चिमुकली इसापनीती/चिमणी आणि मुंगी

एक लहानशी मुंगी नदीवर पाणी पीत होती. पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि ती नदीत पडली. जवळच एका झाडावर एक चिमणी बसली होती. ती फार दयाळू होती. मुंगी सारखी वाहून चालली होती. हे पाहून चिमणीने झाडाचे एक पान तोडले आणि ते नदीत टाकले. पानावर बसून तरंगत मुंगी जमिनीवर आली. नंतर काही वेळाने एक मुलगा तेथे आला. तो हातातील गोफणीने पाखरे मारीत असे. चिमणीला पाहताच मुलाने एक दगड उचलला आणि गोफणीचा नेम धरला. हे पाहून मुंगीने विचार केला की, चिमणीने मला मघाशी मदत केली आणि मला वाचवले. आता ती मरत आहे, तर मी तिला मदत केली पाहिजे. मग मुंगी हळूच जाऊन मुलाला कडकडून चावली. मुंगी चावताच मुलाचा नेम चुकला आणि गोफणीतून दगड खाली पडला. दगडाचा आवाज ऐकून चिमणी भूर्रकन उडून गेली. पहा. मुलांनो, आपण लोकांना उपयोगी पडलो तर लोक आपणाला उपयोगी पडतात.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.