बारा :
किंकाळी


 चित्राचं नाव काय असावं, नक्की आठवत नाही. बहुधा 'द क्राय! 'किंकाळी' - असावंसं वाटतं. चित्रकाराचंही नाव आठवत नाही. आठवतं ते फक्त चित्र आणि दरवेळी आठवलं म्हणजे भीतीनं अंग शहारतं. चित्र अगदी साधं- फक्त काळपांढरं. एक बाई, तीही अगदी साधी. अतिरेखीव नाही, विकृत तर नाहीच नाही. तिनं किंकाळी मारताना तोंड उघडलं आहे, एवढंच चित्र. पण पहिल्या क्षणापासून आतापर्यंत चित्र डोळ्यांपुढं आलं की, ती किंकाळी ऐकू येते. तो एकाकी असहायपणा, सगळं संपलं, अशी अगतिक जाणीव चित्र पाहताना जी झाली, ती आजही होत आहे.

 आणखी एक किंकाळी सारखी आठवते,- मनात घर करून राहिली आहे- ती म्हणजे काम्यूच्या 'फॉल' नावाच्या कादंबरीतील. ह्या कादंबरीतील सबंध कथानक एका किंकाळीभोवती गुंफिलेले आहे. ह्या कादंबरीचा नायक एक तरुण, हुशार माणूस आहे. गरीबगुरीब माणसांचे खटले कोर्टात चालवून, त्यांना न्याय मिळवून देणारा म्हणून त्यानं प्रसिद्धी मिळविली होती. गरिबांचा कनवाळू म्हणून त्याचा सगळीकडे बोलबाला झाला होता. त्याची ही कीर्ती चढत्या कमानीत होती. म्हातार्‍या- कोताऱ्यांना तो मोठ्या आस्थेनं रस्ता ओलांडायला मदत करी. तोही आपल्याला हुशार, लोकांत मानमान्यता पावलेला समजत असे. रस्त्यातून जाताना, किंवा विशेषतः कोर्टाच्या आवारात, त्याला पाहिल्याबरोबर खाली वाकून नमस्कार करणारे, त्याला दुवा देणारे, हा पहा तो अमका अमका,' म्हणून त्याच्याकडे बोट दाखविणारे लोक खूपच होते. तो स्वतःही एकंदरीने स्वत:च्या कर्तबगारीवर, समाजानं त्याचं हे जे चित्र त्याच्या डोळ्यांपुढं उभं केलं होतं, त्यावर खूष होता.

 एक दिवस संध्याकाळच्या वेळी सेन नदीवरील एक पूल तो ओलांडीत होता. रस्ता जवळ-जवळ निर्मनुष्य होता. अशा कातर वेळी अर्धवट अंधारात एक बाई पुलाच्या मध्यभागी कठड्याला टेकून नदीकडे पाहत उभी राहिलेली त्याला दिसली. अशा वेळेला ती बाई का उभी असावी, असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. बाईची उभी राहण्याची तर्‍हा, काय ओझरतं तोंड त्याला दिसलं ते, यांवरून बाई दुःखीकष्टी असावी, असं वाटत होतं. तिच्या मनात काही भयंकर विचार तर नसेल ना, आपण तिची विचारपूस करावी का, असंही ओझरतं त्याच्या मनात येऊन गेलं. पण आपल्याला काय करायचं, म्हणून तो तसाच पुढे गेला. पुलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचतो. तो त्याला पुलावरूनच एक आर्त किंकाळी ऐकू आली. मागे वळून पाहतो, तो त्या मघाच्या बाईनं कठड्यावरून नदीत उडी घेतली, असं त्याला दिसलं. धावत जाऊन आरडाओरडा करून लोक जमवावे, पोलिसांपर्यंत बातमी पोहोचवावी, शक्य-तो आपणच उडी मारून तिला काढण्याचा प्रयत्न करावा, असंही त्याच्या मनात आलं. पण परत 'जाऊ दे, तिला मरायचं होतं, पाणी पण फार गार असेल,' असं म्हणून तो पुढे सटकला.

