वतन-वृत्ति.
----------------

 कोठेही केव्हाही जा, बापाचा धंदा मुलाने उचलला नाही, असें कचित् दृष्टीस पडते. बहुतेक ठिकाणी व प्रसंगी असेंच पाहाण्यांत येतें की बाप वैद्य असला तर मुलगाही वैद्यकी करतो; बाप सराफ किंवा जव्हेरी असला, तर मुलगाही बापाची गादी चालवितो. बापाचा कारकुनी किंवा शिपाई पेषा असला तर मुलगाही कलमबहाद्दर किंवा तरवारबहादर होण्याची ईर्षा धरितो. लक्षावधि धंदे अस्तित्वात असतांना व त्यांत हरघडी शतशः भर पडत असतांना आणि ते शिकण्याची साधने व सोयी विपुल व मुक्तद्वार असतांना जर आज आपणाला असें स्पष्टपणे दिसते की, मुलाचा ओढा बहुधा बापाच्या धंद्याकडे असतो, मुलाने आपला धंदाच पुढे चालवावा असा मनोदय बापाचाही असतो, आणि त्याप्रमाणे उभयपक्षी तयारी करतात; तर जेव्हां धंदे थोडे आणि त्यांचे ज्ञान मिळविण्याची सार्वजनिक साधने व सोयीही थोड्या व एक घरी होत्या, अशा प्राचीन काळांत बापाच्या धंद्याची माळ मुलाच्या गळ्यांत सर्रास पडे, ह्यांत नवल ते कोणतें? पुष्कळ धंदे वंशपरंपरेने चालतात ह्याचे मुख्य कारण हे की, मुलाला वडिलार्जित मिळकत आयती मिळते, त्याचप्रमाणे वडिलार्जित धंद्याचे बरेचसें ज्ञान त्याला बसल्याजागी अनायास प्राप्त होते. जातां येतां वडिलांचे काम नजरेखालून जाते, त्यासंबंधाने ते काय बोलतात हे उंबरा न ओलांडतां कानी पडते, आपण ते काम करूं म्हटल्यास सर्व सामुग्री घरच्या घरी सिद्ध असते, आणि त्याचे वर्म समजून घेण्याचे मनांत आणिल्यास कळकळीचा सांगणारा तत्पर असतो. म्हणतातना, जांवयाबरोबर जेवावे व मुलांबरोबर शिकावें. प्रत्यक्ष बापापेक्षा अधिक हितचिंतक विद्यागुरु कोण भेटणार? धंद्याला काय लागते, खरी मेहनत व कूस किती ह्याचा खडानखडा माहीत   असल्यामुळे, आणि धंद्याची सर्व प्रकारची पूर्व तयारी करून बसल्यामुळे नव्हे तो अगोदरच रेघारूपास आणिल्यामुळे वडिलांनाही असे वाटणे सहाजिक आहे की, मुलाने तोंडांत आलेला घांस टाकून नवा पाव नवा डाव न करता आपल्याच धंद्यांत पडावें. ह्याप्रमाणे सौकर्याच्या दृष्टीने वडिलार्जित धंदे चालविण्यास चालू व भावी पिढ्या सारख्याच आतुर असतात, आणि समाजही ह्या स्थितीस अनुकूल असतो असे म्हटले तरी चालेल. विशेष कारण नसतांना कारखानदार आणि कारखाने वरचेवर बदलले तर, कालावधीने, अनुभवाने किंवा अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या कसबास व प्राविण्यास समाज मुकतो. जोपर्यंत कसब सोपें व साधे असते आणि त्यांत कलाकुसरीचा व व्यक्तिसंपादित प्राविण्याचा भाग फारसा नसतो, तोपर्यंत वंशपरंपरेने धंदे अव्याहत चालले तरी समाजाच्या गरजा विशेष अडचण किंवा तोटा न येतां भागतात.
 आमच्यांत अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या धंदे चालविणारी विवक्षित घराणी केवळ समाजसुव्यवस्थेसाठी निघाली, आणि जरी ती मूळची एकाच समाजांतली किंवा त्या समाजांत अंतर्लीन झालेली असली, तरी कालांतराने आद्य ऐक्याची भावना कमजोर आणि विभक्तपणाची भावना बलवत्तर होत जाऊन त्यांचे वेगवेगळाले संघ झाले. हेच आमचे वर्ण होत. पूर्वीची वर्णव्यवस्था सैल असून तिच्यामध्ये धंद्याची अदलाबदल करण्यास किंवा अमुक धंदा करणाऱ्या आईबापांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे त्यांचा धंदा सोडून दुसरा धंदा करण्यास मनाई नव्हती; म्हणजे वर्णव्यवस्था जन्मसिद्ध नव्हती. पुढे जसजसा समाज वाढला व पांगला, तसतशी ह्या संघांची बंधनें एकमेकांपासून दुरावत गेली, आणि भिन्न भिन्न आचार रूढ होत गेले. त्यांपैकी कांहीं आचार केवळ यदृच्छेनें, कांहीं व्यवसायपरत्वे, कांही देशकालमानाने व काही मतभेदानें प्रचारांत आले असले, तरी त्या सर्वांना व त्यांना मूलभूत जो व्यवसाय त्याला धर्माचें स्वरूप येऊन वर्णाश्रमधर्म सर्वसामान्य धर्माच्या जोडीला येऊन बसला. सामान्यापेक्षा विशेषाचे जेथल्या तेथे माहात्म्य जास्त असते, ह्या नियमानुसार ज्या त्या वर्णातले लोक सामान्य धर्मापेक्षा आपापल्या वर्णविशेष धर्माला जास्त भजू लागले. धंद्याच्या स्वरूपावरून एक धंदा दुसऱ्या धंद्यापेक्षा अधिक पवित्र व मानार्ह अशी धंद्यांची प्रतवारी लागून अखेर एकाच धंद्यांतील-अमुक काम उच्च व शुद्ध किंवा सिद्ध अशी त्यांतल्या त्यांत कामांची वर्गवारी लागली. ह्यामुळे वर्णाश्रमधर्माची विभक्तता दृढ होऊन पूर्वीच्या एकजीव समाजाचे लोक निरनिराळ्या वर्णात व उपवर्णात एकमेकांपासून तुटक नांदू लागले; आणि ज्याने त्याने आपापल्या वर्णीतच शरीरसंबंध व अन्नव्यवहार केला पाहिजे, ज्याचा ज्या वर्णात जन्म त्याच वर्णाचा व्यवसाय त्याने वर्णधर्म म्हणून केला पाहिजे, इतर व्यवसाय करणे अधर्म होय, असले कडक नियम अमलांत आले. त्यांनी प्रथम समाजांतील सर्व वर्णात होणारा बेटीव्यवहार नंतर रोटीव्यवहार नंतर शिवताशिव कमी केली; आणि चार वर्णातून अनेक उपवर्ण ऊर्फ जाती उत्पन्न केल्या. वर्णांप्रमाणे जातिजातींचेही विवक्षित धंदे व आचार पडत गेले, आणि ते जातिधर्म म्हणून ज्या त्या जाती पाळू लागल्या. जातींतल्या काही लोकांनी कांहीं धंद्यांतून किंवा मूळ धंद्याच्या घाणेरड्या किंवा त्रासदायक भागांतून अंग काढून घेतले. तसें ज्यांनी केले नाही किंवा असली कामें ज्यांनी पत्करली, त्यांच्या कमी दर्जाच्या पोटजाती बनूं लागल्या. वर्णातून ज्या कारणांनी जाती निघाल्या, त्याच कारणांनी जातींतून पोटजाती निघाल्या, आणि रूढीने सर्व व्यवसाय, पोटव्यवसाय व त्यांतील निरनिराळी कामें ह्यांना जातिधर्माचे स्वरूप देऊन टाकले. ही समाजविभंजक परंपरा जाति पोटजातींवर मुक्काम करती तरी बरे होते. एखाद्या जातीने दुसऱ्या एखाद्या जातीचा किंवा पोटजातीचा व्यवसाय किंवा आचार उचलला, किंवा जाणून बुजून अथवा नकळत आचारस्खलन केलें, किंवा मूळ धर्माहून किंचित भिन्न असा एखादा उपधर्म किंवा संप्रदाय पत्करला, किंवा शेजारी नांदत असलेल्या परधर्माच्या मतांपैकी किंवा उपासनेपैकी एखादा भाग स्वीकारिला, की त्या जातींत अगर पोटजातींत तट पडत; व तेवढा आचार, व्यवसाय, संप्रदाय, धर्ममत अगर उपासना ह्यांपुरता स्वतंत्र पंथ निघे, व अजूनही हेच चालले आहे. इतर व्यवहारांत सामान्य जात त्याला दूर धरीत नसे व नाही. परंतु अल्पसंख्याक समाज आपले हितास अतिशय जपतात असा नियम आहे, त्याप्रमाणे नवीन पंथच जातीच्या सामान्य हितापेक्षा आपल्या हिताकडे जास्त लक्ष देतात व वेगळं होण्याचे तयारीस लागतात. ह्याप्रमाणे समाजाचे तुकडे होता होतां शेवटी निरनिराळे कुलाचार पडत जाऊन ते कुलधर्म होऊन बसले; आणि एरवी सर्व प्रकारें एक अशा कुळांत सुद्धा फूट पडली व बारा पुरभय्ये आणि चौदा चुली अशी समाजाची स्थिति झाली. जातींच्या किंवा पंथांच्या विभक्तपणाच्या सहस्रावधि कारणांचा शोध केला तर तो अतिशय बोधप्रद व मनोरंजक होईल, आणि त्याची छाननी करून त्यांतील तथ्यांश समाजापुढे सप्रमाण मांडला तर जातिभेदाची तीव्रता कमी करण्यास त्याचा पुष्कळ उपयोग झाल्यावांचून राहणार नाही.

