खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने/शेवगा तोडा, पाय नको
११. शेवगा तोडा, पाय नको
प्रेमचंदांची कहाणी
सात वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता; लेखाचे नाव 'नाणे निधी - शेवग्याचे झाड.' (लेख १) याच शीर्षकाची प्रेमचंदांची एक मोठी प्रसिद्ध कथा आहे. एका मोठ्या जमीनदाराचे खानदान. चार-सहा मुले, सुना, नातवंडे असे मोठे खटले. थाट सगळा देशमुखी. कामे करायची ती सारी नोकराचाकरांनी. घरच्या माणसांनी कामाला हात म्हणून लावायचा नाही. घराण्याचे नाव मोठे. त्यामुळे, सावकार दागिने गहाण ठेऊन घेऊन जमिनी लिहून घेऊन गरज पडेल त्याप्रमाणे कर्ज पुरवीत होते. सारा मोठा बारदाना चालत राहिला. कुणाला काही कमी नाही. साऱ्यांची चंगळ चाललेली. आणि कर्जाचा बोजा वाढत राहिला. एक दिवस अचानक जमीनदार मरून गेले. सावकारांचे तगादे सुरू झाले. कर्जे फेडता फेडता जमीनजुमला दागदागिने सारे धुवून गेले. राहाता जुना वाडाच काय तो राहिला. घर चालावे कसं? कामाची सवय कोणालाच नाही. सुदैवाने, कोणाला व्यसने वगैरे काही नव्हती. पण, दिवसभरात तीन वेळा घरातल्या सगळ्या लोकांसमोर काही चटणी भाकरी तरी आली पाहिजे? ती सोय व्हावी कशी? सुदैवाने, वाड्याच्या परसात शेवग्याच्या शेंगाचे एक जुने मोठे झाड होते. वर्षभर भरपूर शेंगा येत. जमीनदाराच्या पोरांनी एक युक्ती काढली. भल्या पहाटे अंधारात शेंगा तोडून बाजारात विक्रीला पाठवून द्यायच्या; काय येतील त्या पैशात ओल्या कोरड्याची होईल तशी व्यवस्था करायची असा क्रम काही दिवस चालत राहिला. वडिलांचे एक जुने स्नेही एक दिवस पाहुणे म्हणून मुक्कामाला आले. दोनतीन दिवसातच सारी परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. एवढ्या खानदानी घराची अशी अवस्था झालेली पाहून पाहुण्याला मोठे दु:ख झाले. एक दिवस सगळीकडे सामसूम आहे असे पाहून पाहुणा उठला आणि कुन्हाडीने त्याने शेवग्याचे सारे झाड मुळापासून तोडून टाकले आणि अंधारातच, तो कोणाला न सांगता सवरता निघून गेला. दुसरे दिवशी पहाटे नित्यनियमाप्रमाणे पोरे शेंगा तोडायला गेली तर सारे झाडच खाली आलेले. सगळ्या शेंगांवर फार तर आठदहा दिवस गुजराण होईल, पण नंतर उपासमारीला तोंड देणे भाग आहे, हे साऱ्यांच्या लक्षात आले. सर्वांनी मोठा आकांत केला. वडिलांचा जवळचा स्नेही म्हणून स्वागत केलेल्या पाहुण्याने असे नीच कृत्य का केले, कोणालाच कळेना. पाहुण्याच्या नावाने सगळ्यांनी शिमगा केला. अगदीच उपासमारीची वेळ आली तेव्हा सारी जनलज्जा आणि खानदानाचा मोठेपणा बाजूला ठेवून सारी माणसे झटून कामाला लागली. आणि, काही वर्षातच पुन्हा एकदा घरात लक्ष्मी नांदू लागली. पाहुण्याने शेवग्याचे झाड तोडून सर्वांना पुरुषार्थाचा मार्ग पकडण्यास भाग पाडले हे त्यांच्या लक्षात आले. सर्वांनी मनोमन पाहुण्याला धन्यवाद दिले.
कहाणीचा पर्यायी शेवट
प्रेमचंदांची कहाणी थोडक्यात अशी आहे. ज्यावेळी मी हा लेख लिहिला त्यावेळी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी वाटाघाटी चालू होत्या. उद्योगधंद्यात मंदी, निर्यात दरवर्षी अधिकाधिक घसरती, आयातीची मात्र चढती कमान अशा परिस्थितीत परकीय मदत आणि जागतिक बँकेचे कर्ज यांच्या आधाराने अर्थव्यवस्था रडतखडत चालली होती. जागतिक बँकेने कर्ज देण्याचे नाकारले तर काय होईल? सुरुवातीस मोठ्या अडचणी येतील, मोठे संकट कोसळले असे वाटेल; पण, काय सांगावे, प्रेमचंदांच्या कहाणीतील जमीनदाराच्या पोरांप्रमाणे, शेवग्याच्या झाडाचा आधार तुटला हे स्पष्ट झाले तर सारे देशवासी झटून कामाला लागतील; त्रास संकटे सोसण्यास तयार होतील; पुरुषार्थाचा मार्ग धरतील आणि त्यातून कदाचित्, देशाचे भले होईल. पण, शेवग्याचे झाड तोडायची हिम्मत कोण करेल?
प्रेमचंदांच्या कहाणीत शेवग्याच्या झाडाचा आधार सुटल्यानंतर सारे कुटुंबीय कामाला लागले, त्यांनी पुरुषार्थाची कास धरली. तशी त्यांची बुद्धी नसती तर काय झाले असते? झाड तोडल्याने घरात पुन्हा लक्ष्मी नांदू लागेल ही एक शक्यता; पण साऱ्या घराची धूळधाण होईल, सारे अन्नाला मोताद होतील हीच शक्यता अधिक. शेवग्याचा आधार तुटला हे समजल्यावर कष्टाला लागणे आणि नेटाने, कसोशीने सातत्याने प्रयत्न करत राहणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. झाड पडल्याच्या पहिल्या धक्क्यापोटी हिरीरीने कामाला लागणे हे महत्त्वाचे, पण तो निश्चय टिकवून धरणे आणि शेवटपर्यंत तडीस नेणे हे त्याहून कठीण आहे.
प्रेमचंदांच्या कहाणीतल्याप्रमाणे गोड शेवट क्वचित् कोठे पूर्वजांच्या पुण्याईमुळे घडतही असेल. आकडेवारीने पाहायचे झाले तर अशा परिस्थितीत बरबाद होऊन जाणाऱ्या घरांची संख्याच कितीतरी पटीने अधिक भरेल. देशांचा इतिहास पाहिला तर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी जिद्दीने दीर्घकाळपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याची उदाहरणे फारच कम
चैतन्याचा लखलखाट
शत्रूचा हल्ला झाला, भूकंपमहापूर अशा नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तर काही काळ संकटाच्या विक्राळतेसमोर सारे हिणकस कुंठित होते; समाजात एक नवीन बंधुभावाची, ऐक्याची लाट पसरते. लोक केवळ पैसाअडका ओतायला तयार होतात एवढेच नव्हे, तर प्राणावर धोका घेऊन रक्त सांडण्यासही तयार होतात.
१९६२ साली चीनशी युद्धाचा प्रसंग आला. गाठ बलाढ्य शत्रूशी होती. सर्वच बाबतीत आपण कमी पडत होतो. तरीदेखील हिमालयाच्या रक्षणासाठी सारा देश एकत्र झाला. बायाबापड्यांनीदेखील सैन्यातील जवानांच्या मदतीसाठी अंगावरचे दागदागिने उतरवून देऊन ढीग घातले. सुदैवाने, ती सारी लढाई २१ दिवसच चालली. चीनने आपले सैन्य एकतर्फी काढून घेतले नसते, चिनी सैन्य हिमालयातून खाली उतरून गंगायमुनेच्या खोऱ्यात उतरले असते आणि साऱ्या सीमा खरोखरच इंचाइंचाने लढवण्याची वेळ आली असती तर हिंदुस्थान देशवासियांचा उत्साह किती वर्षे टिकून राहिला असता याबद्दल मोठी शंका आहे.
किल्लारीला भूकंप झाला. मृत्यूच्या तांडवाने थैमान घातले. साऱ्या देशातून आणि जगभरातून मदतीचे पूर लोटले. साऱ्या लोकांनी ज्या तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली आणि जीवाची बाजी लावली त्याचे सर्वत्र मोठे कौतुक होऊ लागले. कौतुकाच्या शब्दांचे ध्वनीप्रतिध्वनी विरतात न विरतात तोच दगडामातीच्या ढिगाऱ्यात पडलेल्या प्रेतांच्या अंगावरचे दागिने काढून नेण्यासाठी भुरटे चोरटे हल्ले करू लागल्याच्या आणि त्यात पोलीसही सामील झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. परदेशातून मदतीच्या रूपाने आलेले कपडे, अन्नधान्याचे डबे मान्यवर पुढाऱ्यांच्या कुटुंबियांची आणि दोस्त मंडळींची शरीरे आणि घरे सजवू लागले. नेते मंडळींनी कोट्यवधींच्या माया जमा केल्याची खुलेआम चर्चा होऊ लागली. थोडक्यात, शेवग्याचे झाड तुटलेले पाहिले की प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. निराशेने आणि वैफल्याने ग्रस्त होऊन निष्क्रिय होणारेच बहुसंख्य. क्षणमात्र का होईना, तिरीमिरीने तडफेने कामाला लागणारे तुलनेने दुर्मिळ आणि पहिला उत्साह सातत्याने टिकवून ठेवून नेटाने अथक प्रयत्न चालू ठेवणारी माणसे त्याहून दुर्मिळ आणि अशा गुणवत्तेचे देशतर त्याहूनही विरळा.
कुटुंबावर, गावावर, समाजावर, जातीवर, धर्मावर, देशावर संकट कोसळताच माणसांमध्ये एका चैतन्याचा संचार होतो. त्या चैतन्याच्या भरात माणसे अद्भूत कामे करून जातात. पण, हे चैतन्य आणि त्यासाठी करायच्या कष्टांची आणि बलिदानाची तिरीमिरी अल्पजीवी असते. इस्रायली लोकांनी जवळजवळ दोन हजार वर्षे मायदेश निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि तडीस नेते. आपला म्हणून कोणता एक प्रदेश नाही आणि जगभर साऱ्या देशात ज्यू जमातीचा अवमान आणि शिरकाण होत आहे अशा परिस्थितीत ही चैतन्याची उर्मी १९ शतके टिकली, ही मोठी विशेष गोष्ट. सारा रशिया नेपोलियनने व्यापला आणि नंतर हिटलरनेही पादाक्रांत केला. लक्षावधी लोक ठार झाले. रशियावर अन्नाला मोताद होण्याची वेळ आली आणि तरीही नेपोलियन आणि हिटलर यांच्या फौजांना मागे हटवीत हटवीत रशियन सैन्याने आणि जनतेने प्रचंड शौर्याने आणि कमालीच्या चिवटपणाने झुंजत झुंजत मागे पिटाळून लावले. खुद्द राजधानी लंडन शहरावर अहोरात्र बाँबचा वर्षाव होत असताना 'देशाला देण्यासाठी माझ्याकडे रक्त, अश्रू आणि घाम याखेरीज काहीच नाही,' अशी घोषणा करणाऱ्या चर्चिलने पाच वर्षे एकाकीपणे शर्थीची झुंज दिली. आणि शेवटी विजय संपादन केला. अल्लाउद्दिन खिलजी पद्मिनीवर नजर ठेवून आहे ही जाणीव होताच सारे राजपूत वीर केसरीया बनले, स्त्रियांनी जोहार केले आणि शत्रूच्या फळ्यांमध्ये घुसून लढत लढत वीरांनी बलिदान दिले. चारी दिशांचे प्रदेश शत्रूने व्यापलेले. स्वकीयांपैकी बहुतसारेजण यवनांच्या दरबारात सामील झालेले. अशा परिस्थितीत मूठभर मावळ्यांची फौज उभी कर, कोणा देशमुखाशी सोयरीक जमव, कोणा मोऱ्याचा उच्छेद कर, अंगावर आलेल्या मुसलमान फौजांना युक्तियुक्तीने, गनिमी काव्याने त्रस्त करून सोड असा शिवाजीचा उपक्रम. ही सारी, संकट तोंडावर आले असता समाजात संचरणाऱ्या चैतन्यशक्तीचा इतिहास घडवण्यासाठी झालेल्या वापराची उदाहरणेच आहेत.
उन्माद स्थायीभाव नाही
पण, आपत्ती ओढवली असता वाटेल त्या त्यागास, बलिदानास तयार करणारे चैतन्य ही एक प्रकारची उन्मादावस्था असते; मनुष्यप्राणी आणि समाज यांच्या जीवनाचा तो स्थायीभाव असू शकत नाही. सर्वसामान्य माणसांना जगायचे असते, आयुष्याचा अनुभव घ्यायचा असतो, सुखांचा उपभोग घ्यायचा असतो; धर्म, अर्थ, काम यांबरोबरच समाज आणि मोक्ष हे पुरुषार्थही संपादन करायचे असतात. अशा सुफल आयुष्याची शक्यता जिवंत राहावी यासाठी, आवश्यक पडल्यास, संकटकाळी तो सर्व हिशेब बाजूला ठेवून स्वत:ला झोकून देण्यास तयार होतो. बेफाम उन्मत्त चैतन्याचा हा अनुभव मोठा स्फूर्तीचा स्रोत असतो. पण, असे चैतन्य आणि बलिदान ही जीवनशैली होऊ शकत नाही.
दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुतेक हुकुमशहांना आणि अनेक क्षुद्रवादी नेत्यांना आपत्कालीन चैतन्य हाच माणसांचा आणि समाजाचा सतत टिकणारा स्थायीभाव असावा असे वाटते. ज्या देशात लोकांना आपल्या राष्ट्राविषयी प्रेम अधिक, राष्ट्रासाठी त्याग करण्याची जेथे तयारी अधिक ते देश प्रगती करतात असा त्यांचा विश्वास असतो. राष्ट-प्रेमाची निर्मिती हा अशा मंडळींच्या मते देशाच्या थोरवीचा एकमेव मार्ग असतो. राष्ट्र, धर्म, जाती, इतिहास, पूर्वजांची थोरवी आणि त्याहीपेक्षा दुसऱ्या एखाद्या जाती-जमाती-राष्ट्राचा विद्वेष अशा गोष्टींच्या आधारे माणसाच्या आणि समाजाच्या अस्मितेला गोंजारले, त्यांच्या अहंकाराला जोपासले की त्यातून निर्माण होणारे चैतन्य हीच विकासाची खरी ऊर्जा अशा भावनेपोटीच इतिहासभर अनेक प्रसिद्ध पुरुषांनी राष्ट-भावनांना हाक घातली, प्रचंड युद्धे घडवून आणली, लक्षावधींच्या कत्तली केल्या, मुलुखच्या मुलुख बेचिराख केले. पण, एकालाही सतत, धीमेपणे पावलापावलाने का होईना, प्रगती करणारे समाज तयार करता आले नाहीत.
थोडक्यात, शेवग्याचे झाड कापून टाकणाऱ्या पाहुण्याने एक मोठा धोक्याचा निर्णय घेतला. प्रेमचंदांच्या कथेत शेवट गोड झाला. अशी सुखांतिका होण्याची संभाव्यता, आकडेवारीने पाहू गेले तर, फारशी नाही.
झाड तोडू नका, लागवड करा
शेवग्याच्या झाडाविषयी मी लेख लिहिला त्यावेळी ते झाड समूळ कापून टाकण्याचा उपद्व्याप कोणाला सुचला नाही. उलट, दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानामुळे राष्ट्राराष्ट्रातील सरहद्दींच्या भिंती कोसळत गेल्या, संचार आणि वाहतूक क्षेत्रातील क्रांतीमुळे सारे जग लहान होऊ लागले आहे. जागतिक व्यापारातील आणि देवघेवीतील अडथळे दूर करून सारी व्यापारी देवघेव, गुंतवणूक अधिकाधिक मुक्त असावी या विचाराला अधिकाधिक मान्यता मिळत गेली. खुलेपणास विरोध करणारी मंडळी स्वदेशी राष्ट-भावनेस गोंजारून मताचा काही लाभ घेण्याचा प्रयत्न करतात; पण 'देवेगौडा' काय आणि 'स्वदेशी जागरण मंच'वाले काय – सत्तेची जबाबदारी अंगावर येऊन पडली म्हणजे खुलेपणाचीच भाषा बोलू लागतात; जागतिक व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचीच आवश्यकता प्रतिपादन करू लागतात. थोडक्यात, शेवग्याचे झाड तोडून उत्कर्ष साधण्याची भाषा बाजूला पडली आणि त्याऐवजी 'शेवग्याची लागवड करावी, त्याच्या बियांवर प्रक्रिया करून मौल्यवान तेलाचे उत्पादन करावे आणि शेंगेच्या गराचा उपयोग औषधी कामासाठी करावा, त्यासाठी आवश्यक तर इतरेजनांकडून कर्ज घ्यावे, तंत्रज्ञान घ्यावे अशा तऱ्हेची विचारसरणी सर्वदूर सर्वमान्य होत होती.
अणुचाचण्यांची कु-हाड
आणि एका रात्रीत कोणा पाहुण्याने 'शेवग्या'ची सारी लागवड उद्ध्वस्त करण्याचा खटाटोप केला, एवढेच नव्हे तर प्रक्रियेसाठी तयार होत असलेला छोटासा उद्योग उद्ध्वस्त केला, उद्योगाच्या विकासासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देऊ करणाऱ्या शेजाऱ्यांशी भांडण उकरून काढले. प्रेमचंदांच्या कहाणीचा आधुनिक आविष्कार दोन टप्प्यात अण्वस्त्रांच्या पाच चाचण्या करून वाजपेयी शासनाने घडवून आणला!
गेल्या आठवड्यात भारताने केलेल्या अणुचाचण्यांचा अर्थ यापरता वेगळा लावणे कठीण आहे. भाजपा हा केवळ पर्यायी पक्ष नाही, ती एक वेगळी राष्ट-वादी प्रवृत्ती आहे, विचारधारा आहे असे वाजपेयींपासून त्या पक्षाचे गल्लीबोळातील नेते सातत्याने आणि उघडपणे सांगत आले आहेत. निवडणुकीनंतर देश चालवण्याची जबाबदारी येऊन पडताच अर्थशास्त्रज्ञांच्या व्याकरणात उलथापालथ करणे शक्य नाही, पावलापावलाने ‘स्वदेशी' सौम्य करत जावी लागेल, अंततोगत्वा स्वदेशीबरोबरच राष्ट-भावना मंदावत जाईल; स्वदेशी राष्ट-भावनेचे युग पुन्हा एकदा आणायचे असेल तर एकच मार्ग आहे; सर्व 'फॉरेन' वस्तूंची 'क्रेझ' असलेले हिंदुस्थानी विलायती गोष्टींचा हव्यास सोडून स्वदेशीकडे वळतील हे आता शक्य नाही, 'स्वदेशी स्वदेशी'च्या उद्घोषात प्रत्यक्ष स्वार्थ जोपासला गेला तो काही मूठभर कारखानदारी घराण्यांचा, त्यासाठी शेतकरी आणि ग्राहक यांना प्रचंड बोजा सहन करावा लागला, आता शेतकरी आणि ग्राहक सहजासहजी स्वदेशीच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत हे भाजपा आणि स्वदेशी जागरण मंच इत्यादी साऱ्या परिवारास स्पष्ट झाले. देश स्वदेशीचा स्वीकार राजीखुषीने करत नसेल तर साऱ्या जगापासून त्याला बाजूला काढण्याचा एक मार्ग आहे. ब्रह्मदेशाने जाणीवपूर्वक जगापासून दूर व्हायचे ठरवले. वाजपेयी शासनाने मोठी युक्ती लढवली. साऱ्या जगाकडून देशाला बहिष्कृत करून घेतले म्हणजे आपोआपच 'स्वदेशी' अर्थव्यवस्थेखेरीज काही पर्यायच राहात नाही. अटलबिहारींच्या अणुस्फोटाच्या पाच चाचण्या जगाला जोडणारे पूल जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करून राष्टीय भावनेच्या उद्घोषात 'स्वदेशी' कंपूचे हित साधण्याचा प्रयत्न आहे.
संशोधन तस्करांची कुर्रेबाजी
'शेवग्याचे झाड' तोडणारी कुऱ्हाड एवढाच या चाचण्यांचा खरा अर्थ आहे; अन्यथा, त्याला दुसरा काही अर्थच असू शकत नाही. अणुविस्फोट ही काही आता विज्ञानाच्या क्षेत्रातील नवलाच्या करामतीची गोष्ट राहिलेली नाही. उत्सर्गी द्रव्य पर्याप्त प्रमाणात संपादन करू शकणारा देश काय, व्यक्तिदेखील अशा तऱ्हेच्या अणुचाचण्या करू शकते. अमेरिकेतील 'टाईम'सारख्या साप्ताहिकाने सारा तांत्रिक तपशील छापून प्रसिद्ध केला, त्यालाही १० वर्षे होऊन गेली. बऱ्यापैकी प्रयोगशाळा हाताशी असलेला कोणीही विद्यार्थी घरबसल्यादेखील अशा चाचण्या करू शकतो हे सर्वमान्य आहे. किंबहुना, निव्वळ शास्त्रीय कारणासाठी अशा चाचण्या करण्यात काही अर्थ राहिला नाही. चाचण्यांचे सारे निष्कर्ष तपासून पाहाण्यासाठी गणकयंत्रातील मॉडेलच्या आधारे पडताळून घेता येतात. यातील कोणत्याही गोष्टीबद्दल मतभेद वादविवाद होऊ शकत नाहीत. आणि तरीही, भाजप शासनाने जाणीवपूर्वक, धाडसाने, काहीशा बेदरकारीने चाचण्या घडवून आणल्या हे तर स्पष्ट आहे.
चाचण्यात बहादुरी राहिली नाही
अणुशस्त्रांचे अधिकृत स्वामी पाच देश आहेत. याखेरीज, निदान डझनभर देशांना अणुस्फोट घडवण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान अवगत आहे. जर्मनी, जपान, इस्रायल या तीन देशांकडे तांत्रिक जाणकारी आहे एवढेच नव्हे तर, पाचपन्नास अणुस्फोट घडवून आणावेत इतकी त्यांची आर्थिक कुवतही आहे. जर्मनी आणि जपानसमोर कोणी शत्रुराष्ट- उभे ठाकलेले नाही, पण इस्रायलची परिस्थिती तशी नाही. सतत ५० वर्षे रक्ताची मोठी किंमत देऊन भोवतालच्या साऱ्या अरब देशांशी ते झुंज घेत आहेत. अशाही परिस्थितीत त्यांनी अणुचाचणी करणे आवश्यक मानले नाही. मग, हिंदुस्थान व पाकिस्तान याच देशांना अणुचाचण्यांची एवढी उतावळी आणि उत्साह कशासाठी? रेडिओ, दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमे यांनी एकच धुमधडाका चालवला आहे. अणुचाचण्यांनी भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिक यांची प्रगती आणि सामर्थ्य स्पष्ट केले आहे अशा कोणीही कितीही गमजा मारो, त्यात काही तथ्य नाही हे उघड आहे.
