गोसाई - तठे बसला गोसाई धुनी पेटय...

तठे बसला गोसाई

धुनी पेटयी शेतांत

करे 'बं बं भोलानाथ'

चिम्‌टा घीसन हातांत

मोठा गोसाइ यवगी

त्याच्या पाशीं रे इलम

राहे रानांत एकटा

बसे ओढत चिलम

अरे, गोसायाच्यापाशीं

जड्याबुट्या व्हत्या फार

देये लोकाले औसद

रोग पयी जाये पार

अशा औसदाच्यासाठीं

येती लोकाच्या झुंबडी

पन कोन्हाबी पासून

कधीं घेयेना कवडी

चार झाडाले बांधल्या

व्हत्या त्याच्या चार गाई

पेये गाईचज दूध

पोटामधीं दूज नहीं

एक व्हती रे ढवयी

एक व्हती रे कपीली

एक व्हती रे काबरी

आन एक व्हती लाली

सर्व्या गायीमधीं व्हती

गाय कपीली लाडकी

मोठ गुनी जनावर

देवगायीच्या सारकी

व्हती चरत बांदाले

खात गवत चालली

रोप कशाचं दिसलं

त्याले खायासाठीं गेली

रोप वडाचं दिसलं

भूत बोले त्याच्यांतून

'नींघ वढाय कुठली !

व्हय चालती आठून'

आला राग कपीलाले

मालकाच्याकडे गेली

शिंग हालवत पाहे

माटी उखरूं लागली

तिचा मालक गोसाई

सम्दं कांहीं उमजला

'कोन आज कपीलाले

टोचीसनी रे बोलला?'

तसा गेला बांधावर

रोप हाललं हाललं

त्याच्यातून तेच भूत

जसं बोललं बोललं

टाके गोसाई मंतर

भूत पयीसनी गेलं

तसं वडाच्या रोपाचं

तठी जैर्‍ही रोप झालं

आरे जहरी बोल्याची

अशी लागे त्याले आंच

रोप वाढलं वाढल

झाड झालं जहराचं

मोठ्ठ झाड जहाराचं

गोसायाच्या शेतामधीं

ढोरढाकर त्याखाले

फिरकती ना रे कधीं

काय झाडाचं या नांव ?

नहीं मालूम कोन्हाले

आरे कशाचं हे झाड

पुसा गोसाई बोवाले !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.