चिमुकली इसापनीती/लबाड गाढव
एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |