गांव-गाडा/भरित
पुराणांतरीं गांवाची व्याख्या अशी दिली आहे-
तथाशूद्रजनप्राया सुसमृद्धकृषीवला ।
क्षेत्रोपभोगभूमध्ये वसतीर्ग्रामसंज्ञिता ॥
जिच्यासभोंवतीं कीर्दसार- वहितीला योग्य- जमीन आहे, आणि जिच्यामध्यें मातबर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत, अशा वस्तीला गांव म्हणतात. गांवच्या हद्दीला किंवा सीमेला " शींव ” ही संज्ञा आहे. गांवाचे स्वभावतः आणि एकमेकांपासून अलग असे दोन भाग उघड उघड पडतात. एक ' पांढरी ' किंवा गांवठाण आणि दुसरा ‘काळी’ किंवा रान. काळी आणि पांढरी ह्या संज्ञा जमिनीच्या रंग व गुणधर्मावरून प्रचारांत आल्या असाव्या. काळी जमीन काळी किंवा काळसर असून भुसभुशीत असते, ती पाणी धरते व खचते. पांढरी जमीन पांढरसर, आवळ व निबर असून पाणी ढाळते. ह्यामुळे काळी जमीन जितकी वहितीला उपयोगी, तितकी इमल्याला नसते; आणि पांढरीवर जसा इमल्याला धर सांपडतो, तसा कंदमूलांना किंवा उद्भिज्जांंच्या मुळ्यांना तिच्या पोटीं वाव सांपडत नाहीं. प्रत्येक गांवांत शक्यतेप्रमाणें पांढऱ्या जमिनीची योजना गांवठाणाकडे आणि काळीची योजना शेतवाडीकडे झालेली दिसते ती निसर्गानुरोधानेंच आहे, हें कोणाच्याही लक्षांत येईल. तेव्हां गांवाच्या ज्या जागेवर मनुष्यें घरेंदारें करून नांदतात तिला पांढरी, आई-पांढर किंवा गांवठाण म्हणतात, आणि ज्या जागेत ती पिकें करतात, तिला काळी, आई-काळी, रान किंवा शिवार म्हणतात. कालेंकरून पांढरी व काळी ह्यांचा अर्थ अनुक्रमें पांढरीत व काळीत द्यावे लागणारे कर असा होऊन बसला; जसे, मी पांच रुपये काळी देतो. पांढरी म्हणजे गांव किंवा लोकवस्ती आणि काळी म्हणजे शेतकरी वर्ग असाही भाषणसंप्रदाय रूढ आहे; जसें ही गोष्ट काळी पांढरीला माहीत आहे. शिवेच्या आंतील पांढरीव्यतिरिक्त सर्व भूभाग-शेते, खराबा, चराई, नद्या, नाले, मसणवाटा, माळमुरडण इत्यादि-शिवार ह्या शब्दांत समुच्चयाने येतात. काळी-पांढरी मिळून झालेल्या गांवाला जुन्या कागदपत्रांत “देह" संज्ञिलें आहे. काही ठिकाणी गांवठाण सोडून मनुष्यवस्तीची छपरे, झोपड्या, झांप, घरें इत्यादि दृष्टीस पडतात. गांवठाणापासून दूरदूरची जमीन जसजसे लोक लागण करूं लागले तसतशा शेताच्या येरझारा त्रासदायक होत गेल्या व शेतीतला नफाहा पुरता मिळेनासा झाला. म्हणून शेतांत किंवा त्यांच्या आसपास राहण्याची गरज जास्त भासू लागली. ह्या व ह्यासारख्या दुसऱ्या कारणामुळे शेतकरी शिवारांत कायमची वस्ती घालू लागले. अशा प्रकारची शेतांत एक दोन घरे असली तर त्यांना झांप, आवसा, कोठा, गोठा किंवा पडाळ (पर + आलय ) म्हणतात; आणि ती दहा पांच किंवा अधिक असून त्यांचें छोटेखानी गांवठाणच बनलें तर त्याला वाडा, वाडी, मजरें, पाडा असलें नांव प्राप्त होते. पाडा, वाडा, वाडी अगर मजरें मूळ गांवच्या अंगभूत असते, आणि कागदोपत्री अमुक गांवची अमुक वाडी अगर मजरें याप्रमाणे उल्लेखितात. वाडीची वस्ती जसजशी वाढते व संपन्न होते, तसतसा तिला गांवाचा आकार येतो; आणि मूळ गांवाला मागे टाकणाऱ्या व हा मूळ गांव का वाडी असा पांथस्थांना बुचकळा पाडणाऱ्या वाड्याही क्वचित् आढळतात. अव्वलपासुन आपल्याकडे खेडेगांवांचे दोन भेद मानतात. एक मौजे आणि दुसरा कसबा. कसब ( कला अगर हुन्नर) ह्या शब्दापासून कसबा हा शब्द निघाला आहे. व्यापार, हुन्नर व कसबी मजुरी करणारे लोक मौज्यापेक्षां कसब्यांत अधिक असतात; आणि कसब्याखालीं वाड्याही जास्त असतात. कसब्याचें गांव मौज्यापेक्षां जास्त विस्तृत, चव्हाट्याचें, रोजगारी व संपन्न असतें. गुजराथेंत नागरिकांना 'कसबाते' म्हणतात. मोठ्या व्यापाराच्या गांवाला पेठ म्हणतात. पेठ म्हणजे बाजार किंवा दुकानांनीं व्यापलेला गांवाचा भाग. मनुष्यगणतीच्या वेळीं सरकारनें ठोकताळ्यानें असें ठरविलें कीं, पांच हजारांवरील लोकसंख्येच्या गांवाला शहर म्हणून व त्याखालील लोकसंख्येच्या गांवाला खेडें म्हणून दाखल करावें. परंतु एखाद्या गांवाला खेडें किंवा शहर हें नांव लोक देतात, तेव्हां ते लोकसंख्येबरोबर किंबहुना जास्ती उद्योगधंद्याच्या प्रकारावर लक्ष देतात. गांवची हुन्नरी व व्यापारी वस्ती फुगली आणि काळीपेक्षां पांढरी बळावली कीं त्या गांवाची शहरांत गणना होऊं लागते. खेडणें म्हणजे जमीन कसणें आणि खेडू म्हणजे जमीन कसणारा. तेव्हां खेडूंची जी वस्ती तें खेडें. ज्यामध्यें प्रधान धंदा शेती व ज्यामध्यें भरण्याची वस्ती शेतकऱ्यांची असते, त्या गांवांला लोक खेडें किंवा गांवढे म्हणतात आणि तध्व्यतिरिक्त गांवांना शहर मानतात. लोकरूढ़ींत खेड़ें आणि गांव हे बहुतेक समानार्थक शब्द होऊन बसले आहेतं. गांव-गाडा, गांवकी, गांवमुकादमानी, गांवपंचाईत, वगैरे शब्दांत गांव हा शब्द शहरापेक्षां खेडें ह्या अर्थानें योजिला आहे हें सांगणे नको.
कोणत्याही गांवाला गेलें तरी मध्यें पांढरी व सभोंवतीं काळी दृष्टीस पडेल. गांवच्या बंदोबस्तासाठीं घांटावरील पुष्कळ गांवांसभोंवतीं गांवकूस किंवा कोट केले असून त्यांतून गांवांत शिरण्याला एक अगर अधिक वेशी असतात. पुष्कळ ठिकाणीं गांवकूस व वेशींची निगा न राहिल्यामुळे पडझड व मोडतोड झाली आहे. त्यामुळे गांवाची हवा, उजेड हीं खेळतीं झालीं आहेत, हें सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनें एकपरी बरें झालें म्हणावयाचें ! स्पृश्य जातींचीं घरें वेशीच्या आंत असतात; आणि मेलेल्या जनावरांची चिरफाड करणा-या (शस्त्राने न मारलेल्या म्हणजे निसर्गधर्मानें मेलेल्या जनावराला “ पडे" म्हणतात; त्यांच्या मांसाला तें न खाणाऱ्या जाती “ माती" म्हणतात, व तें खाणाऱ्या जाती "भाजी" म्हणतात.) व ती खाणाऱ्या जातींची, तसेंच वंजारे, वड्डर, कैकाडी, फांसपारधी वगैरेसारख्या फिरस्त्या व नवीन वस्तीला आलेल्या जंगली जातींची घरे, पालें किंवा झोपड्या प्रायः गांवाबाहेर असतात. त्यांतले त्यात फासपारध्यांच्या झोपड्या गावापासून जरा दूर असतात. ह्यामुळे पांढरी पांगलेली दिसते इतकेच नव्हे तर नवख्याला जवळ जवळ दोन तीन गावें असल्याचा भास होतो. जातीजातींची घरें सलग असतात व त्यांना जातिपरत्वं माळआळी.सुतारआळी, कोळवाडा, रामोसवाडा, भिलाटी अशी नावं पडतात. दर एक गांवाला एखादें देवालय आणि बहुतेक गांवांला चावडी असते. तेथे लोक जमतात. भिल्ल, कोळी, रामोशी वगैरे तुफानी जातींतले लोक जंगल पहाडाचे दडण व पुंडावा सोडून गांवाच्या आश्रयाला आले, तेव्हां त्यांच्या जातिधर्मास योग्य अशा ठिकाणी त्यांना वस्ती मिळाली. ह्या जाती स्पृश्य आहेत तरी त्यांना मध्यवस्तीत कोठेही जागा मिळाली नाही. वहिमी जाती मध्यवस्तीत ठेवणे धोक्याचे असते. त्यापेक्षा त्या वेशीजवळ किंवा गांवकुसाजवळ राहिल्या तर गांवाचें राखण तरी करतील. म्हणून भीलवण, कोळवणांतील गांवें शिवाय करून इतर मुलखांतल्या गांवांत ह्या जातीची वस्ती वेशीजवळ किंवा गांवकुसाजवळ दिसून येते. अस्पृश्य जातीपकी ज्या गोमांस खात नाहीत. अशा ढोर, चांभार१, भंगी, इत्यादींची घरं गांवांत शेवटी किंवा गांवकुसाबाहेर अगदी गांवाला खेटून असतात. महार, मांग, मेलेली ढोरें ( गाई, म्हशी ) फाडतात व खातात म्हणून महारवाडा व मांगवाडा हे गांवापासून किंचित् दूर असतात. पश्चिमेची शुद्ध हवा मिळावी ह्यास्तव पुष्कळ ठिकाणी ते गांवाच्या पूर्वेस आढळतात.
१ चांभारगोंदें ऊर्फ श्रीगोंदें येथे मात्र चांभारवाडा गांवाच्या मध्यवस्तीत आहे.
श्रीरामचंद्रानें कनकमृग मारला व तो पडला म्हणून तो महारांनीं हक्कांनी नेला; ही कथा सांगून महार आपला मुख्य हक्क असा सांगतात कीं, आम्ही "पड्याचे धनी.” कोणी म्हणतात, महार हा शब्द मेहतर याचा अपभ्रंश आहे, कोणी म्हणतात, तो महा + अरि ( मोठा शत्रु ) ह्या दोन संस्कृत शब्दांचें रूपांतर आहे. रा. रा. शिवरामपंत भारदे म्हणतात कीं, महाराचें मूळ “मह + अर” म्हणजे जंगलांत किंवा पर्वताच्या गुहेंत राहणारा अर्थात जंगल किंवा गुहेचा नाईक हें आहे, म्हणून त्याचें मुख्य काम वाटाड्याचें ठरलें. सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांच्या मतानें मृतहर ( मेलेलें जनावर ओढणारा) ह्या शब्दापासून महार हा शब्द निघाला. “ गोधन ” हा संस्कृत समास पुराणप्रसिद्ध आहे. हिंदु लोक गाईला आई समजतात. गाई, म्हशी, बैल, रेडे, ह्या शेतोपयोगी जनावरांना शेतकरी लोक ' लक्ष्मी ” म्हणतात. उदाहरणार्थ, पाटलांजवळ दोन खंडी लक्ष्मी आहे, रानांत लक्ष्मीला पाणी भेटत नाहीं इत्यादि. वर सांगितलेल्या जनावरांचें मांस बहुतेक हिंदू खात नाहींत. महार मांग तें खातात; इतकेंच नव्हे, तर लोकप्रवादाप्रमाणें गुरांढोरांना विष घालून मारतात व पडें खातात. तेव्हां मा (लक्ष्मी, आई) + हर अशी महार शब्दाची व्युत्पत्ती संभाव्य दिसते. महार हा जातिवाचक शब्द असून व्यवसायवाचकही आहे, आणि असल्या अनेक जातींप्रमाणें महार ही संकीर्ण जात असावी. महार व मांग या दोन्ही जाती गांवाबाहेर राहतात, तरी बाहेरला व वेसकर हे प्रतिशब्द महारालाच लावतात. दोन्ही जातींत नाईक हें बहुमानाचें उपपद लावतात, व महारांमध्यें त्याचें 'नाक' हें रूप झालें आहे, उ०-खंडनाक, जाननाक. गांवकीच्या कामावर महारांप्रमाणें मांगांच्या साक्षीसह्या कचित आढळतात. आषाढांत कोणत्याही हिंदु जातीचीं लग्नेंं होत नाहीत; परंतु महारांची लग्रसराई मात्र आषाढांत असते. ह्या महिन्यांत महारकीचें काम फारसें नसतें, म्हणून समस्त गावकऱ्यांच्या सोईनें हा महिना महारांना लग्नकार्यांसाठी काढून दिला असावा. दौंडीचा मजकूर तोंडाने ओरडून महार सांगतो व डफडें मांग वाजवितो. प्रेताचें सरण महार वहातो आणि तिरडी बांधण्याची दोरी मांग पुरवितो. पड्याचे अमुक एक (आणि ते महत्वाचे असतात ) अवयव महारांनी घ्यावेत, अमुक मांगांनी घ्यावेत, असे हक्क असल्याबद्दलच्या झालेल्या मजलसींचे जुने कागदपत्र दृष्टीस पडतात. महारांच्या घरी लग्न निघाले तर मांगांनी खिजमत करावी. मांगानें लग्न केलें तर शेला-लुगडे, आणि गोंधळ जागरण घातले तर चार पैसे, महाराला द्यावेत. मांग मोळ कापावयाला गेला तर त्याने महारास चार पैसे, खोबरें, पानसुपारी इतके दिले पाहिजे. महारान बैलावर व मांगानें हल्यावर वरात काढावी. अशा प्रकारच्या दस्तरांवरून मूळ महार, आणि मांग ही महारातून वेगळी पडलेली पोटजात असावी किंवा ती त्याचेमागून त्याच्या पडोशाला येऊन राहिली असावी, असें अनुमान निघते. असो. जातिपरत्वं निरनिराळे पाणोथे आहेत इतक्या मुबलक पाण्याचा गाव विरळ. परंतु कितीही अडचण असली तरी ढोबळ मानाने स्पृश्य जाती एका पाणोथ्याला जातात, व त्यावर अस्पृश्य जातींना पाणी भरूं देत नाहीत. दुसरा पाणोथा नसल्यास स्पृश्य जाती अस्पृश्य जातीना पाणी काढून वाढतात. सवड असल्यास निरनिराळ्या जाती उच्चनीच भावानुरोधाने वेगवेगळ्या पाणोथ्यांवर पाणी भरतात, जसे, महाराच्या पाणोथ्यावर चांभार पाणी भरीत नाहीत: अथवा मांगांच्या पाणोथ्यावर महार पाणी भरीत नाहीत.
काळी व पांढरी हे जसे गांवाचे दोन स्वाभाविक विभाग पडतात, तसे उद्योगपरत्वें लोकवस्तीचे दोन भाग शेतकरी करतात- “ कुणबी" म्हणजे शेतकरी आणि “ अडाणी" म्हणजे बिगर-शेतकरी. सह्याद्रीच्या पायथ्याशी डांगाणांत महादेवाचे कोळी राहतात. तेथील एका गांवचा एक पोक्त कोळी बोलतां बोलतां आढ्यतेने म्हणाला की "आमी 'राजकोळी,' कुणबी नव्हत. 'कुणबी' म्हणजे 'कोणीबी' ( कोणीही ).त्यांच्यांत कोणतीही जात संपादते. ” कुणबी, गुजराती ' कणबी ' किंवा माळवी 'किरसान’ हे शब्द संस्कृत कृषी, कृषीवल ह्या शब्दांपासून निघाले असावेत. कोणी म्हणतात, 'कुनमी ' (पृथ्वीला नमन करणारा) ह्या शब्दापासून कुणबी हा शब्द निघाला. द्राविडी भाषेत जमीन कसणाराला पूर्वी " कुल ” म्हणत. कुळव, कुणबी हे शब्द कुल शब्दापासून निघाले असावेत, हें जास्त संभाव्य दिसतें. शेतीचा पर्यायवाचक शब्द कुणबीक, कुणबावा व शेतकरी ह्याचा पर्यायवाचक शब्द " कुणबी ” हें होत. कुणबी हा शब्द वाणी, माळी, भराडी, कोष्टी, कोळी, महार वगैरे शब्दांप्रमाणेंच जातिवाचक असून व्यवसायवाचकही आहे. धर्माकडे किंवा जातीकडे लक्ष न देतां जसे शेतकरी आपआपसांत एकमेकांना 'मिरासभाऊ' 'पास-भाऊ' (पास= कुळवाचा लोखंडी भाग)म्हणतात, तद्वतच शेतीचा धंदा करणारांना ' कुणबी ' म्हणतात. चैत्र गळे कुणबी पळे, कुनबीसरीखा दाता नहि, वगैरे म्हणींत कुणबी याचा अर्थ शेतकरी धरला आहे. खेडें म्हटलें कीं, पांढरीच्या अगोदर चटकन् काळीच डोळ्यासमोर उभी राहते. मेंढके, शेतकरी, गुराखे, पाट, भुङक्या, विहिरी, नांगर, कुळव, मोट, माळा, गोफण वगैरे बळिराजाचें वैभव खेड्याचें नांव काढतांच इतकं मन व्यापून टाकतें कीं, खेड्यांत शेतीखेरीज दुसरा रोजगार चालत असेल किंवा शेतकऱ्यांखेरीज दुसरें कोणी रहात असेल, असें एकाएकीं मनात येत नाही. कुणबी पुढे झाल्यावांचून एकही खेड्यात वसाहत झाली नाहीं. त्यानें धान्य पैदा करून इतरांच्या खाण्याची तरतूद केली, तेव्हां ते गोळा झाले. दुनियेच्या पोटापाण्याचा भार कुणब्यानें उचलला ही सार्वत्रिक समजूत असल्यामुळे खेड्यांतले सर्व धंदेवाले कुणब्याला "बळिराजा ” असें संबोधितात. वामनाला पृथ्वी दान करणारा बली राजा होता, ही पुराणकथा लोकप्रसिद्ध आहे. शेतीच्या धंद्याइतका शारीर बल वाढविणारा दुसरा धंदा नाही; व रामोशी, महार, मांग इत्यादि सर्व जाती एकवाणींंनें कबूल करतात कीं, एकदरींत कुणब्यां इतकी ताकद दुसऱ्या कोणत्याही जातींत नसते, म्हणूनही कदाचित् ब्राह्मणाला जसें पंडित, तसे कुणब्याला बळी ( बलवान् ) म्हणण्याचा रिवाज पडला असेल. कुणबीक हा जसा आद्य धंदा आहे, तसा तो प्रधान धंदाही आहे. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी' अशी म्हण पडण्याचे कारण इतकेच की, आपल्या देशांतला मुख्य धंदा शेतीचा आहे, आणि सर्वं धंदे शेतीवर जीव धरून आहेत. अझूनही शेकडा ७२ लोकांचे पोट शेतीवर चालतें, आणि शेकडा ८० जणांची धांव जमीन संपादन करण्याकडे आहे. लोकांचा असा ठाम विश्वास आहे की, पोटाला भरपूर आणि निरंतर एक काळी आई देईल; पैसा जातो, परंतु जमीन ठिकाणी राहते व तिच्यांतलें धन सालोसाल उकरून खाता येते. तेव्हा असला अक्षय धंदा ज्याला साधला, त्या धंद्याच्या लोकांनी आपल्या आधारावर धंदा करणाराला अडाणी (अडणारा) म्हणं नये तर काय म्हणावें? ज्या धंद्यांचा काळीशी निकट संबध नाहीं ते करणारांना 'पांढरपेशे' म्हणतात, आणि ते ब्राह्मण झाले तरी कुणब्याच्या हिशेबी अडाण्यांतच मोडतात. तरी पण खेड्यांत जातिपरत्वें अडाणी शब्दाची भिन्न भिन्न योजना दृष्टीस पडते. वाण्यांला विचारले, तर ते सांगतील की, वाण्या-ब्राह्मणांची बारा घरें, आणि बाकी अडाण्यांची. गुरव, सुतार, सोनार, हेही वाणी, ब्राह्मण व स्वतःची जात वगळून बाकीच्यांना अडाण्यांत ढकलतील. असे आहे, तरी ज्याअर्थी कुणबिकीने खेडे बहतेक वेढले आहे, त्याअथा कुणबी करतात तेच लोकवस्तीचे विभाग "कुणबी" आणि "अडाणी" हे अधिक ग्राह्य, आणि खेड्याची उत्पत्ति व सर्वसामान्य स्थिति प्रतिबिंबित करणारे आहेत, ह्यांत संशय नाही.
