केसरीची त्रिमूर्ति/लो. बाळ गंगाधर टिळक









लोकमान्य
बाळ गंगाधर टिळक














चरित्र - रूपरेषा


 लो. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म १८५६ साली रत्नागिरी येथे झाला. त्यांचे वडील गंगाधरपंत हे प्राथमिक शिक्षक होते; पण ते बहुश्रुत असून, त्यांचा संस्कृतचा व्यासंग चांगला होता. त्यांनी मुलाला शाळेत घालण्यापूर्वी त्याचा बराच अभ्यास घरीं करून घेतला होता. १८६६ सालीं त्यांची बदली पुण्यास झाली. टिळकांचें सर्व शिक्षण पुण्यासच झालें. १८७२ च्या डिसेंबरांत ते मॅट्रिक झाले व १८७३ साली डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी नांव घातलें. मॅट्रिक होण्याच्या आधीच्या वर्षीच टिळकांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचें नांव सत्यभामाबाई.
 टिळक १८७७ साली बी. ए. झाले व १८७९ साली एल्एल्. बी. झाले. विष्णुशास्त्री यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेचा संकल्प आधीच जाहीर केला होता. तेव्हा एल्एल्. बी. होतांच टिळक त्यांना जाऊन मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली; आणि टिळक तेथे अध्यापनाचें कार्य करूं लागले. १८८४ साली याच मंडळींनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली; व या संस्थेने १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. तेव्हा टिळक त्या कॉलेजांत प्राध्यापक म्हणून काम करूं लागले. पुढे १८९० साली सोसायटीच्या इतर सभासदांशी टिळकांचा अंगीकृत धोरणाविषयी मतभेद होऊन त्यांनी संस्थेचा राजीनामा दिला.
 विष्णुशास्त्री व टिळक, आगरकर, नामजोशी प्रभृति त्यांचे सहकारी ह्यांनी जानेवारी १८८१ मध्ये 'केसरी' व 'मराठा' ही दोन साप्ताहिक वृत्तपत्रे सुरू केली. त्या वेळीं आगरकर केसरीचे व टिळक मराठ्याचे संपादक झाले. पुढे सामाजिक सुधारणेच्या कांही तत्त्वांवरून टिळक व आगरकर यांचा मतभेद होऊन तो विकोपाला गेला; आणि १८८८ साली आगरकरांनी 'सुधारक' हें स्वतंत्र पत्र काढले. आधीच्या वर्षापासूनच टिळक केसरीचे संपादक झाले होते. पुढे १८९० साली सोसायटीचा राजीनामा दिल्यावर केसरी व मराठा ह्या वृत्तपत्रांच्या कामालाच त्यांनी सर्वस्वीं वाहून घेतलें.
 १८८२ साली कोल्हापूर- प्रकरण झालें. कोल्हापूर संस्थानचे कारभारी श्री. बर्वे हे महाराजांचा छळ करतात, असा मजकूर केसरींत आला. त्यामुळे त्यांनी बदनामीची फिर्याद केली. तींत आरोप सिद्ध न झाल्यामुळे टिळक व आगरकर ह्यांना जुलै महिन्यांत १०१ दिवसांची शिक्षा झाली. ते दोघे संपादक डोंगरीच्या तुरुंगांत होते. ऑक्टोबरमध्ये सुटका होऊन ते परत वृत्तपत्रांचें काम पाहूं लागले.
 विष्णुशास्त्री यांच्याप्रमाणेच स्वधर्म, स्वभाषा व स्वदेश यांच्या अभिमानांतूनच टिळकांनाहि कार्याची प्रेरणा मिळाली होती; आणि पारतंत्र्य हा नरक असून, तें नष्ट करण्यासाठी व स्वदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवित अर्पण करावयाचें हा त्यांचा ध्येयवाद प्रारंभींच निश्चित झाला होता. केसरी व मराठा या पत्रांतून त्यांनी लेखन केलें तें या ध्येयाच्या सिद्धीसाठीच केलें.
 १८९० सालापासून त्यांनी इंग्रजी राज्यकारभारावर प्रखर टीका करण्यास प्रारंभ केला. हळूहळू ते लेख उग्र होऊं लागले. या लेखी टीकेला पुढे त्यांनी गणपति-उत्सव व शिवाजी-उत्सव यांची जोड दिली. १८९४ साली गणपति उत्सव सुरू झाला. त्याला १८९६ सालीं राट्रीय रूप आलें. त्याच साली शिवाजी-उत्सवहि सुरू झाला. पहिला उत्सव रायगडावर झाला व मग हळूहळू तो महाराष्ट्रभर आणि बाहेरहि पसरला. १९०५ सालीं तर जपानांतहि शिवाजी-उत्सव झाला.
 हे दोन्ही उत्सव राष्ट्रजागृतीसाठीच होते. इंग्रज सरकारविरुद्ध असंतोष पसरविणें हाच त्यांचा हेतु होता. या जत्रा- उत्सवांतून सुशिक्षित लोकांनी खेड्यापाड्यांत जाऊन सरकार करीत असलेल्या जुलमाची लोकांना जाणीव करून द्यावी, असा उपदेश टिळक नित्य करीत असत. १८९६ सालच्या दुष्काळांत त्यांनी आणखी एका मार्गाने हेंच जागृतीचे कार्य सुरू केलें. तो मार्ग म्हणजे साराबंदीची चळवळ हा होय. यामुळेच त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप येऊन १८९७ च्या सप्टेंबरमध्ये त्यांना १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली; पण पुढे थोड्या दिवसांनी राजकीय वातावरण निवळलें. मॅक्समुल्लरसारख्या पंडिताने इंग्लंडमध्ये कांही खटपट केली; यामुळे शिक्षा कमी होऊन टिळक सहा महिने आधीच सुटले.
 १८९८ ते १९०८ हा दहा वर्षांचा काळ म्हणजे टिळकांच्या राजकीय कर्तृत्वाचा मध्यान्हकाळ होय. ते या काळांतच 'हिंदी असंतोषाचे जनक' झाले. या काळांतच 'स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य' ही राष्ट्रीय चळवळीची चतुःसूत्री त्यांनी सांगितली. ते अखिल भारताचे नेते झाले, ते याच काळांत. १९०८ सालची शिक्षा त्यांनी अत्यंत धैर्याने व स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. तेव्हा त्रिखंडांत त्यांची कीर्ति होऊन मानवी इतिहासांत महापुरुष म्हणून त्यांची गणना होऊं लागली. ते नामदार टिळक होते ते लोकमान्य टिळक झाले ते याच काळांत.
 ताईमहाराजप्रकरणाच्या अग्निदिव्यांतून त्यांना याच काळांत जावे लागलें. बाबामहाराज हे त्यांचे मित्र. त्यांच्या पत्नी ताईमहाराज. मृत्युसमयीं बाबामहाराजांनी टिळकांना आपल्या मिळकतीचे विश्वस्त नेमलें. त्याअन्वये टिळकांनी जगन्नाथमहाराज यांना ताईमहाराजांच्या मांडीवर दत्तक दिले; पण यांतून वाद व खटले निर्माण होऊन टिळकांच्या आयुष्याचें एक तप यांत खर्ची पडलें. यांतच बाईंवर हात टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आणून त्यांना आयुष्यांतून उठविण्याचा सरकारने घाट घातला होता; पण त्यांतून ते मुक्त होऊन अधिकच तेजाने तळपूं लागले. पुढे १९१५ साली प्रीव्हि कौन्सिलमध्ये त्यांच्यासारखा निकाल होऊन या प्रकरणावर शेवटचा पडदा पडला.
 १९०८ साली टिळकांना राजद्रोहाची दुसरी शिक्षा झाली. ही सहा वर्षांची होती. ती संपवून १९१४ साली ते सुटून आले. या वेळी ब्रह्मदेशांतील मंडाले या गावीं त्यांना ठेवलें होतें. तेथेच त्यांनी 'भगवद्गीतारहस्य' हा विख्यात ग्रंथ लिहिला; आणि हिंदुधर्मांत फार मोठें परिवर्तन घडवून आणले.
 टिळक सुटून आले तेव्हा पहिले महायुद्ध सुरू झालें होतें. त्यांचा राष्ट्रीय पक्षहि निस्तेज व विस्कळित झाला होता. ही सर्व परिस्थिति ओळखून टिळकांनी इंग्रज सरकारला युद्धकार्यांत साहाय्य करण्याचें ठरवून लष्करभरतीचा उपदेश सुरू केला. इंग्लंड संकटांत आलें ही हिंदुस्थानला सुसंधि आहे, याच वेळीं कांही स्वराज्याचे हक्क मिळाले तर मिळतील, असें त्यांचें धोरण होतें.
 त्यांच्या सहा वर्षांच्या अनुपस्थितींत काँग्रेस मवाळांच्या हातीं गेली होती, पण १९१५ साली टिळकांनी आपल्या अनुयायांसह काँग्रेस प्रवेश केला; आणि लवकरच तिच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केलें. पुढच्या सालीं सुप्रसिद्ध होमरूल लीगची- हिंदी स्वराज्यसंघाची- त्यांनी स्थापना केली; आणि सर्व हिंदुस्थानभर दौरा काढून मरगळलेल्या चळवळीला पुन्हा तेज आणलें. अर्थात् यांमुळे त्यांच्यावर पुन्हा सरकारची वक्रदृष्टि झाली व त्यांच्यावर पुन्हा खटला भरण्यांत येऊन त्यांच्याकडुन पन्नास हजारांचा जामीन मागण्यांत आला; पण या वेळीं न्यायदेवता जरा जागी होती. हायकोर्टाने खालच्या कोर्टाचा निकाल फिरवून त्यांना मुक्त केलें.
 १९१६ सालची लखनौची काँग्रेस दोन कारणांनी महत्त्वाची ठरली. या अधिवेशनांतच "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व मी तें मिळवीनच" हा महामंत्र त्यांनी उच्चारला; आणि लखनौलाच हिंदु-मुस्लिम करार घडवून आणून त्यांनी स्वराज्याच्या चळवळीसाठी एकसंध फळी निर्माण केली.
 १९१७ साली स्टेटसेक्रेटरी माँटेग्यू यांनी ब्रिटिश सरकारचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांत, हिंदुस्थानाला जबाबदारीचें स्वराज्य देऊन साम्राज्यांतील एक भागीदार करणें हें ब्रिटिश सरकारचें धोरण आहे, असें आश्वासन दिलें होतें. सरकारी धोरणांतील हें परिवर्तन फार मोठें होतें. 'स्वराज्य' हा शब्द उच्चारणें हाच पूर्वी राजद्रोह होता; पण आता, अंतिम उद्दिष्ट म्हणून का होईना, सरकारने तें मान्य केलें. टिळकांच्या चळवळीचा हा मोठाच विजय होता.
 १९१८ साली टिळक होमरूलचे शिष्टमंडळ घेऊन विलायतेस गेले. टाइम्सचा वार्ताहर चिरोल याच्यावर अब्रूनुकसानीची फिर्याद लावणें हाहि एक हेतु तेथे जाण्यांत होता. चिरोलच्या खटल्याचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेला. शिष्टमंडळाचें काम मात्र कांही स्वरूपांत साधलें. तेथील मजूर पुढाऱ्यांची सहानुभूति हिंदुस्थानच्या स्वराज्याच्या चळवळीला लाभली. हीं दोन्ही कामें संपवून टिळक १९१९ सालअखेर हिंदुस्थानांत परत आले. चिरोलप्रकरणी टिळकांचा अडीच-तीन लाख रुपये खर्च झाला होता. तो खर्च टिळक परत आल्यावर ग्रंथ लिहून त्यावर पैसे मिळवून भरून काढणार होते; पण ते येथे पोचण्याच्या आधीच लोकांनी स्वयंस्फूर्तीने तीन लाख रुपये फंड जमवून तो प्रश्न सोडवून टाकला होता.
 टिळक विलायतेंत असतांनाच हिंदुस्थान सरकारने रौलेट बिलें पास करून दडपशाहीचा वरवंटा फिरविण्यास प्रारंभ केला होता. त्याच्या निषेधार्थं महात्माजींनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. तिच्यांतूनच 'जालियनवाला बाग' हें हत्याकांड उद्भवलें. या वेळी चळवळ अगदी अपूर्व अशी झाली, व आपण नसतांना एवढी चळवळ झालेली पाहून टिळकांना फार समाधान वाटलें.
 १९१९ च्या डिसेंबरअखेर अमृतसरला काँग्रेसचें अधिवेशन झालें. त्या वेळी 'माँटेग्यूसाहेबांनी दिलेल्या सुधारणा निराशाजनक व असमाधानकारक आहेत' या ठरावांतील शब्दांविषयी फार वाद झाला; पण अखेरीस टिळकांचे म्हणणे मान्य होऊन काँग्रेसचें ऐक्य अभंग राहिलें. या अधिवेशनास टिळक गेले तेव्हा त्यांचा अमृतसरला अपूर्व सन्मान झाला. "हिंदुस्थानांत राष्ट्रीय भावनांचा प्रसार करणाऱ्या आदिपुरुषांत टिळकमहाराजांची गणना प्रमुख स्थानों केली जाते" असे उद्गार स्वामी श्रद्धानंदजी यांनी काढले.
 लोकमान्यांनी जन्मभर केलेल्या कार्याची भारताने त्यांना ही जणू पावतीच दिली!
 ही पावती मिळतांच टिळकांचे जीवितकार्य संपल्यासारखें झालें. "माझ्या सर्व शक्ति क्षीण होत चालल्या आहेत," असें ते अलीकडे म्हणतच असत. महात्माजींचा उदय झाल्यामुळे, आपल्या कार्याचा वारसा चालविणारा नेता भारताला मिळाला आहे, हा दिलासाहि त्यांना मिळाला होता. त्यामुळेच कृतार्थता वाटून त्यांनी आपली जीवितयात्रा संपविली. ३१ जुलै १९२० च्या उत्तररात्री ते अनंतांत विलीन झाले.




-१-

स्व-राज्यांतील 'स्व'चा व्याप


राष्ट्राचा आत्मा
 लो. टिळक अमरावतीस गेले असतांना, एक भलें मोठें वऱ्हाडी पोगोटें घातलेला शेतकरी त्यांच्या दर्शनास आला होता. 'हा खेड्यांतील कुणबी माणूस, लोकमान्यांना भेटून काय करणार', असें वाटून दारावरील स्वयंसेवक त्याची दाद घेईना; पण त्यांचें बोलणें ऐकून लोकमान्य स्वतःच बाहेर आले. शेतकऱ्याला फार आनंद झाला. त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून थोड्या वेळाने तो परत गेला. तेव्हा स्वयंसेवकाकडे वळून लोकमान्य म्हणाले, "हिंदुस्थानांत शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा आहे. त्याच्यावरील मालिन्याचा पडदा जर दूर करतां आला तरच हिंदुस्थानचा उद्धार होईल. याकरिता शेतकरी आपला व आपण शेतकऱ्याचे, असे आपणांस वाटावयास हवें." (लोकमान्य टिळक आठवणी व आख्यायिका खंड, २, पृ. ३८.)
 'समाइकीने उभारलेल्या भांडवलाचे कारखाने' या केसरीच्या पहिल्या वर्षी लिहिलेल्या लेखांतच त्यांनी म्हटलें आहे, "देश सधन असो वा निर्धन असो, जित असो वा अजित असो; लोकसंख्येच्या मानाने हलक्या दर्जाचे म्हणजे काबाडकष्ट करून निर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असावयाची. याकरिता या समाजाची स्थिति जोंपर्यंत सुधारली नाही तोंपर्यंत देशस्थिति सुधारली, असे कधीहि म्हणतां येणार नाही."
 देश म्हणजे काय, लोक म्हणजे कोण हें लोकमान्यांच्या मनांत त्यांनी केसरीसाठी लेखणी उचलण्याच्या आधीच निश्चित झालें होतें.
 देश म्हणजे शेतकरी, देश म्हणजे काबाडकष्ट करणारी जनता. शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा! चाळीस वर्षे हें सत्य ते हिंदी समाजाला शिकवीत होते. ते अद्वैत वेदान्ताचे उपासक होते. भारतांत हैं अद्वैत त्यांना प्रत्यक्षांत कोठे दिसलें? हिंदी राष्ट्र व शेतकरी आणि कामकरी यांच्यांतील अभेदाचें दर्शन त्यांना प्रारंभापासूनच झालें होतें.
हाच धर्म
 "हिंदुस्थानची खरी स्थिति पाहवयाची असेल, तर शहरें पाहून उपयोग नाही. खेड्यांतील शेतकऱ्यांची किंवा मजुरांची स्थिति पाहिली पाहिजे." (केसरी, १४-१-१९०२). "हिंदुस्थान ही आमची मातृभूमि आणि देवता, हिंदुस्थानवासी हेंच आमचें बंधुत्वाचें नातें, व त्यांची सामाजिक व राजकीय स्थिति सुधारण्याचा एकनिष्ठ प्रयत्न करणे हाच आमचा धर्म." (केसरी, १९-१२-१८९३). असे विचार त्यांनी केसरीत ठायी ठायी मांडलेले आढळतात.
 लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणोशोत्सवांत नवीन काय होतें? "साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार ह्या सर्व जाती, क्षणभर आपला जातिमत्सर सोडून देऊन, परस्परांशी एकदिलाने व एका धर्माभिमानाने मिसळल्या" ही या उत्सवांतली आनंददायक अशी विशेष गोष्ट होती. (केसरी, १८-९-१८९४.)
 'ब्राह्मण आणि त्यांची विद्या' असें एक पुस्तक प्राचार्य महादेव शिवराम गोळे यांनी लिहिलें होतें. त्यांत ब्राह्मण समाजाच्या ऱ्हासाची कांही कारणमीमांसा त्यांनी केली होती. या पुस्तकावर टीका करतांना टिळकांनी म्हटलें आहे, "सर्व हिंदु समाजांस कुदशा प्राप्त झाली आहे. तिचा विचार न करतां केवळ ब्राह्मणांच्या ऱ्हासाचें निदान ठरविणें म्हणजे पुच्छग्राही, पादग्राही आंधळ्याप्रमाणे मीमांसा करणें होय. हें एकदेशीय व चुकीचें आहे." अशी टीका करून शेवटीं निष्कर्ष म्हणून त्यांनी सांगितलें आहे की, "जें कांही करावयाचें तें सर्व जातींकरिता व सर्व प्रांतांतील लोकांकरिता, त्यांस बरोबर घेऊन, त्यांच्या साहाय्यानेच केलें पाहिजे. शंभर वर्षांपूर्वी दक्षिणेतील ब्राह्मणांनी इतर प्रांत काबीज करण्याच्या कामी शौर्य व साहस प्रकट केलें होतें. आता सार्वजनिक हिताच्या कामीं पुढाकार घेऊन ती चळवळ सर्व राष्ट्रभर पसरविण्याचें काम ब्राह्मणांनीच अंगावर घेतले पाहिजे. यांत ब्राह्मणांनी निष्काम पुढारीपण करावें."
 खरा हिंदुस्थान खेड्यापाड्यांत आहे आणि येथे राष्ट्र निर्माण करावयाचें म्हणजे या खेड्यापाड्यांत जागृति करावयाची, असा टिळकांच्या मनाशी सिद्धान्त झालेला होता. "राष्ट्रीय महोत्सवांत सुशिक्षितांनी काय केलें पाहिजे" हें सांगतांना त्यांनी सांगितले आहे की, त्यांनी मोठ्या जनांना प्रचंड सभांचें रूप द्यावें व खेड्या-पाड्यांतील झोपडींत राजकीय चळवळीचा प्रवेश करून द्यावा. बहुत श्रमांनी त्यांनी स्वतः पैदा केलेलें नैतिक व धार्मिक ज्ञान लिहिता-वाचता न येणाऱ्या खेड्या-पाड्यांतील आपल्या बंधूंना त्यांनी सुलभ उपायाने द्यावें, व आपली खरी स्थिति काय आहे, याची लोकसमूहाला जाणीव करून द्यावी. सरकार करीत असलेल्या जुलमाची त्यांना आठवण करून द्यावी व सर्वांत धर्म-बुद्धि जागृत करून राष्ट्रीयत्वास बळकटी आणावी.
रामदासी संप्रदाय
 डॉ. भडकमकर यांच्यांशी बोलतांना एकदा लोकमान्य म्हणाले, "काँग्रेसच्या चळवळीकडे खेड्यापाड्यांतील लोकांचेंहि लक्ष वेधून, पुढाऱ्यांना खऱ्या लोकांचा पाठिंबा मिळावा, अशा तऱ्हेचे प्रयत्न मी अगदी प्रारंभापासून करीत आहे; तरी पण आपली सर्व चळवळ अद्याप बुद्धिमान् वर्गांतच चालली आहे... ह्या सर्व चळवळी आता धार्मिक व औद्योगिक प्रश्नांच्या पायांवर उभारून खालवर कोना—कोपऱ्यांत पसरविल्या पाहिजेत. या कामाकरिता स्वार्थत्यागी, अल्पसंतुष्ट, उद्योगी, गरीब माणसें उपदेशक म्हणून तयार करून त्यांस वक्तृत्व, वैद्यकी, ज्योतिष, थोडें-बहुत धर्मशास्त्र इत्यादि लोकोपयोगी कला शिकवून, खेड्यांतून रहावयास पाठवून, राजकीय रामदासी संप्रदाय वाढविला पाहिजे... हे लोक समाजांत ठिकठिकाणीं पसरून लोकांच्या सुखदुःखाशी समरस होऊन वावरूं लागले म्हणजे लोकांची मनें आकर्षित करूं शकतात... आणि मग चळवळ अंतःस्फूर्तीने उत्पन्न झाल्यासारखी होऊन तिला जिवंतपणा प्राप्त होईल." (आठवणी, खंड २ रा, पृ. २५५.)
 कलकत्त्याला लोकमान्यांचें 'स्वराज्य' या विषयावर व्याख्यान झालें. त्या वेळीं, "मला होमरूलच्या खटपटीसाठी प्रत्येकी रुपया, आठ आणे देणारींच हजारो माणसें पाहिजेत", असें त्यांनी सांगितलें. कलकत्त्याला लोकमान्यांचे आदरातिथ्य सर्व कोट्याधीश मारवाडी लोकांनी केलें होतें. त्यांना ही मागणी ऐकून मोठा विस्मय वाटला. ते लोकमान्यांना म्हणाले, "तुम्हांला फंडाची जरूर असेल तर आम्हांला गुप्त इशारा द्या. आम्ही तुम्हांला लाखो रुपये मध्यरात्रीं आणून देऊ. असे प्रत्येक माणशी आठ आणे, रुपया कशाला मागता?" त्यावर लोकमान्य म्हणाले, "तूर्त जी होमरूलची खटपट आम्हांला करावयाची आहे तिला 'स्वराज्य पाहिजे' म्हणणारी व स्वराज्याच्या खटपटीला प्रत्येकी आठ आणे, रुपया देणारी माणसें मिळाली तरी पुरे." 'स्वराज्य'मधील 'स्व'चा लोकमान्यांच्या मनांत काय अर्थ होता तें यावरून स्पष्ट होईल. आठ आणे, रुपया देणारी हजारो माणसें, स्वराज्य पाहिजे म्हणणारी लाखो माणसें- यांचे राज्य म्हणजे स्वराज्य! (आठवणी, खंड २रा, पु. ४६४.)
 चाळीस वर्षे लोकमान्य हिंदी लोकांना 'स्व'चा हा अर्थ समजावून देत होते. हिंदुस्थानचे 'स्व' म्हणजे कोण? शेतकरी, कुंभार, सुतार, लोहार, कोष्टी हे कारागीर, वारली, कोळी, कारखान्यांतील कामगार, भिल्ल, कातकरी, तेली, तांबोळी हे लोक म्हणजे 'स्व'. मूठभर सुशिक्षित म्हणजे 'स्व' नव्हे. कोट्याधीश मारवाडी, संस्थानिक, राजे, सरदार हे तर नव्हेच नव्हे.
विशेष काय?
 आज सर्व जगांत शेतकरी, कामगार व एकंदर कष्टकरी जनता यांचा जयजयकार चालू आहे. भांडवली देशांत सुद्धा यांना अग्रमान दिला जातो. 'जय किसान, जय जवान' ही आपली घोषणा सुप्रसिद्धच आहे, असें असतांना लोकमान्यांनी शेतकरी हा देशाचा कणा आहे, राष्ट्राचा आत्मा आहे, असें सांगितले यांत विशेष तें काय, असें वाटण्याचा संभव आहे; पण आपण हें ध्यानांत घ्यावें की, ज्या वेळीं टिळकांनी हें महासत्य सांगितलें त्या वेळीं, म्हणजे १८८० च्या सुमाराला, त्याचा उच्चार करणारे जगांत ते एकटेच नेते होते. चीनचे नेते डॉ. सनयत् सेन ह्यांना त्या राष्ट्राचे जनक मानण्यांत येतें; पण त्यांचा सर्व भर लष्करी उठावणीवर होता. मानवेंद्र रॉय यांनी म्हटलें आहे की, १९२१ सालापर्यंत राष्ट्राची खरी शक्ति किसानांमध्ये आहे, याचा उमग त्यांना पडला नव्हता. चार पिस्तुलें जमा केलों की क्रांति होते, असा त्यांचा समज होता. शिवाय ज्या साम्राज्यवादी ब्रिटन, फ्रान्स ह्या देशांनी चीनवर भयानक अत्याचार केले होते त्यांची आपल्याला मदत होईल, अशी त्यांची शेवटपर्यंत श्रद्धा होती. (रेव्होल्युशन अँण्ड काउंटर रेव्होल्यूशन इन् चायना, पु. २५१-३२०). पाश्चात्त्य देशांत याच कालखंडांत इटली, जर्मनी यांची राष्ट्रसंघटना चालू होती, पण सरंजामदार, सरदार, लष्कर यांच्या बळावरच ती उभारणी चालू होती. शेतकरी ही महाशक्ति आहे, या सत्याचा अवगम तेथील नेत्यांना झाला नव्हता. जपानमध्येहि हीच स्थिति होती. १८५५ च्या सुमारास त्या देशांत अर्वाचीन युग सुरू झाले; पण तेथल्या नेत्यांनी नवीन जपान घडविला तो सरदार, सरंजामदार, लष्कर, राजा यांच्या शक्तीच्या आश्रयानेच घडविला. १८८० साली शेतकरी, किसान हा राष्ट्राचा आत्मा आहे, हा सिद्धान्त मांडणारा जगांत लोकमान्य टिळक हा एकच महापुरुष होता.
बटाट्याचे पोते
 मार्क्सवादी लोक शेतकरी, कामकरी, किसान, जवान म्हणजे एकंदर जी जनता तिच्या नांवाने उद्घोष करीत असतात; आणि अर्वाचीन काळांत मार्क्सचे अनुयायी किसानांच्या संघटना बांधतातहि. पण हें सर्व १९२० नंतरचें आहे. तोपर्यंत किसान, शेतकरी ही एक शक्ति आहे, हें मार्क्सवादाला मान्यच नव्हतें. मार्क्सचा सर्व भर गिरणी कारखान्यांतील कामगारांवर होता. खरे क्रांतीचे नेते, त्याच्या मतें, कामगारच होते. क्रांतीच्या आघाडीवरचे शिपाई म्हणजे कामकरीच होत, असा त्याचा सिद्धान्त होता. भांडवलदार, जमीनदार, व्यापारी, बुद्धिजीवी हे वर्ग तर क्रांतिकारक नव्हेतच; पण मार्क्सच्या मतें किसानहि नव्हेत. मार्क्सचें किसानांच्याबद्दल फार वाईट मत होतें. तो शेतकऱ्यांना 'बटाट्याचें पोतें' म्हणत असे. त्याच्या मतें शेतकरी हा एक वर्ग होऊच शकत नाही; कारण तो संघटित होणें अशक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्याजवळ दोन-चार एकरांचा जमिनीचा लहान तुकडा असतो आणि त्याची कसणूक व निगा तो स्वतः व त्याचे कुटुंबीय हे स्वतंत्रपणे करीत असतात. त्यामुळे ते परस्परांपासून विलग असतात. धनोत्पादनाच्या दृष्टीने त्यांचे हितसंबंध गुंतलेले नसतात. प्रत्येक शेतकरी स्वतंत्रपणे पोटाचा उद्योग करूं शकतो. त्यामुळे शेतकरी हा संघटित होऊं शकत नाही. श्रमविभाग त्याच्या व्यवसायांत होत नाही, विविधता त्यांत येत नाही, कृषिशास्त्राची तो वाढ करूं शकत नाही. यामुळे शेतकरी कायम मागासलेला राहतो आणि भांडवलादार, जमीनदार, बुद्धिजीवी, कारागीर यांच्याप्रमाणेच तो पुराणवादी व क्रांतिविरोधी होऊन बसतो. कामगार मात्र, गिरण्या- कारखान्यांत विलगपणें काम करूं शकत नसल्यामुळे अपरिहार्यपणेंच एकजीव होतात. त्यांचा जीवनउद्योग त्यांना एकत्र बांधूनच ठेवतो. त्या उद्योगांत यांत्रिक प्रगतीशीं नित्य संबंध येत असल्यामुळे तो पुरोगामी होतो. म्हणूनच तो अटळपणें क्रांतिकारक होतो. शेतकऱ्याला अशी कसलीच संधि नसल्यामुळे तो नेहमी विघटितच असावयाचा. तो बटाट्याचें पोतेंच राहवयाचा. (मार्क्स-एंगल्स- सिलेक्टेड वर्क्स, खंड १ला, पृ. ३०३).
 मार्क्सचें हें मत अत्यंत हास्यास्पद आहे हें इतिहासानेच दाखवून दिलें आहे. कम्युनिस्ट क्रांति, त्याच्या मतें, इंग्लंड, जर्मनी या प्रगत भांडवली देशांत व्हावयाची होती; पण ती झाली रशिया व चीनमध्ये. तेथे कामगारवर्ग उदयालाच आला नव्हता. चीनमध्ये तर तो अस्तित्वांतच नव्हता. आणि माओ-त्से-तुंग याने शेतकऱ्यांची संघटना करूनच चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांति घडविली. रशियांत कामगारवर्ग थोड्या प्रमाणांतच होता. त्यामुळे सोव्हिएट नेत्यांना किसानांचे साह्य घ्यावेंच लागलें. पण मार्क्सवादी भ्रमांत ते पुरते अडकलेले असल्यामुळे प्रारंभीच्या काळांतहि किसानांना ते कामगारवर्गाला पोसणारे गुलाम अशा दृष्टीनेच वागवीत असत.
मार्क्सवादी भ्रम
 मार्क्सचा तो सिद्धान्त मुळांतच तर्कदुष्ट होता. धनोत्पादन साधनामुळे. कामगार एकजीव होतात आणि म्हणून ते संघटित होऊं शकतात ही कल्पनाच अशास्त्रीय आहे. एखाद्या कारखान्यापुरतें फार तर तें खरें असेल; पण मार्क्स, "जागतिक कामगारांनी वर्गभेदाच्या तत्त्वावर संघटित व्हावें" असें सांगत होता. ज्यांनी सात जन्मांत एकमेकांची तोंडें पाहिलेली नव्हतीं, ज्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची सुद्धा जाणीव नव्हती व ज्यांची आर्थिक स्थिति परस्परांच्या तुलनेने अत्यंत विषम होती त्या कामगारांची संघटना मार्क्सला सुलभ वाटत होती आणि कायम एकमेकांच्या सान्निध्यांत राहणारे, समदुःखी, समश्रद्ध शेतकरी मात संघटनेला अपान! असे भ्रम मार्क्सवादच पोसूं शकतो.
 लोकमान्य टिळकांना असला भ्रम कधीच नव्हता. मित्र वर्गामध्ये निरनिराळ्या कारणांनी भेद असतात हें ते जाणीत होते; पण हे भेद राष्ट्रसंघटनेच्या आड येतील हें त्यांना मुळीच मान्य नव्हतें. वर्गभेदाचें भ्रामक तत्त्वज्ञान त्यांनी कधीच स्वीकारले नाही. त्यामुळे अर्वाचीन युगांत शेतकरी हाच राष्ट्राचा आत्मा होय हें सत्य तें जाणूं शकले आणि भारतांत तें दृढमूल करूं शकले.
 पण शेतकरी हा राष्ट्राचा कणा होय असें त्यांचें मत होतें म्हणून गिरणी- कारखान्यांत काम करणारा जो कामगारवर्ग त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलें किंवा त्याला हीन मानलें असें नाही. १९०२-३ सालापासून त्यांनी त्या वर्गांतहि आपले कार्यकर्ते पाठवून कामगारांत राष्ट्रीय जागृति करण्यास प्रारंभ केला होता. १९०८ खाली त्यांना शिक्षा झाली त्या वेळी मुंबईचे कामगार खवळून उठले व सरकारी अत्याचारांना न जुमानतां त्यांनी सहा दिवस संप चालू ठेवला तो टिळकांना ते राष्ट्रपुरुष मानीत होते म्हणूनच होय. तेव्हा शेतकरी आणि कामकरी यांच्यांत टिळक भेद करीत नव्हते, हें स्पष्ट आहे. प्रारंभापासून भारत म्हणजे सर्व कष्टकरी जनता असेंच समीकरण त्यांनी मनाशी निश्चित केलें होतें.
समन्वय
 आणि केवळ शेतकऱ्यांच्या किंवा कामकऱ्यांच्या बाबतींतच नव्हे, तर सर्वच दृष्टींनी त्यांनी वर्गविग्रहाचें तत्त्व त्याज्य ठरवून टाकलें होतें. त्यांना या विस्कळित, विघटित, भेदजर्जर, जाति, पंथ, धर्म, जमाती यांनी शतशः विभागलेल्या हिंदी समाजांतून एक राष्ट्र निर्माण करावयाचें होतें. म्हणून त्यांनी धर्मसमन्वयाचें, जातिसमन्वयाचें आणि त्याचप्रमाणे वर्गसमन्वयाचें धोरणच अंगीकारलेलें होतें. अमका धर्म, अमको जात, अमका वर्ग जास्त राष्ट्रवादी आणि अमका कमी, असा मुळांतच कांही भेद आहे, असे त्यांनी कधीहि मानले नाही. पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याशी बोलतांना एकदा त्यांनी, संगीताच्या भाषेंत, आपलें राष्ट्रीयत्वाचें तत्त्वज्ञान स्पष्ट करून सांगितले होते. ते म्हणाले, "तुमच्या गाण्याच्या विषयांत ऐक्याचा धडा अवश्य शिकण्यासारखा आहे. कसा तो पहा- तंबुरा, सतार, सारंगी, दिलरुबा, बीन, रुद्रवीणा, ताऊस, फिड्ल, तबला, मृदंग, हार्मोनियम हीं निरनिराळ्या स्वरूपाचीं वाद्ये आहेत. तीं वाजविण्याच्या तऱ्हाहि निरनिराळ्या व वाजविणारी माणसेंहि निरनिराळी असतात; परंतु निरनिराळीं वाद्यें, तीं वाजविणाऱ्यांच्या मनांत एकच ध्येय असल्यामुळे, परस्परांना उपकारकच होतात. उलट एकाच जातीचीं वाद्ये असून सुद्धा वाजविणाऱ्यांच्या मनांत ऐक्य नसेल तर, तींच अनुपकारकहि होतील. यावरून धर्मभेद, जातिभेद, पक्षभेद, पंथभेद असले तरी ध्येय एकच ठेविलें तर खरोखर कोणतीहि अडचण येणार नाही. निरनिराळ्या रस्त्यांनी एकाच गावाला जातां येतें; पण गाव गाठण्याचें ध्येय नसून एकमेकांचे रस्ते अडविण्याचे किंवा मोडून टाकण्याचे ध्येयच धरल्यामुळे, कोणालाहि पुढे जातां येत नाही. तरी आपले कर्तव्य समजून, फलाविषयी निरिच्छ राहून, मार्ग क्रमीत असलें पाहिजे. म्हणून म्हणतों, अशा कर्तव्यबुद्धीने तुमचा तंबुरा छेडला जाऊं दे!" (आठवणी, खंड २ रा, पृ. २७१.)
 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हा मंत्र उच्चारतांना लोकमान्यांच्या मनांत 'स्व'चा केवढा व्याप होता, हें यावरून ध्यानांत येईल. स्व म्हणजे सर्व लोक किंवा प्रजा. म्हणजेच अखिल भरतखंड, सर्व राष्ट्र हा व्यापक अर्थ प्रत्येक भारतीयाच्या मनांत बिबविण्याचा, वाचेने, मनाने व कृतीने त्यांनी अहनिश प्रयत्न चालविला होता.
सर्व पंथ, सर्व धर्म
 स्वतः टिळक हिंदु धर्माचे व त्यांतहि सनातन वैदिक पंथाचे अतिशय अभिमानी होते; पण लिंगायत, जैन, बौद्ध या पंथांचा त्यांनी कधीहि अनादर केला नाही. कर्नाटक प्रांताचे नेते गंगाधरराव देशपांडे ह्यांना त्यांनी एकदा मुद्दाम सांगितलें की, तुम्ही सार्वजनिक चळवळ कर्नाटक प्रांतांत करीत आहांत. तेथे लिंगायत लोक बरेच आहेत. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे लिंगायत लोकांच्या धर्म-ग्रंथांचा चांगला परिचय करून घेऊन, त्या धर्माच्या उदार तत्त्वांचा आदरपूर्वक अभ्यास करा. म्हणजे त्या धर्मांतील लोकांसंबंधाने आपला आदर वाढून आपल्याला त्यांची सहानुभूति मिळते, नाही तर विनाकारण गैरसमज होतो. जैनपंथाविषयी त्यांनी मुनि जिनविजय यांच्यापाशीं असाच आदरभाव व्यक्त केला होता. ते म्हणाले, जैन समाजाची सांपत्तिक स्थिति फार उत्तम आहे. तो समाज देशाच्या ज्ञानप्रसारक संस्थांना सहानुभूति दाखवून मदत करील तर देशकार्यांत फार बहुमोल मदत होईल. (आठवणी, खंड २ रा, पृ. २१, ४७). कोलंबो येथे 'बौद्ध धर्म व वैदिक धर्म' या विषयावर लोकमान्यांचें व्याख्यान झालें होतें. त्यांत त्यांनी बौद्ध धर्माविषयी असेच गौरवोद्गार काढले होते. ते म्हणाले, "बौद्ध धर्माने वैदिक धर्मांतील संन्यासाची कल्पना स्वीकारली, पण त्याबरोबरच संन्याशाने समाजांत राहून समाजसेवा करावी, कर्मयोगी व्हावें, अशी त्यास दिशा लावली. बौद्ध धर्मामुळे वैदिक धर्मांतील अनेक अनावश्यक आचारांची छाटछाट होऊन वैदिक धर्माचें स्वरूप जास्त शुद्ध व जोमदार झाले, हें मान्य केलेच पाहिजे."
 हें हिंदु धर्मातील पंथाविषयी झालें. ख्रिश्चन व मुस्लिम या धर्मांविषयीहि लोकमान्यांची अशीच वृत्ति होती. त्यांच्या 'स्व' मध्ये त्यांचाहि समावेश होत होता. भरतभूमीला जो कोणी मातृभूमि मानील, येथल्या राष्ट्रपुरुषांची जो पूजा करील व या भूमीशीं जो एकनिष्ठ असेल तो टिळकांचा 'स्व' होता. बॅ. बॅप्टिस्टा व मौ. शौकतअल्ली यांनी सांगितलेल्या आठवणींवरून (खंड २रा, पृ. ५४७, ५७९) व टिळकांच्या कलकत्ता, अमरावती येथील भाषणांवरून हें निःसंदेह सिद्ध होईल.
 अत्यंत शुद्ध अशा राष्ट्रीय वृत्तीची टिळक प्रारंभापासून कशी जोपासना करीत होते तें यावरून ध्यानांत येईल. धर्मभेद त्यांनी राष्ट्रीय वृत्तीच्या कधी आड येऊ दिला नाही. दादाभाई हे पारशी होते. पण त्यांची राष्ट्रसेवा पाहून त्यांनी निरंतर त्यांचा 'पितामह, महर्षि' असा गौरव केला. बॅ. जोसेफ बॅप्टिस्टा हे खिश्चन गृहस्थ, पण टिळकांनी हिंदी स्वराज्य संघाचे त्यांना अध्यक्ष केलें. बॅ. जिना यांची आरंभी वृत्ति पूर्ण राष्ट्रीय होती. त्या वेळी टिळक त्यांना असाच मान देत.
 संगीताच्या दृष्टान्तांत त्यांनी सांगितलेला विचार ते प्रत्यक्षांत कसा आणीत होते तें यावरून विशद होईल. राष्ट्रीय जीवनांतील सर्व तारा परस्परांना उपकारक होऊन सर्वातून संवादी असा एकच मधुर सूर निघावा ही त्यांची तळमळ होती.
 या देशांतील सर्व वर्ण, सर्व जाति, सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व प्रांत यांतील गरीब, श्रीमंत, कष्टकरी, बुद्धिजीवी या सर्वांचा 'स्व'मध्ये समावेश करून राष्ट्र-तत्त्वावर त्यांची संघटना कोणीही, केव्हाही बांधलेली नव्हती. ती बांधणें हें टिळकांचें उद्दिष्ट होतें. हे उद्दिष्ट अभूतपूर्व असें होतें. त्यांनी तें कसें साधलें हें आता पाहावयाचें आहे.




-२-

पाश्चात्त्य विद्या


 हिंदुस्थानांतील शतधा विघटित अशा हिंदी समाजांतून एक राष्ट्र निर्माण करावयाचें हें अभूतपूर्व उद्दिष्ट टिळकांनी कसें साध्य केलें?
 पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांच्या साह्याने!
 लो. टिळक हे सनातन धर्माचे अभिमानी होते; प्राचीन परंपरेचाहि त्यांना फार अभिमान होता; सुधारकांवर त्यांनी फार प्रखर टीका केली होती; असें असतांना त्यांनी पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांचा आश्रय केला, त्यांचा अवलंब करून हिंदुस्थानांत राष्ट्र-निर्मिति केली, हें वाचून अनेकांना विस्मय वाटेल, आश्चर्य वाटेल. पुष्कळांना हें विधान रुचणार नाही, पटणार नाही; पण तें खरें आहे. तें अगदी पूर्ण सत्य आहे. त्या विद्येवांचून त्यांना आपले उद्दिष्ट साध्य करतां आलेच नसतें. त्या संस्कृतीच्या आश्रयावांचून त्यांना एक पाऊलहि पुढे टाकतां आलें नसतें. लोकमान्यांना स्वतःलाहि ही पूर्ण जाणीव होती.
 पाश्चात्त्य शास्त्र
 १९०७ साली बेळगावला 'सरकारी शिक्षण व राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर बोलतांना ते म्हणाले, "तरुण पिढीने विद्वान्, बुद्धिमान् निश्चयी व शरीर- सामर्थ्याने युक्त व्हावे, इतकीच आमची इच्छा नाही. तर आमच्या तरुणांनी पाश्चात्त्य शास्त्रांत पारंगत व्हावें, अशीहि आमची प्रबल इच्छा आहे. हीं पाश्चात्त्य शास्त्र आमच्या विद्यार्थ्यांस शिकविण्याच्या कामी ज्या दिवशी हरकत होईल त्या दिवशीं हिंदुस्थानचा भाग्योदय सरला असें मी समजेन." (लोकमान्य टिळकांची व्याख्यानें, पृ. ९३). पाश्चात्त्य शास्त्रांचें लोकमान्य किती महत्त्व मानीत होते, तें यांवरून ध्यानांत येईल.
सुशिक्षित शत्रु
 राष्ट्रीय पक्षाच्या चळवळीवर टीका करतांना मोर्लेसाहेब म्हणत की, "हिंदुस्थानांतले सुशिक्षित लोक हे इंग्रजी राज्याचे खरे शत्रु आहेत." त्याला उत्तर देतांना टिळक म्हणत की, "आम्ही सुशिक्षित लोक त्यांचे शत्रु कां झालों? तर आम्हांला मिळालेल्या शिक्षणामुळे. म्हणजे आम्ही त्यांचे शत्रु नसून, आमचें ज्ञान हें त्यांचे शत्रु आहे." (उक्त ग्रंथ, पृ. ३). हाच विचार त्यांनी पुण्याला गायकवाडवाड्यांत झालेल्या व्याख्यानांत त्याच साली पुन्हा मांडला आहे. "सरकार म्हणतें शिकलेले लोक आमचे शत्रु आहेत. रयत अजून आमच्या नादी आहे. त्यांना तसेंच ठेवण्याचा आमचा उद्योग आहे, पण सुशिक्षित म्हणतात, तें आम्ही कधीहि होऊं देणार नाही." जे ज्ञान शाळा-कॉलेजांत, विद्यापीठांत सुशिक्षितांना मिळालें तें सर्वं रयतेंत पसरणें व रयतेलाहि इंग्रजांचे शत्रु बनविणें, हा उद्योग टिळकांनी जन्मभर केला. सर्व सुशिक्षितांनी रामदासी बनून तेंच कार्य करावे अशी त्यांची शिकवण होती. कारण या ज्ञानाच्या साह्यानेच राष्ट्र घडावयाचें आहे अशी त्यांची निश्चिति होती.
 गणपतीपुढे व्याख्यान असलें की, न चुकतां लोकमान्य सांगत की, "गणपति ही ज्ञानाची देवता आहे, आज मला तिची मदत पाहिजे आहे." गणपति उत्सव कशासाठी आहे? "ज्ञान मिळावें म्हणून ही सारी खटपट आहे. आम्हांला धर्मदृष्टया सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या, वळण पाहिजे आहे. केवळ मौज करण्याकरिता आम्ही हा उत्सव करीत नाही. तुम्ही जिवंत रहावयाला योग्य आहा की नाही हें निश्चयाने दाखवावयाचें आहे." (उक्त ग्रंथ, पृ. ४५, ५०).
अमेरिकेसारखे शिक्षण
 हें ज्ञान म्हणजे कोणतें ज्ञान? अर्थातच पाश्चात्य विद्यांचें ज्ञान. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय, तें स्पष्ट करतांना त्यांनी हें अनेक वेळा सांगितलें आहे. "राष्ट्रीय शिक्षणांत आम्हांला मराठीत शिक्षण पाहिजे. त्यांत व्यापारी व शास्त्रीय विषयांचें शिक्षण पाहिजे हें खरें; पण मुख्य मुद्दा हा नाही. इंग्लंड, अमेरिका यांसारख्या स्वतंत्र देशांत जें शिक्षण देतात तसलें शिक्षण आम्हांला पाहिजे आहे. आम्हांला जोमाचीं माणसें पाहिजे आहेत. तीं सरकारला कदाचित् पटावयाची नाहीत, पण त्याला कांही इलाज नाही. कुंडीतल्या झाडाप्रमाणे ठराविक उंचीपर्यंत झाड वाढू देण्याची सरकारची इच्छा आहे. आम्हांला पूर्ण वाढ होऊं द्यावयाची आहे. आम्हांला स्वराज्याचे शिक्षण पाहिजे आहे. सरकारला ओशाळलेला शिक्षकवर्ग या कामाचा नाही." (व्याख्यानें, पृ. २४). "इंग्लंडने ज्याप्रकारच्या संस्था काढून आपली स्थिति सुधारली तशा प्रकारच्या संस्था काढून आपण आपली स्थिति सुधारून घेतली पाहिजे. जपानने चाळीस वर्षांत जे केलें तें इंग्रजांनी दीडशे वर्षांत हिंदुस्थानांत केलें नाही. आपलें शिक्षण अपुरें आहे, तें पुरें करण्याचा यत्न तुम्ही कराल, अशी मी आशा करतों." (व्याख्यानें, पृ. ७०).
ज्ञान हें सामर्थ्य
 जें ज्ञान टिळकांना अभिप्रेत होतें, जें खेड्यापाड्यांत पसरण्याचा त्यांचा आग्रह होता. ज्यामुळे जोम येतो, ज्यामुळे वृक्षाची पूर्ण वाढ होते, तें ज्ञान म्हणजे इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान येथल्या विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान होय. स्वराज्य- प्राप्तीसाठी त्या ज्ञानाचें साह्य त्यांना हवें होतें. सरकारी व सरकारमान्य शाळांत इतिहास, भूगोल, रसायन, पदार्थविज्ञान हेच विषय शिकवीत, पण ते निर्जीवपणे, ओशाळेपणे शिकवीत. लोकमान्यांना राष्ट्रीय शिक्षणांत विषय तेच शिकवावयाचे होते; पण त्या शिक्षणाने विद्यार्थ्यांची मनें त्यांना समर्थ करावयाची होती; इंग्रजी राज्यामुळे आमचें नुकसान होत आहे, हें त्यांना शिकवावयाचें होतें, त्या ज्ञानाच्या साह्याने लोकांची प्रतिकारशक्ति त्यांना जागृत करावयाची होती; स्वधर्म, स्वभाषा, भारतीय परंपरा यांचा अभिमान जागृत करावयाचा होता; आणि 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून मी ते मिळवीनच' ही ईर्षा विद्यार्थ्यांच्या मनांत निर्माण करावयाची होती. म्हणून इंग्लंड, अमेरिकेत जी विद्या मुलांना देतात ती त्यांना येथल्या मुलांना द्यावयाची होती. त्या विद्येत खरें सामर्थ्य आहे हें त्यांनी जाणलें होतें.
प्रत्यक्षनिष्ठ शास्त्रे
 वर जीं पाश्चात्त्य शास्त्रे सांगितलीं तीं प्रत्यक्षनिष्ठ व प्रयोगक्षम आहेत. तीं दृष्टफल आहेत, धर्मशास्त्राप्रमाणे अदृष्टफल नाहीत. तेव्हा त्यांचा विचार करतांना आपण प्रत्यक्षाला प्रयोगजन्य निर्णयाला, दृक्प्रत्ययालाच महत्त्व दिलें पाहिजे, त्या बाबतींत वेदांचा किंवा पूर्वाचार्याचा आधार घेऊन दृक्प्रत्यय खोटा, असें मानणें केव्हाहि योग्य नाही, असें लोकमान्य टिळकांनी अनेक वेळा आवर्जून सांगितलें आहे. "पाश्चात्त्य राष्ट्रे अद्याप जिवंत आहेत, आणि तीं आपल्या शास्त्रांची वाढ करण्याच्या उद्योगांत सतत मग्न असतात. प्राचीन काळी आमचे आचार्य असाच उद्योग करीत असत; पण पुढे ही वृत्ति सुटली व आमच्या शास्त्रांची वाढ खुंटली.' टिळक म्हणतात, "ख्रिस्ती शकानंतर कांही शतकांनी शास्त्रविद्येचा जिवंतपणा कमी होऊं लागला, आणि आमचे पंडित पूर्वाचार्यांनी केलेले सिद्धान्तच खलीत बसण्याच्या उद्योगास लागले. हिंदुस्थानांतील शास्त्रांची ही स्थिति सदर शास्त्रे युरोपियन पंडितांच्या हातांत पडल्यावर पालटली." (लो. टिळकांचे केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. ४८५, ४८६). आता आपल्या शास्त्रांना जिवंतपणा यावयास हवा असेल तर आपण प्रत्यक्षनिष्ठ झालें पाहिजे, असें टिळकांनी पुनः पुन्हा बजाविलें आहे.
ब्रह्मवाक्यहि अप्रमाण
 पंचांग-संशोधनाच्या बाबतींत त्यांची ही विज्ञाननिष्ठा अनेक वेळा प्रत्ययास आलेली आहे. १९ मे १९०० च्या केसरींतील लेखांत त्यांनी म्हटले आहे की, "केरूनाना, दीक्षित ह्यांच्यांवर आधुनिक यवनाचार्य म्हणजे युरोपीय ज्योतिर्गणिती यांच्या संशोधनाचा परिणाम झालेला आहे. स्वतः वेध घेऊन त्याप्रमाणे जुनें शास्त्र सुधारलें पाहिजे, असे त्यांचे मत होतें. पूर्वी ब्रह्मगुप्ताची अशीच वृत्ति होती. त्याने आर्यभट्टाच्या गणितास दोष दिलेले आहेत. तो म्हणतो, "ब्रह्मदेवाने सांगितलेले ग्रह-गणित महान् काळ गेल्यामुळे खिळखिळें झालें आहे. तें मी जिष्णुसुत ब्रह्मगुप्त स्पष्ट करून सांगतों." यावरून असें दिसतें की, ब्रह्मदेवाचें वाक्यहि जसेच्या तसें मानतां येत नाही, हें सांगण्याचें धैर्य त्या काळीं होतें. गर्गादि ग्रंथकार तर स्वच्छ म्हणतात की, "म्लेंच्छ, यवन यांनी स्थापिलेलें शास्त्र उत्तम आहे. तेव्हा त्यांनाहि ऋषींप्रमाणे पूज्य मानले पाहिजे." अशी वृत्ति असल्यामुळेच प्राचीन काळी आमचीं शास्त्रे जिवंत राहिली; पण पुढे ही वृत्ति पालटली. त्यामुळे शास्त्रांची वाढ खुंटली."
 तेव्हा पुन्हा आपण त्या प्रत्यक्षनिष्ठ, दृक्प्रत्ययशरण- वृत्तीचा अवलंब केला पाहिजे, असा उपदेश टिळकांनी केला आहे. त्या काळीं जुन्या गणितग्रंथांच्या नियमाप्रमाणे चंद्र-सूर्य व इतर ग्रह यांचे अस्तोदय होत नसत. तेव्हा गणित चुकत होतें हें उघड आहे; पण अंधश्रद्ध लोक तें मान्य करून नवें गणित स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यामुळेच पंचांगाचा वाद माजून राहिला होता. या वेळी, "ज्योतिषाच्या गणिताची साक्ष प्रत्यक्ष आहे- 'प्रत्यक्षं ज्योतिषं शास्त्रं चंद्रार्कौ यत्र साक्षिणौ'- गणिताप्रमाणे चंद्र-सूर्य आकाशांत दिसतील तर तें गणित खरें, नाही तर खोटें" हा विचार टिळकांनी केसरींतून वारंवार मांडला. पाश्चात्त्य विद्येचा संस्कार आपल्या लोकांच्या मनावर व्हावा हाच त्यांतला हेतु होता.
अनाग्रह
 वैद्यकशास्त्राचा विचार करतांना त्यांनी हीच विचारसरणी अवलंबिलेली होती. 'आर्यवैद्यकाचें पुनरुज्जीवन' या लेखांत ते म्हणतात, "आमचें जुनें वैद्यक नव्या वैद्यकापेक्षा कांही बाबतींत पुष्कळ मागे आहे, ही गोष्ट आम्हांस मान्य आहे. वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, इंद्रियविज्ञानशास्त्र, शारीरशास्त्र वगैरे वैद्यकीस उपयुक्त व आवश्यक शास्त्रांचा पश्चिमेकडील लोकांनी गेल्या एक-दोन शतकांत चांगला अभ्यास करून तीं शास्त्रे पुष्कळ पूर्णतेस नेली आहेत." हें सांगून टिळकांनी ज्योतिषशास्त्राप्रमाणेच प्राचीन काळचें भारतीय वैद्यकहि पुष्कळ प्रगत होतें, तेव्हा त्याचाहि अभ्यास करावा व प्राच्य आणि पाश्चात्त्य हा भेद न मानतां सत्याचें मधुकर-वृत्तीने ग्रहण केलें पाहिजे, असें तत्त्व सांगितलें आहे; आणि नंतर म्हटलें आहे की, "आग्रहास शास्त्रीय शोधांत जागा नाही. अनुभवाच्या व परीक्षणाच्या कसोटीस उतरेल तीच गोष्ट असल्या प्रकरणी खरी मानावी लागते." (केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. २०२).
 वैद्यक व ज्योतिष हीं प्रत्यक्षनिष्ठ शास्त्रे झाली. पण व्याकरण, वेदार्थमीमांसा याहि बाबतीत, आमच्या शास्त्रांची वाढ प्राचीन काळींच खुंटली होती, आणि युरोपीय पंडितांनी ती बंद पडलेली परंपरा पुन्हा चालू केली, असें सांगून टिळकांनी त्यांचा गौरव केला आहे; आणि शेवटी एक व्यापक विधान केलें आहे की, "आमच्या शास्त्रांचीच नव्हे तर आमच्या उद्योगधंद्यांची व कलांचीहि हीच स्थिति झालेली आहे. उदाहरणार्थ, वस्त्रे विणण्याची किंवा रंगविण्याची कला घ्या. यांत आम्ही पुष्कळच प्रावीण्य व कौशल्य संपादन केलें होतें. पण पुढे त्यांची वाढ खुंटली. यूरोपियन लोकांस आमच्याकडून या कलेचें जें ज्ञान मिळालें तें याच स्थितींतलें होय; परंतु या वेळी युरोपीय राष्ट्रें जिवंत असल्यामुळे त्यांनी आमच्याकडून संपादन केलेल्या सदर कलांच्या ज्ञानांत भर घालून त्यांचा प्रवाह पुढे चालू ठेवला; आणि त्या कलांच्या साहाय्याने आपला देश श्रीमंत करून आम्हांस उलट भिकेस लाविलें. (वेदांताची आणि उद्योगाची दिशा, केसरींतील लेख, खंड ४ था, पु. ४८६).
 लो. टिळकांचीं हीं विवेचनें वाचतांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की, समाजाला जिवंतपणा यावयास हवा असेल, तर त्याने पाश्चात्त्यांप्रमाणे प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, दृक्प्रत्ययशरण अशा शास्त्रांचा अनाग्रही-बुद्धीने, केवळ सत्याकडे दृष्टि ठेवून, अभ्यास केला पाहिजे, हा सिद्धान्त त्यांच्या मनाशीं निश्चित झाला होता. आणि पाश्चात्त्य शास्त्रांच्या अध्ययनाने असे संस्कार हिंदी जनतेच्या मनावर व्हावेत, अशी त्यांना तळमळ लागलेली होती. 'दोन शब्दांत दोन संस्कृति' या आपल्या लेखांत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पाश्चात्त्य व पौर्वात्य संस्कृतींत जो भेद सांगितला आहे, तोच आजच्या काळाच्या दृष्टीने, लो. टिळकांना मान्य होता. पाश्चात्त्य संस्कृति प्रत्यक्षनिष्ठ आहे; आणि आपली पोथीनिष्ठ आहे, असें सावरकरांनी सांगितलें आहे. टिळकांच्या विवेचनाचा भावार्थ तोच आहे. म्हणूनच पाश्चात्त्य विद्येचा, आपण त्यांचे आदर्श डोळयापुढे ठेवून, अभ्यास केला पाहिजे, असें त्यांनी पुनः पुन्हा सांगितलें आहे.
पाश्चात्त्य ऋषि
 आणि हें केवळ भौतिक शास्त्रांच्या बाबतींत नव्हे, तर प्राचीन भारतीय जे वेदोपनिषदादि ग्रंथ त्यांच्याहि अभ्यासाच्या बाबतीत आपण पाश्चात्त्य पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे, असा टिळकांचा आग्रह होता. प्रो. मॅक्समुल्लर या थोर पंडिताचा मृत्युलेख टिळकांनी लिहिला आहे. त्यांत रॉथ, बॉप, वेबर, बुल्हर या पंडितांच्या कार्याचें महत्त्व सांगतांना ते म्हणतात, "त्यांनी प्राच्य-भाषा, प्राच्य-धर्म, या विषयांवर जे अनेक ग्रंथ लिहून ठेविले आहेत, ते इतके महत्त्वाचे आहेत की, प्राच्य-भाषांचा किंवा धर्म-ग्रंथांचा इतउत्तर जर कोणास सूक्ष्म व नव्या पद्धतीने अभ्यास करावयाचा असेल, तर या पाश्चात्त्य विद्वानांचे ग्रंथ वाचल्याखेरीज त्याच्या अध्ययनाची परिपूर्ति कधीहि व्हावयाची नाही." मॅक्समुल्लर यांच्याबद्दल तर टिळकांना इतका आदर होता की, त्यांनी त्यांना प्राचीन भारतीय ऋषिमुनींच्या पदवीला नेऊन बसविलें आहे, आणि म्हटलें आहे की, "विद्यादेवीची इतक्या एकनिष्ठपणे सेवा करणारे पंडित आमच्या देशांत प्राचीन काळीं पुष्कळ होत असत; व सायणाचार्यांसारखे तेराव्या शतकापर्यंत झालेले आहेत; पण मध्यंतरी ही परंपरा जी कमी झाली ती अद्यापहि पूर्ववत् झाली नाही, ही मोठया दुःखाची गोष्ट आहे. ग्रंथलेखनासाठी मॅक्समुल्लर यांस जी सवलत मिळाली ती दुसऱ्या कोणा विद्वानास मिळाली नसती असें नाही; पण त्यांच्यासारखी विद्याभिरुचि असणारा व एकनिष्ठपणें विद्याव्यासंग करणारा आमच्यामध्ये हल्लीच्या काळांत तरी कोणी नजरेस येत नाही, ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. हिंदुस्थानांतील आधुनिक विद्वानांनी प्रो. मॅक्समुल्लरांच्या चरित्रापासून जर कांही बोध घ्यावयाचा असेल तर तो हाच होय. राजकीय बाबतींत आम्हांस, आमच्या अंगी कितीहि गुण असले तरी, पुढाकार घेण्यास या राज्यांत संधि सापडणें कठीण आहे; पण विद्याव्यासंग, तत्त्वज्ञान, धर्मविचार किंवा शास्त्रीय शोध या बाबतींत आमच्या बुद्धीचा बराच उपयोग आम्हांस अद्याप करून घेतां येण्यासारखा आहे; व तेवढा जरी आमच्या विद्वानांनी करून घेतला तरी त्यापासून देशाचें पुष्कळ कल्याण झाल्याखेरीज राहणार नाही."
 हर्बर्ट स्पेन्सर या थोर पाश्चात्त्य पंडिताच्या अज्ञेयमीमांसेचें परीक्षण करतांना लो. टिळकांनी पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य विद्वान् यांचा असाच मुक्तकंठाने गौरव केला आहे. ते म्हणतात, "अलीकडे दोन-तीन शतकें ज्योतिषशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, विद्युच्छास्त्र वगैरे आधिभौतिक शास्त्रांची पुष्कळ अभिवृद्धि होऊन, जगांतील नैसर्गिक शक्तीने एकंदर पदार्थांचीं जीं स्थित्यंस्थरें किंवा रूपांतरे होतात त्यांचे नियम आपणांस अधिकाधिक कळत जाऊन, त्यापासून मनुष्यजातीचा अत्यंत फायदा झालेला आहे, ही गोष्ट सर्वांस निर्विवाद कबूल आहे." पाश्चात्त्य शास्त्रांचें असें महत्त्व सांगून, टिळकांनी त्या शास्त्रांच्या ज्ञानप्राप्तीच्या पद्धतीचें वर्णन केलें आहे. पाश्चात्त्य विद्येचें अनन्यत्व आहे तें त्या पद्धतींत आहे. "जड सृष्टीतील पदार्थांचें सूक्ष्म अवलोकन, तदंतर्गत गुणधर्माचें व्यवस्थित व सखोल विवेचन आणि परस्पर विभिन्न दिसणाऱ्या पदार्थांचें किंवा गुणधर्मांचें एकमेकांशी सदृशत्व किंवा विसदृशत्व समजणें हीं आता जशी सुगम झाली आहेत तश कधीहि झालेली नव्हती... त्याचप्रमाणे सर्व पदार्थांस सामान्यतः व्यापून असणारे दिक्कालादि पदार्थ अनादि व अनंत असले तरी, त्यांचा इतर पदार्थांशी कोणत्या प्रकारचा संबंध असतो, याचें अर्वाचीन शास्त्रांतून जितकें चांगलें विवेचन आहे, तितकें जुन्या ग्रंथांतून नाही व त्याचें कारणहि उघड आहे. गेल्या दोनशे-तीनशे वर्षांत आधिभौतिक शास्त्राची जी अभिवृद्धि झाली तिच्या योगाने हें ज्ञान आपणांस प्राप्त झालेलें आहे." (केसरींतील लेख, खंड ४ था, पू. ३०५). लो. टिळकांनी अत्यंत प्रांजल-बुद्धीने येथे पाश्चात्त्य विद्येची महती गायिली आहे. दिक्, काल हे तत्त्वज्ञानाचे विषय, पण त्यांचें स्वरूपहि अर्वाचीन शास्त्रांमुळे जास्त चांगलें स्पष्ट होतें, असें ते पूर्ण अनाग्रही वृत्तीने मान्य करतात, हे विचार त्यांनी १९०१ साली मांडले. त्यानंतर दोन वर्षांनी हर्बर्ट स्पेन्सर मृत्यु पावले. तेव्हा त्यांचा मृत्युलेख लिहितांना मॅक्समुल्लरसाहेबांच्या मृत्युलेखांतल्याप्रमाणेच त्यांनी उद्गार काढले आहेत. ते म्हणतात, "आजन्म विद्या-व्यासंग व तत्त्व-विचार यांत आपला सर्व वेळ घालविणारे व स्वभावतःच वैराग्यशील व विगततृष्ण असे महापुरुष आपल्या देशांत प्राचीन काळी बरेच होत असत, परंतु ती प्रवृत्ति नाहीशी होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत, व इंग्रजी शिकलेल्या विद्वानांतहि वैराग्य, तत्त्वज्ञान, सतत विद्याव्यासंग, हे गुण अद्याप दृष्टीस पडूं लागले नाहीत." हें दुःख व्यक्त करून शेवटीं समारोप करतांना टिळकांनी कपिल, गौतम, कणाद, बुद्ध या प्राचीन तत्त्ववेत्त्यांशी स्पेन्सरसाहेबांची तुलना केली आहे व "असे पुरुष देशांत उत्पन्न होणें हेंच देशाच्या सजीवतेचें लक्षण होय" असें म्हटलें आहे. (केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. ३५७, ३६७).
राष्ट्राचे नागरिक
 हिंदी समाज लो. टिळकांनी राष्ट्र या तत्त्वावर संघटित केला तो पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांच्या साह्याने केला, याचा अर्थ आता ध्यानांत येईल, असें वाटतें. राष्ट्रसंघटना याचा ढोबळ अर्थ सर्वांना माहीत असतो. ही संघटना धर्म- जाति-निरपेक्ष असते, ती वर्गभेद, प्रांतभेद मानीत नाही, एक ध्येय, एक राष्ट्रभाषा, एक परंपरा यांनी या संघटनेतील सर्व लोक एकजीव झालेले असतात, हीं तत्त्वें आता सर्वश्रुत झाली आहेत; पण याच्याहि पलीकडे एक अत्यंत महत्त्वाचें तत्त्व राहतें, त्याची जाणीव असावी तितकी लोकांना नसते. समाजांतील प्रत्येक माणसाला, सर्व समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी माझ्या शिरावर आहे, आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असले पाहिजे, अशी जेव्हा जाणीव असते तेव्हाच तो समाज राष्ट्रपदवीला जाऊं शकतो. ही जाणीव होणें म्हणजेच अस्मिता, व्यक्तित्व जागृत होणें; आणि राष्ट्राच्या नागरिकाचें व्यक्तित्व हे पहिले लक्षण होय. या व्यक्तित्वाची जागृति व परिपोष पाश्चात्त्य विद्येवांचून होणें शक्य नाही, हें लो. टिळकांनी प्रारंभीच जाणलें होतें. म्हणूनच पाश्चात्त्य विद्येच्या उपासनेसाठी त्यांचा अट्टाहास होता.
स्वावलंबन
 राष्ट्रांतील प्रत्येक नागरिक सर्व समाजाची चिंता वाहण्यास समर्थ व्हावा यासाठी उपाय काय? राष्ट्रीय प्रपंचाची सर्व कामें स्वतःहून अंगावर घेणें व तीं पार पाडणें हा एकच उपाय यावर आहे. आमचे उद्योगधंदे बुडाले. ते सरकार काढणार नाही, ते आमचे आम्हीं काढले पाहिजेत. कारखाने आम्हीं काढले पाहिजेत, भांडवल आम्हीं जमविलें पाहिजे. हें काम एकट्यादुकट्याचें नाही, म्हणून पाश्चात्त्यांचे अनुकरण करून आम्हीं प्रत्येक कामासाठी सभा स्थापिल्या पाहिजेत. हा विचार टिळक केसरीच्या पहिल्या वर्षापासून सांगत होते. "युरोप-अमेरिकेच्या इतिहासापासून घेण्याजोगी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची सभास्थापनपद्धति होय. राजकीय सभा, सामाजिक सभा, अर्थव्यवहार करणाऱ्या सभा, धार्मिक सभा. (कंपन्या, बँका, पेढ्या यांना टिळकांनी सभाच म्हटलें आहे). पाश्चात्य लोक हरएक कामांत सभा स्थापन करतात. आपण त्यांचें अनुकरण केलें पाहिजे. आपल्याकडे भांडवल नाही. एकेकटा मनुष्य कारखाने काढू शकणार नाही. तेव्हा सभा स्थापून भांडवल जमविणें यावांचून दुसरा तरणोपाय नाही. या सभा स्थापन करण्याचें काम ज्यांस इंग्रजी विद्येचा संस्कार झाला आहे अशाच लोकांनी प्रथम हातीं घेतलें पाहिजे; कारण त्यांच्या साह्यावांचून सभा स्थापन होणें अगदी अशक्य आहे; पण याआधी राजकीय सभा स्थापन झाल्या पाहिजेत. त्यांपासून मनुष्यास, एकत्र येऊन काम केल्याने किती फायदा होतो तें कळू लागतें. शिवाय जों जों अशा प्रकारची सभा मोठी असते तों तों तिचें अधिकाधिकच प्राबल्य होतें व सरकारासहि एक प्रकारची दहशत पडते. अशा रीतीने राजकारणी सभा स्थापण्याचें शिक्षण मिळाल्यावर उद्योगाच्या व व्यापाराच्या सभा स्थापणें सुलभ होतें." (वर्ष १, अंक ४९, ५०; केसरीतील निवडक निबंध, पहिलें पुस्तक, आवृत्ति २ री, पृ. २०८ - २१३ -दोन अंकांतील लेखांचा सारार्थ वर दिला आहे)." असा प्रयत्न इंग्रजी शिकलेल्यांनी केला पाहिजे. असे त्यांनी न केल्यास त्यांच्या देशहिताच्या संबंधाने सर्व गप्पा व्यर्थ जाणार आहेत व पाश्चात्त्य देशांतील लोक या देशास रानटी व सार्वजनिक कामांत उदासीन असें म्हणतात तें यथार्थ ठरणार आहे." (उक्त ग्रंथ, पृ. २१२).
 या देशाचें हेंच मुख्य दुखणे होते. येथले प्रजाजन सार्वजनिक कामांत उदासीन होते. असे लोक राष्ट्र घडवूं शकत नाहीत. अशा या प्रजाजनांना राष्ट्रभक्तीची दीक्षा देणें हें लोकमान्यांचें मुख्य कार्य होतें.
नवी शेती, नवे उद्योग
 राष्ट्रनिर्मिति करण्यासाठी टिळकांना या समाजपुरुषाच्या देहांतील प्रत्येक पेशी जागी करावयाची होती. या देहांतील प्रत्येक स्नायु चलनवलन करूं लागला पाहिजे, प्रत्येक वाहिनी, प्रत्येक धमनी आपलें जीवनरस वाहण्याचें काम उत्तम करूं लागली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. आपली शेती, या विषयावर बोलतांना, पांडुरंग गोपाळ बाळ महाजन यांना ते म्हणाले, "पूर्वीपासून चालत आल्याप्रमाणेच हे लोकशेती करतात; तींत सुधारणा म्हणून नाही. आपण सुधारणा करून इतरांच्या फायद्याकरिता तो अनुभव लोकांपुढे ठेवला पाहिजे." सांगलीला अस्पृश्यांतर्फे त्यांना मानपत्र देण्यांत आलें, त्या वेळी ते म्हणाले, "अस्पृश्यांनी शिक्षण घेतलें पाहिजे; पण तरी नोकरीच्या मागे त्यांनी लागूं नये. धंदा घाणेरडा म्हणून तो अपमानास्पद न मानतां, नवीन वळणावर त्याची सुधारणा करणें हेंच श्रेयस्कर. अस्पृश्य आपल्या धंद्याची सुधारणा करतील तेव्हाच त्यांचा उद्धार झाला असें मी समजेन." डॉ. मोतीराम वेलकर यांच्यापाशीं बोलतांना, स्वराज्य मिळाल्यावर अनेक प्रयोगशाळा काढून देशांतील वनस्पतींचें संशोधन करून, वैद्यकशास्त्रांत प्रगति करण्याचा आपला मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. कारण आता नुसतें कफ, वात, पित्त या कल्पनांना चिकटून चालणार नाही.
पाश्चात्त्य धर्तीचें स्वराज्य
 लोकमान्यांना शेती नवी हवी होती, उद्योग, वैद्यकशास्त्र नवें हवें होतें; आणि या जागृतींतून येणारें स्वराज्यहि नवें म्हणजे पाश्चात्त्य धर्तीचें हवें होतें. 'मराठा राष्ट्रीय संघा'तर्फे भरलेल्या सभेत लोकमान्य बोलत होते. ते म्हणाले, "आता आपल्याला पूर्वीचें स्वराज्य नको असून पाश्चात्त्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे आहे. आपल्या जातिभेदामुळेच येथे ब्रिटिशांचें राज्य स्थापन झालें आहे व जातिभेद असाच पुढे चालू राहणार असेल तर, स्वराज्यांतहि आमची अशीच अधोगति होईल." (आठवणी, २, २०३).
 जाति-पंथ-धर्मभेदातीत स्वराज्य, म्हणजेच हिंदी लोकांचें राज्य लोकमान्यांना हवें होतें. राष्ट्रसंघटना ती हीच; आणि त्यासाठी शेतकरी, अस्पृश्य, रेल्वेकामगार, वैद्य, मठपति या राष्ट्रपुरुषांच्या सर्व अवयवांत ते संजीवनी भरीत होते. एका खाजगी बैठकीत ते म्हणाले, "प्रस्तुत चळवळ मी करीत आहें याचा खरा अर्थ ध्यानांत घ्या, मी आज लोकजागृति करीत आहे. मृतवत् झालेल्या देहांत संजीवन घालीत आहे... ज्या दिवशी स्वराज्याशिवाय जगणें शक्य नाही, ही भावना लोकांत मुरेल, तो दिवस खरा... तोंपर्यंत लोकांत अग्नि चेतविणे एवढेच महत्त्वाचें काम करणें. जरूर आहे.
पाश्चात्त्य आदर्श
 पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति लोकमान्यांना किती प्रिय होती, हें यांवरून ध्यानांत येईल. राष्ट्र, लोकशाही, विज्ञानं या पाश्चात्य संस्कृतीच्या निष्ठा होत्या. समता, बंधुता, व्यक्तित्व, विचारस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, हीं तत्त्वें त्यांच्या बुडाशीं होतीं; आणि तीं सर्व पाश्चात्त्य विद्येतून निर्माण झाली होती. म्हणून स्वराज्याचें रूप ठरवितांना, चळवळीचे मार्ग, आखतांना, संस्था उभारतांना, संघटना करतांना पाश्चात्त्यांचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे, असें ते सांगत असत.
 १९०८ सालच्या 'समेट कसा होईल' या लेखांत ते म्हणतात "पार्लमेंट सभेंत राष्ट्राचें हित कसें साधतात याचें प्रत्यक्ष उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे; मग राष्ट्रीय सभेत अमुक पक्षाचे लोक पाहिजेत, बाकीच्यांनी तेथे येण्याचें प्रयोजन नाही, असा आग्रह धरणें अनुदारपणाचें लक्षण नव्हे काय? मतभेदामध्ये मतैक्य, बेकीमध्ये एकी उत्पन्न करून राष्ट्रकार्य कसें साधावयाचें या प्रश्नाचा पाश्चिमात्य लोकांनी निकाल लावलेला आहे." वंगभंगाच्या चळवळीला उत्तेजन देतांना, टिळक म्हणतात, "शंभरापेक्षा अधिक वर्षांच्या शिक्षणाने बंगाली लोक इंग्रजी रीतीची चळवळ करण्यास शिकले आहेत, आणि त्यांनी जर संघशक्ति अशीच कायम ठेविली तर त्यांच्या चळवळीचा पगडा सरकारवर बसण्याचा संभव आहे. (केसरी, १५-८-१९०५). रशिया, अमेरिका, आयर्लंड या देशांतील चळवळीचीं उदाहरणें त्यांनी अशाच संदर्भात दिली आहेत. "मॅचेस्टरवाल्यांनी केला तसा अन्याय अमेरिकेत झाला तेव्हा अमेरिकेत क्रान्ति झाली; रशियांतील प्रोफेसरांनी, मजुरांनी, विद्यार्थ्यांनी, कारखानदारांनी, एडिटरांनी, दुकानदारांनी आपले म्हणणें धैर्याने, कशाचीहि परवा न करता, झारसाहेबांपुढे मांडले तेव्हा जगांतील सर्व बादशहांत प्रबळ असे हे बादशहा मट्ट्यास आले. हिंदुस्थानांतहि अशी लढाई जुंपण्याची चिन्हें दिसूं लागलीं आहेत." (केसरी, २८-११-१९०५). आयर्लंडांत लँडलीग म्हणून जी सभा आहे, त्या सभेने पुष्कळ जमीनदार लोकांस बहिष्कृत केलें आहे. अशाच तऱ्हेने जर या वेळेस आपल्याकडे बहिष्काराचे रूपांतर होईल तर त्यापासून पुष्कळच फायदा होईल."
 लोकमान्यांना स्वराज्य हवें होतें तें पाश्चात्त्य धर्तीचे हवें होतें, हें वर सांगितलेंच आहे. त्यामुळेच राष्ट्रसभा, सार्वजनिक सभा, होमरूल लीग अशा पाश्चात्त्यांसारख्या संस्था स्थापून, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता, विचारस्वातंत्र्य इत्यादि पाश्चात्त्य संस्कृतीतील तत्त्वांचा अवलंब करून, आणि स्वदेशी बहिष्कार, करबंदी अशा मार्गांनी लोकांनी जागृत होऊन, त्याग करून, दंड, तुरुंग, मृत्यु या शिक्षा सोसून स्वराज्य मिळविलें तरच तें टिकविण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगी येतें हें त्यांनी जाणलें होतें. पाश्चात्त्य विद्या, पाश्चात्त्य संस्कृति व पाश्चात्य कार्यपद्धति यांविषयी त्यांचा आग्रह होता तो यासाठीच.