 तो पुढे गेला. संध्याकाळी त्याला एका बाईकडे जायचं होतं, तिच्याकडे तो गेला. पण ती हताश बाई व तिची शेवटची किंकाळी त्याला काही विसरता येईना. तिच्या स्थितीची कल्पना आली असूनही तिला तीतून बाहेर काढण्यासाठी आपण काहीही प्रयत्न केला नाही. ही जाणीव त्याला चैन पडू देईना. आपल्या मनातच गरिबांचा कनवाळू असं आपलं जे चित्र त्यानं रंगवलं होतं.त्याच्या पार चिंधड्या झाल्या. त्या किंकाळीची आठवण बुजवण्यासाठी त्यानं आपल्या स्वत:ला दारूत बुडविलं, बायकांच्या उपभोगात स्वतःला विसरण्याचा प्रयत्न केला. जगप्रवास केला. कशानंही ती किंकाळी त्याचा पिच्छा सोडीना. शेवटी एक दिवस तो पॅरिसमधून नाहीसा होऊन, जिथं त्याला कोणी ओळखीचं नव्हतं, अशा हॉलंडमधल्या एका गावी जाऊन तो राहिला. सदैव धुक्यात बुडालेल्या, सदैव एक प्रकारच्या विचित्र थंडीनं भरून राहिलेल्या ह्या गावाचं वातावरण सर्वस्वी पॅरिसच्या विरुद्ध होतं. जणू त्याच्या अंतर्मनाचं प्रतिबिंबच असं कंटाळवाणं, क्षुद्र, एकाकी जीवन तो जगत होता. तरीही ती किंकाळी सदैव त्याच्या सोबतीला होती. पुस्तकाच्या शेवटी नायक म्हणतो 'एकदा तो क्षण परत माझ्या आयुष्यात यावा. त्याला असं वाटतं की, 'मी योग्य त-हेनं वागेन' पण लगेच दुसऱ्या क्षणाला तो म्हणतो, “काय उपयोग? तो क्षण परत आला, तर मी तसंच वागणार नाही कशावरून?"

 ती चित्रात पाहिलेली किंकाळी आणि ही वाचलेली किंकाळी सारखी अधूनमधून आठवते.

 तिसरी किंकाळी ही माझ्या आयुष्यात घडलेली एक घटना. ती काही एकच किंकाळी नव्हती. एकामागून एक दिलेल्या बऱ्याच किंकाळ्या होत्या. पण त्या सर्व आज माझ्या कानांत आणि जाणिवेत एकाच किंकाळीसारख्या आहेत. ह्या स्वत: ऐकिलेल्या किंकाळ्या आजही मनात घोळतात.

 मी पुण्याहून मुंबईला चालले होते. बायकांच्या थर्ड क्लासच्या डब्यात मला खिडकीशेजारी जागा मिळाली. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी बाकावर बसल्या बसल्या, डब्यात इतर कोण आहे ते बघत होते. गाडी भांबुरड्याला (म्हणजे हल्लीचं शिवाजीनगर) थांबली. एक तरुण बाई मुलाला खांद्यावर टाकून डब्यात शिरली व माझ्याविरुद्ध बाजूला प्लॅटफॉर्मशेजारी खिडकीशीच बसली. बाईच्या अंगावर कोरं-करकरीत लुगडं होतं. मुलाच्या अंगावरचे कपडेही, टोपडं, झबलं वगैरे नवे, कोरे-करकरीत होते. बाईला पोहोचवायला मध्यम वयाची दोन माणसं आली होती,-एक बाई व एक पुरुष. त्या सर्वांना पाहताना माझ्या मनात आलं, पहिलटकरीण बाळाला घेऊन सासरी निघालेली दिसते आहे. पोहोचवायला आलेले आईबाप दिसताहेत. अशा प्रसंगी नेहमी कितीतरी बोलणी होतात. पण ह्या वेळी मात्र कोणी कुणाशी बोलत नव्हतं. बाळ घेतलेली पोर गप्पच होती. बाहेरचं वयस्क जोडपंही बोलत नव्हतं. गाडी सुटली. त्यांनी मानेनंच मुलीचा निरोप घेतलां मुलीनं बाकावर मांडी घातली आणि मुलाला मांडीवर ठेविलं. हा सर्व वेळ मूल झोपेतच होतं, असं दिसलं.

 गाडी चालू झाली. मी खिडकीबाहेर बघू लागले. डब्यात फारशी गर्दी नव्हतीच. त्यामुळं फारसं बोलणं-चालणंही नव्हतं. सगळं जरा शांतच होतं. असा अर्धा-एक तास गेला असेल. मलाही किंचित डुलकी लागली होती. एवढ्यात एकदम एका किंकाळीनं मी खडबडून जागी झाले. पाठोपाठ दुसरी किंकाळी ऐकू आली. चाललंय काय, म्हणून मी इकडेतिकडे पाहिलं. डब्यात पेंगलेल्या इतर बायकाही माझ्याप्रमाणं चकित होऊन इकडेतिकडे बघत होत्या. किंकाळी कुठून आली कळलं नाही. एवढ्यात एक स्टेशनही येऊन गेलं. मला वाटलं, बाहेरच्या स्टेशनवरचीच एखादी किंकाळी ऐकू आलेली आहे. पण चालत्या गाडीत आणखी पाच-दहा मिनिटांनी परत तशीच किंकाळी ऐकू आली. ती माझ्या डब्यातून ऐकू येत होती. दुसरी किंकाळी ऐकू आली. मी उठून पाहिलं. त्या मघाशी पाहिलेल्या तरूण मुलीच्या मांडीवरील मूल किंकाळ्या फोडीत होतं. मला पहिल्यानं वाटलं त्यापेक्षा मूल बरंच मोठं होतं. सहा महिन्यांचं असेल. बाई आली तेव्हा जशी स्तब्ध बसली होती, तशीच बसली होती. मांडीवर मूल होतं. मुलाचे डोळे मिटलेले होते. मुठी वळलेल्या होत्या. किंकाळीनं तोंड वेडंवाकडं झालं होतं. पाहता-पाहता मुलाच्या मुठी सुटल्या. तोंड परत नीट सरळ झालं. बाईच्या तोंडावर कसलाच भाव नव्हता. बाकीच्या बायका 'काय झालं? काय झालं?' असं विचारीत होत्या. 'करतं असंच अधूनमधून,' असं तुटक उत्तर देऊन ती बाई स्वस्थ बसली.