खेड्यांत अव्वल आणि प्रधान वस्ती कुणब्यांची. तेथें अडाण्यांच्या साऱ्या द्वारकेची एक काय ती मेढ, आणि ती कुणबी होय. "धान्यानामष्टमो भागः षष्ठो द्वादश एव वा आददीत" इत्यादि मनुस्मृति आहे, तरी राजाने रयतेच्या उत्पन्नाचा सहावा हिस्सा भागधेय ( कर ) म्हणून घ्यावा, असा सरसकट धारा पडला असावा. म्हणूनच संस्कृतात 'षष्ठांशवृत्ति' हा राजाचा प्रतिशब्द होऊन बसला. हिंदु राजांचे अंमलांत काळी पुष्कळ आणि कुणबी थोड़े होते. तेव्हां गतकुळी अगर बेवारशी जमिनीची लागण जो करी, तोच तिजवर वारसा सांगे आणि सरकारला तिजबद्दल लढाई वगैरे धामधुमीच्या साली पिकाची चौथाई, आणि एरवींच्या सामसुमीच्या वेळी साहोत्रा देई. ह्याप्रमाणे करभार घेऊन राजे प्रजापालन करीत, ज्याला त्याला स्वकष्टार्जित संपत्तीचा भोगवटा घेण्याची सोय करून देत, आणि अपहार करणाऱ्या दुर्जनांचें पारिपत्य करीत. पुढे राजकारण वाढत जातां जातां मुसलमानी रिआसतींत जमिनीची पूर्ण मालकी राजाने आपल्याकडे ओढली असावी. कारण ' खलक खुदाका मुलख पादशहाका' (विश्व परमेश्वराचे आणि मुलूख राजाचा), 'बेटी बापाची जमीन बादशाहाची,' ह्याप्रमाणे लोक बोलू लागले. मुसलमानी राज्यकर्त्यांनी जमिनीची पहाणी व मोजणी करून सरकारसारा ठरविण्याचा प्रयत्न केला. तैमूरची वसूलपद्धति म्हणून काही ठोकळ नियम होते. शीरशहाने त्यांत सुधारणा करून जमिनीची आकारणी ठरविली. अकबर बादशहाच्या कारकीर्दीत राजा तोडरमल ह्यानें “ इलाही गज” नांवाचें जमीन मोजण्याचे प्रमाण निश्चित करून 'कानुगो' ( जमाबंदीचे मुख्य कामगार ) नेमले, आणि सर्व प्रांतांतील जमीनीचे वर्गीकरण व वसूलआकारणी केली. ह्या वसूलपद्धतीस 'असल-इ-जमा-इ-तुमार' असें नांव आहे, हिलाच दक्षिणेत 'तनखा' म्हणतात. पूर्वी तांब्याचा टक्का घेत होते. त्याऐवजी रुप्याचें तनखा नांवाचे नाणे घ्यावें असें ठरविलें म्हणून ह्या पद्धतीचें नांव तनखा असें पडलें. हिच्या अन्वयें कुलकाळी सरकारची ठरवून तिच्या उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा तीन प्रती लाविल्या, आणि रयतेने स्वामित्वाबद्दल चौथाई उत्पन्न नक्त द्यावें असा धारा घातला. राजा तोडरमल ह्याची कायम धारेबंदी लोकप्रिय झाली असा इतिहास आहे. इ. सन १६०७ ते १६२६ च्या दरम्यान निजामशाहीमधील सुप्रसिद्ध मुत्सद्दी, चांदबिबीचा विश्वासु नोकर, आणि खडकी ऊर्फ औरंगाबाद शहर वसविणारा मलिकंबर ह्याने दक्षिणची शेतवार पाहणी व मोजणी करून प्रतवारी बसविली, आणि जमिनीच्या उत्पन्नाप्रमाणे २५ हिस्सा घांसदाण्याच्या रूपानें वसूल घेण्याचा खुद्द गांवांशी ठराव केला, व वसुलाची जबाबदारी पाटलांवर टाकली. इ. सन १६१४ च्या पुढे त्याने काही ठिकाणी दरसालच्या वास्तविक उत्पन्नाच्या मानाने १३ नगदी वसूल घेण्याचा प्रघात सुरू कला. त्याने प्राचीन ग्रामसंस्थांचे पुनरुज्जीवन केलें, कुणब्यांना मिरासपत्रे देऊन म्हणजे जमिनीचे मालक बनवून त्यांना जमिनीच्या खरेदी विक्रीचे हक्क दिले, आणि पाटीलकुलकर्णी व इतर ग्रामाधिकार आणि बलुतदार ह्यांची वतने मिरास म्हणजे वंशपरंपरेची करून दिली. त्याने गांवाला पड जमिनीतून वनचराई, गायराने काढून दिला, आणि उरली जमीन ती “ गांवसंबंधी” किंवा “ गांव वर्दळ " म्हणून गांवाच्या दिमतीला लावून दिली. सरकारसाऱ्याचा ठराव गांववार - असल्यामुळे त्याची कुळवार फाळणी पाटील करी. ही वसूलपध्दतीची सुधारणा “ मालिकंबरीतह" ह्या नावाने प्रसिद्ध आहे. कुणब्याचा किबहुना कुणब्याअडाण्यांचा काळीशी एकजीव केल्यावांचून सरकारसाऱ्याची शाश्वती नाही, हे तत्त्व मलिकंबरनें पूर्णपणे हृदयांत वागविलें; आणि अझूनही लोक त्याचे गुण आठवितात. ह्याप्रमाणे तनख्यानं कुणब्याकडे किंवा गांवाकडे असलेल्या जमिनीस " मिरासी” व तिचा भोगवटा घेणारास मिरासदार, थळकरी, वतनदार, म्हणत. मेलेल्या मनुष्याची जी मिळकत त्याच्या वारसाला प्राप्त होते तिला अरबी भाषेंत "मिरास" म्हणतात. वारसहक्काने पिढ्यानपिढ्या अबाधितपणे राहाणाऱ्या जमिनीला “मिरासी" म्हणत. मिरासीच्या कोंकणी भांवडांना 'सुटी" व “धारा" म्हणतात. मिरासीखेरीज जी कीर्दसार जमीन सरकारच्या वहिवाटीला राही, तिला खालसा म्हणत. खालसा किंवा सरकारी जमिन सरकार मन मानेल त्याला काही मुदतीपर्यंत कौलाने देई. कौलाने जमिन वाहणाराला उपरी ह्मणत. कांहीं गांवांत तनख्यापेक्षा जास्त वसूल येई, तर कांहीं गांवांत सबंध तनखा वसूल होत नसे. ह्यामुळे गांवच्या हिशेबांत कोठें फाजील निघे. तर कोठे बाक्या ओढाव्या लागत. ही अव्यवस्था मोडण्यासाठी मराठेशाहीत दर गांवाहून जास्तसालबेरीज म्हणजे जास्तीत जास्ती जो वसूल आला त्याचा दाखला काढून तोच गांवच्या तनख्याऐवजी कायम केला, आणि त्याला 'कमालआकार' हे नांव दिले. कमालआकारांत कमजास्त करून सालोसाल जो ऐन वसूल करीत, त्याला 'वसुली आकार' म्हणत. कारणपरत्वें मिरासी जमिनी उपऱ्या झाल्या, आणि कौलदारांनी कुल जमिनीचा-मग तिच्यांत पेर होवो कां ती अंशतः किंवा सर्वस्वी पडित राहो-सरकारसारा देण्याच्या कबुलायती करून देऊन हळुहळू उपऱ्या जमिनी मिरासींत चढवून घेतल्या, असे दाखले मिळतात. इ. स. १८१८ सालीं असें दिसून आले की, पुण्यासाताऱ्याच्या आजूबाजूलां जिकडे तिकडे मिरासीच मिरासी जमीन; तेच आडवळणी सुभ्यांत उपरी जमिनीचे क्षेत्र उमाप होते. असो. ह्याप्रमाणे कुणब्यांचे मिरासदार आणि उपरी असे दोन विभाग झाले.
मिरासदार आणि उपरी हे कुणब्यांचे वर्गीकरण केव्हां झालें असेल तें असो; परंतु मराठेशाहीच्यापूर्वीच तें महाराष्ट्रांत सर्रास प्रचारांत होतें. तुकोबा म्हणतात, 'हे माझे मिरासी। ठाव तुझ्या पायापाशीं ॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥.' मिरासी व मिरासदार ह्यांमध्ये केवढा आत्मभाव प्रदीप्त झाला होता, हे वरील अवतरणावरून दिसून येण्यासारखे आहे. मिरासदारांचा दर्जा फार उंच मानीत. ते ठरलेला धारा देऊन वंशपरंपरेनें जमीन धारण करीत. मिरासीवरील सारा सरकारला वाढवितां येत नसे. परंतु तिच्यांत पेर होवो वा न होवो तिजवरील सरकारदेणे चुकत नसे. सारा येत असे तोपर्यंत सरकाराला मिरासदाराकडून जमीन काढतां येत नसे, आणि यदाकदाचित् त्याकडे सारा थकला तरी देखील मिरासदार तीस वर्षांवर परागंदा झाल्याशिवाय मिरास जमीन अजीबात खालसा करण्याचा सर
कारास हक्क नव्हता. मिरास जमीनीबद्दल जर खुद्द सरकारला इतका हात आंखडून धरावा लागे, तर कर्ज उगवण्यासाठी सावकाराला ती विक्रीस काढतां येत नसे, हे सांगणे नलगे. मिरासदारांप्रमाणे उपऱ्यांचा जमिनीवर निरंतरचा असा काहीएक हक्क नसे. ते सरकारांतून सालोसाल कौलानें अगर मुदतीच्या पट्ट्याने परवडेल ती पड जमीन वाहण्यास घेत असत, आणि पेरल्या जमिनीपुरती पट्टी देत. जमिनीवर त्यांचा हक्क इतकाच की, त्यांना कौलाच्या मुदतीत तिची लागण करतां येई. कौलाची मुदत संपतांच सरकारला उपरी जमीन वाटेल त्याला लावतां येत असे, आणि तिजवरील पट्टी पण वाढवितां येत असे. इंग्रजी राज्यांत मिरासी व उपरी हा भेद उडाला. आतां कुणबी वगैरे अद्याप एकमेकांना मिरासदार किंवा उपरी म्हणतात, त्याचा अर्थ इतकाच की, गांवांत फार दिवस राहिलेला तो मिरासदार, नवीन वस्तीला आला तो उपरी, बाकी दोघाचा जमिनीवरील हक्क सारखेच. इंग्रज सरकारने रयतवारी पद्धत सुरू केली; आणि सरकार व रयत ह्यांचे जमीन धारण करण्यासंबंधाने हक्क व कर्तव्य ही मुंबईच्या जमीनमहसुलाच्या कायद्याने ( इ. सन १८७९ चा ५ वा आक्ट) ठरवून टाकली. ह्या पद्धतीने प्रत्येक कुणबी थेट सरकाराकडून जमीन धारण करतो, व सरकारचा खातेदार होतो; आणि कमकसर उत्पन्नाचा सहावा हिस्सा सारा, नगदीच्या रूपाने भरतो. खातेदार आणि सरकार ह्यांच्या दरम्यान कोणीही मध्यस्थ नाही. खातेदाराने दर तीस वर्षांनी अगर कमी मुदतीने आकारण्यांत येईल तो सारा द्यावा, आणि खुशाल वंशपरंपरेनें जमीन जातीने कसून किंवा बटई, ठोक्याने (मक्त्याने) लावून तिचा उपभोग घ्यावा. सरकारसाऱ्यासाठी जमीन खालसा होते, व सावकारी कर्जासाठी ती विकली जाते. रयतेला जमीन गहाण, खरेदी देण्याची पूर्ण मुभा आहे. परंतु ह्या हक्काने पुष्कळ कुणबी कर्जबाजारी झाले, व काळी कुणब्यांकडून निघून अडाण्याकडे जाऊ लागली, हे पाहून सन
५ सध्या सुमारे पांच हिस्से लावणी ( जमीन ) कुणब्यांकडे व एक हिस्सा अडाण्यांकडे आहे.
