चित्रा नि चारू/सासूने चाललेला छळ

सा सू ने
चा ल व ले ला छ ळ

♣ * * * * * * ♣









 चित्रा नि चारू परस्परांस अनुरूप होती. सुखाला वास्तविक तोटा नव्हता. परंतु सासू मनात चरफडत होती. चित्रा नि चारू यांचा बेबनाव व्हावा असे तिला वाटत होते. चारूच्या मनात चित्राबद्दलचे जे अपार प्रेम होते ते नष्ट व्हावे असे तिला वाटत होते. चारूने चित्राचा त्याग करावा आणि आपल्या मैत्रिणीच्या मुलीशी त्याचे दुसरे लग्न लावावे असे ती मनात योजीत होती.

 चित्रा सुखात वाढलेली होती. फारसे कामकाज करण्याची तिला सवय नव्हती. परंतु गोडगावला पिठाची गिरणी नव्हती. घरीच दळावे लागे. मोलकरणी दळीत, परंतु सासू मुद्दाम चित्राला दळायळा लावी. चारू शेतावर गेलेला असावा आणि इकडे सासूने दळण द्यावे.

 " लौकर दळ, चारू शेतीवरून यायच्या आधी झाले पाहिजे. समजलोस ? तुम्ही शहरच्या पोरी. परंतु येथे खेड्यात नाही हो नुसते बसून चालणार. येथे चार धंदे करायला हवेत. चांगले बारीक दळ. परवा पसाभर फक्त डाळ दिली हरभ-यांची दळायला, तर नुसता भरडा काढून ठेवलास. आणि चारूला हात दाखवलंस वाटतं ? जसे फोड़च आले असतील हातांना ! आम्ही पायली पायली हातांनी दळतो. मोठी नाजूक राणी. कोणा कलेक्टराशी बापाने लावायचे होते लग्न. येथे गांवढ्यात कशाला दिली ? तरी मी पहिल्यापासून सांगत होते, की शहरी मुलगी करू नका. परंतु या चारूचा चावटपणा. येतील म्हणावं अनुभव. हा चारूच उद्या म्हणेल, की नको ही बया, नखरेबाज चढेल मुलगी कोणाला आवडेल ? घे की ते दळायला ! रडायला काय झाले ? ढोंगे येतात करायला." सासू वा पट्टा चालला होता. चित्राने जाते घातले. ती दळीत होतो. दोन्ही हातांनी दळीत होती. तिला जाते ओढेना. तरी कष्टाने दळीत होती. इतक्यात शेतावरून चारू आला. तो चित्रा तेथे दळीत आहे. डोळ्यात पाणी आहे.

 "चित्रा, ये. आपण दोवंजणं मिळून दळू. ये. रडू नकोस आता. हस."

 " चारू, नको, तू जा. सासूबाई रागावतील. माझी लाज राख. जा."

 "मी नाही जाणार. मी तुला हात लावणार."

 " नको रे चारू. माझी फजिती का करायची आहे ? गडीमाणसे येतील, मोलकरणी येतील. मला हसतील, म्हणतील, त्यांना दळायला बसवलं. जा हो चारू. तुझे माझ्यावर प्रेम आहे, ते दळायला लागून नको हो दाखवायला, जा, जा."

 "मी जाणार नाही. घाल दाणे. "

 "हट्टी आहेस तू चारू."

 "आणि तुही हट्टी आहेस."

 "बरे ये. दळू दोघं. तू गेलास म्हणजे सासूबाई याचे उट्टे काढतील."

 "तू आपली नेहमी माझ्याबरोबर राहात जा."

 "नेहमी कशी तुझ्याबरोबर येऊ ? असा काय धरतोस खुंटा ? "

 " तुला तरी कोठे माहीत आहे ? दळले आहेस का घरो कधी ?"

 दोघे दळत होती. चित्रा आनंदली होती.

 " चित्रा, ओवी म्हण की. बायका ओव्या म्हणतात."

 "मला नाही येत."

 "एकदोन तरी येत असतील हो. म्हण, "

 आणि चित्राने ओवी म्हटली,

  दळण दोघे दळू  हात दोघांचे लागती
  चित्रा नि चारू यांची  एकमेकांवरी प्रीती ।।
  एकमेकांवरी प्रीती  वाणीने मी व किती
  एकमेकांच्या हृदयी  एकमेकांची वसती ।।
  चारुराया चित्रा शोभे  जशी चंद्राला रोहिणी
  पतीला ती निज प्रेमे  घाली सदैव मोहिनी ।। अशा ओव्या चालल्या होत्या. तो सासूबाई आल्या.

