चि त्रा व र
सं क ट

♣ * * * * * * ♣







  चित्रा काही दिवस माहेरी गेली होती. आईच्या हातचे खायला गेली होती. प्रेमळ वातावरणात गेली होती. तिची प्रकृती बरी होतो. सासूने हाल केले वगैरे तिने काही सांगितले नाही.

 "आई, फातमाचा लागला का ग पत्ता ? " तिने विचारले.

 "लागला असता तर कळवला असता. तिचे आजोबा वारले. लग्न झाल्यावर नवच्याकडे गेली. परंतु नवरा कोठे असता कळले नाही."

 "आई, आता परत कधी मला आणाल ?”

 "बाळंतपणासाठी ये."

 "आई, तुला मी एक सांगू ?"

 "काय ग ? "

 "काही नाही."

 "सांग. का नाही सांगत ? "

 "मनात येते एखादे वेळेस, की पुन्हा तुमची-माझी भेट होणार नाही. कदाचित् मी मरेन.

 "हे काय वेडे वेडे मनात आणतेस? असे नको हो मनात आणू. चांगला नवरा मिळाला आहे. सुखाचा संसार कर. आज ना उद्या मूलबाळ होईल. सारे चांगले होईल. वेडी आहेस तू चित्रा!"

 "आई, मनात येते ते सांगूही नये का ? तू मायेची म्हणून तुझ्याजवळ म्हटले."

 " परंतु आनंदात राहा. समजलीस ? तुला लवकर लवकर आणीत जाऊ हो. बाळंतपणालाच येशील असे वाटले होते, परंतु एखादीला नाही होत लवकर मूल. म्हणून का कंटाळलीस ? का सासू काही म्हणाली ? होईल मूल. अजून का वय गेले? हे सतरावे वर्ष. चांगली हस, खेळ.मनाला नको बाई लावून घेऊ."

 चित्रा उठून गेली. माहेरी तो लोकरीचा फ्रॉक करीत होती. चारूसाठी फ्रॉक. त्यात तिचा वेळ जाई. फ्रॉक तयार झाला. सासरी जायची वेळ आली. चारू न्यायला आला होता. चार दिवस आनंदात गेले. मेजवानी झाली.

 " फ्रॉक घालून पाहा ना."

 "घरी गेल्यावर घालीन."

 "चारू, जेथे तू नि मी आहो तेथे आपले घरच. येथे आहोत ना आता दोघे, मग येथे घर. घाल. मला बघू दे."

 चारूने फ्रॉक घातला.

 "छान दिसतो तुला !"

 "आता कोणाला करशील ? "

 "पुढे कधी बाळ होईल, त्याला करीन. "

 "मला आला असता, तर मी तुझ्यासाठी केला असता. खरेच ! "

 "वेडा आहेस तू चारू. बायकांचा जन्म का नाही घेतलास ? "

 "पुढच्या जन्मी आपण अदलाबदल करू."

 "चारू, उद्या निघायचेच का ? "

 "झाले आता चार दिवस. पुरे नाही का ? "

 "होय हो, पुरे. जाऊ हो उद्या."

 चित्रा व चारू गोडगावला आलो. सासूबाईंचा स्वभाव अद्याप पूर्ववतच होता. चित्राला मूलबाळ होणार नाही, तू दुसरे लग्न कर, असा आग्रह सासूचा चारूला सुरू झाला होता. परंतु चारू तिकडे लक्ष देत नसे.

 परंतु अकस्मात् चमत्कार झाला. सासू आता फारच चांगली वागू लागली. चित्रावर पोटच्या मुलीवर करावी तशी माया सासूबाई करू लागल्या. त्यांनी तिच्यासाठी लाडू केले. तिला उजाडत लाडू खायला देत. तिला आता काम नसत सांगत. गोड बोलत. तिला जवळ घेत.  "चित्रा, उगीच तुला त्रास दिला हो. जा हो ते विसरून. यापुढे तुला जणू मुलगी मानीन. तुला लागेल ते माग. समजलोस ना ! प्रकृतीची काळजी घे. चारू तुला टॉनिक देत असे मागे, त्याची बाटली आणवू का पुन्हा ?"

 "नको हो आई. आता बरी आहे प्रकृती, तुम्ही प्रेम द्या म्हणजे सर्व काही मिळाले."

 "देईन हो बाळ."

 आता अगदी शुक्लपक्ष होता. चित्रेच्या संसारात प्रेमाचे व सहानुभूतीचे चांदणे होते. दुःख, शोक, चिंता यांना जागा नव्हती.

 "चित्रा, मी नव्हतो सांगत, की आई पुढे निवळेल म्हणून ?"

 "मलाही वाटत होते, की ज्याच्या पोटी चारू येतो त्या कायमच्या कठोर कशा राहातोल? "

 "आता तू सुखी आहेस ना ?"

 "चारू, ज्या दिवशी मी पुत्रवती होईन, त्या दिवशी खरी सुखी होईन. तुझ्या मांडीवर बाळ देईन, तेव्हा मी धन्य होईन."

 "तीही इच्छा देव पुरवील."

 काही दिवस, काही महिने, असे आनंदात गेले. एके दिवशी सासूबाई सुनेजवळ काहीतरी बरेच बोलत बसल्या होत्या. कशाविषयी होते ते बोलणे ? आपण चला ऐकू, कळेल धागादोरा.

 "येशील ना माझ्याबरोबर? येच, माझ्या माहेरच्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. कितीदा तरी त्यांची पत्रे आली, की येताना चित्राला पण घेऊन ये म्हणून. ये माझ्याबरोबर. जरा तुला थारेपालट होईल. माझे माहेर फार छान आहे. मोठा गाव आहे. गावाबाहेर देवीचे देऊळ आहे. जंगलात आहे. तेथे तू , मी जाऊ. देवीला मुलासाठी नवस करू. ती देवी नवसाला पावते. पुत्रदादेवी असेच तिचे नाव आहे. तुला मूलबाळ होत नाही, म्हणून चारूसुद्धा खिन्न असतो. आपण जाऊ. त्या देवीला जाऊ."

 "येईन मी. आणि तुम्ही एकट्या गेल्यात तर मला येथे करमायचे नाही. तुमचा हल्ली लळा लागला आहे मला. माहेरची आठवण खरेच हो तुम्ही मला होऊ देत नाही. म्हणून तुम्हाला हल्ली मी आईच म्हणते. त्यांची आई ती माझीही आईच, येईन मी. देवीच्या पाया पडू."

 चित्राने चारूला ते सारे बोलणे सांगितले.

 "चित्रा, तुझा का अशा नवसांवर विश्वास आहे ?"

 "चारू,जगात चमत्कार नाहीत असे नाही. तुझे-माझे लग्न हाही एक चमत्कारच नाही का? कोठले दोन जीव आणि कसे एकत्र आले! आपण जर जरा खोल पाहू तर सर्वत्र चमत्कारच दिसतील, चारू, मी लवकर परत येईन. सासूबाई राहातील. तू येशील ना मला न्यायला ?"

 "पत्र पाठव म्हणजे येईन. चित्रा, मला का नाही घेऊन जात ? "

 "चारू, तू विचार ना सासूबाईंस."

 "परंतु मला तिकडे यायला आवडत नाही."

 "मला ते ठाऊक आहे. ती मुलगी तिकडे आहे. म्हणून ना ? "

 "तुला कोणी सांगितले ?"

 "साऱ्या जगाला माहीत आहे."

 एके दिवशी सासूबाईंच्या माहेरचे कोणीतरी त्यांना न्यायला आले होते. सासूबाई निघाल्या. चित्राचीही तयारी झाली.

 "चित्रा, लौकर ये हो."

 "चारू प्रकृतीस जप."

 "माझ्या प्रकृतीची काळजी तू घ्यायचीस, तुझ्या मी. खरे ना ?"

 "होय हो. मी लवकरच येईन."

 "आई, चित्राला लवकर परत पाठव हो."

 "चारू, असे काय वेड्यासारखे करतोस ? येईल ती. राहील आठ दिवस. कुठे परमुलखात नाही जात. तू तर आजोळी येतच नाहीस."

 "योग्य वेळी येईन."

 सासूबाई व चित्रा गेली. चारू आता घरी होता. चित्राच्या आठवणी काढीत बसे. मळ्यात जाऊन बसे.

 सासूबाईंचे माहेर मोठे होते. कितीतरी माणसे. कोणाचा कोणाला पत्ता नसे. त्या गावात मुसलमानांचीही बरीच वस्ती होती. सासूबाईंच्या माहेरी मुसलमान येत जात. कामकाज असे, व्यवहार असे.

.  चित्रा कोठे बाहेर असली, म्हणजे तिची सासू सारखी तिची निंदा करीत असे. 'तिला एकटीला तिकडे ठेवणे बरे नाही. चारू एखादे वेळेस गावाला जातो, ही वाटेल त्याच्याशी हसेल, खिदळेल काय, भीती वाटते ह्या पोरीची. आपली बरोबर आणली. डोळ्यांसमोर असलेली बरी' असे बडबडायची. एके दिवशी चित्राची सासू आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. त्या दोघींचे बोलणे चालणे चालले होते.

 “ तुझी मुलगी मी अजून सून म्हणून करून घेईन, परंतु युक्ती करायला हवी. ही चित्रा आहे तोपर्यंत चारू दुसरे लग्न करणार नाही. तो जणू तिचा गुलाम बनला आहे. चित्रा नाहीशी केली पाहिजे म्हणजे. त्याला वाटेल, की आई म्हणत होती त्याच मुलीशी मी लग्न करावे, अशी देवाची इच्छा तर नाही ? एकदा असा विचार त्याच्या डोक्यात आला म्हणजे काम झाले." चित्राची सासू म्हणाली.

 " मला एक युक्ती सुचते."

 "कोणती ? "

 "गावाबाहेरच्या देवीच्या देवळात नवसासाठी तुझी सून व तू जायचे. तेथे तिला कोणी पळवून नेईल अशी व्यवस्था करता येईल ! "

 "कोण नेणार पळवून ?"

 "तोटा गेला ! "

 "कोणी मुसलमान आहे वाटते ? "

 "चारूच्या आई, अहो बायका पळवून व्यापार करणा-या टोळ्या असतात. त्यात हिंदु-मुसलमान दोघेही असतात. मोठमोठ्या श्रीमंतांना, नबाबांना सुंदर बायका या व्यापा-यांकडून पुरविल्या जातात. या व्यापा-यांची हिंदुस्तानभर जाळी असतात. मी ती सारी व्यवस्था करत्ये."

 " आणि ही चित्रा आहे ना, ती लहानपणापासून मुसलमानांकडे म्हणे जात येत असे. तिची फातमा म्हणून एक मैत्रीण आहे. कोठे मसणात आहे ते देव जाणे. ती फातमा म्हणे हिला पानपट्टीसुद्धा करून देई, आपणाला कंडी उठवायला बरे, की एकाद्या मुसलमानाबरोबर गेली असावी. नाही का ?"  "हो. सारे जमेल, काहीही करून तुमच्या चारूच्या गळ्यात माझी चिंगी बांधायचीच. लहानपणापासून आपण ठरवले होते. परंतु चारू आडवा आला. थांब म्हणावे."

 "मग ठरवू या दिवस. "

 "शुक्रवार, मंगळवार नकोत. त्या दिवशी गर्दी असते. मध्येच एखाद्या दिवशी जा. येत्या बुधवारी चालेल ? "

 "हो चालेल,"

 "सायंकाळी हं"

 “ठीक."

 चारूची आई घरी परत आली. त्यांचे ते दुष्ट कारस्थान ठरले.

 "चित्रा, उद्या बुधवारी आपण पुत्रदादेवीला जाऊ हो."

 "आजच गेलो तर ? आज देवीचा वार आहे."

 "आज गर्दी असते. देवीची प्रार्थनासुद्धा नीट करायला मिळत नाही. देवीला सारे वार सारखेच. भाव हवा वार कोणता का असेना? अंगाखांद्यावर नको हो फार घाल. जरा रानात आहे देऊळ. न जाणो. कोणी भेटायचेसुद्धा. चोरबोर नसतात म्हणा; परंतु जपलेले बरे. तेथे नटूनथटून मिरवायला थोडेच जायचे आहे."

 "उद्या किती वाजता जायचे ? "

 "जाऊ तिसरे प्रहरी"

 "कोण कोण जाणार ? "

 "गर्दी नको. तू नि मी. मनापासून पाया पडू हो."

 " बरे."

 बुधवार उजाडला. आज काय असेल ते असो, चित्राला सारखी चारूची आठवण येत होती. जेवताना त्याचे घास तो घेत होती. तिच्या डोळ्यांतून मध्येच पाणी येई. आज देवीला जायचे. चारूला पत्र ठेवू का लिहून ? तो का आठवण काढतो आहे माझी ? त्याला लिहित्ये, की आज देवीला जात आहोत. मुख्य काम झाले, ये मला न्यायला. लिहावेच असे. ती जेवण झाल्यावर एका खोलोत गेली आणि चारूला पत्र लिहीत बसली.  प्रियतम चारू,

  काय रे तुला लिहूं ? तुझी आठवण अक्षरशः पदोपदी येते.

 देवीला आज जात आहे. मनोरथ पूर्ण होवोत. तू मला लवकर

 न्यायला. ये, तुझ्याशिवाय मला चैन नाही पडत. काही सुचत

 नाही. तुला पुष्कळ लिहावेसे वाटते. परंतु काय लिहूं ? किती

 लिहूं ?

  आज सारखे वाईट वाटत आहे. का बरे ? तू का माझी

 आठवण काढून रडत बसला आहेस ? वेड्या, रडू नकोस.