१९०१ साली सरकारने जमीनमहसुलाच्या कायद्यांत दुरुस्ती करून असें ठरविलें आहे कीं, विशिष्ट रयतेला नवीन जमिनी देतांना अशी शर्त घालावी कीं, त्या त्यांना सरकारच्या परवानगीवांचून गहाण, खरेदी किंवा बटाईनें देतां येऊ नयेत. तेव्हां मिरासदार आणि उपरी ह्यांऐवजीं आतां कुणब्यांचे जुन्या शतींचे म्हणजे गहाण, खरेदी देणें वगैरे हक्क असणारे खातेदार, आणि नव्या शतींचे म्हणजे सदरहु हक्क नसणारे खाते- दार असे दोन वर्ग झाले आहेत.
कुणब्यानें गांव वसविलें, आणि काळी उचलली खरी; तथापि त्याचा धंदा पार पाडण्याला व प्रपंचाची अनेक कामें चालण्याला त्याला अडा- ण्यांच्या जातिपरत्वें धंद्यांची गरज होती, म्हणून कुणब्या आपल्याबरोबरच गांवांत अडाणी आणिले. त्यांत पहिल्यानें कारू, व नंतर नारू आले. कारू हा शब्द कार ( करणारा ) ह्या शब्दापासून निघाला आहे. ज्याची विद्या, कसब किंवा मेहनत,. कुणविकीला अथवा कुणब्याच्या सरकारी खासगी व्यवहाराला अवश्य असा धंदा करणारा तो कारू; आणि ज्याच्या धंयावाचून कुणब्याचें नडत नाहीं किंवा क्वचित् नडतें, असा धंदा करणारा तो नारू. कारूला बलुतदार किंवा बलुत्या आणि नारूला आलुतदार किंवा आलुत्या म्हणतात. गुजराथेंत त्यांना 'वसवईया' व तेलंगणांत 'वेट्टीबाडू' म्हणतात. कारू व नारू निरनिराळ्या जातींचे असतात, तरी ते एकमेकांना कारभाऊ नारभाऊ ” म्हणतात, आणि सर्वजण कुणब्याशीं मायलेकरांचें नातें लावतात. कुणविकीच्या व समस्त गांव- कीच्या सामान्य तसेंच गांवकऱ्यांच्या विशेष गरजा भागविण्यासाठीं कारू नारू जीं आपल्या जातिविहित' कसबानुसार काम करतात, त्यांजबद्दल मेहनताना म्हणून त्यांना दरोबस्त कुणब्यांकडून जो पिकाचा वांटा वंशपरंपरेनें मिळतो, त्याला अनुक्रमे बलुतें आणि आलुतें म्हणतात. बलुत्याआलुत्यालाच आय, घुगरी, पेंढीकाडी, सळई,. भिकर्णे, शेर, हक्क, इत्यादि प्रतिशब्द आहेत. ज्यांना बलुते मिळतें ते
बलुतदार, व आलुतें मिळते ते आलुतदार होत. बलुतें अर्थातच आलुत्यापेक्षा अधिक असते. कुणब्यांना ज्या बलुतदारांचा जितका उपयोग त्या मानाने त्यांची प्रतबंदी लागून त्यांचे तीन वर्ग झाले आहेत. अशा वर्गाला 'ओळ' किंवा 'कांस' म्हणतात. पहिल्या वर्गाला 'थोरली' दुसऱ्याला 'मधली' व तिसऱ्याला 'धाकटी' ओळ किंवा कास म्हणतात. कांस म्हणण्याचा प्रघात पडण्याचे कारण असे की, कुणबी हा गाय, व बलुतदार ही वासरे मानलीं आहेत: आणि ही वांसरें आपापल्या पाळीप्रमाणे कांसेला लागतात. कुणबिकीला सर्वात जास्ती ज्यांचा उपयोग ते बलुतें पहिल्याने कासेला लागतात. आणि यथेच्छ जोगवतात, म्हणजे सर्वांत अधिक बलुतें त्यांना मिळते. पहिली ओळ आंखडल्यावर दुसरी ओळ सुटणार, म्हणून तिला पहिलीपेक्षा कमी दूध पिण्याला ( बलुते ) मिळते. तिसऱ्या ओळीची पाळी शेवटी येते. सबब तिचा वाटा सर्वात कमी असतो. गाय, तिची कांस, वासरे हें रूपक आणि कुणब्याचे बहुमानाचें नांव "बळी" ह्यावरून तर्क चालविला तर बलुत्या म्हणजे बली-अपत्य अशी व्युत्पत्ती सिद्द होते. बळाने म्हणजे हक्काने ऐन जिनसी उत्पन्न मागणारा तो बलुत्या, आणि आलेला आगंतुक म्हणून लोभाखातर किंवा धर्म म्हणून पसा मागणारा तो आलुत्या असेंही या शब्दांचे मूळ असू शकेल. मोहबत या शब्दाच्या अर्थाने देशावर 'अलुलकी' हा शब्द वापरतात. जसें "त्याचा कांहीं हक्क नाही पण चार ताटे घेऊन जा म्हणून अलुलकीने बोलावले,” असें कुणबी बोलतात. बलुतदारांना आपापल्या ओळीचें बलुतं हक्काने मागतां येते, व मिळतंही. बलुतदारांप्रमाणे आलुतदारांच्या ओळी नाहीत. साधारणतः पाटील, कुळकर्णी सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव,कोळी, ह्यांना बारा कारू किंवा बलुतदार म्हणतात. तेली, तांबोळी, साळी, सनगर, शिंपी, माळी, गोंधळी,डौऱ्या, भाट, ठाकर, गोसावी, जंगम, मुलाना, वाजंत्री, घडसी, कलावंत, तराल किंवा कोरबु, भोई,
वगैरेंना अठरा नारू किंवा आलुतदार म्हणतात. स्थल-कालपरत्वें आलुत्ये बलुत्यांत चढले व बलुत्ये आलुत्यांत उतरले, आणि कोठे कोठे उपरिनिर्दिष्ट कारूनारुंपैकी काहींना आलुत्याबलुत्यांच्या पंक्तीत मुळीच थारा नाही. बहात्तर रोग आहेत असे म्हणतात, त्याप्रमाणेच गांवाला बारा बलुत्ये व अठरा आलुत्ये असें म्हणण्याची वहिवाट आहे. बाकी वस्तुस्थितीचा ह्या संख्येशी मेळ नाही, हे कारूनारूंची विस्तृत यादी गांव-मुकादमानी ह्या प्रकरणांत दिली आहे, तिजवरून स्पष्ट होते.