 झालं का ग दळण ? आणि हे काय? चारू, तू का दळत बसलास ? अरे, तुला लाज कशी नाही ? इतका काय बाईलवडा ! साहेब नि मड्डम जणू ! दळू दे तिला. काही मरत नाही पसाभर दळून. ऊठ. सारा गाव तोंडात शेण घालील, गडीमाणसे काय म्हणतील ? आणि हिने तुला बोलावले असेल, लाज नाही मेलीला. केव्हाचे दळायला दिले आहे. तरी सांगितले होते तीनतीनदा बजावून, की, तो शेतावरून यायच्या आधी आटप म्हणून, ऊठ हो."

 "आई, अग दळले ज़रा म्हणून काय झालं ? व्यायाम होतो."

 "इतके दिवस नाही कधी दळायला आलास तो. आईला हात लावला होतास का दळताना कधी. बायकोवर माया. काल आली नाही तर तिच्याबरोबर दळायला लागला. आईने जन्मभर खस्ता खाल्या त्याचे काहीच नाही."

 "चारू, जा हो तू." हळूच चित्रा दुःखाने म्हणाली. चारू उठून गेला. चित्रा दळत बसली. तिनं कसेबसे दळण संपवले, आज तिच्या हाताला खरेच फोड आले. पुन्हा दुपारी भाडी घासायची. फोड झोंबत.चित्राला रडू येई.

 असे दिवस जात होते आणि त्यातच दुःखाची गोष्ट म्हणजे चित्राच्या वडिलांचीही दूर बदली झाली. त्या दिवशी ती माहेरी गेली होती. वडील जाणार होते. सारी भावंडे जाणार होती. चारूही आला होता.

 "आजच येतेस का ? "

 " आज नको. पण मला न्या हो."

 " नेईन हो बाळ, तुझे कसे चालले आहे? सासूबाई आताशा कशा वागतात ? "

 "सासूबाईंशीं मला काय करायचे आहे ? माझे माणूस मोलाचे आहे. लाखात असे सापडायचे नाही. बाबा, खरेच हो, चारू म्हणजे प्रेमसिंधू आहे. तुम्ही काळजी नका करू. पत्र पाठवीत जा हा मला."

 "पाठवीन हो."

 इतक्यात श्यामू, रामू, दामू आले.  "ताई, आम्ही चाललो. "

 "आता भाऊबीजेला या." ती म्हणाली.

 "तूच ये आमच्याकडे. तुझ्याकडे आम्ही आलो तर तुझी सासू मारील. ताई, मारकुटी आहे का ग ती ? तुला खरेच तो मारते ?" रामूने विचारले.

 "नाही हो मारीत. त्यासुद्धा आता प्रेम करतात माझ्यावर. असे बोलत नका जाऊ हो कोठे." अणि चित्रा उठून गेली. आई जवळ गेली. सीताबाई आवराआवर करीत होत्या.

 "चित्रे, सांभाळ हो. सासूचा स्वभाव निवळेल हो. असतात काही खाष्ट सास्वा. परंतु पुढे त्याही चांगल्या वागू लागतात. तुला मूलबाळ झाले म्हणजे सारे ठोक होई. आजच्या मांडीवर नातवंड खेळू लागले म्हणजे नातवंडाची आईहो मग आवडू लागते. "

 " आई, तू चिता नको करू. मला किती त्रास झाला तरी चारू दोन शब्द बोलला, की मी पुन्हा हसू लागते."

 " असेच तुमचे प्रेम राहो."

 इतक्यात चारू तेथे आला.

 "आमची चित्रा सांभाळा हो." सीताबाई म्हणाल्या.

 "मला सांभाळण्यापेक्षा तिला अधिक सांभाळीन, खरे ना चित्रा ? "

 " खरे हो."

 " चित्रा, चल आपण स्टेशनवर पुढे जाऊ. तिकिटे काढू. येतेस ?"

 "चला जाऊ."

 दोघे स्टेशनवर गेली. त्यांनी तिकिटे काढली. सामान आले, काही आधीचं पाठवून दिले होते मालगाडीने. हे सारे बरोबर न्यायचे होते. मंडळी सारी आली. गावातीलही काही मंडळी आली होती. शिपाई आले होते. बळवंतराव लोकप्रिय होते. निरोप द्यायला शेवटी शेवटी बरीच गर्दी झाली, कोणी माळाही घातल्या. कोणी भेटी आयत्या वेळेस आणल्या. आता थोडा होता वेळ. श्यामू , रामू ,दामू, बसले गाडीत. सीताबाई बसल्या. बळवंतरावही बसले.

 चित्रा व चारू खाली उभी होती. शिट्टी झाली.  "जपा हो. " बळवंतराव म्हणाले.