 अगदी वरवर पाहणाराला सुद्धा ही गोष्ट कबूल करावी लागेल की, ब्राह्मणादिकांच्या बहुतेक जाती वस्तिपरत्वें झाल्याः- मारवाडी ब्राह्मण, कोंकणी मराठा, गुजराती न्हावी, परदेशी कुंभार इत्यादि. ज्या ब्राह्मणांनी नागवेलीची पानें खुडण्याचे टाकून दिले नाही त्यांची तिरगुळ ब्राह्मण म्हणून एक पोटजात झाली. ज्या क्षत्रिय-वैश्यांनी विधवावपन, पुनर्विवाह वगैरे चालू केले ते आपल्या वर्णबंधूंतून फुटून बाहेर पडले. गुरव, भोप्ये, गोंधळी, आराधी, भुत्ये, भराडी, डोरे गोसावी, वाघ्ये वगैरे पुजारी जातींचे भेद देवदेवतांवरून झालेले दिसतात. शंकराची पूजा प्रमुखत्वें गुरव करतात, तशी देवीची भोप्ये, गोंधळी, भुत्ये किंवा आराधी, भैरवाची जोतीबाची भराडी किंवा डौरे गोसावी, खंडोबाची वाघे करतात. पिराला भजणारे व मानभावाचा अनुग्रह घेतलेले लोक ब्राह्मणेतर जातींत पुष्कळ आहेत, आणि त्यामुळे त्यांचे वेगवेगळाले पंथ झाले आहेत. पांचाळांकडे पाहतां सोनार, तांबट, कासार, लोहार, जिनगर, घिसाडी, ह्या जाती धातूंवरून पडल्या असाव्यात. सुतार, बुरूड, साळी, कोष्टी, चवाळे विणणारे सनगर, धनगर, ह्या जाती धंद्याला लागणाऱ्या निरनिराळ्या जिनसांवरून पडलेल्या दिसतात. ढोर, चांभार, महार, होलार व मांग चामड्याच्या मुख्य धंद्याची पोटकामें करतात, तरी त्यांच्या जाती निराळ्या आणि त्यांतही उच्चनीच भाव आहे. ज्या ढोरांनी जोडे करण्याचे काम पत्करलें ते चांभार झाले; आणि ज्या चांभारांनी महारमांगांचे सुद्धा जोडे करण्याचे पत्करलें ते होलार झाले. महार संबळ वाजवितील पण कड्यावर थाप मारणार नाहीत. मांग कडे वाजवितात पण ढोल किंवा डौर वाजविणे कमी दर्जाचे समजतात, तो मांग गारोडी वाजवितात. भिल्ल, कोळी ह्यांसारख्या अनार्य जातींनी आर्यांना विरोध केला, आणि त्या लूटमार करून राहिल्या. त्यांना आर्यातले दुराचरणी लोकही मिळाले असावेत. आज ज्या अनेक गुन्हेगार जाती आपणांला दिसतात त्या दुराचारी आर्य-अनार्य व संमिश्र जातींचे वंशज होत. गुन्हे करणे हा आपला जातिधर्म आहे असें सदर जाती मानतात. क्षेत्रशुद्धीबद्दल प्रत्येकाला काळजी असते, तरी या न्यूनताप्रचुर जगांत व्यभिचारी लोक असावयाचेच. आपल्या जातीची नीति बिघडू नये म्हणून वरिष्ठ जातींनी आपल्या कामवासना कनिष्ठ जातींतल्या स्त्रियांकरवीं तृप्त केल्या, किंवा आपल्यांतल्या मोळा सुटलेल्या स्त्रियांची स्वतंत्र जात होऊं दिली. ह्यामुळे खानदेशकडील हरदास, बऱ्हाणपुराकडील रामजानी व गंगथडीकडील कोल्हाटी ( कुलटा = निसवलेली स्त्री. ) आणि मुसलमानांतील कसबी वगैरेसारख्या जारकर्में करणाऱ्या जाती निर्माण झाल्या. व्यभिचार हाच आपला जातिधर्म असें ह्या जाती मानतात. मुसलमानांचें पाऊल हिंदीस्तानांत पडण्यापूर्वा गुरे मारण्याचे काम हिंदू खाटिक करीत. मुसलमान दृष्टीस पडल्याबरोबर त्यांनी ते सोडले आणि मुसलमान खाटिकांना 'मुलाना' हा किताब देऊन बकरें लावण्याचें ( कापण्याचे ) काम त्याच्या गळ्यांत अडकविलें. विशेषतः असे दिसून येते की, मूळ जातींतल्या धंद्यांतली त्रासदायक व ओंगळ कामें भिन्न भिन्न जातींतल्या मिश्र शरीरसंबंधाच्या अपत्यांनी व नवीन धर्मानुयायांनी पत्करली. वर सांगितलेल्या व त्यांसारख्या अनेक कारणांमुळे जातींची संख्या व कोंडी बेसुमार वाढली, आणि जातिभेदाची मुळेपाळे लोकाचारांत इतकी खोल गेली की, जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या महंमदी व ख्रिस्ती धर्मांना सुद्धा ह्या कामांत तोंड फिरवावे लागले आहे. लाखों हिंदूंनी महमदी व ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली तरी त्यांच्या गळ्यांतलें जातिभेदाचे लोढणे सुटलें नाही. आतार, मण्यार, झारेकरी, कंजार, तेली, धोबी, मोमीन, तांबोळी, कसई, मदारी, दरवेशी, बंदरवाले, कसबी, कटई, हलालखोर वगैरे कनिष्ठ गणलेले धंदे करणाऱ्या मुसलमान जातींचा व वरिष्ठ जातींच्या मुसलमानांचा बेटीव्यवहार होत नाही. ब्राह्मण ख्रिस्ती, साळी ख्रिस्ती, महार ख्रिस्ती, मांग ख्रिस्ती असले भेद लग्नसंबंधांत हिंदी ख्रिस्ती पाळतात. समाजसुधारकांना जरी पुष्कळसे जातिभेद अनवश्यक दिसतात तरी त्यांना फांटा देणें अनेक वर्षांच्या वहिवाटीमुळे दुर्घट झाले आहे. अनेक जातींत अनाचार, दुराचार व दोष ह्यांना जातिधर्माचे स्वरूप आल्यामुळे ज्या त्या जातीला व एकंदर समाजाला त्यांतला वावगा प्रकार दिसेनासा झाला आहे. तसेंच जातीजातीत-आचारविचारांचे अंतर कसें व किती दुरावलें आहे, आणि जातिधर्मामुळे जातिभेदाचा कोट दुर्भेद्य होऊन पर्वताच्या तुटलेल्या कड्याप्रमाणे हिंदु समाजांतल्या जाती एकमेकांपासून बहुतांशी कशा सुटावल्या आहेत हे गुन्हेगार व व्यभिचारी जातींवरून चांगले स्पष्ट होतें.

