गंगाजल/एक रात्र? की युगानुयुगे?

चार :
एक रात्र? की युगानुयुगे?


 दिवसभर प्रवास करून मी थकले होते रात्री तिने निजण्याची खोली दाखविली, तेव्हा वाटले की, पाठ टेकली की झोप येईल.

 प्रत्येक घराचे आणि भोवतालच्या जागेचे स्वत:चे असे काही एक स्वरूप असते. नेहमी रहायची जागा बदलली की नव्या जागेच्या परकेपणामुळेच मन भांबावते. तसे माझे झाले. खिडक्यांतून भिंतीवर उजेड पडत होता. नेहमी ज्या बाजूला उजेड पडायची सवय, तेथे तो नव्हता. मनात विचार करावा लागला. ह्या खोलीच्या बाहेरचा रस्ता पूर्वेला आहे. रस्त्यावरचे दिवे पुण्यामध्ये घराच्या उंचीवर नाहीत. त्यांचा प्रकाश अगदी निराळ्या भिंतीवर दिसतो. एवढेच नव्हे, तर निराळ्या उंचीवर काही एका कोनाने तो दिसतो आहे. ही गोष्ट समजून घ्यायला थोडा वेळ लागला. एवढ्यात एक गाडी धडधडत गेली. रस्ता निराळ्या दिशेला म्हणून आवाजही निराळ्या दिशेला. भिंतीवर दिव्याच्या प्रकाशात पानांच्या सावल्या नाचत होत्या. ते चित्रही सर्वस्वी अनोळखी! काही पाने लांब, रुंद, मोठी होती. काही लांब, चिंचोळी होती. काही इवलीशीच वाटोळी होती. अमकी सावली अमक्या पानाची किंवा अमक्या फांदीची, हे समजायला रात्री काही मार्ग नव्हता. मी उशिरा आले होते. त्यामुळे बागही पाहिलेली नव्हती. 'कुठचे बरे झाड असावे?' असा विचार करीत पडले होते.

 एवढ्यात झांजा वाजल्या. भजनाचे शब्द नाही, तरी सूर ऐकू येऊ लागले. लक्षात आले की, शेजारी एक देऊळ आहे. भजन चालू असेपर्यंत काही केल्या झोप येईना. भजन जोराने चालले होते असे नव्हे, पण निजताना भजन ऐकू येणे हा अनुभवच नवा होता. म्हणून इतर नव्या अनुभवांच्या जोडीला झोप येऊ न देण्यास त्यानेही मदत केली.

 भजन थांबले. सगळीकडे सामसूम होती. एवढ्यात खोलीच्या खालीच कसलातरी खुळखुळण्याचा आवाज ऐकू आला. मी ताडदिशी उभी राहिले, आणि खिडकीतून डोकावून पाहिले, तर घरचा कुत्रा बागेत हिंडत होता; त्याच्या गळ्यातल्या पितळी बिल्ल्याचा आवाज ऐकू येत होता. थोड्या वेळाने परत शांतता पसरली. पण त्या शांततेतही कुठेतरी काहीतरी लहानसहान आवाज येत होते. कौलांवरून काहीतरी सरपटत गेले. वाऱ्याने बाहेरचा पाचोळा उडाला. ही शांततासुद्धा काहीतरी नवीन होती. तिचा स्तब्धपणा किंवा तिचा आवाज हे दोन्ही माझ्या ओळखीचे नव्हते. आणि ते काय असावे बरे?- असे नसते प्रश्न मन विचारीत होते.

 लांब एका विचित्र आवाजाला सुरुवात झाली. आवाज एकदम मोठा झाला आणि दीर्घ हाळी देऊन थांबला. आवाज मानवी नव्हता; बऱ्याच जणांनी मिळून केला होता. थोड्या वेळाने परत तोच आवाज झाला. आणि माझ्या लक्षात आले की, ती कोल्हेकुई होती. येथे शेजारी उसाची शेते पुष्कळ अन रात्री कोल्ह्यांची धाड उसावर पडायची. हा आवाज कसला, हे ओळखून त्याला नाव दिल्याचे मला समाधान वाटतेय, इतक्यात बाहेरच्या झाडावरून हूऽहूऽहूऽऽ असे ऐकिले. मी पुटपुटले, 'हे हुमण!' ही जागा म्हणजे बाहेरून येणारा प्रत्येक संदेश ग्रहण करण्याची इंद्रियांची तत्परता आणि थकलेपणा यांचे द्वन्द्व. किती वेळ चालले असते, कोण जाणे! पण शेजारच्या खोलीतून आवाज आला... ठणऽ ठणऽ ठणऽऽ. हा नेहमीचा व्यवहारातला, दाट ओळखीचा घड्याळाचा आवाज. मनावरचा ताण एकदम गेला. कितीचे ठोके पडणार, हे मी मोजणार होते. पण ते बंद पडायच्या आतच मला झोप लागली. मी स्वप्नात वावरत होते आणि कालपरवाच्या अनुभवापासून तो जागत्या मनाला अज्ञात असलेल्या भूतकाळात आणि निरनिराळ्या स्थळांतून मी भटकत होते.