 थोडा वेळ तिच्याभोवती उभं राहून जो-तो आपापल्या बाकावर बसला. मीही आपल्या बाकावर बसले. मुलाला काहीतरी मोठा आजार झाला होता, यात शंकाच नव्हती. काय झालं होतं, मला कळत नव्हतं. काही मदतही करिता येत नव्हती. मी स्वस्थ बसून राहिले. एवढ्यात आणखी एक किंकाळी ऐकू आली. पाहिलं तो बाई होती त्याच स्थितीत; तशीच पुतळ्याप्रमाणे नि:स्तब्ध. पण मला काही राहवेना. सबंध आगगाडीत खासच एखादा तरी डॉक्टर भेटेल, त्याला बोलावून मुलावर काही उपचार होतात का हे बघता येईल. असा विचार माझ्या मनात आला. मी उठले. एकामागून एक गाडीचे डबे शोधीत निघाले. शेवटी एका डब्यात डॉक्टर आढळला. त्याला घेऊन परत आले. त्या डॉक्टरबरोबर आगगाडीतला तिकीटतपासनीसही आमच्याबरोबर आला. आम्ही बायांच्या डब्यात शिरलो, तो लागोपाठ दोन किंकाळ्या ऐकू आल्या. आम्ही धावतच ती बाई होती तिथं पोहोचलो. आम्ही मुलाशी पोहोचेपर्यंत किंकाळ्या थांबल्या होत्या. डॉक्टरनं मुलाकडे पाहिलं व छातीला स्टेथॅस्कोप लावला. मूल मेलं होतं. कसलाच उपचार करण्याची शक्यता नव्हती.

 काही करता येणं शक्य नाही. म्हणून डॉक्टर परत गेला. तिकीट चेकर बाईजवळ उभा राहिला. त्यानं विचारलं, 'तुम्हांला कुठं जायचं आहे?" बाई म्हणाली, "माझं तिकीट कुर्ल्याचं आहे. माझ्या नवऱ्याला स्टेशनवर यायला सांगितलं आहे." तिकीट चेकर म्हणाला, "असं मेलेलं माणूस घेऊन तुम्हांला जाता येणार नाही. आता येईल त्या स्टेशनवर म्हणजे कल्याणवर तुम्हांला उतरून देणार" हा सगळा प्रकार पाहून मी रदबदली केली. म्हटलं, “कल्याणपासून कुर्ला किती दूर? जाईना का बिचारी गेली तर!" पण तिकीट चेकर ऐकेना. त्या बाईला तिच्या मेलेल्या मुलासकट त्यानं कल्याणला उतरविलं. बाई एक शब्द बोलली नाही. तिनं कोणाकडे पाहिल नाही. मुकाट्यानं मुलाला खांद्यावर टाकून ती कल्याणला उतरली.

 ती उतरून गेली, आणि माझं विचारचक्र सुरू झालं. भांबुरड्याच्या स्टेशनावर ही माणसं गुपचूप का होती, त्याचं कारण आता मला कळलंस वाटलं. ही पहिलटकरीण तरी होती का? पण तिचं मूल खासच आगगाडीत बसल्यावर आजारी झालं नव्हतं. त्याचा आजार काही दिवसांचा असणार. ते आजारी पडून आता वाचत नाही, असं कळल्यावर त्या लोकांनी तिला व त्याला नवे कपडे घालून त्यांची घाईघाईनं बोळवण केलेली होती. नवऱ्याशी पोहोचेपर्यंत मूल कदाचित जिवंत राहील, अशीही कल्पना असावी. माहेरच्या माणसांनी का सासूसासऱ्यांनी मरायला टेकलेलं मूल मांडीवर देऊन त्याला नव्या कपड्यांनी शृंगारून तिची पाठवणी केली होती. ह्या मुलाला घेऊन काही तासांत ती नवऱ्याकडे पोहोचणार होती. ह्या भयंकर प्रसंगाला तोंड देऊन ती पोरगी बसलेली होती. माझ्या नसत्या उठाठेवीनं तिला मदत तर झाली नाहीच, पण एका भलत्याच स्टेशनावर उतरविल्यामुळे तिच्यापुढे एक नवीनच संकट उभं झालं, हे मला स्पष्ट दिसून आलं. मला मुंबईला बडा रेल्वे-अधिकारी घ्यायला येणार होता. मी सर्व हकीकत त्याला सांगून त्या बाईला कुर्ल्याच्या स्टेशनवर पोहोचवायचीही व्यवस्था केली. पण हे सगळं व्हायला दोनचार तास सहज निघून गेले. आमचा निरोप जाईपर्यंत ती बाई मुलाला घेऊन कल्याण स्टेशनातच बसली होती. असं मला समजलं.

