केसरीची त्रिमूर्ति



डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

















© डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

प्रकाशक व मुद्रक
जयंत श्रीधर टिळक
केसरी मुद्रणालय
५६८ नारायण पेठ
पुणे ३०

प्रथमावृत्ति
ऑगस्ट १९७४

मूल्य २५ रुपये

मुखपृष्ठ : जोशी आर्ट्स








चि. वसंत गणेश
आणि
चि. सौ. काशी वसंत
यांस -












अ नु क्र म
विष्णुशास्त्री चिपळूणकर  १-१२०
१. चित्कळेचा स्पर्श ... 
२. आत्मप्रत्यय ... १२
३. स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश ... २०
४. एक पाय तुरुंगांत ... २७
५. तेजोवलयाचा भेद ... ३३
६. इंग्रजी विद्येचें वस्त्र ... ४०
७. मनावरचे दोन ताण ... ४७
८. अवनतीची मीमांसा ... ५५
९. क्ष-किरणें ... ६२
१०. इहवादी दृष्टिकोन ... ६९
११. टीकाकार विष्णुशास्त्री ... ७६
१२. चरित्रकार विष्णुशास्त्री ... ८८
१३. निबंधकार विष्णुशास्त्री ... ९५
१४. वाग्वैभव ... १०३
१५. व्यक्तिमत्त्व ... ११०
प्रिं. गोपाळ गणेश आगरकर  १२१-२०८
१. आगरकरांना हिंदुस्थान कसा दिसला ? ... १२७
२. व्यक्तिस्वातंत्र्य ... १४४
३. मनुष्यसुधारणेची मूलतत्त्वें ... १४९
४. सुधारणा - अग्रक्रम व मार्ग ... १५९
५. भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा ... १७०
६. प्राचीन परंपरेचा अनुभव ... १९६
७. व्यक्तिमत्त्व ... २०१
लो. बाळ गंगाधर टिळक  २०९-३४१
१. स्वराज्यांतील 'स्व'चा व्याप ... २१५
२. पाश्चात्य विद्या ... २२३
३. प्राचीन परंपरा ... २३३
४. धर्माचें पुनरुज्जीवन ... २४५
५. स्वराज्याचें राजनीति शास्त्र ... २५६
६. संघशक्तीची उपासना ... २७३
७. टिळकांचें राष्ट्रीय अर्थशास्त्र ... २८२
८. लो. टिळक व सामाजिक सुधारणा ... २९४
९. हिंदु-मुस्लिम वाद ... ३०५
१०. महाभूतसमाधि ... ३१५
११. सिंहावलोकन ... ३३२




प्रस्तावना

 १९५७ साली डिसेंबर महिन्यांत नागपूरला 'साहित्यांतून नवी सृष्टि' या विषयावर मीं तीन व्याख्यानें दिलीं होतीं. विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रिन्सिपॉल गोपाळ गणेश आगरकर व लो. बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या साहित्याच्या साह्याने भारतांत नवी सृष्टि कशी निर्माण केली हें त्या व्याख्यानांत मी विशद केलें होतें. त्या वेळी या तीन थोर पुरुषांचा 'त्रिमूर्ति' असाच मी उल्लेख केला होता.
 तेव्हापासून या त्रिमूर्तीच्या कार्याचें विवेचन व मूल्यमापन करणारा ग्रंथ लिहावा असें मनांत होतें. अनेक कारणांनी या मधल्या काळांत तें जमले नाही. 'इहवादी शासन' हा माझा ग्रंथ 'केसरी प्रकाशना'ने प्रसिद्ध केल्यानंतर हा विचार मनांत पुन्हा बळावला. निबंधमालेची जन्मशताब्दीहि पुढे दिसूं लागली, आणि नव्या स्वरूपांत उभविलेल्या टिळक- स्मारक मंदिराचे उद्घाटन होण्याचा योगहि याच वेळीं येत आहे हें दिसलें. म्हणून दीर्घकाळ मागे पडलेला हा ग्रंथ हातीं घ्यावा व तो पूर्ण करावा असें मी ठरविलें व केसरी प्रकाशनासाठी तो स्वीकारण्याची श्री. जयंतराव टिळक यांना विनंती केली. त्यांनी ती तत्काळ मान्य केली. मी लगेच लेखनास प्रारंभ केला, आणि आता वर्ष-सव्वा वर्षांत ग्रंथ पूर्ण होऊन प्रसिद्धहि होत आहे.
 या ग्रंथांत 'केसरी'च्या या तीन संस्थापकांच्या कार्याचें विवेचन व मूल्यमापन केलें आहे. तेंच त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचें चरित्र द्यावें हें नाही. दर विभागांत प्रारंभीं अगदी त्रोटक पद्धतीने त्यांच्या चरित्राची रूपरेषा दिली आहे; पण कालाचा संदर्भ ध्यानांत यावा एवढाच त्यांत हेतु आहे. त्यांच्या चरित्राची माहिती द्यावी हा नाही, आणि त्याची जरुरीहि नाही. त्यांची चरित्रे अनेकांनी लिहिलेलीं आहेत. अजूनहि कोणी लिहीत आहेत; आणि महाराष्ट्रांत आबालवृद्धांना तीं आता पाठ झालेली आहेत. या तीन थोर पुरुषांनी हिंदी राष्ट्राची जडणघडण कशी केली तें नव्याने विशद करणें मात्र अवश्य होतें. आणि म्हणून तें उद्दिष्ट मनापुढे ठेवूनच हा ग्रंथ लिहिला आहे.