हिंदुस्थान पाकिस्तान रानवट देश
अणुचाचणीविरोधी आंतरराष्टीय करारावर भारताने सही केलेली नाही. ह्या करारामुळे जगभर पाच राष्ट-ांची अणुशक्ती क्षेत्रात मक्तेदारी तयार होईल, चाचण्यांवर बंदी घालायची असेल तर ती सर्वच राष्ट-ांनी मानली पाहिजे, राष्ट-राष्ट-ात याविषयी पंक्तिप्रपंच उपयोगाचा नाही ही भारताची भूमिका तशी तर्कशुद्ध आहे.
अण्वस्त्रांचा हक्क आणि जबाबदारी
पण, समर्थ राष्ट-ांना अणुविस्फोटासारख्या विद्ध्वंसकारी क्षेत्रात सर्व राष्ट- एकसारखी मानली जावीत हे तत्त्वच मुळात मान्य होण्यासारखे नाही. ज्या राष्ट-कडे अणुविस्फोटाची शक्ती असेल त्यांच्याकडे काही किमान स्थैर्य आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. इस्रायलने अरब राष्ट-ांविरुद्ध अणुबाँबचा प्रयोग करण्याचा मोह ५० वर्षे कटाक्षाने टाळला आहे. रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध मोठ्या गरमाहटीने चाळीस वर्षे चालले. सारी पृथ्वी पंचवीसतीस वेळा समूळ नष्ट करण्याइतकी अण्वस्त्रे दोन्ही महासत्तांकडे मौजूद होती. कितीएक संघर्षाचे प्रसंग उद्भवले. जागतिक युद्धाची ठिणगी आता उडते की काय अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली. खुश्चेवने क्यूबामधील अस्त्रे परत घेऊन एका तऱ्हेने हार स्वीकारली. व्हिएतनाममध्ये तर बलाढ्य अमेरिकन महासत्तेचा अपमानजनक पराभव झाला. पण, अशाही परिस्थितीत अण्वस्त्रांच्या नियंत्रणाचे बटण दाबण्याचा मोह महासत्तांच्या राष्ट-प्रमुखांनी टाळला. अशा तऱ्हेचा संयम आणि मुत्सद्दी सुज्ञपणा सगळ्याच राष्ट-प्रमुखांकडे असेल असे कोणीच म्हणणार नाही. इदी अमीन आणि गद्दाफी यांसारख्या राष्ट-प्रमुखांकडे अणुविस्फोटाची शक्ती राहिली तर जगाला सुखाने झोप घेणे अवघड होईल हे उघड आहे. हिंदुस्थानी, पाकिस्तानी लोकांना हे सत्य पचवणे कठीण जाईल; पण, दोन्ही देशांची गणना जबाबदार राष्ट-ात केली जात नाही. एखादे देऊळ किंवा मशीद, फार काय क्रिकेटचा सामना किंवा एखाद्या कलावंताचा कार्यक्रम या विषयावर ज्या देशातील मान्यवर नेतेही माथेफिरूसारखे बोलतात, हातात जी जी काही साधने असतील - सुरे, तलवारी, पिस्तुले, मशीनगन, स्फोटके - त्यांचा बिनदिक्कत वापर करून मुडदे पाडतात आणि त्यासंबंधी खुलेआम शेखी मिरवतात; राष्ट-, धर्म अशी नावे घेऊन आपल्या बर्बरतेचे समर्थन करतात त्या देशांना जगाने अण्वस्त्र संपादनास पात्र मानावे कोणत्या आधाराने? मशिदी पाडणारे, खेळाची मैदाने उद्ध्वस्त करणारे, मान्यवर कलावंतांना हैराण करणारे भारतीय नेते आणि धर्माचा उद्घोष आणि परधर्मीयांचा विद्वेष केल्याखेरीज ज्यांना राजकीय स्थान टिकवणे शक्य नाही अशा पाकिस्तानी नेत्यांच्या हाती अण्वस्त्रे आली तर केवळ जिद्दीपोटी - पृथ्वी बुडते का जगते याचा विचार न करता – ही मंडळी खुशाल एकमेकांवर अण्वस्त्रांचा प्रयोग करतील अशी आशंका जगाला वाटली तर त्यांना दोष देणे कठीण आहे.
राष्टीय सुरक्षेत काय फरक पडणार?
हिंदुस्थान आणि पाकिस्तान, दोन्ही देशांचे पंतप्रधान अणुस्फोटांच्या चाचणीविषयी बोलताना जवळजवळ एकच पालुपद घोळवितात. हा प्रश्न राष्ट-च्या सुरक्षेचा आहे. आम्ही निर्णय घेऊ ते आमच्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेऊ. त्यात कोणाची ढवळाढवळ सहन करणार नाही; इत्यादी इत्यादी.
अण्वस्त्रे तयार केल्यामुळे देशाची सुरक्षितता कितपत सुधारते? संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे अलिकडचे एक निवेदन 'चीन हाच आमचा सर्वात मोठा शत्रू आहे.' सोडल्यास पाकिस्तान हेच प्रमुख शत्रुराष्ट- आहे. त्याच्याशीच आतापर्यंत तीन मोठी युद्धे लढावी लागली. आजही काश्मिर, पंजाब आणि इतरत्र पाकिस्तानच्या अतिरेकी आणि घातपाती कारवायांना तोंड द्यावे लागत आहे. गेली पन्नास वर्षे हिंदुस्थान व पाकिस्तान यांच्यात एक अघोषित युद्ध सतत चालूच आहे. चीन अण्वस्त्रांच्या क्षेत्रात आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहे. पारंपरिक शस्त्रास्त्रांनी चीनशी खुलेआम युद्ध लढणेही मोठे दुष्कर होईल; अण्वस्त्रांच्या बाबतीत तर चीनशी तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. थोडक्यात, अण्वस्त्रांच्या विकासाने हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेस मजबुती येईल असे म्हणणाऱ्यांच्या मनात शत्रुराष्ट- म्हणून फक्त पाकिस्तानच असू शकते.
हिंदुस्थानी लोकांच्या डोक्यात पाकिस्तानविषयी एक अगदीच अजागळ गंड आहे. आकाराने, अर्थसामर्थ्याने आणि लष्करी तयारीत पाकिस्तान ही ताकद हिंदुस्थानच्या तुलनेत वीस टक्केसुद्धा नाही. काही आधुनिक विमाने आणि अस्त्रे यांबाबतीत प्रमाण कमी व्यस्त आहे. पण, कोणत्याही युद्धात पाकिस्तान हिंदुस्थानवर मात करू शकेल ही गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे. या परिस्थितीची पाकिस्तानी नेत्यांना चांगली जाणीव आहे. त्यामुळेच, पाकिस्तानी अंदाजपत्रक आणि अर्थव्यवस्था या दोघांवरही लष्करी खर्चाचा बोजा फार मोठा आहे. तेथील राजकारणावरही लष्कराचे प्रभुत्व सतत राहाते याचे कारण हिंदुस्थानविरुद्ध लष्करी तयारी हे त्यांच्या अंतर्गत आणि परराष्टीय धोरणांचे मुख्य सूत्र आहे.
अणुबाँब संपादन केल्यामुळे पाकिस्तानबरोबरच्या संघर्षातील परस्पर बलात काय फरक पडू शकतो? आजमितीस तरी त्यामुळे पाकिस्तानची बाजू वरचढ झालेली दिसते. आंतरराष्टीय क्षेत्रातील हिंदुस्थानची एक शांतताप्रिय लोकशाही राष्ट- म्हणून प्रतिमा आणि प्रतिष्ठा होती. इस्लामिक देशसुद्धा या प्रतिमेमुळे काही मर्यादेपलीकडे हिंदुस्थानविरोधी भूमिका घेण्यास धजत नसत. गौतमबुद्ध, महात्मा गांधींपासूनच्या या परंपरेची दोन दिवसातील पाच स्फोटांनी वासलात लावून टाकली आहे.
साऱ्या इस्लामिक देशांचाच आता पाकिस्तानवर दबाव वाढणार आहे. इस्लामी देशांच्या हाती अणुशक्ती असावी असा अनेक वर्षे तेथील जहाल हुकुमशहांचा प्रयत्न चालू आहे. अशी शस्त्रे हाती आली तर बिनदिक्कतपणे इस्रायलविरुद्ध त्यांचा उपयोग करण्यास ते कचरणार नाहीत. इस्लामी अणुबाँब हरप्रयत्नाने तयार होऊ न देणे हे पाश्चिमात्य राष्ट-ांच्या परराष्टीय धोरणाचे मोठे सूत्र आहे. मध्यपूर्वेतील, त्यातले त्यात आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेली मुस्लिम राष्ट्रे केवळ अमेरिकेच्या दबावामुळे अणुस्फोट करण्यास धजावत नाहीत. पण, गद्दाफी आणि सद्दाम हे काही फक्त दोनच माथेफिरू नेते नाहीत. 'हिंदुस्थानपासून संरक्षण करण्यासाठी बाँब तयार करणे हा आमच्या राष्टीय अस्मितेचा आणि सुरक्षेचा प्रश्न आहे' असा कांगावा करून पाकिस्तानने अणुसामर्थ्य मिळविले तर ते थोड्याच काळात साऱ्या अरब लष्करांना उपलब्ध होईल यात काही शंका नाही. पाकिस्तानी बाँब तयार होऊ नये यात पाश्चिमात्य देशांना प्रचंड स्वारस्य आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानी चाचण्यांना उत्तर म्हणून अणुस्फोट करू नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पाश्चिमात्य राष्ट्रे करतील. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला चेपण्यासाठी, पाकिस्तानने खरेदी केलेली एफ-१६ विमाने देखील अमेरिकेने कित्येक वर्षे अडवून ठेवली, एवढेच नव्हे तर खरेदीची रक्कमही गोठवून टाकली. हिंदुस्थानी अणुचाचण्यांनंतर आता ही विमाने पाकिस्तानला देण्याचे अमेरिकेने ठरविले आहे. हिंदुस्थानच्या हुंब भूमिकेचा फायदा घेऊन पाकिस्तान पारंपरिक शस्त्रास्त्रसजतेत भरगच्च मजबुती आणेल असे दिसते आहे. प्रत्युत्तर म्हणून अणुस्फोट करण्यापेक्षा अणुस्फोट करण्याची भाषा बोलत राहणे आणि त्या धमकीपोटी आधुनिकतम शस्त्रास्त्रे मिळवीत राहणे हा खेळ पाकिस्तानला मोठा फायद्याचा ठरणारा आहे. पाकिस्तानी पुढाऱ्यांचेही डोके फिरले आणि त्यांनी स्फोट केला की शस्त्रसामुग्रीच्या मदतीची ही गंगा आटून जाईल. येत्या काही काळात तरी सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापण्याचा अजागळपणा पाकिस्तान करणार नाही. कारण उघड आहे. खरोखर युद्धाचा प्रसंग उद्भवला तर अण्वस्त्रांचा तसा काहीच उपयोग नाही. हिंदुस्थान अण्वस्त्रधारी देश झाला. अण्वस्त्रांचा वापर करण्याचा आदेश देण्याचे एक बटण पंतप्रधानांच्या हाती आले तर त्याचा ते उपयोग कधी आणि कसा करू शकतील?
पाकिस्तानातून काश्मिरात घुसलेल्या आतंकवाद्यांनी पाचशेहजार हिंदुची कत्तल केली; पंतप्रधान अणुबटण दाबतील? काश्मिरमध्ये घातपात्यांच्या झुंडीच्या झुंडी पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसविल्या, स्थानिक लोकांच्या पाठिंब्यामुळे ते यावेळी श्रीनगरपर्यंत चालून आले; पंतप्रधान अणुबटण दाबतील? पाकिस्तानची विमाने अमृतसर-लुधियाना-अंबालापर्यंत बाँबवर्षाव करू लागली, पंतप्रधान अणुबटण दाबतील?