-३-

प्राचीन परंपरा


संजीवनी
 लो. टिळक हे प्राचीन परंपरेचे अतिशय अभिमानी होते. हिंदुस्थानची प्राचीन परंपरा अत्यंत उज्ज्वल असून, जगांतल्या इतर कोणत्याहि देशाच्या वा समाजांच्या परंपरेपेक्षा ती फार श्रेष्ठ होती, असें त्यांचें निश्चित मत होतें. आपल्या परंपरेच्या श्रेष्ठतेची जाणीव, तिचा सार्थ अभिमान, म्हणजे एकराष्ट्रीयत्वाची संजीवनीचं होय, असें त्यांना वाटत असे. त्या वेळी देश पारतंत्र्यांत होता, आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांची वैज्ञानिक पाश्चात्त्य संस्कृति ही तत्कालीन हिंदु संस्कृतीपेक्षा प्रत्येक बाबतींत श्रेष्ठ आहे, असें पावलोपावलीं प्रत्ययास येत होतें. यामुळे हिंदी जनतेचा आत्मविश्वास खचत चालला होता. तो तसा खचावा, आपण स्वराज्याला, स्वातंत्र्याला लायक नाही, असें वाटून हिंदी मनाला मरगळ यावी व पारतंत्र्याविरुद्ध झगडा करण्याची त्यांची शक्ति, त्यांची इच्छाच नष्ट व्हावी, असा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जाणूनबुजून प्रयत्न चालविला होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी या सांस्कृतिक आक्रमणाला कसें तोंड दिलें व महाराष्ट्रियांचा स्वाभिमान कसा जागृत केला, हें मागे आपण पाहिलेच आहे. लो. टिळकांनी त्यांचें तेंच कार्य दृढनिश्चयाने पुढे चालवून हिंदी जनतेंत चैतन्य निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न चालविला होता.
 पण यामुळेच, परंपरेच्या या अभिमानामुळेच लो. टिळकांना अनेकांनी प्रतिगामी, पुराणवादी, पुनरुज्जीवनवादी, सुधारणाविरोधी, कर्मठ सनातनी ठरविलें होतें, आणि आजहि त्यांच्या कार्याचें मूल्यमापन करतांना कांही पंडित या आरोपांचा पुनरुच्चार करतांना दिसतात. म्हणून टिळकांच्या या परंपराभिमानाचे स्वरूप काय होतें तें तपासून पाहणें आवश्यक ठरते.
आक्षेप
 प्रतिगामी, पुराणवादी याचा अर्थ स्पष्ट आहे. परंपरेने चालत आलेल्या जुन्या रूढि, त्या कालबाह्य झाल्या असल्या, समाजाला घातक ठरत असल्या तरी, अंधश्रद्धेने तशाच पुढे चालविल्या पाहिजेत, असा हट्टाग्रह धरणारा तो पुराणवादी होय. कर्मठ सनातनी याचा अर्थ असाच आहे. समाजांतल्या अनेक आचारांना कालांतराने अर्थ राहत नाही. त्यांतलें मूलतत्त्व नाहीसें झालेलें असतें. तरी अंधपणे ते आचार तसेच पाळत राहणारा तो कर्मठ सनातनी होय. पुनरुज्जीवनवाद तो हाच. इंग्रजीतील रिव्हायव्हॅलिझम या शब्दाचा तो मराठी प्रतिशब्द आहे. जुन्या पीठिका, परंपरा, रूढि यांचा त्या जुन्या म्हणूनच अभिमान धरणें, त्या पुराण आहेत म्हणूनच, साधु आहेत, असें म्हणणें, हा पुनरुज्जीवनवाद होय. लो. टिळकांनी संमतिवयाच्या कायद्याला केलेला विरोध, त्यांनी प्रार्थनासमाजावर केलेली टीका, रानडे, भांडारकर यांच्या अनेक आचारविचारांवर घेतलेले आक्षेप यांचा आधार घऊन, टीकाकारांनी टिळकांना वरील विशेषणे लावलेलीं आहेत.
 पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांचे टिळक किती महत्त्व मानीत होतें, ती विद्या येथे आमच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली पाहिजे, याविषयी त्यांचा कसा आग्रह होता, प्रत्यक्षनिष्ठा, विचारस्वातंत्र्य, अनाग्रही-बुद्धीने केलेलें सत्य संशोधन या पाश्चात्त्य संस्कृतीच्या मूलतत्त्वांचा त्यांनी निश्चयाने कसा पुरस्कार चालविला होता, याचें मागील प्रकरणांत केलेलें विवेचन काळजीपूर्वक वाचलें तर टिळकांच्यावर कर्मठपणाचा, अंधश्रद्धेचा आरोप लोकांनी करावा, आज पन्नास वर्षांनंतरहि करावा, याचें आश्चर्य वाटेल; पण यासाठीच टिळकांच्या परंपरेच्या तत्त्वज्ञानाचें परीक्षण करणें अवश्य आहे.
परिवर्तनाचा पुरस्कार
 जातिभेद, अस्पृश्यता, चातुर्वर्ण्य हा, सनातन्यांच्या मतें, हिंदु धर्माचा आत्मा होय. लो. टिळकांचें यांविषयी काय मत होतें? १९०७ साली बेळगाव येथे 'सरकारी शिक्षण व राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर त्यांचे भाषण झाले. त्यांत ते म्हणाले, "जातिभेद, जातिद्वेष, वा जातिमत्सर यांच्या योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे, याचेंहि ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळालें पाहिजे." "परमेश्वर अस्पृश्यता मानील तर मी परमेश्वरच मानणार नाही" हे त्यांचे उद्गार इतिहासाने नमूद केलेले आहेत. १८९१ सालीं डॉ. भांडारकर यांनी आपल्या गतभर्तृका कन्येचा पुनर्विवाह केला. तेव्हा टिळकांनी त्यांच्या मनोधैर्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलें व प्रत्यक्ष कृतिरूप सुधारणा करणें हाच सामाजिक सुधारणा करण्याचा खरा मार्ग होय, असे उद्गार काढले. १८९३ सालीं धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला त्या वेळी त्यांचेहि टिळकांनी अभिनंदन केलें व ते पानसुपारीलाहि गेले होते. बालविवाहाच्या संबंधांत टिळकांनी १८९० साली जें पत्रक काढलें होतें प्रसिद्धच आहे. चार-पांचशे लोकांनी एकत्र येऊन करार करून, मुलीचें लग्न सोळा वर्षांच्या आंत करूं नये, पुरुषाने चाळीसच्या पुढे लग्न केल्यास विधवेशीं करावें, विधवेचें वपन करूं नये, अशा कांही सुधारणांस स्वतः बांधून घ्यावें, असें तें पत्रक होतें; आणि टिळकांनी स्वतःच्या मुलीचा विवाह तिच्या वयाच्या पंधराव्या वर्षानंतरच केला. आनंदीबाई जोशी त्या काळांत अमेरिकेत जाऊन डॉक्टर होऊन आल्या त्या वेळी टिळकांनी त्यांचें मुक्तकंठाने अभिनंदन केलें व "आनंदीबाईंची मूर्ति शांतपणे सर्व कुलीन स्त्री-पुरुषांच्या हृदयांत निरंतन वास करील", असे त्यांच्याविषयी धन्योद्गार काढले.
 पतितपरावर्तन किंवा शुद्धि याला सनातन शास्त्री-पंडितांचा तीव्र विरोध होता व अजूनहि आहे; पण लो. टिळक शुद्धीचे पुरस्कर्ते होते. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्याशी बोलतांना ते एकदा म्हणाले, "हे आमचे जुने लोक खुळचटपणाचे वाद किती दिवस करीत बसणार आहेत, समजत नाही. जग किती धडाक्याने पुढे चाललें आहे. जो तो आपल्या धर्माची संख्या वाढवीत आहे; आणि आमचे शास्त्री-पंडित पाहवे तर पतितपरावर्तन योग्य की अयोग्य, याचा वाद—विवादच करीत बसले आहेत." (आठवणी खंड २, पृ. ११०). पण पतितांचें परावर्तन एवढ्याचाच टिळक पुरस्कार करीत असें नाही. धर्माच्या कोणत्याहि क्षेत्रांतील समाजाच्या प्रगतीला अवश्य जें परिवर्तन त्याचा ते नेहमीच पुरस्कार करीत. 'हिंदुत्व आणि सुधारणा' या लेखांत त्यांनी म्हटलें आहे की, "हिंदु धर्मांतील तत्त्वें सुधारणेस प्रतिकूल आहेत, असें नाही. असें असतें तर आजपर्यंत हिंदु धर्माने टिकावच धरला नसता व हिंदु राष्ट्रहि कायम राहिलें नसतें." याच भावार्थाने, "आता स्मृतिकार निर्माण झाला पाहिजे, स्मृति बदलण्याचा काळ आता आला आहे", असा विचार त्यांनी एकदा मांडला होता. (आठवणी खंड २, पृ. ४१९).
वेदांविषयी
 वेदांचें प्रामाण्य व वेदांचें अपौरुषेयत्व हीं दोन्ही लो. टिळकांना मान्य होतीं, असा एक समज रूढ आहे; आणि त्याला आधारहि आहे. हिंदु धर्माचें लक्षण सांगतांना त्यांनी 'प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु' असें पहिलेच लक्षण सांगितलें आहे. आणि प्रो. जिनसीवाले ह्यांनी वेद हे अपौरुषेय मानतां येत नाहीत, असा पक्ष मांडला असतांना, टिळकांनी उलटपक्ष घेऊन, वेद अपौरुषेय आहेत, असा विचार मांडला होता. पण असें जरी असले तरी प्रामाण्य व अपौरुषेयत्व यांचा जो रूढ अर्थ आहे, त्याअन्वये टिळकांना तीं तत्वें मान्य होतीं असें कधीच म्हणतां येणार नाही. गीतेच्या दुसन्या अध्यायांत "वेदवादरताः पार्थ", "यावानर्थ उदपाने" आणि "त्रैगुण्यविषया वेदाः" या श्लोकांत श्रीकृष्णांनी वेदांचा जो अधिक्षेप केला आहे तो टिळकांनी पूर्णपणे मान्य केला आहे. कांही उपनिषदांतहि वेदांतील यज्ञयागांचा अधिक्षेप आहे. त्यांचेहि टिळकांनी समर्थन केलें आहे. यामुळे वेदांना साहजिकच गौणत्व येते; पण टिळकांनी तें मान्य करून वेदांचा गौरव करणारा असा जो त्या श्लोकाचा सांप्रदायिकांनी लावलेला अर्थ तो त्याज्य ठरविला आहे. हें ध्यानांत घेऊनच त्यांच्या वेदप्रामाण्याचा अर्थ आपण केला पाहिजे; शिवाय, मागल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे, पाश्चात्त्यांच्या ज्या अनेक संस्थांचें व तत्त्वांचे अनुकरण करावयास त्यांनी सांगितले त्यांचे विवेचन करतांना त्यांनी वेदप्रामाण्याचा उल्लेख सुद्धा केलेला नाही, आणि इतरत्रहि कोठे, वेदवचन असें आहे म्हणून तुम्ही असें आचरण करा, असें चुकून सुद्धा त्यांनी सांगितलेलें नाही. तेव्हा वेदप्रामाण्य याचा, वैदिक परंपरेचा वारसा, तिचा अभिमान यापलीकडे कांहीच अर्थ त्यांच्या मनांत नव्हता हे उघड आहे.
 वेदांच्या अपौरुषेयत्वाचें असेंच आहे. वेद अर्थाच्या दृष्टीने नित्य-शब्दांच्या दृष्टीने नव्हे, आणि अतिप्राचीनत्वाच्या दृष्टीने अनादि, असा प्राचीन ऋषींनी अर्थ केला होता व त्याच दृष्टीने ते अपौरुषेय होत, असा खुलासा टिळकांनी केलेला आहे. पण त्याहिपेक्षा निर्णायक गोष्ट ही की, टिळकांनी वेदांचा कालनिश्चय केलेला आहे. इ. पू. ५००० च्या सुमारास वेदरचना पूर्ण झाली असा सिद्धान्त त्यांनी मांडला आहे. यावरून वेद अपौरुषेय नव्हते, आणि अनादीहि नव्हते असेंच त्यांचें मत होतें हैं दिसून येतें. वेदरचनाकर्ते पुरुष उत्तर ध्रुवाजवळ राहत होते, असें सांगतानाहि त्यांनी वेदांचें मानवी कर्तृत्व उघड उघड मान्य केलें आहे. त्या ऋषींच्या भौगोलिक परिस्थितीचें वर्णन त्यांत आहे, म्हणूनच उत्तर ध्रुवाचा सिद्धान्त त्यांना भांडतां आला. अपौरुषेयत्व किंवा परमेश्वरकर्तृत्व जर मानलें, तर विशिष्ट भौगोलिक परिस्थितीचा संबंधच येत नाही. शिवाय 'खाल्डियन वेद व अथर्ववेद' या प्रबंधांत त्यांनी खाल्डिया व भारत यांच्यांत त्या काळीं दळणवळण असलें पाहिजे व त्यामुळेच अथर्ववेदांत खाल्डियन वेदांतील कांही शब्द व कांही विचार आलेले आहेत, असा विचार मांडलेला आहे. यावरून तर वेदांचें मानवी कर्तृत्व त्यांना संपूर्णपणे मान्य होतें हें अगदी स्पष्ट होतें.
 जातिभेद, अस्पृश्यता या रूढि टिळकांना मान्य नाहीत. जन्मनिष्ठ, विषमता- मूलक चातुर्वर्ण्य त्यांना मान्य नाही. बालविवाहाची रूढि घातक आहे, असें ते म्हणतात. पुनर्विवाह करणाऱ्यांचे ते अभिनंदन करतात. शुद्धीचा ते पुरस्कार करतात. धर्मपरिवर्तनाचा आग्रह धरतात. वेदांचें प्रामाण्य व वेदांचें अपौरुषेयत्व हेंहि त्यांना मान्य नाही, आणि शंकराचार्यांच्या गीताभाष्याचे खंडन करून हजारो वर्षे हिंदु-मनावर असलेलें त्यांचे वर्चस्व त्यांनी नष्ट करून टाकलें. आणि तरीहि प्राचीन परंपरेचा त्यांना अभिमान होता, याचा अर्थ काय?
प्रेरणा व स्फूर्ति
 १९०८ सालीं अकोला येथे लो. टिळकांचे 'शिवाजीमहाराज व परिस्थितीचें बंड' या विषयावर व्याख्यान झालें. त्यांत त्यांनी याचा अर्थ स्पष्ट केला आहे. (व्याख्यानें, पृ. २३७), "शिवाजीने केलें तेंच आम्हांस करावयास सांगता की काय?" असा प्रश्न तेव्हा लोक विचारीत. शिवाजीने मुसलमानांशी लढाया केल्या. मराठ्यांनी बंगालवर स्वाऱ्या केल्या, तसें पुन्हा करावयाचें की काय?- असा या प्रश्नाचा भावार्थ आहे. त्यावर टिळकांचें उत्तर असें की, तसें नाही. शिवाजीमहाराज ही एक प्रेरणा आहे. स्फूर्ति आहे. कशीहि परिस्थिति आली तरी, आम्ही तिच्यावर मात करूं शकतों, हा विश्वास त्यांच्या स्मरणामुळे निर्माण होतो. टिळक म्हणतात, "शिवाजीने केलें तसें तसें तंतोतंत करा, असें आम्ही सांगतों म्हणूंन कोणाचा गैरसमज असल्यास तो काढून टाका. वैश्वदेवाचे वेळीं बापाचा कासोटा सुटत होता म्हणून मुलाने मुद्दाम सोडणें हें जितकें मूर्खपणाचें, तितकेंच हें मूर्खपणाचें आहे." मग शिवाजीचें स्मरण कशाला? त्याचा उत्सव कशाला?
आत्मविश्वास
 "निराशेच्या व अंधकाराच्या परिस्थितींतून आम्ही एकदा वर आलो. ती परिस्थिति ज्यांनी बदलली त्यांचे आम्ही वंशज आहों, त्यांचेच रक्त आमच्यांत खेळत आहे, तेव्हा आम्हीहि सध्याची निराशेची परिस्थिति बदलूं शकूं, हा आत्मविश्वास जोपासण्यासाठी महाराजांचा उत्सव करावयाचा. इतर देशांत थोर लोक झाले नाहीत असें नाही. अमेरिकेचा वाशिंग्टन तसा पुरुष होता; पण शिवाजींच्या धैर्याकडे पाहवयाचें तें एवढ्यासाठी की, शिवाजी आपल्यांतला असून त्याने महकार्य केलें. लॉर्ड कर्झन यांनी लॉर्ड क्लाइव्ह याच्या स्मारकाचा उपक्रम केला होता. त्यांना जितका क्लाइव्ह प्रिय त्यापेक्षा शिवाजीमहाराज महाराष्ट्राला शतसहस्र, नव्हे तर लक्षपट प्रिय असले पाहिजेत. स्वराज्य म्हणजे देशप्रीति, पराक्रम, परिस्थिति जिंकून पराक्रम करणें- हें शिवाजीच्या चरित्राचे रहस्य आहे. किंबहुना हा त्या चरित्राचा जीव की प्राण आहे."
मी - जाणीव
 परंपराभिमानाचा अर्थ यावरून स्पष्ट होईल. शौर्य, धैर्य, पराक्रम, स्वराज्याकांक्षा, कर्तृत्व, परिस्थितीवर मात करण्याची शक्ति माझ्या ठायीं आहे, असा आत्मप्रत्यय म्हणजे एकंदर मानवी गुणसंपदा हा समाजाचा प्राण होय. परंपरेच्या अभिमानाने हा प्राण टिकवितां येतो. म्हणून त्या अभिमानाचें देशाला महत्त्व. विशिष्ट रूढि, विशिष्ट आचार, किंवा त्या परिस्थितीमुळे उद्भवलेले शत्रु-मित्र-भाव, त्या वेळी अंगीकारलेली तत्त्वें ह्यांचें अनुकरण म्हणजे परंपरेचा अभिमान, असा अर्थ नाही. यामुळेच मुस्लिमांनीहि शिवाजी-उत्सवांत सहभागी व्हावें, असें टिळक सांगत. कारण शिवाजीमहाराज हें एक राष्ट्रीयत्वाचें प्रतीक होतें. बंगाली लोकांनी मोठ्या भक्तिभावाने शिवाजी-उत्सव केला तो याच कारणासाठी. पूर्वजांच्या उत्सवामुळे, महाभारत, रामायण, वेद-उपनिषदें या ग्रंथांच्या पठनाने, स्फूर्ति मिळते, चैतन्य भरतें, संजीवनी लाभते, आत्मविश्वास जागृत होतो. म्हणजेच समाज जिवंत राहतो! बिल् ड्युरँट याने म्हटल्याप्रमाणे, मी कोण, ही जाणीव मनुष्याला सतत कायम राहणें अवश्य असतें. ती क्षणमात्र ढळली तर तो वेडा ठरेल. व्यक्तीच्या ठायीं या मी-च्या जाणिवेचें जें महत्त्व तेंच परंपरेच्या जाणिवेचें, स्वत्वाच्या सातत्याचें, पूर्वजांच्या अभिमानाचें राष्ट्राच्या, समाजाच्या ठायीं महत्त्व आहे. लो. टिळकांच्या परंपरेच्या अभिमानाचा हाच अर्थ आहे.
 वरील व्याख्यानाचा समारोप करतांना ते म्हणाले, "स्वार्थ, भीति, यांनी प्रेरित झालेल्या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देतां, पूर्वजांचे पराक्रम आठवून त्यांचेंच रक्त आपल्या अंगांत खेळत असून, त्यांनी केलेली कर्तबगारी करून दाखविण्याचें सामर्थ्य आपणांत आहे, अशी मनाची खात्री ठेवून काम केल्यास परमेश्वर आपणांस यश देईलच देईल."
ऐक्याची वृद्धि
 लो. टिळकांच्या प्रत्येक कार्यामागे भारतांत एकराष्ट्रीयत्व निर्माण करणें हेंच उद्दिष्ट होतें; आणि त्या एकराष्ट्रीयत्वासाठी पाश्चात्य विद्या व संस्कृति यांचे साह्य त्यांना जसें अवश्य वाटत होते तितकीच, किंबहुना एका दृष्टीने त्यापेक्षा जास्त, भारतीय परंपरेच्या अभिमानाची जागृति हीहि त्यांना अवश्य वाटत होती. परंपरेचा अभिमान हा राष्ट्र-संघटनेचा त्यांना प्राणच वाटत होता. शिवाजीउत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे, असें ते आग्रहाने सांगत त्याचें हेंच कारण आहे. गणेशोत्सवहि त्यांनी याच दृष्टीने सुरू केला होता. 'यंदाचा गणपत्युत्सव' या लेखांत ते म्हणतात, "कोणत्याहि लोकांत ऐक्याची वृद्धि होण्यास जीं अनेक साधनें असतात त्यांपैकीच एक उपास्यदैवत असणें हें एक कारण आहे... आणि वर्षांतून दहा दिवस तरी एकाच देवतेच्या भजन-पूजनांत लोक निमग्न झाल्याने त्यांच्यांत ऐक्याची वृद्धि होणार नाही, असें कोण म्हणेल?" अशा भजन-पूजनांतून स्वधर्माचा अभिमान जागृत करणें व त्यांतूनच राष्ट्रभक्तीची शिकवण देणें हें त्यांचें उद्दिष्ट होतें. कारण, ते म्हणतात, "स्वधर्माच्या श्रेष्ठत्वाचा ज्यांस अभिमान वाटत नाही त्यांस स्वराष्ट्राच्या श्रेष्ठत्वाचा तरी अभिमान कोठून वाटणार?" (केसरीतील लेख, खंड १, पृ. ४८७).
 'गणेशोत्सवाचा समारोप' या व्याख्यानांत टिळकांनी राष्ट्रीय जागृतीसाठी, स्वराज्यप्राप्तीसाठी हा उत्सव आहे, हें स्पष्ट केलें आहे. ते म्हणाले, "हा उत्सव दहा दिवस आहे. त्यानंतर वर्षभर तुम्ही काय करणार? माझें असें सांगणें आहे की, हजारो वर्षे जी गोष्ट तुम्ही भोगलीत ती गोष्ट- स्वराज्य– गेल्याबद्दल तुमच्या मनाला चटका लागेल, असे कांही करा." असें कांही करावयाचें म्हणजे काय करावयाचें? तर "गणपतीच्या विसर्जनानंतर स्वदेशी व बहिष्कार ही वाळू येथून नेऊन तुम्ही आपआपल्या घरांतून पसरावी व बहिष्काराचे शत्रु हे जे उंदीर त्यांपासून आपला बचाव करावा."
पारमेष्ठ्य
 याच व्याख्यानांत राष्ट्रजागृतीचा हा मार्ग सांगून 'स्वराज्या'चा संबंध त्यांनी प्राचीन परंपरेशी जोडून दिला आहे. ते म्हणाले, "गणपतीची आराधना करतांना स्वराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य राज्य, अधिराज्य, हें मागण्याची आपली पूर्वापार चाल आहे. हे शब्द ज्या मंत्रांत आहेत ते मंत्र प्राचीन आहेत. तुम्ही त्या शब्दांचा अर्थ विसरून गेला होता. ही कल्पना पुन्हा आठवावी म्हणून बंगाल्यांतील चळवळ झालेली आहे... तुमच्या यत्नांचा लय अखेरीस पारमेष्ठ्यांत होईल. (व्याख्यानें पृ. ५४).
राष्ट्रीय उत्सव
 हे दोन्ही उत्सव नव्या पद्धतीने व्हावे याबद्दल टिळकांचा कटाक्ष होता. हिंदु धर्मांत सण व उत्सव पुष्कळ आहेत; पण ते बहुतेक घरगुती आहेत. सार्वजनिक नाहीत. पंढरीच्या विठोबाच्या यात्रेसारखे कांही उत्सव सार्वजनिक आहेत, पण हे उत्सव अथवा यात्रा पुरातन असल्याने त्यांचें स्वरूप आपणांस पाहिजे त्या रीतीचें करणें अशक्य नसलें तरी बहुतेक असाध्य आहे. तेव्हा ती उणीव भरून काढण्यासाठी हे राष्ट्रीय उत्सव सुरू केलेले आहेत. गणेशोत्सवाप्रमाणेच शिवाजीउत्सवाविषयीहि त्यांनी असाच विचार मांडलेला आहे. ते म्हणतात, "कित्येकांस अशी धास्ती आहे की, शिवाजी-उत्सव लवकरच रामनवमीच्या थाटावर जाईल व त्यापासून फारसें हित होणार नाही, परंतु असल्या शंका निराधार आहेत. शिवाजीमहाराज अवतारी पुरुष असले तरी त्यांचा उत्सव आम्ही करतों, तो ते मार्गदर्शक थोर पुरुष होते म्हणून करतों. अवतारी पुरुष होते या दृष्टीने नव्हे, ही गोष्ट सर्वांनी लक्षांत ठेविली पाहिजे. रामजयंतींत व शिवजयंतींत भेद आहे तो हाच होय. रामचंद्रांनी वानरांच्या साह्याने लंका घेतली ही गोष्ट आता पौराणिक झाली; पण श्रीशिवाजीमहाराजांनी मावळ्यांच्या साह्याने मराठी राज्याची स्थापना केली ही गोष्ट पौराणिक होऊं शकत नाही. हीं त्यांच्या कृतीचीं फलें जोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर आहेत, तोपर्यंत शिवजयंतीचा उत्सव केवळ दैविक पुरुषांच्या उत्सवाप्रमाणे होईल अशी भीति बाळगण्याचे कारण नाही." (केसरीतील लेख, खंड १ला, पृ. ४८७, ५३१) लोकमान्यांना परंपरेचा अभिमान जागृत करावयाचा होता तो स्वराज्यासाठी, अधिराज्यासाठी, पारमेष्ठ्यासाठी, हें यावरून स्पष्ट होईल. म्हणूनच त्यांना महत्त्व वाटे तें त्या चैतन्याचें, बाह्य आचाराचें नव्हे!
 आचार, विचार, रूढि, तत्त्वें, संस्था, धोरणें बदलली तरी परंपरेचा त्याग केला, असें होत नाही. त्या प्राचीन वैभवाचें, कर्तृत्वाचे, गुणसंपदेचें आम्ही वारस आहों, ही जाणीव- तिचें रक्षण- म्हणजे परंपरेचें रक्षण होय. 'हिंदु धर्मांतील एकी व सहिष्णुता' या व्याख्यानांत टिळक म्हणतात, "आमच्या परंपरेला विरुद्ध न जातां- आणि ही मर्यादा अत्यंत महत्त्वाची आहे.- ज्या गोष्टींचा स्वीकार करणें इष्ट वाटेल त्या गोष्टी स्वीकारणें ही आमची फार दिवसांपासूनची प्रवृत्ति आहे. हिंदूंवर अनेक वादळें आलों... तरी आमचा धर्म आज जिवंत आहे, हें हिंदु धर्माच्या अंगीं असलेल्या लवचिकपणाचें फल होय." (व्याख्यानें, पृ. ३०). "आम्हांला धर्मदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या वळण पाहिजे आहे," असें 'आमचें कर्तव्य' या व्याख्यानांत त्यांनी म्हटलें आहे (पृ. ५०). म्हणजे या तीनहि क्षेत्रांत परिवर्तन होणें त्यांना अवश्य वाटत होतें. मग सातत्य, अखंडत्व कशांत राहिलें? याच व्याख्यानांत ते पुढे म्हणतात, "तुमच्या धर्मांतील जिवंतपणा व तेज आणि तुमची ऐतिहासिक परंपरा लक्षांत घेतां तुम्हांला अपयश कधीहि येणार नाही, अशी माझी खात्री आहे."<br?हे ज्ञात होतें
 सुप्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ग्रंथांच्या आधारें मराठींत श्री. ना. ल. फडके यांनी 'अज्ञेय मीमांसा' असा ग्रंथ तयार केला होता. त्याचें परीक्षण करतांना लो. टिळकांनी, प्रथम हे अवघड कार्य केल्याबद्दल फडके यांची प्रशंसा केली आणि नंतर त्यांच्यावर अशी टीका केली की, स्पेन्सरसाहेबांचे सिद्धान्त स्पष्ट करतांना आमच्या प्राचीन ऋषींनी अशाच तऱ्हेचे तत्त्वविचार पूर्वी सांगितले होते, हा विचार त्या ग्रंथांत सांगून, त्या दोन तत्त्वविचारांतील साम्य-वैषम्याचा विचार फडके ह्यांनी केला नाही; तो करावयास हवा होता. कारण तसें न केल्यामुळे, हा कांही तरी नवीनच विचार आपण ऐकत आहोंत, आपल्याकडे असें प्रगल्भ तत्त्वज्ञान पूर्वी नव्हतें, असा समज होतो आणि तसा समज होणें अगदी अनिष्ट आहे. टिळक म्हणतात, "हे आधुनिक काळचे ऋषिवर्य आम्हांस पूज्य व वंद्य आहेत; पण त्यामुळे आम्ही आपल्या पूर्वीच्या ऋषिवर्यांस विसरून केवळ स्पेन्सर- साहेबांचे पोवाडे गात बसावें हें आम्हांस बरें वाटत नाही." (केसरींतील लेख, खंड ४, पृ. २४०).
मालिन्य झटकले
 लो. टिळकांनी ही टीका केली त्या वेळीं (इ. स. १८९६) तर तिचें महत्त्व फार होतें. हिंदुस्थानांतील जनतेचा आत्मप्रत्यय त्या वेळी नष्ट होण्याची वेळ आली होती. इंग्रजांच्या आक्रमणामुळे, पारतंत्र्यामुळे, आणि त्यांच्या भौतिक, वैज्ञानिक संस्कृतीच्या दीप्तीमुळे आपल्या हिंदी समाजाचा तेजोभंग झाला होता. पाश्चात्त्यांच्या तुलनेने, आपण फारच हीन दर्जाचे लोक आहों, असा भाव त्यांच्या मनांत येत होता. अशा वेळीं हें मनोमालिन्य नष्ट करण्याची फार आवश्यकता होती. आणि त्याला उपाय एकच. एके काळी आम्हीहि पराक्रमी, कर्तृत्वशाली होतों, हर्बर्ट स्पेन्सरसारख्या जगविख्यात तत्त्ववेत्त्यासारखें गहन तत्त्वचिंतन करण्याचें सामर्थ्य आमच्या ठायींहि होतें, ही जाणीव जागृत करणे हाच तो उपाय होय. पूर्वी आम्ही पराक्रमी होतों या जाणिवेने आजहि तोच पराक्रम करण्याचे सामर्थ्य आमच्या ठायीं आहे, आम्ही हीन दर्जाचे नाही, हा भाव उदित होऊन मनावरचें मालिन्य झटकून जातें.
अस्मिता
 श्रीस्वामी विवेकानंद समाधिस्त झाले त्या वेळी त्यांच्या कार्याचा टिळकांनी त्यांच्यावरच्या मृत्युलेखांत गौरव केला. त्यांत हीच विचारसरणी आहे. पाश्चात्त्य आमच्यापेक्षा सर्व दृष्टींनी श्रेष्ठ आहेत, ते आमचे गुरु आहेत, आमच्या उद्धारासाठी परमेश्वराने त्यांना हिंदुस्थानांत धाडलें आहे, ही दैवी योजना आहे, अशा तऱ्हेचे विचार येथले मोठमोठे विचारी पुरुष मांडीत होते. असें असतांना पाश्चात्त्य देशांतील सर्वश्रेष्ठ देश जो अमेरिका तेथे जाऊन सर्व जगाच्या धर्मपरिषदेत 'हिंदु धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे' हा सिद्धान्त एका हिंदु संन्याशाने जगज्जेत्या लोकांच्या गळीं उतरवावा व 'विवेकानंद म्हणजे परमेश्वराचा अवतार आहे', 'विवेकानंद म्हणजे ख्रिस्ताची मूर्ति आहेत', असे धन्योद्गार त्यांच्या मुखी आणावे यापेक्षा जास्त चैतन्यप्रद, स्फूर्तिप्रद, उत्साहदायक काय असूं शकेल? "स्वामींनी आमच्यावर अनंत उपकार करून ठेविले आहेत", असें टिळकांनी म्हटलें आहे तें याच कारणासाठी. हिंदी राष्ट्राच्या अस्मितेला त्यांनी संजीवनी दिली; आणि ती प्राचीन धर्म-तत्त्वांच्या वेदान्ताच्या, पुनरुज्जीवनाने!
आत्मप्रत्यय
 लो. टिळकांनी भारताच्या प्राचीन वाङ्मयाचा अतिशय सखोल अभ्यास करून त्यावर अनेक ग्रंथ लिहिले, निबंध लिहिले, इतरांनी लिहिलेल्या ग्रंथांची परीक्षणे केली. याच्या मागे अनेक हेतु असले तरी त्यांतील प्रधान हेतु एकच होता. या भरतभूमीचें, तिच्या प्राचीन वैभवाचें, तिच्या धर्माचें, तिच्यांतील थोर पुरुषांचें, त्यांच्या तत्त्वचिंतनाचें, कर्तृत्वाचें, प्रज्ञेचें, बुद्धिमत्तेचें श्रेष्ठत्व सिद्ध करणें आणि तें हिंदी जनतेला व जगाला दाखवून देणें हा तो हेतु होय. प्राचीन परंपरेचा असा अभिमान जागृत झाल्यावांचून समाजांत जोम येत नाहीं, चैतन्य येत नाही, त्याची मरगळ जात नाही, त्याच्या ठायीं आत्मविश्वास जागृत होत नाही, आत्मप्रत्ययाचा स्फुल्लिंग त्याच्या मनांत झगझगत नाही, अशी त्यांच्या बुद्धीची निश्चिति होती.
 टिळकांच्या प्राचीन परंपरेच्या अभिमानाचा अर्थ आपण समजून घेत आहोत. तो अभिमान म्हणजे विशिष्ट आचार- विचार- रूढि यांचा अभिमान नव्हे, तर येथील थोर पुरुषांच्या कर्तृत्वाचा, प्रज्ञेचा, बुद्धिमत्तेचा, एकंदर गुणसंपदेचा अभिमान होय. स्वत्वाचा अभिमान तो हाच. स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश यांचा अभिमान म्हणजेच हा परंपरेचा अभिमान होय. याच अर्थाने त्यांनी एका व्याख्यानांत "ज्याला वेदादि ग्रंथपरंपरा मान्य आहे तो हिंदु झाला', असें सांगितलें आहे. (व्याख्यानें, पृ. २९). "या अभिमानाचें महत्त्व काय? 'हिंदु' हा शब्द उच्चारल्याबरोबर त्यांतील सर्वांना एक प्रकारची ईर्षा, एक प्रकारचा उसाह, एक प्रकारचा आवेश निर्माण झाला पाहिजे." (व्याख्यानें, पृ. २८).
 गणेशोत्सव, शिवाजीउत्सव यांचा या दृष्टीने विचार केलाच आहे. आता त्यांच्या जगविख्यात ग्रंथांचा याच दृष्टीने विचार करून हें प्रकरण संपवूं.
मृगशीर्ष
 लो. टिळकांनी वेदकालनिर्णय केला आहे. आपल्या 'मृगशीर्ष' अथवा 'आग्रहायणी' अथवा 'ओरायन' या ग्रंथांत त्यांनी असें सिद्ध केलें आहे की, वेदरचना ही इ. पू. ५००० वर्षे या सुमारास पूर्ण झाली. हा सिद्धान्त त्यांनी ज्योतिर्गणिताच्या साह्याने मांडला आहे. त्यापूर्वी पंडित मॅक्समुल्लर याने वेदकाल हा इ. पू. १२०० वर्षे असा ठरविला होता. डॉ. हो याने इ. स. पू. २४०० असा निश्चित केला होता. त्यांनी आपले सिद्धान्त भाषाशास्त्राच्या आधारें मांडले होते. त्यांना ज्योतिर्गणितपद्धति मान्यच नव्हती. त्यांचें म्हणणें असें की, त्या पद्धतीने कालनिर्णय करण्याच्या दृष्टीने पाहतां दक्षिणायन व उत्तरायण यांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म हालचालींच्या ज्ञानाची उपलब्धि असणें, हें ऋग्वेदकाळीं शक्यच नव्हतें. हें ज्ञान त्या वेळच्या ऋषींना होतें याचा पुरावा वेदांत मुळीच सापडत नाही. पण लो. टिळकांनी ऋग्वेदांतल्या ऋचा देऊनच त्या पंडितांचें मत खोडून काढले. आपला प्रबंध त्यांनी इतका साधार व सप्रमाण लिहिला की, हळूहळू, नाखुषीने का होईना, पाश्चात्त्य पंडितांना तो स्वीकारावा लागला. आणि त्यामुळे वेदवाङमय हेंच जगांतलें प्राचीनतम वाङ्मय होय, हें सिद्ध झालें व त्या अतिप्राचीन काळी सुद्धा भारताची संस्कृति अत्यंत प्रगल्भ दशेला पोचली होती, याविषयी वाद राहिला नाही. हिंदी जनतेची मान यामुळे जगांत उंचावली यात शंकाच नाहीं.
राष्ट्रीय महाकाव्य
 कुलगुरु चिंतामणराव वैद्य यांनी 'महाभारत ए क्रिटिसिझम' असा एक ग्रंथ लिहिला होता. त्याचें लोकमान्यांनी केसरींत विस्तृत परीक्षण केलें होतें. त्यांतील पहिल्याच लेखांत त्यांनी महाभारताची थोरवी वर्णन केली आहे. "देशांतील थोर प्राचीन ऐतिहासिक पुरुषांचें उदात्त चरित लोकांस सांगून त्यांच्या वंशजांत शौर्य, अभिमान, सत्यनिष्ठा, धर्म-बुद्धि वगैरे अनेक सूक्ष्म सद्गुण जागृत करणारें प्राचीन काव्य जेथे उपलब्ध आहे, तेथे तेथे तें राष्ट्रीयत्वाचें प्रधान अंग मानले गेलें आहे... राष्ट्रांतील सर्व लोकांस एकसमयावच्छेदेकरून आनंद, ज्ञान, ईर्षा किंवा उत्साह देणारें प्राचीन महाकाव्यासारखें दुसरें साधन मिळणे कठीण आहे. आमच्या देशांतील महाभारत आणि रामायण हीं दोन अशीं प्राचीन महाकाव्यें आहेत." ह्या दोन्ही महाकाव्यांना पहिल्यापासून आर्ष महाकाव्यें म्हणण्याचा परिपाठ आहे. ह्यांतील महाभारत या ग्रंथाची थोरवी आता सर्वमान्य झाली आहे. कारण "महाभारतांत नीति आहे, धर्म आहे. मानवी कर्तव्याचा सशास्त्र विचार त्यांत आहे. त्यांत तत्त्वज्ञान आहे, इतिहास आहे, समाजव्यवस्था आहे. युद्धकला आहे. अशा प्रकारचा सर्वांगसुंदर व सर्वोपजीव्य झालेला दुसरा ग्रंथ संस्कृत वाङ्मयांतच काय, पण इतर देशांच्याहि वाङमयांत आढळत नाही." (केसरीतील लेख, खंड ४, पृ. ४३१, ४३२).
कणाद, कपिल
 एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी जॉन डाल्टन या प्रसिद्ध युरोपीय शास्त्रज्ञाने परमाणुवादाचा सिद्धान्त मांडला व त्याच शतकाच्या उत्तरार्धात चार्लस डार्विन याने आपला विकासवादाचा सिद्धान्त मांडला. हे दोन्ही सिद्धान्त विज्ञानाच्या इतिहासांत युगप्रवर्तक ठरले आहेत. गीतारहस्यांतील 'कापिलसांख्यशास्त्र व क्षराक्षरविचार' या प्रकरणांत त्यांचा उल्लेख करून टिळकांनी म्हटले आहे की, "भारतांत प्राचीन काळीं कणादाने परमाणुवाद सांगितला होता व कपिलाने विकासवाद किंवा गुणपरिणामवाद प्रस्थापित केला होता." आणि हें सांगून ते पुढे म्हणतात की, "अर्वाचीन काळीं भौतिक शास्त्रज्ञांना ज्या युक्त्या व जीं साधनें उपलब्ध आहेत तीं प्राचीन भारतीय दर्शनकारांना मुळीच उपलब्ध नव्हती. तरी सृष्टीची वाढ किंवा घटना कशी असावी याबद्दल सांख्यशास्त्रकारांनी दिलेल्या तात्विक सिद्धान्तांत आणि अर्वाचीन आधिभौतिक शास्त्रांच्या तात्त्विक सिद्धान्तांत फारसा भेद नाही, ही आश्चर्य करण्याजोगी गोष्ट आहे."
 प्रत्येक ठिकाणी लोकमान्य टिळकांना प्राचीन हिंदु संस्कृतीचें असामान्यत्व, असाधारणत्व, अद्वितीयत्व, श्रेष्ठत्व प्रस्थापित करावयाचें आहे आणि तें दाखवून मृतवत् झालेल्या हिंदुसमाजांत ईर्षा निर्माण करावयाची आहे, त्याला उत्साह यावयाचा आहे. त्यावांचून तो राष्ट्रपदवीला जाणें अशक्य होते.
 वेद, महाभारत, कणादकपिलांची दर्शने यांचें विवेचन करतांना लो. टिळकांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचें श्रेष्ठत्व सिद्ध केलें. मग श्रीमद्भगवद्गीतारहस्य हा जो त्यांच्या आयुष्यांतील मौलीभूत ग्रंथ त्यांत हा विचार, हा सिद्धान्त पुनःपुन्हा मांडलेला आढळला तर त्यांत कांहीच नवल नाही. गीतारहस्य हा ग्रंथ प्रामुख्याने प्रवृत्ति-धर्माचें अथवा कर्मयोगाचें विवेचन करण्यासाठी लिहिलेला आहे; पण प्राचीन भारतीय संस्कृतीचें असाधारणत्व भारतीयांना दाखवून देणें व त्यांना संजीवनी देऊन राष्ट्रकार्यास प्रवृत्त करणें हा टिळकांच्या सर्व उद्योगाचा ध्रुवतारा असल्यामुळे, तसे विचार त्यांनी गीतारहस्यांत पदोपदी मांडलेले आहेत.
असा ग्रंथ
 पहिल्या प्रकरणाच्या आरंभींच त्यांनी गीतेच्या अद्वितीयत्वाविषयी पुढील विधान केलें आहे. "पिंडब्रह्मांडज्ञानपूर्वक आत्मविद्येचीं गूढ व पवित्र तत्वें थोडक्यांत, पण असंदिग्धरीतीने सांगून, त्यांच्या आधारें मनुष्यमात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची ओळख करून देणारा... व संसारांत भांबावून गेलेल्या मनास शांत आणि विशेषतः निष्काम कर्तव्यास प्रवृत्त करणारा यासारखा बालबोध ग्रंथ संस्कृतांतच काय पण जगांतील इतर वाङ्मयांतहि सापडणें दुर्मिळ होय."
 हें प्रारंभीचें विधान झाले. त्यानंतर ग्रंथाच्या अभ्यंतरांत अनेक ठिकाणीं कांट, ग्रीन, कोंट इत्यादि पाश्चात्त्य पंडितांचे तात्त्विक, आध्यात्मिक व नीतिविषयक सिद्धान्त व उपपत्ति देऊन, त्या गीतेच्या तुलनेने कशा अपुऱ्या, असमाधानकारक व म्हणूनच अग्राह्य आहेत, हें दाखवून गीतेंतील तत्त्वज्ञानाचें श्रेष्ठत्व टिळकांनी सिद्ध केलें आहे; आणि 'गीतेचें बहिरंग-परीक्षण' या शेवटच्या प्रकरणांतहि प्रथम गीतेचा काळ निश्चित करून मग गीतेंतले अनेक विचार व तत्त्वें, यहुदी धर्म, ख्रिस्ती धर्म किंवा पायथागोरससारखे ग्रीक पंडित यांच्याकडून घेतलेलीं आहेत, अशा तऱ्हेचे पाश्चात्य पंडितांचे जे प्रवाद त्यांचे खंडन करून ते धर्मच गीतेचे ऋणी असण्याचा जास्त संभव आहे, हा विचार मांडून, पुन्हा त्या दृष्टीने गीतेचें श्रेष्ठत्व संदेहातीत करून ठेविलें आहे.
 वैष्णवांचे गुरु श्रीसत्यध्यानतीर्थ यांच्याशी चर्चा करतांना लोकमान्य एकदा म्हणाले की, "मी असें स्पष्ट सांगतों की, अनेक हेतूंप्रमाणे राजकारणाकरिताहि मी गीतारहस्य लिहिले आहे." (आठवणी खंड २, पृ. ११०) आपल्या प्राचीन परंपरेचा अभिमान जागृत करून हिंदी जनतेला स्वातंत्र्यसंग्रामासाठी सिद्ध करणें हें तें राजकारण होय.
 गीतारहस्यच काय, पण टिळकांचा प्रत्येक ग्रंथ, त्यांची प्रत्येक चळवळ, त्यांची प्रत्येक संस्था या राजकारणासाठीच होती. प्राचीन परंपरेचा अभिमान हा त्यांनी चालविलेल्या या यज्ञांतील अग्नीच होता.