 ग्रंथांत जागोजागीं, पावलोपावलीं त्रिमूर्तीच्या ग्रंथांतून, लेखांतून अवतरणें दिलीं आहेत. शक्यतोंवर त्यांचे शब्दच द्यावे, असें धोरण ठेवले आहे. पण विस्तारभयामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या लेखनाचा भावार्थ दिला आहे. त्यांचे शब्द जसेच्या तसे दिलेले नाहीत. अभ्यासकांनी संदर्भ पाहतांना एवढें ध्यानांत ठेवावें अशी विनंती आहे.
 असल्या महागाईच्या व कागदटंचाईच्या दिवसांत श्री. जयंतरावांनी माझा ग्रंथ प्रकाशनार्थ स्वीकारला याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. लेखन चाल असतांना अनेक मित्रांशीं मी नित्य चर्चा करीत असे. त्या चर्चेचा मला अतिशय उपयोग झाला. या मित्रांचा मी फार आभारी आहे. माझें लेखन आज जवळ जवळ चाळीस वर्षे चालू आहे. एवढ्या अवधींत पुण्याच्या ग्रंथालयांनी मला ग्रंथांची कधीहि वाण पडूं दिली नाही. स. प. महाविद्यालयाचे ग्रंथालय, केसरी-मराठा ग्रंथालय, भारतीय संस्कृति कोशाचें ग्रंथालय, पुणे विद्यापीठ, गोखले इन्स्टिट्यूट यांची ग्रंथालये या सर्वांनी मला नेहमी मुक्तद्वार ठेविलें आहे. त्यांच्या या सहकार्यावांचून मला इतकें लेखन करतां आलें नसतें. या सर्व संस्थांतल्या ग्रंथपालांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
 ग्रंथाची छपाई शुद्ध व सुंदर व्हावी यासाठी केसरी- छापखाना विभागांतील श्री. भास्करराव कुलकर्णी स्वतः अतिशय काळजी घेतात. ग्रंथ सर्वांगसुंदर झाला याचें श्रेय सर्वस्वी त्यांना आहे.
 १८७० ते १९२० हें अर्धशतक म्हणजे केसरीच्या त्रिमुर्तीच्या कर्तृत्वाचें अर्धशतक होय. लोकशाही व राष्ट्रनिष्ठा या देशांत रुजविण्याचें कार्य त्या अवधीत या थोर पुरुषांनी कसें केलें याचा तरुण पिढीने बारकाईने अभ्यास केला तर सध्याच्या आपत्काळी तरुणांना निश्चित मार्गे सापडेल. त्या अभ्यासासाठी या ग्रंथाचे त्यांना साह्य होईल अशी आशा वाटते

- पु. ग. सहस्रबुद्धे

विषयप्रवेश
नवभारताची निर्मिति

पाश्चात्त्य विद्या
 सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पेशवाईचा अस्त झाला व भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. इंग्रजांनी या देशांत पाश्चात्य विद्यांचा प्रसार केल्यामुळे गेल्या शतकांत येथे एक अभूतपूर्व क्रांति घडून आली व नवभारताचा जन्म झाला. त्यापूर्वीच्या हजार वर्षांत भारतांत असें परिवर्तन कधीच झाले नव्हतें. त्या कालखंडांत शब्दप्रामाण्य, विषमता, निवृत्ति, दैववाद अशी समाजघातक तत्त्वें धर्मशास्त्रज्ञांनी उपदेशिली, आणि समाजाने तीं अंगीकारिली होती. त्यामुळे हिंदु समाज विघटित झाला व स्वसंरक्षणाला असमर्थ होऊन बसला. मुसलमानी सत्तेचा निःपात करून हिंदूंनी शेवटी हिंदुपदपातशाहि स्थापिली हें खरें; पण पाश्चात्य लोकांच्या आक्रमणाला ते तोंड देऊ शकले नाहीत. भौतिक ज्ञानाची अवहेलना, कूपमंडूक वृत्ति, समुदगमननिषेध यांमुळे हिंदु समाज लुळापांगळा होऊन गेला होता; त्याच्यांत चैतन्य असे राहिलेच नव्हते. त्यामुळे तो इंग्रजांच्यापुढे पराभूत झाला आणि भारताच्या कपाळीं पारतंत्र्य आलें. पण त्यानंतर जी पाश्चात्त्य विद्या या देशांत प्रसूत होऊ लागली तिच्या प्रभावाने येथल्या समाजधुरीणांना नवी दृष्टि प्राप्त झाली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हा समाज पुन्हा जिवंत होऊं लागला. एका शतकाच्या आंतच त्याचा विलक्षण कायाकल्प झाला, आणि नवभारताचा जन्म झाला.