गांवचे आंधळे, पांगळे, महारोगी वगैरे विकल व पंगू लोक हक्कदार भिक्षुकाप्रमाणे काळी-पांढरी उकळून आपला निर्वाह करतात; आणि एकप्रकारे हक्कदार बनतात. सर्व गांवकऱ्यांना, मग ते कोणत्याही धंद्यावर पोट चालवोत, वतनदार ही सामान्य संज्ञा आहे. वरील स्थाईक वतनदारांखेरीज गांवाला ओवांड्याचे (परगांवचे) फिरस्ते वतनदार असतात. सर्व प्रकारचे व दर्जाचे व्यापारी, निरनिराळे तीर्थोपाध्याय, मंदिरवाले, दरगेवाले, फिरस्ते, हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे, भिकार, चोरटे, वगैरे लोकांचा ज्या गांवांशी वंशपरंपरेचा संबंध जडतो, ते ती गांवें वांटून घेतात; आणि वांटणीच्या गांवांत आपला रोजगार पिढ्यानपिढ्या चालवितात. तेही आपणांला वतनदार म्हणवितात, आणि गांवचे स्थाईक वतनदार त्यांना याच नात्याने वागवितात. कदीमच्या फिरत्या वतनदारांप्रमाणे उपलाणी गोसावी, बैरागी, फकीर, जंगम, मानभाव, आंधळे, पांगळे वगैरे भिक्षुक, गोपाळ, कोल्हाटी, गारोडी, ह्यांसारखे तमासगीर कांहीं गांवीं कायमची वस्ती करून वतनदार झाले आहेत. काहीजण फिरता फिरतां कमाईची गांवें टेहाळून ठेवतात, आणि वर्ष दोनवर्षी त्या गांवीं टाकले उतरतात. ह्याप्रमाणे पायरवा घालून ते हळुहळू वतनदार बनतात, ते इतके की लोक त्यांची मुदतीप्रमाणे वाट पाहतात, आणि ते आले नाहीत, तर हळहळतात. एका गांवीं फार दिवस राहिलेल्या एका ख्रिस्ती पालकाने आपण करीत असलेल्या लोकसेवेबद्दल आपला तीन चार महिन्यांचा पंचेचाळीस की साठ रुपये पगार सदरहु गांवांत पट्टी करून काढल्याचे ऐकिवांत आहे. गांवगाड्यांतलें भरित किती ठेललें आहे, वाटेल त्याला त्यांत आपलें चंबू गबाळे टाकून कसा पाय रोवता येतो हे खेड्यांचे निरीक्षण करणाराला तेव्हांच ताडतां येईल. राजकीय, धार्मिक व सामाजिक स्थित्यंतरें, आपल्या समाजाची पुराणप्रियता, वृत्तिछेदाची भीति, धर्मादायाची कल्पना, धौताल कारभार आणि मागणाराची चिकाटी, स्वाभिमानशून्यता, व सतरा सोंगे करून धान्य, पैसा अगर वस्त्र उकळण्याची शिताफी ज्यांना माहित आहे, त्यांना हे सांगण्याची गरज नाहीं की, गांवें उकळून खाणारांची संख्या कित्येक शतकांपासून सारखी वाढतच आहे.
वतन हा शब्द 'वर्तन' (उपजीविकेचे साधन) ह्या संस्कृत शब्दापासून निघाला. राहण्याच्या जागेला आरंबी भाषेत वतन म्हणतात. जातधंदा, वंशपरंपरागत काम, चाकरी, नेमणूक, उत्पन्न, अधिकार, मानपान, हक्क, वडिलोपार्जित मिळकत, स्थावर अगर स्थावराच्या योग्यतेची जंगम मालमत्ता, जन्मभूमि ह्या सर्वांना वतन शब्द लावतात. वतन धारण करणारा तो वतनदार. गांवच्या वसुलावर, पिकांवर, हर जिनसावर, देऊळ दरग्यासारख्या धर्मादायावर, किंवा गांवकऱ्यांच्या संस्कारांवर, धर्मकृत्यांवर, ज्यांचा थोडा फार पिढ्यानपिढ्या अगर व्यक्तिविशिष्ट निरंतर किंवा काही काळपर्यंत हक्क आहे, ते सर्व वतनदार होत. ज्या गांवीं जो कायमची वस्ती करून रहातो, जमीनजुमला करतो, कालविशेषीं धंद्यानिमित्त अगर भिक्षेनिमित्त फेऱ्या घालतो, तो सुद्धा आपणाला त्या गांवचा वतनदार म्हणवितो. वतनदारांच्या गावसंबंधाच्या परस्पर व्यवहाराला आणि वतनदारांच्या जगद्व्यापी जाळ्यांत गुरफटलेल्या गांवच्या समाईक अंतर्बाह्य व्यवहाराला 'गांवकी' किंवा 'गांव-गाडा' असे म्हणतात. तेव्हां गांव-गाड्यात समाविष्ट झालेल्या सर्वांना आपण त्याचे भरित म्हणूं.