 प्रत्येक समाजाला असे वाटत असते की, आपण स्वयंपूर्ण असावें व कोणत्याही गोष्टींत दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिण्याची पाळी आपणावर येऊ नये. त्यांतून हिंदु समाजांतील जाती व पोटजाती एकमेकांपासून बहुतेक बाबतींत अलग झाल्यामुळे स्वयंपूर्ण असण्याची आवश्यकता त्यांना विशेष भासू लागली. जातिपरत्वें जरी सरकारी, खासगी धंद्यांची वाटणी झाली आणि एकीचा धंदा दुसरी सहसा करणार नाही असा आळा पडला, तरी सबंध जातीचा ओघळ होतां होईल तो जातीबाहेर जाऊं देऊं नये ही कल्पना बहुजनसमाजांत अत्यंत दृढमूल झाल्याने प्रत्येक जातीने, पोटजातीने किंवा पंथानें, कांहीं राजकीय, धार्मिक व सामाजिक अधिकार राजाला, धर्माधिकाऱ्यांना किंवा सर्वसामान्य समाजाला अर्पण न करता आपले हाती राखून ठेविले. त्यामुळे पुष्कळ बाबतींत जातीच्या लोकांचा राजा व धर्माचार्य जातच राहिली. लोकसत्तात्मक राज्यपद्धतींत लोकच आपले राजे असतात, तरी पण धर्मसंस्कारांवरील अधिपत्य धर्मगुरूकडे असते असें बहुधा पाश्चात्य देशांत आढळून येते. ह्या नियमाला हिंदु समाजांत मात्र काही अपवाद नजरेस पडतात. अठरा वर्णाचे नामधारी गुरु जरी ब्राह्मण असले तरी ब्राह्मण, मराठे, सोडून प्रत्येक जातीला गुरु व भिक्षुक आहेत; व ते त्यांचे अनेक धर्मसंस्कार चालवितात. उदाहरणार्थ, मिरजगांव परगण्याच्या माळ्यांचे. 'माळगण' आडनांवाचे भिक्षुक आहेत; आराधी, भुत्ये ह्यांचा भोप्या (गुरु) 'कदम' ( मराठा ); ढोरांचा गुरु 'घोडके'; महारांचा मागता (भिक्षुक ) 'ढेगुजी मेघुजी'; मांगगारोड्यांचा ‘डक्कलवार'. लग्नापेक्षा मोठा संस्कार कोणता असावयाचा ? शास्त्रांनी त्याला धर्मसंस्कार ठरविला आहे. म्हणून वास्तविक लग्न धर्माचार्यांनी लावावयास पाहिजे.. परंतु फांसपारधी, कोल्हाटी, कुंचीवाले, वड्डर, गोंड वगैरे हिंदु जाती कोणत्याही धर्माचार्याकडून लग्न न लावितां जातपंचांकडून लावतात. जातीचे समायिक बोभाटे जातगंगेने किंवा दैवानें मिटवावेत, त्यांत जातिबाह्य व्यक्तीचे किंवा संस्थेचे बोट शिरूं देऊं नये; येवढेच नव्हे, तर ज्या भानगडी जातिविशिष्ट नसून निवळ व्यक्तिविषयक आहेत किंवा ज्यांचा संबंध इतर जातींशीही तितकाच पोंचून त्यांनाही ज्या सामान्य आहेत, त्या देखील जातीने मिटवाव्यात असा निर्णय हिंदु समाजाने ठरविला; आणि तो धर्माध्यक्षांनी व प्राचीन राजांनीही मान्य केला. एखाद्याने काही दुष्कर्म केलें, जमातीच्या आचाराविरुद्ध किंवा ठरावा विरुद्ध आचरण केलें, जातिसंप्रदायाविरुद्ध लग्न लावले, प्रेतसंस्काराच्या प्रसंगी मदत केली नाही, जमातीने मागितलेली वर्गणी दिली नाहीं, एखाद्या मानार्हाचा उपमर्द केला, तर जात त्याला शासन करते व पावनहीं करते. जेथे एका जातींतील एक अगर अनेक व्यक्तींचा किंवा सबंध जातीचा संबंध दुसऱ्या एक किंवा अनेक जातींशी किंवा सबंध समाजाशी अथवा राजाशी पडे तेथें जातींतील विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा सबंध जातीबद्दल जबाबदारी अवघ्या जातीवर टाकीत, आणि जातगंगा ती पार पाडी. तथापि जेव्हा एखादा इसम माजून जातीला मोजीनासा होई, तेव्हां धर्माध्यक्षाकडे अगर राजाकडे धाव घेऊन त्यांचे मार्फत जात आपल्या कायद्याची अंमलबजावणी करून घेई. धर्माध्यक्षाची आज्ञा जी जात किंवा जातींतील व्यक्ति उल्लंघी, तिचे पारिपत्य धर्माध्यक्ष राजाकडून करवीत. सारांश, ज्याप्रमाणे गांवकऱ्यांच्या बहुतेक सर्व राजकीय, धार्मिक व सामाजिक कृत्यांची जोखीम गांवगाडा उचली, त्याचप्रमाणे जातभाईच्या कृत्यांचा जिम्मा जात घेई; आणि लोकांवर राजा व धर्माध्यक्ष ह्या दोघांपेक्षाही खराखुरा अंमल जातीचा व गांवाचा असे. ह्यामुळे प्रस्तुत काळी ज्या अनेक गोष्टी खास राजसत्तेच्या म्हणून कायद्याने ठरविल्या आहेत, त्यांचा निकाल जात व गांव पूर्वी आपल्या अधिकारांत करी. मागून चालत आलेल्या वळणावर लोक अजूनही त्या करावयास जातात, पण नकळत त्यांजकड़न कायदा-केव्हां केव्हां तर फौजदारी कायदा-मोडला जातो. पट्टी वसूल करण्याच्या कामी स्वराज्याप्रमाणे पाटील कुलकर्णी नाठाळ कुळाच्या चुलींत क्वचित् प्रसंगी पाणी ओततात, किंवा त्याला अगर त्याच्या माणसांला विहीर बंद करतात. त्यांचे हे कृत्य गांवाला पसंत असते. पण कुळाने फिर्याद केली तर कायद्याप्रमाणे पाटीलकुळकर्ण्यांना शिक्षा करणे आधिकाऱ्यांना भाग पडते. हिंदुस्थानांतील ख्रिस्ती लोकांच्या लग्नासंबंधाने १८७२ चा १५वा कायदा आहे. त्याचे ६८ वे कलम असें आहे की, ह्या कायद्याप्रमाणे लग्न लावण्याचा अधिकार नाही अशा इसमानें डिस्ट्रिक्ट मॅरेज रजि ष्ट्रारच्या गैरहजरीत ज्यांपैकी एकजण ख्रिस्ती आहे अशा वधूवरांचे लग्न लावले तर तो दहा वर्षेपर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेस पात्र होतो. सोलापूर जिल्ह्यांत एका महार मुरळीने आपली नात ख्रिस्ती शाळेत घातली, व तिचा बाप्तिस्मा झाला. ती उपवर झाल्यावर जातीच्या विचाराने तिने तिचे लग्न दुसऱ्या एका महार मुरळीच्या मुलाशीं गांवभटाकडून लाविलें. बाप्तिस्मा झालेल्या लोकांचें नांववार सर्क्युलर गांवच्या चावडीस लागत नसते, आणि त्यांची दौंडीही पण देत नाहीत. तरी पण ' शांतिरस्तु पुष्टिरस्तु' गांवभट, नवरानवरीचे आप्त, जातभाऊ वगैरे मांडव साजरा करणारी सर्व मंडळी गुन्ह्यांत सांपडली. परंतु युरोपियन माजिस्ट्रेटानें सारासार विचार पाहून खैर केली व भटजीचे चौथ्या प्रहरी धिंडवडे झाले नाहीत.