शिल्पकार
 नवभारताच्या निर्मितीचें हें महत्कार्य करणारे जे थोर पुरुष गेल्या शतकांत महाराष्ट्रांत होऊन गेले त्यांत विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रिन्सिपॉल गोपाळ गणेश आगरकर व लो. बाळ गंगाधर टिळक यांचें स्थान फार मोठें आहे. केसरीची त्रिमूर्ति ती हीच होय. ही त्रिमूर्तीच नवमहाराष्ट्राची व नवभारताची शिल्पकार होय. मात्र या तीन थोर पुरुषांनी जें कार्य केलें, जी क्रांति भारतांत घडवून आणली तिची पूर्व-तयारी राममोहन राय, दादाभाई, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे यांनी आधी करून ठेवली होती. कोणत्याहि क्रांतींत नव्या तत्त्वज्ञानाची, समाजरचनेच्या नव्या मूलतत्त्वांची, आवश्यकता असते. त्या तत्त्वांचा मनाशी निश्चय करून समाजांत त्यांचा प्रसार धैर्याने व दृढनिश्चयाने सतत करावा लागतो. हाच क्रांतीचा पाया होय; त्यावरच नवसमाजाचें शिल्प उभारलें जातें. भारतीय समाजांत सर्वांगीण क्रांतीची अशी पायाभरणी करणारे पहिले थोर पुरुष म्हणजे राजा राममोहन राय हे होत. पाश्चात्त्य विद्येचा प्रसार प्रथम बंगालमध्ये झाल्यामुळे नवविचारांचा उदय प्रथम त्याच प्रदेशांत झाला. राममोहन राय यांनी प्रथम रूढ हिंदु धर्मावर अत्यंत प्रखर टीका करण्यास प्रारंभ केला; कारण धर्मक्रांति झाल्यावांचून, विकृत धर्म-कल्पनांपासून समाज मुक्त झाल्यावांचून, येथे दुसरी कसलीहि क्रांति होणें शक्य नव्हतें. त्या वेळीं समाजावर सर्वंकष अशी धर्माची सत्ता होती. व्रतेंवैकल्यें, उद्यापनें हे सर्वं कर्मकांड, मायावाद शिकविणारी निवृत्ति, बुद्धिनाश करणारें ग्रंथप्रामाण्य, समष्टि-भावना मुळांतच खुडून टाकणारा जातिभेद, स्त्रीचें दास्य व त्यांतून निर्माण झालेली सतीची दुष्ट, रानटी चाल, हीं सर्व हिंदु धर्माच्या विकृतीचीं लक्षणें होत, असें राममोहन याचें मत होतें ; म्हणून धर्मसुधारणेसाठी त्यांनी ब्राह्म समाजाची स्थापना करूनं आपल्या लेखांतून, पत्त्रांतून व व्याख्यानांतून धर्माच्या या विकृतीवर सतत भडिमार चालू ठेवला होता; आणि त्याच वेळीं भौतिक विद्यांची उपासना या देशांत व्हावी, असे प्रयत्न त्यांनी चालविले होते. लॉर्ड बेकन याच्या काळापासून ज्या भौतिक दृष्टिकोनाचा अवलंब युरोपने केला त्याच दृष्टिकोनाचा अवलंब करून भारताने आधुनिक भौतिक व सामाजिक शास्त्रांचें अध्ययन केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. तो मानून भारतीय समाजधुरीणांनी अनन्यभक्तीने या पाश्चात्य विद्यांची उपासना केली, म्हणूनच त्यांना भारतांत सर्वांगीण क्रांति घडविणें शक्य झालें.
 ही क्रांति घडविण्यासाठी केसरीच्या त्रिमूर्तीने जें कार्य केलें त्याचें विवेचन आपल्याला पुढील प्रबंधांत करावयाचें आहे; पण त्यापूर्वी पेशवाईच्या अंतापर्यंत भारतीय समाजाची स्थिति कशी अवनत झाली होती आणि ती सुधारण्यासाठी त्यांच्या आधीच्या समाजधुरीणांनी कसे प्रयत्न केले होते, त्याचें धोडक्यांत समालोचन करणें अवश्य आहे.
मानवत्वाची प्रतिष्ठा
 गेल्या शतकाच्या पूर्वार्धात या देशांत पाश्चात्य संस्कृतीच्या आगमनामुळे जें तात्त्विक विचारमंथन सुरू झालें त्यांतून जीं अनेक तत्त्वरूप रत्नें निघाली त्या रत्नांतील अत्यंत श्रेष्ठ रत्न म्हणजे 'मानवत्वाची प्रतिष्ठा' हे होय. १८५० च्या पूर्वी अनेक शतके आपल्या देशांत जीं समाजबंधनें रूढ होतीं त्यांचें परीक्षण केलें तर असे दिसून येतें की, त्या बंधनांच्या प्रणेत्यांना मानवी जीवनाची प्रतिष्ठा मान्य तर नव्हतीच, पण ती त्यांना ज्ञातहि नव्हती. त्या काळी भारतीय समाजांतील सर्व जातींमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या सर्व क्षेत्रांतील व्यवहारावर जी अनंत बंधने होतीं, त्यांचा नुसता विचार सुद्धा आज आपल्याला दुःसह वाटतो. स्नानाविषयी नियम, भोजनाविषयी नियम, शौचाविषयी नियम, मुखशुद्धीविषयी नियम, झोपण्यासंबंधी निर्बंध उठण्यासंबंधी निर्बंध, कपड्यांसंबंधी निर्बंध; जन्माच्या आधीची बंधने, मरणानंतरची बंधनें, तिथि, वार, नक्षत्रें, मास यांविषयीची नियंत्रणें, विवाहविषयक आज्ञा, जातिभेदविषयक आज्ञा, परस्परव्यवहाराविषयी