आणि रोमन कॅथॉलिक धर्मात सुधारणा होणे मुश्किलीचे आहे. या धर्मांत आधुनिक प्रवाह फार दुबळे आहेत. रोमन कॅथॉलिक बहुसंख्य असलेला फ्रान्स आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला तुर्कस्तान वगळले, तर इतर मुस्लिम आणि कॅथॉलिक देश जगातील मागासलेले प्रदेश म्हणूनच ओळखले जातात. या दोन धर्मगटांत आधुनिक विचार रुजणे आवश्यक आहे. मुसलमानांच्या दृष्टीने तर ते अतिशय आवश्यक आहे."
"आता मी तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो. हा प्रश्न अलिगढविषयी आहे. माझे आयुष्य अलिगढला शिकवण्यात गेले. येथील वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांशी माझा निकटचा संबंध आला. अलिगढला मुस्लिम लीगची चळवळ वळली. इथेच पाकिस्तानी विचाराने मूळ धरले. असे का झाले? असा प्रश्न तुमच्या मनात आहे. हा प्रश्न गेली अनेक वर्षे मलाही भेडसावीत आहे."
"अखेरीला अलिगढ विद्यापीठ कशाकरता निघाले? मुस्लिमांचा मागासलेपणा घालवणे, हे अलिगढ आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट होय; परंतु अलिगढने हे उद्दिष्ट साध्य केले नाही. अलिगढ-आंदोलनाचे हे अपयश हाच पाकिस्तानच्या चळवळीचा पाया ठरला आहे. ज्या प्रकारचा सुशिक्षित-बुद्धिवादी वर्ग अलिगढने निर्माण करायला हवा होता, तसा ते विद्यापीठ करू शकले नाही. याचा परिणाम म्हणजेच अलिगढच्या सुशिक्षित वर्गानेच विभक्तवादी पाकिस्तानी चळवळीचे नेतृत्व केले. अलिगढच्या या अपयशाने मन खिन्न होते."
ते बोलायचे थांबले. आधी एक तास दिला असूनही ते जवळजवळ दोन तास बोलत होते. मधेच एकदा मला म्हणाले,
"मुसलमानांना ऐतिहासिक सत्याची काहीच चाड नसते. एकदा मी काही सुशिक्षित मंडळींना सांगितले होते, एके काळी अरबी भाषेत दिव्याला शब्दच नव्हता. 'चिराग' हा शब्द पर्शियनमधून अरबी भाषेत आलेला आहे. याचे कारण, प्रेषिताच्या काळात मदिना शहरातील कोणत्याही घरात दिवा लावला जात नसे. कारण दिवा लावण्याची पद्धतच त्यांना माहीत नव्हती. परंतु, ही वस्तुस्थिती लक्षात न घेता, ‘अरबी भाषा परिपूर्ण आहे,' असाच ही मंडळी माझ्याशी युक्तिवाद करीत होती. ज्या भाषेत दिव्याला शब्द नाही, ती भाषा परिपूर्ण कशी? प्रेषिताच्या वेळी मक्का आणि मदिना या दोन्ही शहरांत मिळून एकूण सत्तावीस साक्षर होते. यामुळे इस्लामच्या परंपरेत तोंडी पुराव्याला महत्त्व आहे. मुसलमान जोपर्यंत धर्म आणि त्याची प्रगती यांच्याकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहत नाहीत, तोपर्यंत ते आहेत तसेच राहणार."
पुढे ते मला म्हणाले,
"तुम्ही मला भेटायला आलात, म्हणून मी हे सारे बोललो. एरवी मी आता सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालो आहे. विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्यासाठी गळ घातली, म्हणून मी उभा राहिलो. मी निवडणूक हरणार ,हे अपेक्षितच होते. परंतु मला एक मोठे समाधान आहे, मी तर माझ्या मताशी प्रतारणा केली नाही!"
ते उठून उभे राहिले. मुलाखत संपल्याची ही खूण होती. त्यांचा मी निरोप घेतला. माझा हात हातात घेऊन ते म्हणाले, “मिस्टर दलवाई, तुम्हाला एकच सांगायचे आहे- कधीही, कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका! धैर्यच माणसाला अखेर त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाते!"
६२ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
संथ पावले टाकीत ते मागे वळले आणि घरात गेल्यानंतर दिसेनासे झाले. मी काही वेळ तिथेच घुटमळत उभा राहिलो. वाटले, परत जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करावा; परंतु तसाच अवघडल्यासारखा उभा राहिलो. काही वेळाने चालू लागलो.
१ लाट (१३ कथांचा संग्रह)
पहिली आवृत्ती १९६१ : साधना प्रकाशन, पुणे
चौथी आवृत्ती २०१६ : मौज प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : ११०, किंमत : १२० रुपये
२ जमीला जावद आणि इतर कथा (१० कथांचा संग्रह)
पहिली आवृत्ती २०१६ : साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १०८, किंमत : १०० रुपये
३ इंधन (कादंबरी)
मौज प्रकाशन, मुंबई
पहिली आवृत्ती : १९६५,सातवी आवृत्ती : २०१३,
पृष्ठे : १५२, किंमत ८० रुपये या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दिलीप चित्रे यांनी Fuel या नावाने केला असून, ते पुस्तक 'नॅशनल बुक ट्रस्ट' ने प्रकाशिन केले आहे.
४ राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान : (लेखसंग्रह)
पहिली आवृत्ती : २००२, साधना प्रकाशन, पुणे
दुसरी आवृत्ती : २०१२, सुगावा प्रकाशन, पुणे
पृष्ठे : २०८, किंमत : २०० रुपये
५ इस्लामचे भारतीय चित्र (शोधयात्रा)
पहिली आवृत्ती : १९८२, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
तिसरी आवृत्ती : २०१७, साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ६८, किंमत : ५० रुपये
६ भारतातील मुस्लिम राजकारण (लेखसंग्रह)
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
पहिली आवृत्ती : २०१७, साधना प्रकाशन, पुणे पृष्ठे : १६०, किंमत : १५० रुपये
('मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया' : शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद दिलीप पुरुषोत्तम चित्रे, या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.)
७ कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
पहिली आवृत्ती : २०१७, साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ६४, किंमत : ५० रुपये
८ अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट : संकलन - मेहरुन्निसा दलवाई
पहिली आवृत्ती : २०१७, साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १३०, किंमत : १२५ रुपये
(वरील सर्व पुस्तके साधना मीडिया सेंटर, पुणे येथे उपलब्ध आहेत. फोन : ०२०-२४४५९६३५)