 जातींतल्या लोकांवरील जें प्रमुखत्व जातीने आपणाकडे ठेविलें, त्याचा अंमल जोपर्यंत जातीची संख्या थोडी आणि वस्ती लहानशा प्रदेशांत होती तोपर्यंत सबंध जात एकत्र जमून करी. जसजशी वस्तिवाडी वाढली आणि लोक दूरदूर ठिकाणी जाऊन राहूं लागले तसतसें सबंध जात गोळा होणं अवघड पडू लागले. तेव्हां जातींतील मुरब्बी व शिष्ट माणसें गोळा होऊन जातप्रकरणाचा निवाडा करीत व तो सर्व जात मान्य करी. कालांतराने सबंध जातींतील शिष्ट किंवा पंच गोळा करणं सुद्धां अडचणीचे होऊ लागल्यावर जातीजातींनी आपापल्या प्रमुख घराण्यांतून काही अधिकारी नेमले, आणि जेथे जेथे जातीची वस्ती असे तेथे तेथे त्यांनी सोयीप्रमाणे सबंध जात अगर पंच गोळा करून जातप्रकरणांचा निकाल करावा, असा त्यांस अखत्यार दिला. अशा प्रकार स्थानिक जातपंचायतीकडून ज्या वादांचा निर्णय लागत नसे त्यांचा निर्णय लग्न अगर दिवस अशासारख्या प्रसंगी अनेक ठिकाणचे पंच जमवून लावीत. जातीने जे अंमलदार नेमले त्यांत जातपाटील, जातचौगुला हे प्रमुख होत. ब्राह्मण व क्षत्रिय वर्णात मोडणाऱ्या जातीत जातपाटील वगैरे अधिकारी दक्षिण प्रांती फारसे दिसून येत नाहीत. स्थान परत्वें व जातिपरत्वे जातपाटलाला पुढे लिहिल्याप्रमाणे संज्ञा प्राप्त झाल्या. राजा (लाड वंजाऱ्यांचा), राव, गादीवाला, प्रधान, सरपाटील, देसाई, परगणे पाटील, महालकरी, नाईक, फडनाईक, खोत, मुकादम, अधिकारी, मानकरी, कारभारी, अगेवान, मुखी, पाटीदार, महाजन, शेटिया, बुधवंत, गांवडा, कट्टीमनी, मेहतर, देशमेहतर, वडेरो इत्यादि. जातचौगुल्याला हवालदार, कोतवाल, मोहलेदार, पोलकर, तळवार, ठाणी, हाळी, तेलिया, पड्डर वगैरे. कांहीं जातींत ह्यांखेरीज इतर कामगारही नजरेस येतात. अहमदनगर जिल्ह्यांत ‘तेलंगी कानडी' नांवाची जात आकोलें डांगाणांत आहे. तिच्या जातपाटलाला 'नाईक' म्हणतात. त्याच्या हुकमतींत 'प्रधान' आणि 'शिपाई' असतो. प्रधानाच्या सांगण्यावर शिपाई जात गोळा करतो, व अपराध्यास पाटलासमोर इनसाफासाठी धरून आणतो. नाशिककडील भिल्लांच्या जातपाटलाला 'मेहतर ' म्हणतात; आणि त्याचे हाताखाली 'फौजदार' 'हविलदार' असतात. हविलदाराचे काम जमातीला लोक बोलावणे व फौजदाराचे काम त्या वेळी बंदोबस्त ठेवणे हे असते. कर्नाटकांतील ' बेडगू' जातीमध्ये जातपाटलाला 'बुधवंत' म्हणतात, आणि त्याचे मंत्र्यास 'चौलगो' व शिपायास ' कोलकर' म्हणतात. जातकामगारांचा अंमल बहुधा सबंध जातीवर चालतो. कांहीं जातींत त्यांच्या अधिकारास स्थलसीमा घातलेली पाहण्यांत येते. कर्नाटकांतील 'काळकुणबी' जातींत 'गांव बुधवंत ' असून त्याचा वरिष्ठ 'महाल बुधवंत' आहे. पुण्याचे सुतारांना 'मेहतर ' व त्याचे वर ‘देश मेहतर ' आहे. न्हाव्यांमध्येही हे अधिकारी आहेत. आगरी लोकांच्या 'गांवपंचायती' असून ' तर्फपंचायती' ऊर्फ 'पेटापंचायती' आहेत. रत्नागिरीकडील चांभारांच्या जातपाटलाला 'महालकरी ' म्हणतात आणि त्याच्या वरिष्ठास ‘मामलेदार ' म्हणतात. विजापुराकडील महारांचा दर गांवीं 'नाईक' आहे. तेहतीस गांवांच्या नाईकांवर 'कसबेदार' नांवाचा अंमलदार आहे. कसबेदारांचे वरिष्ठाला 'कट्टीमनी' म्हणतात. हे अधिकारी जातीपैकींच असून वंशपरंपरेचे म्हणजे वतनदार असतात. जातीमध्ये जी कुळी किंवा घराणे मानाने सर्वांत अग्रगण्य असतें तें पाटलाचें. कदाचित् असेंही असेल की, पाटलाचे घराणे जातीचे आद्य घराणे असावें. ज्याप्रमाणे राज्य मिळविणाराचे घराणें तें राजघराणे असते, त्याप्रमाणे जात अस्तित्वात आणणारे घराणे त्या जातीच्या जातपाटलाचे घराणे असावे असें अनुमान वर ज्या पाटलांच्या संज्ञा दिल्या आहेत त्यांवरून निघेल. शिवाय पाटलाला जातींत पहिल्या 'विड्या टिळ्याचा' म्हणजे सर्वांत मोठा मान असतो. पांढरपेशे व निकृष्ट जाती वजा करतां बाकीच्या मराठजातींत पाटील ही बहुमानदर्शक पदवी आहे. गांवांत डोके हलविणाऱ्या कुणब्याला-मग तो माळी, धनगर, मुसलमान, कोणत्याही जातीचा असो-लोक बहुमानाने पाटील म्हणतात; आणि कुणब्यांच्या सुनाही सासऱ्याला पाटील म्हणून हाका मारतात, मग तो पाटील घराण्यांतला असो वा नसो. पाटलाप्रमाणे जातचौगुल्याचे घराणेही जातींत प्रमुख असते. जातपाटलांची व चौगुल्यांची कांहीं उदाहरणे खाली टिपेंत दिली आहेत. पाटील हा शब्द पटु