दोन्ही देशातील युद्ध एकाचा सपशेल पाडाव आणि दुसऱ्या देशाने त्याचा सर्व मुलुख व्यापणे आणि तेथे आपली सत्ता बसवणे अशा तऱ्हेने होणेच शक्य नाही. तेव्हा, अगदी निर्वाणीचा मार्ग म्हणूनदेखील युद्धप्रसंगात अणुबाँबचा काही उपयोग नाही. भाजपा सरकारला राष्टीय सुरक्षेची खरी चिंता असती तर त्यांनी अणुचाचण्या किंवा आधुनिक विमाने, तोफा यांच्या उपयोगावर आधारलेली संरक्षणनीती सोडून साऱ्या लष्कराची पुनर्रचना करण्याचे काम हाती घ्यायला पाहिजे होते. हिंदुस्थानची संरक्षण दले पूर्णत: व्यावसायिक रचनेची आहेत. युद्ध सुरू झाले की फौजा लढतात, लोक बातम्या ऐकत राहातात. ही शस्त्रास्त्रांची 'मॅच' दोनतीन आठवड्यांपलीकडे चालणार नाही याची सर्वांना खात्री असते. १८ ते २५ वयोगटातील सर्व तरुणांना सक्तीचे लष्करी शिक्षण आणि युद्धकाळात प्रत्येक तरुणास आघाडीवर जाण्यासाठी बोलावण्याची व्यवस्था आणून लष्कराची पुनर्रचना केली तर छोट्या स्वयंचलित बंदुकांच्या वापराने भारताची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत झाली असती. उत्तम स्वयंप्रेरित बंदुका हर जवानाच्या हाती देणे ही राष्टीय सुरक्षेच्या दृष्टीने अणुबाँबपेक्षा कितीतरी पटीने परिणामकारक ठरेल. पण, अणुस्फोट केल्याची घोषणा करण्यात जो थाटमाट आहे आणि राजकीय भांडवल करण्याची शक्यता आहे ती अशा घोषणेने थोडीच होणार आहे? जवान लढतात तोपर्यंत सुरक्षेची महती गाणारे आपल्या पोटच्या पोरांना किंवा स्वत:ला आघाडीवर जाण्याची वेळ येणार आहे हे समजले तरी त्यांचा सूर कायम ठेवतात काय, हे पाहाणे मोठे मनोरंजक होईल.
अणुंच्या आतषबाजीची किंमत
एका बाजूला अर्थमंत्री, व्यापारमंत्री जगभरचे दौरे करतात, परदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानात धन ओतावे, तंत्रज्ञान आणावे म्हणून विनवणी करीत फिरतात; पावसाने थोडे डोळे वटारले तर दक्षिणोत्तर चारपाचशे शेतकऱ्यांना विष पिऊन जीव देण्याखेरीज पर्याय राहात नाही. अशा देशाने, दुसऱ्या बाजूला अणुक्षेत्रातील आपली मस्ती दाखविण्यापूर्वी काही विवेक केला पाहिजे. प्रमुख श्रीमंत देशांच्या उच्छिष्टावर पिंड पोसलेल्या दरिद्री देशांच्या यादीतील हा भणंग देश, विज्ञानाच्या क्षेत्रात उगाचच काही आंग्लविद्याविभूषित संशोधनतस्करांचे अहंकार गोंजारण्यासाठी मिशीला तूप लावून फिरतो हा जागतिक कुतुहलाचा किंवा करमणुकीचा विषय राहिला आहे. पण, या माकडचेष्टा प्राणघातक मर्यादा ओलांडून पलीकडे जाऊ लागल्या तर जग त्याची गांभीर्याने दखल घेईल, आवश्यक तर बडगा दाखवेल हे सहज समजण्यासारखे आहे.
पाच अणुस्फोट घडवल्यानंतर जगातील प्रबळ राष्ट-ांनी भारताविरुद्ध आर्थिक कार्यवाही केली तर त्याबद्दल तक्रार करण्यास हिंदुस्थानला जागा नाही. इराकचा सद्दाम आणि हिंदुस्थानचे 'अटलबिहारी' यात फरक करणे कठीण आहे.
आंतरराष्टीय बहिष्काराचा धोका चाचणीचा निर्णय घेण्यापूर्वी वाजपेयी शासनाच्या लक्षात आला नव्हता असा युक्तिवाद बाष्कळपणाचा होईल. परिणामांची पुरेपूर जाणीव ठेवून घेण्यात आलेला हा निर्णय आहे. आंतरराष्ट-ीय व्यापारातील हिंदुस्थानने लादलेल्या प्रतिबंधांबद्दल जागतिक व्यापार संस्थेच्या दरबारात अनेक प्रकरणे चालू आहेत. त्यातील बहुतेकांचा निर्णय भारताच्या विरुद्ध लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या माथी दोष न घेता आर्थिक क्षेत्रात जगापासून फारकत ठेवण्याचा हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे.
आतापर्यंतच्या लक्षणांवरून तरी ही रणनीती यशस्वी आणि लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे. कोणाही विरोधी पक्षाची अणुचाचण्यांविरुद्ध 'ब्र' काढण्याची हिम्मत झालेली नाही. सर्वांनी हा मुद्दा राष्टीय सुरक्षेचा असल्यामुळे आपली सहमती दाखविली आहे. सर्वजणच देशी विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्या स्तुतिस्तोत्रपाठात सामील झाले आहेत. आजमितीस जगातील सर्व प्रमुख सातही देशांनी भारतावर व्यापार आणि मदत या दोनही क्षेत्रातील संबंध तोडण्याचे जाहीर केले आहे. याचे परिणाम निभावून नेण्याची आणि सोसण्याची भारतीय शासनाची आणि जनतेची कितपत तयारी आहे हा मुद्दा खरा महत्त्वाचा.