 "ताई, चाललो." भावंडे म्हणाली.

 "जप हो." सीताबाई स्फुदत म्हणाल्या.

 चित्राला बोलवत नव्हते. सुटली गाडी. चित्रा व चारू परतली. गाडी घेऊन ती आली होती. बसली दोघे घोड्याच्या गाडीत व निघाली. गडी हाकलीत होता. चारू व चित्रा आत होती. चित्राच्या डोळ्यात राहून राहून पाणी येत होते.

 "चित्रा, उगी. रडू नको. मी आहे ना ? "

 " होय हो चारू. परंतु वाईट वाटते हो.”

 "वाईट वाटायचेच. "

 गाडी घरी आली नाही तो सासूची गर्जना सुरू !

 म्हटलं येता की नाही घरी, की राजाराणी जातात पळून. किती हा उशीर ! चारू, तू अगदी नंदीबैल होणार की काय ? ती नाचवील तसा तू नाचतोस. सिनेमा पाहून आला असाल ? उगीच नाही इतका उशीर झाला. शहरातल्या सवयी, सिनेमे हवेत आणि सिनेमातल्यासारखे उद्या करालसुद्धा."

 "आई, अग गाडीची वेळ बदलली आहे. गाडो सुटली नि तश्शी परत आलो. का उगीच बोलतेस ? आता आम्ही का कुकुली बाळे ? ‘पाहिला सिनेमा म्हणजे का पाप झाले ? तुसुद्धा मधूनमधून पाहातेस."

 "परंतु देवाधर्माचे आम्ही पाहातो."

 "आम्ही वाटते वाईट असतात तेच पाहातो ? काही तरी आपले बोलतेस."

 “ बरे हो, नाही बोलणार. तुम्ही आता मोठी झालीत. कोण बोलणार तुम्हाला. वाटेल तशी नाचा. उद्या तोंडाला काळे फासू नका म्हणजे झाले.”

 असे दिवस जात होते. आणि एकदा चारूला कोठेतरी लांब जायचे होते. महत्त्वाचे काम होते.

 "चारू, जाशील ना तु ?" बापाने विचारले.

 " होय बाबा, हवे ना जायला ?"  “हो. तू नाही तर मी गेले पाहिजे. मला जरा बरे नाही वाटत. तू ये जाऊन."

 "बरे."

 चित्राला वाईट वाटत होते. चारू तिला धीर देत होता.

 "चित्रा, तुलासुद्धा मी बरोबर नेले असते, परंतु ते बरे नाही दिसणार. मी लौकरच येईन. आईला सांगून ठेवीन. आणि जरा धीटपणाने वाग.आई बडबड करील तिकडे लक्ष नको देत जाऊ,हो."

 "चारू, तू जवळ नसलास म्हणजे माझा जीव खाली वर होतो. पाण्याविणे मासा तसे होते. तूच हो एक माझा आधार. तुझ्याशिवाय मला कोण आहे ? तू माझे जग, तू माझा देव. वाटते, की तु नि मी कोठे तरी दूर दूर जावे. नको हे जग, दुष्ट जग ! "

 "चित्रा, हे जग का दुष्ट आहे ? या जगातच तू नि मी आहोत. तुझी फातमा आहे. तुझे आईबाप, भावंडे, सारी आहेत. जगात बरे, वाईट सारे आहे. ब-याकडे लक्ष देऊन आशेने व आनंदाने राहावे, "

 "राहीन हो आनंदाने, ये जाऊन, "

 चारू गेला. चित्राची आता दीनवाणी स्थिती झाली. जहागीरदारही चार दिवस निर्मळपूरलाच औषधासाठी जाऊन राहिले. घरी केवळ सासूचे राज्य. चित्राचे हाल आता कुत्रा खाईना. तिला पहाटे सासू उठवी. खटाळभर भांडी घासायला लावी. धुणी धुवायला लावी. तिला शिळे खायला वाढी, दळायला लावी आणि शिव्या येता जाता आहेतच.

 रात्री बारा वाजता थकलीभागलेली चित्रा आपल्या शयनमंदिरात जाई. परंतु एके दिवशी सासू म्हणाली,

 "वर नाही निजायचे ! खालीच स्वयंपाकघरात झोपत जा. गाद्या हव्यात लोळायला. तो येईपर्यंत नाही वर झोपायचे. समजलीस ? त्या खोलीला मी कुलूपच लावत्ये," आणि खरेच त्या सासूने चित्राच्या खोलीला कुलूप लावले. क्षणभर जाऊन बसायला, रडायला जागाही नाही. स्वयंपाक घरातच तिला निजावे लागे. तेथे ओल असे. डांस असत. निजायला फटकूर मिळे. पांघरायलाही धड नाही. अरेरे, चित्रा. काय ही तुझी दशा !  परंतु सासरा निर्मळपूरहून परत आला.