-----

१ साताऱ्याकडे धनगरांचे पाटील कऱ्हाडचे गावढे आहेत. तिसगांवकडील भोयांच्या नायकाची कुळी काथवटे, राशीनकडील बेरड - रामोशांच्या पाटलाची कुळी खराडे, तेलंगी कानडे जातीच्या नायकाची कुळी सदगीर व भुसनर, भराड्यांच्या पाटलाची कुळी शिंदे, वैदूंच्या व तिरमलांच्या पाटलाची कुळी फुलमाळी, मेडिंगे जोशांच्या पाटलाची कुळी गदाई, कुडमुडे जोशांच्या पाटलाची कुळी भोंसले, नागपूरकडील औषधे विकणाऱ्या गोंड लोकांच्या पाटलाची कुळी ठाकर, फांसपारध्यांच्या पाटलाची कुळी चव्हाण, माकडवाल्यांच्या (कैकाडी) पाटलाची कुळी सोनकचरे, चित्रकथ्यांच्या पाटलाची कुळी गांगर्डा, मांगगारोड्यांच्या पाटलाची कुळी सकट इत्यादि. साताऱ्याकडील धनगरांचा चौगुला ( भल्ला अथवा खर्चा) देहबा, तेलंगी कानड्यांचा करवर (ह्या जातींत खाडगीर आडनांवाचा जातप्रधान आहे), वैदूंचा भोई, तिरमलांचा धनगर, कुडमुड्या जोशांचा पाचंग्या शिणगाण, फांसपारध्यांचा पवार (ह्याला प्रधान म्हणतात), काही ठिकाणी मांगांचा आढळगे, चित्रकथ्यांचा सुपलकर, मांगगारोड्यांचा बोडके इत्यादि. गुजराथेतील भनसाळी जातीला चौधरी नांवाचा कामगार आहे, तोच या जातीचा चौगुला होय. (हुशार ) ह्या संस्कृत शब्दापासून निघाला असावा; अथवा पट्ट म्हणजे मुख्य ह्या शब्दापासूनही तो निघाला असेल. कौलाला पट्टा म्हणतात, व इजारा म्हणजे मक्ता. ज्यावरून गांवाचें बाबवार घेणे देणे समजतें अशा गांवाच्या जमाबंदीच्या ताळेबंदाला पट्टा किंवा इजारपट म्हणतात, व तो पाटलाजवळ असतो, आणि पाटील त्याप्रमाणे वसूल करतो. हजिरीच्या तक्त्यालाही हजिरीपट किंवा पट म्हणतात. पाटील, पटवारी ( कुळकर्णी ) हे जुळे पट किंवा पट्टा या शब्दांवरून बरेंच संभाव्य दिसते. ज्यांजवळ पट्टा किंवा पट असतो आणि त्याबरहुकूम जे पट्टी, सारा, अगर सार्वजनिक वर्गणी वसूल करतात ते पाटील-पटवारी. तेव्हां सबंध जमातींत जो स्मरणाचा धड असून लोकांवर ज्याचे वजन आहे अशा बुद्धिमान् व मुख्य माणसाजवळच जातीचा पट रहावयाचा. कानडी मुलखांत पुष्कळ जातपाटलांना नाईक, गौडा, किंवा बुधवंत ( बुद्धिवान ) म्हणतात; व सिंध-गुजराथेंत मुखी, अगेवान म्हणतात. जो आपल्या गुणांनी समाजाला पटला असेल त्यालाच त्याने आपला पाटील पसंत केला असेल. कोणत्याही बाजूने पाहिले तरी पाटील हा असामान्य गुणाढ्य असला पाहिजे, हे उघड होते. म्हणून असें अनुमान निघतें कीं, मूळ पाटील हा समाजस्थैर्यरक्षणास व समाजाभिवृद्धि करण्यास योग्य असा लोकांनी निवडलेला पुरुष असावा;आणि वतनाची कल्पना दृढ होईपर्यंत पाटीलकी लोकांच्या पसंतीवर अवलंबून असावी. स्वयंपाकाचे अनेक पदार्थ शिजविण्यास बोघोण्या ( पातेलें ) सारखें दुसरें एकहीं पात्र नाहीं; म्हणून त्याला बहुगुणी म्हणतात. बहुगुणी याचा अपभ्रंश ब्राह्मणांत बोघोणे व ब्राह्मणेतरांत बघुललें किंवा भगुलें असा झाला आहे. त्याप्रमाणे चौगुला हा शब्द चौगुणी ह्या शब्दापासून निघाला असावा. चार ह्याचा अर्थ अनेक. जसें-चार लोक गोळा झाले. चौ-गुणी म्हणजे अनेकगुणी, अथवा चौगुला म्हणजे चौ-चार चौघे गोळा करणारा किंवा चौकडून-चोहोंकडून गोळा करणारा; आणि चौधरी म्हणजे चार चौधे धरणारा, सांवरून धरणारा, किंवा चोहोंकडून धरून आणणारा, गोळा करणारा; असे चौगुला व चौधरी ह्यांचे मूळ अर्थ असावेत. चौगुल्याला चौ-लगो असेंही म्हणतात. पूर्व खानदेशांत चोपडे म्हणून तालुक्याचे ठिकाण आहे. तेथील लोक सांगतात की, चोपडे म्हणजे चौपाड, चोहोंकडून पहाड, चारी बाजूला डोंगर; किंवा चौ-पाडा म्हणजे अनेक वाड्या असलेला गांव. रा.भारदे म्हणतात की, चौगुला हा शब्द चौकुल ह्या शब्दापासून निघाला. असो. पाटलाप्रमाणे चौगुला व इतर जातकामगार ह्यांची नेमणूक पहिल्या पहिल्याने लोकनियुक्त असावी. पुढे जसजसे संख्येने लोक वाढत गेले व दूरदूर पांगत गेले, तसतसे त्यांचे एकमेकांतील दळणवळण कमी होत जाऊन जात कामगारांची निवड करणे कठीण पडत गेलें. कामगारांच्या पूर्वजांनी बजाविलेल्या कामगिरीबद्दल कृतज्ञता. त्यांच्या घरंदाजीबद्दल आदर, 'शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी' निपजतातच अशा श्रद्धा, आणि नवीनाबद्दल दचका व त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात कामांतील घोंटाळा व त्रास इत्यादि भावनांमुळे जातकामगार निरंतरचे करून टाकावेत असे लोकांना वाटले असावे; आणि त्यांना जातकामगारांच्या कुळ्या ठरविल्या असाव्या. राजाच्या मागे त्याचा मुलगा सिंहसनावर बसतो हा न्याय सर्वांच्या डोळ्यासमोर होताच. राजाधिकाराप्रमाणे सर्व प्रकारचे अधिकार व कामें वंशपरंपरेने चालवावींंत हा मार्ग लोकांना राजमार्ग वाटला आणि जातकामगार वतनदार होऊन बसले.