o o

 ह्या गोष्टीला कित्येक वर्षे लोटली. अजून मला त्या पोराची किंकाळी ऐकू येतेसं वाटतं आणि परत परत मनात येतं की, 'मी माझ्या वेड्या कीव येण्यामुळं त्या बाईला व्यर्थ दु:खात टाकलं. ही कीव त्या बाईबद्दल होती, का मला त्या किंकाळ्या ऐकवत नव्हत्या म्हणून स्वत:बद्दल होती, हे समजत नाही. परतपरत वाटतं, असा प्रसंग परत आला, तर मी काय करावं?

 माझ्या मते मी लेख संपविला, पण माझा खट्याळ सांगाती मला स्वस्थ बसू देईना. त्याचे कधी न मिटणारे डोळे माझ्याकडे लागले होते. तो बोलत नाही, पण तो असा पाहू लागला की, माझं विचारचक्र परत सुरू होतं. कोणीतरी विचारीत आहेसं वाटतं.

 “तुला असं वाटतं का की, तू स्वस्थ बसली असतीस, तर स्वत:ला दोष दिला नसतास?"

 माझे मीच उत्तर दिलं, "छे! मी गप्प बसले असते, तर उगाच गप्प बसले, डॉक्टर शोधून आणला असता तर मूल मेलं नसतं, असं वाटून हळहळत बसले असते.”

 "हं!"

 माझं मीच उद्वेगानं विचारलं, "म्हणजे मनुष्याच्या हातून योग्य कृती होण्याची कधीच शक्यता नाही का?"

 “माहीत असन वेडे प्रश्न का उभे करतेस?"

 "मूल किंकाळ्या मारतं आहे, त्याचे हातपाय आखडत आहेत. तोंड वेडंवकडं होत आहे, ते खूपखूप आजारी आहे, एवढंच मला समजलं होतं. ते पोरगं वाचणं शक्य नाही. हे मला माहीत नव्हतं. मला नाही, पण डॉक्टरला समजेल. तो काही तात्पुरता उपाय करू शकेल असं मला वाटलं, म्हणून मी गेले-"

 "बरं मग?"

 "मी गेले नसते व मूल मेलं असतं, तर मला शक्य असून मी मदत मिळवायची धडपड केली नाही, म्हणून जन्मभर मनाला बोचणी राहिली असती."

 "हं!"

 माझ्या लुडबुडीनं त्या बाईला काडीचीही मदत झाली नाही, उलट त्रास मात्र झाला, हे मागाहून झालेलं ज्ञान!"

मी पुढे म्हटलं. "तो काम्यूचा नायक 'मदतीला गेलो नाही,' म्हणून हळहळत होता, व मी गेले म्हणून हळहळते आहे!"

 परत आपलं नुसतं "हं!"

परत विचार करून मी म्हटलं, "हा जो प्रकार झाला, ते ह्या अपूर्ण जीवदशेतील मनुष्यव्यवहाराचं सर्वसाधारण वर्णन, असं म्हणता येईल."  "हं!"

 "म्हणजे काहीही कृती केली, अगदी समजून-उमजून, विचारानं केली, तरी ती योग्य होईलच, असं नाही. कधी बरोबर झाली. तरी तीमध्ये थोडीबहुत चूक राहणारच."

 "हं"

 मी त्रासून विचारलं, “मग काहीच कृती करू नये, असंच ना?"

 उत्तर नाही.

 माझं मलाच उत्तर शोधलं पाहिजे.

 "जिवंत आहे, तोवर कृती व विचार होतच रहाणार. दोन्ही आपल्याशी इमान राखून करायच्या. अपूर्णत्वामुळे काय चुकेल, त्याचं फळ भोगायला व हळहळ करायला सबंध आयुष्य आहेच की!"

 उत्तर नव्हतं; पण मागचा ससेमिरा थांबला होता.

१९६९