 " चित्रा, तुझ्या खोलीला कुलूपसे ? "

 "सासूबाई म्हणतात खालीच निजत जा."

 " दुष्ट आहे ही. मी सांगतो हो तिला. "

 आणि सास-याने सांगितले.

 "काही नको वर निजायला ! मला या मुलीचा काडीचा भरंवसा नाही. घरात तुम्ही नव्हतेत. चारू नाही. ही आपली दिवसासुद्धा वर जाऊन गादीवर लोळायची. लाजच नाही मेलीला. म्हणून कुलूपच लावले. वर गेलीस तर तंगडी तोडीन म्हटले. खाली अस माझ्या डोळ्यांसमोर, उद्या काही केलेन् नि तोंडाला काळे फासलेन् तर करता काय ? यांचे होतील खेळ, आपली मान खाली. तुम्ही म्हणत असाल तर उघडत्ये कुलूप. लोळे की नाही ! माझे काय जाते ? आणखी म्हणावं चार गाद्या घाल."

 चित्राचे मंदिर उघडले. त्या दिवशी रात्री चारूचा फोटो जवळ घेऊन ती रडली.

 "चारू, ये रे लौकर परत. तू येईपर्यंत मी जिवंत तरी राहीन की नाही कोणास ठाऊक ! परंतु तुझ्यासाठी मला जगले पाहिजे. मी गेल्यावर तू रडशील, दुःखी होशील, जगेन हो. तुझ्यासाठी जगेन चारू, तुझाच एक मला आधार आहे हो."

 असे त्या फोटोला हृदयाशी धरून ती म्हणत होतो.

 चित्रा अशक्त झाली, आजाऱ्यासारखी दिसू लागली. परंतु चारू आला. चित्राची दशा पाहून त्याला वाईट वाटले.

 "चित्रा, आईने तुझे हाल केले. होय ना ?"

 "नाही हो चारू. ज्या मातेच्या पोटी तुझ्यासारखे रत्न आले, तिला मी कशी नाव ठेवू ? सासूबाईंचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तुझी देणगी त्यांनी मला दिली आहे. त्यांनी किती छळले, कितो त्रास दिला, तरी तो मला गोड करून घेतला पाहिजे. कारण तुझे जीवन त्यांनी मला दिले आहे चारूचे पृथ्वीमोलाचे रत्न जिने माझ्या पदरात घातले, तिला मला दोन शब्द बोलण्याचा अधिकार आहे. खरे ना चारू?"  "चित्रा, कोठे शिकलीस असे बोलायला ?"

 "तुझे प्रेम शिकवते. तुझा फोटो मला शिकवी."

 "तू इतकी अशक्त कशी झालीस ? "

 "तू येथे नव्हतास म्हणून. तुझे दर्शन म्हणजे माझा खरा आहार. तुझे दर्शन म्हणजे अमृत. तू येथे असलास म्हणजे मला अन्न गोड लागते. तू नसलास म्हणजे सारे कडू वाटते. घास जात नाही मग. म्हणून हो मी अशक्त झाल्ये."

 " तुला मी टॉनिक आणीन."

 " वेडा आहेस तू."

 "तू घेतले पाहिजेस."

 "चारू, माझे टॉनिक तू हो. तू आलास. आता बघ माझी प्रकृती सुधारेल."

 "तरीसुद्धा टॉनिक घे. माझ्यासाठी घे."

 " तुझ्या आनंदासाठी घेईन. चारू, तुझ्यापुढे मला नाही म्हणता येत नाही. तुझी इच्छा म्हणजे माझा धर्म. तुझी इच्छा म्हणजे माझा कायदा."

 "चित्रा, ही गुलामगिरी आहे. तू का माझी गुलाम आहेस ? "

 "वेडा आहेस तू चारू ? फातमा कबीराचे एक गाणे म्हणे. कबीर देवाला म्हणतो,
   'मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा।
    तूं साहेब मेरा ।'

 चारू, रामाचे दास होणे म्हणजेच मुक्त होणे. कधी कधी दास्य म्हणजेच मुक्ती असते, कारण ते दास्य स्वेच्छेचे असते. लादलेले नसते. चारू, तू ज्याला गुलामगिरी म्हणतोस त्याला मी आत्मसमर्पण म्हणते व समर्पण, स्वतःचे समर्पण हेच माझे समाधान. समजले ना ? "