 बायका रडतात. पुरुषांना रडणे नाही हो शोभत. मला लवकर

 ने. मग आपण हसू. हो. ये लौकर.

      तुझी सदैव,

       चित्रा

 तिने पत्र पाकिटात घालून कोणाजवळ तरी टाकायला दिले.

 तिसरा प्रहर झाला, देवीला जायची तयारी झाली, खण, नारळ, वगैरे सारे घेण्यात आले. चारूची आई व चित्रा निघाल्या.

 "बरोबर गडी न्या." कोणी तरी म्हणाले.

 "कोणी नको, दोघी जाऊन येतो. भीती थोडीच आहे ?" चारूची आई म्हणाली.

 "गावातून दोधी बाहेर पडल्या. देवीच्या मंदिराचा रस्ता आता त्यांनी धरला. जरा दुतर्फा झाडी होती. रस्ता चांगला होता. मोटार जाईल असा रस्ता, इतक्यात हॉर्न वाजले, कोठे तरी मोटार आहे वाटते ?

 चालल्या दोघी पुढे. देवीचे मंदिर आले. तो जवळ एक मोटार उभी.

 चारूची आई व चित्रा मंदिरात गेल्या. परंतु इतक्यात चारूची आई काय म्हणाली, " चित्रा, ती खाली नदी आहे. तिच्या पाण्याने हातपाय धुवून ये जा. मग देवीची ओटी भर. जा बेटा."

 चित्राला खरे वाटले, ती मंदिरातून बाहेर पडली. इतक्यात कोणी तरी. एकदम तिच्या तोंडावर बुरखा टाकला. तिच्या तोंडात बोळा कोंबला गेला. ती थोडी ओरडली. धडपडली. परंतु त्या दांडग्या लांडग्यांनी त्या हरणीला घट्ट धरले. तिला मोटरीत टाकून ते पळून गेले.  चारूची आई एकटीच रडत ओरडत घरी आली.

 "काय झाले ? चित्रा कोठे आहे ? " सर्वांनी विचारले.

 "गेली हो. कोठे गेली ? मी आपली देवळात वाट पाहात आहे. हिचा पत्ता नाही. नदीवर हातपाय धुवायला म्हणून गेली. बराच वेळ झाला . मी जाऊन पाहात्ये, तो कोणी नाही. तेथे डोह वगैरे नाही. खळखळ वाहणारे गुडघाभर पाणी. कोठे गेली ? का कोणाबरोबर पळाली? चारूला मी नेहमी म्हणायची, को ही बया चांगली नाही म्हणून. परंतु तो लक्ष देत नसे. तो तिला सैल सोडी, चांगले चौदावे दाखवायला हवे होते. कोठे गेली कार्टी ? काळिमा फाशील सर्वांच्या तोंडाला. आता चारूला काय सांगू ? काय लिहू ? जा तुम्ही तरी. बघा कोठे सापडत्ये का ? " लोक शोधायला गावभर गेले. परंतु चित्राचा पत्ता नाही.

 " तिने कोणाजवळ काही ठरवलेले असावे." एकजण म्हणाला.

 "या गावात बाहेरगावचे पुष्कळ रंगेल तरुण येतात. दिसतात गुलजार, गेली असेल पळून. दिला असेल कोणी विडा !" आणखी कोणी म्हणाला, “आणि आज बुधवारी जायची गरज तरी होती ? मंगळवार शुक्रवारी गर्दी असते. तिला गर्दी नको होती. एकान्त हवा होता." तिसरा बडबडला.

 " मी तिला चांगली सांगत होत्ये को शुक्रवारी जाऊ. तर म्हणे कशी, की गर्दीत प्रार्थना मनापासून नाही करता येत. बुधवारीच जाऊ. अगदी एकटी जाणार होती. म्हणे कशी, कोणी नको बरोबर. परंतु मी म्हटले, की कोणी नको तर नको. परंतु मी येईन बरोबर. तिने कोणाजवळ तरी ठरवले असावे." चारूची आई म्हणाली.

 " हा शिक्षणाचा परिणाम." एक सदगृहस्थ उद्गारले.

 "आता चारूला कळवा." कोणी सुचवले.

 "काय, कळवा काय ?" एकाने विचारले.

 "कळवा, चित्रा कोणाचा हात धरून गेली. जाऊ दे, दुःखी होऊ नकोस. येथे दुसरी मुलगी तयार आहे, तुझ्या आईच्या मैत्रीणीची. तुझ्यासाठीच जणू तिचे अद्याप कोठे जमले नाही. देऊ बार उडवन, असे लिहा." एका शिष्टांनी तपकीर नाकात कोंबीत सांगितले.