-४-

धर्माचे पुनरुज्जीवन


जीवनोद्देश
 अरविंदबाबूंनी टिळकांच्या जीवनोद्देशाचें अत्यंत समर्पक वर्णन केलें आहे. "हिंदी राष्ट्राचें पुनरुज्जीवन करणें, त्याला त्याच्या गतकालाप्रमाणे, किंबहुना शक्य असल्यास जास्तच वैभवशाली व उज्ज्वल करणें, हाच टिळकांचा जीवनोद्देश होता. तेवढ्यासाठी त्यांना नुसती राजकीय जागृतीच करावयाची नसून, सुप्तावस्थेंत असलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला, पूर्वकालावर त्याच्या भविष्यकालाचें अधिष्ठान ठेवून, खडबडून जागे करावयाचें होतें. टिळकांनी आपल्या आयुष्यांत जे जे उद्योग केले त्याचा साक्षात् अथवा परंपरेने ह्या राष्ट्रसंवर्धनाकडेच संबंध पोचतो."
 लो. टिळकांच्या जीवितकार्याचं यापेक्षा जास्त यथार्थ वर्णन कोणाला करतां येईल, असें वाटत नाही. राष्ट्रसंवर्धन, राष्ट्राचें पुनरुज्जीवन, हिंदुस्थानचें राष्ट्र या तत्त्वावर संघटन!
देव-देश-अद्वैत
 त्यांनी हिंदुधर्माचें पुनरुज्जीवन केलें तें यासाठीच. यासाठी त्यांनी पहिला महत्त्वाचा विचार सांगितला तो हा की, धर्म व राजकारण दोन नाहीत. देश आणि देव हे भिन्न नाहीत. "देश आणि देव हे दोन मानणारे जे लोक आहेत ते सर्व प्रकारे धर्मभ्रष्ट आहेत असें मी समजतों," असें ते म्हणत. २५ व २६ फेब्रुवारी १९०८ ह्या दोन दिवशीं लो. टिळकांचीं पुण्याला व सोलापूरला दासनवमीनिमित्त दोन व्याख्याने झाली. त्यांत समर्थांच्या कार्याचें विवेचन करतांना त्यांनी या विषयीचें आपलें तत्त्वज्ञान स्पष्टपणे मांडलें आहे. ते म्हणतात, "धर्म आणि व्यवहार यांची जोडी कशी घालावयाची हें रामदासांनी शिकविलें. घराचें दार बंद करून उपासना केली की संपलें. घराबाहेर कोणाचेंहि राज्य असो, बाहेर वाटेल त्या आपत्ति येवोत, त्यांचा धर्माशीं कांही संबंध नाही, असा एक पूर्वी समज असे. राजकीय व्यवहार, देशाची कल्पना, यांचा धर्मात अंतर्भाव होत नाही, अशा प्रकारची कल्पना किंवा कुकल्पना आमच्यांत शिरली होती; पण रामदासांनी हिंदु धर्माचं पुनरुज्जीवन केलें. या धर्मांत असें तत्त्व आहे की, ज्याला मोक्षप्राप्ति पाहिजे असेल त्यास आपल्या देशबांधवांची काळजी केल्याखेरीज गत्यंतर नाही. जे आपल्या देशाकडे पाहत नाहीत, 'जे का रंजले गांजले त्यांस' आपले म्हणत नाहीत, आपले हजारो देशबांधव विपत्तीत असतांना जे नाक धरून घरांत बसतात, ते ढोंगी आहेत, अशा प्रकारची बुद्धि उत्पन्न करणें म्हणजे राष्ट्र जिवंत करणें आहे." (व्याख्यानें, पू. १५२, १५३).
 लो. टिळकांनी हिंदु धर्माचें पुनरुज्जीवन केलें याचा हा अर्थ आहे. देश व धर्म हे अभिन्न आहेत, अशा प्रकारची बुद्धि निर्माण करून त्यांना हिंदी राष्ट्र जिवंत करावयाचें होतें. वरील दोन व्याख्यानांत पुनः पुन्हा हा भावार्थ त्यांनी मांडला आहे. "धार्मिक व राजकीय उत्सव आपणांस विभक्त करतां येणार नाहीत. शरीराच्या डाव्या-उजव्या अंगांप्रमाणे ते चिकटलेले आहेत", "समर्थांचे शिष्य घरोघर हिंडत व लोकांस स्वातंत्र्याचा व मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवीत असत,' "पारतंत्र्यामध्ये व्यापार, हिंमत, उमेद ह्या सर्व बाजूंनी देशाचा ऱ्हास झालेला असतो. अशा वेळी देश वर आणण्यास केवळ धर्मं-बुद्धि असून चालत नाही," "रामदासांनी महाराष्ट्रांत जागृति केली म्हणजे लोकांना गंध लावायला शिकविलें, असा अर्थ नाही. तुकारामांनाहि हा अर्थ अभिप्रेत नव्हता. उच्च कल्पना, अत्युच्च कल्पना लोकांस शिकवून त्या त्यांच्यांत खेळू देणें, जातिजातींतील भेद नाहीसे करून आपण सारे एकच आहों, असें वाटावयास लावणें हें खरें धर्म-शिक्षण होय. इंग्रजी तत्त्ववेत्त्यांनी ही तत्त्वें सांगितली आहेत, आणि तीं आपल्या उपयोगाचीं आहेत. हीं तत्त्वें पूर्वी आपल्यांत होती; पण तीं आपण विसरलो आहों." (व्याख्यानें, पृ. १४४).
 ही जीं विसरलेलीं तत्त्वें, हा जो खरा धर्म त्याचें टिळकांना पुनरुज्जीवन करावयाचें होतें. लोकांना या धर्माचें शिक्षण द्यावयाचें होतें.
भगवंताचे अधिष्ठान
 लोकमान्य विलायतेस जावयास निघाले तेव्हा त्यांना ब्रह्मवृन्दातर्फे पानसुपारी झाली. त्या वेळच्या भाषणांत चळवळीला भगवंताचे अधिष्ठान असणें म्हणजे काय तें त्यांनी स्पष्ट केलें. "चळवळीच्या कचेरींत एखादी मूर्ति बसवून तिच्या पुढे धूप जाळला म्हणजे तेथे भगवंताचे अधिष्ठान होतें असें नाही. भगवंताचें जगांत कार्य काय, तर साधूंचें रक्षण, दुष्टांचें निर्दालन व धर्माची स्थापना. ही कार्ये जेथे चालली असतील तेथे भगवंताचें अधिष्ठान आपोआपच आलें. आमची होमरूलची चळवळ ही हिंदुस्थानची भूमि परकीय जुलमांतून सोडविण्यासाठी आणि सनातनधर्म रक्षिण्यासाठी आहे. म्हणून तींत भगवंताचे अधिष्ठान आहेच आहे." (आठवणी खंड १ ला ज. स. करंदीकर - आठवण, पृ. १४९). वासुदेव विठ्ठल दास्ताने यांनी अशाच प्रकारची आठवण दिली आहे. त्यांचे भुसावळचे एक मित्र टिळकांना म्हणाले की, "आज पंचवीस-तीस वर्षे इतक्या परिश्रमाने चळवळ चालली आहे; पण यश येत नाहीं तेव्हा भगवंताचें अधिष्ठान नाही म्हणून तर अपयश येत नसेल ना? आपल्या चळवळींत ईश्वराची पूजा-अर्चा, भजन, आराधना कांही होत आहे का? आपणांस त्यांत वेळ खर्च करतां येत नाही. त्यामुळे भगवंताचे अधिष्ठान मिळत नाही, म्हणून असें होत नसेल ना?" त्यावर टिळक म्हणाले, "माझी चळवळ हेंहि आराधनेचेंच स्वरूप आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांत निमग्न राहणे हीच उत्कृष्ट आराधना होय. ईश्वरचितनांत असतांना जें सुख, जी शांति मिळते त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला घ्यावयास सापडत आहे." (आठवणी खंड २, पृ. ३१३). पंढरपूरच्या वारकऱ्यांना "तुम्ही राष्ट्रोन्नतिरूप मोक्ष मिळवा", असा उपदेश टिळकांनी केल्याचें वर एकदा सांगितलेच आहे. १९०७ सालच्या एका व्याख्यानांत त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की "मोक्ष ज्याने मिळेल तेवढाच धर्म, अशी आमच्या धर्माची तरी व्याख्या नाही." (व्याख्यानें, पृ. २७).
गीतारहस्य
 धर्म आणि राजकारण, देव आणि देश, भगवंताचे अधिष्ठान आणि स्वराज्याची चळवळ हें जें अद्वैत लो. टिळकांनी निरनिराळ्या व्याख्यानांतून आणि लेखांतून प्रतिपादिलें तेंच अतिशय व्यापक तत्त्वज्ञानाच्या रूपाने त्यांनी गीतारहस्यात प्रतिपादिले आहे. लोकमान्यांनी धर्माचें खरें पुनरुज्जीवन केलें तें हेंच. गीतारहस्याच्या उपसंहारात त्यांनी असें दाखवून दिलें आहे की, निवृत्ति मार्ग, हा प्रथम उपनिषत्कारांनी वे सांख्यांनी प्रचारांत आणला. तत्पूर्वीचा वैदिक धर्म प्रवृत्तिपरच होता. "संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत जीं वर्णने आहेत त्यांवरून हा मार्ग (कर्मयोग) आमच्या देशांत अनादिकालापासून चालत आला आहे असें सिद्ध होते. किंबहुना एरवी हा देश कधीच वैभवशाली झाला नसता." (पू. ४९४).
प्रवृत्तिमार्ग
 या प्रकरणांत पुढे त्यांनी प्रवृत्तिमार्ग किंवा कर्मयोग याच्या चढउताराचा इतिहास थोडक्यांत दिला आहे. उपनिषदानंतर श्रीकृष्णांनी प्रवृत्तिमार्गाचें पुनरुज्जीवन केलें. मध्यंतरी जैन, बौद्ध यांच्या काळीं पुन्हा संन्यासमार्गाचा, संसारत्यागाचा प्रभाव वाढला; पण स्मृतिकारांनी पुन्हा वैदिक कर्मयोगाचें पुनरुज्जीवन केलें; पण पुढे शंकाराचार्य, रामानुज, मध्व इत्यादि सर्व आचार्यांनी संन्यासपक्ष स्वीकारून त्याचाच उपदेश सर्व देशभर केला. भागवतधर्मीय संत मंडळीहि कर्मयोगाला गौणच लेखीत. कर्मयोग हें संन्यासमार्गाचें अंग आहे, असें म्हणण्याऐवजी तें भक्तिमार्गाचे अंग किंवा साधन आहे, असें संत म्हणत, एवढाच फरक. याला अपवाद म्हणजे समर्थ रामदासस्वामी. त्यांनी कर्ममार्गाचें खरें महत्त्व शुद्ध व प्रासादिक मराठींत सांगितलें आहे. पुढे महाभारताच्या गद्यात्मक भाषांतराच्या आधारे कर्मयोगाच्याच तत्त्वांचा अभ्यास मराठेशाहींत सुरू होता; पण कर्मयोगाचें हें पुनरुज्जीवन आमच्या दुर्दैवाने फार दिवस टिकलें नाही. (गीतारहस्य, पृ. ४९९).
 प्रवृत्तिमार्गाच्या आश्रयावांचून देश वैभवशाली होणें शक्य नाही. अशी टिळकांच्या मनाची निश्चिति असल्यानेच त्यांनी त्या मार्गांचें पुनरुज्जीवन करण्यासाठी 'गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र' हा अगविख्यात ग्रंथ लिहिला, आणि हिंदी राष्ट्राच्या उन्नतीची चळवळ दृढ पायावर उभी केली.
टाळकुटे
 देव आणि राष्ट्र यांच्या अद्वैताची, म्हणजेच कर्मयोगाची ही शिकवण आपल्या समाजाला किती अवश्य होती, हें विनायक नारायण जोशी (साखरेबुवा) यांनी दिलेल्या आठवणीवरून घ्यानीं येईल. (खंड ३ रा, पृ. १०१). आध्यात्मिक ग्रंथांचें चिंतन करून ज्ञानेश्वरमहाराजांच्या ग्रंथांवर व्याख्यान लिहावें, असा आपला विचार आहे, असें साखरेबुवांनी लोकमान्यांस सांगितलें; तेव्हा ते म्हणाले, "ते ग्रंथ तर लिहाच पण त्याशिवाय धार्मिक विषयावर स्वदेशाचे कल्याण करण्याविषयी लोकांत जागृति उत्पन्न होईल, अशीं व्याख्यानें देण्यास तुम्ही सुरुवात करा." त्यावर साखरेबुवा म्हणाले की, "तें माझ्या हातून होणार नाही; मला ही तुमची देशकल्याणाची दिशाच मान्य नाही. यापेक्षा शेकडो पटींनी जास्त पुण्य प्राप्त करून घेण्याचा उपाय ज्ञानेश्वरमहाराज, शंकराचार्यादिकांनी सांगितला आहे; त्याचें आचरण करणें अधिक श्रेयस्कर आहे."
 हे ऐकून लोकमान्य रागावले आणि म्हणाले, "तर मग तुम्ही खांद्यावर पताका घेऊन पंढरीस जाणार आणि वाळवंटांत टाळ कुटीत बसणार तर! हेंच ना तुमच्या अध्ययनाचें फल? तुम्ही आपल्या प्रवचनांत ब्रह्म सत्य, जगन्मिथ्या, अशी नुसती बडबड केल्याने, पारतंत्र्याच्या दुःखांत होरपळत असलेल्या हिंदुस्थानांतील लोकांस त्यापासून यत्किचित् तरी गारवा येईल का? मी म्हणतों यांपैकी तुम्हांस कांही पटत नाही, याचेंच मला आश्चर्य वाटतें. अध्यात्म-विचाराचा विषय अजीबात सोडून द्या, असें माझें मुळीच म्हणणे नाही. फक्त त्या विषयाचा उपयोग देशकल्याणाकडे करा एवढेच माझें सांगणें आहे."
 पंढरपुरास एकदा लोकमान्यांचें व्याख्यान झालें. दुसऱ्या दिवशीं तेथील एक उत्पात ह. भ. प. दत्तबुवा भुजंग त्यांना म्हणाले, "आपले एखादें व्याख्यान धर्मावर होतें तर बरें होतें." त्यावर लोकमान्य म्हणाले, "धर्मावरच कालचें माझें, व्याख्यान झालें. माझा धर्म स्वराज्य मिळविण्याखेरीज दुसरा नाही. स्वराज्य कसें मिळवावयाचें या एकाच विचाराने सबंध हिंदुस्थान आज हलत राहिलें पाहिजे." (आठवणी, खंड ३, पृ. १२९).
पाश्चात्त्य पद्धति
 लो. टिळकांना कोणत्या धर्माचें पुनरुज्जीवन करावयाचें होतें तें यावरून स्पष्ट होईल. प्राचीन वैदिक धर्मांत अनेक पंथ होते, शाखा होत्या, मतमतांतरें होती. त्यांतून हिंदुस्थानच्या उत्कर्षास पोषक अशी तत्त्वें निवडून काढून त्यांचें पुनरुज्जीवन करावें असा त्यांचा हेतु होता; आणि हें पुनरुज्जीवन नव्या, शास्त्रीय, पाश्चात्त्य पद्धतीने झालें पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
 नव्या पद्धतीने म्हणजे काय? शास्त्रीय पाश्चात्त्य पद्धति कोणती? बुद्धिवादाची, विचारस्वातंत्र्याची, तर्क, अनुभव, इतिहास यांच्या आधारें आपलें प्रमेय सिद्ध करण्याची.
 जुनी पद्धति शब्दप्रामाण्याची, केवळ सिद्धान्त सांगण्याची आज्ञा करण्याची होती. गीतारहस्यांतील उपसंहार या प्रकरणांत टिळकांनी म्हटले आहे की, "मन्वादि स्मृतीतून व उपनिषदांतून सत्य, अहिंसा यांविषयीच्या आज्ञा किंवा आचार स्पष्टपणें नमूद केलेले आहेत; पण मनुष्य हा ज्ञानवान प्राणी असल्यामुळे वरच्यासारख्या नुसत्या विधानांनी त्याचें समाधान न होता, हे नियम घालून देण्याचें कारण काय हे समजून घेण्याची त्याला स्वभावतः इच्छा होते."
 ही त्याची इच्छा तृप्त करून नव्या राष्ट्र-धर्माचीं तत्त्वें त्याच्या बुद्धीला पटवून दिली पाहिजेत, म्हणजेच या धर्माचें प्रवचन शास्त्रीय पद्धतीने केलें पाहिजे, असें टिळक निक्षून सांगत असत.
 ते म्हणत, "शिकलेल्या लोकांवर धर्मतत्त्वांचें वजन पाडण्यास नव्या तऱ्हेने या विषयाचे प्रतिपादन झालें पाहिजे व त्यांच्यापुढे पाश्चात्त्य पद्धतीने धर्माचें विवेचन करून त्याचें श्रेष्ठत्व त्यांस पटविलें पाहिजे." टिळकांचें असें मत असल्यामुळेच ते स्वामी विवेकानंद, अभेदानंद, ॲनी बेझंट यांचा मनःपूर्वक गौरव करीत. "आधि-भौतिक शास्त्रांच्या प्रसाराने ख्रिस्ती धर्माच्या मांडणीत पुष्कळ फेरफार झाला आहे व तशा प्रकारचा फेरफार हिंदु धर्माच्या मांडणींत होणें जरूर आहे", असें त्यांचें मत होतें.
 जुनी धर्मतत्त्वें, जुने आचार, रूढि, संस्था यांचीहि नव्या काळाला अनुसरून पुनर्रचना केली पाहिजे व त्यांना कार्यक्षम बनविलें पाहिजे, असें त्यांचें धोरण होतें. शंकराचार्यांच्या पीठासंबंधी बोलतांना ते म्हणाले, "जगद्गुरुंच्या जागीं नवीन तऱ्हेने शिकलेला इसम पाहिजे म्हणजे तो पुष्कळ कार्य करील. त्यांतून हल्लीच्या काळीं त्या मनुष्यास इंग्रजी आलेंच पाहिजे. परिस्थितीप्रमाणे या गोष्टी आता झाल्याच पाहिजेत. इंग्रजी शिकल्याशिवाय आपल्या धर्माचें वजन चोहोकडे पाडतां यावयाचें नाही. धर्माचें वजन पाडण्यास तुलनारूपाने त्याचें विवेचन केलें पाहिजे." डॉ. कुर्तकोटी यांना शंकराचार्यांच्या गादीवर आरूढ व्हावें, असा आग्रह टिळकांनी केला व त्यांनी तो मानला हें प्रसिद्धच आहे.
एकवाक्यता अनिष्ट
 नव्या धर्माचें प्रवचन पाश्चात्त्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने, आधिभौतिक शास्त्रांच्या आधारे, बुद्धीला पटवून देण्याच्या हेतूने झाले पाहिजे अशी धारणा असल्यामुळेच लो. टिळकांनी गीतेवरचें त्यांचें गीतारहस्य हें जें प्रवचन तें सर्वस्वी त्या पद्धतीने केलेलें आहे. जुन्या शास्त्री पंडितांची शब्दप्रामाण्यपद्धति त्यांना सर्वस्वी त्याज्य वाटत असे. अनेक श्रुतिवचनें स्मृतिवचनें पाहतां असें दिसतें की, त्यांचे अर्थ परस्परांहून अगदी भिन्न आहेत, परस्परविरोधीहि आहेत. अशा वेळी कोणतें वचन ग्राह्य, कोणतें त्याज्य, हें स्वतःच्या बुद्धीने ठरविणें हाच उपाय असतो; पण स्वतःच्या बुद्धीने विचार करणें व एखादें श्रुतिवचन त्याज्य ठरविणें हें जुन्या शास्त्री- पंडितांना पाप वाटे, अब्रह्मण्यं वाटे. म्हणून तें श्रुति-स्मृतिवचनांतील शब्दांची, अर्थाची वाटेल ती ओढाताण करून त्या सर्वांचा अर्थ एकच आहे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत. टिळकांना ही पद्धति मान्य नव्हती. त्यांनी म्हटलें आहे की, "याचा परिणाम असा होतो की, वेदसंहितेपासून तो पुराणांपर्यंत एकच अर्थ प्रतिपाद्य मानल्यामुळे वैदिक धर्म हा ज्याच्या-त्याच्या सांप्रदायाप्रमाणे एकच उभा सोट आहे, शाखापल्लव फुटून वाढलेला वृक्ष नव्हे, अशी लोकांची समजूत होते; आणि मग दुसऱ्याचा सांप्रदायिक सोट खरा वैदिक नसून, माझीच सांप्रदायिक सोट खरा वैदिक होय, असे तंटें उपस्थित होतात... तेव्हा निरनिराळ्या वचनांची एकवाक्यता करतांना एक मुख्य आणि इतर ओढाताणीने तदर्थक बनविण्यापेक्षा देश-काल- वर्तमानादि परिस्थिति- भेदामुळे एकाच वैदिक बीजापासून निघालेल्या वृक्षास अनेक शाखा फुटणें शक्य आहे, असें समजून त्याप्रमाणे सर्व वचनांची व्यवस्था लावणें हें आमच्या मतें ऐतिहासिकदृष्ट्या व धर्मदृष्टचाहि अधिक समंजस व वस्तुस्थितीला अनुरूप आहे," गीतारहस्यावरील टीकाकारांना उत्तर देतांना टिळकांनी हा विचार मांडलेला आहे. (केसरी, २६-१०-१९१५).
स्वतंत्र चिंतन
 लोकमान्यांनी गीतारहस्य लिहितांना हीच पद्धति अनुसरली होती. उपनिषदांतील बहुसंख्य उपनिषदें संन्यासमार्गी आहेत; कांही थोडीं कर्मयोगमार्गी आहेत. पण त्यांतील वचनांची एकवाक्यता करण्याचा मुळीच प्रयत्न न करतां त्यांनी त्यांतील भिन्न मतें आहेत तशीं मांडून स्वतःला ग्राह्य काय तें स्पष्टपणे सांगितलें आहे. उपनिषदें म्हणजे प्रत्यक्ष श्रुति! त्यांच्या बाबतींतहि टिळकांनी प्रामाण्य मानले नाही. मग शंकर, रामानुज, मध्व, वल्लभ ह्या आचार्यांची भाष्यें त्यांनी मानली नाहीत यांत नवल काय? तीं भाष्यें त्यांच्या बुद्धीला पटेनात म्हणून तर त्यांनी स्वतंत्र बुद्धीने विचार करून गीतेचा अर्थ लावला आणि कांट, ग्रीन इत्यादि पाश्चात्त्य पंडितांच्या मतांची चर्चा करून, इतर धर्मातील सिद्धान्तांशी तुलना करून, आधार, प्रमाणे कारणें देऊन, चिकित्सक बुद्धीला पटेल अशा रीतीने, कर्मयोगशास्त्र सांगितलें.
ऐक्यबंध
 धारणात् धर्म इत्याहुः, धर्मो धारयते प्रजाः ॥ प्रभवार्थाय भूतानां धर्मस्य नियमः कृतः । यः स्यात् प्रभवसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ॥ अशा प्राचीनांनी धर्माच्या व्याख्या केल्या आहेत. ज्याने धारण होतें तो धर्म, ज्याने उत्कर्ष साधतो तो धर्म, असा त्यांचा अर्थ आहे; पण गेली अनेक शतकें हा अर्थ हिंदुस्थानांतून लुप्तच झाला होता. ऐहिक उत्कर्षाचा, समाजाच्या भरण-पोषणाचा, उन्नति-अवनतीचा धर्माशीं कांही संबंध आहे, हेंच येथील धर्मधुरीणांना मान्य नव्हते. लो. टिळकांना हा संबंध पुन्हा प्रस्थापित करावयाचा होता आणि त्या प्राचीन व्याख्यांतील भावार्थाचें पुनरुज्जीवन करावयाचें होतें. त्यासाठीचं देव व देश एकच आहेत, असें त्यांनी सांगितलें. आणि त्यासाठीच धर्म हा सर्वांना एकत्र संघटित करणारा ऐक्यबंध असावा, असे प्रतिपादन त्यांनी वारंवार केलेलें आहे.
 'गणपति उत्सव' या लेखांत ते म्हणतात, "पुण्यांतील गणपतीचा यंदाचा उत्सव फक्त ब्राह्मणांनी केला नसून, त्यांत सर्व हिंदूंचा हात आहे व याबद्दल जितका अभिमान वाटणें साहजिक आहे तितका सर्वांस वाटत आहे. साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार देखील, या सर्व जाती क्षणभर आपापला जातिमत्सर सोडून परस्परांशी एका दिलाने व एका धर्माभिमानाने मिसळल्या (ही आनंद मानण्यासारखी गोष्ट असतांना) यांत खेद करण्याजोगी काय गोष्ट झाली?" (केसरी, १८-९-१८९४).
 त्या वेळी पुराणवादी लोकांनी गणपति उत्सवावर असा आक्षेप घेतला होता की, सार्वजनिक उत्सव करण्यांत गणपतीला विटाळ होऊन तो रागावतो. (त्या वेळीं प्लेगची साथ आली ती गणपतीच्या कोपामुळेच आली, असें पुण्यांत पुष्कळ लोकांनी वाटत असे.) यावर टिळकांनी एका व्याख्यानांत सांगितले की, "लोक जमल्याने देवाला विटाळ होतो म्हणणे म्हणजे देवाने माणसें उत्पन्न केली नाहीत, असें म्हणण्यासारखें आहे. वेदांत चार वर्ण आहेत. ब्राह्मण मुखाच्या ठिकाणीं, क्षत्रिय बाहूच्या ठिकाणी, वैश्य ऊरूच्या ठिकाणी व शूद्र चरणाच्या ठिकाणी आहेत. मग डोक्याला काय पायाचा विटाळ होतो किंवा बाहूला पायाचा विटाळ होतो? असें धरल्यास आधी डोकें तोडून निराळे ठेवावें लागेल." (व्याख्यान, पृ. २६).
 गणेशोत्सव हा फक्त ब्राह्मणांचा आहे असा प्रवाद उठवून ब्राह्मण व मराठे यांच्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न त्या वेळीं सरकार करीत असे. त्यासंबंधी लिहितांना टिळक म्हणतात, "कांही हिंदु-धर्माची नालस्ती करणाऱ्या ब्राह्मणविद्वेषी लोकांनी मराठे आणि ब्राह्मण ह्यांच्यांमध्ये फूट पाडून सर्व हिंदुसमाजाचें अकल्याण करण्याच्या प्रयत्नास सुरुवात केली आहे. करिता आपण सर्वत्रांनी या वेळी सावध राहिले पाहिजे. आपण हें लक्षांत ठेविलें पाहिजे की, हिंदु समाजाच्या ह्या दोन आधारस्तंभांनी उभयतांस हितकर होईल, असें वर्तन ज्याप्रमाणे आजपर्यंत ठेविलें तसेंच पुढेहि ठेविलें पाहिजे." (केसरी लेख, खंड १ ला, १८-९-९४).
 शिवाजी-उत्सव सुरू करण्यांत टिळकांचा हाच हेतु होता. सर्व हिंदु समाजाचें ऐक्य! त्यांनी त्यासंबंधी विवेचन करतांना सांगितलें आहे की, "राष्ट्रांतील महापुरुषांचें स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगलें साधन आहे. शिवाजीमहाराजांनी मराठे, ब्राह्मण, परभू, शेणवी असा भेद न करतां "गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिगं न च वयः ।" या न्यायाने सर्वांस एकराष्ट्रीयत्वाच्या जाळ्यांत आणलें, त्यामुळे त्यांचें स्मरण सर्वांस विशेष श्रेयस्कर होईल यांत शंका नाही. शिवछत्रपतींचा उत्सव करणाऱ्यांनी उत्सवाचा हा हेतु ध्यानांत ठेवून त्यांत कोणताहि जातिभेद मानतां कामा नये. यंदाचे उत्सवांत एक-दोन ठिकाणी असला प्रकार झाल्याचे ऐकिवात आहे. ही जर गोष्ट खरी असेल तर वेळींच तिचा बीमोड झाला पाहिजे." (केसरी लेख, खंड १ ला, पृ. ५३२, ३३).
 लोकांत ऐक्याची वृद्धि होण्यास एक उपास्यदैवत असणें हें मोठें साधन असून गणेशोत्सवाचा तोच हेतु होता, हें मागे एके ठिकाणीं सांगितलेच आहे. स्वधर्माचा अभिमान जागृत करणें हाहि त्यांत हेतु होता. त्या संबंधांतच टिळकांनी म्हटलें आहे की, "स्वधर्माच्या श्रेष्ठत्वाचा ज्यास अभिमान वाटत नाही त्यास स्वराष्ट्राच्या श्रेष्ठत्वाचा तरी अभिमान कोठून वाटणार? धर्मोन्नतीचा व धर्माभिमानाचा जर राष्ट्रीय अभ्युन्नतीशी कांही संबंध असला तर तो याच प्रकारचा होय." (केसरीतील लेख खंड १ला, पृ. ४८८).
 लो. टिळकांना धर्मजागृति करावयाची होती ती राष्ट्रजागृतीसाठी होय, हें यावरून स्पष्ट होईल.
हिंदी राष्ट्र
 पण त्यांच्या धर्मजागृतीच्या या प्रयत्नामुळे त्यांच्यावर अनेक लोकांनी अनेक आक्षेप घेतले होते. हिंदु धर्माची जागृति म्हणजे अन्य धर्मीयांचा द्वेष, असें समीकरणच कित्येकांच्या मनांत होतें. इंग्रज सरकार तर जाणूनबुजून तसा त्यांच्यावर आरोप करीत असे. सरकारला हिंदु-मुसलमानांत दुही माजवावयाचीच होती. तेव्हा टिळकांचें हें धर्मजागरण आणि त्यांचा हिंदुत्वाचा अभिमान यांचा त्यांनी विपर्यास करावा हें युक्तच होतें. पण स्वतःस पुरोगामी म्हणविणाऱ्या अनेक हिंदु नेत्यांनीसुद्धा असा विपर्यास चालविला होता.
 लो. टिळकांना भारतांत राष्ट्र निर्मावयाचें होतें तें हिंदी राष्ट्र होय. हिंदु, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम हे सर्व धर्म त्यांतील पंथ-उपपंथ, ह्या सर्वांचें एक राष्ट्र त्यांना घडवावयाचें होतें. असें असतांना हिंदुधर्मीयांचेंच ऐक्य करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा हें विसंगत नाही काय, अशी शंका त्यांच्या भक्तांना सुद्धा येत असे. अशा शंकांचे वेळोवेळीं निरसन करून, त्यांनी आपली विशुद्ध राष्ट्रीय भूमिका स्पष्ट केली आहे. तिचा परामर्श घेऊन हें विवेचन संपवू.
 १९०४ च्या गणेशोत्सवांत ते म्हणतात, "नुसती हिंदु धर्माची जागृति केली तर इतर धर्मांचा तिरस्कार वाढेल व त्यामुळे राष्ट्रैक्याचा घात होईल... असें म्हणणारी अजूनहि कांही मंडळी आहे; पण धर्माचा नायनाट करून सर्व समाज धर्मशून्य बनल्यामुळे राष्ट्रैक्य किंवा राष्ट्रोन्नति झाल्याचें जगांत एकहि उदाहरण नाही... इतर धर्मांबद्दल द्वेष व विरोध वाढू न देतां हिंदु धर्माची जागृति व उन्नति करून हिंदुधर्मीयांचा मिलाफ करणें शक्य आहे."
समानहितत्व
 "या देशांतील सर्वधर्मीयांनी आपापल्या धर्माचा अभिमान अवश्य बाळगला पाहिजे, पण तो राष्ट्रीयत्वाच्या आड येऊं देतां कामा नये." असें हिंदु-मुसलमानांचे तंटे सुरू झाले तेव्हापासून टिळक सांगत आले आहेत. 'हिंदु-मुसलमानांचा समेट' या लेखांत ते म्हणतात, "हिंदु-मुसलमान लोकांनी ज्या नात्याने एकत्र राहावयाचे तें कांही अंशी अमेरिकेत निरनिराळ्या जातींचे, निरनिराळ्या धर्माचे लोक जसे एकत्र राहतात तशा प्रकारचें असलें पाहिजे... हिंदु-मुसलमान लोकांचे रीतिरिवाज, संस्कार, उत्सव- सोहळे हे बऱ्याच गोष्टींत भिन्न आहेत, परंतु एकदा सलोख्याने व मित्रत्वाने वागावयाचें, असा निश्चय झाल्यावर एकमेकांनी एकमेकांच्या सोयीसाठी व समजुतीसाठी कांही गोष्टी करण्यास व कांही गोष्टी सोडण्यास कबूल झालें पाहिजे." (केसरींतील लेख, खंड १, पृ. २३५). 'ख्रिस्ती धर्म व हिंदुस्थानांतील लोकांचें राष्ट्रीयत्व' या लेखांत या विषयाचें टिळकांनी आणखी स्पष्टीकरण केलें आहे. ते म्हणतात, "राष्ट्रीयत्वाची सिद्धि होण्यास स्वधर्म, स्वभाषा, स्वदेशाभिमान व पूर्वेतिहासस्मरण ह्या गोष्टी कारणीभूत होतात, हें 'राष्ट्रीयत्वाची कल्पना' या लेखांत, सुमारें एक महिन्यापूर्वी आम्हीं सांगितलेच आहे. तथापि समानहितत्व हे राष्ट्रीयत्वाची कल्पना सिद्ध होण्याचें प्रत्यक्ष कारण होय व स्वधर्मप्रीति वगैरे दुय्यम प्रकारची कारणें होत, असेंहि आम्हीं सांगितलें होतें. म्हणजे हिंदुस्थानांतील निरनिराळ्या जातींतील लोकांमध्ये जर यापुढे केव्हा राष्ट्रीयत्वाची कल्पना उत्पन्न होऊन ती प्रबल होण्याचा संभव असेल, तर सर्व लोकांनी स्वधर्म, स्वभाषा व आपला पूर्वेतिहास यांविषयी प्रीति बाळगून सर्वांस समान असें जे राजकीय हक्क ते मिळविण्यास उद्युक्त झाले पाहिजे." (केसरीतील लेख, खंड ३ रा, पृ. २३८).
 लोकमान्यांचें 'हिंदी राष्ट्र' हें निश्चित उद्दिष्ट असल्यामुळेच त्यांनी पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम ह्या सर्वांना एकराष्ट्रीयत्वाच्या मुशींत ओतण्याचा अखंड प्रयत्न चालविला होता. आज ज्याच्यावर कांही अर्धवट लोक गहजब करीत आहेत तो 'लखनौचा करार' यासाठीच होता. आणि सर्वधर्मीयांनी आपापल्या धर्मांचा अभिमान बाळगून त्याचें राष्ट्रीय दृष्टीने पुनरुज्जीवन करावें असें ते सतत सांगत असल्यामुळे त्यांचे हिंदु धर्मजागृतीचे प्रयत्न राष्ट्रैक्यास मुळीच बाधक नव्हते, हे स्पष्ट आहे.
 लो. टिळकांना हिंदु धर्माचें जें पुनरुज्जीवन करावयाचें होतें त्याचें स्वरूप काय होतें तें येथवर केलेल्या विवेचनावरून स्पष्ट होईल. बनारसला ३ जानेवारी १९०६ या दिवशीं भारत-धर्म- महामंडळापुढे त्यांचें जें व्याख्यान झालें त्यांत यासंबंधीचे त्यांचे सर्व विचार एकत्र आलेले आहेत. तेव्हा स्वतंत्रपणें निराळा समारोप करण्याऐवजी त्या व्याख्यानाचा सारार्थ येथे देऊनच या विवेचनाचा समारोप करतों.
 लोकमान्य म्हणतात, "भारत-धर्म- महामंडळ हें नांव सार्थ केव्हा होईल?. हिंदु धर्मात सध्या अनेक पंथ, उपपंथ, शाखा, उपशाखा यांचे तण फार झाले आहे. त्या सर्वांना एकत्र संघटित करून त्यांचें दृढ ऐक्य मंडळ करील तेव्हा त्याचें 'धर्म महामंडळ' हें नांव सार्थ होईल. आपणांत अनेक भेद व फळ्या असतांना, एक पंथ दुसऱ्याचा तिरस्कार करीत असतांना, म्हणजेच आपण असे शतधा विभक्त असतांना हिंदु म्हणून वैभवास चढणें आपल्याला शक्य होणार नाही.
 "धर्माची व्याख्याच मुळी 'धारण करणारा तो धर्म' अशी आहे. धारण करणें म्हणजे एकत्र आणणें, बांधणे. माणूस व परमेश्वर ह्यांना व सर्व मानवांना एकत्र संघटित करणें म्हणजे धारणा करणें होय. यासाठी प्राचीन काळाकडे दृष्टि टाकून वेद, गीता आणि रामायण हें जें आपल्या परंपरेचें वैभव आहे तें शिरसावंद्य मानून आपण आपसांतले इतर भेद दृष्टीआड केले पाहिजेत आणि एक बलाढ्य हिंदु राष्ट्र निर्माण केलें पाहिजे.
 "सध्या आपल्या धर्माला वाईट कळा आली आहे. फूट, दुही, भेद, विभक्तता ह्यांनी आपल्याला ग्रासले आहे. आपण अत्यंत आळशी व मूर्ख झालों आहों. आपल्या प्राचीन ग्रंथांचा आपण अभ्यास करीत नाही. त्या ग्रंथांचें सुवर्ण वैभव आपल्या ध्यानांत आणून देण्यास आपल्याला पाश्चात्य पंडितांची गरज भासते. हे सर्व दोष महामंडळाने नष्ट करून आपल्या प्राचीन धर्माचें पुनरुज्जीवन केलें पाहिजे.
 "आपल्या प्राचीन धर्माचीं तत्त्वें किती उज्ज्वल आहेत तें आज विज्ञानाने सिद्ध होत आहे. सर्व चराचरांत चैतन्य भरलें आहे हा वेदान्ताचा सिद्धान्त आज जगदीशचंद्र बोस यांनी शास्त्राच्या आधारें सिद्ध केला आहे. आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धान्त इतके दिवस स्पेन्सरसारखे पंडित मान्य करीत नव्हते; पण सर ऑलिव्हर लॉज, मेयर यांसारखे शास्त्रज्ञ आता शरीराबरोबर आत्मा विनाश पावत नाही, असें सांगत आहेत. अमेरिकन पंडित आज वेदान्त, योग यांचा अभ्यास करीत आहेत; आणि तेच असे दाखवीत आहेत की, या शास्त्रांतलीं तत्त्वें विज्ञानपूत आहेत.
 "हें ध्यानीं घेऊन आपण आपल्या प्राचीन धर्म-ग्रंथांचे पुन्हा नव्या दृष्टीने संपादन केलें पाहिजे; आणि विज्ञानाच्या नव्या प्रकाशांत ते जगापुढे मांडले पाहिजेत. असें केल्याने ते सर्वांच्या आदरास पात्र होतील. सर्वत्र त्यांना मान्यता मिळेल. हिंदु धर्म हा सत्याच्या पायावर उभारलेला आहे, आणि इतर सर्व धर्म असेच सत्याच्या पायावर उभारलेले आहेत असें तो मानतो. म्हणून तुझा धर्म तुला, माझा मला, अशी त्याची उदार सहिष्णु वृत्ति आहे.
 "अशा या उदार धर्माचें साह्य घेऊन आपण आपसांतले भेद त्या महाप्रवाहांत बुडवून टाकले पाहिजेत व एक अभंग, एकसंध समाज निर्माण केला पाहिजे. असें केलें तरच जगतांतील थोर राष्ट्रांच्या मालिकेंत आपल्याला योग्य असें स्थान मिळू शकेल." (बाळ गंगाधर टिळक, हिज् रायटिंग्ज अँड स्पीचेस, गणेश अँड को., मद्रास, पृ. १२-२०).