 जातपाटलांची मुख्य कामें म्हटलीं म्हणजे जातीच्या वतीने इतराशी बोलणेंं करणे, जातपंचाईत बोलावणे, आणि तिच्यांत पुढाकार घेऊन जातीचे तंटे निवडणे व अपराध्यास शासन करणे हीं होत. पंचांपुढे येणाऱ्या बखेड्यांत 'नाटल्याबाटल्यांच्या' खटल्यांची संख्या सर्वांत जास्त असते; याचे कारण जातिभेद होय. अप्रबुद्ध लोक एकमेकांचा दावा बहुशः घराला किंवा वळ्हईला आग लावून साधतात. कुरापतीचे दुसरे प्रमुख कारण एकाने दुसऱ्याची बायको काढून नेणेंं किंवा विधवा अगर कुमारिका गरोदर होणे हे होय. ह्यांनाच लोक 'जळीपळीची' भांडणे म्हणतात. जातपंचायतींत ह्याही फिर्यादी पुष्कळ असतात. ह्यांखेरीज जातप्रकरणाचे आणखी दावे ह्मटले म्हणजे लग्नमोहतरांत नवरीच्या बापाने जातीच्या ठरावापेक्षा अधिक पैसा घेणे, बायको न नांदविणे, सोयरिकीचे बखेडे, जातीला अनेगा आहे असे कृत्य करणे, ( जसें, गरती कोल्हाटणीने कुंकू लावणे, जोडवीं, बुगड्या, नथ घालणे; वड्डरणींंने किंवा गोंडणीने चोळी, नथ, बांगड्या घालणे; फांसपारध्यांमधील गाईवरून शिकार करणाऱ्या पोटजातीतल्या लोकांनी जोडा घालणे) वगैरे होत. पाटील दैवाच्या (जातीच्या) सल्ल्याने त्यांचाही इन्साफ करतो. गुन्हेगार जातींत एकमेकांच्या दगलबाजीबद्दलचा न्याय अद्यापि जातीमार्फत होतो. त्याला प्रमाण, इमान किंवा दिव्य म्हणतात. आपल्या साथीदाराला चोरून जर एखाद्या भामट्याने चोरीचा माल बळकावला असा संशय आला तर जात त्याला 'तेल-रवा' किंवा 'तेल-गोटी ' चे प्रमाण करावयास लावते. तें असें की, कढईत तेल कढवितात व ज्यावर तोहमत असेल त्याला त्या कडकडीत तेलांतून आंगठी, रवा, गोटी किंवा पैसा हाताने काढावयास सांगतात. तेलाने जर त्याचा हात भाजला नाही तर तो निर्दोषी आहे असें समजतात. लंगोटीपारधी नदीत बुडी घेण्याचे किंवा तापलेली कुऱ्हाड घेऊन चालण्याचे प्रमाण करतात. व्यभिचार केला नाही ह्याचे इमान कढत तेलांतली आंगठी किंवा पैसा काढून घेऊन फांसेपारधिणीला दर दसऱ्याला आपले नवऱ्याला करून दाखवावे लागते. उपनिषदकालापासून आमच्या लोकांची प्रमाणावर श्रद्धा आहे असे दिसतें. छांदोग्योपनिषदांत १६ वे खंडांत उद्दालक आरुणी आपल्या श्वेतकेतुनामक पुत्राला सांगतो की, चोरी न करणाराचा हात तप्त परशूनें भाजत नाही, कारण त्याच्या आत्म्याला सत्याचे आवरण असते. सीतेची अग्निशुद्धि पुराणप्रसिद्ध आहे. असो. चौगुला हा जातपाटलाचा तैनाती किंवा हुजऱ्या होय. पाटील किंवा त्याचा मंत्री ह्यांचे सांगण्यावरून जमातीस आमंत्रण करणे, जातगंगेपुढें अपराध्यास धरून आणणे, पंचायत जमल्यावर पाटलापुढे कंबर बांधून उभे राहणे, पाटलाला पहिल्याने टिळा अंबर लावणे व विडा देणे, पाटलापुढे सर्व स्वयंपाकाची भांडी मांडणे, व त्याचा हुकूम झाल्यावर जातीला जेवण्यास बसण्याला सांगणे इत्यादि कामें चौगुल्याची होत. जातपंचायती बहुधा तोरणादारी किंवा मरणादारी होतात. कांहीं कनिष्ठ जातींच्या-विशेषतः अठरा पगड भिकार जातींच्या-पंचायती मढीच्या कान्होबाच्या वार्षिक यात्रेच्या वेळीही होतात. त्यांत लिहिण्यावाचण्याचे बहुधा अनुष्टुप असते. सर्व कारभार तोंडातोंडी चालतो. पाटलाच्या कामाच्या ह्या स्वरूपावरून 'तोंड-पाटिलकी' म्हणण्याची रूढि पडली असावी. लिहिण्याचे काम पडलेच तर तें ज्या गांवीं जमात जमते तेथील ग्रामजोशी किंवा कुळकर्णी याजपासून करून घेतात. नुकसानीची भरपाई, सोडचिठ्ठी किंवा ज्याची बायको त्याकडे पाठविणेंं, दंड अगर जेवण घेणेंं, वाळीत टाकणेंं इत्यादि शासने जात करते. दंडाच्या रकमेचा विनियोग जातीच्या एखाद्या कार्याकडे किंवा देऊळ, धर्मशाळा, चावडी, जातीची भांडी खरेदी करणे वगैरे बाबींकडे करतात. कांहीं जातींत दंडाची रक्कम जात-कामगारांना मिळते. न्हाव्यांत जर चार रुपये दंड घेतला तर त्यांतली पावली चौगुल्यास व बाकी मेहेतऱ्याला मिळते. पुण्याकडील सुतारांत देशमेहेतऱ्याला दोन रुपये, चौगुल्याला एक रुपया आणि जेथे जमात जमते तेथल्या देशमुखाला रुपया ह्याप्रमाणे अद्याप बटवडा होतो. कुडमुडे जोशांच्या पंचायतीत जो दंड वसूल होतो त्यांतला रुपया दोन रुपये पाटील ठेवतो, आणि बाकी रकमेचे गहूं घेऊन ते जातींत घरोघर वांटतात. गोंड लोकांत व्याभिचार वगैरेबद्दल रुपया दोन रुपये दंड जात घेते, व तो खाण्यापिण्यांत उडविते. फांसपारध्यांत छिनालीबद्दल १५ ते १२५ रुपये दंड होतो. त्यातला निंमा पाटील घेतो व निंमा जातींतले गोरगरीब. “तळी तापडी"(त्रस्त), व इतर जमात ह्यांना वांटून देतात. वर जे सरपाटील, मामलेदार,महाल मेहतरे, कसबेदार सांगितले ते आपापल्या अधिकाराच्या स्थलसीमेंतील स्थानिक अधिकाऱ्यांच्या कामाची तपासणी करतात, व प्रसंगविशेषीं तेही ती कामें करतात.

 वतनदार अधिकारी असण्याची आवश्यकता ज्या कारणांमुळे जातिजातींना वाटू लागली, त्याच कारणांमुळे ती गांवांनाही वाटू लागली; आणि इष्ट तो फेरफार करून जात-वतनदारांच्या नमुन्यावर गांवानें जातिपरत्वे आपआपले वतनी हुद्देदार कायम केले. वतनपद्धति गांव-गाड्याने जातीपासून उचलली किंवा जातीजातींनी ती गांवगाड्यापासून उचलली हे निश्चयाने ठरविण्यास अगोदर गांवें वसली किंवा अगोदर जाती बनल्या हे समजले पाहिजे. गांवांत कायमची वस्ती करून राहिलेल्या जाती जरी पुष्कळ आहेत तरी हल्लीच्या सुरक्षित राज्यांतही शेकडों फिरत्या जाती दृष्टीस पडतात. कायमच्या धंद्याची आवश्यकता व वृद्धि ह्यांमुळे ह्या फिरत्या जातींनाही स्थाईक होणे भाग पडत आहे; आणि वंजारी, कैकाडी, जोशी, तिरमल, घिसाडी, वड्डर वगैरे जाती आपापल्या सोयीप्रमाणे कांहीं गांवांत घरेदारे करून राहिल्या आहेत. ह्यावरून असा ग्रह होतो की, अगोदर जाती निर्माण होऊन त्या भटकत भटकत सोयीसोयीने गांवांत स्थिरावल्या असाव्यात, आणि जातवतनदारीचा ठसा गांवमुकादमानीवर उमटला असावा. राजाची गादी वंशपरंपरेनें चालते हे पाहून समाजव्यवस्था अखंड चालविण्यासाठी जातीजातींनी आपापले कामगार वतनी केले, व जाति-पोटजातींची संख्या सहस्रावधि असल्यामुळे गांवोगांव वतनी जात-कामगार फडकू लागले. जातीचे अधिकार आधुनिक मताप्रमाणे निर्भेळ सामाजिक नसून त्यांनी राजसत्ता व धर्मसत्ता ह्यांचाही पुष्कळसा भाग व्यापला आहे. तेव्हां जातिजातींनी मान्य केलेल्या वतनपद्धतीची मुळे राजसत्ता व धर्मसत्ता ह्यांतही ओघानेंच शिरली. गुणांवरून राजाधिकारी व धर्माधिकारी नेमण्याचा प्रघात असतो. आपल्या देशांतही एका काळी तो तसाच असला पाहिजे. पण समाज ज्या संस्था पसंत करतो त्यांचा प्रवेश राज्यव्यवस्था व धर्मव्यवस्था ह्यांत झाल्याशिवाय रहात नाही. एकंदर लोकप्रवृत्ति वतनाकडे वळल्यामुळे राजाधिकारी व धर्माधिकारी कालांतराने वतनदार झाले आज आहे उद्यां नाही, असल्या मिळकतींत जीव काय ? कांहीं केलें तर ते असे करावें कीं, पिढ्यान् पिढ्या त्याला घोर नाही, ह्या विचाराने वतन निर्माण केले. राजाने राज्य कमावलें तें एकट्याने नव्हे, त्याला अनेक मुत्सद्यांचे आणि वीरांचे साह्य झाले तेव्हां तें त्याच्या हातीं चढले. राज्य संपादन करण्याच्या कामी ज्यांनी आपल्या खांद्याशी खांदा भिडवून संपत्ति, संतति व आपला स्वतःचा प्राण ह्यांची पर्वा केली नाही, त्यांचाच ओढा आपणाकडे असणार, आणि कमावलेलें राज्य संभाळण्यांत त्यांचीच योजना करणे अवश्य व हितकर आहे, असे कृतज्ञतापूर्वक ध्यानांत आणून ज्यांची जशी मदत व प्रेम त्याप्रमाणे राजांनी त्यांना असाम्या दिल्या. स्वतःबरोबरच आपल्या संतानाच्या कल्याणाचा विचार मनांत न बोलावतां येतो, आणि साहजिक असें वाटावयाचें की, नव्याची प्रतीति घेण्यापेक्षां देखला पाणोथा खास बरा. जे आपल्या कामा आले त्यांची संतति आपल्या संततीच्या उपयोगी पडण्याचा संभव अधिक आहे. पूर्वीच्या धामधुमीच्या काळांत जंगमाची किंमत फार कमी होती. स्थावराला चोरांचिलटांची भीति नाही म्हणून तें सुरक्षित असे लोक मानीत. त्यामुळे रोकडीच्या मानाने कमी उत्पन्नाचे स्थावर असले तरी ते निरंतर टिकणारे असते, असा विचार मनांत वागवून कामगार रोकडीपेक्षां स्थावराला जास्त चहात. शिवाय ज्या राजाने स्थावराची नेमणूक करून दिली त्याचे राज्य टिकलें तर ती नेमणूक चालेल, ही गोष्ट कोणालाही कळण्याजोगी आहे. तेव्हां स्थावर नेमणुका करून दिल्या म्हणजे त्या स्वस्त्या पडतील व नेमणूकदार आपल्या पोटतिडिकेसाठी राजनिष्ठ राहातील, इतकेच नव्हे तर राजासाठी पैशानें, शरीराने व स्थावरावरील मालकीमुळे रयतेवर प्राप्त होण्याच्या वजनाने झटतीलही, असें भूपतींना वाटणे साहजिक आहे. दुसऱ्या