आज्ञा; प्रवास, परदेशगमन, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, स्पर्श यांचे विधिनिषेध- हे सर्व निर्बंध आणि त्यांचा अल्पसा भंग झाला असतां घ्यावयास सांगितलीं शेकडो प्रायश्चित्तें, हीं मानवी प्रतिष्ठेला उपमर्दकारक आहेत; मानवाच्या व्यक्तित्वाचा त्यामुळे अवमान होतो आणि त्या बंधनांच्या प्रणेत्यांची मानवाबद्दलची तुच्छता-बुद्धि स्पष्ट होते. असल्या समाजांत कोणत्याहि प्रकारचें कर्तुत्व निर्माण होणें कालत्रयी शक्य नाही. समाजाचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी कांही बंधने आवश्यक आहेत; पण त्या बंधनांना कांही तर्काचा, उपयुक्ततेचा, सद्हेतूचा पाठिंबा असला पाहिजे. तो पाठिंबा जेव्हा नसतो आणि धर्मसिंधु, निर्णयसिंधु ह्या ग्रंथांतल्याप्रमाणे ही बंधनें जेव्हा हेतुशून्य, अर्थशून्य, तर्कशून्य व केवळ धर्माज्ञेवर आधारित अशी असतात, तेव्हा ती मानवी प्रतिष्ठेला अत्यंत घातक ठरतात. या बंधनांनी मानवाचें मानवत्व संपुष्टात येते. एखाद्या सुतावर पाय पडला, एखादा पाण्याचा थेंब अंगावर पडला, कोणाची सावली अंगावर पडली, कसल्या तरी धान्याचा कण पोटांत गेला किंवा नुसता कोणाचा शब्द कानावर आला तरी तेवढ्यामुळे मनुष्य पतित ठरावा, अमंगळ ठरावा आणि त्याबद्दल त्याला प्रायश्चित्त घेणें भाग पडावें, अशा प्रकारच्या धर्माज्ञा प्रचलित करणाऱ्यांच्या मनांत मानवी जीवनाच्या मूलभूत महत्त्वाची किती जाणीव असेल, तें सहज कळून येईल. मानव म्हणचे त्याची बुद्धि, त्याचें मन, त्याचा आत्मा, त्याच्या निष्ठा, त्याची श्रद्धा, त्याची विचारसरणी, त्याच्या आशाआकांक्षा हा सर्व जगांतल्या तत्त्ववेत्त्यांना मान्य असलेला सिद्धान्त भारतांतल्या जुन्या शास्त्री पंडितांनी पायदळी तुडविला होता. त्यांच्या मतें मानव म्हणजे त्याचा देह, त्याचें जड शरीर. "मनुष्य म्हणजे मनुष्याचा आत्मा; देह नव्हे; देह म्हणजे मी, अशी भावना ठेवल्यामुळे मनुष्य मोक्षाला अपात्र ठरतो." अशा प्रकारचें आध्यात्मिक तत्त्वज्ञान एका तोंडाने सांगणाऱ्या धर्मवेत्त्यांनी दुसऱ्या तोंडाने मानवाला जो धर्म सांगितला तो केवळ त्याचा जड देहच विचारांत घेऊन सांगावा, आणि नुसत्या स्पर्शाने किंवा सावलीने त्याला पतित मानण्यास प्रवृत्त व्हावें, यापरता दुसरा अधःपात तो काय !
जुनी घातक तत्त्वें
 ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळांत येथे समाजरचनेचीं जीं तत्त्वें मान्य व रूढ झाली होतीं त्यांतील जवळ जवळ प्रत्येक तत्त्व मानवी प्रतिष्ठेला घातक असेंच होतें. कलियुगाची कल्पना, नियतिवाद, संसाराची उपेक्षा, तर्काची अवहेलना, जन्मनिष्ठ उच्चनीचता, शब्दप्रामाण्य हीं तत्त्वें व्यक्तीच्या स्वत्वाची पायमल्ली करणारी आहेत; आणि हिंदूंचा आचारधर्म, त्यांचें सर्व कर्मकांड त्यांच्याच आधाराने उभारलेलें आहे. असल्या हीन धर्माचे जे अनुयायी त्यांच्यांत मानवी कर्तृत्वाचा निदर्शक असा कोणताच गुण निर्माण होणें शक्य नव्हतें. पाश्चात्त्य विद्येमुळे ज्यांना नवी दृष्टि प्राप्त झाली त्या सर्व पंडितांना हीच भयावह गोष्ट प्रथम जाणवली; आणि त्यांनी पहिला घण त्या कर्मकांडप्रधान, विवेकहीन, जडधर्मावरच घातला. मानवाला देहप्रधान मानून सांगितलेला हीन व अपवित्र असा आचार-धर्म नष्ट करून, त्याच्या जागीं मनाची, बुद्धीची, आत्म्याची प्रतिष्ठा वाढविणारा तात्त्विक धर्म प्रस्थापित करणें हे त्यांचें उद्दिष्ट होतें. धर्म म्हणजे मनोजय, आत्मसंयमन; धर्म म्हणजे भूतदया, परोपकार, प्रेम, भक्ति होय, हा महनीय विचार त्यांना प्रसृत करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी वेद, उपनिषदें, गीता ह्या आपल्या धर्म-ग्रंथांचा आधार घेतला. मध्ययुगांत रूढ झालेलें धार्मिक कर्मकांड म्हणजे मूळ धर्म-वृक्षावर माजलेलें बांडगुळ आहे; धर्म ही मुख्यतः मानसिक उन्नति आहे; आणि तिच्यासाठी विवेक, बुद्धि, तर्क, यांचाहि उपयोग श्रद्धा व भक्ति यांच्याबरोबर झाला पाहिजे हा विचार राममोहन, लोकहितवादी, दयानंद इत्यादि धर्मसुधारकांनी लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला.