-५-

स्वराज्याचें राजनीतिशास्त्र


 भिन्न धर्म, वंश, पंथ, भाषा, प्रांत, परंपरा इत्यादि कारणांनी भेद-जर्जर झालेल्या हिंदी समाजांतून एक संघटित हिंदी राष्ट्र निर्माण करणें हें लो. टिळकांचें अंतिम ध्येय होतें, हें वर अनेकवार सांगितलेंच आहे. या राष्ट्रनिर्मितीसाठी धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था, राजकारण ह्या सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत फार मोठें परिवर्तन घडविणें अवश्य आहे, हें प्रारंभापासूनच त्यांच्या मनाशीं निश्चित झालेलें होतें; आणि म्हणूनच त्या सर्व दिशांनी त्यांनी प्रयत्न आरंभिले होते. त्या प्रयत्नांचाच मागोवा येथवर आपण घेतला. गेल्या प्रकरणांत, त्यांच्या मतें धर्मक्षेत्रांत कोणतें परिवर्तन व्हावयास हवें होतें त्याचें विवरण केलें. आता राष्ट्रनिर्मितीसाठी व स्वराज्यप्राप्तीसाठी कोणतें राजनीतिशास्त्र हिंदी समाजाला त्यांनी सांगितलें त्याचा विचार करावयाचा आहे.
केवळ स्वार्थासाठी
 स्वराज्याच्या राजनीतिशास्त्रांतला त्यांचा पहिला सिद्धान्त हा की, कोणताहि देश दुसऱ्या देशावर सत्ता गाजवितो, तो केवळ स्वार्थासाठी होय. जित देशाच्या कल्याणासाठी कोणी कधीहि असला उद्योग करीत नाही. 'अनावर राज्य-विस्तार' या लेखांत ते म्हणतात की, "इंग्रज लोक हिंदुस्थानाचें राज्य करीत आहेत तें दरबारी भाषेंत जरी हिंदुस्थानच्या हिताचे असले तरी, वास्तविकरीत्या पाहिलें तर इतर युरोपियन राष्ट्रांची एशिया किंवा आफ्रिका खंडांत जी राज्यतृष्णा व चळवळ दिसून येते तीहून इंग्लिश लोकांची चळवळ फारशी भिन्न नाही असें आढळून येतें." (केसरी, खंड २ रा २५ फेब्रुवारी १९०२) याच लेखांत इंग्रजांच्या जगांतल्या अवाढव्य उद्योगाचें वर्णन करून हिंदुस्थानांतील त्यांचा कारभार केवळ स्वार्थाने प्रेरित झाला आहे, हें पुनः पुन्हा सांगितलें आहे. 'फार दिवस घडत असलेला वचनभंग' या लेखांत १८९३ साली एका इंग्रज अधिकाऱ्यांचे उद्गारच त्यांनी दिले आहेत. "हिंदुस्थान देश जो जिंकला आहे तो, हिंदुस्थानच्या फायद्यासाठी नाही. तर राज्यकर्त्यांचा व्यापार वाढावा व त्यांच्या पोराबाळांची तरतूद व्हावी एवढ्याकरिताच होय", असें एका मोठ्या इंग्रज अंमलदाराने बोलून दाखविलें होतें. (केसरी, खंड १ ला, पृ. १७६).
परकी सरकार
 हाच भाव लोकांच्या मनांत दृढमूल करण्यासाठी इंग्रज सरकार हें परकी सरकार आहे, असें वारंवार अट्टाहासाने ते सांगत असत. के. सी. एस्. आय्. ही बडी पदवी धारण करणाऱ्या एका इंग्रजाने, हिंदुस्थानांत इंग्रजांनी सर्व जुन्या संस्था, परंपरा चालू ठेवल्या आहेत, लोकांना स्वातंत्र्य दिले आहे व लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच कारभार चालविला आहे, तेव्हा अशा सरकारला परकी सरकार म्हणणें योग्य नाही, असा मुद्दा मांडला होता. त्याला टिळकांनी जें उत्तर दिलें आहे त्याचा आशय असा : आमच्या देशाची सांपत्तिक स्थिति सारखी खालावत चालली आहे. या देशाचा पैसा पांच हजार कोसांपलीकडे जाऊन पडतो. हत्यारांचा कायदा, ज्यूरीचा कायदा यांत पाश्चिमात्य व पौर्वात्य असा भेद केला जातो; असें असतांना इंग्रज सरकार परकी नव्हे, असें म्हणणें लपंडावाचें आहे. ज्या दिवशी इंग्रज लोकांपुरते निराळे कायदे होण्याचें बंद होईल, अठरापगड जातींसारखीच टोपीवाले ही एकुणिसावी जात होईल, ज्या वेळीं हिंदुस्थानच्या तिजोरीतील सर्व पैसे हिंदुस्थानांतच खर्च होतील, व इंग्लंड आणि हिंदुस्थान हे मित्रत्वाच्या नात्याने राहू लागतील तेव्हाच इंग्रज सरकारचा परकेपणा लुप्त होईल. (केसरी, लेख खंड १ ला, पृ. ३६९).
राजकारणाचा पाया
 इंग्रज सरकार परकी आहे, तें हिंदुस्थानच्या प्रजेचा रक्तशोष करीत आहे, त्यांच्या राज्यांत हिंदुस्थानचा सारखा अधःपात होत आहे, हें राज्य अन्यायाचें आहे, जुलमाचें आहे, या राज्यांत लोकांची अन्नान्नदशा होऊन दरसाल लक्षावधि लोक मृत्युमुखी पडत आहेत, आणि तरीहि दिवसेदिवस जास्त जास्त कर लादून, सारा वाढवून इंग्रज येथल्या प्रजेला पिळून काढीत आहेत, हा जो विचार, आणि यांतून सिद्ध होणारें जें तत्त्वज्ञान तें म्हणजे टिळकांच्या राजकारणाचा पायाच होय. त्यांनी हिंदी जनतेंत जो असंतोष निर्माण केला तो इंग्रजांची ही रक्तपिपासु राजनीति लोकांच्या निदर्शनास आणूनच केला. स्वराज्य कशासाठी पाहिजे या प्रश्नाला त्यांचें हेंच उत्तर होतें. तात्त्विकदृष्ट्या पाहिलें तर परकी सुराज्यापेक्षां स्वकीय वाईट राज्यहि चांगलें हें खरें; तसें एक-दोन ठिकाणी टिळकांनी म्हटलेंहि आहे; पण अंती हा विचार तात्त्विकच राहतो. कारण परकी सत्ताधारी प्रजेच्या कल्याणाची चिंता वाहून, खरोखरच केवळ प्रजेच्या हिताच्याच दृष्टीने कारभार करूं लागले, तर त्यांचें परकीयत्व तत्काल लुप्त होईल. येथल्या अनेक जातिजमातींपैकी ती एक जमात होऊन तिची 'स्व'मध्येच गणना होईल; आणि तसें टिळकांनी स्वतःच म्हटलें आहे, हें वरील उताऱ्यावरून दिसून येईल. तेव्हा हें सरकार अन्यायी आहे, जुलमी आहे, स्वार्थप्रेरित आहे, लुटारू आहे, रक्तशोषक आहे, हा विचार सतत मांडून, त्याचें काळें अंतरंग लोकांना दाखवून त्यांना स्वराज्याच्या चळवळीसाठी, इंग्रज सरकारशी लढा करण्यासाठी सिद्ध करणें हेंच टिळकांचें राजकारण होय. त्यांनी पुनः पुन्हा तुरुंगवासाच्या दारुण यातना सोसल्या आणि आत्म-बलिदानाची सतत सिद्धता ठेवली ती यासाठीच.
नवी राजनीति
 हें राजकारण, स्वराज्याची ही राजनीति, हिंदुस्थानाला सर्वस्वी नवी होती. एका व्यक्तीने शासनावर सत्ताधाऱ्यावर टीका करावयाची, विचाराने, तत्त्वज्ञानाने तिचा नैतिक पायाच हादरून टाकावयाचा आणि त्यासाठी हालअपेष्टा, तुरुंगवास सोसावयाचा ही कल्पनाच या देशाला पूर्वीच्या काळी कधी स्फुरलेली नव्हती; कारण राज्यक्रांति लोकांकडून करवावयाची असते हा विचारच येथे कधी उद्भवला नव्हता. भारतांत लो. टिळकांनी तो प्रथम मांडला; आणि त्या पद्धतीने येथे जागृति घडवून आणली. त्यांच्या या कार्याचें या प्रकरणांत विवेचन करावयाचें आहे.
दारिद्र्य
 इंग्रजी राज्यांत हिंदुस्थान दरिद्री होत आहे, हें दारिद्र्य दिवसेदिवस भीषण स्वरूप धारण करीत आहे, आणि हें असेंच चालू राहिलें तर एक दिवस या देशांत भडका उडाल्यावांचून राहणार नाही, हा विचार लो. टिळक केसरीच्या पहिल्या वर्षापासून सतत सांगतांना दिसतात. राष्ट्रपितामह दादाभाई नौरोजी यांनी दीर्घकाल अभ्यास करून प्रथम हा विचार १८७१ साली विलायतेत 'ईस्ट इंडिया फायनॅन्स कमिटी' पुढे साक्ष देतांना मांडला; आणि तोच पुढे त्यांनी 'पॉवर्टी अँड अब्रिटिश रूल इन इंडिया' या ग्रंथांत विस्ताराने प्रतिपादिला. हाच विचार पायाभूत म्हणून स्वीकारून विष्णुशास्त्री, आगरकर व टिळक ह्यांनी आपलें राजकारण उभारलें, असें आचार्य जावडेकर ह्यांनी म्हटले आहे ते यथार्थ आहे. दादाभाईंच्याबरोबरच श्री. डिग्बी या इंग्रज गृहस्थाच्या 'प्रॉस्परस इंडिया' या ग्रंथाचा उल्लेख टिळकांनी केला आहे. त्यानेहि दादाभाईंच्यासारखाच सिद्धान्त मांडला आहे. काँग्रेसचे आद्य प्रवर्तक श्री. हयूम यांचाहि टिळकांनी याच दृष्टीने मोठा गौरव केला आहे. पंडित गुरु गोविंद हे इंग्लंडमध्ये राहणारे एक हिंदी गृहस्थ. त्यांनी तेथील 'स्टेट्समन' या मासिकांत चार-पांच लेख लिहून हिंदुस्थानांत इंग्रजी राज्यामुळे सर्वत्र आबादीआबाद आहे, असें गुणगान करणाऱ्या डॉक्टर हंटर या गृहस्थाला खरमरीत उत्तर दिलें होतें. हे त्यांचे लेख १८८० सालांतले आहेत. डिग्बीसाहेबहि त्या वेळेपासूनच लिहीत होते. या सर्वांच्या आधाराने टिळकांनी इंग्रज राज्यकर्त्यांची राजनीति कशी आहे, तें हिंदी लोकांना स्पष्ट करून सांगितलें.
पाऊण आणा रोज
 'आम्ही आमच्या दारिद्र्यांतून कशाने सुटू' या लेखांत टिळकांनी डिग्बी यांच्या प्रतिपादनाचा मथितार्थ दिला आहे. लोकमान्य म्हणतात, "डिग्बी यांनी आपल्या 'हिंदुस्थानासंबंधी प्रश्न' या पुस्तकांत हिंदु लोकांच्या दारिद्र्याची अशी खाशी तसबीर काढली आहे की, ती पाहून पाषाणाला सुद्धा द्रव आल्यावांचून राहणार नाही. डिग्बी यांनी म्हटले आहे की, "नेटिव राजे प्रजेला चाबकाखाली झोडीत, पण आम्ही (इंग्रजबहाद्दरांनी) त्यांच्या अंगाला विंचवाच्या नांग्या लावल्या आहेत." (केसरी, वर्ष दुसरें, अंक १ ते ४). याच डिग्बीसाहेबांच्या दुसऱ्या 'प्रॉस्परस इंडिया' या उपरोधी नांवाने लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारें, टिळकांनी हिंदी जनतेच्या दारिद्रयाचा हिशेब दिला आहे. १८५० सालीं हिंदुस्थानचे दर माणशी रोजचें उत्पन्न दोन आणे होते. १८८० सालीं तें दीड आण्यावर आलें व १९०० सालीं तें फक्त पाऊण आणा होतें. डिग्बी यांनी सरकारी रिपोर्टाचेच आधार घेऊन ही माहिती दिली आहे. आणि आरंभीच हिंदुस्थानचे महानबाब लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांना उद्देशून म्हटले आहे की, "माझ्या पुस्तकांतील गोष्टी सर्व सरकारी रिपोर्टांतून घेतल्या आहेत. त्या खोट्या तरी ठरवा किंवा हिंदुस्थानास भिकेस लावणारी राज्यपद्धति तरी बदला." (केसरी, लेख, खंड २, रा पृ. २९५, ३००).
सुवर्णभूमीची अन्नान्नदशा
 हिंदुस्थानला हें भीषण दारिद्र्य कशामुळे आलें? एके काळी ही भूमि म्हणजे सुवर्णभूमि होती. सतराव्या-अठराव्या शतकांत येथे डीलाव्हेल, रे, टार्मर, डॉ. फायर इत्यादि जे युरोपीय प्रवासी येऊन गेले त्यांनी येथल्या उद्योगधंद्यांच्या भरभराटी- संबंधाने मोठ्या गौरवाने लिहून ठेविलें आहे. प्राचीन काळीं तर इराण, चीन, रोम, तुर्कस्थान या देशांशी आमचा व्यापार चालू होता. येथले कारागीर अत्यंत कुशल असून, त्यांच्या कलाकौशल्याची ख्याति जगभर झाली होती. गेल्या शतकापर्यंत युरोपांतील राजस्त्रिया हिंदुस्थानांतील सुती व रेशमी तलम वस्त्रावांचून दुसरीं वस्त्रे वापरण्यास नाखूष असत. असे हें कुशल कारागीर व त्यांच्या मालाचा जगभर विक्रय करणारे व्यापारी यांच्यामुळे हिंदुस्थानांत बाहेरून सोन्याचे पाट वाहत येत असत. असा हा देश आता भिकेला कां लागला? त्याची अन्नान्नदशा कां झाली?
नरडीस नख
 येथल्या कारागिरांचें कलाकौशल्य व येथला व्यापार इंग्रज सरकारने जाणून- बुजून नष्ट केला म्हणून हिंदुस्थानला दारिद्र्य आले आहे, असा सिद्धान्त टिळकांनी मांडला. 'आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले?' (केसरी, ११-११-१९०२); आणि 'कंपनी सरकार व इंग्रज सरकार' (२५-११-१९०२), या लेखांत त्यांनी हा सिद्धान्त सविस्तर मांडला आहे. सर थॉमस मनरो यांनी 'हाऊस ऑफ कॉमन्स कमिटीपुढे काश्मिरी शालीची कीर्ति गायिली ती ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांस सहन झाली नाही. आणि १७६९ सालींच त्यांनी हुकूम काढला की, हिंदुस्थानांतील फक्त कच्च्या मालास उत्तेजन द्यावें व पक्का माल होता होईल तो तयारच होऊ देऊ नये. त्याअन्वये येथील कोष्ट्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कारखान्यांतच त्यांनी नोकरी केली पाहिजे, स्वतंत्रपणें माल तयार करता कामा नये, असें फर्माविलें; आणि ज्यांनी नकार दिला त्यांना कडक शिक्षा केल्या. यानंतर कंपनीने येथून देशाबाहेर जाणाऱ्या मालावर जबर जकात बसविली. अशा मालावर शेकडा ६२२ पावेतों जकात ठेवून हिंदी व्यापाऱ्यांच्या व कारागिरांच्या नरडीस नख लावण्यांत आलें. येथल्या उद्योगांची व व्यापारांची अशी व्यवस्था केल्यावर कंपनी विलायती माल हिंदुस्थानांत पाठविण्यास मोकळी झाली. कारण स्पर्धा नाहीशी झाली होती. याचा परिणाम काय झाला? १८३० सालीं विलायतेंतून फक्त साडेसात लाखांचा माल हिंदुस्थानांत येत असे. तोच १९०० सालीं जवळ जवळ ९२ कोटि रुपयांचा माल तिकडून आला. आमचा माल परदेशीं जाऊं नये व तेथला माल येथे यावा एवढीच व्यवस्था करून कंपनीचे अधिकारी थांबले नाहीत. देशांतल्या देशांत पाठविल्या जाणाऱ्या मालावर देखील त्यांनी जबर जकात बसविली. यामुळे येथला व्यापार व येथली कारागिरीहि सर्वस्वीं बुडाली.
 कोष्ट्याच्या धंद्याप्रमाणेच इतर कलाकौशल्याच्या धंद्यांची अवस्था झाली. हा सर्व नाश जाणूनबुजून करण्यांत आला होता. इतर राहिलेल्या धंद्यांचा नाश इंग्रजी सुधारणांमुळे झाला. येथे आगगाडी आली. त्याच्या आधी १७८० मध्ये एकट्या गंगेच्या प्रवाहांतून मालाची ने-आण करणारे ३०,००० नावाडी होते. आगगाडीमुळे एवढ्या लोकांच्या तोंडचें अन्न गेलें. येथल्या प्रत्येक उद्योगाची इंग्रजी राज्यामुळे अशी वाताहत झाली; आणि आम्ही अन्नाला मोताद झालों.
 असे सर्व विवेचन करून 'आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले?' या लेखाच्या शेवटी टिळक म्हणतात, "हिंदुस्थानचा व्यापार ठार झाला अथवा येथील लोकांचे उद्योगधंदे बुडाले यांत नवल नाही. जर अशा तऱ्हेचे कायदे इंग्लंडास लागू केले असते अथवा इतकी परतंत्र स्थिति दहा-वीस वर्षेच इंग्लंडांत राहिली असती तर तें राष्ट्र केंव्हांच रसातळाला गेलें असतें, असें मानणें तर्कशास्त्रास सोडून होणार नाही."
 केसरी व मराठा या पत्रांच्या पहिल्या वर्षापासून लो. टिळक हा विचार सतत सांगत आले आहेत. केसरीच्या पहिल्या सात वर्षांतील अनेक लेख 'केसरींतील निवडक निबंध' या नांवाने दोन पुस्तकांत छापलेले आहेत. त्यांतील 'आम्ही या दारिद्र्यांतून कशाने सुटूं?', 'व्यापाराखेरीज तरणोपाय नाही', 'अप्रतिबंध व्यापार आणि उत्तेजन', 'समाइकीने उभारलेल्या भांडवलाचे कारखाने', 'उद्योगवृद्धि', 'भारतीय शास्त्रकलांचे पुनरुज्जीवन' आणि 'हिंदुस्थानचे कला कौशल्य' ह्या लेखांत पुनःपुन्हा हा विचार मांडण्यांत आलेला आहे. 'मराठा' पत्राच्या १८८१ सालच्या पहिल्या दोन महिन्यांतच याविषयी चार लेख आले आहेत. १८८२ च्या प्रारंभींहि असेच लेख आढळतात. त्यांचा मथितार्थ असा:
रानतोडू लोक
 इंग्लिशांनी आमचा सर्व व्यापार बळकावला आणि येथल्या उद्योगधंद्यांचा नाश केला, हेंच आमच्या दारिद्र्याचें खरें कारण आहे. हिंदुस्थान सध्या केवळ कच्चा माल पुरविणारा देश होऊन बसला आहे. आम्हांला लागणारा सर्व पक्का माल परदेशांतून येतो, विलायतेंतून येतो, ही अत्यंत लज्जास्पद स्थिति आहे. ती नाहीशी करावयाची तर आम्ही देशी उद्योगधंदे काढले पाहिजेत. हा देशं सृष्टिजन्य पदार्थांच्या बाबतींत समृद्ध आहे. येथे मजुरीहि स्वस्त आहे. पण त्या मूळ द्रव्यावर, कच्च्या मालावर, संस्कार करून त्याचा पक्का माल करण्याचे कारखाने येथे नाहीत. आम्ही केवळ धान्यपिकवू व रानतोडू लोक झालों आहों. एवढ्यावर कोणतेंहि राष्ट्र संपत्तिमान् होत नाही! आम्हीं खंडीच्या खंडी मुलद्रव्यें उत्पन्न करावीं, दुसऱ्या राष्ट्रांनी तीं जहाजे भरभरून न्यावीं आणि त्यांवर कुशलतेची करामत करून ती पुनः आम्हांकडे विकण्यास आणावीं व हवे तसे पैसे मिळवावे ही केवढी दुःखाची गोष्ट! असा प्रकार आमच्या देशांत आणखी कांही वर्षे चालला तर येथील माणसें एकमेकांना खाऊं लागतील, यांत काडीचा संशय नाही.
औद्योगिक विकास
 या भीषण भवितव्यांतून सुटावयाचें असेल, तर आपण कच्च्या मालाचा पक्का माल करण्याचे कारखाने येथे काढले पाहिजेत. त्यासाठी भांडवल लागेल तें समाइकीने उभारलें पाहिजे; आणि तज्ज्ञ कारागीर लागतील त्यासाठी आपले विद्यार्थी परदेशी पाठवून त्यांना तज्ज्ञ करून आणलें पाहिजे.
 या वेळी असे विद्यार्थी परदेशी धाडण्याची एक योजना पुण्याच्या सार्वजनिक सभेने आखली होती. तिचा पाठपुरावा केसरी व मराठा या दोन्ही पत्रांत केलेला आढळतो. मराठा पत्रांत शास्त्रीय ज्ञानाचें महत्त्व विवरून सांगितले असून शास्त्रीय ज्ञानावांचून खरी संस्कृति निर्माण होऊ शकत नाही, असें म्हटलें आहे; आणि शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार व औद्योगिक विकास हा सध्याच्या दारिद्र्यांतून सुटण्याचा एकमेव उपाय होय, असें सांगितलें आहे.
स्वदेशी
 'स्वदेशी व बहिष्कार' ही चळवळ १९०५ च्या सुमारास सुरू झाली; आणि अत्यंत वेगाने सर्व देशभर पसरली, पण तोहि विचार केसरीच्या पहिल्या वर्षापासूनच टिळकांच्या मनांत उदित झाला होता, असें दिसतें. मँचेस्टरच्या व्यापाऱ्यांनी नाना उपाय करून त्यांच्या हिंदुस्थानांत येणाऱ्या मालावरची जकात कमी करून घेतली. बाह्यतः त्यांनी असे दाखविलें की, हिंदु लोकांना कपडा स्वस्त पडावा हा यामागे हेतु आहे. टिळकांनी त्यांना मार्जार-साधु, बकध्यानी असें म्हणून येथल्या गिरण्या बुडविण्यासाठीच हें कारस्थान केलेलें आहे, हें स्पष्ट सांगितलें आहे; आणि स्वजनांना उपदेश केला आहे की, परदेशांतून येणाऱ्या कापडावरील जकात सरकारने माफ केली, यामुळे इकडील गिरणीवाल्यांचें नुकसान होत आहे. तें न होण्यास इकडील लोकांनी स्वदेशी कापड वापरण्याचा निश्चय करावा. त्यामुळे लाखो रुपये परदेशी जातात ते स्वदेशीं राहतील.
औद्योगिक पारतंत्र्य
 या देशाला राजकीय पारतंत्र्य आलें होतें. तें नष्ट करून त्याला स्वराज्य प्राप्त व्हावे यासाठी टिळकांनी सर्व आयुष्यभर तन-मन-धन झिजविलें; पण त्या राजकीय पारतंत्र्याचीं मुळे आपल्या औद्योगिक पारतंत्र्यांत आहेत हें प्रारंभापासूनच त्यांनी जाणलें असल्यामुळे त्या पारतंत्र्याचें पूर्ण स्वरूप ओळखून आपण त्या पारतंत्र्याच्या बेड्या प्रथम तोडल्या पाहिजेत, असें ते सतत सांगत असत. ('औद्योगिक पारतंत्र्य', केसरी, २५-९-१८९४), स्वराज्याच्या राजनीतिशास्त्रांतला त्यांचा हा सर्वांत महत्त्वाचा सिद्धान्त होता.
शेतकऱ्याचा रक्तशोष
 व्यापार व उद्योग यांचा नाश हें हिंदुस्थानच्या दारिद्र्याचें एक कारण झालें. दुसरें महत्त्वाचें कारण म्हणजे इंग्रज सरकारने चालविलेला येथल्या शेतकऱ्याचा रक्तशोष हें होय. हा रक्तशोष करण्याचें सर्वांत मोठें साधन म्हणजे सारावाढ हें होय. हिंदुस्थानचा शेतकरी ब्रिटिश राज्याच्या पूर्वकाळीं सुखी होता, संतुष्ट होता; पण इंग्रजांचें राज्य झाल्यापासून त्याची सुस्थिति लोपून तो हळूहळू कर्जबाजारी होऊं लागला व शेवटीं अन्नालाहि महाग झाला.
 'शेतकऱ्यांचा कायदा' या लेखांत टिळक लिहितात, "हिंदुस्थानांतील एकुणीसविसांश लोकांचा उदरनिर्वाह परोक्ष किंवा अपरोक्ष रीतीने जमिनीवर चालतो, पण जमिनीची लागवड करणाऱ्या शेतकरीवर्गास कोण विपन्नावस्था प्राप्त झाली आहे, याचा विचार केला म्हणजे अंगावर काटा उभा राहतों." (केसरी, २-२-१८९२). १८७५ साली सावकारांच्या जुलमाला त्रासून त्यांचा सूड घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दंगा केला. त्या वेळीं एक कमिशन नेमून त्याचा अहवाल हातीं आल्यावर सरकारने 'शेतकऱ्यांचा कायदा' म्हणून प्रसिद्ध असलेला कायदा केला. या वेळी शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचें मुख्य खापर सावकारांच्या माथीं फोडण्याचा सरकारने प्रयत्न केला. सरकारनेच नेमलेल्या कमिशनने शेतकऱ्यांच्या दारिद्रयाचें मुख्य कारण सावकार नसून, सरकारची सारावाढ हें खरें कारण असें सांगितलें होतें; पण सरकारने तें मुळीच मान्य केलें नाही.
 त्यानंतर पुढील दहा-पंधरा वर्षांत तो शेतकऱ्यांचा कायदा शेतकऱ्यांना हितावह न ठरतां घातकच होत आहे, असें दिसून आलें. तेव्हा सरकारने पुन्हा कमिशन नेमलें. याच वेळीं कलकत्त्याच्या स्टेट्समन या पत्राने या विषयावर पांच-सहा लेख लिहून, शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणास सावकार लोक जबाबदार नसून, खरें कारण सरकारचा कडकपणा हेंच आहे, इतकेंच नव्हे तर सावकार लोकांपासून शेतकऱ्यांस पूर्वी जी पुष्कळ प्रकारची मदत मिळत नसे तीहि कायदा झाल्यापासूनं बंद झाल्यामुळे त्यांचे अतिशय हाल होऊं लागले आहेत, असा स्पष्ट अभिप्राय दिला. त्या लेखांचाच सारांश टिळकांनी देऊन आपल्या लोकजागृतीच्या कामास पुन्हा चालना दिली.
सारावाढ
 लो. टिळक कायमधारा पद्धतीचे पुरस्कर्ते होते. त्या पद्धतीने शेतकऱ्याला जमिनीची मशागत करून तिची सुधारणा करण्यास हुरूप येतो. आपण जमिनींत कष्ट केले, तर त्याचें फळ कांही वर्षांनी सारावाढ करून सरकार हिरावून घेईल, असा धसका शेतकऱ्याच्या मनांत राहील तर कष्ट करण्यास त्यास उत्साह वाटणार नाही, हे उघडच आहे; पण इंग्रज सरकारला त्याची पर्वा नव्हती. "हिंदुस्थानला पिळून काढलें पाहिजे", असे लॉर्ड सॅलिसबरी जाहीरपणेंच म्हणाले होते; आणि हिंदुस्थान सरकारने तेंच धोरण ठेविलें होतें. जमिनीचें उत्पन्न वाढलें तर सरकारने थोडा सारा वाढवावा हें ठीक आहे, पण त्याला कांही मर्यादा आहेत. १८७४ आणि १८८४ या दोन सालीं विलायत सरकारने ठराव करून या मर्यादा घालून दिल्या होत्या. कांही ठिकाणी शे. ३३, कांही ठिकाणीं शे. ६६ व जास्तीत जास्त म्हणजे शे. १०० अशी सारावाढ त्या ठरावांनी मंजूर केली होती. पण १८९९ साली हिंदुस्थान सरकारने सर्रास दुप्पट, तिप्पट व कोठे कोठे पांच सहापट सारावाढ केली. त्यांवरच 'फेरपाहणीचा जुलूम' (केसरी २४-१०-१८९९), या लेखांत टिळकांनी कडक टीका करून 'प्रजेचा संतोष' हेंच ज्या सरकारच्या राज्याच्या बळकटीचें लक्षण आहे, त्याने अन्यायाने, दांडगाईने आपल्या तिजोरीची भर करणें चांगलें नाही, असा इशारा दिला आहे.
ठिणगी
 पण असा इशारा देणारे लोक सरकारला अत्यंत अप्रिय होऊन जात. १८९२ साली राष्ट्रीय सभेचे सेक्रेटरी श्री. ह्यूम यांनी दोन सर्क्युलरें प्रसिद्ध केलीं आणि "हल्ली शेतकऱ्यांची जी स्थिति आहे ती तशीच कायम राहिल्यास लवकरच ते बंड करण्यास उद्युक्त होतील, व एकदा असे दंगेधोपे होऊं लागले म्हणजे त्यांत सरकार, जमीनदार, शिकलेले लोक वगैरे कांहीएक भेदाभेद न होता; सर्वजण सारखेच बळी पडतील" असा इशारा दिला; पण याचा इंग्रज अधिकाऱ्यांना इतका संताप आला की, ह्यूमसाहेब लोकांना बंड करण्यास प्रवृत्त करीत आहेत, असा त्यांच्यावर आरोप करून त्यांना गोळी घालून मारावें, असा ओरडा त्यांनी सुरू केला. आणि हाच विषय घेऊन टिळकांनी, 'हिंदुस्थानांतील शेतकरी लोकांस खरोखरच बंड करावें लागेल काय?' या नांवाचे दोन लेख केसरीत लिहिले. (केसरी, ६ व १३ डिसेंबर १८९२) आणि त्यांत "शेतकरी लोक जोंपर्यंत अज्ञान आहेत तोंपर्यंत भीति नाही; पण दारिद्र्य व ज्ञान ही एकत्र झाली की, ठिणगी पडल्यावांचून राहणार नाही." असें एका इंग्रज पंडिताचें मत उद्धृत करून, तें अगदी यथार्थं आहे, असे स्पष्टपणें लिहून टाकलें, आणि शेवटीं लेखांचा समारोप करतांना, प्रत्येक देशहितचिंतकाने सरकारी अधिकाऱ्यांची किंवा अन्य कोणाची भीडमुरवत न धरतां शेतकऱ्यांची स्थिति सुधारण्याचे उपाय वेळीच अवश्यमेव केले पाहिजेत, असें सुशिक्षित हिंदी जनांना बजावलें. ते म्हणतात, "इंग्रजी राज्यावर पुढे केव्हा संकट येणार असेल तर तें उत्तरेकडून किंवा वायव्येकडून येणार नाही; पण सर्व देशांतील प्रजाच अन्नास महाग होऊन दंगा करण्यास प्रवृत्त झाली म्हणजे मात्र वेळ कठीण येणार आहे."
 टिळक कोणत्या आगीत उडी घेत होते तें यावरून कळून येईल. जो इशारा दिल्याबद्दल ह्यूमसाहेबास गोळी घालावी, असे इंग्रज अधिकाऱ्यांना वाटलें तोच इशास टिळक देत होते; व हिंदुस्थानांतील शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे बंडास प्रवृत्त करीत होते; आणि सुशिक्षितांनी हेंच कार्य केलें पाहिजे असें त्यांना पढवीत होते.
साराबंदी
 सारावाढीच्या जुलमाविषयी टिळक लेख लिहून थांबले, पण दुष्काळांत होणाऱ्या जुलमाच्या प्रतिकारासाठी त्यांनी प्रत्यक्ष मोहीमच उघडली. दुष्काळ ही हिंदुस्थानांतील नित्याचीच गोष्ट आहे. तेव्हा अशा प्रसंगी त्याच्या निवारणार्थ कोणती उपाययोजना करावयाची त्यासंबंधी सरकारने कांही नियम घालून दिले, व 'फॅमिन कोड' म्हणून ते प्रसिद्धहि केले. या फॅमिन रिलीफ कोडांत साऱ्याची सूट केव्हा, किती द्यावयाची, तो केव्हा, किती तहकूब ठेवावयाचा, जंगलें केव्हा खुलीं करावयाची, दुष्काळी कामावर मजुरी किती द्यावयाची, इत्यादि सर्व गोष्टींविषयी नियम बांधून दिलेले होते; पण प्रत्यक्षांत सरकारी अधिकारी दर वेळीं ते नियम वाऱ्यावर उधळून मन मानेल तसा कारभार करीत होते. म्हणून लोकांना जागृत करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक सभेतर्फे चळवळ सुरू केली. प्रथम त्यांनी फॅमिन रिलीफ कोडाचें मराठीत भाषांतर करून त्याच्या हजारो प्रती खेड्यापाड्यांत वाटण्याची व्यवस्था केली; आणि मग अनेक सुशिक्षित तरुणांना दुष्काळी भागांत धाडून शेतकऱ्यांच्या सभा घेऊन सरकार त्यांच्यावर कसा जुलूम करीत आहे, तें समजावून देण्यास प्रारंभ केला. ते तरुण शेतकऱ्यांना जाहीर सभेत सांगत की, "तुमचीं पिके बुडालीं आहेत तर तुम्ही सारा देऊं नका. सरकारचा नियमच तसा आहे." अशा सभेला कडेकोट पोलिस बंदोबस्त असे; पण तरीहि निर्भयपणे टिळकांचे कार्यकर्ते मुकत्यार अशी भाषणे करीत. १३ डिसेंबर १८९६ रोजी उंबरगाव पेट्यांत खत्तलवाड येथे कोळी, वारली, पांढरपेशे अशा लोकांची मोठी जंगी सभा झाली; त्या सभेस महालकरी, पोलिस-फौजदार, असि. कलेक्टर श्री. दुबोले हे सर्व हजर होते. सभेभोवतीं पोलिसांनी बंदुका भरून गराडा दिला होता. तरीहि सार्वजनिक सभेच्या दुष्काळ कमिटीचे सेक्रेटरी प्रो. साठे यांनी "तुमचीं पिके बुडालीं असली तर तुम्ही सरकारास सारा देऊं नये", असें त्रिवार समजावून सांगितलें, 'पोलिसांच्या पेटलेल्या बंदुकीच्या टप्प्यांत भरलेली रयतेची जंगी सभा' असा मथळा देऊन टिळकांनी या प्रतिकाराच्या चळवळीचें वर्णन केले आहे.
 कायदेभंग, करबंदी, बहिष्कार, निःशस्त्र प्रतिकार या पुढच्या सर्व चळचळींची ही खत्तलवाडची सभा म्हणजे नांदीच होती.
 हिंदुस्थानचा व्यापार व येथले उद्योगधंदे ठार करणें आणि शेतकऱ्याचा द्रव्यशोष करणे हे हिंदुस्थानचा रक्तशोष करण्याचे इंग्रज सरकारचे दोन मुख्य उपाय होत; पण याशिवाय अनेक मार्गांनी तें परकी सरकार जळवांप्रमाणे हिंदी जनतेचें शोषण करीत होतें. त्या अनेक मार्गांपैकी हुंडणावळीचा दर वाढविणें हा तर राजमार्गच होता. हिंदुस्थानांत नाणें रुप्याचें होतें; पण इंग्लंडला धाडावयाचा पैसा हा सोन्याच्या नाण्यांत धाडावा लागे. तेव्हा पौंडाचा भाव वाढवून इंग्रज सरकार कोट्यवधि रुपयांची लूट करीत असे. साम्राज्यविस्तार करण्यासाठी ब्रह्मदेश, अफगाणिस्तान अशा देशांवर इंग्रज सरकार नेहमी स्वाऱ्या करीत असे. त्या स्वाऱ्यांचा सर्व खर्च हिंदुस्थानवर लादणें हा लूटमारीचा आणखी एक मार्ग होय. साम्राज्य ब्रिटिशांचें, खर्च हिंदी जनतेचा! होमचार्जेस ही तर उघड उघड लूट आहे असें दादाभाई कंठरवाने अनेक वर्षे सांगत होते. दरसाल वीस-पंचवीस कोटि रुपयांची अशी लूट होत असे. मागे उल्लेखिलेले गुरु गोविंद यांनी अशीच टीका त्या वेळी केली होती. टिळकांनी त्यांचाच उतारा देऊन हा विषय विशद करून, केसरीच्या दुसऱ्या वर्षी पुन्हा मांडला आहे.
शहाणे करोनि...
 पारतंत्र्यामुळे अशा या ज्या भयानक आपत्ति येतात त्यांवर उपाय काय? 'शहाणे करोनि सोडावें सकळ जन!' 'हिंदुस्थानापासून इंग्लंडास फायदे' या लेखांत टिळक म्हणतात, "एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावरचा अंमल निघण्यास जिंकलेल्या राष्ट्राचे शहाणपण कारण होतें. शहाणपणाच्या मागे सर्व गोष्टी येतात. लोक शहाणे होऊं लागले व त्यांना आपलें हिताहित कळूं लागलें म्हणजे त्यांना धैर्य येतें, कल्पना येते, संपत्ति मिळू लागते व अखेरीस स्वातंत्र्यहि मिळते. सर्व मोठेपणाचा पाया शहाणपण होय. जोपर्यंत जिंकलेल्या लोकांस शहाणपण येऊ लागलें नाही तोपर्यंत त्यांच्या हातून कांही एक व्हावयाचें नाही."
 केसरीच्या पहिल्या वर्षी सांगितलेला हाच विचार 'शेतकरी लोकांस बंड करावें लागेल काय?' या लेखांत टिळकांनी बारा वर्षांनी पुन्हा सांगितला आहे. त्याचा निर्देश वर आलाच आहे. दारिद्र्य व ज्ञान एकत्र झालों की, ठिणगी पडते!
 यावरून, प्रारंभापासूनच लो. टिळकांचा स्वराज्यप्राप्तीचा मार्ग निश्चित झाला होता, हें दिसून येईल. लोकांना शहाणे करावयाचें, त्यांना आपले हिताहित सम जून द्यावयाचें, त्यांचें शौर्य-धैर्यादि सुप्त गुण जागे करावयाचे आणि मग ठिणगी पाडावयाची. वन्हि तो चेतवावा रे!
दिव्य दृष्टि
 हा मार्ग टिळकांनी आखला यांतच त्यांचें अलौकिकत्व आहे. गेल्या शतकाच्या उत्तरार्धांत जर्मनी, इटली, जपान, चीन या देशांत तेथील नेत्यांनी राष्ट्रसंघटना केली, स्वातंत्र्याचे लढे केले; पण ते सर्व जमीनदार, सरंजामदार, लष्करी सरदार यांच्या बळावर. लोकशक्तीला आवाहन त्यांनी केलेच नाही. ती एक महाशक्ति आहे. हें त्यांना आकळलेच नाही. भारतासारख्या मागासलेल्या देशांत, लोकशाहीची पूर्व-परंपरा मुळीच नसलेल्या देशांत, टिळकांनी ही शक्ति जाणली व तिला जागृत करून स्वातंत्र्याचा पाया घातला हेंच त्यांचें असामान्यत्व होय. ते क्रांतदर्शी होते, द्रष्टे होते असा त्यांचा गौरव आज सर्व जगभर होत आहे. त्याची यथार्थता यावरून कळून येईल.
जगाचे भाग्य
 भारत आज लोकायत्त देश झाला आहे; त्याने येथे प्रजासत्ताक शासन स्थापिलें आहे, हें खरोखर जगाचें मोठें भाग्य आहे. सोव्हिएट रशिया व चीन या देशांत गेल्या पन्नास वर्षांत दंडसत्ता स्थापन झाल्या. हिंदुस्थान हा त्यांच्यासारखाच जगांतला तिसरा मोठा देश. तोहि कम्युनिस्ट होऊन दंडायत्त झाला असता, तर जगांतील लोकशाहीचें भवितव्य निश्चित धोक्यांत आलें असतें. तें तसें आलें नाही, लोकशाहीला अजूनहि जगांत प्रतिष्ठा राहिली आहे, याचे श्रेय लो. बाळ गंगाधर टिळक यांना आहे. हिंदुस्थानांत लोकशक्ति जागृत करावयाची आणि येथे लोकसत्ताक शासन स्थापन करावयाचें हा निर्धार या महापुरुषाने प्रारंभापासून केला होता आणि सतत चाळीस वर्षे तन-मन झिजवून भारतीयांच्या मनांत लोकशासनाच्या आकांक्षा दृढमूल केल्या. आज जगांत नव्याने प्रस्थापित झालेल्या लोकसत्ता सर्वत धडाधड कोसळत असतांना भारतीय लोकसत्ता पंचवीस वर्षे अबाधित टिकून आहे याचें हेंच कारण आहे. हिंदी जनता लोकवादी झाली आहे.
सार्वलौकिक मत
 केसरीच्या दुसऱ्या वर्षाच्या मे महिन्याच्या अंकांतच 'मुत्सद्दी व योद्धा' या लेखांत लोकमान्यांनी भारतांतल्या खऱ्या शक्तीचा निर्देश केला आहे. ते म्हणतात, "इतक्या दिवसांच्या गाढ निद्रेतून अंमळ डोळे उघडून पाहण्याची मनीषा आम्हांला होऊं लागली आहे; परंतु सार्वलौकिक मत म्हणून जो एक नियामक अद्भुत उपाय आहे- ज्याला जुलमी राजे व अहंपणाचा तोरा बाळगणारे मंत्रीहि भितात- तशा प्रकारचें मत आपल्यामध्ये अजून उत्पन्न होऊं लागलें नाही. या गोष्टीला चांगले मुत्सद्दीच देशांत असले पाहिजेत", आणि जुलमी राजांनी भ्यावें असें लोकमत सिद्ध करण्याच्या प्रयत्नास टिळकांनी तेव्हापासूनच प्रारंभ केला. १९०१ साली शेतकऱ्यांचा जमिनीवरचा हक्क नष्ट करण्याचा प्रस्ताव सरकारने संमत करून घेतला. त्या वेळी ना. मेथा, सर भालचंद्र गोखले, खरे इत्यादि कौन्सिलच्या सभासदांनी त्याला कसून विरोध केला होता, व सभात्यागहि केला होता; पण सरकारते त्याची पर्वा केली नाही. त्या वेळी 'दुराग्रही सरकार व निर्बल लोकमत', 'आमची कायदेकौन्सिलें थट्टा आहे काय?' असे लेख लिहून, आमचें लोकमत निर्बल असल्यामुळेच हें घडू शकतें, तेव्हा लोकमत प्रभावी केलें पाहिजे, असाच उपदेश टिळकांनी केला. त्या वेळी त्यांनी सैन्याला, सरदारवर्गाला किंवा दहशतवादी क्रांतिकारकांना चिथावणी दिली नाही. त्या शक्तींना आवाहन केलें नाही. जनशक्ति जागृत नसतांना सैन्य हें सामर्थ्य आहे, असें टिळकांच्या स्वप्नांत सुद्धा आलें नाही. आमचें लोकमत दुर्बल आहे, सरकारवर पगडा बसविण्याचें सामर्थ्य त्याच्यांत नाही, तेव्हा तें लोकमत जागृत केलें पाहिजे हा टिळकांचा महामंत्र होता. त्यानंतरच्या काळांतहि सरकार ज्या ज्या वेळी अत्यंत जुलमाचें व दडपशाहीचें कृत्य करी त्या त्या वेळी टिळकांनी याच शक्तीला आवाहन केलेले आहे. बंगालच्या फाळणीच्या वेळी त्यांनी याच शक्तीला उधाण आणून तिला संघटित करण्याचा प्रयत्न केला. "सरकार लाखो लोकांच्या मताला काडीइतकीहि किंमत देत नाही. या गोष्टीचा प्रतिकार करण्याचा कांही मार्ग आम्हीं काढला नाही, तर लोकांचा चळवळीवरचा विश्वास उडून जाईल: तेव्हा हें लोकमत जागृत करणें हें पुढाऱ्यांचे काम आहे. हल्लीचें लोकमत अळणी आहे. त्याचा अळणीपणा कसा घालवावयाचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे."
नवें राजनीतिशास्त्र
 त्या वेळी राष्ट्रीय सभेत दोन पक्ष होते. जहाल आणि मवाळ. यांपैकी टिळक हे जहाल पक्षाचे होते. त्या पक्षाचें तत्त्वज्ञान, धोरण व कार्यपद्धति हेंच वरील प्रश्नाला उत्तर होतें. लोकमताचा अळणीपणा कसा घालवावयाचा, या प्रश्नाला लोकमत जहाल करून अळणीपणा घालवावयाचा, हें उत्तर लो. टिळकांनी दिलें. आता लोकमत जहाल करावयाचें म्हणजे काय?
 नवें राजनीतिशास्त्र लोकांना शिकवावयाचें. हिंदुस्थानांत हजारो वर्षे अनियंत्रित अशी राजसत्ता होती. राजा हा परमेश्वर आहे, विष्णूचा अवतार आहे, अशी लोकांची श्रद्धा होती. लोक व त्यांचे शास्त्री- पंडितांसारखे नेते इतके नादान झाले होते की, औरंगजेबासारखा जुलमी, अत्याचारी मोगल बादशहाला सुद्धा ते विष्णूचा अवतार मानीत असत. प्राचीन काळीं राजा जुलमी निघाला, तर प्रजेने त्याला पदच्युत करावें, इतकेंच नव्हे तर ठारहि मारावें, असें धर्मशास्त्र सांगे; पण तें शास्त्र पुढे लोपलें. आणि 'पावसाने झोडलें व राजाने मारलें तर कोठे जायचें?' असा प्रश्न विचारण्याइतकी ती हीन-दीन व निर्जीव झाली. प्रजेने संघटित होऊन राजसत्तेला नियंत्रण घालावयाचें असतें ही कल्पनाच या देशांतून नाहीशी झाली, आणि लोक 'मुकी बिचारी कुणी हाका,' असे होऊन गेले.
 अशा स्थितींत लोकांना नवी पाश्चात्त्य राजनीति शिकवून त्यांना जिवंत करणें, जुलमी राजसत्तेला प्रतिकार करण्याचें धैर्य त्यांच्या ठायीं निर्माण करणें, आणि वाटेल त्या यातना सोसून त्या सत्तेशी लढा करण्याची त्यांच्या मनाची तयारी करणें हें अवश्य होते. यालाच पुण्याच्या विठ्ठल मंदिरांतील एका व्याख्यानांत टिळकांनी 'खरें राजकीय नीतिशास्त्र' म्हटले आहे. ज्या शास्त्राचें पर्यवसान स्वराज्यांत होतें तें खरें राजकीय नीतिशास्त्र होय. (व्याख्यानें, पृ. २८६).
 स्वराज्याचें हें राजनीतिशास्त्र लोकमान्यांच्या व्याख्यानांवरूनच आता आपल्याला पाहवयाचें आहे.
प्रजाहि देवच
 राजसत्तेविषयी प्रजेच्या मनांत असणारा पूज्यभाव, आणि त्यांतूनच निर्माण होणारी भीति आणि धसका हा नष्ट करण्यासाठी "राजा देव असेल तर प्रजाहि देवच आहे,' असें टिळकांनी या व्याख्यानांत वारंवार सांगितलें आहे. ते म्हणतात, 'राजा देव आहे. हो आहे, नाही कोण म्हणतो? पण प्रजा कोण? देवच! अर्थात् प्रजा-देवाने राज-देवतेचा जुलूम सोसलाच पाहिजे, असें अनुमान यापासून निघत नाही. मनूने राजाला देवता म्हटलें आहे, पण त्यानेच त्याच्या पाठीमागे राजधर्म लावून देऊन, ते धर्म त्याने पाळले नाहीत तर तो नरकांत जाईल, असें स्पष्ट म्हटलें आहे. सारांश, राजा देव आहे असें म्हटलें तरी तेवढ्याने जुलमाचें आणि अन्यायाचें समर्थन होत नाही." (लो. टिळकांचीं व्याख्यानें, पू. ६, ७). सोलापूरच्या व्याख्यानांत त्यांनी असाच विचार सांगितला आहे. "राजा कांही आकाशांतून पृथ्वीवर पडलेला नाही. तो परस्परांच्या संमतीनेच निर्माण झाला पाहिजे. जो राजा आपल्या प्रजेच्या कल्याणाकरिता झटत नाही तो राजाच नव्हे व जी प्रजा आपले कर्तव्य बजावीत नाही ती प्रजाहि नव्हे. प्रजेने राजास कर्तव्य करावयास लावावें हीहि पूर्वापारची वहिवाट आहे."
 पूर्वीच्या शास्त्रांत राजाचे धर्म सांगितले आहेत, आणि ते न पाळले तर राजा पापी ठरतो, असेंहि म्हटलें आहे. पण 'प्रजाद्रोह' असा शब्द त्या शास्त्राने वापरलेला नाही. टिळकांनी तो शब्द वारंवार वापरला आहे. अकोला येथील व्याख्यानांत ते म्हणतात, "सध्यांच्या पीनल-कोडांत प्रजाद्रोहाला शिक्षा सांगितलेली नाही. तरी सर्व राजांचा राजा जो परमेश्वर त्याच्या कोडांत प्रजाद्रोहाबद्दल शिक्षा सांगितलेली असलीच पाहिजे. हा प्रजाद्रोहाचा गुन्हा राजांकडून होत असला म्हणजे प्रजेच्या मनोवृत्ति प्रज्वलित होऊन राजेलोक त्यांत पतंगाप्रमाणे नाश पावतात." (व्याख्यानें, पृ. २५६).
प्रतिकार
 राजा ही देवता असेल; पण ती भ्रष्ट झाली व तिने जर प्रजाद्रोह केला, तर तिचा प्रतिकार करण्याचा प्रजेला हक्क आहे; नव्हे तें तिचें कर्तव्यच आहे. तेव्हा जुलमी राजसत्तेचा प्रतिकार हे नव्या राजनीतीचें दुसरें तत्त्व होय. इंग्रज सरकारने सभाबंदीचा कायदा केला तेव्हा टिळक म्हणाले, "हा कायदा जुलमी आहे. असा कायदा करण्याचा सरकारला हक्क नाही. मनगटाच्या जोरावर असेल, पण नीतीने नाही. ईश्वरदत्त वाणीचा हक्क काढून घेण्यास सरकारास हक्क नाही. मी तुम्हांला स्पष्ट सांगतो की, आज वाणीने तर उद्या कृतीने याचा तुम्हांला निषेध करावा लागेल. जो कायदा आपल्याला जुलमी वाटतो तो न मानणें हें प्रजेचें काम आहे." (व्याख्यानें, पृ. ५९), प्रतिकाराची ही राजनीति टिळकांनी जवळ जवळ प्रत्येक व्याख्यानांत सांगितली आहे. सुरतेची राष्ट्रीय सभा मोडल्यावर तेथेच त्यांचे नंतर व्याख्यान झालें. त्यांत ते म्हणाले, "कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेत झालेल्या ठरावाअन्वये आता पुढे काय केले पाहिजे याचा विचार करण्याकरिता आपण जमलों आहों. सरकार रागावलें तरी आम्ही मागे जाणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांना खूष करण्याच्या बुद्धीपेक्षा प्रतिकाराची बुद्धि दाखविण्याची, माझ्या मतें, ही वेळ आहे. आपल्याला जो थोडा अग्नि रक्षण करतां येण्यासारखा आहे त्या अग्नीची ज्वाला भडकेपर्यंत तो जळता ठेवण्यासाठी, जिवंत राखण्यासाठी, आपण कांही करूं शकणार नाही काय?"
ज्वाला
 ठिणगी, अग्नि, ज्वाला! टिळकांच्या मनांत अखंड एक राजनीतितत्त्व होतें. शेतकरी, कारागीर दरिद्री आहेत, अज्ञ आहेत. त्यांच्या दारिद्र्यांत ठिणगी टाकावयाची, आणि मग ज्या ज्वाला भडकतील त्यांत आमचा रक्तशोष करून दिवाळी साजरी करणाऱ्या इंग्रजी राज्याची होळी करावयाची!
 वर निर्देशिलेली अग्नीची ज्वाला सतत जिवंत ठेवण्याचें साधन कोणतें? 'स्वदेशी आणि बहिष्कार'
स्वदेशीचा अर्थ
 स्वदेशी म्हणजे स्वदेशांत, हिंदुस्थानांत होणारा कापड, साखर, कागद इत्यादि माल वापरावयाचा आणि बहिष्कार म्हणजे सर्व प्रकारच्या ब्रिटिश मालावर बहिष्कार घालावयाचा; पण हे शब्दांचे मूळ अर्थ झाले. टिळकांच्या चळवळींत त्या दोन्ही शब्दांना फार व्यापक अर्थ आले होते. टिळकांच्या मतें हीं दोन्ही राजकीय शस्त्रे होती; आणि त्यांचा स्वराज्याशीं अविभाज्य संबंध होता. हिंदी जनतेंत ब्रिटिश राज्याविषयी तीव्र असंतोष चेतवून तिला त्या साम्राज्यसत्तेशी झुंज घेण्यासाठी सिद्ध करणें हा त्या चळवळीचा हेतु होता. तेव्हा तें एक राजकीय शस्त्र होतें हे उघडच आहे.
 अकोला येथील व्याख्यानांत टिळकांनी हा विचार विशद केला आहे. ते म्हणतात, "स्वराज्याच्या साधनत्रयीपैकीच स्वदेशी व बहिष्कार हीं दोन साधनें आहेत. (तिसरें साधन म्हणजे राष्ट्रीय शिक्षण), स्वदेशी उद्योगधंद्यांना सरकार उत्तेजन देत नाही, हें मनुष्यस्वभावास धरूनच आहे. त्यांचे वैभव कमी होईल असा उद्योग ते आम्हांस शिकवितील हें दुर्घट आहे; पण आमच्या हितासाठी आम्हीं उद्योग केला पाहिजे. त्यासाठी स्वदेशी हा मार्ग आहे. स्वदेशी हें ढोंग नव्हे. ज्या देशांतील अन्नाने आमचा पिंड बनला तो देश काय ढोंग आहे? आर्यभूमि वाट पाहत आहे. तिला मातापिता म्हणून केव्हा ओळखाल याची ती वाट पाहत आहे."
 गुर्लहोसूर येथील व्याख्यानांत त्यांनी सांगितलें की, "स्वदेशी व स्वराज्य कांही भिन्न नाहीत. स्वदेशीचें अंतिम स्वरूप स्वराज्य हें आहे." यावरून स्वदेशाची चिंता वाहणें त्यासाठी वाटेल त्या त्यागाची सिद्धता करणें हा 'स्वदेशी'चा टिळकांचा अभिप्रेत अर्थ होता हें स्पष्ट होईल. वरील अकोल्याच्या व्याख्यानांत त्यांनी पुढे हेंच स्पष्ट केलें आहे. "आर्यभूमीला माता म्हणून ओळखणे हीच स्वदेशी चळवळ होय."
प्रभावी शस्त्र
 यानंतर याच व्याख्यानांत त्यांनी 'बहिष्कार' याचा अर्थ स्पष्ट केला आहे. "बहिष्कार हें सामान्य शस्त्र नाही. त्याचा उपयोग कसा करावयाचा हे आपणांस शिकावयाचें आहे. स्वदेशींतच त्याचा उगम होऊन त्यामुळे जे परकीय तें आपोआप बाहेर पडते. राष्ट्रीय शिक्षणांतच स्वदेशी बहिष्काराचा अंतर्भाव होतो. तिन्हीहि आचरणीय असून स्वातंत्र्यपोषक आहेत. हे उपाय सर्वांस कळावे हा या नवीन चळवळीचा हेतु आहे."
 'जें जें परकीय तें बाहेर टाकणें' असा बहिष्काराचा व्यापक अर्थ आहे. हिंदुस्थानांत सर्व परकीयच आहे. न्यायखातें, महसूलखातें, पोलिसखातें... सर्व खातीं परकीयांच्या सत्तेखाली आहेत. या सर्वांवर बहिष्कार, असा बहिष्काराचा व्यापक अर्थ घेतला तर मग तें केवढें राजकीय शस्त्र आहे हें उमगेल. जानेवारी १९०७ मध्ये 'टेनेट्स ऑफ दि न्यू पार्टी' या विषयावर टिळकांचें कलकत्त्याला व्याख्यान झालें. त्यांत त्यांनी हा व्यापक अर्थ स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, "आपल्याजवळ शस्त्रे नाहीत, पण त्यांची कांहीच जरूर नाही. त्यापेक्षा फार प्रभावी शस्त्र आपल्याजवळ आहे, आणि तें म्हणजे बहिष्कार हे होय. हें राजकीय शस्त्र आहे. आपण सरकारला महसूल वसूल करण्यांत साह्य करावयाचें नाही. आपल्या सरहद्दीबाहेर लढण्याचें आपण नाकारूं. न्यायखातें चालविण्यास आम्ही साह्य करणार नाही. आम्ही आमचीं न्यायालयें स्थापूं. आणि पुढे वेळ आली की, आम्ही कर देण्याचें बंद करूं. आपल्या संघटित प्रयत्नांनी हे आपल्याला करतां येणार नाही काय? हें शक्य झालें तर उद्याच्या उद्याच आपण स्वतंत्र होऊं." (रायटिंग्ज अँड स्पीचेस, गणेश अँड कं., मद्रास).
तुमचेच राज्य
 धुळे, सोलापूर, पंढरपूर, पुणे येथील, 'आमची दुःस्थिति व त्यावर उपाय', 'आपले शत्रु आपणच', 'स्वदेशहित कसें साधावें?', 'श्रीशिवाजी-उत्सव' या विषयांवरील व्याख्यानांतून टिळकांनी हाच बहिष्कारयोग समजावून सांगितला आहे. "गुरें फॉरेस्टांत गेली म्हणून त्यांना कोंडणारे आम्ही, पाटील आम्ही, कुळकर्णी आम्ही, मामलेदार व इतर अधिकारी आम्ही. आणि इंग्रजांसाठी लढतोहि आम्हीच. तुम्हीच राज्य चालवीत आहा. आपल्या हातांतच स्वराज्य आहे. हें कळावयाचें व तें हातांतल्या हातांत ठेवावयाचें, एवढेच काय तें.", "तुम्ही इंग्रज सरकारचें राज्य आपण होऊन चालवीत आहां. तुमच्या हातूनच जुलूम करण्याची हातोटी सरकारास साधली आहे. याकरिता ज्या वेळीं तुम्ही एकजुटीने प्रयत्न कराल त्या वेळी हें राज्य तुमचेंच आहे.", "कोणी विचारतील की, मग काय, आम्हीं बंड करावयाचें की काय? बंडहि करायला नको व स्वस्थहि बसायला नको. हें माझें यास उत्तर आहे. पोलिस कोण आहेत? मुनसफ कोण असतात? मामलेदार कोण असतात? सगळे तुमचेच लोक. असें जर आहे तर सरकारला आपल्या मनासारखें करायला कां लावतां येणार नाही?"
 बहिष्काराचा हा अर्थ आहे. महात्माजींनी पुढे जी चळवळ केली तिच्यांतील करबंदी, कायदेभंग, सत्याग्रह व असहकारिता हीं जीं तत्त्वें तीं सर्व या बहिष्कारयोगांत आलेली आहेत. १९०८ साली टिळकांना शिक्षा झाली नसती तर ती चळवळ तेव्हाच झाली असती.
तुरुंग, हद्दपारी
 हीं बहिष्कारयोगाची तत्त्वें झालीं; पण नुसत्या तत्त्वप्रसारांनी कार्य होत नसतें. नुसता युक्तिवाद उपयोगी पडत नाही. मवाळपक्षाचे लोक पंचवीस वर्षे तो करीतच होते; पण सरकारवर त्याचा कसलाहि परिणाम होत नव्हता. म्हणूनच टिळकांनी नवा पक्ष स्थापिला. ह्या तत्त्वांच्या मागे सामर्थ्य उभे केलें पाहिजे हें ते प्रत्येक व्याख्यानांत सांगत असत. तें सामर्थ्य कोणते? देशासाठी हालअपेष्टा सोसण्यास सिद्ध असलेली तरुण शक्ति, आत्मबलिदान करण्याचें धैर्य जिच्या ठायीं आहे अशी लोकशक्ति! दडपशाहीच्या राजनीतीला या राजनीतीने उत्तर देणें अवश्य होतें. टिळक म्हणतात, "देशासाठी अनेक संकटे सोसण्यास आम्ही तयार असलें पाहिजे. रक्तपातशून्य क्रांति हे शब्द आहेत. रणांगणावरील रक्तपाताचा त्यांत समावेश नसला तरी तुरुंग किंवा हद्दपारीची शिक्षा त्यांत येत नाही, असें समजूं नका." (व्याख्यानें, पृ. ५). "ज्या गोष्टी आहेत त्यांची नुसती तात्त्विक समज असून भागत नाही. इच्छेचे मज्जातंतु हातांच्या बोटांत उतरले पाहिजेत. घोटाळा माजला आहे तो काढून टाकण्याकरिता धस सोसावी लागेल. हद्दपार व्हावें लागेल, तुरुंगांत जावें लागेल, तरी तुम्हीं तयार असलें पाहिजे. संकटांनीच तुमचा कस लागणार आहे. तुमचा कस कांही भोजनाच्या ताटावर लागावयाचा नाही." (व्याख्यानें, पृ. ४५). "सरकारने काही केलें तरी स्वदेशी व बहिष्काराचें व्रत आम्ही पुढे चालविणार असा निश्चय पाहिजे. मला तुरुंगांत पाठविलें किंवा फाशी दिलें तरी बेहत्तर, असें सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नुकतेच जाहीर केलें आहे. शेकडो लोक कैदेत गेले आहेत, जात आहेत, लोक हद्दपार झाले आहेत, याने जर तुमचें मन निग्रही बनत नसेल तर तुमची गणना पशूंत करावी लागेल." (व्याख्यानें पृ. ५१).
 लोकमान्यांनी प्रवर्तित केलेलें जें नवें राजनीतिशास्त्र त्याचें स्वरूप असें आहे. ज्या शास्त्राचें पर्यवसान स्वराज्यांत होतें ते राजनीतिशास्त्र अशी त्यांनीच त्याची व्याख्या केली आहे. त्याला नवें असें म्हणण्याचें कारण हें की, अशा तऱ्हेचें राजनीतिशास्त्र भारताच्या इतिहासांत कधीहि, कोणींहि सांगितलेलें नव्हतें. सर्व देशासाठी आपण कांही करावयाचें आहे, ती आपली जाबाबदारी आहे, हा विचारच भारताला नवा होता. अखिल देशाच्या उत्कर्षापकर्षाचें चिंतन कोणी करीत नसल्यामुळे औद्योगिक पारतंत्र्य, परदेशी जाणारा पैसा, सरकारने केलेली लूट याचा कोणीं अभ्यासच कधी केला नव्हता. आणि जुलमाचा, अन्यायाचा प्रतिकार सामान्य- जनांनी संघटित होऊन करावयाचा असतो हें तर कोणाच्या स्वप्नांतहि नव्हते. आगरकर, टिळक बर्वे-प्रकरणांत तुरुंगांत गेले तेव्हा, हा लष्करच्या भाकरी भाजण्याचा उद्योग यांना कोणीं सांगितला होता? असा लोकांना प्रश्न पडला होता. विष्णुशास्त्री यांनी त्यावर कडक टीका केल्याचें मागे सांगितलेच आहे. त्यानंतर पंधरा-सोळा वर्षांनी टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली तेव्हाहि त्यांच्या निकटवर्तीयांना तसाच प्रश्न पडला होता. हा नसता उद्योग कशासाठी? राष्ट्रकार्य हा अजूनहि नसता उद्योग वाटावा अशी या देशाची स्थिति होती. तेव्हा बहिष्कार, कायदेभंग, करबंदी, निःशस्त्र प्रतिकार ह्या कल्पना लोकांना किती अपरिचित होत्या हें कळून येईल; आणि असा हा नसता उद्योग हद्दपारी, फाशी पत्करूनहि केला पाहिजे असें राजनीतिशास्त्र टिळकांना सांगावयाचें होतें. या देशांत त्यांना केवढी मानसिक क्रांति घडवावयाची होती हें यावरून ध्यानीं येईल.
 या क्रांतीचें जें तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलें त्याचें विवेचन येथवर केलें. आता संघशक्ति निर्माण करून त्यांनी ती प्रत्यक्षांत कशी घडविली याचा विचार करावयाचा आहे.




-६-

संघशक्तीची उपासना


संघटित सामर्थ्य
 लो. टिळकांना भारतांत लोकसत्ता स्थापावयाची होती; आणि म्हणूनच त्यांना स्वराज्य मिळवावयाचें होतें तें लोकशक्तीच्या बळावर, व त्या शक्तीच्या साह्याने मिळवावयाचें होतें. असें उद्दिष्ट सतत डोळ्यापुढे असल्यामुळेच त्यांनी प्रारंभापासून ही लोकशक्ति जागृत करण्याचे प्रयत्न चालविले होते; पण लोकशक्ति जागृत करणें जितकें अवश्य तितकेंच तो संघटित करणें हेंहि अवश्य असतें, त्यावांचून सर्व प्रयत्न फोल ठरतात, हें लोकसत्तेचें तत्त्वहि त्यांनी जाणलें होतें. आणि म्हणून प्रारंभापासून त्यांनी संघशक्तीची उपासनाहि तितक्याच निष्ठेने चालविली होती.
मर्मस्थान
 प्राचीन काळी ग्रीसमध्ये अथेन्स या नगरींत लोकसत्ता स्थापन झाली होती. तिचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे; पण ती लोकसत्ता दीर्घकाल टिकली नाही. कारण अथीनियन लोकांना अभंग असें ऐक्य टिकवितां आलें नाही. लोकसत्तेचें हेंच मर्मस्थान आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य द्यावयाचें आणि तरीहि एकजूट कायम राखावयाची, हें कार्य फार अवघड आहे. जवळ जवळ अशक्य आहे. रोमनांनीहि लोकसत्तेशीं कांही काळ चाळा केला; पण त्यांनाहि लवकरच अनियंत्रित सम्राटांचाच आश्रय करावा लागला. आजपर्यंत दीर्घकालपर्यंत, व्यक्तिस्वातंत्र्य देऊनहि, अभंग ऐक्य टिकविण्यांत जगांत फक्त इंग्लंडला यश आलेले आहे. त्याच्या खालोखाल अमेरिकेला. बाकी पश्चिम युरोपांतील इटली, जर्मनी, फ्रान्स, स्पेन ह्या देशांतील लोकशाहीची कथा ही रडकथाच आहे. त्याचें कारण एकच. ह्या देशांतील लोकांना व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकसत्ता यांचा समन्वय साधण्याची कला अवगत झालेली नाही.
जागृति व संघशक्ति
 हा सर्व इतिहास टिळकांच्या डोळ्यासमोर होता. म्हणून ही समन्वय विद्या हिंदी जनतेला पढविण्याचे त्यांनी यावत्शक्य प्रयत्न केले. 'जागृति आणि संघटना, जागृति आणि संघटना' हाच त्यांचा मंत्र होता. १९०२ च्या जानेवारीत केसरीचा एकविसावा वाढदिवस होता. त्या वेळीं एका लेखांत टिळकांनी म्हटले आहे की, "लोकांत जागृति, व संघशक्ति उत्पन्न करणें हेंच वर्तमानपत्रकार या दृष्टीने आमचें मुख्य कर्तव्य आम्ही समजतों." सतत चाळीस वर्षे हेंच कार्य करीत राहिल्यामुळे टिळकांना हिंदुस्थानांत लोकशाहीचा पाया घालतां आला. ते भारतांतील लोकसत्तेचे आद्य प्रणेते ठरतात तें त्यांच्या या असामान्य कार्यामुळेच.
जुटीच्या अभावीं
 केसरीच्या दुसऱ्या वर्षीच टिळकांनी 'जूट' या विषयावर चार लेख लिहून संघशक्तीचें महत्त्व विशद केले आहे. "आम्हांवर पारतंत्र्यासारखी विपत्ति आली, व इतर अनेक अरिष्टें कोसळलीं त्याचें कारण जुटीचा व स्वाभिमानाचा अभाव हें होय; आणि यापुढे आम्हांत खरी जूट झाली तरच आपल्याला स्वतंत्रता-मंडित देशाचें जूं खांद्यावर घेतां येईल, आणि हिंदु म्हणजे तृण भक्षण न करणारे दोन पायांचे पशु, अशी जी कित्येक पाश्चात्त्यांची समजूत झाली आहे ती दूर होऊन हे भारतवर्षीय आपल्या बरोबरीचे, किंबहुना काडीभर जास्तच आहेत अशी त्यांची पक्की खात्री होईल." असे विचार पहिल्या दोन लेखांत त्यांनी मांडले आहेत; आणि पुढे जॉन राजापासून इंग्लंडच्या इतिहासाचा मागोवा घेऊन इंग्लिशांना जें असामान्य वैभव प्राप्त झालें तें जुटीमुळेच होय, असें सांगितलें आहे. ते म्हणतात, "त्यांच्यांत तंटे असतात, भांडणें असतात, पण राज्य-प्रकरणी ते सर्व आपसांतील तंटे गिळून टाकून जुटीने काम चालवितात. देशाच्या व सार्वजनिक कामांत सर्व एक. पण आमच्या इकडे नजर टाकली तर सर्व त्याच्या उलट प्रकार!"
 एकजूट, संघटना, राष्ट्रीय एकात्मता यांचें असें अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळेच टिळकांनी काँग्रेस स्थापन झाल्यापासून, एखाद्या पित्याने आपल्या कन्येचें लालनपालन, भरण-पोषण करावें तसें, पस्तीस वर्षे, काँग्रेसचें, राष्ट्रीय सभेचें भरण-पोषण केलें. राष्ट्रीय सभेवांचून हिंदुस्थानला अन्यगति नाही हाच विचार ते लोकांना अखेरपर्यंत सांगत राहिले होते.
राष्ट्र-मण्यांची माला
 १८८५ साली पहिली कांग्रेस पुण्याला भरावयाची होती. तेव्हा या कल्पनेचें स्वागत करतांना टिळकांनी म्हटले की, पुण्यास लवकरच एक जंगी कॉन्फरन्स म्हणजे सभा होणार आहे. तिचा हेतु असा आहे की, सरकारपासून जे हक्क घ्यावयाचे त्यांचें संपादन होण्यासाठी जं. उपाय योजावयाचे त्यासाठी सर्वं हिंदुस्थानभर एकमेकांच्या साह्याने, एकदिलाने व एकोप्याने परिश्रम चालावे. हा हेतु तडीस गेल्यास ब्रिटिश सरकारच्या अमलाखाली आतापर्यंत संकीर्ण असलेले जे महाराष्ट्र, कानडा, बंगाल, सिंध, मध्यप्रांत, वायव्यप्रांत इत्यादि राष्ट्र-मणि ते अन्योन्यसाधारण अशा कार्यसरांत गुंफिले जाऊन राष्ट्रीय संबंधांत त्यांची एक माला होईल; व असें झाल्यास "कलौ संघे शक्तिः' या वाक्याची पूर्तता होऊन आमच्या सुधारणेचें पाऊल थोडें जलदीने पडूं लागेल."
एकराष्ट्रीयत्व
 हें पहिल्या काँग्रेसविषयी झालें. येथून पुढे राष्ट्रीय सभेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या वेळीं लोकजागृति व एकराष्ट्रीयत्वाच्या पायावर या जागृत लोकशक्तीची संघटना, हाच मंत्र टिळक देत असत; आणि यासाठी खेड्यापाड्यापर्यंत काँग्रेसची चळवळ पसरली पाहिजे, असे आग्रहाने सांगत असत. १८, १०, १८९२ च्या केसरीत त्यांनी लिहिलें आहे की, "राष्ट्रीय सभेत ऐकमत्य होण्यापूर्वी प्रत्येक प्रांतांत त्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यांत व त्यापूर्वी प्रत्येक खेड्यांत तें झालें पाहिजे. अशा नैसर्गिक क्रमाने ज्या दिवशी आमचे प्रयत्न चालू लागतील तेव्हाच आम्ही राजकीय हक्क भोगण्यास पात्र होऊं व सरकारहि आमचें म्हणणे ऐकेल, हें प्रत्येक देशहितचिंतकाने लक्षांत बाळगलें पाहिजे." याच लेखांत ते पुढे म्हणतात, "सामाजिक, औद्योगिक वगैरे कोणतीहि सुधारणा असो, दर वेळीं आपलें राजकीय पारतंत्र्य आड येतें, हा अनुभव सर्वांस आहेच. यासाठीच वेळोवेळी जाहीर सभा करून, व्याख्यानें देऊन आणि वर्तमानपत्रांतून व पुस्तकरूपाने लेख लिहून लोकमत जागृत केलें पाहिजे."
मजबूत पाया
 अकरावी राष्ट्रीय सभा या लेखांत (केसरी, ६-८-९५) लोकमान्यांनी एक-राष्ट्रीयत्वाचा असाच विचार मांडला आहे. ते म्हणतात, "राष्ट्रीय सभेच्या विस्तीर्ण मंडपांत, बंगाली, मद्रासी, सिंधी, पारशी, मुसलमान आदि करून सर्व जातींचे लोक एकदिलाने व एकचित्ताने राजकीय व राष्ट्रीय प्रश्नांचा विचार करतांना ज्यांनी पाहिले असतील त्यांची हिंदुस्थानच्या भावी उदयाचा व ऐक्यतेचा राष्ट्रीय सभा हा एक मजबूत पायाच होय, अशी खात्री होऊन, त्यांची मनें आनंदाने भरून गेलीं असतील. आमच्या हिंदुस्थानांत पूर्वी छप्पन्न देश होते असा इतिहास आहे, पण इंग्रज सरकारच्या सार्वभौमत्वाखाली हे छप्पन्न देश मोडून त्यांचा एकजीव अथवा एकराष्ट्र होण्याचा समय आला आहे हें राष्ट्रीय सभेवरून जितकें पूर्णपणें व्यक्त होतें तितकें दुसरें कशावरूनहि व्यक्त होत नाही."
सर्वांचा एकजीव
 राष्ट्रीय सभेच्या कार्याचें महत्त्व विशद करतांना पुढे त्यांनी म्हटलें आहे की; "इंग्रजांच्या राज्यांत सर्व देशभर एकभाषा, सर्वत्र एक कायदा, एक राज्यपद्धति, दळणवळणाची रेल्वेसारखीं साधनें, अशी एकराष्ट्रीयत्वाची पूर्वतयारी सगळी झाली हें खरें; पण सर्वांचा एकजीव होण्यास लोकांचीं मनें एक झाली पाहिजेत; ही उणीव भरून काढणें हा राष्ट्रीय सभेचा मूळ हेतु आहे. हा साध्य होण्यासाठी हिंदुस्थानांतील सर्व जातींच्या, धर्मांच्या व सर्व प्रांतांतल्या लोकांस एकदिलाचें व एकविचाराचें करणें हें राष्ट्रीय सभेचें मुख्य कर्तव्य होय; आणि आज दहा वर्षे जो क्रम चालत आहे तो तसाच आणखी कांही वर्षे चालू राहिल्यास हा हेतु बऱ्याच अंशाने तडीस जाईल अशी राष्ट्रसभेच्या पुरस्कर्त्यांची उमेद आहे."
रयतेला येऊ द्या
 राष्ट्रीय एकतेची जशी टिळकांना चिंता होती तशीच जनतेच्या जागृतीचीहि होती. त्यामुळे शेतकरी, कारागीर हे लोक आता राष्ट्रीय सभेत आले पाहिजेत, असें प्रतिपादन आठव्या-नवव्या अधिवेशनापासून ते जास्त आग्रहाने करूं लागले. सातारा, कराची अशा ठिकाणीं जेव्हा राष्ट्रीय सभेचीं प्रांतिक अधिवेशने भरत तेव्हा त्यांचें महत्त्व सांगतांना ते हा विचार मुद्दाम सांगत. लोकजागृतीच्या दृष्टीने प्रांतिक सभेचें महत्त्व त्यांना जास्त वाटे. सातारकरांना मार्गदर्शन करतांना त्यांनी म्हटलें आहे की, "त्यांनी पुढील साली कांही तरी विशेष गोष्ट करावी; आणि ती कोणती म्हणाल तर शेतकरी वगैरे लोकांत प्रांतिक सभेबद्दल जागृति उत्पन्न करणें ही होय.. जमिनीचा धारा, जंगल, मीठ, अबकारी वगैरे बाबतींत गरीब रयतेचे हक्क काय आहेत ते त्या रयतेस समजून देण्याच्या उद्योगास आम्ही लागलें पाहिजे... रयतेचीं दुःखें रयतेनेच येऊन सभेत सांगितली पाहिजेत. निदान ज्यांच्या दुःखाबद्दल सरकारपाशी आम्ही दाद मागतों ते लोक असल्या सभेस हजर तरी असले पाहिजेत." (केसरी, १२ मे १८९६).
जहाल- मवाळ भेद
 लोकजागृतीचा– शेतकरी, कारागीर, तेली, तांबोळी, कोष्टी, साळी, माळी, चांभार, महार ह्यांना आपले हक्क समजावून देऊन त्यांच्यांत प्रतिकारशक्ति निर्माण करण्याचा- टिळकांचा हा जो आग्रह त्यामुळेच मवाळ व जहाल हे दोन पक्ष निर्माण झाले. कारण वर्षांतून चार दिवस एकत्र जमावें, भाषणे करावीं, कायदे-कौन्सिलाचें सभासदत्व, सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा यांविषयी कांही मागण्या कराव्या आणि वर्षभर नंतर आराम करावा, अशीच मवाळांची राष्ट्रीय सभेची कल्पना होती. तन-मन-धन अर्पण करून लोकजागृति करावयाची आहे, हें कोणाच्या स्वप्नांतहि नव्हतें. अलाहाबादच्या 'इंडियन ओपिनियन' पत्राने हें स्पष्टपणें म्हटलें आहे की, हिंदुस्थानांत राजकीय चळवळीला यश न येण्याचें कारण हेंच की, पुढारी अंग मोडून मेहनत करीत नाहीत. सर्व वेळ काँग्रेसला देण्यास कोणीच तयार नव्हतें. उलट जे आरंभी स्वतंत्र होते त्यांनी- तेलंग, चंदावरकर, तय्यबजी, सुब्रह्मण्य अय्यर, शंकरन् नायर यांनी- सरकारी नोकऱ्या पतकरल्या. उलट दुष्काळांतील साराबंदी, स्वदेशी आणि बहिष्कार या जहाल मार्गाने टिळक राष्ट्रीय सभेला नेऊ लागले. तेव्हा जहाल व मवाळ हे दोन तट पडणें अपरिहार्य झालें.
वंगभंगाच्या वेळीं
 वंगभंगाच्या चळवळींतून या दोन पक्षांच्या वृत्ति, कार्यपद्धति व राष्ट्रीय चळवळीविषयीची धोरणें स्पष्ट झाली. बंगालच्या फाळणीविरुद्ध लोकमत जागृत करण्यासाठीच स्वदेशी व बहिष्कार ही चळवळ सुरू झाली. यांत एक लक्षणीय गोष्ट अशी की, प्रारंभी ना. गोखले, सुरेंद्रनाथ हे नेमस्त म्हणजे मवाळ पुढारी या चळवळीला अनुकूल होते. सुरेंद्रनाथांनी तर तिचें नेतृत्वच केलें. बनारसच्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावरून गोखले यांनी या चळवळीचें उत्तम समर्थन केलें. "ही चळवळ राष्ट्राच्या इतिहासाला वेगळेंच स्वरूप देणारी अशी गोष्ट होय. या चळवळीने देशांतील वाद हटून पूर्वी कधी झाली नव्हती इतकी एकी पुढाऱ्यांत झाली आहे." असे उद्गार त्यांनी काढले. "बंगाली लोकांच्या मागे आम्ही उभे आहोंत, बहिष्कार हें शस्त्र योग्य असून स्वदेशीकरिता लोकांनी झीज सोसली पाहिजे, हिंदुस्थानाला वसाहतीचें स्वराज्य मिळालें पाहिजे.' असेंहि त्यांनी भाषणांत सांगितलें. याचा अर्थ असा की, गोखले जहाल झाले! "टाइम्स ऑफ इंडिया' ने दुसऱ्या दिवशीं तशी टीका केलीच. "नेमस्तपणा गोखले यांनी सोडला ही त्यांनी चूक केली" असें तो म्हणाला. दुर्देव असें की, सर्व नेमस्ताग्रणींना ही चूक झाली असेंच वाटले; आणि ती दुरुस्त करण्याच्या प्रयत्नास त्यांनी लगेच प्रारंभ केला.
जीव गुदमरला
 वास्तविक वंगभंगामुळे सर्व देशांत व विशेषतः बंगालमध्ये जो सरकारविरुद्ध प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला होता त्याच्या लाटेंत सर्व प्रांतांच्या, पंथांच्या, धर्मांच्या लोकांना एकत्र स्नान घडवून सर्वांना राष्ट्रीयत्वाचा मंत्र देण्याचा व अशा रीतीने सर्व भेद नष्ट करून दृढ एकात्मता घडविण्याचा टिळकांचा उद्देश होता. स्वदेशी व बहिष्काराची चळवळ त्यांनी नव्या जोमाने प्रचलित केली ती याच हेतूने. आरंभी तो हेतु साध्य होत आला होता. ना. गोखले यांनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावरून चळवळीला पाठिंबा दिला. सुरेंद्रनाथांनी तिचें प्रत्यक्ष नेतृत्वच केलें; पण त्या महासागरांतील प्रचंड लाटांचें खारे पाणी नाकातोंडांत जातांच नेमस्तांचा जीव गुदमरला आणि ते भराभर बाहेर पडूं लागले, राष्ट्रीय सभेलाहि या लाटेंतून मागे खेचण्याचा त्यांनी निश्चय केला होता. त्यासाठी टिळक व लजपतराय यांना पुढच्या सालच्या कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष न करतां त्यांनी दादाभाईंना पाचारण केलें; पण दादाभाईंनीच त्यांना दगा दिला. त्यांनी स्वदेशी-बहिष्काराचें समर्थन तर केलेच, पण शिवाय स्वराज्य-मंत्राची दीक्षा दिली. यामुळे राष्ट्रीय सभा एकदम 'केसरी'च्या म्हणजे 'जहालां'च्या हातीं गेली. कलकत्त्याच्या इंग्लिशमन पत्राने म्हणून टाकलें, "यंदाची राष्ट्रीय सभा सर्वतोपरी जहाल पक्षाच्या हाती गेली स्वराज्याचा प्रश्न लोकांपुढे प्राधान्याने मांडून दादाभाईंनी राष्ट्रीय सभेस जहाल करून सोडलें."
 स्वदेशी-बहिष्काराच्या चळवळीच्या लाटेंतून राष्ट्रीय सभेला बाहेर काढण्यांत कलकत्त्याला नेमस्तांना यश आलें नाही. तरी त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत; आणि रासबिहारींना अध्यक्ष करून तोच डाव पुन्हा सुरतेला त्यांनी टाकला; आणि त्यामुळेच तेथे राष्ट्रीय सभेचें ऐक्य भंगलें. तिच्यांत दोन फळया झाल्या.
मी तडजोडवादी
 या वेळी मवाळांशी समेट करावा, राष्ट्रीय सभा भंगूं नये म्हणून टिळकांनी फार प्रयत्न केले. सभेच्या अधिवेशनाच्या आधी दोन दिवस स्वतः टिळक, लजपतराय, खापर्डे हे सुरेंद्रनाथ, मालवीय इत्यादि नेमस्ताग्रणीकडे हेलपाटे घालीत होते; पण त्यांनी या नेत्यांशीं अपमानास्पद वर्तन केलें. त्यामुळे टिळकांनी असला अपमान सोसून पुन्हा मवाळांच्याकडे खेटे घालू नयेत, असें त्यांच्या जहाल पक्षाच्या अनुयायांना वाटत होतें. त्यांच्यापैकी 'महाराष्ट्रा'चे संपादक श्री. ओगले हा विचार टिळकांना सांगण्यासाठी त्यांच्याकडे गेलेहि, पण टिळकांनी त्यांना सांगितलें की, "समेट होत असेल तर हजार वेळा अपमान सोसण्यास मी तयार आहें. मी कांही स्वतःसाठी समेटाची याचना करीत नाही. देशाचें काम आहे, आणि आपलें खरें भांडण सरकारशी आहे, मवाळांशीं नाही. त्यांच्याशी भांडतांना शक्य तितकें ताणूं, पण तुटेपर्यंत ताणण्यांत अर्थ नाही. मी तडजोडवादी आहे हे लक्षांत ठेवा." (आठवणी, खंड २, पृ. ३२४).
ऐक्यासाठी मानहानि
 पण टिळकांनी कलकत्त्याला नव्या राष्ट्रीय पक्षाची स्थापना करून स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ही जीं पक्षाचीं चार मुख्य तत्त्वें म्हणून सांगितली होतीं त्यांतलें एकहि मवाळांना मान्य करणें शक्य नव्हतें. म्हणून तडजोड होऊं शकली नाही. पुढे काँग्रेसच्या अधिवेशनांत दुफळी झाल्यानंतरहि मोतिलाल घोष यांनी पुन्हा समेटाचा प्रयत्न केला. ती वेळ तर टिळकांच्या कसोटीची होती. मोतिलाल म्हणत होते, "तुम्हीं कांग्रेस मोडली, ऐक्यभंगाला तुम्ही कारण झाला, असें मवाळ म्हणत आहेत, तें तुम्हीं मान्य केलेंत, तसे लिहून सही करून दिलीत, तर समेटाला मवाळ तयार आहेत. मला माहीत आहे की, त्यांचें म्हणणें खरें नाही, पण ऐक्य टिकविण्यासाठी तुम्हीं हें करावें, असा माझा आग्रह आहे." या वेळीं राष्ट्रीय पक्षाच्या लोकांनी या सूचनेला तीव्र विरोध केला; पण टिळकांनी मोतिलालांचा आग्रह मानला व तसे लेखी लिहून दिलें. मोतिलाल म्हणतात, "या त्यागाला, या मनोधैर्याला तोड नाही. देशासाठी केवढी मानहानि त्या पुरुषाने पत्करली! ही उदात्तता असामान्य आहे." (ए स्टेप इन दि स्टीमर, प्रस्तावना, पृ. ९).
मवाळांचा अस्त
 पण या उदात्ततेचा कांही उपयोग झाला नाही. कारण ब्रिटिश सरकारला विरोध करणें, त्याच्या विरुद्ध प्रतिकाराची मोहीम उघडणें हें मवाळांना स्वप्नांतह मान्य होण्याजोगें नव्हतें. त्या वेळीं नव्हतें आणि पुढेहि केव्हा मान्य झालें नसतें. लो. टिळक मंडालेहून सुटून आल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी राष्ट्रीय पक्षाचें वर्चस्वं तेथे प्रस्थापित केलें. त्या वेळी त्यांनी होमरूलची चळवळहि सुरू केली होती. त्या वेळी श्रीनिवास शास्त्री, सुब्रह्मण्य अय्यर अशा कांही नेमस्तांनी तिला कांही काळ पाठिंबा दिला. पण लढा, संघर्ष, प्रतिकार, त्याग, आत्मार्पण, हा विचार त्यांना झेपण्याजोगा नव्हता. आणि टिळकांच्या चळवळीचा तोच आत्मा होता. त्यामुळे १९१७ नंतर नेमस्त नेते लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडले व अस्त पावले.
 यांत सर्वांत दुःखद कथा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची आहे. वास्तविक कायदे- भंगाच्या चळवळीस त्यांनीच प्रारंभ केला होता; पण १९२५ साली लिहिलेल्या आत्मचरित्रांत, "आम्ही सनदशीर मार्ग सोडून रेसभरहि कधी गेलो नाही", असें म्हणून त्यांनी बहिष्कारयोगाचा निषेध केला. आणि "ब्रिटिशांचे मन आता उदार झालें आहे, तेव्हा सनदशीर मार्ग सोडून रेखामात्रहि तुम्ही जाऊं नका", असा आपल्या देशबांधवांना त्यांनी अखेरचा संदेश दिला.
काँग्रेस अभंग
 मवाळांशी तडजोड होऊन १९०७ साली काँग्रेस अभंग राहिली असती तरी, हळूहळू टिळकांनी राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव तेथे प्रस्थापित करून बहुमताच्या जोरावर राष्ट्रीय सभेला (काँग्रेसला) बहिष्कारयोगाच्या मार्गावर निश्चितच आणली असती. आणि तेंच त्यांनी १९१६ साली केलें. त्या वेळीं प्रथम काँग्रेसच्या मवाळांनी ठरविलेल्या प्रतिज्ञाप्रत्रकावर सही करून त्यांनी आंत प्रवेश केला, आणि मग आपलें बहुमत करून काँग्रेसलांच होमरूलच्या चळवळींत ओढले. हा खटाटोप यासाठीच होता की, काँग्रेस फुटू नये. सर्व देशाची ही एकमेवाद्वितीय संस्था होती. ती अभंग राखली पाहिजे अशी टिळकांची प्रतिज्ञा होती. कारण लोकमत कितीहि जागृत झालें तरी तें जोपर्यंत संघटित होत नाही तोंपर्यंत तें सरकारला विरोध करण्याइतकें समर्थ होऊं शकत नाही हें त्यांना दिसतच होतें. त्यामुळे १९०७ सालीं व पुन्हा १९१५ साली आपली निराळी काँग्रेस काढावी असा राष्ट्रीय पक्षांतील त्यांच्या अनुयायांचा आग्रह असूनहि तो त्यांनी मानला नाही व काँग्रसचें अद्वितीयत्व कायम राखलें.
 कारण काँग्रेस ही इंग्लिश पार्लमेंटसारखी आहे, असें त्यांचें मत होतें, त्या पार्लमेंटांत अनेक पक्ष असतात. कधी या पक्षाचें बहुमत होतें कधी त्या पक्षांचें; पण त्यामुळे पार्लमेंट कोणी सोडून देत नाही. तीच दृष्टि काँग्रेसविषयी ठेवून आपण ती संस्था रक्षिली पाहिजे, असें त्यांचे ठाम धोरण होतें, आणि तें शेवटपर्यंत संभाळून त्यांनी काँग्रेसचा संभाळ केला. आज भारताला जें वैभव प्राप्त झाले आहे, जगांतल्या सर्वं नवोदित लोकसत्ता धडाधड कोसळून पडत असतांना भारतीय लोकसत्ता अजूनहि एक प्रबळ पक्ष टिकवू शकत आहे, याचें सर्व श्रेय टिळकांनी वाणीने, आचरणाने व त्याग-बुद्धीने भारतीयांच्या मनावर जे संस्कार केले त्याला आहे.
आम्ही होमरूलर
 १९०५ ते १९०८ या तीन वर्षात स्वदेशी व बहिष्कार ही चळवळ टिळकांनी जशी जागृति व संघशक्ति या तत्त्वांवर चालविली होती तशीच १९१६ ते १९२० ह्या चार वर्षांत होमरूलचीहि चळवळ जागृति व संघशक्ति याच तत्त्वांवर चालविली होती. २८ एप्रिल १९१६ या दिवशीं बेळगावला होमरूल लीगची रीतसर स्थापना झाली. ॲनी बेझंट यांनी मद्रासला आधीच स्वतंत्रपणें होमरूल लीगची स्थापना केलीच होती. त्यामुळे आता फिरून जोमाने लोकशिक्षणाच्या व जागृतीच्या कार्यास प्रारंभ झाला. त्याचे परिणामहि लगेच दिसूं लागले. बेझंटबाईंच्या 'न्यू इंडिया' पत्राकडून सरकारने जामीन घेतला व तीन महिन्यांच्या आंत ती रक्कम जप्तहि केली; शिवाय त्यांच्यावर मुंबई प्रांतांत येण्याची बंदी घालण्यांत आली. लो. टिळकांवरहि राजद्रोहाचा खटला भरण्यांत आला. त्यांची बेळगाव व अहंमदनगर येथील भाषणें सरकारला फार आक्षेपार्ह वाटली. सरकारविषयी त्यामुळे अप्रोति व द्वेष निर्माण होतो, व हा राजद्रोह आहे, असा आरोप त्यांच्यावर होता; पण हायकोर्टाने टिळकांना ह्या सर्व आरोपांतून मुक्त केलें.
 या सर्वांमुळे लोक अधिकाधिक निर्भय होत चालले. पुढे बेझंटबाईंना अटक झाल्यावर चळवळीला अधिक जोम चढून तिला सत्याग्रहाचें रूप आलें. स्वराज्याची मागणी बेकायदेशीर असेल तर आम्ही ती करीत आहों व होईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहों, असें लोक जाहीर सभा भरवून सांगू लागले व जिल्ह्या जिल्ह्यांतून तशी पत्रकें स्वराज्य संघाकडे धाडूं लागले. आश्चर्याची गोष्ट अशी की, सर सुब्रह्मण्य अय्यर, सुरेंद्रनाथ, बॅ. जीना, यांसारखे मवाळहि आपण स्वराज्यावादी असल्याचे जाहीर करून पत्रकावर सह्या करूं लागले. अलाहाबादचे सी. वाय्. चिंतामणि हे तर स्वराज्य संघाचे स्वतः सभासद झाले व काँग्रेस भक्तांनाहि त्यांनी तशी विनंती केली; आणि अशांतच १९१६ सालच्या डिसेंबरमध्ये लखनौला काँग्रेसचें अधिवेशन झालें आणि सर्व राष्ट्र एकमुखाने स्वराज्याची मागणी करीत आहे, असें अद्भुत दृश्य तेथे दिसून आलें.
लखनौ
 काँग्रेस सर्व धर्मांची, सर्व पक्षांची, सर्व जातींची- सर्वांची- आहे असें टिळक प्रथमपासून सांगत होते. लखनौला त्यांचें हें म्हणणें साकार झालें. मुस्लिम लीगनेहि स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा दिला. बहुतेक सर्व मवाळ पुढाऱ्यांनी ती मागणी उचलून धरली. ब्राह्मणेतरहि बहुसंख्येने सामील झाले, आणि सर्वांनुमते मंजूर झालेली योजना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सभेत मांडली. अशा रीतीने टिळकांनी केलेल्या परिश्रमांचें जीज होऊन लोकशक्ति जागृत झाली व संघटितहि झाली.
मुकुटधारण-विधि
 यामुळे कृतार्थता वाटून लो. टिळकांनी केसरींत पुढच्या आठवड्यांत लेख लिहिला. ते म्हणतात, "शुक्रवार, २९ डिसेंबर १९१६ हा दिवस हिंदी राष्ट्राच्या इतिहासांत निदान- ब्रिटिश रियासतीच्या इतिहासांत- सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा उगवला याविषयी शंका नाही. कारण त्या दिवशी हिंदी स्वराज्याचें निशाण लखनौ येथे गोमती नदीच्या तीरावर रोवलें गेलें... शुक्रवारचा ठराव म्हणजे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय आकांक्षेने केलेला मुकुटधारण-विधीच होय! या समारंभाला तिची सर्व प्रजा आपापला नजराणा घेऊन हजर होती. हिंदुस्थानांतील असा एकहि वर्ग नसेल की, ज्याचे प्रतिनिधि या समारंभास आले नव्हते. जातिभेद, मतवैचित्र्य, व्यक्तिद्वेष वगैरे राष्ट्रीय- कार्योच्छेदक पिशाचांनीहि गोमतीच्या प्रवाहांत गति घेतली व नवीन शुभदेह धारण करून समारंभास मंगल आशीर्वादच दिला.... आपलें राजकीय हृद्गत हुडकून काढण्याला या राष्ट्राला पांच पन्नास वर्षे लागली खरी, पण तें हृद्गत त्याचें त्याला आता कळून आलें. आणि गेल्या शुक्रवारी सर्व राष्ट्राने एकमुखाने त्याचा एवढा मोठा उच्चार केला की, त्याचा आवाज जगभर पसरला. आता त्याला त्याचा विसर पडणें शक्यच नाही; आणि त्याच्या हातून पुढे जो उद्योग होणार तो हे हृद्गत सफल होण्याकरिताच होईल यांत शंका नाही."
 तीस वर्षांनी, मध्यंतरी अनेक व्याघात आले तरी, टिळकांची ही भविष्यवाणी खरी ठरली.
 पण त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत राष्ट्रीय दृष्टीचा लोप होत चालला आहे. जातिभेद, मतवैचित्र्य, व्यक्तिद्वेष, इत्यादि राष्ट्रीय- कार्योच्छेदक पिशाचें पुन्हा जोर करून उठलीं आहेत. या वेळीं एवढेच म्हणावेंसें वाटतें की -