 दगडांच्या वाटोळ्या गडग्यात मी उभी होते. जिकडे पाहावे तिकडे काही दूर, काही जवळ अशी दगडाची वाटोळी कुंपणे पसरलेली होती. खाली नदी दिसत होती. काहीतरी मासेमारीच्या गोष्टी चालल्या होत्या. एवढ्यात मला एकदम गणपतीचे देऊळ दिसायला लागले. सभामंडपात पेशवे शेवटच्या घटका मोजीत पडले होते. भोवताली कोणकोण म्हणून बघते, तो गणपती नाही नि मंदिर नाही. काही बुद्ध भिक्षु (थेर) भिक्षा मागून परतत होते. त्यांना सामोरी जाईन म्हटले, तर परत दगडांच्या भिंतीआडून मी वाटेने चाललेल्या शेजाऱ्याशी बोलू लागले. गुरे सगळी नीट गडग्याच्या आत आसऱ्यासाठी आणिली होती. मावळत्या सूर्याचे किरण माझ्या मोटारीच्या पत्र्यावरून परावर्तित होऊन एकदम डोळ्यांत घुसले...

 निर्वृक्ष, बरड माळ. वारा झोंबतो आहे- बर्फ पडणारसे वाटत आहे. आम्ही माळ तुडवतो आहो. बरोबर जनावरे आहेत, माणसे आहेत. श्टिलऽनाख्ट! हायलिगऽनाख्ट! (शांत, पवित्र रात्र) बर्लिनचा किल्ला. खिसमसच्या संध्याकाळी म्हटली जाणारी गाणी! कसली आली आह शांत आणि पवित्र रात्र! वारा घोंघावतो आहे. रात्रीपुरता निवारा पाहिजे आहे॰ उघड्यावर लांडगी, कोल्हे, तरसे फन्ना पाडतील. एखाद्या दरडीआड जागा बघतो आहोत- कुईऽ कुईऽ कुई! उसाच्या मळ्यातले कोल्हे वाटते ? आर्यांच्या टोळ्यांचे मध्य-आशियातील भ्रमण मला जाणवत होते. मध्येच जर्मनीत ऐकिलेली ख्रिस्तजन्माची गाणी आठवली. नंतर निजण्यापूर्वीची कोल्हेकुई आठवली.

 वाटोळी पानं, चिंचोळी पानं. कुठची बरं ही झाडं? ओळखीची वाटतात. वाट तरी किती चिंचोळी? एकामागं एक चालावं लागतं आहे, तरीदेखील बिनधोक पुढे जाता येत नाही. सगळी थबकली. कोण बरं जनावर?- दिसत नाही; खसखस ऐकू येते आहे. आम्ही त्याला भ्यालो ते आम्हाला भ्याले. जोराचा पळण्याचा आवाज आला. आम्ही पुन्हा चालू लागलो. ही चिंचोळी पानं वेळूची का? कुर्गचा का हा प्रदेश?- छे! हे काही निराळेच आहे. इथे वेळूची बेटे नाहीत. जाता-जाता अंग ओरखडतं आहे, इतक्या काटेरी जाळ्या आहेत. जीपमधून चाललो आहोत आणि काटेरी फांद्यांनी दंडातून रक्त निघाले आहे. हूऽ हूऽ! घुबड वाटत? अश्मयुगात कधीतरी माणसं शिकारीवर निघाली होती. प्रदेश उष्ण कटिबंधात असावा. त्यातच कुर्गच्या रानात भटकले होते, त्याची आठवण झाली. नंतर परत एकदा हिन्दुस्थानात कोठेतरी कामासाठी जीपमधून दोन्ही बाजूला काटेरी झाडे असलेल्या एका अरुंद रस्त्यातून गेलो होतो. त्याची आठवण मिसळली व त्यातच निजण्यापूर्वीचे अनुभव!

 कोठचेतरी डोळे माझ्याकडे बघत आहेत. त्यामुळे मी जागी झाले. लख्ख उजाडले होते. उन्हे पसरली होती. ज्यामुळे मी जागी झाले, ती माझ्या

गंगाजल / ४१

लेकीची स्नेहाळ दृष्टी माझ्यावर लागली होती. मी अजून का बरे उठले नाही, म्हणून पाहायला ती आली होती.

 झोपेतील अनुभवांत मी अजून बुडून गेले होते. अवकाश आणि काळ ह्यांत काही धरबंधच राहिला नव्हता, इतके ते कालवले गेले होते. मागचं पुढे, पुढचं मागे. ह्या आयुष्यात अनुभविलेले, कधी न पाहिलेले असा सगळ्यांचा काला झाला होता. पाषाणयुगातून, ताम्रयुगातून, पेशवाईतून... कालपर्यंत माझे मन भटकत होते; असंख्य मैल तुडवून पाय दमले होते; अगणित जन्म अनुभवून मन थकले होते.

 युंगम्हणतो की, कधीतरी काही प्रसंगाने आपल्या पूर्वजांचे संस्कार

-----
काल का परवा, का आठवड्यापूर्वी थेऊरला चाललेले उत्खनन पहायला मी एकटीच मोटारीने गेले होते. गणपतीचे देऊळ डावीकडे टाकल्यावर हा एक खडबडीत रस्ता जातो, त्याने सुमारे अर्धा-पाऊण मैल गेल्यावर उत्खननापाशी मी पोहोचले. ख्रिस्तपूर्व १००० वर्षांची वस्ती असावी, असे सांगतात. एकमेकांवर लहान-मोठे दगड रचून वर्तुळाकार भिंती (-कोकणात ज्याला गडगा म्हणतात-) पूर्वी रचिलेल्या होत्या. (भिंती जाऊन फक्त पायाच्या दगडांची वर्तुळे मात्र शिल्लक राहिली होती) अशी एकाशेजारी एक ५०-५०, १००-१०० फूट अंतरावर कितीतरी वर्तुळे त्या माळावर होती. उत्खननात एका घराचे अवशेष एका वर्तुळात सापडले होते. घर कसले छप्पर म्हणायचे! त्याच वर्तुळात मासेमारीत वापरायचा एक तांब्याचा गळ सापडला होता, वर्तुळात उभे राहिले की, खाली मुळा-मुठा नदी दिसत होती. गडगे उभे असते, तर २५-४० गडगे दिसले असते. एका बाजूने गणपतीचे देऊळदिसत होते. 'थेऊर' हे ग्रामनाम थर-पुर ह्या पाली नावावरून आले असावे, अशी माझी कल्पना. म्हणजे थेऊरात एके काळी बुद्धमठ असावा. दगडी वर्तुळे ख्रिस्तपूर्व हजार वर्षांची (सुमारे महाभारतकालीन)- बुद्धमठ (?) ख्रिस्तशकाच्या अलीकडेपलीकडे कार्ले भाजे लेण्यांच्या वेळचा- नंतर पेशवे

४२ / गंगाजल

आपल्या मनात उसळी मारून उठतात. कालिदास म्हणतो, जन्मांतरांचे संस्कार ‘भावस्थिर' असतात, व एखादे वेळी डिवचले जाऊन उठतात. हे संस्कार माझ्या पूर्वजन्मीचे होते की आजची मी माझ्या सर्व पूर्वजांचे संस्कार घेऊन जन्माला आले होते, कोण जाणे! एवढे मात्र खचित की, त्या रात्री कित्येक लाखांपासून काही शतकांपूर्वीच्या माझ्या पूर्वजांबरोबर मी पृथ्वी पालथी घातली होती. रात्रीच्या काही तासांत मी युगे जगले होते. वेळेची अशी गल्लत होते कशी? काळ वा वेळ हा एक अनुभव आहे. तो काय घड्याळाच्या काट्यात बसविता येणार आहे? का घड्याळाच्या काट्यानी मोजता येणार आहे?

१९७०