 राजा राममोहन राय यांचा मूर्तिपूजेला विरोध होता; कारण मूर्तिपूजेमुळे समाजाला बौद्धिक दास्य येतें, त्याला परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाचा विसर पडतो आणि तो अनेक वेडगळ आचारांना व रूढींनाच धर्म मानूं लागतो असें त्यांचें म्हणणें होतें. म्हणूनच त्यांनी ब्राह्म-समाजाच्या स्थापनेच्या वेळीं मूर्तिपूजेचा त्याग करून निर्गुण परमेश्वराची उपासना करण्याचा उपदेश केला. त्यांना समाजांतील बाह्य विधिविधानांचे मूळच उपटून काढावयाचें होतें, म्हणून त्यांनी मूर्तिपूजेचा निषेध केला. त्याचप्रमाणे त्यांनी वेदान्ताला प्रवृत्तिपर स्वरूप देऊन निवृत्तिपर समाजाला कर्मप्रवण बनविण्याचाहि प्रयत्न केला.
खरा धर्म
 अमूर्त परमात्म्याचें ध्यान व मनन करणें हाच ईश्वरपूजेचा प्रशस्त मार्ग होय, असे मत लोकहितवादी यांनीहि प्रतिपादिले आहे. नीतीवरहि त्यांनी भर दिला आहे. नीति, सदाचार, परोपकार, भूतदया, मनोनिग्रह, क्षमा, शांति, ज्ञानदान याला ते खरा धर्म मानतात. व्रतवैकल्यें, उपासतापास, मंत्रतंत्र हीं निरर्थक कर्मे व दांभिक आचार यांमुळे नीति नष्ट झाली आहे, याचे त्यांना फार दुःख होत असे. त्यांनी आपल्या शतपत्रांत रूढ धार्मिक कर्मकांडावर प्रखर टीका केली असून, खरा धर्म कोणता त्याचें स्पष्ट विवेचन केले आहे.
प्रार्थनासमाज
 डॉ. भांडारकर व न्या. रानडे हे प्रार्थनासमाजाचे थोर आचार्य होते. ते अव्यक्त परमात्म्याची उपासना करीत असले व मूर्तिपूजेच्या विरुद्ध असले तरी, ते परमेश्वराला सगुण मानीत. मात्र त्यांनी देवपूजेबरोबर रूढ झालेल्या अनिष्ट आचारांचा निषेधच केला आहे. कारण त्यामुळे देवाची केवळ विटंबना होते, आणि लोक प्रपंचकदमांत रुतून पडतात, असें त्यांचें मत होतें.
समता
 मानवाची प्रतिष्ठा जागृत करण्यासाठी गेल्या शतकांतील सुधारकांनी त्या प्रतिष्ठेचा पहिला शत्रु जो अंध आचारधर्म त्यावर प्रथम टीकास्त्र सोडलें, हें आपण पाहिले. त्या आचारधर्माइतकीच आपल्या समाजरचनेच्या बुडाशीं असलेली जन्मनिष्ठ उच्चनीचता मानवी प्रतिष्ठेला विघातक आहे, ती विषमता नष्ट करून समतेच्या पायावर समाजाची पुनर्घटना केली पाहिजे, हा विचार राजा राममोहन राय यांनीच प्रथम सांगितला. मात्र त्या क्षेत्रांत त्यांनी जोराची चळवळ केली नाही. ती पुढे केशवचंद्र सेन यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. त्यांनी ब्राह्मसमाजामार्फत अनेक भिन्नजातीय विवाह घडवून आणले व त्यांना मान्यता मिळावी म्हणून १८७२ सालीं सरकारकडून तसा कायदाहि करवून घेतला.
 जातिभेदाचा नाश करण्याचा पहिला प्रयत्न महाराष्ट्रांत दादोबा पांडुरंग यांनी केला. १८५० साली त्यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेंत सर्व जातींच्या व धर्माच्या लोकांना प्रवेश असे. सभासद होतांना प्रत्येकाला प्रथम 'मी जातिभेद मानणार नाही' अशी प्रतिज्ञा करावी लागे. पण त्या सभेचें काम गुप्तपणे चाले. त्यामुळे दादोबांच्या प्रयत्नाला व्यापक स्वरूप आलें नाही.
 जन्मनिष्ठ विषमतेवर लोकहितवादींनी केलेला भडिमार त्या काळांत अपूर्वच मानला पाहिजे. त्यांतहि त्यांनी एकंदर ब्राह्मण जातीवर हत्यार धरल्यामुळे, त्या समाजाची दृष्टि अंतर्मुख होऊन त्याला आत्मनिरीक्षणाचें बाळकडूच मिळालें. गेल्या शंभर-दीडशे वर्षांत इतर जातींनी ब्राह्मणांना जितक्या शिव्या दिल्या, त्यांपेक्षा किती तरी जास्त शिव्या ब्राह्मणांनीच स्वजातीला दिल्या आहेत. समाजांत जागृति कायम राहण्यासाठी अशा तऱ्हेचें कठोर आत्मपरीक्षण अवश्यच असतें व त्यांचें श्रेय लोकहितवादींना दिलें पाहिजे. "जे ब्राह्मण ज्ञानशून्य आहेत, ते कैकाड्यासारखे असून, कैकाडी सुधारले तर ब्राह्मणांसारखेच मानावे" म्हणजेच ज्याच्या त्याच्या गुणकर्मावरून वर्ण ठरवावा, असें त्यांनीं प्रतिपादिले आहे. "ब्राह्मणांनी आपल्या मूर्ख समजुती सोडून देऊन लोकांस सारखें मानून विद्या शिकण्याचा हक्क सर्वांना आहे, हें त्यांनी कबूल करावें,-", असा उपदेश त्यांनी केला आहे.
