कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा


कानोसा:
भारतातील
मुस्लिम मनाचा


हमीद दलवाई








साधना प्रकाशन

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
हमीद दलवाई

© रुबिना व ईला

पहिली आवृत्ती :२५ जून २०१७

मुखपृष्ठ आणि मांडणी :
गिरीश सहस्रबुद्धे

अक्षरजुळणी:
सुरेश माने

मुद्रितशोधन :
मिलिंद बोरकर

प्रकाशक :
साधना प्रकाशन
४३१ शनिवार पेठ, पुणे ४११०३०
दूरध्वनी : ०२०-२४४५९६३५
sadhana.prakashan@gmail.com

मुद्रक :
कॉम्प प्रिंट कल्पना
पुणे ४११०३०

किंमत : रु. ५०/-
ISBN : 978-93-86273-17-8

  अनुक्रम


महाराष्ट्रीय मुसलमान ०५
मुंबईकर मुसलमान १३
भारतीय मुसलमानांचे अंतरंग २३
हिंदू-मुस्लिम संबंध ३१
भारतीय मुसलमान : एक कानोसा ४१

 पार्श्वभूमी

 साधना साप्ताहिकाने २०१५ चा १५ ऑगस्ट विशेषांक 'पुनर्भेट : हमीद दलवाईंची' या विषयावर काढायचे ठरवले होते. तेव्हा मेहरुन्निसा दलवाई यांनी जी काही कात्रणे दिली, त्यात हमीद दलवाईंचे चार लेख असे होते, जे विशेष महत्त्वाचे आहेत; परंतु कोणत्याही पुस्तकात समाविष्ट केलेले नाहीत. एवढेच नाही तर १९५४ ते ७३ या काळात वेगवेगळ्या चार नियतकालिकांतून ते प्रसिद्ध झाले होते आणि नंतर कोणाच्याच पाहण्यात आले नसावेत, अन्य कोणत्या नियतकालिकांनीही ते पुनर्मुद्रित केले नसावेत. कदाचित, मेहरुन्निसाभाभींच्या हातात ती कात्रणे उशिरा आली असावीत. मुंबईकर मुसलमान, महाराष्ट्रीय मुसलमान, भारतीय मुसलमानांचे अंतरंग, हिंदू-मुस्लिम संबंध हेच ते चार लेख. या चारही लेखांमध्ये दलवाईंच्या सुस्पष्ट विचारांची साखळी दिसते, ते चारही लेख परस्परांना पूरक वाटतात. या लेखांमधील विचारांची साखळी पुढे घेऊन जाणारे आणखी एक-दोन (असंग्रहित) लेख सापडले तर त्या सर्वांचे मिळून एक छोटे पुस्तक, करता येईल असे तेव्हाच ठरवले होते.
 आणि गेल्या महिन्यात मेहरुन्निसाभाभींनी आणखी काही कात्रणे राजेंद्र बहाळकर यांच्यामार्फत पाठविली, त्यात 'भारतीय मुस्लिम : एक कानोसा' हा असा लेख मिळाला, जो अद्याप कुठल्याही पुस्तकात समाविष्ट झालेला नाही, फारसा कोणाच्या पाहण्यात आलेला नाही. हा लेख १९७३ च्या मौज दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला असला, तरी मुळात १९६७ च्या उत्तर भारत दौऱ्यातील डायरीचा काही भाग आहे. 'मौज'मध्ये ही डायरी इतक्या उशीरा का प्रसिद्ध झाली हे कळावयास मार्ग नाही, पण दौऱ्याच्या कच्च्या नोंदी आहेत आणि नंतर लेखात रूपांतरित केल्या असे घडले असणे शक्य आहे.
 या डायरीवजा लेखाचे मध्यवर्ती सूत्र आधीच्या चार लेखांना जोडणारे आहे. म्हणून या पाच लेखांचे हे छोटे पुस्तक केले आहे. वस्तुतः हा पाचवा लेख 'इस्लामचे भारतीय चित्र' या १९८२ मध्ये आलेल्या पुस्तकात जायला हवा होता; परंतु त्या पुस्तकाच्या वेळी हा लेख कोणाच्याही लक्षात आला नसावा. पण हरकत नाही, या पुस्तकात तो अजिबात विसंगत वाटत नाही. उलट आनंदच आहे. कारण 'इस्लामचे भारतीय चित्र' आणि 'कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा' या दोन पुस्तकांतील अंत:प्रवाह इतके सारखे आहेत, की या पुस्तकांना जुळी भावंडं म्हणता येईल. दुःख इतकेच आहे की, हे पुस्तक छापायला जाणार होते त्याच आठवड्यात मेहरुन्निसाभाभींचा मृत्यू झाला.

संपादक, साधना / १५ जून २०१७