जातिधर्मबद्ध सामान्य जनाची नजर 'मी व माझें कुटुंब' ही कोंडी फोडून निघाली ती गांवकुसाला अटकली, आणि देशाभिमानाची जागा ग्रामाभिमानाने पटकावली व तोही पुढे वतनलोभांत लय पावला. आतांप्रमाणे प्रवाससौकर्य, व्यापारविस्तार, आणि नियमबद्ध कारभार व तो चालण्यास जरूर तें राजबल ह्यांचा भरपूर आश्रय नसल्यामुळे आपापले उद्योगधंदे आणि प्रपंचाचे नित्य व्यवहार अव्याहत चालूं ठेवण्यासाठी खेड्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी होणें अवश्य झालें. हमेषचा सर्व प्रकारचा व्यवहार गांव आपल्या अखत्यारीवर करी, आणि राजाधिकारी किंवा धर्माधिकारी त्यांत क्वचित् चित्त घालीत. जीवित किंवा वित्त संरक्षण करण्याच्या कामी शिवभावांचे किंवा राजाधिकाऱ्यांचे वेळेवर सहाय्य मिळेलच असा भरंवसा नव्हता. त्यामुळे गांवावर जी धोंड येई तिचे ओझें सर्व गांवानें समाईक उचलण्याखेरीज गत्यंतर नव्हते. ज्या गांवाला बाजार नसतो, किंवा असूनही वेळेवर सौदा मिळण्याचा संभव नसतो तेथले धोरणी संसारिक जसे सवडीनुसार हरएक वाण संपादन करून लावून ठेवतात आणि वेळेवर काढतात; त्याप्रमाणे गांवगाड्याच्या योगक्षेमासाठी जरूर ते राजाधिकारी, धर्माधिकारी, ग्रामरक्षक, हुन्नरी, मजूर, मनोरंजन करणारे, त्यानें आपले संग्रहास वंशपरंपरेनें ठेवले. खरे पाहूं गेलें तर प्रत्येक गांव हा एक तुटक जनसमाज किंवा स्वतंत्र राज्यच झालें, आणि राज्यांतील इतर विभागांशी त्याचा इतका कमी संबंध येत होता की, तो असून नसल्यासारखा होता. सिंधप्रांतीं गांव वसविणाऱ्या घराण्यांना समुच्चयाने राज ( राज्य ) म्हणतात. ही गोष्ट वरील विधानाच्या प्रत्यंतरादाखल लक्षांत घेण्याजोगी आहे. सबंध काळी-पांढरीची सामाजिक व राजकीय जबाबदारी गांवाने सर्व मिळून घ्यावी, होतां होईल तोपर्यंत त्याला कोणत्याही कारणाने परगांवापाशी किंवा खुद्द सरकारापाशी सुद्धा तोंड वेंगाडण्याची गरज पडूं नये हे ध्येय सतत डोळ्यापुढे ठेवून आमच्या पूर्वजांनी गांवगाडा भरला, आणि त्यांना तो अंतर्बाह्य व्यवहारांत जितका स्वयंसमाविष्ट करता आला तितका करण्यांत त्यांनी यत्किंचित् कसर केली नाही. म्हणून तो पूर्वीच्या बेबंदशाहीतून वांचून निघाला. ह्या गांवाचें त्या गांवाशीं वांकडे नसलें१ तर नशीब समजावयाचें. "गांवचा बळी गांवींच बळी पऱ्या गांवीं गाढवें वळी ” ह्या म्हणीवरून गांवगांवचे लोक परगांवच्या लोकांशीं कसे वागत ह्याचा उलगडा होतो. जें तें गांव आपल्यापुरतें पाही. अनेक गांवें किंवा सबंध प्रांत ह्यांचें लोकोपयोगी कामांत सहकार्य पाहण्याचा सुयोग विरळ. उलट परदेशस्थांना असें अनेक वेळीं दिसून येई कीं, एखाद्या गांवाच्या सुड्या जळाल्या, तर आसपासचीं गांवें आपलें धान्य त्यांना न विकतां दाबून धरीत; आणि शेजारच्या गांवावर आपआपल्या शेतांनीं नांगर कुळव हांकीत. राजकीय विभागांसंबंधानें गांवचा हात महालाला, महालाचा सुभ्याला आणि सुभ्याचा राज्याला लागला तरी तो पुण्याहवाचनापुरताच. एकमेकांनीं एकमेकांला कडकडून कवटाळलें व ओढून घेतलें आणि चिरकालीन विस्तृत सार्वजनिक हितसंबंध निर्माण केले असें क्वचित झालें. ह्यामुळे एक राज्य जाऊन दुसरें आलें म्हणून गांवच्या दिनचर्येत दिसण्याजोगा बदल झाला, किंवा गांवकरी गांवकीपलीकडच्या विचारांत निमग्न झाले, असें बहुधा होत नसे. ज्याप्रमाणें अनेक पिढ्या वरून आल्या व गेल्या तरी उंबरा आपल्या ठिकाणच्या ठिकाणींच, त्याप्रमाणें राज्यांच्या अनेक तऱ्हा व उलथापालथी झाल्या, तरी गांवगाड्यानें आपलें ठिकाण सोडलें नाहीं. त्याचे गुणावगुण कांहीं असले तरी हें कबूल केलें पाहिजे कीं, गांवगाडा हा राज्यव्यवस्थेचा आदि घटक, आणि अनेकविध धर्मव्यवस्था व समाजव्यवस्था ह्यांचा प्रधान घटक अनेक शतकें होऊन बसला आहे; आणि आजला सुद्धां त्याची ही पदवी कायम आहे. कारण हिंदीस्तान हा शह-
१ पूर्वकालीन शेजार वैराचे स्मारक म्हणून नगर जिल्ह्यातल्या कोपरगांव तालुक्यांतील संवत्सर व कोकमठाण या दोन गांवांतल्या लोकांमध्यें अद्याप दरसाल अक्षय्य तृतीयेस गोफणधोंड्याची लढाई होते, व कांहीं डोकीं फुटतात. अशी लढाई न केली तर पीक जातें, असें तेथील लोक मानतात म्हणून ते राजीखुशीने लढतात. हत्यारे होती तेंव्हा ते हत्यारांनी लढत असत. रांचा देश नसून खेड्यांचा देश आहे. गेल्या मनुष्यगणतीने हेच सिद्ध केले आहे. दहा हजार व वर लोकसंख्येची शहरें अवघ्या देशांत सत्तावीस असून त्यांत देशांतील एकंदर लोकसंख्येपैकी शेकडा २.१४ लोकवस्ति आहे. पांच हजारांवरील शहरांच्या वाट्याला अजून लोकसंख्येचा दहावा हिस्सा सुद्धां येत नाही. शेकडा नव्वदांवर लोक खेड्यापाड्यांनी राहतात; आणि निम्याहून अधिक जनता एक हजार लोकसंख्येच्या आंतील सहा लाख खेड्यांत कालक्रमणा करते. सरसकट शेकडा दहा लोक जरी शहरांत राहतात, तरी कोण्याना कोण्या खेड्यांत त्यांना वतन नाही असे शहरवासी आपल्या देशांत विरळा. तेव्हां सबंध हिंदीस्तान गांवगाड्यांत भरले आहे, असे म्हटले असतां आठ हात लांकूड आणि नऊ हात ढलपी असा आरोप खास येणार नाही. तरी तो कसा काय चालला आहे ह्याची पूसतपास करूं.