 लोकहितवादींच्याइतकेंच समतेचें आग्रहाने प्रतिपादन करणारे दुसरे गृहस्थ म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी हे होत. साम्यवादाचा पुरस्कार करून त्यांनी समतेची पराकोटी गाठली. "प्रजा हें एक कुटुंब आहे, असें मानून सर्वांनी कष्ट करावे व त्या कष्टांनी निर्माण झालेलें धन राज्याच्या कोठारांत भरूत ठेवावें व सर्व गावकऱ्यांच्या पोटास लागेल तसें द्यावें ", अशी व्यवस्था त्यांनी सांगितली आहे. "जातिभेद, मूर्तिपूजा व धर्माचीं ढोंगें यांचा नाश केला पाहिजे. गुणांवरून वर्ण व जाति ठरविल्या पाहिजेत", असे त्यांचें मत होतें.
सत्यशोधक समाज
 विषमता नष्ट करून समतेची प्रस्थापना करण्याचे गेल्या शतकांत जे प्रयत्न झाले, त्यांत म. ज्योतिराव फुले यांच्या उद्योगाचे महत्त्व विशेष आहे, कारण ते बहुजन समाजांतले होते. दलित समाजाचा आत्मप्रत्यय शेकडो वर्षांच्या संस्कारांमुळे नाहीसा झालेला असतो; आपण खरोखरच हीन आहों, अशी त्याच्या मनाची भावना झालेली असते. अशा वेळीं त्या समाजांतला व त्याचा अभिमान बाळगणारा कार्यकर्ता पुढे सरसावताच त्या समाजाच्या मनाचें मालिन्य नष्ट होतें व अन्यायाचा प्रतिकार करण्यास तो सिद्ध होतो. स्वजनांचा विरोध सोसूनहि ज्योतिबांनी अस्पृश्यांची शाळा चालविली व त्यांच्यासाठी स्वतःच्या घरापुढचा पाण्याचा हौद खुला केला. सत्यशोधक समाजाची स्थापना हें त्यांचे खरें सामाजिक कार्य होय. विषमतेवर आधारलेल्या वर्णजातिव्यवस्थेविरुद्ध खेड्यापाड्यांतील खालच्या वर्गांत असंतोष निर्माण करण्याचें मोठें कार्य त्या समाजाने केलें.
आर्यसमाज
 स्वामी दयानंदांनी स्थापन केलेल्या आर्यसमाजाने पंजाबांत समतेच्या दृष्टीने जें कार्य केलें, त्यालाहि फार महत्त्वाचे स्थान आहे. वेदपठणाचा अधिकार सर्व हिंदूंना आहे, हें तत्त्व प्रसृत करून, या समाजाने त्या अन्वये मागसलेल्या व अस्पृष्ट जातींनाहि समाजांत सामील करून घेतलें, आणि सर्व जातींत शिक्षणाचा प्रसार करून, त्यांच्यांत रोटीबेटी व्यवहार सुरू केला.
 कोणत्याहि प्रकारची विषमता ही समाजाला घातकच ठरते; पण त्यांतल्या त्यांत जातिभेदामुळे आलेली विषमता ही समाजाचें सर्व कर्तृत्वच नष्ट करून टाकते; कारण अशा समाजांत हीन जातीच्या लोकांना पराक्रम करण्यास स्फूर्ति येणेंच शक्य नसतें. आपण जें कर्तृत्व दाखवूं, त्याचें पुरेपूर फल आपल्याला मिळेल, ही खात्री असेल तरच मनुष्य श्रम करण्यास उद्युक्त होतो. गुणांप्रमाणे समाजांत स्थान निश्चित मिळेल ही भावना कर्तृत्वाची प्रेरणा देते. हीन गणलेल्या जातींना विषम समाजव्यवस्थेंत वरचें स्थान मिळण्याची कधीच शक्यता नसते, उत्कर्षाची संधि त्यांना मिळत नाही, म्हणून त्यांचे कर्तृत्व कुजत पडतें. म्हणूनच जातिभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नाचें महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
स्त्री-जीवन
 अंध आचारधर्म आणि विषम समाजारचना यांचे हीन जातींवर जसे अनिष्ट परिणाम होतात, तसेच स्त्रीजीवनावरहि अनिष्ट व घातक परिणाम होतात. स्त्रियांना अशा समाजांत जवळ जवळ शून्य प्रतिष्ठा असते. जुन्या धर्माने व रूढींनी स्त्रियांवर जीं असंख्य जाचक बंधने लादली होतीं, त्यांवरून सनातन धर्मशास्त्रकार स्त्रीला एक मानवी व्यक्ति मुळीच मानीत नव्हते, असें स्पष्ट दिसतें. पति मरण पावतांच पत्नीने सती गेलें पाहिजे, त्याच्या चितेंत स्वतःला जिवंत जाळून घेतलें पाहिजे, असें सांगणारा धर्म आणि स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध सक्तीने चितेत लोटण्याची रूढि यांच्या अधमपणाला व दुष्टपणाला सीमाच नाही. एखादी स्त्री पूर्णपणें स्वेच्छेने व केवळ पतिप्रेमामुळे जरी सती जात असली तरी, तिची ही कर्तव्यबुद्धि तामसच मानावी लागेल. स्त्रीस्वातंत्र्याच्या दृष्टीने 'सती' हा कोणत्याहि स्वरूपांत अधर्मच ठरतो. सतीच्या चालीप्रमाणेच पडदा-पद्धति, बालविवाह, विधवाविवाहबंदी केशवपन, स्त्रीशिक्षणाला विरोध ह्या सर्व नियमनांच्या मागे स्त्रीविषयीची तुच्छताच दिसून येते. या विकृत बुद्धीमुळेच त्या काळी स्त्रीच्या जीवनाला स्वतंत्र अर्थच राहिला नव्हता. स्त्री ही केवळ पुरुषाची पडछाया होती, संसाराचें एक साधन होती, भोगदासी होती. तिच्या मनाचा विचार न करतां तिच्या जड देहावर अनेक बंधनें घालण्यांत आली होती. पुरुषांवर मात्र तशी बंधने नव्हती.