'लोकमान्यांचे आठवावें रूप'

 नाही तर प्राचीन ग्रीस, रोम या लोकसत्ता ज्या मार्गाने गेल्या, सध्याच्या नवोदित लोकसत्ता ज्या मार्गाने चालल्या आहेत, त्याच विनाशाच्या मार्गाने भारतीय लोकसत्तेला जावें लागेल. त्यामुळे त्या लोकसत्तेच्या आद्य प्रणेत्याच्या अंतरात्म्याला फार क्लेश होतील.




-७-

टिळकांचें राष्ट्रीय अर्थशास्त्र


 लो. टिळकांच्या आर्थिक धोरणाचा व तत्त्वांचा आता विचार करावयाचा आहे. त्यांतील एका सिद्धान्ताचा मागल्या एका प्रकरणांत आपण विचार केला. इंग्रज सरकार या देशाचा रक्तशोष करीत आहे, लूट करीत आहे, येथला व्यापार व उद्योग नष्ट करून त्याला आपला व्यापार व उद्योग वाढवावयाचा आहे, आणि म्हणन नाना प्रकारचे जुलमी कायदे करून तें सरकार आमचे सर्व उद्योगधंदे ठार: मारीत आहे, हा टिळकांचा पहिला सिद्धान्त होता; आणि या औद्योगिक पारतंत्र्यातून आपण स्वराज्य प्राप्त झाल्यावांचून मुक्त होणार नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यांच्या सर्वं राजनीति शास्त्राचा हा पाया होता.
दुहेरी मार्ग
 या नीतिशास्त्राचें प्रतिपादन करतांनाच एका बाजूला आपल्या उद्योगधंद्यांचा, कारागिरीचा, व्यापाराचा व शेतीचा विकास झाला पाहिजे, असें ते सांगत; आणि या विकसित होणाऱ्या उद्योगधंद्यांच्या संरक्षणासाठी आपण स्वदेशी बहिष्काराचा अवलंब केला पाहिजे, असें दुसऱ्या बाजूने सांगत. औद्योगिक पारतंत्र्य नष्ट करावयाचें; आणि स्वराज्यप्राप्ति करून घ्यावयाची यासाठी हा दुहेरी मार्ग त्यांनी दाखवून दिला होता. किंवा या एकाच मार्गाच्या दोन बाजू होत्या, असेंहि म्हटलें तरी चालेल.
आक्षेप
 या मार्गाचे स्वरूप वर्णितांना त्यांनी हिंदी भांडवलदारांचा पक्ष घेऊन, ब्रिटिश भांडवलदारांवर, मँचेस्टरच्या गिरणीवाल्यांवर अनेक वेळा टीका केली. मॅचेस्टरवाले त्यांच्या मालावरची जकात हिंदुस्थान सरकारकडून कमी करून घेत, येथल्या कामगारांच्या कामाचे तास कमी झाले पाहिजेत, असा आग्रह धरीत; आणि हें सर्व हिंदी जनतेला माल स्वस्त मिळावा व कामगारांचे हाल वांचावे म्हणून आम्ही करीत आहों, असें सांगत. टिळकांनी याच संदर्भात त्यांच्यावर मार्जार-साधु, बकध्यानी अशी टीका केली, हें मागे सांगितलेंच आहे; पण यामुळेच ते भांडवलदारांचे पक्षपाती आहेत, कामगारांच्या हिताची त्यांना चिंता नाही, असा त्यांच्यावर आक्षेप आला होता. सावकार, खोत, जमीनदार यांच्या बाबतींतहि असेंच झालें. सावकार हे शेतकऱ्यांना नागवितात, लुबाडतात, त्यामुळे शेतकरी दरिद्री झाला आहे असा प्रचार ब्रिटिश सरकार अखंड करीत राहिलें होतें. त्यावरहि टिळकांनी वेळोवेळी कडक टीका केली. त्यामुळे ते सावकार, जमीनदार यांचा शेतकऱ्यांविरुद्ध पक्ष घेतात असाहि त्यांच्यावर आक्षेप येत असे. अजूनहि येतो. यासाठीच टिळकांच्या अर्थशास्त्रीय तत्त्वांचा परिचय करून घेऊन वरील प्रकारच्या आक्षेपांत कितपत तथ्य आहे, हें पाहणें अवश्य आहे
 'दत्तकाची आवश्यकता' या विषयावर केसरीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षाच्या अंकांमिळून एकंदर आठ लेख टिळकांनी लिहिले आहेत. (केसरीतील निवडक निबंध, पहिलें पुस्तक, पृ. ४८-७४). त्यांत अत्यंत मूलगामी असे अर्थशास्त्रीय विचार त्यांनी सांगितलेले आहेत.
दत्तक अनावश्यक
 टिळकांच्या मतें दत्तक घेण्याची आवश्यकता मुळीच नाही. त्या रूढीमुळे समाजाचें फार नुकसान होत आहे. आज रूढ असलेलें दत्तकपुत्राचें सर्व शास्त्र स्मृतींनी सांगितलें आहे. वेदकाळीं तसें शास्त्र नव्हतें. मेल्यानंतर स्वर्गप्राप्ति व्हावी व आपल्यामागे आपलें नांव चालावें ह्या दोन हेतूंनी मनुष्य दत्तक घेतो. जुन्या धर्मशास्त्रानेहि याच हेतूंनी दत्तकाची आवश्यकता सांगितली आहे; पण त्याच धर्मशास्त्राचें सविस्तर विवेचन करून टिळकांनी असे दाखवून दिलें आहे की, हे दोन्ही हेतु साध्य होण्यासाठी त्या जुन्या धर्मशास्त्रानेच इतर अनेक मार्ग सांगितले आहेत. तेव्हा दत्तक घेण्याची आजच्या समाजांत तर मुळीच जरूर नाही.
 हा धर्मशास्त्रीय विचार प्रथम सांगून मग अर्थशास्त्राच्या दृष्टीने दत्तकाची रूढि कशी अनिष्ट व समाजाला अहितकारक आहे तें सांगितलें आहे. तें सांगतांना आजचे सर्व समाजवादी विचार टिळकांनी त्या लेखांत मांडलेले आहेत; आणि पुढे व्यवहारदृष्ट्याहि त्यांची युक्तायुक्तता तपासली आहे. टिळकांचें प्रतिपादन असें आहे:-
 अगदी प्राथमिक अवस्थेत समाज भटक्या स्थितींत असतो. शेतीची त्याला माहिती नसते. कंदमुळांवर तो निर्वाह करीत असतो. अशा स्थितींत कोणत्याहि प्रकारचा धनसंचय करणें त्याला शक्य नसतें. पुढे शेती, पशुपालन, कारागिरी यांची माहिती झाल्यावर समाज स्थिर होतो, कुटुंबसंस्था दृढमूल होते; आणि मग त्या वेळी मनुष्य धनसंचय करूं शकतो. या वेळीं समाज राजसत्ता स्थापून, अनेक कायदे करून, आणि सैन्य व पोलिस दलें उभारून समाजाचें, त्यांतील कुटुंबांचें, त्यांतील मनुष्यांचे, त्यांच्या घरादारांचें, जमिनीचें, पशुधनाचें एकंदर जीवित-वित्ताचें रक्षण करतो; आणि मनुष्याला धनसंचय करून त्याचें रक्षण करणें हें समाजाने केलेल्या या व्यवस्थेमुळेच शक्य होतें.
धनावरील हक्क?
 आता धनाचें अर्जन आणि संचित धनाचें रक्षण हें जर समाजामुळे शक्य होतें तर त्या संचित धनावर समाजाचा कांही प्रमाणांत तरी हक्क असला पाहिजे हें उघड आहे. द्रव्यसंचय होतो, तो समाजाच्या मदतीने होतो. तेव्हा त्या द्रव्याचा व्यय योग्य रीतीने कसा करावा हें समाजाने सांगावें व लोकांनी तें पाळावें हें न्यायता प्राप्त होतें; आणि हा न्याय मान्य केला तर अर्थशास्त्रदृष्ट्या प्रत्येक मनुष्याचा आपल्या स्वकष्टार्जित द्रव्यावरहि फारच कमी हक्क आहे असें दिसेल. 'वसुधैव कुटुंबकम्' या उदार दृष्टीने पाहतां समाजाची अति उत्कर्षावस्था म्हटली म्हणजे व्यक्तिमात्रास सारखें काम व सारखें सुख असावें, ही होय. व असें होण्यास सुखप्राप्तीचें साधन जें द्रव्य तें समाजांत एकतर सारखें वांटून गेलें पाहिजे किंवा एकत्र असल्यास समाजाच्या सामायिक ताब्यांत असलें पाहिजे. एरव्ही सर्वांस सारखें सुख कधी प्राप्त होणार नाही. (केसरीतील निवडक निबंध, पुस्तक १ लें, पृ. ६३, ६४).
 पण ही अति उत्कर्षावस्था म्हणजे आदर्श ध्येयवादी अवस्था झाली. सर्व- समाजहितांतच आपले हित आहे, ही वृत्ति प्रत्येक मनुष्याची होईल तेव्हा ती शक्य आहे; पण मनुष्यस्वभाव असा नसतो. मी व माझें यापलीकडे तो पाहत नाही. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने स्वकष्टाने मिळविलेल्या धनावर त्याचें संपूर्ण स्वामित्व समाजाने मान्य केलें आहे. तसें केल्यावांचून मनुष्याला उद्योगाला, कष्टाला प्रेरणाच मिळणार नाही. याच कारणामुळे मनुष्याने स्वकष्टार्जित सर्व धन आपल्या पुत्रांना, आप्तांना द्यावें हा त्याचा हक्कहि समाजाने मान्य केला आहे. पुत्र-कन्या यांच्या प्रेमामुळेच मनुष्य कष्ट करण्यास प्रवृत्त होतो व मिळविलेल्या द्रव्याचा संचय करण्याची त्यास बुद्धि होते.
समाजाला वांटा द्या
 पण मनुष्याचा स्वार्जित धनावर असा पूर्ण हक्क मान्य केल्यामुळेच समाजांत विषमता निर्माण होते. कांही लोक अति श्रीमंत होतात व कांहींना दिवसभर कष्ट करूनहि पोटास मिळत नाही. ही स्थिति समाजाच्या दृष्टीने श्रेयस्कर नाही. म्हणून स्वार्जित धनाचा वांटा समाजाला मिळवून देण्याचे अनेक मार्ग आपण अवलंबिले पाहिजेत.
 दत्तकाची रूढि नष्ट करणें हा तसाच एक मार्ग आहे. पुत्रांना मनुष्याने धन ठेवणें हें युक्त आहे. पण पुत्र नसतांना कोणा तरी सोम्यागोम्याला दत्तक घेऊन, त्याला तें संचित धन विनाकष्ट प्राप्त करून देणें, हा समाजावर अन्याय आहे. दत्तकाचा प्रघात पडल्याने आज लाखो रुपये लोकोपयोगाकडे न लागतां, श्रम केल्या वांचून कांही लोक त्यांचा यथेच्छ उपभोग घेत आहेत. यांत समाजाचें फार नुकसान आहे. सारांश, अर्थशास्त्रदृष्ट्या पाहिलें, तर स्वार्जित धनावर मनुष्याला पूर्ण हक्क दिल्यामुळे समाजांत जी आर्थिक विषमता निर्माण होते, ती मोडून टाकण्याची संधि या दत्तकाच्या रूढीमुळे नाहीशी होते. (पृ. ६६, ७०).
समाजवादी अर्थशास्त्र
 दत्तकाविषयी यापुढे आणखी कांही विवेचन टिळकांनी केले आहे. पण आपल्या विषयाच्या दृष्टीने तें अप्रस्तुत आहे. आपल्याला लक्षणीय आहेत तीं त्यांची संपत्तीच्या विभजनासंबंधीचीं मतें. मनुष्य धनसंचय करूं शकतो, तो समाजाच्या मदतीमुळे. म्हणून त्याच्या संचयावर समाजाचा बराच हक्क असतो. आता त्याची उद्योग- प्रेरणा नष्ट होऊं नये म्हणून त्याचें स्वामित्व समाज मान्य करतो व अर्जित धन पुत्रांना ठेवण्याचा त्याचा हक्कहि युक्त मानतो; पण या मर्यादा संपल्यावर त्या धनाचा वाटेल तो उपयोग करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे, असें मात्र नाही. हें व्यावहारिक अर्थशास्त्र झाले; पण आदर्श व्यवस्था कोणती म्हणून विचार करतां, व्यक्तिमात्रास सारखें काम व सारखें सुख असलें पाहिजे; आणि यासाठी सर्वांना सारखें धन वांटून दिले पाहिजे- ही उत्कृष्टावस्था होय, असें लो. टिळकांचें उत्तर आहे.
 केसरीच्या दुसऱ्या- तिसऱ्या वर्षांत, 'समाइकीने उभारलेल्या भांडवलाचे कारखाने' या विषयावर दोन लेख आले आहेत. त्यांत गिरण्या- कारखान्यांच्या भांडवलांत कामगारांचेहि भाग असावे, त्याचे पैसे त्यांच्याकडून सवलतीने घ्यावे, त्यांना शक्य नसेल तर प्रथम त्यांच्या भागाचे पैसे उत्पादकांनी घालावे व मग ते हळूहळू वसूल करून घ्यावे, असें सांगितलें आहे. यांत हेतु असा की, "कामगारांचा कारखान्याच्या नफ्यांत वांटा असला पाहिजे." या रीतीने मेहनतीबद्दल रोजमुरा मिळून नफ्यापैकी कांही भाग सालअखेरीस मिळण्याची खात्री झाल्यामुळे कारखान्याचा नफा करण्याकडे सर्व लोकांचा एकदिल लागतो. आणि या व्यवस्थेने कष्टकरी जनतेची स्थिति सुधारते. आणि या समाजाची स्थिति सुधारल्याखेरीज देशस्थिति सुधारली असें कधीहि म्हणतां येणार नाही. (पुस्तक २ रें, पृ. ४६ ते ४९).
 लो. टिळकांचे अर्थशास्त्रीय सिद्धान्त काय होते हें वरील विवेचनावरून ध्यानांत येईल. त्यांच्या राजनीतीचा किंवा अर्थकारणाचा विचार करतांना हे त्यांचे सिद्धान्त कधीहि दृष्टीआड होऊं देता कामा नये. येथे जें विवेचन आता करावयाचें आहे तें त्यांचीं ही तत्त्वें मनांत वागवूनच करावयाचें आहे.
कारखानदारीची वाढ
 या देशाचें दारिद्र्य नष्ट व्हावयाचें तर येथे भांडवली पद्धतीची कारखानदारी अत्यंत वेगाने प्रगत झाली पाहिजे, येथला व्यापार वाढला पाहिजे; आणि येथली शेती शास्त्रीय पद्धतीने झाली पाहिजे, हें टिळकांचे मत मागें एक-दोनदा सांगितलेंच आहे. इंग्रजांनी येथली कारागिरी बुडविली, व्यापार बुडविला, त्यामुळे शेतीवर सर्व लोकांचा भार पडून तिलाहि निकृष्टावस्था प्राप्त झाली आणि असे असूनहि पाटबंधारे, खतें, शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार यांची कांहीहि व्यवस्था न करतां इंग्रज सरकार सारावाढ मात्र सारखें करीत राहिलें. यामुळे हा देश अन्नालाहि महाग होऊन बसला. अशा स्थितींत नवी कारागिरी- म्हणजे भांडवली कारखानदारी, आणि व्यापार यांची वाढ हा एकच उपाय होय, हें जें टिळकांचें आर्थिक तत्त्व त्याचा ऊहापोह मागे केलाच आहे.
 या तत्त्वाचें प्रतिपादन करतांना टिळकांनी भांडवलदार, कारखानदार, व्यापारी यांचा सतत पुरस्कार केला आहे यांत शंकाच नाही. प्रश्न आहे तो हा की, असें करतांना कामगार, मजूर आणि एकंदर कष्टकरी जनता यांच्या हिताविषयी ते उदासीन राहिले होते की काय? त्यांच्या अर्थशास्त्रीय प्रतिपादनाविषयी आक्षेप घेतांना त्यांच्यावर आक्षेपक तसा आरोप करतात. म्हणून त्याचा परामर्शहि केला पाहिजे.
सोव्हिएट पंडित
 येथे आता जें विवेचन करावयाचें आहे तें बरेचसे 'टिळक अँड दि स्ट्रगल फॉर इंडियन फ्रीडम' या ग्रंथाच्या आधारे करावयाचें आहे. हा ग्रंथ रशियन मार्क्सवादी पंडितांनी १९६६ मध्ये प्रकाशित केला आहे. रेसनर व गोल्डबर्ग हे त्याचे संपादक असून लेव्हकॉव्हस्की, चिचेरोव्ह इत्यादि आणखी पांच-सहा लेखकांनी त्यांत लेख लिहिलेले आहेत. टिळकांच्यावर आक्षेप येतात ते बहुधा स्वदेशी मार्क्सवादी पंडितांकडून येतात. तेव्हा त्यांचा परामर्श घेतांना त्यांना गुरुस्थानी असलेल्या रशियन मार्क्सवादी पंडितांचा आधार घेणे सयुक्तिक होईल असें वाटतें.
कामगार हिताचे कायदे?
 १८८० च्या सुमारास मँचेस्टरच्या कारखानदारांच्या आग्रहामुळे इंग्रज सरकारने हिंदुस्थानांतील गिरण्या- कारखान्यांतील कामगारांसंबंधी दोन कायदे केले. एका कायद्याने सात वर्षांच्या आंतील मुलांना गिरण्यांत कामावर घेण्यास मनाई केली, सात ते बारा वर्षांच्या मुलांचे कामाचे तास नऊ असावे असें ठरविलें; आणि एकंदर कारखान्यांतील कामावर देखरेख करण्यासाठी इन्स्पेक्टर नेमण्याचा ठराव केला. दुसऱ्या कायद्याचा मागे उल्लेख आलाच आहे. हिंदुस्थानांत येणाऱ्या ब्रिटिश मालावरची जकात मँचेस्टरवाल्यांनी सरकारला कमी करावयास लावली. आणि गरीब रयतेला तो माल स्वस्त मिळावा हा यांत हेतु आहे, असें सांगितलें.
 लो. टिळकांनी या दोन्ही कायद्यांवर अतिशय कडक टीका केली; आणि यामुळे हिंदी भांडवलदारांचे कारखाने डबघाईस येतील, असें सांगून याच वेळीं आपण मँचेस्टरच्या मालावर बहिष्कार घालून, आपल्या उद्योगधंद्यांचें संरक्षण केलें पाहिजे, असें स्वजनांना सांगितलें. (मराठा, १७-३-८१).
 सकृद्दर्शनी टिळकांचें हें प्रतिपादन फार भयंकर दिसतें. गरीब कामगार, त्यांची मुलें व एकंदर जनता यांचे ते शत्रूच आहेत व त्यांची पिळवणूक होणें हेंच त्यांना इष्ट वाटतें, असा त्याचा अर्थ होतो; पण थोडा अर्थशास्त्रीय विचार केला व इतिहास पाहिला तर या आरोपांतील फोलपणा ध्यानांत येतो.
चिचेरोव्हचें मत
 आपण हें ध्यानांत ठेविलें पाहिजे की, कामगारांना सुस्थिति प्राप्त होते ती भांडवलशाहीच्या प्रगतीमुळे होते. भांडवलदारीची वेगाने प्रगति झाली की उत्पादन वाढतें, नफ्याचें प्रमाण वाढतें आणि मग कामगारांना वेतनवाढ देणें शक्य होतें. याच दृष्टीने चिचेरोव्ह या रशियन पंडिताने म्हटलें आहे की, "हिंदी कामगारांचे अति हाल होत, ते भांडवलदारीमुळे नसून, भांडवलदारीची योग्य व व्यवस्थित वाढ न झाल्यामुळे होत, आणि याला कारण म्हणजे ब्रिटिशांचें साम्राज्य." (उक्त ग्रंथ, पृ. ५४९). याविषयी कोणाला शंका असेल तर त्याने रशियाचा क्रांतीनंतरचा पंचवीस वर्षांचा इतिहास पाहवा. कामगारांची सत्ता, त्यांच्या हितासाठी स्थापलेली सत्ता असा तिचा गौरव केला जातो; पण तेथे अजूनहि कामगारांना पुरेसें अन्नहि मिळत नाही. एखादा दिवस कामगार गैरहजर राहिला तर त्याला बडतर्फ केलें जातें; आणि त्याची राहण्याची जागाहि जाते, आणि मग त्याला सैबेरियांत पाठविलें जातें. याचें कारण एकच. तेथे भांडवलदारीची प्रगति अवश्य तितकी झालेली नाही. सर्वांना पुरेसें उत्पादनच तेथे होत नाही. मग विभजन कशाचें करणार?
लॉर्ड रे यांचा सल्ला
 आणि ज्या वेळीं मँचेस्टरवाले व इंग्रज सरकार हिंदी कामगारांची काळजी दाखवीत होते त्या वेळीं म्हणजे १८७५-८० च्या सुमारास इंग्लंडमध्ये कामगारांची काय स्थिति होती? अनेक इंग्रज ग्रंथकारांनीच त्यांची वर्णने केलेलीं आहेत तीं पाहा. म्हणजे हिंदी कारखाने बुडविणें, त्यांच्यामुळे होणारी स्पर्धा नष्ट करणें एवढा एकच हेतु इंग्रज सरकारचा होता हें सहज ध्यानांत येईल. किंवा त्या ग्रंथकारांचीहि गरज नाही. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्वतःच आपला हेतु जाहीर केला आहे. लॉर्ड रे या अधिकाऱ्याने स्वबांधवांना सल्ला दिला की, "त्यांनी हिंदुस्थानांत भांडवल न्यावें, कारण तेथे मजुरी स्वस्त असून, कामगार संघटना मुळीच नाहीत. याचाच अर्थ असा की, तेथे कामगारांचा रक्तशोष किती करावा याला मर्यादा नाही." (लेव्हकॉस्की- उक्त ग्रंथ, पृ. ३१९). व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यानेहि जाहीरपणें सांगितलें होतें की, हिंदुस्थानांत ब्रिटिश कारखानदारीची वाढ करूं देणें हेंच सरकारचें मुख्य उद्दिष्ट आहे. याच वेळीं हुंडणावळीच्या दरांत सरकारने असा बदल केला की, त्यामुळे हिंदी निर्यात मालावर तीस टक्के जकात बसूं लागली. इत्यर्थ असा की, इंग्रजी राज्ययंत्र हेंच मुख्यतः हिंदी कष्टकरी जनतेच्या गुलामगिरीला व रक्तशोषाला कारण होतें. (पृ. ३२०). न्या. मू. रानडे, ना. गोखले, रमेशचंद्र दत्त यांनी अशाच प्रकारची टीका त्या वेळी केली होती
 १९०५ साली हिंदुस्थानांत ब्रिटिश कंपन्यांचे १६५ कारखाने होते व त्यांचें वसूल भांडवलच शंभर कोटि रुपये होतें. ब्रिटिश भांडवलदारांनी हिंदुस्थान कसा ग्रासला होता, हें यावरून कळून येईल. आणि हिंदुस्थानांतील ब्रिटिशांच्या कारखान्यांत, विशेषतः कलकत्त्याच्या जूट गिरण्यांतच मजुरांची सर्वांत जास्त पिळणूक होत असे. तेव्हा निरनिराळे कामगार- कायदे करण्यांत, हिंदी भांडवलदारी बुडवून आपण हिंदी कामगारांचा रक्तशोष करावा एवढाच इंग्रजांचा हेतु होता, हें स्पष्ट आहे. (पृ. ३१८, ३३२).
इंग्लंडमधील कामगार
 मँचेस्टरच्या मालावरची जकात हिंदुस्थान सरकारने माफ केली यावर टिळकांनी टीका केली हें ठीक. पण लहान मुलांच्या संरक्षणासाठी त्याने कायदे केले त्यालाहि टिळकांनी विरोध करावा हें अनेक स्वदेशी मार्क्सवादी पंडितांना फार खटकतें; पण त्यालाहि कांही अर्थ नाही. येथल्या भांडवलदारांना बुडवून, त्यांच्या जागीं आपण येऊन, येथल्या कामगार बायकामुलांचा दसपट रक्तशोष करावा, असाच ब्रिटिश भांडवलदारांचा व ब्रिटिश सरकारचा हेतु होता. याला निश्चित, संशयातीत पुरावा हा की, स्वतःच्या देशांत- इंग्लंडमध्ये- स्त्री व बाल-कामगारांचा ते असाच अमानुष छळ करीत होते. तेथील कारखान्यांत चार ते सहा वर्षांच्या मुलांना सुद्धा कामाला लावीत. त्यांच्या कामाच्या खोलींत १२०° ते १४८° असें तपमान असें. स्ट्रॉ-प्लेटिंगच्या कारखान्यांत तीन वर्षांच्या मुलांनाहि कामाला जुंपीत; आणि अनेक वेळा पैशाच्या लोभाने स्वत: आई-बापच मुलांना जास्त राबविण्यास सांगत. १८६७ सालीं याच्या नियमनासाठी कायदे झाले, पण कायदे करणाऱ्यांनीच प्रत्येक कलमाला इतके अपवाद करून ठेवले होते की, कामगार कल्याणाचा निम्मा हेतु विफल व्हावा. शिवाय सेक्रेटरी ऑफ स्टेट यांच्या खास परवानगीने बायका- मुलांनाहि चौदा ते पंधरा तास राबविण्याची सोय होती ती निराळीच. (ए हिस्टरी ऑफ फॅक्टरी लेजिस्लेशन- हचिसन अँड हॅरिसन, प्रकरण ८ वें) सिडने वेब या विख्यात समाजवादी ग्रंथकाराने वरील ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे. तींत ते म्हणतात, "लंडन येथील स्वेटेड इंडस्ट्रीजमध्ये कामगारांना गुरासारखें राबवितात. अन्न-वस्त्र पुरेसें न मिळाल्यामुळे लवकरच हे कामगार व त्यांचीं बायका-मुलें निकामी होतात, व त्यांना 'पुअर लॉ'च्या आश्रयाने जगावें लागतें. हाऊस ऑफ लॉर्डस् कमिटीने हें सर्व आपल्या अहवालांत १८९० सालींच नमूद करून ठेविलें आहे. त्याला आता बारा वर्षे झाली. पण तिकडे कोणी लक्ष देत नाही." वेबसाहेब पुढे म्हणतात, "१८०२ साली कापडगिरण्यांतील कामगारांची जी स्थिति होती तशीच आज (१९०२ साली) या स्वेटेड इंडस्ट्रीजमध्ये (स्लॉपक्थॉय्, लो ग्रेड फर्निचर इत्यादि) आहे." खाणींमध्ये स्त्रियांच्या कमरेला हातगाड्यांचे दोर बांधून त्यांना दोन हात टेकून चक्क बैलांप्रमाणे त्या गाड्या ओढायला लावीत. 'सोशल हिस्टरी ऑफ इंग्लंड' या ग्रंथांत याचीं चित्रेच दिली आहेत.
 स्वतःच्या देशांतील व स्वतःच्या रक्ताच्या गोऱ्या कामगारांचा असा अमानुष छळ करणारे ब्रिटिश सत्ताधीश हिंदी कामगारांसाठी कायदे करण्यास दयाबुद्धीने प्रेरित झाले होते असें म्हणणें सैतानालाच फक्त शक्य आहे. ब्रिटनमध्ये कामगार संघटनांमुळे पूर्वीप्रमाणे कामगारांचा रक्तशोष करतां येईना. तेव्हा हिंदुस्थानांत भांडवल गुंतवून तेथल्या कामगारांचें रक्त प्यावें हाच ब्रिटिश भांडवलदारांचा हेतु होता. आसामच्या चहाच्या मळ्यांत व चंपारण्यांतील निळीच्या मळ्यांत ते हा रक्तशोष करीतच होते. तेव्हा येथे कारखाने काढून येथल्या कामगारांचा त्यांनी हिंदी कारखानदारांपेक्षा दसपट रक्तशोष केला असता यांत शंकाच नाही.
 तेव्हा ब्रिटिशांच्या या आर्थिक आक्रमणास स्वदेशी- बहिष्कारादि चळवळींनी विरोध करणें, व हिंदी उद्योगधंदे बुडविण्यासाठी त्यांनी केलेले कायदे हाणून पाडणें, हें कोणाहि हिंदी देशभक्ताचें कर्तव्यच होते. टिळकांनी तेंच केलें; पण तसें करतांना कामगारांच्या हिताकडे त्यांनी दुर्लक्ष केलें होतें, त्यांचे दारिद्रय अपरिहार्य आहे, असे ते म्हणत होते, असें मात्र नाही. प्रारंभापासूनच सर्व कष्टकरी जनतेच्या हिताची चिंता ते करीत होते आणि त्या लोकशक्तीला जागृत व संघटित करून तिच्या करवीच तिचा व भारताचा मोक्ष साधावयाचा, हें त्यांचें धोरण होतें. वर निर्देशिलेल्या रशियन पंडितांच्या आधारेच त्याचें स्वरूप पाहूं.
 काँग्रेसचें पहिलें अधिवेशन झालें त्या वेळी मराठा पत्रांत तिच्या संयोजकांचें अभिनंदन करून टिळकांनी लिहिले की, "कोट्यवधि जनतेच्या वतीने आम्ही यां संयोजकांचे आभार मानतों. कारण त्या जनतेला संघटित करण्याची खरी आवश्यकता आहे.' (हा प्रारंभ आहे. पुढे-मागे जनतेपर्यंत काँग्रेस पोचेल ही अपेक्षा). यावरून हे स्पष्ट आहे की, कोट्यवधि जनतेची काँग्रेस प्रतिनिधि व्हावी ही प्रारंभापासूनच टिळकांची अपेक्षा होती. भारताच्या इतर कोणत्याहि नेत्याच्या दृष्टीचा पल्ला इतका दूरवर गेला नव्हता; आणि 'मराठा'खेरीज कोणत्याहि वृत्तपत्राने अशा आकांक्षा व्यक्त केल्या नव्हत्या." (टिळक अँड दि स्ट्रगल फॉर इंडियन फ्रीडम, पृ. ४४).
 लो. टिळकांनी शेतकऱ्यांत जागृति करण्यासाठी कोणत्या चळवळी केल्यां त्याचें मागे वर्णन केलेंच आहे. त्यांनी मजूरवर्गांत कशी जागृति केली त्या विषयी चिचेरोव्ह याने पुढील माहिती दिली आहे. टिळकांचे अनेक कार्यकर्ते गिरणी- कामगारांमध्ये जाऊन मजूर म्हणून राहत असत. हे बहुतेक सर्व ब्राह्मण असत त्यामुळे कामगारांना हे वरिष्ठ जातीचे लोक आपल्यांत राहतात याचा फार अभिमान वाटे व ते त्यांचा आदर करीत. या कार्यकर्त्यांचा मुख्य हेतु कामगारांना स्वराज्याच्या चळवळीत सामील करून घ्यावें हा होता; पण असें करतांना आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीची व विशेषतः रशियांतील १९०५-७ या वर्षांतील क्रांतीची ते कामगारांना माहिती देत व तिची तत्त्वेंहि सांगत. टिळकांना १९०८ सालीं शिक्षा झाल्यावर खाडिलकरांनी केसरीत 'मुंबई ही आमची आघाडीची सेना आहे' या मथळ्याखाली पांच लेख लिहून कामगार संघटनेचीं सर्व तत्त्वें त्यांत सांगितलीं होतींच.
 त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांनी टिळकांना झालेल्या शिक्षेचें समर्थन करतांना आपल्या गुप्त अहवालांत म्हटलें आहे की, "टिळकांचे कामगारांवर वर्चस्व इतकें होतें की, त्यापासून साम्राज्याला धोका निश्चित झाला असता. त्यांना शिक्षा झाली नसती तर त्यांनी सार्वत्रिक संप (जनरल स्ट्राइक) निश्चित घडवून आणला असता." त्या वेळच्या पोलिस-अहवालांतहि म्हटलें आहे की, टिळकांना लोक परमेश्वरच मानीत, आणि ते आपल्या कल्याणासाठी झटतात म्हणूनच सरकारने त्यांना तुरुंगांत टाकले आहे असें कामगारांना वाटे. (उक्त ग्रंथ, पृ. ५८८-९१).
 या रशियन पंडितांनी अनेक ठिकाणी मुक्तकंठाने लो. टिळकांचा गौरव केला आहे, आणि बहुतेक जागीं त्यांच्या कार्याचें योग्य असें मूल्यमापन केलें आहे; पण मधूनच केव्हा तरी त्यांच्या मनांतला मार्क्सवाद जागा होतो, आणि टिळकांचा दृष्टिकोन वर्गीय होता, मध्यमवर्गीय बुद्धिवादी दृष्टीमुळे त्याला मर्यादा पडत, कामगारांच्या स्वतंत्र चळवळीचें व कामगार नेतृत्वाचें महत्त्व त्यांनी जाणलें नाही, बुद्धिजीवी वर्गाकडेच त्यांनी अखेरपर्यंत नेतृत्व ठेविलें, अशा तऱ्हेचे आक्षेप ते घेतात. त्यांचें सविस्तर विवेचन येथे करावयाचें नाही; पण आपण एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे की, मार्क्सचीं हीं तत्त्वें आता अगदी हास्यास्पद ठरली आहेत. राष्ट्रीय पातळीवरचे लढे जगांत केव्हाहि वर्गविग्रहाच्या तत्त्वावर आणि कामगारांच्या नेतृत्वाने झाले नाहीत. खुद्द रशियांत व चीनमध्येहि नाहीत; आणि वरील आक्षेप घ्यावयाचेच ठरले तर ते सोव्हिएट व चिनी नेत्यांवर जसेच्या तसे घेतां येतील.
 तेव्हा टिळकांचें धोरणच बरोबर होतें. वर्गविग्रह हा भारताला घातक होईल असें त्यांचें निश्चित मत होते. इंग्लंडमध्ये असतांना डेप्युटेशनचे एक सभासद डॉ. वेलकर यांच्याशीं बोलतांना ते म्हणाले "भांडवलदार व कामगार असा लढा हिंदुस्थानांत होणें मला इष्ट वाटत नाही. कामगारांच्या संघटना मी निश्चित उभारणार आहे; पण त्या सोशल वेल्फेअरच्या पायावर. विमा-योजना, इस्पितळें, सहकारी पतपेढ्या, क्रीडा-केंद्रे अशा तऱ्हेच्या सुखसोयी कामगारांना मिळवून देणें हें त्यांचें उद्दिष्ट राहील. मुंबई ही मजुरांची आहे. त्यांच्या श्रमावर मुंबईची श्रीमंती अवलंबून आहे; पण नुकत्याच जन्मास आलेल्या आपल्या देशांतील कारखान्यांना व गिरण्यांना परदेशी गिरण्या- कारखान्यांशी स्पर्धा करावयाची आहे. अशा स्थितींत मजुरीचे दर कृत्रिम रीतीने वाढवून कसें चालेल?" (आठवणी खंड २, पृ. ८१).
 टिळकांची अशी व्यावहारिक दृष्टि होती; आणि त्या दृष्टीने कष्टकरी जनतेसाठी, तिच्या सुखासाठी ते सतत दक्ष असत. १८९६ सालीं दुष्काळाच्या वेळीं त्यांनी शेतकऱ्यांसाठी कशी चळवळ केली तें मागे सांगितलेच आहे. त्या वेळी कोष्टी, विणकर यांनाहि सरकार खडी फोडण्याचेंच काम देत असे. वास्तविक कायदा असा होता की, कसबी कारागिरांना त्यांच्या तऱ्हेचें काम दुष्काळांत दिलें पाहिजे. सोलापूरच्या साळी, कोष्टी यांच्यामार्फत टिळकांनी सरकारकडे तसा अर्जहि केला, पण उपयोग होईना. तेव्हा टिळक स्वतः सोलापूरला गेले व धनिक व्यापारी व गिरणीवाले यांच्या साह्याने त्यांनी कोष्टी लोकांस सूत पुरवून त्यांनी केलेला माल व्यापाऱ्यांनी घ्यावा अशी व्यवस्था केली, व यासाठी 'वीव्हर्स गिल्ड' अशी एक कमिटी स्थापन केली. ती अद्यापहि कार्यक्षम आहे. या व्यवस्थेमुळे साळी-कोष्टी यांना त्या वेळीं काम भरपूर मिळालें. इतकेंच नव्हे तर १९०० सालचा दुष्काळहि त्यांना जाणवला नाही. हल्ली ते लोक आपापला स्वतंत्र धंदा करून संपन्न स्थितींत आहेत. लोकमान्यांचें नांव यामुळे तेथे सर्वतोमुखी झाले आहे. (आठवणी खंड २ रा, पृ. ४०६, मल्लिकार्जुनप्पा पाटील यांच्या आठवणी). टिळकांना वर्गविग्रह नको होता. वर्गसमन्वय हवा होता. तो कसा तें यावरून दिसून येईल.
 त्यांचे सावकारांविषयी जें धोरण त्याच्या विषयी मागे विवेचन केलेच आहे. सरकार शेतकऱ्यांना स्वस्त व्याजाने कर्ज मिळवून देण्याची सोय जोपर्यंत करीत नाही, तोंपर्यंत सावकारांविरुद्ध हाकाटी करण्यांत कांही अर्थ नाही. तेव्हाहि नव्हता व आज स्वातंत्र्यानंतरहि नाही. कारण मोठमोठे कायदे झाले असूनहि आजहि ग्रामीण भागांत लोकांना ऐंशी टक्के कर्जपुरवठा सावकारींतूनच होतो. कारण सहकारी संस्था पुऱ्या पडूं शकत नाहीत. धनंजयराव गाडगीळांनी सुद्धा म्हटलें आहे की, "कांही म्हटलें तरी सावकार हा शेती-धंद्याच्या दृष्टीने उपयुक्त कार्य करीत होता, हें मान्य केलेच पाहिजे." तेव्हा त्या सावकारांवर नियंत्रण घालणें एवढाच एक उपाय शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी करण्याजोगा होता. आणि टिळकांनी तोच सुचविला होता. "शेतकऱ्यांच्या परस्पर साहाय्यकारी पेढ्या' या लेखांत, 'हलक्या व्याजावर शेतकऱ्यांस पैसे मिळतील अशा प्रकारच्या सावकारांच्या पेढया काढण्यास सरकारने मदत व उत्तेजन दिलें असतें तर चांगले झालें असतें," असें त्यांनी म्हटलें आहे. (लो. टिळकांचे केसरीतील लेख, खंड २ रा, पू. ४७७).
 खोतीविषयी याच दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. तो करतांना एक गोष्ट सतत ध्यानांत ठेवली पाहिजे की, इंग्रज सरकारला येथले कामगार, शेतकरी, कारागीर यांचें म्हणजे कष्टकरी दलित जनतेचें कसलेंहि हित करावयाचें नव्हतें. भांडवलदार, सावकार, खोत हे या जनतेला नागवितात त्याऐवजी आपण तिला नागवावयाचें, तिचा रक्तशोष करावयाचा हाच सर्व कायदे करण्यांत ब्रिटिशांचा एकमेव हेतु होता. भांडवलदार, सावकार, जमीनदार, खोत हे त्याच्या आड येत म्हणून त्यांना बाजूला सारणे हीच सर्वत्र त्यांची दृष्टि होती.
 खोतीचेंच उदाहरण घ्या. रत्नागिरी जिल्ह्यांतील खोत हे मुसलमानी काळापासून जमिनीचे मालक होते. तो मुलुख वसतिक्षम व तेथली जमीन उत्पादनक्षम त्यांनीच केली होती. त्यांनी सरकारधारा दिला की कुळाकडून जमिनीची कशीहि वहिवाट करण्याचा त्यांना अधिकार होता. कुळांना जमिनी करण्यास देऊन चांगल्या जमिनीच्या पिकांतून ते अर्धेल (अर्धे उत्पन्न) व वरकस जमिनीच्या पिकांतून तिल (एक-तृतीयांश उत्पन्न) घेत. कुळांना जमीन देणें न देणें हें त्यांच्या मर्जीवर होते; यामुळे कुळावर अनेक वेळा अन्याय, जुलूम होई हें खरें. त्यासाठी १८८० साली सरकारने कायदा करून खोतांना बांधून टाकलें व कुळांचेहि हक्क ठरवून दिले. हा कायदा उभयपक्षीं मान्य झाला होता. याने कुळांचें कल्याण झालें, असें सरकारनेहि बोलून दाखविलें; आणि टिळकांनीहि तें मान्य केले आहे. पण त्यानंतर सरकारचे दात दिसूं लागले. कांही वर्षांनी सरकारला खोतांनी द्यावयाचा धारा सरकारने वाढवून मागितला आणि त्यांना मात्र कुळाकडून हिस्सा वाढवून घेण्यास मनाई केली. यांत सरकारने कुळांची बाजू घेतली असें कोणास वाटेल. पण खरें काय तें लवकरच दिसून आलें. जास्त धारा भरण्यास खोतांनी नकार देतांच सरकारने त्यांच्या जमिनी जप्त केल्या आणि मग मात्र कुळाकडून पूर्वीपेक्षा उत्पन्नाचा जास्त हिस्सा सक्तीने वसूल करण्यास सुरुवात केली. म्हणजे जें करण्यास सरकारने खोतांना मनाई केली तेंच, कुळांच्या जमिनी ताब्यात येतांच स्वतः सरकार करूं लागलें. तेव्हा लूट करावयाची ती खोतांना न करूं देतां साक्षात् आपण करावयाची हाच खोती बिल करण्यांत सरकारचा हेतु होता हे स्पष्ट झालें. टिळकांनी त्यावर टीका केली ती याच साठी. खोती किंवा जमीनदारी नष्ट झाल्यावर शेतकरी जेव्हा सरकारच्या ताब्यांत जाई तेव्हा त्याची दसपट नागवणूक होते हें ते डोळयांनी पाहत होते. सर रिचर्ड टेंपल या मुंबईच्या गव्हर्नराने (१८-७७-८०) शेतकऱ्यांच्या हितासाठी नवें लँड रेव्हिन्यू कोड केलें. तें फार भयंकर होतें. तलाठ्याने सारा ठरविला की त्याविरुद्ध वर अर्ज करण्याचा शेतकऱ्याला हक्क नव्हता. एक हप्ता चुकला की त्याचे घरदार जप्त करण्याचा मामलेदाराला अधिकार होता; आणि थकबाकीचें वाटेल तें व्याज घेण्याचा त्याला अधिकार देऊन ठेवला होता. शेतांतलीं उभी पिके या कायद्याच्या आधारें तो जप्त करू शकत असे. याहिपेक्षा एक अमानुष प्रकार होता. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सेमूर के यांनी सांगितल्याप्रमाणे एका शेतकऱ्याचा सारा चुकला तर त्याच्या गावांतील इतर शेतकऱ्यांना जबाबदार धरून त्यांची स्थावर-जंगम मिळकत जप्त करण्याचा अधिकारहि मामलेदाराला या कोडाने दिला होता. (टिळक ॲण्ड दि स्ट्रगल फॉर इंडियन फ्रीडम, पृ. २०). खोती नष्ट करून तेथील कुळांना आपल्या ताब्यांत सरकारला यासाठी घ्यावयाचे होतें.
 तेव्हा हिंदी भांडवलदार, सावकार व खोत यांच्यापासून कामगार किंवा शेतकरी यांना आपल्या ताब्यांत घेऊन सरकारला काय करावयाचें होतें तें स्पष्ट आहे. त्यांना त्यांचें दसपट शोषण करावयाचें होतें. टिळक सरकारने केलेल्या कायद्यांवर टीका करीत होते तें यामुळेच होय. आता हे भांडवलदार, सावकार किंवा खोत कामगारांना किंवा कुळांना छळीत नसत, नागवीत नसत असें मुळीच नाही. पण त्यांतून त्यांना मुक्त करण्याचा टिळकांचा उपाय म्हणजे त्या समाजांना जागृत करून त्यांना संघटित करणें हा होता; आणि प्रारंभापासून त्याचाच त्यांनी अवलंब केला होता. या लोकशक्तीला जागृत करून ब्रिटिश साम्राज्यसत्तेशी झुंज देण्यास तिला प्रवृत्त करावयाचें हें तर त्यांचे ध्येय होतें. अशा रीतीने ती शक्ति जागृत झाल्यावर तिला येथल्या हिंदी भांडवलदार- जमीनदारांशी सहज मुकाबला करतां आला असता. आणि तो लढा इंग्लंडमधल्या भांडवलदार-कामगारांच्या लढ्यासारखा झाला असता. तेथे रक्तपात, क्रान्ति कधीच झाली नाही. कारण तेथले भांडवलदार 'अर्धं त्यजति पंडित:' इतके शहाणे होते. हेंच वर्गसमन्वयाचें धोरण टिळकांचें होतें. त्यामुळेच हळूहळू आर्थिक विषमता नष्ट होते. टिळकांचें अंतिम उद्दिष्ट तेंच होते. दत्तकाविषयी त्यांनी केलेल्या विवेचनांत याची सविस्तर चर्चा केली आहे. सर्वांना सारखें सुख व त्यासाठी सारखें धन ही त्यांच्या मतें आदर्श व्यवस्था होय; पण ती प्रत्यक्षांत कधी येत नाही. म्हणून अनेक उपाय करून विषमता शक्य तितकी कमी करणें हें धोरण अवलंबावें लागतें. किसान- कामगार जागृति हा त्यांतला सर्वांत प्रभावी उपाय होय. टिळक त्याचाच अवलंब करीत होते. स्वातंत्र्यानंतर ते असते तर त्यांनी ती शक्ति संघटित करून व भांडवलदार- जमीनदारांना विवेक शिकवून इंग्लंडप्रमाणे वर्गसमन्वयाच्या मार्गाने, रक्तहीन क्रांति येथे निश्चित घडविली असती. त्यांच्या राष्ट्रीय अर्थशास्त्राचा हाच आशय होता.