 १ 'तुल्यवेतनोऽस्मि, भवद्भिःसह भोग्यमिदं राज्यम् ।' अशी प्रसिद्ध राजनीति आहे.

बाजूलाही स्वाभाविकपणे असें वाटावयाचे की, जर आम्ही हातावर शिर घेऊन राजाला यशस्वी केले आणि त्याच्या मुलाबाळांची निचिंती केली, तर त्यानेही आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या काळजीतून मुक्त करावें. आम्ही खानदानीचे लोक ज्याचे मीठ खाऊं त्याच्याशी आमच्या घरचे कुत्रं देखील हराम होणार नाही. ह्या उभयपक्षी मनोमय कयासाने राज्यांतील दिवाण, सेनापति, खजीनदार, फडणीस, मुजुमदार, चिटणीस इत्यादींसारख्या महत्वाच्या तहाहयात असाम्या वंशपरंपरेच्या केल्या, आणि रोकड तनख्यामोबदला जमीनमहसूल लावून देण्याची युक्ति काढली. सामान्यत्वे ह्या वंशपरंपरेच्या स्थावर नेमणुकांना इनाम ही संज्ञा प्राप्त झाली. सरकारच्या सार्वजनिक नोकरीच्या मोबदल्याबद्दल जमिनीचे उत्पन्न तोडून देण्याची जी ही योजना निघाली, ती सर्व प्रकारची सार्वजनिक नोकरीच काय पण वैद्यकी, गायन, नर्तनाप्रमाणे थेट निवळ खासगी नोकरी व भीकमाग्या दरवेसपणापर्यंत पांगली. हिलाच वतनपद्धति म्हणतात.

 वतनपद्धतीला जातीजातींच्या बहुविध जनतेकडून समाजव्यवस्थेत पाठिंबा मिळाला तसा राजाकडून राज्यव्यवस्थेत व धर्माध्यक्षांकडून धर्मव्यवस्थेत मिळाला. वतनी व्यवस्था गांवकींत सुदृढ व विस्तृत होण्याला वतनी राज्यव्यवस्था व धर्मव्यवस्था जशी कारणीभूत झाली, तशी जातिपोटजाति व पंथ ह्यांमध्ये जी धंद्यांची विभागणी झाली, तीही बऱ्याच अंशांनीं कारणीभूत झाली. जातिधर्माप्रमाणे अमुक धंदा अमक्या कुडीत जन्म घेणाऱ्या इसमाने करावयाचा असे ठरले. तो धंदा करणारा गांवांत


 १ नाही म्हणावयाला पुण्यश्लोक शिवाजीमहाराज मात्र इनाम देण्याला प्रतिकूल होते. "तो शिवाजी बहुधा कोणास जहागिर देत नसे...शिवाजीचे किती एक मानकरी लोक मसलत करीत कीं, लष्करास खर्चाची नेमणूक परभारें गांवगन्ना करावी, परंतु ते शिवाजीच्या मनास येईना; कां की, ते लोक स्वयें सत्ता करूं लागतील आणि रयतेस उपद्रव होईल हें, तो जाणत असे." ग्रँँटडफकृत मराठ्यांची बखर पाने ६४-५.

राहण्याला मुख्य आमिष काय तें सर्वमान्य इनामी वतन होऊन बसलें त्याचा लोभ कोणालाही सुटेना. उपट पाल आणि पुढच्या गांवाला चाल, अशा रीतीनें गांवोगांव रोजगारासाठी भटकण्यापेक्षा एखाद्या गांवीं स्थाईक होऊन गिऱ्हाईक बांधून टाकावे, म्हणजे मला काम मिळतें कां दुसऱ्याला मिळतें म्हणून वाट पहात बसण्याची गरज उरणार नाही, आणि पोटापाण्याची चिंता निरंतरची दूर होईल, ह्या विचाराने जातकसब्यांनी गांवकी वतनावर उडी घातली. सबब गांवकीतले नुसते राजाधिकारी व धर्माधिकारीच वतनदार होऊन बसले नाहीत, तर राजाच्या असाम्यांप्रमाणे कारूनारूही गांवचे वतनदार चाकर झाले. परंतु गांवगाड्याच्या उभारणीला व बळकटीला सर्वांत जास्त मदत देशांतील बेबंदशाहीची झाली. आतांप्रमाणे एकछत्री, सुयंत्रित, दक्ष व सक्त राज्यव्यवस्था नसल्यामुळे रयतेकडील करभार निश्चित रकमेनें निश्चित काळी सरकारचे पदरांत पडणे मुष्कील होते. सरकाराला परचक्राची भीति तर होतीच, पण देशांतले देशांतही शत्रुभय पुष्कळ असे. संस्थानिक, सरदार, इनामदार, ह्यांमध्ये राजसत्तेची विभागणी इतकी झाली होती की, मध्यवर्ती सरकाराचा दाब राजधानीबाहेर क्वचित् भासत असे; आणि राज्यांतील मुलूख व लोक ह्यांचे संपूर्ण व पद्धतशीर नियंत्रण राजाच्या आवाक्याबाहेर गेले होते. हिंदुस्थानांत ही स्थिति केव्हांपासून सुरू झाली हे जरी निश्चयाने सांगता येत नाही तरी ती मुसलमानी रियासतीच्या पूर्वीपासून होती ह्यांत संशय नाही. राजांनाही असेंच झाले होते की, राजकीय, धार्मिक व सामाजिक बाबतींत जातीचा भार जितकी जात उचलील व गांवचा भार जितका गांव उचलील तितकें बरें. ह्यामुळे गांवगाडा एक सवता सुभाच होऊन बसला,आणि त्यांतली सर्व कामें व कारभार हा इनामदार अगर वतनदार ह्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालू राहिली.