 गेल्या शतकांतील समाजसुधारकांनी जातीय विषमतेविरुद्ध जशी मोहीम सुरू केली तशीच स्त्री-पुरुषविषमतेविरुद्ध हि तितक्याच निकराने चळवळ केली. राजा राममोहन राय यांनी सतीची चाल बंद करावी म्हणून लॉर्ड बेंटिककडे जो अर्ज केला होता त्यांत, शास्त्राच्या दृष्टीने किंवा सारासार विचाराने, कसेंहि पाहिलें तरी, सती म्हणजे स्त्रीचा खूनच होय, असें मत दिलें होतें. त्यांनी स्त्रीला दास्यांत ठेवणाऱ्या सर्वच रूढींविरुद्ध चळवळ सुरू केली होती; पण त्यांत त्यांना फारसें यश आलें नाही. सतीची चाल कायद्याने बंद झालेली पाहण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले.
 स्त्रीदास्य नाहीसे करण्यासाठी पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी जे प्रयत्न केले त्यांना फार महत्त्व आहे. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी चाळीस शाळा काढल्या; आणि सर्व बंगालभर स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला. त्याचप्रमाणे त्यांनी विधवाविवाहाची चळवळ करून १८५६ साली विधवा-विवाहाचा कायदा सरकारकडून करून घेतला. ब्राह्म-समाजाचे पुढारी केशवचंद्र सेन यांनीहि स्त्री-स्वातंत्र्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करून, त्यांत बरेंच यश मिळविलें.
 महाराष्ट्रांत १८५१ सालीं फुले यांनी पुण्याला मुलींची शाळा सुरू केली. विष्णुशास्त्री पंडित यांनी जुन्या शास्त्राचें मंथन करून त्यांतून विधवा-विवाहाला शास्त्राधार काढला व त्यासाठी महाराष्ट्रांत मोठी चळवळ केली व स्वतः पुनर्विवाहहि केला.
 लोकहितवादींनी स्त्रीजीवनाविषयी अनेक क्रांतिकारक विचार सांगितले आहेत. स्त्रियांना पुरुषासारखेच सर्व क्षेत्रांत अधिकार असावेत, स्त्रीचा विवाह प्रौढपणी व्हावा, एवढेच नव्हे तर खरें म्हणजे तिचें स्वयंवर व्हावें हेंच प्रशस्त होय, असें त्यांनी प्रतिपादिले आहे; आणि या सुधारणांच्या आड धर्मशास्त्र येत असेल तर त्यास बाजूस सारून सुधारणा केली पाहिजे, असा स्पष्ट उपदेशहि त्यांनी अनेक ठिकाणी केला आहे.
 भांडारकर, रानडे, स्वामी दयानंद, त्यांचे शिष्य लाला हंसराज, गुरुदत्त विद्यार्थी, लाला लजपतराय ह्या थोर नेत्यांनीहि स्त्री-शिक्षण, प्रौढ विवाह, व स्त्रियांचें आर्थिक स्वातंत्र्य यांसाठी अखंड परिश्रम करून लोकमताला नवीन वळण लावलें. दयानंदांच्या 'सत्यार्थप्रकाशांत' बाल-विवाहाचा निषेध केलेला असून विधवा-विवाहास

अनुमति दिलेली आहे.