इराकच्या सद्दाम हुसेनने गेली १० वर्षे कठोर आंतरराष्ट-ीय आर्थिक बहिष्काराचा सामना चालवला आहे. अशा बहिष्काराला चिवटपणे तोंड देण्यासाठी लागणारी कुवत आणि नेतृत्व आपल्याकडे आहे? भारतातील अणुशक्ति संस्थाने नष्ट करण्यासाठी लष्करी कारवाईचा निर्णय संयुक्त राष्ट-संघाने घेतला तर त्याला आपण किती दिवस तोंड देऊ शकू. राष्ट-ीयत्वाच्या गर्जना आणि वल्गना वातावरणात विरून जाऊ लागल्या आणि स्वदेशी राष्ट-भावनेच्या वल्गनांचा जोश ओसरू लागला म्हणजे इराकसदृश्य परिस्थितीचा सामना आपण किती समर्थपणे करू शकू हा खरा प्रश्न आहे. सरकारी नियुक्तीने दूरदर्शनवर मुलाखती देणारे स्वयंमान्य तज्ज्ञ 'जागतिक बहिष्काराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काहीच परिणाम होणार नाही' असे बजावून बजावून सांगत आहेत. 'देशाचा जागतिक व्यापार राष्टीय उत्पादनाच्या एक टक्कासुद्धा नाही, तेव्हा बहिष्काराचा परिणाम होऊन होऊन होणार किती? पुष्कळसे देश बहिष्कारात सामील होणारच नाहीत' असा त्यांचा युक्तिवाद आहे. पण, 'जागतिक व्यापाराचे प्रमाण कमी आहे आणि जागतिक गुंतवणूक नगण्य आहे हेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या कमकुवतपणाचे कारण आहे' असे सर्व मान्यवर अर्थशास्त्रज्ञ मांडतात; व्यापार आणि गुंतवणूक वाढली तरच देशावरील आर्थिक अरिष्ट दूर होईल असे मानतात. थोडक्यात, आर्थिक संकट टाळण्याचा जो मान्यवर महामार्ग त्याचा या बहिष्काराने 'रास्ता रोको' होतो आहे. त्याचे नेमके परिणाम काय होतील? भारतीय ग्राहक आणि शेतकरी यांनी स्वातंत्र्यानंतरची ५० वर्षे सरकारी धोरणांचा काच सतत सहन केलाच आहे. खुलेपणाच्या वाऱ्याचा थोडा अनुभव घेतल्यानंतर ते पुन्हा आपली मान समाजवादाऐवजी राष्ट-वादाच्या गोंडस नावाच्या जुवाखाली देण्यास तयार होतील काय?
या विषयावर विद्वान, पंडीत काहीही अकांडतांडव घालोत; खरे उत्तर बाजारपेठेने दिले आहे. शेअर बाजार कोसळत आहे. एका दिवसात रुपया ७० पैशाने पडला. येत्या पाच सहा महिन्यात तो कोठपर्यंत कोसळेल हे सांगणे कठीण आहे. डिसेंबर १९९८ पर्यंत डॉलरची किंमत ६० रुपयांवर जाईल असे भाकीत मी १९९५ सालापासून सांगत आहे, ते खरे ठरण्याची सारी लक्षणे दिसत आहेत. स्वदेशीच्या जपमाळा ओढणारे कारखानदार प्रत्यक्षात सर्वच बाबतीत पाश्चिमात्य देशांवर अवलंबून आहेत. समाजवादाच्या काळात ५० वर्षे त्यांना हरतऱ्हेने आंजारले गोंजारले तरी ते खरेखुरे उद्योजक बनले नाहीत. असा परभृतांच्या आधाराने स्वदेशीचे गलबत पाण्यात सोडणे हा मोठा विलक्षण प्रकार आहे.
अटलबिहारी पंतप्रधान आहेत; देशाचे मान्यवर नेते आहेत. राष्टीय सुरक्षेच्या ललकारीने देशात आणि देशवासियांत काय चैतन्याचा हुंकार भरता येतो याबद्दल त्यांच्या अनुमानाला आव्हान देणे धार्ष्टाचे होईल. आणीबाणीचा उत्साह सात महिने टिकला, अणुचाचणीतून निघालेली उन्मादावस्था तितकी टिकली तरी पुरे झाले.
समजा, भारतावरील व्यापारी बहिष्कारामुळे पेट-ोलियम, वरखते, रसायने यांचा पुरवठा तुटला तर त्याची काही पर्यायी व्यवस्था आहे? भारतीय लष्कराकडे पुरेसे पेट-ोल, डिझेल नसेल तर त्यांच्या हाती अणुबाँब देऊन काय फायदा होणार आहे? आणि, सारी अर्थव्यवस्था कोसळत असेल तर लष्कराच्या हातातील दोनचार अणुबाँब देशाचे संरक्षण करू शकतील?
देश जोपर्यंत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करीत असतो तोपर्यंत लोक पुढाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. बिरबलाच्या 'माकडीण आणि तिचे पिल्लू' या कथेतील माकडीणीच्या नाकात पाणी जाऊ लागले की ती आपल्याच पिल्लाला पायाखाली घालण्यास कचरत नाही. ३० वर्षे इंडोनेशियावर सतत अधिसत्ता गाजवणाऱ्या सुहार्ताचा हा आजमितीचा अनुभव आहे. अर्थव्यवस्था कोसळली तर वाजपेयींची गतही काही वेगळी राहणार नाही.
अशा परिस्थितीत प्रार्थना करायची तर ती एकच. “इंद्रराज देवा! वरुणराजा! आता भाजपचे राज्य आले आहे. यंदा भरपूर आणि चांगला पाऊस पडू द्या, यंदा ओला किंवा सुका दुष्काळ झाला आणि भिकेची थाळी घेऊन अन्नधान्यासाठी याचना करीत फिरावे लागले तर आज चाललेल्या भारतीय विज्ञानाच्या उदेउदेच्या ललकाऱ्यांनंतर ती लाचारी डोळ्यांनी पाहणे कठीण होईल. तेवढी वेळ येऊ देऊ नको इंद्रदेवा! राज्य आपल्या लोकांचे आहे!"
(२१ मे १९९८)