 जसजशा राज्याच्या, समाजाच्या आणि गांवकीच्या गरजा वाढत गल्या, तसतसे इनाम देण्याचे हेतु व त्यांचे प्रकारही वाढत गेले. मुख्य इनाम देणारे दोन-राव आणि गांव. भूमीचे स्वामी राजे होते, तरी त्यांनी अमुक वसूल व अमुक चाकरी घेण्याचा ठराव करून गावाच्या दिमतीला सबंध काळी-पांढरी लावून दिल्यामुळे गांवांनाही जरूरीप्रमाणे इनाम देण्यास ऐपत व मुभा होती. तेव्हां इनामांचे दोन भाग पाडतात-सनदी आणि गांवनिसबत. राजाने दिलेल्या इनामांना सनदी म्हणतात व गांवजमिनींतून किंवा गांवच्या उदिमावर अगर प्राप्तीवर गांवाने दिलेल्या इनामांना गांवनिसबत इनाम म्हणतात. इनाम देण्याचे मुख्य हेतु दोन- चाकरी आणि मेहरबानी. जे स्वतः किंवा ज्यांचे पूर्वज विशेष रीतीनें सरकाराच्या कामास आले, किंवा मर्जीस उतरले त्यांना पारितोषक, म्हणजे कोणत्याही प्रस्तुत अगर भावी चाकरीची अट न घालता जे इनाम देण्यांत आले ते कृतज्ञतापूर्वक किंवा मेहरबानीखातर दिलेले इनाम होत. हे इनाम जात-इनामांत मोडतात. राजघराण्यांतील किंवा सरदारघराण्यांतील लोकांनाही आपापल्या इभ्रतीप्रमाणे राहता येण्यासाठी इनाम दिलेले आहेत. नोकर-इनामांचे ठोकळ तीन भाग पडतातः (१) सरकारच्या लष्करी किंवा मुलकी नोकरीच्या शर्तीवर दिलेले जागीर, फौजसरंजाम, अगर जातसरंजाम यांसारखे इनाम ('जा' किंवा 'जै' म्हणजे जागा, नेमणूक; 'गिर' म्हणजे प्राप्त होणे. 'सरंजाम' म्हणजे सामुग्री, सामान. मुसलमानांनी दिलेल्या इनामांना जागीर अथवा जहागीर व मराठ्यांनी दिलेल्या इनामांना सरंजाम म्हणत. सरंजाम व जहागीर ह्यांमध्ये विशेषसा फरक नाही.); (२) देऊळ, समाधि, मशीद, दर्गा वगैरेंमधील पूजाअर्चा, दिवाबत्ती, झाडसारवण, उत्सव, यात्रा, उरूस, हगामे यांसारखे समारंभ, इत्यादि चालविण्यासाठी दिलेले धर्मादाय किंवा देवस्थान इनाम; (३) गांव, महाल, परगण्याची महसुली, फौजदारीसंबंधानें गांवकी व घरकी कामें करणाऱ्या गांवकामगारांना व परगणे अंमलदारांना दिलेले इनाम. इनाम म्हणून जे काही देण्यात आले ते काळीचे उत्पन्न-स्वामित्व नव्हे-म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार, किंवा इनाम जमीन धारण करणारांना महसुलाची सर्वस्वी अमर अंशतः सूट देण्यात आली. इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात. प्रत्यक्ष (दुमाला ) आणि अप्रत्यक्ष (परभारा). पहिल्या प्रकारांत इनामदारांना सबंध महाल, गांव किंवा गांवांतील कांहीं जमीन दुमाला करून देत, व धारा वसूल करण्याचा राजाधिकारही त्यांना देत. दुसऱ्या प्रकारचे इनाम नक्त किंवा ऐनजिनसी असत. धारा वसूल करून आपल्या खजिन्यांतून सरकार इनामदारांना जी ठराविक नेमणूक रोकडीने आदा करी तिला नक्त इनाम म्हणतात; आणि जमीन धारण करणारांकडून इनामदार परस्पर ठराविक घुगरी म्हणजे दर बिघ्यास किंवा नांगरास धान्याची अमुक मापें घेत ती, अथवा बाजारहाटांत विकावयास आणलेल्या मालाची शेव-फसकी किंवा वाणगी घेत ती, ह्यांना परभारा हक्क किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात.

 हे झाले राजरोष इनाम. मध्यवर्ती राजसत्तेच्या कमकुवतपणामुळे, राजे, संस्थानिक व इनामदार, ह्यांच्या गृहकलहामुळे, आणि परस्परांबद्दलच्या साशंक व मत्सरप्रचुर वृत्तीमुळे, वेळोवेळी अनेक बिनकाळजाचे व कपटी पुरुष रयतेपासून पुष्कळ जमिनी, शेतमाल व पैसा उपटू लागले; आणि असा क्रम काही दिवस चालवून त्यालाच ते हक्क म्हणू लागले. त्यांना आकळण्याचे सामर्थ्य गांवगाड्यांत नसल्याने व ते शिरजोर होईपर्यंत राजांनी त्यांच्याकडे कानाडोळा केल्याने तेही कालावधीने गोमागणेशी इनामदार झाले, आणि गांवगन्ना हक्क उकळू लागले. खानदेशांत ठोके नांवाचे मुसलमान इनामदार आहेत. त्यांचे पूर्वज सातपुडा, सातमाळ, सह्याद्रिपर्वत व किर्र जंगले यांचा आसरा घेऊन वाटसरांना ठोकून काढून लुटीत; अशा रीतीनें बळावत जाऊन ते पुढे आसमंतांतील गांवांचेही काम काढू लागले. तेव्हां गांवांनी त्यांना दरसाल ठोक ऐवज पावता करण्याचा ठराव करून त्यांच्या लुटालुटीपासून आपली मुक्तता करून घेतली !! एकोणविसावे शतकाच्या आरंभी बंडखोर रजपूत व कोळी नाईक ह्यांनी गुजरातेंत गांवेंची गांवें लुटण्याचा सपाटा लावला, आणि सरकारकडून तर रयतेचे रक्षण होईना !! अशा अवस्थेत गांवांनी त्यांना " थोडा ग्रास " नांवाची खंडणी (घांसदाणा) देण्याचे ठरविले, आणि त्यांनीही गांवांला उपद्रव न देण्याचे व दुसरे कोणी लुटारू गांवांवर आल्यास त्यांचा बंदोबस्त करण्याचे पत्करलें. अशा रीतीने पुष्कळ तोडा गिरासीये इनामदार अस्तित्वात आले. सबंध राज्य, संस्थान किंवा सरदारकी वडील मुलाला मिळे म्हणून धाकट्या मुलांचा इतमाम चालण्यासाठी जो ऐवज देत त्यास "ग्रास" म्हणत. सबंध रोटी एकाला गेली खरी, पण इतरांना घांसकुटका कांहीं तरी पाहिजे. तसें, सबंध वसूल सर्वसत्ताधिकारी राजाला दिला, तरी ज्या मानानें राजसत्ता प्रजासंरक्षणास असमर्थ होती त्या मानानें तें संरक्षण करणारे जे हे छोटेखानी उपटसूळ राजे झाले त्यांनी आपल्या हक्काला “थोडा ग्रास ” हे नांव दिले, असेंही काहींचे मत आहे. गांवगाड्याचे भरित सर्वस्वी वतनदारांचे असल्यामुळे वतनवृत्तीचे संक्षिप्त विवरण आवश्यक झाले. वतनदारांनी स्वराज्यांत गांवगाडा कसा हांकला ह्याचे दिग्दर्शन पुढील प्रकरणांत येईल.