भौतिक ज्ञान
 ह्या सर्व सुधारणांचा पाया म्हणजे भौतिकज्ञान हा होय. समाजांतली विषमता नष्ट करण्यासाठी, घातक रूढींच्या बंधनांतून त्याला मुक्त करण्यासाठी समाजांत भौतिक ज्ञानाचा प्रसार केला पाहिजे, त्या ज्ञानावांचून समाजाची उन्नति होणें शक्य नाही, याविषयी या भारतीय समाजसुधारकांच्या मनांत मुळीच संदेह नव्हता. म्हणूनच त्या ज्ञानासाठी त्यांनी अट्टाहास चालविला होता. १८२३ साली सरकारने शिक्षण-प्रसारासाठी कांही रक्कम मंजूर केली; पण तिचा विनियोग व्याकरण, वेदान्त, न्याय वगैरे जुनीं शास्त्र शिकविणाऱ्या संस्कृत पाठशाळेसाठी करण्याचें ठरविलें. त्या योजनेला राममोहन राय यांनी विरोध केला व "ती रक्कम पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारासाठीच खर्च केली जावी", असा अर्ज केला. त्या अर्जांत, "गणित, रसायन, शरीरशास्त्र इत्यादि ज्या शास्त्रांना पूर्णत्वास नेल्यामुळे युरोपियन राष्ट्र जगाच्या पुढे गेलीं तीं शास्त्रे आम्हांस शिकवावी; जुनें व्याकरण किंवा तत्त्वज्ञान यांचा समाजाला कांही उपयोग नाही, येथे उणीव आहे ती भौतिक विद्येची आहे", असे विचार त्यांनी सांगितले आहेत. यावरून ग्रंथप्रामाण्याचे युग संपून अनुभवगम्य व बुद्धिगम्य ज्ञानाचे युग सुरू व्हावें याविषयी राममोहन यांना किती तळमळ लागून राहिली होती, तें दिसून येतें.
 लोकहितवादींना समाजांतील अज्ञानाबद्दल फारच संताप येत असे; कारण येथल्या पढिक विद्वानांना, शास्त्री पंडितांना नवीन जगाची मुळीच माहिती नव्हती. ज्ञान मिळविण्याचा प्रयत्नच त्यांनी केला नाही. उलट अज्ञानांत त्यांना भूषण वाटे. आपले जुने ग्रंथ हेच त्यांना सर्वश्रेष्ठ वाटत होते. आणि त्यांचें पाठांतर हीच त्यांची विद्या होती. त्यासाठीच लोकहितवादींनी त्यांना बैल, टोणपे अशा शिव्या दिल्या आहेत. पुराणांनी भारताला दैववाद, शब्दप्रामाण्य व जगाविषयी भ्रांत कल्पना शिकविल्या, असें त्यांचें मत होते. या शब्दप्रामाण्यावर व अंधश्रद्धेवर त्यांनी प्रखर टीका केली आहे. हिंदु लोकांची सुधारणा व्हायची तर त्यांना मुख्य म्हणजे विद्या हव्या; पण त्या विद्या पुराणांतल्या नव्हे, तर पाश्चात्त्य भौतिक विद्या. समाजाच्या पायांतल्या सप्तशृंखला तोडल्या पाहिजेत, हा विचार लोकहितवादींनी शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी सांगितला, यांतच त्यांचें असामान्य मनोधैर्य दिसून येतें.
 दादोबा पांडुरंग यांनीहि महाराष्ट्रांत याच तऱ्हेचे विचार प्रसृत केले. भौतिक ज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी 'स्टूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी' ही संस्था दादाभाईंच्या सहकार्याने १८४८ साली काढली. या संस्थेच्या मराठी शाखेचे ते अध्यक्ष होते व दादाभाई नौरोजी हे गुजराती शाखेचे अध्यक्ष होते. इंग्रजी राज्यांत हिंदी लोकांचा व्यापार बुडाला व प्रजा निर्धन झाली याचें कारण, दादोबांच्या मतें, लोकांचें अज्ञान व विद्यारहितपणा हें होतें. भौतिक शास्त्रांचा अभ्यास करणें, विद्या व कला यांचें ज्ञान संपादन करणें, हाच उत्कर्षाचा उपाय म्हणून त्यांनी सांगितला आहे.
 न्या. मू. रानडे हे गेल्या शतकांतील या समाजधुरीणांचे अग्रणी होत. अलौकिक प्रज्ञा, बुद्धिमत्ता, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्य अशा अनेक गुणांनी ते संपन्न होते. मानवी प्रतिष्ठेचें पुनरुज्जीवन हें त्यांच्या सर्व सुधारणेचें आदि-सूत्र होतें. "आपल्या अधःपाताचें मूळ कारण म्हणजे आपणावरची सर्व बंधनें ही विवेकबंधने नसून तीं बाह्य व जड बंधनें आहेत, हें होय. त्यामुळे आपलीं मनें बाल्यावस्थेतच राहिली. स्वयंशासन व आत्मसंयमन यांमुळे येणारी मानवी प्रतिष्ठा आपल्याला आलीच नाही." हे त्यांचे उद्गार प्रसिद्धच आहेत. समाजजीवनाचें असें एकहि क्षेत्र नाही, की ज्याचें पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. लो. टिळकांनी म्हटल्याप्रमाणे, मुतवत् झालेल्या, थंड गोळा झालेल्या महाराष्ट्राला त्यांनीच प्रथम सचेतन केलें, आणि त्याला उत्कर्षाचा मार्ग आखून दिला. यामुळेच नवभारताच्या निर्मितींत त्यांचें श्रेय फार मोठें आहे.
 अशा रीतीने केसरीच्या त्रिमूर्तीने आपल्या कार्याला प्रारंभ करण्यापूर्वीच या देशांत क्रांतीचें तत्त्वज्ञान सांगितलें गेलें होतें. त्यांना ज्या राष्ट्र-मंदिराची उभारणी करावयाची होती त्याची पायाभरणी ही अशी आधीच झाली होती. त्या पायावर या त्रिमूर्तीने मंदिराची उभारणी कशी केली तें आता पाहवयाचें आहे.