-८-

लो. टिळक व सामाजिक सुधारणा


लोकसमूहांतून राष्ट्र
 हिंदुस्थानांतील लोकसमूह हा धर्मभेद, पंथभेद, वर्णभेद, जातिभेद, स्पृश्यास्पृश्यभेद, प्रांतभेद, वंशभेद अशा अनेक भेदांनी ग्रस्त झालेला होता. धर्मबंधनें, जातिबंधनें, कर्मबंधनें, रूढिबंधने यांनी येथल्या सर्व थरांतील व्यक्तींचें व्यक्तित्व पार नष्ट झालें होतें. दीर्घकालीन पारतंत्र्यामुळे या समाजाचें स्वत्व सर्वस्वीं लोपलें होतें. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांचा अभिमान त्याच्या ठायीं नाममात्रहि उरला नव्हता. अज्ञानांधकारांत अनेक शतकें तो मूढपणें काल कंठीत राहिल्यामुळे जगांतील अन्य देशांची, त्यांच्या इतिहासाची, भूगोलाची, व्यापाराची, उद्योगधंद्यांची, राज्यपद्धतीची, समाजरचनेची, भौतिक शास्त्रांतील प्रगतीची पुसट सुद्धा कल्पना या लोकसमूहाला नव्हती. इतकेंच नव्हे तर स्वतःच्या देशाचा इतिहास, येथली प्राचीन परंपरा, येथल्या पूर्वसूरींचे पराक्रम, त्यांचे कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा यांचें सुद्धा त्याला ज्ञान नव्हतें. अशा या लोकसमूहांतून एक संघटित हिंदी राष्ट्र निर्माण करावयाचें आणि ब्रिटिश साम्राज्यसत्तेशी लढा देण्यास त्याला समर्थ करून या देशाला स्वातंत्र्याचा लाभ करून द्यावयाचा हे लोकमान्य टिळकांचें उद्दिष्ट होतें, हें वर अनेक वेळा सांगितलें आहे; आणि याच दृष्टीने त्यांनी धार्मिक, राजकीय, आर्थिक या जीवनाच्या भिन्न क्षेत्रांत कोणतें उद्योग आरंभिले होते, काय प्रयत्न चालविले होते याचा विचार येथवर आपण केला व त्यांच्या प्रयत्नांची तात्त्विक चिकित्सा करून त्यांतील यशापयशाचें रूपहि पाहिले. आता त्याच दृष्टीने समाज- सुधारणेच्या क्षेत्रांतील त्यांचें तत्त्वज्ञान, त्यांचे उद्योग, व त्यांचे यशापयश यांचा परामर्श करावयाचा आहे.
नागरिक आणि प्रजा
 जुन्या काळच्या राजांच्या अमलाखाली नांदणारी प्रजा आणि राष्ट्ररूपाने संघटित झालेले लोक यांच्यांतील एक महत्त्वाचा फरक हा की, राष्ट्रांतील प्रत्येक व्यक्तीला सर्व समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी आपल्या शिरावर आहे याची जाणीव असते. जुन्या प्रजांच्या ठायीं या जाणिवेचा संपूर्ण अभाव असतो. राज-सत्तेखालच्या व्यक्ति या वैयक्तिक जीवन जगत असतात; सामूहिक, सार्वजनिक जीवनाची त्यांना कल्पनाच नसते. उलट, सामूहिक राष्ट्रीय जीवन हेंच राष्ट्रसंघटनेचें मुख्य लक्षण. यावरून हें उघड होईल की, ज्याला आपला समाज राष्ट्ररूपाने संघटित करावयाचा आहे त्याने प्रथम त्यांतील व्यक्तींना उत्कर्षापकर्षाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे; आणि ती जबाबदारी पार पाडण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी येईल अशाच तऱ्हेचें समाजसुधारणेचे तत्त्वज्ञान अंगीकारिलें पाहिजे. त्याचप्रमाणे सामूहिक जीवन जगण्याची विद्या तिला शिकवून त्या जीवनाच्या आड येणाऱ्या सर्व रूढि, परंपरा, धर्मतत्त्वें, यांचा निरास केला पाहिजे.
 गेल्या शतकांतील राम मोहन रॉय, रानडे, स्वामी दयानंद, विवेकानंद, दादाभाई, आगरकर यांसारख्या थोर नेत्यांनी सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रांत याच धोरणाने प्रयत्न चालविले होते. लोकमान्य टिळकांनी या क्षेत्रांत कोणतें कार्य केलें ते आता पाहवयाचें आहे.
 लो. टिळकांनी काँग्रेस, सार्वजनिक सभा, कायदेकौन्सिलें, यांसारख्या सामूहिक जीवनाचें शिक्षण देणाऱ्या सार्वजनिक संस्थांत प्रवेश करून अनेकविध कार्य केलें; साराबंदी, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, होमरूल यांसारख्या राष्ट्रीय चळवळी केल्या; आणि गणेशोत्सव, शिवाजी-उत्सव यांसारखे उत्सव सुरू केले. यांपैकी प्रत्येक संस्थेत व चळवळींत त्यांनी राष्ट्रसंघटनेचीं वर सांगितलेली तत्त्वें अखंड डोळ्यापुढे ठेवूनच कार्य केलें. धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद, स्पृश्यास्पृश्यभेद अशा कसल्याहि भेदांना त्यांनी मनांत कधीहि अणुमात्र थारा दिला नाही. हा ब्राह्मणांचा अधिकार आहे, हें क्षत्रियांचे कार्य आहे, वैश्यांना हें विहित नाही, येथे शूद्रांना प्रवेश नाही, तेथे अस्पृश्य येता कामा नयेत, असा कसलाहि विषमतेचा विचार चुकून सुद्धा त्यांनी कधी सांगितला नाही. राष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक क्षेत्रांत सम अधिकार असलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यावांचून सामूहिक जीवन याला कांही अर्थच राहणार नाही आणि राष्ट्रीय प्रपंचाची धुरा पेलण्यास त्याचे नागरिक समर्थ होणार नाहीत. अशी त्यांची निश्चिति होती.
स्वातंत्र्याची ओळख
 राष्ट्रीय शिक्षण या विषयावरील लो. टिळकांची व्याख्यानें आणि लेख पाहिले तर सामाजिक सुधारणेचा सर्व आशय त्यांत आलेला आहे असें आपल्याला दिसून येईल. राष्ट्रीय शिक्षणाची त्यांनी अनेक ठिकाणीं व्याख्या दिली आहे व स्वरूप वर्णिलें आहे. प्रत्येक व्यक्तीस राष्ट्राची जबाबदारी आपल्यावर आहे व सर्व व्यक्तींनी संघटित होऊन ती पार पाडली पाहिजे, ही शिकवण देतें तें, टिळकांच्या मतें, राष्ट्रीय शिक्षण होय. सोलापूरच्या एका व्याख्यानांत ते म्हणतात, "आपण कोण, आपली स्थिति काय, देशाची कामगिरी काय याची ओळख करून देणारें तें राष्ट्रीय शिक्षण होय." (व्याख्यानें, पृ. १५६). अनेक व्याख्यानांतून ही कल्पना त्यांनी विशद केली आहे. "राष्ट्रीय गुणांचे शिक्षण देणारें तें राष्ट्रीय शिक्षण.", "लोकांत राष्ट्रीयत्वाची कल्पना आणा. ती आणील तें राष्ट्रीय शिक्षण.", "हिंदुस्थानचा भाग्योदय कशाने होईल, सध्या तो का होत नाही, याची विद्यार्थ्यांना कल्पना दिली पाहिजे.", "आपला धर्म कळावा, देश कळावा, नीतीचें आचरण घडावें, देश खाली जात चाललेला वर उचलण्याची ताकद व धैर्य यावें, जोम यावा यांकरिता राष्ट्रीय शाळा पाहिजे आहेत.", "प्रत्येक मनुष्यास आपली स्थिति किती वाईट झाली आहे हें ज्या शाळेत समजाविलें जाईल ती राष्ट्रीय शाळा.", "आम्हांस राष्ट्रीय शिक्षण कशाला हवें? फिरोजशहा मेथा, रानडे यांच्यासारखे लोक सतत व जास्त निपजत राहवे यासाठी.", "राष्ट्राकरिता मी वेळ आल्यास मरेन देखील, अशी बुद्धि उत्पन्न होईल असें शिक्षण राष्ट्रीय शाळेत दिलें पाहिजे.", "देशाकरिता मरावयास तयार झाला तोच खरा देशभक्त.", "ज्याला इंग्रजीत कॅरॅक्टर म्हणतात तें चारित्र्य,- दानत- राष्ट्रांतील लोकांत असली पाहिजे. त्यांच्यांत करारीपणा असला पाहिजे, आणि मी राष्ट्राकरिता मरण्यास देखील तयार आहे अशी बुद्धि राष्ट्रांतील तरुणांत उत्पन्न झाली पाहिजे. हें ज्या शिक्षणाने होईल तें राष्ट्रीय शिक्षण.", "राष्ट्रीय शिक्षण द्यावयाचें तें एवढयाचकरिता की, मुलांच्या मनांत राष्ट्राशिवाय प्रथम दुसरी कोणतीहि गोष्ट येऊ नये.", "राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी- बहिष्कारापेक्षाहि जास्त योग्यतेचें आहे. राष्ट्राचें मन बदलणें, राष्ट्रांतील लोकांत भावना उत्पन्न करणें, हें राष्ट्रीय शिक्षणाचें काम आहे.", "ज्या स्वातंत्र्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्या स्वातंत्र्याची ओळख काय सरकारी शिक्षण करून देणार? राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता ही ओळख पटवून देण्यासाठी आहे.", "राष्ट्राला धक्का बसला असतां आपल्याला धक्का बसल्यासारखें वाटणें, आपलीं लहानसान कामे बाजूला ठेवून राष्ट्राच्या कामाला जाणें, राष्ट्राचा खेद स्वतःच्या खेदास कारण होणें किंवा राष्ट्राचा त्वेष आपल्या अंगी उत्पन्न होणें हें (सध्या आपल्यांत) कमी आहे व तें (राष्ट्रीय शिक्षणाने) आले पाहिजे." (सर्व अवतरणें- कै. लोकमान्य टिळक यांची व्याख्याने, प्रकाशक, केसरी-मराठा संस्था, पुणें).
जातिवर्णनिरपेक्ष
 प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रकार्याची शिकवण देणारें व तें कार्य करण्यास तिला समर्थ करणारें असें हें राष्ट्रीय शिक्षण वर्ण, जाति, धर्म, पंथ यांचा कसलाही विचार न करतां सर्वांना सारखें द्यावें, असें टिळकांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. 'राष्ट्रीय शिक्षण' या विषयावरील व्याख्यानांत ते म्हणतात, "राष्ट्रीय शिक्षण हा विषय विशिष्ट जातीकरिता नाही. तो सर्व जातींचा सार्वजनिक विषय आहे. सर्वांना हा एकसारखाच परिचित असला पाहिजे... ही शाळा कोणत्याहि एका धर्माच्या लोकांकरिता नाही. एकट्या ब्राह्मणांकरिता नाही, किंवा एकट्या जैनांकरिता नाही. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे निरनिराळें शिक्षण दिले जाईल, आणि बाकीचें शिक्षण एकसारखें दिलें जाईल. निरनिराळ्या पंथांतील द्वैतभाव काढून देशाकरिता काम करतां यावें असें शिक्षण दिले जाईल." (लो. टिळकांची व्याख्यानें, पृ. १६१, १६३). "सध्या केवळ अक्षरज्ञानासाठी कित्येक जाति आपापल्या जातीपुरत्या शाळा काढू लागल्या आहेत; पण राष्ट्रीय शिक्षणाच्या दृष्टीने जातिजातींच्या शाळा योग्य नव्हेत. सर्व जातींनी एकाच शाळेंत बसून, राष्ट्रोद्धाराचें शिक्षण घेणें अत्यंत इष्ट व आवश्यक आहे." (व्याख्यानें, पृ. ९६). "सर्व जातींनी एक होऊन सार्वजनिक कामें एकजुटीने करावीत असा बोध सभांमध्ये होत असतो. राष्ट्रीय शाळांमध्येहि जातिजमातींनी एक होण्याची आवश्यकता इत्यादि गोष्टी विद्यार्थ्यांस शिकविल्या पाहिजेत." (पृ. ९३).
मनोविकासाची संधि
 हें राष्ट्रीय शाळांमधून द्यावयाच्या शिक्षणाविषयी झालें. अन्यत्रहि राष्ट्रीय जीवनांत मनुष्याची जात, त्याचा वर्ण, धर्म हे कोठेहि आड येऊ नयेत, व्यक्तीचा मनोविकास व तिच्या सामर्थ्याचा विकास करण्याची संधि जाति-वर्ण-निरपेक्ष मिळाली पाहिजे, प्रत्येक क्षेत्रांत मिळाली पाहिजे, असें लोकमान्य कटाक्षाने सांगत असत. 'कामकरी लोक व दारूचें व्यसन' या विषयावर करी रोड, मुंबई येथे कामगारांपुढे भाषण करतांना ते म्हणाले, "तुम्ही मजूरलोक हलके आहां, खालच्या जातीचे आहा, अशी बुद्धि ठेवू नका. तुम्हा मजुरांत साधुसंत निर्माण झाले व त्यांच्या चरणी आम्ही ब्राह्मण लीन झालों होतों. त्यांनी ब्राह्मणांना देखील धर्माची दिशा दाखवून दिली आहे." (पृ. २७९). यावरून धर्मनिर्णय करण्याचा व धर्मप्रवचन करण्याचा कोणत्याहि जातीच्या मनुष्याला हक्क आहे, हें लोकमान्यांना मान्य होतें असें दिसतें. पुण्यास नाईकांच्या गणपतीपुढे झालेल्या व्याख्यानांत तसे त्यांनी स्पष्टंच म्हटले आहे. "सर्व जातींच्या शहाण्या लोकांनी धर्माचा विचार करून, सलोखा वाढविण्यासारखें, व धर्माची घडी बसेल असें कांही करण्याकरिता, एक कौन्सिल नेमलें पाहिजे व त्यांचें मत शंकराचार्यांनी घेतले पाहिजे." (पृ. ३०), याच व्याख्यानांत गादीसंबंधी तंटे करणाऱ्या शंकराचार्यांवर कडक टीका करून त्यांनी लोकांना सांगितलें आहे की, "लोकांनी आपला हक्क गुरूस दाखविला पाहिजे, नाही तर गुरुत्व दुसऱ्यास दिले पाहिजे."
गुणकर्मनिष्ठ
 लो. टिळकांना चातुर्वर्ण्याचा अभिमान होता, पण तें चातुर्वर्ण्य गुणकर्मनिष्ठ असें होतें. जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य हें व्यक्तीच्या विकासाच्या आड निश्चितच येतें आणि तशा व्यवस्थेंत, प्रत्येक व्यक्तीला तुझ्या शिरावर राष्ट्रीय प्रपंचाची जबाबदारी आहे, असें सांगण्याला अर्थ नाही; पण टिळकांना तसलें चातुर्वर्ण्य मान्य नव्हतें. १९१६ सालीं कानपूरच्या व्याख्यानांत त्यांनी हें स्पष्ट केलें आहे. ते म्हणाले, "हिंदु समाजाला शास्त्रांतील चातुर्वर्ण्य मान्य आहे, पण तें आनुवंशिक नाही. गुण व कर्म यांच्या योगाने तें सिद्ध होते; पण इंग्रजांमुळे हें चातुर्वर्ण्यहि नष्ट झालें. कारण राज्यकर्त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचीं कामें आपणाकडेच घेतली आहेत." वर उल्लेखिलेल्या करी-रोडच्या भाषणांत हा विचार त्यांनी आणखी स्पष्ट केला आहे. "आमच्या शास्त्रांत असें सांगितलें आहे की, ब्राह्मण असून तो वाईट कर्म करूं लागला तर तो शूद्र होतो, आणि शूद्र असून त्याने चांगले कर्म केलें तर शूद्राचा ब्राह्मण होतो." याच व्याख्यानांत त्यांनी कामगारांना सांगितले की, "इंग्लंडमध्ये 'लेबर पार्टी' म्हणून मजुरांचा पक्ष आहे. आज ना उद्या तेथे मजुरांचें राज्य होणार आहे. आणि येथील कामगारांनी प्रयत्न केला तर हिंदुस्थानांत त्यांचेंहि राज्य होईल." लो. टिळकांच्या राष्ट्रसंघटनेचें स्वरूप यावरून ध्यानीं येईल. येथली प्रत्येक व्यक्ति नागरिक झाली पाहिजे आणि कोणत्याहि क्षेत्रांतील अत्युच्च पदाचा मार्ग तिला मोकळा असला पाहिजे हा विचार त्या संघटनेत अत्यंत महत्त्वाचा होता. खरी सामाजिक सुधारणा ती हीच होय!
 काँग्रेस, हिंदी स्वराज्य संघ यांसारख्या संस्थांत काम करतांना टिळकांनी अशीच वर्ण-जाति-धर्म-भेदातीत दृष्टि ठेवली होती. १९०८ साली धुळें येथे भरलेल्या प्रांतिक सभेत भाषण करतांना ते म्हणाले, "जात, मत व धर्म यांतील भेदाभेद लक्षांत न आणतां, सर्व माणसें राष्ट्राच्या कार्याकरितां एक होतात, याचें नांव एकी. याचें नांव राष्ट्र... राष्ट्र म्हणजे एका धर्माचे एका जातीचे, एका मताचे लोक अशी व्याख्या नाही. आपलीं भिन्न भिन्न मतें सोडून विशिष्ट उच्च हेतूकरिता लोक एक होतात, तेव्हा त्यास राष्ट्र म्हणतात... हिंदुस्थानचें कल्याण करण्याचा मक्ता एका जातीला, एका धर्माला, किंवा एका मताला (पक्षाला) दिलेला नाही. हें सर्वांचें काम आहे. देश-कल्याण करण्याचा सर्वांना हक्क आहे. या बाबतींत कोणी दुसऱ्यास कमअस्सल म्हणणें मूर्खपणाचें आहे." (व्याख्यानें, पृ. २२०)
 राष्ट्रीय जीवन हें समूहजीवन आहे, हे संघटित जीवन आहे, हा त्यांच्या मनांतील भाव यांतून स्पष्ट होईल. त्यांच्या अहमदनगरच्या होमरूलवरील भाषणांत हाच भाव अनेक वेळा दिसून येतो. "मी तुम्हांला निश्चित सांगतों की, सर्व धर्मांच्या व सर्व जातींच्या लोकांनी एक होऊन सरकारकडे निश्चयाने ही मागणी केली, संघटितपणे तिचा पाठपुरावा केला, आणि ही मागणी मान्य झाल्यावांचून आम्ही स्वस्थ बसणार नाही, असें सरकारलाच नव्हे, तर सर्व जगाला जाहीरपणें दाखवून दिलें, तर त्याचें फळ पदरांत पडल्यावांचून राहणार नाही."
सर्व जाति सर्व पंथ
 होमरूलच्या प्रचारासाठी टिळकांचा देशभर दौरा चालू असतांना सर्व धर्मांचे, सर्व जातींचे, पंथांचे लोक संघाचे सभासद होत होते. होमरूल लीगच्या- हिंदी स्वराज्य संघाच्या- पहिल्या वार्षिक संमेलनाच्या सभेंत चिटणीसांनी अहवाल सांगितला. त्यांत नमूद केलेलें आहे की, एकंदर १४२१८ सभासद नोंदविले गेले. त्यांत शे. ४२ ब्राह्मण व शे. ४३ ब्राह्मणेतर असून ३०९ मुसलमान, ११ पारशी व ६७ स्त्रिया आहेत. २६ डिसेंबर १९१७ सालची राष्ट्रसभा कलकत्त्यास झाली. त्या वेळीं १२ लक्ष सह्यांचा अर्ज माँटेग्यूसाहेबांकडे पाठविण्यांत आला आहे असें सांगण्यांत आलें. त्याच वेळीं मद्रासच्या ब्राह्मणेतरांकडून व पंचम लोकांकडूनहि स्वराज्याच्या मागणीला अनुकूल असा संदेश आला होता. पुढील मार्चमध्ये मुंबईला सभा झाल्या. मारवाडी विद्यालयाची सभा झाली व त्या लोकांनी स्वराज्य संघाला १५००० रुपयांची थैली दिली. ता. २५ रोजीं एल्फिन्स्टनरोडवर सुमारे ४० गिरण्यांतील कामगारांची सभा झाली. सोळा हजार कामगारांनी एकेक आणा वर्गणी देऊन १००० रु. जमविले व ती थैली टिळकांना अर्पण केली.
 सर्व प्रकारचें शिक्षण सर्वांना सारखें मिळालें पाहिजे, प्रत्येक सार्वजनिक संस्थेत प्रत्येक व्यक्तीला जाति-वर्ण-धर्म-निरपेक्ष प्रवेश मिळाला पाहिजे या संबंधांत कसलीहि उच्चनीचता, कसलाहि भेदाभेद असतां कामा नये, असा टिळकांचा कटाक्ष होता. काँग्रेस, हिंदी स्वराज्य संघ यांविषयी उदाहरणे येथे सांगितली. गणेशोत्सव, शिवाजी-उत्सव, स्वदेशी, बहिष्कार, साराबंदी ह्या चळवळी यांसंबंधीची उदाहरणें मागल्या प्रकरणांतून आलींच आहेत. तेव्हा समता, बंधुता, स्वातंत्र्य याच तत्त्वांचा अवलंब टिळक प्रत्येक ठिकाणी करीत असत, याविषयी संदेहास जागा नाही.
प्रतिगामी?
 असे असतांना टिळक हे प्रतिगामी होते, सनातन धर्माचे अंध अभिमानी होते, सामाजिक सुधारणांना त्यांचा विरोध होता, ते सुधारणाद्वेष्टे होते, असे आरोप त्यांच्यावर येतात ते कां? लोकांच्या मनांत टिळकांविषयी पराकाष्ठेचा आदर असला तरी, सनातन धर्माधिमानी, सुधारणाविरोधी अशीच त्यांची लोकमानसांत प्रतिमा आहे. असें कां असावें याचा गंभीरपणें विचार केला पाहिजे. कारण अशी प्रतिमा निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठी हानि झाली आहे, असे मला वाटतें.
 वरील सुधारणांखेरीज स्त्रीजीवनविषयक ज्या अनेक सुधारणा त्यांना आपण अनुकूल आहोंत; केसरीने त्यांना कधीच विरोध केलेला नाही, असें टिळकांनी वारंवार म्हटलें आहे. स्त्री-शिक्षण, प्रौढ-विवाह, पुनर्विवाह ह्या सुधारणांना आपला विरोध नाही; फक्त ह्या सुधारणा जनमत तयार करून सावकाशीने केल्या पाहिजेत, सरकारकडून कायदा करून घिसाडघाईने करतां कामा नयेत, अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी अनेक वेळा सांगितलें आहे.
 टिळकांनी पुनः पुन्हा विशद केलेली ही भूमिकाहि अंध किंवा सनातनी अशी नाही, पुरोगामीच आहे. असे असूनहि टिळक हे रूढिग्रस्त सनातन पक्षाचे नेते, असें मानले गेलें त्याचें कारण काय?
असमर्थनीय
 याचें मुख्य कारण असें की, अशी भूमिका असूनहि टिळकांनी फीमेल हायस्कूल- मधील स्त्री-शिक्षण, संमतिवयाचा कायदा, दादाजी विरुद्ध रखमाई, राष्ट्रीय सभेच्या मंडपांत सामाजिक परिषद् भरविण्यासंबंधीचा वाद, ग्रामण्य प्रकरण, वेदोक्त प्रकरणं असे वाद-प्रसंग जेव्हा निर्माण झाले तेव्हा प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने सनातन्यांचा पक्ष घेतला. एवढेच नव्हे, तर त्या त्या वेळीं सुधारकांचा व सुधारणांचाहि कमालीचा उपहास केला. टिळकांच्या या विरोधाचें व उपहासाचें समर्थंन कोणत्याहि युक्तिवादाने करतां येत नाही.
 प्राचीन धर्मशास्त्रांतील कांही वचनांवर नवें भाष्य करून, त्या शास्त्रकारांची स्त्रियांविषयीची दृष्टि उदार होती, असें न्या. रानडे यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला- या प्रयत्नाचें टिळकांनी वास्तविक अभिनंदन करावयास हवें होतें; पण तसें न करतां त्यांनी रानडे यांच्यावर अति कडक भाषेत टीका केली. १८८६ साली मुंबईच्या माधवबागेंत, सरकारने आमच्या सामाजिक चालीरीतींत हात घालूं नये असा अर्ज करण्यासाठी सभा भरली होती. त्या वेळी तेलंगांनी ठरावाला उपसूचना पाठविली की, "अर्जांत, बालविवाह व असंमत वैधव्य यांचे वाईट परिणाम आम्हांस ठाऊक आहेत, पण ते आमचे आम्हीच सुधारले पाहिजेत, सरकारने त्यांत हात घातल्यास नुकसानच होईल, असे शब्द घालावे." टिळकांनी या सूचनेचा पुरस्कार करावयास हवा होता. कारण तीच टिळकांची तंतोतंत भूमिका होती; पण ज्या सनातन्यांनी ती सूचना फेटाळली त्यांचाच पक्ष टिळकांनी घेतला. राष्ट्रीय सभेच्या मंडपाचा वाद हा तर अगदी असमर्थनीय वाटतो. १८९५ सालापर्यंत काँग्रेसच्या मंडपांतच मागून सामाजिक परिषद् भरत असे. १८९५ साली पुण्यास काँग्रेसचें अधिवेशन होतें. त्या वेळीं, त्या मंडपांत मागून सुद्धा सामाजिक परिषद् भरतां कामा नये, असा पुण्याच्या सनातन पक्षाचा आग्रह पडला. प्रारंभी टिळकांना तो मान्य नव्हता. पुढे अनेक घडामोडी होऊन टिळकांना सेक्रेटरीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि नंतर मात्र टिळकांनी सनातन्यांचा पक्ष आवेशाने घेतला.
प्राचीन धर्मशास्त्र
 अशा वादांत टिळक नेहमी प्राचीन धर्मशास्त्राची मर्यादा उल्लंघू नये असें सांगत. त्या धर्मशास्त्राचा अभिमान प्रगट करीत. वस्तुस्थिति अशी आहे की, हिंदूच्या प्राचीन धर्मशास्त्रांत पुरोगामी व प्रतिगामी दोन्ही पक्षांना वाटेल तेवढे आधार सापडतात. सूत्रकाल व त्यानंतरचा स्मृतिकाल या काळांत हिंदुधर्मशास्त्र फार प्रतिगामी व अनुदार झालें. त्यांच्या अगोदरचा काळ म्हणजे वेदकाळ. ब्राह्मणे, उपनिषदें यांचा श्रुतींतच समावेश होतो; आणि स्वतः टिळकांनी, 'अस्पृश्यता वेदशास्त्रास संगत नाही', 'सूत्रकालापूर्वी मुलींचे विवाह प्रौढ वयांत होत असत,' असें म्हटलें आहे. शिवाय गीतेवर भाष्य लिहितांना, स्वमतविरोधी अशीं वेदोपनिषदांची वचनेंहि त्याज्य ठरविली आहेत. असें असतांना, सुधारणा करतांना प्राचीन धर्मशास्त्राचा मान ठेवण्याचा प्रश्न उद्भवतच नव्हता. कारण वर्ण, जाति यांची समता, त्यांचे संकर-विवाह, व्यवसाय-स्वातंत्र्य, स्त्रीजीवनविषयक सर्व सुधारणा यांना प्राचीन शास्त्रांत वाटेल तेवढे आधार सापडतात. त्यामुळे लोकमान्यांनी सुधारकांना विरोध करतांना, प्राचीन धर्मशास्त्राचा आधार घ्यावा, आणि ग्रामण्य-प्रकरणी व विलायतच्या प्रवासाहून परत आल्यानंतर, अत्यंत उपेक्षणीय अशा धर्मवचनांन्वये प्रायश्चित्त घ्यावें हें विपरीत वाटतें. परदेश-प्रवास- निषेधाला तर वेद, उपनिषदें, सूत्रे, स्मृति यांत मुळीच आधार नाही. दहाव्या-अकराव्या शतकांतील कलिवर्ज्यासारख्या एका क्षुद्र प्रकरणाने (टीका- ग्रंथाने) तो निषिद्ध मानला आहे. तो पुढच्या काळच्या लोकांनी तसा मानल्यामुळेच, भारताची अपरिमित हानि झाली आहे. लोकमान्यांनी परदेशगमन टाळले नाही; पण तें पाप आहे हें प्रायश्चित्त घेऊन, मान्य केले. ज्या युगंधर महापुरुषाने गीतारहस्य सांगतांना प्रत्यक्ष श्रुतिवचनांपुढे शरणागति पतकरली नाही, शंकराचार्यांचें गीताभाष्य व भागवतपुराण या श्रुतिसम प्रतिष्ठा पावलेल्या ग्रंथांपुढे शरणागति पतकरली नाही त्याने एका अत्यंत अविवेकी, मूढ धर्मशास्त्रकारापुढे शरणागति पतकरलेली पाहून मनाला फार क्लेश होतात.
वेदोक्त
 वेदोक्त प्रकरणांत तर लोकमान्यांनी केवळ वहिवाट व रूढि यांच्याच आधारावर, कोल्हापूरचे महाराज आणि एकंदर मराठे यांच्या, वेदमंत्रोक्त धार्मिक विधि करण्याच्या मागणीला विरोध केला. वास्तविक त्रैवणिकांचे सर्व धर्मसंस्कार वेदमंत्राने व्हावे, असें प्राचीन धर्मशास्त्र होतें. एका काळी तर शूद्रांचे संस्कारहि वेदमंत्राने व्हावेत, याला धर्मशास्त्राची मान्यता होती. असे असतांना, वेदांच्या ठायी प्रामाण्य-बुद्धि हें धर्माचें लक्षण ज्यांनी सांगितलें, त्यांनीच वेदोक्त संस्कारांच्या मागणीला विरोध करावा, हें विपरीत वाटतें. कोल्हापूरच्या महाराजांनी त्यांचे उपाध्याय राजोपाध्ये यांनी वेदमंत्रांनी संस्कार करण्याचें नाकारल्यामुळे त्यांचे इनाम जप्त केलें. महाराजांचा हा निर्णय योग्यच होता. ज्यासाठी वतन दिलें तें कार्य तो वतनदार करीना, तर त्याचें वतन जप्त करणें हें न्याय्यच होते; पण टिळकांनी त्यावरहि टीका केली. धर्म हा ऐक्यबंध रूढ करणारा एक चिवट धागा असतो. टिळकांना सर्व हिंदु-समाजांत जूट निर्माण करावयाची होती. अशा स्थितीत मराठ्यांनी वेदोक्त संस्कारांची मागणी केली ही फार मोठी सुसंधि होती. प्राचीन धर्मशास्त्र याला अनुकूल होतें. तेव्हा सर्व ब्राह्मणांनी आनंदाने या मागणीचें स्वागत करावयास हवें होतें; पण सनातन पक्षाने तिला विरोध केला आणि टिळकांनी याहि वेळेस अंध सनातन्यांचाच पक्ष घेतला. ब्राह्मणेतरांच्या मनांत, यामुळे फार कडवटपणा निर्माण होऊन, सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने मोठीच हानि झाली.
धार बोथटली
 या सर्वांमुळे मनाला क्लेश होण्याचें मुख्य कारण हें की, टिळक ही जी एक क्रांतिशक्ति भारतांत निर्माण झाली होती तिला रूढिवादी, सनातनी, अंधपरंपरावादी असें रूप येऊन, सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने, तिंची धार बोथट झाली, तिची प्रखरता लोपली. गणेशोत्सवांत हिंदु-धर्मांतील सर्व जाति, वर्ण, स्पृश्य, अस्पृश्य यांनी एकत्र यावें, असें सांगून व तसें घडलें याचें स्वागत करून, टिळकांनी शेकडो वर्षांची वहिवाट व रूढि मोडली, व यांमुळे विटाळ होतो, असें म्हणणाऱ्या सनातन्यांवर उपहासाने टीका केली. शूद्रांना विद्या द्यावयाची नाही अशी जुनी वहिवाट. तशी शेकडो वर्षे रूढि पडलेली होती व सूत्र-ग्रंथ व स्मृति यांनी तसेंच शास्त्र सांगितले होते; पण राष्ट्रीय शिक्षण सर्व जातींना, वर्णांना, धर्मांना सारखें दिलें पाहिजे, असे प्रतिपादन करून लेख, व्याख्यानें व उत्सव त्यांतून तसें प्रत्यक्ष करून, ती वहिवाट, ती घातक रूढि, व तें धर्मशास्त्र यांना टिळकांनी झुगारून दिलें व राष्ट्रैक्याचा पाया घातला. अस्पृश्यता ही वेदकालीन प्राचीन धर्मशास्त्राला मान्य नव्हती; पण स्मृतींनी ती आग्रहाने सांगितली होती व हजारो वर्षे तशी रूढि होती; पण ती रूढि टिळकांनी मानली नाही. मी अस्पृश्यता पाळीत नाही असें जाहीरपणें सांगितलें तशी कृतीहि अनेक वेळा केली. महर्षि वि. रा. शिंदे यांच्या अस्पृश्यतानिषेधक जाहीर पत्रकावर त्यांनी सही केली नाही याचा आज मोठा गवगवा करण्यांत येतो, पण २ जुलै १९१८ या दिवशीं टिळकांनी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रांत त्याचा खुलासा केला आहे. "तुमच्या मॅनिफेस्टोच्या शेवटीं कांही कार्यक्रम शिरावर घेऊन तो प्रत्यक्ष अमलांत आणण्याची व्यक्तिशः जबाबदारी त्यांत टाकलेली असल्यामुळे. सध्याच्या माझ्या कार्यव्यापृततेमध्ये हें नवीन कार्य अंगावर घेतां येईल असें वाटत नाही. म्हणून तुमच्या जाहीर पत्रकावर मला सही देतां येत नाही याबद्दल माफ करा", असें त्यांनी म्हटलें आहे. याने टीकाकारांचें समाधान व्हावें असें वाटतें. असो. कोणत्या जातींनी कोणता उद्योगधंदा करावा याविषयी स्मृतिप्रणीत धर्मशास्त्राचे नियम फारच कडक होते; पण लोकमान्यांनी हें धर्मशास्त्र मुळीच न मानतां प्रत्येकाने आपल्याला साधेल तो व्यवसाय करावा, मात्र तो उत्तम करावा, असें वारंवार सांगितलेले आढळते. पिढ्यान् पिढ्या तोच धंदा केल्याने त्यांतील नैपुण्य वाढतें, असें त्यांचें मत असल्याचें दिसतें; पण तेंहि बाजूस सारून व्यवसायबंदीचें शास्त्र त्यांनी त्याज्य मानलें. स्वतःच्या मुलांना सुद्धा, तुम्ही जोडे शिवण्याचा धंदा केलात तरी चालेल, मात्र ते जोडे सर्वोत्कृष्ट झाले पाहिजेत, असें त्यांनी सांगितलें होतें. कोणतीहि सुधारणा करतांना ती सयुक्तिक, आवश्यक, व सुकर आहे की नाही एवढाच विचार करावयाचा असतो, असें त्यांनी स्वतःच म्हटलें आहे. हेंच धोरण त्यांनी स्त्री-शिक्षण वेदोक्त, परदेशगमन, सहभोजन, अनेक प्रायश्चित्तविधि या बाबतींत अवलंबिले असतें, तर क्रांतीच्या या शक्तीचें तेज, सामाजिकदृष्ट्याहि. मलिन झालें नसतें.
 लोकमान्यांच्या बाबतींत आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय, हा वाद निर्माणच व्हावयास नको होता, असें मला वाटतें. कारण आधी सामाजिक व धार्मिक सुधारणा झाल्यावांचून राष्ट्रीय तत्त्वावर समाजाचें ऐक्य होणार नाही आणि तसें झालें नाही तर स्वराज्याच्या मागणीला जोर येणार नाही, असें त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितलें आहे व तशी कृतीहि केली आहे. या लेखाच्या प्रारंभीं व आरंभीच्या दोन-तीन लेखांत यासंबंधीचीं त्यांची अनेक वचनें व त्यांनी प्रत्यक्ष कृति केल्याची अनेक उदाहरणें दिलीं आहेत. त्यावरून यासंबंधी संदेहाला कोठे जागा आहे, असें वाटत नाही.
 तरीहि संदेह निर्माण होतो व वाद माजतो याचें कारण हे की, स्वतः टिळकांनीच अनेक ठिकाणीं तसें प्रतिपादन केलें आहे. आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजेत व सामाजिक सुधारणा त्यांच्या मागून सुईमागून दोरा येतो तशा येतील, असे त्यांनी अनेक वेळा म्हटल्याचे आढळतें. आणि हें नुसतें म्हटलें आहे असें नाही तर त्याची कारणमीमांसाहि त्यांनी केली आहे. धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला तर समाजांत दुफळी माजेल व स्वराज्याच्या कार्यासाठी, म्हणजे राजकीय सुधारणांसाठी अवश्य ती एकजूट राहणार नाही, असें त्यांचें मत होतें. तसें त्यांनी लिहिलेंहि आहे, आणि आज त्यांचे निकटवर्ती लोक, ही भीति, हें सामाजिक सुधारणांना विरोध करण्याचें मुख्य कारण होतें, तसें त्यांनी आपल्याजवळ म्हटलें होतें असें सांगतातहि. सामाजिक सुधारणा झाल्याखेरीज राजकीय सुधारणा होणार नाही असा आग्रह धरण्यांत कांही अर्थ नाही, असें दोन-तीन ठिकाणी टिळकांनी म्हटलें आहे आणि सर्व सामाजिक सुधारणा ब्रह्मी लोकांत व हिंदुस्थानांतील नेटिव ख्रिस्ती लोकांत झाल्या असूनहि ते समाज आमच्याप्रमाणेच अधोगतीस गेले आहेत, हें उदाहरण दिलें आहे. तेव्हा समाजसुधारणांना टिळकांनी या चर्चेच्या वेळीं तरी गौण स्थान दिलें होतें, हें मान्य केलेच पाहिजे. कांही सुधारणांना अनेक वेळा त्यांनी प्रत्यक्ष विरोध केला होता हें वर दिलेच आहे.
 पण या सर्वांची संगति नीट लागत नाही. सुधारक पक्षाचे लोक इंग्रजांना आपले गुरु मानीत, त्यांचें राज्य म्हणजे ईश्वरी वरदान समजत, आणि सुधारणांचा प्रचार करतांना प्राचीन परंपरेचा जेवढा अभिमान धरावयास हवा तेवढा धरीत नसत, यामुळे टिळकांना त्यांचा फार तिरस्कार वाटत असे. आणि त्यामुळे सुधारकांबरोबर सुधारणांचाहि ते अधिक्षेप करीत एवढेच स्पष्टीकरण फार तर देतां येईल.
आधी सामाजिक
 एरवी आतापर्यंत वर दिलेल्या प्रमाणांवरून सामाजिक सुधारणा झाल्यावांचून राजकीय सुधारणा होणार नाहीत, असेंच त्यांचे ठाम मत होतें, असें त्यांच्या अनेक वेळच्या कृतीवरून व वचनांवरून म्हणतां येतें. शिवाजीमहाराजांचा गौरव करतांना, "त्यांनी ब्राह्मण, परभू, शेणवी, मराठे, धनगर, मावळे ह्या सर्व जातींत स्वराज्याबद्दल सारखा अभिमान उत्पन्न करून त्यांस इष्ट हेतूच्या प्राप्त्यर्थ आपसांतील भेद विसरावयास लावण्याचें महत्कृत्य केलें", असें टिळकांनी म्हटलें आहे; आणि "माधवरावांच्या नंतर पेशवाईअखेर हे तत्त्व अमलांत आणणारा कोणीहि पुरुष नसल्याने पेशवाईचा व मराठी राज्याचा शेवट झाला", असा निष्कर्ष मांडला आहे. (शिवाजी आणि ब्राह्मण, केसरी, २२ ऑगस्ट १८९९). सामाजिक सुधारणा झाल्यावांचून स्वराज्य साधणार नाही व त्या तत्त्वाचा राज्यकर्त्यांना विसर पडला तर राज्य टिकणार नाही, असाच याचा भावार्थ होतो. आणि टिळकांनी छत्रपतींच्या या तत्त्वांचा अवलंब करूनच स्वतः जातिभेद, अस्पृश्यता इत्यादि भेदाभेद तत्त्वज्ञानपूर्वक आणि कृतीने दृष्टीआड करून सर्व चळवळी केल्या. तेव्हा सामाजिक सुधारणांचें महत्त्व ते पूर्णपणे जाणीत होते यांत शंका नाही.
व्यक्तित्व हा पाया
 आणि यासंबंधांत एक अत्यंत निर्णायक गोष्ट सांगून हें विवेचन पुरें करतों. लो. टिळकांनी राजकीय चळवळ करतांना हिंदी समाजांतील सर्व जातीतील, सर्व वर्गांतील लोकांचें व्यक्तित्व जागृत करून त्यांना इंग्रजी सत्तेशी लढा देण्यास प्रवृत्त केलें. शेतकरी, कामकरी, स्पृश्य, अस्पृश्य, शूद्र, ब्राह्मण, श्रीमंत, गरीब ह्या सर्वांना त्यांना राष्ट्राचे नागरिक करावयाचे होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या गुणविकासाला पूर्ण अवसर दिल्यावांचून हें कार्य साधणार नाही, हें जाणून व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांवरच त्यांनी सर्व चळवळी केल्या, याविषयी तर कोणाचा वाद नाही. हें जर खरें, तर आपण हें ध्यानांत घेतलें पाहिजे की, व्यक्तित्व-जागृति हा सर्व सुधारणांचा- धार्मिक, सामाजिक, आर्थिक राजकीय- या सर्व सुधारणांचा पाया आहे. कारण या जागृतीमुळे माणसाची सर्व सामर्थ्ये   अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे धैर्य त्याला येतें. तें आल्यावर कोणतीहि विषमता तो टिकू देणार नाही. तेव्हा असें हें सर्व सुधारणांना पायाभूत असणारें जें व्यक्तित्व तें ज्याने जागृत केलें त्याने सर्व क्षेत्रांतील सुधारणांचा पाया घातला, असें निर्विवाद मान्य केलें पाहिजे. एक ब्रह्म जाणले की सर्व जाणलें असें होतें, असा उपनिषदांचा सिद्धान्त आहे. त्याच न्यायाने व्यक्तित्व-जागृति ही सुधारणा केल्याने सर्व सुधारणा केल्या असें होतें. ती जागृति टिळकांनी या देशांत घडवून आणली. तेव्हा त्यांचे कांही लेख, त्यांच्या कांही कृति या समाजसुधारणेशी विसंगत असल्या तरी, त्या सुधारणांचा अवलंब करूनच त्यांनी राष्ट्रीयत्वाचा पाया घातला, हे आपण जाणलें पाहिजे.




-९-

हिंदु-मुस्लिम वाद


 लोकमान्यांच्या धार्मिक, राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांतील कार्याचें विवेचन येथवर केलें. आता हिंदु-मुस्लिमवादाविषयीच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श करावयाचा आहे.
 भारतांतील हिंदु-मुसलमानांचा संघर्ष बाराशे वर्षांचा जुना आहे. महंमद कासीमने ७११ सालीं सिधप्रांतांत पाऊल टाकले तेव्हाच हा संघर्ष सुरू झाला; आणि आज विसावे शतक संपण्याच्या बेतांत आलें आहे तरी तो संपण्याची चिन्हें दिसत नाहीत. मुसलमान राष्ट्रीय वृत्तीचा स्वीकार करून या भूमीच्या हिताहिताशी जोपर्यंत एकरूप होत नाहीत आणि हिंदु समाज जोपर्यंत आपसांतील जातिभेद वर्णभेद, पंथभेद, प्रांतभेद विसरून संघटित होऊन बलशाली होत नाही तोपर्यंत हा संघर्ष मिटावयाचा नाही, असें आज अनेक पंडित सांगत आहेत. साधारण ऐंशी वर्षांपूर्वी लो. टिळकांनी हाच सिद्धान्त सांगितला होता.
राष्ट्रीय वृत्ति
 १८८५ साली राष्ट्रसभेची स्थापना झाली. त्या वेळेपासून राष्ट्र म्हणजे काय व तें कसें घडवावयाचें याची शिकवण टिळक देत होते. "ज्यांना राष्ट्राच्या सुधारणा कशा होतात हें इतिहासवाचनाने कळून आलें असेल त्यांना ही कान्फरन्स (काँग्रेस) भरविणारांस शाबासकी दिल्यावांचून राहवणार नाही", असे उद्गार त्यांनी (८-१२-१८८५) केसरीत काढले आहेत व सर्वं हिंदुस्थानभर एकमेकांच्या साह्याने एकदिलाने, एकोप्याने परिश्रम चालले पाहिजेत; आणि असें झाल्यास 'कलौ संघ शक्तिः' या वाक्याची पूर्तता होऊन आमच्या सुधारणेचें पाऊल जलदीने पुढे पडेल, असेंहि त्या लेखांत सांगितलें आहे. तेव्हापासून राष्ट्रसभा ही सर्वधर्मीयांची, सर्व जातींची, सर्व पंथांची, सर्व प्रांतांची, सर्व पक्षांची सभा आहे, ती कोणत्याहि विशिष्ट जातिजमातीची नाही, असा त्यांनी सारखा उद्घोष चालविला होता. "या सभेंत, पारशी, मुसलमान आदिकरून सर्व जातींचे लोक राष्ट्रीय प्रश्नांचा विचार करतांना ज्यांनी पाहिले असतील त्यांची, हिंदुस्थानच्या भाग्योदयाचा राष्ट्रसभा म्हणजे पाया आहे, अशी खात्री होऊन त्यांची मनें आनंदाने भरून गेली असतील." असें अकराव्या राष्ट्रीय सभेच्या वेळीं त्यांनी म्हटले असल्याचें मागे सांगितलेच आहे. 'राष्ट्र' या शब्दाची त्यांची व्याख्या तशीच होती. "राष्ट्र म्हणजे एका धर्माचे, एका जातीचे, एका मताचे लोक, अशी व्याख्या नाही. आपलीं भिन्न भिन्न मतें सोडून विशिष्ट हेतूंकरिता लोक एक होतात तेव्हा त्यास राष्ट्र म्हणतात."
 तेव्हा प्रारंभापासून लो. टिळकांनी अगदी विशुद्ध राष्ट्रीय वृत्ति अवलंबिली होती; आणि राष्ट्रसभेला तेंच रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न होता हें सहज दिसून येईल. राष्ट्रसभेला– काँग्रेसला- तसें रूप हळूहळू येऊंहि लागले होते; पण खेदाची गोष्ट अशी की, राष्ट्रसभेला असें रूप येऊ लागल्यामुळेच इंग्रज सरकारला ती सभा दुःसह होऊं लागली, ही संघशक्ति पुढेमागे आपल्याला जाचक होईल हें सरकारच्या ध्यानांत आलें, आणि फोडा व झोडा या राजनीतीचा अवलंब करण्याचें त्यांनी ठरविलें. गेल्या शतकांतील हिंदु-मुस्लिम संघर्षाचें मूळ कारण हें आहे.
सरकारची भेदनीति
 १८९३ सालीं प्रथम मुंबईला मुस्लिमांचा दंगा सुरू झाला. शेकडो-हजारो मुस्लिमांनी दीन-दीन करीत मशिदींतून, घरांतून, दर्ग्यातून बाहेर पडावयाचें आणि हिंदूंचीं घरे-दारें, दुकानें लुटावयाची, मूर्ति, देवळें फोडावयाचीं व रक्तपात करावयाचा, असा दंगा याचा एकच अर्थ तेव्हापासून आजपर्यंत आहे. त्या सालीं सौराष्ट्रांतील जुनागड या मुस्लिम संस्थानांत प्रभासपट्टण या हिंदूंच्या पवित्र क्षेत्रांत मुसलमानांनी असा दंगा केला. तेव्हा तेथे ज्या शेकडो हिंदूंचें जीवन उद्ध्वस्त झालें त्यांना साह्य करण्यासाठी मुंबईला हिंदूंची सभा भरली. एवढे निमित्त मुस्लिमांना पुरलें आणि त्यांनी दंग्याला सुरुवात केली. त्यानंतर मग पुणे, येवलें, नाशिक, धुळें, येथे असेच दंगे वरचेवर होऊं लागले. मशिदीवरून जातांना हिंदूंनी वाद्ये वाजविलीं, गाय मारण्यास विरोध केला अशीं कारणें सांगण्यांत येत; पण हीं दाखविण्याची कारणें होतीं. सरकारची भेदनीति हें या सर्वांच्या मागे खरें कारण होतें. त्यामुळे दर वेळी पोलिस मुस्लिमांचा पक्ष घेत, धरपकड फक्त हिंदूंची करीत, त्यांच्यावरच खटले भरीत आणि शिक्षा हिंदूंनाच देत. कारण हिंदुसमाज हा आपला खरा शत्रु असून, त्याला खच्ची करण्यासाठी मुस्लिमांना आपल्या बाजूला वळवून घेणें व त्यांच्यामार्फत हिंदूंचें जीवन उद्ध्वस्त करून टाकणें हें धोरण सरकारने अवलंबिलें होतें.
प्रतिकार
 आणि ही भयानक आपत्ति पाहूनच टिळकांनी तिला तोंड देण्यासाठी लेखणी उचलली. १८९३ आणि १८९४ ह्या दोन वर्षांत ते सारखे या विषयावर लेख लिहीत होते व सरकारी धोरणावर, अन्याय, पक्षपात, जुलूम यांवर टीका करीत होते. एका लेखांत तर, हा दंगा मुस्लिमांचा नसून पोलिसांचा आहे, असें स्पष्टपणें त्यांनी लिहिलें, आणि दर वेळीं अनेक पुरावे देऊन, कांही प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्यांच्या भाषणांचे आधार देऊन, दंग्याला प्रारंभ मुस्लिमांनी केला, पोलिसांनी त्यांना साह्य केलें आणि वरिष्ठ अधिकारी साळसूदपणें हिंदूंनाच उपदेश करीत आहेत, हें सिद्ध करून दिलें.
 याबरोबरच दुसरी एक गोष्ट ते सारखी सांगत. ती ही की, आता हिंदूंनी आत्मसंरक्षणासाठी सिद्ध झालें पाहिजे. सरकार तुमचें रक्षण करणार नाही, तेव्हा तुम्हींच एकजूट करून प्रतिकार केला पाहिजे, त्यावांचून दुसरा तरणोपाय नाही, असें प्रतिपादन त्यांनी सतत चालू ठेवलें होतें. याचाच परिणाम होऊन मुंबईला व पुण्याला हिंदूंनी उत्तम प्रतिकार करून दंग्यांना आळा घातला. एका खटल्यांत सेशन्स जज्ज जेकब यांनी खरा न्याय दिला. हिंदूंच्यावरचे आरोप मुळीच सिद्ध होत नाहीत, असे सांगून त्यांना सोडून दिलें व पोलिसांवर टीका केली. धुळ्याला कलेक्टरच्या देखतच, सरकारी हुकूम न मानतां मुस्लिमांनी अत्याचारास प्रारंभ केला. तेव्हा त्यानेहि हिंदूंचा पक्ष घेतला. टिळकांनी या दोघांनाहि धान्यवाद देऊन, त्यांच्या आधारें आपल्या प्रतिपादनाची सत्यता सिद्ध केली. सरकारच्या स्वार्थी भेदनीतीचें व मुस्लिम अत्याचारांचें स्वरूप उघड करून टिळकांनी प्रतिकाराचा संदेश दिला नसता, व प्रतिकार करणाऱ्या हिंदूंचे वेळोवेळीं समर्थन केलें नसतें, तर महाराष्ट्रांत हिंदूंना जगणेंहि कठीण झालें असतें.
इतिहासाची जाणीव
 हिंदूंना प्रतिकाराची प्रेरणा देतांना लो. टिळक आणखी एक विचार पुनः पुन्हा मांडीत असत. इंग्रज लोक मुस्लिमांस जवळ करतांना त्यांस नेहमी सांगत की, "आम्ही येण्यापूर्वी तुम्ही येथले राज्यकर्ते होता, हिंदूंना तुम्हीं जिंकलें होतें. तेव्हा तुम्ही हिंदूंपेक्षा जास्त पराक्रमी आहा." हें सांगण्याचा हेतु उघड आहे. तुम्ही हिंदूंचें सहज निर्दाळण करूं शकाल, अशी चिथावणी यांत आहे. मुस्लिमांचा हा भ्रम नाहीसा करण्यासाठी तीन-चार लेखांतून, मागला इतिहास सांगून टिळकांनी इंग्रजांना इशारा दिला की, ही चिथावणी शेवटीं तुमची तुम्हांलाच घातक होईल. आम्ही राज्य मुसलमानांपासून घेतलें, हा तुमचा दावा खोटा आहे. तुम्ही आला तेव्हा मराठ्यांनी मुस्लिम सत्ता जवळ जवळ नष्ट करीत आणली होती; आणि तुम्ही आला नसता तर, आज जीं काय एक-दोन मुस्लिम संस्थानें शिल्लक आहेत तींहि नाहीशी झाली असती. मुसलमानांनाहि टिळक सांगत की, मराठे, रजपूत, शीख हे तुमच्यासारखेच पराक्रमी आहेत, हें विसरूं नका. मराठ्यांनीच तुमची सत्ता नामशेष केली होती. दोन्ही जमातींनी एकमेकींच्या शौर्याची व पराक्रमाची जाणीव ठेवली की दंग्याचे पहिले कारण नाहीसें होईल, व हिंदु आणि मुसलमान दोघेहि मिळून आपल्या शक्तीचा उपयोग दोघांच्या साधारण हितासाठी करतील. आज हिंदु-मुसलमानांनी एकत्र राहवयाचें तें कांही अंशी अमेरिकेत निरनिराळ्या जातींचे व धर्माचे लोक जसे एकत्र राहतात तशा प्रकारेंच राहिलें पाहिजे. (हिंदु-मुसलमानांचा समेट, केसरी, १०-१०-१८९३). हिंदु-मुसलमानांत सलोखा कसा होईल हे सांगतांना टिळकांनी अनेक ठिकाणीं सांगितलें आहे की, मुस्लिमांत विद्येचा प्रसार झाला पाहिजे, म्हणजे त्यांना राष्ट्रीय दृष्टि येईल. याशिवाय त्यांच्या ठायीं हिंदूंच्याप्रमाणे धर्मसहिष्णुता आली पाहिजे. ती आली तर आपला धर्म आपण पाळावा, दुसऱ्याचा त्यास पाळू द्यावा, अशी त्यांची वृत्ति होईल; आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर सांगितलेल्या इतिहासाची जाणीव मुस्लिमांनी ठेवली पाहिजे. आपण एकदा राज्यकर्ते होतों या विचाराने आजहि मुसलमान उन्मत्तपणें वागूं पाहतात. ही वृत्तीहि त्यांनी सोडून दिली पाहिजे. इतकें झाल्यावर इंग्रज सरकार आपल्याला ज्या गोष्टी सांगतें त्या आपमतलबीपणाच्या आहेत, हें मुसलमानांच्या ध्यानांत येईल. आणि ह्या दोन्ही जमाती या देशांत सलोख्याने नादूं लागतील.
 टिळकांचा हा उपदेश कांही सुबुद्ध मुसलमानांना तरी त्या वेळीं पटला होता. बॅ. जिना हे यामुळेच टिळकांचे अनुयायी झाले होते, आणि आरंभीं नव्हे, पण पुढे पुढे अल्लीबंधूहि, टिळकच आमचे खरे राजकीय गुरु, असें म्हणत असत. (केळकर- टिळक-चरित्र, खंड १ ला, पृ. ३६५). पुढे काँग्रेसने ब्रिटिशांचेच धोरण स्वीकारलें त्यामुळे सर्वच बिघडलें तो भाग निराळा.
पुरोगामी कोण?
 हिंदु-मुसलमानांच्या दंग्यांत लो. टिळकांनी हिंदूंचा पक्ष घेतला, त्यांना प्रतिकाराची प्रेरणा दिली, मागल्या इतिहासाची त्यांना व मुसलमानांनाहि जाणीव दिली; त्यामुळे त्यांना मुस्लिम तर आपले शत्रु मानीतच, पण सुधारक पक्षाचे रानडे, फिरोजशहा मेथा यांसारखे नेतेहि त्यांना पुराणवादी व प्रतिगामी मानीत. त्या वेळेपासून आजपर्यंत भारतांत हें ठरून गेलें आहे. हिंदूंना जो संघटित होण्याचा उपदेश करील, मुस्लिम आक्रमणाचा प्रतिकार करण्यास सांगेल, तो प्रतिगामी, तो पुराणवादी. जो त्यांच्यापुढे लाचार होईल, त्यांचा अनुनय करील, वंदे मातरम् या राष्ट्रगीताचाहि अवमान त्यासाठी सहन करील, तो खरा उदारमतवादी व पुरोगामी.
 केवळ संघटित होऊन प्रतिकार करण्याचा उपदेश हिंदूंना केला एवढ्यावरूनच टिळक पुराणवादी ठरले. मग त्यांनी गणेशोत्सव व शिवाजी-उत्सव सुरू केल्यावर त्यांच्या आक्षेपकांना जोर चढला असेल यांत काय नवल? पण ह्या दोन्ही उत्सवांत टिळकांची विशुद्ध राष्ट्रीय भूमिका रेसभरहि कधी ढळली नव्हती. शिवाजी हा राष्ट्रपुरुष आहे, तो अवतारी पुरुष म्हणून धर्म-बुद्धीने आम्ही त्याचा उत्सव करीत नसून, एक राष्ट्रीय नेता म्हणून त्याला वंद्य मानतों, हें त्यांनी अनेक ठिकाणीं स्पष्ट केलें आहे. शिवाजी-उत्सवांतील एका व्याख्यानांत त्यांनी सांगितले की, शिवाजी- उत्सव मुस्लिमांविरुद्ध नाही, शिवाजी महाराष्ट्रांत जन्मला हा केवळ योगायोग आहे, अन्यत्र आम्ही अकबराचाहि उत्सव केला असता. मोगल आक्रमक होते म्हणून त्याने त्यांचा प्रतिकार केला. मुस्लिम म्हणून नव्हे. पुढील राष्ट्रपुरुष कदाचित् मुसलमानांत जन्म घेईल. आम्ही त्याला असेंच मानूं. (रायटिंग्ज् ॲण्ड स्पीचेस्, पृ. ३२, गणेश अँड कंपनी, मद्रास). २० ऑगस्ट १९०१ व १६ मे १९०५ या केसरींतील लेखांत त्यांनी हाच विचार अशाच शब्दांत मांडला आहे. ते म्हणतात, "मुसलमान किंवा खिश्चन हे आमचे शत्रु नव्हेत. 'विनाशाय च दुष्कृताम्' असा शिवाजीचा उद्योग होता; मुस्लिम धर्मीयांविरुद्ध नव्हे. त्याच्या जागी कोणी मुसलमान असतां, तरी त्याचाहि आम्हीं, उत्सव केला असता. या देशांतले थोर पुरुष, मग ते ब्राह्मण असोत, मराठा असोत, मुसलमान असोत, त्यांचे गुणगान करून राष्ट्रीयत्व जागृत ठेवणें हें आमचें कर्तव्य आहे. जातीकडे किंवा धर्माकडे न बघतां राष्ट्रकार्य करण्यास आपण त्यांच्यापासून शिकावें." अकोला येथील 'आमची दुःस्थिति व आमचें प्राप्तव्य' या व्याख्यानांतहि हाच आशय त्यांनी व्यक्त केला आहे. "आम्हांला गुणांची अपेक्षा आहे, जातीची नाही." म्हणून मुस्लिमांनीहि शिवाजी-उत्सवांत सामील व्हावें, असें तें सांगत.
 मुसलमानांना शिवाजी-उत्सवांत सामील होण्यास सांगणे यांत खरोखर विपरीत असें कांही नाही. आज इजिप्त, तुर्कस्थान, इराण इत्यादि देशांतील मुसलमान तेथील मुस्लिमेतर ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांचा आत्मीयतेने अभिमान बाळगीत आहेत. बांगला देशांतील शेख मुजिबुर रहमान हे रवींद्रनाथांना राष्ट्रपुरुष मानतात. त्यांचें गीत बांगला मुस्लिमांनी राष्ट्रगीत मानले आहे. मुजिबुर रहमान हे दुर्गा, कालीमाता यांच्या उत्सवांत आनंदाने सामील होतात. हीच राष्ट्रीय दृष्टि टिळक मुसलमानांना शिकवीत होते. गणेशोत्सवामागेहि त्यांची हीच राष्ट्रीय दृष्टि होती. गणेशोत्सव सुरू करण्यांत हिंदूंना एकधर्मीयत्वाच्या बंधनांनी संघटित करावें हा हेतु निश्चित होता; पण त्यांत मुस्लिमांविरुद्ध असें कांही नव्हतें. कारण त्यांतहि मुस्लिमांनी सामील व्हावें असें त्यांनी आवाहन केलें होतें; आणि प्रारंभी अनेक मुस्लिमांनी तें मानलेंहि होतें. नाशिक, सोलापूर येथे व इतर अनेक शहरांत मुसलमान गणेशोत्सवांत सामील झाले होते. नाशिकला तर गणोशोत्सवाचें नेतृत्वच मुसलमानांनी केलें होतें. ही माहिती देऊन, टिळक हे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे अत्यंत मोठे पुरस्कर्ते होते, असें डॉ. राम गोपाळ यांनी आपल्या 'इंडियन मुस्लिम' या ग्रंथांत म्हटलें आहे. (पृ. ८७- ९५). गणेशोत्सव हा मुस्लिमांविरुद्ध नव्हता, असें रौलट रिपोर्टातहि मान्य केलेले आहे. तरी टिळक हे मुस्लिमांचे शत्रु होते, प्रतिगामी होते, असा आरोप अजूनहि त्यांच्यावर केला जातो, याचें कारण एकच. ते हिंदु धर्माचे अभिमानी होते, मराठ्यांनी मुस्लिमसत्तेचें निर्दाळण केलें हें ऐतिहासिक सत्य ते मान्य करीत होते, अफजुलखानाला शिवछत्रपतींनी ठार केलें, हें योग्यच केलें, असें म्हणत होते, आणि स्वधर्म व प्राचीन परंपरा यांचा अभिमान जागृत करून हिंदूंना संघटित होऊन प्रतिकार करण्यास सांगत होते.
 टिळकांनी मुसलमानांवर टीका केली, त्यांच्या अत्याचारांना विरोध केला तो मुस्लिम अराष्ट्रीय वृत्तीची जोपासना करीत होते म्हणून. ते विधर्मीय म्हणून नव्हे; पण इंग्रज अधिकारी व सुधारक मात्र त्यांच्यावर तसा आक्षेप घेत असत; पण वर केलेल्या विवेचनावरून हें ध्यानांत येईल की, मुस्लिम हे ब्रिटिशांचे हस्तक होऊन राष्ट्रसभेला विरोध करीत होते, आपण राज्यकर्ते आहोंत अशा वृत्तीने ते हिंदूंशी चढेलपणे वागत होते व या देशाच्या हिताशी एकरूप होत नव्हते म्हणून टिळक त्यांच्यावर टीका करीत होते; पण अशी टीका करीत असतांनाहि त्यांना राष्ट्रीय वृत्तीची शिकवण देऊन काँग्रेसमध्ये आणण्याचा व स्वराज्याच्या लढयांत सामील करून घेण्याचा त्यांनी आपला प्रयत्न मात्र कधीहि सोडला नव्हता.
हिंदी मुसलमान
 या त्यांच्या प्रयत्नाला थोडें थोडें यशहि येत होतें. शिवाजी-उत्सवांत मुस्लिमांनी सहभागी व्हावें असा उपदेश ते करीत; आणि अनेक ठिकाणीं मुस्लिम लोक तसे सहभागी झालेहि होते. पुढे वंगभंगामुळे प्रक्षोभ होऊन स्वदेशी-बहिष्काराची चळवळ सुरू झाली. तींतहि मुस्लिमांनी येऊन मिळावें असें आवाहन टिळकांनी केलें व प्रारंभीं त्याला प्रतिसादहि बरा मिळाला. बारिसालची परिषद् ही वंगभंगाच्या प्रतिकारासाठीच भरली होती. वंदे मातरम् हें राष्ट्रगीत म्हणण्याचा हक्क लोकांना, सिद्ध करावयाचा होता; आणि अशा या परिषदेचे अध्यक्ष होते. बॅ. रसूल व एक पुढारी होते लियाकत हुसेन.
 पुढे १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेच्या द्वेषांतूनच तिचा जन्म झाला होता हें उघड आहे. तरीहि त्या वेळीं पुष्कळ मुसलमानांना ती पसंत नव्हती. कलकत्त्याच्या राष्ट्रसभेपुढे बंगालच्या फाळणीच्या निषेधाचा ठराव, लीगचे संस्थापक जे डाक्याचे नबाब त्यांच्या बंधूंनीच मांडला होता. सभेला पन्नास-साठ मुस्लिम प्रतिनिधीहि होते. स्वदेशीच्या ठरावाला टिळकांनी उपसूचना मांडली तिला बॅ. रसूल, अलिगडचे फाजल हुसेन व काझी सयफ उद्दिन यांनी अनुमोदन दिलें. त्यानंतरच्या एका सभेत बडोद्याचे हायकोर्ट जज्ज शमसुद्दीन तय्यबजी यांचें व्याख्यान झाले. त्यांनी "मुसलमानांनीहि राष्ट्रीयत्वाची बंधने पाळली पाहिजेत", असें सांगितलें. डाक्याच्या नबाबांनी लीगची स्थापना करून आरंभिलेल्या भेदनीतीचा सभेत निषेध करण्यांत आला. आणि सभेत शेवटी 'हिंदी मुसलमान संघ' स्थापण्यांत येऊन नबाब सय्यद महंमद बहादूर हे तिचे अध्यक्ष व हैदर रेझा हे सेक्रेटरी, अशी निवड करण्यांत आली. वंगभंग, वंदे मातरम्, स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळीमुळे हिंदु-मुस्लिम ऐक्याला थोडें बरें रूप येत होतें हें यावरून दिसून येईल. अर्थात् हें ऐक्य अल्पजीवी ठरलें. मोर्ले-मिंटो सुधारणा लवकरच आल्या आणि मिंटोसाहेबांना राष्ट्रसभा व मुस्लिम समाज यांत पाचर मारण्यांत मोठेच यश आलें.
 यानंतर टिळक लवकरच तुरुंगांत गेले. त्याआधी त्यांनी राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली होती व 'बहिष्कार' याचा सरकारच्या सर्व कारभारावर- लष्करावर, मुलकी खात्यावर, पोलिसखात्यावर, न्यायखात्यावर बहिष्कार- असा व्यापक अर्थ सांगून, त्याच्या सांगाती करबंदीची चळवळ करण्याची घोषणाहि केली होती. ती सुरू झाली असती तर कदाचित् वंगभंगाप्रमाणेच मुस्लिमांत पुन्हा स्वराज्याच्या मागणीत सहभागी होण्याची वृत्ति निर्माण झाली असती. पण ती चळवळ झालीच नाही; आणि टिळक सुटून येऊन होमरूलची चळवळ सुरू करीपर्यंत मुस्लिम समाजांत अराष्ट्रीयत्वाची, ब्रिटिश-धार्जिणेपणाचीं, विभक्ततेची विष-बीजें फार खोलवर रुजली होती.
भेद वितळले
 पण १९१२ साली ब्रिटिशांनी तुर्कस्थानच्या सुलतानाविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे पुन्हा हिंदी मुस्लिमांत ब्रिटिशविरोधाची लाट आली. त्या सालीं ग्रीस, बल्गेरिया, इत्यादि तुर्की साम्राज्यांतील चार देशांनी उठावणी करून सुलतानाचा पराभव केला. त्याआधी इजिप्त, त्रिपोली, मोरोक्को ह्या प्रकरणांवरून, ब्रिटिश हे इस्लामचे शत्रु, अशी हिंदी मुस्लिमांची भावना झालीच होती; आणि या वेळींहि त्यांनी तुर्की सुलतानाविरुद्ध पक्ष घेतला. त्यामुळे अलिगडचे मुस्लिमहि संतप्त झाले, व हिंदी मुस्लिमांची इंग्रजी राज्याविरुद्ध एक फळी तयार होऊन तिने काँग्रेसशी सहकार्य करण्याचे ठरविलें. त्या वेळी काँग्रेसच्या धुरीणांनी या वृत्तीचें आनंदाने स्वागत केलें; आणि १९१३ साली काँग्रेसचे अध्यक्षपद नबाब सय्यद महमूद यांना दिलें.
सर्व नॅशनॅलिस्ट
 मुस्लिमांची ही ब्रिटिश- शत्रुत्वाची वृत्ति हळूहळू वाढत गेली. पहिल्या महायुद्धांत तुर्की सुलतान इंग्रजांच्या विरुद्ध पक्षाला म्हणजे जर्मनीला मिळाला होता. त्यामुळे ती जास्त तीव्र झाली. मुस्लिमांच्या या ब्रिटिश- शत्रुत्वाच्या मागे प्राधान्याने पॅन् इस्लामिझमची भावना होती हें खरें. तरी त्या शत्रुत्वांतून थोड्या प्रमाणांत राष्ट्रीयत्वाची भावनाहि निर्माण होत होती. वंगभंग, स्वदेशी, बहिष्कार या चळवळींच्या वेळी तशी ती कांही प्रमाणांत झाली होती हें टिळकांनी पाहिलें होतें. म्हणूनच त्यांनी होमरूलच्या चळवळींत त्यांना सामील करून घेऊन तिचा परिपोष करण्याचा प्रयत्न केला. लखनौचा करार त्यांतूनच निर्माण झाला. १९१६ साली लखनौला काँग्रेसच्या अधिवेशनांत झालेल्या कराराअन्वये, मुस्लिमांना पंजाब व बंगाल सोडून इतर प्रांतांत त्यांच्या लोकसंख्येपेक्षा फार जास्त प्रमाणांत जागा मिळाल्या. पंजाब व बंगालमध्ये त्यांची बहुसंख्या होती. तेथे प्रमाणापेक्षा कमी जागा मिळाल्या. पण अन्यत्र जास्त जागा दिल्यामुळे, डॉ. मुंजे, पं. मालवीय आणि बहुसंख्य हिंदुसभावादी लोक यांचा कराराला विरोध होता. तरीहि टिळकांनी तो घडवून आणला, याचें कारण एकच. मुस्लिमांत राष्ट्रीय वृत्तीची वाढ होण्याची शक्यता त्यांना त्या वेळीं वाटली. ऑक्टोबरमध्ये अहमदाबादच्या प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष बॅ. जीना होते. "आपण सर्व आता नॅशनॅलिस्ट झालों", असें त्या वेळीं ते म्हणाले. लखनौ करार करण्यांत टिळकांचें हेंच सूत्र होते. मागे निर्देशिलेल्या २९-१२-१९१६ च्या केसरीच्या लेखांत त्यांनी पुनः पुन्हा तें सांगितलें आहे. "मवाळ जहाल, हिंदु-मुसलमान हे पक्षभेद उगवत्या राष्ट्रीय बुद्धीच्या तेजामुळे वितळून गेले. शेवटच्या मुसलमान नबाबाच्या राजधानींत (लखनौला) एकाच सभापीठावर बसून मुसलमान व हिंदु विद्वानांनी प्रत्यक्ष स्वराज्याची मागणी केली, त्या अर्थी ब्युरॉक्रसीची सद्दी आता संपली", असे त्यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानांत हिंदु बहुसंख्य आहेत. त्यामुळे, ब्रिटिश गेले तर त्यांचीच सत्ता स्थापन होईल, अशी भीति मुस्लिमांना वाटत होती, म्हणून स्वराज्याला त्यांचा विरोध होता, तो आता गेला; म्हणून टिळकांनी म्हटलें की, "हिंदी लोकांपैकी कोणत्याहि वर्गाच्या हाती सत्ता आल्यास ती एका दृष्टीने आपल्याच हाती आल्यासारखी आहे, अशी बुद्धि मुस्लिमांत उदित झाली नसती, तर कायदेकौन्सिलांतील प्रतिनिधींच्या प्रमाणासंबंधी करारमदार करून का होईना, पण स्वराज्याचे मागणीत ते हिंदी लोकांना कधीहि मिलाफी झाले नसते." लो. टिळकांचें करारामागचें सूत्र या शेवटच्या वाक्यावरून स्पष्ट होईल. आपण सर्व हिंदी एक ही भावना मुस्लिमांची असली पाहिजे, म्हणजे ते राष्ट्रीय झाले पाहिजेत, म्हणजेच त्यांनी राष्ट्रीयत्वाची सर्व बंधने पाळली पाहिजेत; याचाहि अर्थ टिळकांनी अनेक वेळा स्पष्ट केला आहे. शिवाजीला त्यांनी राष्ट्रपुरुष मानावें, गणेशोत्सवांत सामील व्हावें व स्वदेशी- बहिष्कारासारख्या राष्ट्रीय चळवळींत सहभागी व्हावें, हा तो अर्थ होय. मुस्लिमांना प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व देतांना व पुढे, अधिकाराच्या जागा वाटेल तर हिंदूंना द्या वाटेल तर मुसलमानांना द्या, पण आमच्यापैकी कोणाला तरी द्या, असें म्हणतांना त्यांची हीच भूमिका होती." राष्ट्रीय भावनेचें खरें बीज यांतच आहे, व हें बीज हिंदुस्थानच्या भूमींत आता रुजलें गेलें याविषयी सरकारासहि फारशी शंका उरेल, असें आम्हांस वाटत नाही." असें त्या लेखाच्या समारोपांत त्यांनी म्हटले आहे. लखनौच्या आधिवेशनानंतर ३० डिसेंबरला तेथेच स्वराज्य संघ परिषद् भरली होती. त्या वेळींहि टिळकांनी करार करतांना आपल्या अपेक्षा काय होत्या तें स्पष्ट केलें. "स्वराज्याच्या मागणीत मुसलमान बंधु सामील व्हावे म्हणूनच त्यांना या विशेष सवलती दिल्या आहेत. तशा दिल्यामुळे आता त्यांची स्वराज्य-सिद्धीची जबाबदारी वाढेल. इंग्रजांच्या हातून सत्ता हिसकावून घ्यावयाची तर रस्सीखेचीच्या खेळांत आमच्याबरोबर मुसलमानांनीहि हातभार लावला पाहिजे. प्रत्येकाने खणखणीत आवाजाने आपल्या तोंडाने स्वराज्याची मागणी करणें हा या प्रयत्नाचा प्रारंभ होय." एका शिक्षकांशी बोलतांना याविषयी टिळकांनी आणखी स्पष्ट खुलासा केला आहे. ते म्हणतात, "या करारासंबंधी लोकांनी इतका बाऊ कां करावा तें समजत नाही. आज आम्हांस परकीय सरकारास तोंड द्यावयाचें आहे. त्या वेळी कमीअधिक प्रमाणांत मुसलमानबंधूंस मतदानाचे हक्क अधिक देण्यास काय हरकत आहे? स्वराज्य मिळाल्यानंतर हें प्रमाण केव्हाहि बदलतां येईल." (आठवणी, पृ. १ २, ११२).
 सी. एस्. रंगा अय्यर यांनी आपल्या आठवणींत टिळकांची भूमिका अतिशय स्पष्ट शब्दांत विशद केली आहे. ते म्हणतात, "लोकमान्यांनी लखनौ करार मोठ्या खुषीने केला होता असें नाही; पण त्यामुळे मुसलमानांचें समाधान होत असेल, ते काँग्रेसमध्ये त्यामुळे येत असतील, आणि मुख्य म्हणजे देशबाह्यनिष्ठा सोडून हिंदी राष्ट्रवादाला मान्यता देणार असतील तर करार करण्याजोगा आहे ", अशी त्यांची विचारसरणी होती. (आठवणी. पृ, २, ५६५).
विकृत धाष्टर्य
 लखनौ करारासंबंधी टिळकांची भूमिका काय होती याविषयी संदेहास यत्किचितहि जागा नाही, हें वरील विवेचनावरून ध्यानांत येईल. मुसलमानांचा स्वराज्यालाच विरोध होता. इंग्रजांचें राज्य त्यांना कायम हवें होतें. ही भूमिका सोडून ते स्वराज्याच्या मागणीला अनुकूल झाले, तींत सहभागी झाले. शिवाय राष्ट्रीयत्वाची बंधने पाळण्यासहि ते तयार झाले; आणि याच वृत्तीने ते प्रथम स्वदेशी-बहिष्कार या चळवळींत आणि नंतर होमरूलच्या चळवळींत सामील झाले. इतका पालट त्यांच्यांत झाला म्हणूनच त्यांना थोडें झुकते माप देण्यास टिळक तयार झाले. असे असतांना आज लखनौ करार हाच खरा पाकिस्तानचा पाया होय, आणि तो टिळकांनीच घातला, असा आरोप कांही जाणते लोक करीत आहेत, याचा मोठा विस्मय वाटतो. असा आरोप एक-दोघा पंडितांनी केला आहे असें नसून, तो एक संप्रदायच आहे, असें दिसतें. या संप्रदायाच्या मनांत महात्माजी, पं. नेहरू व त्यांची काँग्रेस यांना या घोर कृत्याच्या अपश्रेयांतून मुक्त करावयाचें आहे; आणि त्यासाठी ते टिळकांवर हा आरोप करीत आहेत, हें त्यांच्या लिखाणावरून स्पष्ट दिसून येतें. अन्यथा हें विकृत धाष्टर्य त्यांच्या हातून झालें नसतें.
 वास्तविक मुस्लिमांच्या बाबतींत टिळकांचा मार्ग पुढीलांनी अनुसरला असता तर, पाकिस्तानची आपत्ति टळली असती. मुस्लिमांच्या पाशवी अत्याचारांचा संघटित प्रतिकार करणें, 'ये यथा मां प्रपद्यन्ते' या धोरणाने त्यांच्याशी वागून हिंदूंच्या सामर्थ्याची त्यांना जाणीव करून देणें, आणि त्याचबरोबर त्यांच्यांत राष्ट्रीय वृत्तीचें बीज रुजवून त्याचा परिपोष करणें, हा टिळकांचा मार्ग होता. १८९३-९४ सालीं पुण्या-मुंबईस संघटित प्रतिकार झाल्यामुळे पुढे अनेक वर्षे महाराष्ट्रांत मुस्लिम अत्या चार करूं धजले नाहीत. आणि राष्ट्रीय वृत्तीला आवाहन केल्यामुळे कांही प्रमाणांत तरी ते स्वराज्याचा चळवळींत सामील झाले; आणि लखनौला स्वराज्याची मागणी काँग्रेसला एकमुखाने करतां आली. असें करतांना मुस्लिमांना कांही जादा सवलती द्याव्या लागल्या हा गौण पक्ष हें खरें. पण परराष्ट्रांशी सुद्धा कांही प्रसंगीं, थोडा गौण पक्ष स्वीकारून, करार करावे लागतात. येथे तर जे स्वकीय होण्याच्या मार्गावर होते त्यांच्या बाबतींत ही गौणता स्वीकारली होती; पण त्यांनी अत्याचार केले तर त्यांचा प्रतिकार करावयाचा; आणि पुढेमागे ही गौणता काढून टाकावयाची, अशी सतत सावधगिरी त्यामागे बाळगलेली होती.
 याउलट टिळकांच्या नंतरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुस्लिमांच्या देशद्रोही वृत्तीलाच खतपाणी घालून त्यांचा सतत अनुनय करण्याचें धोरण अवलंबिलें, मुस्लिमांनी भीषण अत्याचार केले तेव्हा 'शूर मोपले', 'भाई रशीद' म्हणून त्यांचे कौतुक केलें, त्यामुळे त्यांचें पाशवी आक्रमण वाढतच गेलें. पण यापेक्षाहि काँग्रेसचे अक्षम्य पाप म्हणजे भारतनिष्ठ मुस्लिमांना सतत दूर ठेवून तिने मुस्लिम लीगला जवळ केलें. आज बांगलामधील मुस्लिम बंगाली मातृभाषा मानतात, तिच्यासाठी प्राणार्पण करतात. रवींद्रांचें गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारतात, पाकिस्तानला शत्रु लेखतात व भारतीय परंपरेचा आदर करतात. हेंच आज सिंधमध्ये चालू आहे. हें 'जिये सिंध' चळवळीवरून दिसून येतें. सिंधी मुसलमानांना पाकिस्तानांतून बांगलाप्रमाणेच फुटावयाचें आहे, सिंधी भाषेला ऊर्जितावस्था आणावयाची आहे. दाहीरच्या परंपरेचा ते अभिमान धरतात, आणि महंमद कासीमला आक्रमक समजतात. याच राष्ट्रीय वृत्तीचे जे मुस्लिम त्या काळीं भारतांत होते- तसे ते निश्चित होते हें सरहद्द प्रांतांत त्याच वेळी दिसत होतें- त्यांना आपले, स्वकीय मानून, त्यांचा पक्ष वृद्धिंगत करणें व त्यांच्या सहकार्याने भारतनिष्ठेची मुस्लिमांत जोपासना करणें हा मार्ग महात्माजी- पंडितजींनी अनुसरला असता तर भारत निश्चित अखंड राहिला असता. लोकमान्यांनी प्रारंभापासून तोच मार्ग आखला व अनुसरला होता; पण वरील थोर नेत्यांनी सर्वस्वीं विपरीत व विनाशगामी मार्ग स्वीकारला; आणि त्यांच्याच शब्दांत म्हणावयाचें, तर मातृभूमीचे तुकडे केले.
 बांगला, सिंध, वायव्यप्रांत येथे आज भारतीय प्राचीन परंपरेच्या भक्तीचें, मातृभूमीच्या निष्ठेचें जें उधाण आलें आहे व पाकिस्तानविषयी जो जहरी कडवा द्वेष तेथे उफाळत आहे त्यावरून टिळक मार्ग अनुसरला असता तर पाकिस्तान निश्चित टळलें असतें यांत शंका नाही. डोळ्यासमोर घडलेल्या इतिहासाचा हा निष्कर्ष स्पष्ट दिसत असतांना पाकिस्तानचे अपश्रेय टिळकांना देणाऱ्यांची बुद्धि विकृत आहे, असेंच म्हटलें पाहिजे. अजूनहि शहाण्या माणसांनी सावध होऊन मुस्लिमांच्या बाबतींत लोकमान्यांच्या तत्त्वांचा पुन्हा अवलंब करावयाचें ठरविलें, तर यापुढच्या अनेक आपत्ति टळण्याचा संभव आहे.




