<poem> .... थांब ! अशानें थोडाच तूं ताळ्यावर येणार आहेस ! नुसत्या छडीनें नाहीं भागायचें - चांगला या चाबकानेंच तुला सडकला पाहिजे ! - चूप ! खबरदार ओरडशील तर ! आणलीस तापवलेली पळी ? ठीक. आण ती इकडे ! धर याला नीट, - अस्सा ! चांगला चरचरुन डाग बसला तोंडाला ! - रडूं दे, रडूं दे लागेल तितका ! काय ग, या त्रिंब्याला अक्कल तरी केव्हां येणार ? आतां का हा लहान आहे ? चांगला सहा वर्षाचा घोडा झाला आहे ! पण अजून कसें तें व्यवहारज्ञान नाहीं ! - नाहीं पण मी म्हणतों, कांहीं जरुर पडली होती मध्यें बोलण्याची याला ? मी इकडे गणपतरावांना सांगतों आहे कीं, तुमची दहा रुपयांची नोट पडलेली इथें कांहीं कोणाला सांपडली नाहीं म्हणून ! पण इतक्यांत आमचे हे दिवटे चिरंजीव आले ना ! आल्याबरोबर यानें त्या गृहस्थाला सांगितलें कीं, - तरी मी इकडे चांगला डोळ्यांनी दाबतों आहें ! - पण या गाढवाचें लक्ष असेल तर ! - म्हणे ' तुमच्या खिशांतून काल कागद पडला होता, तो किनई मी बाबांच्याजवळ नेऊन दिला ' - चूप बैस ! खोटें बोलतोस आणखी ? असें नाहीं तूं त्यांना म्हणालास ? - अग यानें सांगितल्याबरोबर, माझ्या जीवाची कोण इकडे त्रेधा ! मग कांहीं तरी आठवल्यासारखे केलें, मुद्दाम कागदपत्रांची दहापांच पुडकीं उलथी पालथी केलीं, अन् खिशांत असलेली नोट हळूच कशी तरी त्या गणपतरावांना काढून दिली ! - असा संताप आला होता त्या वेळेला या कार्ट्याचा ! - पण त्यांच्या देखत ' नेहमीं अशींच मला शहाणपणानें आठवण करीत जा बरें बाळ ! ' असें म्हणून ते जाईपर्यंत या त्रिंब्याची मला वरचेवर पाठ थोपटावी लागली ! कशी लक्ष्मी चांगली घरांत चालून आली होती ! - पण या कार्ट्यापायीं; - अरे कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ! - तें कांही नाहीं ! या पोरट्यांना उठतां बसतां नेहमीं सडकलेंच पाहिजे ! त्याशिवाय नाहीं यांना जगांतलें ज्ञान यायचें ! - स्वयंपाक झाला आहे म्हणतेस ? चला तर घ्या आटपून. चंडिकेश्वराच्या देवळांत लवकर मला गेलेंच पाहिजे ! आजपासून तिथें प्रख्यात काशीकरशास्त्री श्रीमदभगवद्गीतेवर पुराण सांगायला सुरुवात करणार आहेत ! चला तर लवकर ! - ' त्रिंब्या, थांबलें कीं नाही तुझें अजून रडणें ? का पाहिजे आहेत तडाखे आणखी ? '....


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.