-१०-

महाभूतसमाधि


तं वेधा विद्ते नूनं महाभूतसमाधिना ।
तथा हि सर्वे तस्यासन् राष्ट्रार्थैक फलागुणाः ॥

महापुरुषांना घडविण्यासाठी, पंचमहाभूतांचीं मूलकारणें, सृष्टीचीं मूलद्रव्यें ही जी सामग्री विधाता वापरतो तीच वापरून त्याने या महापुरुषाला घडविलें असले पाहिजे. त्यामुळेच राष्ट्राचा उत्कर्ष हें ज्यांचे एकमेव फलं आहे, असेच त्याचे सर्व गुण होते.
 रघुवंशांतील थोर राजा दिलीप याचें कालिदासाने या श्लोकांत वर्णन केलें आहे. त्यांत 'परार्थ' ऐवजी 'राष्ट्रार्थ' असा बदल केला तर तें वर्णन लो. टिळकांच्या बाबतींतहि सार्थ होईल असें वाटतें. हिंदुस्थानचें एक राष्ट्र घडविणें यासाठीच त्यांचा अवतार होता. त्या एका हेतुच्या सिद्धीसाठीच त्यांचे सर्व गुण विधात्याने त्यांना दिले होते.
गुणगौरव
 "प्रखर बुद्धिमत्ता, अचल ध्येयवाद, व्यावहारिक दक्ष-वृत्ति, उदंड उत्साह, भेदक प्रज्ञा, गाढ पांडित्य, साधी राहणी, असामान्य कार्यैक-निष्ठा, अभंग आवेश पण बाह्यतः मात्र शांत वृत्ति, हे मराठा समाजाचे गुण लो. टिळकांच्या ठायी मूर्त झाले होते. त्यामुळे टिळक म्हणजे अतिशय धारदार, तिखट पण म्यान केलेले खड्ग आहे, असे मला नेहमी वाटे," असें महायोगी अरविंद घोष यांनी टिळकांविषयी आपल्या आठवणीत म्हटलें आहे.
 कवयित्री सरोजिनी नायडू म्हणतात, "टिळक हे आपल्या टणक, समृद्ध दगडी महाराष्ट्रांतल्या एखाद्या पहाडासारखे होते. त्याच्या अंगावरून निर्झर खळाळत असतात, वनराजींनी तो झाकलेला असतो, पण त्याच्या सुप्त सामर्थ्याची प्रतीति सारखी जाणवत असते."
 सुप्रसिद्ध वार्ताहर नेव्हिनसन हे सुरतेच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनास स्वतः उपस्थित होते. त्यांना टिळकांचें दर्शन कसें घडलें?- "आभाळांत काळे ढग येऊन वीज कडाडावी आणि वादळ व्हावें त्याप्रमाणे टिळक थेट समोरून येऊन अध्यक्षांच्या खुर्चीसमोर उभे राहिले. ते तक्रार करीत होते, निषेध करीत होते, हरकत सांगत होते; पण हें सर्व काम त्यांच्या शांत व निश्चयी स्वभावाप्रमाणे सुरू होतें. त्यांचा तो आवाज ऐकून वाटे की, हा मनुष्य भवितव्यतेलाहि तुच्छ मानीत आहे."
 ब्रिटिश पार्लमेंटचे मजूरपक्षीय सभासद कर्नल वेजवुड म्हणतात, "टिळकांची भेट होऊन आता पांच वर्षे झाली; पण माझ्या मनावरचा त्यांचा दरारा कायम आहे. इतर हिंदी जनांबरोबर मी बरोबरीच्या नात्याने बोलूं शकतों, त्यांच्या बरोबरीने हसतों, वाद घालतों, पण टिळकांच्या समोर हें धैर्य मला होत नसे. कारण टिळक म्हणजे पिढ्यान् पिढ्यांची दैवी स्थितप्रज्ञता, तपस्या व ज्ञानसाधना यांची साक्षात् पूर्तीच!"
 सुरत काँग्रेसनंतर टिळकांवर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यांत आला होता. त्या वेळी डॉ. मुंजे व दादासाहेब खापर्डे त्यांना तुरुंगांत भेटावयास गेले होते. जेलरसाहेब एक मद्रासी हिंदु होते. त्यांनी तीन खुर्च्या मांडून टिळकांसकट सर्वांना बसावयास सांगितलें. आणि आपण अदबीने बाजूस उभे राहिले. थोड्याच वेळांत टेबलाच्या खणांतून पांढरी रोठा सुपारी व अडकित्ता काढून त्यांनी टिळकांसमोर ठेवला; आणि खाली वाकून ते म्हणाले, "मला माहीत आहे आपल्याला सुपारी खाण्याचा फार शोक आहे." त्यावर टिळक म्हणाले, "मी आता कैदी आहे हे आपण विसरलात वाटतें?" जेलरसाहेबांनी नम्रपणें उत्तर केलें, "आपल्यासारख्यांवर असे संकट येणें ही दुःखाची गोष्ट तर खरीच, पण आम्हासारख्यांना दुःखांत सुख हेंच की, अशा विभूतींच्या आगमनाने हें पापालय पुनीत होतें."
 पांडुरंग काशीनाथ पेंडसे यांनी एक आठवण दिली आहे. त्यांच्या घरी एकदा लोकमान्य गेले होते. तेथे त्यांनी त्यांच्या आजीला नमस्कार केला. त्या वेळेस पेंडशांच्या आजी म्हणाल्या, "रामराजा वनवासाला गेला त्या वेळेस जितकें दुःख प्रजेला झालें तितकेंच दुःख आपण ब्रह्मदेशांत जाते वेळीं प्रजेला झालें." हें ऐकून लोकमान्यांच्या डोळ्याला पाणी आलें. तें पाहून पेंडशांना आश्चर्य वाटलें. दृढ अंतःकरणाचा व कठोर निश्चयाचा हा पुरुष! लोकांचें प्रेम पाहून त्याला द्रव फुटतो. तेव्हा "व्रज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि!" असेच लोकमान्य आहेत हेंच खरें.
 संकेश्वराला गेले असतांना लोकमान्य तेथील श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य यांच्या मठांत गेले होते. त्या वेळीं स्वमींनी शाल देऊन त्यांचा सत्कार केला. तेव्हा लोकमान्य म्हणाले, "आम्ही आपले चरणीं कांही अर्पण करण्याचें सोडून आपलेकडूनच घेणें हें बरोबर नाही." त्यावर स्वामी म्हणाले, "अहो, लोकमान्य, तुम्ही लोकमान्य नव्हे, जगन्मान्य आहांत. पुण्यामध्येच काय, पण सबंध हिंदुस्थानमध्ये देखील तुम्ही सांगाल त्याप्रमाणे लोक ऐकतात. आम्ही सध्या नामधारी जगद्गु आहोत, तुम्हीच खरे जगद्गुरु आहांत."
 स्वकीय-परकीय, लहान-थोर पुरुषांना लो. टिळक कसे दिसले तें त्यांनी आपापल्या शब्दांत व्यक्त केलें आहे. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचें त्यांतून स्पष्ट दर्शन घडतें. महाभूतसमाधि ती हीच. राष्ट्रार्थैकफल असे त्यांचे गुण ते हेच.
कालपुरुषाची चेष्टा
 भवितव्यतेला ते तुच्छ लेखीत असत हें तर प्रत्येक प्रसंगी दिसून आलें आहे. १९१५ साली होमरूल लीगच्या स्थापनेसंबंधी बोलणी चालली होती. बॅ. बॅप्टिस्टा यांनी एकदा १८९९ साली व एकदा १९०६ साली तशी सूचना केली होती; पण 'अजून वेळ आली नाही', असें दोन्ही वेळा टिळक म्हणाले होते. १९१५ सालीं त्यांनी ती सूचना पुन्हा मांडली तेव्हा टिळक म्हणाले, "होय. आता योग्य वेळ आली आहे. आता यामुळे माझा मंडालेकडे परत प्रवास सुरू होईल; पण तो धोका पत्करण्याजोगा आहे. तुम्ही अध्यक्षीय भाषणांत सूचना मांडा." सहा वर्षे मंडालेच्या एकान्तवासाचा अनुभव घेऊन आल्यावर पुन्हा वर्षाच्या आंतच, आणि तोहि साठाव्या वर्षी पुन्हा तिकडे जाण्याचा संभव दिसत असून, टिळकांनी होमरूल लीगच्या कार्यास प्रारंभ केला.
 आपल्याभोवती घिरट्या घालणाऱ्या कालपुरुषाची टिळक नेहमीच अशी चेष्टा करीत असत. १९०८ सालीं खटला चालू असतांना वातावरण फारच गंभीर झालें होतें. तेव्हा टिळक हसत हसत भोवतालच्या मंडळींना सहज म्हणाले, "आज काळ्या पाण्याचा रंग दिसतो आहे."
 भीषण भवितव्यतेला असें तुच्छ लेखण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नसतें तर हिंदी राष्ट्र घडविण्याचें कार्य त्यांच्या हातून झालेच नसतें. हें राष्ट्र घडवावयाचें म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूर, सैतानी, सत्तेला, प्रत्यक्ष यमदंडालाच आव्हान देणें प्राप्त होतें. चाळीस वर्षे केसरीच्या प्रत्येक लेखांत, आणि प्रत्येक भाषणांत टिळक हें आव्हान देत होते.
स्थितप्रज्ञता
 त्यांना हें धैर्य, हें बळ कोठून प्राप्त झालें? गीता, भगवद्गीता! भगवद्गीतारहस्य! स्थितप्रज्ञता हें गीतेचें रहस्य आहे. तीच त्यांनी साध्य करून घेतली होती. हरिदास मुरूडकरबुवा यांनी टिळकांना हाच प्रश्न विचारला होता. "आपण हें सर्व सहन कसें केलें? आपण गीतेच्या परिशीलनामुळे प्रज्ञाप्रतिष्ठित झाला आहां, जीवन्मुक्त कोटींतील आहां. त्याच भूमिकेवरून आपण कारागृहांतहि कारागृहातीत असला पाहिजे!" यावर टिळकांनी विनयाने सांगितले की, "त्या कोटींतील मी नव्हे, आपण म्हणतां तसा ब्रह्मनिष्ठ मी नाही; पण लहानपणापासून मनांत जेणेंकरून धैर्य उत्पन्न होईल, अशा गोष्टींचा वारंवार विचार करण्याची, मला सवय होती. मंडालेला असतांना मी जी गीता लिहिली तिच्यामुळे मन धैर्यपूरित व उदार झालें. कांही काळ तें सुखदुःखादि द्वंद्व सोडून निश्चल होई. अशा रीतीने मी आपल्या मनाला हें द्वंद्व सहन करण्याचें सामर्थ्य आणलें." स्वदेशी- बहिष्काराच्या चळवळीपासून, तुरुंगवास, हद्दपारी, फाशी झाली तरी सरकारी अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे, असें टिळक सांगूं लागले. त्या वेळींच त्यांच्या मनाने निश्चल होण्याचा अभ्यास पूर्ण केला असला पाहिजे. कारण १९०८ सालीं सहा वर्षांची काळेपाण्याची शिक्षा झाली तरी, तुरुंगांत जातांच त्यांना शांतपणें झोप आली. हीच स्थितप्रज्ञता मंडालेस पूर्णत्व पावली. १९१४ नंतरच्या सहा वर्षांत जे जे लोक टिळकांच्या सहवासांत आले त्यांना त्यांना पदोपदी त्यांच्या या द्वंद्वातीत निश्चलतेचा प्रत्यय आलेला आहे.
वेदान्ती व्यक्तिमत्त्व
 ही निश्चलताच नव्हे, तर टिळकांचें सर्व व्यक्तिमत्त्वच गीतेंतल्या वेदान्ताने घडविलेलें होतें. ते पराकाष्ठेचे लोकवादी (डेमोक्रॅट) झाले ते वेदान्तामुळेच. वास्तविक समता, बंधुता, स्वातंत्र्य हीं लोकशाहीचीं तत्त्वें आपण पाश्चात्त्यांकडून घेतलीं आहेत. टिळकांना हें अमान्य आहे असें नाही; पण त्यांच्या मतें या तत्त्वांना जास्त आधार वेदान्तांत आहे. दासनवमीनिमित्त झालेल्या व्याख्यानांत ते म्हणाले, "सर्व माणसें जन्माने सारखी आहेत हें इंग्रजी तत्त्व आहे. पण वेदान्ताचें तत्त्व यापेक्षा उदात्त आहे. त्यांत सर्व माणसांचा आत्मा सारखा आहे, असेंच केवळ नाही, तर सर्व माणसें व प्राणी यांचा आत्मा सारखा आहे असें सांगितलें आहे. जगांतील अत्यंत उदात्त विचारांची एखादी शाळा असेल तर ती वेदान्ताची होय." याच व्याख्यानांत ते पुढे म्हणतात, "धर्म तरी काय सांगतो? तूं स्वतंत्र आहेस, मायेचें पटल आलें आहे तें सोडून दे. संसारांतील लोभाची, क्रोधाची, स्वार्थाची बुद्धि टाकून द्यावी. परमेश्वर होण्याचें सामथ्य आपल्या अंगी आहे, हें धर्माने कळून येईल." सोलापूरच्या व्याख्यानांत असाच विचार त्यांनी मांडला आहे. "मनुष्याचा परमेश्वर होऊं शकतो. आज जमलेल्या हजारो लोकांचा व माझा आत्मा भिन्न नाही. सगळ्या मनुष्यांचा आत्मा एक आहे. तो मीच आहें, मी तो आहे. हें नातें ओळखणारा अधिक तत्त्वज्ञ व देशाचा अधिक हितकर्ता, असें म्हणण्यास हरकत नाही!"
श्रेष्ठगौरव
 प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र महत्त्व आहे, तिच्या व्यक्तिमत्त्वाला मान दिला पाहिजे हा राष्ट्रीयत्वाचा व लोकशाहीचा विचार असा वेदान्तांतून स्फुरलेला आहे. रवीन्द्रनाथ ठाकुरजी यांनी एका आठवणींत टिळकांच्या या वृत्तीचा गौरव केला आहे. ते युरोपला निघाले होते. टिळकांनी पन्नास हजार रुपये त्यांना देऊ केले. कशा साठी? युरोपांत त्यांनी स्वदेशाचें कार्य करावें म्हणून; पण कार्य कोणतें? टिळकांचा निरोप होता की, "तुमच्या मताने जें आपल्या मातृभूमीच्या हिताचें असेल तें करा. माझ्या मार्गाने या, असें मी म्हणत नाही. तसें तुम्ही केल्यास मला वाईटच वाटेल. तुम्ही स्वतःच्या मतांशी प्रामाणिक राहून योग्य दिसेल तें करा. तुमचा मार्ग तुम्ही ठरवा." रवीन्द्रनाथ म्हणतात, "माझ्या देशबांधवांनी माझ्या केलेल्या गौरवांत हा सर्वश्रेष्ठ गौरव होता. टिळकांच्या या व्यक्तित्वगुणाने मी फार प्रभावित झालों. टिळकांनी हें जाणलें होतें, की देशोद्धाराचे मार्ग अनेक असू शकतात, आणि प्रत्येक व्यक्तीला तिच्या गुणांचा विकास करण्यास पूर्ण अवसर मिळाला तरच ती स्वतंत्रपणे मार्ग आखून अनेक प्रकारे राष्ट्रोद्धाराचे कार्य साधूं शकेल." (आठवणी, खंड २रा, पृ. ६०८).
व्यक्तित्वाचे महत्त्व
 १९२० सालच्या काँग्रेसचे अध्यक्ष सी. विजय राघवाचारियर यांनी टिळकांच्या लोकवादी वृत्तीचा असाच गौरव केला आहे. ते म्हणतात, "महापुरुष हे निकटच्या लोकांना महापुरुष वाटत नाहीत, अशी एक म्हण आहे, पण टिळक तिला अपवाद होते. जों जों मी त्यांच्या निकट आलों तों तों माझा त्यांच्याविषयीचा आदर वाढत गेला. याचें कारण हें की, दुसऱ्याच्या मतांविषयी त्यांनी कधीह असहिष्णुता दाखविली नाही. ज्यांनी त्यांना फार दुखविलें त्यांच्याबद्दलहि त्यांची वृत्ति अनुदार नव्हती. गोखल्यांच्या मृत्युसमयीचें त्यांचें भाषण याची साक्ष देईल." (आठवणी, खंड २ रा, पृ. ६४३). न्या. रानडे, आगरकर यांच्याविषयी टिळकांनी जे मृत्युलेख लिहिले त्यांचें हेंच वैशिष्ट्य आहे. त्यांच्या जीवनाचे रहस्य टिळकांनी जसें उलगडून दाखविलें तसें त्यांच्या अनुयायांनी सुद्धा दाखविलें नव्हतें. न्या. रानडे यांची वृत्ति अशीच होती. स्वतःकडे कमीपणा घेऊन त्यांनी अनेक वेळा टिळकांचा मुक्तमनाने गौरव केला, हें प्रसिद्धच आहे. हे दोघेहि महापुरुष खरे लोकवादी होते. आणि व्यक्तीच्या व्यक्तित्वाचें महत्त्व ते जाणीत होते, असा याचा अर्थ आहे. दोन तेजस्वी पुरुषांचें सख्य होणे अशक्य आहे, असें महाभारतांत एक वचन आहे; पण राष्ट्रकार्यासाठी असें सख्य होणें अवश्य आहे हें जाणून टिळकांनी तें अनेक वेळा घडवूनहि आणलें होतें. यासाठी या महत्कार्यासाठी, संपूर्ण आत्मलोप करण्याचीहि त्यांची सिद्धता होती. महात्माजींचा उदय होत होता, तेव्हा त्यांनी यापुढचे तुमचे तेच खरे नेते होत, असे अनेकांना पूर्ण स्थितप्रज्ञ-वृत्तीने सांगितलें. ते म्हणाले, "असहकारितेवांचून गत्यंतर नाही, हें तत्त्व मला पूर्ण मान्य आहे; परंतु लोकांची तयारी नाही म्हणून मी स्वस्थ आहें. महात्मा गांधींना तशी तयारी दिसत असेल किंवा तितकी तयारी करवून घेण्यास ते समर्थ असतील, तर लोकांनी सर्वस्व अर्पण करून त्यांना साह्य करावें. आफ्रिकेंतील महात्माजींची चळवळ सर्वांस ठाऊकच आहे व ह्या देशांत देखील ही चळवळ यशस्वीपणे चालवून दाखविण्यास इतका योग्य मनुष्य दुसरा कोणी नाही, हे निर्विवाद आहे." (आठवणी खंड २ रा, पृ. २३३). ही वेदान्ती- वृत्तीची परिसीमा आहे. पंचवीस वर्षे अनभिषिक्त सम्राटाचा अनन्य अधिकार गाजविल्यानंतर शांतपणें हा नेता दुसऱ्या उदयोन्मुख नेत्यासाठी सिंहासन रिकामें करतो. या मनाच्या औदार्याला जगांत तोड नाही. राष्ट्रहितबुद्धीची, निर्ममत्वाची ही पराकाष्ठा आहे. हिच्यांतूनच टिळकांची लोकवादी वृत्ति उगम पावली व परिपक्व झाली.
व्यावहारिक मर्यादा
 लो. टिळक वेदान्ती असले तरी त्यांचा वेदान्त व्यवहारी वेदान्त होता. आणि सर्व उदात्त तत्त्वांच्या बाबतींत असें असावेंच लागतें. मानवता, लोकशाही, समाजवाद, समता, बंधुता, स्वातंत्र्य, हीं अतिशय उदात्त तत्त्वें आहेत; पण प्रत्यक्ष व्यवहारांत त्यांना पदोपदीं मुरड घालावी लागते. नाही तर स्वार्थी मानव त्यांना विकृत रूप देऊन त्यांचा हेतु विफल व आचार अशक्य करून टाकतो. लोकशाही आणि समाजवाद यांच्या नांवाखाली आज सर्वत्र हेंच चालू आहे. लोकमान्यांना याची पूर्ण जाणीव असल्यामुळे उदात्त तत्त्वांच्या व्यावहारिक मर्यादा कोणत्या तें सांगण्यास ते कधी विसरत नसत. सर्वभूतात्मैक्य, आत्मौपम्य, अद्वैत, चराचराशी तादात्म्य हीं वेदान्ताचीं प्रधान तत्त्वें होत. त्याविषयी विवेचन करतांना 'सिद्धावस्था आणि व्यवहार' या गीतारहस्यांतील प्रकरणांत ते म्हणतात, "सर्व मानवजातीचें किंबहुना प्राणिमात्राचें ज्याने हित होईल तोच धर्म हा जरी अखेरचा सिद्धान्त आहे, तरी परमावधीची ही स्थिति प्राप्त होण्यास कुलाभिमान, धर्माभिमान, देशाभिमान या चढत्या पायऱ्या असल्यामुळे त्यांची आवश्यकता केव्हाही नाहीशी होत नाही... आत्मोन्नतीची परमावधीची स्थिति प्राप्त होईपर्यंत इतर राष्ट्र व समाज यांची स्थिति ध्यानांत घेऊन साधुपुरुषांनी आपआपल्या समाजास तत्तत्कालीं श्रेयस्कर होईल असा देशाभिमानी धर्मच त्यास उपदेशिला पाहिजे. समाजसुधारणेच्या दृष्टीने पाहिले तर कुलाभिमान जें विशिष्ट कार्य करतो तें केवळ देशाभिमानाने होत नाही, आणि देशाभिमानाचें कार्य निव्वळ सर्वभूतात्मैक्य- दृष्टीने सिद्ध होत नाही." (पृ. ३९७).
खोटा वेदान्त
 नागपूरचे धुंडिराजपंत ठेंगडी यांनी टिळकांची एक आठवण दिली आहे. ते मानवतावादी होते. त्यामुळे 'स्वदेशी'ला त्यांचा विरोध होता. ते टिळकांना म्हणाले, "या चळवळीने आपण मानवजातीच्या उत्कर्षास विघ्न आणीत आहां. खुल्या व्यापाराचें तत्त्व आपणांस मान्य असूं नये हा चमत्कार आहे!" त्यावर टिळक शांतपणे म्हणाले, "होय. तुमचें म्हणणे बरोबर आहे. सर्व मानवजातीच्या दृष्टीने जेव्हा विचार कराल तेव्हा तुमचेंच म्हणणें खरें आहे; पण आज प्रथम आपणांस आपल्या देशापुरताच विचार करावयाचा आहे ना? शरीराच्या एकाच अवयवांतून रक्तस्राव होत असल्यास, बाकीच्या सर्व अवयवांकडे दुर्लक्ष करून प्रथम त्याच्याकडे लक्ष द्यावें लागतें. त्याचप्रमाणे सरकारने धुळीस मिळविलेल्या आपल्या उद्योगधंद्यांचे प्रथम संरक्षण करून नंतर त्यांची भरभराट झाल्यावर मग तुम्ही म्हणतां त्या तत्त्वज्ञानास प्रारंभ होतो. एरवी हा वेदान्त खोटा आहे व म्हणूनच स्वदेशी चळवळ केल्याखेरीज गत्यंतर नाही." ठेंगडी म्हणतात, "या उपदेशामुळे माझी समजूत पटली व तेव्हापासून मी पूर्ण स्वदेशी बनलों." (आठवणी खंड २ रा, पृ. ४५३).
पाय जमिनीवर
 जागतिक शांतता, सहजीवन, जगांतील कामगारांचें ऐक्य, सत्य, अहिंसा, अलिप्तता, विश्वराष्ट्रवाद, या उदात्त तत्त्वांची जगांत कोणती विटंबना आज होत आहे, हें सर्वांना दिसतच आहे. जे धूर्त आहेत ते मुखाने हीं तत्त्वें सतत उच्चारतात; पण राष्ट्रीय स्वार्थ साधण्याच्या हेतूनेच त्यांचा ते उपयोग करतात. जे अव्यवहारी, स्वप्नमग्न, एकांतिक असतात ते या तत्त्वांमुळे फक्त स्वदेशाचा घात करून घेतात. असे होऊ नये म्हणून टिळक अखंड सावधगिरी बाळगीत प्रतियोगी सहकारितेच्या वादांत, कलकत्त्याचे बॅ. लाहिरी टिळकांशी चर्चा करीत होते. त्यांना प्रतियोगी सहकारिता मान्य नव्हती. तेव्हा टिळक त्यांना म्हणाले, "लाहिरी, राजकारणांतहि तुम्ही व्यवहारी असले पाहिजे. आपली वास्तव परिस्थिति तुम्ही कधी विसरूं नका. उत्साह, भावना या शक्ति नेहमी आपल्या स्वाधीन असल्या पाहिजेत. त्यांच्या आहारी आपण गेलों की घात झालाच. मान सदैव ताठ असावी हें खरें; पण पाय नेहमी जमिनीवरच असले पाहिजेत." लाहिरी म्हणतात, "तेव्हापासून हा उपदेश म्हणजे माझी गीता झाली; आणि सर्व सुशिक्षित व विचारी भारतीयांचीहि तीच गीता होत आहे, असें वाटतें." (आठवणी खंड २ रा, पृ. ६२४).
 दुर्दैवाने लाहिरी यांची ही अपेक्षा खरी ठरली नाही. परराष्ट्रीय राजकारण, हिंदु-मुस्लिम संघर्ष, कम्युनिझम, समाजवाद, राष्ट्रीयीकरण या प्रत्येक बाबतींत आपण अधांतरी चालून आत्मघात करून घेत आहों.
शांत तेज
 देशबंधु दास म्हणतात, "लोकमान्य जन्माने क्रांतिकारक होते काय? मुळीच नाही. उड्डाण, भरारी हें त्यांच्या स्वभावांतच नव्हतें. दृढ, संथ पावले टाकणें, जें अल्प मिळेल तें खिशांत टाकून पुढच्यासाठी लढत राहणें, ध्येयावरची दृष्टि अचल राखून सतत तडजोडीला, समेटाला तयार असणें ही त्यांची वृत्ति होती. तुटत्या ताऱ्याची झगझग, किंवा विजेचा क्षणभरचा लखलखाट हें त्यांच्या चरित्रांत नाही. स्वयंप्रभ ताऱ्याप्रमाणे त्यांचें तेज शांत होते. ते जनतेंतून वर आले होते; आणि अखेरपर्यंत जनतेच्या बरोबर राहून तिच्या चालीनेच ते चालत राहिले. त्यामुळे त्यांचें पाऊल पडे तें निर्भयपणें व दृढनिश्चयाने पडे; आणि मग तें पाऊल प्राणांतीहि मागे घेत नसत. गीतारहस्याचा हा कर्ता कर्मयोगी होता व अखंड, अविरत कर्म हें त्याचे ब्रीदवाक्य होतें." (चित्तरंजन दास - आठवण, (सारार्थ), खंड २ रा, पृ. ६२२).
अलौकिक मुत्सद्देगिरी
 लो. टिळकांची वृत्ति अशी शांत, धीरगंभीर, दृढ व संथ असल्यामुळे, उत्साह, भावना यांच्या ते कधी आहारी जात नसल्यामुळेच ते फार मोठे राजकीय मुत्सद्दी होऊ शकले. मुत्सद्दी कधीहि भावनावश होत नाही. ध्येयावर त्याची दृष्टि अविचल असली तरी त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. विष्णुशास्त्री यांची निबंधमाला वाचूनच त्यांचे सहकारी होण्याचें टिळकांनी ठरविलें. त्यामुळे प्रारंभापासूनच इंग्रजी राज्याविषयी कडवा द्वेष त्यांच्या चित्तांत असला पाहिजे, हें उघड आहे; पण आरंभीं वीस-पंचवीस वर्षे त्यांनी त्याची वाच्यता केली नाही. इंग्रजी राज्यापासून आमचे खूप फायदे आहेत, तें येथे दीर्घकाल टिकलें पाहिजे, त्याविरुद्ध बंड करणें योग्य नव्हे, आम्ही अत्यंत राजनिष्ठ आहों, असेंच ते म्हणत, सांगत, लिहीत राहिले. मुद्दाम होऊन ते राजनिष्ठा प्रगट करीत असत; पण वंगभंगाच्या चळवळीपासून त्यांची भाषा बदलली. त्या वेळी ते सरकारवर कडक, प्रखर टीका करूं लागले. पण त्या वेळी त्यांनी इंग्रजी बादशहा व नोकरशाही म्हणजे स्टेट सेक्रेटरीपासून साध्या सार्जंटापर्यंतचे अधिकारी हा जो भेद केला त्यांत त्यांची अलौकिक मुत्सद्देगिरी दिसून आली. यामुळे त्यांना सरकारवर वाटेल ती टीका करूनहि हा राजद्रोह नव्हे, ही साधी कारभारी बदलण्याची मागणी आहे, असें म्हणतां आलें. होमरूल लीगच्या स्थापनेनंतर त्यांची बेळगाव व नगर येथे जीं व्याख्यानें झालीं तीं या दृष्टीने वाचण्याजोगी आहेत.
 ते म्हणाले, "इंग्रजी राष्ट्राच्या मदतीने, सहानुभूतीने, त्यांच्या देखरेखीखाली आम्हांस आमचें कल्याण करून घ्यावयाचें आहे ही गोष्ट खरी; पण ज्याच्या साहाय्याने ही गोष्ट घडावयाची तें सरकार अव्यक्तच आहे. परब्रह्माहून माया जशी वेगळी तसेंच अव्यक्त सरकारापासून व्यक्त सरकार हे वेगळें असतें. हें व्यक्त सरकार वेळोवेळी पालटतें. अव्यक्त सरकार आम्ही बदलूं इच्छित नाही. पण व्यक्त सरकार बदलावें असें आमचें म्हणणें आहे." अव्यक्त सरकार म्हणजे बादशहा व व्यक्त सरकार म्हणजे नोकरशाही हा भेद पुढे व्याख्यानांत त्यांनी अनेक वेळा स्पष्ट केला आहे. "पुन्हा सांगतों की, आमची तक्रार राजा, बादशहा यांच्याबद्दल नाही. मधल्या देवतांविषयी आमची तक्रार आहे... प्रधानाने राजीनामा द्यावा, असें म्हणण्यांत राजद्रोह नाही. होमरूल दिलें म्हणजे इंग्रजांचें राज्य बुडेल असें नाही. ज्या दारांतून आम्ही बाहेर जाऊं म्हणतों तेथे ब्युरॉक्रसी उभी आहे. तिला- त्या नोकरशाहीला- धक्का देऊन आम्हांला बाहेर जाणें आहे." "आम्हांला धनी चालतों, पण मधले कोठावळे (व्हाइसरॉय, गव्हर्नर, कलेक्टर इत्यादि) चालत नाहीत. ते गेले पाहिजेत व त्यांचे अधिकार लोकांना मिळाले पाहिजेत. स्वराज्य मिळविणें म्हणजे इंग्रजी सत्ता किंवा बादशाही काढून टाकणे नव्हे." १९१६ साली टिळकांच्यावर तिसऱ्याने खटला झाला; पण त्यांतून ते निर्दोष म्हणून सुटले त्याचें कारण हेंच. हा भेद हायकोर्टाच्या दोन्ही न्यायाधीशांनी मान्य केला, आणि नोकरशाहीविषयी, अप्रीति म्हणजे राजद्रोह होत नाही, असा निकाल दिला. हा सारा टिळकांच्या मुत्सद्देगिरीचा विजय होय.
स्वातंत्र्य अंतिम साध्य
 पण बादशहा व नोकरशाही या भेदापेक्षा आणखी एक निराळा सूक्ष्म भेद त्यांनी १९०७-८ सालीं मांडावयास प्रारंभ केला होता. त्यांत त्यांची खरी प्रज्ञा दिसून येते. त्यांना केवळ साम्राज्यांतील स्वराज्याचाच नव्हे, तर पूर्ण स्वातंत्र्याचा संदेश लोकांना द्यावयाचा होता. तो तर उघड राजद्रोह झाला असता; पण तोहि राजद्रोह नव्हे, हे टिळकांनी स्टेट सेक्रेटरी मोर्ले यांच्या आधारानेच दाखवून दिले. त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ असा की, स्वातंत्र्य हें आमचें अंतिम साध्य आहे. ती आमची अंतिम आकांक्षा आहे; आणि अशी अंतिम वासना कोणती तें सांगणे यांत राजद्रोह नाही. 'फेथ अँड ॲस्पिरेशन्स' हीं पीनल कोडाच्या मर्यादित येत नाहीत, असें खुद्द मोर्लेसाहेबांनीच सांगितले आहे. अंतिम हेतु साध्य करण्याचीं जीं साधनें तीं पीनल कोडाच्या मर्यादेत येतात; पण अंतिम हेतु किंवा उच्च असें अखेरचें प्राप्तव्य लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न हा कायद्यांत येणार नाही. हा महत्त्वाचा भेद आपण लक्षांत ठेवला पाहिजे. सुरत, धुळे व अकोला येथील व्याख्यानांत स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य असे शब्द वापरून त्यांनी पुनः पुन्हा हा भेद स्पष्ट केला आहे. (व्याख्यानें, पृ. ११७, २२३, २४३). अकोल्याच्या व्याख्यानांत तर, ज्याला स्वातंत्र्य हे नैसर्गिक वाटत नाही तो पशु समजावा", असें त्यांनी स्वच्छ म्हटलें आहे.
 बादशहा व नोकरशाही हा भेद आणि अंतिम प्राप्तव्य व तें साध्य करण्याचे मार्ग हा भेद- असे भेद केल्यामुळे टिळकांना अनेक वर्षे राजद्रोहाच्या पकडींत न सापडतां जनजागृति करता आली, लोकांच्यांत निर्भयता व धैर्य जोपासतां आलें व इंग्रज सरकारशी लढा करण्याची सिद्धता करतां आली. १९०८ साली त्यांना शिक्षा झाली त्या वेळीं पूर्ण स्वातंत्र्यासंबंधीचीं सर्व व्याख्यानें सरकारपुढे होती; पण खटल्यांत तीं गोविलीं गेली नव्हती. टिळक अत्याचाराला उत्तेजन देतात यावर सरकारचा सर्व भर होता; आणि ते लेख टिळकांनी लिहिलेले नव्हते. तेव्हा स्वराज्य आणि पूर्ण स्वातंत्र्य यांची प्रेरणा देऊनहि टिळकांनी ती अशा पद्धतीने दिली की, ती राजद्रोहाच्या कक्षेत येऊं नये. त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी ती हीच.
कायदा आणि नीति
 ह्या दोन भेदांप्रमाणेच कायदा व नीति ह्यांत भेद करून टिळकांनी इंग्रजी राज्यामागची सर्व पुण्याईच काढून घेतली. ते म्हणाले की, जें कायदेशीर असतें तें नीतियुक्त असतेच असे नाही. सरकारला आपल्या लहरीप्रमाणे कायदे करतां येतात. औरंगजेब तसेच करीत असे; पण तेवढ्यामुळे त्याचे कायदे जुलमी नव्हते किंवा न्याय्य होते असें ठरत नाही. तसेंच सध्याच्या सरकारचें आहे. त्यांची कृत्ये कायदे शीर असली तरी तीं जुलमी आहेत. त्यांना नीतीचा आधार नाही. म्हणूनच स्वतःचा बळी देऊनहि त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रजेला हक्क आहे.
 लो. टिळक केवढे महाप्रज्ञावंत मुत्सद्दी होते हें यावरून दिसून येईल. काव्हूर, बिस्मार्क, क्लेमेंको, फ्रँकलिन रूझवेल्ट यांचीं नांवें थोर मुत्सद्दी म्हणून आज जगांत प्रसिद्ध आहेत. चाणक्य, नाना फडणीस हीं आपल्याकडचीं नांवें अशींच प्रसिद्ध आहेत. पण ह्या थोर पुरुषांच्या पुढे जें कार्य होतें त्याच्यापेक्षा टिळकांचें कार्य फार मोठें, आणि त्यांचे कार्यक्षेत्रहि अतिशय मोठें असें होतें. एका संबंध लोकसमूहाला शेकडो वर्षांच्या निद्रेतून जागे करून त्यांना अर्वाचीन राष्ट्राचे नागरिक बनविणें हें टिळकांचें कार्य होतें आणि काहूर, बिस्मार्क यांच्यापेक्षा त्यांचा देश दसपटींनी मोठा होता. असे असूनहि तीस-चाळीस वर्षांच्या अवधीत त्यांनी त्या समूहांत फार मोठें मानसिक परिवर्तन घडवून आणले आणि राष्ट्रासाठी वाटेल त्या त्यागास सिद्ध होण्याइतकी जागृति येथे घडवून आणली. तें करतांना त्यांनी जी भाषा वापरली, जे युक्तिवाद मांडले, जें राजकीय तत्त्वज्ञान सांगितलें आणि तें ज्या पद्धतीने सांगितलें त्या सर्वांवरून त्यांची असामान्य राजकीय प्रज्ञा स्पष्ट प्रत्ययास येते. अशी ही असामान्य प्रज्ञा राष्ट्रकार्यासाठी सर्वस्वी अर्पण करणारा हा महापुरुष भारताला लाभला हें त्याचें थोर भाग्य होय.
एकमेव उद्दिष्ट
 लोकमान्यांचा वेदान्त जसा राष्ट्रार्थैकफल होता, तशीच त्यांची विद्वता, त्यांचे ज्ञान, त्यांचा व्यासंग राष्ट्रार्थैकफलच होता. त्यांच्या व्यासंगाला तोडच नव्हती, त्यांचे ज्ञानभांडार अगाध होतें, त्यांची विद्वत्ता अतुल होती; पण स्वतःच्या राष्ट्राचा उत्कर्षं हेंच त्या सर्वांचें उद्दिष्ट होतें. 'मृगशीर्ष', 'आर्यांचे मूलस्थान' हे ग्रंथ त्यांनी कशासाठी लिहिले? हिंदूंची प्राचीन संस्कृति जगांतल्या इतर कोणत्याहि संस्कृतीपेक्षा जास्त पुरातन आहे, हें सिद्ध करून या समाजाचा मरगळलेला, लुप्त झालेला, आत्मप्रत्यय जागृत करण्यासाठी! गीतारहस्य त्यांनी कशासाठी लिहिलें? निवृत्ति, कर्मसंन्यास ही या राष्ट्राला जडलेली व्याधी नष्ट करण्यासाठी. प्रवृत्तिमार्गाकडे समाजाला नेल्यावांचून राष्ट्राच्या अभ्युदयास अवश्य असलेला उद्योग त्याच्या हातून होणें शक्यच नव्हते. इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, ज्योतिष, भूगोल, खगोल, गणित, पुरातत्त्व, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, सर्व सर्व शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. जगतांतील पंडितांच्या अग्रमालिकेत त्यांना त्यामुळे स्थानहि मिळालेले आहे. पण भारतांत लोकशाहीचीं तत्त्वें प्रस्थापित करावीं, येथल्या उद्योग- धंद्यांचा, शेतीचा उत्कर्ष साधावा, येथल्या धर्माचें पुनरुज्जीवन करून 'धारणाद्धर्म' ही व्याख्या सार्थ करावी, या समाजाला विज्ञानदृष्टि द्यावी, त्याचा स्वाभिमान जागृत करावा आणि राष्ट्रतत्त्वावर त्याला संघटित करून स्वातंत्र्य हें उद्दिष्ट गाठावें हेंच त्या सर्व पांडित्यामागे एकमेव उद्दिष्ट होतें.
कला कशासाठी?
 ललितकलांकडे पाहण्याचा लोकमान्यांचा दृष्टिकोण आपण ध्यानांत घेतला, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचें हें रहस्य आपल्याला सहज कळून येईल. त्यांना ललितकलांची अभिरुचि फारशी नव्हती. एका गायनाच्या मैफलीत, त्यांचे गाण्याकडे मुळीच लक्ष नाही, हें पाहून त्यांना एका गृहस्थाने विचारलें, "महाराज, आपल्याला गाण्याची विशेष अभिरुचि फारशी दिसत नाही. एवढीच कला आपल्या हातून हस्तगत व्हावयाची कशी राहिली?" लोकमान्य म्हणाले, "भगवंताच्या मुखाने गाइलेलें गाणें (भगवद्गीता) ऐकल्यामुळे मानवगीत मला रुचेनासें झालें." पण मानवगीत व एकंदर मानवी कला त्यांना आवडत नसल्या तरी, राष्ट्रीय जीवनांतील त्यांचें महत्त्व त्यांनी जाणलें होतें. एकदा गायकवाडवाड्यांत, गणपत्युत्सवांत भास्करबुवा बखले यांचें गायन होतें. बैठक संपल्यावर लोकमान्य त्यांना म्हणाले, "भास्करबोवा, मला जरी गाण्याची विशेष आवड व शोक नाही तरी, एके काळी आपल्या भारतवर्षात उत्कर्षाच्या शिखरास पोचलेल्या या पंचम वेदाबद्दल मला फार आदर आहे. आणि या गहन व ईश्वरदत्त कलेमध्ये आपण परिश्रमपूर्वक यश मिळविल्याबद्दल मला फार आनंद होतो व अभिमान वाटतो. मला गायनशास्त्राकडे लक्ष देण्यास मुळी कधी फुरसतच झाली नाही; पण आपले गाणे ऐकल्यानंतर या विद्येची अपूर्वता मला कांहीशी कळली."
 मास्टर कृष्णराव यांच्या या आठवणीप्रमाणेच नारायणरावांचीहि आठवण उद्बोधक आहे. एकदा विद्याहरण हें नाटक पाहण्यासाठी त्यांनी लोकमान्यांना बोलाविलें होतें. नाटक पाहून झाल्यावर बालगंधर्वांना टिळक म्हणाले, "आमच्या कृष्णाजीपंतांनी अशीच आणखी नाटके लिहिली, तर हल्लीच्या परिस्थितीला त्यांचा विशेष उपयोग होणार आहे. जर्मनीमध्ये तर एका विशिष्ट हेतूनेच हल्ली नाटके लिहिली जातात व करमणुकीबरोबर राष्ट्रास योग्य असें शिक्षण देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. आमच्या व्याख्यानास जसे ठराविक लोक येतात तसाच तुमच्या नाटकांचाहि ठराविक प्रेक्षकवर्ग आहे. म्हणून ज्ञान देण्याच्या बाबतींत त्याचीहि उपेक्षा होतां कामा नये."
आत्माविष्कार
 लो. टिळकांच्या वक्तिमत्त्वाचे वर वर्णिलेले सर्व गुणविशेष त्यांच्या बहुविध ग्रंथ- निबंध- रचनेत आणि व्याख्यानांत स्पष्टपणे दिसून येतात. वाङमयांत आत्माविष्कार होतो, असें साहित्यशास्त्रज्ञ म्हणतात. "यादृश: पुरुषस्यात्मा तादृशं संप्रभाषते", असें महाभारतांतहि म्हटलें आहे. लो. टिळकांच्या बाबतीत ते अगदी यथार्थ आहे, असें दिसून येतें. त्यांचा अगाध व्यासंग, त्यांची लालित्याची नावड, त्यांची स्थितप्रज्ञ निश्चल वृत्ति, त्यांचा संस्कृत विद्येचा व प्राचीन परंपरेचा अभिमान ह्या सर्व विशेषांचे प्रतिबिंब त्यांच्या सर्व लेखनांत स्वच्छपणे पडलेलें आहे.
ज्ञाननिष्ठा
 टिळकांचा व्यासंग फार मोठा होता, अगाध होता, असें म्हणणें म्हणजे सूर्याच्या ठायीं तेज आहे, प्रकाश आहे, असें सांगण्यासारखेच आहे; पण तरीहि सूर्याचें स्तोत्र आपण गातों, तसेंच टिळकांच्या व्यासंगाचें थोडें वर्णन करण्यास हरकत नाही. वेद, उपनिषदें, महाभारत, रामायण, स्मृति, कालिदास, भवभूति- ही संस्कृत सरस्वती तर त्यांच्या जिव्हेवर अखंड नाचत होतीच; पण आपले प्रतिपादन अर्वाचीन पद्धतीने, बुद्धीला पटवून देण्याच्या हेतूने, त्यांना करावयाचे असल्यामुळे पाश्चात्त्य विद्येतील तत्त्वज्ञान व भौतिकशास्त्रे त्यांनी आत्मसात् करून टाकली होती. गीतारहस्य लिहितांना सर्व भारतीय तत्त्ववेत्ते व संत यांच्याबरोबरच प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्यापासून कांट, शोपेनहार, बेथाम, मिल्ल, ग्रीन हे सर्व तत्त्ववेत्ते व डाल्टन, डार्विन, हेकेल, हे शास्त्रज्ञ यांच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांनी केला व त्या पायावर गीतारहस्यांतील सिद्धान्तांची उभारणी केली. 'मृगशीर्ष' व 'आर्यांचें मूलस्थान' या ग्रंथांसाठी त्यांना भूगोल, खगोल, पुरातत्त्व, पदार्थविज्ञान, गणित हीं सर्व शास्त्रे सूक्ष्मपणें अभ्यासावीं लागलीं. हें त्यांच्या जगविख्यात ग्रंथांविषयी झाले. त्यांचे केसरींतील लेख हें त्या मानाने स्फुट लेखन होतें. तें प्रासंगिक वृत्तपत्रीय लेखन होतें, पण तेंहि लेखन ज्ञानपरिपूरित असेंच आहे. त्यांना राजकीय विषयांवर लिहावयाचें होतें, इंग्रज सरकारविरुद्ध लिहावयाचें होतें; पण त्यांना प्रचारकी लेखन करावयाचें नव्हतें. तर नवें राजकीय तत्त्वज्ञान या देशाला सांगून राष्ट्रीयत्व व लोकशाही यांचा पाया घालावयाचा होता. त्यामुळे हे लेखहि त्यांनी शास्त्रीय पद्धतीने व्यासंग करूनच लिहिले. बहिष्कार हा विषय येतांच इटली, चीन, अमेरिका यांनी परकी मालावर बहिष्कार घालून आक्रमकांना कसें नमविलें हा सर्व इतिहास ते सांगतात. उद्योगधंदे, कारखाने, कापड, सूत यांच्या गिरण्या हा विषय मांडतांना वेदकाळापासून भारतांत उद्योगधंद्याची काय स्थिति होती, पाश्चात्त्य देशांत काय होती, त्यांच्या मागचे अर्थशास्त्रीय सिद्धान्त वारंवार कसे बदलत गेले, हें सांगून इंग्रजी राज्यामुळे या देशाला दारिद्र्य व अवकळा आलेली आहे, हा आपला सिद्धान्त ते मांडतात. स्थानिक स्वराज्य, ज्यूरीची पद्धति, प्लेगचे इनॉक्युलेशन- कोणताहि विषय असूं द्या. त्या त्या विषयाच्या शास्त्रज्ञांना नसेल इतकी माहिती टिळक जमा करीत; आणि बिनतोड युक्तिवाद करून प्रतिपक्षाला नामोहरम करीत. टिळकांच्या नंतर भारतीय राजकारणांत व्यासंगाची, ज्ञानष्ठेिची ही परंपरा लुप्त झाली हें दुर्दैव होय.
खंडन-मंडन
 अगाध व्यासंगाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या लेखनांत आविष्कृत होणारा दुसरा गुणविशेष म्हणजे त्यांचे खंडन-मंडन-कौशल्य आणि युक्तिवाद-नैपुण्य. 'मिल्ल आणि मोर्ले' 'अध्यक्षांचे अधिकार', 'हिंदी स्वराज्य संघ' यांसारख्या लेखांत हें नैपुण्य अगदी टिपेस गेलेलें दिसतें. मोर्ले हे त्या वेळचे स्टेट सेक्रेटरी. त्यांनी 'हिंदुस्थानावर परकी राज्य असणेच हितावह आहे" असें सांगून त्यासाठी 'प्रतिनिधिसत्ताक पद्धति' या मिल्लच्या ग्रंथाचा आधार दिला आहे. त्यावर टीका करतांना मूळ ग्रंथांतील अवतरणें देऊन टिळकांनी प्रथम हें दाखवून दिलें की, मोर्ले यांनी मिल्लचीं वाक्यें मागचा-पुढचा संदर्भ सोडून घेतली असून तीं अपुरीं व तुटकी आहेत. आणि मग मिल्लच्या सर्व प्रतिपादनाचा मथितार्थ देऊन म्हटलें आहे की, "मोर्लेसाहेबांनी आपली दिवटी मिल्लसाहेबांच्या मशालीपासून पेटवून घेतली असेल, पण त्यांचे थोर गुण त्यांच्या अंगी नसल्यामुळे, त्या दिवटींतून उजेडापेक्षा धूरच अधिक निघाला आहे." सुरतेच्या काँग्रेसच्या अधिवेशनांत टिळकांनी अध्यक्षांचा उपमर्द केला असा मवाळांनी त्यांच्यावर आरोप केला. त्याला 'अध्यक्षांचे अधिकार' या लेखत्रयींत टिळकांनी उत्तर दिलें आहे. त्यांतला पहिला मुद्दा हा की, पिता काय, गुरु काय किंवा अध्यक्ष काय, ते कल्याण-बुद्धीने वागतात तोपर्यंतच त्यांची प्रतिष्ठा असते. ते जर आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून मुलाचा, शिष्याचा वा सभाजनांचा घात करूं लागले तर त्यांची अवज्ञा वा उपमर्द करूनच त्यांचा मान राखला पाहिजे. हा मुद्दा मांडून मग टिळकांनी अर्सकिन, में, पालग्रेव्ह, ल्यूसी, डॉ. स्मिथ इत्यादि अनेक पाश्चात्त्य पंडितांच्या आधारे सर्व सभाशास्त्राचें तत्त्वज्ञानच सांगितलें आहे व आपल्यावरच्या आरोपाचें खंडन केलें आहे. 'हिंदी स्वराज्य संघ' या लेखमालेत राज्यशास्त्रांतील अनेक तत्त्वें, हिंदुस्थानचा प्राचीन राज्यकारभार, ब्रिटिश पार्लमेंटांतील रीतिरिवाज, या विषयांचा ऊहापोह करून हिंदुस्थानच्या स्वराज्याची घटना काय स्वरूपाची असावी हें सांगितलें आहे. आणि जातां जातां होमरूलच्या मागणीवर येणाऱ्या आक्षेपांचें साधार, सप्रमाण खंडन केलें आहे. 'हिंदुस्थानांतल्या प्रजेची अस्वस्थता', 'शिवाजी आणि ब्राह्मण', 'राष्ट्रीय शिक्षण' या लेखांत धीरनपाल, मॉरिसन, हिस्टॉरिकस या आक्षेपकांचा टिळकांनी जो परामर्श घेतला आहे त्यांत त्यांच्या बिनतोड युक्तिवादाचीं अशींच आणखी अनेक उदाहरणें सापडतील.
साधी सरळ टीका
 प्रतिपक्षाच्या आक्षेपांचें, आरोपांचें, त्यांच्या सिद्धान्तांचें खंडन करतांना टिळक, विष्णुशास्त्री यांच्याप्रमाणे व्याजोक्ति-वक्रोक्तीचा आश्रय करीत नाहीत किंवा भावनावेगहि प्रकट करीत नाहीत. त्यांच्या लेखणींत हे गुण नाहीत असें नाही, पण ते अपवादात्मक. आधार प्रमाणें व मुद्दे सांगतांना ते प्रतिपक्षावर साधी सरळ टीका करतात. हें म्हणणें एकतर्फी व चुकीचें आहे, हें मत निर्मूल निराधार आहे, अशास्त्रीय आहे, वेडगळ आहे, हें प्रतिपादन असमंजसपणाचें, मानभावी आहे. हें बालिश आहे, पोरकट आहे. अशी त्यांची टीका बहुधा असते. लॉर्ड सँडर्स्ट हे गव्हर्नरपदाला अयोग्य आहेत, नालायक आहेत, असें ते म्हणतात. ते फार रागावले तर 'मुंबईच्या टाइम्सचा हा बेशरमपणा' आहे, लुब्रेपणा आहे, त्याने सर्व आयुष्य श्वान-वृत्तींत घातलें आहे' अशी तीव्र टीका ते करतात. लोकांच्या मनांत इंग्रज सरकारविषयी संताप यावा, चीड यावी, द्वेष निपजावा हाच त्यांचा हेतु असतो; पण लेख लिहितांना ते स्वतः या भावनांच्या अधीन न होतां त्यांना सांगतात की, या अन्यायाचा प्रतिकार माथेफिरूपणाने केला तरी चालेल, याच्याविषयी आम्हांला त्वेष आला पाहिजे, फाशी, हद्दपारी सोसण्याचीहि आपण तयारी ठेविली पाहिजे! या प्रतिपादनांतील भाव अत्यंत जळजळीत व जहरी असा आहे, पण त्यांची भाषा तार्किक प्रतिपादनासारखी आहे. टिळकांच्या गद्य शैलीचा व वक्तृत्वशैलीचा हा फार मोठा विशेष आहे.
गद्य-दृष्टान्त
 लालित्य, सौंदर्य, यांची टिळकांना स्वभावतःच फारशी अभिरुचि नव्हती, हें मागे, गायन, नाट्य या कलांविषयीचे त्यांचे उद्गार दिले आहेत, त्यांवरून ध्यानांत येईल. भाषेच्या शृंगाराविषयी त्यांची अशीच दृष्टि होती. उपमा-दृष्टान्त ते देत, पण ते विचार समजावून देण्यापुरते. त्यांतून कांही सौंदर्य निर्माण करावें अशी त्यांची वृत्तीच नव्हती. लोकांच्या बुद्धीला आवाहन करावें, त्यांच्या बुद्धीला पटवून द्यावें एवढेंच उद्दिष्ट त्यांच्यासमोर असे. त्यामुळे पुष्कळ वेळा अध्यात्म, ज्योतिष, वैद्यक या शास्त्रांतले दृष्टान्त ते देत. बादशहा व नोकरशाही यांच्यांत भेद करतांना त्यांनी परब्रह्म आणि माया यांचा दृष्टान्त दिला आहे, हें मागे आलेच आहे. राष्ट्रीयत्वाच्या उदयास प्रारंभ कोठून होतो? राष्ट्रीय अहंकारांतून. सांख्य-मताने सर्व सृष्टीचीच निर्मिति अशी होते. मूलप्रकृतीपासून बुद्धि निर्माण झाली की तींतून पहिलें तत्त्व निर्माण होतें तें म्हणजे अहंकार! राष्ट्राचें असेंच आहे. लॉर्ड कर्झन हें व्हाइसरॉय कसे आहेत? लोकांचा सर्वनाश करण्यासाठी आलेल्या धूमकेतूसारखे. सूर्यमालेत कांही ग्रह, उपग्रह व कांही धूमकेतूहि असतात. त्याचप्रमाणे बादशहांच्या भोवती फिरणाऱ्या मुत्सद्दी मंडळांतहि कांही धूमकेतु असतात. लॉर्ड कर्झन हे अशांपैकीच एक! श्रीशिवजयंतीसारखे राष्ट्रीय उत्सव हे कांही विशिष्ट हक्क किंवा सद्यःफल मिळविण्यासाठी नसतात. राष्ट्राचें जीवित्व कायम राखण्यासाठी ते करावयाचे असतात. वैद्यकशास्त्रांतील दृष्टान्त घ्यावयाचा झाल्यास असल्या उत्सवांची गणना ताप, खोकला, दमा यांवरील औषधांत न करितां सामान्य आयुर्वर्धक किंवा शक्तिवर्धक उपायांत (टॉनिकांत) करावी लागेल. स्वराज्याची कल्पना आम्ही कांही काळ विसरलों होतों हें खरें पण अग्नीवर राख जमलेली असली तरी आंत विस्तव असतो त्याप्रमाणे स्वराज्याचें आम्हांला सतत मनांत स्मरण असतें. मोर्लेसाहेबांनी देऊ केलेल्या सुधारणा कशा आहेत? टोणग्याच्या आचळासारख्या! सर भालचंद्र चंदावरकर हे सरकारपुढे लाचार होतात याबद्दल त्यांना दोष देण्यांत अर्थ नाही. तो त्यांचा जन्मस्वभाव आहे. कोल्ह्याच्या अंगी धैर्य नाही म्हणून त्याला आपण नांवे ठेवूं काय?
पिण्डेष्वनास्था
 लोकमान्यांचे उपमा- दृष्टान्त असे प्रायः अगदी प्राकृत, गद्य व व्यवहारी असतात. बाह्योपचारांच्या बाबतींत ते स्वतः अगदी रूक्ष व कठोर असत. डोक्याला त्यांनी कधी कोणाकडून तेलहि लावून घेतलें नाही. पत्नीकडून सुद्धा. आपलें सर्व जीवन जणू त्यांनी अग्निज्वाळेवर कायम धरलेलें होतें. "एकान्तविध्वंसिषु मद्विधानां पिण्डेष्बनास्था खलु भौतिकेषु" (नाशवंत अशा या जड देहावर माझ्यासारख्यांची मुळीच आसक्ति नसते) अशी दिलीप राजाप्रमाणेच त्यांची वृत्ति होती. हीच त्यांची वृत्ति आपल्या तात्त्विक सिद्धान्ताचा देह म्हणजे जी भाषा तिच्याविषयी होती असें दिसतें. महाभारत हा या बाबतींत त्यांचा आदर्श असावा. महाभारतांत साहित्यसौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत नाही. कालिदास- भवभूति या अभिजातपंथीय कवींच्याप्रमाणे तर नाहीच, पण रामायणासारखा सुद्धा नाही. मानवी जीवनाचा आशय सांगावा, त्यावर भाष्य करावें, त्याचें तत्त्वज्ञान सांगावें, आणि अज्ञानतिमिराने अंध होऊन चाचपडत चालणाऱ्या लोकांच्या डोळ्यांना ज्ञानांजनाने दृष्टि द्यावी, त्यांच्या नेत्रांचें उन्मीलन करावें हें आपलें उद्दिष्ट असल्याचें वेद व्यासांनी सांगितलें आहे. लो. टिळकांचे तेंच उद्दिष्ट होतें. म्हणून भाषेच्या शृंगाराचा हव्यास त्यांनी धरला नाही.
गंगौघ
 लो. टिळकांनी अनेक अर्वाचीन पाश्चात्त्य विद्यांचा अभ्यास केला. शेकडो युरोपीय पंडितांचे ग्रंथ चाळले, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वा लेखनावर त्यांचा प्रभाव पडला नाही. विष्णुशास्त्री यांच्या लेखणीवरचा मेकॉले, जॉन्सन यांचा व ग्रीक-रोमन इतिहासाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आगरकरांचे मिल्ल, स्पेन्सर, कोंट हे आदर्श पंडित होते; पण टिळकांच्या मनावर प्रभाव होता तो वेद, उपनिषदें, महाभारत, रामायण, कालिदास, भवभूति, भर्तृहरि यांचा. सर्व पाश्चात्त्य विद्या त्यांना करतलामलकवत् होत्या. त्यांनी त्या पूर्ण आत्मसात् केल्या होत्या. त्यांचें सर्व राजकीय व आर्थिक तत्त्वज्ञान त्यांवरच उभें होतें. पण त्यांच्या मनांत त्यांचें रसायन झाल्यावर त्याचा जो आविष्कार होत असे, तो गंगोत्रींतून झाल्यासारखा दिसे; आणि तो सर्व ओघ गंगौघासारखा वाटे.
पूर्वसूरींची वाणी
 लोकांना त्यांना जो उपदेश करावयाचा होता तो सर्व ते या पूर्वसूरींच्या वाणींतून, वचनांतून करीत. आपण जर एकजूट केली, संघशक्ति निर्माण केली, तर इंग्रज- सरकारला आपल्याला वठणीवर आणतां येईल हें सांगतांना "तृणैरावेष्टयते रज्जुः यथा नागोपि बध्यते ।" हें वचन त्यांनी दिले आहे. तृणाची जूट होऊन दोरी झाली की त्याच तृणांनी हत्ती देखील बांधला जातो. स्वदेशी- बहिष्काराच्या चळवळीला त्यांनी 'बहिष्कारयोग' असें नांव दिलें होतें. म्हणजे हा एक धर्म आहे, असे त्यांना सांगावयाचें होतें. आणि कर्मयोगाचें अल्प आचरण जरी केलें तरी त्याचें जसें मोठें फल मिळतें तसेंच या धर्माचें आहे, हा भावार्थ "स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।" या गीतावचनाने त्यांनी सांगितला आहे. सरकाशी लढा करतांना फाशी, हद्दपारीहि सोसावी लागली तरी सोसावी हा विचार ते व्यास मुखांतून सांगतात. यदि समरमपास्य नास्ति मृत्योः भयमिति युक्तमितोन्यतः प्रयातुम् । अथ मरणमवश्यमेव जंतोः किमिति वृथा मलिनं यशः कुरुध्व । युद्ध टाळून मृत्यु चुकत असेल तर पळून जाणें युक्त ठरेल, पण मृत्यु कधी टळत नाही. मग उगीच नांवाला कलंक का लावून घेतां? भिक्षा मागणें, रडणें किंवा इतरांच्या धर्म-बुद्धीवर अवलंबून राहणें, याने राजकीय कामे होत नसतात; तर तीं ज्याने त्याने आपल्या तेजानेच साध्य केली पाहिजेत, ही नीति राष्ट्रीय सभेस सांगण्याची आता वेळ आली आहे, असें म्हणून 'राष्ट्रीय सभेच्या कामाची दिशा' या लेखांत टिळकांनी वनपर्वांतील भीमाच्या तोंडचे "न चार्यो भैक्ष्यचर्येण... यतस्व पुरुषर्षभ" हे दोन श्लोक उद्धृत केले आहेत. डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल सेल्बी यांनी, विद्यार्थ्यांनी स्वदेशीच्या चळवळींत पडूं नये, असा उपदेश चालविला होता. त्या वेळीं 'हे आमचे गुरूच नव्हत' असा प्रहार टिळकांनी केला होता, हें प्रसिद्धच आहे. "गर्वाने फुगून गेलेला, कार्याकार्य न जाणणारा, आणि दुर्मार्गाने जाणारा असा गुरु असेल तर त्याचा त्याग करणेच योग्य." या व्यास-वचनाचा आधार त्यांनी त्या वेळीं घेतला होता. होमरूलची चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारने बेझंटबाईंना अटक केली; पण त्यामुळे चळवळ उलट जास्तच फोफावली. सरकारने विष म्हणून दिलें, पण त्याचें अमृत झालें. "विषमप्यमृतं क्वचिद् भवेद् अमृतं वा विषमीश्वरेच्छया", असें कालिदासाने म्हटलेच आहे. शिवरामपंत परांजपे यांच्या 'काळ' पत्रांत फार राजद्रोही लेख येतात, अशी चहाडी मुंबईच्या 'टाइम्स'ने सरकारकडे केली. तेव्हा शिवरामपंतांची बाजू घेऊन टिळकांनी 'मराठी काळ व इंग्रजी काळ' हा प्रसिद्ध लेख लिहिला. त्यांत टाइम्स व त्यासारखे चहाडखोर लोक यांवर भर्तृहरीच्या श्लोकांच्या आधारे टिळकांनी कडक टीका केली आणि असले 'नृपांगणगतः खल' न्यायाच्या केरसुणीने अंगणांतून झाडून काढून अंगण साफ करावें, अशी सरकारला विनंती केली. ही गोष्ट १९०६ सालची. तेव्हा टिळकांनी 'विनंती' हा शब्द वापरला. पुढे १९१७ साली गव्हर्नर विलिंग्डन यांनी लष्करभरतीसाठी सभा बोलावली. त्या सभेंत टिळकांनी सांगितले की, "स्वराज्य व स्वदेश-संरक्षण यांची साखळी आम्हांला तोडतां येणार नाही" हे वाक्य उच्चारतांच गव्हर्नर- साहेबांनी त्यांच्या भाषणास बंदी केली. तेव्हा "अशा परिस्थितींत परिषद् सोडून जाण्याखेरीज कोणाहि स्वाभिमानी माणसास दुसरा मार्ग नाही" असें म्हणून टिळक सभा सोडून निघून गेले; आणि दुसऱ्या दिवशी केसरीमध्ये 'मय्यप्यास्था न चेत् त्वयि मम सुतराम्, एष राजन् गतोऽस्मि' ('हे राजा तुला माझी परवा नसेल तर मला तुझी त्याहूनहि नाही, हा मी चाललों.') या भर्तृहरीच्या वचनाने गव्हर्नर- साहेबांना सडेतोड उत्तर दिलें.
दिव्य मूलद्रव्ये
 लो. टिळकांची मूर्ति घडवितांना विधात्याने जी महाभूतसमाधि, जीं दिव्य मूलद्रव्यें निवडलीं तीं हीं अशीं होतीं. अचल ध्येयवाद, कार्येकनिष्ठा, असामान्य धैर्य, स्वयमेव मृगेंद्रता, स्थितप्रज्ञता, विद्वत्ता, व्यासंग, लोकवादी निष्ठा, निःस्सीम राष्ट्रभक्ति, पराकाष्ठेचें निर्ममत्व, पूर्ण निरंहकारी वृत्ति हीं गुणरत्ने घेऊनच त्याने त्यांचें व्यक्तिमत्त्व घडविलें होतें. त्यामुळेच तीस-चाळीस वर्षांच्या अवधींत धर्माचें पुनरुज्जीवन, स्वराज्याच्या राजनीतिशास्त्राचें प्रवर्तन, राष्ट्रीय अर्थशास्त्राची प्रस्थापना आणि सर्व सामाजिक सुधारणांची पायाभरणी करून अखिल भारतीय समाज ते जागृत व राष्ट्रतत्त्वावर संघटित करूं शकले. या अल्पावधींत त्यांनी या मरगळलेल्या समाजाला संजीवनी दिली आणि त्याला रणयज्ञाची दीक्षा देऊन भारतांत नवी सृष्टि निर्माण करण्याचें सामर्थ्य त्याला प्राप्त करून दिलें; आणि या लोकांतून जातांना "स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम्" (जो जन्मल्याने सर्व वंश महत्पदास जातो तोच पुरुष खरा जन्मास आला) हें भर्तृहरीचें वचन ते सार्थ करून गेले. लोकमान्यांच्या जन्मामुळे केवळ टिळकवंशच समुन्नतीला गेला असें नव्हे, तर सारा मानववंशच समुन्नत झाला हें सत्य भावी इतिहास भक्तीने सांगेल.




-११-

सिंहावलोकन


एक ध्येय
 विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर आणि टिळक यांच्या तत्त्वज्ञानाचें व कार्याचें येथवर विवेचन केलें. त्यावरून हें ध्यानांत येईल की या त्रिमूर्तीचें तत्त्वज्ञान हे स्वातंत्र्याचें व राष्ट्रनिर्मितीचें तत्त्वज्ञान होतें. त्या तिघांत इतर अनेक बाबतींत कितीहि मतभेद असले तरी याविषयी त्यांच्यांत मुळीच मतभेद नव्हते. तेव्हा स्वतंत्र राष्ट्राची निर्मिति हे सर्वांचेच अंतिम उद्दिष्ट असल्यामुळे त्यासाठी प्रथम या देशांत नागरिक निर्माण करणें हा उद्योग त्यांनी आरंभिला. तोपर्यंत या देशांत राजाचे प्रजाजन होते. त्यांचा राज्यकारभाराच्या धोरणाशीं, समाजाच्या उन्नतिअवनतीशीं, कसलाहि संबंध नव्हता. राष्ट्रोत्कर्षाची जबाबदारी माझ्या शिरावर आहे, ही जाणीव त्या प्रजाजनांना मुळीच नव्हती. ही जाणीव असणें हें राष्ट्राच्या नागरिकाचें पहिले लक्षण होय. ही जाणीव निर्माण होण्यासाठी भौतिक विद्येचें ज्ञान, विचारशक्ति, विचारस्वातंत्र्य, समता, बुद्धिप्रामाण्य, कार्यकारणभावाचें ज्ञान, इहवादीवृत्ति, प्रवृत्तिपरता इत्यादि गुणांची आवश्यकता असते. हें जाणूनच या तीन थोर पुरुषांनी प्रारंभापासून त्या गुणांची येथल्या प्रजाजनांत जोपासना करण्याचे यावतशक्य प्रयत्न केले.
 वर सांगितलेले जे व्यक्तिस्वातंत्र्य, समता, प्रवृत्तिपरता इत्यादि नागरिकत्वास अवश्य असणारे गुण त्यांचें प्रतिपादन या त्रिमूर्तीच्या आधी, राममोहन रॉय, दादाभाई, दादोबा पांडुरंग, म. फुले, लोकहितवादी, रानडे, दयानंद इ. जे थोर पुरुष भारतांत होऊन गेले यांनी केलेंच होते. मग या त्रिमूर्तीचें वैशिष्ट्य काय? प्रारंभी विषय-प्रवेश करतांना, त्या थोर नेत्यांनी वैचारिक क्रान्तीची पायाभरणी कशी केली होती, हें स्पष्ट केलें आहे. त्यावरून नागरित्वास अवश्य त्या गुणांची जोपासना ते करीत होते, यांत शंकाच नाही. मग त्यांचेच कार्य या त्रिमूर्तीने पुढे चालविलें का स्वतःची कांही निराळी भर त्यांत घातली, निराळा पंथ, निराळी परंपरा, निर्माण केली, असा प्रश्न येतो. येथवर केलेलें विवेचन ध्यानीं घेतलें तर या त्रिमूर्तीने स्वतःची निराळी परंपरा निर्माण करून कालप्रवाह बदलून टाकला हे सहज लक्षांत येईल.

स्वावलंबन
 स्वावलंबन हा या निराळ्या परंपरेचा पहिला विशेष होय. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादि सर्व क्षेत्रांत आपल्या उत्कर्षाचे प्रयत्न आपणच केले पाहिजेत, इंग्रज सरकार, इंग्रज अधिकारी, इंग्रज पंडित, येथे आलेले पाश्चात्त्य मिशनरी यांचें या बाबतींत कसलेंहि साह्य होणार नाही, असा त्यांचा निश्चित सिद्धान्त होता. आधीच्या थोर नेत्यांची धारणा बरोबर याच्या उलट होती. ते इंग्रजांना गुरु मानीत असत. त्यांचें राज्य हें ईश्वरी वरदान आहे, असें त्यांना वाटे; आणि सर्व क्षेत्रांत ते आपल्या या अजाण देशाला हातीं धरून चालवितील, अशी त्यांची श्रद्धा होती. येथे जुलूम होतो, अन्याय होतो हें त्यांना दिसत होतें. तसें ते बोलूनहि दाखवीत; पण इंग्लंडमध्ये जाऊन, तेथे राहणारे भारताचे जे खरे राज्यकर्ते त्यांना गाऱ्हाणी सांगितलीं, येथल्या परिस्थितीची कल्पना दिली, की ते या सर्व गैर प्रकाराला आळा घालतील, असें त्यांना वाटे. या त्रिमूर्तीची मात्र अशी निश्चिति होती की इंग्रज लोक हे पूर्ण स्वार्थी आहेत, या देशाची लूट करणें यापलीकडे त्यांचा दुसरा कोणताहि हेतु नाही आणि या देशाच्या हिताची जी जी गोष्ट असेल तिच्यावर बिब्बा घातल्याखेरीज ते मुळीच राहणार नाहीत. म्हणूनच विष्णुशास्त्री यांनी जाहिरपणे लोकांना सांगून टाकलें की, "इंग्रज येथे आले नसते तर, इतकेंच नव्हे तर इंग्रज जगांतच नसते तरी, आमचें कांही अहिंत झालें असतें असें नाही!"
 अर्थात् स्वावलंबनाखेरीज तरणोपाय नाही हें ओघानेच आलें. काँग्रेसचे मूळ प्रवर्तक जे ह्यूमसाहेब ते स्वदेशी परत जावयास निघाले तेव्हा येथल्या नेत्यांची काय अवस्था झाली हें मागे वर्णिलेच आहे. यापुढे काँग्रेस इंग्लंडमध्ये भरवावी असा त्यांनी चक्क ठराव केला! यावरून ते किती परावलंबी, किती आत्मप्रत्ययशून्य होते हे ध्यानांत येईल. अशा वृत्तीतून नागरिक कसे निर्माण होणार? राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारी जी संस्था तिची जबाबदारी अंगावर घेण्यास जो कचरतो तो नागरिक कसला? तो सर्व उत्कर्षापकर्षाची जबाबदारी कशी घेणार? या परावलंबी वृत्तीचा आगरकर-टिळकांना संताप आला आणि त्यांनी तिचा कडक शब्दांत निषेध केला, यांतच त्यांचें वैशिष्ट्य दिसून येतें.
 असली परावलंबी, आत्मप्रत्ययशून्य वृत्ति नष्ट व्हावी, आणि प्रत्येक बाबतींत येथला समाज स्वावलंबी व्हावा यासाठीच या त्रिमूर्तीने राष्ट्रीय शिक्षणाचा अट्टाहास चालविला होता. सरकारी नोकरी सोडून देऊन विष्णुशास्त्री यांनी पहिला उद्योग हातीं घेतला तो हाच. 'राष्ट्रीय शिक्षण!' आणि राष्ट्रनिर्मितीसाठी त्याची किती आवश्यकता आहे हें पूर्णपणे जाणल्यामुळेच टिळक व आगरकर त्यांना तत्काळ येऊन मिळाले. इंग्रज सरकारने शाळा स्थापिल्या होत्या. विद्यापीठांचीहि स्थापना केली होती. शिक्षणाचा प्रसारहि चालविला होता; पण शिक्षणक्षेत्रांतलें हें परावलंबन त्रिमूर्तीला मुळीच मान्य नव्हतें. कारण त्या शाळांतून सरकारी शिक्षक स्वत्वशून्य शिक्षणच देणार. म्हणून याहि क्षेत्रांत आपण पूर्ण स्वावलंबी झालें पाहिजे, अशा निर्धाराने त्यांनी 'न्यू इंग्लिश स्कूल' या पूर्ण राष्ट्रीय व स्वतंत्र शाळेची स्थापना केली. लो. टिळकांनी अखेरपर्यंत राष्ट्रीय शिक्षणाचा आग्रह का धरला होता, स्वदेशी- बहिष्काराइतकेंच राष्ट्रीय शिक्षण महत्त्वाचें आहे, स्वराज्याचा तो पायाच आहे, असें तें का म्हणत, हें यावरून ध्यानांत येईल.
 आर्थिक क्षेत्रांतील स्वावलंबनाचा तर प्रश्नच नव्हता. इंग्रज सरकार या देशाचा, येथल्या कष्टकरी जनतेचा रक्तशोष करीत आहे हा सिद्धान्त तर दादाभाईंनीच मांडला होता. संरक्षित व्यापाराचा सिद्धान्त न्यायमूर्ति रानडे यांनी मांडला होता. पण असे असूनहि स्वदेशी- बहिष्काराला त्यांनी कधी पाठिंबा दिला नाही. १८७५ सालापासून सार्वजनिक काका स्वदेशीचा पुरस्कार व आचार करीत होते. बहिष्काराचा मार्ग टिळक, केसरी-मराठ्याच्या प्रारंभापासून सांगत होते, पण न्यायमूर्तीना तो कधी पटला नाही. उलट परदेशी भांडवलाचे ते गोडवे गात. तें भांडवल येथून लुटून नेलेल्या पैशांतूनच येत असे. पण ती लूट आहे, हेंच न्यायमूर्तीना मान्य नव्हतें. त्या भांडवलासाठी आपण ब्रिटिश भांडवलदारांचें ऋणी असले पाहिजे असें ते म्हणत. उलट समाईक भांडवल उभारून आपले कारखाने आपण काढले पाहिजेत, आपला व्यापार आपण हातीं घेतला पाहिजे, असें टिळक-आगरकर प्रारंभापासून प्रतिपादित होतें. त्रिमूर्तीची स्वावलंबी वृत्ति ती हीच होय. ब्रिटिश हे या देशाचे शत्रु आहेत, आपल्या मालाची बाजारपेठ म्हणून तें हिंदुस्थानकडे पाहतात, ते एकवेळ राज्य सोडतील पण व्यापार सोडणार नाहीत, हें त्यांनी पक्केपणीं जाणलें असल्यामुळेच त्यांनी तिचा अवलंब व पुरस्कार चालविला होता.
 राजकीय क्षेत्रांतील स्वावलंबन हा तर त्रिमूर्तीच्या कार्याचा प्राणच होता. विष्णुशास्त्री लवकर कालवश झाले म्हणून त्यांना आपलें तत्त्वज्ञान सविस्तर मांडतां आले नाही. पण त्यांच्या सर्व लिखाणाचा आत्मा तोच होता. अमेरिकेत क्रान्ति झाली तशी येथे होईल, असें जॉनसनच्या चरित्रांत त्यांनी सूचित केलेच होतें. आगरकरांचे राजकीय विचार हळूहळू याच वळणावर येत होते. टिळकांच्या स्वराज्याच्या राजनीति शास्त्राची सविस्तर चर्चा आपण केलीच आहे. स्वदेशी, बहिष्कार, साराबंदी, करबंदी हे स्वावलंबनाचे सर्व मार्ग नवा पक्ष स्थापितांना त्यांनी विवरून सांगितले होते.
सर्वस्वत्याग
 अशा तऱ्हेच्या स्वावलंबनामागोमाग ध्येयासाठी सर्वस्वत्याग हा ओघानेच येतो. तो अपरिहार्यच असतो. असा त्याग करण्याची अगदी नवी परंपरा या देशांत केसरीच्या त्रिमूर्तीनेच निर्माण केली. त्या आधीचे नेते थोर होते, ज्ञाते होते; पण त्यांची देशसेवा फावल्या वेळांतली होती. आपापली नोकरी-व्यवसाय संभाळून ते देशसेवा करीत. तेंहि कार्य फार मोठें होतें यांत शंका नाही. पण स्वराज्य-स्वातंत्र्य हें ध्येय तेवढ्याने साधणे कधीच शक्य नव्हते. एवढेच नव्हे तर सरकारशीं विरोध येताच ती देशसेवाहि संपुष्टांत येत असे. काँग्रेसची सेवा की सरकारची सेवा- म्हणजे नोकरी– असा प्रश्न उभा राहताच त्या पुरुषांनी सरकारची सेवा ठेवली व कांग्रेस सोडून दिली; आणि विष्णुशास्त्री यांनी नोकरी सोडून राष्ट्रसेवेचें व्रत घेतलें. आधीचे नेते व त्रिमूर्ति यांच्यांत हा फार मोठा फरक होता.
 राजकारणासाठी तुरुंगवास पत्करावयाचा ही वृत्तीच या देशांत पूर्वी नव्हती. कोल्हापूरच्या वर्गांचें प्रकरण उद्भवलें आणि आगरकर-टिळक यांच्यावर खटला झाला. तेव्हा, हा घरचें खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचा उद्योग या लोकांना कोणी सांगितला होता, असेंच लोक म्हणू लागले. १९८७ साली टिळकांच्यावर राजद्रोहाचा पहिला खटला झाला त्या वेळी त्यांना लोक असाच सल्ला देऊं लागले. हा नसता उद्योग कशाला? राष्ट्राचें कार्य हें आपले कार्य ही भावना येथे अभावानेच कशी होती हे त्यावरून दिसून येईल. येथे सर्व प्रजाजन होते, लोक अजून नागरिक झाले नव्हते हाच याचा अर्थ आहे. स्वराज्याची चळवळ हा त्यांना नसता उद्योग वाटत होता. अशा या समाजांतून त्रिमूर्तीला राष्ट्र निर्माण करावयाचें होतें. म्हणूनच राष्ट्रासाठी सर्वस्वत्याग, अंतीं प्राणत्यागहि, केला पाहिजे ही वृत्ति त्यांनी स्वतःच्या उदाहरणानेच निर्माण केली. विष्णुशास्त्री एक पाय तुरुंगांत ठेवूनच नेहमी लिहीत असत. आगरकर त्याच वृत्तीचे होते. त्यांना अकाली मृत्यु आला यामुळे त्यांच्यावर तुरुंगवासाचा प्रसंग आला नाही. नाही तर टिळकांच्या प्रमाणेच त्यांच्यावरहि राजद्रोहाचे खटले झाले असते यांत शंका नाही. त्यांच्या राजकीय व आर्थिक विषयांवरच्या लेखांचे स्वरूप तसेंच होते. टिळकांनी सर्वस्व त्याग कसा केला याचें सविस्तर वर्णन करण्याची गरजच नाही. मागे सांगितल्याप्रमाणे कालपुरुषाची चेष्टा करीतच ते आपले राजकारण चालवीत होते. पुढे सत्याग्रहाच्या व असहकारितेच्या चळवळींत हजारो, लाखो लोक तुरुंगांत गेले त्यांना ही नागरिकत्वाची प्रेरणा या त्रिमूर्तीच्या त्यागाच्या परंपरेंतूनच मिळाली होती.
राष्ट्रीय अहंकार
 राष्ट्रीय अहंकाराचा परिपोष हें त्रिमूर्तीच्या कार्याचें तिसरें वैशिष्ट्य होय. प्राचीन परंपरेचा तीव्र अभिमान जागृत करून या अहंकाराचा परिपोष त्यांनी केला. त्रिमूर्तीच्या आधीच्या नेत्यांना भारताच्या प्राचीन परंपरेचा अभिमान नव्हता असें नाही. पण सर्वस्वार्पणास सिद्ध होण्याची प्रेरणा देण्याइतका तो प्रखर नव्हता, आणि असणें शक्यहि नव्हतें. इंग्रजांना ते गुरु मानीत, त्यांचें राज्य म्हणजे परमेश्वरी योजना अशी श्रद्धा ते जोपाशीत. तेव्हा त्यांचा हा अभिमान कांही झालें तरी राष्ट्रीय अहंकाराच्या परिपोषाला अवश्य तितका तेजस्वी असणें शक्यच नव्हतें. विष्णुशास्त्री यांनी नवयुग निर्माण केलें तें त्या अभिमानाचा निखारा फुलवून केलें. साधी स्वभाषेची गोष्ट पाहा. त्यांच्या आधीच्या थोर नेत्यांनी आपले सर्व वक्तृत्व व लेखन इंग्रजीत केलें. मराठी भाषेचा विकास आणि राष्ट्रीयत्वाचा विकास यांत अद्वैतसंबंध आहे, हे त्यांनी मानले नाही. त्यांतल्या कांहींनी मराठीत लेखनहि केलें. नाही असें नाही; पण मराठींत वाग्वैभव निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्नहि केला नाही. तीच गोष्ट स्वधर्माची. त्यांनाहि धर्माभिमान होता; पण मिशनऱ्यांना वैरी मानावें, त्यांना शत्रु लेखावें व त्यांचा पाडावा करावा हें धोरण त्यांनी अंगीकारलें नाही. उलट त्यांनाहि ते गुरुस्थानी मानीत. आणि आपल्या पूजा-प्रार्थना ख्रिस्ती वळणावर नेत. यामुळे जनतेच्या अस्मितेला तेज चढण्याऐवजी ती म्लानच होत असे. आमच्या धर्मांत दोष नाहीत, असें त्रिमूर्तीपैकी कोणीच म्हणत नसे. अनेक धार्मिक रूढींवर त्या सर्वांनी विष्णुशास्त्री व टिळक यांनी सुद्धा- टीका केली आहे. पण दादोबा पांडुरंग, लोकहितवादी यांनी केलेली टीका व ही टीका यांत महदंतर होते. त्रिमूर्तीच्या टीकेत स्वत्व-जागृतीचें अवधान असें. आगरकरांनी हिंदु धर्मावर अति कडक टीका केली. पण ती सर्व आचारधर्मावर, तत्त्वज्ञानावर नव्हे. प्राचीन परंपरेच्या अभिमान्यांवरहि त्यांनी टीका केली; पण स्वतः कर्तृत्वशून्य राहून नुसती तशी वटवट करणाऱ्यांवर ती टीका होती. या दृष्टीने पाहिलें तर आगरकरांना विष्णुशास्त्री व टिळक यांच्याइतकाच स्वत्वाभिमान होता असे दिसून येईल. फरक पडत असे तो आवेशांत आणि भर देण्यांत.
 नागरिकत्वाच्या गुणांची जोपासना करूनहि सर्व नागरिकांच्या ठायीं राष्ट्रीय अहंकाराचा पोष झाला नसता तर ते गुण निर्माल्यवत् झाले असते. राष्ट्रीय अस्मितेचें हें महत्त्व त्रिमूर्तीने बरोबर जाणलें होतें म्हणूनच त्या ध्रुवताऱ्यावरून त्यांनी आपलें लक्ष केव्हाहि विचलित होऊं दिलें नाही.
मूळ गाभा एकच
 राष्ट्रनिर्मितीसाठी ह्या तीन थोर पुरुषांनी जें तत्त्वज्ञान सिद्ध केलें होतें. त्या विषयी त्यांच्यांत फारसे मतभेद नव्हतें. त्यांच्यांत भेद होते ते अग्रक्रमाविषयी होते, कमीजास्त भर कशावर द्यावयाचा याविषयी होते; आणि प्रत्येकाचा आपापले प्रतिपादन करण्याचा आवेश भिन्न होता; पण राष्ट्रनिर्मितीचे जे मूलसिद्धान्त, त्यांचा जो गाभा त्याविषयी त्यांच्यांत मतभेद नव्हते.
 निवृत्तीमुळे या देशाचा अधःपात झाला असून प्रवृत्तिवाचून त्याचा उत्कर्ष साधणार नाही याविषयी त्रिमूर्तीपैकी कोणालाच शंका नव्हती. संपत्ति, षड्रिपु याविषयी विष्णुशास्त्री यांचीं मतें पूर्णपणे इहवादी, प्रवृत्तिवादी होती, हें मागे आपण पाहिलेच आहे. आपला व्यापार वाढला पाहिजे, कारखानदारी वाढली पाहिजे, त्यासाठी भौतिक शास्त्रांची उपासना आपण केली पाहिजे, हा तर टिळक-आगरकरांच्या राजकारणाचा कणाच होता. युरोपांत चौदाव्या शतकांत ग्रीक विद्येचें पुनरुज्जीवन झालें. त्याआधी व्यापार, सावकारी यांविषयी कॅथलिक धर्मीयांत तुच्छ बुद्धि होती. लूथर, काल्व्हिन यांनी ती नष्ट करून या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तेंच कार्य हिंदुस्थानांत त्रिमूर्तीने केलेले आहे. वैराग्य, विषयसुखाची निंदा या धार्मिक वृत्तीवर आगरकरांनी किती प्रखर टीका केली आहे तें आपण पाहिलें आहे. टिळक याविषयी अशा आवेशाने लिहीत नाहीत; पण हजारो वर्षे प्रतिष्ठा लाभलेल्या आचार्यांच्यावर, त्यांच्या निवृत्तिवादासाठी, संन्यासवादासाठी, टीका करून त्यांना त्यांनी भारतीय जनमानसांतून स्थानभ्रष्ट केलें हें प्रसिद्धच आहे.
 मनुष्यतेचें ऐहिक सुखवर्धन हा आगरकरांना खरा धर्म वाटे. टिळकांचें तेंच मत होतें. साखरेबुवा जेव्हा ज्ञानेश्वर- शंकराचार्य यांच्या अध्यात्माबरोबर स्वराज्याविषयी बोलण्याचें नाकारू लागले तेव्हा टिळक त्यांना म्हणाले, 'तुमच्या 'ब्रह्मसत्यं जगन् मिथ्या' या प्रवचनामुळे पारतंत्र्यांत, दारिद्र्यांत होरपळणाऱ्या गरीब प्रजेला थोडा तरी गारवा मिळणार आहे, काय?' याचा भावार्थ हाच अर्थ आहे. ऐहिक सुखवर्धनाशिवाय सर्व अध्यात्मज्ञान व्यर्थ आहे. देव व देश अभिन्न आहेत, असें ते सांगत तें याच अर्थाने.
 जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता या रूढींविषयी सर्वांची वृत्ति अशीच सारखी होती. आगरकरांच्या भावना याविषयी अत्यंत तीव्र होत्या. वर्णसंकर हा धर्मोत्कर्ष होय, असे ते म्हणत. विष्णुशास्त्री किंवा टिळक या टोकाला कधीच गेले नाहीत; पण जातींची किंवा अस्पृश्यतेची विषमता त्यांना मुळीच मान्य नव्हती. अठरा पगड जातींची एक मूस झाली पाहिजे, असें विष्णुशास्त्री म्हणत. शिक्षण, व्यवसाय, राजकारण, अर्थकारण या प्रत्येक क्षेत्रांत सर्व जातींना समसंधि मिळाली पाहिजे, जातिभेदामुळेच आमचा नाश झाला आहे हें टिळकांचें नित्याचें प्रतिपादन असे. यापुढे जें कांही करावयाचें तें सर्व जातींसाठी, सर्व वर्णांसाठी, सर्व पंथीय, धर्मीय, प्रांतीय यांसाठी केलें पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता.
सामुदायिक ध्येय
 राजकीय व सामाजिक सुधारणांच्या अग्रक्रमाविषयी असाच प्रकार होता. मागे हें सांगितलेंच आहे की, टिळकांच्या राजकीय सुधारणांत म्हणजे स्वराज्याच्या चळवळींत सर्व सामाजिक सुधारणांचा अंतर्भाव होत होता. अनेक शतके दारिद्र्य, अज्ञान, लाचारी, दैववाद, त्यांत बुडून राहिलेल्या भारतीय सामान्य माणसाला, अत्यंत बलाढ्य अशा परकीय राजसत्तेचा प्रतिकार करण्यास उद्युक्त करण्यासाठी त्याच्या मनांत केवढी क्रांति घडविणें अवश्य होते याची जर आपल्याला कल्पना असेल तर या राजकीय कार्यात सर्व सामाजिक सुधारणांचा पाया घातला जातो, हें आपल्याला मान्य होईल. जातिभेद, अस्पृश्यता, विषमता, स्त्री-दास्य या रूढींची पाळेंमुळे समाज-मनांत फार खोल जाऊन रूतून बसलेली होती. तीं खणून काढण्यासाठी नुसतें तार्किक प्रतिपादन पुरे पडणार नाही, असें टिळकांचें मत होतें. समाजापुढे कांही फार मोठें सामुदायिक ध्येय ठेवलें व त्या ध्येयाच्या आड या रूढि येत आहेत, हें समाजाला दाखविलें तर या रूढींचा त्याग करणें अवश्य आहे हें त्याला पटेल व मग सामाजिक सुधारणा करण्यास अवश्य तें मानसिक सामर्थ्य त्याला प्राप्त होईल, असा त्यांचा हिशेब होता. आणि यासाठीच स्वराज्य हें उदात्त ध्येय डोळयांपुढे ठेवून त्यासाठी चालू केलेल्या स्वदेशी- बहिष्कारादि चळवळींत समाजाला सामील करून घ्यावयाचें असे धोरण त्यांनी आखलें होतें. महाभारतांत म्हटलें आहे की, हत्तीच्या पावलांत सर्व इतर प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो त्याचप्रमाणे राजधर्मांत सर्व धर्मांचा समावेश होतो. टिळकांचें हेंच तत्त्व होतें. राजकीय सुधारणा करतां करतांच त्यांतूनच, सामाजिक सुधारणेस अवश्य ती मानसिक शक्ति समाजाला लाभेल, अशी त्यांची निश्चित होती.
अगोदर जगणें
 मौज अशी की, राजकीय सुधारणांचें महत्त्व जास्त आहे, त्यांनाच अग्रस्थान दिले पाहिजे हा विचार टिळकांच्याइतक्याच आग्रहाने व निःसंदिग्धपणे आगारकरांनी.'फेरजमाबंदी व लष्करी खर्च' या 'सुधारकां'तील लेखांत मांडला आहे. ते म्हणतात, "जशा सामाजिक सुधारणा अवश्य आहेत तशा राजकीय सुधारणाहि अवश्य आहेत. किंबहुना सामाजिक सुधारणापेक्षाहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत, म्हणून राजकीय सुधारणा सामाजिक सुधारणांच्या आधी झाल्या पाहिजेत." या लेखांत एवढेच सांगून आगरकर थांबले नाहीत. सरकार सामाजिक सुधारणांचे महत्त्व जास्त आहे, असें सांगून आमची फसवणूक करीत आहे, अशी टीकाहि त्यांनी केली आहे. यानंतर राजकीय सुधारणांचे महत्त्व पुन्हा विशद करतांना ते म्हणतात, "अगोदर जगणें आणि मग चांगल्या रीतीने जगणें. चैतन्य रक्षण झाल्यावांचून तें (जीवन) सुखाने घालवितां येणें अशक्य आहे. विशिष्ट प्रकारच्या राजकीय व्यवस्था समाजाच्या अस्तित्वाला आवश्यक आहेत. म्हणजे त्या नसल्या तर समाजाची वाताहात होते. सामाजिक सुधारणांची गोष्ट तशी नाही. त्या समाजास शोभा देतात, किंवा विशिष्ट प्रकारचा आनंद निर्माण करतात. तेव्हा त्या मागून झाल्या तरी चालतील. जातिभेद, बालविवाह, असंतम वैधव्य, केशवपन, वगैरे दुष्ट चालीपासून आम्हांस पुष्कळ त्रास होत आहे. पण मिठावरील कर, रेव्हिन्यू सर्व्हेचा फेरा, लष्करी खातें, यांपासून जो त्रास होत आहे त्यापुढे वरील त्रास कांहीच नाही म्हटलें तरी चालेल. आजच्या व पुढच्या विधवांचे वैधव्य-दुःख एकत्र केलें तरी साठ लक्ष मनुष्यें अन्नान्न करून मेली त्यांच्या दुःखाबरोबर तें येणार नाही, अशी आमची खातरी आहे." (निबंधसंग्रह, भाग ३ रा, पृ. ११५-१६ उतारा: 'आधुनिक भारत'- आचार्य जावडेकर, पृ. १५१).
अद्वैत
 लो. टिळक तरी यापेक्षा निराळें काय म्हणत होते? तेव्हा सामाजिक व राजकीय सुधारणांच्या आवश्यकतेविषयी, इतकेंच नव्हे तर त्यांच्या अग्रक्रमाविषयीहि टिळक-आगकरांत मूलतः मतभेद नव्हतें, हें आपण ध्यानांत घेतलें पाहिजे. तत्कालीन परिस्थिति, कांही स्वभाव-गुण, त्या सुधारणांचे मार्ग, त्यांच्या मर्यादा यांमुळे त्या काळीं संघर्ष झाला. तो सर्व विसरून त्रिमूर्ति ही एकजीव त्रिमूर्ति होती, हें ध्यानीं घेऊन त्यांच्या प्रकृति निराळ्या असल्या तरी, त्रिगुणातीत होऊन आपण त्यांचे अद्वैतच लक्षांत घेतलें पाहिजे.
 विष्णुशास्त्री यांनी भारतांत राष्ट्रीय अहंकार, राष्ट्रीय अस्मिता जागृत केली. या जाणिवेवांचून कोणतीहि नवी सष्टि निर्माण होत नाही. एकंदर, विश्वरचनेंतहि प्रथम अहंकार- म्हणजे मी पृथक् आहे, स्वतंत्र आहे, श्रेष्ठ आहे, अनन्यसामान्य आहे ही जाणीव स्फुरावी लागते. जें एकंदर विश्वरचनेंत आहे तेंच मानवी सृष्टींत आहे. कोणताहि समाज, कोणतेंहि राष्ट्र, कोणतीहि संस्था यांच्या निर्मितीसाठी, ही पृथक्त्वाची जाणीव अवश्य असते. म्हणूनच ही जाणीव, हा अहंकार भारतीयांच्या ठायीं जागृत करण्यास विष्णुशास्त्री यांनी प्रारंभ केला.
व्यक्तित्व आणि संघटना
 हा अहंकार हा राष्ट्ररचनेचा पाया होय. त्यावर मंदिर उभारण्यापूर्वीचं विष्णुशास्त्री निघून गेले; आणि टिळक-आगरकर यांच्या शिरावर ती जबाबदारी आली. त्यांनी तें कार्य कसें केलें? या अहंकारामुळे समाजांत, प्रत्येक व्यक्तीच्या ठायीं प्रथम व्यक्तित्व जागृत व्हावें लागतें. तें जागृत झालें तर व्यक्ति निर्माण झाली असें होतें; आणि अशा व्यक्तित्वसंपन्न लोकांना संघटित केलें, त्यांच्या भिन्न अहंकारांची राष्ट्रीय अहंकारांत परिणति झाली की राष्ट्र निर्माण होतें. तेव्हा अस्मिता जागृत झाल्यावर प्रथम व्यक्ति निर्माण करणें आणि मग या व्यक्तींना संघटित करणे ही दोन कार्ये राष्ट्रनिर्मितीसाठी करणें अवश्य असतें.
 यांपैकी व्यक्तिनिर्मितीवर आगरकरांनी भर दिला; आणि संघशक्तिनिर्मितीवर टिळकांनी भर दिला.
 ह्या दोन कार्यामध्ये विरोध आहे काय? मुळीच नाही. त्या दोघांच्याहि मनांत तसें नव्हतें. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतांना, समाजाचें, कुशल राहील इतकीं बंधनें ठेवली पाहिजेत असें आगरकर नेहमी म्हणत; आणि संघशक्तीचें महत्त्व प्रतिपादीत असतांना, जेथे व्यक्तिस्वातंत्र्य नाही तो समाज पशूंचा होय, असें टिळक सांगत असत. तेव्हा स्वातंत्र्य व संघटना ह्या दोन्ही बाबतींत तात्त्विक दृष्टीने मुळांतच या दोन थोर पुरुषांचा मतभेद होता असे नाही; पण असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारांत या तत्त्वांचा आचार करतांना, परस्परांच्या मर्यादांचा प्रश्न उद्भवला आणि त्यांतूनच संघर्ष निर्माण झाला.
 भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचें तें लोकशक्तीच्या साह्याने घ्यावयाचे असा टिळकांचा निश्चय होता. लोकशाहीला व्यक्तिस्वातंत्र्य अपरिहार्यच असते; पण व्यक्तींना असें स्वातंत्र्य प्राप्त झालें की त्यांची संघटना दुष्कर होऊन बसते. टिळकांना ही सतत चिंता होती. त्यांच्या डोळ्यांदेखत नवीनच स्वतंत्र झालेले लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, हे जे देश त्यांच्या लोकशाहीची परवड होत होती. उलट जपान, जर्मनी यांनी मर्यादित लोकशाहीच्या आश्रयाने स्वतःची राष्ट्रें बलसंपन्न केली हें त्यांना दिसत होते. त्यामुळे जुनीं बंधने तोडतांना आधी नव्या बंधनाची व्यवस्था केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. सामाजिक सुधारणा करतांनाहि हजार-पांचशे लोकांनी मंडळी किंवा सभा स्थापून, नवीं बंधनें स्वीकारून ती करावी, असें ते म्हणत. असे केलें नाही तर समाज विघटित होईल अशी भीति त्यांना वाटे. म्हणून एकट्या व्यक्तीने उठून कांही एकांतिक प्रतिपादन व आचार करूं नये, असें ते सांगत.
 आगरकरांची रीत याहून निराळी होती. रूढ लोकमताहून भिन्न असे कोणतेहि विचार, अत्यंत क्रान्तिकारक, अगदी ध्रुवभिन्न विचारहि प्रतिपादण्यास अर्थ आहे, त्याचाहि उपयोग आहे, असें त्यांना वाटे. त्याचप्रमाणे आचाराच्या बाबतींतहि व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, असें त्यांचे मत होतें. आणि तसे ते आवेशाने मांडीतहि.
 माझ्या मतें या दोन्ही वृत्ति, या दोन्ही रीति समाजसुधारणेला अवश्य असतात. अनेक शतके अंधधर्माचें व रूढींचें वर्चस्व असलेला समाज इतका हेकट, दुराग्रही व बधिर झालेला असतो, त्याची कातडी इतकी जाड झालेली असते की, अत्यंत तीक्ष्ण, धारदार आणि भेदक भाल्यांच्या प्राहारांवांचून त्याच्या अंतरंगापर्यंत पोचण्यास दुसरा मार्गच नसतो. म्हणूनच आगरकरांनी तसे प्रहार केले; पण अशाने सर्वच बंधनें तुटून समाज स्वैर होऊ नये म्हणून लोकसेवा करून, लोकांना सीम्य उपदेश करून, त्यांच्या कलाने घेऊन, त्यांच्यापासून फार दूर न जातां, एकदोन पावलेंच पुढे टाकून लोकमतांत हळूहळू परिवर्तन करणारा नेता हाहि अवश्य असतो. टिळकांनी हा दुसरा मार्ग स्वीकारला.
दोनच पावले
 पण या दोन्ही रीति समाजसुधारणेस अवश्य आहेत, असें टिळकांचेंहि मत असावें असें वाटतें. महात्मा गांधींचा उदय झाला व त्यांनी सत्याग्रहाची व कायदेभंगाची मोहीम सुरू केली. वास्तविक हा मार्ग टिळकांनीच १९०७ साली आखलेला होता. पण या वेळी ते महात्माजींच्या चळवळींत सामील झाले नाहीत. कां? अखिल भारतीय काँग्रेसने तसा ठराव केल्यावाचून त्या चळवळींत पडावयाचें नाही, असें त्यांनी ठरविलें होतें. कारण लोकांच्यापुढे दोनच पावलें जावयाचें असें त्यांचे धोरण होतें. पण तरीहि महात्मा गांधींनी त्या मार्गाने अवश्य जावें, असेंहि त्यांनी सांगितलें होतें. ते म्हणाले होते, "तुम्हांला या कार्यात यश येवो. जर तुम्हांला लोकांना आपल्याकडे वळवितां आलें, तर मी तुम्हांला उत्साहाने पाठिंबा देईन."
 यावरून आगरकरांच्या रीतीला, स्वतः ती स्वीकारावयाची नाही, असें निश्चित्त ठरले असूनहि, टिळकांचा मनोमन पाठिंबा असावा असें वाटतें. तेंव्हा एकाच अहंकाराची भिन्न रूपें घेऊन प्रगट झालेली ही केसरीची त्रिमूर्ति होती यांत शंका नाही.
सिंहनाद
 या ग्रंथाच्या अगदी आरंभी कैसरीच्या त्रिमूर्तीच्या आधीचे जे नेते त्यांच्या कार्याचें स्वरूप आपण पाहिलें. नंतर ग्रंथामध्ये त्रिमूर्तीच्या कार्याचे विवेचन केलें. आणि आता शेवटीं त्यांच्या कार्याचें वैशिष्ट्य काय याचा विचार केला. त्यावरून असे दिसून येईल की, पहिल्या पिढीच्या नेत्यांनी नवें तत्त्वज्ञान सांगून येथे ज्या नव्या प्रेरणा दिल्या होत्या त्यांमुळे भारतीय जीवनांत नवीं स्पंदनें, नव्या अस्फुट नादलहरी उत्पन्न होऊ लागल्या होत्या; पण गिरिशिखरें हादरून टाकील, ब्रह्मकटाह भेदून गगनाला जाऊन भिडेल असा सिंहनाद त्यांतून निर्माण होत नव्हता. तो त्रिमूर्तीच्या केसरीने भारतांत निर्माण केला. या नादाच्या प्रचंड लहरींनी पृथ्वी आणि आकाश गर्द भरून गेलें. त्या तुमुल घोषाने आंग्ल राष्ट्राच्या हृदयाचें विदारण केलें आणि भारतीय जनतेच्या मनांत नवे कंप निर्माण केले. त्या कंपांमुळे तिला नवी चित्कळा लाभली; आणि तिच्या सामर्थ्याने राष्ट्रपदवीवर आरूढ होऊन तिने स्वातंत्र्याचा लाभ करून घेतला.
 "आज भारतांत तसाच सिंहनाद आपण निर्माण करावा," अशी केसरीच्या त्रिमूर्तीची मी मनोभावें प्रार्थना करतों.